मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

नद्या प्रदूषण : वैश्विक समस्या



  पृथ्वी कशी बनली, याबाबत अनेक वर्षापासून संशोधन सुरू आहे. आजही हे गुढ खऱ्या अर्थाने उलगडले आहे, असे म्हणता येणार नाही. आज असे मानले जाते की, एक आगीचा खुप मोठा गोळा होता. त्याचे एका स्फोटाने मोठे, मोठे तुकडे झाले आणि ते आजच्या सुर्याभोवती फिरू लागले. अनेक अब्ज वर्षापुर्वी घडलेल्या या घटनेतून सुर्य आणि त्याभोवतीच्या ग्रहांची निर्मिती झाली. हे ग्रह सर्याभोवती फिरू लागले. त्यातील पृथ्वी एक नशिबवान ग्रह. हा ग्रह जसजसा थंड होत गेला, तसे त्यावर प्रथम पाणी अस्तित्वात आले. वातावरणाची निर्मिती झाली. त्या पाण्यात नंतर एकपेशीय जीव अस्तित्त्वात आले. पुढच्या टप्प्यात बहुपेशीय जलचर, त्यानंतर उभयचर आणि सर्वात शेवटी भूचर व पक्षी अस्तित्त्वात आले. म्हणजेचं जीवनाची सुरूवात पाण्यापासून झाली. हे सर्वजण मान्य करतात. म्हणूनचं पाण्याला मराठीमध्ये जीवन असे सार्थ नाव मिळाले असावे.
      असे हे पाणी, पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आहे. पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. यातील समुद्राचे पाणी मानवाला आणि भूचर प्राण्याच्या वापरासाठी योग्य नाही. समुद्राव्यतिरिक्त असणारे पाणीचं आपल्या उपयोगाचे. पृथ्वीवर निसर्गचक्र तयार झाले. उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा. यामध्ये पावसाळयात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी, त्याच्या गुणधर्मानुसार उताराकडे वाहत जाते आणि न्यूनतम पातळीवर जाऊन स्थिरावते. ही न्यूनतम पातळी समुद्राची असते. वारंवार होणाऱ्या या प्रक्रियामधून पाण्याचे वाहून जाण्याचे निश्चित मार्ग तयार झाले. या मार्गाना आपण नद्या म्हणतो. पावसाळ्यात सर्वत्र पाणी असायचे, मात्र, हिवाळा आणि उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी उत्क्रांत होत असलेल्या मानवाने या नद्याकाठी आपल्या वस्त्या वसवायला सुरूवात केली. आज यातून अनेक संस्कृती उदयास आल्या होत्या, असे निष्कर्ष काढण्याइतपत पुरावे उत्खननातून आपल्याला मिळाले आहेत. तात्पर्य नद्याकाठी मानवी वसाहती वसू लागल्या. त्या वाढू लागल्या. त्या काळात आणि आजही मानव आणि भूचराना आवश्यक पाणी पुरवणारे गोड्या पाण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे नद्या आहेत. पुढे मानवाचा स्वार्थ वाढतचं राहीला. मानवाने आपल्या प्रगतीसाठी, आपल्या सुखासाठी निसर्गात हस्तक्षेप सुरू केला. अनिर्बंध पद्धतीने पाणी वापरायला सुरूवात केली.
      ही पाण्याची तहान भागवण्यासाठी नद्यावर बांध घालण्यास सुरूवात केली. आपल्यापासून नदी पुढे ज्या भागात वहात जाते, त्या ठिकाणी काय परिणाम होणार आहे, याचा विचार झाला नाही. त्यामूळे अनेक नद्या खालच्या भागात उन्हाळयात कोरड्या राहू लागल्या. हा मानवाचा निसर्ग संतुलन बिघडवण्यास कारण ठरलेला पहिला मोठा हस्तक्षेप. पुढे मानवाच्या सुपिक मेंदुतून आपल्या भौतिक सुखासाठी विविध अंगानी प्रगती झाली. मानवी वस्त्यासोबत विविध उद्योगधंदे नद्याच्या आणि जलसाठ्यांच्या काठावर आले. घरे बांधण्यासाठी नदीपात्रातील वाळू अनिर्बंध पद्धतीने उपसली जाऊ लागली. मानव पाण्याचा अनिर्बंध वापर करू लागला. स्वत:च्या स्वच्छतेसाठी वापरलेले पाणी घाणीसह पुन्हा तो नद्या पात्रात सोडू लागला. पुर्वी मर्यादित स्वरूपात पाणी वापरले जायचे. त्यावरून मराठवाडा भागात तर "तूप सांड्या हो, पण पाणी सांड्या होऊ नको" अशी तुपापेक्षा पाण्याचे महत्त्व जास्त असल्याचे अधोरेखीत करणारी म्हण अस्तित्त्वात आली. या सर्व गोष्टीबरोबर नद्यांच्या स्थितीत बदल होत होता. मूळ रूप बदलत होते. मात्र त्याकडे अनेक दिवस गांभिर्याने पाहिले गेले नाही. अनेक वर्ष ही प्रक्रिया राबवल्यानंतर, जेंव्हा नद्यातील पाणीचं वापरायोग्य राहीले नाही. नद्यातील जलचरांना जगणे शक्य होईनासे झाले, तेंव्हा या प्रश्नाचे महत्त्व लोकाना हळूहळू पटू लागले. मात्र हे जाणणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प आणि नद्यांचे पाणी प्रदुषीत करणारे अनेक. त्यांच्या अनेक आर्थिक बाबी त्यात गुंतलेल्या. त्यामुळे हा प्रश्न चुटकीसरशी सोडवणे शक्य नाही. तसेचं हा प्रश्न फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर, वैश्विक आहे. जगातील ४४ टक्के नद्यातील पाणी हे पिण्यासाठी आणि मासेमारीसाठी अयोग्य असल्याचे अभ्यासक जॉन केरी यांचे मत आहे. काँझर्व्ह एनर्जी फ्युचर संस्थेच्या संकेतस्थळावर जगातील दहा सर्वाधिक प्रदूषीत नद्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जगातील सर्वचं राष्ट्रात हा प्रश्न गंभिर आहे.
      भारतात गंगा नदीला सर्वात जास्त महत्त्व. या नदीत स्नान केले, की सर्व पापे धुतली जातात, हा एक गैरसमज किंवा समज. मयताचे प्रेत या नदीत सोडले की मृतात्म्याला स्वर्गप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा. या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती. या वस्तीतील लोकाना जगवण्यासाठी आणि गंगाकाठी पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने उद्योग उभारण्यात आले आहेत. या उद्योगधंद्याना लागणारे पाणी गंगा नदी पुरवते. हे पाणी वापरून स्वच्छता आणि सुबत्ता प्राप्त केली जाते. वापरलेले अनेक जीवाना अपाय करणाऱ्या घटक सामावून घेत असलेले, घाण पाणी इतरत्र न पाठवता पुन्हा गंगेत सोडले जाते. जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांबी असणारी गंगा नदी आहे. तिच्यात मल मूत्रयुक्त पाणी सर्वाधिक प्रमाणात मिसळते. त्यामुळे आज सर्वात पवित्र मानली जाणाऱ्या गंगा नदीचे, जगातील सर्वाधिक प्रदूषीत नद्यामध्ये पहिले स्थान आहे. भारत सरकारने स्वच्छता अभियान सुरू केले. गंगा नदी स्वच्छतेसाठी खास अभियान राबवले जाते. तरीही अद्याप या नदीचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे, दुर्दैवाने हे वास्तव आहे.
      त्यानंतर सर्वाधिक प्रदूषीत नद्यात, दुसरा क्रमांक हा इंडोनेशियातील सीटारम नदीचा लागतो. इंडोनेशियाच्या नागरी वस्त्याना जगवणाऱ्या या नदीच्या दोन्ही बाजूला मोठी नागरी वस्ती आहे. औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या घाण पाण्यामुळे, या नदी काठावरील संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे. विशेषत: पारायुक्त पाणी नदीत आल्याने धोका वाढला आहे. या नदीतील प्रदूषीत पाण्यामुळे वर्षाला पन्नास हजार लोकाना मृत्यू पहावा लागतो.
      चीनने औद्योगिक उत्पादनाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे
केले. पीत नदीच्या काठी मोठ्या औद्योगीक वसाहती उभारल्या. मुळातच विशिष्ट खडकातून वाहिल्याने पाण्याला पिवळा रंग घेऊन वाहणारी ही नदी. आता उद्योगानी सोडलेल्या घाण पाण्यामूळे आणखी प्रदूषीत झाली आहे. सध्या ती तिसऱ्या क्रमांकाची प्रदूषीत नदी आहे. खनीजावरील प्रक्रिया करणारे अनेक उद्योग वापरलेल्या घाण पाण्याचा विसर्ग पीत नदीत सोडतात. त्यामूळे हे पाणी शेतीसाठी वापरण्यासही योग्य  नाही. 
      जगातील चवथ्या क्रमांकाची प्रदूषीत नदी आहे इटलीतील सर्नो नदी. युरोपातील ही सर्वाधिक प्रदूषीत नदी. सुरूवातीला या नदीचे पाणी सर्वोत्तम आहे. पुढे नदीकाठावरील मानवी वस्त्यांचे सांडपाणी, मैलायुक्त पाणी आणि उद्योगातील वापरलेले पाणी नदीत सोडल्याने नदीचे पाणी वापरास योग्य रहात नाही. या नदीकाठच्या लोकामध्ये यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यानंतर पाचवा क्रमांक हा आपल्या शेजारच्या बांग्लादेशातील बरिंगंगा नदीचा लागतो. बांग्लादेशातील ही सर्वात मोठी नदी. या नदीकाठी मोठ्या प्रमाणात असलेल्या चर्मोद्यागाने या नदीच्या प्रदूषणाला मोठा हातभार लावला आहे. त्याचंप्रमाणे अन्य नद्याप्रमाणे या नदीतही मानवी वस्त्यांचे घाण पाणी आणि उद्योगांचे वापरलेले पाणी सोडले जाते. ही नदी प्रदूषीत झाल्याने बांग्लादेशसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 
      जगातील सर्वाधिक प्रदूषीत नद्यात सहाव्या क्रमांकावर फिलीपाइन्समधील मरिलिओ नदी आहे. नद्या प्रदूषणाबाबत अमेरिकेतील परस्थितीही चांगली नाही. अमेरिकेतील मिसिसीपी नदी ही
सातव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे ही जगातील सर्वाधिक लांबीची नदी. आठवा क्रमांक हा जॉर्डनमधील जॉर्डन नदीने पटकावला आहे. जॉर्डनचा प्रदूषणाचा प्रश्न मात्र प्रामुख्याने घुसखोरामुळे निर्माण झाला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. अर्जेंटिनातील मंताझा नदी ही नवव्या क्रमांकावर तर वर्तुळ पुर्ण करत भारतातील यमुना नदी दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामूळे नदी प्रदूषणाने जगातील सर्व देश ग्रासले आहेत. या प्रश्नाने आता वैश्विक रूप धारण केले आहे. इतर संस्थानी केलेल्या सर्वेक्षणातही याचं नद्या क्रमांकातील थोड्या फार फरकाने समाविष्ट आहेत.
      नद्यांचे प्रदूषण करण्यात सर्वात मोठा वाटा आहे, तो रसायन मिश्रित पाण्याचा. विविध उद्योगधंदे असे वापरलेले पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडतात. त्यातून पारा, फॉस्फरस, गंधक, जड धातू यांचा समावेश असणारे पाणी, नद्यामध्ये प्रक्रियेविना सोडले जाते. खराब उत्पादित रसायने किंवा दर्जाहीन रसायने नष्ट करताना, योग्य प्रक्रिया न करता अनेक उद्योग ती नद्यात सोडतात. त्यामूळे  जीवसृष्टीला हानी पोहोचते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले जाते. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची रासायनिक नत्रयुक्त आणि फॉस्फेटयुक्त खते, किटकनाशके शेतीसाठी वापरली जातात.  त्यांचा पिकानी न वापरलेला भाग पावसाच्या पाण्याबरोबर नदीत जाऊन मिसळतो आणि नद्यांचे प्रदुषण वाढते. त्याचबरोबर घरगुती वापराच्या पाण्यात क्लोरीनचा वापर होतो. घरच्या सांडपाण्यात साबूण आणि अन्य रसायनाचा समावेश असतो. अनेक नागरी वस्त्यांचे मैलायुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. अनेक शहरातून गोळा केला जाणारा कचरा आहे तसाच एकत्र टाकला जातो. या कचऱ्याची विभागणी होऊन त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक असते. मात्र तसे होत नाही. या कचऱ्यात जीवसृष्टीला धोका असणारे अनेक घटक असतात. ते ढिगात तसेच राहतात. पावसाच्या पाण्याबरोबर अशा कचऱ्यातून हे घटक जाऊन नदीपात्रात मिसळतात. त्याचप्रमाणे प्लॅस्टीकचा अतिरेकी वापर आणि त्याचे पाण्याच्या प्रवाहात जाऊन बसणे, हे जीवसृष्टीला
महाघातक ठरत आहे.
      अनैसर्गिक पदार्थ विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात पाण्यात मिसळल्यास प्रदूषण झाले असे मानतात. बाहेरून मिसळणाऱ्या घटकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होते आणि त्यामूळे निसर्गत: पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जीवसृष्टीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. हे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असणारे जीव धोक्यात आले, की प्रदुषणाची पातळी वाढत जाते. हे जीव नष्ट होतात आणि पाणी स्वच्छ होण्याची प्रक्रिया पुर्णपणे थांबते. ही प्रक्रिया थांबताच मानवी जीवनाला हानी पोहोचवणारे जीव वाढू लागतात. त्यातून बिल्हारजिया, मलेरिआ, कॉलरा अशा रोगाना निमंत्रण मिळते. विशिष्ट रसायनामूळे कर्करोगासारखे आजारही उदभवतात. पंजाबमध्ये कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रदूषीत पाण्यामूळे साथी पसरल्याचे जाहिर होते, तात्पुरती उपाययोजना होते आणि नंतर साथ गेली की पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरू राहते.
                काही वर्षापुर्वी इंग्लंडमधील थेम्स नदी अशीचं प्रदूषणग्रस्त झाली होती. या नदीचे पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास योग्य नव्हते. ब्रिटीश शासनाने आणि त्यापेक्षा जास्त तेथील जनतेने या नदीला पुर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी चंग बांधला आणि आज ते वैभव थेम्स नदीला प्राप्त झाले आहे. त्यामूळे मानवाने प्रामाणिक प्रयत्न केले, तर, नद्या पुर्ववत होऊ शकतात यात शंकाच नाही. नद्याना पुर्ववैभव प्राप्त करून द्यायचे तर सर्वप्रथम नद्यातील बेसुमार वाळू उपसा थांबवला पाहिजे. वाळू हे नदी स्वच्छ ठेवण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे. आपण पिण्यायोग्य पाणी बनवणाऱ्या शुद्धीकरण प्रकल्पात वाळू वापरतो आणि नद्यातील नैसर्गीक शुद्धीकरण प्रक्रियेतील हा घटक अमर्याद उपसतो. हा सर्वात मोठा विरोधाभास आहे. जनजागृतीसाठी प्रभावशाली पावले उचलणे आवश्यक आहे. लोकाना नदी प्रदूषणाचे धोके समजावून सांगीतले पाहिजेत. या प्रयत्नात लोकांचा समावेश झाला, तरच ते यशस्वी होवू शकतात. नदी पात्रातील जलपर्णी, गाळ, स्वच्छ करायला हवा. नदीत सांडपाणी सोडणे तातडीने थांबवणे आवश्यक आहे. त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते अन्य कारणासाठी वापरले जायला हवे. प्रत्येक गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जावेत, यासाठी जनमत तयार करायला हवे. योग्य झाडांची निवड करून त्यांची लागवड नदी काठावर करायला हवी. नदीत होणारी अवैध मासेमारी थांबवली गेली पाहिजे. अवैध बांधकामे आणि झाडाची कत्तल रोखायलाचं हवी.
      उद्योगधंदे उभारताना त्या भागातील नैसर्गिक संसाधनाचा विचार करणे आवश्यक आहे. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, अशा भागात बिअर उत्पादनाचे कारखाने आणि सर्वाधिक उस कारखाने हा विरोधाभास आहे. त्यातूनही ज्या उद्योगाना परवानगी मिळते, त्या उद्योगानी पर्यावरण विषयक सर्व अटींची पुर्तता केली आहे किंवा नाही, याची खातरजमा सरकारी यंत्रणानी करून घ्यायला हवी. लोकानीही याबाबत जागरूक राहून त्याबाबत कोणतीही अनियमितता आढळल्यास पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
      या सर्व उपायाना आपलेसे केले, तरचं नद्या या जीवनदायीनी बनून राहतील. आज आपण ही पावले उचलली नाहीत, तर पुढची पिढी आपणास निश्चित माफ करणार नाही. नद्या होत्या असा इतिहास लिहिला जाईल आणि आपण तिचे गोडवे गात असताना, नवी पिढी आपल्याला दोष देत राहील यात शंका नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रयत्न सुरू केलेले आहेत, ते प्रयत्न मनापासून आणि सर्व पातळीवर झाले तर नद्या वाचवणे कठिण नाही. मात्र त्याला जोड हवी आहे प्रामाणिक प्रयत्नांची. सर्व देशातून आणि सर्व स्तरातून. नाहीतर विश्वाचा विनाश अटळ आहे... प्रदूषण आपण केले. हे टाळायची जबाबदारी आपली आहे.