बहावा! एक नितांतसुंदर असं झाड. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये
कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू
अशी अनेक नावं धारण करणारं भारतीय उपखंडातील मूळचं झाड. देखण्या चित्ताकर्षक
फुलांच्या माळा आंगोपांगावर वागवणारं म्हणूनच नव्हे तर बहुगुणी, बहुऔषधी, बहुपयोगी
म्हणूनही सर्वदूर लोकप्रियता प्राप्त करणारा हा राजवृक्ष आहे. बहावाच्या याच
वैशिष्ट्यपूर्णतेवर टाकलेला एक दृष्टीक्षेप….
--------------------------------------------------------------------------------------------
बहावाची
आणि आमची ओळख शाळेपासूनची. गाव बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी. लहानपणी अनेकदा या डोंगरावर
गेलो. पावसाळ्यात या डोंगरात फिरताना एका झाडाला लांबलचक काठीसारख्या शेंगा दिसायच्या.
त्या तोडून आम्ही त्याचा वापर काठी म्हणून करायचो. एका मित्राने त्या शेंगांचा आणखी
वेगळाच उपयोग शोधला. काठी तोडायची. काठीचा तुकडा दगडावर रगडायचा. काळा रंग असल्याने
काठी चांगलीच तापायची. त्या तापलेल्या तुकड्याचा चटका मित्राला द्यायचा. चटका बसला
की मित्र दचकायचा. तो दचकला की याला आनंद व्हायचा. गमतीत आम्हीही हा प्रयोग करू लागलो.
ही गोष्ट आमच्या पिताश्रींच्या लक्षात आली आणि त्याच काठीचा पाठीवर प्रसाद मिळाला.
वरुन ताकीदही. पुन्हा या शेंगा घरात दिसता कामा नयेत. ही बहावाची आणि आमची पहिली भेट.
त्या काळात उन्हाळ्याच्या डोंगरात हिंडायला आम्हाला बंदी असल्याने आणि गावाजवळ बहावाची
झाडे नसल्याने शालेय जीवनात… तो फुललेला कधी दिसलाच नाही.
पुढे
बसमधून प्रवास करताना कधीमधी दिसला तरी लक्षात राहिला नाही. दयानंद महाविद्यालयात विशेषत:
वसतीगृहाच्या मागे त्याची झाडे होती. वसतीगृहातून बाहेर पडण्याच्या मार्गावर बहावा
आणि सोनमोहरची झाडे होती. महत्त्वाचे म्हणजे आमच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेशेजारी
बहावाचे उंच वाढलेले झाड होते. त्याची इमारतीशी स्पर्धा सुरू होती. ते जणू विद्यार्थ्यांना
सांगायचे, इमारतीसारखे राहू नका; माझ्यासारखे वाढत राहा. मात्र ते फुलायच्या दिवसात
महाविद्यालयाला सुट्टी असल्यामुळे त्याचे पुष्पसौंदर्य
प्रथम आणि द्वितीय वर्षात अनुभवता आले नव्हते. तिसऱ्या वर्षी मात्र शिक्षकांच्या संपामुळे
परीक्षा उशीरा झाल्या आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्या झाडाला फुललेले पाहायचे
भाग्य आम्हाला लाभले. ते फुललेले रूप पाहून मी त्या झाडाच्या(च) प्रेमात पडलो. त्यानंतर
प्रवासादरम्यान रस्त्याकडेला हे झाड दिसले की त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवत राहिलो.
आम्ही
विद्यापीठातील निवासस्थानात राहात होतो, तेव्हाची गोष्ट. आपण जेवढी वर्षे इथे राहणार
तेवढी वर्षे दरवर्षी एक झाड लावून वाढवायचे, असे आम्ही ठरवलेले. अगोदरच्या वर्षी गुलमोहर
लावला. त्या शेजारी बहावाचे रोप लावायचे, असे
आमच्या सौभाग्यवतींनी ठरवले. त्यासाठी त्यांनी एका माळ्याला बहावाचे रोप आणून द्यायला
सांगितले. त्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर माळी घरी आला. तो आमच्या सौभाग्यवतींना सांगत
होता की, ‘मॅडम, ते तुम्ही सांगितलेले ‘बावा’चे रोप काही मिळत नाही. लय शोधलं पण कुठं
मिळंनाच’. सौभाग्यवतींना आश्चर्याचा धक्का बसला. ‘मी कुठे तुम्हाला असले रोप बघायला
सांगितले होते?’ त्यावर तो माळी पुन्हा म्हणाला, ‘मागच्यावेळी आल्यावर तुमीच म्हणला
होता की बावाचं रोप पायजेल म्हणून’. त्या दोघांचा चाललेला संवाद ऐकून मला हसू येत होते.
कारण तो माळी त्याच्या भाषेत सांगत होता, तर आमच्या सौभाग्यवती पुणेरी मराठीत. शेवटी
मी मध्ये हस्तक्षेप करत विचारले, ‘अरे, कसल्या झाडाचे रोप म्हणतोस?’ मग त्याने सांगितले,
‘आपल्या गेस्ट हाऊसजवळ नाही का, पिवळी उलटी फुलं येतात ते, काठीसारख्या शेंगा असत्यात;
ते झाड हो. त्याचं मॅडमनी रोप मागितलं होतं. सगळीकडे शोधलं पण मिळतच नाही’. हे वर्णन
ऐकून सौभाग्यवती आणि माझ्या डोळ्यासमोर पटकन ते झाड आले. मी बोलायच्या अगोदर सौभाग्यवतीच
बोलल्या, ‘अच्छा, तुम्ही बहावाच्या रोपाबद्दल बोलताय होय. मग ते कसे तयार करायचे?’
मीच पुढे म्हटले, ‘ आता त्याला शेंगा आल्या असतील ना. त्या शेंगा घेऊन ये. आपणच करू
त्याचे रोप’. माळ्यालाही आश्चर्य वाटले आणि तो दहा मिनिटात शेंगा घेऊन आला. त्याचे
बी काढून लावले. महिन्याभरात मस्त रोप वाढले. विद्यापीठातील निवासस्थानाबाहेर बहावाचे
रोप गुलमोहोराशेजारी लावले. पण माळ्याने ‘बहावा’ची टोके काढून त्याला ‘बावा’ केलेले
पाहून हसायला येत होते. आजही ही आठवण काढून आम्ही हसतो.
बहावा!
नितांत सुंदर असे झाड. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन
शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू असे नाव धारण करणारे हे झाड. या झाडाचे
मूळ भारतीय उपखंडात आहे. ब्रह्मदेशापासून दक्षिण पाकिस्तान आणि उत्तर प्रदेश बिहारपासून
अगदी श्रीलंकेपर्यंत आढळणारे हे झाड. या अस्सल भारतीय झाडाचा उल्लेख येथील पुराणात
आढळत राहतो. रामायणामध्ये सीताहरणावेळी सीता कर्णिकार वृक्षाला सांगते, ‘हे कर्णिकार
वृक्षा, तू प्रभू रामचंद्रांना सांग की तुमच्या सीतेला रावणाने पळवले आहे.’ त्याचप्रमाणे
रामही सीतेच्या विरहाने व्याकुळ होऊन कर्णिकार वृक्षाला मिठी मारतात आणि विचारतात,
‘तू सीतेला पाहिलेस का?’. रामायणात त्यापुढेही अनेक ठिकाणी या वृक्षाचा उल्लेख आला
आहे. कवी कालिदासाने आपल्या काव्यात या झाडाचे वर्णन अनेकदा केले आहे. महाभारतात मात्र
बहावा कोठे भेटला नाही.
हा
बहुगुणी वृक्ष आहे. त्याच्या गुणधर्माप्रमाणे त्याला अनेक नावे मिळाली. त्याच्या वर्णनावरून
आणि उपयोगाप्रमाणे ही नावे आली आहेत. हे झाड औषधी असून आयुर्वेदात त्याचे विविध उपयोग आहेत. या झाडाच्या शेंगांचा मुख्यत: उपयोग केला
जातो. रोगांचा नाश करणारा म्हणून बहावाला ‘आरग्वध’ असे नाव मिळाले. याच्या शेंगाची
पूड रेचक असल्याने बद्धकोष्ठता असणाऱ्या रूग्णासाठी वापरली जाते. त्यामुळे त्याला ‘आरेवत’
असेही नाव पडले. विविध व्याधींचा नाश करणारा म्हणून ‘व्याधीवत’, मानवाचे कल्याण करणारे
फळ देणारा म्हणून याला ‘शम्पाक’ म्हणतात. हा वृक्ष आरोग्य चांगले ठेवण्यास सहाय्यकारक
असल्याने त्याला ‘आरोग्यम्’ असेही म्हणतात. त्याची शेंग गुणकारी असल्याने त्याला ‘आरोग्यशिम्बी’
हे नाव मिळाले. तर त्या झाडाच्या वर्णनानुरूप त्याला ‘सुवर्णक’ म्हणजे सोनेरी रंगाचा,
‘स्वर्णाङ्ग’ म्हणजे सोनेरी काया असणारा, ‘स्वर्णभूषण’ म्हणजे सोन्याच्या दागिन्याप्रमाणे
फुले असणारा, ‘स्वर्णद्रु’ म्हणजे सोनरी वृक्ष, ‘कृतमाल’ म्हणजे फुलांच्या माळा धारण
करणारा, ‘दीर्घफल’ म्हणजे लांबलचक फळ असणारा, ‘चतुरङ्गुल’ म्हणजे दोन पानात चार बोटांचे
अंतर असणारा, अशा विविध नावांचा धनी आहे हा बहावा. हा वृक्ष मूळ या मातीतील असल्याने
त्याला अशी अनेक संस्कृत नावे येणे स्वाभाविक आहे.
याचे
शास्त्रीय नाव आहे कॅशिया फिस्टुला. बहावाच्या फळांचा आकार हा दंडगोलाकार लांब काठीप्रमाणे
असल्याने त्याला फिस्टुला हे नाव मिळाले. तर त्याच्या फुलांचा मंद सुगंध येत असल्याने
ग्रीक शब्द कॅसियावरून त्याचा समावेश कॅशिया कुटुंबात झाला आहे. या फळातील गोडसर गर
हा माकडांचे आवडते खाद्य त्यामुळे याला हिंदीमध्ये ‘बंदर लाठी’ असेही नाव मिळाले आहे.
तर याच गुणधर्मामुळे त्याला इंग्रजीमध्ये ‘पुडींग पाईप ट्री’ असे म्हणतात. एखाद्या
राजाच्या दरबारात सर्वांचे बोलणे झाल्यानंतर सुवर्णालंकारानी नटलेला राजा बोलायला उभा
राहावा, तसा वसंत ऋतू संपण्याच्या मार्गावर असताना निसर्गाच्या दरबारात हा वृक्ष खुलून
दिसतो. म्हणूनच की काय याला ‘राजवृक्ष’ असेही म्हटले जाते.
हा
खरोखर राजवृक्ष आहे. थायलंडमध्ये त्याला राजवृक्षाचा दर्जा आहे. या वृक्षाला फुले आल्यानंतर
तेथे मोठा उत्सव साजरा केला जातो. बहावाचे फुल हे थायी संस्कृतीचे निदर्शक मानले जाते.
त्याला ‘रॅचाफ्रुरेक’ म्हणून ओळखले जाते. बहावाच्या फुलण्याला ते ‘डोकू खून’ म्हणतात.
आपल्याकडचे डाकू आणि खून हे दोन शब्द आठवतात. मात्र इतक्या सुंदर फुलांशी जोडला गेलेला
शब्द ‘खून’ असला तरी तो थाई भाषेतील आहे. हिंदी किंवा मराठीतील नाही. लाओ या देशाचे
नववर्ष या वृक्षाच्या फुलण्याबरोबर सुरू होते. नवे वर्ष हे आनंद आणि सुखसमृद्धीने भरलेले
असावे, यासाठी या वृक्षाच्या फुलांनी घरे आणि मंदिरे सजवली जातात. सर्वत्र ही फुले
झुंबरासारखी लावतात. श्रीलंकेतही बौद्ध मंदिराच्या भोवती या झाडांची लागवड केली जाते.
सिंहली भाषेत याचे नाव ‘इहेला’ असे आहे. इंडोनशियामध्ये याला ‘कायुराजा’ म्हणून ओळखले
जाते.
अशा या अनेक नावे धारण करणाऱ्या वृक्षाची उंची वीस फुटांपासून साठ फुटापर्यंत
असते. हे झाड चिंच, गुलमोहर, शंकासूर, नीलमोहर, कांचन यांच्याच कुटुंबातील सदस्य आहे.
भारतीय उपखंडातील जरी हे झाड असले, तरी त्याच्या सौंदर्यामुळे आज जगभर त्याची लागवड
केली जाते. पाण्याची निचरा होणारी जमीन या झाडासाठी योग्य. उलट पाणी जास्त असले तर
ते बहरात येत नाही. म्हणजे म्हणावे तसे फुलत नाही. डोंगर कपारीतही हे झाड छान फुलते.
ते क्षार मोठ्या प्रमाणात शोषून घेते. त्याला जास्त थंडी सहन होत नाही. याचे खोड टणक
आहे. बैलगाड्या, होड्या शेतीची अवजारे शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी याचे लाकूड उपयोगाला
येते. गावाकडे बारदाण्यासाठी बाभळीचे लाकूड नाही मिळाले, तर बहावाच्या लाकडाला पसंती
दिली जाते. बहावाच्या लाकडावरील सालही पिवळसर हिरवी किंवा फिकट पोपटी रंगाची असते.
त्याच्या सालीचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मुख्यत: कातडे कमावण्यासाठी ही
साल वापरतात. घशाच्या गाठीवर बहावाच्या सालीचा काढा करून दिला जातो. हे तसे पानगळीचे
झाड. याचे पान संयुक्त असते. देठाच्या दोन्ही बाजूला तीन ते आठ लांब पाने येतात. पानाची
लांबी अगदी दोन फुटापर्यंतही असते. मात्र जनावरे याची पाने खात नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या
कडेला हे झाड लावण्यासाठी सुरक्षित मानतात. वसंताच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्या खोडावर
मोहर यायला सुरूवात होते आणि एप्रिलच्या अखेरीस बहावा फुलायला सुरुवात होते.
बहावाच्या
फुलाला एकसारख्या आकाराच्या पाच पिवळ्या नाजूक पाकळ्या असतात. त्याच्या केंद्रस्थानी
दहा सारखे आणि तीन वेगळे पुंकेसर असतात. स्त्रीकेसर मात्र एक आणि लांब असतो. अशा अनेक
कळ्यांचे घोस उलटे जमिनीकडे वाढत राहतात आणि फुले फुलायला सुरुवात होते. मात्र तो फुलांचा
गुच्छ बनत नाही. तर ते दोलकाप्रमाणे भासतात. मात्र झुलतात झुंबरासारखे. छताला टांगलेल्या
झुंबराप्रमाणे ते फांदीला चिकटलेले असतात. आदिवासी लोक याच्या कळ्यांची आणि फुलांची
भाजी करतात. काही लोक याचा गुलकंदासारखा खाद्यपदार्थही बनवतात. बहावाच्या फुलांचे घोस
हे पंधरा दिवसांपर्यंत टिकतात. वरून फुले उमलतात, तेव्हा मध्ये अर्धवट फुललेल्या कळ्या
असतात. तर अगदी टोकाला मुक्या कळ्या असतात. हे घोस अगदी दीड-दोन फूट लांबीचे येतात.
संशोधकांच्या मते बहावाचे सहा ते सात प्रकार आहेत. मात्र त्याला पिवळ्या किंवा पांढऱ्या
रंगाची फुले येतात. उत्तराखंडमध्ये पांढरा बहावा आढळतो. आपल्याकडे मात्र पिवळा बहावाच
आढळतो. या फुलांना दिवसा सुगंध जाणवत नाही. अगदी जवळ गेल्यावर मंद सुवास येतो. रात्री
मात्र या झाडाजवळ जाताच येणारा गंध मनाला मोहवून टाकतो. त्याच्या फुलामध्ये असणाऱ्या
रसामुळे अनेक किटक त्याकडे आकृष्ट होतात. वाऱ्याची झुळुक आल्यावर खाली पडणाऱ्या त्या
सुवणमुद्रांचा सडा अंगावर घेताना आपणही जणू राजा असल्याचा भास व्हावा.
याचा
बहार संपताना त्यावर लांब हिरव्या शेंगा येतात. तीच याची फळे. दीड ते दोन फुट लांबीच्या
या शेंगा टणक असतात. त्यांचे आवरण शेंग जशी पक्व होत जाईल तसे टणक होत जाते. तिचा व्यास
दीड ते अडीच सेंटीमीटर असतो. शेंगांच्या आत कप्पे असतात. या कप्प्यात गोड गर असतो आणि
त्यात त्याच्या बिया सुखात राहतात. वानरांप्रमाणेच कोल्हा, अस्वल, भेकर हे प्राणीही
याच्या कोवळ्या शेंगावर ताव मारतात, असे संशोधकांना आढळून आले आहे. हा गर तंबाखूला
सुगंधी बनवण्यासाठी वापरला जातो. हा गर पित्तशामकही आहे. ही फळे पक्व होतात, तसा त्यांचा
रंग हळूहळू तपकिरी आणि नंतर काळा होत जातो. उन्हाळ्यात या शेंगा पूर्ण काळ्या रंगाच्या
बनतात. पूर्ण वाळलेल्या शेंगा वाऱ्यावर झुलू लागल्या की त्यातून मंजूळ आवाज ऐकायला
मिळतो. शेवटी बिया सुट्ट्या न होता पूर्ण शेंगच जमिनीवर पडते. शेंग जड असल्याने आणि
आवरण कठिण असल्याने याची निसर्गत: मोठ्या प्रमाणात रोपे तयार होत नाहीत. बिया जाणीवपुर्वक
रूजवून मात्र हवी तेवढी रोपे बनवता येतात.
इतर वेळी या झाडाचे अस्तित्व जाणवतही नाही. मध्यम
चणीच्या या वृक्षाच्या फांद्या कशाही वाढलेल्या असतात. हिवाळा सरताना याची सर्व पाने
पडतात. मात्र त्याच्यावर पाने येण्यापूर्वीच मोहर यायला सुरूवात होते. फुलांचा मोहर
संपताना त्यावर लालसर रंगाच्या पानासह नवे कोंब फुटतात. ही पाने नंतर पोपटी आणि शेवटी
गडद हिरवी होत जातात. हिवाळा संपताना याची पाने पिवळसर रंग धारण करतात आणि गळतात.
असा
हा विविध रंगाची उधळण करणारा बहावा कवीला भुरळ न पाडता तरच नवल. अनेक कवींनी बहाव्याला
काव्यात बांधले आहे. अरूण सु. पाटील यांना फुललेल्या बहावाच्या झाडाकडे पाहताना नटलेली
आणि हळद लावलेली नवरी दिसली. ते म्हणतात,
‘हिरवी
हिरवी गार
साडी
नवरी नेसली
सोनपिवळी
फुलांची
अंगी
हळद माखली’
तर
फुललेला बहावा पाहून कवी बिपीन यांना कवळ्या प्रेमाची आठवण येते. ‘मायबोली’ ब्लॉगवर
कवयित्री स्मिता यांनी ठेवलेल्या कवितेचा शेवट खूपच हळूवार केला आहे. कवीने बहावा गुलमोहराच्या
कुशीत बहरत असल्याचे वर्णन केले आहे. रेखा घाणेकर यांच्या ब्लॉगवर बहावावर दोन कविता
दिसतात. त्यातील एका कवितेत अगदी नेमक्या शब्दांत त्या म्हणतात ‘मन बहावा, बहावा, डोळे
भरून पहावा’. बहावाचे फुलणे खरंच डोळे भरून पाहावे, असेच आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध
कवी, गीतकार गुलजार यांच्या ‘अमलतास’ या कवितेमुळे बहावाचे हिंदी नाव अनेकांना कळले.
मराठीतील
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या कवितेतील तिसरे
कडवे हे बहावाचे फुलणे पाहूनच लिहिले असावे, असे मला नेहमी वाटते. यात मी विज्ञानाचा
विद्यार्थी असण्याचा भाग असावा. कवीच्या कल्पनेला अंत नाही, मर्यादा नाहीत. कोणतीच
बंधने नाहीत. मात्र विज्ञान तसे मान्य करत नाही. त्या ओळी अशा आहेत,
‘पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या
गंधाने भरला गगनाचा गाभारा’
वसंतात
विविध झाडांना पालवी फुटून झाडे हिरवीगार होतात, म्हणजे पाचूचा रंग धारण करतात. त्यावेळी
म्हणजे वसंताच्या शेवटच्या काळात हळदीच्या रंगाची फुले धारण करत बहावा फुलतो. भाळावर
घामाचे थेंब या काळात हमखास येतात. श्रावणात वातावरण बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे
घामाचे थेंब भाळी येण्याची शक्यता नाही. मात्र भाळीचे थेंब श्रावणसरीमुळे आले असतील,
तर त्या पावसामुळे माती गंधित होत नाही. तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब जेव्हा पडतात,
तेव्हा मातीचा गंध गगनाचा गाभारा भरून टाकतो. श्रावणातील पाऊस मातीला गंध देत नाही.
बहावा फुललेला असतो तेव्हा तापलेल्या मातीवर वळीवाचा पाऊस पडतो. तेव्हा जमीन तापलेली
असते. त्या मातीचा गंध येतो. म्हणून हे कडवे पाडगावकरांना बहावाच्या फुलण्याला पाहून
सुचले असावे आणि नकळत या गाण्यात बसले असावे, असे वाटते. ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे
गीत निश्चितच आनंद देते. खूप सुंदर आवाजात ते लताजीनी गाईले आहे. मात्र या गाण्यातील
या ओळी ऐकताना बहावाच आठवत राहतो.
हे
कवितांचे झाले. मात्र या बहावाने एका शास्त्रज्ञालाही मोहात पाडले होते. डॉ. बिरबल
साहनी हे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आणि पुरावानसशास्त्रज्ञ. म्हणजेच पॅलिओबॉटनिस्ट.
वनस्पतींच्या निर्जीव जीवाश्मांचा अभ्यास ते करत. त्यांनी याबाबतची राष्ट्रीय संस्थाही
स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. बिरबल साहनी हे सौंदर्यदृष्टी असणारे रसिक व्यक्तीमत्व
होते. त्यांच्या निवासस्थानी त्यांनी सुंदर बाग फुलवली होती. या बागेत ते स्वत: काम
करत. घराची आणि आपली काळजी घेणाऱ्या पत्नीला कृतज्ञता म्हणून दररोज बागेतील गुलाबपुष्पांचा
सुंदर गुच्छ भेट देत. त्यांनी लखनौमध्ये गोमती नदीच्या किनारी आपले घर बांधले. नदीच्या
किनाऱ्यावर सर्वत्र बहावाची झाडे लावली. ऐन उन्हाळ्यात फुललेला बहावा हा पर्यटकांचे
आकर्षण बनला. परदेशी पर्यटकही उन्हाळ्यातील हे सौंदर्य टिपण्यासाठी लखनौला भेट देत.
असा
हा बहावा. कोणत्याही दृष्टीने त्याचा विचार केला तर केवळ ‘अरे व्वा’ असे कौतुकाचे शब्द
यावेत, असा अस्सल देशी वृक्ष. तो भरभरून फुलला की शेतकरी यावर्षी पाऊस जोरात येणार,
असे आजही मानतात. त्याला पावसाची चाहूल देणारा वृक्ष म्हणूनही ओळखले जाते. बहावा फुलला
की पुढे पंचेचाळीस ते साठ दिवसांत पाऊस येतो, असे मानले जाते. आणखी एक समज म्हणा किंवा
अंधश्रद्धा, अशी आहे की, बहावा फुलला असताना त्याच्या खालून जर स्त्री गेली तर तिचा
केशसंभार अधिक लांब होतो. ही अंधश्रद्धाच. कारण भेदभाव माणसाचा गुणधर्म; निसर्गाचा
नव्हे! याची फुललेली फुले आणि शेंगा ज्या पद्धतीने जमिनीकडे असतात, ते पाहून बहावात
मला विद्वान, सर्वगुणसंपन्न अशा विनम्र महात्म्याचा भास होतो. असे सर्वांना प्रिय असणारे
सौंदर्यही नम्रपणे धारण करणारा बहावा, निश्चितच असा भेदभाव करू शकत नाही. केस वाढोत
किंवा न वाढोत, त्या वादात न पडता, बहावा फुललेला असताना कोणीही त्याखाली बसावे. मंद
वाऱ्याची झुळूक यावी आणि त्याच्या पाकळ्यांचा सडा अंगावर घ्यावा… तो आनंद मनात साठवावा
आणि आयुष्यभर बहावाच्या फुलण्याचा त्याच्या सौंदर्याचा, नम्रतेचा, शालीनतेचाच आठव व्हावा.
अप्रतिम लेख आहे सर.....अगदी परीपूर्ण माहिती आहे.
उत्तर द्याहटवासर अप्रतिम लेख आहे मी काही दिवसांपूर्वी बहावा च्या बिया गोळ्या केल्या त्यावेळी मला वाटलं नाही की या झाडाचे इतके महत्त्व आहे..... सर नेहमीपेक्षा काहीतरी नवीन माहिती दिला आपण रोज एक झाडाची माहिती पाठवला तर खूप छान माहिती मिळेल.....धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा.हा लेख golden flowers सारखा सुंदर आहे. अतिशय छान लेख आहे. Thanks sir
हटवान पाहता सुद्धा त्या झाडाचा सहवास लाभला, त्याच्या नितांतसुंदर सौंदर्याची अनुभूती येते, अप्रतिम वर्णन, ना कमी ना ज्यादा
उत्तर द्याहटवाखूपच छान , उपयुक्त माहिती मिळाली
उत्तर द्याहटवासर सर्वांगसुंदर लेखन. बहावा या वृक्षाविषयी अप्रतिम सादरीकरण.. मी तर म्हणेन हा बहावा वरील शोधनिबंध आहे. यात आपण अतिशय सखोल माहिती सर्वांगाने परीक्षण करून दिली आहे. लेखनातील सातत्य वाखाणण्याजोगे आहे सर. यामध्ये आपण आपली पहिली बहावा भेट, विद्यापीठात आल्यानंतर त्याची लागवड, याविषयीचे पुराणातील संदर्भ, या वनस्पतीचे गुणधर्म आणि उपयोग, यास दिलेली वेगवेगळी नावे, त्याची शास्त्रीय माहिती, पान फूल फळ यांचे सूक्ष्म निरीक्षण, बहावाचे काव्यातील अवतरण आणि काव्यमय शेवट करून या लेखाची उंची वाढवली आहे. बहावा ला जसे वा म्हटलं जातं तसंच या लेखाबद्दल अरे वाह असं म्हणायला हरकत नाही. खुप खुप धन्यवाद सर.
उत्तर द्याहटवाकेशव यशवंत राजपुरे.
बहावा सारखाच प्रसन्न लेख
उत्तर द्याहटवासुंदर लेख आहे सर, बहावा माझे पण आवडते झाड आहे .!!
उत्तर द्याहटवासाहेब नितांत सुंदर बहावा त्याच्या जन्मापासून ते विज्ञान उद्याच्या बहुगुणी उपयोगा सह आपण त्याच्यावर रचलेल्या काव्य मै वैभवा पर्यंत त् ऐतिहासिक राज्य सौंदर्या पर्यंत आपण बहावा या वनस्पतीचे सुंदरसे वर्णन ऐतिहासिक राज योगा पर्यंत केले आहे अभिनंदन परंतु साहित्यामध्ये पण पु ल देशपांडे साहेबांनी या वनस्पती विषयी काही लिहून ठेवले आहे असे वाटते आपल्या लॉजिकल व क्रिएटिव्ह थिंकींग ला सलाम
उत्तर द्याहटवासर्जी
उत्तर द्याहटवाआपल्या संवेदनशीलते बद्दल मी पामराने काय बोलावे.
असेच लिहीत राहा.
लेख खूप आवडला. बऱ्याच चित्रकारांनाही त्याने भुरळ घातलीय.
धन्यवाद.
नमस्कार.
काळजी घ्या
आदरणीय,व्ही.एन.शिंदे सर, बहावा वाचला आणि माझे अंत:करण बहाव्यासारखेच फुलुन आले. कारण हा लेख बहाव्यासारखाच नखशिखांत ओतप्रोत शब्दफुलांनी बहरलेला आहे.बहाव्याची जगभरातील विविध नावे, त्याची गुणवैशिष्ठे,मानवाला उपकारक असणारे त्याचे उपयोग व फायदे,मानवी मनाला भुरळ घालणारे त्याचे अप्रतिम सौन्दर्य,सर्व मोसमातल्या त्याच्या अस्तित्वाच्या कळा मॅन मोहून टाकतात.सर्वात जास्त म्हणजे त्याच विनातक्रार फुलत राहणं,सजीवांना आनंद देत राहणं.त्याच्या मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या निकोप अस्तित्वाच्या सूक्ष्म छटा तुम्ही फारच सुंदर रेखाटल्या आहेत,मला विल्यम वॉर्डस्वर्थ व रॉबर्ट ब्राऊनिंगची आठवण झाली.बहव्याचं मानवी जीवनास विसवणं,निसवणं,व त्याचं निसर्गता विकसणं अलौकिकच आहे.म्हणून मलाही म्हणावसं वाटतं-
उत्तर द्याहटवा"सर्वांच्या दारी अंगणात एक बहावा असावा।
तो डोळ्याला दिसावा,मनी मिळावा विसावा।।"- हे निसर्गाचं अंगभूत चैतन्य घेऊन येणारा बहावा माणसाला खूप काही शिकवून जातो.सर,तुम्ही या निसर्गातील विलक्षण अवलियाला बहाव्याला योग्य न्याय दिला.तुमच्याकडे ती कलेची,सौंदर्याची व रसिकतेची दृष्टी आहे.तुमची लेखनी तुमच्यावर खूश आहे, एखाद्या पट्टीच्या चित्रकाराने रंगाच्या एकाच कुंचल्याने हिमालय रेखाटावा तसा हा बहावा तुम्ही अचूक शब्दात पकडला आहे.तो ही अगदी साध्या,सोप्या, सरळ भाषेत.योग्य प्रतिमा व अंलकार,ज्ञान आणि माहितीचा खजिना,निसर्गदृष्टी,परोपकार,शुद्ध निखळ विज्ञानवादी दृष्तुकोन यामुळे हा बहावा अधिकच खुमासदार झाला आहे.शिंदे सर तुम्ही लिहीत राहा,उत्तखननीत राहा,खोदत राहा नवनवीन माहितीच्या लेण्या, मोहेंजोदडो आणि हड्डप्पा.आम्ही त्याचे स्वागतच करू.तुमच्या आगामी अक्षरबंध,अक्षरब्रम्ह,शब्दबंध अन्वेषणाला आमच्या लाख-लाख शुभेच्छा!@प्रा.डॉ.प्रभाकर रामचंद्र पवार.
कैशिया बहरला असा वि द घाटे यांचा धडा होता शाळेत तो आठवला. विद्यापीठात गो मा पवार,सोनार सर ,नारायण सर यांच्या कडे यायचो तेव्हा बहरलेली झाडे पहायचो.घुगे सरांचा मुलगा अभिनय करायचा,त्या काळात १९८४ ते १९८६ हमलोगमधे त्याला इन्स्पेक्टरची भुमिका मिळाली होती.त्याचे या बहाव्यासोबत फोटो सेशन झाल्याचे आठवते.
उत्तर द्याहटवाबहावा प्रमाणेच सुंदर आणि माहीती पूर्ण लेख आहे, शब्दालंकार बहावा प्रमाणेच फुलले आहेत, माहितीपूर्ण लेखा बद्धल अभिनंदन
उत्तर द्याहटवासुंदर मांडणी सर
उत्तर द्याहटवाGood
हटवासर नमस्कार, खरच खुप सुंदर आणि अप्रतिम माहीती आपण दिली
उत्तर द्याहटवासुंदर, एवढी माहिती कशी मिळवली. लेखक हा साहियिक आहे का वनस्पती तज्ज्ञ का आयुवेदाचार्य का संकृती अयासक; कोण असावा? असा प्रश्न पडतोय. फिजिक्सचा वियाथी असेल अस मात्र दुरान्वयेही वाटत नाही.
उत्तर द्याहटवाअप्रतिम झालाय लेख..
शुध्दलेखन गडबडलय जरा वर, माहित नाही आज हा की बोर्ड का असं करतोय आज....
अप्रतिम...
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर वर्णन केले आहे. लेख वाचून मनस्वी आनंद झाला.
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दचित्र, सर.
उत्तर द्याहटवाबहावा प्रमाणे असेच आपले लेखन बहरत राहो ही शुभेच्छा सर
उत्तर द्याहटवाअप्रतिम सादरीकरण..
उत्तर द्याहटवाएका वृक्षाची इतकी अप्रतिम माहिती वाचून खूप आनंद झाला बहावा वृक्षास प्राचीन काळापासून त्याचे महत्त्व अधोरेखित होते आरोग्यदायी सांस्कृतिक धार्मिक असे विविध गुणसंपन्न असलेला हा वृक्ष सदैव मानवजातीची सेवा करत आहे
उत्तर द्याहटवाआदरणीय शिंदे सर अतिशय माहितीपूर्ण व समर्पक असा हा लेख वाचून अतिशय आनंद झाला बहावाप्रमाणे तुमची कारकीर्द अशीच बहरत राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद
Excellent informative writing with literary touch.All the best.
उत्तर द्याहटवानमस्कार सर...!,
उत्तर द्याहटवाभौतिकशात्राचे अभ्यासक आणि एवढी सुंदर माहिती...!,खूप छान सर.
खूपच सुदंर परिपूर्ण लेख.भाषा, शब्द कल्पना सर्व सुदंर. सर्व माहीती. वैज्ञानिक ,सांस्कृतिक भौगोलिक सर्वच उपयुक्त. मलाही बहावा खूप आवडतो. आमच्याकडे एक झाड आहे. पण त्याच्या शेंगातील बियापासून नवीन रोपे नाही केली. आता करेन.
उत्तर द्याहटवाखूप छान
कालिदासाच्या काव्यात बहरलेला "बहावा" आता महालक्ष्मीच्या
उत्तर द्याहटवाविद्या दरबारात सुवर्ण मुद्रांचा सडा घालतो आहे
अप्रतिम , सुंदर शब्दांकन..... मनःपुर्वक धन्यवाद
धन्यवाद सर, सुंदर लेख. शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा- सरोजकुमार मिठारी
Very nice sir
उत्तर द्याहटवाधन्यवाद, शिंदे सर.. आजची पहाट सुरम्य झाली.. मूलद्रव्यांवरच्या तुमच्या पुस्तकाच्या निमित्ताने फोन-ओळख झाली, तुम्ही लेख वाचावा म्हणून सुचवलंत आणि तुमच्या लेखनाचा एक वेगळाच पैलू समजला.. कोल्हापूरशी संबंध तसे खूप वेगवेगळ्या प्रकारे आले, आज आणखी एक नवा आयाम त्याला जोडला गेला.. छान लिहिता, सर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी, स्वाभाविकच बहावासाख्या वनस्पतींवरचं तुमचं लेखन विज्ञानाधिष्ठित झालंय.. मला तर राहून राहून शरदिनी डहाणूकरांची आठवण येत राहिली.. सर, बहावा आवडला म्हणून बहावावर लिहिलं असलंत तरी बहावावर न थांबता इतरही वनस्पतींवर लिहा..
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर, तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील…
उत्तर द्याहटवाडॉ विलास शिंदे सर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख आपण लिहिलेला आहे. आमच्या दारात सुद्धा बहावा बहरला होता. त्यामुळे एकूणच आमच्या परिसराला वैभव प्राप्त झाले होते. मी त्या संदर्भातील एक लेख लिहिला होता. तो ई सकाळ मध्ये प्रकाशित झाला. तो वाचल्यानंतर एका विद्यार्थ्याने तुमचा लेख माझ्या निदर्शनास आणला. आपण अतिशय अभ्यासपूर्ण सहज व सौंदर्यपूर्ण शैलीत बहाव्याचे वर्णन केले आहे. वनस्पतीशास्त्राचे सगळे ज्ञान अशा सुंदर शैलीत उपलब्ध झाले, तर निश्चितच 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हे तुकोबांचे शब्द सर्वांनाच सार्थक ठरू लागतील. खुप खुप धन्यवाद सर👏👏👏
खुप खुप धन्यवाद सर खूप मौल्यवान माहिती आपण लेखाच्या माध्यमातून आम्हाला अवगत करून दिलीत झाडाला पाहिले तिच्या खाली ठेवून त्याच्या शेजारी तुमच्या प्रमाणे लहानपणी खेळायच्या त्याचे नाव देखील माहीत नव्हते आणि त्याचे फायदे तर अजिबातच नाही त्यामुळे आपले मनःपूर्वक धन्यवाद
उत्तर द्याहटवाखुप छान लेख व सखोल माहिती
उत्तर द्याहटवाविद्यापीठाचे काम सांभाळत मराठीतून उत्कृष्ठ लिखाण करणे म्हणजे खरच कोतुकास्पद आहे सर
उत्तर द्याहटवाबहावाचे फुलणे आणि पाऊस यांचा संबंध आहे. मी गेली ७ वर्षे नोंद ठेवतो आहे आणि त्याच्या फुलण्यावर पावसाचा अंदाज बांधता येतो.
उत्तर द्याहटवाबाहावा फुलल्यावर साधारण महिनाभरात पाऊस पडतो. २०२० आणि २०२१ मध्ये जवळपास प्रत्येक महिन्यातच (निदान पुण्याततरी) पाऊस पडतोच आहे पण पावसाळ्यातला पाऊस साधारणपणे महिन्यात.
सुंदर लेख
उत्तर द्याहटवाअप्रतिम! खूप सुंदर माहिती सर!
उत्तर द्याहटवाबहवा खूपच गुणकारी आहे, धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाह्या बहावाच्या फुलांमध्ये शेंगांमध्ये कुठली रासायनिक द्रव्ये असू शकतात की ज्याचं खत बनल्यावर शेतीसाठी उपयोग होऊ शकतो.
उत्तर द्याहटवा