१४ फेब्रूवारी जगामध्ये प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. फेब्रुवारी २०२० च नवे गाव आंदोलन मासिकाचे अंकही प्रेम या विषयाला वाहिलेला होता. प्रेमावरती मराठीत उदंड लिहिलेले असताना आणि लिहिले जात असताना संपादकांनी शास्त्रज्ञांच्या प्रेमाबद्दल लिहायला लावले. तो प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासाठी येथे प्रसिद्ध करीत आहे.
एखाद्या
गोष्टीचा ध्यास घ्यायचा. ती गोष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत राहायचे. सदानकदा
डोक्यात ध्येयाचा विचार असल्याने अनेकदा वागणे विक्षिप्त बनून जाते. विशेषत: वैज्ञानिक
याबाबतीत आघाडीवर असतात. अनेक यशस्वी वैज्ञानिकानी अशा पद्धतीने आपले आयुष्य पणाला
लावले. त्यामध्ये अनेकांचे लग्नच करायचे राहून गेले. लग्न करणे, संसार करणे या गोष्टी
त्यांनी कधी मनावर घेतल्याच नाहीत. संशोधनापलीकडे काही विश्व आहे हे त्यांनी कधी मानलेच
नाही. त्यातून गुरूत्वाकर्षणाचा शोध लावणारा न्यूटन असेल किंवा इलेक्ट्रीक इंडक्शनसह
अनेक शोध लावणारा आणि जगाला मोफत विद्युत द्यायचे स्वप्न पाहणारा निकोला टेस्ला असेल,
असे अनेक वैज्ञानिक आयुष्यभर अविवाहीत राहीले. मात्र अनेकजन ‘नेटका संसार’ करूनही आपल्या
ध्येयाप्रत पोहोचण्यात यशस्वी झाले. काहीना संशोधक महिला जोडिदार मिळाल्या तर काहीना
केवळ त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या कार्यास पूरक भूमिका निभावणाऱ्या जीवनसाथी
मिळाल्या.
शास्त्रज्ञांच्या
प्रेमकथांचा विचार करताना सर्वात प्रथम डोळ्यासमोर नाव येते ते स्टिफन हॉकिंग यांचे.
या माणसाचे शरीर खूर्चीमध्ये खिळले होते, मात्र मनाने तो काळाचा इतिहास अभ्यासत होता.
त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी उच्चशिक्षीत कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षणही व्यवस्थीत
सुरू होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात खगोलशास्त्राचे शिक्षण घेत असताना साहित्याची विद्यार्थीनी
असणाऱ्या जेन वाईल्ड हिच्याशी त्यांचा परिचय झाला. दोघांचेही विद्यार्थी जीवन संपले
नव्हते. अभ्यास सुरु होता. या अभ्यासासोबत त्यांची प्रेमकथाही बहरु लागली. ही कहाणी
सुरू झाली आणि न्यूमोनियामुळे स्टिफन आजारी पडले. मात्र ते बरे झाले नाहीत. त्यांच्या
पुन्हा चाचण्या केल्यानंतर आजारातून ते पूर्ण कधीच बरे होणार नाहीत आणि त्यांना मोटर
न्यूरॉन डिसिज झाल्याचे लक्षात आले. हॉकिंग यांच्या कुटुंबाला हा मोठा धक्का होता.
या रोगात स्नायूवरील नियंत्रण हळूहळू कमी होते आणि शरीर लूळे पडत जाते. अल्पावधीत व्यक्ती
मरण पावते. तज्ज्ञ डॉक्टरनी जानेवारी १९६३ मध्ये स्टिफन यांचे आयुष्य केवळ दोन वर्ष
असल्याचे सांगीतले. मात्र ते १४ मार्च २०१८ पर्यंत जगले. त्यांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर
त्यांनी जेन यांना स्वत:पासून विभक्त व्हायला वारंवार सांगीतले. मात्र प्रेमामध्ये
शंका नसतात, स्वार्थ नसतो तर केवळ त्याग असतो. खरे प्रेम म्हणजे काय असते, हे जाणणाऱ्या
जेनने
स्टिफन यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय कायम ठेवला. स्टिफन यांच्या हालचाली
पूर्ण थांबण्यापूर्वी १९६५ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना रॉबर्ट, ल्यूसी आणि टिम ही तीन मुले झाली. हा संसार असाच २५ वर्ष चालला. तोपर्यंत जेनचे संगीत आणि कलेच्या प्रांगणात मोठे नाव झाले होते. तीचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले. त्यामूळे पूर्वीप्रमाणे ती स्टिफन यांच्यासमवेत राहू शकत नव्हती. स्टिफन यांची काळजी घेण्यासाठी एलियन मॅसन या नर्सची नियुक्ती करण्यात आली. ती स्टिफन यांच्यासमवेत
राहू शकत नव्हती. स्टिफन यांची काळजी घेण्यासाठी एलियन मॅसन या नर्सची नियुक्ती करण्यात
आली. ती स्टिफन यांच्यासमवेत असायची. हळूहळू स्टिफन यांना तिची सवय झाली. जेनचा सहवास
खूपच कमी लाभायचा. एलियनसोबतच्या सहवासातून स्टिफन तिच्या प्रेमात पडले. ही गोष्ट जेनच्या
लक्षात आली. स्टिफन यांना आपल्यापेक्षा कोणीतरी जास्त आवडते हे लक्षात आल्यानंतर जेन
त्यांच्या आयष्यातून बाजूला झाली. स्टिफन यांनी एलियनशी दुसरा विवाह केला. तरीही जेन
दोन वर्ष एकटीच राहिली. अखेर जेननेही १९९७ मध्ये संगीतकार जोनाथन जोन्स यांच्याशी विवाह
केला. स्टिफन यांचे जगणेही अवघड आहे, हे माहित असताना त्यांच्याशी विवाह करणाऱ्या आणि
पंचेवीस वर्ष संसार करणाऱ्या जेन आणि स्टिफन यांची प्रेमकथा ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’
या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर आली आणि खूप गाजलीसुद्धा!
भारतीय
संशोधन कार्यक्रमाचे जनक थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई आणि त्यांच्या पत्नी
मृणालिनी
साराभाई यांचे एकमेकावर नितांत प्रेम होते. स्टिफन यांच्याप्रमाणेच विक्रम साराभाई
हे भौतिकशास्त्रज्ञ तर त्यांच्या पत्नी मृणालिनी कलाकार. त्या प्रसिद्ध नृत्यांगना
होत्या. आपल्या व्यस्त कार्यातून पत्नीच्या आवडीकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून साराभाईनी
‘दर्पण’ नावाची संस्था अहमदाबाद येथे सुरू केली. त्या संस्थेच्या कार्यक्रमाना ते उपस्थित
राहात. त्यांचे एकमेकावर खूप प्रेम होते. मात्र सुधिर कक्कर यांनी अहमदाबाद येथील इंडियन
इंस्टिट्यूटच्या स्थापनेमागे विक्रम साराभाई हे क्रियाशील होते आणि त्यांचे अहमदाबाद
टेक्सटाईल इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेत काम करणाऱ्या कमला चौधरी नावाच्या विधवा महिलेवर
प्रेम बसले, असा दावा त्यांच्या पुस्तकात केला आहे. कमला चौधरी यांनी अहमदाबादत राहावे,
यासाठी त्यांनी अहमदाबादेत आयआयएम स्थापन करण्याचा आग्रह धरला असे मानले जाते. या संस्थेच्या
कमला चौधरी या पहिल्या संशोधक संचालक बनल्या होत्या.
एकोणविसाव्या
शतकातील द्मित्री मेंडेलिव यांची कथा ही विक्रम साराभाई यांच्यासारखीच आहे. त्यांचा
विवाह हा लेशेवा यांच्याशी झाला होता. लग्नानंतर संसारही सुरळीत चालू होता. मेंडेलिव
त्यावेळी जगातील उत्कृष्ट रसायनशास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आलेले होते. त्यांच्या
आवर्त सारणीच्या
कार्याबद्दल २०१९ हे साल युनोने जाहीर केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय
पातळीवर आवर्त सारणी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले, असे त्यांचे कार्य. मात्र, त्यांच्या
पिटसबर्ग येथील विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पोपोवा नावाची मुलगी रूजू झाली.या सुंदर
मुलीच्या प्रेमात मेंडेलिव पडले. त्याकाळी रशियात एकच लग्न मान्य होते. दुसरे लग्न
करायचे तर पहिल्या पत्नीला घटस्फोट देवून सात वर्ष एकट्याने राहावे लागत असे. त्यांनतर दुसरा विवाह केला तरच तो कायदेशीर ठरत असे.
असे असतानाही मेंडेलिव यांनी पोपोवाकडे प्रेम व्यक्त केले. पोपोवाला मेडेलिव आवडत नव्हते,
असे नाही. मात्र, तिने सामाजिक भान ठेवत या गोष्टीला नकार दिला. यावर मेंडेलिव यांनी
‘तू जर आपले प्रेम मान्य नाही केले आणि माझ्याशी लग्न केले नाही, तर आपण आत्महत्या करू’, अशी धमकी दिली.
यानंतर मात्र ती मेंडेलिवशी लग्नकरायला तयार झाली. त्यांनी लग्न केले. लग्नानंतर दिडवर्षाने त्यांचा प्रथम पत्नीशी घटस्फोट झाला. या सर्व गोष्टींचा मेंडेलिव यांच्या कार्यावर परिणाम झाला. रशियन ॲकेडमी ऑफ सायन्सेसने त्यांना सदस्यत्व नाकारले. शेवटी ते रॉयल सोसायटी लंडन येथे नोकरी करू लागले. इंग्लंडमध्ये मात्र त्यांना मोठा मानमरातब मिळे. त्यांना डेव्ही मेडले आणि कोपले पुरस्कार देण्यात आला. मात्र मातृभूमीची ओढ या संशोधकाला शांत बसू देत नव्हती. त्यांनी रशियाला परत यायचा निर्णय घेतला आणि प्रेमापुढे रशियातील कायदाही झुकला आणि मेंडेलिव सन्मानाने रशियात परतले. पुढे त्यांचा संशोधनाबरोबर संसारही सुखाचा झाला.
अशा
अनेक संशोधकांच्या प्रेमकथा असल्या तरी मनात घर करून राहते ती एकोणविसाव्या शतकातील
मारी आणि पिअरे क्यूरी या दांपत्याची प्रेम कहाणी. यातील मारीचा जन्म पोलंडमध्ये झाला.
त्याकाळी पोलंडवर रशियाची सत्ता होती. रशियनाकडून स्थानिकावर मोठा अन्याय केला जाई.
मूळनिवासी नागरिकांना मुलांना शाळेतही पाठवता येत नसे. काही मंडळी भूमिगत शाळा चालवत.
मात्र शाळांचे ठिकाण दर दोन दिवसाला बदलावे लागत असे. शेवटी तिने मोठ्या भावंडाप्रमाणे
पोलंड सोडले. ती फ्रांसला आली. पॅरिसमध्ये तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचवेळी
तिला पिअरे क्यूरी भेटले. दोघेही एकाच प्रयोगशाळेत संशोधन करायचे. दोघांचीही परिस्थिती
गरीबीची. कधीकधी केवळ ब्रेड खाऊन पाणी प्यायचे आणि आला दिवस ढकलायचा. दोघेही अविरत
कष्ट करायचे. दोघानांही काहीतरी बनायचे होते. दोघांच्याही डोळ्यात स्वप्ने होती. अखेर
दोघांचे सूर जुळले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.
मात्र आर्थिक पातळीवर आनंदच होता. त्यांनी लग्नात परस्परांना सायकल भेट दिली. लग्नासाठी
नवे कपडेही घेतले नाहीत. लग्नावेळी मारी यांनी प्रयागशाळेत घालायचा काळा गाउन घातला
होता. अशा परिस्थितीत झालेले लग्न दोघांनीही मनोभावे शेवटपर्यंत नेले.
किरणोत्सारी
पदार्थांचा शोध घेत त्यांचे संशोधन सुरू होते. त्यांनी केलेल्या संशोनाबद्दल या दांपत्याला
१९०३ सालाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषीक मिळाले. त्यानंतर दुर्दैवी अपघातात १९०६
मध्ये पिअरे यांचे निधन झाले आणि मारी या एकाकी पडल्या. तरीही त्यांनी पतीसमवेत सुरू
असलेले संशोधन सुरूच ठेवले आणि पोलोनियम आणि रॅडियम या दोन मूलद्रव्यांचा शोध लावला.
या शोधाबद्दल त्यांना १९११ चे नोबेल पारितोषीक मिळाले. आजही दोन नोबेल मिळवणाऱ्या त्या
एकमेव महिला आहेत. पुढे त्यांच्या कन्येलाही नोबेल पुरस्कार मिळाला. मारी आणि पिअरे
क्यूरी यांनी संशोधन आणि संसार दोन्ही नेटके केले. त्यांच्या प्रेमाची कथा सफल झाली.
त्यामुळेच एका मूलद्रव्याचे नाव क्यूरियम असे ठेवून त्यांचे कार्य रसायनशास्त्रातील
आवर्त सारणीत मानाने नोंदवले गेले.
संशोधकही
माणसेच असतात. ती संशोधनामध्ये रमतात. त्यासाठी आपले आयुष्य वेचतात. मात्र त्यांच्या
भावना या आपल्यासारख्याच असतात. शेवटी पाडगावकरानी म्हटलेच आहे ‘प्रेम म्हणजे प्रेम
म्हणजे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते’. शास्त्रज्ञांचेही सेमच असते.