शनिवार, ३० एप्रिल, २०२२

आक्का नावाचे झाड…



आक्का… माझी आई. मी कोल्हापूरात… ती बार्शीत. तिच्या सहवासात मला फार काळ राहता आले नाही. मात्र जो काही सहवास लाभला, त्यातील तिच्या आठवणी. रविवार दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी लौकिकार्थाने इहलोकीची यात्रा तिने संपवली. मात्र संस्कारांच्या रूपात ती चिरंतन सोबत असायची आणि असेल…


____________________________________________________________

लहानपणापासून…
तुला मी पाहात आलो
ते कायम काम करताना…
तुझे हात राबत असायचे…
एकत्र कुटुंब असतानाचे दिवस
मला फारसे आठवत नाहीत…
पण कुटुंबे वेगळी झाली…
ती १९७२ च्या ऐन दुष्काळात…
दुष्काळात बालाघाटच्या डोंगरातून
जनावरांसाठी धामणीचा पाला आणायचीस
शेतातील बरबडा उपटण्याचे,
शाळेनंतर आमचे काम असायचे…
तू डोंगरातून भलेमोठे ओझे आणलेले असताना
बरबडा उपटून माझे लाल झालेले
हात पाहायचीस…
 
त्या दुष्काळात फक्त कोट्यावरच्या
विहिरीत पाणी होते…
ते पाणी मिळवण्यासाठी सात पुरूष खोल विहिरीत
आम्ही उतरून वाटीने घागर भरायचो…
ती घागर घेऊन तू वर यायचीस…
त्यावेळी आमचीच काळजी तुझ्या डोळ्यात असायची…
घराकडे जाताना…
आमच्या हातातील चरवीचे ओझेही तुला
जास्त वाटत असायचे…
स्वत:च्या डोक्यावर घागर असताना…
आमच्या हातच्या चरवीला…
तू आधार द्यायचीस…
 
त्याच दुष्काळात…
पाणी कोठेतरी मिळायचे
पण अन्नाचा तुटवडा होता…
सरकारने रेशनिंगला इलोमिलो पुरवला होता…
इतरांच्या घरातील पांढरीशुभ्र भाकरी पाहून
मी सत्याग्रह सुरू केला…
इलोमिलोची लाल भाकरी खाणे बंद केले…
मी ‘ज्वारीच्या भाकरीचा जोसरा’ काढला होता
असे पुढे तू सांगायचीस…
त्या बालवयात केलेल्या सत्याग्रहात…
मी काहीतरी खावे म्हणून, तू कासावीस व्हायचीस…
शेवटी वडिलांनी कोठून तरी ज्वारी मिळवली…
आणि माझा सत्याग्रह संपवला…
त्यावेळी तू ते पीठ जपून वापरलेस…
दुष्काळ संपेपर्यंत मला भरवलेस…
 
गावाकडची होळी…
मुलांसाठी आनंदाचा सण असायचा…
होळी पेटवण्यासाठी लाकडे चोरायला…
आणि होळीभोवती बोंब मारायला,
तू जाऊ द्यायची नाहीस…
मात्र होळीच्या दुसऱ्या दिवशी
तू पहाटेच आम्हाला होळीकडे जायला सांगायचीस…
होळीची राख आणून तू बनवलेल्या आळ्यात
ती पसरायला लावायचीस…
राख पसरल्यावर त्यात
कारले आणि दोडक्याच्या बिया
लावायला सांगायचीस…
माझ्या हाताने लावलेल्या बिया
चांगल्या रूजतात, हा तुझा समज…
मी आजही जपतोय… जमेल तसा…
जमेल तेथे बिया रूजवून…
झाडे लावून…
हा संस्कार तूच तर दिलास…
 
त्या वाढणाऱ्या वेलांचे, रोपांचे…
माझ्यापेक्षा तुलाच जास्त कौतुक असायचे…
त्याला लागलेल्या फळांची भाजी करताना
ते ओसंडून वाहायचे…
खाणाऱ्याला ‘राजाने लावलेल्या वेलाची भाजी’
असे न चुकता सांगायचीस…
ते वेल माझ्या हातापेक्षा तुझ्या मशागतीने
आणि त्याहीपेक्षा तुझ्या मायेच्या नजरेने…
चांगले वाढत असावेत…
तरीही…
त्या वेलांकडे कौतुकाने पाहणाऱ्याला…
‘राजाने वेल लावलेत’
असे अभिमानाने सांगायचीस…
 
तू केवळ आमच्याच काळजीत असायचीस, असे नाही…
तुझ्या सावलीत येणाऱ्या प्रत्येकाची
काळजी तुला असायची…
आठ लेकरांची माय तू…
त्यातील सातजणांना तू वाढवलेस…
त्यातही एक बहीण कायम आजारी…
तुझा जीव तिच्यासाठी कळवळत असायचा…
तिला त्रास होताना तुझा चेहरा दु:खी व्हायचा…
काही असले तरी तू काम करत असायची…
तिच्याकडे लक्ष देताना,
इतरांकडेही तुझे लक्ष असायचे…
तुला शांत बसलेले कधी मी पाहिलेच नाही..
कायम तुझे हात राबत असायचे…
जनावरांचे दाणापाणी
लेकरांइतकेच निगुतीने तू करायचीस…
आम्ही जनावरांना मारलेले तुला चालायचे नाही…
काळ्या तिखटापासून सारे काही…
तुला स्वत: बनवलेले हवे असायचे…
तुझा शांत न बसण्याचा संस्कार,
तू नकळत करत असायचीस…
 
संध्याकाळी रानातील कामे संपवून घरी परतल्यावर…
चिमणी… कंदिलाच्या…
किंवा चुलीतील आगीच्या उजेडात
तू स्वयंपाक करत असायचीस…
त्यावेळी आठवणीने आम्हाला
वाचायला लावायचीस… तेही मोठ्याने…
तू फारशी शिकलेली नव्हतीस…
पण आम्ही वाचताना…
तू लक्ष देऊन ऐकायचीस…
आमचा उच्चार चुकला तर, तेथूनच सांगायचीस…
‘स्वत: शाळा शिकलेली नसताना
तुला हे कसे कळते’ हा प्रश्न
त्या वेळीही मनात असायचा…
त्या तुझ्या प्रयोगानेच
माझे वाचन चांगले झाले…
 
माझे ते वाचन ऐकून
गावच्या पोथी वाचनाचे मला निमंत्रण आले…
गावात हरिविजय, रामविजय, नवनाथाची
पोथी सुरू असायची…
तू कधी जायची नाहीस ते ऐकायला…
कारण कामच तुझ्यासाठी देव असावा…
पण…
मी पोथी वाचू लागलो आणि
ते ऐकायला मात्र तू यायला लागलीस…
माझ्या पोथी वाचनाचे,
माझ्यासमोर क्वचितच कौतुक करायचीस…
मात्र इतरांनी केलेले कौतुक तुला सुखवायचे…
तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसायचे…
 
मला पोहायलाही तूच शिकवलेस…
खोल पाण्याची मला फार भिती वाटायची…
मी पोहायला जायचो नाही…
तू शेवरीची लाकडे मिळवलास…
बिंडा बांधून घेतलास…
बेसावध असताना माझ्या पाठीला बांधून
पाण्यात ढकललेस…
काही दिवस कमरेला कासरा बांधून तर…
काही दिवस भोपळ्याचा बिंडा बांधून…
मी ओरडायचो… गोंधळ घालायचो…
तुला पळवायचो…
पण तू काही हट्ट सोडला नाहीस…
मला पोहायला शिकवलेसच…
स्वतंत्रपणे पोहायला शिकलो तरी…
तुझे लक्ष आमच्या खोड्याकडे असायचे…
आम्ही चांगले तेवढेच घ्यावे…
असा तुझा आग्रह असायचा…
 
माझ्या पाठोपाठ धाकटा भाऊ जन्मला…
‘त्याच्याकडे लक्ष देताना माझ्याकडे
दुर्लक्ष झाले’, असे तू म्हणायचीस…
पण तुला सर्वांसाठी इतके राबताना पाहून
माझ्या मनाला ते कधीच पटले नाही…
तुझ्या कायम कामात असणाऱ्या हातांनी
कधीच कोणाकडे दुर्लक्ष केले नाही…
मग माझ्याकडे तुझे दुर्लक्ष झाले…
हे तुझे म्हणणे मला पटणार कसे…
 
१९८२च्या रामनवमीचा दिवस
शेतात ज्वारीचे खळे होते…
तुला मजुरांसह सर्वांचा स्वयंपाक करायचा होता…
त्याचेच दळण आणायला आम्ही गेलो…
वेळ असल्याने, कट्ट्यावर बसलो
खालच्या पट्ट्याला चुकून अंगठा लागला…
गंमत वाटली…
म्हणून पुन्हापुन्हा धावत्या पट्ट्याला
पायाचे बोट लावत राहिलो…
आणि…
गिरणीच्या पट्ट्यात सापडलो…
त्यातून वाचलो,
पण…
सगळे अंग सोलून निघाले…
अंगावर जखम नाही, असा भाग नव्हता…
त्यावेळी त्या जखमांच्या माझ्यापेक्षा
तुलाच जास्त वेदना होत असाव्यात…
त्यावेळी जखमांवर मलम लावतानाचा तुझा स्पर्श…
आजही स्पष्ट जाणवतो…
 
पारिजातकाची फुले मला फार आवडायची
निळकंठेश्वराच्या मंदिरातील झाडाची फुले…
ओल्या रूमालातून, घरी आणायचा प्रयत्न केला…
घरी येईपर्यंत सर्व फुलांचे पाणी झालेले…
ते पाहून मी रडू लागल्यावर…
‘जितकी फुले नाजूक, सुंदर…
तितकीच ती अल्पायुषी’
हे किती सहज समजावले होतेस तू…
 
कोणाविरूद्ध राग धरायचा नाही,
खोटे कधी बोलायचे नाही,
कोणाला नावे ठेवायची नाहीत,
आपले काम करत राहायचे…
नावे ठेवणाराचे तोंड काम बंद करते…
माणूस बोलण्याने नाही,
तर, कामाने मोठा होतो…
लोकांचा विचार करत बसलं तर…
वेळही वाया जातो…
आपलेही विचार वाईट बनतात…
कामात मन गुंतवले
की वेळ सत्कारणी लागतो…
कामही आणखी शिकवत जातं…
माणूस घडत जातो… चौरंगी चिऱ्यासारखा…
कोणत्याही अंगाने तो भिंतीत बसवता येतो…
ही शिकवणही तुझीच…
नावे ठेवणाऱ्यांना आपले कामच उत्तर देते…
किती मोठे तत्त्वज्ञान, सहज सांगायचीस…
 
चार सुनांची सासू तू…
पण त्यांचीही आई होण्याकडे तुझा कल…
शहरात राहणाऱ्या सुनांना…
मुलीसारखे जपायचा,
तुझा प्रयत्न असायचा…
सुनांबद्दल त्यांच्यासमोरच नाही
तर पाठीमागेही कधी वावगे बोलली नाहीस…
सुना घरात आहेत म्हणून
तुझे हात कधी थांबले नाहीत…
काम सुरूच असायचे…
अंगमेहनतीची कामे स्वत: करताना
‘गावाकडचे काम पोरींना कस जमणार’ म्हणत
स्वत:च राबत असायचीस…
 
माझा पाय मोडल्यामुळे
२०१६मध्ये दिवाळीला गावी आलो नाही
तर, तू किती कासावीस झालीस…
मी यावे… तुला भेटावे एवढीच तुझी अपेक्षा…
पाय मोडल्याचं मुद्दामच तुला सांगितलं नव्हतं…
पण सेरिकल्चरच्या कार्यशाळेला आलेल्या
भाच्याकडून ही बातमी तुला समजली…
तू सारखी आठवण काढू लागल्याच समजल्यावर…
मी भेटायला आलो…
तेव्हा मोडलेल्या पायावरून अलवार
फिरलेला तुझा हात…
तसाच आहे, असं आजही जाणवतं…
 
कोणाकडून तुझी कसलीच अपेक्षा नव्हती…
स्वत: होऊन काही आणलंच तर…
‘कशाला खर्च केला?’ असे विचारायचीस…
आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये
हाच तुझा प्रयत्न असायचा…
तू येणाऱ्यांचे मात्र निगुतीने करायचीस…
तुझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाची तू सावली व्हायचीस…
तुला त्रास देणाऱ्या… नावे ठेवणाऱ्यांसाठीही…
कोणताही भेदभाव न करता…
कोणतीही कुरकूर न करता…
सारे काही प्रेमाने करत असायचीस…
झाडही असेच असते ना…
स्वत:चे दु:खही कधीच न सांगता…
फुलांचा गंध देते…
भुकेलेल्यांना फळे देते…
वाटसरूला सावली देते…
तूही अगदी तशीच होतीस…
स्वत:साठी काहीही न मागता…
सर्वांना सारं काही देणारी…
अगदी झाडासारखी…!


बुधवार, १३ एप्रिल, २०२२

रंगेल खैर

 

पानाचा विडा म्हटले की तो रंगलाच पाहिजे. हा विडा रंगण्यासाठी आवश्यक असतो चुना आणि त्याच्यासमवेत कात. हा कात मिळतो एका झाडाच्या सालीपासून आणि लाकडाच्या तुकड्यापासून. खैराची साल किंवा बारीक लाकडाचे तुकडे पाण्यात घालून चांगलेच उकळले, अगदी साका (precipipet) तयार होईपर्यंत की त्यातील काताचे अंश पाण्यात उतरतात. हा साका गाळून थंड केला की कात तयार होतो. तो कापून वड्या बनवतात. या काताची फुले, पांढरी साल राखाडी, फळे चॉकलेटी, साल आणि लाकूडही रंगीत… असा हा रंगिला खैर!

_________________________________________________________

‘खाई के पान बनारसवाला, खुल जाये बंद अकल का ताला’ हे अमिताभवर चित्रित झालेले लोकप्रिय गाणे. त्यात म्हटल्याप्रमाणे बंद अक्कलेचे कुलूप निघते की नाही माहीत नाही. मात्र पानाने तोंड मात्र लाल रंगात रंगते. हे पान बनारसी असो,कलकत्ता असो किंवा साघ्या पानाचा विडा. पानाचा विडा रंगण्यासाठी कात अनिवार्य घटक. विड्यात कात नसेल, तर पान रंगतच नाही. विडा किती रंगला यावर सजनाचे, सजनीवर किंवा सजनीचे, सजनावर किती प्रेम आहे? याचा अंदाज बांधता येतो, असा समज ग्रामीण भागात आहे. मात्र या विड्यामध्ये कात नसेल तर… या तर्काला काहीच अर्थ राहात नाही. असा कात देणारे झाड म्हणजे खैर! या काताची फुले, पांढरी साल राखाडी, फळे चॉकलेटी, साल आणि लाकूडही रंगीत… असा हा रंगिला खैर!!

खैराचे झाड अस्सल भारतीय. हिमालयाची उंच हिमशिखरे वगळता खैराचा सर्वत्र मुक्तसंचार असे. भारताबाहेर पाकिस्तान ते म्यानमारपर्यंत खैराची झाडे आढळतात. मात्र त्याच्या उपयुक्ततेमुळे आज खैर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खैराच्या झाडाला संस्कृतमध्ये रोगनाशक म्हणून खदिर, लहान पानांचा म्हणून बालपत्र, वाकडे काटे असणारा म्हणून वक्रकंट, यज्ञात याच्या फांद्या वापरतात म्हणून यज्ञांग, दंतोपचारात वापरले जाते म्हणून दंतधावन, कंटक काटेयुक्त लाकडाचा म्हणून कुष्ठकंटक अशी गुणावरून अनेक नावे प्राप्त झाली आहेत. याखेरीज खाद्य, पत्री, क्षतक्षम, सुशल्य, कण्टकी, गायत्री, जिह्नशल्य, कंठी, सारद्रुम, कुष्ठारी, बहुशल्य, बहुसार, मेध्य, गीत, कुष्ठघ्न, बालतनय, यज्ञीय, इरिमेद, रक्तसार अशी विविध नावे आहेत. याला हिंदीमध्ये खैर, गुजरातीमध्ये खेर, बंगालीमध्ये खयेर, तेलगूमध्ये पोडलमानु, तामिळमध्ये कचुकही, मल्याळमळमध्ये कद्रम, कन्नडमध्ये कटच, इंग्रजीमध्ये कटेचू ट्री नावाने ओळखले जाते. याचे शास्त्रीय ॲकेशिया कॅटेचू आहे. काटे आहेत यावरून ॲकेशिया तर कन्नड नावावरून कॅटेचू घेण्यात आले आहे.

खैराचे झाड बियापासून उगवते. सुरुवातीला रोप हिवर, शमीच्या झाडासारखे दिसते. मात्र थोडे दिवस होताच ते आपले रंग दाखवायला सुरुवात करते. खोड तपकिरी, लाल दिसू लागते. पहिली दोन पाने साधी असतात. नंतर येणारी पाने संयुक्त पाने असतात. एका पानामध्ये वीस ते पन्नास पानांच्या जोड्या असतात. पानांवरही बारीक काटे असतात. पाने मळकट हिरवी असतात. खैराचे पाने शेळ्या आणि मेंढ्या आवडीने खातात. हत्ती आणि हरणांचेही ते आवडते खाद्य आहे. पानांमध्ये प्रथिने, क्रुड प्रथिने, तंतूजन्य पदार्थ आणि रंगद्रव्ये असतात. खैराची पाने जनावरांसाठी चांगले खाद्य मानले जाते. 

 पानांसमवेत काटे यायला सुरुवात होते. काटे आखूड, लाल, रूंद बुडांचे, वाकडे, मागे वळलेले असतात. काटे मजबूत आणि अतितीक्ष्ण असतात. झाड थोडे मोठे होताच त्याला फांद्या फुटू लागतात. खैराचे झाड मध्यम उंचीचे असते. त्याची उंची ९ ते १२ मीटर असते. खोडाचा परीघ दोन ते तीन फूटांपर्यंत वाढतो. या झाडाला राखाडी किंवा गडद तपकिरी रंगाची साल असते. पानांचे देठ तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे असते. हा पानगळ गटातील वृक्ष आहे. उन्हाळ्यामध्ये याची सर्व पाने गळून जातात. सर्व पाने गळून गेल्यानंतर काटे असणारे निष्पर्ण झाड खूप वेगळे, खराट्यासारखे अनाकर्षक दिसते. उन्हाळा संपत असताना त्याला नवीन पाने यायला सुरुवात होते.

खैराचे झाड तीन ते चार वर्षाचे झाल्यानंतर त्याला पानांच्या बेचक्यातून कळ्या येतात. खैराची फुले पाच ते दहा सेंटिमीटर लांबीची असतात. फुलांचा रंग हिरवट पिवळा असतो. फुललेले झाड काही दिवसांपूर्वीचे कुरूप रूप हरवून सुंदर बनते. फुलांच्या बाहेर हिरवी पाने असतात. असंख्य लहान सुगंधी फुले पांढऱ्या गजऱ्यांचे रूप घेतात. फुलांच्या मंद गंधामुळे किटक फुलांकडे आकर्षित होतात. किटकांच्या माध्यमातून फुलांमध्ये फलन होते. खैराच्या शेंगा पातळ, गुळगुळीत, सपाट असतात. शेंगाचा रंग गडद चॉकलेटी असतो. शेंगा टोकाला चोंचीसारख्या असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस या शेंगा येतात आणि जानेवारीपर्यंत त्या पक्व होतात. खैराच्या शेंगा पाच ते दहा सेंटिमीटर लांबीच्या असतात. त्यामध्ये पाच ते आठ गोल बिया असतात. खैराच्या शेंगा मानवाच्या पोटामध्ये गेल्यास बाधतात. त्या विषारी असल्याने पक्षी, जनावरे कोणीच खात नाहीत. आदिवासीमध्ये याबाबत एक कथा आहे. पूर्वी खैराच्या शेंगा सर्व लोक आवडीने खात असत. सर्वांचे ते आवडते फळ होते. एका गावात सीतामाई नावाची एक पतिव्रता स्त्री होती. सासू सीतामाईचा अनन्वीत छळ करायची. तिला खायला देत नसे. एकदा सीतामाई खैराची फळे खात असताना सासूने पाहिले. तिने सीतामाईच्या हातून शेंगा घेऊन जमिनीवर टाकल्या आणि शेंगाना लाथ मारली. तेव्हापासून ही फळे खाण्यायोग्य राहिली नाहीत. म्हणून सूनेला कधीही छळू नये.

खैराचे लाकूड बाहेरच्या बाजूला पिवळसर लाल असते, तर केंद्राकडे लाल असते. एक घनमीटर लाकडाचे वजन १०१० किलोग्रॅम भरते. झाडामध्ये बाष्पाचे प्रमाण १२ टक्के असते. लाकूड कमावण्यासाठी सावलीमध्ये ठेवून हळहळू सुकू दिले जाते. अशा लाकडाच्या पातळ फळ्या काढता येतात. खैराच्या लाकडाचे साहित्य शेकडो वर्ष टिकते. लाकडाच्या कठिणपणामुळे खैराच्या फळ्या काढताना यंत्रावर सोपे नाही. खैराच्या लाकडाचे अनेक उपयोग आहेत. खैराचे लाकूड अतिशय चिवट, कठीण आणि मजबूत असते. हे लाकूड टिकाऊही असते. या लाकडाला वाळवी लागत नाही. त्याचे लाकूड मोठे असल्यास घरबांधणीमध्ये खांबाच्या रूपात केला जातो. हातामाग तयार करण्यासाठी खैराचे लाकूड सर्वोत्तम मानले जाते. खैराचे लाकूड पाणी आणि मातीमध्ये कुजत नसल्याने विहिरीच्या मोटेचे साहित्य बनवण्यासाठी वापरले जात असे. तेलाच्या घाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडासाठीही खैराला पसंती दिली जाते. खैराच्या झाडाला चांगले गुळगुळीत बनवता येत असल्याने शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, होड्या, तलवारीच्या मुठी इत्यादीसाठी खैराच्या झाडावर लाखेचे किडे चांगले पोसले जातात. खैराच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठीही केला जातो. खैराचे लाकूड अर्धवट जाळून कोळसा बनवला जातो. हा कोळसा पेटवल्यानंतर खूप लाल रंगाचा दिसतो. त्याला ‘खदिरांगार’ असे म्हटले जाते. एखादी व्यक्ती रागावल्यानंतर त्याच्या डोळ्यात रक्त उतरते. डोळे त्यामुळे लाल दिसतात. अशा डोळ्यांचे वर्णन ‘खदिरांगारासारखे लाल’ असे केले जाते. खैराच्या लाकडाचा आणि कोळशाचा उष्मांक हा खूप जास्त आहे.  

खैराच्या झाडाची साल दहा ते बारा मिलीमीटर रूंदीची असते. बाहेर करड्या किंवा राखाडी रंगाची साल आतील बाजूला लाल असते. जून्या झाडाची साल आणि बारीक फांद्याचे तुकडे उकळले जातात. चांगले उकळल्यानंतर त्यातील रस बाहेर पडतो. घट्ट साका तयार झाल्यानंतर तो बाहेर काढून त्याच्या वड्या पाडल्या जातात. त्या वाळवल्या की त्याचा कात तयार होतो. खैराच्या झाडापासून कात तयार करणाऱ्या कुशल मजूरांना ‘कातकरी’ म्हटले जात असे. काताचे पांढरा, तपकिरी आणि खेरसाल असे तीन प्रकार मानले जातात. खेरसाल तयार करावा लागत नाही. तो झाडाच्या खोडावर फांद्याच्या बेचक्यात आपोआप तयार होतो. तो खैराचा डिंक असतो. हा डिंक उत्तम पोषण्द्रव्य असणारा घटक आहे.

आयुर्वेदामध्ये खैराला औषधी वनस्पती म्हणून मोठी मान्यता आहे. खैरामध्ये फ्लेवेनॉईडस, क्वेरेसेटिन आणि टॅनिनसह अनेक उपयुक्त संयुगे आहेत. धन्वन्तरी निघंटूमध्ये यासंदर्भात ‘खदिरो रक्तसारश्च गायत्री दन्तधावन:l कण्टकी बालपत्रश्च जिल्मशल्य: क्षतक्षम:ll२५ll खदिर: स्याद् रसे तिक्तो हिम: पित्तकफास्रनुत्l कुष्ठामकासकण्डूतिकृमिदोषहर: स्मृत:ll२६ll’ असे वर्णन करण्यात आले आहे. आयुर्वेदामध्ये काताचे पाच प्रकार दिले आहेत. पांढरा कात हे नाव रंगावरून मिळाले आहे. तपकिरी किंवा तांबट काळसर कात आतून पिवळट आणि मृदू असतो. याचा उपयोग औषधामध्ये केला जातो. तांबडा कात हा विड्यातून खाण्यासाठी वापरला जातो. काळा कात निकृष्ट दर्जाचा मानला जातो. विट्खदिराला चरबीसारखा वास येतो. त्यामुळे त्याचा वापर कातडी कमावण्यासाठी केला जातो. खाकी कपडा रंगवण्यासाठीही कात वापरला जातो. काताचा उपयोग कापड रंगवणे, कातडी रंगवणे, मासेमारीची जाळी रंगवण्यासाठी केला जातो. सुपारीला लाल रंग आणण्यासाठी चूना आणि कात याच्या मिश्रणात रंगवण्यात येते.

कात चवीला किंचीत कडू असतो. कात कफ आणि पित्तशामक मानला जातो. जखमेतून होणारा रक्तप्रवाह थांबवण्यासाठी काताची पूड जखमेवर पसरतात. दंतरोग, तोंडातील व्रणासाठी काताचा वापर केला जातो. अतिसार आणि जंतावर कात उपयुक्त ठरतो. थुंकीतून रक्त येत असल्यास खैराच्या ताज्या सालीचा रस आणि हिंगाचे मिश्रण दिले जाते. घशाला शिथिलता आणण्यामध्ये कात उपयुक्त ठरतो. खोकला येत असल्यास कात आणि दालचिनी याची गोळी तयार करून तोंडात ठेवली जाते. मात्र हे मिश्रण आयुर्वेदाचार्याकडून घेणे हिताचे. कुष्ठरोगावरील औषधांमध्येही काताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. बारीक तापामध्ये कात उपयुक्त ठरतो. कातामध्ये एपिकेटिन्स आणि कॅटेचिनसारखी संयुगे असतात. ही संयुगे आतड्याच्या हालचाली सुरळीत ठेवतात. त्यामुळे पान खाणे पचनासाठी उपयुक्त मानले जाते. खैराच्या सालीतील घटक प्रतिजैविकाप्रमाणे कार्य करतात. कात रोगजनक बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करतो. मूत्रविकारांवरही कात उपयुक्त आहे.

खैरामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. खैराच्या बियांमध्ये एस्कॉर्बिक ॲसिडच्या तोडीचे अँटिऑक्सिडंट घटक आहेत. खैराच्या झाडामध्ये फिनॉलिक संयुगे आहेत. खैराच्या लाकडामध्येही ही संयुगे आढळतात. खैराच्या बियांचा अर्क जिवाणूंविरूद्ध प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. कठीण लाकडाचा अर्क हा बुरशीनाशक असल्याचेही दिसून आले आहे. बांग्लादेशामध्ये खैराच्या झाडाच्या विविध घटकांचा वापर मधूमेहावरील उपचारासाठी केला जातो. उंदरावर केलेल्या प्रयोगामध्ये खैर लाकडाचा अर्क उंदरांच्या शरीरातील साखर नियंत्रीत करत असल्याचे आढळून आले. पानापासून बनवलेला काढा दुधात मिसळून खोकला आणि सर्दीवर उपचार केले जात. तोंड आणि ओठांची जळजळ थांबवण्यासाठी खैरांपासून औषध बनवले जाते. त्वचेच्या विविध रोगावरही खैरापासून औषध बनवले जाते. या झाडामध्ये रक्तदाब नियंत्रीत करणारे घटक असल्याचे आढळले आहे.

खैर औषधी वृक्ष आहे. मात्र याचा औषध म्हणून उपयोग स्वत:च्या मर्जीने करू नये. आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेउन किंवा त्यांच्या सल्ल्यानेच उपचार करावा. गर्भधारणा झालेल्या महिलांना ही औषधे कितपत सुरक्षित आहेत याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र स्तनदा मातांना पान खाण्याचा सल्ला दिला जातो.  

खैर वृक्षाचे सर्व उपयुक्त गुण लक्षात घेऊन काही राज्यांमध्ये खैराची जाणिवपूर्वक लागवड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खैराचे लाकूड हे मौल्यवान मानले जाते. त्याचा टिकाउपणामुळे वर्ग ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या झाडाला आपल्या शेताच्या बांधावर लावायला हवे. जगवायला हवे. हे निसर्गाच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे झाड आहे.

-०-