Chincholi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Chincholi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

निसर्गप्रेमाचा धडा देणारे – खाडे गुरूजी

 (शिक्षक दिन विशेष -३  मोतीराम दगडू खाडे गुरूजी)

शालेय जीवनात स्मरणात राहील, असा मार मी एकदाच खाल्ला. खाडे गुरूजींचा. गुरूजींचे शिकवणे अप्रतिम होते. एकदा त्यांचे वणव्यासंदर्भातील धडा शिकवणे ऐकून मला वणवा कसा असतो, ते पाहण्याची इच्छा निर्माण झाली. मी वणवा पेटवला. मोठे नुकसान झाले. मात्र वणवा पेटवण्याची शिक्षा म्हणून मारताना खाडे गुरूजींनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी दिलेल्या मारामुळे पाठीवर वळ उठले होते. ते वळ मिटले. मात्र त्या माराने लावलेले वळण कायम राहिले. आपल्या मारातून निसर्गप्रेमाचा अभ्यासक्रमबाह्य धडा शिकवणाऱ्या त्या गुरूजींची आठवण आजच्या तापमानवाढीच्या चर्चा सुरू असलेल्या काळात ठळक झाली. अशा खाडे गुरूजींविषयी…
_______________________________________________________

आमचे गाव चिंचोली. छोटे खेडेगाव. आजही हजाराच्या आत लोकसंख्या असणारे. गावात जिल्हा परिषद, सोलापूरमार्फत प्राथमिक शाळा चालवली जाते. मी शाळेत जाऊ लागलो तेव्हा चवथीपर्यंत शाळा होती. सुरुवातीला एकाच वर्गात चार ओळीमध्ये चार वर्ग बसायचे. या चार वर्गाना आळीपाळीने दोन शिक्षक शिकवत असत. गावातील प्रमुख चौकात शाळेचा एक मोठा वर्ग होता. त्यात ही शाळा भरायची. पुढे दोन खोल्यांची शाळा गावापासून सुमारे पाउण किलोमीटर अंतरावरील भवानी आईच्या मंदिरासमोरील जागेत बांधण्यात आली. वर्ग दक्षिणेकडे तोंड करून  होते. त्या वर्गाच्या पुढे तीसेक फुआवर आग्नेय दिशेला भवानी मातेचे मंदिर होते. मंदिरासमोर डिकमल (दिपमाळ) दिमाखात उभी होती. शाळेच्या पुढे मंदिराच्या दक्षिणेस कबड्डीचे मैदान बनवलेले होते. कधीकधी तेच खो-खोचे मैदान बनवण्यात येत असे. या मैदानाच्या कडेला एक कडुनिंबाचे झाड होते. थोडी सिताफळांची झुडपे होती. मंदिर, मैदान आणि शाळेच्या तीन बाजूला खोल दरीसारखा भाग होता. शाळा आणि मंदिर दोन्ही माळ नावाच्या टेकडीच्या पायथ्याशी होते. याला भवानी आईचा माळ म्हणायचे. माळावर झाडे फारशी नव्हती. जी होती ती झुडपे. पावसाळ्यात माळाच्या पायथ्यावर येणारे गवत वाऱ्यासोबत नाचत असायचे. हलक्या वाऱ्याच्या तालावर डुलणारे गवत पाहताना किती वेळ जायचा, ते कळायचे नाही. हिवाळा संपता-संपता गवत वाळू लागायचे. या गवतात पावसाळा आणि उन्हाळ्यात जनावरे चरत असायची. हिवाळ्याच्या अखेरीस गवताला कुसळे फुटायची त्या काळात जनावरे ते गवत खात नसत. अशी गावापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात आमची शाळा होती.

आमचे दुसरीपासूनचे वर्ग या नव्या शाळेत भरू लागले. पहिली आणि तिसरी एका वर्गात तर दुसरी आणि चवथीचा वर्ग एका वर्गात बसत असे. या शाळेत अंबऋषी कृष्णा काशिद आणि मोतिराम दगडू खाडे असे दोन शिक्षक होते. काशिद गुरूजींचा मी विशेष लाडका होतो. प्रत्यक्ष शाळेचा विद्यार्थी होण्यापूर्वीच मी बहिणीबरोबर शाळेत गेलेलो असल्याने ते मला ओळखत होते. त्या वेळी लहान असूनही मी दंगा करत नसे. शिकवताना अडथळा करत नसे, असे त्यांचे मत होते. प्रत्यक्ष विद्यार्थी झाल्यानंतर गुरूजींनी विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तरे देत असल्याने काशिद गुरूजी माझ्यावर खुश होते. पहिली सुखात पार पडली आणि मी दुसरीला गेलो. दुसरीला खाडे गुरूजी वर्गशिक्षक होते.

मोतीराम दगडू खाडे गुरूजी. आमच्या गावापासून तीन किलोमीटरवरील घोळवेवाडी या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावचे होते. सहा फुट उंची. घारे भिरभिरते डोळे. गोरा रंग. लांब नाक. सडसडीत बांधा. दाढी आणि मिशा काढलेला गुळगुळीत चेहरा. गावातील सर्व लोकात त्यांचा रंग उजळून दिसत असे. पांढरे शुभ्र धोतर, त्यावर नेहरू शर्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी. टोपीतून बाहेर डोकावणारे विरळ पांढरे केस. हातात निरगुडीची दोन अडिच फूट लांबीची छडी. हा त्यांचा पेहराव ठरलेला. गावातील ‘बच्चा, बच्चा’ कोठूनही खाडे गुरूजीना ओळखत असे. त्यांचे नाव कोणीच विसरू शकत नव्हते. आवाज खणखणीत नव्हता. मात्र सर्वांपर्यंत पोहोचणारा होता. खोलीतील एका वर्गाला शिकवताना दुसऱ्या कोपऱ्यातील एखाद्या मुलाने काहीही चूकीचे केले तरी त्यांच्या लक्षात येत असे. त्यामुळे ‘भिरभिरते डोळे’ हे त्यांच्याबाबत शब्दश: खरे होते. त्यांचे सर्वच विषयांचे शिकवणे चांगले होते. मात्र गणित शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. पहिलीच्या विद्यार्थ्याचे ‘बे’चे पाढे पाठ असलेच पाहिजेत, असा त्यांनीच केलेला नियम होता. ते पहिलीला शिकवत नव्हते. मात्र दुसरीला त्यांच्या वर्गात येणाऱ्या मुलांना पहिल्या आठवड्यात तोंडी परीक्षा द्यावी लागत असे.

आमच्या वर्गालाही दुसरीला शिकवण्यासाठी खाडे गुरुजी आले. सात जूनला मान्सूनचे आगमन होवो न होवो, प्राथमिक शाळा त्याच दिवशी सुरू व्हायच्या. आम्हाला पहिल्या दिवसापासून शाळेत जाणे बंधनकारक होते. शाळा बुडवली हे वडिलांना समजले की (त्यांना ते समजायचेच) पाठीचे धिरडे व्हायचे. त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी शाळेत गेलो. त्याच दिवशी ‘कोण किती पाण्यात आहे’, हे खाडे गुरूजींनी तपासण्यास सुरुवात केली. नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी संपलेली होती. आंब्याची चव अजून जिव्हेवरून गेलेली नव्हती. गल्लीतील मुले सोडून इतरांशी गप्पाही झालेल्या नव्हत्या, अशात खाडे गुरूजी वर्गात आले. कपाटातील छडी काढून टेबलवर ठेवली. सर्वांची हजेरी घेतली. एकेकास उभा करून पहिल्याच दिवशी बेचे पाढे म्हणायला सांगितले. काही विद्यार्थ्यांना म्हणता आले. ज्यांचे पाठ नव्हते त्यांना सक्त ताकिद मिळाली. ‘आठ दिवसात दहापर्यंत पाढे पाठ झाले पाहिजेत. पाढे पाठ नसले तर छडीचा प्रसाद मिळेल.’ पहिल्याच दिवशी खाडे गुरूजींनी दिलेला दम ऐकून काही मुलानी धसका घेतला. काहींनी पाढे पाठ करायचा निर्धार केला. पण बहुतांश मुले प्रामाणिकपणे प्रयत्न करत.

त्या काळात बालभारतीची पुस्तके बाजारात शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध होत असत. तरीही पहिला आठवडा पुस्तके शाळेत लागत नसत. पैशाअभावी काही गरीब मुलांचे आई-वडिल शाळा सुरू झाल्यावर पुस्तके आणायची, असे ठरवत. गुरूजीनी पुढच्या सोमवारपर्यंत पुस्तके आणा, असे सांगितले. तोपर्यंत त्यांच्या भाषेत ‘मडके किती भाजले’, हे तपासण्यास सुरूवात केली. पाढ्यांची परीक्षा झाल्यावर एक दिवस हातात खडू दिला आणि एकेकाला उठवून फळ्यावर लिहायला सांगितले. ‘कमल बघ…, गणपत गवत आण…’ अशी सोपी, वयाला पेलवतील अशी वाक्ये लिहायला लावली. ज्यांना लिहिता आले त्यांना शाबसकी मिळाली. ज्यांचे थोडेफार चुकले त्यांना ‘लक्ष नव्हते का?’ असे विचारले. तर अगदीच काही न येणाऱ्याला, ‘कारे शाळेत यायचास का म्हशी वळायला जात होतास?’ असा खडा सवाल केला. हे सर्व त्यांचे दरवर्षी चालत असे. आम्ही पहिलीला असताना चारही वर्ग एकाच खोलीत भरत असल्याने, वरच्या वर्गाच्या मुलांना शिकवताना अनुभवले होते. तेंव्हाच त्यांच्याबद्दल मनात भिती निर्माण झालेली होती. तेच गुरूजी आमच्या वाट्याला आलेले होते.

आपल्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांना काय येते हे तपासण्यात आठ दिवस कसे गेले ते कळलेच नाही. पुढे त्यांचे प्रत्यक्ष शिकवणे सुरू झाले. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे पाढे पाठ व्हावेत आणि पाठ राहावेत म्हणून खाडे गुरुजींनी वर्गातील मुलांची दोन गटात विभागणी केली. ही विभागणी सुरुवातीलाच ‘कोण किती पाण्यात आहे’ याचा अंदाज घेऊन केली. मग दोन गटांना दोन ओळीत बसवले आणि एका गटाने ‘बे एके बे’ म्हणायचे त्यानंतर दुसऱ्या गटाने ‘बे दुणे चार म्हणायचे. त्यानंतर पुन्हा पहिल्या गटाने ‘बे त्रिके सहा’ म्हणायचे. असा पाढे म्हणण्याचा कार्यक्रम दर शुक्रवारी तीन ते चार या वेळेत एका वर्गाचा आणि चार ते पाच या वेळेत दुसऱ्या वर्गाचा असायचा. यात ज्यांचे पाढे पाठ नसायचे त्यांच्या फक्त ओठांच्या हालचाली होत. ही गोष्ट त्यांच्या भिरभिरत्या नजरेतून सुटत नसायची. त्या मुलाजवळ किंवा मुलीजवळ ते जाऊन छडीचा प्रसाद द्यायचे. या माराला पर्याय नसल्याने आम्ही सुट्टीतही पाढे म्हणण्याचा न सांगता गृहपाठ किंवा रानपाठ (शेतात काम करताना) करायचो.

खाडे गुरूजी शिकवताना खूप तन्मयतेने शिकवत. गणित असो किंवा बालभारती. शिकवताना ते कधीच खुर्चीत बसत नसत. त्यांना केवळ हजेरी घेतानाच खुर्चीत बसलेले पाहिले. मुलांच्या ओळीमध्ये फिरत त्यांचे शिकवणे सुरू असायचे. गणितातील बेरीज, वजाबाकीची दोन गणिते ते फळ्यावर सोडवून दाखवत. ‘समजले का?’ असे विचारायचे. ‘हो’ असे बहुतांश विद्यार्थ्यांचे उत्तर आल्यानंतर एक गणित फळ्यावर लिहित आणि सोडवायला सांगत. ते गणित आम्ही सोडवू लागलो की बसलेल्या विद्यार्थ्यांच्या ओळीतून फिरत. कोणाचे बरोबर कोणाचे चूक हे न बोलता लक्षात घेत. पुरेसा वेळ झाला की ज्याचे गणित चुकलेले असायचे त्यातील एकाला पुढे बोलावून फळ्यावर सोडवायला लावत. तो तिथे चुकला तर समजावून सांगत. पुन्हा सर्वांना समजले का विचारत. अशी तीन गणिते सोडवून झाल्यावर पुन्हा नवे गणित सांगत. हे गणित जर कोणाचे चूकले तर पाठीवर छडीचा प्रसाद मिळत असे. एकदा मुलांनी गुरूजी जेवायला गेल्यानंतर त्यांची छडी फेकून दिली. आपली छडी गायब झालेली पाहून त्यांनी सर्वांना तंबी दिली, ‘तुम्ही कितीही छड्या गायब केल्या तरी मी रोज दोन्ही वेळा नव्या छड्या आणू शकतो. आज छडी आणलेली नाही. पण माझा हात छडीपेक्षा कमी नाही.’ असे म्हणत त्यादिवशी त्यांनी अनेकांना हातानेच मार दिला. त्यांच्या ‘चूकीला मार’ सूत्रामुळे ‘मारकुटे गुरूजी’ हे त्यांना टोपण नाव दिलेले होते. खाडे गुरूजींचा अभ्यासासाठी मला एकदाही हा प्रसाद खावा लागला नाही.

एखादी कविता किंवा धडा शिकवताना मुलाच्या डोळ्यांसमोर ते चित्र उभा करत. मुलाला त्या भावविश्वात नेत असत. मुलाच्या मनावर तो पाठ कोरला जात असे. त्यामुळे ते शिकवू लागले की सर्वांचे कान टवकारले जात. मुले पूर्ण लक्ष देऊन ऐकत असत. आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कविता पाठ असल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. एक दिवस असेच वर्गात मोठ्या आवाजात सामुहिक कविता म्हणण्याचा कार्यक्रम चालत असे. प्रत्येक कवितेला चाल लावली जायची. सुरुवातीला स्वत: दोन ओळी म्हणायचे आणि नंतर आम्हाला म्हणायला लावायचे. या सर्व शिकणे शिकवण्यात आमची दुसरी संपली. मी पहिला आलो. खाडे गुरूजींच्या आवडत्या विद्यार्थ्यांत समाविष्ट झालो.

आम्ही तिसरीत गेलो आणि आमच्या शाळेत आणखी एका शिक्षकाची नियुक्ती झाली. पांगरीचे जानराव गुरूजी तिसरे शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यानंतर खाडे गुरूजीनी तिसरी आणि चवथीचा वर्ग स्वत:कडे घेतला. एकाच वर्गात तिसरी आणि चवथीची मुले बसू लागलो. त्यातचे माझे अक्षर चांगले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वर्गातील भिंतीवर लावायचे तक्ते बोरूने मला लिहायला लावले. बोरू तयार करण्यासाठी लागणारा बांबू ते रामलिंग (बालाघाटच्या डोंगरातून) ते स्वत: आणला. धारदार ब्लेडने ते लिलया बोरू बनवून देत असत. तक्ता तयार झाल्यानंतर स्केच पेनने नक्षी काढायला लावली. या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. आपण बनवलेले तक्ते वर्गाच्या भिंतीवर लावले आहेत, हे पाहून मी नसलेली छाती फुगवून शाळेत वावरत होतो.  

खाडे गुरूजींची भिती मनातून गेली होती. गुरूजींच्या मारकुट्या स्वभावावर त्यांचे शिकवणे भारी पडले होते. चवथीच्या वर्गाला ते शिकवत असताना आमचे कान त्यांच्या शिकवण्याकडे असायचे. एक दिवस असेच ते चवथीच्या वर्गाला वणव्याशी संबंधीत धडा शिकवत होते. माझे कान त्यांच्या शिकवण्याकडे लागलेले होते. वणव्याचे वर्णन ऐकून तो कसा असतो, हे पाहण्याची इच्छा मनात निर्माण झाली. आता वणवा कोठे आणि कसा पाहायला मिळणार याचा विचार मनात सुरू झाला. आकाशाला भिडणाऱ्या ज्वाळा. त्या आगीमुळे उडणारे कीटक. त्यांना खाण्यासाठी आगीवरून फेऱ्या मारणारे पक्षी. हे सर्व वर्णन ऐकून वणवा आपण पाहायलाच पाहिजे असे मनात सारखे वाटू लागले.

आठ दिवस याच विचारात होतो. जानेवारी महिना सुरू होता. गवताला कुसळे आल्याने बरेच दिवस जनावरे माळाच्या पायथ्याशी गवत खात नव्हती. गवत गुडघाभर उंचीचे होते. ते गवत पाहून, आपण हे पेटवले तर आपणास वणव्याची अनुभुती मिळेल, असा विचार अस्मादिकाच्या मनात आला. (त्या वेळेपासून स्वत: प्रयोग करून पाहण्याची आवड माझ्या मनात होती.) आठवडाभर वणव्याचेच विचार सतत मनात होते. घरातून कोणाचे लक्ष नाही, असे पाहून गुपचूप काडीपेटी खिशात ठेवली. शाळेत गेलो. मधली सुट्टी कधी होते आणि वणवा कधी पेटवतो हा एकच विचार मनात होता. मन बेचैन होते. त्या दिवशी शिकवताना खाडे गुरूजीनी ‘लक्ष कोठे आहे’ असे विचारले. पण पूर्वीच्या पुण्याईवर मोठे बोलणे पडले नाही. असाच पहिला भाग संपला. मधली सुट्टी झाली. जानराव गुरूजी आणि खाडे गुरूजी मधल्या सुट्टीत त्यांच्या घरी जेवायला जात असत. ते दोघे दहा वाजता घरी गेले. काशिद गुरूजी त्या दिवशी आलेले नव्हते. माळाच्या पायथ्याचे गवत वाळलेले होते. ते गवत पेटवले की दुरून वणवा अनुभवता येणार होता. इतर मुलांबरोबर पटकन जेवण आटोपले. बाकीची मुले खेळू लागली. मी पोट दुखण्याचा बहाणा करून खेळायला जाणे टाळले. सर्व मुले खेळण्यात दंग आहेत, हे पाहून हळूच माळाच्या पायथ्याला गेलो. खाली बसून काडी पेटवली. काडीपेटी तिथेच टाकली आणि गुपचूप परत आलो. आपल्याला कोणी पाहात नाही ना, याची खातरजमा करत परत आलो. दिपमाळेच्या आडून पेटणारे गवत पाहू लागलो. तेवढ्या वेळात गवत चांगलेच पेटले. ताड ताड असा आवाज होऊ लागला. खेळण्यात दंग असणाऱ्या मुलांचे लक्ष आगीकडे गेले. ‘आग… आग…’ अशी ती ओरडू लागली. गुरूजींनी वर्णन केल्याप्रमाणे कीडे पकडण्यासाठी काळे पक्षी येऊन त्यांना भक्ष बनवू लागले. काही थोराड मुले आग विझवण्यासाठी उन्हाळीची झाडे उपटून प्रयत्न करू लागली. मात्र त्याच वेळी वारा जोरात आला आणि आग वेगाने पसरली. या आगीमध्ये शंभर-दिडशे एकराच्या परिसरातील गवत जळून खाक झाले.

खाडे गुरूजींचा गावाकडून यायचा रस्ता नेमका तोच होता. ते शाळेकडे यायला निघाले आणि त्यांना हा धुराचा लोट दिसला. त्यांनी आपली चालण्याची गती वाढवली. शेतात काम करणाऱ्या लोकांना सोबतीला घेऊन आग विझवली. मात्र अर्ध्या पाऊण तासात शेकडो एकर परिसरातील गवत जळून खाक झाले होते. आग विझवून घामेघुम झालेले गुरूजी अडिचच्या दरम्यान शाळेत आले. येताना त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी आग शाळेजवळच लागली आणि पसरली, हे टिपले होते. शाळेत येताच सर्वांना त्यांनी समोरच्या पटांगणात उभा केले. आग कशी लागली, याची प्राथमिक चौकशी सुरू झाली. बहुतांश मुलांनी आम्ही खेळत होतो, हे उत्तर दिले. मग उलटसुलट अनेक प्रश्नांची सरबत्ती झाली. कोण इकडे आले होते का? कोणाला पाहिले का? अशा सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरे मिळाल्यावर प्रत्येकाला तू कोठे होता? असे विचारायला सुरुवात केली.

बहुतांश मुले खेळत होती. काही विद्यार्थी घरी किंवा शेतात जेवायला गेले होते. कोणाकडूनच उत्तर मिळत नव्हते. गुरूजी अगोदरच लालेलाल झालेले होते. मग खेळायला कोण कोण नव्हते? असे विचारले. तोपर्यंत आपण पकडले जाणार ही भिती माझ्या मनात दाटू लागली होती. गुरूजी माझ्याजवळ आले आणि मी तिथेच होतो आणि खेळायला नव्हतो, हे त्यांच्या कानावर पडले. माझे पूर्व कर्तृत्व विसरून गुरूजींनी खण्णकन गालावर थप्पड मारली. पहिल्याच थप्पडीत डोळ्यासमोर काजवे चमकले. ‘तू काय करत होतास?’ प्रश्न आणि छडी असा दुहेरी मारा सुरू झाला. या दुहेरी माऱ्यापुढे मी जास्तवेळ तग धरू शकलो नाही.

मी आग लावल्याचे मान्य केले, तरी गुरूजींच्या हातातील छडी काही थांबत नव्हती. ओरडले तर आणखी जोरात फटका मिळायचा. ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अनुभवत होतो. माझे वय तेव्हा आठ वर्षे होते. प्रकृती तोळामासा. मार खाऊन माझी अवस्था अगदीच केविलवाणी झाली असावी किंवा मारून गुरूजींचा हात दुखू लागला असावा, त्यांनी मारणे थांबवून मला उभा केले. शांतपणे मला विचारले, ‘आग का लावली?’ मी प्रामाणिकपणे स्फुंदत-स्फुंदत उत्तर दिले, ‘मला वणवा बघायचा होता.’ उत्तर ऐकताच पुन्हा चार पाच छड्यांचा प्रसाद मिळाला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांसमोर त्या दिवशी आयुष्यातील पहिला मार मिळाला. जणूकाही पूर्वी कधीच मार न खाल्ल्याचा ‘बॅकलॉग’ मी भरून काढला. तोपर्यंत साडेतीन वाजत आलेले होते. वर्गात सर्व मुलांना बसवले.

खाडे गुरूजी पूर्ण बेचैन होते. वर्गात शिकवायला त्यांचे मन लागत नसावे. त्यांनी अस्वस्थपणे त्या आगीमुळे काय, काय नुकसान झाले याची माहिती सांगायला सुरुवात केली. त्यात पाच कधी वाजले ते कळाले नाही. शाळा सुटली. पाठीवरील मार बसलेल्या भागाची लाहीलाही होत होती. मात्र कोणाला सांगता येत नव्हते. वर्गातील मुलांना तर सारेच माहीत होते. घरात आपण काहीच बोलायचे नाही असे ठरवले. त्या दिवशी शाळेतून पहिल्यांदाच असा मार खाऊन घरी आलो. आता ही बातमी वडिलांना समजली, तर पुन्हा मार मिळणार या भितीने घरी येताच हात पाय धूवून आतल्या खोलीत अभ्यास करत बसलो. गावभर या आगीची आणि ती मी लावल्याची चर्चा सुरू होती. वडिलांना गावात येताच, ही बातमी समजली. ते बाहेरून तापूनच घरी आले. माळाच्या पायथ्याचा वणवा दुपारीच विझला होता, पण आमच्या घरात वणवा पेटणार होता. त्यांनी घरात पाऊल टाकताच, ‘मी कोठे आहे’ याची चौकशी केली. अभ्यास करत होतो, तेथे येऊन मला बाहेर आणले आणि मार-मार मारले. राग कमी झाल्यावर मला सोडले. मात्र खाडे गुरूजींनी जेवढे त्या आगीमुळे झालेल्या नुकसानीचे वर्णन केले होते, त्यापेक्षा जास्त वर्णन केले. असाच तो दिवस मी केलेल्या प्रयोगाचे दुष्परिणाम ऐकण्यात गेला. वडिलांनी मला मारल्यानंतर माझ्या त्या दिवशीच्या प्रतापाची माहिती आईला मिळाली. आईने आत येऊन शर्ट काढून पाहिले तर अंगावर काळे-निळे वळ उठले होते. आईचेच मन ते. ती त्यावर तेल लावू लागली तर वडील तिच्यावर ओरडले, ‘त्याला तेल लावतेस, त्याने मारलेल्या जीवांचे काय?’ तिच्याकडे आणि माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. तशीच तळमळत रात्र काढली. खूप दुखत होते, पण काहीच बोलू शकत नव्हतो. माझ्या हातून अक्षम्य चूक झाली होती.

तळमळत अख्खी रात्र सरली. कालौघात पाठीवरील वळ नाहीसे झाले. मात्र खाडे गुरूजींच्या त्या मारामुळे आणि त्यानंतर वडिलांनी दिलेल्या प्रसादामुळे पर्यावरण, निसर्गातील प्रत्येक घटक किती महत्त्वाचे आहेत, ते मनावर कोरले गेले. निसर्गातील इतर घटक नसतील तर माणूसही राहणार नाही, याची मनाला खात्री पटली. त्यावेळी फार काही कळले नव्हते. मात्र पुढे जसजसे वय वाढत गेले, वाचन वाढले तसे पर्यावरणाचे, निसर्गाचे महत्त्व पटत गेले. गुरूजीनी सर्वांसमोर मारल्यामुळे अनेक दिवस खाडे गुरूजींबद्दल मनात राग होता. मात्र पर्यावरणाचे महत्त्व जसजसे पटत गेले, तसतसे त्यांची कृती किती महत्त्वाची होती आणि मी किती विध्वंसक प्रयोग केला होता हे लक्षात येऊ लागले. खाडे गुरूजींचा तो मार वळाबरोबर वळण लावणारा होता. विद्यार्थ्यांना वळण लावणे हे शिक्षकांचे कार्यच. हे पुढे पटत गेले. त्यांच्याबद्दलचा आदर वाढत राहिला. जागतिक तापमान वाढीच्या चर्चा चाललेल्या असताना तर त्यांच्या कृतीचे महत्त्व आणखी ठळकपणे समोर आले. म्हणूनच आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण! माझ्या निसर्गप्रेमाची सुरुवात खाडे गुरूजींच्या मारातून झाली हे मनाला पटत गेले. आज विद्यार्थ्यांना मारायचे नाही, असा नियम आहे. मला मात्र तो तितकासा पटत नाही.

खाडे गुरूजी आज नाहीत. मात्र आजही मला त्यांची, त्या दिवशीच्या माराची आणि त्यातून मिळालेल्या धड्याची आठवण येत राहते. त्यांनी कदाचित त्या दिवशी मला शिक्षा दिली नसती, पर्यावरणाचे महत्त्व माझ्या मनावर बिंबवले नसते, तर मी आजच्याइतका निसर्गप्रेमी झालो असतो का? असा नकळत प्रश्न मनात येतो. त्यांनी दिलेल्या मारापेक्षा संस्कार मनात येतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जागी होते. आजच्या शिक्षक दिनानिमित्त समाज घडवणाऱ्या समस्त शिक्षक वर्गास मन:पूर्वक शुभेच्छा आणि खाडे गुरूजीना विनम्र आदरांजली…

-०-

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

हर.. हर.. महादेव


      
 (सण, उत्सव याना जोडून प्रथा परंपरा येतात. गावोगावी यांचे स्वरूप बदलते. यात काही अंधश्रद्धाही होत्या. कालाच्या ओघात काही बंद पडल्या, तर काही सुरू आहेत. यातील काही प्रथा समाजप्रबोधन करत तर काही समाजाला बांधून ठेवत. गावोगावच्या प्रथा, परंपरा आणि उत्सवावर यावेळी "नवे गाव आंदोलन" मासीकाचा ऑक्टोबर २०१८ चा विशेषांक आहे. यातील आमच्या गावातील निळकंठेश्वराचे मंदिर आणि तेथील कार्यक्रमावरील माझा मूळ लेख येथे प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
--------------------------------------------------------------------------------------------
     बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी सलेले आमचं गाव, चिंचोली. आजही गुगलवर न दिसणारे. गावात खच्चून दोन-अडिचशे उंबरा. गावात शिंदे आडनावाची घरं जास्त. चौधरी, जगताप, कदम, गलांडे, बोधले यांच प्रत्येकी एक घर. ही सर्व परगावातून आमच्या गावात आलेली मंडळी. ती सगळया गावाचे पाहुणे. त्याना दाजी किंवा मामा म्हणून हाक मारली जायची. या व्यतीरिक्त खुने, चांदणे आणि कसबे, सुतार आणि कोळी यांची वीसेक घरांची वस्ती गावात एकरूप झालेली.
      गाव इतक छोटं की सुरूवातीला तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत होती. चिंचोली, ढेंबरेवाडी आणि घोळवेवाडी. नंतर घोळवेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळाली. मात्र आजही दोन गावाची ग्रामपंचायत आहे. गावात पोलीस आलेच तर ते पाहुणे म्हणून. एखाद्या गुन्ह्यासाठी कधी पोलीस आल्याचे आठवत नाही. गावाला एक सुसंस्कृतपणा होता. तो गावाच्या शैक्षणिक वारशामुळे आलेला. चिंचोलीला पुर्वी कँप चिंचोली म्हणून ओळखले जायचे. गाव मराठवाड्याच्या हद्दीवर. मराठवाडयात निजामाचा अम्मल. तर चिंचोली इंग्रजांच्या अंमलाखाली. निजामाच्या राज्यात रझाकारानी भयानक गोंधळ मांडला होता. त्याची झळ सरहद्दीवरच्या गावानाही बसायची. या गावाना संरक्षण देण्यासाठी सैनिकांचा एक कँप, चिंचोली येथे ठेवण्यात आला होता. त्यामूळे गावाला कँप चिंचोली असेही म्हटले जायचे. सैनिकांच्या वस्तीमुळे गावात शाळा सुरू झाली.


      शाळेत व्यंकटेश देशपांडे नावाचे शिक्षक आले, असे वडील सांगायचे. या गुरूजीनी आमच्या गावातील तीन पिढ्याना शिकवले. त्यांच्यामुळे माझे पणजोबा, आजोबा आणि वडील प्राथमिक शिक्षक झाले. शिक्षणाबरोबर गावात सुसंस्कृतपणाही आला. गावात जातीपातीचे भेद मिटत गेले. सगळे एकाचं विहिरीवर पाणी भरायचे. सर्वच लहान मुले एकत्र राहात, खेळत असायची. गावाची वस्ती आजही हजाराच्या आत आहे. गावातील अनेक युवक शिकले आणि नोकरीनिमित्त सोलापूर, पुणे, मुबई कोल्हापूर, नांदेड, कोकण अशा विविध गावात जावून तिथेच राहातात. त्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ होत नाही. ज्या घरात चार मुले असायची. त्यातली तीन सरकारी नोकरीत. त्यातही शिक्षकांची संख्या मोठी. त्यामुळे पुढे कँप चिंचोली ही मास्तरांची चिंचोली बनली.
      अशा या गावाच्या ईशान्येला बालाघाट डोंगराच्या दोन-अडिचशे फुट उंच टेकडीच्या पायथ्याशी निळकंठेश्वराचे मंदिर. हे देवस्थान जागृत असल्याचे मानतात. मुळात हे शिवलिंग तेथे नव्हते. ते कुठेतरी डोंगरात होते. गावातील पुर्वजापैकी एकाला ते नेमकी कोठे आहे? ते स्वप्नात दिसले. मग चिंचोलकरानी गुपचूप जावून ते शोधले. वाजत गाजत जाण्याची सोय नव्हती. कारण तो भाग जंगलात, बालाघाटच्या डोंगररांगात होता. तिथे रझाकारांचा हल्ला होण्याची भिती होती. ती मुर्ती आणून आताच्या मंदिरात प्रतिष्ठापना केली. आणखी एक मंदिराच्या निर्मितीची कथा सांगीतली जाते. एकदा एक गुराखी जनावरे राखत असताना त्याच्या गायीचा पाय अडकला. पाय काढण्यासाठी तो कचरा आणि माती बाजूला काढू लागला. ती माती काढताना त्याला खाली हे शिवलिंग दिसले. शिवलिंगाचे दर्शन गुराख्याला होताचं गायीचा पाय निघाला. त्याने ही गोष्ट गावात सांगीतली आणि मग गावकऱ्यानी तिथे मंदिर बांधले. मूळ मंदिरात ओवऱ्या होत्या. त्या ओवऱ्या कोणी बांधल्या? हे तेथील दगडावर किंवा फरशीवर कोरलेले होते. अशाचं एका फरशीवर तुका बाळा शिंदे असे आमच्या पणजोबाचे नाव कोरलेले होते. त्यांनी त्या ओवरीतील फरशी बसवून घेतली होती. मंदिराच्या नुतनीकरणात ओवऱ्या काढल्या आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा हेमाडपंथी पद्धतीचा आहे. गाभाऱ्यात बरोबर शिखराखाली महादेवाची पिंड बसवलेली. बाहेरच्या बाजूला पुढे नव्या तंत्राने शाडू, चुना आणि इतर साहित्य वापरून सुबक, आकर्षक नक्षीकामासह रचना उभारण्यात आली. मंदिरात कितीही पाणी, दुध याचा अभिषेक घातला, तरी ते सर्व व्यवस्थित बाहेर जाईल अशी रचना. साधरणत: महादेवाच्या ऊर्फ शंकराच्या मंदिरात पिंडीसमोर एक नंदी महादेवाकडे पहात बसलेला असतो. या मंदिरात मात्र दोन नंदी असे महादेवाकडे पहात बसलेले आहेत. ते मुख्य मंदिरात नाहीत, तर त्या दोन नंदीचे स्वतंत्र मंदिर उभारलेले आहे. त्या नंदींच्या वायव्येला आणखी एक छोटे मंदिर. त्यातही महादेवाची पिंड. जाहिरातीचे युग येण्यापुर्वी, देवस्थान प्रसिद्धीच्या झोतात नसताना, तीसेक वर्षापुर्वी कोल्हापूरच्या मंडळीनी या छोटया मंदिराचे सुशोभीकरण केले.
      या देवस्थानाच्या जागृतपणाचे अनेक किस्से सांगतात. अनेक घटना दाखला म्हणून सांगीतल्या जातात. गावातील म्हणे एकजण मटण खावून मंदिरात गेला... त्याला मंदिरात सात फण्याचा साप दिसला. सापाने त्याचा पाठलाग सुरू केला. तो पळत शेवटी घरी आला. मात्र सापाने त्याचा घरापर्यंत पाठलाग केला होता म्हणे. तसेचं एकदा चोर, चोरी करून मंदिरात आले. त्यातील एकाने मटन खाल्ले होते. त्यानी वाटण्या करायला घेतल्या. मात्र, त्याना कोणीतरी येतयं असा भास व्हायचा. शेवटी ते वाटण्या करायचे सोडून निघाले. मात्र देवाने त्याना मंदिराभोवती फिरत ठेवले आणि सकाळी ते मुद्देमालासह पोलीसाना सापडले. अशा अनेक कथा सांगीतल्या जात. आगावू मुले हे कधी घडले होते? असा प्रश्न करायची. यावर सांगणारा म्हणायचा, "आमच्या वडिलानी हे सांगीतले". त्यांच्या वडिलाना विचारले, तर, त्यांचे उत्तरही हेच असायचे. त्यामुळे हे खरेच घडले होते का? हा प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. या गोष्टींचा मुख्य हेतू पावित्र्याच्या संकल्पनाना कोणी छेद देवू नये, कोणाच्या भावना दुखावू नयेत, असा असावा.
      मात्र आमच्या एका बंधूबाबत घडलेला किस्सा पुढे पुरावा म्हणून सांगीतला जावू लागला. झाले असे की, 'देव सर्वात आहे, देवाला सर्व जीव सारखेच प्रिय असतात' असे त्याने बरेचं कांही ऐकलेले होते. त्यावेळी त्याचे वय बारा तेरा वर्ष असावे. ऐकिव ज्ञानावर त्याने स्वत:चे तत्वज्ञान तयार केले. 'देवाला सर्व जीव प्रिय आहेत, माशाला जीव आहे, म्हणजे देवाला मासे प्रिय आहेत. देवाला प्रिय वस्तू अर्पण करायची असते, मग आपण देवाला प्रिय असणारी वस्तू म्हणून मासे अर्पण करायचे'. नदीत पोहताना त्याने हळूच मासा पकडला. तो तांब्यात ठेवला. आंघोळ करून तांब्यात पाणी घेतले. देवाला जलाभिषेक घालायला इतर मुले निघाली. कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून तो सर्वात शेवटी  निघाला. बाकीची मुले तोपर्यंत ओल्या कपडयाने दगडी पायऱ्यावरून पळत गेली. सगळया पायऱ्या ओल्या झालेल्या. पायाला लागलेल्या मातीमुळे चिखलही झाला. मासा घेवून एक एक पायरी चढत, हे साहेब बरेच वर गेले आणि त्याचा अचानक पाय घसरला आणि तो आडवा झाला. पायऱ्यावरून घरंगळत शेवटच्या पायरीवर येवूनचं थांबला. विशेष हे कि कोठूनही रक्त आले नव्हते. मात्र मुका मार चांगलाच मिळाला होता. त्यावेळेपासून तर जागृतपणाला आमच्या काळातल्या या किस्स्याची जोड मिळाली.
      गावात, पंचक्रोशीत देवस्थानाची आणखी जोरात चर्चा सुरू झाली. मंदिरातील गर्दी वाढू लागली. माझा मात्र दृष्टीकोन तेंव्हाही वेगळा होता. देवाकडे आपण कांही मागायचे असते, हे माझ्या मनात कधीच येत नाही. कोणत्याही मंदिरात गेले की प्रसन्न वाटते. या मंदिरातही कसे अगदी प्रसन्न वाटते. त्याठिकाणी जायचे. दर्शन घ्यायचे आणि एका ओवरीत डोळे मिटून शांत बसायचे. सारे जग विसरायला होते. मंदिरात पाच झाडे होती आणि आजही आहेत. चाफ्याचे झाड मुख्य मंदिराच्या दक्षीणेला दिमाखात उभे आहे. तर उत्तर बाजूला उंबराचे झाड आहे. छोट्या मंदिराच्या शेजारी प्राजक्ताचे झाड आहे. त्याच्याच शेजारी नंदींमागे कडूनिंबाचे झाड. तर या दोन झाडांमध्ये पिंपळाचे झाड आहे. मंदिराच्या बाहेर बार्शी-लातूर रोडवर वडाचे भलेमोठे झाड आहे. मंदिराच्या पश्चिमेला सामाजिक वनीकरण विभागाने ॲकेशिआची झाडे लावली आहेत. मंदिरात कधीही गेलो तरी झाडाखाली एकतरी चाफ्याचे फुल सापडते आणि ते मी देवाला वाहतो. अनेक वर्षात या सवयीत खंड नाही.
      मंदिर ज्या टेकडीच्या पायथ्याशी आहे त्या टेकडीवर तुरळक झाडे आहेत. त्यांची वाढ नीट झाली नसल्याने ही टेकडी उजाड दिसते. टेकडीवर मंदिरातून जावे लागते. तिव्र चढाचा, निमुळता रस्ता आहे. धापा टाकतच माणूस वर चढतो. टेकडीवर दिड-दोनशे एकराचा पुर्ण सपाट भाग आहे. त्याच्या केंद्रस्थानी एक नंदी आहे. असं म्हणतात, की तो नंदी दरवर्षी एका गव्हाच्या दाण्याइतके अंतर पुढे येतो. हे अंतर कोण मोजतो? कसा मोजतो? हे प्रश्न विचारू नका. मात्र असे सांगतात, तो नंदी जेंव्हा मंदिरातील महादेवाच्या भेटीला येईल तेंव्हा जगबुडी होणार. ते अंतर एक किलोमीटर इतक असावं. लहानपणी आम्ही ते अंतर किती असेल? नंदीला यायला किती वर्ष लागतील? त्यावेळी आपलं वय किती असेल? आपण जिवंत असू की नसू? अशा अनेक न शोधता येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधायचो. मंदिरापुढे मोठा रस्ता  आहे. पुर्वी वर्दळ कमी असायची. मात्र काळाबरोबर वाहनांची संख्या वाढली आणि रस्त्यावरची गर्दीपण....
      गर्दी कितीही वाढली तरी तीचा मंदीरातील शांततेवर कोणताही परिणाम नाही. मंदिरात अगदी शांत वाटते.‍ महादेवाच्या दर्शनाला नेहमीचं गर्दी असते. मात्र खरा जोर असतो तो श्रावण महिन्यात. त्यातही श्रावण महिन्यातील सोमवारी. आम्ही प्राथमिक शाळेत शिकत असताना गावातल्या सर्व लहान मुलांचा एक सामुहिक कार्यक्रम असायचा. गावातील लहान मुले कळशी किंवा चरवी घेन पहाटेच बाहेर पडायच. गावाबाहेर तीनेकशे मीटरवर नीलकंठा नदी. गावाच्या उत्तरेने नदी वाहते. ही नदी आम्हाला खुप मोठी वाटायची. आमची मजल फक्त बार्शीपर्यंत. त्यामुळे या नदीपेक्षा मोठी नदी दिसायची नाही. त्यामुळे आमच्या नदीचे मोठेपण त्या काळात मनावर जे कोरले गेले ते आजही कायम आहे. पुढे अनेक मोठया नद्या पहाता आल्या. मात्र निलकंठा नदीच्या त्या काळातील त्या रुपाची जागा कोणीच घेउ शकले नाही. ती फक्त डिसेंबरपर्यंत वाहायची. त्या नदीत आंघोळ करायची. नदीच्या वरच्या पात्रात कळशी वाळूने स्वच्छ घासून पाण्याने भरून घ्यायची. मंदिरातील पिंडीला जलाभिषेक घालायचा आणि बाहेर येवून मंदिराच्या आवारातील प्राजक्त आणि चाफ्याची झाडाखाली पडलेली फुले गोळा करून पिंडीवर वाहायची. हा कार्यक्रम सातवीपर्यंत नेमाने पार पाडला जायचा.
      श्रावणातील गर्दीनंतर प्रत्येक अमोवास्येला गर्दी असते. त्याखेरीज गुढीपाडव्याला तर जत्रेचे स्वरूप यायचे. घरातून उदबत्ती, नारळ, गुळ, फुले घेवून घराघरातून मंडळी चारच्या सुमारास मंदिराकडे जायला निघायची. मंदिरात पाय ठेवायलाही जागा नसायची. मंदिराच्या गाभाऱ्यातील मुर्तीवर त्यादिवशी पितळी मुखवटा बसवलेला असायचा. फुले आणि पानानी छान सजावट केलेली असायची. उदबत्त्यांचा संमिश्र वास वातावरणात दरवळत असायचा. त्या वातावरणात गर्दितून वाट काढत आत जायचे, देवाचे दर्शन घ्यायचे नारळ ओवाळून फोडायचा. गुळामध्ये बारीक तुकडे करून मिसळून तो प्रसाद म्हणून सर्वाना वाटायचा. त्याला 'शेरणी' म्हणायचे. सर्वजन मंदिरात जायचे. प्रसाद परत घरी आणण्याचा प्रश्न नसायचा.   
      गुढी पाडव्यादिवशी नवस फेडण्यासाठी अनेक लोक येतात. कोणी पाचं तर कोणी दहा नारळाचे तोरण मंदिराच्या दरवाजाला बांधते. आणखी एक सोहळा असायचा. पाडव्या दिवशी छोट्या बाळाना शिखरावरून खाली टाकले जाई. ज्या बाळाने मान पकडली आहे, अशी सहा महिने ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाना 'हर.. हर.. महादेव'च्या गजरात शिखरावरून खाली टाकले जाई. खाली चारजन चादरीचे टोक घट्ट पकडून उभा असत. सुरूवातीला नारळ टाकला जाई. तो काढल्यानंतर बाळाला टाकायचे. आईच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरलेले असायचे. चादरीमध्ये ते बाळ अलगद विसावत असे. असे वरून टाकताना बाळाला कधी रडताना पाहिल्याचे आठवत नाही. बाळ खाली येताचं, आई त्याला पटकन चादरीतून काढून उराशी घ्यायची. बाळ आईच्या कुशीत छान हसायचे. यामध्ये कधी बाळाला इजा झाली नाही. बाळ असे टाकले म्हणजे देवाची त्याच्यावर कायम कृपा राहते, अशी श्रद्धा होती. तरीही काळाच्या ओघात ही प्रथा आज कोणत्याही आंदोलनाशिवाय आपोआप बंद झाली. आता गुढी पाडव्याला असे बाळाला शिखरावरून टाकले जात नाही. मात्र गुडीपाडव्या दिवशीचा उत्साह कायम आहे.
      त्यानंतर आणखी महत्वाचा सोहळा असतो तो महाशिवरात्रीचा. त्या दिवशी सर्व गाव उपवास करते. संध्याकाळी सहानंतर मंदिरात हळूहळू गर्दी जमा होते. त्यानंतर किर्तन सुरू होते. किर्तन संपताचं महाशिवरात्रीची कथा वाचायला सुरूवात होते आणि ती नऊपर्यंत संपते. त्यानंतर जमा झालेली मंडळी आपआपल्या घराकडे जातात. त्यादिवशी होणारे कथावाचन सर्वधर्मसमभावाची शिकवण देत असायचे. सारे ईश्वराला प्रिय आहेत. एक पारधी शिकारीसाठी बाहेर पडतो. संध्याकाळ झाली तरी त्याला शिकार कांही मिळत नाही. शेवटी त्याला एक तळे दिसते. त्या तळयाच्या कडेला एक झाड असते. रात्री तळयावर पाणी पिण्यासाठी जनावर येईल आणि आपण त्याचा वेध घेवू, या आशेने शिकारी झाडावर चढतो आणि कांही आवाज न करता शिकारीची वाट पहात असतो. त्याला अडथळा करणारी पाने तोडून ती खाली टाकत असतो. ते झाड असते बेलाचे. त्या झाडाखाली महादेवाची पिंड असते. त्या शिकाऱ्याने तोडलेली पाने त्या पिंडीवर पडत राहतात. नजरेला स्पष्ट दिसावे म्हणून तो आणखी पाने तोडत जातो आणि ती खाली मुर्तीवर पडत राहतात. ही नकळत घडणारी सेवा पाहून शंकर महादेव त्याला प्रसन्न होतात आणि वर देतात. अशा आशयाची ती कथा. शिकारीचा शोध घेत बसलेल्या पारध्याकडून नकळत घडलेल्या सेवेमुळेसुद्धा भगवान प्रसन्न होतात. हा बोध आमच्या मनावर कोरला जायचा. त्यामुळे जातीभेद हा मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. हे वर्गात शिकलेले मनावर पक्के कोरले जायचे. आजही  सर्व उत्सव पार पडतात. गावी नेहमी जाणे होत नसले तरी वेळ मिळेल तेंव्हा मी मंदिरात जातो. बालपणीच्या आठवणीना उजाळा देतो. नकळत एक सकारात्मक ऊर्जा स्वत:मध्ये साठवून घेतो आणि नव्या उमेदीने कर्तव्य पार पाडायला परत येतो. मनात मात्र कायम आठवणीचा सुगंध कायम दरवळत असतो.

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

बातमी... एका झाडाची !

ती बातमीही आहे तशी छोटीचं
पण मनात काहूर उठवणारी माझ्यासाठी...
कोसळले एक चिंचेचे झाड....
त्याखाली सापडली एक गाडी...
गाडीचे मोठे झाले नुकसान तरी
कोणतीही झाली नाही जिवीतहानी..
नेहमीप्रमाणे असणारी छोटीशी बातमी..
पण मनात दाटली प्रचंड अस्वस्थता कारण ते झाड साध सुधं नव्हत...
त्या झाडाशी जोडली गेली होती माझ्या लहाणपणाची नाळ..

माझ्याच नव्हे तर माझ्या नकळत्या वयापासून
गावातील आबालवृद्धाचे नातं होतं त्या झाडाशी
निळकंठेश्वराच्या मंदिरापासून शंभरेक मिटरवर
बार्शी लातूर हायवेवर उभा होते ते चिंचेचे झाड
शांतपणे........
अनेक पिढ्यांचे साक्षीदार बनून

झाली होती चिंच या फळाची ओळख या झाडामुळेचं
जरी चिंचोली होते गावाचं नाव तरी
नव्हती गावात चिंचेची झाडे
आमच्या झाडाना पण फळ यायला नव्हती झाली सुरूवात
त्या बालवयातही ते झाड तसेचं मोठे होते
भव्य त्या झाडाकडे पाहून वाटायचं
आपल्या गावाचे नाव पडले असावे या झाडामुळेचं

होते त्याला कारणही तसेचं
त्या झाडाच्या पुढे होते एक पांगिऱ्याचे झाड
आमच्या शेजारच्या गावाचे नावही पांगरी 
चिकटून वसलेली गावे, जुळया भावंडासारखी
सुखानं राहणारी, एकमेकाना हवं नको ते पाहणारी
त्यामुळे आमच्या बाल चर्चेत हा असायचाचं मुद्दा
पण त्या बालचर्चाचं होत्या हे कळले पुढे ....

ते झाड इतके मोठे होते की
लहानपणीसुद्धा चार पाच जणानी हात जोडले तरी
नाही यायचा बुंधा कवेत
भव्यपणा या शब्दाचा जणू सांगायचे अर्थ....
शांतपणे....

मात्र आठवत असेचं कधीतरी
पहिल्यांदा लहानपणी खाल्ल्याचं त्याचं झाडाच्या चिंचा..
होय, नक्की त्याचं झाडाच्या...
अमावास्येला किंवा एरवीही गेलो मंदिरात की
शोधायचो आम्ही हटकून झाडाखाली चिंचा...
खाली नाही सापडल्या तर मारायचो दगड
आमच्या दगडाचा मार त्या झाडाने
निमुटपणे सोसला होता आमच्या बालपणी
कोणतीही न तक्रार करता.... निस्तब्धपणे.....

हायवेलगत होतं ते झाड
झाडाला दगड मारताना मोठ्यानी पाहिले की
लागत आम्हाला बोलणी खावी
झाडाला दगड मारू नका म्हणून नाही तर...
तो लागू नये रस्त्यावरील वाहनाना म्हणून
झाडाची मात्र नव्हती कधीचं तक्रार
आणि जाणवली पण नाही ती कधी बालपणी
झाड उभाचं होते.......शांतपणे............

आम्हाला रागावणारे मात्र
गोठा बांधताना जायचे त्याचं झाडाकडं
आणायचे त्याच्या कोवळया फांद्या काढून
आडू बांधायला...
कारण त्या फारचं म्हणे चिवट असायच्या
नायलॉनच्या दोऱ्यावरही मात करायच्या....
तेचं साधन होतं बांधणीचं...
शिकवायचं ते झाड कसं जोडून ठेवावं ते.... शांतपणे.....

अनेक वर्षांच्या आठवणी झाल्या ताज्या
झाड पडलं..... ही बातमी वाचून
एरवी ते झाड आठवायचं ही नाही कधी
जणूकांही ते आपलं म्हणून सामावलं होतं मनातं
आपल्या माणसांचे अनेकदा विस्मरण होते कांहीसे तसेचं
विसरलो होतो मीही झाडाला.... पण झाड उभा असायचं ...
पुन्हा भेटायचं... शांतपणे

त्या झाडाने खावू घातल्या अनेक पिढ्याना चिंचा
झाड हायवेवर असल्याने मालकी तशी सरकारची
म्हणजे आमचीचं
पण आपण हाताळतो सरकारी वस्तू ज्या पद्धतीने
तसंच सर्वजण त्या झाडाला हाताळायचे
पण त्याची कधीचं तक्रार नव्हती

झाड खुपंच जुनं...
झाडाला खोबण्या होत्या..
त्या खोबणीत पोपट असायचे
त्याना पकडण्यासाठी लहानपणी आम्ही आरसा घेवून जायचो
आणि त्या पोपटाच्या डोळयावर नेम धरून टाकायचो प्रकाश शलाका
प्रकाश एकटक डोळ्यावर पडला तर
पोपटाला चक्कर येते, होतो असे ऐकून.
पोपट कधी सापडला नाही, पण बघीतले थोरानी आणि
पाठीचं सालटे निघेपर्यंत खाल्ला मार
पण तरीही कांहीचं बोलत नव्हत झाड
ते जगत होते समाधीस्थ साधूसारखे अविचल....

पाहिले अनेक प्रसंग त्याने...
१९७२ चा दुष्काळ आम्ही जगतानाही दिली होती त्याने फळे
आजही आठवत सारं स्पष्ट
त्यानंचं धैर्य दिलं होतं दुष्काळाशी लढायचं..
संकटातही उभा राहायचं ताठ मानेनं..
संकटावर मात करत चालायचं पुढे.... आणखी पुढे......

तसेचं चालू ठेवले होते झाडानं सारे कांही
मोठी होत होती गावातील लहान मुले
शाळा संपली की जात शहरात ...
तेथून पुढे आणखी पुढे...आणखी पुढे...
अगदी कोरिया आणि ऑस्ट्रेलियालासुद्धा
जगाच्या पाठीवर कुठेही
जिवनाच्या लढाईत गावाकडच्या आठवणी होत धुसर
पण झाड मात्र तिथेचं उभा होते.... शांतपणे...

गावातील पुढच्या पिढीला पावसाळ्यात आडोसा,
हिवाळयात चिंचा आणि उन्हाळ्यात सावली देत..
अनेक पिढ्यांचे साक्षीदार बनून...
झाडाला वयं असतं हे नाही कळले कधीचं
त्या झाडाला पाहून...
झाडे कधी मरत नाहीत असंचं वाटायचं बालपणी...
पुढे मोठं झाल्यावर कळलं, तरी दिर्घायुष्य असंतं याची
ते झाड देत असायचं याची साक्ष ........ शांतपणे


पहिली कत्तल होताना झाडाच्या फांद्याची
पाहिली होती बुजवताना रस्त्यावरचे खड्डे
भांडण काढलं होतं कामगाराबरोबर
फांद्या तोडल्या म्हणून....
काढली होती समजूत गावातील थोरानी....
पण संध्याकाळी कोणी नसताना
डांबर वितळावयाच्या त्या यंत्रावर दगडे मारून
जिरवला होता मी माझा राग....
आणि झालो होतो शांत... त्याचं झाडाच्या साक्षीने...

पुढे कोणी पेटवली बुंध्यातचं शेकोटी
झळा लागल्या बुंध्यालापण...
वरची खोबणी आली खालवर..
तर ती खोबणी लपाछपीत लपायला झाडानं
जागा म्हणून दिली...
नेहमी शिकवलं द्यायलाचं त्याने
दातृत्व शिकवत उभा होत ते झाङ... अनेक पिढ्या...शांतपणे

आज मात्र नसताना कोणतही वादळ पडलं ते झाडं..
अनेक विचारांचं वादळ उठवून माझ्या मनात
ते बोलले नसेल कधीचं कोणास कांही
परि राहील सदैव माझ्या स्मरणात....
कारण नसतानाचं तिव्र होतात आठवणी
आणतात तेंव्हाचं डोळयात पाणी....
आलेल्या प्रत्येकाला जायचं आहे

हे सांगत आज ते झाडही गेलं ....शांतपणे