शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

काटा..

 

काटा.. शब्द ऐकला तरी टोचण्याचा भास होतो. काटा.. डोळ्यात पाणी आणि आतून हुंदका आणणारा. कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला. मूळ वेगळे असेल, कूळ वेगळे असेल, पण टोचण्याचा गुण तोच. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरूष, कसलाही भेदभाव न करणारा. वनस्पतीचे काटे टोचत असले तरी ते आपणास सांगतात… जपून, नाही तर टोचेन. पण माणसातील काटे?

      तर आज काट्याबद्दल बोलू काही…

__________________________________________________

 

काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी

मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे!

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची?

चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे!

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे

माझे अबोलणेही, विपरीत होत आहे!

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना

आयुष्य ओघळोनी, मी रिक्तहस्त आहे!

आकाशवाणीवर गाणे लागले होते. सकाळचा चहा घेताना नकळत मीही गुणगुणू लागलो. ‘हे बंध रेशमाचेया रणजीत देसाई यांच्या नाटकातील थोर कवयित्री शांता शेळके यांचे गीत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजाने सजलेले. भीमपलास’ रागातील हे गीत कितीही वेळा ऐकले, तरी पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे. 'काटा' या शब्दाने सुरू होणारे. काटा आणि फुलाची सांगड या गीतात घातली आहे. काटा तर रूततोच. मात्र कवयित्रीला फुल रूतते. हे फुलाचे रूतणे तिला आपल्या नशिबाचा भाग वाटतो. सहज शब्दात आलेले हे गीत मनात रूतणारे आहे. अंतर्मन दुखावल्याची भावना या काव्यात व्यक्त होते. अस्वस्थ मनातील भावना व्यक्त करणारे गीत. ऐकत राहावेसे वाटते. मनातील वेदना कोणाला सांगणेही अशक्य आहे. काही कोणाला सांगावे, तर त्यातून वेगळाच अर्थ काढण्याची जगाची रीत आहे. भवताली असणाऱ्या लोकांचे वागणे पाहून मनोमन एकाकी पडलेल्या व्यक्तीचे मनोदर्शन सुंदर पद्धतीने या गीतात ऐकावयास मिळते. नाटकामध्ये हे गीत ज्या प्रसंगानंतर येते, तो लक्षात घेतला तर ते मन:पटलावर आणखी खोल रूतते.

स्वातंत्र्यपूर्व फाळणीचा काळ. आजच्या पाकिस्तानातील लाहोर येथे श्रीकांत आणि अमिर हे दोन गुणी गायक मित्र शेजारी-शेजारी राहात असतात. दंगली उसळल्या आणि श्रीकांतने भारतात यायचा निर्णय घेतला. त्यासाठी तो तिकीट आणण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातो. तेवढ्यात दंगल उसळते. दंगलखोर श्रीकांतच्या घरी जातात. श्रीकांतच्या पत्नीवर अत्याचार करण्यासाठी पुढे सरकतात. आपले शील जपण्यासाठी ती स्वत:ला पेटवून घेते. श्रीकांत आला की नाही, हे पहायला अमिर श्रीकांतच्या घरी येतो. श्रीकांतच्या घराची दुर्दशा पहात असताना, श्रीकांतची मुलगी शामला, अमिरला बिलगते आणि ‘अब्बूजान हमें बचाओ’ म्हणते. अमिर तिला येऊन घरी येतो. पत्नीची अशी अवस्था आणि मुलीचे गायब होणे पाहून हताश श्रीकांत कसाबसा भारतात येतो. तिकडे अमिर शामलाला संगीत शिकवतो. तिला उत्कृष्ट गायिका बनवतो. अनेक वर्षांनंतर एका संगीत संमेलनात हे दोन मित्र भेटतात. त्या ठिकाणी आपल्या पत्नी आणि मुलीला मारण्यामध्ये अमिरची भूमिका आहे, या ग्रहातून श्रीकांत त्याची निर्भर्त्सना करतो. त्यावेळी अमिरच्या तोंडी रणजीत देसाई यांनी खूप सुंदर वाक्य दिले आहे, ‘लोग काँटों की बात करते है, हमने तो फुलों से जख्म खाये।’ आणि त्यानंतर हे गाणे सुरू होते. या एकूण पार्श्वभूमीवर या गीतातील प्रत्येक शब्द मनाला नकळत अंतर्मुख करत नेतो. हे गीत अनेकदा ऐकले, पण, या गीतातील काटा हा शब्द आज मनातून जात नव्हता. पुनःपुन्हा तो आठवत होता. खरं तर, काटा मनात रूतला होता.

काटा एक साधा शब्द. ऐकला तरी टोचण्याचा आभास होतो. काटा, डोळ्यात पाणी आणि आतून हुंदका आणणारा. काटा, कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला. खेड्यात बालपण गेलेल्या प्रत्येकाला तर तो हमखास टोचतोच, पण, शहरातील मंडळींनाही कोठे तरी तो भेटतोच. फार तर त्याचे झाड वेगळे असेल. मूळ वेगळे असेल, कूळ वेगळे असेल, पण टोचण्याचा गुण तोच. कधी तरी, कोठे तरी पायात घुसतोच. गरीबाला पाय अनवाणी असल्याने बाभळीचा, हिवराचा काटा टोचेल. तर कोणा गर्भश्रीमंताला, स्वयंपाकगृहातही पाय अनवाणी ठेवायची सवय नसलेल्यास, गुलाबाची फुले घेताना हाताला बोचतो. गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा, स्त्री असो वा पुरूष, काटा कोणताही भेदभाव न करता, थोडे दुर्लक्ष झाले की टोचतो. काटा टोचला की ‘आई गं...’ हे शब्द तोंडातून बाहेर येतात.

निसर्गात झाडाला काटे आले, ते त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने केलेली सोय म्हणून, असे संशोधकांचे मत. कमी पावसाच्या भागात वाढणाऱ्या झाडांना हमखास काटे असतात. झाडाचे संरक्षण हा त्यामागचा उद्देश असतो, असे म्हणतात. मला मात्र हे पटत नाही. हां, हे खरे आहे की, करवंदीसारख्या मधूर फळांच्या जंगलात आढळणाऱ्या झाडाला काटे असतात. मोसंबी, लिंबोणी अशा बागेतील सुमधूर फळांच्या झाडानांही काटे असतात. ते सुरूवातीला हिरवे असतात. नंतर त्यांचा रंग पांढरा होतो. हे काटे फळांचे रक्षण करण्यासाठी निश्चितच नसावेत. कारण बाभळीच्या शेंगा आपण कोठे खातो, हिवराच्या शेंगा कसल्या आहेत, हे कोठे पहायला जातो. त्यांनाही असतातच ना काटे. मग तेथे का असतात काटे? काटे असूनही या झाडांची पाने शेळ्या अन् मेंढ्यांचे आवडते खाद्य. काटे चुकवून पाने खाण्याचे कसब या प्राण्यांना कोण शिकवते, माहीत नाही. तर दुसरीकडे आंबा, पेरू, चिंच या मधूर आणि सर्वप्रिय फळांच्या झाडाना कुठे असतात काटे? याचीही पाने शेळ्या आणि मेंढ्या तितक्याच आवडीने खातात. निवडूंगाच्या झाडाला त्याच्या पानातून बाष्पीभवन कमी व्हावे, म्हणून काटे असतात, म्हणे. कारण काहीही असो, काही वनस्पतींना काटे असतात, तर काहींना नसतात, हेच खरे. काटे असोत वा नसोत सर्वच वनस्पती त्यांचे कार्य करत, काही उद्देशाने जगत असतात. स्वत:ला बुद्धीमान समजणाऱ्या मनुष्यप्राण्यास का जगायचे कळो वा ना कळो, वनस्पतींना मात्र जीवनाचे उद्दिष्ट ठाउक असते.

गुलाबाचे फुल आकर्षक. सर्वांचे आवडते. फुलांचा राजाच. मात्र त्याला बेसावधपणे तोडायला जाल, तर काटे टोचणारच. बरे गुलाबाचे काटे जसे टोकदार, तसेच अणकुचीदार. थोडासा बेसावधपणाही रक्त काढतो. तसे हे फुल इतरांपेक्षा कमी नाजूक, मात्र त्याला काटे आहेत. गुलाबापेक्षा जाई, जुई, चमेली, प्राजक्त, बकुळ, रातराणी, कामिनी अशा अनेक वेलींची आणि झुडुपांची फुले ही कितीतरी नाजूक. मात्र या वेलींना आणि वनस्पतींना काटे नसतात. तर दुसरीकडे बोगनवेलीला पावसाळा संपला की फुले यायला सुरुवात होते. नेत्रसुखापलिकडे काहीही उपयोग नसणारी. पण बोगनवेलीचे काटे वर्षभर सर्वांच्या डोळ्यांत खुपतात. बोगनवेलीचे काटे सरळ, पण वाळल्यावर लोखंडी खिळ्यासारखे पायात घुसणारे. अगदी ‘चप्पल फाड के’. कामिनी, रातराणीची फुले तर सुगंधी दरवळ पसरवणारी. तोडली तर रात्रीत सुकून जाणारी. मानव प्राण्यास धुंद करणारी. मात्र या वनस्पती काट्याविना असतात. निसर्गाने वनस्पतींना काटे वाटताना काय नियम लावला, काही लक्षात येत नाही.   

बरे, या काट्यांचे प्रकारही अनेक. प्रत्येक झाडाचा काटा वेगळा. रंग वेगळा, गुणधर्मही वेगळे. बाभळीचा काटा मोठा, लांब असतो. फांदीच्या अगदी टोकाला असणारे काटे पोपटी असतात. ते जरा जून झाले की पांढरे होतात. हळूहळू त्यांचे टोक काळे होते आणि अगदी जुना काटा झाला की तो पूर्ण काळा होतो. हा काटा पायात खोलवर घुसतो. कोवळा काटा पायात घुसला की काढताना तो टोक आत ठेवूनच येतो. मग पायातील काट्याचा तो भाग काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. या बाभळीच्या काट्याचा वापर एका धार्मिक उत्सवातही केला जातो. पुणे जिल्ह्यातील पुरंधर तालुक्यातील गुळुंचे गावी जोतिर्लिंग मंदिर आहे. इथे गुढीपाडव्यानंतर लगेच बाभळीच्या झाडांच्या शेंड्यांच्या फांद्या तोडून फास घातले जातात. दिपावली पाडव्याला ग्रामदेवतेची यात्रा सुरू होते. कार्तिक बारसच्या दिवशी हे बाभळीचे घातलेले सर्व काटेरी फास एकत्र आणून रचले जातात. या दिवशी देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर अनेक भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालून येतात. काट्याच्या फासावर उड्या मारतात. हे चित्र तसे नवख्या माणसाच्या अंगावर शहारे आणणारे. मात्र उड्या मारणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नसते. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या या जत्रेला ‘काटेबारस’ म्हणून ओळखले जाते.

हिवराचे काटेही तसेच. मात्र फांदी तुटून पडली की ते लवकर कुजतात. असा कुजलेला काटा पायात घुसला तर जास्तच त्रासदायक. पायात राहिला तर कुरूप तयार करतो. त्याला मुळापासून काढावे लागते. विलायती बाभूळ नावाची विदेशी वाणाच्या बाभळीचा काटा सर्वात खतरनाक. चुकून गाडीच्या चाकाखाली हा काटा आला, तर टायर पंक्चर झालेच म्हणून समजा. बोरीचे काटे दोन प्रकारचे असतात. सरळ काटा दर्शनी असतो, तर वाकडा काटा पानाआड दडलेला. सरळ काट्यापासून जपताना खालचा काटा कधी ओरखडा उठवतो, कळतही नाही. झाडाची ताजी बोरे तोडून खाण्याची मजा घेताना लपलेल्या काट्यापासून नेहमी सावध रहावे लागते. सरळ काटे सरळ नजरेला दिसतात. मात्र वाकडे काटे आकाराने लहान, पोपटाच्या चोचीसारखा बाक असलेले. त्यांच्या सानिध्यात कोणतीही गोष्ट गेली की फाटलीच पाहिजे. अनेकांचे कपडे आणि कातडी या बोरीच्या काट्यांनी फाडलेली असते. सुरुवातीला पांढरट हिरवे असणारे काटे, पुढे फांदीबरोबर तांबडा रंग धारण करतात आणि काटकही बनतात. घातक, काटेरी झाडाची फळे मात्र मधुर असतात. त्यांची आंबटगोड चव अवर्णनीय. खैर, सागरगोटे किंवा गजगा, चिलारी या झाडांचे काटेही बोरीसारखेच. सौंदड किंवा दसऱ्याला ज्याची पाने आपट्याबरोबर वाटण्याची प्रथा मराठवाड्यात आहे, त्या चांदीच्या झाडाचे काटेही अणकुचीदार, वाकडे असतात. सागरगोट्याच्या तर बियांच्या पेटीवरही काटे असतात. मात्र खोडावरचे काटे वाकडे आणि फळांच्या पेटीवरचे काटे सरळ असतात. पेटीतून सागरगोटे फोडून बाहेर काढताना काळजीपूर्वक काढावे लागतात. नाही तर फिकट सोनेरी रंगाचे काटे कधी हातात घुसतात, कळतही नाही. बरे हातात घुसल्यानंतर काटा तर सलतो, पण तो कोठे आहे, ते नेमके दिसत नाही. हेकळीच्या झाडाचे काटे तसेच. मात्र झुडुपाच्या लाल रंगांच्या काट्यावर पाने असतात. पुढे या काट्याचे फांदीत रूपांतर होते. आपटा, पांढरफळी, हुंबाटीचे काटे असेच असतात. मात्र त्यांचे टोक धारदार नसते. गवती बांबूच्या लहान पेरावर ते लहान असल्यापासून काटे असतात. तर इतर जातीच्या बांबूचे बेट पक्व झाले की, त्याला फुले येतात आणि नंतर त्या बांबूला काटे येतात. हे काटे फारच भयंकर असतात. त्यामुळे आदिवासी मंडळी बांबूच्या बेटाला फुले दिसली की कटाई करतात आणि काट्याचा त्रास टाळतात. त्याउलट बाभळीचे वय जसे वाढत जाते, तसे काटे लहान होतात. झाड म्हातारे झाले की त्याला काटे यायचे बंद होतात. बिनकाट्याच्या बाभळीला ‘गोडी बाभळ’ म्हटले जाई. आज क्वचितच गोडी झालेली (पूर्ण आयुष्य जगलेली) बाभूळ पहायला मिळते. फणसाच्या फळावर काटेरी आवरण असल्यासारखे भासते. दिसतेही तसेच. त्यामुळे फळाला हात लावायची भीती वाटते. मात्र या काट्यांच्या आत पौष्टिक गर असतात. धोत्र्याच्या फळाला विषारी म्हणून कोणी हात लावायचे धाडस करत नाही. तरीही या झाडाच्या फळावर काटे असतात. विशेष म्हणजे फणस असो वा धोत्रा त्यांच्या खोडावर काटे नसतात.

काटेसावरची तर गोष्टच वेगळी. अंगभर जाडजूड काटे घेऊन ही बया मिरवत असते. फुललेली काटेसावर पाहिली की मनाने चांगली पण बोलण्याला काट्याची धार असणाऱ्या इरसाल म्हातारीची आठवण येते. काटेसावर फुलली की कावळ्यांपासून पोपटांपर्यंत सर्व पक्षी आणि कीटक मधूभक्षणासाठी या झाडावर गर्दी करतात. आणि हे झाड सर्वांना तितक्याच प्रेमाने आपला मध वाटत राहते. या कार्यक्रमात काटे कोठेच येत नाहीत. याखेरीज विदेशातून भारतात पोहोचलेली आणि सर्वत्र आपले साम्राज्य उभारत चाललेल्या घाणेरीवरील काटे बारीक पण चांगलेच बोचणारे असतात. खरे तर घाणेरीला आता हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्टुली आणि वागाटे या रानातल्या फळभाज्या. वागाटे आषाढ महिन्यापर्यंत मिळतात. आषाढी एकादशीचा उपवास सोडताना त्यांचा मान मोठा. मात्र ही रान-फळभाजी बाजारात सहज मिळत नाही. क्वचित दिसतात, पण भरपूर महाग. त्यामुळे नव्या पिढीला ही फळे अपवादानेच माहित आहेत. तर कर्टुली किंवा रानकारली पावसाळयात येतात. रानकार्ल्याच्या वेल नाजूक. कमी उंचीच्या झुडुपावर वाढणारा. तर वागाट्यांचा वेल कडुनिंब, आंबा, शेलवट अशा उंच वाढणाऱ्या झाडावर दिमाखात चढणारा. मात्र रानकार्ल्याच्या वेलाला काटे नाहीत. वागाट्याच्या वेलीचे काटे मात्र भरपूर टोकदार आणि टणक. ही फळे काढणे महाकष्टाचे काम. मुळात वेली कमी. त्यात फळे काढणारे आणखी कमी. रानकार्ल्यावरही काटेरी आवरण आहे, असे दिसते. मात्र हे काटे खूप मऊ असतात.

वांग्याचे भरीत खायला अनेकांना आवडते. मात्र ही फळे काढतानाही भरपूर काळजी घ्यावी लागते. वांग्याच्या खोडावर आणि पानावरही भरपूर काटे असतात. त्याच्या फळाच्या देठावरही काटे असतात. वांग्याला अनेकजण मजेने 'वन लेग चिकन' म्हणतात. वांगे तोडताना किंवा स्वयंपाकघरात वांग्यावरील काटे काढताना ते हातात घुसले तर सलतात. काट्यांचा रंगही फिकट पिवळा. त्यामुळे नजरेला लगेच काटा कोठे घुसला, हे दिसत नाही. अंबाडी आणि करडी या दोन तेलबियासुद्धा काटेरी वनस्पतीपासून मिळतात. अंबाडीचे काटे बरे, पण वाळलेल्या करडीचे काटे भरपूर त्रास देणारे. भुईरिंगणीचे काटे अगदी वांग्यासारखेच असतात. याखेरीज अनेक झुडुपवर्गीय, वेलीवर्गीय, जमिनीवर पसरणाऱ्या आणि गवतवर्गीय वनस्पतींना काटे असतात. सरळ, वाकडे आणि कुसीच्या रूपात हे लहान-मोठे काटे आपल्याला भेटतात.   

लहानपणी असा पायात काटा घुसला की बाभळीचा चांगला (न कुजलेला) काटा शोधला जाई, काट्याने काटा काढायला. त्या काट्याने पायात जेथे काटा घुसला आहे, त्याच्या आजूबाजूची कातडी काढली जाई. घुसलेल्या काट्याचे टोक प्रथम शोधले जाई. हा काटा दिसू लागला की ज्याच्या पायात काटा मोडला आहे, त्याला हुश्श वाटे. मग तो काटा आणखी जरा मोकळा करून अलगद काढायचा प्रयत्न केला जात असे. काढणाऱ्याने कितीही काळजी घेतली, तरी ज्याच्या पायात काटा मोडला आहे, तो ‘जरा हळू की. किती जोरात काढताय’, असे ओरडत असे. मोठ्या माणसांना काटा काढू द्यायला लहान मुले तयार नसत. लहानपणी असा पायात मोडलेला काटा बाहेर काढल्यावर तो 'चोर' की 'पोलीस' हे ठरवण्याचा खेळ चाले. डोळ्यावरील पापणीतील एक केस काढून तो पायातून काढलेल्या काट्याला लावून तो काटा केसाला चिकटतो की नाही, हे तपासले जाई. जर काटा उचलला गेला, तर तो प्रामाणिक आणि पोलीस ठरवला जाई. मात्र जर तो नाही चिकटला, तर तो चोर असे. मग पायात घुसलेल्या काट्याला फेकून दिले जाई. या खेळाला तसा काही अर्थ नसायचा. पण या खेळात काटा घुसून झालेल्या वेदना कुठच्या कुठे पळून जात असत, हे मात्र नक्की.

पायात मोडलेला काटा बाभळीचा असेल तर फारसा त्रास देत नाही. मात्र तो हिवर, पांढरा खैर या झाडांचा असेल तर खूप दुखतो. लगेच काढावा लागतो. त्याच्या वेदना जास्त होतात. लहानपणी असे अनेक काटे पायात मोडले. काटा मोडला की आम्ही वडिलधाऱ्यांना पायाला हात लावू देत नसायचो. मग वडिलधारी मंडळी सांगायची, 'असा काटा पायात ठेवणे बरे नाही. तो काढावाच लागतो. नाही काढला तर पायात बाभळीचे (किंवा हिवराचे) झाड उगवते. मग त्याची मुळे शरीरात शिरतात आणि झाड मोठे होते. मग तू चालणार कसा?' असे म्हटले की डोळ्यासमोर आपल्या पायात झाड उगवल्याचे चित्र यायचे. लगेचच ते झाड मोठे व्हायचे. पायातील झाड घेऊन आपल्याला चालता येणार नाही, असे वाटायचे आणि आम्ही गपगुमान काटा काढायला पाय पुढे करायचो.

काट्याच्या बालपणी अनेक गंमतीही घडत असत. आघाड्याच्या रोपाच्या शेंड्याला आलेले काटेरी फळांचे घोस नकळत एखाद्या मुलाच्या पाठीवरून फिरवले जाई आणि त्यांची छान नक्षी पाठीमागे शर्टवर उठायची. मुलगा कोठे तरी टेकून बसेपर्यंत आपण पाठीवर काटे घेऊन फिरतो आहोत, हे त्याच्या गावीही नसायचे. आघाड्याच्या काटेरी बिया नकळत कापडाला चिकटतात. गवतातून जाताना त्या आपल्या कपड्यावर कधी येऊन बसतात, ते कळतही नाही. एका गवताला काळ्या रंगाची कोयरीच्या आकाराची फळे येतात. त्याला खालच्या बाजूला दोन वाकडे काटे असतात आणि देठाच्या बाजूला दोन छिद्रे असत. ते दोन काटे छिद्रात अडकवून त्याची लांब माळ करायचो. ती माळ नंतर सर्वत्र विसकटली जात असत. कोणी याला कोयरीचे तर काही भागात कुत्रीचे झाड म्हणतात. काही ठिकाणी नकटीचे झाडही म्हणतात.  यावरूनच वेल्क्रोचे तंत्रज्ञान तयार झाले. सराटा हा एक भयानक प्रकार खेड्यात आढळतो. हरभऱ्यासारखी पाने असलेली ही वनस्पती. जमिनीवर मस्त पसरते. सराट्याच्या पानांची भाजीही करून खाल्ली जात असे. मात्र त्याच्या फळाचे काटे पायात घुसले की वेदना असह्य होत. जनावरे शेतात चरताना अनेक प्रकारचे काटे शरीरावर घेऊन येत असत. आणखी बरीच झाडे आणि वनस्पती, गवतांना काटे असतात. गवताला भाले फुटतात की नाही, माहीत नाही. मात्र बाजरी, ज्वारी, करडी, अंबाडीला असणारी कुस एक प्रकारचे सूक्ष्म काटेच. ते अंगाला चिकटले तर आंघोळ केल्याशिवाय जात नाही. शक्यतो, काळ्या मातीचा अंगाला लेप लावून आंघोळ केली तरच कुस लवकर जाते.

      या भागातील कवचकुल्या आणि उर्वरित महाराष्ट्रातील खाजखुजली ही एकाच गुणाची. लहानपणी मारकुट्या मास्तरच्या खुर्चीला ती आणून लावायचा प्रकार एक दोन वर्षात एकदा तरी घडायचा. खोडकर मुले अतिशय सांभाळून ती आणायचे. या उनाड मुलांचे नाव सांगणे म्हणजे शाळा सुटल्यावर त्यांचा मार खाणे. त्यामुळे हा पराक्रम करणारा कोण हे बहुतांश वेळा गुप्त राहायचे. त्यामुळे छडीचा प्रसाद अख्ख्या वर्गाला मिळायचा.

असे हे वनस्पतीचे काटे आपल्याला अनेकदा, अनेक ठिकाणी भेटतात आणि छळतातही. मात्र त्यांचा त्रास आपण त्यांना निष्काळजीपणे सामोरे गेलो किंवा आडवे गेलो तरच होतो. ते स्वत:हून तुमच्याकडे येत नाहीत. काट्याचा धर्म आहे टोचणे. जवळ गेलो तर टोचणारच. एकाच झाडाला येणारी फुले, फळे आणि काटे. काट्यांचे मोल नाही. शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंपण करण्यापूरता याला महत्त्व. एरवी रस्त्यात कोठे काटा दिसला तर त्याला उचलून बाजूला फेकले जाते. त्यावरून वाक्प्रचारही आला, काट्यासारखे दूर करणे. फुल किंवा फळ मोलाचे असते. फुलांना भाव मिळतो, मात्र त्या शेजारील काटे खरवडून काढले जातात. फळ आणि फुलाला मिळणारा भाव पाहून असूयेपोटी तर काटे टोचत नसावेत?

मात्र काटे असणारी बाभूळ, हिवर, बोर, कार ही झाडे पक्ष्यांची आवडती झाडे. हिवराच्या झाडावर पन्नासपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी घर बनवतात. बाभळीच्या झाडालाही सुगरणीपासून अनेक पक्ष्यांची पसंती असते. सुगरणीची घरटी कडुलिंबापेक्षा बाभळीवर जास्त दिसतात. या झाडाच्या काट्यामुळे शत्रूचा धोका कमी असतो. कित्येक पक्षांची बाळंतपणे या काटेरी झाडावर सुखेनैव झालेली असतात. बाभळीच्या काट्यांचे सुंदर घर बॅगवर्म मॉथ बनवतो. त्या काटेरी कोशातून तो केवळ पानांचे भोजन घ्यायला बाहेर येतो.

मानवी जीवनाचा काटा हा अविभाज्य भाग आहे. जेवताना चमच्याप्रमाणे आता काटा हाही आवश्यक झाला आहे. त्यातून काटे-चमचे असा जोडशब्दच तयार झाला. वजन-काटा बरोबर असेल तरच माप व्यवस्थित होते. तेथेही काटा हाच महत्त्वाचा. न्यायदेवतेच्या हातातही हा वजन-काटा दिलेला आहे. वस्तुस्थिती काही असो, पुराव्याचे वजन पारड्यात पडले तरच काटा न्यायाच्या बाजून झुकतो. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आले तरी आपण त्याला काटाच म्हणतो. माशांच्या हाडे काटे म्हणूनच ओळखली जातात. मासे खाताना काटे अलगद बाजूला काढून टाकावे लागतात. चूकून घशात अडकला तर जेवणाची पूर्ण मजाच निघून जाते. मधमाशी, गांधीलमाशी यांनाही काटे असतात. हे किटक माणसाला किंवा इतर प्राण्यांना चावा घेताना तो काटा शरीरात सोडतात. काटा काढला नाही, तर त्या भागाला मोठी सूज येते. कधी कधी त्यामुळे जखम होण्याचा धोका असतो. त्यामुळे तो काटाही शोधून तत्काळ दूर करावा लागतो. निवडणूक दोन तुल्यबळ उमेदवारांत असेल, तर त्या मतदारसंघातील निवडणूक म्हणजे ‘काट्याची टक्कर’ आहे, असे म्हणतात.

काटा हा एकच शब्द आपण मराठीत वापरत असलो तरी इंग्रजीत त्याला अनेक नावे आहेत. वांगी आणि गुलाबावरील काट्यांना ते प्रिकल म्हणतात. कॅक्टसवरील काटे स्पाईन होतात. स्वयंपाकगृहामधील काटे फोर्क असतात. बियांवरील कूस स्पीकलेट असते. वनस्पतींवरील सर्वच काट्यांना थॉर्न म्हणतात. हिंदीत त्याला काँटा म्हणतात. या शब्दाला घेऊन अनेक चित्रपट निघाले. गाणी बनवण्यात आली. तुळजापूरचे कवी नारायण पुरी यांनी नवविवहितेच्या पायात मोडलेला काटा काढणाऱ्या नवऱ्याच्या मनातील भावनांचे छान वर्णन केले आहे. बायकोच्या पायात मोडलेल्या बोरीच्या अणकुचीदार काट्याने ज्या वेदना सुरू होतात, त्यात आपला निम्मा वाटा आहे, असे त्याला वाटते. तिचे पाय किती नाजूक हे सांगताना कवीला कापूस आठवतो.

'पायामध्ये सलतो गं, सखे बोराटीचा काटा

तुह्या पायातील सल, त्यात माहा निम्मा वाटा

पाय नाजूक साजूक, राणी कापसाच्यावाणी

तुह्या पायाला बग फुलली, बघ काट्याची ग अणी

 

काटा काढण्याची पद्धत आणि पतीपत्नीतील प्रेमाचे सुंदर वर्णन कवितेत आहे. पायात काटा मोडण्यापासून, काटा काढणे, त्याला चोर-पोलिस ठरविणे आणि त्यानंतर बिब्याचा चटका देईपर्यंत सर्व काही या कवितेत आहे. काटा जर पूर्ण निघाला याची खात्री नसेल, तर बिब्याचा चटका दिला जातो. तसेच ‘वाटेवाटेवर काटे आहेत जरा जपून चाल’, असा पोक्त सल्लाही तिला देतो. तिचा पाय असा मांडीवर घेता येणार असेल, तर तिला काटा पुन्हा मोडावा, असा स्वार्थी विचारही त्याच्या मनात येतो. ग्रामीण भागात काट्यामुळे ओढवणारा प्रसंग ग्रामीण शैलीत अतिशय सुंदर पद्धतीने चित्रीत केले आहे.

वनस्पतींचे काटे आपल्याला त्रास देत असले तरी ते आपल्याला दिसतात. ते सांगतात, ‘जवळ आलास तर टोचेन’. आपण त्यांच्याजवळ गेलो नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत. पण माणसातील काटे अनेकदा दिसत नाही. समाजात जगताना असे काटे पदोपदी भेटतात. नेहमी गोड बोलणारी माणसे हिवराच्या काट्यासारखी असतात. गोड बोलून जवळीक साधून गळा कापण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. उलट काट्यासारखे बोचणारी माणसे ही खऱ्या अर्थाने आपली हितचिंतक असतात. आपले भले व्हावे, म्हणून त्यांचे ते टोकणे, बोलणे असते. समाजाच्या भल्यासाठी आपल्या पदाचा पूर्ण क्षमतेने वापर करणारी माणसे जनसामान्यांच्या मनातील नायक असतात. मात्र त्यांचे कर्तव्यकठोर नियमाप्रमाणे काम करणे ज्यांच्या स्वार्थाच्या आड येते, त्यांच्या दृष्टीने ती काटा असतात. एरवी काटा सहज दूर करता येतो, पण हे खऱ्या अर्थाने काटे नसल्याने त्यांना कायमचे दूर करणे शक्य नसते. अशा कर्तव्यप्रिय अनेक अधिकाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागते. अशा अधिकाऱ्याना काट्यासारखे बाजूला करून अडगळीत टाकून दिले जाते. शेवटी काय, काटा बाजूला करण्यातच धन्यता मानली जाते. खरे तर समाजाचा गाडा त्यांच्यामुळेच नीट चालत असतो. असे अधिकारी जनतेच्या गळ्यातील ताईत असतात. जनता त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. मात्र त्यांना संरक्षण देऊच शकते, असे नाही. ‘काटा’ ही गोष्ट त्यामुळेच सापेक्ष आहे.

काटेही सुंदर असतात, असेच निसर्ग सांगतो. तसे असते म्हणूनच त्यांच्या संगतीत गुलाब फुलतो.  गुलाबाला जवळ करणारे काट्यांना दूर करतात- गुलाबाला तो कितीही जवळ हवा असला तरी.... मग गुलाबाला तोडण्यापेक्षा काट्यातच फुलत राहू दिले तर..?

(पूर्वप्रसिद्धी पुण्यनगरी, कोल्हापूर दिवाळी अंक २०२१)

 

-०-

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

कोरोना आणि शिक्षण

 
      काही दिवस लॉकडाउनची परिस्थिती अनुभवल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करणे अपरिहार्य ठरले. विद्यमान शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्यापासून प्रथमच ‘खडू आणि फळा’ संस्कृतीप्रती तडत्व निर्माण झालेल्या शिक्षकांना अचानक या बदलास सामोरे जावे लागले. विद्यार्थी तंत्रज्ञान सहज स्वीकारतात. त्यांनी या तंत्राशी स्वत:ला जुळवून घेतले. शिक्षकांनीही झूम, गुगल मीट, वेबेक्स, व्हॉटसअप व्हिडीओ कॉल अशा विविध प्लॅटफॉर्मवर बैठका आयोजित केल्या. अशा अध्यापनाला ऑनलाईन टिचींग असा शब्द रूढ झाला….

‘सह्याद्री’ गगनबावड्याचे आनंद रंगराज आणि त्यांचे तरूण मित्र यांनी मनावर घेऊन प्रसिद्ध केलेल्या पहिल्या दिवाळी अंकासाठी ‘कोरोना आणि शिक्षण’ विषयावरील माझा लेख प्रसिद्ध झाला. तो ‘सह्याद्री’च्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रसिद्ध करत आहे.

___________________________________________________ 

मानवाच्या दृष्टीने, ‘कोरोना संकट’ इतिहासातील काळा अध्याय म्हणून लिहिला जाईल. हा अध्याय कधी पूर्ण होणार, कधी संपणार, याबाबत आजही अनिश्चितता आहे. औद्योगिक क्रांतीनंतर आलेले हे सर्वात गंभीर संकट. त्याचे सावट अद्यापही दूर झालेले नाही. जगभरातील विचारवंत यापुढे कालगणनेमध्ये ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनात्तर’ असे दोन भाग पडतील, असे सांगत आहेत. कोरोनाचे सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाले आहेत. उद्योग, पर्यटन, शेती, व्यापार सर्व क्षेत्रे या संकटाने ग्रासली आहेत. उद्योगातील उत्पादन घटले. पर्यटन व्यवसायामध्ये मोठी घसरण झाली. शेतीतील उत्पादन कायम ठेवण्यात शेतकरी यशस्वी ठरत असले, तरी तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये अनंत अडचणी येत आहेत. व्यापारी वर्गास अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे. मानवी जीवनाचा प्रत्येक कोपरा कोरोनाच्या संकटाने झाकोळला आहे. शिक्षण व्यवस्था याचाच एक भाग.

शिक्षण क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला आहे. काही दिवसानंतर याचे गांभीर्य ठळकपणे समोर येणार आहे. शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षण व्यवस्था खुली करण्याचे वारंवार मागणी केली आहे. ‘शिक्षण हे एकमेव उन्नतीचे साधन आहे’, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. शिक्षण व्यवस्थेवर आलेल्या या संकटामुळे उन्नतीचे हे एकमेव साधन संकटात आले आहे. शिक्षण व्यवस्थेतील अंगणवाडीपासून विद्यापीठापर्यंतच्या सर्व शिक्षणसंस्थांतील नेहमीचे वातावरण आज दिसत नाही. डिसेंबर २०१९ पासून कोरोनाच्या संकटाची चर्चा सुरू झाली. अनेक राष्ट्रांनी याला गांभिर्याने घेतले नाही. कोरोनाला रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये सर्वांना घरांमध्ये नजरकैद व्हावे लागले.

शाळा आणि महाविद्यालये बंद झाली. ‘युनेस्को’च्या अहवालानुसार, एप्रिल २०२० मध्ये जगभरातील १८८ देशांतील १५४ कोटी विद्यार्थी घरी बसले. भारताचाही यात समावेश आहे. भारतातील पंधरा लाख शाळा आणि पन्नास हजार शिक्षण संस्था बंद आहेत. यामुळे २६ कोटी शालेय विद्यार्थी आणि तीन कोटी सत्तर लाख उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी घरात बसले आहेत. शालेय आणि उच्च शिक्षणातील एकूण एक कोटी चार लाख शिक्षक शाळा-महाविद्यालयांपासून दूर आहेत. सुमारे तीस कोटी विद्यार्थी असे निव्वळ घरात बसून राहणे, हे एका स्फोटक परिस्थितीला निमंत्रण देणारे ठरू शकते. कोरोनाची समस्या ही निव्वळ आरोग्याची समस्या नाही. या समस्येचे आरोग्य हे तत्कालिक दृष्य स्वरूप आहे. याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत होत असलेल्या बदलांचे परिणाम लगेच न दिसता काही दिवसांनंतर, काही महिन्यानंतर, कदाचित काही वर्षांनंतर दिसू लागतील. कोरोना संकटामध्ये विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. ‘शिक्षण पद्धती अशीच बंद राहिली तर शिक्षण हक्कालाच धोका पोहोचेल’, अशी शंका युनेस्कोच्या महासंचालकांनी व्यक्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, याचा विचार सुरू झाला.

काही दिवस लॉकडाऊनची परिस्थिती अनुभवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करणे अपरिहार्य ठरले. विद्यमान शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्यापासून प्रथमच ‘खडू आणि फळा’ संस्कृतीप्रती जडत्व निर्माण झालेल्या शिक्षकांना अचानक या बदलास सामोरे जावे लागले. यासाठी त्यांना कोणतेही प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. विद्यार्थी तंत्रज्ञान सहज स्वीकारतात. त्यांनी या तंत्राशी स्वत:ला जुळवून घेतले. शिक्षकांनीही झूम, गुगल मीट, वेबेक्स, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल अशा विविध प्लॅटफॉर्मवर बैठका आयोजित केल्या. अशा अध्यापनाला ‘ऑनलाईन टिचिंग’ असा शब्द रूढ झाला. काही उद्यमी शिक्षकांनी यामध्येही प्रयोग सुरू केले. आपले अध्यापन विद्यार्थ्यांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी त्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, अध्यापनाशी निगडित चलत्चित्रफिती दाखवण्यास सुरुवात केली. यातुन काही अंशी विषय समजणे विद्यार्थ्यांसाठी सोपे झाले. नॅशनल डिजीटल लायब्ररी, स्वयम्, शोधगंगा, इनफ्लिबनेट अशा मार्गातून ज्ञानाची संसाधने सार्वत्रिक उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न झाले. ते गरजेचेच आहेत. मात्र अपरिहार्यतेतून या तंत्राचा स्वीकार करताना सर्वसमावेशकतेचा विचार न करता ही शिक्षण पद्धती वापरली जात आहे. त्यामुळे ती वर्गातील अध्यापनाइतकी परिणामकारक ठरताना दिसत नाही.

लॉकडाऊननंतर अनेक देशांत दूरशिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यू-ट्यूब, मल्टिमीडिया, मोबाईल, इ-लायब्ररी, दूरचित्रवाणी, ध्वनी आणि ध्वनीचित्रफिती, माहिती तंत्रज्ञान अशा सर्व माध्यमांतून मुलांना अध्ययन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतात मात्र परीक्षा रद्द करणे, परीक्षा न घेता मुलांना पुढील वर्गात प्रवेश देणे अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जाऊ लागले. प्रगत राष्ट्रांमध्ये अशा शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत संधी उपलब्ध आहेत. भारतात मात्र अशी परिस्थिती नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा प्रसार, विस्तार, दर्जा आणि संधी वाढवण्यास आजही मोठी संधी आहे. २०२० मध्ये ‘ट्राय’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात ६८ कोटी ४५ लाख लोक आंतरजाल (इंटरनेट) वापरतात. भ्रमणध्वनी वापरणाऱ्यांची संख्या ४८ कोटी ८२ लाख इतकी आहे. आंतरजालासह भ्रमणध्वनी वापरणाराची संख्या ४० कोटी ७२ लाख इतकी आहे. दूरचित्रवाणी पाहणाराची संख्या ७६ कोटी आहे. हा माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार मोठा वाटत असला, तरी भारताची लोकसंख्या १३८ कोटी इतकी प्रचंड आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के लोकांकडे आंतरजाल सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच सुमारे पन्नास टक्के लोक आंतरजाल सुविधेपासून दूर आहेत. ग्रामीण भागातील ६४ टक्के जनता आंतरजाल सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. शहरातील हेच प्रमाण ३६ टक्के इतके आहे. त्यामुळे ही विषमता टोकाची दिसून येते. आंतरजाल सुविधेपासून वंचित असणारा वर्ग आर्थिकदृष्ट्याही कमकुवत आहे. आंतरजाल सुविधेसह भ्रमणध्वनी असला तरी त्याच्या डाटासाठी द्यावे लागणारे अधिकचे शुल्क, विद्युत पुरवठा इत्यादीचा अधिकचा आर्थिक भार अनेक कुटुंबाना परवडत नाही. अखंडित वीज पुरवठा आणि सक्षम भ्रमणध्वनीसाठी आंतरजाल उपलब्धता या समस्याही गंभीर आहेत. भारताप्रमाणेच अनेक विकसनशील देशांत परिस्थिती आहे. त्यातील काही देशांनी अध्यापनासाठी आंतरजालापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेल्या दूरचित्रवाणीसारख्या संसाधनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. भारतात मात्र या संसाधनाची म्हणावी तशा चर्चा झाली नाही. खरं तर, भारतात नऊशेपेक्षा जास्त दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. मात्र या वाहिन्यांचा शैक्षणिक कारणांसाठी किती उपयोग केला जातो? 

 असे असले तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण पद्धती आता रूजू लागली आहे. ‘शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे’, या धोरणानुसार आजची शिक्षण प्रक्रिया सुरू आहे. ही शिक्षण पद्धती प्रचलित शिक्षण प्रक्रियेला पर्याय ठरू शकते का? याचा विचार करणे आवश्यक आहे. ‘शिक्षणाचा उद्देश मिळणारे चौफेर ज्ञान आत्मसात करणे आणि त्यातून चांगले व्यक्तिमत्व घडवणे’, हा आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा खूप मोठा वापर करता येऊ शकतो. या तंत्राचे निश्चित काही फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काही महिने शिक्षण व्यवस्थेपासून दूर राहिलेले विद्यार्थी आणि शिक्षक परस्परांशी आभासी पद्धतीने का होईना, संवाद साधू लागले आहेत. शिक्षक आपली पारंपरिक ‘खडू-फळा संस्कृती’ सोडून ‘तंत्रस्नेही’ बनत आहेत. शहरातील विद्यार्थ्यांना मिळणारे दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळू लागली आहे. मोबाईलवर खेळत बसणे, दूरचित्रवाणीवरील कॉमिक्स पाहणे, याऐवजी मुले ऑनलाईन अभ्यास करू लागली आहेत. मुले अभ्यास करतात की नाही, यावर पालकांना लक्ष देता येऊ लागले आहे. शाळेत सहा तास जाणे, जाण्या-येण्यासाठी लागणारा वेळ, शिकवणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचू लागला आहे. तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मुले नेहमी तयार असतात. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकण्यास मुले उत्सुक आहेत. आंतरजालांवरील उपलब्ध ज्ञानाचा वापर करणे मुलांनी स्वीकारले केले आहे.

अनेक फायदे दिसत असले, तरी ऑनलाईन शिक्षण’ पद्धतीचे अनेक नकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. विद्यार्थांना अनुभवातून शिकलेले चांगले लक्षात राहते. मात्र प्रयोग करणे, अनुभवातून शिक्षण घेणे या पद्धतीतून साध्य करता येत नाही. भ्रमणध्वनीवरील आंतरजाल सुविधेची उपलब्धता, विद्युत पुरवठ्याची अनुपलब्धता, लॅपटॉप, भ्रमणध्वनीची उपलब्धता अशा अनेक गोष्टींमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये थेट संवाद होत नसल्याने शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना समजते की नाही, याचा अंदाज बांधणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना शिकवलेले समजलेले पाहून शिक्षकांना मिळणारे समाधान ऑनलाईन पद्धतीत मिळू शकत नाही. इलेक्ट्रॉनिक संसाधनाचा अतिवापर मुलांच्या आरेाग्यासाठी घातक ठरत आहे. भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप दीर्घकाळ पडद्याकडे पाहिल्याने डोळ्यांचा त्रास, पाठदुखी, कानांचे विकार वाढत आहेत. वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनामध्ये शिक्षक अभ्यासक्रमबाह्य दाखले, माहिती देत असतात. ऑनलाईन शिक्षणामध्ये शिक्षक काटेकोरपणे केवळ अभ्यासक्रमाशी निगडित चर्चा करतात. त्यामुळे वर्गात खूप छान शिकवणारे काही शिक्षक ऑनलाईन पद्धतीत कंटाळवाणे वाटतात. विद्यार्थी बहुतांश वेळ ऑनलाईन असताना आक्षेपार्ह संकेतस्थळावर भेट देण्याची शक्यता असते.

जे विषय प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासावयाचे असतात, त्यांची मोठी अडचण झाली आहे. शिक्षण संस्था बंद असल्याने प्रत्यक्षिके होत नाहीत. प्रात्यक्षिक होत नसल्याने ते कसे करावयाचे याचे केवळ ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी ते कौशल्य आत्मसात करू शकत नाहीत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचे कौशल्‍य देण्यासाठी तो प्रयोग करण्याची प्रत्यक्ष संधी त्यांना मिळणे आवश्यक असते. मात्र, असे घडत नाही. विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानसशास्त्रासारख्या विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांखेरीज दिले जाणारे शिक्षण परिणामकारक बनवण्यासाठी निश्चितच सक्षम ठरू शकत नाही.  

वर्गातील, शाळेतील इतर मित्र-मैत्रिणींशी भेट होत नसल्याने मुले एकलकोंडी बनू लागली आहेत. अधिक वेळ ऑनलाईन कार्य करण्यातून ऑटिझ्‍म हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. शाळेतील खेळांचे तास, त्यामध्ये होणारी दंगामस्ती, चिडणे, चिडवणे, धडपडणे  या साऱ्या गोष्टीला बालगोपाळ मुकले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तर हे सुवर्ण दिन असतात. अभ्यास, कला, क्रीडा क्षेत्रांत प्राविण्य दाखवायचे, मित्र-मैत्रिणींना भेटायचे, प्रेमात पडायचे हे दिवस! ऑनलाईन शिक्षणाने त्यांचा शिक्षणाबरोबर शिक्षणबाह्य आनंदही हिरावला गेला आहे. आवाज आणि शिक्षकाचे चलचित्र माध्यमातील बोलणे स्पष्ट ऐकता यावे, दिसावे यासाठी इतरांचे कॅमेरा बंद असतात. त्याचा गैरफायदा काही अतिहुशार विद्यार्थी घेतात. ते निव्वळ स्वत:ला त्या तासाला जोडतात आणि इतर उद्योग करत असतात. त्यांचे  अध्यापनाकडे लक्षच नसते.

शिक्षक आता अध्यापन पद्धतीला सरावत आहेत. गांभीर्याने शिकू इच्छिणारे विद्यार्थीही नवे तंत्रज्ञान स्वीकारून ज्ञानसाधना करत आहेत. ‘मोबाईल बाजूला ठेवा’, असे सांगणारे पालक आता ऑनलाईन तासासाठी ‘मोबाईल घेऊन बसा’ असे सांगत आहेत. मात्र  सर्वच विद्यार्थी गांभीर्याने शिक्षण घेत नाहीत. चार ते पाच तास ऑनलाईन राहणे विद्यार्थ्यांना अडचणीचे आणि कंटाळवाणे ठरत आहे. अध्ययन करणारे करत आहेत, अभ्यास टाळू पाहणारे, शिकण्याचे टाळत वेळ वाया घालवण्याचे काम करत आहेत. यातून अध्ययन चांगले होत आहे, असे खात्रीने सांगण्यासारखी परिस्थिती सध्या नाही. शिक्षण पद्धतीत तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन! यातील अध्यापन ऑनलाईन सुरू आहे. अध्ययन विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार सुरु आहे. मूल्यमापन हा तिसरा महत्त्वाचा भाग सध्या अडचणीमध्ये आहे. नामवंत व्यवस्थापन तज्ज्ञ पीटर ड्रकर यांच्या मताननुसार अर्थप्राप्तीचे मूळ ज्ञानवृद्धिंगतेवर आहे. ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धती किती ज्ञानवृद्धिंगत करते हे तपासणे सध्याच्या मूल्यमापन व्यवस्थेतून नेमके समजू शकत नाही.   

सध्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीमध्ये घेण्यात येतात. या परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित घेण्यात येत आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयाचे सर्वंकष आकलन तपासले जाणे अपेक्षित असते. त्याचं हेतूने विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा घेण्यात येतात. लेखी परीक्षा घेताना प्रश्नांची भिन्न स्वरूपात मांडणी असणे आणि त्याची काठिण्यपातळी किती आणि कशी असावी, हे तज्ज्ञांचे मंडळ निश्चित करून देत असते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी, टिपात्मक, टिकात्मक असे प्रश्नांचे स्वरूप प्रमाणासह निश्चित करून देण्यात आलेले असते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेपासून विश्लेषण करण्याच्या क्षमतेपर्यंत सर्व काही तपासता यावे, हे अपेक्षित असते.

सध्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतात. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांखेरीज इतर प्रकारचे प्रश्न योजणे आणि त्याआधारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पडताळणी करणे अपवादानेच घडते. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा न घेताच निकाल लावण्याचे अद्भुत कार्य कोरोना काळात अनुभवण्यास मिळाले.

न्यूटन शिकत असताना प्लेगची साथ आली होती. त्यावेळी त्या भागातील सर्व शिक्षण संस्था बंद झाल्या होत्या. त्या काळात ते वर्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षण कालखंडात शून्य वर्ष म्हणून गृहित धरण्यात आले होते. मात्र परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. अर्थात त्या काळात तंत्रज्ञान आजच्याइतके प्रगत नव्हते. कोणत्याच माध्यमातून अध्यापन झालेले नव्हते. आज ऑनलाईन पद्धतीतून अध्यापन होत आहे. त्यामुळे किमान ऑनलाईन परीक्षा आज होत आहेत. मात्र काही वर्गांच्या परीक्षा न घेताच निकाल जाहीर न करणे अनाकलनीय आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे आकलन झाले किंवा नाही, याचे मूल्यमापन होणे शक्य नाही.

फार वर्षांपूर्वीच शिक्षण व्यवस्थेच रूप बदलणे आवश्यक होते. शिक्षण व्यवस्थेतील अध्यापन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हावे, यासाठी शिक्षण संस्थांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले. त्यातून डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टर्स, आंतरजाल सुविधा, कम्युनिटी रेडिओ केंद्राची उभारणी, दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे निर्मिती, स्वयम्साठी अभ्यासक्रमावर आधारित, आकलन समृद्ध करणाऱ्या चलत‌चित्रफितींची निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. या अनुदानातून साहित्य खरेदी करण्यातही आले. मात्र अनेक संस्थांमध्ये असे घेतलेले साहित्य वापराविना पडून होते. कोरोनाच्या संकटाने यातील अनेक उपकरणे वापरली जाऊ लागली आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. कोरानाचा अनेक क्षेत्रांवरील प्रभाव अजूनही पूर्ण नाहीसा झालेला नाही. शिक्षण व्यवस्थेवरचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. या संकटातून अध्यापनाचे नवे सापडलेले तंत्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. या तंत्रामध्ये सुधारणेला मोठा वाव आहे. नवी फिचर्स यामध्ये येत आहेत. यातून ऑनलाईन शिक्षण प्रणाली आणखी कार्यक्षम होईल. अर्थात कोरोनाचे संकटही दूर होईल. पुन्हा मुले शाळेत बागडू लागतील. महाविद्यालये तरूणाईने फुलतील आणि शिक्षण व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊन सक्षम नागरिक घडवू लागेल. मात्र कोरोना काळात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांच्याच हाती असणार आहे. त्यांनी या काळातही मनापासून अभ्यास करणे, ज्ञान संपादन करणे आणि स्वत:ला सिद्ध करणे याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच अधिक आहे, हे जाणून शिकायला हवे!    

-०-


शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

टोचणारे काटे आणि गोड फळांची कार!

मराठीमध्ये कार, किरमा तर संस्कृतमध्ये नागबली या नावाने ओळखली जाणारी झुडुपवर्गीय वनस्पती. या झाडाचे टोकदार काटे हीच त्याची ओळख बनल आहेत आणि या काट्यामुळेच ते नावडतेही बनले. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होते की काय, असा प्रश्न पडतो. मात्र या झाडाची फळे गोड आणि चविष्ट असतात. ही फळे म्हणजे बालपणीचा बाळगोपाळांचा आवडता रानमेवा. याच्या मुळांचा उपयोग सर्पदंशावर केला जातो. या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. अशा या बहुगुणी रानमेव्याविषयी….संपूर्ण लेख


 _________________________________________________________

बालपण समृद्ध होते. शाळा शिकणे जसे सुरू होते, तसेच जंगलात फिरणे आणि अनुभवणेही सुरू होते. त्यातून विविध वनस्पतींची ओळख झाली. त्यातील जे जे माणसाने खाण्यासाठी योग्य अशा सर्व गोष्टी चाखता आल्या. टेंभूर्णीची फळे, धामणे, इरामणे, करवंदे, बोरे, चारे, गोदणे, हुंबाटे, कामिन्या, निळुंब्या अशा अनेक वनस्पतींची फळे बालपणी खायला मिळाली. त्यातीलच एक आठवण बनलेले झाड म्हणजे कार. सोलापूर, मराठवाडा भागात या झाडाला कारीचे झाड म्हणतात. मात्र कोल्हापूर भागात, कोकणात ही झाडे फारशी दिसत नव्हती. मुळात सोलापूर भागातही ही झाडे आता कमी दिसतात. या झाडाची ओळख धुसर होत असतानाच एक दिवस एका झुडुपावर बुलबुल पक्ष्याचा दंगा पाहायला मिळाला. बुलबुलचा आनंद शोधताना, हे झाड दिसले आणि आठवणीच्या पानावरील धूळ क्षणात दूर झाली

या झाडाचीकारनावाने बालपणापासून ओळख झालेली असली तरी या झाडाचा शोध घेताना त्याचे किरमा आणि कडबार ही मराठीतील अन्य नावे समजली. तसेच हे झाड इतके दुर्लक्षित आहे की त्यावर मराठी भाषेत साहित्य दिसून आले नाही. इंग्रजीमध्ये मात्र अनेक शोधनिबंध आणि त्याच्या औषधी गुणधर्माबाबत संदर्भ मिळाले. संस्कृतमध्ये नागबला, गंगेरूकी ही नावे आहेत. कोकणीमध्ये या झाडाला कायली म्हणतात. कन्नडमध्ये करेमुल्लू, ओल्लेपोडे, कारे-गीडा, मल्याळममध्ये मधाकरा, निरूरी, सेरूकरा, कारामुल्लू, कट्टरामुल्लु, कंटककारा, कंडाकारा, ओडिसरमध्ये तुतीडी, तमिळमध्ये थेरवाई, सेंगराई, थेर्नाई, नल्लक्कराई, मुल्लुकराई, कुडीराम, करायचेडी, तेलगूमध्ये बालुसू, सिन्नाबालूसू नावाने ओळखले जाते. त्याला किरनी, कंडाकारा, नल्लाकराई, कोरोमंडल बॉक्सवूड, कराईचेड्डी ही इतर काही नावे मिळाली आहेत. इंग्रजीत याचे बारसे कॅरे चेड्डी, वाईल्ड जेस्सामीन या नावाने करण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव कँथियम कोरोमँडेलिसम असे आहे. शेतात फिरताना शेळ्या आणि मेंढ्या वगळता इतरांची या झाडाशी दोस्ती केवळ फळे असतानाच असे. एरवी सर्वजण कारीपासून फटकून राहणेच पसंत करतात. झुडुपवर्गीय काटेरी वनस्पती असूनही, उंची कमी असल्याने यावर पक्ष्यांची घरटी क्वचितच आढळतात.

हे झाड मूळ भारतातील आहे. आजही याचे अस्तित्व भारतासह, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान या देशापुरताच मर्यादित आहे. उष्ण आणि समशितोष्ण वातावरणामध्ये हे झाड वाढते. पाण्याची निचरा होणारी, मुरमाड जमिनीत ही झाडे आढळतात. झाडाची उंची सहा ते बारा फूट होते. झाडाची रोपे बियापासून तयार होतात. रोप तयार होताना सुरुवातीला एक कोंब वर येतो. जमिनीपासूनच पाने आणि काटे दिसू लागतात. दोन काटे एकाच उंचीवर परस्परविरूद्ध बाजूला असतात. शेजारी असणाऱ्या काट्याच्या जोड्या बरोबर काटकोनात असतात. हे काटे सरळ आणि धारदार असतात. काटे टणक आणि चार ते पाच सेंटिमीटर लांब असतात. काटेही सुरुवातीला पिवळे, नंतर पोपटी आणि शेवटी हिरवे होतात. त्यानंतर त्यांचा रंग वाळलेल्या लाकडासारखा करडा - काळसर होतो. मात्र काट्याच्या टोकाला असणारी धार सुरुवातीपासून शेवटपर्यंत तशीच असते. काट्याच्या खाली काही अंतरावर पाने असतात. पाने गळाल्यानंतर धारदार, लांब काटे असणारे सरळ लाकूड हे एखाद्या शस्त्राचे रूप धारण करते

खोडाचा आणि काट्यांचा रंग काळसर करडा असतो. मुख्य खोडसुद्धा फार मोठे होत नाही. पाच ते सहा सेंटिमीटर व्यासापर्यंत खोडाची वाढ होते. त्यानंतर जरी ते खोड वाळले तरी बुंध्यातून फुटलेल्या फांद्यामुळे त्या ठिकाणचे झाडाचे अस्तित्व संपत नाही. ते तेथे तसेच असते. झाडाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असते. त्याचा वापर प्रामुख्याने जळण म्हणून केला जातो. लाकडापासून मिळणाऱ्या उष्णतेचे प्रमाण जास्त असते. मात्र त्याच्या काट्यामुळे हिरवे झाड जळणासाठी तोडत नाहीत. त्यापेक्षा काट्यांचा त्रास होऊ नये म्हणून लहान रोपानाच वाढू दिले जात नाही.

कारीचे एक फळ दोन ते चार बिया धारण करते. असे बहुबीजधारी फळ खाली पडले आणि त्यातील सर्वच बिया रूजल्या, तर, प्रत्येक बी रूजून एकाच बुंध्यात तीन ते चार रोपे आलेली असतात. ही रोपे दोन - तीन फुटांची उंच होताच, त्यांना फांद्या फुटतात. काही रोपांच्या बुंध्यातून फांद्याही फुटतात. फांद्या सुरुवातीला सरळ असतात. फांद्यांचा आकार लहान असल्याने लांबी वाढताच काही प्रमाणात खाली झुकतात. फांद्या मोठ्या प्रमाणात फुटून झुडुप डेरेदार होते. येणारी कोवळी पाने पिवळ्या रंगाची असतात. पानांचा रंग प्रथम पोपटी आणि नंतर गडद हिरवा होतो. पाने साधी असतात. पक्व जून झालेली पाने पिवळी होतात आणि गळतात. पाने अंडाकृती असतात. पानांची रूंदी दोन ते अडिच सेंटिमीटर तर लांबी तीन ते चार सेंटिमीटर असते. पानांच्या मधोमध एक शीर असते. प्रत्येक बाजूला चार उपशीरा असतात. त्यापासून लहान शीरांचे जाळे तयार होते. शीरा आणि उपशिरांचा रंग पोपटी असतो. पाने मऊ असतात. खालच्या बाजूला पानांचा रंग फिकट असतो

या झाडांची पाने शेळ्या आणि मेंढ्यांची आवडते खाद्य आहेत. काट्याखाली असणारी पाने शेळ्या-मेंढ्या मोठ्या शिताफीने खातात. सर्व पाने कोवळ्या फांद्यावर असतात. जुन खोडावरील पाने गळतात. पानाच्या अगदी जवळून एप्रिल - मे महिन्यात कळ्या येतात. कळया थोड्या लांब असतात. कळया मध्यभागात थोड्या दबलेल्या असतात. जेथून नव्या फांद्या येतात अगदी त्याच जागी कळ्या येतात. यामुळे या कळ्यांना आणि फुलांना अक्षधारी कळ्या म्हणतात. एका देठाला तीन ते चार कळ्या येतात. या कळ्यातून छोटी, हिरवट-पिवळ्या रंगाची फुले येतात. प्रत्येक फुलामध्ये चार पुंकेसर असतात. चार निदलपुंज आणि चार दलपुंज असतात. मध्ये असणाऱ्या दांड्याच्या खाली फुलाच्या देठाजवळ अंडाशय असते. मध्यभागी असणाऱ्या दांड्यातून पुंकेसरातील परागकण बिजांडापर्यंत पोहोचवण्याचे काम कीटक करतात. तेथेच फळ आकार घेऊ लागते

फुलांचे फळात रूपांतर होताच, फुलांचे इतर भाग गळून जातात. फळे हिरवी असतात. फळांना खाचा असतात. फळाच्या दुसऱ्या टोकाला जांभळाप्रमाणे खाचयुक्त भाग असतो. दुसऱ्या बाजूलाही देठ होते की काय, असे वाटते. मात्र जांभळावरजांभूळ आख्यानआले तसे भाग्य या झाडाला आणि फळाला लाभले नाही. फळे मोठी होत जातात. पूर्ण वाढलेल्या फळांचा आकार दीड ते दोन सेंटिमीटर लांब आणि एक ते दीड सेंटिमीटर रूंद असतात. फळे दोन्ही बाजूला थोडी दबलेली असतात. तीन - चार महिन्यानंतर फळे पक्व होतात. जुलै - ऑगस्टनंतर फळे पिकतात. पिकताना ती पिवळी होतात. फळे कडक असतात. फळाचा अर्धा भाग बियांनी व्यापलेला असतो. बिया एका बाजूला चपट्या असतात. दुसऱ्या बाजूला गोल असतात. फळावरील आवरण चकाकणारे आणि गुळगुळीत असते. फळ पूर्ण पक्व होताच गर मऊ पडतो. फळाचा रंग प्रथम लालसर आणि नंतर तपकिरी होतो. कच्ची फळे तुरट असतात, मात्र मऊ झालेली फळे खायला खूप गोड आणि चविष्ट असतात. या फळांना खाण्यासाठी बुलबुल, मुनियासारखे पक्षी, खारूताई या झाडाकडे मोर्चा वळवतात. कीटकही या फळांचा आस्वाद घेतात. पूर्ण पिकलेले फळ झाडावर असणे जणू या जीवाना आवडत नाही. काट्याखाली आणि पानाआड लपलेली ही फळे शोधून फस्त करतात

या झाडाच्या विविध भागांचा औषधी उपयोग होतो. काही भागात या वनस्पतीची पाने सॅलॅडप्रमाणे खातात. काही आदिवासी कारीच्या पानांची भाजी करून खातात. पायात किंवा शरीरामध्ये काटे मोडल्यानंतर कोवळी पाने उकळून काटा मोडलेल्या जागेवर बांधतात. काटे बाहेर पडण्यास त्यामुळे मदत होते. लहान मुलांना जंताचा त्रास होऊ नये म्हणून नियमीतपणे पाने खायला देतात. जनावरांच्या जखमा भरून याव्यात म्हणून पानांचा काढा करून पाजला जातो. पानामध्ये मोठ्या प्रमाणातअँटिऑक्सिडंटघटक असल्याने पूर्वी पानांचा रस पित असत. पोटाच्या आजारावर पानातील घटक उपयुक्त ठरतात. मुळे आणि पानांचा एकत्रित वापर मूत्राशयाच्या त्रासावर, खरूज, खोकला, ताप, जंत, मधुमेह, अतिसार, मळमळ, अशक्तपणा, मूळव्याध, श्वसनविकार इत्यादी आजारावर करण्यात येतो. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस दुधाबरोबर मुळापासून बनवलेले औषध देण्यात येते. त्यामुळेच संस्कृतमध्ये याला नागबला म्हणतात. सालीची भुकटी बनवून ती हळद, लिंबू मिसळून डोकेदुखीवरील औषध बनवले जाते. फळ खाण्याने जंताचा त्रास होत नाही. तसेच पित्ताचा त्रास कमी होतो. मधुमेह, अपचन, अतिसार, नपुसंकत्व, ताप, स्थूलत्वावर या झाडाचा उपयोग होतो.  

बालपणी माळावरच्या शेतात कारीची दोन झाडे होती. या झाडांची फळे कधी पिकतात याची आम्ही वाट पाहात असायचो. अगदी नकळत्या वयापासून फळे पिवळी होताच आम्ही ती तोडून खायचो. बडबड गीतासारखेकारीचे लाडू गोड फार, जरी असले काटे धारदारअसे पुटपुटत आम्ही झाडाच्या चारी बाजूने पिकलेली फळे शोधायचो. फळे तोडताना भरपूर काटे टोचायचे. काटे टोचले तरी ती गोड फळे खाण्याच्या नादामध्ये ते बोचणे कधीच विसरले जायचे. गोड फळाबरोबर काटे टोचवणारे हे झाड जणूकाही जीवनात सुखाबरोबर दु: पचवायची जणू शिकवण देत असते. झाडाचे महत्त्व जाणणारे वडील कारीची फळे खाताना कधीही रागावत नसत. जास्त पिकलेले, मऊ झालेले फळ तोंडात टाकताच गर विरघळून जात असे. त्यांची चवही जास्त गोड असायची. या जास्त पिकलेल्या फळांना आम्ही लाडू म्हणायचो. एक तीळ सात जणांनी कसा खाल्ला असेल माहीत नाही. मात्र, एखाद्याला दोन लाडू मिळाले तर लाडू मिळणारा त्याच्याकडे आशेने पाहात असत. सर्वजण तो मेवा वाटून खात असत. बालपणी या झाडांची फळे खाण्याचा मनमुराद आनंद घेतला असल्याने हे झाड कायम आठवणीत राहिले. याचे झाड आज पहिल्यासारखे सर्वत्र दिसत नाही. याची फळे मिळणे तर दूर. आरोग्याच्या दृष्टीने उपयोगाची असणारी ही वनस्पती तशी पूर्णत: दुर्लक्षित झाले आहे. या झाडाची रोपे कोणत्याही रोपवाटिकेत मिळत नाहीत. या झाडाला आवर्जून कोणी लावत नाही. या झाडाचे शेतात रोप उगवले, तर जगू दिले जात नाही. चुकून बांधावर उगवले आणि कोणाचे लक्ष नाही गेले तरच ते जगते. मात्र या बहुगुणी झाडाला वाढू दिले पाहिजे. बालगोपाळांना या फळांचा आनंद मिळू दिला पाहिजे

-०-