बुधवार, २० मे, २०२०

नितांतसुंदर बहावा…




 बहावा! एक नितांतसुंदर असं झाड. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू अशी अनेक नावं धारण करणारं भारतीय उपखंडातील मूळचं झाड. देखण्या चित्ताकर्षक फुलांच्या माळा आंगोपांगावर वागवणारं म्हणूनच नव्हे तर बहुगुणी, बहुऔषधी, बहुपयोगी म्हणूनही सर्वदूर लोकप्रियता प्राप्त करणारा हा राजवृक्ष आहे. बहावाच्या याच वैशिष्ट्यपूर्णतेवर टाकलेला एक दृष्टीक्षेप….
--------------------------------------------------------------------------------------------
बहावाची आणि आमची ओळख शाळेपासूनची. गाव बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी. लहानपणी अनेकदा या डोंगरावर गेलो. पावसाळ्यात या डोंगरात फिरताना एका झाडाला लांबलचक काठीसारख्या शेंगा दिसायच्या. त्या तोडून आम्ही त्याचा वापर काठी म्हणून करायचो. एका मित्राने त्या शेंगांचा आणखी वेगळाच उपयोग शोधला. काठी तोडायची. काठीचा तुकडा दगडावर रगडायचा. काळा रंग असल्याने काठी चांगलीच तापायची. त्या तापलेल्या तुकड्याचा चटका मित्राला द्यायचा. चटका बसला की मित्र दचकायचा. तो दचकला की याला आनंद व्हायचा. गमतीत आम्हीही हा प्रयोग करू लागलो. ही गोष्ट आमच्या पिताश्रींच्या लक्षात आली आणि त्याच काठीचा पाठीवर प्रसाद मिळाला. वरुन ताकीदही. पुन्हा या शेंगा घरात दिसता कामा नयेत. ही बहावाची आणि आमची पहिली भेट. त्या काळात उन्हाळ्याच्या डोंगरात हिंडायला आम्हाला बंदी असल्याने आणि गावाजवळ बहावाची झाडे नसल्याने शालेय जीवनात… तो फुललेला कधी दिसलाच नाही.
पुढे बसमधून प्रवास करताना कधीमधी दिसला तरी लक्षात राहिला नाही. दयानंद महाविद्यालयात विशेषत: वसतीगृहाच्या मागे त्याची झाडे होती. वसतीगृहातून बाहेर पडण्याच्या मार्गावर बहावा आणि सोनमोहरची झाडे होती. महत्त्वाचे म्हणजे आमच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेशेजारी बहावाचे उंच वाढलेले झाड होते. त्याची इमारतीशी स्पर्धा सुरू होती. ते जणू विद्यार्थ्यांना सांगायचे, इमारतीसारखे राहू नका; माझ्यासारखे वाढत राहा. मात्र ते फुलायच्या दिवसात महाविद्यालयाला सुट्टी असल्यामुळे  त्याचे पुष्पसौंदर्य प्रथम आणि द्वितीय वर्षात अनुभवता आले नव्हते. तिसऱ्या वर्षी मात्र शिक्षकांच्या संपामुळे परीक्षा उशीरा झाल्या आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्या झाडाला फुललेले पाहायचे भाग्य आम्हाला लाभले. ते फुललेले रूप पाहून मी त्या झाडाच्या(च) प्रेमात पडलो. त्यानंतर प्रवासादरम्यान रस्त्याकडेला हे झाड दिसले की त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवत राहिलो. 
आम्ही विद्यापीठातील निवासस्थानात राहात होतो, तेव्हाची गोष्ट. आपण जेवढी वर्षे इथे राहणार तेवढी वर्षे दरवर्षी एक झाड लावून वाढवायचे, असे आम्ही ठरवलेले. अगोदरच्या वर्षी गुलमोहर लावला.  त्या शेजारी बहावाचे रोप लावायचे, असे आमच्या सौभाग्यवतींनी ठरवले. त्यासाठी त्यांनी एका माळ्याला बहावाचे रोप आणून द्यायला सांगितले. त्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर माळी घरी आला. तो आमच्या सौभाग्यवतींना सांगत होता की, ‘मॅडम, ते तुम्ही सांगितलेले ‘बावा’चे रोप काही मिळत नाही. लय शोधलं पण कुठं मिळंनाच’. सौभाग्यवतींना आश्चर्याचा धक्का बसला. ‘मी कुठे तुम्हाला असले रोप बघायला सांगितले होते?’ त्यावर तो माळी पुन्हा म्हणाला, ‘मागच्यावेळी आल्यावर तुमीच म्हणला होता की बावाचं रोप पायजेल म्हणून’. त्या दोघांचा चाललेला संवाद ऐकून मला हसू येत होते. कारण तो माळी त्याच्या भाषेत सांगत होता, तर आमच्या सौभाग्यवती पुणेरी मराठीत. शेवटी मी मध्ये हस्तक्षेप करत विचारले, ‘अरे, कसल्या झाडाचे रोप म्हणतोस?’ मग त्याने सांगितले, ‘आपल्या गेस्ट हाऊसजवळ नाही का, पिवळी उलटी फुलं येतात ते, काठीसारख्या शेंगा असत्यात; ते झाड हो. त्याचं मॅडमनी रोप मागितलं होतं. सगळीकडे शोधलं पण मिळतच नाही’. हे वर्णन ऐकून सौभाग्यवती आणि माझ्या डोळ्यासमोर पटकन ते झाड आले. मी बोलायच्या अगोदर सौभाग्यवतीच बोलल्या, ‘अच्छा, तुम्ही बहावाच्या रोपाबद्दल बोलताय होय. मग ते कसे तयार करायचे?’ मीच पुढे म्हटले, ‘ आता त्याला शेंगा आल्या असतील ना. त्या शेंगा घेऊन ये. आपणच करू त्याचे रोप’. माळ्यालाही आश्चर्य वाटले आणि तो दहा मिनिटात शेंगा घेऊन आला. त्याचे बी काढून लावले. महिन्याभरात मस्त रोप वाढले. विद्यापीठातील निवासस्थानाबाहेर बहावाचे रोप गुलमोहोराशेजारी लावले. पण माळ्याने ‘बहावा’ची टोके काढून त्याला ‘बावा’ केलेले पाहून हसायला येत होते. आजही ही आठवण काढून आम्ही हसतो. 
बहावा! नितांत सुंदर असे झाड. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू असे नाव धारण करणारे हे झाड. या झाडाचे मूळ भारतीय उपखंडात आहे. ब्रह्मदेशापासून दक्षिण पाकिस्तान आणि उत्तर प्रदेश बिहारपासून अगदी श्रीलंकेपर्यंत आढळणारे हे झाड. या अस्सल भारतीय झाडाचा उल्लेख येथील पुराणात आढळत राहतो. रामायणामध्ये सीताहरणावेळी सीता कर्णिकार वृक्षाला सांगते, ‘हे कर्णिकार वृक्षा, तू प्रभू रामचंद्रांना सांग की तुमच्या सीतेला रावणाने पळवले आहे.’ त्याचप्रमाणे रामही सीतेच्या विरहाने व्याकुळ होऊन कर्णिकार वृक्षाला मिठी मारतात आणि विचारतात, ‘तू सीतेला पाहिलेस का?’. रामायणात त्यापुढेही अनेक ठिकाणी या वृक्षाचा उल्लेख आला आहे. कवी कालिदासाने आपल्या काव्यात या झाडाचे वर्णन अनेकदा केले आहे. महाभारतात मात्र बहावा कोठे भेटला नाही.
हा बहुगुणी वृक्ष आहे. त्याच्या गुणधर्माप्रमाणे त्याला अनेक नावे मिळाली. त्याच्या वर्णनावरून आणि उपयोगाप्रमाणे ही नावे आली आहेत. हे झाड औषधी असून आयुर्वेदात त्याचे विविध उपयोग  आहेत. या झाडाच्या शेंगांचा मुख्यत: उपयोग केला जातो. रोगांचा नाश करणारा म्हणून बहावाला ‘आरग्वध’ असे नाव मिळाले. याच्या शेंगाची पूड रेचक असल्याने बद्धकोष्ठता असणाऱ्या रूग्णासाठी वापरली जाते. त्यामुळे त्याला ‘आरेवत’ असेही नाव पडले. विविध व्याधींचा नाश करणारा म्हणून ‘व्याधीवत’, मानवाचे कल्याण करणारे फळ देणारा म्हणून याला ‘शम्पाक’ म्हणतात. हा वृक्ष आरोग्य चांगले ठेवण्यास सहाय्यकारक असल्याने त्याला ‘आरोग्यम्’ असेही म्हणतात. त्याची शेंग गुणकारी असल्याने त्याला ‘आरोग्यशिम्बी’ हे नाव मिळाले. तर त्या झाडाच्या वर्णनानुरूप त्याला ‘सुवर्णक’ म्हणजे सोनेरी रंगाचा, ‘स्वर्णाङ्ग’ म्हणजे सोनेरी काया असणारा, ‘स्वर्णभूषण’ म्हणजे सोन्याच्या दागिन्याप्रमाणे फुले असणारा, ‘स्वर्णद्रु’ म्हणजे सोनरी वृक्ष, ‘कृतमाल’ म्हणजे फुलांच्या माळा धारण करणारा, ‘दीर्घफल’ म्हणजे लांबलचक फळ असणारा, ‘चतुरङ्गुल’ म्हणजे दोन पानात चार बोटांचे अंतर असणारा, अशा विविध नावांचा धनी आहे हा बहावा. हा वृक्ष मूळ या मातीतील असल्याने त्याला अशी अनेक संस्कृत नावे येणे स्वाभाविक आहे.

याचे शास्त्रीय नाव आहे कॅशिया फिस्टुला. बहावाच्या फळांचा आकार हा दंडगोलाकार लांब काठीप्रमाणे असल्याने त्याला फिस्टुला हे नाव मिळाले. तर त्याच्या फुलांचा मंद सुगंध येत असल्याने ग्रीक शब्द कॅसियावरून त्याचा समावेश कॅशिया कुटुंबात झाला आहे. या फळातील गोडसर गर हा माकडांचे आवडते खाद्य त्यामुळे याला हिंदीमध्ये ‘बंदर लाठी’ असेही नाव मिळाले आहे. तर याच गुणधर्मामुळे त्याला इंग्रजीमध्ये ‘पुडींग पाईप ट्री’ असे म्हणतात. एखाद्या राजाच्या दरबारात सर्वांचे बोलणे झाल्यानंतर सुवर्णालंकारानी नटलेला राजा बोलायला उभा राहावा, तसा वसंत ऋतू संपण्याच्या मार्गावर असताना निसर्गाच्या दरबारात हा वृक्ष खुलून दिसतो. म्हणूनच की काय याला ‘राजवृक्ष’ असेही म्हटले जाते.

हा खरोखर राजवृक्ष आहे. थायलंडमध्ये त्याला राजवृक्षाचा दर्जा आहे. या वृक्षाला फुले आल्यानंतर तेथे मोठा उत्सव साजरा केला जातो. बहावाचे फुल हे थायी संस्कृतीचे निदर्शक मानले जाते. त्याला ‘रॅचाफ्रुरेक’ म्हणून ओळखले जाते. बहावाच्या फुलण्याला ते ‘डोकू खून’ म्हणतात. आपल्याकडचे डाकू आणि खून हे दोन शब्द आठवतात. मात्र इतक्या सुंदर फुलांशी जोडला गेलेला शब्द ‘खून’ असला तरी तो थाई भाषेतील आहे. हिंदी किंवा मराठीतील नाही. लाओ या देशाचे नववर्ष या वृक्षाच्या फुलण्याबरोबर सुरू होते. नवे वर्ष हे आनंद आणि सुखसमृद्धीने भरलेले असावे, यासाठी या वृक्षाच्या फुलांनी घरे आणि मंदिरे सजवली जातात. सर्वत्र ही फुले झुंबरासारखी लावतात. श्रीलंकेतही बौद्ध मंदिराच्या भोवती या झाडांची लागवड केली जाते. सिंहली भाषेत याचे नाव ‘इहेला’ असे आहे. इंडोनशियामध्ये याला ‘कायुराजा’ म्हणून ओळखले जाते.
 महाराष्ट्राचे राज्यफुल जसे जारूल आहे, तसे केरळचे राज्यफुल बहावा आहे. केरळच्या राजवृक्षाचा दर्जा या वृक्षाला मिळाला आहे. केरळमधील ‘विशू’ सणामध्ये या फुलांना विशेष महत्त्व असते. या सणामध्ये अय्यप्पाची पूजा केली जाते. अय्याप्पाच्या पूजेची आरास बहावाच्या फुलांनी करतात. आपल्याकडे झेंडू आणि दसरा सणाचे जसे नाते आहे, तसे बहावा आणि विशू सणाचे नाते आहे. विशू म्हणजे मल्याळी लोकांच्या नव्या वर्षाचा आरंभ! थायलंड असो, लाओ असो किंवा केरळ. ज्या कोणाला या नववर्षाची सुरुवात बहावाच्या फुलांच्या सहाय्याने करण्याची कल्पना सुचली असेल, त्याचे कौतुक करायला पाहिजे.  
अशा या अनेक नावे धारण करणाऱ्या वृक्षाची उंची वीस फुटांपासून साठ फुटापर्यंत असते. हे झाड चिंच, गुलमोहर, शंकासूर, नीलमोहर, कांचन यांच्याच कुटुंबातील सदस्य आहे. भारतीय उपखंडातील जरी हे झाड असले, तरी त्याच्या सौंदर्यामुळे आज जगभर त्याची लागवड केली जाते. पाण्याची निचरा होणारी जमीन या झाडासाठी योग्य. उलट पाणी जास्त असले तर ते बहरात येत नाही. म्हणजे म्हणावे तसे फुलत नाही. डोंगर कपारीतही हे झाड छान फुलते. ते क्षार मोठ्या प्रमाणात शोषून घेते. त्याला जास्त थंडी सहन होत नाही. याचे खोड टणक आहे. बैलगाड्या, होड्या शेतीची अवजारे शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी याचे लाकूड उपयोगाला येते. गावाकडे बारदाण्यासाठी बाभळीचे लाकूड नाही मिळाले, तर बहावाच्या लाकडाला पसंती दिली जाते. बहावाच्या लाकडावरील सालही पिवळसर हिरवी किंवा फिकट पोपटी रंगाची असते. त्याच्या सालीचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मुख्यत: कातडे कमावण्यासाठी ही साल वापरतात. घशाच्या गाठीवर बहावाच्या सालीचा काढा करून दिला जातो. हे तसे पानगळीचे झाड. याचे पान संयुक्त असते. देठाच्या दोन्ही बाजूला तीन ते आठ लांब पाने येतात. पानाची लांबी अगदी दोन फुटापर्यंतही असते. मात्र जनावरे याची पाने खात नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला हे झाड लावण्यासाठी सुरक्षित मानतात. वसंताच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्या खोडावर मोहर यायला सुरूवात होते आणि एप्रिलच्या अखेरीस बहावा फुलायला सुरुवात होते.
बहावाच्या फुलाला एकसारख्या आकाराच्या पाच पिवळ्या नाजूक पाकळ्या असतात. त्याच्या केंद्रस्थानी दहा सारखे आणि तीन वेगळे पुंकेसर असतात. स्त्रीकेसर मात्र एक आणि लांब असतो. अशा अनेक कळ्यांचे घोस उलटे जमिनीकडे वाढत राहतात आणि फुले फुलायला सुरुवात होते. मात्र तो फुलांचा गुच्छ बनत नाही. तर ते दोलकाप्रमाणे भासतात. मात्र झुलतात झुंबरासारखे. छताला टांगलेल्या झुंबराप्रमाणे ते फांदीला चिकटलेले असतात. आदिवासी लोक याच्या कळ्यांची आणि फुलांची भाजी करतात. काही लोक याचा गुलकंदासारखा खाद्यपदार्थही बनवतात. बहावाच्या फुलांचे घोस हे पंधरा दिवसांपर्यंत टिकतात. वरून फुले उमलतात, तेव्हा मध्ये अर्धवट फुललेल्या कळ्या असतात. तर अगदी टोकाला मुक्या कळ्या असतात. हे घोस अगदी दीड-दोन फूट लांबीचे येतात. संशोधकांच्या मते बहावाचे सहा ते सात प्रकार आहेत. मात्र त्याला पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुले येतात. उत्तराखंडमध्ये पांढरा बहावा आढळतो. आपल्याकडे मात्र पिवळा बहावाच आढळतो. या फुलांना दिवसा सुगंध जाणवत नाही. अगदी जवळ गेल्यावर मंद सुवास येतो. रात्री मात्र या झाडाजवळ जाताच येणारा गंध मनाला मोहवून टाकतो. त्याच्या फुलामध्ये असणाऱ्या रसामुळे अनेक किटक त्याकडे आकृष्ट होतात. वाऱ्याची झुळुक आल्यावर खाली पडणाऱ्या त्या सुवणमुद्रांचा सडा अंगावर घेताना आपणही जणू राजा असल्याचा भास व्हावा.  
याचा बहार संपताना त्यावर लांब हिरव्या शेंगा येतात. तीच याची फळे. दीड ते दोन फुट लांबीच्या या शेंगा टणक असतात. त्यांचे आवरण शेंग जशी पक्व होत जाईल तसे टणक होत जाते. तिचा व्यास दीड ते अडीच सेंटीमीटर असतो. शेंगांच्या आत कप्पे असतात. या कप्प्यात गोड गर असतो आणि त्यात त्याच्या बिया सुखात राहतात. वानरांप्रमाणेच कोल्हा, अस्वल, भेकर हे प्राणीही याच्या कोवळ्या शेंगावर ताव मारतात, असे संशोधकांना आढळून आले आहे. हा गर तंबाखूला सुगंधी बनवण्यासाठी वापरला जातो. हा गर पित्तशामकही आहे. ही फळे पक्व होतात, तसा त्यांचा रंग हळूहळू तपकिरी आणि नंतर काळा होत जातो. उन्हाळ्यात या शेंगा पूर्ण काळ्या रंगाच्या बनतात. पूर्ण वाळलेल्या शेंगा वाऱ्यावर झुलू लागल्या की त्यातून मंजूळ आवाज ऐकायला मिळतो. शेवटी बिया सुट्ट्या न होता पूर्ण शेंगच जमिनीवर पडते. शेंग जड असल्याने आणि आवरण कठिण असल्याने याची निसर्गत: मोठ्या प्रमाणात रोपे तयार होत नाहीत. बिया जाणीवपुर्वक रूजवून मात्र हवी तेवढी रोपे बनवता येतात. 
 इतर वेळी या झाडाचे अस्तित्व जाणवतही नाही. मध्यम चणीच्या या वृक्षाच्या फांद्या कशाही वाढलेल्या असतात. हिवाळा सरताना याची सर्व पाने पडतात. मात्र त्याच्यावर पाने येण्यापूर्वीच मोहर यायला सुरूवात होते. फुलांचा मोहर संपताना त्यावर लालसर रंगाच्या पानासह नवे कोंब फुटतात. ही पाने नंतर पोपटी आणि शेवटी गडद हिरवी होत जातात. हिवाळा संपताना याची पाने पिवळसर रंग धारण करतात आणि गळतात.

असा हा विविध रंगाची उधळण करणारा बहावा कवीला भुरळ न पाडता तरच नवल. अनेक कवींनी बहाव्याला काव्यात बांधले आहे. अरूण सु. पाटील यांना फुललेल्या बहावाच्या झाडाकडे पाहताना नटलेली आणि हळद लावलेली नवरी दिसली. ते म्हणतात,
‘हिरवी हिरवी गार
साडी नवरी नेसली
सोनपिवळी फुलांची
अंगी हळद माखली’
तर फुललेला बहावा पाहून कवी बिपीन यांना कवळ्या प्रेमाची आठवण येते. ‘मायबोली’ ब्लॉगवर कवयित्री स्मिता यांनी ठेवलेल्या कवितेचा शेवट खूपच हळूवार केला आहे. कवीने बहावा गुलमोहराच्या कुशीत बहरत असल्याचे वर्णन केले आहे. रेखा घाणेकर यांच्या ब्लॉगवर बहावावर दोन कविता दिसतात. त्यातील एका कवितेत अगदी नेमक्या शब्दांत त्या म्हणतात ‘मन बहावा, बहावा, डोळे भरून पहावा’. बहावाचे फुलणे खरंच डोळे भरून पाहावे, असेच आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार गुलजार यांच्या ‘अमलतास’ या कवितेमुळे बहावाचे हिंदी नाव अनेकांना कळले.
मराठीतील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या कवितेतील तिसरे कडवे हे बहावाचे फुलणे पाहूनच लिहिले असावे, असे मला नेहमी वाटते. यात मी विज्ञानाचा विद्यार्थी असण्याचा भाग असावा. कवीच्या कल्पनेला अंत नाही, मर्यादा नाहीत. कोणतीच बंधने नाहीत. मात्र विज्ञान तसे मान्य करत नाही. त्या ओळी अशा आहेत,
 ‘पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
 माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा’
वसंतात विविध झाडांना पालवी फुटून झाडे हिरवीगार होतात, म्हणजे पाचूचा रंग धारण करतात. त्यावेळी म्हणजे वसंताच्या शेवटच्या काळात हळदीच्या रंगाची फुले धारण करत बहावा फुलतो. भाळावर घामाचे थेंब या काळात हमखास येतात. श्रावणात वातावरण बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे घामाचे थेंब भाळी येण्याची शक्यता नाही. मात्र भाळीचे थेंब श्रावणसरीमुळे आले असतील, तर त्या पावसामुळे माती गंधित होत नाही. तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब जेव्हा पडतात, तेव्हा मातीचा गंध गगनाचा गाभारा भरून टाकतो. श्रावणातील पाऊस मातीला गंध देत नाही. बहावा फुललेला असतो तेव्हा तापलेल्या मातीवर वळीवाचा पाऊस पडतो. तेव्हा जमीन तापलेली असते. त्या मातीचा गंध येतो. म्हणून हे कडवे पाडगावकरांना बहावाच्या फुलण्याला पाहून सुचले असावे आणि नकळत या गाण्यात बसले असावे, असे वाटते. ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे गीत निश्चितच आनंद देते. खूप सुंदर आवाजात ते लताजीनी गाईले आहे. मात्र या गाण्यातील या ओळी ऐकताना बहावाच आठवत राहतो.
हे कवितांचे झाले. मात्र या बहावाने एका शास्त्रज्ञालाही मोहात पाडले होते. डॉ. बिरबल साहनी हे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आणि पुरावानसशास्त्रज्ञ. म्हणजेच पॅलिओबॉटनिस्ट. वनस्पतींच्या निर्जीव जीवाश्मांचा अभ्यास ते करत. त्यांनी याबाबतची राष्ट्रीय संस्थाही स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. बिरबल साहनी हे सौंदर्यदृष्टी असणारे रसिक व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निवासस्थानी त्यांनी सुंदर बाग फुलवली होती. या बागेत ते स्वत: काम करत. घराची आणि आपली काळजी घेणाऱ्या पत्नीला कृतज्ञता म्हणून दररोज बागेतील गुलाबपुष्पांचा सुंदर गुच्छ भेट देत. त्यांनी लखनौमध्ये गोमती नदीच्या किनारी आपले घर बांधले. नदीच्या किनाऱ्यावर सर्वत्र बहावाची झाडे लावली. ऐन उन्हाळ्यात फुललेला बहावा हा पर्यटकांचे आकर्षण बनला. परदेशी पर्यटकही उन्हाळ्यातील हे सौंदर्य टिपण्यासाठी लखनौला भेट देत. 
असा हा बहावा. कोणत्याही दृष्टीने त्याचा विचार केला तर केवळ ‘अरे व्वा’ असे कौतुकाचे शब्द यावेत, असा अस्सल देशी वृक्ष. तो भरभरून फुलला की शेतकरी यावर्षी पाऊस जोरात येणार, असे आजही मानतात. त्याला पावसाची चाहूल देणारा वृक्ष म्हणूनही ओळखले जाते. बहावा फुलला की पुढे पंचेचाळीस ते साठ दिवसांत पाऊस येतो, असे मानले जाते. आणखी एक समज म्हणा किंवा अंधश्रद्धा, अशी आहे की, बहावा फुलला असताना त्याच्या खालून जर स्त्री गेली तर तिचा केशसंभार अधिक लांब होतो. ही अंधश्रद्धाच. कारण भेदभाव माणसाचा गुणधर्म; निसर्गाचा नव्हे! याची फुललेली फुले आणि शेंगा ज्या पद्धतीने जमिनीकडे असतात, ते पाहून बहावात मला विद्वान, सर्वगुणसंपन्न अशा विनम्र महात्म्याचा भास होतो. असे सर्वांना प्रिय असणारे सौंदर्यही नम्रपणे धारण करणारा बहावा, निश्चितच असा भेदभाव करू शकत नाही. केस वाढोत किंवा न वाढोत, त्या वादात न पडता, बहावा फुललेला असताना कोणीही त्याखाली बसावे. मंद वाऱ्याची झुळूक यावी आणि त्याच्या पाकळ्यांचा सडा अंगावर घ्यावा… तो आनंद मनात साठवावा आणि आयुष्यभर बहावाच्या फुलण्याचा त्याच्या सौंदर्याचा, नम्रतेचा, शालीनतेचाच आठव व्हावा. 


     








सध्या शिवाजी विद्यापीठात फुललेला नितांतसुंदर बहावा ....  

सोमवार, ४ मे, २०२०

ओझोन थराचा धोका टळला

 कोरोना आला. त्यांने जगभर विनाश सुरू केला आणि त्याच्या भितीने लॉकडाउन्‍ झाले. सर्व कारखाने उद्योगधंदेच नाही, तर वैयक्तिक वाहनांचा वापर अगदी कमी झाला. वातावरणातील प्रदूषण कमी झाले आणि एका संकटाने दुसरे संकट दूर केले. प्रदूषण कमी झाल्याने ओझोन थराला पडलेले छिद्र भरले. त्याबाबतचा माझा लेख ३ मे २०२० च्या दैनिक ‘पुढारी’ या दैनिकाच्या ‘बहार’ पुरवणीत प्रसिद्ध झाला. तो लेख दै. पुढारीच्या सौजन्याने येथे प्रसिद्ध करत आहे…
--------------------------------------------------------------------------------------------
मागील वर्षाच्या नोव्हेंबरपासून जगात कोरोना या विषाणूची चर्चा सुरू झाली. या विषाणूने या वर्षाला व्यापून टाकायचे असे ठरवलेले दिसते. चीनमधील वुहान या प्रांतात त्याच्या प्रसारास सुरुवात झाली. अनेकांना वाटले होते की हा सार्ससारखा कोरोनाही थोडाफार त्रास देईल आणि जाईल. मात्र पहाता पहाता त्यांने सारे जग व्यापले आणि सर्वत्र कोरोना हा एकच चर्चेचा विषय बनला. जगातील अनेक संशोधक यावर लस शोधत आहेत. अजूनतरी म्हणावे तसे यश मिळालेले दिसत नाही. आपण लवकरच या विषाणूवर लस शोधू. कोरोनावर मात करू, यात शंकाच नाही. हा लेख लिहित असताना जगातील या आजाराने बाधितांची संख्या तीस लाखावर पोहोचली आहे. मृताचा आकडा सव्वादोन लाखाच्या टप्प्यावर गेला आहे. जगातील अनेक देशात लॉकडाउन सुरू आहे. संपूर्ण मानवजात कोरोनाच्या प्रभावाखाली असताना निसर्गाने मात्र अनेक चमत्कार दाख्वायला सुरुवात केली आहे. गंगेपासून पंचगंगेपर्यंत अनेक नद्यांच्या प्रदूषणात घट झाली आहे. हवा स्वच्छ असल्याने दूरवरच्या पर्वतरांगा स्पष्ट दिसत आहेत. मात्र समाजाच्या डोक्यात कोरोना सोडून दुसरे काही नसल्याने अनेक निसर्गातील चमत्कार आणि अविष्कार पहायला आपण मुकलो आहोत.
प्रदूषण कमी झाले. आकाश निरभ्र होते. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एक अवकाशस्थानक आकशात फिरताना स्पष्टपणे दिसले. दिनांक बारा एप्रिलला तर अगदी चार मिनिटे इतका वेळ ते शुक्राजवळून जाताना पहायला मिळाले. एरवीच्या आकाशात हे पहाता येणे शक्यच नव्हते. तर सव्वीस एप्रिलला चंद्र आणि शुक्र शेजारी शेजारी बसलेले पाहून कुसमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेतील पृथ्वीवर एकतर्फी प्रेम करणारे हे दोन प्रेमवीर आपले दु:ख, सहवेदना एकमेकाना सांगत आहेत, असे वाटले. तर नासाच्या हवाल्याने एक बातमी अशी आली आहे की २९ एप्रिल २०२० पर्यंत ओआर-२ नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून म्हणजे १८ लाख किलोमीटरवरून जाणार आहे. अनेकांनी याच्या विपर्यस्त बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. पृथ्वीवर म्हणे या लघुग्रहाने विनाश घडणार होता. मात्र त्यापेक्षा एक मोठा आणि गंभीर धोका या वसुंधरेला निर्माण झाला होता. संशोधकांच्या तो लक्षात आला होता. अनेक सुजाण विज्ञानप्रेमी या धोक्यामुळे अस्वस्थ झाले होते. आता तो धोका टळला आहे. मात्र त्याबाबत चिंतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पृथ्वी कशी आहे ते आपणास माहित आहे. जमीन आणि पाण्याने पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे. जमिनीवर मानवासह असंख्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. आपण सर्व भूपृष्ठावर राहणारे प्राणी, पक्षी आणि वनस्पती हवेच्या महासागराच्या तळाशी राहतो, असे टोरिसेली यांनी सतराव्या शतकातच सांगीतले होते. हा हवेचा महासागर त्याच्या पृष्ठभागाजवळ म्हणजेच पृथ्वीपासून साधारण १५ ते ३५ किलोमीटर अंतरावर ओझोनचा एक थर धरून ठेवतो. ओझोनचा रेणू तीन ऑक्सिजन अणूंचा बनतो. आपण प्राणवायू म्हणून घेतो तो ऑक्सिजन दोन ऑक्सिजन अणंचा रेणू असतो. हा ओझोनचा थर वातावरणात असल्यानेच जीवसृष्टी तग धरून आहे. हा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. एका अभ्यासानुसार अतिनील किरणामध्ये दहा टक्के वाढ झाल्याने त्वचेच्या कर्करोगाचे पुरूषामध्ये १९ टक्के आणि स्त्रियामध्ये १६ टक्के प्रमाण वाढते. चिलीमध्ये झालेल्या अभ्यासात हेच प्रमाण हे प्रमाण ४६ टक्क्यानी वाढत असल्याचे लक्षात आले. हा थर धोक्यात आल्यास डोळ्याच्या मोतीबिंदूच्या तक्रारीही वाढतील. यांचा पिकावरही परिणाम अपरिहार्य आहे. ही किरणे जर पृथ्वीपर्यंत आली तर संपूर्ण जीवसृष्टी होरपळून जाईल. या सजीवसृष्टी रक्षक ओझोन थराला मागील महिन्यात एक छिद्र पडले होते.
दरवर्षी असे छिद्र पडलेले संशोधकाना दिसते. मात्र ते दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका सागरावर असते. हे छिद्र साधारण दोन ते अडिच दशलक्ष चौरस किलोमीटर इतके मोठे असते. उत्तर ध्रुवावर आर्क्टिक सागरावर सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली असते. या भागात ओझोन थराला दहा लाख चौरस किलोमीटरचे छिद्र पडलेले आढळून आले. ओझोन थराचे छिद्र कमी करण्यामध्ये ढग, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि हायड्रोफ्लोरोकार्बनची मोठी भूमिका असते. जेंव्हा अतिनिल किरणे पृथ्वीच्या जवळ येतात तेव्हा क्लेारीन आणि ब्रोमीनचे अणू या रेणूतून बाहेर पडतात. ते ओझोनमधील ऑक्सिजन अणूंशी संयोग पावतात. त्यामुळे ओझोन थर पातळ होतो. प्रदुषणामुळे या प्रक्रियेत भरच पडते आणि ओझोन थराला धोका वाढतो. यामुळे उत्तर ध्रुवावर ओझोन थर पातळ होतो. वसंत ऋतूमध्ये ओझोनचा साधारण सत्तर टक्के भाग पातळ होतो. काही ठिकाणी छिद्र पडते. मात्र उत्त्र ध्रुवावर असे छिद्र प्रथमच पडले आणि विज्ञानविश्वाला मोठा धक्का बसला. त्यामुळे १९८७ मध्ये माँट्रिएल करार करण्यात आला. त्यावेळेपासून क्लोरोफ्लोरोकार्बनच्या उत्सर्जनावर बंदी घालण्यात आली आणि ओझोन थराचा धोका कमी करण्यात आला. त्यावेळेपासून दक्षीण ध्रुवावर हे छिद्र दिसते मात्र त्याची व्याप्ती कमी असते. सर्वात महत्त्वाचे उत्तर ध्रुवावर प्रथमच हे घडत होते. 
यावर्षी उत्तर ध्रुवावरील तापमान हे नेहमीपेक्षा खुप कमी झाले होते. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात ढग तयार झाले होते. त्यातून ओझोन थरासाठी धोकादायक असणारे घटक आल्याने हा धोका निर्माण झाला. कोपर्निकस सेंटियल-५पी या उपग्रहाच्या सहाय्याने प्राप्त माहितीतून ही गोष्ट लक्षात आली. जर हे छिद्र असेच राहिले तर बर्फ मोठ्या प्रमाणात वितळून समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असती. यामध्ये समुद्रकिनारी असणारी अनेक मोठी शहरे आणि छोट्या वस्त्या समुद्रात बुडून गेल्या असत्या. त्या भागात असणाऱ्या सजीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला असता. अनेकांना कर्करोगासारख्या आजाराला बळी पडावे लागले असते. त्यामुळे अनेक संशोधक या छिद्राच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. 
      मात्र आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठे उत्तर ध्रुवावरील हे छिद्र हळूहळू कमी होत गेले. हे कसे घडले याचा अभ्यास करताना संशोधकांनी मोठा खुलासा केला आहे. कोरोना आला. त्याने जगभर विनाश सुरू केला आणि त्याच्या भितीने लॉकडाउन झाले. सर्व कारखाने, उद्योगधंदेच नाहीतर वैयक्तिक वाहनांचा वापर अगदीच कमी झाला. वातावरणातील प्रदूषण कमी झाले. आणि एका संकटाने दुसरे संकट दूर केले. प्रदूषण कमी झाल्यामुळे हे छिद्र भरले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र यापुढे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. प्रदूषण कमी नाही केले तर हा धोका पुन्हा पुन्हा उदभवू शकतो. त्यामुळे आता प्रदूषण कमी करण्यावर भर देण्याव्यतिरिक्त पर्याय नाही. कोपर्निकस संस्थेचे वैज्ञानिक विन्सेंट हेन्री यांच्यामते ओझोनला पडणारी छिद्रे ही अनेक संशोधकांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रदूषण कमी नाही झाले तर असे एखादे छिद्र भविष्यात न बुजता ते वाढत राहील आणि संपूर्ण मानवजातीलाच नव्हे तर जीवसृष्टीला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. वातावरणातील क्लोरीन आणि ब्रोमिनचे प्रमाण कमी केल्याशिवाय पर्याय नाही. आपण सर्वानी प्रदूषण कमी करणारी जीवनशैली आपलीशी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

(Photograph Courtesy : Copernicus)