बुधवार, १३ एप्रिल, २०२२

रंगेल खैर

 

पानाचा विडा म्हटले की तो रंगलाच पाहिजे. हा विडा रंगण्यासाठी आवश्यक असतो चुना आणि त्याच्यासमवेत कात. हा कात मिळतो एका झाडाच्या सालीपासून आणि लाकडाच्या तुकड्यापासून. खैराची साल किंवा बारीक लाकडाचे तुकडे पाण्यात घालून चांगलेच उकळले, अगदी साका (precipipet) तयार होईपर्यंत की त्यातील काताचे अंश पाण्यात उतरतात. हा साका गाळून थंड केला की कात तयार होतो. तो कापून वड्या बनवतात. या काताची फुले, पांढरी साल राखाडी, फळे चॉकलेटी, साल आणि लाकूडही रंगीत… असा हा रंगिला खैर!

_________________________________________________________

‘खाई के पान बनारसवाला, खुल जाये बंद अकल का ताला’ हे अमिताभवर चित्रित झालेले लोकप्रिय गाणे. त्यात म्हटल्याप्रमाणे बंद अक्कलेचे कुलूप निघते की नाही माहीत नाही. मात्र पानाने तोंड मात्र लाल रंगात रंगते. हे पान बनारसी असो,कलकत्ता असो किंवा साघ्या पानाचा विडा. पानाचा विडा रंगण्यासाठी कात अनिवार्य घटक. विड्यात कात नसेल, तर पान रंगतच नाही. विडा किती रंगला यावर सजनाचे, सजनीवर किंवा सजनीचे, सजनावर किती प्रेम आहे? याचा अंदाज बांधता येतो, असा समज ग्रामीण भागात आहे. मात्र या विड्यामध्ये कात नसेल तर… या तर्काला काहीच अर्थ राहात नाही. असा कात देणारे झाड म्हणजे खैर! या काताची फुले, पांढरी साल राखाडी, फळे चॉकलेटी, साल आणि लाकूडही रंगीत… असा हा रंगिला खैर!!

खैराचे झाड अस्सल भारतीय. हिमालयाची उंच हिमशिखरे वगळता खैराचा सर्वत्र मुक्तसंचार असे. भारताबाहेर पाकिस्तान ते म्यानमारपर्यंत खैराची झाडे आढळतात. मात्र त्याच्या उपयुक्ततेमुळे आज खैर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खैराच्या झाडाला संस्कृतमध्ये रोगनाशक म्हणून खदिर, लहान पानांचा म्हणून बालपत्र, वाकडे काटे असणारा म्हणून वक्रकंट, यज्ञात याच्या फांद्या वापरतात म्हणून यज्ञांग, दंतोपचारात वापरले जाते म्हणून दंतधावन, कंटक काटेयुक्त लाकडाचा म्हणून कुष्ठकंटक अशी गुणावरून अनेक नावे प्राप्त झाली आहेत. याखेरीज खाद्य, पत्री, क्षतक्षम, सुशल्य, कण्टकी, गायत्री, जिह्नशल्य, कंठी, सारद्रुम, कुष्ठारी, बहुशल्य, बहुसार, मेध्य, गीत, कुष्ठघ्न, बालतनय, यज्ञीय, इरिमेद, रक्तसार अशी विविध नावे आहेत. याला हिंदीमध्ये खैर, गुजरातीमध्ये खेर, बंगालीमध्ये खयेर, तेलगूमध्ये पोडलमानु, तामिळमध्ये कचुकही, मल्याळमळमध्ये कद्रम, कन्नडमध्ये कटच, इंग्रजीमध्ये कटेचू ट्री नावाने ओळखले जाते. याचे शास्त्रीय ॲकेशिया कॅटेचू आहे. काटे आहेत यावरून ॲकेशिया तर कन्नड नावावरून कॅटेचू घेण्यात आले आहे.

खैराचे झाड बियापासून उगवते. सुरुवातीला रोप हिवर, शमीच्या झाडासारखे दिसते. मात्र थोडे दिवस होताच ते आपले रंग दाखवायला सुरुवात करते. खोड तपकिरी, लाल दिसू लागते. पहिली दोन पाने साधी असतात. नंतर येणारी पाने संयुक्त पाने असतात. एका पानामध्ये वीस ते पन्नास पानांच्या जोड्या असतात. पानांवरही बारीक काटे असतात. पाने मळकट हिरवी असतात. खैराचे पाने शेळ्या आणि मेंढ्या आवडीने खातात. हत्ती आणि हरणांचेही ते आवडते खाद्य आहे. पानांमध्ये प्रथिने, क्रुड प्रथिने, तंतूजन्य पदार्थ आणि रंगद्रव्ये असतात. खैराची पाने जनावरांसाठी चांगले खाद्य मानले जाते. 

 पानांसमवेत काटे यायला सुरुवात होते. काटे आखूड, लाल, रूंद बुडांचे, वाकडे, मागे वळलेले असतात. काटे मजबूत आणि अतितीक्ष्ण असतात. झाड थोडे मोठे होताच त्याला फांद्या फुटू लागतात. खैराचे झाड मध्यम उंचीचे असते. त्याची उंची ९ ते १२ मीटर असते. खोडाचा परीघ दोन ते तीन फूटांपर्यंत वाढतो. या झाडाला राखाडी किंवा गडद तपकिरी रंगाची साल असते. पानांचे देठ तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे असते. हा पानगळ गटातील वृक्ष आहे. उन्हाळ्यामध्ये याची सर्व पाने गळून जातात. सर्व पाने गळून गेल्यानंतर काटे असणारे निष्पर्ण झाड खूप वेगळे, खराट्यासारखे अनाकर्षक दिसते. उन्हाळा संपत असताना त्याला नवीन पाने यायला सुरुवात होते.

खैराचे झाड तीन ते चार वर्षाचे झाल्यानंतर त्याला पानांच्या बेचक्यातून कळ्या येतात. खैराची फुले पाच ते दहा सेंटिमीटर लांबीची असतात. फुलांचा रंग हिरवट पिवळा असतो. फुललेले झाड काही दिवसांपूर्वीचे कुरूप रूप हरवून सुंदर बनते. फुलांच्या बाहेर हिरवी पाने असतात. असंख्य लहान सुगंधी फुले पांढऱ्या गजऱ्यांचे रूप घेतात. फुलांच्या मंद गंधामुळे किटक फुलांकडे आकर्षित होतात. किटकांच्या माध्यमातून फुलांमध्ये फलन होते. खैराच्या शेंगा पातळ, गुळगुळीत, सपाट असतात. शेंगाचा रंग गडद चॉकलेटी असतो. शेंगा टोकाला चोंचीसारख्या असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस या शेंगा येतात आणि जानेवारीपर्यंत त्या पक्व होतात. खैराच्या शेंगा पाच ते दहा सेंटिमीटर लांबीच्या असतात. त्यामध्ये पाच ते आठ गोल बिया असतात. खैराच्या शेंगा मानवाच्या पोटामध्ये गेल्यास बाधतात. त्या विषारी असल्याने पक्षी, जनावरे कोणीच खात नाहीत. आदिवासीमध्ये याबाबत एक कथा आहे. पूर्वी खैराच्या शेंगा सर्व लोक आवडीने खात असत. सर्वांचे ते आवडते फळ होते. एका गावात सीतामाई नावाची एक पतिव्रता स्त्री होती. सासू सीतामाईचा अनन्वीत छळ करायची. तिला खायला देत नसे. एकदा सीतामाई खैराची फळे खात असताना सासूने पाहिले. तिने सीतामाईच्या हातून शेंगा घेऊन जमिनीवर टाकल्या आणि शेंगाना लाथ मारली. तेव्हापासून ही फळे खाण्यायोग्य राहिली नाहीत. म्हणून सूनेला कधीही छळू नये.

खैराचे लाकूड बाहेरच्या बाजूला पिवळसर लाल असते, तर केंद्राकडे लाल असते. एक घनमीटर लाकडाचे वजन १०१० किलोग्रॅम भरते. झाडामध्ये बाष्पाचे प्रमाण १२ टक्के असते. लाकूड कमावण्यासाठी सावलीमध्ये ठेवून हळहळू सुकू दिले जाते. अशा लाकडाच्या पातळ फळ्या काढता येतात. खैराच्या लाकडाचे साहित्य शेकडो वर्ष टिकते. लाकडाच्या कठिणपणामुळे खैराच्या फळ्या काढताना यंत्रावर सोपे नाही. खैराच्या लाकडाचे अनेक उपयोग आहेत. खैराचे लाकूड अतिशय चिवट, कठीण आणि मजबूत असते. हे लाकूड टिकाऊही असते. या लाकडाला वाळवी लागत नाही. त्याचे लाकूड मोठे असल्यास घरबांधणीमध्ये खांबाच्या रूपात केला जातो. हातामाग तयार करण्यासाठी खैराचे लाकूड सर्वोत्तम मानले जाते. खैराचे लाकूड पाणी आणि मातीमध्ये कुजत नसल्याने विहिरीच्या मोटेचे साहित्य बनवण्यासाठी वापरले जात असे. तेलाच्या घाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडासाठीही खैराला पसंती दिली जाते. खैराच्या झाडाला चांगले गुळगुळीत बनवता येत असल्याने शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, होड्या, तलवारीच्या मुठी इत्यादीसाठी खैराच्या झाडावर लाखेचे किडे चांगले पोसले जातात. खैराच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठीही केला जातो. खैराचे लाकूड अर्धवट जाळून कोळसा बनवला जातो. हा कोळसा पेटवल्यानंतर खूप लाल रंगाचा दिसतो. त्याला ‘खदिरांगार’ असे म्हटले जाते. एखादी व्यक्ती रागावल्यानंतर त्याच्या डोळ्यात रक्त उतरते. डोळे त्यामुळे लाल दिसतात. अशा डोळ्यांचे वर्णन ‘खदिरांगारासारखे लाल’ असे केले जाते. खैराच्या लाकडाचा आणि कोळशाचा उष्मांक हा खूप जास्त आहे.  

खैराच्या झाडाची साल दहा ते बारा मिलीमीटर रूंदीची असते. बाहेर करड्या किंवा राखाडी रंगाची साल आतील बाजूला लाल असते. जून्या झाडाची साल आणि बारीक फांद्याचे तुकडे उकळले जातात. चांगले उकळल्यानंतर त्यातील रस बाहेर पडतो. घट्ट साका तयार झाल्यानंतर तो बाहेर काढून त्याच्या वड्या पाडल्या जातात. त्या वाळवल्या की त्याचा कात तयार होतो. खैराच्या झाडापासून कात तयार करणाऱ्या कुशल मजूरांना ‘कातकरी’ म्हटले जात असे. काताचे पांढरा, तपकिरी आणि खेरसाल असे तीन प्रकार मानले जातात. खेरसाल तयार करावा लागत नाही. तो झाडाच्या खोडावर फांद्याच्या बेचक्यात आपोआप तयार होतो. तो खैराचा डिंक असतो. हा डिंक उत्तम पोषण्द्रव्य असणारा घटक आहे.

आयुर्वेदामध्ये खैराला औषधी वनस्पती म्हणून मोठी मान्यता आहे. खैरामध्ये फ्लेवेनॉईडस, क्वेरेसेटिन आणि टॅनिनसह अनेक उपयुक्त संयुगे आहेत. धन्वन्तरी निघंटूमध्ये यासंदर्भात ‘खदिरो रक्तसारश्च गायत्री दन्तधावन:l कण्टकी बालपत्रश्च जिल्मशल्य: क्षतक्षम:ll२५ll खदिर: स्याद् रसे तिक्तो हिम: पित्तकफास्रनुत्l कुष्ठामकासकण्डूतिकृमिदोषहर: स्मृत:ll२६ll’ असे वर्णन करण्यात आले आहे. आयुर्वेदामध्ये काताचे पाच प्रकार दिले आहेत. पांढरा कात हे नाव रंगावरून मिळाले आहे. तपकिरी किंवा तांबट काळसर कात आतून पिवळट आणि मृदू असतो. याचा उपयोग औषधामध्ये केला जातो. तांबडा कात हा विड्यातून खाण्यासाठी वापरला जातो. काळा कात निकृष्ट दर्जाचा मानला जातो. विट्खदिराला चरबीसारखा वास येतो. त्यामुळे त्याचा वापर कातडी कमावण्यासाठी केला जातो. खाकी कपडा रंगवण्यासाठीही कात वापरला जातो. काताचा उपयोग कापड रंगवणे, कातडी रंगवणे, मासेमारीची जाळी रंगवण्यासाठी केला जातो. सुपारीला लाल रंग आणण्यासाठी चूना आणि कात याच्या मिश्रणात रंगवण्यात येते.

कात चवीला किंचीत कडू असतो. कात कफ आणि पित्तशामक मानला जातो. जखमेतून होणारा रक्तप्रवाह थांबवण्यासाठी काताची पूड जखमेवर पसरतात. दंतरोग, तोंडातील व्रणासाठी काताचा वापर केला जातो. अतिसार आणि जंतावर कात उपयुक्त ठरतो. थुंकीतून रक्त येत असल्यास खैराच्या ताज्या सालीचा रस आणि हिंगाचे मिश्रण दिले जाते. घशाला शिथिलता आणण्यामध्ये कात उपयुक्त ठरतो. खोकला येत असल्यास कात आणि दालचिनी याची गोळी तयार करून तोंडात ठेवली जाते. मात्र हे मिश्रण आयुर्वेदाचार्याकडून घेणे हिताचे. कुष्ठरोगावरील औषधांमध्येही काताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. बारीक तापामध्ये कात उपयुक्त ठरतो. कातामध्ये एपिकेटिन्स आणि कॅटेचिनसारखी संयुगे असतात. ही संयुगे आतड्याच्या हालचाली सुरळीत ठेवतात. त्यामुळे पान खाणे पचनासाठी उपयुक्त मानले जाते. खैराच्या सालीतील घटक प्रतिजैविकाप्रमाणे कार्य करतात. कात रोगजनक बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करतो. मूत्रविकारांवरही कात उपयुक्त आहे.

खैरामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. खैराच्या बियांमध्ये एस्कॉर्बिक ॲसिडच्या तोडीचे अँटिऑक्सिडंट घटक आहेत. खैराच्या झाडामध्ये फिनॉलिक संयुगे आहेत. खैराच्या लाकडामध्येही ही संयुगे आढळतात. खैराच्या बियांचा अर्क जिवाणूंविरूद्ध प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. कठीण लाकडाचा अर्क हा बुरशीनाशक असल्याचेही दिसून आले आहे. बांग्लादेशामध्ये खैराच्या झाडाच्या विविध घटकांचा वापर मधूमेहावरील उपचारासाठी केला जातो. उंदरावर केलेल्या प्रयोगामध्ये खैर लाकडाचा अर्क उंदरांच्या शरीरातील साखर नियंत्रीत करत असल्याचे आढळून आले. पानापासून बनवलेला काढा दुधात मिसळून खोकला आणि सर्दीवर उपचार केले जात. तोंड आणि ओठांची जळजळ थांबवण्यासाठी खैरांपासून औषध बनवले जाते. त्वचेच्या विविध रोगावरही खैरापासून औषध बनवले जाते. या झाडामध्ये रक्तदाब नियंत्रीत करणारे घटक असल्याचे आढळले आहे.

खैर औषधी वृक्ष आहे. मात्र याचा औषध म्हणून उपयोग स्वत:च्या मर्जीने करू नये. आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेउन किंवा त्यांच्या सल्ल्यानेच उपचार करावा. गर्भधारणा झालेल्या महिलांना ही औषधे कितपत सुरक्षित आहेत याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र स्तनदा मातांना पान खाण्याचा सल्ला दिला जातो.  

खैर वृक्षाचे सर्व उपयुक्त गुण लक्षात घेऊन काही राज्यांमध्ये खैराची जाणिवपूर्वक लागवड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खैराचे लाकूड हे मौल्यवान मानले जाते. त्याचा टिकाउपणामुळे वर्ग ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या झाडाला आपल्या शेताच्या बांधावर लावायला हवे. जगवायला हवे. हे निसर्गाच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे झाड आहे.

-०-

३१ टिप्पण्या:

 1. सर नमस्कार,
  आपण निसर्गातील विविध प्रकारच्या वनस्पती ची अतिशय सुंदर शब्दमांडणी करून उपयुक्त माहिती सतत नावीन्य पूर्ण देत आसता
  आपले मनपूर्वक धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 2. 🙏🙏
  साहेब, आपण सतत उपयुक्त माहिती देत आहात. या लेखामधून खैर वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म माहित होत आहेत. धन्यवाद.🙏🙏

  उत्तर द्याहटवा
 3. सुंदर लेख आणि उत्तम मांडणी...


  असेच नवनवीन *लेखाचे वीडे* रंगत राहोत.

  आपले लेख नेहमीच एक पर्वणी असते.

  धन्यवाद सर.

  उत्तर द्याहटवा
 4. सर नमस्कार,एवढा सुंदर लेख सर आपण प्रदर्शित केला खूपच छान माहिती मिळाली आणि खैर वनस्पती ही किती महत्त्वपूर्ण आहे याची संपूर्ण मांडणी खूप चांगल्या प्रकारे आपण केलेली आहे याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन,🙏

  उत्तर द्याहटवा
 5. खुप छान माहिती लिहिलेली आहे सर 🙏

  उत्तर द्याहटवा
 6. खूप छान माहिती मिळाली या सुंदर लेखापासून।

  उत्तर द्याहटवा
 7. खूप उपयुक्त माहिती वनस्पतीचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी वनस्पतीची माहिती असणे आवश्यक आहे सर तुमच्या लिखाणामधून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचत आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन

  उत्तर द्याहटवा
 8. सर अशा वनस्पतीची आपण काळजी घेतली पाहिजे फार उपयुक्त माहिती दिली होती. धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 9. Very nice information.? Not known to many people and a few recent generations as well. Kindly keep on sharing such articles. Hope, will be of help to many.

  उत्तर द्याहटवा
 10. छान माहिती दिली आहे
  कोकणात खैर भरपूर आहेत कात तयार करणार्या भटयाही आहेत

  उत्तर द्याहटवा
 11. सर,नमस्कार !
  लेख फारच मौलिक आणि अभ्यासपूर्ण झाला आहे.लेखकाचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे.

  उत्तर द्याहटवा
 12. खैराच्या झाडावरील लेख अतिशय आवडला ... उपयुक्त माहिती समजली ...thank you Sir ji

  उत्तर द्याहटवा
 13. नेहमी प्रमाणे खूप छान लेख आहे.

  उत्तर द्याहटवा
 14. खैराच्या झाडांची उपयुक्त माहिती मिळाली सर. 🙏🙏

  उत्तर द्याहटवा
 15. अतिशय अभ्यासपूर्ण व रोचक शब्दात लेखन केले आहे

  उत्तर द्याहटवा
 16. खैराच्या झाडाविषयी प्रत्येक भागाची माहिती चांगल्या पद्धतीने मिळाली. तसेच मानवी जीवनामध्ये खैराच्या झाडाची उपयुक्तता काय असते याविषयी खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 17. प्रस्तुत लेखाची सुरुवातच खैराच्या विविधांगी आयामाने झाली आहे. खैराच्या झाडापासून फक्त कातच तयार केला जातो एवढेच आपण म्हणत होतो; पण काताबरोबर खैराच्या झाडाचे उपयोग किती विविधांगी आहेत; विशेषकरून तलवार सारख्या धारदार शस्त्राच्या मुठीतयार करण्यासंदर्भात, ओठांची जळजळ, त्वचारोगावर आणि महत्वाचे म्हणजे मधुमेह यासारख्या रोगावर उपाय म्हणून खैराच्या झाडाचा उपयोग किती महत्त्वाचा आहे याविषयी महत्त्वाची माहिती या लेखातून व्यक्त झाली आहे.
  डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे या झाडांच्या अनुषंगाने अलीकडे होत असणारे लेखन ही केवळ त्या झाडाची उपयुक्तता सांगून थांबत नाही; तर पर्यावरणाच्या दृष्टीने अशी झाडे किती महत्त्वाची आहेत याचाही विचार ते साकल्याने करतात. शिवाय वर्णनाच्या ओघात लेखांना लालित्यही प्राप्त होते. हे डॉ. शिंदे यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे. म्हणून त्यांच्या लेखनास वैज्ञानिक ललित लेखन असे म्हणता येईल.

  उत्तर द्याहटवा
 18. रंगीला खैर ......हा खैराच्या झाडाचा गुण पहिल्यांदाच कळाला.... फार उपयुक्त माहिती .... सर 🙏

  उत्तर द्याहटवा
 19. अतिशय छान व उपयुक्त माहिती मिळाली.

  उत्तर द्याहटवा
 20. अतिशय उपयुक्त माहिती..धन्यवाद सर.💐

  उत्तर द्याहटवा
 21. लेख नेहमीप्रमाणे उत्तम आहे. खैरलांजी या गावाचा आणि खैरनार या आडनावाचा या वृक्षाची काही संबंध असावा असे वाटते.

  उत्तर द्याहटवा