पान म्हटलं की माझ्या नजरेसमोर ‘डॉन’ चित्रपटातील, डोक्याला लाल रंगाचा गमछा पद्धतीचा टॉवेल गुंडाळलेला, जाकीट घालून, ‘भंग का रंग हो चकाचक, फिर लो पान चबाय, अरे ऐसा झटका, लगे जिया पे, पुनरजनम होई जाय…, हो खईके पान बनारसवाला, खुल जाये बंद अकल का ताला’ हे गाणे येते. डॉन चित्रपट, त्यातील अमिताभ-झीनत अमानची जोडी आणि त्यांचे हे गीत आजही तितकेच प्रसिद्ध आहे. हिंदीतील पान आणि मराठीतील पान लिहिण्यापासून अर्थापर्यंत सर्वकाही समान आहे, असे दाखवणारे हे गाणे. मात्र हिंदीत पानाला पत्ता म्हणतात. या गाण्याने लोकांचे खूप मनोरंजन केले, त्याचबरोबर पांढरपेशांमध्येही पानाची ‘क्रेझ’ आणली, हे मात्र खरे!
अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत
गावाकडे पान खाणे, हे एखाद्या पार्टीप्रमाणे असायचे. विशेष म्हणजे गावाकडील अनेक आज्याही
पान खायच्या. त्यांच्या पानाच्या पिशवीला बटवा तर पुरुषांची चंची असायची. गावातील एक
बंडखोर महिला तर पुरूषांमध्ये बसून पान खायची. मुलांना लग्न झाल्यानंतर पान खाण्याचा
जणूकाही परवाना दिला जायचा. लहान मुलांना मात्र पानापासून लांब ठेवले जायचे. मोठी माणसे
गावातील पारावर, मारूती मंदिराच्या ओसरीत, ठरलेल्या ठिकाणी एकत्र यायची. प्रत्येकजण आपली-आपली चंची काढायचा. त्यातून पान,
सुपारी, कात, चुना, तसेच काही तालेवार मंडळीच्या पिशवीतून तंबाखू, हे सर्व जिन्नस बाहेर
काढले जायचे. पानाच्या गठ्ठ्यातून दोन; लहान असतील, तर तीन पाने काढली जात. प्रथम ते पान खालून-वरून धोतर, पायजम्यावर
पुसले जात असे. त्यानंतर पानाचे देठ खुडले जात. काही मंडळी खुडलेले देठसुद्धा खास पद्धतीने
फेकतात. टोकाकडचा भाग तोडला जाई. त्यावर हलक्या हाताने चुना लावला जात असे. लाडाने
वाढवलेल्या बकऱ्याला कापायला नेताना त्याच्या अंगावरून हलकेच फिरवावा तसा. नाहीतरी,
त्या बकऱ्याचे मरण जसे आलेले असते, अगदी तसेच पानांचे चर्वण होणार असते. राहून, राहून
वाटते, ‘चुना लावणे’ हा वाक्प्रचार प्रथम वापरणाऱ्याने ही चुना लावण्याची नजाकत पाहूनच
तो वापरला असावा. त्यानंतर अडकित्त्याने बारीक केलेली सुपारी त्यावर पसरून काताचे तुकडे
किंवा पावडर टाकण्यात यायची. एखाद्याला यात लवंग, वेलची किंवा तंबाखू टाकावी लागते.
त्याशिवाय त्याला पान खाल्ल्याचा आनंद मिळत नाही. अट्टल पान खाणाऱ्यांच्या भाषेत ‘कीक’
बसत नाही. त्यानंतर त्याचा विडा बनवून तो तोंडात कोंबला जात असे. यातील जो पदार्थ कमी
असेल, तो बिनधास्त मागून घेतला जात असे. अगदी पानासह सर्वकाही. पान खाण्याच्या कार्यक्रमात
प्रत्येकजण आपले पान आपणच तयार करत असे. पान खाल्ल्यानंतर तंबाखुयुक्त पान खाणारी मंडळी
दोन बोटे ओठावर ठेवून पिचकारी मारत. अनेक शासकीय कार्यालयातील भिंतींची खालची बाजू
याच रंगाने रंगलेली असायची. हे लक्षात येऊ नये म्हणून शेवटी शासनानेच तेथे विटकरी रंग
मारायला सुरुवात केली असावी.
खरे तर, पान खाणे आरोग्यासाठी, पचनासाठी चांगले मानले जाते. मात्र दाताची काळजी घेण्याबाबत जागरूकता आली, तसे पान खाणे कमी होत गेले. शहरात मात्र पानपट्टी नावाचा प्रकार आला. तो आजही बहुतांश शहरात आहे. या पानपट्टीने पानाचे अनेक प्रकार आणले. कलकत्ता पान, बनारस पान, देशी पान, मगई पान हे पानाचे मूळ प्रकार. त्यातून पुढे साधे पान, मसाला पान, १२०-३०० पान, फुलचंद पान, पलंगतोड पान, चंदन पान, स्ट्रॉबेरी पान, चॉकलेट पान असे अनेक प्रकार बनवण्याच्या आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवरून आणले. प्रत्येक मोठ्या शहरात असा एखादा पानपट्टीवाला सुप्रसिद्ध असतो. त्याच्याकडे रांग लावून लोक पान खरेदी करतात. गावाच्या एका टोकाला असलेल्या दुकानातील पान खाण्यासाठी, काही किलोमीटरचा प्रवास करून लोक येतात आणि पानाचा आनंद घेतात.
पान खाण्याची प्रथा नेमकी कधी सुरू
झाली, याचा निश्चित काळ माहीत नाही. या पानाची मूळ चव तिखट असते. मात्र या पानात कॅल्शियम,
प्रोटिन, खनिजे, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व-क मोठ्या प्रमाणात असतात. भारतात
प्राचीन काळात पान खाणे हे राजेशाही लक्षण मानले जात असे. राजे, महाराजे, सरदार, दरबारातील
मानकरी, कलाकार सर्वांसोबत पानाची पिशवी असायची. जेवणानंतर आजही अनेकजण पान खातात.
विशेषत: कलाकार मंडळी, गायक आवर्जून पान खायचे. अनेक चित्रपटात असे कलाकारांचे पान
खाणे, विनोदी पद्धतीने चित्रीत केले गेले आहे. या पानाला चूना लावून त्यामध्ये कात,
सुपारी टाकून पान खाण्याची पद्धत, मोगल काळापासून सुरू झाली, असे मानले जाते. त्यापूर्वी
पानामध्ये वेलची किंवा बडीशेप टाकून खाण्याची पद्धत होती. मात्र मोगलांनी आणलेली, पानाला
आणखी चविष्ट बनवण्यासाठी त्यात कात, सुपारी आणि चूना टाकून खाण्याची पद्धत पुढे कायम
राहिली. पान खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, असे मानले जाते. बद्धकोष्ठता, ॲसिडीटी कमी
होते. तसेच पोटाचे विकार कमी होतात. पानामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते. हिरड्याची
सूज कमी होते. सर्दी झाल्यावर पान मधामध्ये बुडवून खाल्ले जाते. डोके दुखत असल्यास
पान खातात. तसेच जखमा लवकर भरून येण्यासाठीही पान खाल्ले जायचे. पानातील सुपारीमुळे
अल्सरचा त्रास कमी होतो. पानातील गुणधर्मामुळे पान खाण्याने मधुमेहाचा त्रास कमी होतो.
‘खईके पान बनारसवाला…’ या गाण्यापूर्वीही पान होते. पुढेही राहील. मात्र या गाण्याने
बनारसमधील एका वेलीच्या एका भागाला, पानाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.
पानाचे धार्मिक महत्त्वही आहे. पुजेमध्ये
खायचे पान मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामागे एक कथा सांगण्यात येते. देव आणि दानवांनी
समुद्र मंथन केले. त्यामध्ये विष आणि अमृत निघाले. विष भगवान शंकरानी प्राशन केले.
त्यातून त्यांना नीळकंठ नाव प्राप्त झाले. अमृत दानवांकडे गेलेच होते. मात्र भगवान
विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केले. अमृत आपल्या ताब्यात घेऊन, सर्व देवांना अमृताचे
वाटप केले. त्यानंतर थोडे अमृत शिल्लक राहिले. ते मोहिनी रूपातील विष्णूंनी हत्ती बांधायच्या
खुंटीजवळ ठेवून दिले. काही दिवसानंतर खुंटीजवळ एक वेल उगवली. ती सरसर वरती चढली. सर्वत्र
पसरली. हिरव्यागार वेलाला पाहून सर्व देवांना आनंद झाला. देवांनी तिला नागवेल असे नाव
दिले. भोजनानंतर देवांनी त्या वेलीच्या पानाचा विडा खाण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर
देवाला महानैवेद्य अर्पण केल्यानंतर पानाचा विडा आणि दक्षिणा अर्पण करण्याची सुरुवात
झाली. आजही कोणत्याही पुजेमध्ये खाऊचे पान शुभ मानले जाते. विड्याच्या पानाच्या टोकास
लक्ष्मी वास करते, तर पानाच्या मध्यभागी सरस्वती असते, असे मानले जाते. विड्याच्या
पानाला संस्कृतमध्ये ‘तांबुल’ असे म्हणतात.
पान. पर्ण, दल, पत्र, पत्री, पत्ती,
पात, पाते, फळ, पल्लव, पाचोळा, पाला, पालापाचोळा, पत्रा, इत्यादी अनेक नावे प्राप्त
झालेले, पान झाडाचं. पान वेलीचं. हिरव्यागार पानांनी लगडलेले झाड, वेल मनाला प्रसन्न
करते. हे झाडाचे महत्त्वाचे अंग. सर्व हिरव्या वनस्पतींचा महत्त्वाचा अवयव. अवघ्या
जीवसृष्टीला तारणारे असते ते पान. पाने अपवाद वगळता हिरव्या रंगाचीच असतात. काही शोभिवंत
वनस्पतींची पाने मात्र लाल, जांभळी, पिवळी, पांढरी असतात. तरीही पान म्हटले की, आपल्या
डोळ्यासमोर हिरवा रंगच येतो. ही पाने खोडावर असतात. खोडाशी ती देठाने जोडलेली असतात.
ती सहज नजरेला पडतात. देठ आकाराने लांब, आखूड असतो. पान जन्माला येताना खोडाला अगदी
बिलगून बसलेले असते. तो सहसंबंध पान पिकून गळेपर्यंत टिकतो. बीज अंकुरत असताना खोड
पानाला घेऊन बाहेर पडते. अंकुर किंवा कोंब जसजसे वाढते, तसतसे पान आणि खोड वेगळे होतात.
कोंब जसजसे वाढत जाते, तसतशी कोवळी पाने टोकाला येतात आणि खाली जूनी पाने असतात. कोवळ्या
पानांचे रंग सुंदर असतात. लहान बाळ पाहिल्यावर जसे मन प्रसन्न होते, तसाच आनंद ही कोवळी,
पिवळी, चॉकलेटी, लाल अशी अनेक रंगांनी रंगलेली पाने असतात. काही दिवसात त्यांचा रंग
पोपटी किंवा हिरवा बनतो. पाने मुख्यत्वे पसरट असतात. पानावर भरपूर सूर्यप्रकाश पडावा,
यासाठी ही रचना असते. देठाची लांबीही पानाला पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी लांब किंवा
आखूड असते. पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये झालेल्या कोनाला कक्ष म्हणतात. जास्वंदीसारख्या
झाडामध्ये पाने लघुकोनात असतात. काही झाडांना काटकोनात पाने फुटतात. काही झाडाची पाने
मात्र विशालकोनात निवांतपणे पसरलेली असतात. पानाच्या वरच्या बाजूच्या तुलनेमध्ये खालच्या
बाजूचा रंग कमी हिरवा असतो. अनेक झाडांच्या पानाचा खालचा भाग पांढरट, केसाळ असतो. पानाला
अंतर्गत आधार देण्यासाठी देठ पानात आल्यावर देठाचे शिरेमध्ये रूपांतर होते. शिरेला
पुढे उपशिरा फुटत जातात.
पान जीवसृष्टीसाठी सर्वाधिक महत्त्वाचा
घटक आहे. झाडाचा हाच घटक पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईड शोषून त्याचे ऑक्सिजन आणि पाण्यामध्ये
रूपांतर करत असतो. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया पानामध्ये घडत असते. कार्बन डायऑक्साईड
आणि ऑक्सिजन आणि बाष्परूपातील पाण्याची देवाणघेवाण याच भागात घडत असते. खोडाकडून आलेले
पाणी आणि क्षार, तसेच तयार झालेले अन्न इतर भागाकडे पोहोचवण्यासाठी पान मदत करत असते.
पानामधून पाण्याचे मर्यादेपेक्षा जास्त बाष्पीभवन होऊ नये यासाठी पानाच्या दोन्ही बाजूस
पेशींचा अधिधर्म नावाचा एक थर असतो. त्यावर क्युटिनाचा एक थर असतो. त्याच्या मध्यभागात
असणाऱ्या हरितलवकामध्ये प्रकाशसंश्लेषण घडते. काही नेच्यासारख्या वनस्पती याला अपवाद
असतात. असायलाच हव्यात, अपवाद असल्याखेरीज नियम कसा सिद्ध होणार? पानावर सूक्ष्म छिद्रे
म्हणजेच पर्णरंध्रे असतात. ती खरेतर पानाची नाकं असतात. प्रत्येक छिद्राभोवती दोन रक्षक
पेशी असतात. त्यातून वातावरणाशी झाडाची देवाणघेवाण होत असते.
पाने हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश
ऊर्जा रासायनिक ऊर्जेत रूपांतरीत करतात. ही रासायनिक ऊर्जा अन्नाच्या रूपात साठवले
जाते. या प्रक्रियेत बाहेर पडणारे पाणी झाडातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते. पानाच्या
मुख्य भागाला पर्णदल म्हणतात. पर्णदलाच्या आणि खोडाच्यामध्ये देठ असते. देठ खोडाजवळ
जाड असते. त्याला पर्णाधार म्हणतात. काही झाडामध्ये पर्णाधाराजवळ दोन अनुपर्णे असतात.
अनुपर्णे टोकदार असतात. जास्वंदीतील अनुपर्णे सहज पहायला मिळतात. काही झाडांना पाने
येताना सोबत मोठी अनुपर्णे घेऊन येतात, मात्र ती पान पूर्ण बाहेर येताच गळून जातात.
रबर, वड, पिंपळ या झाडांची अशा येणाऱ्या अनुपर्णाना कलिका शल्क म्हणतात. ज्या झाडांना
पाने येताना अनुपर्णे येत नाहीत त्याना अननुपर्णी असे म्हणतात. काही पानांचे देठ लांब
असते. काहींचे आखूड तर काहीना देठच नसतो. ती थेट खोडाला चिकटून फुटलेली असतात. ज्यांना
देठ नसतो, त्यांना अवृंत्त पाने म्हणतात. बहुतांश झाडांचे देठ गोलाकार असते. ऑस्ट्रेलियन
बाभळीच्या झाडांचे देठ चपटे असते. काही पाने अगदी धाग्यासारख्या देठाने जोडलेली असतात.
बहुतांश झाडांच्या पानांची देठे खोडाजवळ फुगीर झालेली असतात. पानाकडून आलेले अन्न त्यामध्ये
साठवलेले असते, असे मानले जाते. मात्र ते तितकेसे खरे नसावे. पानाबरोबरच्या देवाणघेवाणीत
जणू हे देठ, जकात वसुली करून तेथे संचय करत असावे.
विज्ञानाच्या भाषेत प्रत्यक्ष पानाला
पर्णदल असे म्हणतात. ते हिरवे, चपटे आणि पसरट असते. त्याच्या तळापासून टोकाकडे एक किंवा
अनेक शिरा निघतात. शिरा सुरुवातीला जाड असतात, पुढे त्या बारीक होत जातात. एक शिरा
असलेल्या पानातही अनेक उपशिरा फुटतात. त्या पानाच्या टोकाकडे जाताना बारीक होत जातात.
पानाचे तळ, कडा आणि टोक असे भाग असतात. माणसाच्या शरीरात रक्त वाहून नेणाऱ्या केसवाहिन्यांचे
जाळे असते, तसेच या शिरांचे जाळे तयार होते. त्या अत्यंत सूक्ष्म असतात. ऊस, मका, ज्वारी
अशा काही वनस्पतींच्या पानाचा पर्णदलाचा सुरुवातीचा भाग खोडाभोवती गुंडाळलेला असतो.
बहुतांश पानांची विभागणी शिरेमुळे दोन भागात होते. मात्र तळापासून निघालेल्या कडा समांतर
पुढे जात टोकाला एकत्र येतात. वड, पिंपळ, पिंपरण अशा बहुतांश झाडांच्या पानांच्या कडा
सरळ, वर्तुळाकार वाढत जातात. अशोकाच्या झाडाच्या पानांच्या कडा मात्र नागमोडी रस्ता
पसंत करत टोकाला येऊन मिळतात. बकुळाच्या पानांना पण असे वेडेवाकडे जावेसे वाटते, मात्र
त्यांचा तेवढा पैस नसतो. पानफुटीच्या जाड कडेलाही छान नक्षी असते. दोडक्याची आणि घोसावळ्याच्या
वेलीची पाने जवळपास एकसारखी. दोडक्याची पाने गर्द हिरवी तर घोसावळ्याची पोपटी. दोन्हीच्या
पानाला असणाऱ्या दात्र्या मात्र जोरात असतात. मुचकुंदाची पाने पसरट मोठ्या दात्र्याची.
मात्र याचे पान फार वेगळे. मुचकुंदाचे पान हातात घ्यावे, जितके चुरगळता येईल, तितके
चुरगळावे आणि सोडून द्यावे. पुन्हा ते पहिल्यासारखे पसरते. जणूकाही ‘झाले गेले विसरून
जावे’ हे गीत त्याच्या शिरेशिरेमध्ये सामावले आहे.
घायपाताच्या कडा जाडजूड असतात. मूळातच
पान जाड असते. बहुतांश झाडांचे, पान खोडाला जेथे चिकटलेले असते, तेथे बेचक्यात मुकुल
किंवा डोळा किंवा ज्याला आपण कोंब म्हणतो, तो नव्या फांदीच्या निर्मितीसाठी बसलेला
असतो. मात्र त्यातून प्रत्येक वेळी फांदी फुटेलच असे नाही. जास्वंदीच्या पानाच्या शेजारून
लगेच कळी बाहेर येते आणि तिचे फुलात रूपांतर होते. हे त्या झाडाच्या गुणधर्मानुसार,
तसेच त्याला मिळणारे अन्न आणि पाणी यावर अवलंबून असते. जास्तीत जास्त प्रकाश मिळणे
ही पानाची नाही, तर समस्त जीवसृष्टीची गरज आहे. पान समस्त जीवसृष्टीसाठीच प्रकाशसंश्लेषण
प्रक्रिया, त्यातून ऑक्सिजन, पाणी आणि अन्ननिर्मिती हे पर्णदलाचे कार्य आहे.
सूचीपर्णीच्या पानांचा आकार लांब,
अरूंद सुईसारखा असतो. काही कंदवर्गीय अळू, कमळ, लिलीसारख्या वनस्पतीची पाने गोलाकार
असतात. केळीची पाने लांब, पसरट आणि समांतर कडा आणि उपशिरांनी सजलेले असते. कांद्याची
लसणांची आणि काही गवताची पाने पोकळ गोलाकार असतात. त्यातील पानकणसाची पाने याहीपेक्षा
वेगळी. पाण्यातून बाहेर येणारी. या प्रवर्गातील कांद्याच्या पातीपासून पिपाणी बनवून
लहान मुले वाजवत. मात्र बहुतांश गवताची पाने चपटी आणि लांब असतात. म्हणूनच ‘गवताला
भाले फुटतात’ असे नाटकाचे शीर्षक आले असावे. मिरी, नागवेलीची पाने हृदयाच्या आकाराची
असतात. गारवेलीची पाने हाताच्या पंज्यासारखी असतात. धोतरा ही तशी विषारी वनस्पती. धोतऱ्याची
पाने लव असलेली, पांढरट रंग धारण केलेली आणि दोन्ही कडांना एकत्र न येऊ देणारी असतात.
त्याच्या विषारीपणाची कल्पना जनावरांनाही आली असावी. कोणताही प्राणी त्याला तोंड लावत
नाही. त्यामुळे धोतऱ्याची पाने दोन समान भागात विभागलेली नसतात. आंब्याची पाने वरून
गर्द हिरवी तेलात न्हाऊन निघालेली पुढे टोकाला अणकुचीदार रूप धारण करणारी असतात. कण्हेरीची
पाने भाल्याच्या टोकासारखी आणि खालच्या बाजूला पांढरा रंग घेतलेली असतात. करंजाच्या
पानाचा तोरा वेगळाच असतो. लंबगोलरूप धारण करून ते झाडावर मिरवत असते. मात्र गर्द हिरव्या
रंगाऐवजी पोपटी रंगच त्याला आवडत असावा. जास्वंदीची पाने अंडाकृती मात्र त्याच्या कडा
छान नक्षीदार कुशल शिम्प्याने कातरल्यासारखी असतात. तर बदामाची पाने उलट अंडाकृती म्हणजे
देठाकडे निमुळती असतात. याच्या पानाच्या कडा टोकाला गोल असतात. आपट्याच्या पानाला दसऱ्याच्या
दिवशी सोने म्हणून वाटले जाते. याची पाने दोन भागात विभागलेली असतात, मात्र दोन दले
समान नसतात. कांचनच्या पानाचा आकार मोठा असतो, आपट्यापेक्षा पातळ असतात. दोन्ही झाडांची
पाने इतर गुणवैशिष्ट्याने सारखीच. मधल्या देठासह शिरा उपशिरांचे जाळे त्याच्या पिवळसर
पोपटी रंग आणि रचनेने पांढरट पानांचे सौंदर्य खुलवतात. प्रत्येक वेलीचे, झाडाचे पान
वेगळे असते.
रबर, वड अशी काही झाडे वगळता बहुतांश
पाने तशी खूपच पातळ असतात. या पानाला आधार आवश्यक असतो. तो आधार नसेल तर पान पसरट बनू
शकत नाही. त्यासाठी पानांमध्ये शिरा आणि उपशिरांचे जाळे तयार होते. त्यामध्ये एक किंवा
अनेक उपशिरा असतात. त्याच पानाला पसरटावस्थेत ठेवण्याचे कार्य करतात. पानफुटी वनस्पतीचे पुनरूत्पादन
हे पानांपासूनच होते. एकावेळी अनेक कामे करण्याचे काम
झाडांकडून माणसाने शिकावे. झाडाचा प्रत्येक घटक अनेक जबाबदाऱ्या विनातक्रार पार पाडत
असतात. शिरांचे असेच असते. त्या पाणी आणि क्षार पानापर्यंत पोहोचवतात, त्याचबरोबर पानाने
तयार केलेले अन्न झाडाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही, ती विना तक्रार
करत असतात. शिरा आणि उपशिरांच्या रचनेला ‘शिराविन्यास’ असे भरभक्कम नाव मिळाले आहे.
पान देठाला जेथे जोडलेले असते, तेथून हा शिराविन्यास सुरू होतो. पानामध्ये शिरा आणि
उपशिरांच्या रचनांचे जाळीदार आणि समांतर शिराविन्यास हे दोन मुख्य प्रकार आढळतात. जाळीदार
शिरांची रचना ही प्रामुख्याने द्वीदल वनस्पतीमध्ये आढळते. यामध्ये एक, तीन, पाच, सात
अशा शिरा पानाच्या तळापासून सुरू होतात आणि पुढे उपशिरा फुटून पानभर नक्षी पसरवत राहतात.
याचे पुढे एकप्रशिरी म्हणजे एकच मुख्य शिरेपासून जाळे तयार करणारे आणि बहुप्रशिरी म्हणजे
एकापेक्षा जास्त शिरा फुटून जाळे तयार करणारे असे दोन प्रकार असतात. पिंपळ, जास्वंद
यांची पाने एकप्रशिरी वर्गात आढळतात. बहुप्रशिरी शिराविन्यासामध्ये अभिसारी आणि अपसारी
असे दोन प्रकार आहेत. यातील अभिसारी प्रकारात मुख्य शिरा पानाच्या तळापासून निघतात,
मात्र टोकाला पुन्हा एकत्र येतात. तमालपत्र, बोराच्या झाडाची पाने अशा प्रकारची असतात.
तर अपसारी प्रकारात झाडाच्या शिरा तळापासून फुटतात आणि पुढे त्यांच्यातील दुरावा वाढत
जाऊन कडेला संपतात. कापूस, पपईच्या पानात अशा रचना आढळतात.
समांतर शिराविन्यासातही असेच दोन
प्रकार आहेत. ज्वारी, मका अशा वनस्पतीमध्ये पानात एकच शीर सुरुवातीस निघते आणि अत्यंत
छोट्या उपशिरांचे समांतर जाळे करत पुढे जात राहते. राळे, भगर, बाजरी
आणि अनेक तृणवर्गीय वनस्पतीमध्ये पानांची रचना अशीच असते. हा प्रकार म्हणजे समांतर एकप्रशिरी
शिराविन्यास होय. कर्दळ, हळद, ऊसाची पानेही अशीच असतात, एकाच कुळातून निघालेल्या सर्व
लेकरांनी एकाच गावात सवते सुभे थाटावेत, अगदी तसेच या शिरा आणि उपशिरांचे असते. लहान
मुलाने आईच्या कमरेभोवती हात गुंडाळावेत अगदी तशीच ही पाने खोडाजवळ असतात. बहुप्रशिरीमध्ये
एका मुख्य शिरेपासून अनेक उपशिरा फुटत असतात. बांबुसारख्या वनस्पतीत पाने एका देठापासून
निघून पुढे टोकाला मिळत असतील, तर त्या रचनेला अभिसारी बहुप्रशिरी रचना म्हणतात. अपसारी
बहुप्रशिरी रचनेमध्ये एका मुख्य शिरेपासून अनेक उपशिरा फुटतात. मात्र त्या पुन्हा एकत्र
न मिळता, कडेला जातात. ताड, पंखामाड, सुपारी अशा अनेक झाडांची पाने अशी असतात. या झाडामध्ये
पामच्या एका प्रजातीची पाने खूपच मोठी असतात.
पानाच्या शिरांचे जाळे कसेही असो,
पानाचे दोन प्रकार आहेत असे वनस्पतीशास्त्र सांगते. साधी पाने आणि संयुक्त पाने. मात्र
ही तरी कोठे साच्यात बसणारी. साध्या पानामध्ये एकच पर्णदल असते. पानाची कडा अखंड असते.
जास्वंद, आंबा, पेरू, चिकू, अशोक, करंज अशा असंख्य झाडांची पाने साधी असतात. याचा आकार
काही मिलीमीटरपासून फुटापर्यंत असतो. यातील सागाचे पान पाहा कसे नखरे दाखवते. संयुक्त
पान हा दुसरा प्रकार. यामध्ये एकाच देठाला एकापेक्षा जास्त पर्णदले असतात. त्यामध्येही
ही चिंचेसारख्या झाडाच्या पानात सर्व पर्णदले मुख्य शिरेला जोडलेली असतात. तर गुलमोहोरासारख्या
झाडाच्या पानातील पर्णदले ही उपशिरेशी जोडलेली असतात. बाभूळ, चिंच, शेवगा, बकान नीम,
कडुलिंब, हादगा, सुबाभूळ, गुलमोहोर, अफ्रिकन ट्युलिप अशा अनेक वनस्पतींची पाने संयुक्त
पाने असतात. संयुक्त पानामध्ये पुढे अनेक प्रकार पडतात. पिच्छाकृती आणि हस्ताकृती असे
महत्त्वाचे प्रकार. यातील पिच्छाकृती संयुक्त पानामध्ये एकच देठ असते. एकाच शेपटावर
अनेक केस असतात, तसेच देठाच्या दोन्ही बाजूला पर्णिका असतात. त्याचेही पुढे एकपिच्छक,
द्विपिच्छक, त्रिपिच्छक आणि विसंयुक्त असे प्रकार आहेत. पिसासारखी रचना असल्याने त्याला
पिच्छाकृती म्हणतात. एकपिच्छक संयुक्त पानामध्ये मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला समोरासमोर
पर्णिका असतात. यामध्ये समपिच्छक आणि असमपिच्छक असे दोन प्रकार आहेत. समपिच्छक संयुक्त
पानातील पर्णिकांची संख्या सम असते. आवळा, चिंच, बाभूळची पाने या प्रकारची असतात. सूर्य
मावळतीला लागला की यांच्या पर्णिका एकामेकांना कुशीत घेऊन जणू झोपी जातात. म्हणे लाजाळूचे
झाड स्पर्श करताच लाजून पर्णिका एकमेकाजवळ घेते. असे असेल तर त्याचप्रकारची पाने असणाऱ्या
शिरीष, आवळा, चिंचेची पाने स्पर्श झाल्यावर मिटत नाहीत, म्हणजे या झाडानी लाज सोडली
का, असा प्रश्न उगाचच मनात येतो. ते काहीही असो, रात्री पाने मिटून घेणाच्या या पानांच्या
गुणाचा मोहोळ–मधाची पोळी शोधण्यासाठी चांगला उपयोग करून घेतला जातो. दिवसभर पानांनी
भरलेले झाड मधाच्या पोळ्याना दडवून ठेवते, मात्र रात्री पाने मिटल्यावर ती मधाची पोळी
सहज नजरेला पडतात. पानांची ही सवय लक्षात घेऊन मधाच्या पोळ्यांची जागा शोधून, दुसऱ्या
दिवशी त्यातून मध काढणारे अनेक महाभाग पाहिले आहेत. बाभळीचे पान द्विपिच्छक प्रकारात
येते. एका मुख्य देठाला पुढे समांतर उपशाखा फुटतात आणि त्यावर पर्णिका असतात. अशा संयुक्त
पानातही पर्णिकांची संख्या समान असेल तर त्या संधीप्रकाशात मिटलेल्या असतात.
त्रिपिच्छक संयुक्त पानांमध्ये देठाला
शाखा फुटतात. त्यांना पुन्हा उपशाखा फुटतात आणि त्यांना पर्णिका जोडलेल्या असतात. या
दुसऱ्या उपदेठावर पर्णिका जोडल्या गेलेल्या असतात. शेवग्याची पाने या प्रकारची असतात.
विसंयुक्त पाने हा आणखी एक प्रकार यामध्ये असतो. गाजर, बडीशेप, जिरे यांची पाने अशा प्रकारची
असतात. यामध्ये दोनपेक्षा जास्त फुटवे आणि त्यांना चिकटलेल्या पर्णिका असतात. संयुक्त
पानातील दुसरा मुख्य प्रकार असतो, तो हस्ताकृती संयुक्त पान. या प्रकारच्या पानांमध्ये
पर्णिका देठाच्या टोकाला फुटलेल्या असतात. एकपर्णिका प्रकारामध्ये एकच पर्णिका पानाच्या
टोकाला असते. पपई, पपनसाची पाने या प्रकारची असतात. यामध्ये बहुतांश पानांचे देठ पोकळ
असते. द्विपर्णिकी संयुक्त पानामध्ये देठाच्या टोकाला दोन पाने असतात. ‘बेलाला पाने
तीन’ किंवा ‘पळसाला पाने तीन’, असे आपण म्हणतो, मात्र ती पाने नाहीत तर त्या पर्णिका
असतात. त्रिपर्णिकी संयुक्त पानामध्ये एकाच देठाला तीन पर्णिका असतात. नेच्याच्या काही
प्रकारामध्ये देठाच्या टोकाला चार पर्णिका असतात. अशा पानांना चतु:पर्णिकी संयुक्त
पान म्हणतात. सप्तपर्णी, शाल्मलीसारख्या झाडाच्या पानाला चारपेक्षा जास्त पर्णिका देठाच्या
टोकाला वसलेल्या असतात. त्यांना बहुपर्णिकी संयुक्त पाने म्हणतात. अशा पानांमध्ये ५,
७, ९ अशी पर्णिकांची संख्या असते.
वेगवेगळ्या झाडांच्या
पानांचे आयुष्य वेगवेगळे असते. पर्णपाती प्रकारातील झाडांची पाने हिवाळ्यात गळतात.
या प्रकारच्या झाडांच्या पानांचे आयुष्य एका ऋतुचे असते. पानझडी वृक्षांची पाने वर्षातून
एकदा गळतात. मार्च ते मे महिन्यात पुन्हा पाने यायला सुरुवात होते. सदाहरित वृक्षांची
पाने एक वर्षापेक्षा झाडावर असतात. जांभूळ, आंब्याच्या झाडांना विनापानाचे
कधीच पाहता येत नाही. मात्र बहावा, सागाची झाडे पूर्ण पर्णहिन अवस्थेत हिवाळ्याच्या
सुरुवातीलाच येतात. बहावा फुलांनी पूर्ण बहरल्यावरच पानांचे आगमन होते, तर सागाची पक्व
झालेली पाने पिवळे ठिपके अंगावर परिधान करून लोकांचे लक्ष वेधत असतात. पूर्ण काही शैवालवर्गीय वनस्पतींमध्ये
पानसदृष्य रचना असतात, त्या पानाची कार्येही करतात. मात्र ती पाने नसतात. निवडुंगासारख्या
वनस्पतींमध्ये खोडच पानाचे कार्य करत असते. पानाचा आकार पहाता फार मोठे वैविध्य आढळते.
अगदी काही मिलीमीटरपासून काही फुटापर्यंत पानाचा आकार आढळतो. चिरघोळ किंवा चिघळाची
भाजी अनेकांच्या आवडीची. तिची पाने अगदी लहान काही मिलीमीटर लांबी-रूंदीची. ताटभर भाजी
घेतल्यावर घराला पुरते. मात्र चव आणि पौष्टिकपणा लाजवाब. तर वाळवंटात आढळणारी वेलवेट्शियाची
पाने चांगलीच लांब असतात. दोन मीटरपर्यंत लांबी आणि सात-आठ सेंटिमीटरची रूंदी असणारे
पान एखाद्या पात्यासारखे असते. ॲमेझॉन लिलीचे पान अडीच पौंडाच्या बाळाला लिलया तोलून
धरते. या लिलीच्या पानाचा व्यास एक ते दीड सेंटिमीटर सहज असतो. मात्र सर्वात मोठ्या
पानाचा मान आहे, तो रॅफियाचा. याचे पान दोन मीटर लांब आणि तीन मीटर रूंदीचे असते.
उत्क्रांतीवादाच्या
सिद्धांताला पानेही अपवाद नाहीत. अन्न तयार करणे हे पानाचे मुख्य कार्य असले तरी इतरही
कार्ये पान करतेच. हे काम माझे नाही, ते काम माझे नाही, असे म्हणत बसत नाहीत, ही पाने.
पडेल ते काम करणाऱ्या पानांकडून मानवाने शिकण्यासारखे बरेच काही आहे. अनेक वेलवर्गीय
वनस्पतींना तणावे असतात. पानाशेजारून बारीक, लांब, तारेसारखे हा तणावा वेलीला किंवा
झाडाला आधार देण्याचे काम करतात. वाटाणा, बचनाग, मोरवेल यामध्ये असे तणावे येतात. ही
उत्क्रांत पानेच असतात. दुसरा उत्क्रांत पानाचा प्रकार म्हणजे शूल. जनावरांपासून संरक्षण
करणे तसेच बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी हा पानाचा प्रकार तयार झाला आहे. बाभूळ, निवडुंग,
घायपातीमध्ये असणारे काटे म्हणजेच शूल. काही पातळ पडद्यासारखी पाने जमिनीखालच्या भागावर
असतात. ही कोंबांचे रक्षण करतात. त्यांना शल्कपर्णे म्हणतात. हळदीचे खोड, केळीचा कंद,
कांदा, लसूण या सर्वामध्ये अशी शल्कपर्णे असतात. कांदा, लसूण यावरील शल्कपर्णे अन्न
साठवून ठेवण्याचेही कार्य करतात. पर्णाभवृंत्त या उत्क्रांत पानाचा देठ चपटा, पातळ,
पसरट, हिरवा आणि पर्णदलासारखाच असतो. ऑस्ट्रेलियन बाभळीमध्ये असे पर्णाभवृंत्त असतात.
घटपर्णी या कीटकभक्षी वनस्पतींमध्ये कीटकांना पकडण्यासाठी पान सापळ्याचे रूप धारण करते.
ड्रॉसेरा, घटपर्णी या वनस्पतीमध्ये पानाचे रूपांतर सापळ्यात झालेले आढळून येते.
मानवाला खाण्यासाठी फळे आणि फुले मिळावीत, म्हणून कार्य करत असणारी पाने मोठ्या
प्रमाणात खाण्यासाठी वापरली जातात. पालक, चूका, शेपू, मेथी, चाकवत, माठ, तांदळी, चिघळ
किंवा चिरघोळ, पोकळा, चंदनबटवा इत्यादी पालेभाज्या लागवड करून विकल्या जातात. त्याखेरीज
फळांसाठी लावलेल्या शेवग्याच्या झाडांची पाने आवर्जून मृग नक्षत्राच्या आगमनावेळी खाल्ली
जातात. हादग्याच्या फुलांप्रमाणेच पानांची भाजी करण्यात येते. कोकणात अनेक रानवनस्पतींच्या
पानांची भाजी बनवतात. फांजी, भारंगी, कुर्डू, दार, अळू, टाकळा, बांबुचे कोंब,
तरोडा या रानभाज्यांची पाने भाज्यांसाठी वापरली जातात. काही विशिष्ट काळात विशेषत:
चातुर्मासात लाल भोपळ्याची पाने इतर वनस्पतींच्या पानांसोबत मिसळून त्यांची भाजी करून
खाल्ली जाते. याखेरीज करडई, अंबाडी, कांदेपात, मोहरी, राजगिरा या त्यांच्या बियांसाठी,
फळांसाठी, किंवा खोडासाठी लावल्या जातात. मात्र त्यांच्या पानांचा भाज्यासाठी उपयोग
केला जातो. तमालपत्र, कडीपत्ता यासारख्या पानांचा वापरही फोडण्यासाठी केला जातो. भाज्यांमध्ये
क्षार आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पानांमध्ये खनिजे आणि एंझाईम्सही मोठ्या
प्रमाणात असतात. पानाच्या चोथ्यामुळे आतड्यातील अपचनाचा तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होत
नाही. काही झाडांची पाने औषधांसाठी वापरली जातात. यामध्ये निरगुडीचा पाला पायाची सूज
कमी करण्यासाठी गरम सूती कपड्यांमध्ये गुंडाळून सूजलेल्या भागावर बांधला जातो. हाडजोडीच्या
पानांचा रस काढून हाड मोडलेल्या रूग्णांना पिण्यासाठी देण्यात येतो. दगडी पाल्याच्या
पानांचा रस काढून जखम झालेल्या भागावर लावण्यात येतो.
पाने
जनावरांचे आवडते खाद्य. अनेक वनस्पतींची पाने जनावरे खात असल्याने त्या झाडांची संख्या
वाढत नाही. आंबा, कडुलिंबाची पाने जनावरे मोठ्या आवडीने खातात. पेरलेल्या धान्याची
पानेही जनावरे मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे जनावरांपासून अनेक झाडांचे, पिकांचे
रक्षण करणे आवश्यक ठरते. काही वनस्पतींच्या पानाकडे जनावरे ढुंकूनही पहात नाहीत. कडू
नसूनही रामफळ, सिताफळीची पाने जनावरे कधीच खात नाहीत. त्याउलट टाकळ्याची पाने कडू असूनही
शेळ्या मोठ्या आवडीने ती खातात. अनेक वनस्पतींबाबत, त्यांची पाने जनावरांनी खाल्ल्यास
त्या वनस्पतींना येणारी फळे कडू बनत असल्याचे मानले जाते. विदेशी वनस्पतींमधील आता
कुठे गुलमोहोराची पाने जनावरे खाऊ लागली आहेत. इतर वनस्पतींची पाने उदाहरणार्थ ग्लिरिसिडीया,
रानमोडी, कॉस्मॉस, अफ्रिकन सनफ्लॉवर, अफ्रिकन ट्युलिप, काजू अशा अनेक वनस्पतींची पानांना
जनावरे तोंडही लावत नाहीत. त्यामुळे या वनस्पती विना अडथळा वाढतात. त्यांची संख्याही
मोठ्या प्रमाणात वाढते. चिंच जांभूळ, हादगा, शेवगा, बाभूळ, बोरीच्या पानांवर शेळ्या
आणि मेंढ्या तुटून पडतात. हरीण, ससा, गेंडा, हत्ती आणि समग्र जंगली शाकाहारी प्राण्यांचे
खाद्य वनस्पतींची पानेच आहेत. काटे असूनही शेळ्या-मेढ्या मोठ्या कुशलतेने बोरी-बाभळीची
पाने खातात. १९७२ च्या दुष्काळात धामण या वनस्पतीच्या पानांनीच मराठवाड्यातील जनावरांना
जगवले होते. पाने खाऊन जगणाऱ्या प्राण्यांची संख्या मर्यादित राहावी, यासाठी जणू निसर्गाने
मांसाहारी प्राण्यांची निसर्गाने केली असावी.
पिंपळाच्या पानाला काही
दिवस पाण्यात बुडवून ठेवले, तर त्याच्या शिरांची जाळी अलगद मिळते. विशेष म्हणजे ही
जाळी सोनेरी लालसर रंगाची असते. अनेक भेटकार्डामध्ये या जाळीचा सुंदर वापर करण्यात
येतो. इतर झाडांच्या पानांची अशी जाळी पाहावयास मिळत नाही. याच पिंपळपानाला घेऊन,
‘इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’
असे अरूण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर सांगत आहेत. त्याचवेळी मंगेश पाडगावकर
दुसऱ्या कवितेत, ‘आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान’, असल्याचे सांगतात. अमोल हिवरे
‘पान आयुष्याचं’ लिहितात. मनिषा आवेकर यांना मात्र पानाचे महत्त्व पुरेपूर समजले असावे.
त्यांच्या मते ‘पानांनी बनवले असे, जीवन आपुले सुंदर’. पानांनी कवींना भरपूर कष्ट घ्यायला
लावले आहेत. त्यातही पिंपळपान यांचे आवडते. बालपणापासून या पिंपळपानाचे वेड लागलेले
असते. लहानपणी वह्या आणि पुस्तकांमध्ये मोरपिसाप्रमाणे, अशी पिंपळपाने ठेवून अनेकांनी
वर्षभर जतन केलेली आहेत. परमेश्वर म्हेत्रे हे भलतेच रोमँटिक मूडमध्ये, ‘पिंपळाचं पान
जसं उगवताना लाल गं, लाल गं, सखे तसे तुझं गाल गं’, अशी भन्नाट रचना रचतात. संकर्षण
कऱ्हाडेच्या कवितेतही पान आले आहे, मात्र ते जेवणाचे पान आहे. तर सोनाली अवसरे-करमनकर
यांना ‘तुझ्या आठवणीतील एक पान’ लिहावेसे वाटते. तर क्षितिजा कुलकर्णी या पिकल्या पानावर
कविता लिहितात. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलावंतीण’ चित्रपटात
शोभा गुर्टू यांच्या आवाजातील जगदिश खेबूडकरांनी शब्दबद्ध केलेली ‘पिकल्या पानाचा देठ
की हो हिरवा…’ ही लावणी आजही तितकीच हिरवी, ताजी वाटते. हा चित्रपट त्याकाळी बॉक्स
ऑफिसवर जोरात आपटला. मात्र ज्या लावणीने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला होता,
ती लावणी मात्र अजरामर झाली. आजही कोणी फाटलेले पान लिहित आहे, तर कोणाची
पाने जीर्ण झाली आहेत. कोणाला पानझड आठवते, तर कोणी याला पानगळ म्हणत जुन्या आठवणींना
उजाळा देत राहते. कोणी मागे पडलेली पाने आठवत बसते. कोणाचे पान पूर्ण कोरेच असते. तर
कोणी ‘आपट्याची सोनेरी पाने तोडू नका’, असे सांगणारी कविता कागदाच्या पानावर लिहितो.
कवी मंडळींनी पुस्तकाच्या आणि झाडांच्या पानांना समान महत्त्व दिले आहे. ‘मेंदीच्या
पानावर’ हे गीत जसे गाजले, तसेच शरणकुमार लिंबाळे यांचे सुरुवातीच्या काळातील याच नावाचे
सदरही खूप गाजले होते. नाही तरी पूर्वी भ्रुजपत्रावरच लिहिले जायचे.
भोजन करताना वाढले जाते
त्यालाही ‘पान’ म्हटले जाते. त्याला भोजनपात्र, ताट, पत्रावळ असे प्रतिशब्द आहेत. पूर्वी
केळीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात भोजनासाठी केला जात असे. आता त्यांच्याजागी
स्टीलची ताटे आली असली तरी वाढलेले असते ते पानच. सागाचे पान कितीही मोठे असले तरी
त्यावर मात्र पान वाढता येत नाही. त्याच्यावर असणारी लव हे मुख्य कारण असावे. त्यासोबत
एक कथा जोडली गेली आहे. हे सागाचे पान चुरगळले आणि त्याचा रस हाताला लागला तर हात कुंकवाने
माखावा तसा लाल होतो. पळसाच्या पानाला जोडून त्यापासून पत्रावळी तयार केली जाते. द्रोणही
त्यापासून बनवली जातात. त्यांना जोडण्यासाठी एरवी कडू असणाऱ्या कडुलिंबाच्या काड्या
म्हणजेच पानाचा देठ वापरला जातो. या पत्रावळ्यांना लग्नामध्ये मोठे महत्त्व होते. मात्र
त्यांनाही आता प्लास्टीक ताटांनी हटवले आहे. विडीसाठीही पानेच वापरली जातात. दोन वनस्पतींच्या
पानांचा उपयोग विडी बनवताना केला जातो. पानापासून बनलेल्या तंबाखूला, टेंभुच्या पानात
गुंडाळून विडी बनवली जाते.
पान आहेच सर्वांसाठी
महत्त्वाचे. जीवनात ही पाने, अन्न-हवा-पाणी या मूलभूत गरजांचे घटक उपलब्ध करून देण्यासाठी
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्यरत असतात. वनस्पतींची पाने जगण्यासाठी आवश्यक आहेत, तर आनंदी
आयुष्यासाठी पुस्तकांची आणि वहीची पाने महत्त्वाची असतात. या पानालाही अनेक प्रतिशब्द
आहेत. पुस्तकाचे-वहचे पान तक्ता, ताव, पृष्ठ, दर्शनी, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, बंद अशा नावांनी
ओळखले जाते. त्याच्या योग्यतेनुसार, उपयुक्ततेनुसार ती वापरली जातात. पुस्तकाची पाने
वाचण्याची ज्यांना सवय जडते, ते सदैव आनंदी असतात. म्हणजेच जीवनानंद देण्यासाठीही पानेच
महत्त्वाची ठरतात. आपल्या आयुष्याचे पान सुखात्म ठरावे, म्हणून वनस्पतीचे, पुस्तकाचे,
वहीचे, भोजनाचे पान महत्त्वाचे आहे! चला, ते काहीही असो, आता फराळाचे
पान वाट पाहातेय!
-०-


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा