कोरोना आला. त्यांने जगभर विनाश सुरू केला आणि
त्याच्या भितीने लॉकडाउन् झाले. सर्व कारखाने उद्योगधंदेच नाही, तर वैयक्तिक
वाहनांचा वापर अगदी कमी झाला. वातावरणातील प्रदूषण कमी झाले आणि एका संकटाने दुसरे
संकट दूर केले. प्रदूषण कमी झाल्याने ओझोन थराला पडलेले छिद्र भरले. त्याबाबतचा माझा
लेख ३ मे २०२० च्या दैनिक ‘पुढारी’ या दैनिकाच्या ‘बहार’ पुरवणीत प्रसिद्ध झाला.
तो लेख दै. पुढारीच्या सौजन्याने येथे प्रसिद्ध करत आहे…
--------------------------------------------------------------------------------------------
मागील वर्षाच्या नोव्हेंबरपासून
जगात कोरोना या विषाणूची चर्चा सुरू झाली. या विषाणूने या वर्षाला व्यापून टाकायचे
असे ठरवलेले दिसते. चीनमधील वुहान या प्रांतात त्याच्या प्रसारास सुरुवात झाली. अनेकांना
वाटले होते की हा सार्ससारखा कोरोनाही थोडाफार त्रास देईल आणि जाईल. मात्र पहाता पहाता
त्यांने सारे जग व्यापले आणि सर्वत्र कोरोना हा एकच चर्चेचा विषय बनला. जगातील अनेक
संशोधक यावर लस शोधत आहेत. अजूनतरी म्हणावे तसे यश मिळालेले दिसत नाही. आपण लवकरच या
विषाणूवर लस शोधू. कोरोनावर मात करू, यात शंकाच नाही. हा लेख लिहित असताना जगातील या
आजाराने बाधितांची संख्या तीस लाखावर पोहोचली आहे. मृताचा आकडा सव्वादोन लाखाच्या टप्प्यावर
गेला आहे. जगातील अनेक देशात लॉकडाउन सुरू आहे. संपूर्ण मानवजात कोरोनाच्या प्रभावाखाली
असताना निसर्गाने मात्र अनेक चमत्कार दाख्वायला सुरुवात केली आहे. गंगेपासून पंचगंगेपर्यंत
अनेक नद्यांच्या प्रदूषणात घट झाली आहे. हवा स्वच्छ असल्याने दूरवरच्या पर्वतरांगा
स्पष्ट दिसत आहेत. मात्र समाजाच्या डोक्यात कोरोना सोडून दुसरे काही नसल्याने अनेक
निसर्गातील चमत्कार आणि अविष्कार पहायला आपण मुकलो आहोत.
प्रदूषण कमी झाले. आकाश
निरभ्र होते. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एक अवकाशस्थानक आकशात फिरताना स्पष्टपणे
दिसले. दिनांक बारा एप्रिलला तर अगदी चार मिनिटे इतका वेळ ते शुक्राजवळून जाताना पहायला
मिळाले. एरवीच्या आकाशात हे पहाता येणे शक्यच नव्हते. तर सव्वीस एप्रिलला चंद्र आणि
शुक्र शेजारी शेजारी बसलेले पाहून कुसमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेतील
पृथ्वीवर एकतर्फी प्रेम करणारे हे दोन प्रेमवीर आपले दु:ख, सहवेदना एकमेकाना सांगत
आहेत, असे वाटले. तर नासाच्या हवाल्याने एक बातमी अशी आली आहे की २९ एप्रिल २०२० पर्यंत
ओआर-२ नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून म्हणजे १८ लाख किलोमीटरवरून जाणार आहे.
अनेकांनी याच्या विपर्यस्त बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. पृथ्वीवर म्हणे या लघुग्रहाने
विनाश घडणार होता. मात्र त्यापेक्षा एक मोठा आणि गंभीर धोका या वसुंधरेला निर्माण झाला
होता. संशोधकांच्या तो लक्षात आला होता. अनेक सुजाण विज्ञानप्रेमी या धोक्यामुळे अस्वस्थ
झाले होते. आता तो धोका टळला आहे. मात्र त्याबाबत चिंतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पृथ्वी कशी आहे ते आपणास
माहित आहे. जमीन आणि पाण्याने पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे. जमिनीवर मानवासह असंख्य
प्राण्यांचे वास्तव्य आहे. आपण सर्व भूपृष्ठावर राहणारे प्राणी, पक्षी आणि वनस्पती
हवेच्या महासागराच्या तळाशी राहतो, असे टोरिसेली यांनी सतराव्या शतकातच सांगीतले होते.
हा हवेचा महासागर त्याच्या पृष्ठभागाजवळ म्हणजेच पृथ्वीपासून साधारण १५ ते ३५ किलोमीटर
अंतरावर ओझोनचा एक थर धरून ठेवतो. ओझोनचा रेणू तीन ऑक्सिजन अणूंचा बनतो. आपण प्राणवायू
म्हणून घेतो तो ऑक्सिजन दोन ऑक्सिजन अणंचा रेणू असतो. हा ओझोनचा थर वातावरणात असल्यानेच
जीवसृष्टी तग धरून आहे. हा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू
देत नाही. एका अभ्यासानुसार अतिनील किरणामध्ये दहा टक्के वाढ झाल्याने त्वचेच्या कर्करोगाचे
पुरूषामध्ये १९ टक्के आणि स्त्रियामध्ये १६ टक्के प्रमाण वाढते. चिलीमध्ये झालेल्या
अभ्यासात हेच प्रमाण हे प्रमाण ४६ टक्क्यानी वाढत असल्याचे लक्षात आले. हा थर धोक्यात
आल्यास डोळ्याच्या मोतीबिंदूच्या तक्रारीही वाढतील. यांचा पिकावरही परिणाम अपरिहार्य
आहे. ही किरणे जर पृथ्वीपर्यंत आली तर संपूर्ण जीवसृष्टी होरपळून जाईल. या सजीवसृष्टी
रक्षक ओझोन थराला मागील महिन्यात एक छिद्र पडले होते.
दरवर्षी असे छिद्र पडलेले
संशोधकाना दिसते. मात्र ते दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका सागरावर असते. हे छिद्र
साधारण दोन ते अडिच दशलक्ष चौरस किलोमीटर इतके मोठे असते. उत्तर ध्रुवावर आर्क्टिक
सागरावर सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली असते. या भागात ओझोन थराला दहा लाख चौरस किलोमीटरचे
छिद्र पडलेले आढळून आले. ओझोन थराचे छिद्र कमी करण्यामध्ये ढग, क्लोरोफ्लोरोकार्बन
आणि हायड्रोफ्लोरोकार्बनची मोठी भूमिका असते. जेंव्हा अतिनिल किरणे पृथ्वीच्या जवळ
येतात तेव्हा क्लेारीन आणि ब्रोमीनचे अणू या रेणूतून बाहेर पडतात. ते ओझोनमधील ऑक्सिजन
अणूंशी संयोग पावतात. त्यामुळे ओझोन थर पातळ होतो. प्रदुषणामुळे या प्रक्रियेत भरच
पडते आणि ओझोन थराला धोका वाढतो. यामुळे उत्तर ध्रुवावर ओझोन थर पातळ होतो. वसंत ऋतूमध्ये
ओझोनचा साधारण सत्तर टक्के भाग पातळ होतो. काही ठिकाणी छिद्र पडते. मात्र उत्त्र ध्रुवावर
असे छिद्र प्रथमच पडले आणि विज्ञानविश्वाला मोठा धक्का बसला. त्यामुळे १९८७ मध्ये माँट्रिएल
करार करण्यात आला. त्यावेळेपासून क्लोरोफ्लोरोकार्बनच्या उत्सर्जनावर बंदी घालण्यात
आली आणि ओझोन थराचा धोका कमी करण्यात आला. त्यावेळेपासून दक्षीण ध्रुवावर हे छिद्र
दिसते मात्र त्याची व्याप्ती कमी असते. सर्वात महत्त्वाचे उत्तर ध्रुवावर प्रथमच हे
घडत होते.
यावर्षी उत्तर ध्रुवावरील
तापमान हे नेहमीपेक्षा खुप कमी झाले होते. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात ढग तयार झाले
होते. त्यातून ओझोन थरासाठी धोकादायक असणारे घटक आल्याने हा धोका निर्माण झाला. कोपर्निकस
सेंटियल-५पी या उपग्रहाच्या सहाय्याने प्राप्त माहितीतून ही गोष्ट लक्षात आली. जर हे
छिद्र असेच राहिले तर बर्फ मोठ्या प्रमाणात वितळून समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या
प्रमाणात वाढली असती. यामध्ये समुद्रकिनारी असणारी अनेक मोठी शहरे आणि छोट्या वस्त्या
समुद्रात बुडून गेल्या असत्या. त्या भागात असणाऱ्या सजीवसृष्टीला मोठा धोका निर्माण
झाला असता. अनेकांना कर्करोगासारख्या आजाराला बळी पडावे लागले असते. त्यामुळे अनेक
संशोधक या छिद्राच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
मात्र आजवरच्या
इतिहासातील सर्वात मोठे उत्तर ध्रुवावरील हे छिद्र हळूहळू कमी होत गेले. हे कसे घडले
याचा अभ्यास करताना संशोधकांनी मोठा खुलासा केला आहे. कोरोना आला. त्याने जगभर विनाश
सुरू केला आणि त्याच्या भितीने लॉकडाउन झाले. सर्व कारखाने, उद्योगधंदेच नाहीतर वैयक्तिक
वाहनांचा वापर अगदीच कमी झाला. वातावरणातील प्रदूषण कमी झाले. आणि एका संकटाने दुसरे
संकट दूर केले. प्रदूषण कमी झाल्यामुळे हे छिद्र भरले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
मात्र यापुढे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. प्रदूषण कमी नाही
केले तर हा धोका पुन्हा पुन्हा उदभवू शकतो. त्यामुळे आता प्रदूषण कमी करण्यावर भर देण्याव्यतिरिक्त
पर्याय नाही. कोपर्निकस संस्थेचे वैज्ञानिक विन्सेंट हेन्री यांच्यामते ओझोनला पडणारी
छिद्रे ही अनेक संशोधकांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रदूषण कमी नाही झाले तर असे एखादे
छिद्र भविष्यात न बुजता ते वाढत राहील आणि संपूर्ण मानवजातीलाच नव्हे तर जीवसृष्टीला
धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. वातावरणातील क्लोरीन आणि ब्रोमिनचे प्रमाण कमी
केल्याशिवाय पर्याय नाही. आपण सर्वानी प्रदूषण कमी करणारी जीवनशैली आपलीशी करणे हे
अत्यंत महत्त्वाचे आहे.
(Photograph Courtesy : Copernicus)
(Photograph Courtesy : Copernicus)
सर, अतिशय महत्त्वाची गोष्ट निसर्गात घडली. आपण हे चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. निसर्ग एका हाताने घेतो आणि दुसऱ्या हाताने देतो हे परत सिद्ध झाले. धन्यवाद सर!
उत्तर द्याहटवानिसर्गात घडणारे बदल व त्यांचा होणारा प्रादुर्भाव ह्याचे उत्तम लिखाण केले शिंदे सर. आपले अभिनंदन
उत्तर द्याहटवायेथून पुढे प्रतिवर्षी किमान 8 दिवस world lockdawn week जाहीर करायला पाहिजे म्हणजे निसर्गात बरेच चांगले बदल घडतील
उत्तर द्याहटवाहे मलाही खूप आधीच सुचले होते पण हे कुठे/कुठल्या मंचावर मांडावे ?
हटवासर खुप छान माहिती
उत्तर द्याहटवा* पाऊस कसा होईल त्याचाअंदाजबहावाच्या बहारामुळे कळतो.
उत्तर द्याहटवा* शेंग उगाळून कपाळाला लावली तर कपाळशूळ थांबतो म्हणतात - स्वानुभव नाही.