(सण,
उत्सव याना जोडून प्रथा परंपरा येतात. गावोगावी यांचे स्वरूप बदलते. यात काही
अंधश्रद्धाही होत्या. कालाच्या ओघात काही बंद पडल्या, तर काही सुरू आहेत. यातील
काही प्रथा समाजप्रबोधन करत तर काही समाजाला बांधून ठेवत. गावोगावच्या प्रथा, परंपरा
आणि उत्सवावर यावेळी "नवे गाव आंदोलन" मासीकाचा ऑक्टोबर २०१८ चा विशेषांक
आहे. यातील आमच्या गावातील निळकंठेश्वराचे मंदिर आणि तेथील कार्यक्रमावरील माझा मूळ
लेख येथे प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
बालाघाट डोंगराच्या
पायथ्याशी वसलेले आमचं गाव, चिंचोली. आजही गुगलवर न दिसणारे. गावात खच्चून दोन-अडिचशे
उंबरा. गावात शिंदे आडनावाची घरं जास्त. चौधरी, जगताप, कदम, गलांडे, बोधले यांच
प्रत्येकी एक घर. ही सर्व परगावातून आमच्या गावात आलेली मंडळी. ती सगळया गावाचे
पाहुणे. त्याना दाजी किंवा मामा म्हणून हाक मारली जायची. या व्यतीरिक्त खुने,
चांदणे आणि कसबे, सुतार आणि कोळी यांची वीसेक घरांची वस्ती गावात एकरूप झालेली.
गाव इतक छोटं की सुरूवातीला तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत होती.
चिंचोली, ढेंबरेवाडी आणि घोळवेवाडी. नंतर घोळवेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली.
मात्र आजही दोन गावाची ग्रामपंचायत आहे. गावात पोलीस आलेच तर ते पाहुणे म्हणून.
एखाद्या गुन्ह्यासाठी कधी पोलीस आल्याचे आठवत नाही. गावाला एक सुसंस्कृतपणा होता.
तो गावाच्या शैक्षणिक वारशामुळे आलेला. चिंचोलीला पुर्वी कँप चिंचोली म्हणून ओळखले
जायचे. गाव मराठवाड्याच्या हद्दीवर. मराठवाडयात निजामाचा अम्मल. तर चिंचोली
इंग्रजांच्या अंमलाखाली. निजामाच्या राज्यात रझाकारानी भयानक गोंधळ मांडला होता.
त्याची झळ सरहद्दीवरच्या गावानाही बसायची. या गावाना संरक्षण देण्यासाठी सैनिकांचा
एक कँप, चिंचोली येथे ठेवण्यात आला होता. त्यामूळे गावाला कँप
चिंचोली असेही म्हटले जायचे. सैनिकांच्या वस्तीमुळे गावात शाळा सुरू
झाली.
शाळेत व्यंकटेश देशपांडे नावाचे शिक्षक आले, असे वडील सांगायचे.
या गुरूजीनी आमच्या गावातील तीन पिढ्याना शिकवले. त्यांच्यामुळे माझे पणजोबा,
आजोबा आणि वडील प्राथमिक शिक्षक झाले. शिक्षणाबरोबर गावात सुसंस्कृतपणाही आला.
गावात जातीपातीचे भेद मिटत गेले. सगळे एकाचं विहिरीवर पाणी भरायचे. सर्वच लहान
मुले एकत्र राहात, खेळत असायची. गावाची वस्ती आजही हजाराच्या आत आहे. गावातील अनेक
युवक शिकले आणि नोकरीनिमित्त सोलापूर, पुणे, मुबई कोल्हापूर, नांदेड, कोकण अशा
विविध गावात जावून तिथेच राहातात. त्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ होत नाही.
ज्या घरात चार मुले असायची. त्यातली तीन सरकारी नोकरीत. त्यातही शिक्षकांची संख्या
मोठी. त्यामुळे पुढे कँप चिंचोली ही मास्तरांची चिंचोली बनली.
अशा या गावाच्या ईशान्येला बालाघाट डोंगराच्या दोन-अडिचशे फुट उंच टेकडीच्या पायथ्याशी निळकंठेश्वराचे मंदिर. हे देवस्थान जागृत असल्याचे मानतात. मुळात हे शिवलिंग तेथे नव्हते. ते
कुठेतरी डोंगरात होते. गावातील पुर्वजापैकी एकाला ते नेमकी कोठे आहे?
ते स्वप्नात दिसले. मग चिंचोलकरानी गुपचूप जावून ते शोधले. वाजत गाजत जाण्याची सोय
नव्हती. कारण तो भाग जंगलात, बालाघाटच्या डोंगररांगात होता. तिथे रझाकारांचा हल्ला
होण्याची भिती होती. ती मुर्ती आणून आताच्या मंदिरात प्रतिष्ठापना केली. आणखी एक
मंदिराच्या निर्मितीची कथा सांगीतली जाते. एकदा एक गुराखी जनावरे राखत असताना
त्याच्या गायीचा पाय अडकला. पाय काढण्यासाठी तो कचरा आणि माती बाजूला काढू लागला.
ती माती काढताना त्याला खाली हे शिवलिंग दिसले. शिवलिंगाचे दर्शन गुराख्याला
होताचं गायीचा पाय निघाला. त्याने ही गोष्ट गावात सांगीतली आणि मग गावकऱ्यानी तिथे
मंदिर बांधले. मूळ मंदिरात ओवऱ्या होत्या. त्या ओवऱ्या कोणी बांधल्या? हे तेथील दगडावर किंवा फरशीवर कोरलेले होते. अशाचं एका फरशीवर तुका बाळा
शिंदे असे आमच्या पणजोबाचे नाव कोरलेले होते. त्यांनी त्या ओवरीतील फरशी बसवून
घेतली होती. मंदिराच्या नुतनीकरणात ओवऱ्या काढल्या आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा
हेमाडपंथी पद्धतीचा आहे. गाभाऱ्यात बरोबर शिखराखाली महादेवाची पिंड बसवलेली. बाहेरच्या
बाजूला पुढे नव्या तंत्राने शाडू, चुना आणि इतर साहित्य वापरून सुबक, आकर्षक
नक्षीकामासह रचना उभारण्यात आली. मंदिरात कितीही पाणी, दुध याचा अभिषेक घातला, तरी
ते सर्व व्यवस्थित बाहेर जाईल अशी रचना. साधरणत: महादेवाच्या ऊर्फ शंकराच्या मंदिरात
पिंडीसमोर एक नंदी महादेवाकडे पहात बसलेला असतो. या मंदिरात मात्र दोन नंदी असे
महादेवाकडे पहात बसलेले आहेत. ते मुख्य मंदिरात नाहीत, तर त्या दोन नंदीचे
स्वतंत्र मंदिर उभारलेले आहे. त्या नंदींच्या वायव्येला आणखी एक छोटे मंदिर. त्यातही
महादेवाची पिंड. जाहिरातीचे युग येण्यापुर्वी, देवस्थान प्रसिद्धीच्या झोतात नसताना,
तीसेक वर्षापुर्वी कोल्हापूरच्या मंडळीनी या छोटया मंदिराचे सुशोभीकरण केले.
या
देवस्थानाच्या जागृतपणाचे अनेक किस्से सांगतात. अनेक घटना दाखला म्हणून सांगीतल्या
जातात. गावातील म्हणे एकजण मटण खावून मंदिरात गेला... त्याला मंदिरात सात फण्याचा
साप दिसला. सापाने त्याचा पाठलाग सुरू केला. तो पळत शेवटी घरी आला. मात्र सापाने
त्याचा घरापर्यंत पाठलाग केला होता म्हणे. तसेचं एकदा चोर, चोरी करून मंदिरात आले.
त्यातील एकाने मटन खाल्ले होते. त्यानी वाटण्या करायला घेतल्या. मात्र, त्याना
कोणीतरी येतयं असा भास व्हायचा. शेवटी ते वाटण्या करायचे सोडून निघाले. मात्र
देवाने त्याना मंदिराभोवती फिरत ठेवले आणि सकाळी ते मुद्देमालासह पोलीसाना सापडले.
अशा अनेक कथा सांगीतल्या जात. आगावू मुले हे कधी घडले होते? असा प्रश्न करायची. यावर सांगणारा म्हणायचा, "आमच्या वडिलानी हे
सांगीतले". त्यांच्या वडिलाना विचारले, तर, त्यांचे उत्तरही हेच असायचे.
त्यामुळे हे खरेच घडले होते का? हा प्रश्न विचारण्यात अर्थ
नव्हता. या गोष्टींचा मुख्य हेतू पावित्र्याच्या संकल्पनाना कोणी छेद देवू नये,
कोणाच्या भावना दुखावू नयेत, असा असावा.
मात्र आमच्या एका बंधूबाबत घडलेला किस्सा पुढे पुरावा म्हणून
सांगीतला जावू लागला. झाले असे की, 'देव सर्वात आहे, देवाला सर्व जीव सारखेच प्रिय
असतात' असे त्याने बरेचं कांही ऐकलेले होते. त्यावेळी त्याचे वय बारा तेरा वर्ष असावे.
ऐकिव ज्ञानावर त्याने स्वत:चे तत्वज्ञान तयार केले. 'देवाला सर्व जीव प्रिय आहेत,
माशाला जीव आहे, म्हणजे देवाला मासे प्रिय आहेत. देवाला प्रिय वस्तू अर्पण करायची
असते, मग आपण देवाला प्रिय असणारी वस्तू म्हणून मासे अर्पण करायचे'. नदीत पोहताना
त्याने हळूच मासा पकडला. तो तांब्यात ठेवला. आंघोळ करून तांब्यात पाणी घेतले. देवाला
जलाभिषेक घालायला इतर मुले निघाली. कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून तो सर्वात
शेवटी निघाला. बाकीची मुले तोपर्यंत ओल्या
कपडयाने दगडी पायऱ्यावरून पळत गेली. सगळया पायऱ्या ओल्या झालेल्या. पायाला
लागलेल्या मातीमुळे चिखलही झाला. मासा घेवून एक एक पायरी चढत, हे साहेब बरेच वर
गेले आणि त्याचा अचानक पाय घसरला आणि तो आडवा झाला. पायऱ्यावरून घरंगळत शेवटच्या
पायरीवर येवूनचं थांबला. विशेष हे कि कोठूनही रक्त आले नव्हते. मात्र मुका मार
चांगलाच मिळाला होता. त्यावेळेपासून तर जागृतपणाला आमच्या काळातल्या या किस्स्याची
जोड मिळाली.
गावात, पंचक्रोशीत देवस्थानाची आणखी जोरात चर्चा सुरू झाली. मंदिरातील
गर्दी वाढू लागली. माझा मात्र दृष्टीकोन तेंव्हाही वेगळा होता. देवाकडे आपण कांही
मागायचे असते, हे माझ्या मनात कधीच येत नाही. कोणत्याही मंदिरात गेले की प्रसन्न
वाटते. या मंदिरातही कसे अगदी प्रसन्न वाटते. त्याठिकाणी जायचे. दर्शन घ्यायचे आणि
एका ओवरीत डोळे मिटून शांत बसायचे. सारे जग विसरायला होते. मंदिरात पाच झाडे होती
आणि आजही आहेत. चाफ्याचे झाड मुख्य मंदिराच्या दक्षीणेला दिमाखात उभे आहे. तर
उत्तर बाजूला उंबराचे झाड आहे. छोट्या मंदिराच्या शेजारी प्राजक्ताचे झाड आहे.
त्याच्याच शेजारी नंदींमागे कडूनिंबाचे झाड. तर या दोन झाडांमध्ये पिंपळाचे झाड आहे.
मंदिराच्या बाहेर बार्शी-लातूर रोडवर वडाचे भलेमोठे झाड आहे. मंदिराच्या पश्चिमेला
सामाजिक वनीकरण विभागाने ॲकेशिआची झाडे लावली आहेत. मंदिरात कधीही गेलो तरी
झाडाखाली एकतरी चाफ्याचे फुल सापडते आणि ते मी देवाला वाहतो. अनेक वर्षात या सवयीत
खंड नाही.
मंदिर ज्या टेकडीच्या पायथ्याशी आहे त्या टेकडीवर तुरळक झाडे आहेत.
त्यांची वाढ नीट झाली नसल्याने ही टेकडी उजाड दिसते. टेकडीवर मंदिरातून जावे
लागते. तिव्र चढाचा, निमुळता रस्ता आहे. धापा टाकतच माणूस वर चढतो. टेकडीवर दिड-दोनशे
एकराचा पुर्ण सपाट भाग आहे. त्याच्या केंद्रस्थानी एक नंदी आहे. असं म्हणतात, की
तो नंदी दरवर्षी एका गव्हाच्या दाण्याइतके अंतर पुढे येतो. हे अंतर कोण मोजतो?
कसा मोजतो? हे प्रश्न विचारू नका. मात्र असे सांगतात, तो
नंदी जेंव्हा मंदिरातील महादेवाच्या भेटीला येईल तेंव्हा जगबुडी होणार. ते अंतर एक
किलोमीटर इतक असावं. लहानपणी आम्ही ते अंतर किती असेल?
नंदीला यायला किती वर्ष लागतील? त्यावेळी आपलं वय किती असेल? आपण जिवंत असू की नसू? अशा अनेक न शोधता येणाऱ्या
प्रश्नांची उत्तरे शोधायचो. मंदिरापुढे मोठा रस्ता आहे. पुर्वी वर्दळ कमी असायची. मात्र काळाबरोबर
वाहनांची संख्या वाढली आणि रस्त्यावरची गर्दीपण....
गर्दी कितीही वाढली तरी तीचा मंदीरातील शांततेवर कोणताही परिणाम
नाही. मंदिरात अगदी शांत वाटते. महादेवाच्या दर्शनाला नेहमीचं गर्दी असते. मात्र
खरा जोर असतो तो श्रावण महिन्यात. त्यातही श्रावण महिन्यातील सोमवारी. आम्ही प्राथमिक शाळेत शिकत असताना गावातल्या सर्व लहान मुलांचा एक सामुहिक कार्यक्रम असायचा. गावातील लहान मुले कळशी किंवा चरवी घेऊन पहाटेच बाहेर पडायची. गावाबाहेर तीनेकशे मीटरवर नीलकंठा नदी. गावाच्या उत्तरेने
नदी वाहते. ही नदी आम्हाला खुप मोठी वाटायची. आमची मजल फक्त बार्शीपर्यंत. त्यामुळे
या नदीपेक्षा मोठी नदी दिसायची नाही. त्यामुळे आमच्या नदीचे मोठेपण त्या काळात
मनावर जे कोरले गेले ते आजही कायम आहे. पुढे अनेक मोठया नद्या पहाता आल्या. मात्र निलकंठा
नदीच्या त्या काळातील त्या रुपाची जागा कोणीच घेउ शकले नाही. ती फक्त
डिसेंबरपर्यंत वाहायची. त्या नदीत आंघोळ करायची. नदीच्या वरच्या पात्रात कळशी
वाळूने स्वच्छ घासून पाण्याने भरून घ्यायची. मंदिरातील पिंडीला जलाभिषेक घालायचा आणि बाहेर येवून मंदिराच्या
आवारातील प्राजक्त आणि चाफ्याची झाडाखाली पडलेली फुले गोळा करून पिंडीवर वाहायची. हा कार्यक्रम
सातवीपर्यंत नेमाने पार पाडला जायचा.
श्रावणातील गर्दीनंतर प्रत्येक अमोवास्येला गर्दी असते. त्याखेरीज
गुढीपाडव्याला तर जत्रेचे स्वरूप यायचे. घरातून उदबत्ती, नारळ, गुळ, फुले घेवून
घराघरातून मंडळी चारच्या सुमारास मंदिराकडे जायला निघायची. मंदिरात पाय ठेवायलाही
जागा नसायची. मंदिराच्या गाभाऱ्यातील मुर्तीवर त्यादिवशी
पितळी मुखवटा बसवलेला असायचा. फुले आणि पानानी छान सजावट केलेली असायची.
उदबत्त्यांचा संमिश्र वास वातावरणात दरवळत असायचा. त्या वातावरणात गर्दितून वाट
काढत आत जायचे, देवाचे दर्शन घ्यायचे नारळ ओवाळून फोडायचा. गुळामध्ये बारीक तुकडे
करून मिसळून तो प्रसाद म्हणून सर्वाना वाटायचा. त्याला 'शेरणी' म्हणायचे. सर्वजन मंदिरात जायचे. प्रसाद परत घरी आणण्याचा प्रश्न नसायचा.
गुढी पाडव्यादिवशी नवस फेडण्यासाठी अनेक लोक येतात. कोणी पाचं तर
कोणी दहा नारळाचे तोरण मंदिराच्या दरवाजाला बांधते. आणखी एक सोहळा असायचा. पाडव्या
दिवशी छोट्या बाळाना शिखरावरून खाली टाकले जाई. ज्या बाळाने मान पकडली आहे, अशी
सहा महिने ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाना 'हर.. हर.. महादेव'च्या गजरात शिखरावरून खाली टाकले जाई. खाली चारजन चादरीचे टोक घट्ट पकडून
उभा असत. सुरूवातीला नारळ टाकला जाई. तो काढल्यानंतर बाळाला टाकायचे. आईच्या
चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरलेले असायचे. चादरीमध्ये ते बाळ अलगद विसावत असे. असे
वरून टाकताना बाळाला कधी रडताना पाहिल्याचे आठवत नाही. बाळ खाली येताचं, आई त्याला
पटकन चादरीतून काढून उराशी घ्यायची. बाळ आईच्या कुशीत छान हसायचे. यामध्ये कधी
बाळाला इजा झाली नाही. बाळ असे टाकले म्हणजे देवाची त्याच्यावर कायम कृपा राहते, अशी
श्रद्धा होती. तरीही काळाच्या ओघात ही प्रथा आज कोणत्याही आंदोलनाशिवाय आपोआप बंद
झाली. आता गुढी पाडव्याला असे बाळाला शिखरावरून टाकले जात नाही. मात्र गुडीपाडव्या
दिवशीचा उत्साह कायम आहे.
त्यानंतर आणखी महत्वाचा सोहळा असतो तो महाशिवरात्रीचा. त्या दिवशी
सर्व गाव उपवास करते. संध्याकाळी सहानंतर मंदिरात हळूहळू गर्दी जमा होते. त्यानंतर
किर्तन सुरू होते. किर्तन संपताचं महाशिवरात्रीची कथा वाचायला सुरूवात होते आणि ती
नऊपर्यंत संपते. त्यानंतर जमा झालेली मंडळी आपआपल्या घराकडे जातात. त्यादिवशी
होणारे कथावाचन सर्वधर्मसमभावाची शिकवण देत असायचे. सारे ईश्वराला प्रिय आहेत. एक
पारधी शिकारीसाठी बाहेर पडतो. संध्याकाळ झाली तरी त्याला शिकार कांही मिळत नाही.
शेवटी त्याला एक तळे दिसते. त्या तळयाच्या कडेला एक झाड असते. रात्री तळयावर पाणी
पिण्यासाठी जनावर येईल आणि आपण त्याचा वेध घेवू, या आशेने शिकारी झाडावर चढतो आणि
कांही आवाज न करता शिकारीची वाट पहात असतो. त्याला अडथळा करणारी पाने तोडून ती
खाली टाकत असतो. ते झाड असते बेलाचे. त्या झाडाखाली महादेवाची पिंड असते. त्या
शिकाऱ्याने तोडलेली पाने त्या पिंडीवर पडत राहतात. नजरेला स्पष्ट दिसावे म्हणून तो
आणखी पाने तोडत जातो आणि ती खाली मुर्तीवर पडत राहतात. ही नकळत घडणारी सेवा पाहून
शंकर महादेव त्याला प्रसन्न होतात आणि वर देतात. अशा आशयाची ती कथा. शिकारीचा शोध
घेत बसलेल्या पारध्याकडून नकळत घडलेल्या सेवेमुळेसुद्धा भगवान प्रसन्न होतात. हा
बोध आमच्या मनावर कोरला जायचा. त्यामुळे जातीभेद हा मानवाने निर्माण केलेली गोष्ट
आहे. हे वर्गात शिकलेले मनावर पक्के कोरले जायचे. आजही सर्व उत्सव पार पडतात. गावी नेहमी जाणे होत
नसले तरी वेळ मिळेल तेंव्हा मी मंदिरात जातो. बालपणीच्या आठवणीना उजाळा देतो. नकळत
एक सकारात्मक ऊर्जा स्वत:मध्ये साठवून घेतो आणि नव्या उमेदीने कर्तव्य पार पाडायला
परत येतो. मनात मात्र कायम आठवणीचा सुगंध कायम दरवळत असतो.