रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

चैतन्याचा झरा… साळुंखे सर!

(शिक्षक दिन विशेष -४)
दैनंदिन जीवनात आपणास अनेक माणसं भेटतात. त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकतो. त्यातील काही माणसं आपल्यात सकारात्मक बदल घडवतात. आपले जीवन सुखी बनवण्यासाठी त्यांचा लाभलेला सहवास आणि त्यांनी दिलेली शिकवण कारणीभूत ठरते. अशी माणसं आपल्या आयुष्यात कायम आदराच्या स्थानी राहतात, गुरूस्थानी असतात. गुरूचे स्थान देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष वर्गात शिकवायलाच हवे, असे नाही. असे माझ्या जीवनात गुरुस्थानी आलेले व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. माणिकराव तथा एम.एम. साळुंखे! त्यांनी मला वर्गात कधीही शिकवले नाही. मात्र त्यांनी मला सुखाने, आनंदाने जगण्यासाठी मंत्र दिला. माझ्या लेखनाच्या प्रांतातील पुनरागमनासाठी त्यांच्या शिकवणीने मोठी भूमिका पार पाडली, अशी माझी नम्र धारणा आहे. म्हणूनच  शिक्षक दिनानिमित्त त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी…

__________________________________________________

दैनंदिन जीवनात आपणास अनेक माणसं भेटतात. त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकतो. त्यातील काही माणसे अशी असतात की, जी आपल्यात सकारात्मक बदल घडवतात. आपल्यातील वाईट सवयी बदलायला कारण ठरतात. आपले जीवन सुखी बनवण्यासाठी त्यांचा लाभलेला सहवास आणि त्या सहवासात त्यांनी दिलेली शिकवण कारणीभूत ठरते. अशी माणसं आपल्या आयुष्यात कायम आदराच्या स्थानी राहतात. ती खऱ्या अर्थाने गुरूच असतात. गुरूचे स्थान देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष वर्गात आपल्याला शिकवायलाच हवे, असे नाही. वर्गाबाहेरच्या शिक्षणामध्ये त्यांनी आपल्याला चांगला माणूस बनण्यासाठी, सुखी जीवन जगण्यासाठी जे धडे दिलेले असतात, ते त्यांना नकळत गुरूपद बहाल करते. असे माझ्या जीवनात आलेले व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. माणिकराव तथा एम.एम. साळुंखे! त्यांनी मला वर्गात कधीही शिकवले नाही. मात्र माझे जीवन सुखाचे, आनंदाचे बनवण्यासाठी त्यांचा लाभलेला सहवास आणि त्या काळात मी गिरवलेले धडे माझ्या जीवनात फार महत्त्वाचे आहेत. माझ्या लेखनाच्या प्रांतातील पुनरागमनासाठी त्यांच्या शिकवणीने मोठी भूमिका पार पाडली. म्हणूनच आजच्या शिक्षक दिनाचा लेख त्यांच्याविषयी.

काही माणसं अशी असतात की, ज्यांची जवळ गेल्याशिवाय ओळख होत नाही. दूरवरून आपण पाहत असताना, ती एक दिसतात आणि जवळ गेल्यावर वेगळीच असतात. लांबून कडक रागीट दिसणारा माणूस, जवळ गेल्यावर संवेदनशील मनाचा जाणवतो. डॉ. माणिकराव साळुंखे सरांच्या बाबतीत माझं तसंच झालं. आम्ही एम. एस्सी. आणि पीएच.डी.चे विद्यार्थी असताना सर रसायनशास्त्र विभागात शिकवायचे. समकालीन रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी त्यांचे नाव कायम असायचे. त्यांचे दर्शन जाता येता व्हायचे. पण बोलणे फारसे नसे. किसन कोडम हा जीवरसायनशास्त्राचा विद्यार्थी. त्याच्याकडे मी जवळजवळ दररोज जात असे. मात्र खालून मागच्या जिन्याने त्याच्या प्रयोगशाळेत आम्ही जायचो. इतर शिक्षकांचे, त्यातही साळुंखे सरांचे दर्शन शक्यतो टाळायचो, इतकी त्यांची आदरयुक्त भीती मनात होती.

अखेर ते विज्ञान संस्था, मुंबई येथे गेले. पुढे या संस्थेचे संचालक बनले. आमचे शिक्षण संपले. नोकरीसाठी वणवण सुरु झाली. बारामतीला एक वर्ष शिक्षक म्हणून काम करून पुन्हा विद्यापीठात रुजू झालो. विद्यापीठात शिक्षक म्हणून चार वर्षे काम केल्यानंतरही कायम होत नाही, हे पाहून प्रशासनात आलो. उपकुलसचिव म्हणून सोलापूर येथे काम करत असताना रसायनशास्त्र विषयाच्या एका शिक्षकांशी माझे वितुष्ट आले. नियम डावलून त्यांच्या मनाप्रमाणे मला काम करणे शक्य नव्हते. निव्वळ सोलापूर जिल्ह्यासाठी विद्यापीठ स्थापन करायच्या हालचाली सुरु झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी ते फारच मनावर घेतले होते. त्यातच नियमाप्रमाणे काम करण्याचे मलाही फळ मिळत होते. माझ्याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या जात होत्या. निनावी तक्रारींचा पाऊस पडत होता. त्यात ते प्राध्यापक महोदयही होते. ते साळुंखे सरांचे जवळचे मित्र असल्याची चर्चा होती. सोलापूर येथे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी नियुक्त समिती माणिकराव साळुंखे सरांची होती. मुख्यमंत्री महोदयांना प्रस्ताव दिल्यावर काही दिवसांत, डिसेंबर २००३ मध्ये माझी बदली कोल्हापूर येथे झाली.

त्यावेळी विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक एम. व्ही. भोसले सर आणि आस्थापना विभागाचे उपकुलसचिव कामते साहेबांना माझ्याबद्दल आस्था होती. निनावी तक्रारींमुळे मुख्यालयातील वातावरण माझ्यासाठी विचित्र होते. दरम्यान तत्कालीन कुलगुरूंनी राजीनामा दिला. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची प्रक्रिया नव्याने सुरु झाली. नावे ऐकायला मिळत होती. प्रक्रिया पुढे सरकत होती. व्ही.एम. चव्हाण हेच कुलगुरू राहावेत, असे मनापासून वाटत होते. आणि एक दिवस माणिकराव साळुंखे सरांचे नाव कुलगुरू म्हणून जाहीर झाले.

मनात म्हटले,आपले भोग सरले नाहीत.’ आपल्याबद्दल यांना त्यांच्या मित्राने आवर्जून सांगितले असणार. यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटच असणार! सर, ११ जून २००४ रोजी शिवाजी विद्यापीठात कुलगुरू म्हणून हजर झाले. त्यांच्यासमवेत पहिली भेट होण्यापूर्वीच १३ जूनला माझ्या वडिलांचे निधन झाले. मी चौदा दिवस रजेवर होतो. रजा संपवून मी रूजू झालो. त्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत केली. त्या बैठकीसाठी मी वेळेपूर्वी गेलो. व्यवस्थापन परिषद कक्षात जाऊन बसलो. त्यानंतर साळुंखे सर आले. खुर्चीमध्ये बसले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि विचारले, ‘केवळ उपकुलसचिवांची बैठक आहे ना? मग त्यांना कोणी बोलावले?’ त्यावेळी आस्थापना विभागाचे उपकुलसचिव रामचंद्र कामते साहेब होते. ते उत्तरले, ‘तेही उपकुलसचिव आहेत!’ त्यानंतर मी बैठकीमध्ये बसलो. सर्व विभागांचा आढावा घेऊन माझी पाळी आली. मी सांगायला सुरुवात केली तोच साळुंखे सर म्हणाले, ‘परीक्षा विभागाचे सांगून झाले आहे. तुम्ही बसा.’ नंतर थोड्याच वेळात बैठक संपली. अशी आमची सलामीची भेट!

 मी परीक्षा नियंत्रक भोसले सरांच्या कक्षात गेलो. मन मोकळे केले. म्हटले, ‘माझे दिवस काही संपले नाहीत. मागच्या पानावरून पुढे सुरू झाले… असं दिसतंय’ त्यानंतर दिवस सरत होते. माझे कुलगुरूंच्या कक्षाकडे जाणे नव्हतेच. परीक्षा विभागाचे कामकाज डॉ. एम.व्ही. भोसले सर आणि ए.सी. पवार पाहात. तेच सगळे सांगत. मी केवळ येणारे कागदोपत्री कामकाज पाहात होतो. त्या वेळी ऑन एक्झाम विभागाचा कार्यभार माझ्याकडे होता.

दरम्यान अभ्यासक्रम बदलला. अभियांत्रिकीचाही अभ्यासक्रम बदलण्यात आला. विद्या परिषद बैठकीमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ हवा होता. त्यासाठी आंदोलन उभारण्यात आले होते. आंदोलन तीव्र झाले आणि विद्या परिषद बैठकीमध्ये ‘कॅरी ऑन’चा निर्णय झाला. त्यावेळी अभ्यास मंडळ विभागाचे उपकुलसचिव बी.एम. हिर्डेकर होते. या विषयावरील टिपणीवर सभा विभाग, परीक्षा विभागातील दोन्ही उपकुलसचिव आणि अभ्यास मंडळ विभागाचे उपकुलसचिव यांनी सह्या करून टिपणी यायला हवी, असा सरांनी आग्रह धरला. टिपणी तयार झाली. इतरांच्या सह्या झाल्या. मी सही करायला नकार दिला. कुलगुरू साळुंखे सरांना कोणीतरी ‘माझा विद्यार्थी हिताला नेहमीच विरोध असतो’ असा संदेश पोहोचवला. बरेच दिवस ही टिपणी येत नाही म्हटल्यावर सरांनी ते फोल्डर घेऊन मला बोलावले. मी गेलो. सरांनी विचारले, ‘काय अडचण आहे तुमची? सही का करत नाही?’ मी स्पष्टच सांगितले, ‘ज्या प्रकारे टिपणी मांडली आहे, त्याप्रकारे दंडकाचा भंग होतो. दंडकाचा भंग होणाऱ्या टिपणीवर मी स्वाक्षरी करू शकत नाही.’ त्यांनी तो दंडक दाखवण्यास सांगितले. दंडक वाचून झाल्यावर सरांनी सांगितले, ‘तुम्हाला जे वाटते ते लिहा. पण टिपणी सादर करा’. मी त्यावर स्पष्ट शेरा लिहिला, ‘दंडक ७६ (c) नुसार लगतच्या वर्षामध्ये विद्यार्थी सर्व विषयात अनुत्तीर्ण असला तरी त्याला प्रवेश देता येऊ शकतो. मात्र प्रथम वर्षाचा अनुत्तीर्ण विद्यार्थी तृतीय वर्षात किंवा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी चतुर्थ वर्षात प्रथम किंवा द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण असताना जाऊ शकत नाही’. आणि टिपणीवर सरांनी माझ्या शेऱ्याला अधोरेखित करून तोच मान्य केला. हे आमच्या संबंधांत सुधार होण्याच्या दृष्टीने पडलेले पहिले पाऊल होते.

माझ्या शेऱ्यानुसार परिपत्रक निघाले. मात्र काही विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास अडथळा आला होता. त्यातील काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परिपत्रकास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. साळुंखे सरांनी, भोसले सरांना या याचिकेचे उत्तर मी तयार करावे, असे सांगितले. मी या गोष्टीला तयार नव्हतो. अखेर मी उत्तर तयार करायचे आणि सहाय्यक कुलसचिव वाय बी कांबळे यांच्या नावे सादर करायचे यावर परीक्षा नियंत्रक भोसले सरांनी तडजोड घडवून आणली. त्यानुसार तयार केलेल्या उत्तराच्या आधारे उच्च न्यायालयाने चारही याचिका फेटाळल्या. साळुंखे सरांनी परीक्षा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून अभिनंदन केले. त्या वेळी चर्चेत बोलताना मी ‘उच्च न्यायालयाने दावे फेटाळले असले, तरी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करावे,’ असे सुचविले. मात्र सरांना ते पटले नाही. सरांनी ‘तुमचे काहीतरीच असते. ते विद्यार्थी आहेत. त्यातच आता न्यायालयाला सुट्ट्या आहेत. कॅव्हेटची काही गरज नाही’, असे सांगितले. पुढे या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळी न्यायालयांना दिवाळी सुट्टी असूनही विद्यार्थ्यांनी ‘व्हेकेशन बेंच’कडून उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आदेश मिळवला. विद्यापीठाच्या परिपत्रकाला डावलून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्या लागणार होत्या. सरांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून स्टे ऑर्डर रद्द करण्यासाठी काय करावे लागेल, असे विचारले. दुपारपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील वकील निश्चित झाले. त्यांच्याशी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या वकीलांनी निरोप दिला, ‘कोणी जबाबदार अधिकाऱ्यांने सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊन साक्ष दिल्यास प्रयत्न करता येईल. मात्र अधिकारी अभ्यासू हवा. इंग्रजी किंवा हिंदीत त्याने उत्तरे द्यावीत.’ कुलगुरू साळुंखे सरांनी मला जायचा आदेश दिला.

मोठ्या नाईलाजाने मी गेलो. त्यावेळी रेल्वेने जावे लागले. विद्यापीठाने दिलेले वरिष्ठ वकील पुढे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. त्यांचे त्यावेळचे सहाय्यक अनिरूद्ध मायी यांनी सर्व बाबी समजून घेतल्या. मला प्रक्रिया समजावून सांगितली. कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, काय उत्तरे द्यायची, हेही सांगितले. आम्ही न्यायालयात गेलो. जाताना सूचनेप्रमाणे सर्वांनी भ्रमणध्वनी बंद केले होते. त्यावेळी सुट्टीतील न्यायालयीन कामकाज पुढे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झालेले एम. के सबरवाल पाहात होते. आम्ही त्यांच्या दालनात गेलो. न्यायमूर्तींच्या समोर गेल्यावर मनावर तणाव आला होता. कामकाजाला लगेच सुरुवात झाली. प्रश्नोत्तरे सुरू झाली. न्यायमूर्तींनी पिटीशनमधील मुद्दे खोटे कसे आहेत, ते विचारले. मी विद्यापीठाची बाजू मांडली. विद्यापीठाचा निर्णय कसा बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी कशी चुकीची आहे, हे सांगत असताना त्यांनी थांबवले. ते म्हणाले, ‘हे पिटीशन आणि तुमच्या उत्तरात समजले. मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे, ‘विद्यार्थी म्हणतात त्याप्रमाणे महाविद्यालयांनी खरंच विद्यार्थ्यांना अपात्र असूनही प्रवेश दिला असेल; तर, अशा महाविद्यालयावर विद्यापीठ कोणती कारवाई करणार?’ या प्रश्नावर मी उत्तरलो, ‘विद्यापीठ अशा महाविद्यालयावर कारवाई करेल!’ त्यांनी पुन्हा विचारले, ‘तेच, कोणती कारवाई करणार?’ मी म्हणालो, ‘त्यांचे संलग्नीकरण काढून घेण्याची कारवाई करण्यात येईल.’ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे कोणतेच पुरावे जोडले नव्हते. त्यांचे वकिलही पुरावे सादर करू शकले नाहीत. मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश रद्द करून, चारही दावे फेटाळले. आदेश ऐकला आणि आनंद झाला. त्याचवेळी मी काय साक्ष दिली, याची जाणीव झाली आणि दरदरून घाम फुटला. कुलगुरूंशी चर्चा न करता मी संलग्नीकरण काढून घेण्याची साक्ष दिली होती.

मी ॲडव्होकेट मायींना सांगून पटकन बाहेर आलो. मोबाईल ऑन केला. साळुंखे सरांना मी केलेला तो पहिला फोन होता. त्यांना प्रथम न्यायालयाचा निर्णय सांगितला. त्यांनी अभिनंदन केले. मी पुढे बोललो, ‘सर मी तुमच्याशी चर्चा न करता न्यायालयामध्ये खूप धाडसी साक्ष दिली आहे, ‘जर महाविद्यालयांनी चूकीचे प्रवेश दिले असतील, तर त्यांचे संलग्नीकरण काढून घेऊ’ अशी. सर म्हणाले, ‘अभिनंदन! तुम्ही अशी बिनधास्त साक्ष देणार याची खात्री होती, म्हणूनच तुम्हाला पाठवले होते. टेन्शन विसरा आणि दिल्ली फिरून, निवांत या’. मी मात्र सुट्टी असूनही दिल्ली न फिरता लगेच परतलो. त्यावेळी रेल्वेचा प्रवास करून शनिवारी आलो. सोमवारी विद्यापीठात आलो. सरांनी सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून चहापान आयोजित केले. खास अभिनंदन केले. मी दिलेली साक्ष सरांना मनापासून आवडली असावी. त्यानंतर आमच्यात सुसंवाद सुरू झाला. सरांकडे जाताना मनात येणारा ‘किंतु’ गायब झाला.

परीक्षा विभागात काम करताना आणखी एक महत्त्वाची घटना घडली. त्यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांची संरक्षण दलामध्ये निवड झाली. बी.एस्सी.च्या निकालाला वेळ लागणार होता. विद्यार्थी मुदतीत निकालपत्र सादर करू शकले नाहीत, तर संधीला मुकणार होते. सरांनी त्यावेळी या विद्यार्थ्यांच्या हातात ज्या अधिकाऱ्यांना निकालपत्र द्यावयाचे, त्यांच्या नावे सिलबंद लखोट्यात निकालपत्र द्यायला लावले आणि विद्यार्थ्यांची संधी जाणार नाही, याची दक्षता घ्यायला लावली. पुढे ती प्रचलित पद्धती बनली. संरक्षण दलामध्ये जाणारे अधिकारी तो निकाल सुखरूप पोहोचवतील, असा सरांचा विश्वास होता. आजवर या विद्यार्थ्यांनी कधीही विश्वासाला तडा दिला नाही. एकदा सर तीन-चार दिवसांसाठी बाहेरगावी होते. बी.एस्सी. परीक्षेचा निकाल तपासताना काही विद्यार्थ्यांना इतर विषयात खूपच चांगले गुण होते. मात्र एका विषयामध्ये ते अनुत्तीर्ण होते. काहीतरी गडबड आहे, हे लक्षात आले. मूळ उत्तरपत्रिका मागवल्या. काळजीपूर्वक तपासले असता, निदर्शनास आले की, एका विद्यार्थ्याचे गुण घ्यावयाचे राहिले होते. त्यामुळे गुणांची अदलाबदल झाली होती. तोपर्यंत निकाल जाहीर झाला होता. जवळपास ४० विद्यार्थ्यांचा निकाल बदलत होता. कुलगुरूंच्या मान्यतेशिवाय सुधारित निकाल जाहीर करता येणार नव्हता. उशीर जितका जास्त होईल, तितके प्रकरण संवेदनशील बनणार होते. अखेर सरांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितले आणि तीन-चार दिवसाचा विलंब प्रकरणाची तीव्रता वाढवेल, हे ही सांगितले. सरांनी केवळ एवढेच विचारले, ‘काळजीपूर्वक सर्व तपासले का? तुमची खात्री पटली असेल, तर सुधारित निकाल जाहीर करा. मी आल्यानंतर मान्यता देतो. तसा इ-मेल पाठवत आहे.’ आम्ही निकाल जाहीर केला आणि कोणाकडूनही याबाबत तक्रार आली नाही.

सरांची कन्या एम.एस्सी.ची विद्यार्थिनी होती. सरांनी तत्काळ एक आदेश काढला. महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील तरतुदीनुसार त्यांनी या परीक्षेसाठीचे सर्वाधिकार अधिष्ठाता विज्ञान विद्याशाखा यांना दिले. आदेशात म्हटले होते की, ‘एम.एस्सी. रसायनशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेसंदर्भातील कोणतेही कामकाज, टिपण्या कुलगुरूंपर्यंत पाठवण्यात येऊ नयेत. अधिष्ठाता यांना या परीक्षेसाठी कुलगुरू म्हणून मला असणारे सर्व अधिकार देण्यात येत आहेत.’ अशा प्रकारची पारदर्शकता आणि साधनशुचिता ते कायम पाळत राहिले. सरांच्या अशा प्रकारच्या कृतीमुळे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणतीही गोष्ट करताना हजारवेळा विचार करावा लागत असे.

परीक्षा विभागात असताना एका विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्रथम वर्ष बी.एस्सी.च्या भौतिकशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका काढावी लागली. विद्यार्थ्याची तक्रार होती की, आपणास जाणीवपूर्वक कमी गुण देण्यात आले आहेत. माझाही विषय भौतिकशास्त्र असल्याने ती उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासली. विद्यार्थ्याच्या दाव्यात काहीही तथ्य नव्हते. उलट त्याला जास्तच गुण देण्यात आले होते. त्यातील एक प्रश्न असा होता की ‘X-rays are……..’ या प्रश्नाला पर्याय देण्यात आले होते ते a) electric, b) magnetic, c) electrostatic d) electromagnetic असे होते. या प्रश्नाचे उत्तर d होते. त्या विद्यार्थ्यांने ‘c’ असे लिहिले होते. तरीही त्या विद्यार्थ्याला गुण देण्यात आले होते. परीक्षकाबद्दल माझ्या मनात भयंकर राग आला. या परीक्षकाला परीक्षा प्रमाद समितीसमोर बोलावून शिक्षा करायला हवी, असे मनात आले. मी ती उत्तरपत्रिका सरांना दाखवली. मी म्हटलो, ‘सर असे जर शिक्षक उत्तरपत्रिका तपासत असतील, तर विद्यार्थी कशाला अभ्यास करतील’. यावर सरांनी मला विचारले, ‘तुम्ही काय म्हणून काम करता? एका प्रशासकीय अधिकाऱ्याने कोणा परीक्षकाच्या चुका सांगायच्या नाहीत. तो अधिकार कुलगुरू म्हणून मलाही नाही. या विषयातील एका शिक्षकाला बोलावून त्याचा अभिप्राय घ्या आणि मग हे प्रकरण प्रमाद समितीकडे पाठवा’. प्रशासकीय कार्यामध्ये दक्षता किती महत्त्वाची असते, हे सहज समजावून सांगणारे हे उदाहरण!

आणखी एका प्रकरणामध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या एका विषयाच्या उत्तरपत्रिका निष्काळजीपणे तपासल्याचा आरोप झाला होता. ४० पैकी ३८ विद्यार्थी नापास झाले होते. या उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी शिक्षकाने चुकीचे पेपर तपासले असावेत, असेच वाटत होते. मात्र पूर्वीच्या प्रकरणातून धडा मिळाल्याने या विषयाच्या एका प्रख्यात शिक्षकाला उत्तरपत्रिका देऊन अभिप्राय मागवला. त्या शिक्षकांनी ‘उत्तरपत्रिका ज्या शिक्षकाने तपासल्या त्याने अगदी उत्तम कार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाच्या नोटस वापरल्या आहेत. हा पेपर हाय टेंशन इलेक्ट्रिसिटीचा पेपर आहे. या विद्यार्थ्यांनी ज्या सर्किट डायग्रॅम काढल्या आहेत, त्यामध्ये अर्थिंग दाखवलेले नाही. असे जर इंजिनियर तयार झाले, तर किती लोकांचे जीव जातील. आहे तो निकाल कायम ठेवावा,’ असे मत दिले. सरांनी पहिल्या प्रकरणात केलेल्या मार्गदर्शनामुळे या प्रकरणातही एका चांगल्या शिक्षकाने केलेले योग्य मूल्यमापन कायम राहिले.

परीक्षा विभागात लागणारे मनुष्यबळ हा नेहमीच चर्चेचा विषय! ‘शिंदे कायम रोजंदारी कर्मचाऱ्यांची मागणी करत असतो. प्रत्यक्षात एवढ्या मनुष्यबळाची आवश्यकता नसते’, असे सरांना कोणीतरी सांगितल्याची चर्चा कानावर आली. मी पाठवलेल्या टिपणीवर सरांनी परीक्षा विभागातील मनुष्य बळासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करायला सांगितला. मी लगेच दीड पानांची टिपणी तयार करून सादर केली. अर्थात, सरांनी ती टिपणी वाचून स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ‘यात केवळ मनुष्यबळ मागितले आहे. कामाची व्याप्ती आलेली नाही’, असे म्हणाले. त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे, ते त्यांच्याकडून समजावून घेऊन कामाला लागलो. प्रत्येक टेबलला काम काय चालते, त्या विभागात त्या स्वरूपाचे काम किती आहे, याच्या नोंदी प्रत्यक्ष काम करून घेतल्या. कोडींग, स्लीप फाडणे, गुणपडताळणी अशी विविध कामे प्रत्यक्ष केली. आठ दिवसानंतर सात पानांची टिपणी सादर केली. सरांनी ती जशीच्या तशी मान्य केली. सरांनी त्यानंतर मला सांगितले की ‘आज तुम्ही प्रशासनात काम करता, तरीही तुम्ही संशोधन केले आहे. तुमची टिपणी ही संपूर्ण माहिती आणि तर्काधारित हवी.’ शैक्षणिक प्रशासन आणि सामान्य प्रशासनातील फरक आणि यामध्ये शिक्षणाचा कसा उपयोग होतो, हे या धड्यातून मला शिकता आले.    

महाराष्ट्रातील एका नामवंत विद्यापीठामध्ये १९९९ मध्ये परीक्षा कामकाजात मोठा घोटाळा झाला होता. त्याची चौकशी आणि परीक्षा कामकाजात सुधारणा सुचविण्यासाठी तत्कालीन कुलपती मा. पी.सी. अलेक्झांडर यांनी पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्रा. अरूण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्रा. डी.एन. धनागरेही या समितीचे सदस्य होते. या समितीने पुनर्मूल्यांकनाची पद्धत बंद करणे, केंद्रीय मूल्यांकन पद्धती स्वीकारणे, परिमूल्यांकन पद्धती लागू करणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची मूल्यांकनानंतर छायाप्रत देणे, मार्क सेटलिंग समिती रद्द करून समान दंडकाच्या माध्यमातून गुण देणे, असे अनेक उपाय सूचवले होते. या सुधारणा लागू करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक होते. यामुळे सर्वच विद्यापीठांनी पूनर्मूल्यांकन बंद केले. पुढे काही विद्यापीठांनी पुन्हा पुनर्मूल्यांकन सुरू केले; मात्र अनेक विद्यापीठांनी ही पद्धती बंदच ठेवली होती. २००५-०६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने छायाप्रतीमध्ये मूल्यांकन चुकीचे झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे आणि काही अटींच्या आधारे ही पद्धत सुरू करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांची पुनर्मूल्यांकनाची मागणी रास्त आहे का? याची पडताळणी करूनच ते व्हावे, असे निकालात सांगण्यात आले होते. हा निर्णय शिवाजी विद्यापीठास लागू होत नसला तरी, आपले विद्यार्थी न्यायालयात गेले तर हाच निर्णय येणार, हे ओळखून त्या निर्णयाच्या आधारे पुनर्मूल्यांकन पद्धती सुरू करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत सर कायम आग्रही असत. दंडक १०६ बदलताना सरांनी स्वत: तो मसुदा अनेकवेळा अभ्यासून परीक्षेचा दर्जा कायम राहील आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली.

पुनर्मूल्यांकन सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे गुण बदलतात, हे लक्षात आल्यानंतर सरांनी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी किती अर्ज येतात आणि त्यांतील किती विद्यार्थ्यांच्या गुणात फरक पडतो, याचा अभ्यास करावयास सांगितले. सरांना नेमके काय हवे, हे तोपर्यंत माझ्या लक्षात यायला सुरुवात झाली होती. मी बारकाईने अभ्यास केला. यामागची कारणे शोधली आणि गुणांची बेरीज करताना, आतील गुण प्रथम पृष्ठावर घेताना बहुतांश चुका झाल्याचे निदर्शनास आणले. यानंतर मॉडरेशन झालेल्या उत्तरपत्रिकांची पडताळणी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायला लावली. आडव्या गुणतालिकेऐवजी उभी गुणतालिका छापलेला उत्तरपत्रिकेची छपाई सुरु केली. परिणामी २००४-०५ मध्ये गुणबदलाचे दहा टक्केच्या आसपास असणारे प्रमाण हे चार टक्केच्या खाली आले. यानंतर प्रश्नपत्रिका नियोजक, परीक्षक आणि परीनिरीक्षकांसाठी कार्यशाळा घ्यायला लावल्या. यातून हे प्रमाण तीन टक्केच्या खाली आले. परीक्षा कामकाजात गोपनीयता असली तरी, ती आवश्यक पारदर्शकता आणि भेदभावविरहीत असायला हवी, असा त्यांचा कायम आग्रह असे. या संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे एक शोधनिबंध बनवण्यास सांगितले. तो मी आणि तत्कालिन परीक्षा नियंत्रक एन.व्ही. ठक्कर यांनी बेगलेार येथील कार्यशाळेत सादर केला. नॅकनेही तो ‘बेस्ट प्रॅक्टिस’ म्हणून प्रसिद्ध केला.

त्यांच्या काळातच लीड कॉलेजची योजना सुरू केली. यामुळे एका तालुक्यातील, एका भागातील महाविद्यालयात सुसंवाद प्रस्थापित झाला. या योजनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रमांचे आयोजन सुरू करण्यात आले. यामुळे परिपूर्ण नागरिक घडवण्यासाठी पूरक कार्यक्रम सुरू झाले. या योजनेत पुढे कालानुरूप बदल झाले. मात्र ही योजना आजही सुरू आहे. त्यांच्या अनेक संकल्पना काळाच्या पुढच्या असत. लोक असे बदल सहज स्विकारण्यास तयार नसत. मात्र पूर्ण विचारांती घेतलेल्या निर्णयाची ते अंमलबजावणी करत. आधिकार मंडळांना आपले म्हणणे पटवून देत असत. त्यांच्या कार्यकाळातील आठवणी आजही अनेक सदस्य काढतात. सभागृहातील शीस्त पाळण्याबाबत ते कायम आग्रही असत. कोणत्याही सदस्याने आपसात बोललेले त्यांना आवडत नसे. एकदा त्यांचे शिक्षक राहिलेल्या सदस्याचा भ्रमणध्वनी विद्या परिषद बैठकीमध्ये वाजला, तर सरांनी त्यांनाही सुनावले होते.     

त्यांना पहाटे पाच वाजता फिरायला जायची सवय होती. ते सकाळी फिरून येताना जे काही उणे असेल ते पाहून येत. त्यानंतर कार्यालयीन वेळेत ते संबधित आधिकाऱ्याला ती पूर्तता करावयास सांगत. सांगितलेले काम झाले का नाही, हे दुसऱ्या दिवशी त्यांच्या निदर्शनास येत असे. ते पुन्हा पुन्हा तेच काम सांगत नसत. त्याऐवजी सांगूनही न झालेल्या कामाबद्दल या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दणका मिळत असे. त्यामुळे सरांनी सांगितलेले काम रेंगाळत ठेवले, तर सर्वांसमोर चर्चा होणार, या भितीने सर्व अधिकारी ते काम कसे पूर्ण होईल, हे पाहात.

सन २००५ मध्ये हिर्डेकर सरांनी पीएच.डीच्या कामाकरिता रजा घेतली, तेव्हा माझी परीक्षा विभागातून संलग्नता विभागात त्यांनी बदली केली. त्याचवेळी सहाय्यक कुलसचिव म्हणून संजय कुबल यांनाही संलग्नता विभागात देण्यात आले. मुळात पूर्ण विद्यापीठामध्ये उपकुलसचिव पदावर काम करणारे अधिकारी सहा होते. कॅप्टन सोनजेही लिनवर होते. हिर्डेकर सरांच्या रजेमुळे ती संख्या चार झाली. त्यामुळे एकाचवेळी संलग्नता, अभ्यास मंडळ, नॅक, सुरक्षा, पदव्युत्तर प्रवेश, सेमिनार आणि पीजी बीयुटीआर या सर्व विभागांचा कार्यभार जवळपास वर्षभर माझ्याकडे सोपविण्यात आला. त्याचवेळी बहि:स्थ विभागाचे दूर शिक्षणमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या सर्व विभागांचे कार्य पार पाडताना कोणत्याही क्षणी अडचण आली, तर सरांचे मार्गदर्शन मिळत असे. त्यामुळेच कोणतीही जबाबदारी पार पाडताना दडपण येत नसायचे. ज्या विद्यापीठाला स्वयं अध्ययन साहित्य म्हणजे काय हे माहीत नव्हते, त्या विद्यापीठाचे ‘सीम’ पुढे दूर शिक्षणाचे कार्य करणाऱ्या विद्यापीठाने तसेच इतर विद्यापीठानी वापरले. त्यासाठी कार्यशाळा घेणे, त्यासाठी मार्गदर्शक निश्चित करणे यासाठी सर वेळोवेळी मार्गदर्शन करत असत. या कार्यात तत्कालिन दूर शिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. सीमा येवले यांनी अपार कष्ट घेतले. सरांनी त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी सर्व सहकार्य देण्याचे सांगितले होते. सरांचे स्वत:चे या कार्याकडे सूक्ष लक्ष असायचे.

बीबीए, बीसीए आणि बीसीएस या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा याच कालावधीत वाढला. महाविद्यालयात या अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांची लूट होते, अशी चर्चा झाली आणि विद्या परिषदेने हे प्रवेश केंद्रीय पद्धतीने विद्यापीठातून द्यावेत, असा निर्णय घेतला. महाविद्यालयातील प्रवेश असल्याने हे काम संलग्नता विभागाने पार पाडावे, असा आदेश आला. अशा प्रवेशाचा कोणताच अनुभव नसतानाही केवळ सर पाठीशी आहेत, या विश्वासावर हे काम मी स्विकारले आणि विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. या कामास सुरुवात करण्यापूर्वी सरांनी एकच सांगितले होते. ‘चूक झाली तर मान्य. दुरूस्त करता येईल; मात्र, गैरव्यवहार आणि गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.’ ज्या कालखंडात हे प्रवेशाचे कामकाज केले त्या काळात एकही गैरव्यवहार वा प्रकाराची तक्रार आली नाही. अनेक मान्यवरांनी प्रवेश द्यायला सांगण्यासाठी फोन केले. मात्र एकाही विद्यार्थ्याला असा प्रवेश द्यायला सरांनी आम्हाला सांगितले नाही. त्या मान्यवरांना सर एवढेच सांगायचे, ‘सारं काही नियमाप्रमाणे होईल.’

एकदा एका मोठ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दोन अधिकारी भ्रष्टाचार करतात असे पत्र दिले. तर सरांनी त्या पदाधिकाऱ्यास आपल्या कक्षात बसवून ठेवले. त्या दोन अधिकाऱ्यांना बोलावले. त्या अधिकाऱ्यांना पाहताच त्या पदाधिकाऱ्याचा चेहरा पडला. सरांनी सरळच विचारले, ‘तुम्ही पैसे खाता, अशी यांची तक्रार आहे.’ त्यावर अधिकारी म्हणाले, ‘आमची चौकशी करा. कोणाकडून पैसे खाल्ले, हे आम्हालाही कळू द्या’. यावर सरांनी त्या पदाधिकाऱ्याला उत्तर देण्यास सांगितले. निदान व्यक्ती, महाविद्यालयाचे नाव सांगायचा आग्रह धरला. ते पदाधिकारी तयार होत नव्हते. ‘हे पैसे खातात, अशी बाहेर चर्चा आहे, म्हणून हे पत्र देतोय,’ असे सांगितले. यावर मात्र सर भडकले, ‘कोणीतरी काहीतरी म्हणते, म्हणून तुम्ही नाव घालून बदनामी करणारी पत्रे कशी देताय? ते पैसे खातात, हे सिद्ध करा. नाहीतर हे पत्र मागे घेत असल्याचे आताच पत्र द्या.’ सरांची ही सवय चहाड्या करणाऱ्यांना, खोट्या तक्रारी करणाऱ्यांना अटकाव करणारी होती. यामुळे विद्यापीठात दुसऱ्याबद्दल चुकीची माहिती सांगायचे धाडस कोणी करत नव्हते. सभागृहात आणि सभागृहाबाहेर सर अधिकाऱ्यांच्या पाठीशी कायम असत. त्यामुळे अधिकाऱ्यांना नियमानुसार काम करताना विचार करावा लागत नसे. निर्णय योग्य आणि नियमाप्रमाणे घेतल्यास सर आपल्या पाठीशी असणार याची अधिकाऱ्यांना कायम खात्री असे.

अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषद बैठकांच्या अगोदर सर सर्व उपकुलसचिवांच्या समवेत इतर अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करत. या बैठकीत कोणत्या बाबींवर उलटसुलट चर्चा होऊ शकते, याचा ते अंदाज बांधत. त्यानुसार आवश्यक कागदपत्रांची मागणी करत. सदस्यही पूर्ण तयारीनिशी आलेले असत. एखाद्या विषयावर वाद होतो, असे लक्षात आल्यास ते चर्चेला वाव देत आणि नंतर एकच घाव घालून निर्णयास पूरक परिस्थिती निर्माण करत. सभागृहात विषयांतर करून चर्चा लांबवणे त्यांना आवडत नसे. विद्या परिषद बैठकीस जास्त वेळ लागतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी क्लासिफाईड अजेंडा ही संकल्पना राबवण्यास सांगितले. तो किस्साही मजेदार! सरांचा वाढदिवस एक एप्रिल. योगायोगाने त्या दिवशी विद्यापीठाला सुट्टी होती. त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गेलो. त्यांना शुभेच्छा दिल्या. सरांनी ‘धन्यवाद’ हा शब्द उच्चारला आणि ‘चार एप्रिलला विद्या परिषदेची बैठक आहे ना!’ असे विचारले. पुढचा प्रश्न आला, ‘किती तास चालेल बैठक?’ मी म्हटले, ‘आठेक तास तरी लागतील.’ सर म्हणाले, ‘तीन तासांत संपवायची.’ मी म्हटले, सर तीनशेपेक्षा जास्त विषय असताना हे कसे शक्य होणार? विषय वाचायचे म्हटले तरी तेवढा वेळ लागेल’. सरांनी सांगितले, ‘सर्वात जास्त विषय संलग्नता विभागचे आहेत. बीए, बीकॉम, बीएस्सी.. असे जेवढे कोर्स आहेत तेवढेच विषय करा. एक पॉवरपॉईंट सादरीकरण बनवा. त्यात महाविद्यालय, अभ्यासक्रम, संलग्नीकरणासाठी प्राप्त श्रेणी ही माहिती त्यात द्या. सर्व महाविद्यालयांच्या बीएच्या संलग्नीकरणाचा निर्णय एकाच विषयात झाला पाहिजे.’ तीन दिवस उरलेले! मात्र दुसऱ्या दिवसापासून ते माहिती घेत होते. तीन तारखेला त्यांनी ते सादरीकरण पाहिले आणि चार एप्रिलची बैठक खरंच तीन तासात संपली. यातून एकाच अभ्यासक्रमाला समान त्रुटी असताना दोन भिन्न महाविद्यालयांना एकाच कालावधीसाठी संलग्नीकरण मिळू लागले. कामकाजाचा वेळ वाचला. पारदर्शकता आली. कार्यालयीन कामकाज सुरळीत झाले. पुढे अनेक वर्ष हीच प्रथा कायम राहिली.  विद्या परिषदेची कार्यसूची तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागद वापरावा लागत असे. हा कागदाचा वापर कमी करण्यासाठी सरांनी सीडीच्या रूपात कार्यसूची पाठवण्यास सुरुवात केली.

सरांनी सर्व विभागातील कामकाजाची माहिती देणारी माहितीपुस्तीका बनवण्यास सांगितले. परीक्षा विभागाची पुस्तीका तयार केली आणि माझी बदली झाली. सलंग्नता विभागाचीही पुस्तिका मला तयार करावी लागली. यामुळे त्या विभागातील कामाची व्याप्ती आणि पद्धती सुरुवातीलाच मला माहीत झाली. संलग्नता विभागाचा कार्यभार माझ्याकडे असताना एका स्वायत्त संस्थेने ज्या विद्याशाखेसाठी त्यांना मान्यता देण्यात आली होती, त्या शाखेऐवजी दुसऱ्या विद्याशाखेचे अभ्यासक्रम सुरू केले होते. यावर सरांनी ‘बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट’ कठारे भूमिका घेत मान्यता देता येणार नसल्याचा निर्णय घेतला. विद्या परिषदेने तो निर्णय कायम ठेवला. या प्रकरणात ही संस्था उच्च न्यायालयात गेली. मा. उच्च न्यायालयाने विद्यापीठाची भूमीका मान्य करून ही याचिका फेटाळली. संस्था या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात गेली. तेथेही विद्यापीठाचा निर्णय कायम राहिला. या विषयावर विविध संघटनानी विद्यापीठाविरूद्ध आंदोलन सुरू केले. सरांनी आपली भूमिका कायम ठेवली. संस्थेच्या बाजूने काही नेत्यांनी शासन पातळीवर प्रयत्न सुरू केले. तरीही सरांनी भूमिका बदलली नाही. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने विषय ठेवला. सर्वांना वाटत होते की, विद्या परिषदेमध्ये पूर्वीचा निर्णय कायम होईल असे वाटत होते. झालेली चर्चा त्याप्रमाणेच झाली. काही सदस्यांनी मात्र संस्थेच्या बाजूने मोठी भाषणे केली. आजवर असणारी सरांची भूमिका पाहून पूर्वीचा निर्णय राहणार असे आम्हालाही वाटत होते. तासभर चर्चेनंतर सर बोलले, ‘विद्यापीठाची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने कायम केली आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष? आपणच मान्यता दिलेली संस्था आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना विद्यापीठाची पदवी मिळणार म्हणून प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याचा आपण विचार करायला हवा. यासाठी एक समिती नेमून विद्यापीठात सुरू असणारा अभ्यासक्रम आणि संस्थेने शिकवलेला अभ्यासक्रम याची तुलना करून समितीने अहवाल द्यावा. जो भाग विद्यार्थी शिकलेला नसतील तो अभ्यासक्रमाचा भाग आपण ब्रिज कोर्सच्या माध्यमातून शिकवावा. जे विद्यार्थी हा कोर्स पूर्ण करतील त्यांना आपण पदवी द्यावी. तसेच विद्यार्थ्यांची यापुढे फसवणूक होऊ नये यासाठी विद्यापीठाने मान्यताप्राप्त कोर्सेसचे एक प्रमाणपत्र द्यावे. यासाठी होणारा खर्च संस्थेने विद्यापीठात भरावा. ते संस्थेने किंवा महाविद्यालयाने त्यांच्या माहितीपुस्तकात छापणे बंधनकारक असावे. वर्तमानपत्रातही यासंदर्भात प्रवेश घेताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात जाहीर निवेदन द्यावे, असे मला वाटते.’ विद्या परिषदेने हा निर्णय एकमताने घेतला. चूक करणाऱ्यांना शिक्षा मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याचा सर किती विचार करत, याचे हे आणखी एक उदाहरण!

एका महाविद्यालयाने शिक्षक पदे भरण्यासाठीची जाहिरात अतिशय कमी खपाच्या दैनिकात दिली असल्याने ती कोणाच्याच पाहण्यात आली नाही, अशी तक्रार सरांच्या कानावर आली. यावर काय केले पाहिजे, याविषयी चर्चा केली. उपाय म्हणून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संस्थेची संपूर्ण जाहिरात ठेवावी. ती महिनाभर संकेतस्थळावर राहील, जेणेकरून अर्ज करण्याच्या मुदतीपर्यंत ती कोणालाही दिसू शकेल. यासाठी प्रति जाहिरात रूपये ५०० शुल्क आकारावे असे सांगितले. आधिकार मंडळाच्या लगतच्या बैठकीत यावर निर्णय घेऊन लगेच अंमलबजावणी सुरू केली. या प्रयोगामुळे महाविद्यालयाच्या जाहिरातीवरील खर्चात कपात झाली आणि उमेदवारांचीही सोय झाली.

माझ्यासाठी सरांच्या काळात आणखी एक कसोटीचा प्रसंग आला. एका महाविद्यालयातील मराठीचे शिक्षक लिनवर दुसरीकडे रूजू झाले. त्यांच्या पदावर रजा कालावधीसाठी जाहिरात करून दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती झाली. ही संस्था सरांच्या जवळच्या नातेवाईकाची होती. रजा कालावधीसाठी नियुक्त झालेले शिक्षक माझ्या आईचे भाचे. संस्थेने आग्रह धरला की आम्हाला याच शिक्षकाला पुढे ठेवायचे आहे. विद्यापीठाने नियमीत मान्यता द्यावी. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर मी, ‘तशी मान्यता देता येणार नाही. संस्थेने पुन्हा रितसर प्रक्रिया पार पाडून पद भरावे’, असे सांगितले. हे प्रकरण घरगुती पातळीवर आणि कार्यालयात मला अडचणीचे ठरत होते. आईनेही मला मी तिच्या भाच्याची अडवणूक का करतो, असा प्रश्न विचारला. आईचे ठीक होते, तिला कार्यालयीन काम माहीत नव्हते. मात्र कायम नियम पालनासाठी आग्रही असणाऱ्या सरांनीपण ही मान्यता देण्याचा आग्रह धरला. सरांना ही मान्यता देता येणार नसल्याचेच सांगितले. मला या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटत होते. मात्र थोडा विचार केल्यानंतर मला लक्षात आले, कदाचित ही माझी परीक्षा असावी. मी शेवटपर्यंत माझ्या भूमिकेवर कायम राहिलो. अखेर सरांनी संस्थेला जाहिरात काढून पद भरण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नियमानुसार प्रक्रिया पार पाडून त्याच शिक्षकाना मान्यता घेतली. मला आजही खात्रीने सर त्या प्रकरणात माझी परीक्षा घेत होते, असेच वाटते. स्वत:च्या मुलीसाठी नियम पालनाबाबत एवढे काटेकोर आणि कठोर असणारे सर, कोणा नातेवाईकासाठी नियम मोडायचा आग्रह धरणे, शक्यच नव्हते!

महाविद्यालयातील शिक्षक भरतीमध्ये त्याच लोकांचा समितीमध्ये वारंवार समावेश होतो आणि इतरांना संधी मिळत नाही, अशी नेहमी तक्रार होत असे. सरांनी यावर महाविद्यालयीन शिक्षक आणि विद्यापीठ शिक्षकांच्या पदनामनिहाय याद्या बनवण्यास लावले. या यदीनुसार ज्येष्ठतेनुसार सर्वांना संधी कशी देता येईल हे पाहिले. कोणता शिक्षक किती वेळा निवड समितीवर पाठवला याची त्या शिक्षकांच्या नावासमोर नोंद करावयास लावले. कोणबद्दल तक्रार आली तर सर त्यांच्या यंत्रणेतून खातरजमा करत आणि अशा शिक्षकाच्या नावापुढे शेरा लिहून ठेवत. पुन्हा अशा व्यक्तीला ते निवड समिती सदस्य म्हणून पाठवत नसत. मागासवर्गीय प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी अशा वेगवेगळ्या गटासाठी वेगळ्या याद्या ठेवायला लावल्या जात. यामुळे अनेक शिक्षकांना या समित्यावर काम करण्याची संधी मिळाली. ते विद्यापीठात आले की आवर्जून भेटत आणि आभार मानत.  

‘एक महाविद्यालय एक झाड’ ही योजना राबवण्याचा सरांनी संकल्प केला. दीड हजार रूपये महाविद्यालयाने विद्यापीठात भरावयाचे आणि विद्यापीठात त्या महाविद्यालयाच्या नावाने झाडे लावताना एकाच प्रकारची झाडे एका रस्त्यावर लावावीत आणि त्या झाडाच्या नावाने रस्ता ओळखला जावा, ही त्यांची मूळ संकल्पना होती. हा उपक्रम राबवण्यास उद्यान विभागाने नकार दिला आणि संलग्नता विभागाचा उपकुलसचिव म्हणून ही जबाबदारीही मला पार पाडावी लागली. येथून पुढे माझ्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास पुन्हा सुरुवात झाली. उत्तर आणि दक्षिण सर्कलमध्ये चिंचेच्या झाडांची लागवड, पर्यावरणशास्त्र आणि भाषभवनच्या पश्चिमेस काजू झाडांची लागवड हे उपक्रम त्यांच्या काळात राबवण्यात आले. वृक्ष लागवड आणि संगोपनास त्यांच्या काळात झालेली सुरुवात आजही त्याच जोमाने सुरू आहे.

सरांच्या काळात झालेले सर्वात मोठे काम म्हणजे विद्यापीठ परिसराचा चेहरा बदलणे. हा चेहरा भौतिक आणि शैक्षणिक दोन्ही स्तरावर बदलण्याचे प्रयत्न होते. रस्त्यावरून जाताना विद्यार्थी रस्त्याच्या मधून जातात. वाहनांना त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि सावधानतेने जावे लागते. हे लक्षात घेऊन मुलींचे वसतीगृह ते रसायनशास्त्र विभागापर्यंत पदपथ निर्माण केले. जेथे विद्यार्थ्यांचा वावर जास्त असतो, त्या सर्व भागांत हे पदपथ निर्माण करावयास लावले. ग्रंथालय इमारतीसमोर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासभोवती उद्यान विक‍सित करण्याची संकल्पनाही त्यांचीच. यामुळे ग्रंथालयासमोरचा भाग आणि मानवविद्या इमारतीसमोरचा परिसर सुंदर झाला. त्यावेळेपासून आजही विद्यापीठ सुंदर दिसावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे जलसंधारणाचे!

विद्यापीठाचा परिसर मोठा आहे. एका तलावाचे बांधकाम करण्यात आलेले असूनही तो भरत नाही आणि विद्यापीठ महानगरपालिकेचे पाणी घेते, ही गोष्ट त्यांना खटकत असे. त्यांनी तो तलाव भरण्यासाठी आवश्यक चरी आणि नाल्यांची निर्मिती करावयास लावली. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले. सुतार विहिरीचा गाळ काढून बांधकाम पूर्ण करून घेतले. विहिरीवर वीस हॉर्सपॉवरचे दोन विद्युत पंप बसवून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकून घेतली. टाकीजवळ जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला. ही पाईपलाईन मोठ्या चढावरून आणली होती. ती पाण्याच्या दाबाने वारंवार सुटत असे. यावर त्यांनी एक दिवस तत्कालीन अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव कॅप्टन सोनजे यांना स्पष्ट सांगितले, ‘आज रात्री पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात पडल्याखेरीज तुम्ही घरी जावयाचे नाही’. त्यांच्या समोरच मी राहत होतो. त्यांच्याबरोबर मीही गेलो. रात्री दहाच्या दरम्यान पाणी प्रकल्पापर्यंत आले आणि कॅप्टन सोनजे आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. या सर्व प्रयत्नात भाषा भवनजवळचा तलाव भरू लागला. तो प्रथमच पूर्ण क्षमतेने भरणार असे दिसत असताना जिल्हा प्रशासनाने तलाव फुटू नये याची दक्षता घ्यावी. तलाव फुटून खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना धोका पोहोचल्यास जबाबदारी विद्यापीठाची राहील, असे सांगितले. अर्थात तलाव बांधताना सर्व आवश्यक मान्यता घेतल्या होत्या. हे बांधकाम शासकीय यंत्रणेनेच केलेले होते. तरीही जिल्हा प्रशासनाने असे सांगितले होते. पाणी वर येऊ लागले आणि आम्हालाही भिती वाटू लागली. अखेर पाणी खूपच वरपर्यंत येऊन पोहोचल. आमच्या मनावरचा तणाव वाढला. त्या रात्री सरांनी तलावाचे पाणी सांडव्यातून बाहेर कसे पडेल, हे पाहायला कॅप्टन सोनजे यांना सांगितले. त्यांच्याबरोबर मीही गेलो. रात्री एक वाजेपर्यंत भाषा भवन जवळच्या तलावाच्या सांडव्यातील सिेमेंटचा कठडा तोडण्याचा प्रयत्न सुरू होता. पाणी वाढत होते. तीन फुट पाण्यात उतरून काम सुरू होते. कठडा तोडेपर्यंत पाण्याची पातळी इतकी वाढली की, पाणी आपोआप सांडव्यातून बाहेर पडू लागले. रात्री एक वाजता सोनजे यांनी सरांना फोन केला. सर जागेच असावेत. सरांनी फोन पहिल्याच रिंगमध्ये उचलला. आपले कर्मचारी आणि आधिकारी काम करत असताना, त्यांच्या चिंतेने जागा राहणारा असा हा मानवीय दृष्टीकोनाचा, वरिष्ठ अधिकारी!

भारताचे जल मानव राजेंद्रसिंह राणा विद्यापीठात आले असताना, त्यांना जलसंधारणासाठी आणखी काय करता येईल, हे सुचविण्यास सांगितले. त्यांनी सुचवल्याप्रमाणे संगीतशास्त्र विभागाजवळ तलाव बांधण्यात आला. विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी विद्यापीठ वापरू लागले. मात्र हे पाणी वर्षभर पुरत नव्हते. जोपर्यंत पुरेल तोपर्यंत विद्यापीठातील पाणी वापरण्याचा त्यांचा आग्रह कायम होता. त्यामुळे सात ते आठ महिने विद्यापीठ स्वत:चे पाणी वापरत असे आणि विद्यापीठातील पाणी संपल्यानंतर महानगरपालिकेकडून पाणी घेतले जात असे. ‘पाण्यानेच वाचवला पाण्यासारखा जाणारा पैसा’ ही मुखपृष्ठकथा १६ डिसेंबर २००६ च्या साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. या जलसंधारणाच्या कामामध्ये मी मूक साक्षीदार होतो. मात्र हे सर्व जलसंधारणाचे कार्य मी पाहिले होते. पुढे २०१४-१५ च्या दुष्काळानंतर विद्यापीठाला जल स्वंयपूर्ण बनवण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. त्या कार्यात सरांच्या काळातील कार्यापासून मिळालेली प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचा ठरला. आज विद्यापीठ जलस्वयंपूर्ण बनले. मात्र याचा पाया सरांच्या काळात घातला गेला होता.

सरांनी अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. सर्वसाधारण विद्यापीठात होणाऱ्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी एखाद्या शिक्षकाकडे सोपवली जाते. मात्र ‘इन्फोसिस’बरोबर झालेल्या सांमंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याची संधी मला मिळाली. विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षकांना प्रशिक्षणासाठी निवडणे आणि पाठवण्याचे कार्य तीन वर्षे पाहिले. विद्यापीठात बी.टेक्. आणि एम. टेक. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तंत्रज्ञान अधिविभाग त्यांच्या काळातच सुरू झाला. सरांनी विद्यापीठाने स्वत: प्रवेश परीक्षा घ्यावी आणि प्रवेश द्यावेत, असे सांगितले. बीबीए, बीसीए प्रवेशाचा अनुभव असल्याने, हे कामही मला पाहावे लागले. पुढे यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वसतीगृह हवे होते. पाच बंगल्यातील अपार्टमेंटचे नुतनीकरण करून त्यांचे रूपांतर वसतीगृहात करण्यात आले. येथे रेक्टर म्हणून मला काम करण्याची संधी दिली. बारावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळण्याचा मोठा अनुभव मला घेता आला. सलग तीन वर्षे मी हे काम सांभाळले. तंत्रज्ञान अधिविभागाप्रमाणे त्यांना स्वत:चे म्हणजे विद्यापीठाचे महाविद्यालय असावे, असे वाटत असे. खरे तर आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिसणाऱ्या अनेक संकल्पना त्या काळात सर बोलत असत. त्यांना विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमही सुरू करायचे होते. आंतरविद्याशाखीय संशोधन सक्षम करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे बोलत. त्यांच्या काळात झानेल्या बदलांसंदर्भात विद्यापीठाने ‘इनोव्हेशन अँड चेंज’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या मनात असंख्य संकल्पना यायच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करायचे. त्यांच्या वेगाने पळताना अनेकांची दमछाक झालेली पाहिली आहे. 

सरांनी विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता आणि वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रत्येक शिक्षकाकडे किमान एक संशोधन प्रकल्प असलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. अध्यापन, संशोधन आणि समाज प्रबोधन मिन्ही पातळीवर विद्यापीठाचे कार्य दिसले पाहिजे आणि यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणत. त्यांच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांचा विभाग, अध्यापन करणारे शिक्षक यांच्याबाबत फिडबॅक घेण्यासाठी संगणक प्रणाली विक‍सित करून घेतली. ही यंत्रणा गोपनियता जपत असल्याने विद्यार्थी, आपले खरे मत नोंदवत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ते अधिविभागाना भेट देत. या भेटीवेळी शिक्षकांशी या फिडबॅकबाबत चर्चा करत असत. सुधारणा करण्यासंदर्भात सांगत. चांगले अभिप्राय असणाऱ्या शिक्षकाचे ते कौतुक करत.  

सरांची विद्यार्थीप्रियता हा तर एका वेगळ्या लेखाचा विषय ठरावा. विद्यापीठात मी अनेक कुलगुरू पाहिले. मात्र साळुंखे सरांशी ज्या मोकळेपणाने विद्यार्थी वागत, ते पाहिले की आश्चर्य वाटते. सरांबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी विद्यार्थी नेहमी गर्दी करत असत. विद्यार्थीहित हा सरांच्या मनातील कायम असणारा एक विचार विद्यार्थ्यांना त्यांच्याशी कायम जोडत असावा. कोणताही विद्यार्थी सरांना भेटायला जाऊ शकत असे. सर विद्यार्थ्यांसमोर भाषण देत असले की शब्द आतून येत असत. त्यांचे भाषण मनापासून असे. दुसरे म्हणजे सरांचा कामाच उरक. कोठेही कार्यक्रमाला गेले, तरी सर कार्यालयात येऊन सर्व कामकाज संपवत असत. एकदा सर आणि मी मुंबईला एका बैठकीसाठी गेलो होतो. पहाटे साडेचार वाजता निघायचे ठरले. मी सरांसोबत तयार होऊन गाडीत बसलो. गाडी निघाली. गर्दी कमी असल्याने सुसाट वेगाने, फक्त रस्त्यात एका ठिकाणी चहा घेऊन, आम्ही साडेदहा वाजता कोल्हापूरला पोहोचलो. कोल्हापुरात आल्यानंतर सर सरळ कार्यालयात गेले. मी मात्र घरी जाऊन आलो. मात्र सर दिवसभर कार्यालयातच होते. संध्याकाळी सात वाजताच त्यांनी कार्यालय सोडले.

सरांच्या सहवासात प्रशासन, कामाचा गतीने निपटारा, नवी जबाबदारी स्वीकारणे आणि ती पार पाडणे, अशा अनेक गोष्टींची मला जणू सवय झाली. सरांनी उत्तम निर्णय कसा घ्यावा, हे त्यांच्या कार्यातून शिकवले. सरांच्या विशिष्ट सवयी होत्या. सरांच्या कृतीतून सरांना काय म्हणायचे आहे, हे लक्षात येत असे. सरांच्या बोलण्यावरून त्यांची खुशी आणि नाराजी कळत असे. एखादी गोष्ट ऐकून आनंद झाला की, ‘अरे व्वा!’ म्हणत शाबासकी द्यायचे किंवा खुशी व्यक्त करायचे. सरांची चार साडेचार वर्षे कधी संपली, हे कळलेच नाही. दरम्यान नॅकची भेट झाली. सरांच्या काळात झालेल्या कामामुळे सर्वांना चांगली श्रेणी मिळणार, असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. विद्यापीठाला ‘बी+’ श्रेणीवर समाधान मानावे लागले. मात्र पुढच्या मुल्यांकनावेळी या सर्व गोष्टींचा फायदा निश्चित झाला.  

त्यांच्या सहवासामुळे माझ्या जीवनात मोठा फरक पडला. या शिकवणीतून मी आज निरामय जीवन जगतो अशी माझी नम्र धारणा आहे. जगण्याचे भान आणि त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, ज्ञान सरांपासून मी शिकलो. याला कारण ठरली आमच्या सौ आणि सरांची भेट. त्याचे असे झाले, माझी सौभाग्यवती सरांची थेट विद्यार्थिनी. त्यामुळे एकदा दसऱ्यादिवशी मी सहकुटुंब कुलगुरू निवासात गेलो. त्यांचा विद्यार्थिनीशी संवाद सुरू होता. त्यामध्ये थेट सौभाग्यवतीने विचारले, ‘सर, एवढे कसलं टेंशन असतं? रात्रभर हे अनेकदा झोपत नाहीत. हे न झोपल्यामुळे मी जागी असते. याचा परिणाम शरीरावर होतो, हे ही त्यांच्या लक्षात येत नाही.’ सरांनी तिला फक्त एवढेच सांगितले, ‘फरक होईल’. दोन-तीन दिवसांनी सरांनी सर्व कामकाज संपल्यावर मला बोलावून घेतले. मला विचारलं, ‘आमच्या विद्यार्थिनीची तक्रार आहे. तुम्ही म्हणे रात्र-रात्रभर जागत बसता? कसलं टेन्शन घेता?’ मी सांगितले, ‘उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. नोकरीची निश्चिती नाही. ऑफिसमध्ये काही घडले की, त्याचा विचार मनातून जात नाही. दररोज काहीतरी घडते आणि ते विसरता येत नाही.’ मला सरांनी सांगितले, ‘मला जेवढ्या तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्या तुलनेत तुमच्या वाटणीला किती प्रसंग येतात. मलाही राग येतो. चीडचीड होते. मात्र हे सर्व कामानिमित्त असते. ती वेळ गेली की ते विसरायला पाहिजे. नाहीतर ब्लड प्रेशर, शुगर सर्व काही जवळ येईल. मी बघा एखाद्या प्रकरणात चिडलो, तरी ते लगेच सोडून, विसरून संबंधिताशी पहिल्यासारखे वागतो. तुम्ही न्यायालयात प्रकरण आहे, याचा विचार करून काय फरक पडणार आहे! तुम्ही विचार केला म्हणून निकाल थोडाच बदलणार आहे? नाही ना. मग कशाला विचार करता? एवढी वर्षे झाल्यानंतर निकाल तुमच्याच बाजूने लागणार. नका विचार करू.’ मी म्हणालो, ‘सर कसं शक्य आहे, सगळ विसरणं?’ यावर सरांनी सांगितले, ‘तुम्ही कसे येता?’ मी म्हटल, ‘मोटारसायकलने.’ सर पुढे म्हणाले, ‘आजपासून एक ठरवायचे. मनातील ऑफिसमधले सगळे विचार सोडून दिल्यावरच गाडी सुरू करायची. तोपर्यंत इथंच फिरत राहायचं. हळूहळू सवय होईल. घरी गेल्यानंतर पुस्तकं वाचा. गाणी ऐका. काहीही करा. मात्र बाकीचे विचार मनात आणायचे नाहीत, म्हणजे नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही विचार करून परिस्थिती बदलणार नसेल, तर विचार का करायचा? आहे त्या परिस्थितीला सामोरे जायचे. पुन्हा मला तक्रार ऐकायची नाही. आपल्या मेंदुमध्ये कप्पे असतात. त्यात आपण आणखी भर घालायची. कार्यालयीन कामकाज एका कप्प्यामध्ये, वाचन, आनंद देणाऱ्या गोष्टी दुसऱ्या कप्प्यात ठेवता आल्या पाहिजेत. एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात सहज ‘स्विच ओव्हर’ होता आलं पाहिजे. तरच घर आणि नोकरी सुखाने करता येईल.’

या संवादानंतर मी जाणीवपूर्वक प्रयत्न करू लागलो. हळूहळू सवय झाली. सारे काही सरांनी सांगितले, तसे करायचा प्रयत्न करू लागलो. बागकामात लक्ष घालू लागलो. वाचन सुरू केले. अभ्यास सुरू केला. वाचन वाढत गेले. पुढे व्यक्त व्हावेसे वाटले. अनेक वर्षांनंतर लिहू लागलो. पहिले पुस्तक लिहिले. प्रस्तावनेसाठी सरांचे नाव डोळ्यांसमोर आले. सरांनी ‘एककांचे मानकरी’ या पुस्तकाला विस्तृत प्रस्तावना दिली. यानंतर माझा लिखाणाचा वेग वाढला. आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्षाचे निमित्त होते. त्यानिमित्त मी ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे पुस्तक लिहिले. रसायनशास्त्रावरचे हे पुस्तक मी साळुंखे सरांना अर्पण केले. पुस्तकाची पाठराखण सरांनीच केली. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा विज्ञान साहित्याचा पुरस्कार मिळाला. पूर्वी नैमित्तिक लेखन करणारा मी, प्रशासनात आल्यानंतर लेखनापासून दुरावलो होतो. कदाचित सरांनी त्या दिवशी मार्गदर्शन केले नसते, तर मी लेखनाचा विचारच केला नसता! या कृतज्ञतेपोटी मी पुस्तक सरांना अर्पण केले.

मध्यम उंचीचे, चणीचे, रंगाने गोरे, लांब नाक, सतत हसतमुख चेहरा असणारे सर आठवले की सरांना ‘चैतन्याचा झरा’ या शब्दाखेरीज वर्णनासाठी अन्य शब्द समोर येत नाहीत. अनेक तासांचा प्रवास करूनही दिवसभर कार्यरत असणारे सर, चैतन्याचे, उत्साहाचे मूर्तीमंत उदाहरण. विद्यार्थ्यांचे हित, नियमांचे पालन, कडक आणि गतीमान प्रशासन हे सरांच्याकडून शिकण्यासारखे. नव्या संकल्पना आणि त्यांची अंमलबजावणी हा त्यांचा आवडता भाग. इलेनॉर रूझवेल्ट म्हणतात, ‘Small mind discuss peoples, Average mind dicuss events and Great mind discuss ideas’. साळुंखे सरांच्या बोलण्यातून नेहमी कोणते ना कोणते नवीन काम, संकल्प यायचे, म्हणूनच सर मला कायम मोठ्या मनाचे, मोठे व्यक्तीमत्व म्हणून दिसतात.  

सरांनी २००९ मध्ये विद्यापीठ सोडले, ते केंद्रीय विद्यापीठ राजस्थानचे कुलगुरू म्हणून रूजू होण्यासाठी! तेथील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून रूजू झाले. आज ते भारती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. २००९ पासून सर अन्य संस्थांमध्ये कार्यरत असले तरी, आजही सरांची आठवण येते. आजही मन मोकळे करण्यासाठी सरांशी बोलतो. दुसऱ्याच विषयांवर चर्चा होतात. ज्या कारणाने मन जडावलेले असते, ते कारण न सांगताही मन हलके होते. प्रत्यक्षात नोकरीत, दैनंदिन जीवनात ते कोणतीच मदत करणार नसले, तरी ते पाठीशी आहेत, याची जाणीव मनाला निर्धास्त करते आणि मी नव्या उमेदीने नव्या कामाकडे वळतो…  

-०-