सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

धवल धुक्यांची…

 धुके सर्वांनाच आवडते… धुक्यावर अनेक कवी व्यक्त झाले आहेत. मात्र त्यात अनेकदा विरहाचा सूर दिसतो. व्यक्त-अव्यक्त प्रेमाच्या त्या आठवणी अखेरपर्यंत येत असतात आणि धुके त्या आठवणीवरील धूळ धुत असावे. त्यामुळेच धुक्यात त्या प्रकर्षाने येत असाव्यात. मानवी मनावर संशयाचे धुके आले, तर ते मात्र खूपच वाईट. या धुक्यामुळे मनाने जवळ असणारी माणसे दूर जातात. संशयाचे धुके तयार झाले, तर ते सहज जात नाही आणि गेले तरी नात्यांमध्ये पूर्वीची जवळीक आणत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या धुक्याचे तसे नसते. सूर्याचा पारा चढू लागला की धुके विरून जाते. दै. पुण्यनगरी कोल्हापूरच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासाठी…

____________________________________________________

तो दिवस सुट्टीचा होता. सकाळी उठलो, तर सारा आसमंत धुक्याने भरलेला. धुके पाहून मनापासून आनंद झाला. रस्त्यावरील दिवे धुक्याला चिरत जमिनीकडे प्रकाशाला पाठवण्याचा जिवापाड प्रयत्न करत होते, पण तो जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. दिवे सुरू असतानाही केवळ संधीप्रकाश जाणवत होता. धुक्यामुळे वातावरण थंड झाले होते. धुक्यातील थंडी हवीहवीशी वाटत होती. थंडीचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायचा, तर फिरायला जाणे गरजेचे. मी नित्याप्रमाणे, मात्र जरा लवकर आवरून फिरायला बाहेर पडलो (यास अनेकजन ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात). धुक्यात फिरायचा आनंद सोडायचा नव्हता. तसेच आपण नेहमीच्या वेळी निघालो आणि धुके विरले तर, अशी मनात भिती होती. धुक्याचा आनंद घालवायचा नव्हता, म्हणून लवकर निघालो. त्या दिवशीचे धुके इतके दाट होते की, पन्नास फुटावरचेही काही दिसत नव्हते. अशा मस्त धुक्याने भरलेले ते संपूर्ण वातावरण हवेहवेसे वाटू लागले. बाहेर पडलो आणि त्या धुक्याचा आनंद घेत मस्त फिरू लागलो. आता भ्रमणध्वनी हा केवळ संदेशवहनाचे साधन राहिलेला नाही. त्याचा उपयोग करत छायाचित्रे घेत होतो. साठवणीतील आठवणी आठवत आणि या धुक्यांच्या आठवणी छायाचित्रात बंदीस्त करत, मस्त फिरणे सुरू होते.

सूर्य नजरेआड होता. धुक्यांने पृथ्वी आणि सूर्यामध्ये पडदा धरला होता, अंतरपाटच जणू. सूर्याची पृथ्वीवर नजर पडू नये, याची धुके जणू काळजी घेत होते. पृथ्वीचा रात्रभरचा विरह असह्य झालेला सूर्य, या भूभागाला आपल्या सहस्त्र करांनी कुरवाळण्यास उत्सुक होता. मात्र सूर्य-पृथ्वीच्या मिलनामध्ये हे धुके अडथळा बनले होते. सूर्यासाठीचा अडथळा, माझ्यासाठी मात्र आनंदाचे धाम बनला होता. आनंदसुद्धा सापेक्ष असतो ना! पृथ्वी आणि सूर्य यांचा एकत्रित कधीही मनात विचार आला, की कुसुमाग्रजांचे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आठवल्यावाचून राहात नाही. वसुंधरेच्या सूर्यावरील निस्सिम प्रेमाचे हे कवन. पृथ्वीचे प्रेम आपल्याला मिळावे, म्हणून शुक्र, चंद्रापासून ते अगदी ध्यानस्थ अविचल ध्रुवापर्यंत सर्वजन आस लावून बसलेले असताना पृथ्वी मात्र सूर्यावर प्रेम करते. ती म्हणते,

‘परी दिव्य ते तेज पाहून पुजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहूनी साहवे’

असे उत्कट प्रेम करणाऱ्या पृथ्वीला सूर्याला भेटायचे आहे. तो रोजच भेटतो. आज मात्र धुके अडथळा बनले होते. या धुक्याला पाहून बालपणातील एक आठवण आली. गावातील एकाचे शाळा संपताच लग्न झाले होते. त्याची बायको, नवरा घरी यायची वेळ झाली की लपून बसायची. ते आठवले आणि मनात विचार आला, पृथ्वीपण आपल्या प्रियकराला पाहून धुक्याआड लपून बसली की काय? पण ते होणे शक्यच नाही. ही तर आपल्या प्रियकराला भेटायला स्वत:च अधीर झाली आहे. आपल्या आणि वसुंधरेमधील हा धुक्याचा अडथळा सूर्य एका ठरावीक मर्यादेपलिकडे सहन करणार नव्हता. त्याचा पारा जसजसा वाढेल, तसतसे हे जलबिंदू बाष्पात रूपांतरीत होऊन निघूनच जाणार होते. पण एखाद्या नवरीला भेटायला गेलेल्या नवरोबाला कुरवलीचा अडथळा असावा, तसाच हा काहीसे धुक्याचे वर्तन होते. त्या दिवशीही सूर्यापुढे धुके टिकले नाही. थोड्याच वेळात धुक्याला दूर व्हावेच लागले. सूर्याची किरणे पृथ्वीवरील प्रत्येक जिवासाठी पृथ्वीपर्यंत पोहोचणारच असतात. पण हे धुक्याचे सूर्य किरणांना अडवणे हे कुरवलीने नवरोबाला अडवण्याइतकेच मोहक वाटत होते. म्हणूनच धुके पडले की फिरायला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्या दिवशी असाच मनमुराद आनंदाची लयलूट करत, माझे फिरणे सुरू होते.

मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. अचानक मन उदास झाले. धुक्याचा आनंद कधी आणि कसा विरला, हे कळलेच नाही. त्या दिवशीचे धुके खूप दाट होते. एक किलोमीटरचा पल्ला स्कूटरवरून पार करताना स्वेटर भिजले होते. केसावरही दवबिंदू आले होते. कोरोना काळात सर्दीचा त्रास नको म्हणून रूमालाने केस पुसले आणि सफेद रूमालावर काळे डाग पडलेले आढळले. ते काळे डाग पाहून ‘डाग अच्छे है’ म्हणण्याचे धाडस कोणताही संवेदनशील माणूस करणार नाही. ते काळे डाग प्रदूषकांचे हवेतील प्रमाण जास्त झाल्याने आले होते. ते डाग पाहून बालपण आठवले. बालपणीही धुके पडायचे. केसावर जलबिंदू आलेले असायचे. मात्र या जलबिंदूनी कधी असे काळे डाग पडले नव्हते. प्रदूषण तर मानवाची निसर्गाला देणगी आहे. प्रदूषणामुळे धुकेही दूषीत झाले होते. त्यामुळेच त्या दिवशीचे धुके मन उदास करणारे ठरले. त्या उदासीत मंगेश पाडगावकरांचे यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले आणि अरूण दाते यांनी स्वरबद्ध केलेले गाणे नकळत ओठावर आले,  

‘धूके दाटलेले उदास उदास

मला वेढीती हे तुझे सर्व भास

उभी मूक झाडे, विरागी किनारा

झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा’

याच विचारात फिरून घराकडे वळलो आणि अनेक विचारांनी मनात काहूर केले. तसे धुके काही प्रथम अनुभवले नव्हते. विविध गावात आणि वयाच्या विविध टप्प्यावर धुके अनुभवलेले होते. आजच्या धुक्याने थंड वातावरणात दिलेला चटका मात्र मनातून जात नव्हता. रूमालावरील डाग साबणाने जाणार होते आणि गेलेही. मात्र मनात धुक्यांविषयी कुतूहल जागे झाले. मूळात धुके पडते का हा प्रश्न मनात आला.

धुके पडण्याला पाणीच प्रामुख्याने जबाबदार असते. वायुरूपातील पाण्याचे द्रवीकरण होत असताना तयार होणारे सूक्ष्म कण धुक्याच्या रूपात दिसू लागतात. खरं तर, हा भूपृष्ठालगत असणारा एक ढगच असतो. ढगात असणारे सर्वच कण पृथ्वीच्या वातावरणात असतात. या कणांची घनता जास्त झाली की आपल्याला लांबवरचे दिसणे कमी होते. धुके नसताना एक किलामीटरपेक्षा जास्त दूरवरचेही मानवी नजरेस स्पष्ट दिसते. मात्र धुके दाट असताना ही दृश्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी होते. विरळ धुक्यात ती एक किलोमीटरपेक्षा जास्त असते, मात्र नेहमीसारखे ते चित्र, तो परिसर स्पष्ट दिसत नाही. संशोधकांनी धुक्याची शास्त्रीय व्याख्या भलतीच कठीण करून ठेवली आहे. ‘दाट धुके म्हणजे जमिनीच्या किंवा पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारा असा मेघ की ज्यामुळे दृश्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी भरते’. साधं सोप्या भाषेत सांगायचे सोडून असले शब्द वापरून उगाच विज्ञानाविषयी जनसामान्यांच्या मनात निर्माण करतात. ते असो. धुके पडते, तेव्हा हा मेघ पृथ्वीच्या पृष्ठभागाला म्हणजेच जमिनीला किवा पाण्याला चिकटून असतो.

धुके पडण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्या कारणानुसार त्यांची विविध नावे आहेत. विविध कारणांनी बाष्पांश असलेल्या (आर्द्र) हवेतील ऊष्णता निघून जाते आणि ती हवा थंड होते. हे तापमान दवांकाखाली आल्यास धुके पडते. अशा धुक्याला शीतलीकरण धुके, असे म्हणतात. उच्च तापमानाच्या पाण्याचे थंड हवेत बाष्पीभवन झाले आणि हवेत धुके निर्माण करणारी केंद्रके असल्यास, धुके निर्माण होते, अशा धुक्यास बाष्पीभवन धुके म्हणतात. उच्च तापमानाच्या पाण्यावरून जेव्हा थंड हवा जाते, तेव्हाही बाष्पीभवन धुके तयार होते. आर्क्टिक भागातून येणारी थंड हवा जेव्हा समुद्रावरून वाहते, तेव्हा धुके तयार होते. या धुक्याला आर्क्टिक धूर म्हणून ओळखले जाते. अगोदरच्या दिवशी पाऊस झाला, तर हवेत बाष्प मोठ्या प्रमाणात तयार होते. सकाळी वारे वाहत नसेल, तर जमिनीतून रात्री बाहेर पडणाऱ्या प्रारणांमुळे जमिनीलगतचे तापमान कमी होते. ते दवांक बिंदूच्याखाली आल्यास प्रारणजन्य धुके तयार होते. उष्ण प्रदेशातील हवा शीत प्रदेशाकडे गेल्यास अभिवहन धुके तयार होते. उंचीवर असणाऱ्या उष्ण हवेतून कमी भागावरील थंड जागेकडे येणारे जलबिंदू हवेत बाष्प तयार करतात. हे वर्षाजन्य धुके असते. पर्वतावर ज्या बाजूने हवा येत असते, त्या बाजूला कोणत्याही कारणाने धुके तयार झाले तर त्यास आरोही धुके म्हणतात.   

एखाद्या पर्वताच्या शिखरावरील माणसाला ढग त्याला छेदून जाताना, सर्वत्र धुके पडल्याचा भास होतो. मात्र पर्वत पायथ्याशी असणाऱ्या व्यक्तीला ढग डोंगराला घासून चालला आहे, असे वाटते. एरवी सखल प्रदेशात आपण असताना जो धुक्याचा अनुभव घेत असतो, तो एक प्रकारचा ढगच असतो. या ढगात जलकण असतात. ध्रुवीय प्रदेशात किंवा बर्फाच्छादित प्रदेशातील धुक्यामध्ये बर्फाचे कणही असतात. पण सध्या धुके केवळ जलकणांचे राहिले नाही. यामध्ये धुळ, कार्बन, धूर, लवण इत्यादींच्या कणांचाही समावेश होतो. काही आम्लेही यामध्ये विरघळतात. विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये पडणाऱ्या धुक्यांमध्ये धुलीकण आणि धुम्रकणांचे मोठे प्रमाण आढळते. आपली प्रगती ही वातावरण आणि एकूणच पर्यावरणाचा बळी देत सुरू आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदुषके पाठवत आम्ही आमच्या सुखसोईच्या आणि आरामाच्या गोष्टी बनवत असतो. अनेकदा अशा प्रदूषकांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. अशा अपायकारक घटकांमुळे १९५२ साली लंडनला मोठी दुर्घटना घडली होती. तेथे डिसेंबर महिन्यात पडलेल्या धुक्यामुळे चार हजारपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते. हे आठवले आणि मंगेश पाडगावकरांच्या त्याच कवितेतील ओळी आठवल्या,

‘कुठे चालल्या या दिशाहीन वाटा

कुणा शोधिती या उदासीन लाटा’

मानवाची प्रगती ही खरंच दिशाहीन आहे. त्यामुळेच दिल्लीसारख्या शहरामध्ये पडणारे धुके चिंतेचा विषय बनते. धुके हा न्यायालयीन कामकाजाचा भाग बनते. प्रदूषण मंडळाचे आधिकारी हे धुक्याचे खापर शेतकरी पिकांचे उर्वरीत भाग जाळत असल्याने धुके पडत असल्याचा निष्कर्ष काढतात. शहरांवरील प्रदूषित हवेमध्ये आर्द्रतेचे म्हणजेच जलकणांचे प्रमाण ७० टक्केपेक्षा जास्त झाले, की धुके पडते. हवेतील बाष्प प्रदूषित घटकाच्या केंद्रावर जलकणात रूपांतरीत होते. त्यातच तापमान आणखी कमी झाले की हे प्रमाण वाढते आणि दाट धुके तयार होते. त्यामुळे धुके तयार होण्यास जलकणांना आधार देणारे प्रदूषक घटक आणि बाष्परूपातील पाणी हवे असते. त्यामुळे पावसाळा संपल्या-संपल्या धुके पडलेले वारंवार आढळते. धुके पडले की रंग लुप्त होतात. ती वस्तू एखाद्या धुसर कृष्णधवल चित्राप्रमाणे दिसू लागते. रंग गायब होतात, अगदी पूर्वी घडून गेलेल्या घटनांच्या आठवणीसारखे. मंगेश पाडगावकरांनी धुक्याच्या या गाण्यात पुढे नाहीतरी म्हटलेच आहे,

‘दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास

क्षणी भास होतो, तुझे सूर येती

जीवा भारुनी हे असे दूर नेती

स्मृती सोबतीला असा हा प्रवास’

आठवणींचेही असेच असते. दिवस जातील तशा त्या धुसर होत जातात. अनेकदा तपशील लक्षात नसतात. पूर्वी घडलेल्या एखाद्या प्रसंगात आपणास राग आलेला असतो, आपण चिडलेले असतो. मात्र कालौघात आपण त्या घटनेकडे प्रसंगाकडे तटस्थ वृत्तीने पाहायला लागतो, आणि आपणास आता त्यामध्ये चिडण्यासारखे काहीच नव्हते, हे जाणवते. अगदी तसेच धुके सर्व रंगाना लुप्त करून कृष्णधवल चित्र उभा करते. आजच्या धुक्यातही झाडे खरंच मुक्याने उभी होती. प्रदूषणाचा हे रूप पाहून मानवाची वाट दिशाहीन झाली आहे, याची खात्री पटत होती. उदासीन लाटामध्ये बालपणीच्या निव्वळ जलबिंदूच्या समृद्ध धुक्याला मन शोधत असते. स्मृती सोबतीला घेऊन धुक्यातील प्रवास होत असतो. अन स्मृती सांगतात… धुके असावे पण जलबिंदूंचे प्रदूषणाच्या काळ्या कणांना घेऊन आनंदाचा भास देणारे नसावे.

हवा कमी थंड असेल, तर शुभ्र धुके दिसते. मात्र हवा थोडी थंड झाली की धुके करड्या रंगाचे दिसू लागते. जितकी थंड होईल तितका रंग गडद करडा होत जातो. समुद्रावर, तळ्यावर पडणारे धुके आणि जमिनीवरील धुक्यांमध्ये पाण्याचे प्रमाण समान असते. मात्र जमिनीवरील धुक्यामध्ये असणारे कण हे आकाराने लहान (तीस मायक्रॉन व्यास) आणि संख्येने जास्त असतात तर समुद्रावरील धुक्याच्या कणांची संख्या कमी मात्र आकार मोठा (चाळीस मायक्रॉन व्यास) असतो. त्यामुळे समुद्रावरील धुक्याची दृश्यमानता जमिनीवरील धुक्यापेक्षा जास्त असते. अगदी जवळचे म्हणजे तीस मीटर अंतरावरील काहीही दिसत नाही, अशा प्रकारचे धुके तयार करण्यासाठी लागणारे पाणी किती असावे? तर अशा धुक्याच्या वलयात एक घनमीटरमध्ये पाणी असते, केवळ तीन ग्रॅम. औद्योगिक वसाहतीवर पडलेल्या धुक्यात हे पाणी आणखी कमी होते.

धुक्यामध्ये शक्यतो पावसासारखी जमीन भिजण्याची वेळ क्वचितच पाहायला मिळते. ज्या ठिकाणी तापमान उणे दहा डिग्री सेल्सियसपेक्षाही कमी असते, अशा भागात धुके पडत नाही. विमानात हायड्रोजन आणि कार्बनयुक्त इंधन वापरण्यात येत असल्याने कृत्रिमरित्या तयार होणारे ते एक धुकेच असते. त्याच्या धुरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि प्रदुषणकारी घटक असतात. प्रदूषके, धुलीकण नसतील तर धुके तयार होत नाही. मात्र त्याचे मानवाला पेलवेल एवढेच प्रमाण असायला हवे. सर्व प्रकारची धुकी ही केवळ तापमान बदलामुळे आर्द्र हवेत तयार होतात. तापमान वाढल्यास धुके नष्ट होते. त्यामुळे उष्ण कटिबंधामध्ये बहुतांश वेळा धुके केवळ सकाळी दिसते. थंड हवेच्या भागात धुके तयार झाले तर ते दिवसभर राहू शकते. महाराष्ट्रात सर्वत्र धुके पडते. कधीही आणि कोणत्याही ऋतूमध्ये धुके पडू शकते. मात्र त्यासाठी हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असावे लागते आणि तापमान दवांकबिंदूपेक्षा कमी असणे आवश्यक असते. 
 

धुके सर्वांनाच आवडते. सर्वांनाच आनंद होतो. धुक्यावर कवी मंडळी तर विशेष फिदा आहेत. अगदी आधुनिक कवितेचे जनक बा.सी. मर्ढेकरांपासून नव्याने कविता लिहायला लागलेल्या कॉलेजकुमारांपर्यंत सर्वांना हे धुके वेड लावते. हे धुके पृथ्वीलाही वेड लावते असे कल्पना हलगे यांना वाटते. त्या लिहितात,

‘भारलेली धुंद अवनी

भारलेलीच ही वाट

धुकं पिवूनी झिंगला

धुक्याचा तो थाटमाट’

धुके पडले की अवनी धुंद होते. वाटही भारून जाते. धुके पिऊन धुके झिंगते. कसली भारी कल्पना आहे. स्वत:च स्वत:च्या आनंदात मग्न असणाऱ्या माणसाप्रमाणे धुक्याचे वागणे आहे. तर, प्रज्ञा वझे-घारपूरे म्हणतात,

‘दे ना मला दुलई तुझी,

गोड गोजिऱ्या धुक्याची,

पांघरूनी मग मी ही निजेन,

स्वप्न्‍ कोवळ्या उन्हाची’.

असे हे धुके प्रत्येक कवीला वेगळे दिसते. प्रत्येकाच्या आठवणी वेगळ्या. प्रत्येकाची नजर वेगळी. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच धुके वेड लावते. त्यामुळेच मृण्मयी नावाच्या कवयित्रीच्या पिलूला,

‘धुकं, धुकं, धुकं पडलं,

मला ते खूप गारठून गेलं,

मी गेले लपायला,

धुकं आलं मला शोधायला,

धुकं येऊन माझ्याशी खेळलं,

उन्हानं त्याला घरी पाठवलं,’

असे बालगीत सूचले. त्या बालवयातील रचना करणाऱ्या पिलूला सूर्यदेव आले की धुके पळून जाते हे माहीत आहे. इतक्या लहान बालकांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांना धुके आवडते, वेड लावते.

जाणीवा जागृत झालेल्या अनेक कवींना धुक्यात गतकाळातील आठवणी आठवतात आणि ते त्याप्रमाणे व्यक्त होतात. हा सिलसिला अगदी बा.सी. मर्ढेकरांपासून सुरू आहे. त्यांनाही आपल्या प्रियेची आठवण होते आणि ते म्हणतात,

‘दवात आलीस भल्या पहाटी

शुक्राच्या तोऱ्यात एकदा,

जवळुनी गेलीस पेरीत आपुल्या

तरल पावलांमधली शोभा’

त्यातही वेदनांचा सल व्यक्त होतो आणि कवी काव्यामृत लिहितो, ‘शुभ्र दाटले धुके धुसर, गंध कुसुमांचा दरवळत नाही, सल किती या वेदनेचा, अबोल तोलही सावरत नाही.’ अनेक कवी धुक्याबरोबर जुन्या आठवणी आठवत राहतात. या आठवणीमध्ये या कवीनी धुक्यावर अनेक कविता लिहिल्या आहेत. ‘मराठी कविता’ ब्लॉगवर अशा अनेक कविता भेटतात. यातील एका कवितेत कवी लिहितो, ‘ओंजळीत पहाडांच्या धूसर धुके साठलेले… गुफेत हृदयाच्या, जणू दु:ख दाटलेले…’  काही कवीना मात्र धुक्यात प्रेम आठवते. वैभव वाघमारे यांनी ‘आज पुन्हा धुक्याची पहाट आली, प्रत्येक पानांवर तुझी प्रतिमा तयार झाली l मी शोधत राहिलो त्या दवबिंदूमध्ये तुला, आणि तू प्रत्येक थेंबात विलीन झालीस l’ अशी रचना करतात. तर जागृती पुजारी, ‘ओल्या शुभ्र धुक्यात पानावली ही माती, येता तुझ्या कवेत विसावली सारी नाती…!!!’ अशा व्यक्त होतात. खरंच, धुक्यामध्ये सारं काही विसरून आठवणीत मन रमते. अनेक कवींच्या रचना याची साक्ष देतात.

माध्यमीक शिक्षण घेत असताना, पुरतं कळायच्या आधीच्या वयात, वर्गातील तो तिला आवडतो. तसेच तो कोणा दुसरीला पाहून खूश होत असतो. त्याला आवडणारी ती दिसली तरी त्याचे मन उगाच खूश होते. दिवस चांगला जाणार असे मन, त्याच्या मनालाच सांगते. त्या वयात तो तिच्याजवळ किंवा ती त्याच्याजवळ व्यक्त झालेले नसतात. पुढे शालेय शिक्षण संपते आणि वाटा वेगळ्या होतात. मात्र या आठवणी मनाच्या कोपऱ्यात तशाच असतात. त्याला ती, तिला तो कधीतरी आठवतात. पुढे कधी भेटतात, कधी भेटत नाहीत. मात्र त्यांच्या त्या आठवणींचे हे दिवस साठवण बनून राहिलेल्या असतात. त्याच आठवणी धुके पडले की बाहेर पडत असाव्यात. अनेकांच्या महाविद्यालयीन जीवनातीलही अशा आठवणी असतात. व्यक्त-अव्यक्त प्रेमाच्या त्या आठवणी अखेरपर्यंत येत असतात आणि धुके त्या आठवणीवरील धूळ धुवत असावे. त्यामुळेच धुक्यात त्या प्रकर्षाने येत असाव्यात. मानवी मनावर संशयाचे धुके आले, तर ते मात्र खूपच वाईट. या धुक्यामुळे मनाने जवळ असणारी माणसे दूर जातात. संशयाचे धुके तयार झाले तर ते सहज जात नाही आणि गेले तरी नात्यांमध्ये पूर्वीची जवळीक आणत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या धुक्याचे तसे नसते. सूर्याचा पारा चढू लागला की धुके विरून जाते.   

धुक्यांचे विचार अनेक दिवस मनातून जात नव्हते. सात-आठ दिवस गेले आणि पुन्हा एक दिवस धुक्याची पहाट आली. ही सकाळ मनमौजी सकाळ होती. छान धुके पडले होते. खरंतर सकाळी पावणेसहापर्यंत धुक्याचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते. रस्त्याच्या मध्यावर असणाऱ्या विद्युतपथावरून अवैधरित्या नेलेल्या केबलच्या वायरना खाली लोंबणारे पाण्याचे पांढरे थेंब दिसत होते. अंधारामुळे काळ्या रंगाच्या केबलवरील पांढरे पाण्याचे थेंब, मूळात हिरव्या पार्श्वभूमीवर आणखीन उठून दिसत होते. जणू कोणी काळ्या धाग्यामध्ये पांढरे मोती ओवून माळच तयार केली होती. अशा प्रसन्न सकाळी, ती आणखी प्रसन्न करण्यासाठी, स्वहस्ते बनवलेला मस्त (हो, मला चहा छान बनवता येतो, असे माझ्या गृहमंत्र्याचे प्रमाणपत्र असते) चहा फस्त करून, स्वेटरमध्ये स्वत:ला झाकून, कानांची बंदिस्ती करून, मजेत बाहेर पडलो. विद्यापीठाच्या प्रांगणात आलो आणि धुके दिसू लागले. आणखी थोडे पुढे जाईपर्यंत, धुक्यावरचे बा.सी. मर्ढेकरांचे काव्य आठवले धवल धुक्याच्या संथ बटांची, ल्याली मलमल किती घरे ही! आणि वाटले धवल धुक्यांची मलमल किती झाडांनी लपेटून घेतली आहे.

आजचे धुके आणखी वेगळे होते. फिरता फिरता जे दिसत होते, ते भ्रमणध्वनीला छायाचित्र टिपण्याचे साधन बनवून टिपत गेलो. निसर्गाचे नवे रूप साठवत गेलो. आजच्या धुक्यामध्ये संक्रांत वेलीच्या कळ्याही जणू उमलणे विसरून गेल्या होत्या. मोरही थिजले असावेत. नाहीतर सहाच्या आत न्याहरीसाठी नेहमी दिसणारी त्यांची धडपड आठ वाजत आले, तरी दिसत नव्हती. पक्ष्यांचे मंगलकुजन नव्हते. वेगवेगळ्या झाडांची पाने अंगावर धुक्याची चांदर पांघरून मस्त झोपली होती. तर काहींनी हा भार सहन होत नसल्याने जलबिंदूना टोकाला नेऊन मोत्यामध्ये रूपांतरीत करायला सुरुवात केली होती. पांढरफळीच्या फांद्यानीही खालच्या बाजूला जलबिंदूना मोत्याचे रूप देत बांधून ठेवले होते. काही झाडांनी आपल्या अंगावर येणाऱ्या दवबिंदूना जास्तच जवळ ओढत स्नानाचा आनंद घ्यायला सुरुवात केली होती. ती पूर्ण भिजली होती. गुलमोहोर आणि सुबाभूळ हे विदेशी वृक्ष यात आघाडीवर होते. त्यांच्या पानातून थेंब जमिनीकडे येत होते आणि रस्ता त्या जलबिंदूनी भिजला होता. असे धुके क्वचितच दिसते.

मस्त धुक्यामध्ये निसर्गाचा आनंद घेत असताना, अधूनमधून सूर्याचे दर्शन घेत होतो. सूर्यही आज जणू धुक्याची दुलई पांघरून झोपला असावा. सुरुवातीला समस्त पशूपक्ष्यांचे वागणे पाहून, तर सूर्य उगवायचे विसरला की काय? असेच वाटले. मात्र त्याला पृथ्वीचा विरह सहन होत नसावा. अधूनमधून तो बाहेर यायचा आणि आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करायचा. मात्र आजचे धुके वेगळेच होते. त्याने सूर्यालाही चंद्रासारखे शीतल बनवले होते. तो चंद्रासारखा दिसत होता. कोणताही गॉगल न घालता सूर्याला पाहू शकत होतो. तोही धुक्यापुढे जणू पांढरे निशाण घेऊन शरण आला की काय, असे वाटत होते. धुक्याआडून त्याचे दर्शन चंद्राप्रमाणे शीतल होते. झाडांआडून दिसणारा शीतल सूर्य पाहून लिंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई.. आठवले आणि हसूही आले. सकाळी, सकाळी अंगाई गीत आठवले. सूर्याची अवस्था पाहून धुक्याने थिजलेल्या आणि त्यामुळे अजूनही निजलेल्या पक्ष्यांसाठी तर हे अंगाई गीत आठवले नसेल ना! याच विचारात वेळेकडे लक्ष गेले. नऊ वाजत आले होते. सूर्यांने अखेर आपली शक्ती दाखवायला सुरूवात केली आणि धुके विरळ होऊ लागले. काही मिनिटात त्याचे अस्तित्व संपले. मात्र सकाळ प्रसन्न करून… 

पुन्हा बालपणीचे धुके पडावे… स्वच्छ जलबिंदूंचे… असे नेहमी वाटते. धवल धुक्यांच्या संथ बटांची मलमल रोज ल्यायला मिळावी. मात्र धुक्यामध्ये प्रदूषकांचे प्रमाण जास्त असले, की आम्लयुक्त, धूरयुक्त धुके पडते. हे धुके आवडले तरी कोणत्याही संवेदनशील मनाला उदास करून जाते. असे धुके सोडले तर… ते मन प्रसन्न करणारेच असते. आठवणींना उजाळा देणारे असते. दररोजचा सूर्योदय जसा वेगळे रूप घेऊन येतो, तसेच दरवेळी धुके वेगळे रूप घेऊन येते. कोणतेही रूप घेऊन धुके आले, तरी मनापासून आनंद होतो.

७ टिप्पण्या:

  1. Very nicely presented sir. Reality, poetic views, feelings, scientific facts, pollution and its effects. Many things to learn. Thank you 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. धुक्याची ..... शास्त्रीय, साहित्यिक व काव्यात्मक अशी छान मांडणी केली आहे. दाट धुक्याप्रमाणेच हा लेख ही मनाला दवबिंदूंमध्ये भिजवून जातोच...... छान लेख सर 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. धुक्याविषयीं शास्त्रीय माहिती सांगताना मानवी जीवनातील प्रेम, लोभ आणि मानवाचे जगणे या अनुषंगाने धुक्याला केंद्रवरती ठेऊन केलेली मांडणी ललित आणि ललितेतर साहित्य यांच्यातील सीमारेषा पुसाट

    उत्तर द्याहटवा
  4. धुक्याविषयीं शास्त्रीय माहिती सांगताना मानवी जीवनातील प्रेम, लोभ आणि मानवाचे जगणे या अनुषंगाने धुक्याला केंद्रवरती ठेऊन केलेली मांडणी ललित आणि ललितेतर साहित्य यांच्यातील सीमारेषा पुसट करणारी आहे हे या लेखाचे वेगळेपण आहे.

    उत्तर द्याहटवा