Solapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Solapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सर्वांगीण विकासासाठी झटणारी गुरुमाता : वैशाली धायगुडे मॅडम

 शिक्षक दिन विशेष :

विद्यार्थी जीवनामध्ये अनेक शिक्षक भेटतात. त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचे दान ते विद्यार्थ्यांना देतात. त्यातून विद्यार्थी घडत जातो. विषयाचे अध्ययन सुरू असताना स्वंयअध्ययन करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असते. हे कौशल्य ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त होते, ते विद्यार्थी घडतात. असे विद्यार्थी घडवणारे शिक्षक मला लाभले, हे माझे भाग्य. माझ्या आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांपैकी एक महत्त्वाच्या शिक्षिका म्हणजे वैशाली धायगुडे मॅडम. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सेवेत असताना आणि नंतरही कायम कार्यरत मॅडमचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत. आजच्या शिक्षकदिनी त्यांच्याबद्दलच्या काही साठवणीतील आठवणी….

________________________________________________________

 शिक्षक हा खऱ्या अर्थाने शिल्पकार असतो, विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि कुंभार जसा मातीला आकार देतो, तसा शिक्षक आकार देत असतो, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. त्याचे कारण म्हणजे कुंभार एकदा तयार केलेल्या चिखलातून हव्या तशा मूर्त्या बनवत असतो. त्याला एकाच आकाराच्या, प्रकारच्या मूर्त्या बनवता येतात, तसे शिक्षकाचे नसते कारण एका वर्गात विशिष्ट अर्हता धारण करून प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हवे ते उद्दिष्ट गाठून देण्याचे कार्य शिक्षकाला साध्य होत नाही. कारण माती कुंभाराच्या इशाऱ्यानुसार वळत असते. ती विरोध करत नाही. तसे विद्यार्थ्यांचे नसते. ते शिक्षकाच्या इशाऱ्याप्रमाणे वागत नाहीत. चांगले गुरू, शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांना चांगले घडविण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वांना समान संधी देत असतात. मात्र शिक्षकाने दिलेले हे दान घेण्याची ज्यांची पात्रता असते, ते विद्यार्थी घडतात. असे प्रत्येक वर्गात काही विद्यार्थी असतात. त्याची गरज ओळखून त्यांना शिक्षक सहकार्य करतात. शिक्षकांच्या ते लक्षातही येतात. मात्र केवळ त्यांच्यावर लक्ष न देता संपूर्ण वर्गाला ते सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न करत राहतात. असेच आयुष्यभर असिधारा व्रत घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका मला माझ्या पदवी अभ्यासाच्या वेळी भेटल्या आणि त्यांनी माझ्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. या शिक्षिका म्हणजे वैशाली नागेश धायगुडे मॅडम.

बार्शीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, मात्र कसाबसा प्रथम श्रेणी घेऊन. तेवढ्या गुणांवर या महाविद्यालयात बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाला मला प्रवेश देता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स विषयाला कोठे प्रवेश मिळू शकेल, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात १९८४ साली जवळपास एक महिना वास्तव्य केले होते. वस्तीगहात राहताना या महाविद्यालयाचा परिसर मनापासून आवडला होता. या महाविद्यालयाचा परिसर बार्शीच्या कॉलेजपेक्षा खूपच सुंदर होता. मी दयानंद महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो का याची गावातील आबासाहेब शिंदे यांना चौकशी करायला सांगितले. आबासाहेब त्यावेळी रसायनशास्त्र विभागात प्रयोगशाळा सहाय्यक होते. त्यांनी चौकशी करून प्रवेश मिळू शकतो असे सांगितले. वडील प्राथमिक शिक्षक असल्याने कोणतीही आधिकची फी भरावी लागणार नव्हती.

मी जून १९८६ मध्ये सोलापूरला जाऊन दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रवेश घेताना प्रथम वर्षासाठी इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय निवडले. दयानंद महाविद्यालयात एक वेगळी संस्कृती होती. प्रत्येक विभागाला वेगळी इमारत होती. आंतरविभागीय विषय हवामानशास्त्र, जैवरसायनशास्त्र असे विषय द्वितीय वर्षाला निवडता येत होते. पायाभूत सुविधा जशा प्रशस्त होत्या, तसेच विशाल मनाचे शिक्षक होते. महाविद्यालयाची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावीच्या वर्गाला शिकवत असत. त्याचप्रमाणे प्रथम वर्षासाठी ज्येष्ठ शिक्षक अध्यापन करत असत. (आता ही अध्यापन संस्कृती राहिली नाही, असे ऐकावयास मिळते.) परिणामी त्या विषयाकडे विद्यार्थी आकर्षित होत असत.

पहिल्या वर्षी भौतिकशास्त्र शिकवण्यासाठी विभागप्रमुख मनगोळी सर, डॉ. नागेश धायगुडे आणि प्रा. वैशाली धायगुडे मॅडम होते. मनगोळी सरांची मातृभाषा मराठी नसावी. मात्र अत्यंत सोप्या इंग्रजीत मध्येच मराठी शब्द वापरत ते खूप सुंदर पद्धतीने जनरल फिजिक्सचा भाग शिकवत असत. दुसरा पेपर होता तो इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिजमचा हा पेपर धायगुडे सर आणि मॅडम शिकवत असत. सरांचे अक्षर आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत इंग्रजीतून शिकवण्याची पद्धत मुलांना भावत असे. मॅडमकडे त्यातील अवघड, विद्यार्थ्याला समजायला कठीण वाटणारा भाग असायचा. त्या आयआयटीमध्ये शिकायला असल्याने त्यांना कठीण भाग देतात, अशी विद्यार्थ्यात कुजबूज असायची. त्याही इंग्रजी माध्यमातून शिकवत. मात्र मुलांना काही समजले नाही तर मराठीतूनही समजावून सांगत. मॅडमची शिकवण्याची पद्धत वेगळी. तीन शिक्षक, तिघांच्या शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या. मात्र विद्यार्थी या तिघांच्याही शिकवण्यामुळे भौतिकशास्त्र विषयाच्या प्रेमात पडत.

दुसऱ्या वर्षी यातील एक विषय सोडावा लागत असे. मी रसायनशास्त्र विषय सोडून इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय निवडले. दुसऱ्या वर्षी जाधव सर, धायगुडे मॅडम आणि धायगुडे सर काही तास घेत असत. दुसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकच विषय निवडावा लागत असे. तोपर्यंत धायगुडे सर आणि मॅडमच्या शिकवण्यामुळे माझ्या मनावर भौतिकशास्त्राने बराच कब्जा करायला सुरुवात केली होती. इलेक्ट्रॉनिक्स तरीही आवडत होते. इलेक्ट्रॉनिक्स की भौतिकशास्त्र यामध्ये शिक्षकाच्या अध्यापनाने इलेक्ट्रॉनिक्स विषय बाजूला पडला आणि मी भौतिकशास्त्र विषय घेऊन पदवी अभ्यासक्रम घ्यावयाचे निश्चित केले.

तसा प्रथम वर्षापासून शैक्षणिक उपक्रमाबरोबर वक्तृत्व, निबंध स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याने क्रीडा, सांस्कृतीक स्पर्धेत यश मिळवले तर त्याचे नाव लिहिलेला फलक दर्शनी भागात लावलेला असे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच या संस्कृतीची ओळख झाली आणि आपलं नावपण असंच बोर्डवर झळकले पाहिजे, असे मनात येऊन गेले. आपला प्रांत सांस्कृतीक होता. माझ्‍या शालेय जीवनामध्ये निबंधाचे चांगलंच कौतुक करण्यात येत असे. निबंध स्पर्धा हा प्रकार आपल्याला पेलवेल असे वाटले. काही दिवसातच जायंटस ग्रुप ऑफ सोलापूर यांच्या निबंध स्पर्धेची जाहिरात आली. चार-पाच विषय होते. त्यातील ‘अंमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर १००० शब्दापर्यंतचा निबंध लिहून पाठवायचा होता. मी त्याबाबत काही संदर्भ शोधून छान निबंध तयार केला आणि मुदतीत टिळक चौकातील दिलेल्या पत्त्यावर नेऊन दिला. निकालाची उत्सुकता होती. अशा स्पर्धेत भाग घ्यायचा पहिलाच प्रसंग होता. त्यावेळी मोबाईलचे युग कल्पनेतही नव्हते. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी छापून आली. त्या काळी संचार, केसरी गर्जने, विश्वसमाचार, तरूण भारत अशी काही मोजकी दैनिके सोलापूरातून प्रकाशित होत असत. तोपर्यंत माझ्या वर्गातील सर्वांशी ओळखीही झाल्या नव्हत्या. आम्ही सकाळी चहा घ्यायला टपरीवर गेलो. तेथे आमचे चहा-नाष्टा घेत पेपर वाचन चालत असे. चहा घेत असताना राजेंद्र शिंदे या वर्गमित्राने येऊन प्रथम माझे अभिनंदन केले. ते पेपरचे पान घेऊन क्षणात बातमी वाचून काढली. पहिल्यांदाच माझे नाव छापून आलेले होते. खूप आनंद झाला होता. तब्बल तीनशे रूपयांचे पहिले बक्षीस (त्यावेळी महिन्याला खानावळीसाठी मला १४० रूपये द्यावे लागत) मिळाले होते. आता ही बातमी शिक्षकांना आपण कशी सांगायची, असे मनात होते.

मात्र प्रॅक्टिकलसाठी भौतिकशास्त्र विभागात गेलो आणि मॅडम आम्हाला प्रॅक्टिकलला नसतानाही, पहिल्या वर्षाच्या प्रयोगशाळेत आल्या. माझे चुलतबंधू सुरेश शिंदे हे धायगुडे सर आणि मॅडमचे फॅमिली फ्रेंड होते. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. त्यांनी बातमी वाचली होती. त्या माझ्याजवळ आल्या आणि विचारले, ‘तुम्ही निबंध स्पर्धेत भाग घेतला होता का?’ मी ‘हो’ म्हटले. त्या लगेच मोठ्याने म्हणाल्या ‘जायंटस क्लबच्या निबंधस्पर्धेत विलास शिंदेना पहिले बक्षीस मिळाले आहे, त्यांचे अभिनंदन.’ एकिकडे आपण स्वत: शिक्षकांना कसे सांगायचे, असा मी विचार करत होतो. हा प्रश्न मॅडमनी चुटकीसरशी सोडवला होता. पुढे त्यांनी मला कोणाचे मार्गदर्शन घेतले, आणखी काय लिहिता, असे बरेच प्रश्न विचारले. या स्पर्धेसाठी मी कोणाचेच मार्गदर्शन घेतले नाही, असे सांगितले. तसेच कविता लिहितो, हे ही सांगितले. ‘तुम्हाला साहित्यात रस असेल, तर तुम्ही वनस्पतीशास्त्र विभागातील शाम कुलकणी सरांना भेटा असे आवर्जून सांगितले.

मी शाम कुलकर्णी सरांना भेटलो आणि ‘अक्षरमंच’ या महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकाचे काम पाहू लागलो. यातून आमच्या वर्गात शिकणाऱ्या नरेंद्र अंभोरे यांचा परिचय झाला. अंभोरे यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी संपादक म्हणून काम करता आले. दुसऱ्या दिवशी जायंटस क्लबचे पत्र मिळाले माझे नाव बोर्डवर लागले. पुन्हा एकदा अभिनंदन झाले. माझे अल्पकालीन ध्येय साध्य झाले होते. पुढे ज्या-ज्या स्पर्धेची जाहिरात येईल त्या सर्व स्पर्धात भाग घेऊ लागलो. मध्येच एक दिवस कामत सरांनी, ‘निबंध स्पर्धेला पाठवण्यापूर्वी धायगुडे मॅडमना दाखवत जा’, असे सांगितले. त्यानंतर रोटरी क्लबची निबंध स्पर्धा जाहीर झाली. विषय होता, स्त्री-मुक्ती. मी निबंध तयार केला आणि मॅडमना भितभितच विचारले, ‘मॅडम, हा निबंध दाखवायचा होता’. मॅडमनी निबंध लगेच वाचायला घेतला आणि पाच मिनिटात वाचून संपवला. ‘मी असाच निबंध पाठवणार, की पुन्हा लिहिणार’, असे विचारले. मी म्हटलं, ‘काही बदलायचे असेल तर पुन्हा लिहितो.’ मॅडमनी लगेच निबंध पुन्हा वाचायला आणि त्यामध्ये दुरूस्त्या करायला सुरुवात केली. दहा-बारा व्याकरणाच्या दुरुस्त्या केल्या. एक मुद्दा वाढवण्यास सूचवले. जी गोष्ट करायची ती परिपूर्ण असली पाहिजे, असा आग्रह त्या कायम धरत.

मी तो निबंध घेतला आणि हॉस्टेलवर संध्याकाळी पुन्हा लिहून काढला. दुसऱ्या दिवशी तो रोटरी क्लबच्या कार्यालयात सादर केला. अर्थातच या स्पर्धेतही पहिले बक्षीस मिळाले. तेथून पुढे कोणत्याही स्पर्धेसाठी निबंध पाठवताना मॅडमना तो दाखवून दुरूस्त करूनच पाठवत असे. अनेक स्पर्धात पहिले किंवा दुसरे बक्षीस हमखास मिळायचे. अशी दरवर्षी पाचसहा बक्षीसे मिळायची. त्यानंतर सोलापूर बाहेरच्या स्पर्धांसाठीही निबंध पाठवले आणि बक्षीसे मिळवली. त्यामध्ये मॅडमचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. आयआयटीमध्ये इतर विषयही शिकवले जातात. विद्यार्थ्यांना इतर विषयातील अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध असते. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. दयानंद महाविद्यालयात, असे कोणतेही बंधन किंवा नियम नसताना भौतिकशास्त्र शिकणाऱ्या मुलाला ही सुविधा उपलब्ध होती. धायगुडे मॅडम आणि सर विद्यार्थ्याला भौतिकशास्त्राचा कोणताही संबंध नसलेल्या, निबंध लेखनाचे कौशल्य वाढवण्यासाठी कष्ट घेत होते. त्यांनी कधीही याचा आणि तुमच्या विषयाचा काय संबंध, असा प्रश्न विचारला नाही. उलट आपला बहुमूल्य वेळ अशा मार्गदर्शनासाठी दिला. त्यांनी अशा कार्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये अशा तरतुदी येण्याची वाट पाहिली नाही. ते येण्याच्या कित्येक वर्ष अगोदर हे सारे घडत होते.

विद्यार्थ्यांने केवळ विषयाचे ज्ञान घ्यावे म्हणून त्या कार्यरत नव्हत्या. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्या स्वत: एनसीसी कॅडेट होत्या. त्या खेळाडूही होत्या त्यां राष्ट्रीय पातळीवर खेळल्या होत्या. आता त्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत विविध उपकरणाशी लिलया खेळत होत्या. विद्यार्थ्यांना ती कौशल्ये प्राप्त व्हावीत, असे मनोमन प्रयत्न करत होत्या. अंधारखोलीतील (डार्क रूममधील) प्रयोग त्या सहज करून दाखवत. इतर नवीन शिक्षकांना जे प्रयोग करून दाखवायला दोन तास लागत, तेच प्रयोग मॅडम अर्ध्या तासात करून दाखवत असत. दुसऱ्या वर्षाचे प्रयोग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असायचो. मॅडमना सर्व उपकरणे शरण आली असावीत. मॅडमच्या उपस्थितीत कोणत्याही उपकरणाने सहकार्य करायचे नाकारले नाही. सगळी उपकरणे निमूट काम करत असत. जेव्हा उपकरणे एवढी सरळ वागायची, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये वाकड्यात जाण्याचे धाडस कसे येणार. विद्यार्थी प्रयोग करताना मॅडम मधून एक फेरी मारून जात. मध्येच विद्यार्थ्यांबरोबर बोलत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष प्रयोगावर केंद्रित झालेले असायचे. 

मी बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्गात शिकत असताना, आमची प्रात्यक्षिके वरच्या मजल्यावरील प्रयोगशाळेत होत असत. त्या प्रयोगशाळेतील डिमरमध्ये स्पार्किंग होत असे. तोपर्यंत उपकरणे हाताळण्याचे कौशल्य प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे यांच्या लक्षात आले होते. त्यातच मी हिंदुस्तान इन्स्टिट्युट या खाजगी संस्थेतून विद्युत उपकरणे हाताळण्याचा कोर्स केला होता. कारंडे यांनी मला डिमर काढून आतल्या कॉईलवरील आवरण न जाता कार्बन काढणार का असे विचारले. मी ही तेवढाच हात साफ होईल म्हणून लगेच ते साफ करायला घेतले. दोन डिमरचा कार्बन साफ करून झाले. त्यांचे काम सुरळीत सुरू झाले. तिसरा डिमर साफ करत असताना अचानक शिपायाने येऊन फॅनचे बटण दाबण्याऐवजी डिमरची पीन असलेले बटन सुरू केले. जोराचा झटका बसला. त्यांने लगेच बटण बंद केले. मात्र माझ्या अनियंत्रीत हालचाली झाल्या. पाय अचानक पुढे गेला. पुढे लोखंडी पट्टी असलेले स्टूल होते. त्या स्टूलच्या खालच्या पट्टीवर पाय आदळला. पाय आदळताना डाव्या पायाच्या करंगळीशेजारचे बोट आणि करंगळीच्या मधल्या भागात ती पट्टी आली. काही कळण्याच्या आत रक्ताची धार सुरू झाली. मला लगेच महाविद्यालयाच्या दवाखान्यात नेले. तिथल्या डॉक्टरनी पटकन तीन टाके घातले. पायाला माती, चिखल लागू देऊ नका म्हणून सांगितले. जखम खोलवर झाली होती. चालताना नको एवढ्या वेदना होत होत्या. कसेबसे आवरावे लागत होते. जखमेजवळ पाणी पोहोचल्यास जखम चिघळू शकते असे सांगितल्याने आंघोळही नाही. मेसला जेवायलाही जाता येत नव्हते. बाहेरून मेसवर डब्बाही मागवता येत नव्हता आणि होस्टेलची मेसही नव्हती. प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे याला विभागप्रमुख मनगोळी सर खूप ओरडले होते. त्याला ओरडून माझी जखम भरणार नव्हती. या काळात मॅडमनी इतर मुलांकडे माझी चौकशी केली. संध्याकाळी डब्बा घेऊन मॅडम आणि सर निळया स्कूटरवरून होस्टेलवर आले. त्यापुढे आठ दिवस दररोज माझ्यासाठी डब्बा हॉस्टेलवर पोहोच होत होता. डॉक्टरची औषधे, आणि मातेच्या आपुलकीने घेतली जाणारी ही काळजी यामुळे मी लवकरच बरा होऊन पुन्हा वर्गात येऊ लागलो. मात्र या काळात माझ्या मनात मॅडमबाबत एक बदल झाला. एका चांगल्या शिक्षिकेची मनातील प्रतिमा, मातृप्रतिमेत कधी बदलली ते कळालेच नाही.

माझे उपकरणे हाताळण्याचे आणि प्रयोग करण्याचे कौशल्य इतरही शिक्षकांच्या लक्षात आले होते. तसेच माझे हस्ताक्षर कौशल्यही जर्नलच्या रूपात सर्वांच्या लक्षात आले होते. त्यातही अक्षरमंचचे अंक नियमीत निघत असत. त्यावेळी नुकतेच संगणक शिक्षणसंस्थेत दिसू लागले होते. फ्लेक्सचा जमाना यायचा होता. त्यामुळे विभागातील विविध कार्यक्रमाचे बोर्ड रंगीत खडूनी सजवले जात. हे काम माझ्याकडे आपोआप आले. त्यावेळी फलकावर लिहावयाचा मजकूर प्रथम कागदावर लिहून मॅडमकडून तपासून घ्यायचो. मॅडमचे गोलाकार अक्षर सुंदर आहे. त्यांच्या व्याख्यानाच्या नोटसही तशाच अक्षरात कोणतीही खाडाखोड नसलेल्या असायच्या. ही नोटस काढण्याची सवय माझ्यातही नकळत आली. कोणतीही खाडाखोड न करता लेखन व्हायला हवे हा संस्कार मॅडमचाच. त्या शिकवताना विद्यर्यांनी मुद्दे लिहून घ्यावेत आणि संदर्भ पुस्तके वापरून नोटस काढाव्यात, असे सांगत असत. त्यामुळे बी.एस्सी.ला असतानाच आम्हाला बी.एल. थरेजाचे बेसीक इलेक्ट्रॉनिक्स, थर्मोडायनॅमिक्सला श्रीवास्तव, ॲटोमीक फिजिक्सला राजम या लेखकांची आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची ओळख झाली. संदर्भ पुस्तक वापरणे त्यातून नोटस काढणे, या गोष्टींची सवय झाली. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच विषय शिकायचा कसा, अभ्यासायचा कसा, याची शिकवण मिळाली आणि आम्ही स्वत:च्या नोटस काढू लागलो. मॅडमकडून शिकलेल्या अनेक गोष्टीतील ही सर्वात महत्त्वाची गोष्ट.

पुढे शिक्षकांचा १९८८ च्या अखेरीस शिक्षकांनी संप पुकारला. आंदोलनामध्ये सर्वच शिक्षक सहभागी होते. आम्ही जाताना येताना महाविद्यालयाबाहेर बसलेले शिक्षक पहात होतो. मात्र यामध्ये मॅडम किंवा सरांना क्वचित पाहिले. या संपामुळे वर्गात शिकवणे पूर्ण बंद झाले होते. जवळपास दोन महिने हा संप चालला. शिक्षकांनी संपातील दिवस सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवून भरून काढायचे होते. त्यामुळे दररोज वर्ग सुरू झाले. तो जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. झुंजूरवाड यांनी मला बोलावल्याचा निरोप विभागात आला. प्राचार्यानी बोलावले म्हणजे अंगावर काटा यायचा. पण मला काहीतरी वेगळी बातमी असावी, असे वाटत होते. मी तरीही भितभितच गेलो. प्राचार्यानी मला एक पत्र दाखवले आणि तुम्ही या शिबिरासाठी जायचे असे सांगितले. अभ्यासाची, शिकवण्याची आणि शिकण्याची घाई सुरू असताना अशा शिबीरासाठी जवळपास तीन आठवडे घालवणे म्हणजे एम.एस्सी. प्रवेशाच्या स्वप्नावर पाणी सोडण्यासारखे होते. त्यामुळे मी प्राचार्याना लगेच नकार सांगितला. प्राचार्यांनी माझे मन वळवण्याची जबाबदारी धायगुडे सरांवर सोपवली. सरांनी मला खूप समजावले. सरांच्या पेपरचा अभ्यास करणे सहज शक्य होते. मात्र मॅडम शिकवत असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचे काय करायचे असा प्रश्न होता. मी सरांनाही जवळपास नकारच दिला होता. सरांनीच मॅडमना मला समजावून सांगायला सांगितले असावे. 

मॅडमनी मला सहज बोलावल्यासारखे बोलावून, ‘प्राचार्यांनी का बोलावले होते’ असे विचारले. मी खिशातील पत्र काढून मॅडमना दाखवले. मॅडमनी लगेच ‘अभिनंदन’ केले. ‘खूप छान संधी मिळाली आहे’, असेही म्हणाल्या. मी म्हटलं, ‘मॅडम, हे जवळपास तीन आठवडे जातील. पुन्हा मी युवक महोत्सवासाठी जावे लागेल. जवळपास एक महिना असा गेल्यावर मला एम.एस्सीला प्रवेश कसा मिळेल.’ मॅडम लगेच म्हणाल्या, ‘तुम्ही जावा. अशी संधी पुन्हापुन्हा मिळत नसते. तुम्ही जरूर जावा. अभ्यास होत राहील. आल्यानंतर नोटस मिळतील. होईल तुमचा अभ्यास. तुम्ही गेलंच पाहिजे.’ मी पुन्हा म्हटलं, ‘मॅडम बाकी सारे संमजेल हो, पण क्वांटम मेकॅनिक्स समजायला जड जाईल.’ मॅडमनी पुन्हा सांगितले, ‘मी आहे ना, जे समजणार नाही ते मी शिकवेन. तुम्ही बिनधास्त जावा.’ मॅडमनी दिलेल्या खात्रीमुळे मी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापूर सोडले. मार्च १९८९ मध्ये मी परत आलो तेव्हा सर्व अभ्यासक्रम शिकवून झाला होता. सर्व शिक्षकांनी नोटस, पुस्तके उपलब्ध करून दिली. बाकी सर्व विषयांचे बऱ्यापैकी आकलन होत होते. मात्र क्वांटम मेकॅनिक्स डोक्यावरून जात होते. अखेर मॅडमनी तो सेक्शन घरी शिकवला. कोणतेही शुल्क न घेता. हे शिकवणे तसे किती त्यागाचे होते हे मला मी बाप झाल्यावर लक्षात येते. कारण त्यावेळी दिप्ती आणि प्रज्योत हे दोघेही तसे लहान होते. शालेय विद्यार्थी. त्यांचा हक्काचा हा वेळ मॅडम मला देत होत्या. एवढेच नाही, अनेकदा शिकवत असताना उशीर झाला तर, घरीच जेवायला लावत आणि नंतर मी होस्टेलवर येत असे.

मॅडम आणि सरांच्यामुळे मी लेखनाकडे वळलो. दयानंद महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेले संस्कार आजन्म पुरणारे आहेत. मात्र त्यातील सर आणि मॅडम यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांनी प्रज्योत, दिप्ती यांच्याइतकेच प्रेम माझ्यावर केले. तसे त्या सर्वांशीच आपुलकीने वागत. सर्वांच्या अडचणी सोडवण्यात पुढाकार घेत. मला हे कायम जाणवत असे. त्यातून त्यांच्याप्रती कामयत मनात कृतज्ञता भाव वढत गेला. त्यामुळे आयुष्यातील अनेक निर्णय घेताना मी त्यांचे मत जाणून घेत असे.

पुढे मी सोलापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्रात अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. माझ्या मनात विचार आला की, राष्ट्रीय विज्ञान दिनी एक ‘विज्ञान पुरवणी’ प्रकाशित व्हावी. मी हा विचार मॅडम आणि सरांच्यापुढे बोलून दाखवला. लगेचच आम्ही तरूण भारतचे संपादक विवेकजी घळसासी यांना भेटलो. यापूर्वी ‘मध्यमा’ पुरवणीचे काम मी अनेक दिवस पाहिले असल्याने पुरवणी काढण्यासाठी काय, काय करावे लागते, हे मला माहीत होते. आम्ही विवेकजीना कल्पना सांगताच त्यांनी लगेच होकार दिला. मात्र विज्ञान लेखकांशी माझा परिचय नव्हता. सर आणि मॅडमनी अगदी जयंत नारळीकर, बाळ फोंडके, विगो कुलकर्णी, निरंजन घाटे हेमचंद्र प्रधान अशा अनेक लेखकांशी संपर्क साधला. या मान्यवरांनीही लेख दिले आणि २८ फेब्रुवारी १९९६ पासून पुढे मी सोलापूरमध्ये असेपर्यंत आम्ही दरवर्षी विज्ञान पुरवणी प्रकाशित करत राहिलो. पुढेही तरूण भारतची विज्ञान पुरवणी मॅडम आणि सर प्रकाशित करत. यातून मी विज्ञान लेखनाकडे जास्त ओढला गेलो. या काळात काही वेळा अगदी उशिरापर्यंत आम्ही काम करत असायचो आणि मॅडमही बरोबर असत.


पुढेही हे घर माझ्यासाठी प्रज्योत, दिप्तीइतक्याच हक्काचे झाले. घराशी कायमचे जोडले जाण्यामध्ये मॅडमचा स्वभाव महत्त्वाचा ठरला. मॅडम सरांपेक्षा थोडा प्रॅक्टिकल विचार करत. मात्र विद्यार्थ्यांसाठी काही करायचे झाले तर सरांच्याही पुढे असत. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. विद्यार्थ्यांने एखादी अडचण सांगावी आणि मॅडमनी ती आईच्या ममतेने सोडवावी, याचे दर्शन अनेकदा घडले. यातून मी या कुटुंबाशी कायमचा जोडला गेलो. कन्या वैष्णवीसाठी सर ‘गुड मॉर्निंग आजोबा’ आणि मॅडम ‘आज्जी’ बनल्या. तिचेही मॅडमकडून भरपूर लाड झाले. मी प्रशासकीय सेवेत उपकुलसचिव झाल्यानंतर सोलापूरला २००३ पर्यंत होतो. तोपर्यंत दररोज किमान फोनवर बोलायचो. आठवड्यातून एकदा सर्वंजन एकत्र यायचो. सर बाहेरगावी गेले असले तरी यात खंड नसायचा. पुढे माझी बदली कोल्हापूरला झाली.

मॅडम आणि सर दोघेही सेवानिवृत्त झाल्यानंतर सर अनेकदा कार्यालयीन कामासाठी कोल्हापूरला आले. मात्र २००९ च्या फेब्रुवारीमध्ये सर आणि मॅडम प्रथमच दोघेही कोल्हापूरला आले. राहिले. मुलांना खऱ्या अर्थाने आजी-आजोबा अनुभवता आले. स्नेहबंध आणखी दृढ झाला. छोट्याछोट्या प्रसंगात, कमी क्षणातही आनंदाची साठवण कशी करायची, हे त्यांच्याकडूनच शिकता आले. विद्यार्थ्याला केवळ क्रमीक पुस्तकातील, अभ्यासक्रमात नमूद केलं तेवढ्यावर समाधान न मानता त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर या उभयतांनी भर दिला.

त्यानंतर तीनच वर्षांत सरांचे निधन झाले. त्यावेळी ‘एककांचे मानकरी’ या पुस्तकाचे माझे लेखन सुरू होते. सरांच्या जाण्याचा धक्का माझ्यासाठी तीव्र होता. मी पुस्तकाचे काम जवळपास थांबवले होते. मात्र मॅडमच्या सूचनेनुसार पुन्हा ते पुस्तक पूर्ण करायला सुरुवात केली आणि तीन वर्षांनंतर ते प्रसिद्ध झाले. ते पुस्तक सरांना अर्पण केले. त्याचवेळी मी ‘एककांचे इतर मानकरी’ हे पुस्तक लिहायचा विचार करत होतो. आज ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि हे पुस्तक आज प्रकाशनासाठी तयार झाले आहे. एककांचे इतर मानकरी हे मॅडमना अर्पण केले आहे.

पुढे मॅडम पुण्याला राहू लागल्या. मात्र सरांच्या स्मरणार्थ सोलापूरच्या घरांमध्ये शालेय मुलांना प्रयोगाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाची रूची निर्माण व्हावी, यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. सरांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालाही मराठी विज्ञान परिषदेच्या सोलापूर शाखेमार्फत सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्षाच्या निमित्ताने दिप्तीच्या सहाय्याने आवर्त सारणी कशी सहज समजावून सांगता येईल यासाठीचे एक प्रतिमान (मॉडेल) तयार केले. अनेक शाळांतून आवर्त सारणीवर व्याख्याने दिली. त्यांच्या या मॉडेलची चर्चा रशियापर्यंत पोहोचली. त्यांना या मॉडेलसह रशियात आमंत्रित केले. त्यांना त्यावेळी जाणे जमले नाही. मात्र, विज्ञान प्रसाराचे कार्य त्या आजही करत आहेत.

इकडे मीही याच विषयावर ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे राज्य शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक लिहिले. भौतिकशास्त्र तितक्याच समर्थपणे शिकवत असतानाच, या पुस्तकाच्या लेखनाचा विचार आणि त्यासाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्याचे संस्कार देणाऱ्या या गुरूमातेला त्रिवार वंदन आणि शिक्षक दिनांच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा!





शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

तो एक गुरू...!

 

(शिक्षक दिन विशेष-२ प्रा. शाम तथा एस.एच. कुलकर्णी सर)
आज महाविद्यालयीन शिक्षणाचा सुवर्णकाळ येतोत्यामुळे स्वप्न पाहायला पूर्ण मोकळीक असते. इथे जाणिवा समृद्ध व्हायला सुरुवात होते. या वयात चांगल्या शिक्षकांचा परिसस्पर्श झाला किंवा आपण गुरूरूपी परिसाच्या जवळ गेलो, तर आयुष्याचे सोने होते त्यासाठी शिक्षकाचा सहवास अनुभवावा लागतो. मी स्वत:ला या बाबतीत नशीबवान समजतो. मला वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तर जवळ जाता आलेच; पण ज्यांच्या विषयाचा विद्यार्थी नव्हतो, अशा अनेक शिक्षकांच्याही सहवासाचे भाग्य लाभले. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. आजच्या शिक्षक दिनानिमित्त मला वर्गात कधीच शिकवणाऱ्या पण अनेक कौशल्ये शिकवणाऱ्या गुरूंचे अर्थात शाम कुलकर्णी सरांविषयी......                            

--------------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थी मातीचा गोळा असतो. कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यातून भांडी तयार करतो, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. शालेय जीवनात तर शिक्षक मुलांसाठी सर्वस्व असतात. त्या वयात शिक्षकांनी सांगितलेले सारे काही खरे वाटते. आपले वडील एखाद्या विषयाचे कितीही मोठे तज्ज्ञ असले तरी मुलांना शिक्षकांनी शिकवलेली पद्धतीच योग्य वाटते. ‘आमच्या टिचरनी असे सांगितले आहे’, हे वाक्य बहुतांश पप्पा-मम्मीने ऐकलेले असते. पुढे उच्च माध्यमिकचा कालावधी, विद्यार्थी दशेतील अत्यंत कठ काळ. त्या वयात खरे तर काहीच कळत नसते. मात्र आपल्याइतके जगात कोणालाच कळत नाही, असा भ्रम असतो. तो हळूहळू कमी होत जातो. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा सुवर्णकाळ येतो. जबाबदारी काहीच नसते, त्यामुळे स्वप्न पाहायला पूर्ण मोकळीक असते. इथे जाणिवा समृद्ध व्हायला सुरुवात होते. या वयात चांगल्या शिक्षकांचा परिसस्पर्श झाला किंवा आपण गुरूरूपी परिसाच्या जवळ गेलो, तर आयुष्याचे सोने होते. मात्र त्यासाठी शिक्षकाचा सहवास अनुभवावा लागतो. मी स्वत:ला या बाबतीत नशीबवान समजतो. मला वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तर जवळ जाता आलेच; पण ज्यांच्या विषयाचा विद्यार्थी नव्हतो, अशा अनेक शिक्षकांच्याही सहवासाचे भाग्य लाभले. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. आजच्या शिक्षक दिनानिमित्त मला वर्गात कधीच शिकवणाऱ्या पण अनेक कौशल्ये शिकवणाऱ्या गुरूंचे अर्थात शाम कुलकर्णी सरांचे स्मरण होते.


जुलै १९८६ मध्ये मी दयानंद महाविद्यालयात गेलो. पूर्वीपासून माझा ओढाग्रुपकडे होता. त्यामुळे वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांची निवड करण्याचा प्रश्नच नव्हता. त्या वेळी महाविद्यालयात एकापेक्षा एक दिग्गज शिक्षक होते. कला, साहित्य क्षेत्रातील डॉ. नरेंद्र कुंटे मराठीचे शिक्षक संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. पदार्थविज्ञानशास्त्राचे डॉ. धायगुडे सर ( http://drvnshinde.blogspot.com/2019/09/blog-post.html ) आणि धायगुडे मॅडम यांचे वर्तमानपत्रातून विज्ञान विषयावर लेख येत. गणिताच्या डी.जी. आणि एल.जी. कुलकर्णी सरांच्या शिकवण्याचा मोठा दबदबा होता. असेच वनस्पतीशास्त्राचे दोन शिक्षक होते. डॉ. प्रमोद पाटसकर आणि शाम कुलकर्णी सर. दोघे विज्ञानाचे असूनही साहित्याच्या प्रांतात मुक्त संचार करत. विद्यार्थ्याचा विषय असो किंवा नसो, सर्वांना माहित असणारे असे बरेच शिक्षक दयानंदमध्ये होते.

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आम्ही इकडे तिकडे खूप भटकत असू. महाविद्यालयाचा परिसर मोठा. ६५ एकराच्या परिसरात विज्ञान अधिविभागासाठी स्वतंत्र इमारती होत्या. भौतिकशास्त्र, भूगोल आणि भूशास्त्र विषयाची इमारत पूर्व परिसराच्या उत्तर बाजूला होती. मध्येच शिक्षणशास्त्र महाविद्यालय. त्याला जोडून एनसीसीचे शस्त्रागार आणि त्याला बिलगून वनस्पतीशास्त्र विभाग. त्याच्यापलिकडे प्राणीशास्त्र विभाग. सर्वात दक्षिणेकडील भागात रसायनशास्त्र विभाग होता. त्याच्या डोक्यावर सूक्ष्मजीवशास्त्र विभाग. या इमारतींच्या मागे आमचे वसतीगृह होते. आमचे विषय उत्तरेच्या कोपऱ्यात विसावलेले. मात्र वसतीगृहाच्या दक्षिण द्वारातून निघून आम्ही मित्रांना सोडत भौतिकशास्त्र विभागाकडे जात असू. त्या पलिकडे आमच्या विभागातील अन्य विद्यार्थ्यांचा दक्षिण बाजूस संबंध नसे. विभागाच्या स्वतंत्र सूचनाफलकाखेरीज मुख्य सूचनाफलक पश्चिम बाजूच्या परिसरात होता. तिकडे प्राचार्यांचा कक्ष, गणित विभाग, कला विभाग विधी आणि वाणिज्य महाविद्यालये होती. एका भव्य इमारतीच्या मध्ये ग्रंथालय. ग्रंथालयाकडे जाणाऱ्या जिन्याच्या ठिकाणी तळ मजल्यावर मुख्य सूचनाफलक होता. तेथे आठवड्यातून दोन वेळा जाऊन सर्व विद्यार्थ्यांना सूचना पाहाव्या लागत. मोकळ्या जागेत रस्ता आणि झाडे भरलेली होती. या इमारतींची रचना आकाशातून प्रमाणे दिसायची. त्याचे छायाचित्र कला शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षात लावलेले होते. महाविद्यालयाचा परिसर आणि एकूण वातावरण कथा कादंबऱ्यातील वर्णनाप्रमाणे रम्य होते.

प्रवेश घेतल्यानंतर प्रथमच मुख्य सूचनाफलक पाहताना, सर्वात मध्यभागी असलेल्या फलकाजवळ मी थांबलो. तेथे अक्षरमंचनावाचे हस्तलिखित भित्तीपत्रक लावलेले होते. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलले आणि साहित्याने भरलेले भित्तीपत्रक पाहून मनापासून आनंद झाला. अकरावी-बारावीत असताना मी कविता करायचो. कविता म्हणून त्या किती चांगल्या, किती वाईट, हे आज काही सांगता येत नाही. कारण त्या आज माझ्याजवळ नाहीत. मात्र दोन्ही वर्षी बार्शीच्या श्री  शिवाजी महाविद्यालयाच्या नियतकालिकात त्यातील दोन कविता छापल्या गेल्या होत्या. अर्थात त्यामुळे उगाचच भविष्यातल्या महान कवीपणाची स्वप्ने त्या काळी मला पडत असत. असे त्या वयात जवळ जवळ प्रत्येकालाच वाटत असते. आपण लिहू शकतो, यापेक्षा आपले अक्षर खूप चांगले आहे, असाही माझा समज होता. ‘अक्षर चांगले आहे’, असे म्हणणाऱ्या बहुतेकांचे अक्षर खूपच खराब होते. त्यामुळे ते सापेक्षतेनुसार खरे होते. आज माझ्यापेक्षा सुंदर हस्ताक्षर असणारे अनेकजण मला माहीत आहेत. मात्र अक्षराबाबत अनेकांनी सांगितल्याने मलाही असे वाटायचे की, जगातील सर्वात चांगले हस्ताक्षर आपले आहे. अशा सर्व मानसिकतेमुळे या भित्तीपत्रकाचे- अक्षरमंचचे  काम आपण आणखी चांगले करू, असे वाटले.

अक्षरमंचच्या त्या अंकाच्या उजव्या कोपऱ्यावर मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेंद्र कुंटे आणि प्रा. शाम कुलकर्णी यांची नावे होती. त्या खाली संपादक म्हणून दोन विद्यार्थ्यांची नावे होती. एका सिनियरला भेटून अक्षरमंच, कुलकर्णी सर आणि कुंटे सरांची माहिती घेतली. कुलकर्णी सर वनस्पतीशास्त्र विभागातील आहेत, ते कथा खूप छान लिहितात, त्यांचे कथाकथन तर इतके भन्नाट असते की हसून हसून पोट दुखते, असे बरेच काही समजले. नरेंद्र कुंटे सर मराठीचे होते़. कुंटे सर आणि कुलकर्णी सर कोण, ते लांबून पाहून घेतले. का माही नाही पण त्यावेळी कुंटे सरांकडे जायला भिती वाटली. त्यांचा चेहरा करारी होता. त्यांना कसे बोलावे, असा प्रश्न पडायचा. पुढे त्यांच्याशीही अनेकदा खूप चांगला संवाद झाला. पण कुलकर्णी सरांना पाहताच ते आपलेसे वाटले. त्यातच कुंटे सरांचा विभाग सकाळच्या सत्रात असायचा. शास्त्र विषयाच्या विभागांना दहा वाजता जाग येत असे. त्यामुळे मी शाम कुलकर्णी सरांना भेटायचा निर्णय घेतला.

सावळा वर्ण, मध्यम उंची, थोडे जाडसर ओठ असे मध्यम चणीचे कुलकर्णी सर वनस्पतीशास्त्र विभागाच्या शिक्षक कक्षात बसलेले होते. मी रामहरी आगलावे नावाच्या मित्रासह गेलो होतो. आम्हाला बाहेर पाहताच दरवाजाजवळ शिपायानेकाय आहे?’ असे विचारले. मी सांगितले,कुलकर्णी सरांना भेटायचे आहे.त्याने सरांना निरोप देताच ते लगेच उठून बाहेर आले. ‘आपल्याकडे आलेल्या मुलांचा वेळ जाऊ नये आणि इतर शिक्षकांना त्रास होऊ नये,म्हणून ते नेहमी असे करत, हे नंतर आमच्या लक्षात आले. हा माझ्यावर झालेला पहिला संस्कार होता. मी आजही मला भेटायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच ताकळत ठेवत नाही. अगदी कुलसचिवपदी कार्य करत असतानाही हे कटाक्षाने पाळले. सर आम्हाला प्रयोगशाळेत घेऊन गेले आणिहं बोला, काय काम आहे’, असे विचारले. मी माझा परिचय करून दिला आणि अक्षरमंचचे काम करायचे असल्याचे सांगितले. सरांनी विचारले, ‘काय लिहिता?’ मी महान कवी असल्याच्या विर्भावात सांगितले, ‘कविता करतो.आमच्या मित्राने पुढे सांगितले, ‘सर, त्याचे अक्षर खूप चांगले आहे.अक्षर चांगले आहे आणि कविता करतो म्हटल्यावर सरांनी परीक्षा घ्यायचे ठरवले असावे.

सर पुन्हा शिक्षक कक्षात गेले आणि एक लेख घेऊन आले. मागच्या वर्षीच्या कुठल्या तरी मुलाने दिलेला, वापरलेला लेख होता तो. दोन कागदही दिले. त्या कागदावर तो व्यवस्थित लिहून आणि सजवून आणायला सांगितले. मी रात्री लगेच रंगीत पेन, स्केच पेन वापरून त्याला जास्तीत जास्त आकर्षक वाटेल, असे सजवले. तो घेऊन दुसऱ्या दिवशी सरांना शोधू लागलो. त्या दिवशी सर आले नव्हते. मला ते कधी एकदा सरांना दाखवेन, असे झाले होते. मात्र एक दिवस प्रतीक्षा करावी लागणार होती. तिसऱ्या दिवशी सरांना भेटलो. ते दाखवले. सरांनी प्रथम अक्षर चांगले असल्याचे सांगितले. नंतर डिजाइनचासेन्चांगला असल्याबद्दल कौतुक केले. नंतर मला स्टूलवर बसायला सांगितले आणि ड्रॉवरमधून स्केचपेन काढून कोऱ्या कागदावर मी जसे लिहिले होते, तसेच मात्र वेगळ्या रंगाच्या पेनने लिहिले. म्हणाले, ‘तू जी रंगांची संगती लावली ती आणि आता मी काढताना वापरलेली रंगसंगती यातील डोळ्यांना चांगली कोणती चांगली वाटते ते पाहा’. अर्थातच सरांनी केलेली रंगसंगती धिक नेत्रसुखद होती. सर पुढे म्हणाले, ‘आता रंगांची अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स तयार करून समोर ठेवायची आणि दुसऱ्याच कोणीतरी काढली आहेत, असे समजून त्यातील कोणते चांगले वाटते, ते आपणच ठरवायचे. आपण आपल्याच गोष्टीकडे तटस्थपणे पाहायला लागलो, की आपल्या चुका आपल्याला कळतात. स्वतःत सुधारणा करू शकतो. तेव्हा आपली कला इतरांपुढे सादर करण्यापूर्वी आपण तटस्थपणे त्याकडे पाहायलाशिकले पाहिजे.हा कुलकर्णी सरांचा महत्त्वाचा संदेश मला अनेक टप्प्यांवर आठवतो आणि प्रशासकीय जीवनातही उपयोगी पडतो.

त्यानंतर नरेंद्र आंभोरे यांच्यासमवेत अक्षरमंचसंपादनाची जबाबदारी १९८६ मध्येच माझ्यावर सोपवली गेली. पुढची दोन वर्षे मी सिनियर झालो. इतर विद्यार्थ्यांनी मला साथ दिली. पहिला अंक कधी निघेल, असे मला झाले होते. तो काढला आणि सर्वांना आवडलाही. त्यानंतर त्या महिन्यात कोणाची पुण्यतिथी आहे, कोणाची जयंती आहे. महिन्याभरात कोणती महत्त्वाची घटना घडली आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेणे, लिहित्या मुलांंकडून लेख मागवायचे, त्यासाठीच्या सूचना लावायच्या, आलेल्या लेखांची छाननी करून आपल्या मतासह कुलकर्णी सरांना दाखवायची. हे सलग तीन वर्षे केले. अक्षरमंच आपण एकटे पाहात नाही, तर कुंटे सरही त्याचे भाग आहेत, हे कुलकर्णी सर कधीच विसरत नसत. सर्व लेख आणि आम्हाला घेऊन ते कुंटे सरांकडे जात. त्यांच्याकडून सर्व लेखांची, कवितांची आणि छायाचित्रांची निवड अंतिम करून घेत. कुंटे सर त्या लेखातील व्याकरणाच्या चुका आणि अपवादात्मक परिस्थितीत शब्द दुरूस्ती करून देत. त्याबरहुकूम लिहावे लागत असे. अध्यापन, संशोधन किंवा इतर बाबी सांभाळत त्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत असे. ‘वेळ नाहीहे वाक्य या शिक्षकद्वयांकडून आम्हाला कधीच ऐकायला मिळाले नाही.

अनेकदा कामासाठीचे ड्रॉइंगशिट मिळायचे नाही, कधी स्केचपेन संपत, अशा वेळी कुलकर्णी सर खिशातील पैसे काढून देत. आम्हाला वाटायचे, याचे त्यांना ऑफिसकडून पैसे मिळत असतील. मात्र पुढे माहीत झाले की ती सरांची पदरमोड होती. कारण अशा खरेदीचे बिल त्यांनी मच्याकडे कधीच मागितले नाही आणि बिल नसेल तर कोणतेही कार्यालय पैसे दा करत नाही. दर महिन्याला एक अंक निघावा, असा त्यांचा कटाक्ष असे आणि त्यासाठी त्यांनी केलेली ती पदरमोड असे.  

आमच्याकडून उशी झाला की त्यांचा निरोप आलाच म्हणून समजायचे. स्वत: कलाक्षेत्रात रमणारे असूनही विलंब त्यांना चालत नसे. अक्षरमंचचा अंक तयार झाला की, प्रथम तो कुलकर्णी सरांना दाखवला जात असे. त्यामध्ये काही चुका आहेत का, हे ते तपासून पाहात. त्यानंतर तो कुंटे सरांना दाखवला जात असे. कुंटे सरांनीठी आहे’, म्हटल्यावर तो सूचनाफलकावर लावला जाई. १९८८ मध्ये एक अंक असाच दाखवला. अगोदर फायनल केलेले सर्व लेख आणि कविता लिहिल्यानंतर थोडी जागा शिल्लक राहिली होती. त्या जागेवर अंतिम निवडीत नसणारी एक छोटी कविता मी लिहिली. कुलकर्णी सरांच्या ते लगेच  लक्षात आले. त्यांनी तो अंक पुन्हा लिहायला लावला. तसेच पुन्हा असे करायचे नाही’, हे निक्षून सांगितले. आपण सर्वजण मिळून काम करत असताना सर्वांनी मिळून निर्णय घेतल्यानंतर तो कधीही एकट्याने बदलायचा नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच बदल केला पाहिजे, हा धडा त्यावेळी रागावता दिला. प्रशासनात आल्यानंतर या गोष्टीचाही मला खूप फायदा झाला.

लेखांची निवड कशी करायची, त्यांचे संपादन कसे करायचे, हे सर्व सरांसोबत काम करताना हळूहळू लक्षात ये लागले. लेखनात सुधारणा करताना मूळ लेखकाच्या मताचा पूर्ण सन्मान झाला पाहिजे, या गोष्टींची जाणी झाली. महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकात प्रसिद्ध होणाऱ्या लेखातील मते सकारात्मक असावीत, त्यात विखारीपणा नसावा, भाषा ही बोलीभाषा असली तरी ती त्याबरहुकुम असावी, अशा अनेक गोष्टी सर सांगत. ‘अक्षरमंचत्या काळात खूपच चर्चेत आला. त्यावेळी तरूण भारत (सोलापूर) हे दैनिक दर बुधवारीमध्यमानावाची खास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी प्रकाशित करत असे. ‘अक्षरमंचच्या कामामुळे मध्यमा पुरवणीचे काम मला मिळाले. त्या निमित्ताने तरूण भारतमध्ये जाऊ लागलो. विवेक घळसासी सर त्यावेळी संपादक होते. त्यांना सुरुवातीला लांबून पाहात असे. मात्र नंतर त्यांच्याशी संवाद सुरु झाला. पुढे विज्ञान दिन पुरवणीमुळे स्नेह आणखी दृढ झाला. ‘केसरीमध्ये आमचे मित्र अरूण लोहकरे होते. त्यामुळे १९८६ पासून मी अधूनमधून वृत्तपत्रातून लिहू लागलो. विद्यार्थी दशेतील सर्व लेख डॉ. धायगुडे सरांच्या मार्गदर्शनाखाली लिहायचो. प्रसिद्ध झालेल्या लेखांवर शाम कुलकर्णी सरांची आवर्जून प्रतिक्रिया असायची. त्या काळात सारे काही उत्साहाच्या भरात चाललेले असायचे. या उत्साहात होणारी चूक सांगायला व सुधारायला शाम कुलकर्णी सर असायचे. रामानुजन यांच्यावर मीगणितातील अढळ ध्रुव रामानुजननावाचा लेख केसरी लिहिला. त्यावेळी भेटल्यानंतर कुलकर्णी सरांनी प्रथम लेखाचे कौतुक केले. नंतर म्हणाले, ‘शीर्षकात मात्र चूक झाली. अरे ध्रुव अढळच आहे. हे शीर्षक गणितातील ध्रुव रामानुजनएवढेच हवे होते. अशा चुका टाळल्या पाहिजेत. ‘अक्षरमंचच्या संपादकाकडून अशा चुका अपेक्षित नाहीत.तेव्हापासून शीर्षक लिहिताना खूप विचार करू लागलो. अनेकदा शीर्षक अगोदर तयार असते. तरीही आजदेखील महत्त्वाच्या लेखांचे शीर्षक जवळच्या मित्रांशी चर्चा करून अंतिम करतो. अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून सरांनी कळत-नकळत माझ्यावर अनेक संस्कार केले. त्यातून लेखन कला विकसि व्हायला मदत झाली. त्यामुळे डॉ. धायगुडे सर आणि मॅडम यांच्याप्रमाणेच शाम कुलकर्णी सरही लेखन संस्काराबाबत माझ्यासाठी गुरूस्थानी आहेत आणि अखेरपर्यंत राहतील. महाविद्यालयात विविध निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित होत. त्यामध्ये मीच नव्हे, तर कोणत्याही विद्यार्थ्याला बक्षीस मिळाले की सर आवर्जून कौतुक रून प्रोत्साहन देत.

सर, कथाकथन खूप छान करायचे. पु.. देशपांडे, .पु. काळे यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या कार्यक्रमाचे मुक्तपणे कौतुक केले होते. कितीही विनोदी प्रसंग असला तरी चेहऱ्यावर हास्य दिसू देता सहजपणे ते सांगत आणि श्रोत्यांना खळखळून हसवत. दरवर्षी वसतीगृहात त्यांचा एक कार्यक्रम आवर्जून होत असे. त्यावेळी वसतीगृहातील हॉल तुडुंब भरलेला असे. सोलापुरात नोकरी करणाऱ्या कुलकर्णी सरांनी हुबळी, जालना, लातूर, पाटण, लांजा, निपाणी, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी शंभरावर प्रयोग केले होते. ‘रसिका आवडे विनोदहा त्यांचा कार्यक्रम से, तेव्हा तर श्रोत्यांची तोबा गर्दी हो. हे कौशल्य त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून विकसि केले होते.

सरांचे शिकवणेही खूपच चांगले होते. वनस्पतीशास्त्राचे शिक्षक म्हणून पानांची हिरवाई त्यांनी पूर्ण आत्मसात केली होती. त्यांचे दर्शनच मनाला प्रसन्न करणारे होते. त्यांचे वर्गातील शिकवणे हे रंजक किश्श्यांनी आणि खुमासदार शैलीने भरलेले असायचे, असे आमच्या बॅचचे वनस्पतीशास्त्र विषयाचे विद्यार्थी मित्र सांगायचे. मलाही त्यामुळे आपण सरांचे विद्यार्थी असायला हवे होते, असे वाटायचे. त्यांच्याकडे फक्त पानांचा हिरवटपणा नव्हता, तर, फुलांच्या पाकळ्यांची कोमलताही होती. त्यामुळे त्यांचे बोलणे कोणाला दुखावत नसे. महाविद्यालयात ते एखाद्या टपोऱ्या गुलाबासारखे असायचे. मात्र एवढ्या गोड आणि विद्यार्थीप्रिय सरांना मधुमेहासारखा एक काटा (ज्ञात) जोडला गेला होता. त्यांच्या गोड खाण्यावर बंदी होती. मात्र घरापर्यंत पोहोचणारे कोणी नसले की ते कधी-कधी गोड खात. ‘मधुमेहाला एवढे चालते रे,असे म्हणत. त्यांना आणखी एक कला अवगत होती. विद्यार्थ्याचा चेहरा वाचून तो अडचणीत आहे, हे सर ओळखायचे. प्रयोगशाळेत बोलावून त्याची अडचण समजून घेऊन आपल्या परीने मदत करायचे. त्यांनी केलेली मदत कधी कोणाला कळत नसे.

शाम कुलकर्णी सर म्हणजे चैतन्याचा झरा होते. त्यांच्या घरी कधी जाण्याचा योग आला नाही. आमचा संबंध महाविद्यालयामध्येच येत राहिला. त्यामुळे मला त्यांची इतर कौटुंबिक माहिती नाही. पदवीनंतर आमचे कॉलेज संपले. विद्यापीठात एम.एस्सी. करत असताना १९९१ मध्ये सरांचे निधन झाल्याचे समजले. काही दिवसांनी डॉ. नरेंद्र कुंटे सरांनी त्यांच्यावरउत्साहसूर्य अवेळीच अस्ताला गेलाया शीर्षकाचा ३० जानेवारीच्या दैनिकात लिहिलेला लेख वाचायला मिळाला. त्यामध्ये कुंटे सरांनी त्यांच्याविषयी खूप हळवेपणाने लिहिले आहे. त्यातील एक प्रसंग येथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. साताऱ्याला वसंत व्याख्यानमालेत कुंटे सरांचे व्याख्यान होते. व्याख्यानानंतर कुलकर्णी सर त्यांना भेटले. त्यावेळी ते प्रात्यक्षिक परीक्षेचे परीक्षक म्हणून साताऱ्याला गेले होते. व्याख्यानाचा फलक पाहून ते व्याख्यानाला उपस्थित होते. कुंटे सरांनी व्याख्यानाअगोदर का भेटला नाहीत, असे विचारले. त्यावर कुलकर्णी सरांनी सांगितले, ‘अनोळखी श्रोत्यांपुढे व्याख्यान अधिक रंगते, म्हणून नाही भेटलो.स्वत: अनेक कार्यक्रमात श्रोत्यांना खिळवून ठेवणारे कुलकर्णी सर इतरांच्या सादरीकरणाची अशी काळजी घेत. ते स्वत: उत्कृष्ट कलावंत तर होतेच; पण, चांगले रसिकही होते. त्यामुळेच वक्ता जवळचा मित्र असूनही त्याच्या सादरीकरणाची काळजी त्यांनी घेतली.

मोठेपणा आव बाळगणारे, चांगल्याचे कौतुक करणारे, चु हळूवार निदर्शनास आणणारे, अचूकतेचा आग्रह धरणारे, विद्यार्थ्यांचा उत्साह टिकून राहावा म्हणून पदरमोड करणारे, इतरांचा सन्मान कसा जपावा, याचा नकळत संस्कार करणारे, स्वत:चे दु: झाकून इतरांना खळाळून हसवणारे, अडचणीच्या प्रसंगही विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणारेकुलकर्णी सर. सरांनी प्रत्यक्ष वर्गात फळ्यावर पानाफुलांच्या आकृत्या काढायला आणि रेषा मारायला मला कधी शिकवले नाही. मात्र साहित्य समजून घ्यायला, त्यातील चुका शोधायला, स्वत:चे लेखन स्वत: तपासायला, रंगसंगती निवडायला शिकवले. लौकिकार्थाने माझे थेट शिक्षक नसणाऱ्या मात्र प्रत्यक्ष जीवनात अनेक गोष्टी शिकवणाऱ्या, अवेळीच अस्ताला गेलेल्या या सच्च्या गुरूला शिक्षक दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!