शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

घराघरातील आवड– शेवगा!

शेवग्याचे झाड. सर्वत्र दिसणारे. त्याच्या निदान शेंगाची भाजी प्रत्येक घरात होत नाही असे घर मिळणार नाही. काही भागात शेवग्याच्या पानांचीही भाजी करण्यात येते. साल, मूळ यांचे औषधी उपयोग आहेत. असे हे शेवग्याचे झाड शेताच्या बांधावर, परसामध्ये असले पाहिजे. शेवग्याच्या झाडालाही आईचे झाड, जादूचे झाड अशी नावे त्याच्या गुणामुळे मिळाली आहेत. अशा या शेवग्याच्या फळाविषयी, झाडाविषयी… सारे काही!  

_________________________________________________________

ll १ ll

शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या नाहीत, असा माणूस मिळणे दुर्मिळ! शेवगा हे महाराष्ट्रातील अनेकांच्या परसात फुलणारे झाड. कसेही वाढणारे. मनमौजी. त्याच्या सौंदर्यात अनेकांना फारसे काही दिसत नाही. कशाही वाढणाऱ्या फांद्या. अतिशय हलके आणि कमजोर लाकूड. संयुक्त पान असूनही कडुनिंब, चिंचेसारखी नियमितता न जपणारे. असे सारे काही असूनही, बावनकशी सोन्यासारखे, सर्वप्रिय, सर्वगुणसंपन्न. त्याच्या औषधी गुणधर्मांची जसजशी माहिती लोकांना समजू लागली आहे तसतसे हे झाड आणखी लोकप्रिय बनत आहे. सहज बांधावर वाढणाऱ्या या झाडाची आज खास शेती करण्यात येते. बेशिस्तपणातही त्याचे सौंदर्य खुलून दिसते. फुललेला, मंद गंध प्रसवणारा शेवगा तर अनेकांना मोहीत करतो. अनेक कुटुंबाचा शेवग्याची भाजी खाल्ली जात नाही, असा आठवडा जात नाही.

भूगोलातील काही सिद्धांतानुसार भारतीय उपखंड, अरबस्तान आणि आफ्रिका खंड हे सर्व सलग भूभाग होते. पुढे हे भूप्रदेश परस्परांपासून दूर गेले. शेवग्याचे मूळ या भागातील मानले जाते. भारतातील पश्चिम हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये या झाडांचे मूळ असावे, असा काही संशोधकांचा दावा आहे. तर काही संशोधकांच्या मते आग्रा, दिल्ली या भागात शेवग्याची झाडे प्रथम आली असावीत. उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील पानगळ वृक्षांच्या प्रदेशात हे झाड चांगले वाढते. भारतातील बहुतांश सर्व राज्यांमध्ये हे झाड अनेक वर्षांपासून लावण्यात येत आहे. काही संशोधकांच्या मते, ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपासून भारतात शेवगा आहारात वापरला जात असावा. भारताप्रमाणेच अरब राष्ट्रे, आफ्रिका, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांतही हा वृक्ष अनेक वर्षांपासून आढळतो. सध्या दक्षिण अमेरिकेप्रमाणे उत्तर अमेरिकेतही शेवग्याची लागवड होऊ लागली आहे. यामध्ये फ्लोरिडा आघाडीवर आहे. शेवग्याचे झाड मध्यम उंचीचे असते. झाडाची उंची दहा ते पंधरा फूट वाढते. क्वचित त्यापेक्षा जास्त उंच वाढते. शेवग्याचे झाड वीस ते पंचवीस वर्षे जगते.

मराठीमध्ये शेवगा, शिवगा, सुज्ना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झाडाला इतर भाषांतूनही भरपूर नावे आहेत. हिंदीमध्ये मुनागा, मुंगारा, सहिजना, सरिंजना, सेग्रा, शाजमाह, शाजना, सोंजना, सैंजना या नावाने ओळखले जाते. ओडियामध्ये सांजना, सैजना, सौंडल नावे आहेत. बंगालीमध्ये सुजना, सैजना, सोज्ना, कन्नडमध्ये नुग्गेकई, नुग्गेकोडू, नुग्गा इगिपा, नुग्गे, नुगे, नुग्गी मारा, मोचका, गुग्गल, मल्याळममध्ये सिग्रु, मोरिंगा, मुरिंगा, मोरूना, कोकणीमध्ये मुसिंग, मोसिंग, गुजरातीमध्ये सरगावो, सरगतो, मिधो-सरगावो, सुरगावो, सेगलो, सरगतो, पंजाबीमध्ये सोंजना, संजिना, सिंधीमध्ये स्वंजेरा, तेलुगुमध्ये तेलामुनगा, मुलागा, साजना या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याच्या गुणावरून आणि उपयोगावरून विविध नावे प्राप्त झाली आहेत. कसेही वाढणारे म्हणून शोभांजन, विविध व्याधींपासून मुक्ती देणारे म्हणून मोचक, मुरंगी, शिग्रु अशी अनेक नावे आहेत. इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक ट्री, हॉर्सरेडिश ट्री, मदर्स बेस्ट फ्रेंड, रॅडिश ट्री, वेस्ट इंडियन बेन या नावाने ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. मल्याळम भाषेतील मोरिंगा किंवा संस्कृतमधील मुरंगी नावावरून प्रजातीचे नाव मोरिंगा असेच घेण्यात आलेले आहे. या झाडांच्या बियापासून तेल मिळते म्हणून ऑलिफेरा घेण्यात आले आहे. याचे दुसरे शास्त्रीय नाव मोरिंगा टेरिगोस्पर्मा असे आहे. याच्या बियांना पंख असल्याने टेरिगोस्पर्मा असे नाव देण्यात आले आहे. शेवग्यास ‘शिगॉन’ असे नाव सुश्रुतसंहितमध्ये आढळते.

शेवग्याचे झाड मुलत: बियांपासून वाढते. शेवगा जलद वाढणारे झाड आहे. तीन महिन्यांमध्ये ते आठ ते दहा फुटांपर्यंत वाढते. फांद्यांपासूनही झाडे बनवली जातात. मोठ्या झाडाची फांदी तोडून जमिनीत मातीमध्ये घुसवली आणि पाणी दिले की त्यापासून झाड बनते. असे शाखीय पुनरूत्पादन आजही ग्रामीण भागात केले जाते. शेवग्याचे बी मातीत पडले आणि त्यास पाणी मिळाले की रूजते. शेवग्याच्या बिया वाऱ्यापासून दूर उडत जातात आणि त्याचा प्रसार होतो. पाण्याचा निचरा होणारी कोणतीही जमीन शेवग्याला चालते. बी रूजताच त्यापासून कोंब बाहेर येतो आणि जमिनीत मुळे घुसायला सुरुवात होते. बियांपासून वाढणाऱ्या शेवग्याच्या झाडाला सोटमूळ असते. शेवग्याचा जमिनीवरील भाग अवर्षणामुळे पाणी कमी पडले तर वाळून जातो. मात्र सोटमूळ जिवंत असते. पाऊस पडल्यानंतर त्याला पुन्हा फुटवा फुटतो. त्यामुळे झाडाचा वरचा भाग वाळला तरी झाड मरण पावले असे समजून ते नष्ट न करता मूळ जिवंत आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक असते. पांढरट हिरवा कोंब अतिशय सुंदर दिसतो. या रोपांना सुरुवातीला पाणी द्यावे लागते. एकदा झाडाने चांगले मूळ पकडले की पुढे पाणी देण्याची गरज भासत नाही. जमीन चांगली असेल आणि पाणी मिळत असेल, तर झाडाची वाढ चांगली होते. जमीन मुरमाड, हलक्या प्रतीची असेल तर झाड टिकते, मात्र व्यवस्थित वाढत नाही. त्याला सुरुवातीपासून संयुक्त पाने यायला सुरुवात होते. या पानाचा एक देठ असतो. हा देठ पोपटी किंवा तपकिरी रंगांचा असतो. हा देठ खोडाला जोडलेल्या ठिकाणी फुगीर असतो. त्यापासून अनेक देठाच्या शाखा फुटतात. या शाखांना टिकल्यासारख्या एक गोलाकार आणि लंबगोलाकार पर्णिका असतात. पानाचा एकूण आकार नेहमीच्या कदंबाच्या मोठ्या पानासारखा असतो. पर्णिका पातळ असतात. या पानांची लांबी दोन फुटापर्यंत असते. पर्णिका अतिशय पातळ असल्याने हलक्या वाऱ्यातही हलतात. पाने पातळ आणि नाजूक असतात. पानांच्या कडेला नाजूक पिवळ्या रंगाची नाजूक कडा असते. त्या सोनेरी वर्खामुळे पानाचे सौंदर्य खुलून दिसते.

शेवग्याच्या पानांतही मोठ्या प्रमाणात पौष्टिकतत्त्वे असतात. वाळलेल्या पानांची १०० ग्रॅम पावडर घेतली तर त्यामध्ये साडेसात टक्के पाणी असते. त्यापासून २०५ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. त्यामध्ये २७.१ ग्रॅम प्रोटिन्स, २.३ ग्रॅम मेद, ३८.२ ग्रॅम कार्बोहायड्रेट, तंतूमय पदार्थ १९.२ ग्रॅम असतात. यामध्ये कॅल्शियम २००३ मिलीग्रॅम, मॅग्नेशियम ३६८ ग्रॅम, फॉस्फरस २०४ मिलीग्रॅम, पॉटेशियम १३२४ मिलीग्रॅम, लोह २८.२ मिलीग्रॅम तर सोडियम ८७० मिलीग्रॅम असे मूलद्रव्यांचे व क्षारांचे प्रमाण असते. शेवग्यामध्ये जीवनसत्व ‘अ’ (१६.३ मिलीग्रॅम), बी-१ (२.६४ मिलीग्रॅम), बी-२ (२०.५ मिलीग्रॅम), बी-३ (८.२ मिलीग्रॅम), सी (१७.३ मिलीग्रॅम) आणि इ (११३ मिलीग्रॅम) आढळतात. त्याचबरोबर अमिनो आम्ले आणि ऑक्झॅलिक आम्लेही आढळतात.

शेवग्याची पाने शेळ्या, मेंढ्या यांना विशेष प्रिय असतात. शेवग्याचे मोकळ्या रानात उगवलेले रोप त्यांच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे जंगलात शेवग्याची झाडे फार दिसत नाहीत. हरिण, काळवीट असे प्राणीही शेवग्याच्या पानांवर ताव मारतात. त्यामुळे खास लावलेल्या झाडांना संरक्षक कुंपण घालावे लागते. शेळ्या-मेंढ्या जवळ असताना झाडाच्या फांद्या काढतात. त्याही विनाविलंब पाला फस्त करतात. पाने अतिशय पातळ असल्याने खाली पडून तशीच राहिली तर पातळ थर तयार करतात. त्यामुळे जमीन घट्ट झाल्यासारखी होते आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात पिकाची वाढ चांगली होत नाही. मात्र ही माती जर हलवली आणि मोकळी ठेवली तर पीक चांगले येते. मात्र शेवग्यामुळे पीक येत नाही, या भावनेने अनेकजन बांधावर शेवगा ठेवत नाहीत. 

झाड एकाच खोडासह सात फुट वाढत जाते. त्यानंतर त्याचा वरचा कोंब हलका खुडला जातो. त्यामुळे त्याला फांद्या फुटतात. फांद्याही सरळ वरच्या बाजूला वाढू लागतात. मात्र त्या कशा वाढत जातील, हे निश्चित सांगता येत नाही. फांद्याला फांद्या कोठे फुटतील, हे नेमके सांगता येत नाही. फांद्या पुढे बऱ्यापैकी वाढल्यानंतर खाली झुकतात. पसरट पाने असणारा शेंडा वाऱ्याबरोबर झुलत राहतो. शेवग्याच्या झाडाच्या फांद्या विरळ असतात. त्यामुळे शेवग्याच्या झाडापासून गर्द सावली मिळत नाही. झाडाचे खोड जसे वाढत जाते, तसा त्याचा बाह्यरंग पांढरा व्हायला सुरुवात होते. बुंध्याचा व्यास दोन फुटांपर्यंत वाढतो. शेवग्याची साल मऊ असते. त्यावर बारीक ठिपके असतात. खूपच जुन्या झाडाची साल करड्या रंगाची बनते. शेवग्याची साल दोन सेंटिमीटरपर्यंत जाड असते. सालीच्या आत असणारे लाकूड पांढरट पिवळे असते. लाकूड वजनाला अतिशय हलके असते. तसेच ते ठिसूळ असते. त्यामुळे त्याचा बांधकामासाठी, शेतीच्या अवजारासाठी उपयोग होत नाही. या लाकडाचा जळण म्हणूनही उपयोग होत नाही. शेवग्याचे लाकूड जळण म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला, तर मोठ्या प्रमाणात धूर होतो. त्यामुळे शेवग्याचे लाकूड वृत्तपत्रीय कागद तयार करणे, कापड व्यवसायातील किरकोळ कारणाखेरीज उपयोगी पडत नाही.

शेवग्याच्या झाडांची पाने हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये गळतात. गळणाऱ्या पानांचा रंग पिवळा झालेला असतो. झाडाखाली पिवळ्या पानांचा सडा पडलेला असतो. काही दिवसांतच नवीन पाने यायला सुरुवात होते. रोप लावल्यापासून आठ ते नऊ महिन्यांमध्ये झाडाला कळ्या येतात. शेवग्याच्या झाडाचा फुलण्याचा हंगाम साधारण जानेवारीपासून सुरू होतो. एप्रिल-मेपर्यंत फुलांचा मुख्य हंगाम असतो. उर्वरित काळातही फुले येतात, मात्र कमी प्रमाणात. दक्षिण भारतात मात्र वर्षांतून दोनवेळा बहर येतो. दुसरा बहर जुलैमध्ये येतो. खोडाला पानाच्या बेचक्यातून कळ्याचा गुच्छ फुटतो. कळ्यांचा दांडा वाढत जातो आणि अर्धा ते पाऊण फूट लांब होतो. कळ्यांचा गुच्छ बहुशाखीय असतो. या फुलोऱ्यामध्ये पांढऱ्या रंगाची फुले येतात. सर्वात खाली हिरव्या रंगाचा देठाशी जोडणारा भाग असतो. त्यावर पांढऱ्या रंगाच्या साधारण दोन सेंटिमीटर लांबीच्या आठ ते दहा पाकळ्या असतात. सर्व फुलांतील पाकळ्यांची संख्या सारखीच असते, असे नाही. यातील बहुतांश पाकळ्या देठाकडे वळलेल्या असतात. फुलाचा देठही असाच आठचा आकडा केल्यासारखा असतो. पुढे शेंगा आल्यावर तो थोडे वाकडेपण कमी करतो. मात्र ते लुघुकोनाचा काटकोन होण्याइतकेच! तो आतमध्ये पाच सुटे पुंकेसर असतात. काही प्रजातींत आणखी पाच परागकण नसणारे पुंकेसर असतात. त्यांचा दांडाही पांढरा असतो. त्याच्या टोकाला पिवळे परागकण असतात. त्यामध्ये तीन स्त्रीकेसरही असतात. बीजांडकोश अंडाकृती आणि केसाळ असतात. या फुलांना मंद मधाळ वास असतो. त्याचे वाढणे जसे अनियमित तशीच फुलेही अनियमित रचना असणारी असतात. शेवग्याला फुले लागली की त्यावर पोपटांचा वावर सुरू होतो. फुले खायला त्यांना आवडते. इतरही पक्षी विशेषत: छोट्या चिमण्या या झाडावर फुलांना फस्त करायला येतात. पोपटाचा डोळा तर शेंगावरही असतो. मोठ्या शेंगा वरच्या बाजूने कुरतडत ते खातात. फुलांवर फुलपाखरे येत नाहीत. मधमाशा इतर कीटक मोठ्या प्रमाणात असतात. विशेषत: भुंग्याचे भ्रमरगान दिवसभर सुरू असते. फुलांच्या दिवसांत झाडाखाली सुकलेल्या फुलांचा सडा पडलेला असतो. मात्र या झाडाची रचना अशी असते की यावर कोणताही पक्षी घर करण्याच्या भानगडीत पडत नाही.

सर्वच फुलांमध्ये परागीभवन होत नाही. परागीभवनानंतर त्यातून दोऱ्यासारख्या शेंगा बाहेर पडतात. सुरुवातीला या शेंगा सुतळीचे तुकडे जोडल्यासारख्या लोंबत असतात. सुरुवातीला शेंगांचा रंगही तपकिरी हिरवट असतो. सुरुवातीपासून या शेंगांवर रेघा असतात. शेंगा जसजशा मोठ्या होत जातात, तसे आतील बिया फुगीर होत जातात. या बियांना तीन पंख असतात. हे पंख आतील गाभ्याला चिकटून असतात. बिया जसजशा मोठ्या होत जातात तसतशा शेंगावर गाठी आल्यासारखे दिसू लागते. शेंगा तीस ते पन्नास सेंटिमीटर लांब होतात. एका शेंगेमध्ये दहा ते पंधरा बिया असतात. शेंगांचा आकार त्रिकोणी असतो. शेंगांचा आकार हिरवा असतो. त्या पक्व होण्यापूर्वीच खाण्यासाठी वापरल्या जातात. शेंगा दिसू लागल्यापासून पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये काढल्या जातात. पहिल्या दोन वर्षांमध्ये शेंगा कमी लागतात. झाडाच्या फांद्यांची दरवर्षी छाटणी करावी लागते. पुढे झाड जसे मोठे होत जाते, तसे शेंगांचे प्रमाण वाढत जाते. एका झाडाला सहाशेपेक्षाही जास्त शेंगा लागतात.

शेवग्याच्या शेंगांच्या १०० ग्रॅम गरापासून २६ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. शेंगांच्या गरामध्ये २.५ ग्रॅम प्रथिने, ०.१ ग्रॅम मेद, ३.७ ग्रॅम कर्बोदके, ४.५ ग्रॅम तंतूमय पदार्थ असतात. तसेच जीवनसत्त्व बी-१ (०.०५ मिलीग्रॅम), बी-२ (०.०७ मिलीग्रॅम), बी-३ (०.२ मिलीग्रॅम), क (१२० मिलीग्रॅम) असते. त्याचबरोबर कॅल्शियम ३० मिलीग्रॅम, मॅग्नेशियम २४ मिलीग्रॅम, फॉस्फरस ११० मिलीग्रॅम, पॅटेशियम २५९ मिलीग्रॅम, तांबे ३.१ मिलीग्रॅम, लोह ५.३ मिलीग्रॅम, गंधक १३७ मिलीग्रॅम असते. यामुळे शेवग्याच्या शेंगांना औषधी महत्त्व प्राप्त होते. त्यातील या घटकांमुळे त्याचा प्रसार सर्वदूर झाला आहे.     

मात्र ज्या शेंगा पक्व होतात, त्यांचा रंग तपकिरी होतो आणि त्या झाडालाच वाळतात. वाळलेल्या शेंगा उन्हामुळे फुटतात. त्यातील बिया वाऱ्यामुळे दूरवर जातात. त्यातील काही रूजतात. शेवग्याच्या बिया मऊ गुळगुळीत काळया अथवा करड्या रंगांच्या असतात. त्याचे पंख पांढरट पिवळ्या रंगाचे असतात. बिया गोलाकार किंवा लंबगोलाकार असतात. पंखांसह बियांचा आकार तीन ते चार सेंटिमीटर भरतो. पंख जोडलेला बीचा भाग त्याठिकाणी फुगीर असतो, त्यामुळे बियांचा आकारही त्रिकोणी दिसतो. बिया वजनालाही हलक्या असतात. विविध वाणांच्या एका किलोमध्ये तीन ते नऊ हजार बिया असतात. बिया सहज तीन-चार दिवसांत रूजतात. मात्र बिया जर कक्ष तापमानाला दमट वातावरणात राहिल्या, तर महिनाभरातच त्यांचे रूजण्याचे प्रमाण साडेसात टक्क्यांनी घटते. काही वाणांच्या बिया हिरवट रंगाच्या असतात. बियांच्या आवरणाखाली असणारे प्रत्यक्ष बी पिवळसर पांढरे असते. या बियांमध्ये पांढरा स्निग्धांश असणारा भाग असतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल असते.       

या घराण्यात तीनच प्रमुख वाण असल्याचे संशोधक मानतात. एक वाण सर्वत्र आढळतो. मात्र त्याचे मूळ रूप जंगलात आढळते. दुसरा वाण ठाण्यापासून कोकणात आणि गोव्यापर्यंत तुरळक ठिकाणी आढळतो. त्याला मोरिंगा कोकणेन्सिस या नावाने ओळखले जाते. हा अभिजात वाण आहे. याची फुले थोडीसी लालसर असतात. तशी ही प्रजातही दुर्मिळ बनत चालली आहे. तिसरा वाण मात्र जंगलात क्वचितच दिसतो. नेहमी आढळणारा वाण मात्र सर्वदूर पसरला आहे. आज शेवग्याचे अनेक संकरित वाण तयार झाले आहेत. पूर्वी छोट्या फूटभर लांबीच्या शेंगा मिळायच्या आजू मात्र दोन-तीन फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा बाजारात सर्वत्र दिसतात. कोल्हापूरमधील दत्त, शबनम, जीकेव्ही-१, जीकेव्ही-३, चेन मुरिंगा, चावा काचेरी, कोईमतूर, जाफना, रोहित-१, कोकण रूचिरा ही संकरित वाणे महाराष्ट्रात आणि भारतात प्रामुख्याने लावण्यात येतात. यातील कोईमतूर वाण वर्षभर शेंगा देतो. वेळेवर छाटणी केली आणि त्याची निगा राखल्यास आठशे ते अकराशे शेंगा मिळतात. चवीला चांगला आणि उत्पादन भरपूर देत असल्याने तो शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पीकेएम-२ वाणाला निर्यातमूल्य चांगले मिळत असल्याने या वाणाचेही लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. मात्र आजही शेवग्याच्या फळांचा आणि इतर गोष्टींचा खाण्याखेरीज भारतात मोठ्या प्रमाणात उपयोग होत नाही.

ll २ ll

       शेवग्याचे लाकूड वगळता इतर सर्व गोष्टींचा मानवी जीवनात उपयोग आहे. धन्वन्तरी निघन्टूमधील ‘शिग्रुस्तिक्त: कटुष्चोष्ण: कफशोफ समीरजित् l कृम्यामविषमेदोघ्नो विद्रधिप्लीहगुल्मनुत् ll’ या एका श्लोकामध्ये शेवगा महात्म्य दिलेले आहे. आयुर्वेदामध्ये शेवग्याबाबत ‘शिग्रु: सर: कटु:पके तीक्ष्णेष्मी मधुरीलधु: l दीपन: रोचानो रुक्ष: क्षारस्तिक्ती विदाहकृत ll संग्राह्यशुक्रलो हृथ: पित्तरक्तप्रकोपण: चक्षुष्य: कफवातघ्नो, विद्रधिश्र्वयधुक्रिमीन ll’ असा उल्लेख आढळतो. तर ‘भावप्रकाश’मध्ये ‘चक्षृष्यं शिग्रुजं बीजं तीक्ष्णोष्णं विषनाशनम l अवृष्यं कफवातघ्नं तन्नस्येन शिरो:र्तिहृत ll’ असे शेवग्याचे फायदे सांगितले आहेत. खालीलप्रमाणे उल्लेख आहे. वा.ग. देसाई यांनी ‘औषधी संग्रह’ या पुस्तकामध्ये विविध वनस्पतींच्या औषधी उपयोगाबाबत माहिती दिली आहे. यामध्ये शेवग्यावरील माहिती विस्तृतपणे देण्यात आलेली आहे.  इसवी सन पूर्व दीडशे वर्षांपूर्वी राजे आणि राण्या बौद्धिक तल्लखता सुरक्षित रहावी, कातडी तुकतुकित बनावी यासाठी शेवग्याच्या पानांचा आणि फळांचा आहारात मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे उल्लेख मिळतात. प्राचीन मौर्य योद्ध्यांना युद्धावर असताना शेवग्याच्या पानांचा अर्क देण्यात येत असे. शेवग्याच्या पानांच्या अर्कामुळे युद्धातील जखमांच्या वेदना आणि मनावरील तणाव कमी होत असे. अलेक्झांडर दि ग्रेट याला हरवणाऱ्या सैन्यालाही हा अर्क देण्यात येत असे. याची खातरजमा संशोधकांनी केली आणि शेवग्याच्या औषधी गुणधर्माची माहिती लोकांना समजली. शेवग्याला त्यामुळेच ‘चमत्कारी झाड’ (Miracle Tree) असे नाव मिळाले. कोकणामध्ये शेवगा हा पाहुणे आले, मुलांना भूक लागली की सहज करून देण्याचा पदार्थ मुलांसह सर्वांना आवडणारा पदार्थ. असल्याने त्याला ‘आईचे झाड’ असेही नाव मिळाले आहे.  

      शेवग्याच्या पानांमध्ये असणारी विविध मूलद्रव्ये आणि जीवनसत्वामुळे प्राचीन काळापासून खाद्यान्नामध्ये वापर करण्यात येतो. शेवग्याच्या कोवळ्या पानांचा खाण्यासाठी भाजी, सूप आणि सॅलाड म्हणून उपयोग केला जातो. काही भागात पाने वाळवून ठेवतात. काही भागात या पानांची भुकटी करून पदार्थांची पौष्टिकता वाढावी यासाठी विविध खाद्यपदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये मिसळली जाते. शेवग्याच्या पानांमध्ये दुधापेक्षा दुप्पट प्रथिनांचे प्रमाण असते. संत्र्यापेक्षा सातपट जास्त जीवनसत्व ‘क’ असते. दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. शेवग्याच्या पानांची भाजी रक्तदाब नियंत्रण करते. आतड्याच्या आतील भागावर पडणारे व्रण आणि जखमा बऱ्या करण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. ही भाजी सहज उपलब्ध होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून करण्यात येते. तसेच, बाळाच्या पाचवीला सटवाईला शेवग्यांच्या पानाच्या भाजीचा नैवद्य दाखवतात. आईलाही ही भाजी खाऊ घातली जाते. डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी शेवग्याच्या पानाचा रस  उपयोगी पडतो. शेवग्याच्या पानाचा रस आणि मध मिसळून डोळ्यात घालण्यासाठीचे अंजन बनवले जाते. पिसाळलेल्या जनावराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पानांचा रस मीठ, काळी मिरी पावडर, लसूण, हळद यांचे मिश्रण बनवून जखमेवर लावतात. वैद्यांच्या सल्ल्यानुसार पोटातही घेतात. डोकेदुखीवर पर्णरसात मिरी भुकटी मिसळून लावली जाते. गळ्यामध्ये सूज आल्यास शेवग्याचा पर्णरस काढून गुळण्या केल्या जातात. तोंड आल्यास पाने चघळणे फायद्याचे ठरते. अतिसारावर पर्णरस योग्य प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो. खरूज झाल्यास पुटकळ्यांवर पानांचा रस चोळतात.

      पोटात जखमा झाल्यास, व्रण निर्माण झाल्यास, थकवा येत असल्यास, हाडांना कमजोरी आल्यास, जंताचा त्रास होत असल्यास पानांचा रस उपयोगी पडतो. जेवल्यानंतर धाप लागणे, डोळ्यांच्या त्रास होत असल्यास, डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास, तोंडाची चव जाणे, कुपोषण यावर शेवग्याची पाने आणि पानांची भुकटी अत्यंत उपयुक्त ठरते. शेवग्याच्या पानांच्या रसामध्ये खडीसाखर मिसळून खाल्ल्यास पोटात गोळा येणे, स्नायू आखडणे या त्रासापासून मुक्ती मिळते. आयुर्वेदामध्ये तीनशे भिन्न त्रासापासून शेवग्याच्या पानांच्या व शेंगांच्या खाण्यातील वापरामुळे मुक्ती मिळत असल्याचा उल्लेख सापडतो. लोणच्यामध्ये आणि सॅलॅडमध्ये पाने वापरली जातात. काविळ झालेल्या रूग्णांनाही शेवग्याच्या ताज्या पानांचा रस एक चमचा मधामध्ये मिसळून शहाळ्यासोबत पिण्यासाठी दिल्यास त्रास कमी होतो. कोवळ्या पानांची भाजी आतड्यांची हालचाल नियमित करतात, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. जठराचा कर्करोग टाळणे यामुळे शक्य होते. शेवग्याच्या पानातील पिट्रिगोस्पेरमिन नावाचा घटक जीवाणू प्रतिबंधकाचे कार्य करतो. हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस येणे इत्यादीवर शेवग्याच्या पानांची भाजी उपयुक्त ठरते. ही भाजी रक्तवर्धक आहे. नेत्ररोगावरही शेवग्याच्या पानांची भाजी उपयुक्त ठरते.

      शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी पाने स्वच्छ धुवून घेतात. भाजीमध्ये घालण्यासाठी एक तास अगोदर मूगडाळ भिजत घालतात. धुतलेल्या पानांतील पाणी निथळू द्यावे. जिरे, हिरवी मिरची, लसूण वाटून घ्यावेत. फोडणी देऊन त्यात हे सर्व पदार्थ घालून परतावेत. त्यानंतर दाळ घालून परतावी. त्यानंतर त्यात पाने घालावीत आणि मीठ घालून झाकण ठेवून अंगच्या पाण्यावर शिजू द्यावीत. शेवग्याची पाने तुरट कडवट चवीची असतात. भाजी शिजताना ही चव निघून जाते आणि चविष्ट भाजी बनते. पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, सूप, झुणका, थालिपीठ, पुलाव, कढी इत्यादी पदार्थ बनवले जातात.

शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात. ही भाजी संधीवातावर उपयुक्त असते. फुलांचे भरीत, शेंगाची रसभाजी, भाजीही संधीवातावर उपयुक्त ठरते. शेवग्याच्या वाळलेल्या बियांचे पीठ पाणी निर्जंतूक करण्यासाठी वापरले जाते. शेवग्याच्या बियांपासून निघणाऱ्या तेलास बेन ऑईल म्हणतात. याचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये केला जातो. घड्याळांचे वंगण म्हणूनही या तेलाचा वापर केला जातो. शेवग्याची पाने, फुले, फळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट घटक असतात. कर्करोग होऊ नये म्हणून शेवग्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन उपयुक्त ठरते. पानांच्या तुलनेत शेंगांमध्ये जीवनसत्त्वे आणि क्षारांचे प्रमाण कमी असते. मात्र क जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. विकसनशील देशांमध्ये कुपोषण टाळण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सेवन करण्याबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. काही भागातील अन्न आणि पाण्यामध्ये अर्सेनिकचा अंश असतो. अर्सेनिक विष असते. या भागांतील लोकांनी शेवग्याच्या पानांचे, शेंगाचे नियमित सेवन केल्यास ही विषबाधा टळते. विषाणू, जिवाणू प्रतिबंधाचे कार्य शेवगा सेवनाने आपोआप होते. सांधेदुखीमुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. मूत्ररोगावरही शेवगा उपयोगी ठरतो. उच्च रक्तदाब, ॲनेमिया, सिकलसेल इत्यादी आजारावरही शेवगा सेवन उपयुक्त ठरते. १२० भाज्यांवर संशोधन केल्यानंतर संशोधकांनी शेवगा ही सर्वोत्तम भाजी असल्याचे जाहीर केले. शेवग्याचे नियमित सेवन चांगले मात्र अतिसेवन करू नये.  

      प्राचीन काळापासून इजिप्तमध्ये शेवग्याच्या बियांचे तेल वापरले जात असल्याचे दाखले मिळतात. सूर्य प्रकाशाचा त्वचेवर परिणाम होऊ नये यासाठी तेल वापरले जात असे. युरोपमध्ये ग्रीक लोकांनी बेन ऑईलचे इतरही उपयोग लक्षात घेऊन त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असत. पुढे रोमन लोकांनी शेवग्याचे महत्त्व जाणून त्याचा प्रसार केला. १८१७ मध्ये ब्रिटीशांनी शेवग्याच्या उपयुक्ततेवर एक बैठक बोलावली आणि त्यांचे साम्राज्य ज्या ज्या भागात होते तेथे या वनस्पतीच्या लागवडीचा प्रसार केला. शेवग्याच्या तेलाचा उपयोग सॅलड आणि इतर घटकामध्ये सुरू केला. निकारूग्वुआमध्ये सुरुवातीला शेवग्याची झाडे शोभेची झाडे म्हणून लावली जाऊ लागली. त्यानंतर कुंपणासाठी शेवग्याची दाट झाडे लावली जाऊ लागली.

      आज शेवग्याची मुळे, साल, पाने, शेंगा आणि बियांपासून मिळणाऱ्या विविध घटकांचा उपयोग ओळखून सर्वत्र लागवड केली जाते. औषधे, खाद्यपदार्थ, रंग, प्राण्यासाठीचे खाद्य, अस्वच्छ पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी शेवग्याचा उपयोग केला जातो. शेवग्याच्या झाडांपासून डिंकही मिळतो. हा डिंक काही प्रमाणात वापरला जातो. डिंक दीडशे ते दोनशे रूपये किलो दराने विकला जातो.

      शेवग्यापासून आज विविध कंपन्यांनी औषधे तयार करून बाजारात उपलब्ध करून दिली आहेत. २०२१ साली ५०० मिलीग्रॅमच्या साठ मोरिंगा गोळ्या चारशे रूपयांना ऑनलाईन मिळतात. सेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या शेवग्याच्या पानांची भुकटीही बाजारामध्ये उपलब्ध आहे. दीडशे ग्रॅमच्या भुकटीची किंमत तीनशे रूपये आहे. जो शेवगा कोठेही वाढतो, उपलब्ध असतो, त्याला नैसर्गिक रूपात घेऊन खाण्यामध्ये जी मजा आहे, ती औषधामध्ये कशी बरे येईल?     

ll ३ ll

      इतका उपयुक्त असूनही शेवग्याचे झाड दारात लावू नये, असा गैरसमज सर्वत्र दिसतो. यामागे केवळ शेवग्याचे लाकूड ठिसूळ असणे, हेच कारण होते. शेवग्याच्या फांद्या जोरदार वाऱ्याने मोडून त्यातून अपघात होण्याची, दारातील जनावराचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा गैरसमज पसरला आहे. आजही काही लोक हे मानतात. शेवग्याचे झाड दारात न लावण्याला इतर कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. शेवग्याच्या शेंगाचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने पुरूषत्व वाढते असाही गैरसमज आहे. या समजापोटी अनेक लोक शेवग्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. मात्र यालाही शास्त्रीय पुरावा नाही. विशेष म्हणजे या मुद्द्यावर तमिळनाडू विधानसभेमध्ये चर्चा झाली होती. शेवग्याच्या झाडांवर रात्री भूते येतात, असाही गैरसमज आहे. त्यामुळे शेवगा घरासमोर लावण्याऐवजी घरामागे लावला जातो.

      शेवग्याच्या झाडाचा, फळांचा उपयोग असूनही त्याचे साहित्यात फार उल्लेख नाहीत. आळशी कुटुंबाला उद्यमी बनवण्यासाठी एका पाहुण्याने केलेल्या प्रयत्नाबाबतच्या कथेत शेवग्याचा उल्लेख येतो. एक कुटुंब असते. त्यांच्या अंगणात शेवग्याचे झाड असते. या झाडाला वर्षभर शेंगा येत. या शेंगा काढायच्या, विकायच्या आणि सुखाने जगायचे, असा त्या कुटुंबाचा दिनक्रम. ते इतर कोणताही कामधंदा करत नसत. आळशासारखे घरात पडून राहात. त्यामुळे त्यांची परिस्थिती होती, तशीच राहिली. एक दिवस थोरल्या मुलाचा मेहुणा त्यांच्याकडे पाहुणा म्हणून येतो. तो हे सारे पाहतो. यांनी इतर वेळेत काम केले, शेती पिकवली, तर ते आणखी सुखी होऊ शकतात. त्यांची परिस्थिती बदलू शकते, हे त्याच्या लक्षात येते. रात्री तो हे शेवग्याचे झाड कापून टाकतो. सकाळी उठून ते शेवग्याचे झाड कापलेले पाहिल्यावर पाहुण्याचा चांगलाच पाणउतारा केला जातो. पाहुंणा निघून जातो. मात्र आता शेवग्याला खालून फुटवा जरी आला तरी शेंगा यायला आठ नऊ महिने लागणार होते. या काळात जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यामुळे त्यांनी शेतात मशागत केली. शेत बरीच वर्षे पडून राहिले असल्याने पीक जोमात आले. शेतातून इतके उत्पादन येते, हे त्यांना प्रथमच समजले. त्यांनी शेती कसण्यास सुरुवात केली. दरम्यान शेवग्याचे झाड पुन्हा वाढले. त्याला शेंगा येऊ लागल्या त्या फळांची विक्री करून अधिकचे उत्पादन मिळू लागले. शेतातून उत्पादन चांगले निघते, हे लक्षात घेऊन त्यांनी शेती करणे सुरू ठेवले. आता त्यांची परिस्थिती बदलली होती. घरात आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. काही वर्षांनंतर झाड तोडणारे पाहुणे पुन्हा घरी आले. त्यांचे चांगले स्वागत झाले. या बदलामागचे त्यांनी कारण विचारले. कारण ऐकताना ते हसत होते. नंतर त्यांनी ‘तुम्ही आळस सोडून शेती करावी, म्हणून मुद्दामच झाड तोडले होते’ असे सांगितले.

      शेवग्याच्या शेंगा याच नावाच्या कथेमध्ये य.गो. जोशी यांनी छान पद्धतीने वापरल्या. फार पूर्वी जोशी यांनी लिहिलेली कथा अनेक विद्यापीठांच्या अभ्यासाचाही भाग राहिली. फार पूर्वी आठवीच्या अभ्यासक्रमातही ही कथा होती. या कथेवर नाटक आणि १९५५ मध्ये चित्रपटही निघाला. या कथेतही शेवग्याचे झाड केंद्रस्थानी आहे. काकासाहेब विधूर असतात. मुलीचे लग्न लवकर झालेले असते. पुढे तीन मुलांची लग्ने होतात तेव्हा भावांची वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीवरून भांडणे सुरू होतात. ते सर्वजण वेगळे राहू लागतात. ही भांडणे इतकी विकोपाला जातात की परस्परांचे तोंडही पाहायलाही तयार नसतात. त्यांच्या पूर्वीच्या घरासमोर असलेल्या शेवग्याच्या शेंगा सर्वांनाच प्रिय असतात. त्या सर्वांना मृत आईविषयी ओढ असते, आदर असतो. घराचीही आठवण येत असते. मात्र ते एकत्र येत नाहीत. शेवटी फार पूर्वी लग्न झालेली बहिण त्या जुन्या घरी येते. शेवग्याच्या शेंगा काढते. आईच्या हातचे शेंगाचे पिठले हे सर्वांनाच आवडत असते. तीही शेंगांचे पिठले बनवते आणि काकासाहेबांच्या घरी सर्वांना जेवायला बोलावते. तेही भाऊच! सर्व भाऊ बहिणीचे निमंत्रण स्वीकारतात. या प्रितीभोजनातून बहीण या भावांचे मनोमिलन घडवून आणते. या कथेवर आधारित चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद य.गो. जोशी यांनीच लिहिले होते. शांताराम आठवले यांनी या चित्रपटासाठी गीते लिहिली; तर बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी या चित्रपटाला संगीत दिले. ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकामध्ये स्वाती चिटणीस आणि संजय मोने काम करत होते.

      आचार्य अत्रे यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकामध्ये ‘टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा, आंब्याच्या झाडाला, शेवग्याच्या शेंगा’ असे विनोदी गाणे लिहिले आहे. विजय कदम मोरूची मावशी बनून हे गाणे असे काही सादर करत की हसून हसून मुरकुंड्या वळत. शेवग्यावर जास्त कविता मिळत नाहीत. खूप शोधल्यानंतर कवी पु. शि. रेगे यांची ‘आसुसलेला शेवगा’ ही कविता सापडली. पत्नी कामाने थकलेली आहे, याची जाणीव ठेऊन ‘दोन प्रहर निवांत सारे, श्रमभराने बाजेवरती पांगुळलेली तू, खिडकीबाहेर ढाळितो चवरी, आसुसलेला शेवगा दारीचा’ अशी छोटेखानी आशयगर्भ अशी ही रचना आहे. कविवर्य इंद्रजित भालेराव यांच्या ‘गर्भिनी नार’ या कवितेत ‘गर्भिन्या नारीला उन्हाळ्याची धगधग, दारी शेवग्याचा बाग त्याच्या सावलीनं वाग’ असा उल्लेख सापडला. सदानंद रेगे यांनीही ‘शेवगा’ कवितेत फुललेल्या शेवग्याचे ‘फुलवून पंखा, शुभ्र फुलांचा, तुरा टपोरा तलम उन्हाचा, टाकीत टाकीत सुने उसासे, टिपे शेवगा धुंद कवडसे’ असे वर्णन आहे. नित्य वापरातील शेवगा असा काव्यापासून कदाचित त्याच्या अतिपरिचयाने दूर राहिला असावा. लीला शिंदे यांनी शेवग्याला ‘आनंदाचं झाड’ म्हणत त्याचे सुंदर वर्णन केले आहे. शेवग्याचे झाड दारात असेल तर घरात भांडणे होतात, असे सांगणाऱ्या शेजारणीचे म्हणणे न ऐकता त्यांनी शेवगा वाढू दिला. या शेवग्यामुळे विविध पक्ष्यांची आणि जीवांची कशी ओळख झाली, याचे सुरेख वर्णन या लेखात आहे. २०२०-२१ च्या अभ्यासक्रमात बालभारतीच्या पुस्तकात हा लेख समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र शेवगा हे नाव एका उपकरणाला मिळाले आहे. बेसणापासून शेव तयार करण्यासाठी पूर्वी पितळेचा आणि आता स्टीलचा शेवगा मिळतो. मात्र त्यातून बाहेर पडणारी शेव ही शेवग्याच्या कोवळ्या शेंगासारखी दिसते.   

ll ४ ll

शेवगा. लहानपणापासून सर्वांच्या परिचयाचा झालेला असतो. लहानपणापासून शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला मिळते. मलाही शेवग्याची बालपणीच ओळख झाली. पहिल्यांदा नेमकी केव्हा शेवग्याची भाजी खाल्ली, आठवत नाही. आमची वडाची विहीर नावाची गावाजवळ अर्धा एकर शेती आहे. लहानपणी त्या शेतात आजोबांनी सर्व प्रकारची फळझाडे लावली होती. मोसंबी, इडलिंबू, पेरू, आंबा, रामफळ, सीताफळ अशी अनेक झाडे होती. त्यातच एक शेवग्याचे झाड होते. कळायला लागल्यानंतर एक-दोन वर्षातच ते झाड वाळले. नंतर मी चवथीमध्ये असताना आम्ही घर बदलले. नव्या घराच्या अंगणात आड होता. त्या आडावर गल्लीतील सर्व लोक पिण्याचे पाणी भरत. पाणी भरताना मोठ्या प्रमाणात सांडत असे. त्या सांडलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून अळू लावला. अळूच्या बांधावर शेवग्याची झाडे लावली. दोन झाडे मोठी झाली. त्यांना भरपूर शेंगा लागू लागल्या. घराची गरज भागून मोठ्या प्रमाणात शेंगा लागत. अळूची पाने आणि शेंगा शेजारी हव्या तेव्हा विकत असत. त्यातून बरेच पैसे मिळत असत. मला मांसाची ॲलर्जी असल्याने मटण आणले की घरात कोणीतरी म्हणायचे, ‘याच्यासाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी करा. आम्ही नळ्या ओरपू, हा शेंगा ओरपेल.’ मात्र त्या काळात शेंगा केवळ उन्हाळ्यातच मिळायच्या. पुढे पावसाचे प्रमाण कमी झाले. गावाच्या परिसरामध्ये कुपनलिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. विहिरींचे पाणी आटले. आडाचे पाणीही आटले. अळू जळाला. शेवग्याची झाडेही वाळून गेली. पुढे त्या जागेवर घर बांधताना कोरडा आड बुजवून टाकला. त्यामुळे या साऱ्या आठवणी बनून राहिल्या.

पुढे गावातील पाणी परिस्थिती बिकट झाली. टँकरने पाणीपुरवठा होत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नोकरी करू लागलो. धाकट्या भावाने नोकरीसोबत शेती करायचे ठरवले. पाण्यासाठी कुपनलिका खोदायचे ठरवले. मात्र वडीलांना विचारल्याखेरीज कोणताही निर्णय शक्य नव्हता. वडिलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शेतात अतिपाण्याची पिके द्राक्षे, ऊस अशी लावायची नाहीत. २०० फुटापेक्षा जास्त खोल जायचे नाही आणि वडाची विहीर या शेतापर्यंत पाईपलाईन टाकून गावातील लोकांना मोफत पाणी नेऊ द्यायचे, या तीन अटीवर कुपनलिका खोदायला परवानगी दिली. त्यानुसार कुपनलिका खोदली. १६० फुटांवर पाणी लागले. १८० फुटांवर पंप बसवला. कुपनलिका खुदाई दोनशे फुटापर्यंतच केली. ठरल्याप्रमाणे वडाची विहीर या शेतापर्यंत आणि घरापर्यंत पाईपलाईन टाकली. त्यामुळे वाड्यात पाणी आले. या पाण्याबरोबर पुन्हा अळू लावला, दोन नारळाची झाडे लावली. त्याचबरोबर खास नान्नज येथील एका शेतकऱ्याकडून नेऊन कोईमतूर वाणाची शेवग्याची दोन झाडे लावली. यातील एक झाड मोठे झाले. त्याला भरपूर शेंगा लागू लागल्या. पूर्वीचे शेवग्याचे दिवस पुन्हा आले. त्याच्या शेंगा चवीला खूपच चांगल्या होत्या. त्याच्या शेंगा पंधरा वर्षे सर्वांनी आवडीने खाल्ल्या. घरामध्ये बांधकाम वाढवताना हे झाडही गेले. वडिलांच्या निधनानंतर धाकटा भाऊही बार्शीला राहायला गेला. आता त्या वाड्यामध्ये एक नारळाचे झाड आणि पूर्वीच्या आठवणी राहतात.

बारावीनंतर शिक्षण सुरू असताना हॉटेलचा परिचय घट्ट झाला. विविध पदार्थांची चव चाखू लागलो. दक्षिण भारतीय पदार्थांबरोबर सांबर आले की त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा हमखास मिळत. शेवग्याशिवाय त्यांचा कोणताही पदार्थ दक्षिण भारतीय लोक खातच नाहीत का? असा प्रश्न पडायचा. मात्र शेवगा लहानपणापासून आवडायला लागला, तो आजही तितकाच प्रिय आहे. पुढे नोकरीनिमित्त नांदेडला गेलो. नांदेड-पुणे असा अनेकवेळा प्रवास करावा लागत असे. प्रवासात जेवणासाठी हॉटेलला थांबावे लागे. मी शक्यतो शाकाहारी हॉटेल निवडत असे. निव्वळ शाकाहारी पदार्थ मिळणारी हॉटेल्स मराठवाड्यात तुलनेने कमी आहेत. माझ्या वाहनाचे सारथ्य करणारे शिवाजी हुंडे यांनी मला औरंगाबाद जालना रोडवरील काळे बंधूंच्या त्याच नावाने असलेल्या एका हॉटेलची माहिती दिली. ‘जिभेसोबत पोटाची काळजी’ हे ब्रीदवाक्य घेऊन हे हॉटेल चालवले जाते. तेथे शेवग्याचे अनेक पदार्थ मिळत असल्याचे हुंडे यांनी सांगितले. मला शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी हा एकच पदार्थ माहित होता. फार तर उडप्यांच्या हॉटेलमुळे सांबरातील शेवगा माहीत झाला होता. २०१० डिसेंबरमध्ये असाच प्रवास करताना मी प्रथम या हॉटेलमध्ये गेलो. शेवग्याच्या रस्सा भाजीतच काळे तिखट आणि लाल तिखट असे दोन प्रकार होते. मेनुकार्ड पूर्ण शेवगामय होते. शेवगा फ्राय, शेवगा पिठले, शेवगा झुणका, शेवगा पकोडा, गर शेवगा, शेवगा बॉईल, शेवगा हंडी, शेवगा मटका, शेवगा बिर्याणी, सुका शेवगा, शेवगा कढी इत्यादी शेवग्याच्या पदार्थांनी पूर्ण पान भरले होते. शेवग्याचे एवढे सगळे पदार्थ बनवले जाऊ शकतात, हे मला प्रथमच समजले. हॉटेलमधील पदार्थांची चवही उत्कृष्ट होती. स्पेशल चिकनचे, डोशाचे, इडलीचे उपहारगृह पाहिले होते. मात्र खास शेवग्यासाठी प्रसिद्ध असणारे काळे बंधूंचे हे हॉटेल मनापासून आवडले. पुढे दीड वर्षात या रस्त्यावरून जाताना सात-आठवेळा या हॉटेलमध्ये जेवलो. शेवग्याचे विविध प्रकार खाल्ले आणि मनापासून आवडलेही. हॉटेलच्या मागे आणि सभोवताली सर्व शेवग्याची झाडे होती. मसालेही घरगुती वापरत. त्यामुळे पोटाची काळजी आपोआप घेतली जाते. मात्र हे सर्व समजल्याने पाककला जमत असली तरी घरी त्यातील पदार्थ बनवण्याचे प्रयोग केले नाहीत. अर्थात आता युट्यूबवर शेवग्याच्या अनेक पाककृती उपलब्ध आहेत.  

शेवग्याची झाडे लावावीत वाढवावीत आणि त्या झाडाच्या शेंगा खाव्यात, असे खूप वाटते. मात्र फ्लॅट संस्कृतीमध्ये ते शक्य होत नाही. बाजारात शेवग्याच्या शेंगा दिसल्या की घेतल्याशिवाय राहवत नाही. शेवग्याची भाजी असतेच न्यारी!

-0-

३२ टिप्पण्या:

 1. सुंदर माहिती लिहिलेली आहे
  देवगड येथील कातळावरील शेवगयाची चव प्रसिद्ध आहे एकदा या स्वाद घेणयासाठी

  उत्तर द्याहटवा
 2. खूप छान सविस्तर माहिती आहे सर..👌

  उत्तर द्याहटवा
 3. एका शेवग्याची किती किती माहिती....ग्रेट सहृ

  उत्तर द्याहटवा
 4. अप्रतिम सर,शेवगा फक्त औषधी वनस्पती हे आणि अलिकडे विविध माध्यमातून त्या चे महत्त्व वाचायला, ऐकायला मिळते. पण आपणलिहिलेली माहिती खुपच विस्तृत, महत्त्वाची आहे.
  आपले लेखन नेहमी प्रमाणेच शास्त्रीय आधाराचे,परंपरेशी सांगड घलणारे आणि वाचनप्रिय आहे, खुप छान सर...

  उत्तर द्याहटवा
 5. लेखाची मांडणी अतिशय उत्कृष्ट, शेवग्याचे महत्त्व... शास्त्रीय माहिती उगम,लागवड, प्रसार तसेच ऊर्जा स्त्रोत... प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, जीवनसत्वे, शेवग्याच्या विविध जाती, विविध प्रांतातील त्याची नावे याची खूप सुंदर माहिती दिलीत.
  शेवग्याचे फायदे, औषधी उपयोग, इतिहासातील दाखले, संस्कृत श्लोक, त्याच मराठीतील अर्थ, शेवग्याच्या पानांची भाजी...ती करायची पद्धत..त्याचे शरीरावरील परिणाम..त्यापासून मिळणारा डिंक तर मला लहान पणात घेऊन गेला... आमच्या शेजारी परड्यात शेवग्याचे झाड होतं त्याचा डिंक आम्ही खायचो...
  शेवग्या बद्दल चे समज, गैरसमज, अंधश्रद्धा याची खूप छान माहिती दिलीत.
  सोनेपे सुहागा म्हणजे साहित्यातील शेवगा.... शेवटी लिहिलेला स्वानुभुती... काळेंच हॉटेल तेथील पदार्थ..खूप छान वर्णन अगदी हॉटेल मध्ये गेल्यासारखं वाटल. उत्कृष्ट व संग्रही लेख...waiting for next.

  उत्तर द्याहटवा
 6. शेवगा या विषयावरील इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती प्रथमच वाचत आहे

  उत्तर द्याहटवा
 7. अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. एखाद्या लेखात किती वैविध्यपूर्ण तपशील भरता येऊ शकतात हे या लेखातुन दिसून येते.

  उत्तर द्याहटवा
 8. सर
  शेवगा वनस्पती बद्दल खूप छान माहिती मिळाली ।
  धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 9. सर शेवगा वनस्पती फार मोठा फायदा होणार आहे याची माहिती मिळाली.

  उत्तर द्याहटवा
 10. लेख मनापासून आवडला, शेवग्याच्या अतिसेवणाचे काही अपाय आहेत का

  उत्तर द्याहटवा
 11. शेवग्याच्या पानांची भाजी आणि शेंगांची आमटी अनेकदा खाल्लूय, पण शेवगापुराण एवढे विस्तृत असे वाटले नव्हते. त्यात विषयानुसार तुम्ही केलेले अध्याय ज्ञानात मोलाची भर घालणारेच आहेत. आपल्या परिचयाचे झाड, पण पुरेशी माहिती नाही अशी बहुतेकांची अवस्था होते, तुमच्या या विस्तृत लेखाने माहिती मिळालीच पण त्याच्या लागवडीबाबतचे गैरसमजही दूर झाले

  उत्तर द्याहटवा
 12. खूप विस्तृत नी सविस्तर माहिती मिळाली खरंतर शेवग्याची आमटी नी गरम भात एक वेगळीच चव असते अनेकदा अत्यंत आवडीने खाल्ली पण याच शेवग्याची एवढी माहिती आपल्या लेखातून समजली. खूप सुंदर मांडणी केलीय. खूप खूप अभिनंदन आपल्या पुढच्या लेखासाठी शुभेच्छा.

  उत्तर द्याहटवा
 13. शेवगा वनस्पती फार मोठा फायदा होणार आहे याची माहिती मिळाली.खूप खूप छान सर

  उत्तर द्याहटवा
 14. खूप छान सविस्तर माहिती दिली लेख मनापासून आवडला

  उत्तर द्याहटवा
 15. खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहेत. सखोल माहिती मिळाली.

  उत्तर द्याहटवा
 16. नमस्कार सर,शेवग्याच्या झाडाची आणि शेंगाची सखोल माहिती त्याचे आहारातील स्थान व औषधी गुणधर्म याविषयी खूप महत्वाची माहीत मिळाली .त्याबद्दल तुमचे अभार.

  उत्तर द्याहटवा
 17. बहुगुणी शेवगा. आशय आणि उपयोजनाच्या पातळीवर मांडणीतील वैविध्यपूर्णता पाहिल्यास लेखकाची सूक्ष्म निरीक्षणक्षमता किती अव्वल दर्जाची आहे हे ध्यानात येते.

  उत्तर द्याहटवा
 18. पूर्वीप्रमाणेच या विषयाचे लेखन सुद्धा दर्जेदार आणि वाचनीय आहे. बार्शी येथे मराठी विज्ञान परिषदेचे संमेलन झाले होते. या संमेलनामध्ये कृषिभूषण कै. वि.ग.राऊळ साहेब यांनी शेवग्याचे महत्व विषद केले होते. आपला लेख वाचल्यानंतर पुन्हा एकदा संमेलनाची आठवण झाली. आपण लिहीत असलेल्या लेखातून निश्चितच सखोल माहिती आम्हाला मिळते ज्ञान मिळते याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.

  उत्तर द्याहटवा
 19. शेवग्याला अखेर न्याय मिळाला....अभ्यासपूर्ण मांडणी विश्लेषण

  उत्तर द्याहटवा
 20. भाव समृद्ध शेवगा खूप आवडला. शेवगा अगोदर पासूनच प्रिय आहेच. आता तो अधिक आवडू लागला. शेवग्याच्या इतक्या जाती आहेत हे माहीत नव्हते. खूप खूप धन्यवाद सर!

  उत्तर द्याहटवा
 21. डॉ.शिंदे सरांनी मांडलेली माहिती खुपच अभ्यासपूर्ण आहे.शेवग्याच्या शेंगाबाबत माहिती नसलेली बरीच माहिती मिळाली

  उत्तर द्याहटवा