शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

शेती तंत्राचे वर्तुळ

 

शेती चांगली पिकायची. अन्नधान्याचे व्यवस्थापनही नेटके केले जात असे. त्यामुळेच ब्रिटिशांची सत्ता येण्यापूर्वी मोठे दुष्काळ पडूनही अन्नधान्याची कमतरता आणि उपासमारीने मृत्यू या उपखंडाला जाणवले नाहीत. आज ज्याला आपण सेंद्रीय शेती म्हणतो, तीच शेतीपद्धती पूर्वीपासून भारतात राबवली जात असे. शेतातील पालापाचोळा हा कुजवून त्यापासून खत मिळवून ते मातीत मिसळले जायचे. सेंद्रीय शेतीच्या पुरस्काराने भारतीय कृषी क्षेत्राचे एक वर्तुळ पूर्ण होत आहे… 
शेतीप्रगती मासिकाच्या २०२२ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख…

_________________________________________________________


पृथ्वीची निर्मिती ही एका महास्फोटातून झाली. स्फोट झाला त्यावेळी पृथ्वीसह अन्य सर्व ग्रह तप्त वायुंचे गोळे होते. या गोळ्यांना स्वत:भोवती गती होती. त्या गतीसह हे गोळे सुर्याभोवती फिरत राहिले. अनेक वर्षे असे फिरत असताना, हळूहळू ते गोळे थंड होत गेले. तापमान कमी होत असताना त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रक्रिया घडल्या, की ज्यातून विविध मूलद्रव्यांची निर्मिती झाली, हे अजून नेमकेपणाने कोणी सांगितलेले नाही. सूर्यामध्ये असणाऱ्या घटकांचेच हे तप्त गोळे होते, मात्र त्यातील ऊर्जाक्षय झाला. ते थंड झाले. मात्र त्यातून आत पृथ्वीसह अन्य ग्रहावर आढळणारी मूलद्रव्ये कशी बनली, याची उकल अजून झालेली नाही. ते काहिही असले, तरी आज हा सिद्धांत बहुतांश संशोधक मान्य करत आहेत. तर
, महास्फोटात पृथ्वी तयार झाली. ती थंड होत गेली. ती थंड झाल्याने भूपृष्ठ तयार झाले. तरीही पोटातील तप्त लाव्हा ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर येत असे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून उंच पर्वत आणि खोल समुद्र बनले. थंड होण्याच्या प्रक्रियेत तयार झालेले पाणी खड्ड्यात जाउन साठले आणि समुद्र तयार झाले. या समुद्रातील पाण्यामध्ये प्रथम एकपेशीय आणि नंतर बहुपेशीय जीव बनले. यामध्‍ये अमिबासारखे एकपेशीय जीव प्रथम तयार झाले. पुढे शैवालासारख्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती अस्तित्वात आल्या. त्यानंतर जलचर, पुढे उभयचर जीव तयार झाले, असे मानले जाते. उभयचरांपासून सरपटणारे प्राणी, पुढे भूचर, पक्षी बनले. तसेच वनस्पतींचेही उत्क्रांत पावणे सुरू होते. पाण्यात वाढणाऱ्या शैवालांपासून जमिनीवर वाढणाऱ्या वेली विकसीत झाल्या. त्यानंतर झाडे बनली. प्राण्यांमध्ये असणारा मानव हा वानरापासून उत्क्रांत झाला, असे डार्विनचे म्हणणे आज जगाने स्विकारले आहे.

मानवही इतर प्राण्याप्रमाणे प्रथम चार पायावर चालत होता. तो निसर्गात मिळणाऱ्या वनस्पतींची पाने, फळे खाऊन आपली भूक भागवत होता. कंदमुळे, फळे आणि पाने खात जगताना काही प्राणी इतर प्राण्यांना मारून आपली भूक भागवताना दिसले आणि तोही शिकार करू लागला. मांसाहार करू लागला. हळूहळू त्यांने चार पायावरील तोल दोन पायांवर सांभाळण्याची कला विकसीत केली. हा सर्वात मोठा महत्त्वाचा क्षण होता. मानवाचे डोके आणि जमीन यामधील अंतर वाढले आणि मानवांचा मेंदू आधिक कार्यक्षमतेने कार्य करू लागला. त्यातून त्याला कष्ट कमी करण्याचे वेध लागले. उन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण हवे होते. यासाठी तो एकाच ठिकाणी निवारा करून राहू लागला. निवाऱ्यासाठी त्यांने नदीकाठची जागा निवडली. सुरक्षीत ठिकाणी तो गवत, लाकडाचा वापर करून झोपड्या बनवू लागला. अनेकदा झाडावर निवारा बनवू लागला.

मानवालाच नव्हे, तर सर्वच सजीवांना जगण्यासाठी लागणाऱ्या तीनच मूलभूत गोष्टी आहेत. अन्न, पाणी आणि हवा. हवा, आणि पाणी निसर्ग सहज पुरवत होता. मानवाच्याही याच तीन मूलभूत गरजा. या पूर्ण करण्यासाठी त्याला कष्ट करावे लागत होते. शिकारीसाठी, फळे, कंदमुळे मिळवण्यासाठी त्याला जंगलात जावे लागे. वणवण फिरून अन्न मिळवावे लागे. कधीकधी शिकारीविना परतावे लागत असे. ही अनिश्चितता त्याला नको वाटे. हे कष्ट कमी करण्यासाठी, अन्नाची शाश्वती ‍निश्चित करण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये खाण्यायोग्य कोणत्या वनस्पती आहेत, याचा शोध सुरू केला. ‍जगाच्या शेतीचा शोध घेतानाही हाच निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. महिलाच अशा वनस्पतींचे बियाणे राखून ठेवत. ते बियाणे दुसऱ्या वर्षाच्या हंगामात पेरता येते आणि त्यापासून उत्पन्न घेता येते हेही महिलांनीच शोधले. नेमके किती बियाणे पेरावे, त्यापासून किती उत्पन्न मिळणार, याचा त्यांनी अंदाज येऊ लागला आणि खऱ्या अर्थाने अन्ननिर्मितेचे म्हणजेच शेतीचे तंत्र मानवाच्या हाती आले. अर्थात त्या काळात शेतातील सर्व कामे हातानेच केली जात असत.

शेतीची सुरुवात साधारण दहा हजार वर्षांपूर्वी मध्यपूर्व भागात झाली. यामध्ये आजचे इस्राईल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्तान, कुवेत, इराक, इराण या देशांचा समावेश होतो. सुरुवातीच्या काळात त्यांने गहू, आईन कॉर्न, जवस अशा धान्यप्रकारांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मसूरसारख्या कडधान्याचेही उत्पादन घेण्यात येत असे. त्यानंतर वाटाण्याची शेती होऊ लागली. पशूपालनास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ शेळ्या आणि मेंढ्या पाळल्या जात. त्याबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश झाला. या भागातून शेतीचा प्रसार उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, आणि आशिया खंडामध्ये झाला.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर सुमारे ३५०० वर्षांनी भारतात शेतीची सुरुवात झाली. निकोलाय व्हॅव्हिलाव या रशियन संशोधकाने जगभरातील शेतामध्ये सुरुवातीच्या काळात पिकवल्या जाणाऱ्या पिकांविषयी संशोधन केले. जगभरातील शेतीच्या सुरुवातीच्या क्षेत्रांमध्ये दक्षीण भारताचा समावेश होतो. या भागात पिकवल्या जाणाऱ्या पिकामध्ये तांदूळ, मूग, उडीद, तूर, हरभरा, चवळी इत्यादी तृणवर्गीय पीके लावली जात. वांगी काकडी, मुळा, इत्यादी भाज्या लावल्या जात. यामध्ये ऊस, तीळ, करडई, ताग, काळे मिरे, दालचिनी इत्यादी पिकांचाही समावेश आहे. आंबा, चिंच, संत्रा, लिंबू या फळांचाही अन्न म्हणून समावेश आहे. भारतात पिकवली जाणारी शेती ही सेंद्रीय शेती होती. शेतीसाठीची जमीन अदलून बदलून वापरण्यात येत असे. बियाणे पिकातूनच वेगळे काढले जात असे. भारतीय शेतीमध्ये मातीचा कस टिकवून ठेवण्यामध्ये मोठे महत्त्व होते. शेतामध्ये अनेक पिके एकाच क्षेत्रात लावण्यात येत असत. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तूरीमध्ये उडीद, मूग, चवळी इत्यादी कमी उंचीची पिके आडपट्ट्यामध्ये घेतली जात असत. भारतीय शेती पद्धतीमध्ये जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल राखण्यावर मोठा भर दिला जात असे. जंगलाची शेती पिकवण्यामध्ये असणारी भूमिका माहिती असल्याने ग्रामवन किंवा देवरायांना जपण्याकडे ग्रामस्थ लक्ष देत. अगदी प्राचीन काळापासून तलावांची निर्मिती आणि तलावांचे पाणी पाटाने शेतीला पुरवण्याकडे ग्रामस्थ लक्ष देत. उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाले की गाळ काढून तो शेतातील मातीमध्ये मिसळण्यात येत असे. जेथे तलावाचे पाणी जात नसे, त्या भागात शेत जमिनीच्या कडेला झाडे लावून ओलावा टिकवण्याचे तंत्र, त्यांना माहीत होते. झाडांच्या ओलाव्यावर रब्बी पिके पिकवण्यात येत असत. अशा जमिनीत कोणती पिके घ्यायची, याचे शास्त्र अवगत झाले होते. अनुभवाच्या आधारे मिश्र पिके कोणत्या जमिनीत कोणती आणि कशी लावावीत, याच्या पद्धती त्यांनी समजून घेतल्या होत्या. पिकांचा फेरपालट करून जमिनीचा कस टिकवून असत. पिके कधी काढावीत, त्यांची मळणी कशी करावी, याच्या पद्धती भारतातील शेतकऱ्यांनी विकसीत केल्या होत्या. काढलेले धान्य साठवण करण्यासाठी भारतातील शेतकरी जमिनीखाली गोदाम तयार करत. ज्वारीसारखी धान्ये त्यामध्ये दोन-तीन वर्षे सहज टिकत. मूग, उडिद, तूरीसारख्या कडधान्यापासून डाळ बनवण्याची प्रक्रिया विकसीत करण्यात आल्या. या सर्व प्रक्रिया निसर्गस्नेही होत्या. पिक काढल्यानंतर उरणारा जैविक कचरा  जनावरांना खाद्य म्हणून वापरत. उर्वरीत भाग हा खोल खड्ड्यात कुजवून त्यापासून खत बनवले जाई. जनावरांपासून मिळणारे शेणादी मलमूत्र हे ही त्याच खड्ड्यात कुजवून खत म्हणून वापरले जात असे. या शेती पद्धतीतून मिळणारे उत्पादन भरपूर होते. प्रती हेक्टर चार ते सहा टन धान्य उत्पादन निघत असल्याचे दाखले मिळतात. त्यावेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे उत्पादन खूप जास्त होते. हे धान्य पेवामध्ये पुरून ठेवत. या धान्याचा उपयोग अवर्षण काळात करण्यात येत असे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याकडील असे अतिरिक्त धान्य खरेदी करत आणि किल्ल्यावर साठवून ठेवत. पावसाळ्यापूर्वी किल्ल्यावरून बियाणे आणि घोडे आणि अन्य प्राण्यापासून बनलेले खत पुरवण्यात येत असे. अन्नधान्याचे इतके मोठे उत्पादन होते की इंग्रजांची सत्ता येईपर्यंत गत दोन हजार वर्षांत बावीस मोठे दुष्काळ पडले, मात्र अन्नधान्याची कमतरता जाणवली नाही. अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे जिवित हानी झाल्याच्या नोंदी नाहीत.   

इंग्रजाचा भारतात सर्वत्र अंमल सुरू होईपर्यंत भारतातील शेती आणि शेतीपद्धती समृद्ध होती. भीषण दुष्काळ पडले असूनही अन्नधान्याची टंचाई झाली नाही. पाण्याचीही उपलब्धता होती. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या काळातही भारतातील खेडी अन्नधान्य आणि शेतीव्यवस्थापनामध्ये स्वायत्त होती. मात्र इंग्रजांचा अंमल सुरू झाला आणि त्यांनी येथील सर्व संसाधनांची लूट सुरू केली. त्यांनी प्रथम जंगलांची मालकी शासकीय केली. जंगलातील सागासारख्या टिकाऊ लाकडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. त्यांच्या जागेवर नव्याने लागवड मात्र झाली नाही. शेतावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात येऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. जो शेतसारा पाच टक्केपर्यंत असायचा, तो पन्नास ते साठ टक्केपर्यंत वाढवण्यात आला. खेड्यांतील गावकऱ्यांना गरजेची असणारी पिके न लावता नीळ, कापूस, ऊस, भुईमूग अशी नगदी पिके लावण्याची सक्ती करण्यात येऊ लागली. उत्पादन निघो किंवा न निघो शेतसारा भरणे सक्तीचे असायचे.   

इंग्रजांच्या या धोरणाने भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दुसरीकडे शेतकऱ्यांना सहाय्य करण्याच्या नावाखाली इंग्रज सरकारच्या आश्रयाने जमिनदार आणि सावकारांचे पेव फुटले. शेतकरी कर्जबाजारी बनले. कर्ज न फेडता आल्याने शेतकरी आणखी त्रस्त झाला. जमिनींची मालकी सावकार आणि जमिनदारांकडे जाऊ लागली. यामुळे खेड्यांमध्ये दारिद्र्य वाढले. भारतातील शेतकऱ्यांची आणि शेतीची प्रचंड हानी झाली. ब्रिटीश सत्तेच्या काळात एकूण अकरा दुष्काळ पडले. तोपर्यंत भारतातील अन्नधान्य निर्मिती, साठवण आणि वितरण व्यवस्था पूर्णत: बदलली होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात  पडलेल्या बिहार आणि पश्चीम बंगालच्या दुष्काळामध्ये मोठी जिवीत हानी झाली. या दुष्काळात लोकांचे झालेले हाल आणि लाखोंची जिवितहानी वाचताना आजही अंगावर शहारे येतात.

तोपर्यंत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये रासायनिक खतांचा शोध लागला. त्यांचे कारखाने निर्माण झाले. उत्पादन वाढीसाठी या खतांचा वापर करून जास्त उत्पादन काढता येते, असा या खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा दावा होता. भविष्यात याचे काय परिणाम होणार आहेत, याचा विचार कोणीच केला नाही. भारतातील पारंपरिक शेती पद्धती आदिम आहे आणि यांना आधुनिक शेतीपद्धती शिकवण्याची गरज आहे, असे इंग्रज सरकारला या कंपन्यांनी पटवून दिले. इंग्रज शासनाने तेथील कृषी संशोधकांना भारतियांना आधुनिक शेतीपद्धती शिकवण्यासाठी पाठवण्याचे धोरण स्विकारले. अल्बर्ट हॉवर्ड असेच एक संशोधक होते. ते भारतात आले आणि येथील पारंपरिक शेती पद्धतीच्या प्रेमात पडले. ज्या कामासाठी त्यांना भारतात पाठवण्यात आले होते, ते काम ते करत नाहीत, उलट भारतीय शेती पद्धतीचा पुरस्कार आणि प्रसार करत आहेत, अशा हॉवर्ड यांच्याविरूद्ध तक्रारी करण्यात आल्या. यामध्ये कंपन्याना त्यांची उत्पादने विकायची होती. हॉवर्ड यांचे वर्तन मात्र कंपन्यांच्या ध्येयधोरणाच्या विरूद्ध होते. ते पारंपरिक भारतीय शेती पद्धतीच योग्य असल्याचे प्रतिपादन करत. त्यांच्या शेती पद्धतीची फळे इंग्लंडच्या महाराणीने चाखली आणि हॉवर्ड यांना शिक्षा करणे तर दूरच, उलट त्यांना ‘सर’ ही पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. हॉवर्ड यांच्या या प्रयत्नांना सर्वमान्यता मिळण्याऐवजी रासायनिक खत कंपन्यांनी भारतीय शेती पद्धती आणि हॉवर्ड यांच्यावर टिकेची झोड उठवली. मोठी बदनामी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात जगातील बहुतांश राष्ट्रे कंगाल झाली. इंग्लंडही याला अपवाद नव्हते. इंग्रजांनाही सूर्य कधीही न मावळणारे साम्राज्य सांभाळणे कठीण झाले आणि भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र तोपर्यंत भारतीय कृषीक्षेत्राची पूर्ण वाट लागली होती.     

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेतीकडे लक्ष देणे गरजेचे होतेच. सरकारनेही त्यादृष्टिने प्रयत्न सुरू केले. भारत सरकार, संशोधक या सर्वांनीच भारतीय शेती पद्धतीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सेंद्रीय शेतीची फळे तत्काळ मिळत नाहीत. त्यासाठी वाट पाहावी लागते. शेतीचे उत्पादन वाढेपर्यंत लोकसंख्या वाढ मात्र थांबली नाही. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. इंग्रजानी बदललेल्या शेती पद्धतीतून शेतकरी आणि शेती रातोरात बाहेर पडू शकत नव्हते. त्यातच स्वातंत्र्य पडल्यानंतर पाठोपाठ काही दुष्काळाची वर्षे आली. पुरेसे अन्न न ‍मिळाल्याने काही प्रमाणात जिवितहानी झाली. पुढे अन्नधान्याची आयात करण्यात येऊ लागली. १९७२ च्या दुष्काळापर्यंत अशी अन्नधान्याची आयात करणे क्रमप्राप्त झाले. अमेरिकेसारखी राष्ट्रे भारताला अन्न विकतानाही मुजोरी दाखवत. भारताला अक्षरश: याचकाप्रमाणे धान्य विकत घेण्यासाठीही मिनतवाऱ्या कराव्या लागत. या सर्व परिस्थितीची जाण आणि भान असणारे डॉ. स्वामीनाथन हे त्यांच्या कर्तृत्वाच्या परमसीमेवर होते. त्यांच्याखेरीज इतरही कृषी संशोधक कृषी उत्पादन वाढावे, यासाठी प्रयत्न करत होते.

जानकी अम्मल यांनी भारतीय ऊसाचा गोडवा वाढवला होता. ऊसाचे संकरीत वाण तयार केले. शर्करेचे जास्त प्रमाण असणारे ऊसाचे वाण तयार करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. कृष्णस्वामी रामय्या यांनी संकरीत वाण निर्मितीचे तंत्र अवगत असणारे अनेक संशोधक घडवले. बेंजामीन पिअरी पाल यांनी तर भाताबरोबर गुलाब आणि बोगनवेलीच्या असंख्य वाणांची निर्मिती केली. दिलबागसिंग अठवाल यांनी ‘कल्याण सोना’सारख्या आजही सुप्रसिद्ध असणाऱ्या गव्हाच्या वाणाची निर्मिती केली. एम.व्ही. राव यांनी भारत तेलबियांच्या उत्पादनात स्वंयपूर्ण व्हावा, यासाठी योगदान दिले. बद्रीनारायण बारवाले यांच्यासारख्या शेतकऱ्यांने बीजनिर्मिती आणि वितरण व्यवस्था महिकोच्या माध्यमातून भक्कम केली. संशोधकांचे असे प्रयत्न सुरू असताना दादाजी खोब्रागडे यांच्यासारखा शेतकरी आपल्या कल्पक डोक्याने संकरीत वाणांची निर्मिती करत होते. आजही प्रसिदध असलेला ‘एचएमटी तांदूळ’ दादाजींची भारताला सर्वात मोठी देणगी आहे. मद्रास भागात जी. नमलवार हे सेंद्रीय शेतीचा सर्वत्र प्रसार करत होते. संशोधक आणि शेतकरी शेतीत नवे प्रयोग करत असताना दुसरीकडे आधिकाधीक क्षेत्र शेतीखाली यावे यासाठी सरकार प्रयत्न करत होते.

तोपर्यंत भारतातील बहुतांश शेती ही निव्वळ पावसावर अवलंबून होती. त्यामुळे बहुतांश क्षेत्रामध्ये एकच पीक घेतले जात असे. वर्षभर शेती पिकवायची असेल तर त्यासाठी पाण्याची गरज होती. यासाठी जायकवाडी, उजनी, कोयना ही जशी महाराष्ट्रामध्ये धरणे बांधण्यात आली, तशीच ती देशभर बांधण्यात आली. यामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले. तरीही शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत नव्हते. संशोधकांनी संकरीत वाणही बनवले होते. मात्र हे प्रयत्न वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यास पुरेसे पडत नव्हते. स्वामीनाथन जगभरात अन्नधान्याच्या उत्पादनवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष ठेवून होते. अमेरिका आणि जपान या राष्ट्रांनी या क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली होती. स्वामीनाथन यांनी श्रीमंतीच्या तोऱ्यात वावरणाऱ्या अमेरिकेकडे मदतीचा हात मागण्यापेक्षा जपानकडे सहकार्य मागितले. मात्र जपानमध्ये झालेल्या क्रांतीमागे नॉर्मन बोरलॉग यांचेच सहकार्य होते. जपानच्या संशोधकांनी मदत तर केलीच पण त्यांनी जपानकडून मिळणाऱ्या वाणांपेक्षा नॉर्मन बोरलॉग यांच्याकडील बियाणे भारतीय वातावरणात जास्त उपयुक्त ठरतील असे कळवले.

स्वामीनाथन यांनी बोरलॉग यांच्याकडे बियाणे पाठवण्याची विनंती केली. विश्वकल्याणाचा विचार करणाऱ्या बोरलॉग यांनी ती मान्य केली. बियाणे पाठवले. स्वत: भारतात येऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना शांततेचे नोबेल देण्यात आले. संशोधकांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला. पद्धती समजावून सांगितली आणि भारतीय शेतकऱ्यांच्या सहकार्याने भारताने हरीत क्रांती झाली. हरीत क्रांती घडवून आणताना त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करण्यात आला नाही. विचार करण्यासाठी वेळही नव्हता. सुरुवातीला काही वर्षे शेती उत्पादन वाढले. मात्र संकरीत वाणांना आवश्यक असणारी पोषकद्रव्ये मिळावीत, यासाठी रासायनिक खते देणे गरजेचे बनले. तसेच संकरीत वाणांवर कीड पडते. रोग आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे आवश्यक बनले. पुढच्या मोसमांमध्ये आणखी जास्त मात्रा वापरावी लागते. याचा परिणाम जल, जंगल आणि जमीन यावर होत गेला. किटकनाशके, खते यांच्या अतिरीक्त वापरांमुळे जमीन क्षारपड होऊ लागली. जल प्रदुषणाचे प्रमाण वाढले. मातीचा पोत बिघडला. अखेर संशोधकांनी आणि शेतकऱ्यांनी आपले लक्ष सेंद्रीय शेतीवर केंद्रीत केले आहे.

रासायनिक खते, किटकनाशके यांचा वापर करण्यापेक्षा निसर्गातून मिळणाऱ्या घटकांचा वापर करून शेती पिकवण्याचे तंत्र वापरण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष गेले आहे. निसर्गातून मिळणाऱ्या घटकांचा उपयोग करून शेती पिकवण्याच्या पारंपरिक पद्धतींचे पुनरूज्ज्वीन आणि त्यामध्ये आवश्यक शास्त्रीय बदल, प्रयोग करण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली अन्नधान्ये, शेतीजन्य पदार्थ, फळे यांची भारतातील बाजारपेठेत मागणी वाढत आहे. भावही चांगला मिळत आहे. मात्र सेंद्रीय शेती पद्धती पूर्ण विकसीत होऊन वाढलेल्या लोकसंख्येचे पोट शांत करेल, इतके उत्पादन निर्माण करण्याची क्षमता येईपर्यंत मिश्र शेती पद्धती कायम ठेवावी लागेल. अन्यथा पुन्हा मोठे संकट उभे राहू शकते आणि जागतिक स्तरांवरील अस्थिर वातावरण पाहता ते परवडणारे नाही. शासनाने अशा शेतीला उर्जितावस्था प्राप्त होईपर्यंत अनुदान द्यायला हवे.

असे झाले तरी इंग्रजी राजवट आल्यापासून थेट कृषी डतपादकांना बाजारात वाढलेल्या भावाचा उपयोग किंवा फायदा होत नाही. शेतकरी आजही असंघटीत असल्याने बाजार भावाचा लाभ शेतकऱ्यास मिळू दिला जात नाही. हे टाळण्यासाठी सामुहीक शेतीचे प्रयोग व्हायला हवा आहे. खेडी अन्नधान्य आणि त्यांच्या गरजांच्यासाठी स्वायत्त होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची आंदोलने होतात, मात्र ती पूर्ण यशस्वी होताना दिसत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्च आणि मिळणारे पैसे यातून भरीव नफा मिळत नाही. त्यामुळे उपजिविकेसाठी त्याला आलेले कृषी उत्पादन तत्काह विकावे लागते. दुसरी मोठी समस्या येते ती अन्नधान्य साठवून ठेवण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही. त्यामुळे माल भाव चांगला येईपर्यंत ठेवायचे कोठे? हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. शेतकऱ्यांना गोदामांची सहज सुविधा उपलब्ध व्हायला हवी.

भारतीय शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करणे भविष्यात फार गरजेचे असणार आहे. एकीकडे पारंपरिक शेती ते सेंद्रीय शेती हे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. मात्र अन्नधान्य उत्पादन वाढवायचे असेल तर जनुकीय वाणांना मर्यादित रूपात स्विकारणे आवश्यक आहे. दुसरीकडे मूळ देशी वाणांचे जतन करत त्यांच्यापासून आधिक उत्पादन ‍मिळवण्यासाठी संशोधनाची गरज आहे. नवे संकरीत वाण शोधावे  लागतील. जागतीक तापमान वाढ आणि त्यामुळे होणारे बदल, निसर्गाचा लहरीपणा शेती क्षेत्रावर मोठे परिणाम करणार आहे. त्यातून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना संशोधकानी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यानीही या सर्व गोष्टी समजून घेऊन आवश्यक बदल तातडीने स्विकारण्याची गरज आहे. तरच शेती आणि शेतकरी ‍टिकेल!

-०-



 

         

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

नाते गुरू- शिष्याचे!

 

प्राचीन काळात भारतातच नव्हे, तर जगातील विविध देशात शिक्षण हे धर्मशिक्षणाचा भाग होते. विद्यार्थ्याला नीतीमान, ज्ञानी बनवण्यासाठी अध्यात्म आणि तत्वज्ञानाची बैठक देणारी शिक्षण पद्धती जगभरात निर्माण झाली. पाश्च्यात राष्ट्रात विद्यार्थी किंवा शिष्य हा मठात जाऊन शिक्षण घेत असे. त्याला तेथे धर्मगुरू शिक्षण देत. पुढे शाळा ही संकल्पना पाश्चात्य राष्ट्रांत अस्तित्वात आली. ज्यांना धर्मगुरू व्हायचे, तेच मठामध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले. ज्यांना राज्यकारभर करावयाचा आहे, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करावयाचे आहे, असे विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेत. त्यांच्यामुळे पाश्चात्य राष्ट्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानात भरीव कार्य झाले. ज्ञानाचे केवळ निष्कर्ष न अभ्यासता, प्रयोग करण्याची आणि प्रचिती घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असे. धर्मप्रसाराचे कार्य करू इच्छिणारे शिष्य, मठातील शिक्षण संपवून जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन धर्मरक्षण आणि प्रसाराचे कार्य करत. यातून ग्रेगर मेंडेलसारखा एखादाच संशोधनाचे कार्य करू शकला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास, प्रसार आणि प्रचार पाश्चात्य राष्ट्रात भारताच्या अगोदर झाला. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षकाबरोबर विविध ग्रंथांची उपलब्धता झाली. मात्र अगदी पंधराव्या शतकापर्यंत ग्रंथ बाळगणे सामान्यांच्या कुवतीबाहेर होते.

भारतातील शिक्षण पद्धतीत मात्र असे कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. शिष्य कोणते शिक्षण घ्यावयाचे, हे अगोदर ठरवत असे. त्यानुसार त्या विद्येमध्ये पारंगत असणाऱ्या गुरूची निवड करत असे. त्यानंतर तो गुरूगृही जाऊन अध्ययन करायचा. गुरूगृही त्याला आपले घर असल्याप्रमाणे शिष्याला राहावे लागे. घरातील कामे करणे, जनावरांची देखभाल करणे, गुरूगृही किंवा आश्रमात पडेल ते आणि सांगण्यात येईल ते काम करणे क्रमप्राप्त असे. सुरुवातीला गुरू शिष्याची पात्रता ओळखत. गुरू त्याची चाचणी घेत. तो कोठपर्यंत ज्ञान आत्मसात करू शकेल, याचा अंदाज घेत आणि नंतरच त्याचा खऱ्या अर्थाने शिष्य म्हणून स्विकार करत. ही गुरू-शिष्य परंपरा अनेक वर्षे सुरू होती. पुढे राजदरबारी पंडीत किंवा गुरू येऊ लागले आणि राजधानीतच राजकुमार, सरदारपुत्र शिक्षण घेऊ लागले. हीच शिक्षण पद्धती इंग्रज येईपर्यंत सुरू होती. त्या शिक्षण पद्धतीत गुरूबद्दल नितांत आदर असे. ‘गुरू आज्ञा प्रमाण’ मानली जात असे. गुरू आज्ञेचे उल्लंघन झाल्यास शिष्य शिक्षेस पात्र असे. गुरूच्या इच्छेप्रमाणे आणि त्या स्वरूपात परीक्षा घेतली जाई. गुरूंने सांगितलेली गोष्ट शिष्याला पाळावीच लागे. आश्रमातील सर्व नियमांचे पालन करावे लागे. त्यासाठी विद्यार्थ्यास सुरुवातीला कोणतेही शुल्क आकारले जात नसे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूदक्षिणा दिली जात असे. गुरू शिष्याच्या कुवतीप्रमाणे दक्षिणा मागत. काही वेळा ही गुरूदक्षिणा देण्याची कुवत नसली, तरी जीवाची बाजू लावून, ती अदा करत. पांडवानी युद्ध करून गुरूदक्षिणा दिली. एकलव्याने धनुर्विद्येसाठी अत्यावश्यक असणारा, अंगठा देऊन गुरूदक्षिणा दिली. मात्र एरवी गुरू शिष्याला देता येईल, अशीच दक्षिणा मागत.

हीच शिक्षण पद्धती इंग्रज येईपर्यंत अस्तित्वात होती. मूठभर इंग्रजांनी खंडप्राय देशावर सत्ता निर्माण केली. येथील राज्यकारभार सांभाळताना आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी, म्हणून शिक्षण व्यवस्था निर्माण केली. ही शिक्षण व्यवस्था सर्वांसाठी खुली होती. यामधून त्यांना आधिकाऱ्यांपेक्षा, हाताखाली काम करणारा कर्मचारीवर्ग तयार करायचा होता. या शिक्षण पद्धतीतही पूर्वी ज्यांना शिक्षण खुले होते, तेच शिक्षक होते. त्यामुळे शाळेत वर्णव्यवस्थेप्रमाणे विद्यार्थ्यांना वागणूक मिळे. महात्मा जोतिराव फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांनी समता आणण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात याचा पाया घातला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनेक संस्थाचे जाळे विणले. त्यातून बहुजन समाज शिकला. नवीन शिक्षक तयार झाले आणि आजचे शिक्षक-विद्यार्थी नाते असणारी व्यवस्था तयार झाली.

आधुनिक शिक्षण व्यवस्थेतही शिक्षकांबद्दल नितांत आदर आहे. हा आदर ‍किंवा शिक्षकांबद्दलच्या विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, अगदी ९० च्या दशकांपर्यंत कायम होत्या. या दशकात ‘खाउजा’ संस्कृती उदयास आली. यातून नवतंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मात्र तोपर्यंत शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या मनात सर्व काही असायचा. सर्वज्ञानी शिक्षकांनी सांगितलेले वाक्य हे ब्रम्हवाक्य असायचे. स्वत: दुसऱ्या शाळेत त्याच वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाचा पाल्य, आपल्या मुलाला जरा काही वेगळ्या पद्धतीने गणिताची पद्धत सांगू लागला, तर तो गुरूभक्त शिष्य आपल्या वडिलांना ‘असं नाही. आमच्या सरांनी/मॅडमनी असं शिकवलयं.’ असे सांगत असे. शिक्षकांने सगितलेले सर्व काही खरे मानले जात असे. त्या काळात शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारण्याची मुभा होती. काही शिक्षक चांगलेच बडवून काढत. काही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या पोटाला चिमटा काढायची सवय होती. शिक्षकांनी मारले म्हणून घरात सांगायची सोय नव्हती. ‘कार्ट्या, तूच चूकला असशील. काय खोडी केली सांग’, म्हणत पुन्हा घरातल्यांचा मार मिळायचा. असा दुहेरी मार खाण्यापेक्षा गुरूजी किंवा शिक्षकांच्या मारावर थांबलेले बरे. असाच विचार बहुतांश मुले करत असत. शिक्षक गल्लीत आले तरी मुले दुसरीकडे पळून जात. गुरूजी घरातल्यांशी बोलू लागले तर मुले दाराआड उभा राहून चोरून ऐकायची, पण समोर यायची नाहीत. गुरूजींचा, दरारा, धाक, आदर, ‍भिती सर्व काही यात असे. आपली जिज्ञासा पूर्ण करण्याचे साधन गुरूजी किंवा शिक्षक असायचे.

शिक्षक आणि मुलांचेच नाही तर पालकांचे, गावकऱ्यांचे गुरूजींशी, शिक्षकांशी वेगळेच नाते तयार झालेले असायचे. गावही गुरूजींचा शब्द प्रमाण मानत असे. गुरूजी अडाणी गावकऱ्यांचे पत्र वाचून दाखवायचे आणि लिहून द्यायचे. गावकरी शेतातील भाजी, गायीचा खरवस गुरूजींच्या घरी आवर्जून पाठवायचे. शिक्षकाची गावातून बदली झाली की अख्खी शाळा रडत असे. गाव त्यांना निरोप द्यायला लोटायचा. गावातील सुखदु:खात सावरायला गुरूजी असायचे आणि गुरूजीला हवं नको ते पाहायला गाव असे. गुरूजी अख्ख्या गावाचे असायचे. गुरूजींसाठीही गाव तितकाच जवळचा झालेला असायचा. पुढे गुणांची शर्यत लागली. शिक्षकांनी स्वत:ला बदलून घेतले. मुले गुणांच्या शर्यतीत मागे राहू नयेत, म्हणून सकाळी, संध्याकाळी शाळेव्यतिरिक्त वेळ ते मुलांचा अभ्यास करून घेण्यासाठी घालवत. मुलांना रात्री अभ्यास करता यावा, यासाठी दिव्याचे तेल स्वत:च्या पगारातून जाळत. या नात्यात व्यवहार नव्हता. प्रेम होते, आपुलकी होती. ती टिकवून ठेवण्याचे कार्य दोन्ही बाजूकडून पार पाडण्यात येत असे.

पुढे खाउजा संस्कृती आली आणि चित्र वेगाने बदलले. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणामध्ये भौतिक सोयीसुविधा सहज उपलब्ध होऊ लागल्या. गुरूजींना गावात राहण्यापेक्षा शहरात राहणे आवडू लागले.‍ शिक्षकांच्या वेतनातही सुधारणा झाली. ते गावात राहिनासे झाले. गावाशी जोडलेले नाते दुरावले. तरीही मुलांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी तशीच आदराची भावना होती. आजही ती बऱ्याच अंशी आढळून येते. मात्र पूर्वीइतके ते दृढ राहिलेले नाही. अँड्रॉईड फोन आल्यानंतर तर आणखी वेगाने चित्र बदलले. अनेकांना शिकवणे हे पैशाच्या बदल्यात करायचे काम वाटू लागले. पूर्वी अत्यंत तोकड्या पगारात पूर्ण निष्ठेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण कमी झाले असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. अजूनही पूर्ण क्षमतेने योगदान देणारे शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास कायम आहे.

मात्र हा विश्वास कायम ठेवण्यासाठी आता शिक्षकांना स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक बनले आहे. कोरोनाने शिक्षकांना ‘चॉक अँड टॉक’ संस्कृतीतून बाहेर आणले. ‘ऑनलाईन शिक्षण’ पद्धती अस्तित्वात आली. काही वर्षांपूर्वी ‘असे कधी शिकवणे असते का’, असे विचारणारे शिक्षकही ऑनलाईन वर्ग घेऊ लागले. मुलांच्या हाती मोबाईल देणे पालकांना भाग पडले. मुले त्यातून अभ्यासाबरोबर अतिरिक्त ज्ञानही घेऊ लागली. अभ्यासात पडणाऱ्या शंकाची उत्तरे देणारे ‘गुगल गुरू’ मुलांना भेटले. त्यातून मुलांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत. उलट मुले शिक्षकांकडून प्रश्नांच्या उत्तरांची खात्री करून घेत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी समाजमाध्यमांवर मित्र बनले आहेत. अनेक कार्यक्रमात एकत्र येतात. शिक्षकाबद्दल भिती नष्ट होत आहे. यातून आधिक चांगला सुसंवाद निर्माण होऊन ज्ञानग्रहण सुकर व्हावे. अर्थात यात काही चूकीच्या गोष्टी घडत आहेत. काहीही असले तरी शिक्षकांची भिती जाऊन आता मित्रत्वापर्यंत नाते आले आहे, हे मात्र खरे! 

  (बदलते जग २०२२ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख.)

  

 

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

धवल धुक्यांची…

 धुके सर्वांनाच आवडते… धुक्यावर अनेक कवी व्यक्त झाले आहेत. मात्र त्यात अनेकदा विरहाचा सूर दिसतो. व्यक्त-अव्यक्त प्रेमाच्या त्या आठवणी अखेरपर्यंत येत असतात आणि धुके त्या आठवणीवरील धूळ धुत असावे. त्यामुळेच धुक्यात त्या प्रकर्षाने येत असाव्यात. मानवी मनावर संशयाचे धुके आले, तर ते मात्र खूपच वाईट. या धुक्यामुळे मनाने जवळ असणारी माणसे दूर जातात. संशयाचे धुके तयार झाले, तर ते सहज जात नाही आणि गेले तरी नात्यांमध्ये पूर्वीची जवळीक आणत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या धुक्याचे तसे नसते. सूर्याचा पारा चढू लागला की धुके विरून जाते. दै. पुण्यनगरी कोल्हापूरच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासाठी…

____________________________________________________

तो दिवस सुट्टीचा होता. सकाळी उठलो, तर सारा आसमंत धुक्याने भरलेला. धुके पाहून मनापासून आनंद झाला. रस्त्यावरील दिवे धुक्याला चिरत जमिनीकडे प्रकाशाला पाठवण्याचा जिवापाड प्रयत्न करत होते, पण तो जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. दिवे सुरू असतानाही केवळ संधीप्रकाश जाणवत होता. धुक्यामुळे वातावरण थंड झाले होते. धुक्यातील थंडी हवीहवीशी वाटत होती. थंडीचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायचा, तर फिरायला जाणे गरजेचे. मी नित्याप्रमाणे, मात्र जरा लवकर आवरून फिरायला बाहेर पडलो (यास अनेकजन ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात). धुक्यात फिरायचा आनंद सोडायचा नव्हता. तसेच आपण नेहमीच्या वेळी निघालो आणि धुके विरले तर, अशी मनात भिती होती. धुक्याचा आनंद घालवायचा नव्हता, म्हणून लवकर निघालो. त्या दिवशीचे धुके इतके दाट होते की, पन्नास फुटावरचेही काही दिसत नव्हते. अशा मस्त धुक्याने भरलेले ते संपूर्ण वातावरण हवेहवेसे वाटू लागले. बाहेर पडलो आणि त्या धुक्याचा आनंद घेत मस्त फिरू लागलो. आता भ्रमणध्वनी हा केवळ संदेशवहनाचे साधन राहिलेला नाही. त्याचा उपयोग करत छायाचित्रे घेत होतो. साठवणीतील आठवणी आठवत आणि या धुक्यांच्या आठवणी छायाचित्रात बंदीस्त करत, मस्त फिरणे सुरू होते.

सूर्य नजरेआड होता. धुक्यांने पृथ्वी आणि सूर्यामध्ये पडदा धरला होता, अंतरपाटच जणू. सूर्याची पृथ्वीवर नजर पडू नये, याची धुके जणू काळजी घेत होते. पृथ्वीचा रात्रभरचा विरह असह्य झालेला सूर्य, या भूभागाला आपल्या सहस्त्र करांनी कुरवाळण्यास उत्सुक होता. मात्र सूर्य-पृथ्वीच्या मिलनामध्ये हे धुके अडथळा बनले होते. सूर्यासाठीचा अडथळा, माझ्यासाठी मात्र आनंदाचे धाम बनला होता. आनंदसुद्धा सापेक्ष असतो ना! पृथ्वी आणि सूर्य यांचा एकत्रित कधीही मनात विचार आला, की कुसुमाग्रजांचे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आठवल्यावाचून राहात नाही. वसुंधरेच्या सूर्यावरील निस्सिम प्रेमाचे हे कवन. पृथ्वीचे प्रेम आपल्याला मिळावे, म्हणून शुक्र, चंद्रापासून ते अगदी ध्यानस्थ अविचल ध्रुवापर्यंत सर्वजन आस लावून बसलेले असताना पृथ्वी मात्र सूर्यावर प्रेम करते. ती म्हणते,

‘परी दिव्य ते तेज पाहून पुजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहूनी साहवे’

असे उत्कट प्रेम करणाऱ्या पृथ्वीला सूर्याला भेटायचे आहे. तो रोजच भेटतो. आज मात्र धुके अडथळा बनले होते. या धुक्याला पाहून बालपणातील एक आठवण आली. गावातील एकाचे शाळा संपताच लग्न झाले होते. त्याची बायको, नवरा घरी यायची वेळ झाली की लपून बसायची. ते आठवले आणि मनात विचार आला, पृथ्वीपण आपल्या प्रियकराला पाहून धुक्याआड लपून बसली की काय? पण ते होणे शक्यच नाही. ही तर आपल्या प्रियकराला भेटायला स्वत:च अधीर झाली आहे. आपल्या आणि वसुंधरेमधील हा धुक्याचा अडथळा सूर्य एका ठरावीक मर्यादेपलिकडे सहन करणार नव्हता. त्याचा पारा जसजसा वाढेल, तसतसे हे जलबिंदू बाष्पात रूपांतरीत होऊन निघूनच जाणार होते. पण एखाद्या नवरीला भेटायला गेलेल्या नवरोबाला कुरवलीचा अडथळा असावा, तसाच हा काहीसे धुक्याचे वर्तन होते. त्या दिवशीही सूर्यापुढे धुके टिकले नाही. थोड्याच वेळात धुक्याला दूर व्हावेच लागले. सूर्याची किरणे पृथ्वीवरील प्रत्येक जिवासाठी पृथ्वीपर्यंत पोहोचणारच असतात. पण हे धुक्याचे सूर्य किरणांना अडवणे हे कुरवलीने नवरोबाला अडवण्याइतकेच मोहक वाटत होते. म्हणूनच धुके पडले की फिरायला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्या दिवशी असाच मनमुराद आनंदाची लयलूट करत, माझे फिरणे सुरू होते.

मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. अचानक मन उदास झाले. धुक्याचा आनंद कधी आणि कसा विरला, हे कळलेच नाही. त्या दिवशीचे धुके खूप दाट होते. एक किलोमीटरचा पल्ला स्कूटरवरून पार करताना स्वेटर भिजले होते. केसावरही दवबिंदू आले होते. कोरोना काळात सर्दीचा त्रास नको म्हणून रूमालाने केस पुसले आणि सफेद रूमालावर काळे डाग पडलेले आढळले. ते काळे डाग पाहून ‘डाग अच्छे है’ म्हणण्याचे धाडस कोणताही संवेदनशील माणूस करणार नाही. ते काळे डाग प्रदूषकांचे हवेतील प्रमाण जास्त झाल्याने आले होते. ते डाग पाहून बालपण आठवले. बालपणीही धुके पडायचे. केसावर जलबिंदू आलेले असायचे. मात्र या जलबिंदूनी कधी असे काळे डाग पडले नव्हते. प्रदूषण तर मानवाची निसर्गाला देणगी आहे. प्रदूषणामुळे धुकेही दूषीत झाले होते. त्यामुळेच त्या दिवशीचे धुके मन उदास करणारे ठरले. त्या उदासीत मंगेश पाडगावकरांचे यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले आणि अरूण दाते यांनी स्वरबद्ध केलेले गाणे नकळत ओठावर आले,  

‘धूके दाटलेले उदास उदास

मला वेढीती हे तुझे सर्व भास

उभी मूक झाडे, विरागी किनारा

झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा’

याच विचारात फिरून घराकडे वळलो आणि अनेक विचारांनी मनात काहूर केले. तसे धुके काही प्रथम अनुभवले नव्हते. विविध गावात आणि वयाच्या विविध टप्प्यावर धुके अनुभवलेले होते. आजच्या धुक्याने थंड वातावरणात दिलेला चटका मात्र मनातून जात नव्हता. रूमालावरील डाग साबणाने जाणार होते आणि गेलेही. मात्र मनात धुक्यांविषयी कुतूहल जागे झाले. मूळात धुके पडते का हा प्रश्न मनात आला.

धुके पडण्याला पाणीच प्रामुख्याने जबाबदार असते. वायुरूपातील पाण्याचे द्रवीकरण होत असताना तयार होणारे सूक्ष्म कण धुक्याच्या रूपात दिसू लागतात. खरं तर, हा भूपृष्ठालगत असणारा एक ढगच असतो. ढगात असणारे सर्वच कण पृथ्वीच्या वातावरणात असतात. या कणांची घनता जास्त झाली की आपल्याला लांबवरचे दिसणे कमी होते. धुके नसताना एक किलामीटरपेक्षा जास्त दूरवरचेही मानवी नजरेस स्पष्ट दिसते. मात्र धुके दाट असताना ही दृश्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी होते. विरळ धुक्यात ती एक किलोमीटरपेक्षा जास्त असते, मात्र नेहमीसारखे ते चित्र, तो परिसर स्पष्ट दिसत नाही. संशोधकांनी धुक्याची शास्त्रीय व्याख्या भलतीच कठीण करून ठेवली आहे. ‘दाट धुके म्हणजे जमिनीच्या किंवा पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारा असा मेघ की ज्यामुळे दृश्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी भरते’. साधं सोप्या भाषेत सांगायचे सोडून असले शब्द वापरून उगाच विज्ञानाविषयी जनसामान्यांच्या मनात निर्माण करतात. ते असो. धुके पडते, तेव्हा हा मेघ पृथ्वीच्या पृष्ठभागाला म्हणजेच जमिनीला किवा पाण्याला चिकटून असतो.

धुके पडण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्या कारणानुसार त्यांची विविध नावे आहेत. विविध कारणांनी बाष्पांश असलेल्या (आर्द्र) हवेतील ऊष्णता निघून जाते आणि ती हवा थंड होते. हे तापमान दवांकाखाली आल्यास धुके पडते. अशा धुक्याला शीतलीकरण धुके, असे म्हणतात. उच्च तापमानाच्या पाण्याचे थंड हवेत बाष्पीभवन झाले आणि हवेत धुके निर्माण करणारी केंद्रके असल्यास, धुके निर्माण होते, अशा धुक्यास बाष्पीभवन धुके म्हणतात. उच्च तापमानाच्या पाण्यावरून जेव्हा थंड हवा जाते, तेव्हाही बाष्पीभवन धुके तयार होते. आर्क्टिक भागातून येणारी थंड हवा जेव्हा समुद्रावरून वाहते, तेव्हा धुके तयार होते. या धुक्याला आर्क्टिक धूर म्हणून ओळखले जाते. अगोदरच्या दिवशी पाऊस झाला, तर हवेत बाष्प मोठ्या प्रमाणात तयार होते. सकाळी वारे वाहत नसेल, तर जमिनीतून रात्री बाहेर पडणाऱ्या प्रारणांमुळे जमिनीलगतचे तापमान कमी होते. ते दवांक बिंदूच्याखाली आल्यास प्रारणजन्य धुके तयार होते. उष्ण प्रदेशातील हवा शीत प्रदेशाकडे गेल्यास अभिवहन धुके तयार होते. उंचीवर असणाऱ्या उष्ण हवेतून कमी भागावरील थंड जागेकडे येणारे जलबिंदू हवेत बाष्प तयार करतात. हे वर्षाजन्य धुके असते. पर्वतावर ज्या बाजूने हवा येत असते, त्या बाजूला कोणत्याही कारणाने धुके तयार झाले तर त्यास आरोही धुके म्हणतात.   

एखाद्या पर्वताच्या शिखरावरील माणसाला ढग त्याला छेदून जाताना, सर्वत्र धुके पडल्याचा भास होतो. मात्र पर्वत पायथ्याशी असणाऱ्या व्यक्तीला ढग डोंगराला घासून चालला आहे, असे वाटते. एरवी सखल प्रदेशात आपण असताना जो धुक्याचा अनुभव घेत असतो, तो एक प्रकारचा ढगच असतो. या ढगात जलकण असतात. ध्रुवीय प्रदेशात किंवा बर्फाच्छादित प्रदेशातील धुक्यामध्ये बर्फाचे कणही असतात. पण सध्या धुके केवळ जलकणांचे राहिले नाही. यामध्ये धुळ, कार्बन, धूर, लवण इत्यादींच्या कणांचाही समावेश होतो. काही आम्लेही यामध्ये विरघळतात. विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये पडणाऱ्या धुक्यांमध्ये धुलीकण आणि धुम्रकणांचे मोठे प्रमाण आढळते. आपली प्रगती ही वातावरण आणि एकूणच पर्यावरणाचा बळी देत सुरू आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदुषके पाठवत आम्ही आमच्या सुखसोईच्या आणि आरामाच्या गोष्टी बनवत असतो. अनेकदा अशा प्रदूषकांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. अशा अपायकारक घटकांमुळे १९५२ साली लंडनला मोठी दुर्घटना घडली होती. तेथे डिसेंबर महिन्यात पडलेल्या धुक्यामुळे चार हजारपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते. हे आठवले आणि मंगेश पाडगावकरांच्या त्याच कवितेतील ओळी आठवल्या,

‘कुठे चालल्या या दिशाहीन वाटा

कुणा शोधिती या उदासीन लाटा’

मानवाची प्रगती ही खरंच दिशाहीन आहे. त्यामुळेच दिल्लीसारख्या शहरामध्ये पडणारे धुके चिंतेचा विषय बनते. धुके हा न्यायालयीन कामकाजाचा भाग बनते. प्रदूषण मंडळाचे आधिकारी हे धुक्याचे खापर शेतकरी पिकांचे उर्वरीत भाग जाळत असल्याने धुके पडत असल्याचा निष्कर्ष काढतात. शहरांवरील प्रदूषित हवेमध्ये आर्द्रतेचे म्हणजेच जलकणांचे प्रमाण ७० टक्केपेक्षा जास्त झाले, की धुके पडते. हवेतील बाष्प प्रदूषित घटकाच्या केंद्रावर जलकणात रूपांतरीत होते. त्यातच तापमान आणखी कमी झाले की हे प्रमाण वाढते आणि दाट धुके तयार होते. त्यामुळे धुके तयार होण्यास जलकणांना आधार देणारे प्रदूषक घटक आणि बाष्परूपातील पाणी हवे असते. त्यामुळे पावसाळा संपल्या-संपल्या धुके पडलेले वारंवार आढळते. धुके पडले की रंग लुप्त होतात. ती वस्तू एखाद्या धुसर कृष्णधवल चित्राप्रमाणे दिसू लागते. रंग गायब होतात, अगदी पूर्वी घडून गेलेल्या घटनांच्या आठवणीसारखे. मंगेश पाडगावकरांनी धुक्याच्या या गाण्यात पुढे नाहीतरी म्हटलेच आहे,

‘दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास

क्षणी भास होतो, तुझे सूर येती

जीवा भारुनी हे असे दूर नेती

स्मृती सोबतीला असा हा प्रवास’

आठवणींचेही असेच असते. दिवस जातील तशा त्या धुसर होत जातात. अनेकदा तपशील लक्षात नसतात. पूर्वी घडलेल्या एखाद्या प्रसंगात आपणास राग आलेला असतो, आपण चिडलेले असतो. मात्र कालौघात आपण त्या घटनेकडे प्रसंगाकडे तटस्थ वृत्तीने पाहायला लागतो, आणि आपणास आता त्यामध्ये चिडण्यासारखे काहीच नव्हते, हे जाणवते. अगदी तसेच धुके सर्व रंगाना लुप्त करून कृष्णधवल चित्र उभा करते. आजच्या धुक्यातही झाडे खरंच मुक्याने उभी होती. प्रदूषणाचा हे रूप पाहून मानवाची वाट दिशाहीन झाली आहे, याची खात्री पटत होती. उदासीन लाटामध्ये बालपणीच्या निव्वळ जलबिंदूच्या समृद्ध धुक्याला मन शोधत असते. स्मृती सोबतीला घेऊन धुक्यातील प्रवास होत असतो. अन स्मृती सांगतात… धुके असावे पण जलबिंदूंचे प्रदूषणाच्या काळ्या कणांना घेऊन आनंदाचा भास देणारे नसावे.

हवा कमी थंड असेल, तर शुभ्र धुके दिसते. मात्र हवा थोडी थंड झाली की धुके करड्या रंगाचे दिसू लागते. जितकी थंड होईल तितका रंग गडद करडा होत जातो. समुद्रावर, तळ्यावर पडणारे धुके आणि जमिनीवरील धुक्यांमध्ये पाण्याचे प्रमाण समान असते. मात्र जमिनीवरील धुक्यामध्ये असणारे कण हे आकाराने लहान (तीस मायक्रॉन व्यास) आणि संख्येने जास्त असतात तर समुद्रावरील धुक्याच्या कणांची संख्या कमी मात्र आकार मोठा (चाळीस मायक्रॉन व्यास) असतो. त्यामुळे समुद्रावरील धुक्याची दृश्यमानता जमिनीवरील धुक्यापेक्षा जास्त असते. अगदी जवळचे म्हणजे तीस मीटर अंतरावरील काहीही दिसत नाही, अशा प्रकारचे धुके तयार करण्यासाठी लागणारे पाणी किती असावे? तर अशा धुक्याच्या वलयात एक घनमीटरमध्ये पाणी असते, केवळ तीन ग्रॅम. औद्योगिक वसाहतीवर पडलेल्या धुक्यात हे पाणी आणखी कमी होते.

धुक्यामध्ये शक्यतो पावसासारखी जमीन भिजण्याची वेळ क्वचितच पाहायला मिळते. ज्या ठिकाणी तापमान उणे दहा डिग्री सेल्सियसपेक्षाही कमी असते, अशा भागात धुके पडत नाही. विमानात हायड्रोजन आणि कार्बनयुक्त इंधन वापरण्यात येत असल्याने कृत्रिमरित्या तयार होणारे ते एक धुकेच असते. त्याच्या धुरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि प्रदुषणकारी घटक असतात. प्रदूषके, धुलीकण नसतील तर धुके तयार होत नाही. मात्र त्याचे मानवाला पेलवेल एवढेच प्रमाण असायला हवे. सर्व प्रकारची धुकी ही केवळ तापमान बदलामुळे आर्द्र हवेत तयार होतात. तापमान वाढल्यास धुके नष्ट होते. त्यामुळे उष्ण कटिबंधामध्ये बहुतांश वेळा धुके केवळ सकाळी दिसते. थंड हवेच्या भागात धुके तयार झाले तर ते दिवसभर राहू शकते. महाराष्ट्रात सर्वत्र धुके पडते. कधीही आणि कोणत्याही ऋतूमध्ये धुके पडू शकते. मात्र त्यासाठी हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असावे लागते आणि तापमान दवांकबिंदूपेक्षा कमी असणे आवश्यक असते. 
 

धुके सर्वांनाच आवडते. सर्वांनाच आनंद होतो. धुक्यावर कवी मंडळी तर विशेष फिदा आहेत. अगदी आधुनिक कवितेचे जनक बा.सी. मर्ढेकरांपासून नव्याने कविता लिहायला लागलेल्या कॉलेजकुमारांपर्यंत सर्वांना हे धुके वेड लावते. हे धुके पृथ्वीलाही वेड लावते असे कल्पना हलगे यांना वाटते. त्या लिहितात,

‘भारलेली धुंद अवनी

भारलेलीच ही वाट

धुकं पिवूनी झिंगला

धुक्याचा तो थाटमाट’

धुके पडले की अवनी धुंद होते. वाटही भारून जाते. धुके पिऊन धुके झिंगते. कसली भारी कल्पना आहे. स्वत:च स्वत:च्या आनंदात मग्न असणाऱ्या माणसाप्रमाणे धुक्याचे वागणे आहे. तर, प्रज्ञा वझे-घारपूरे म्हणतात,

‘दे ना मला दुलई तुझी,

गोड गोजिऱ्या धुक्याची,

पांघरूनी मग मी ही निजेन,

स्वप्न्‍ कोवळ्या उन्हाची’.

असे हे धुके प्रत्येक कवीला वेगळे दिसते. प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या. प्रत्येकाची नजर वेगळी. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच धुके वेड लावते. त्यामुळेच मृण्मयी नावाच्या कवयित्रीच्या पिलूला,

‘धुकं, धुकं, धुकं पडलं,

मला ते खूप गारठून गेलं,

मी गेले लपायला,

धुकं आलं मला शोधायला,

धुकं येऊन माझ्याशी खेळलं,

उन्हानं त्याला घरी पाठवलं,’

असे बालगीत सूचले. त्या बालवयातील रचना करणाऱ्या पिलूला सूर्यदेव आले की धुके पळून जाते हे माहीत आहे. इतक्या लहान बालकांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांना धुके आवडते, वेड लावते.

जाणीवा जागृत झालेल्या अनेक कवींना धुक्यात गतकाळातील आठवणी आठवतात आणि ते त्याप्रमाणे व्यक्त होतात. हा सिलसिला अगदी बा.सी. मर्ढेकरांपासून सुरू आहे. त्यांनाही आपल्या प्रियेची आठवण होते आणि ते म्हणतात,

‘दवात आलीस भल्या पहाटी

शुक्राच्या तोऱ्यात एकदा,

जवळुनी गेलीस पेरीत आपुल्या

तरल पावलांमधली शोभा’

त्यातही वेदनांचा सल व्यक्त होतो आणि कवी काव्यामृत लिहितो, ‘शुभ्र दाटले धुके धुसर, गंध कुसुमांचा दरवळत नाही, सल किती या वेदनेचा, अबोल तोलही सावरत नाही.’ अनेक कवी धुक्याबरोबर जुन्या आठवणी आठवत राहतात. या आठवणीमध्ये या कवीनी धुक्यावर अनेक कविता लिहिल्या आहेत. ‘मराठी कविता’ ब्लॉगवर अशा अनेक कविता भेटतात. यातील एका कवितेत कवी लिहितो, ‘ओंजळीत पहाडांच्या धूसर धुके साठलेले… गुफेत हृदयाच्या, जणू दु:ख दाटलेले…’  काही कवीना मात्र धुक्यात प्रेम आठवते. वैभव वाघमारे यांनी ‘आज पुन्हा धुक्याची पहाट आली, प्रत्येक पानांवर तुझी प्रतिमा तयार झाली l मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला, आणि तू प्रत्येक थेंबात विलीन झालीस l’ अशी रचना करतात. तर जागृती पुजारी, ‘ओल्या शुभ्र धुक्यात पानावली ही माती, येता तुझ्या कवेत विसावली सारी नाती…!!!’ अशा व्यक्त होतात. खरंच, धुक्यामध्ये सारं काही विसरून आठवणीत मन रमते. अनेक कवींच्या रचना याची साक्ष देतात.

माध्यमीक शिक्षण घेत असताना, पुरतं कळायच्या आधीच्या वयात, वर्गातील तो तिला आवडतो. तसेच तो कोणा दुसरीला पाहून खूश होत असतो. त्याला आवडणारी ती दिसली तरी त्याचे मन उगाच खूश होते. दिवस चांगला जाणार असे मन, त्याच्या मनालाच सांगते. त्या वयात तो तिच्याजवळ किंवा ती त्याच्याजवळ व्यक्त झालेले नसतात. पुढे शालेय शिक्षण संपते आणि वाटा वेगळ्या होतात. मात्र या आठवणी मनाच्या कोपऱ्यात तशाच असतात. त्याला ती, तिला तो कधीतरी आठवतात. पुढे कधी भेटतात, कधी भेटत नाहीत. मात्र त्यांच्या त्या आठवणींचे हे दिवस साठवण बनून राहिलेल्या असतात. त्याच आठवणी धुके पडले की बाहेर पडत असाव्यात. अनेकांच्या महाविद्यालयीन जीवनातीलही अशा आठवणी असतात. व्यक्त-अव्यक्त प्रेमाच्या त्या आठवणी अखेरपर्यंत येत असतात आणि धुके त्या आठवणीवरील धूळ धुवत असावे. त्यामुळेच धुक्यात त्या प्रकर्षाने येत असाव्यात. मानवी मनावर संशयाचे धुके आले, तर ते मात्र खूपच वाईट. या धुक्यामुळे मनाने जवळ असणारी माणसे दूर जातात. संशयाचे धुके तयार झाले तर ते सहज जात नाही आणि गेले तरी नात्यांमध्ये पूर्वीची जवळीक आणत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या धुक्याचे तसे नसते. सूर्याचा पारा चढू लागला की धुके विरून जाते.   

धुक्यांचे विचार अनेक दिवस मनातून जात नव्हते. सात-आठ दिवस गेले आणि पुन्हा एक दिवस धुक्याची पहाट आली. ही सकाळ मनमौजी सकाळ होती. छान धुके पडले होते. खरंतर सकाळी पावणेसहापर्यंत धुक्याचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते. रस्त्याच्या मध्यावर असणाऱ्या विद्युतपथावरून अवैधरित्या नेलेल्या केबलच्या वायरना खाली लोंबणारे पाण्याचे पांढरे थेंब दिसत होते. अंधारामुळे काळ्या रंगाच्या केबलवरील पांढरे पाण्याचे थेंब, मूळात हिरव्या पार्श्वभूमीवर आणखीन उठून दिसत होते. जणू कोणी काळ्या धाग्यामध्ये पांढरे मोती ओवून माळच तयार केली होती. अशा प्रसन्न सकाळी, ती आणखी प्रसन्न करण्यासाठी, स्वहस्ते बनवलेला मस्त (हो, मला चहा छान बनवता येतो, असे माझ्या गृहमंत्र्याचे प्रमाणपत्र असते) चहा फस्त करून, स्वेटरमध्ये स्वत:ला झाकून, कानांची बंदिस्ती करून, मजेत बाहेर पडलो. विद्यापीठाच्या प्रांगणात आलो आणि धुके दिसू लागले. आणखी थोडे पुढे जाईपर्यंत, धुक्यावरचे बा.सी. मर्ढेकरांचे काव्य आठवले धवल धुक्याच्या संथ बटांची, ल्याली मलमल किती घरे ही! आणि वाटले धवल धुक्यांची मलमल किती झाडांनी लपेटून घेतली आहे.

आजचे धुके आणखी वेगळे होते. फिरता फिरता जे दिसत होते, ते भ्रमणध्वनीला छायाचित्र टिपण्याचे साधन बनवून टिपत गेलो. निसर्गाचे नवे रूप साठवत गेलो. आजच्या धुक्यामध्ये संक्रांत वेलीच्या कळ्याही जणू उमलणे विसरून गेल्या होत्या. मोरही थिजले असावेत. नाहीतर सहाच्या आत न्याहरीसाठी नेहमी दिसणारी त्यांची धडपड आठ वाजत आले, तरी दिसत नव्हती. पक्ष्यांचे मंगलकुजन नव्हते. वेगवेगळ्या झाडांची पाने अंगावर धुक्याची चांदर पांघरून मस्त झोपली होती. तर काहींनी हा भार सहन होत नसल्याने जलबिंदूना टोकाला नेऊन मोत्यामध्ये रूपांतरीत करायला सुरुवात केली होती. पांढरफळीच्या फांद्यानीही खालच्या बाजूला जलबिंदूना मोत्याचे रूप देत बांधून ठेवले होते. काही झाडांनी आपल्या अंगावर येणाऱ्या दवबिंदूना जास्तच जवळ ओढत स्नानाचा आनंद घ्यायला सुरुवात केली होती. ती पूर्ण भिजली होती. गुलमोहोर आणि सुबाभूळ हे विदेशी वृक्ष यात आघाडीवर होते. त्यांच्या पानातून थेंब जमिनीकडे येत होते आणि रस्ता त्या जलबिंदूनी भिजला होता. असे धुके क्वचितच दिसते.

मस्त धुक्यामध्ये निसर्गाचा आनंद घेत असताना, अधूनमधून सूर्याचे दर्शन घेत होतो. सूर्यही आज जणू धुक्याची दुलई पांघरून झोपला असावा. सुरुवातीला समस्त पशूपक्ष्यांचे वागणे पाहून, तर सूर्य उगवायचे विसरला की काय? असेच वाटले. मात्र त्याला पृथ्वीचा विरह सहन होत नसावा. अधूनमधून तो बाहेर यायचा आणि आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करायचा. मात्र आजचे धुके वेगळेच होते. त्याने सूर्यालाही चंद्रासारखे शीतल बनवले होते. तो चंद्रासारखा दिसत होता. कोणताही गॉगल न घालता सूर्याला पाहू शकत होतो. तोही धुक्यापुढे जणू पांढरे निशाण घेऊन शरण आला की काय, असे वाटत होते. धुक्याआडून त्याचे दर्शन चंद्राप्रमाणे शीतल होते. झाडांआडून दिसणारा शीतल सूर्य पाहून लिंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई.. आठवले आणि हसूही आले. सकाळी, सकाळी अंगाई गीत आठवले. सूर्याची अवस्था पाहून धुक्याने थिजलेल्या आणि त्यामुळे अजूनही निजलेल्या पक्ष्यांसाठी तर हे अंगाई गीत आठवले नसेल ना! याच विचारात वेळेकडे लक्ष गेले. नऊ वाजत आले होते. सूर्यांने अखेर आपली शक्ती दाखवायला सुरूवात केली आणि धुके विरळ होऊ लागले. काही मिनिटात त्याचे अस्तित्व संपले. मात्र सकाळ प्रसन्न करून… 

पुन्हा बालपणीचे धुके पडावे… स्वच्छ जलबिंदूंचे… असे नेहमी वाटते. धवल धुक्यांच्या संथ बटांची मलमल रोज ल्यायला मिळावी. मात्र धुक्यामध्ये प्रदूषकांचे प्रमाण जास्त असले, की आम्लयुक्त, धूरयुक्त धुके पडते. हे धुके आवडले तरी कोणत्याही संवेदनशील मनाला उदास करून जाते. असे धुके सोडले तर… ते मन प्रसन्न करणारेच असते. आठवणींना उजाळा देणारे असते. दररोजचा सूर्योदय जसा वेगळे रूप घेऊन येतो, तसेच दरवेळी धुके वेगळे रूप घेऊन येते. कोणतेही रूप घेऊन धुके आले, तरी मनापासून आनंद होतो.