शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

आनंदाचे धाम…

भुकेचा प्रश्न मिटलेला असेल तर मानवाच्या जीवनामध्ये दुसरा भाग अवतरतो, तो म्हणजे आनंदाचा. हे ‘आनंदाचे धाम’ तो छंदात शोधतो. माणूस गाणे म्हणतो, चित्र काढतो, शिल्प घडवतो, कविता लिहितो, झाडे लावतो, बागकाम करतो, पशू, पक्ष्यांची काळजी घेतो. चौंसष्ट कलांपैकी एखादीतरी कला माणसाकडे असतेच. कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी प्रतिभेची गरज असते. ती प्रत्येकाकडे असतेच, असे नाही. काही लोकांकडे कोणतीच कला नसते; मात्र त्याना एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची सवय असते. हा छंद, जीविका होय.

दैनिक लोकमत, कोल्हापूरच्या वर्धापन दिन पुरवणी दि. २० ऑगस्ट २०२२ रोजीचा प्रसिद्ध लेख. दै. लोकमतच्या सौजन्याने…

__________________________________________________

पृथ्वीवर जल, जंगल आणि जमीन या तिन्ही घटकांमध्ये असंख्य जीव राहतात. आजही सर्वांची आपणास ओळख झालेली नाही. या जीवांना जेथे पोषक वातावरण मिळेल, तेथे ते जगतात. यामध्ये जीवाणू, विषाणू, वनस्पती, जलचर, उभयचर, पशू, आणि पक्षी सर्व आहेत. या सर्वांमध्ये वेगळा आहे तो मनुष्य. सुरुवातीला मानवही अन्य प्राण्यांप्रमाणेच होता. हजारो वर्षांपूर्वी त्याने इतर प्राण्यांपासून वेगळी ओळख बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला निसर्गात उपलब्ध असणारे अन्न– फळे, कंदमुळे खात असे. शिकार करून मांस खात असे. पुढे त्याने अन्नाची खात्रीने उपलब्धता व्हावी, यासाठी शेती करायला सुरुवात केली. शेतीने मानवाला स्थैर्य दिले. या स्थिरतेने मानवाला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून दिला. त्याने आपले जीवन आणखी सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

त्यासाठी त्याने विविध यंत्रे बनवली.भज्ञैतिक सुखाची साधने, उपकरणे बनवली. दळणवळणात क्रांती घडवली. वाहने बनवली. त्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी इंधने शोधली. या सर्व प्रगतीचा निसर्गावर अनिष्ट परिणाम होत होता, पण यातून मानवाचा वेळ आणि श्रम वाचले. निवांतपणा मिळाला. यातून पुन्हा नवे शोध लावले. त्यातूनच आजचे युग अवतरले.

आजच्या युगातही मानवाची पोटाची चिंता मिटलेली नाही. पुरेसे अन्न न मिळाल्यास भूक मानवाला झोप मिळू देत नाही. ही भूक मिटवण्यासाठी मानवाला उपजीविकेचे साधन शोधावे लागते. उपजीविकेचे साधन उपलब्ध झाल्यास मानवाची मोठी चिंता मिटते. भुकेचा प्रश्न मिटलेला असेल तर मानवाच्या जीवनामध्ये दुसरा भाग अवतरतो, तो म्हणजे आनंदाचा. पोटाची भूक भागलेली असेल तर मानव आनंदाचे धाम शोधावयास मोकळा असतो. हे ‘आनंदाचे धाम’ तो छंदात शोधतो. माणूस गाणे म्हणतो, चित्र काढतो, शिल्प घडवतो, कविता लिहितो, झाडे लावतो, बागकाम करतो, पशू, पक्ष्यांची काळजी घेतो. अशा अनेक छंदातून आनंद शोधतो. चौंसष्ट कलांपैकी एखादीतरी कला माणसाकडे असतेच. कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी प्रतिभेची गरज असते. ती प्रत्येकाकडे असतेच, असे नाही. काही लोकांकडे कोणतीच कला नसते; मात्र त्याना एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची सवय असते. हा छंद, जीविका होय. म्हणजेच माणसाला आनंदाने जगण्यासाठी उपजीविका आणि जीविका या दोहोंची गरज असते.

जीविका आनंदाचे धाम बनण्यासाठी पोट मात्र भरलेले असावे लागते. समजा खूप दिवसांपासून एक चित्रपट पाहावयाची एका माणसाला इच्छा आहे. तो एका चांगल्या घरामध्ये राहातो. तो चित्रपट दूरचित्रवाणीवर लागला आहे. मात्र काही कारणांमुळे तो उपाशी आहे. असा चित्रपट सुरू झाला, तरी तो माणूस त्या चित्रपटाचा मनापासून आनंद घेऊ शकेल का? किंवा एकाकडे २०० रूपये आहेत. तो उपाशी आहे. त्याला समोरच्या चित्रपटगृहामध्ये खूप दिवसांपासून पाहावयाचा चित्रपट लागलेला आहे. अशा वेळी तो निश्चितच पोटाची भूक भागवण्यास पसंती देईल. म्हणजेच मानवाच्या जीवनात उपजीविकेला प्रथम प्राधान्य असते. मात्र एकदा का पोट भरले की, तो आनंद शोधू लागतो.

 उपजीविकेसाठी माणूस शेती करतो, उद्योग, व्यवसाय करतो, व्यापार करतो, त्यातून पैसे कमावतो. ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही, ते नोकरी करतात. मग ती सरकारी असो किंवा खाजगी. नोकरी करणाऱ्याचा सरकारशी किंवा मालकाशी एक प्रकारचा करार झालेला असतो. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी विहीत केलेले काम पूर्ण करावयाचे आणि त्या बद्दल शासन किंवा मालकाने ठरल्याप्रमाणे कर्मचाऱ्यास विहीत रक्कम द्यायची. या कराराप्रमाणे कर्मचारी काम करत असतो. मात्र प्रत्यक्षात एका संशोधनानुसार आणि सर्वमान्य तत्वानुसार कोणत्याही आस्थापनेमध्ये शंभर टक्के कर्मचारी ठरल्याप्रमाणे कार्यरत नसतात. वीस टक्के कर्मचारी पूर्ण क्षमतेने योगदान देत नाहीत. साठ टक्के कर्मचारी हे परिस्थितीनुरूप योगदान देतात. वीस टक्के कर्मचारी मात्र करारापेक्षा जास्त योगदान देत असतात. हे कर्मचारी संस्थेला खऱ्या अर्थाने मोठे बनवत असतात. लौकिकामध्ये भर घालत असतात कारण ते नोकरीमध्ये आनंद शोधत असतात.

साठ टक्के कर्मचारी जे परिस्थितीनुरूप योगदान देत असतात, त्यांच्या दृष्टीने नोकरी करणे म्हणजे पाट्या टाकणे असते. ते वेळेचे बांधील असतात. ‘ठरल्या वेळेत कार्यालयात उपस्थित असणे म्हणजे दिवसभरचे काम झाले’, असे त्यांचे मत असते. पण नोकरीला ‘पाट्या टाकणे’ मानणाऱ्या व्यक्तींनी एक गोष्ट करायला हवी, या पाट्या ‘भरलेल्या’ टाकायला हव्यात. रिकाम्या पाट्या टाकण्यापेक्षा भरलेल्या पाट्या जर टाकल्या, तर निश्चितच त्यातून एक भराव तयार होईल. पावसाळ्यामध्ये त्या भरावामुळे पाणी अडेल. तेथे जलाशय तयार होईल. त्या जलाशयामुळे तेथे जीवसृष्टी अस्तित्वात येईल. नोकरी करणे म्हणजे पाट्या टाकणे, मानणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर आठ तास किंवा नियोजित वेळेत काम करायला सुरुवात केली, तर संस्थेच्या किंवा त्या कार्यालयाच्या लौकिकामध्ये, कार्यक्षमतेमध्ये मोठी वाढ होते. ती संस्था, कार्यालय किंवा कंपनी मोठी होत जाते.

जीविका आणि उपजीविका एकत्र आणणे खूप अडचणीचे ठरते. समजा, एखाद्याला चित्र काढण्यामध्ये आनंद मिळतो. निवांत वेळी त्याने काढलेली चित्रे अप्रतिम असतात. मात्र कार्यालयात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बैठक सुरू असताना तो चित्र काढत बसला तर… तो कार्यालयाचे मोठे नुकसान करतो. तसेच एखादा आधिकारी आपल्या कार्यालयात कडक शिस्तीचा म्हणून प्रसिद्ध असेल, तर त्यांने ती शिस्त कार्यालयातच ठेवायला हवी. तीच शिस्त घरात आणणे अडचणीचे आणि घरातील वातावरण बिघडवणारे ठरते. म्हणून जीविका आणि उपजीविका या स्वतंत्र ठेवणे आवश्यक असते.

यासाठी कर्मचाऱ्यांनी उपजीविकेमध्ये जीविका शोधायला हवी. एखाद्या कर्मचाऱ्याला बागकामाची आवड आहे. त्यांने आपल्या कार्यालयात कुंड्या ठेवायला लावल्या. त्या कुंड्याकडे कार्यालयातील काम करताना फावल्या वेळेत थोडेसे लक्ष द्यायला सुरुवात केली, तर कार्यालयातील वातावरण निश्चितच बदलून जाईल. ज्याला चित्रे काढायला आवडते त्याने आपल्या चित्रापैकी उत्तम चित्रांनी कार्यालयाच्या भिंती सजवल्या तर कार्यालयाचे सौंदर्य वाढेल. आपली चित्रे नजरेसमोर असताना मनही आनंदी राहील. सहकाऱ्यांमध्ये चर्चा करत असताना कार्यालयाच्या उत्कर्षाच्या चर्चा घडायला हव्यात. यासाठी आपणास कार्यालयातून वेतन मिळते. त्या वेतनातून आपले आणि आपल्या कुटुंबियांचे पोट भरते, मुलांचे शिक्षण होते, आरोग्याची देखभाल होते. त्यामुळे आपण आपल्या घराची जशी काळजी घेत असतो, तशीच कार्यालयाचीही काळजी घ्यायला हवी. घरात कोणत्याही गोष्टीचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेतो, त्याप्रमाणे कार्यालयाचीही काळजी घ्यायला हवी.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट नोकरी देत असते. ज्या कार्यालयात नोकरी करत असतो, त्या कार्यालयामुळे कर्मचाऱ्यास एक ओळख मिळते. या ओळखीमुळे त्याला समाजात एक स्थान मिळते. या ओळखीपोटी त्याने कार्यालयाला काही द्यावे, असे अपेक्षित नसते. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यासाठी कार्यालयास, काहीतरी ‘रिटर्न गिफ्ट’ द्यायला हवी. यासाठी कोणताही आर्थिक त्याग करण्याची गरज नाही. केवळ आपल्या कामामध्ये आनंद शोधायला सुरुवात करायला हवी. एखाद्याचे हस्ताक्षर सुंदर असेल तर त्याने आवश्यकता असेल, तेथे कार्यालयात आपले योगदान द्यायला हवे. निश्चितच त्याच्या हस्ताक्षराचे कौतुक त्याला सुखावून जाईल. मात्र तेथे ‘काम टाळू’ वृत्ती ठेवली तर हे कौतुक त्याच्या वाट्याला येणार नाही.

अनेक कार्यालयांत गट-तट असतात. हे टाळायला हवे. इलेनॉर रूझवेल्ट यांचे एक वाक्य सुप्रसिद्ध आहे. त्या म्हणतात, ‘सामान्य मनाची माणसे इतरांची चर्चा करतात, मध्यम मनाची माणसे ही कार्यक्रमांची चर्चा करतात, तर मोठ्या मनाची माणसे ही भविष्यातील कार्यक्रमांची, उपक्रमांची चर्चा करतात’. विविध कर्मचाऱ्यांमध्ये कशा स्वरूपाच्या आणि काय चर्चा चालतात, हे पाहिले की त्या कार्यालयाचे भविष्य समजते. आपण कशा स्वरूपाच्या चर्चा करतो, याचा विचार करून वर्तनात योग्य बदल करायला हवा. इतरांचे कौतुक करायला सुरुवात केली, तर इतरही आपले कौतुक करतील आणि कार्यालयातील वातावरण आनंददायी बनेल. उपजीविका आणि जीविका कार्यालयाच्या भल्यासाठी एकत्र आल्यास त्या कार्यालयाचा लौकिक निश्चित वाढेल. नोकरी पाट्या टाकण्याचे ठिकाण न मानता ‘आनंदाचे धाम’ बनेल.   

-०-