शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

गरज जागे होण्याची…

  

नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी आहे’. आपण अनेक सण, उत्सव साजरे करतो. त्याच्या मूळ रूपात अनेक बदल कालौघात झाले. नैसर्गिक संसाधनांचा वापर करतो. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर करतो. त्यामुळे निसर्गाची पर्यायाने पर्यावरणाची हानी करतो. ‘अक्षरभेट – २०२२’च्या दिवाळी अंकामध्ये लिहिलेला लेख आपल्यासाठी…

_________________________________________________________

मागील काही वर्षापासून निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणाचा जागर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मूळात जगाला याची जाणीव झाली ती १९७० च्या दशकामध्ये. त्यावेळी डीडीटीचा मोठ्या प्रमाणातील वापर प्रथम सस्तन प्राण्यांना कसा घातक ठरतो, ते संशोधकांनी सांगितले. त्यानंतर मानवामध्ये डीडीटीचे अंश प्राण्यांच्या दूध आणि मांसातून येत असल्याचे शोधण्यात आले. गिधाडासारखी प्रजाती यातून नष्ट होत असल्याचे निदर्शनास आले. गिधाडांना वाचवण्यासाठी अभयारण्ये निर्माण करण्यात आली. मात्र त्याचा हवा तसा परिणाम झालेला दिसून येत नाही. २०२१ मध्ये ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ने युनोला दिलेल्या अहवालानुसार पृथ्वीवरील जीवसृष्टिला किती आणि कसा धोका निर्माण झाला आहे ते संशोधकांनी सांगितले. त्यानुसार परिणामही दिसू लागले आहेत. पुणे, बेंगलोरमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस अगदी आयपीसीसीच्या अहवालातील निष्कर्षानुसार आहेत. पाकिस्तानमधील पूराने हजारो लोकांचा जीव घेतला. आपण यासाठी पावसाला आणि निसर्गाला दोष देत असलो, तरी हे मूळात मानवाने निर्माण केलेली समस्या आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी, सुखासाठी निसर्गाला, निसर्गातील संसाधनाना हवे तसे ओरबडले. हवी तशी लूट केली. त्याचा परिणाम म्हणजे निसर्गाचा लहरीपणा आहे.

भारतीय संस्कृतीच नव्हे, तर सर्व धर्म पंथांची मूळ शिकवण ही निसर्गस्नेही आहे. कोणताही धर्म, पंथ मानवाला त्याच्या आचरणामध्ये, सण, सोहळे आणि उत्सवामध्ये निसर्गाला हानी पोहोचवण्याची शिकवण देत नाही. मात्र कालानुरूप त्यामध्ये अनुचित प्रथा परंपरा येतात. यामध्ये दुर्बलांवर, महिलांवर मोठ्या प्रमाणात बंधने आणण्यात आली. बालविवाह, बाल-जरठ विवाह, पतीचे निधन झाल्यानंतर सती जाण्याची प्रथा, विधवांचे मुंडण करणे, विधवांना समजात मिसळू न देणे, देवदासी अशा अनेक परंपरा निर्माण करण्यात आल्या. काम तसे कोणतेच हलके नसते. मात्र तथाकथीत हलकी कामे करणाऱ्या समुहाला अस्पृश्य मानण्याची प्रथा पुढे आली. त्यानंतर तर यामध्ये इतका अनिष्टपणा आला की विशिष्ट वर्गाच्या लोकांना गळ्यात मडके आणि मागे झाडू बांधून फिरायला लावले जात असे. कायद्याचा बडगा असो, किंवा समाजाची बदललेली मानसिकता आज काही प्रमाणात यात फरक आला आहे. बदलत्या युगात यातील अनेक प्रथा नष्ट झाल्या आहेत, तर काही ग्रामीण भागात आढळतात. बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. बाल-जरठ विवाहही घटले आहेत. मुलींच्या शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढल्याने यात घट झाली आहे. देवदासींची प्रथाही जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र अजूनही विधवांना सौभाग्यालंकार घालू दिले जात नाहीत. मासीक पाळी आलेल्या महिलांना अजूनही ‘बाहेर बसवले’ जाते. अनेक अनिष्ट प्रथा आणि परंपरा कालबाह्य झाल्या असल्या तरी नव्या गोष्टींचा अंतर्भावही मोठ्या प्रमाणात होत आहे.   

सण, उत्सव साजरे करताना असे आलेले बदल समाज सोईने वापरत असतो. त्याचा फटका निसर्ग आणि पर्यावरणाला बसतो. अशा अनेक प्रथा आणि परंपरा आज आपण पाळत आहोत. त्या प्रथेमागील भावना समजून घेण्यापेक्षा केवळ कर्मकांडाला महत्त्व देण्यात येते. त्यातून होणारे निसर्गाचे नुकसान टाळले तरी खूप काही साध्य होऊ शकते, मात्र आपल्या सोईसाठी सारासार विवेक हरवून बसलेला मानव याकडे लक्ष देत नाही. आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पतींचा मानवी आरोग्य निरामय ठेवण्यासाठी उपाय सूचविण्यात आले आहेत. औषधी उपयोगासाठी वनस्पतीचा एखादा भाग जसे की, पान, फूल, फळ, साल, मूळ वापरावे लागते. हे झाडापासून तोडण्यापूर्वी त्या झाडाची क्षमा मागून, त्या झाडाला त्याचा तो भाग देण्याची, विनंती करावी, असे सांगणारी भारतीय संस्कृती आहे. मात्र आपले अनेक सण साजरे करताना आलेले बदल निसर्गाची हानी करतात आणि आपण ते लक्षात घेत नाही. या आलेल्या बदलांचा आणि त्यातून होणाऱ्या निसर्गाच्या हानीचा विचार करायला हवा.

गुढी पाडवा हा नववर्षाचा प्रारंभाचा दिवस. या दिवशी दारात गुढी उभा करण्याची परंपरा पुराणानुसार वसू राजाने सुरू केली, असे संदर्भ मिळतात. वसू राजाला स्वर्गलोक हवा होता. तो एक आदर्श राजा होता. त्याचे मन इंद्रदेवाने वळवले आणि तुझ्या राज्याचे स्वर्गात रूपांतर कर म्हणून सांगितले. वसू राजाने पृथ्वीवर आल्यानंतर पहिली गुढी उभारली. त्यांने बांबूच्या टोकाला शालू, लिंबाची डहाळी आणि हार घालून गुढी रोवली. आजही गुढी अशाचप्रकारे उभी केले जाते. मात्र टोकाला तांब्या उपडा बसवण्यात येतो. कडुलिंबाची डहाळी गुढीला वरती बांधण्यात येते. ही प्रथा केव्हापासून आली याचे संदर्भ मिळत नाहीत. गुढी उभारताना, आरोग्यासाठी उपकारक कडुलिंबाच्या फुलांमध्ये गुळ, हरभऱ्याची भिजवलेली डाळ घालून खाण्याची प्रथा आहे. यासाठी कडुलिंबाची फुले असणारी एक डहाळी लागते. मात्र अनेक महाभाग कडुलिबांच्या गावाला पुरतील एवढ्या फांद्या तोडून आणतात. त्यांच्यापैकी कोणाला विचारले तर सांगतात, ‘येत होतो, शेजारच्या वहिनी, आमच्यासाठीही आणा म्हणाल्या. त्यांच्यासाठीही घेतल्या.’ एक फांदी वाढण्यासाठी एक वर्षाचा काळ लागतो. अशा अनेक फांद्या तोडून झाडाच्या वाढीचा वेग आपण कमी करतो. दुसऱ्या दिवशी या नेलेल्या फांद्यापैकी ढिगभर फांद्या कचऱ्यात टाकल्या जातात. हे आपण टाळायला हवे. कडुलिंबाचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व जाणून उपयोगासाठी आवश्यक तेवढाच भाग घ्यायला हवा. झाडांची कत्तल थांबवायला हवी.

त्यानंतर येणारा सण म्हणजे वटसावित्री पौर्णिमा. हा सण तर आता केवळ उपचार आणि इतरांना, विशेषत: वडिलधाऱ्यांना काय वाटेल म्हणून साजरा केला जातो. यासाठी वडाच्या झाडापर्यंत जाण्याचे कष्टही घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे, सण साजरा करण्यासाठी, बाजारातून वडाची फांदी विकत आणून तिचे पूजन केले जाते. यामागेही वडाच्या झाडाचे महत्त्व जनमाणसात रूजावे, हा हेतू होता. महिलांना घराबाहेर पडण्याचे निसर्गात, रमण्यासाठी ते एक कारण होते. वडाचे झाड जमिनीतील पाणी शुद्ध करणारे. मात्र याच वडाच्या फांद्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येते आणि बाजारात त्या विकल्या जातात. झाडांपासून तोडलेल्या फांद्यांची पूजा करून नवरा सात जन्म कसा मिळणार? हे मात्र समजत नाही. वडाचे झाड दिर्घायुषी. ते लावावे, जगवावे, प्रत्येक गावात किमान एकतरी वडाचेझाड असावे असा यामागे हेतू होता. वडाच्या झाडाचे महत्त्व लक्षात घेऊन हे प्रयोजन करण्यात आले. त्यामुळे वडाची पूजा करायचीच असेल तर त्यासाठी वडाचे झाड लावावे आणि जगवायला हवे. फांद्याऐवजी किमान वडाचे रोप कुंडीत लावून वाढवायला हवे आणि त्याची पूजा करावी.

पुढे आपण साजरी करतो, नागपंचमी. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी वारूळाच्या ठिकाणी सापासाठी दूध ठेवले जात असे. घरात नागोबाचे चित्र काढून त्याची पूजा केली जात असे. बत्तीस शिराळा येथे जिवंत सापाला पकडून खेळवण्यात येत असे. वन्यजीव संरक्षक कायद्याने याला बंदी घालण्यात आली. तरीही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो. यात अनेकांचा जीव जातो. साप दूध पीत नाही, तरीही हे प्रयत्न करण्यात येतात. नागाची किंवा सापाची पूजा करण्याची परंपरा होती. साप शेतातील उंदराचा त्रास कमी करतात, म्हणून त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असे. साप उपकारकर्ता आहे. त्याला मारू नये म्हणून ही प्रथा. मात्र आता तिचे रूप बदलले आहे. श्रावण महिन्यात आणखी एक सण येतो तो म्हणजे गोकुळाष्टमी. त्यात दहिहंडीचा उत्सव सुरू झाला. दहिहंडी कोण किती थराची रचतो याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. शारीरिक कसरतीचा भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. मात्र डॉल्बी आल्यापासून लोकांनी त्यावर ठेका धरायला सुरुवात केली. डॉल्बीचा दणदणाट लोकांना त्रस्त करत असतो. उत्साह वाढवण्यासाठी संगीत आवश्यक असे आयोजक सांगतात. मात्र डॉल्बीच का? याचे उत्तर कोणीच देत नाही. ढोल ताशाच्या आवाजात खरेतर उत्साह वाढतो. 

पुढचा महत्त्वाचा सण येतो तो गणपतीचा. घरी मातीचा गणपती बनवून, त्याची पूजा करण्यात येत असे. पुढे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. गणपती घरीच बनवणे, जवळपास बंद झाले आहे. काही भागात दीड दिवस, काही भागात पाच तर काही भागात अकरा दिवस गणपती बसवण्यात येतात. गणपतीची रोज पूजा करण्यात येते. पूर्वी गाण्याचे, भजनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असत. अनेक गणेश मंडळे व्याख्यानमालाही आयोजित करत असत. या गणपती पूजनातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य साठते. ते शेतात नेऊन टाकायला हवे. त्यावर पाय पडू नये म्हणून ते नदीत टाकण्यात येत असे. आता वाहणाऱ्या नद्याच राहिलेल्या नाहीत. नद्यांच्या पात्रात अनेक ठिकाणी डबकी आढळतात. मूळात हे निर्माल्य नदीत टाकण्याची गरज नसते. ते शेतात मातीखाली गाडल्यास कूजून त्याचे खत तयार होईल. त्याला कोणाच्या पायाचा स्पर्श होण्याचाही प्रश्न उरणार नाही. गणपतीची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीसची असल्याने त्या पाण्यात विरघळत नाहीत. पाण्याच्या पात्रात त्या अनेक दिवस तशाच राहतात. पात्रात किंवा पाण्याच्या साठ्यात मूर्त्या तशाच राहतात. त्यातच गणपती रंगवण्यासाठी सध्या रसायनापासून बनवलेले रंग वापरण्यात येतात. त्यामुळे गणपती पाण्यात विसर्जीत केल्यानंतर पाणी प्रदूषीत होते. कोल्हापूरकरांचे याबाबत कौतुक करावे तेवढे थोडे! नेत्यांनी गणपती नदीतच विसर्जीत करण्याला पाठिंबा दिलेला असतानाही, लोकांनी मोठ्या प्रमाणात मूर्त्या दान करण्यास सुरुवात केली आहे. सध्या गणेश उत्सवात डॉल्बीच्या होणाऱ्या वापरावर न्यायालयानेही निर्बंध घातले आहेत. तरीही, डॉल्बीचा वापर करण्यात येतो. झुंडीच्यापुढे अनेकदा पोलिसही मजबूर होत, मात्र मागील काही दिवसांपासून पोलिसांनी कडक अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. डॉल्बीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे वृद्धांना, कमकुवत हृदयाच्या लोकांना, रूग्णांना होणारा त्रास मोठा असतो. ध्वनी प्रदूषण आणि पाण्याचे प्रदूषण या गोष्टी टाळून हा उत्सव साजरा करायला हवा. गणपतीला विद्येची, ज्ञानाची देवता म्हणून पूजले जाते. त्यामुळे या काळात व्याख्यानमाला, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. मात्र दसऱ्याच्या सणालाही पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होते. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने आणि चांदी म्हणून शमीची पाने मोठ्यांना देण्याची पद्धत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात घट बसवण्यात येत. यामध्ये धान्य रूजवण्यासाठी ठेवत. दसऱ्यादिवशी डोक्यावरील टोपीमध्ये उगवलेल्या धान्याचे तुरे घालून बालगोपाळ सोने वाटत गावात फिरत. कोणाच्या घरातील धान्य कसे रूजले, यावरून कोणते पीक रब्बी हंगामात पेरावे, याचा ज्येष्ठांना अंदाज येत असे. मोठ्यांना आदर देण्याचे संस्कार व्हावेत, हाही या सोने-चांदी वाटण्याच्या प्रथेमागे हेतू होता. मात्र आज आपट्याची किंवा शमीची पाने काढावीत, इतकी झाडेच राहिलेली नाहीत. सोन्याची म्हणून बहुतांश लोक कांचनवृक्षाची पाने सोने म्हणून देतात. शमीच्या पानासारखी दिसणारी अनेक वृक्षांची पाने निसर्गात आढळतात, मात्र ती चांदी म्हणून दिली जात नाहीत. कांचनच्या पानांची मात्र मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. लोक मोठमोठ्या फांद्या आणून विक्रीला ठेवतात. त्यामुळे झाडांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सोने म्हणून पाने द्यायचीच असली तर, केवळ आपट्याची पाने तोडून द्यायला हवीत. मात्र आज आपट्याची झाडे अभावानेच दिसत आहेत. त्यामुळे आपट्याच्या झाडांची लागवड करून दसरा साजरा करायला हवा. खरे तर आपणास सण साजरा करण्यासाठी ज्या-ज्या झाडांची, त्यांच्या पाना-फुलांची किंवा फळांची गरज पडते अशा सर्व झाडांची लागवड करून ते-ते घटक उपलब्ध होतील याची खात्री करून घ्यायला हवी.

दिवाळीचा सणही सर्वांच्या आनंदाचा. खरीपातील कमी कालावधीची मूग, उडिद, हुलगा, तीळ अशी पिके शेतातून गोठ्यात किंवा घरात आलेली असतात. रब्बीच्या पिकांची पेरणी झालेली असते. या दोन्ही हंगामाच्या मध्ये येणारा काळ दिवाळीचा असायचा. आता पावसाच्या अनियमतेप्रमाणे हेही बदलले आहे. मात्र पूर्वी दोन हंगामाच्यामध्ये येणारा हा काळ काहीसा निवांतपणाचा. मुलांनी मामाच्या गावाला, सासुरवाशीणीनी माहेरी जाण्यासाठी हा कालखंड निश्चित केलेला असावा. दिवाळीच्या सणामध्ये पर्यावरणाला हानी पोहोचवणारी बाब म्हणजे फटाके. पूर्वी टिकल्या घेऊन बालगोपाळ आनंद साजरा करायचे. फटाक्यांचा आवाज गल्लीतच विरत असे. आता मात्र गावापासून कोसभर दूर आवाज सहज पोहोचवणारे फटाके फोडले जातात. मात्र काळाच्या ओघात नवनव्या फटाक्यांचे शोध लागत गेले. आणखी मोठ्या आवाजाचे फटाके लोकांना हवे होते. ते शोधले गेले. आकाशात आतषबाजी करणारे फटाके तयार झाले. फटाक्यांचा आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, रूग्णांना आणि बालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. फटाक्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषणही गंभीर बाब आहे.

दिवाळीमध्ये प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात होतो. फटाक्यांना दमट हवेपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी, आकश कंदील तयार करण्यासाठी, विजेच्या दिव्यांच्या माळा बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दुसरा भाग म्हणजे बहुतांश फटाके तयार करण्यासाठी कागदाचा वापर करण्यात येतो. कागद निर्माण करण्यासाठी झाडांना तोडावे लागते. फटाके फुटल्यानंतर कागदाचे इतके छोटे तुकडे होतात की त्यांचा पुनर्वापर करता येत नाही. फटाक्यांच्या, भेटवस्तूंच्या पॅकिंगसाठी पुठ्ठाही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो. दिवाळीपासून थंडीची सुरुवात होते. बहुतांश पुठ्ठ्यांचा वापर शेकोटीसाठी करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारा ऑक्सिजन झाडेच पुरवतात. या झाडांची कत्तल करूनच पुठ्ठे आणि कागद बनवण्यात येतो. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी, वायू प्रदूषण हा तर महत्त्वाचा भाग आहेच, पण त्यामुळे जल प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

दिवाळीसाठी बनवला जाणारा आकाश कंदिल हा नैसर्गिक संसाधनापासून न बनवता प्लॅस्टिकपासून बनवले जाऊ लागले आहेत. घरावर, कार्यालयावर केली जाणारी रोषणाईसाठी वापरली जाणारी विद्युत कोळसा किंवा इंधन तेल वापरून मिळवली जाते. त्यामुळे प्रदूषण करून मिळवली जाणारी वीज आपण रोषणाईसाठी जाळत असतो. मूळात एवढ्या मोठ्या घराची आवश्यकता असते का? एवढी रोषणाई करून आपण केवळ आपल्या मोठेपणाचे, श्रीमंतीचे दर्शन घडवत असतो. त्यासाठी वापरली जाणारी विद्युत ऊर्जा अन्य उत्पादक कामासाठी वापरली जाऊ शकते. सण साजरा करत असताना संसाधनांचा किमान वापर करण्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

सर्वांच्या आनंदाचा सण असतो तो होळीचा. होळी नंतर येणारी रंगपंचमी सर्वांनाच हवी असते. होळीचा सण साजरा करण्यामागे परस्परांबद्दल मनामध्ये असणारा द्वेष गाडून पुन्हा गावातील सर्वांनी सौहार्दाने राहावे, हे कारण. जपानमध्ये मनातील राग, ताण घालवण्यासाठी होळीशी साधर्म्य असणारी पद्धती आहे. तेथे कार्यालयामध्ये एक खोली राखून ठेवलेली असते. त्यामध्ये सुट्टीच्या तासात कर्मचाऱ्यांनी जाऊन तेथे ठेवलेल्या पुतळ्यावर आपला सर्व राग काढावा आणि मन शांत करून पुन्हा कामाला लागावे, असे अपेक्षीत केले जाते. पूर्वी गावात एका ठिकाणी होळी पेटवली जात असे. होळीची पूजा करत. त्यानंतर होळीभोवती गावातील लोक येउन बोंब मारत. दुसऱ्या दिवशी होळीची राख लोक घेऊन जात. ती राख परसदारी लावावयाच्या वेलीसाठी वापरण्यात येत असे. होळी पेटवलेल्या जागेची स्वच्छता आपोआप होत असे. मात्र आज होळीचा सण कसा साजरा केला जातो? आपल्या सोईसाठी आपण सर्वत्र डांबरी किंवा काँक्रिटचे रस्ते बनवले आहेत. घराच्या आजूबाजूला पायाला माती लागू नये म्हणून पेव्हिंग ब्लॉक बसवून घेतले जातात किंवा कोबा करण्यात येतो. यामुळे आपणाला स्वच्छता मिळते असे वाटते. मात्र, जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण घटते. सध्या होळी रस्त्यावर पेटवली जाते. होळी पेटवल्यानंतर खालच्या रस्त्याचे डांबर जळते. त्यातून कार्बन मोनॉक्साईडसह अनेक घातक वायू वातावरणात पसरतात. होळीची राख उचलण्याचे सौजन्य कोणीही दाखवत नाही. खरं तर होळी पेटवणाऱ्यांची ती नैतिक जबाबदारी असते. मात्र ती राख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सफाई करेपर्यंत तशीच पडलेली असते. रस्ता खराब होतो, तेथे डांबर जळून केवळ खडी राहते. खड्डा पडतो. तो खड्डा लगेच भरून घेतला नाही, तर पावसाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नावाने आपण खडे फोडत बसतो. आज प्रत्येक अपार्टमेंट, सोसायटीमध्ये होळीचा सण साजरा केला जातो. त्यामध्ये कोणाची होळी मोठी याची शर्यत लागते. त्यातून होणारे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, रस्त्याची हानी याचा कोणताही विचार केला जात नाही.

त्याला जोडून येणारा सण हा रंगपंचमी. वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. निसर्गात रंगोत्सव फुललेला असतो. या रंगोत्सावात सहभागी होण्यासाठी हा उत्सव आपण साजरा करतो. यामध्ये निसर्गातील विविध वनस्पतींपासून बनवलेलय रंगांचा वापर केला जात असे. पिवळी माती, पळस फुलांपासून रंग बनवण्यात येत. आज नैसर्गिक रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतलेली आहे. या रंगांना धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात येतो. काही ठिकाणी तर स्थानिक स्वराज्य संस्थांना दोनवेळा पाणी सोडावे लागते. हे रासायनिक रंग अनेकदा डोळे, त्वचा यांना अपाय पोहोचवतात. मात्र आधिक उठावदार रंग खेळण्यासाठी या रंगांचा वापर करण्यात येतो. यातून पाण्याचा अपव्यय होतो. पाणी प्रदूषीत होते. चेहऱ्यांवर आलेल्या गडद रंगांचा गैरफायदा घेणाऱ्या काही समाजकंटकांचा, महिलांना होणारा त्रास हा आणखी वेगळा भाग.

मानवी स्वभाव उत्सवप्रिय आहे. भारत किंवा केवळ भारतीय संस्कृतीच उत्सव साजरे करायला शिकवते असे नाही. जगभर उत्सव साजरे केले जातात. मात्र आपण सारासार विवेक हरवत गेलो आणि सण साजरे करताना मध्येच आलेल्या अनिष्ट प्रथातून निसर्गाचे, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत. गुढी पाडव्यापासून होळीपर्यंत सर्व सण अवश्य साजरे करावेत. या सणांचे प्रयोजन विशिष्ट हेतूने करण्यात आले आहे. ते समजून घेणे आणि त्यानुसार सण साजरे करणे आवश्यक आहे. यातील अनिष्ट प्रथांचा, पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टी तातडीने बंद व्हायला हव्यात. भारतातील एका उद्योगपतीने बांधलेले घर मध्ये चर्चेचा विषय बनले होते. ते दिवाळीमध्ये सजवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात विद्युत वापरली जात असेल, याचा विचार करायला हवा. त्या घराला व्यवस्थीत ठेवण्यासाठी लागणारे पाणी आणि ऊर्जेचाही विचार करायला हवा. झाडांची लागवड करण्याची गरज असलेल्या काळात फांद्या गरजेपेक्षा जास्त तोडणे, झाडांचे नुकसान करणे टाळायला हवे. रासायनिक रंगांचा वापर करून जल प्रदूषण करणे, टाळायला हवे. गणपतीच्या मूर्तीची उंची हाही चिंतेचा विषय आहे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, प्रकाशाचे प्रदूषण, जल प्रदूषण आणि पर्यायाने जमिनीचे प्रदूषण करत आपण पुढच्या पिढीला आणखी विनाशाच्या जवळ नेत आहोत याचे भान ठेवायला हवे. आशेचा किरण म्हणजे अनेक सुशिक्षित घरात फटाक्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. गणेशोत्सवातही समाज प्रबोधनाचे कार्य व्हायला हवे. पूर्वी सुरू असलेल्या व्याख्यानमाला निदान ऑनलाईन स्वरूपात सुरू व्हायला हव्यात. शेवटी नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गातील संसाधने आपल्या बापजाद्यांची जहागिरी नाही, तर ती पुढच्या पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी आहे.’            

-०-

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद!

 

दत्तोबा ऊर्फ दत्तात्र्यय इश्वरराव भोसले! छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा निजामाशी लढताना वापरत राहिले. मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर राजकारणाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हापुन्हा तोच प्रयत्न करण्यापेक्षा समाजसुधारणा, आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. समाजाला विवेकवादाची, तारतम्याची शिकवण देत राहिले. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची म्हणावी, तशी नोंद घेण्यात आली नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांत त्यांच्या कार्यावर संशोधन होणे आणि त्यांचे कर्तृत्व आणि विचार समाजासमोर आणणे काळाची गरज आहे. त्यांच्या विवेकी विचारांचा घेतलेला मागोवा ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ वार्षिक विशेषांकात प्रसिद्ध झाला… तो लेख आपल्यासाठी…

_______________________________________________________

लहानपणी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये एक लेख आला होता. त्यामध्ये आमच्या गावाची दोन नावे दिली होती. शिंदे चिंचोली आणि कँप चिंचोली. गावात बहुतांश लोकांचे म्हणजे ९५ टक्के लोकांचे आडनाव शिंदे असल्याने, शिंदे चिंचोली हे नाव आले असावे, हे बालवयातही लक्षात आले. मात्र कँप चिंचोली या नावाचे गुढ तसेच राहिले. कँप चिंचोली नावाबाबत सुट्टीत गावी आल्यानंतर वडिलांना विचारले. त्यांनी रझाकार, निजाम त्यांचे अत्याचार आणि त्याविरूद्ध लढणारे सैनिक याबाबत बरीच माहिती दिली. निजाम, रझाकाराविरूद्ध लढणाऱ्या सैनिकांचा कँप चिंचोली येथे होता, त्यामुळे गावाची ओळख कँप चिंचोली असल्याचे सांगितले. हा संदर्भ वगळता इतर सर्व तपशील, बरीचशी माहिती विस्मरणात गेली. पुढे शिक्षण, नोकरीच्या व्यापात हा विषय बाजूला पडला. एक दिवस मराठीचे ज्येष्ठ समिक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी या विषयावर साठलेली धूळ बाजूला केली. मी माझ्या गावाबाबत लिहावे, असा आग्रह धरला. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने केवळ ऐकीव माहितीवर लेखन करायला मन तयार होत नव्हते. म्हणून काही वर्षांपासून मी गावाचा इतिहास शोधत आहे. त्यातून उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी महमंद हैदर यांचे ‘ऑक्टोबर कुप’ नावाचे आत्मचरित्र हाती आले. त्यामध्ये चिंचोली गावाचा उल्लेख आलेला प्रथम सापडला. आणखी काही संदर्भांतून काही दिवस का होईना चिंचोली गाव ‘मुक्तापूर स्वराज्य सरकार’ची राजधानी होते, हे समजले. अजूनही गावाचा इतिहास शोधतो आहे. या शोधयात्रेत मी रेंगाळलो ते दत्तोबा भोसले या स्वातंत्र्य सैनिकाजवळ!

दत्तोबा भोसले 
        चिंचोली गावाला राजधानीचा दर्जा देण्यात आणि टिकवून ठेवण्यात दत्तोबा भोसले यांचे कार्यकर्तृत्व मोठे. त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि निजाम प्रशासनात निर्माण केलेली दहशत फार मोठी होती. तरीही स्वातंत्र्याच्या इतिहासातच नाही, तर मराठवाडा मुक्तीसंग्रामातही हे नाव फारसे आढळत नाही. दत्तोबांचा निजामशाहीशी लढा, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू असला, तरी ते त्यापूर्वी आणि नंतर आदर्श विद्यार्थी आणि सुजाण नागरिक बनून जगले. त्यांचे त्या काळातील विचार मनाला भारावून टाकणारे आणि त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारे आहेत आणि त्यांचे आचरणही तसेच राहिले. त्यामुळेच त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण झाले आणि गावापेक्षा दत्तोबांच्या शोधात गुंतलो.

ईश्वरराव लिंबाजी भोसले हे मातोळा (ता. औसा जि. लातूर) येथे शेती करत. त्यांचे दोन विवाह झाले होते. त्यातील लक्ष्मीबाई यांच्यापोटी दोन बहिणींच्यानंतर दत्तोबा उर्फ दत्तात्रय यांचा १९ नोव्हेंबर १९१८ रोजी जन्म झाला. दत्तोबांना योग्य वयात गावातील शाळेत घालण्यात आले. भारताचा बाकी भाग इंग्रजांच्या ताब्यात होता, तर या भागात त्यावेळी निजामाची संस्थानी राजवट होती. इतर भागात मातृभाषेतून शिक्षण घेता येत असले, तरी निजामाच्या राज्यात तिसरीच्या पुढे ऊर्दूतून शिक्षण घ्यावे लागत असे. दत्तोबांचे प्राथमिक शिक्षण संपताच ते १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत आले. गावापासून हिप्परग्याला ते चालत जात असत. पिळदार देहयष्टी, क्रीडा आणि अभ्यासातील नैपुण्याने त्यांनी तेथील शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी स्वामी रामानंद तीर्थ हे त्या शाळेचे संस्थापक - मुख्याध्यापक होते. राष्ट्रीय विचाराने प्रेरीत विद्यार्थी घडावेत या हेतुनेच या शाळेची स्थापना करण्यात आली होती. ते या शाळेचे विद्यार्थी असताना वि.स. खांडेकर यांनी १९३५ मध्ये या शाळेस भेट दिली होती. कदाचित तेथून ते खांडेकर यांच्या लेखनाच्या प्रभावाखाली आले असावेत.

निजाम संस्थानातील शाळेत त्यांना शिक्षण घ्यावयाचे नव्हते. त्यामुळे त्यांनी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेत प्रवेश घेतला आणि तेथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांना शिक्षकाची किंवा शासकीय नोकरी सहज मिळू शकली असती. मात्र दत्तोबांना पुढे शिकायचे होते. पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट बडोदा गाठले. हिप्परग्याच्या शाळेतील मुलांना पुढे शिकायचे असेल तर बडोदा येथे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत असे. ते बडोद्याला शिक्षण घेत असताना त्यांची देहयष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पाहून प्रा. राजरत्न माणिकराव (त्यांचे मूळ नाव गजानन ताम्हणकर. हे मूळचे पुण्याचे.  घराणे मूळ ताम्हणे, जिल्हा सातारा. राजरत्न माणिकराव ही महाराजानी त्यांना दिलेली उपाधी.) यांनी त्यांना ‘तुम्ही हिप्परग्याच्या शाळेतून आलास का?’ असे विचारले. दत्तोबांना राजरत्न यांनी आपल्या आखाड्यातच ठेवून घेतले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड स्वातंत्र्याची आस असलेले अशा युवकांना पूर्ण अर्थसहाय्य करत. दत्तोबा त्यांचे आवडते विद्यार्थी बनले. तालमीत कसून मेहनत करून घेण्यात येत होती. हजार जोर आणि दोन हजार बैठका करवून घेण्यात येत. अर्थातच कसून मेहनतीच्या जोरावर दत्तोबा मिडलवेट गटात राष्ट्रीय विजेते बनले. दत्तोबा गायकवाड घराण्याचे इतके आवडते बनले की राजचित्रकार घोरपडे यांच्याकडून दत्तोबांचे चित्र काढून घेतले. त्यांचे शिक्षण पूर्ण होत झाले. मात्र ते राजरत्न यांच्या आखाड्यातच राहिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशभरात कोठेही त्यांची प्रथम श्रेणी आधिकारी म्हणून नियुक्ती झाली असती!

त्याचवेळी मराठवाड्यात, निजामाच्या राज्यात सर्वत्र असंतोषाचे वारे वेगाने वाहत होते. निजामाच्या राज्यात तिहेरी अंमल सुरू होता. इंग्रजाचे राज्य अखंड भारतावर होते. निजामाच्या राज्याचाही त्यात समावेश होता. निजाम संस्थानिक होता. त्याला मर्यादित स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे इंग्रजाची प्रथम आणि मर्यादित अंकुश होता. निजामाचे थेट राज्य आणि अंकुश होता. निजामाच्या पोलीस दलाची हुकमत होती. महसूल गोळा करण्यापासून संरक्षणापर्यंत सर्व बाबी निजामाच्या हाती होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागताच मूळात धर्मांध आणि क्रूर असणाऱ्या निजामांने आपले वागणे कठारे बनवले. त्यातून ८५ टक्के हिंदूना पिटाहण्याची किंवा त्यांचे धर्मांतर करायची, इच्छा व्यक्त करू लागला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद राज्य काँग्रेसची स्थापना केली. मात्र लगेच निजामाने बंदी घातली. अशा निजामाची दुसरी हुकमत. त्याने आपले राज्य कब्जात राहावे. स्वतंत्र होऊ नये, म्हणून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी रझाकार संघटनेसारख्या संघटनांना पाठबळ दिले. लातूरमध्ये वकिली करणाऱ्या कासीम रझवी याने निजामाला पाठिंबा देण्यासाठी रझाकार ही संघटना निर्माण केली होती. सर्वत्र हैदोस घालणाऱ्या या रझाकारांची तिसरी हुकमत. मात्र निजामी सत्तेचे पोलीस आणि रझाकार यांनी जनतेला सळो की पळो करून सोडले होते. महिलांच्या इज्जतीला हात घालणे आणि संपत्तीची लूट करणे हे नित्याचे झाले. हे सारे दत्तोबांना कळत होते. याचा अतिरेक झाला आणि दत्तोबा यांनी राजरत्न यांच्याकडे मातृभूमीची, तेथील जनतेची या अत्याचारातून सुटका करण्यासाठी जाऊ देण्याची विनंती केली. राजरत्न यांनी त्यांना परवानगी तर दिलीच, पण पुढे हरप्रकारे मदतही केली. दत्तोबा तेथून मातोळ्याला आले. काही दिवसानंतर त्यांनी सातारला कूच केले.

त्यावेळी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा सर्वत्र बोलबाला होता. क्रांतीसिंह आणि दत्तोबा यांची राजारामबापू पाटील यांनी भेट घालून दिली. त्यांनी क्रांतीसिंह यांच्याकडून, तशाच प्रकारचे कार्य करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतली आणि निजामाविरूद्ध लढणाऱ्या कँपमध्ये सहभागी झाले. त्यांचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरले आणि प्रमुख लढवय्या अशी त्यांची ख्याती उस्मानाबाद, लातूर या भागात पसरली. क्रांतीसिंह नाना पाटील, जी.डी. बापू लाड यांनीही या भागाला भेटी देऊन मार्गदर्शन केल्याच्या नोंदी मिळतात. कुंडल येथील प्रतिसरकार जसे होते, तसेच निजामाच्या तावडीतून मुक्त केलेल्या ६५ गावांचे त्यांनी ‘मुक्तीपूर स्वराज्य’ स्थापन केले. त्याची राजधानी किंवा प्रमुख ठिकाण म्हणून हालचालीसाठी सोईचे; पण शत्रूला येण्यासाठी अडचणीचे असणारे चिंचोली गाव त्यांनी निवडले असावे. येथे एकूण सातशे सैनिकांचा कँप होता. त्यांची खलबताची जागा तेथील निळकंठेश्वर मंदिर बनले. त्यांनी जवळा, गौडगाव, तडवळे, गौर, वाघोली, मोहा, खामसवाडी, धानोरा इत्यादी गावात कँपची निर्मिती केली किंवा कँपमधील कारवायांना गती दिली. धानोऱ्यात रझाकारांचा म्होरक्या गुंडू पाशाची हत्या, अपसिंगा हल्ला, सेलूच्या खजिन्याची लूट, नाईचाकूर पोलिस स्टेशनवरील हल्ला, देवताळ्यात दीडशे रझाकारांचा खात्मा अशा अनेक पराक्रमी घटनांत दत्तोबांचे शौर्य दिसून येते.

उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी महमंद हैदर यांनी दत्तोबांचे ‘मातोळा डेव्हील ऑन हॉर्सबॅक’ असे वर्णन केले आहे. दत्तोबा पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येत आणि क्षणात नजरेसमोरून पसार होत. त्यांनी जिल्हाधिकारी हैदरच्या गाडीवर बाँब फेकला होता. हैदर यांना त्या भागात सळो की पळो करून सोडले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा महिन्यांनी मराठवाडा ‘हैद्राबाद पोलिस ॲक्शन’च्या कारवाईनंतर भारतात सामील झाला आणि सर्वच स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनातील दुसरे पर्व सुरू झाले. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाडा मुक्ती संग्रामात कार्यरत असणाऱ्या या योद्ध्यांची ओढ शेतकरी कामगार पक्षाकडे होती. मात्र डावी विचारसरणी असूनही घरात सत्यनारायण घालणाऱ्या पुढाऱ्यांसोबत काम करणे शक्य नाही, हे ओळखून दत्तोबांनी शेकापपासून फारकत घेतली. नंतरच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून उभे राहिले. मात्र अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या या लढवय्याला त्याच्या काळाच्या पुढे असणाऱ्या विचारांमुळे पराभूत व्हावे लागले. ते पंचायत समितीच्या निवडणुकीलाही उभा राहिले आणि पडले. त्यानंतर त्यांनी राजकारणाचा नाद सोडून घराच्या आणि गावाच्या विकासावर केंद्रित केले. १९५२ साली त्यांनी विवाह केला. विवाहात कोणताही मोठेपणा नव्हता. अत्यंत साधेपणाने विवाह पार पडला. समरप्रसंगी सहाय्य करणाऱ्या कुटुंबातील मुलगीच पत्नी म्हणून निवडली. त्यांच्यावर बंगालच्या क्रांतीकारकांचा, आझाद हिंद सेनेचा आणि त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव असावा. युद्ध काळात ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे वेश परिधान करत. त्यांनी आपल्या सर्व मुलांची नावे बंगाली पद्धतीची विवेकानंद, अरविंद, सच्चिदानंद, तन्मयानंद, निर्मला, कुमुदिनी, कादंबरी, तनुजा अशी ठेवली. याखेरीज छ. शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, नेपोलियन बोनापार्ट, चे गवेरा, यांचाही प्रभाव होता. शिक्षण घेत असताना त्यांनी भरपूर साहित्य वाचले असावे. त्यांच्यावर अनेक इंग्रजी साहित्यिकांचाही प्रभाव होता. वर्डस्वर्थच्या कविता तोंडपाठ होत्या. राजकारणापासून दूर गेल्यानंतर त्यांनी मुले, कुटुंब आणि ग्रामविकासावर लक्ष केंद्रीत केले. त्यांचे दिनांक २ जानेवारी १९७४ रोजी निधन झाले.

दत्तोबा भोसले 
         शिक्षणातून आणि चिंतनातून दत्तोबांचा दृष्टिकोन विशाल आणि विवेकी बनला होता. त्यांना पहिले अपत्य कन्यारत्नाच्या रूपात प्राप्त झाले. आजही भारतातील अनेक राज्यांत दर हजारी मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण कमी आहे. तसेच अनेक कळ्या जन्मापूर्वीच खुडल्या जात असल्याच्या बातम्या येतात. या पार्श्वभूमीवर दत्तोबांनी १९५२ मध्ये केलेली नोंद खूप महत्त्वाची वाटते. ‘त्याच रोजीं पिढा नाहीशी झाली. सुदैवानं मुलगी झाली व आनंदी आनंद झाला’ अशी नोंद दत्तोबा करतात. मुलीच्या जन्माबद्दल १९५२ मध्ये आनंद व्यक्त करणारे दत्तोबा त्यामुळेच वेगळे आणि महत्त्वाचे ठरतात. दत्तोबांना स्त्री-पुरूष विषमता मान्य नव्हती. समाजातील जात, धर्म, पंथ, भाषा भेदामुळे येणारी विषमता त्यांना मान्य नव्हती. स्त्री-पुरूष भेदाभेदावरून त्यांनी ‘समाजात सर्वत्र विषमता असताना स्त्री-पुरूषातच तेवढी समता कुठून येणार?’ असा थेट प्रश्न विचारतात. ते पुढे लिहितात, ‘आडातच नाही तर पोहोऱ्यात कोठून येणार? निर्दयी रूढीच्या बंदिस्त तुरूंगातच समाजाचे शरीर कुजत आहे, आत्मा गंजत आहे.’ देवताळा येथे दीडशे रझाकारांना उभे कापून काढतानाही त्यांच्या कुटुंबियांना दत्तोबांनी सुखरूप आणि सन्मानाने त्यांच्या मूळ गावी पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा जसा त्यांनी घेतला, तसाच महिला आणि मुलांविषयी सहृदयी दृष्टिकोनही घेतला असल्याचे दिसून येते.

त्यांचा भूताखेतावर, अंधश्रद्धावर विश्वास नव्हता. भावकीतील श्रीपतराव भोसले नावाच्या भावकीतील व्यक्तीने आत्महत्या केली. दत्तोबांनी आडनाव भोसले असूनही आत्महत्या केल्याबद्दल त्याला दुषणे दिली. नंतर मोठ्या मुलाला म्हणजे विवेकानंद याला घेऊन त्या ठिकाणाकडे निघाले. त्यावेळी पत्नीने विरोध केला. प्रेत पाहून मूल घाबरेल असे पत्नीचे म्हणणे होते. त्यावर दत्तोबांनी आपण त्याची भिती घालवण्यासाठीच घेऊन जात आहोत असे सांगितले. एवढेच नाही तर तेथे गेल्यावर प्रेताला आवर्जून स्पर्श करायला लावला. प्रेताच्या मुठी सोडवण्याचे काम सांगितले. आपोआप मुलाच्या मनातील भूताखेताची, जादू-टोण्याची भिती दूर झाली. महात्मा फुले यांच्या ‘शंभर व्याख्यानांपेक्षा, एक कृती श्रेष्ठ’ या वचनाचा ते नेहमी उल्लेख करत. या वचनानुसारच त्यांचे वर्तनही होते. ते अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जात, तेथील मंदिरे पाहात, बांधकामाचे निरीक्षण करत. मात्र मंदिरात जाऊन मूर्तीपुढे हात जोडत नसत. याचे कारण सांगताना ते म्हणत, ‘तीर्थाच्या ठिकाणी धोंडा आणि पाणीच असते, खरा देव माणसात असतो, आणि हे मी नाही तुकाराम महाराज सांगतात. ते म्हणतात, तिर्थी धोंडा पाणी l देंव रोकडा सज्जनी ll’

दत्तोबांचे विचार काळाच्या फार पुढे होते. ते विचाराप्रमाणे आचारही ठेवत. जात-धर्मभेद त्यांना मान्य नव्हता. एकदा जवळे दुमाला येथे पाहुण्यांच्या घरी गेले होते. तेथे एक भिकारीण भिक्षा मागण्यासाठी आली. त्यांनी तिच्याशी संवाद सुरू केला. घरात बसायला लावले. तिचा विश्वास संपादन करून तिच्या झोळीतील एक करंजी उचलून खाल्ली. यजमान गृहिणिने त्या बाईला दोन ताजी धपाटी, लाडू आणि करंज्या दिल्या. दत्तोबाच्या करंजी खाण्याच्या कृतीने त्या बाईच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य ओसंडून वाहत होते. दत्तोबा केवळ हसले आणि म्हणले ‘खरा देव इथे आहे’. त्या बाईची जात कोणती? धर्म कोणता? याच्याशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. त्यांच्या दृष्टीने ‘मानव हाच खरा धर्म’ आणि या नात्यांने ते समस्त मानव जातीशी जोडले जात होते. गावात ज्यांना अस्पृश्य म्हणून वेगळी वागणूक दिली जात असे, त्या समाजातील लोकांना बोलावून ते त्यांच्यासमवेत जेवायला बसत. स्वत:च्या हातांनी ताक-भाकरी कुस्करून देत. आपल्या रोजनिशीतील एका पानावर ते लिहितात, ‘जगातील श्रमणारे किसान-कामगारांची भूक शांत होईल, तेव्हाच जगात शांतता निर्माण होईल’.

इतरांच्या श्रद्धेबद्दल ते अडथळा बनले नाहीत. शिवभक्त पत्नीला घराच्याबाहेर महादेवाचे मंदिर बांधून दिले आणि ‘तिथे तूझी पुजा कर, मात्र घरात पूजा नको’, असा आग्रह धरला. पत्नीनेही तो नियम पाळला. यातून ते इतरांच्या मनाचा, भावनांचा आणि श्रद्धेचा आदर करत, हेच दिसून येते. ते स्वत: पूर्णत: नास्तिक नव्हते. त्यांच्यासाठी देव होता, पण तो सज्जनांमध्ये पाहात असत. त्यांच्या दृष्टीने देवळात जाऊन देव भेटत नाही. दीनदुबळ्यांची सेवा केल्यास त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदातून देवाचे दर्शन होते. लोक कर्ज काढून देव-देव करत बसतात, हे त्यांना पटत नव्हते. रोजनिशीत यासंर्भात केलेली नोंद त्यांचे विचार स्पष्ट करते. ते लिहितात, ‘पंढरीच्या आषाढी कार्तिकेच्या यात्रांना हजारो वारकरी दरवर्षी जातात. अगदी कर्ज काढून जातात. त्या कर्जाचे जब्बर व्याज भरण्याचा प्रसंग येतो तेव्हा दामाजी पंतासाठी विठू महार होवून भल्या मोठ्या रकमेची भरपाई करणारा विठ्ठल एकाच्याही मदतीला धावून येत नाही! देवभक्ती हा एक दुबळ्या मनाचा दु:ख विसरण्याचा मार्ग आहे. पण कुठलीही दु:खे विसरून दूर होत नाहीत, ती झगडून प्रसंगी लढून दूर करावी लागतात.’ ‘दे रे हरी, खाटल्यावरी’ असे तर नाहीच. तुम्ही भक्ती केली तरी देव एखाद्या दामाजीच्याच उपयोगाला येतो, सर्वांच्या नाही. ते एवढे सांगून थांबत नाहीत, तर आपल्या दु:खाचे निरसन करण्यासाठी स्वत:च प्रयत्न करायला हवेत, असेही सांगतात. आणखी एका नोंदीमध्ये ते म्हणतात, ‘जगात एकदम यश कोणाला मिळाले आहे. आजच्या अपयशातून भावी यश फुलेल. अशा अनुभवातूनच जग पुढें जात असते.’ बुवाबाजीवरही त्यांनी सडकून टिका केलेल्या नोंदी आढळून येतात. त्यांनी घरात सत्यनारायणाची पूजाच नव्हे; तर कसलीच पूजा केली नाही.

दत्तोबा भोसले यांच्या डायरीतील पाने 
 आजही टिटवी ओरडली की माणसाच्या मनात काहूर उठते. अविचाराने मनात थैमान सुरू होते. जवळच्या कोणाच्यातरी जाण्याची शंका यायला लागते. दत्तोबाना टिटवीचे ओरडणे हा तिचा निसर्गधर्म वाटतो. त्यात शुभाशुभ काहीच नसते. आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, ‘प्रत्येक रूढी काही कारणाने उत्पन्न होते. पण ते कारण नाहीसे झाल्यावर ती कायम ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. देवाच्या भंगून गेलेल्या मूर्तीची कुणी पूजा करत नाही.’ हे विधान करताना ते देवावर विश्वास ठेवायला सांगत नाहीत, तर त्याचा उपयोग एक दृष्टांत म्हणून करतात.  

देवाधर्मावर खर्च करण्यापेक्षा स्वत:च्या शरीराकडे लक्ष द्या, असे दत्तोबांचे म्हणणे होते. ‘शरीर सुंदर व पुष्ट असावे, हाच खरा धर्म आहे. शरीर जर चांगले डौलदार, पीळदार असेल तर तो माणूस जगात राजा आहे; भाग्यवान तोच आहे. दैव त्या माणसावर आपोआप झडप घालतो. म्हणून जगांत प्रथम शरीर कमविले पाहिजे व तद्नंतर ते उत्तम रीतीने सांभाळले पाहिजे.’ त्यांच्यादृष्टिने शरीर उत्तम सांभाळणे हाच खरा धर्म आहे. याहीपुढे ते श्रमप्रतिष्ठेला किती महत्त्व देत याबाबत त्यांचा मुलगा विवेक यांनी एक आठवण सांगितली आहे. दत्तोबा आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुट्टीत गावाकडे आल्यावर जनावरे राखायला पाठवत असत. ‘कॉलेजला शिकतो आणि गुरे राखतो,’ यावर गावकरी टोमणे मारत. मुले नाराज झाली. यावर दत्तोबांनी त्यांना सांगितले, ‘त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. जे नावं ठेवतील त्यांना कामाचे महत्त्व कळत नाही मग त्यांची कुणाला चिंता? जे चांगले म्हणतात, ते सोबतीच्या लायकीचे. कामाची पुजा व्हायला पाहीजे. त्यात कमीपणा नाही. कामावरून वर्गीकरण न करता त्याची माणुसकी, विचार-आचार पाहून त्याची योग्यता ओळखावी.’   

दत्तोबा आयुष्यात चूकुनही कधी निराश झाले असतील, असे वाटत नाही. एखादा कठीण प्रसंग आला की लोक गर्भगळीत होतात. आपले कसे होणार कुटुंबाचे कसे होणार, हे विचार मनात आणून निराशेच्या गर्तेत जातात. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र अशा प्रसंगांना ते कधीच डगमगले नाहीत. प्रत्येक अडचणीवर मात करत ते पुढे चालत राहिले. निजामासारखा प्रबळ शत्रू असताना, एकट्या मराठवाड्यात रझवीचे अडीच लाख रझाकार असताना, ते लढले. दत्तोबांवर लाखाचे बक्षीस ठेवले तरी ते डगमगले नाहीत. याचे कारण त्यांच्या एका रोजनिशीतील पानात मिळते, ‘ज्यावेळी माणूस कोशीस करून थकतो तेव्हा त्याचा प्रयत्न सफल होणार, हे खास. अत्यंत उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, अत्यंत हिवाळा होऊ लागला की उन्हाळा जवळ आला समजावे. अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधारातच विजेची कोर दिसते.’ कितीही संकट आले तरी अंतिम यश प्रामाणिक प्रयत्न करणारासच मिळते, असा त्यांना विश्वास होता.

असे हे दत्तोबा ऊर्फ दत्तात्र्यय इश्वरराव भोसले! छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा निजामाशी लढताना वापरत राहिले. निजामाच्या ताब्यातून मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर राजकारणाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हापुन्हा तोच प्रयत्न करण्यापेक्षा समाजसुधारणा, आरोग्य आणि शिक्षणावर लक्ष करून जीवन जगत राहिले. समाजाला विवेकवादाची, तारतम्याची शिकवण देत राहिले. त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात गाजवलेल्या शौर्य आणि पराक्रमाची अजूनही म्हणावी तशी नोंद घेण्यात आली नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षांत त्यांच्या कार्यावर संशोधन होणे आणि त्यांचे कर्तृत्व आणि विचार समाजासमोर आणणे काळाची गरज आहे. त्याची समाजाला आज गरज आहे. तोच त्यांच्या कार्याचा खरा गौरव होईल!

-०-

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

पर्यावरण आणि नेतृत्व

 

नेतृत्वाने जनतेमध्ये शहाणपण आणायचे असते. लोकानुनय करणारे नेतृत्व दिर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहात नाही. तर जनतेला शहाणपण देणारे नेतृत्व लोकोत्तर ठरते, हे जगभरातील नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. तरच ही वसुंधरा वाचू शकेल. केवळ परिषदामधील भाषणे उपयोगाची नाहीत तर सर्वच राष्ट्रानी पर्यावरण सर्वांसाठी सुखकर राहावे यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. इंद्रधनुष्य २०२२ या दिवाळी अंकात ‘पर्यावरण आणि नेतृत्व’ हा प्रसिद्ध झालेला लेख… आपल्यासाठी

___________________________________________________

‘काय झाडी… काय डोंगार… … समंद कसं, ओक्केमंदी हाय’ या वाक्याने सगळ्यांना वेड लावले. सोलापूरी मराठीतील या वाक्याचे मराठी न येणाऱ्या लोकांनाही लागीर झाले. हे वाक्य सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे. वाक्य गाजू लागले, त्या वेळी महाराष्ट्रात राजकीय तणाव होता. जनसामान्यांच्या मनातील तणाव या वाक्याने हलका केला. त्या वाक्यातील इतर बाबींपेक्षा एका वेगळ्या कारणासाठी हे वाक्य महत्त्वाचे वाटले. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या झाडांची कत्तल होत असताना, जंगल आच्छादित जमीन उघडी होत असताना, डोंगरच्या डोंगर क्रशरची दगडांची भूक भागवण्यासाठी भुईसपाट होत असताना, राजकीय तणावात महाराष्ट्राला ढकलत, राज्यातील आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर, तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडले. तिथले डोंगर आणि त्यावरील वृक्षराजीच्या प्रेमात पडले. त्यांना तेथील वृक्षराजीचे अप्रूप वाटले आणि रांगड्या बापूंच्या मनातून हे वाक्य आले. ती निखळ भावना होती. त्यांना झाडांचे आणि निसर्गाचे कौतुक वाटले, तेच त्यांनी व्यक्त केले आणि ते सर्वत्र पोहोचले. वाक्यासोबत बापूंनाही प्रसिद्धी लाभली.

खरे तर, जग आज एका मोठ्या चिंतेत आहे. ती समस्या मानवानेच निर्माण केली आहे. ती निर्माण होण्यामागे निसर्गातील घटलेले जंगलांचे प्रमाण हेही मुख्य कारण आहे. मानवाने निसर्गाचा एक घटक म्हणून वावरायला सुरुवात केली. पुढे बुद्धीच्या जोरावर आपले जगणे किमान कष्टाचे कसे होईल, याचा ध्यास घेतला. तत्पूर्वी तो स्वत:ला निसर्गाचा घटक मानत असे. मात्र जीवन सुखासीन बनवण्याचा मागे धावताना तो स्वत:ला निसर्गाचा घटक न मानता निसर्गाचा, या वसुंधरेचा स्वामी मानू लागला. यातून निसर्गातील संसाधने स्वत:ला पाहिजे तशी वापरू लागला. तेथूनच समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला शेती, शेतीसाठी जमीन मिळावी म्हणून, निवाऱ्याच्या निर्मितीसाठी त्यांने जंगलांवर घाव घालायला सुरुवात केली. पहिला घाव घातल्यापासून आजवर अव्याहतपणे घाव घालणे सुरूच आहे. निसर्गातील संसाधने केवळ मानवासाठी नाही, तर सर्वच जीवांसाठी आहेत हा विचारच त्याने सोडून दिला. निसर्ग ओरबडताना त्याचा इतर जीवसृष्टीवर काय परिणाम होतो, याचा विचार कधीच केला नाही. दुसरीकडे त्याला सुख जसे लाभू लागले, तसे त्यांने आपले जीवन निरोगी व्हावे, म्हणूनही प्रयत्न सुरू केले. परिणामी, लोकसंख्येचा विस्फोट झाला. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी पुन्हा जंगलतोड आणि निसर्गाची हानी सुरू झाली. असे हजारो वर्ष मानव करत राहिला. गावे वसवली, उद्योग उभारले. निसर्गाचा कोणताही विचार न करता!

सतराव्या शतकापर्यंत मानव प्रगती साधतानाही थोडाफार का होईना, निसर्गाचा स्नेहबंध जपत होता. मात्र जसजशी वैज्ञानिक क्रांती होत गेली. तंत्रज्ञानाची निर्मिती होऊ लागली, तसतशी मानवाला आणखी वेगाने प्रगती करण्याची इच्छा निर्माण झाली. जीवनमान सुधारायचे तर पैसा हवा. जास्तीत जास्त श्रीमंत होण्यासाठी उद्योग उभारणे, उत्पादनाची विक्री करणे, असे प्रयत्न सुरू झाले. संपन्नता असलेल्या राज्यांवर कब्जा मिळवण्यासाठी युद्ध करणे नित्याचे झाले. एखाद्याने युद्ध टाळले, तरी समोरचा शांत न राहिल्याने युद्धे अपरिहार्य ठरू लागली. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध जगाने पाहिले. छोटी-छोटी युद्धे तर अगणित. हे सर्व गतीने होऊ लागले कारण प्रगत शस्त्रे आणि अस्त्रे निर्माण झाली होती. यातील हिरोशिमा आणि नागासाकीचा भयंकर अनुभव जगाने घेतला. हे दोन्ही आघात मोठे होते. त्या आघातांनी मानवी अस्तित्वाचे मोठे नुकसान केले. मात्र त्यापेक्षाही मोठा बाँब, संपूर्ण जगाला विळख्यात घेत असताना जग आणि जागतिक नेतृत्वाने मात्र त्याकडे दुर्लक्षच केले. लक्षात येण्यापूर्वी हा विळखा घट्ट पडत गेला.

त्यातच एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचा मापदंड म्हणून प्रति माणसी ऊर्जेचा वापर गृहीत धरण्यात येऊ लागले. आपण ज्याला विकास म्हणतो, ती वसुंधरेच्या विनाशाची नांदी आहे, याकडे मानवाचे अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लक्षच नव्हते. ऊर्जा मिळवण्यासाठी इंधनाचा वापर अनिवार्य असल्याने प्रथम लाकूड, नंतर दगडी कोळसा आणि खनिज तेलाचा वापर सुरू झाला. यातून कार्बनी संयुगांचे वातावरणात उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत होते. सीएफसी किंवा हरित वायूचा शीतयंत्रामध्ये होत असणाऱ्या वापरातून तर ओझोन थराला धक्का पोहोचला, तरीही मानवाने या बाबीकडे लक्ष दिले नाही. वातावरणात असणारी कार्बनी संयुगे सौर ऊर्जा शोषत पृथ्वीवरील तापमान वाढवत राहिले. या तापमानवाढीचा तोटा सर्वच राष्ट्रांना बसत आहे, हे उमजूनही दुर्दैवाने आजही जगातील बहुतांश राष्ट्रे वागत नाहीत.  

जॉन फार्किन आणि मर्श या दोन संशोधकांनी १९०७ मध्ये ‘माणूस आणि निसर्ग’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी तत्कालिन परिस्थिती आणि मानवाकडून होत असलेली निसर्गाची हानी यावर भाष्य केले. मानवाने या प्रश्नाकडे लक्ष दिलेच नाही. पुढे खऱ्या अर्थाने याबाबत चर्चा सुरू झाली १९६० पासून! इन्व्हायरमेंट हा शब्द ‘इन्हायर सराउंडिंग ऑफ इनसर्कल’ या फ्रेंच शब्दापासून बनवण्यात आणि वापरण्यास सुरुवात झाली. याचा नेमका अर्थ सजीव-निर्जीव यांच्यातील क्रिया-प्रतिक्रिया आणि आंतरक्रिया या सर्वांमधून सजीवाभोवती साकारलेली स्थिती होय. मराठी आणि हिंदीमध्ये यासाठी पर्यावरण हा शब्द वापरण्यात येतो. परि म्हणजे अवतीभवती, भवताल किंवा सभोवताल. तर आवरण म्हणजे सभोवताल ज्याने व्यापले आहे ते. यावेळी मात्र निदान संशोधकांना परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळे लगेच हा अभ्यासाचा स्वतंत्र विषय बनला. त्यांनतर हळूहळू जगभरातील संशोधकांचे या विषयाकडे लक्ष जाऊ लागले. ती जगासमोर मांडण्याचे प्रयत्न सुरू केले. पैशाच्या आणि ऐशोआरामाच्या कह्यात गेलेल्या देशोदेशीच्या नेतृत्वांनी मात्र हे फारसे गांभिर्यांने घेतलेच नाही. याचे गांभिर्य युनोने ओळखून १९७० मध्ये पॅरिसमध्ये पहिली जागतिक परिषद भरवली. पुढे दोन वर्षांनंतर स्टॉकहोम येथे भरलेल्या परिषदेत पर्यावरण संरक्षणाबद्दल आणि हानी टाळण्याबद्दल विचारविमर्ष सुरू झाला. तसेच या पुढे ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. १९७५ च्या बेलग्रेड परिषदेत कृती आराखडा मंजूर करण्यात आला. यानंतर नियमितपणे आंतरराष्ट्रीय परिषदा होत आहेत. या परिषदांमध्ये कार्बन उत्सर्जन कसे कमी करता येईल, याबद्दल चर्चा होतात, मात्र परिस्थिती फारशी बदलताना दिसत नाही. या परिषदांमध्ये वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठराव मांडले जात आहेत. मात्र अंमलबजावणीची वेळ आली, की सगळे राष्ट्रप्रमुख परस्परांकडे बोट दाखवत प्रत्यक्षात कृती करण्याचे टाळत आहेत.

परिस्थिती गंभीर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रगतीचा मापदंड, ऊर्जेच्या प्रतिमाणसी ऊर्जेवर ठरवण्यात आला. आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी सहज उपलब्ध असणारी संसाधने वापरण्यात आली. यातून विकसित राष्ट्रांनीही सुरुवातीला जंगलातील वृक्षांची बेसुमार वृक्षतोड करून ऊर्जा मिळवली. त्यानंतर प्रथम दगडी कोळशाचा आणि नंतर खनीज तेलाचा वापर सुरू झाला. या तिन्ही घटकांच्या वापरातून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित होत असे. याचा वातावरणावर काय परिणाम होतो, याचा विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कोणीच विचार करत नव्हते. रिचर्ड बेकर यांच्यासारखा एखादा माणूस झाडांचे महत्त्व सांगत होता. मात्र त्यामध्ये पर्यावरण विचारांपेक्षा भविष्यात तोडण्यासाठी झाडेच उरणार नाहीत, याची चिंता जास्त होती. सर्व झाडे तोडली गेली, तर जंगलच राहणार नाहीत. सर्वत्र वाळवंटच होईल, हा विचार होता. कोणी अल्बर्ट हॉवर्ड रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय खतांचा वापर करायला हवा, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. तर त्यांनाही नोकरीतून काढून टाकण्याचा बनाव रचण्यात आला होता.

या परिस्थितीत जगभरातील सर्व राष्ट्रप्रमुख आपले राष्ट्र प्रगत झाले पाहिजे, याचा ध्यास घेऊन प्रयत्न करत होते. परिणामी, विविध राष्ट्रांमध्ये कारखाने उभारले जात होते. आपल्या देशात विदेशी गुंतवणूक वाढावी, असे प्रयत्न होत होते. या कारखान्यांना लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी दगडी कोळसा आणि खनिज तेल वापरले जात होते. लाकडे तर होतीच. यातून कर्बवायूंबरोबर इतरही घातक पदार्थ वातावरणात जात होते. भारतातही असे अनेक कारखाने आले. त्यातील भोपाळजवळ उभारलेल्या युनियन कार्बाईडच्या कारखान्यातून मिथील आयसोसायनेट या वायूची गळती झाली. अनेकांचे जीव गेले. अनेकांना अपंगत्व आले, हे एक उदाहरण! अशा अनेक करखान्यातून जल, वायू आणि जमिनीचे प्रदूषण होत आले; मात्र, आपल्या काळात राष्ट्राची प्रगती झाली, हे दाखवण्याच्या हट्टापायी असे अनेक उद्योग अविचाराने, पर्यावरणाची काळजी न घेता उभारण्यात आले आहेत.

या परिस्थितीला वैतागून नववीतील एक मुलगी ग्रेटा थनबर्ग पेटून उठते. सत्याग्रहाचे हत्यार उपसते. राष्ट्रसंघाच्या व्यासपिठावरून जगभरातील विविध देशांच्या प्रमुखाना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते. तुमच्यामुळे आमचे भवितव्य अंध:कारमय झाले असल्याचे ठणकावते. सगळे तिचे कौतुक करतात. परिणाम मात्र शून्य! जगातील सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख गांधारीच्या भूमिकेत वावरत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे, हे ते मान्य करतात. मात्र कृती करायच्या वेळी ते परस्परांकडे बोट दाखवतात. ‘आम्ही पूर्वी दगडी कोळसा खनिज तेल वापरला असेल. मात्र आता आम्ही हे प्रमाण घटवले आहे. आता आम्ही विशिष्ट मर्यादेपेक्षा ही इंधने वापरत नाही. विकसनशील राष्ट्रे आणि अप्रगत राष्ट्रे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करतात. त्यांनी दगडी कोळसा, खनिज तेलाचा वापर थांबवायला हवा’ असे प्रगत राष्ट्रांचे म्हणणे असते. अमर्याद उत्पादन करताना या राष्ट्रांनी पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे. मात्र आजच्या परिस्थितीवर बोला, असे त्यांचे म्हणणे आहे.

विकसनशील राष्ट्रे यावर सांगतात, ‘प्रगत राष्ट्रांनी पर्यावरणाचे नुकसान करून प्रगती साधली आहे. त्यांनी प्रदूषणाचे कारण असलेली इंधने वापरूनच हे साध्य केले आहे. तेव्हा त्यांनी १०० टक्के अशी इंधने थांबवायला हवीत. आम्हाला अजून प्रगती करायची आहे. आमच्यावर ही बंधने न घालता ही सवलत द्यायला हवी.’ या सर्व वादातून आजची परिस्थिती उद्भवली आहे. १९५१ पासून २०१५ पर्यंत वातावरणाचे तापमान सरासरी एक डिग्री सेल्सियसने वाढले आहे. तापमानवाढ हा एक भाग. पण पर्यावरणातील सर्वच घटकांवर मानवी प्रगतीचा अनिष्ट परिणाम झालेला आहे.

सर्वात प्रथम मानवाने सजीवाना आवश्यक असणाऱ्या दोन घटकांना प्रदूषणाच्या विळख्यात ढकलले आहे. त्या म्हणजे पाणी आणि हवा. मूलत: पाणी आणि हवा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्याचे आपण आजही मान्य करत नाही. त्यामुळे अन्नाची कमतरता होताच मानवाने हरित क्रांती केली. मात्र पाणी आणि हवेची शुद्ध प्रमाणात उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न करताना काही छोटे देश वगळता फारसे कोणी आजही प्रयत्न करत नाहीत. घोषणा होतात, मात्र निष्पन्न काहीच नाही. यातील सर्वात भीषण समस्या पाण्याची आहे. काही वर्षांपूर्वी केपटाऊन या आफ्रिकेतील राजधानीच्या शहरासाठी शून्य प्रहर जाहीर करण्यात आला होता. त्या वेळेपर्यंत पाऊस पडला नसता, तर त्या शहराला पाणी पुरवठा पूर्ण थांबणार होता. मात्र आजही तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी फारसे प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. आपल्याकडील पुण्याची अवस्था फारशी वेगळी नाही. दुष्काळ पडला तर पुण्यासारख्या शहराला कोठून पाणी पुरवणार? याचा विचार शहराचा विस्तार करताना कोणीच करत नाही.

शहरांचे वाढते प्रमाण, वाढती कारखानदारी यातून पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. कारखान्यात वापरलेले रसायनमिश्रीत पाणी, शहरातील मलमूत्र मिश्रीत पाणी थेट नद्यांमध्ये सोडण्यात आले. शेतीसाठी वापरण्यात येणारी किटकनाशके आणि रासायनिक खते संपूर्णत: पिकांसाठी वापरली जात नाहीत. ती जमिनीवर तशीच राहतात. पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि पाण्याचे प्रदूषण आणखी वाढते. पाण्यामध्ये नको असणारे घटक मिसळले तर त्यांना संतुलित करणारी यंत्रणा निसर्गत: विकसित झालेली असते. मात्र प्रदूषकांचे प्रमाण इतके मोठ्या प्रमाणात वाढले आहे की या नैसर्गिक यंत्रणाच मोडकळीस आलेल्या आहेत. यामुळे पाण्याचे प्रदूषण इतके वाढले आहे की नद्यांच्या पाण्यात राहणारे जीव त्यामध्ये जगू शकत नाहीत. त्यामुळेच नद्यांतील मासे मृतावस्थेत आढळल्याच्या बातम्या येतात. वापरलेले सर्व पाणी पुनर्प्रक्रिया करून इतर कारणासाठी वापरायला हवे. मात्र ते अशुद्ध पाणी तसेच नद्या नाले आणि पाण्यांच्या साठ्यांमध्ये मिसळू दिले जातात. या गोष्टी टाळायला हव्यात मात्र तसे होत नाही. मनात आणले तर काय होऊ शकते, याचे सुंदर उदाहरण इंग्लंडमधील थेम्स नदी. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून या नदीला ओळखले जात होते. हा क्रमांक आता भारतातील गंगा नदीने पटकावला आहे. जगातील दहा सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये अर्ध्याधिक नद्या भारतातील आहेत. थेम्स नदी स्वच्छ व्हावी, असे शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले. मात्र कितीही प्रयत्न केला तरी नदी काही स्वच्छ होत नव्हती. काही सुजाण नागरिकांना ही नदी पूर्वीसारखी स्वच्छ व्हावी, असे वाटत होते. मात्र नदी काही स्वच्छ होत नव्हती. अखेर लोकांचा सहभाग वाढू लागला. नेत्यांनी जनतेच्या बरोबरीने यात सहभाग घेतला आणि पाहता-पाहता नदी पूर्ण स्वच्छ झाली. जगातील सर्वात जास्त शुद्ध नदी म्हणून ती आज ओळखली जाते. लोकांचा अनुनय न करता लोकांच्या हिताच्या उपक्रमांत नेत जेव्हा सहभागी होतात, तेव्हा निश्चितच समाजाच्या भल्याचे कार्य उभा होते. मात्र अनेकदा हे घडत नाही. लोकांना जे आवडते ते करण्याचा आणि त्याला पाठिंबा देण्याचा नेत्यांकडून प्रयत्न होतो. याचा परिणाम असा होतो, उगमाजवळ स्वच्छ पाणी घेऊन वाहणारी नदी, मोठ्या शहराजवळून पुढे जाताना गावाची घाण आपल्यात सामावून घेत पुढे जाताना दिसते. नद्यांची अशी अवस्था पाहिली की मन अस्वस्थ होते.

दुर्दैवाने आजही नेतृत्व लोकानुनयाच्या भूमिकेतून निर्णय घेते. त्यामध्ये मग डॉल्बीबाबतची त्यांच्या प्रतिक्रिया असोत वा गणपती नदीतच विसर्जित करण्याचा आग्रह असो. नेतृत्वाने जनतेमध्ये शहाणपण आणायचे असते. लोकानुनय करणारे नेतृत्व दीर्घकाळ स्मरणात राहात नाही. तर जनतेला शहाणपण देणारे नेतृत्व्‍ा लोकोत्तर ठरते, हे जगभरातील नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे.

वायू प्रदूषणाचा विळखा तर इतका भयानक आहे की, सर्वोच्च न्यायालयास स्वत:हून यासंदर्भातील याचिका दाखल करून घ्यावी लागली. न्यायमूर्तींनी स्पष्टपणे काही प्रश्न विचारले. सर्वोच्च न्यायालयाने, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शेतकरी शेतातील पिकाचे इतर जैविक घटक दिल्लीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जाळल्याने प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्याचे म्हणणे खोडून काढले. यावर या विषयातील तज्ज्ञ अधिकारी आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयास पटवून देऊ शकले नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळच नियंत्रण सोडू लागले, तर पर्यावरणाची हानी टळणार कशी? भारतात विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यात येते. मात्र या वाहनांना पुनर्प्रभारित करण्यासाठी लागणारी ऊर्जा दगडी कोळसा जाळून मिळवली जाते. ज्या हेतूने ही वाहने बनवली आहेत, तो हेतू यातून खरेच पूर्णत: साध्य होतो का? हा प्रश्न पडतो. वाहनांचे नियम, त्यांना चालवताना बाहेर पडणाऱ्या प्रदूषक घटकांचे प्रमाण हा एक भाग आहे. कारखाने सुरू असताना बाहेर पडणारा वायू यामुळे वातावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. वाहने आणि कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी काही नेते मनापासून प्रयत्न करत आहेत. लोकांच्या इच्छेपेक्षा लोकांचे हित लक्षात घेऊन हे नेते निर्णय घेत आहेत, ही त्यातील जमेची बाजू आहे. हवेचा प्रदूषण निर्देशांक अनेक शहरांमध्ये धोका पातळी ओलांडत आहे. आपण, आपले कुटुंबिय याच शहरात राहात असल्याचे नेत्यांना माहीत आहे. मात्र हे कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ही केवळ अधिकाऱ्यांची जबाबदारी मानून सोडून देण्यात येते. याउलट अधिकाऱ्यांनी कारवाई करायचे ठरवले तर त्यांना सोडून देण्यासाठी प्रकरण दडपण्यासाठी काही नेते आवर्जून प्रयत्न करत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. हवेच्या प्रदुषणांमुळे श्वसनाचे विकार वाढत आहेत. ओझोनचा थर विरळ होत जात आहे. मात्र मी एकटा नीट वागून काय उपयोग, असे प्रत्येकजण म्हणतो आहे. मात्र प्रत्येकाने काहीतरी करायचे ठरवले तर निश्चितच इप्सित साध्य होईल, हे कोणी लक्षातच घेत नाही. कार्बनी संयुगामुळे तापमान वाढ आणि त्यामुळे पर्जन्यमानाचे बदलणे हे वारंवार दिसू लागले आहे. ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ या युनोच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या संघटनेने सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर इशारे देण्यात आले आहेत. ज्या गांभिर्याने हे इशारे घ्यायला हवेत, तितक्या गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.

आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. झपाट्याने ती बिकट होताना दिसत आहे. जमिनीचे प्रदूषण ही मोठी निर्माण झाली आहे. किटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिकांनी न वापरलेला भाग जमिनीवर तसाच असतो. त्यातून क्षारपड क्षेत्र वाढत आहे. किटकनाशकांच्या अविचारी वापराने मधमाशा आणि इतर किटक मृत्यूमुखी पडत आहेत. त्यातून परागीभवनाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र त्यापेक्षा जमिनीत वाढलेले प्रमाण ठराविक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आजाराचे कारण घडत आहे. पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रातील काही भागांत कर्करोगाचे प्रमाण वाढण्यामागे जमिनीचे प्रदूषण, किटकनाशकांचे, रासायनिक खतांचे जमिनीतील वाढते प्रमाण कारण असल्याचे असे काही संशोधक सांगत आहेत. हरित क्रांतीनंतर तारतम्य न बाळगल्याचे हे परिणाम असल्याचे आज मानले जात आहे. आता कोठे लोकांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटू लागले आहे. मात्र सेंद्रिय शेतीचा अविवेकी स्विकारही श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू शकते.

नेत्यांनी कोणत्याही कृतीचे दीर्घकालीन परिणाम घ्यायला हवेत. तज्ज्ञांचे विचार ऐकायला हवेत. आपला विचार आपल्या गावाचे, भागाचे आणि देशाचे हित साधणारा ठेवायला हवा. पुण्याजवळ दिसणारे कॉस्मॉसचे ताटवे पाहून कोल्हापुरातील एका जनप्रतिनिधीने त्याच्या बिया आणून वनाजवळ टाकल्या. त्याचे प्रमाण वाढल्याने पूर्वी मिळणारा चारा जनावरांना मिळेनासा झाला. त्या वनात कॉस्मॉसचे प्रस्थ वाढले आहे. जंगलातील पशूंना खाण्यासाठी आवश्यक वनस्पतींचे प्रमाण कमी झाले. जंगलात खाद्य न मिळाल्याने ही जनावरे गावात आणि शहरात येऊ लागली. पिकांचे नुकसान करू लागली. आज त्या भागातील लोक कॉस्मॉसच्या बिया आणून टाकणाऱ्या त्या दिवंगत नेत्याला नावे ठेवते. एका नेत्याला का होईना डोंगर, झाडांचे नवल वाटले आणि अंत:करणातील भाव शब्दातून व्यक्त झाले हे चांगलेच झाले. आता पुढचा टप्पा म्हणून नेतृत्त्वाने अशी झाडी वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत. डोंगर आपल्या भागात कसे टिकून राहतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. नद्यांच्या प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील अधिकाऱ्यांना पाठबळ आणि प्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी आग्रह धरायला हवा. ज्या ठिकाणी जनता चुकते असे वाटत असेल, तेथे समाजाला समजावून सांगण्याची भूमिका त्यांना घ्यावीच लागेल. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश जवळ आल्याची चर्चा होत असते. हे खरेही आहे. हे टाळायचे असेल तर संशोधकांच्या मताचा आदर करून नेतृत्वाला प्रत्यक्ष कार्यात सहभागी व्हावे लागेल. शेजाऱ्याच्या डोंगराचे, झाडांचे कौतुक जसे मनातून ओठात आले… तसेच आता… नेतृत्वाने आपल्या भागात, ‘तसेच डोंगर… तशीच झाडी’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.  

-०-


शनिवार, १० डिसेंबर, २०२२

गरज शाश्वत विकासाची…

मानवाचे कष्ट कमी करण्यासाठी, कमी त्रास होण्यासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या सुविधांचा विकास म्हणजे शाश्वत विकास, ही संकल्पना बहुतांश लोकांच्या मनात आहे. अशा विकासात निसर्गाचे होणारे नुकसान, त्याचा पुढील पिढीवर होणारा परिणाम याचा कोणी विचार करत नाही. २०२२ हे साल युनेस्कोने ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेवर आधारीत उपक्रमांचे आयोजन करून साजरे करण्याचे आवाहन केले. निसर्गातील साधनसंपत्ती सर्व जीवांसाठी आहे, याचा विचार करून त्यांचा वापर करण्याची गरज आहे. शब्दोत्सव २०२२ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासाठी… 

_________________________________________________________ 

कोरोनाचे संकट हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून उपकारक म्हणायला हवे. या संकटकाळात लॉकडाऊन झाल्याने आपण निसर्गाची कशी हानी करत आहोत, हे किमान जाणवले. तसेच आज घडणाऱ्या अनेक गोष्टींमागे आपले निसर्गाला हानी पोहोचवणारे वर्तन असल्याचेही सिद्ध झाले. २०२० सालच्या मार्चमध्ये उत्तर ध्रुवावरील ओझोन थराला दहा हजार चौरस किलोमीटरचे छिद्र पडले होते. उत्तर ध्रुवावर अशा प्रकारे छिद्र पडण्याची पहिलीच घटना होती. हे छिद्र असेच राहिले असते तर, सौरप्रारणातील अतिनील किरणे पृथ्वीवर आली असती. उत्तर ध्रुव आणि इतर ठिकाणचाही बर्फ वितळला असता. पृथ्वीवर अभूतपूर्व जलसंकट आले असते. मात्र, जगभरातील सर्व प्रदूषण करणाऱ्या यंत्रणा लॉकडाऊनमुळे बंद होत्या. प्रदूषके वातावरणात न मिसळल्याने, हवेतील ओझोन थराला पडलेले छिद्र बुजले. मात्र सर्व काही पूर्वीसारखे सुरू असते, लॉकडाऊन नसते, तर हे छिद्र बुजले नसते. दुसरीकडे, अरबी समुद्रामध्ये वादळे कधीच येऊ शकत नाही, असे सांगणारे वैज्ञानिकही अरबी समुद्रात सतरा महिन्यात तीन वादळे आली.

मागील वर्षी भारतासह अनेक देशांमध्ये पुरांने थैमान घातले. जर्मनी, भारत आणि चीनमध्ये पुराने हाहाकार माजवला. चीनच्या पोलादी भिंतीतून चूकूनच बातम्या बाहेर आल्या. चीनमधील पुरात सहा हजारपेक्षा जास्त कुटुंबांचे स्थलांतर करावे लागल्याची बातमी आली. लाखो कुटुंबांच्या, लाखो हेक्टर जमिनीवर पुराचे पाणी पसरले होते. भारतात जुलैमध्ये मोठा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्राला सर्वप्रथम पुराने वेढले. त्यानंतर उत्तर भारतात पुराने कहर केला. महाराष्ट्रातील पुराचा सर्वाधिक फटका कोकणासह कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना बसला. कोकणातील चिपळूण शहर पुरामध्ये पूर्ण बुडाले. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील एकाही धरणातून पाणी न सोडताही पूर आला होता. सह्याद्रीच्या पर्वतरांगात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. भक्कमपणाचा दाखला म्हणून सह्याद्रीचा दाखला देण्यात येत असे. त्याच सह्याद्रीच्या कडा अनेक ठिकाणी ढासळल्या. दरड केासळल्याने शंभरपेक्षा जास्त लोकांचे जीव गेले. पन्हाळ्याची तटबंदी कोसळली. विशाळगडावरही भेगा पडल्या. पूर्वी माळीण गावातही दरड कोसळून गावाचे अस्तित्वच पुसले गेले.

२०२२ मध्ये उलट घडले आहे. पश्चीम महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असला तरी पूराचे थैमान नाही. चीनमध्ये मात्र अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवणारा दुष्काळ पडला आहे. पाकिस्तानमध्येही पूराने थैमान घातले आहे. महाराष्ट्र आणि भारतातही यावर्षी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या. या सर्व गोष्टीमागे मानवाने निसर्गात केलेला अविचारी हस्तक्षेप हे कारण आहे. या सर्वांचे खापर निसर्गाच्या लहरीपणावर टाकतो. असा निसर्ग पूर्वी वागलाच नाही असे नाही. मात्र, पूर्वी अशी अपरिमित हानी झाली नव्हती.

पश्चिम महाराष्ट्रात १९८९ साली आणि नंतर २००५ साली पूर आला होता. त्यानंतर २०१९ सालापाठोपाठ २०२१ साली पूर आला. या पाठोपाठ आलेल्या पुरामुळे आणि वाढत्या नुकसानीमुळे पूर आणि नैसर्गिक आपत्तींचा नव्याने विचार करण्यात येऊ लागला. जुलै २०२१ मध्ये राष्ट्रसंघाच्या ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ या संस्थेने आपला सहावा अहवाल सादर केला. त्यानुसार हिंद महासागरातील समुद्राचे तापमान वेगाने वाढत आहे. यामुळे अरबी समुद्रात वारंवार वादळे येणार, ढगफुटी किंवा कमी वेळात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती वारंवार उद्भवणार, तसेच दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण ४० टक्के वाढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच यावर्षी घडत आहे. महाराष्ट्रात लातूर, कोल्हापूर, सातारा, पुणे येथे ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचे अनुमानही नमूद आहे. तापमानवाढीमुळे दक्षिण मुंबईचा बहुतांश भाग, कोकण किनारपटृटीवरील अनेक गावासह पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षीचा चीनमधील दुष्काळही या अहवालातील नमूद अनुमानानुसार आहे.   

      मानवाकडून होणारा अविचारी पद्धतीने विकास या बदलत्या निसर्ग चक्राला कारणीभूत आहे. औद्योगिक प्रगतीची सुरुवात झाल्यापासून आजतागायत ‘ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर म्हणजे विकास’, असे सूत्र जगाने मान्य केले. ऊर्जा मिळवण्यासाठी खनिज तेले आणि कोळशाचा प्रचंड वापर करण्यात येऊ लागला. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणकारी घटक वातावरणात मिसळू लागले. या प्रदूषकांची सौर ऊर्जा शोषण करण्याची क्षमता मोठी असते. परिणामी जागतिक पातळीवर तापमान वाढ होते. अतिरेकी ऊर्जेच्या वापरातून होणारे प्रदूषण, त्यामुळे वाढणारे तापमान आणि त्यांचा वातावरणावर होणाऱ्या परिणामाची जाणीव संशोधकांना झाली. १९६९ साली मायकेल ओपेनहायमर या संशोधकाने सर्वप्रथम ‘मानवाच्या अविचारी विकासाने पृथ्वीवरील निसर्गाचे नुकसान होते’, हे सांगितले. त्यानंतर अनेक संशोधकांनी या विषयावर संशोधन करून ओपेनहायमर यांच्या निष्कर्षांस पुष्टी दिली. आजही असे संशोधन प्रसिद्ध होत आहे. ‘आयपीसीसी’चा अहवाल त्याचाच एक भाग.

ओपेनहायमर यांच्या इशाऱ्यानंतर दहा वर्षांनी १९७९ मध्ये जागतिक तापमान वाढीसंदर्भात अधिकृत चर्चा सुरू झाली. जिनेव्हा येथे पहिली जागतिक परिषद झाली. त्यानंतर १९९०, २००९ मध्येही अशा परिषदा  झाल्या. या सर्व परिषदांमध्ये सर्वांनीच जागतिक तापमान वाढ थांबली पाहिजे, प्रदूषण कमी झाले पाहिजे, खनिज तेलाचा वापर नियंत्रित झाला पाहिजे, असे मान्य केले. मात्र अंमलबजावणीची वेळ आल्यानंतर, ‘प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी दुसऱ्याची’, अशी भूमिका घेत आले. अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी, विकसनशील देशांनी खनिज तेल आणि दगडी कोळशाचा वापर कमी करावा, असे सुचवले. विकसनशील देशांनी ‘विकसित देशच याला जबाबदार आहेत, त्यांनीच याची अंमलबजावणी करावी’, असा सूर आळवला. प्रश्न तसाच राहिला. उलट खनिज तेलाचा वापर दिवसेंदिवस वाढला. जागतिक तापमानवाढ होतच राहिली. त्याचेच परिणाम वसुंधरा भोगत असल्याचे, संशोधक सांगतात. मात्र ‘ऐकणार कोण?’ हा प्रश्न आहे.

जागतिक तापमान वाढ हा सर्वात मोठा धोका. खनिज तेलाचा अमर्याद वापर थांबला पाहिजे, हे सर्वांना मान्य आहे. मात्र तसे होत नाही. तथापि, जागतिक तापमान वाढीचे आणि निसर्ग चक्रावर अनिष्ट परिणाम होण्याचे, हे एकमेव कारण नाही. अविचाराने होत असलेला सर्वच क्षेत्रांतील विकास सर्वात मोठा धोका बनला आहे. त्या दृष्टीने नैसर्गिक संकटांकडे पाहायला हवे. कोल्हापूर, सांगली भागांत वारंवार येणारे पूर, त्यांची वाढती तीव्रता ही प्रामुख्याने महामार्गाचे देणगी आहे. पंचगंगा नदीवरून महामार्ग जात असताना केवळ पंचगंगा नदीवर पूल बांधला गेला आहे. पूर आला की पाणी पात्राबाहेर पडते. हे पाणी जाण्यासाठी पात्राच्या दोन्ही बाजूला मार्ग नाही, तेथे पंधरा ते वीस फूट उंचीचा भराव आहे. इतर ठिकाणचे डोंगर पोखरून हे भराव घातले आहेत. त्यामुळे पूरस्थितीत नदीचे पात्र आणि पूल एक कालवा बनतो. तर भराव धरणाचा बांध. पात्राबाहेरील पाणी भरावामुळे अडते. पाण्याचा फुगवटा वाढतो. शहर पुराखाली जाते. अतिवृष्टी तर जागतिक तापमानवाढीची देणगी आहे. काही तासांत, एक दोन दिवसांत अतिवृष्टी होणे हा तापमान वाढीचा परिणाम आहे. जागतिक तापमान वाढीचा प्रश्न चर्चेत येण्यापूर्वीही अतिवृष्टी होत असे. मात्र, आता त्याची वारंवारिता वाढली आहे. ठिकाणांची घनताही वाढली आहे. अतिपाऊस पडला की पूर येणे स्वाभाविक आहे. मात्र हा पूर पाऊस थांबताच न ओसरणे, हे अनैसर्गिक आहे. पूर न ओसरण्यामागे महामार्गाचे अविचारी बांधकाम हे महत्त्वाचे कारण असल्याचे आज तज्ज्ञ सांगत आहेत. महामार्गांचे बांधकाम नव्याने करण्याची मागणी जोर धरत आहे. महामार्गाच्या रचनेत बदल करण्यासाठी येणारा खर्च हा वारंवार येणाऱ्या पुरांमुळे होणाऱ्या हानीपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे या गोष्टीची अंमलबजावणी तातडीने होण्याची गरज आहे.

मानवाला वेग हवा आहे. कमी खर्चात, जास्त वेगाने गाड्या जाव्यात म्हणून मार्गातील चढ-उतार कमी करण्यासाठी डोंगराचा मोठा भाग फोडण्यात येतो. त्यामधून रस्ता काढला जातो. दोन्ही बाजूला त्या टेकडीचे भाग तसेच उभे असतात. ते पडू नयेत, यासाठी काही जुजबी उपाययोजना करण्यात येतात. हे डोंगर फोडताना पोकलँडसारख्या अजस्त्र यंत्राचा, व्हायब्रेटींग ब्रेकरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा यंत्रांच्या कंपनामुळे न फोडल्या जाणाऱ्या डोंगराचा भाग सुटा होतो. त्याच्या विविध थरांतील पकड ढिली होते. तर काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी इतर ठिकाणचे डोंगर, टेकड्या फोडून दगड, माती आणि मुरुम आणून टाकला जातो. याची बांधणी, यावर भार देऊन घट्ट बसवण्याचे काम अजस्त्र यंत्राच्या सहाय्याने होते. हे काम करताना पर्यवेक्षण किती काळजीपूर्वक होते, हे संबधित अधिकाऱ्यांना माहीत! ते पूर्ण क्षमतेने होते, असे गृहित धरले तरी उभ्या असणाऱ्या डोंगरांतील माती आणि दगडगोट्यांमध्ये आलेला सैलपणा कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मुळात त्याचा विचारच कोणी करत नाही.

भारतातील अनेक राज्यांत पूराचे गंभीर होणाऱ्या संकटामागे महामार्गांचे बांधकाम होताना पुराच्या पाण्याला वाटा न ठेवणे कारणीभूत असल्याची चर्चा आता होते आहे. महामार्गाच्या बांधकाम तंत्रामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. भविष्यात पूर तुंबण्याची ठिकाणे कमी होतील. मात्र पुरासारख्या आपत्तीसाठी अतिवृष्टी आणि महामार्गांची बांधकामे केवळ हीच कारणे नाहीत. पुरासारखी आपत्ती भयानक ठरण्यामागे जमिनीची धूप हेही एक कारण आहे. जमिनीची धूपसुद्धा विविध कारणाने होत आहे.

पश्चिम घाटातच नव्हे, तर देशभर डोंगर संपवण्याच्यामागे अनेक लोक लागले आहेत. हे अनेक दृष्टीने घातक आहे. डोंगराच्या नाशामागे महामार्गांचे बांधकाम हे पहिले कारण. बांधकामासाठी, रस्त्यासाठी खडी, दगडांची गरज भागवण्यासाठी, खनिजांसाठी डोंगर पोखरले जात आहेत. झाडे तोडणे, त्यावरील माती अनियंत्रितपणे बाजूला खाणीच्या ठिकाणी सातत्याने आढळून येते. ही माती सुटी, सैल पडलेली असते. धूप होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे ते शेतीचे! लोकसंख्या जशी वाढत गेली, तसे जंगलाचे क्षेत्र कमी झाले. त्या जागेवर शेती करण्यात येऊ लागली. वाढत्या लोकसंख्येच्या पोटाची भूक भागवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे समर्थन करण्यात येते. शेतातील पीक चांगले यावे म्हणून मशागत केली जाते. माती भुसभुशीत केली जाते. असे शेतीचे क्षेत्र पावसाळ्यात पिकावीना असेल, आणि त्या भागात अतिवृष्टी झाली, तर माती वाहून जाते. त्याचबरोबर पूर क्षेत्रात असणारी पीक पद्धतीही महत्त्वाची भूमिका पार पाडते. ऊसासारखी घनदाट आणि उंच वाढणारी पिके नदीपात्रात असल्यास पूर ओसरण्यास लागणारा वेळ वाढतो. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी २००५ साली कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत आलेल्या पुराच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला आहे. खनिजांच्या, दगडांच्या खाणीमुळे सुटी झालेली माती जोरात येणाऱ्या पावसाबरोबर वाहून जाते. ती नदीच्या पात्रात येते. नदीच्या पात्रात ही गाळाची माती साठते. त्यामुळे नदीचे पात्र उथळ बनते. केवळ पात्रातून जाऊ शकणारे पाणीसुद्धा पात्राबाहेर पडते. पाण्याबरोबर आलेली माती ऊसासारख्या पिकामुळे अडकून राहते. मातीमुळे पात्र पसरट, उथळ होत असतानाच पात्राबाहेर पडलेले पाणी नदी पात्राशेजारील सुपीक जमिनीतील पिके आणि कसदार माती वाहून नेते. शेतीचे अतोनात नुकसान होते. पूरांमुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान नेहमीचे झाले आहे. खाणकाम करताना कसे करावे, सुटी माती कशी जपावी, ती वाहून जाऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात शासन निर्देश आहेत. मात्र ते काटेकोरपणे पाळले जात नाहीत. त्यामुळे अनेक नद्यांच्या पात्रामध्ये वाळू नाही, तर केवळ मातीच असते.

ज्या भागात वाळू आहे, त्या भागात वाळू तस्करी सुरू आहे. वाळूच्या अनिर्बंध उपशामुळे जमिनीत पाणी मुरणे थांबते. वाळू नदीत असणे, नदी जिवंत असण्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. मात्र हा थर संपवला जातो. वाळू प्रदूषण कमी करते, पाणी स्वच्छ ठेवते. वाळू पूर्णत: उपसली गेली, तर नदीपात्रातील जमीन उघडी पडते. वाळूचा उपसा मर्यादित होणे आवश्यक आहे. त्यानुसारच शासनाकडून निविदा निघतात. मात्र मानवी हव्यास आणि स्वार्थ हा वाळू उपसा त्या मर्यादेत ठेवत नाही. अर्थात याचे परिणाम दीर्घकालीन होत आहेत आणि होत राहणार, हे कोणीच लक्षात घेत नाही.

नद्यांकाठची, समुद्राकाठची तोडली जाणारी झाडे, ही सुद्धा मोठी समस्या आहे. नदीकाठी असणाऱ्या शेताचे बांध आज बोडके झाले आहेत. त्यामुळे शेतातील गाळाची माती, नदी पात्रात येते. पृथ्वीवरील जीवसृष्टी अशीच ठेवायची असेल तर, ‘जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल’ राखणे आवश्यक आहे. मात्र माणूस इंच-इंच भूमी कशी पिकवता येईल, याचा विचार करतो. यासाठी झाडांची कत्तल करतो. एकीकडे दरवर्षी वृक्षारोपणाचे सोहळे साजरे करायचे आणि दुसरीकडे मोठ-मोठ्या झाडांची कत्तल करायची, असे दुटप्पी वागणे अहर्निष सुरू आहे. दरवर्षी मोठ्या झाडांचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. झाडांची व्याख्या करताना नियमानुसार ‘दहा सेंटिमीटर व्यासाचे खोड आणि पाच फुट उंची’ हे सूत्र वापरले जाते. या सूत्रात बसणारी रोपेही झाडाच्या मोजमापावेळी मोजली जातात. अशी शंभर नव्हे, हजार झाडांची रोपे लावून शंभर सेंटिमीटर व्यासाचे खोड असणाऱ्या झाडामुळे मिळणाऱ्या फायद्याची बरोबरी होऊ शकत नाही, हे कोणीच लक्षात घेत नाही. उंच आणि मोठ्या झाडांची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात. ती जमिनीत पाणी नेतात. मोठे झाड वाळले की पाणी मुरवण्याचे कार्यही थांबते. मोठ्या झाडांची मुळे माती, मुरूम घट्ट धरून ठेवण्याचे काम करतात. मोठ्या झाडांच्या तुटण्यामुळे या मातीचे पालकत्वही संपते. पावसाच्या पाण्याबरोबर माती आणि बारीक दगड-धोंडे वाहून जातात. जमिनीची धूप होते. नव्याने लावलेल्या रोपांची मुळे खोलवर गेलेली नसतात. ती मुळे खोलवर पाणी नेण्याचे काम करू शकत नाहीत. या फायद्या-तोट्यांचा गांभिर्याने विचार केला जात नाही. मोठ्या झाडाभोवती एक परिसंस्था विकसित झालेली असते. झाडांवर काही पक्षी राहातात. अनेक कीटक त्या झाडांच्या फळांवर जगत असतात. असे मोठे झाड तुटले की एक परिसंस्था नष्ट होते. नव्या लावलेल्या रोपाला फळे येत नाहीत. कीटकांना सालीमध्ये नवे घर मिळत नाही. नवी रोपे झाडात रूपांतरित होण्यासाठी काही वर्षांचा वेळ लागतो. या सर्व गोष्टींचा एखादे मोठे झाड तोडताना विचार करणे आवश्यक आहे.

कोकणात जे होत आहे, ते तर आणखी भयानक आहे. मागील काही वर्षांमध्ये कोकणात खाजगी मालकीची जमीन मोठ्या प्रमाणात उद्योजकानी विकत घेतली आहे. पूर्वी या जमिनीवर खाजगी मालकीचे जंगल होते. या जमिनी, पैसेवाल्या धनदांडग्यांनी खरेदी केल्या आहेत. त्यांनी या जमिनीवरील जंगल मोठ्या प्रमाणात तोडले. नेसर्गिक जंगलाच्या जागेवर हापूस आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. काहीजण काजूच्या बागा लावतात. मात्र केवळ झाडाच्या जागेवर झाडे लावून चालत नाही. पूर्वीची झाडे तोडल्याने त्या जागेवरील परिसंस्था नष्ट झाल्या आहेत. हापूसची, काजूची झाडे लावताना त्या जमिनीवरील पूर्वी असणारे गवत, झाडे-झुडपे आणि वृक्ष सर्व संपवले आहे. त्यामुळे जमीन उघडी पडली. कोकण आणि सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये लाल माती मोठ्या प्रमाणात आहे. ही माती ऊन-वारा आणि पावसामुळे सुटी होते. मातीला घट्ट पकडून ठेवणारी झाडांची मुळे आणि गवताचे आवरण नष्ट झालेले असल्याने, ती माती पाण्याबरोबर वाहून जाते. ती नदी पात्रात जमा होते आणि पात्र उथळ बनवते. कोकणातील नद्या तीव्र उतारावरून धावतात. त्यामुळे पाण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे मातीचा मोठा भाग समुद्रातही वाहून जातो.

पारंपरिक परिसंस्थांच्या नाशामुळे इतरही अनेक गोष्टी घडत असतात. गवताळ, झाडांनी व्यापलेल्या डोंगरमाथ्यावर मोठ्या झाडांच्या बागा तयार झाल्या, तर ज्या भागात गवताळ आणि वृक्षराजीने झाकलेला भाग आहे, तो जास्त पाणी पकडून ठेवतो. तो भाग जड बनतो. वरचा भाग त्याच पद्धतीचा नसल्याने हा कडेला असणारा भाग सुटतो आणि दरडी कोसळतात. महामार्गांच्या बांधकामासाठीही अनेक झाडे तोडण्यात येतात. महामार्गाच्या आड येणारी माती काढून टाकली जाते. चढ खोदून बाजूला केले जातात. उतारावर भर घातली जाते. या कामासाठी अवजड यंत्रे वापरतात. या यंत्रांच्या हादऱ्याने कोकणासारख्या भागातील मृदा सैल होते. पाऊस पडला की उघडी जमीन पाण्याबरोबर मातीही नेते. माती सैल झालेल्या भागातून पाणी गेले की भेगा रूंदावतात. अशा भागात रस्ते बांधताना मोठी आणि अवजड कंप करणारी यंत्रे न वापरता मनुष्यबळाचा वापर करून हळुवारपणे गरजेपुरत्या भागातील माती काढण्याची गरज असते. मात्र मानवी बळाचा वापर करून असे मोठे प्रकल्प पूर्ण करावयाचे झाल्यास त्यासाठी खर्च आणि वेळ वाढतो. खर्च आणि वेळेची केलेली बचत पुढे मोठ्या विनाशाकडे घेऊन जाते.

आजही धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्यवस्थित झाले नाही किंवा झालेच नाही, असा आरोप होतो. तो आक्रोश आपणास ज्ञात असतो कारण त्यांचे म्हणणे आपल्यापर्यंत पोहोचते. आपणास वाचता येते. ऐकता येते. मात्र झाडे तोडताना, गवताळ भूभाग नष्ट करताना आपण ज्या जीवांना बेघर करतो, त्यांचा आक्रोश सर्वसामान्यांना समजत नाही. ज्या तज्ज्ञांना हा आक्रोश समजतो, ते आपणास समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो आपण समजून घेत नाही. समजूनही त्याकडे दुर्लक्ष करतो कारण ते आर्थिकदृष्ट्या आपल्या फायद्याचे असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राहणे दीर्घ काळानंतर आपल्या किती तोट्याचे आहे, ते समजते. मात्र तोपर्यंत खूप उशिर झालेला असतो.

कोकणचा विकास करताना हेच घडत आहे. कोकणातील रस्ते बांधताना सुरू असलेले काम पाहून हे धोके लक्षात येतात. या भागात मोठ्या प्रमाणात ‘फार्म हाऊस’ची निर्मिती होत आहे. ही बांधकामेही तेथील पर्यावरणाला नुकसान पोहोचवत आहेत. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात लावली जाणारी झाडेही पर्यावरणपूरक नाहीत. त्या भागातील भूस्तर, माती, तेथे असणारे पर्यावरण बेचिराख करत होणारा विकास हा भावी धोक्याची घंटा वाजवतो आहे. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. रस्ते, हापूस, काजूच्या बागा, बांधकामे केल्यानंतर लावली जाणारी झाडे स्थानिक असली पाहिजेत. काही वर्षापूर्वी सोळा देशांना त्सुनामीचा फटका बसला. या त्सुनामीमुळे किनाऱ्यांवरील अनेक गावात प्रचंड हानी झाली. त्यामधून ज्या गावांनी किनारपट्टीवरील खारफुटी किंवा मॅग्रोव्हजची तटबंदी अबाधित ठेवली होती, ती गावे बचावली. त्या गावांमध्ये कोणतीही जिवित आणि वित्त हानी झाली नाही.

        पूर, कडा कोसळणे, अतिवृष्टी अशा सर्व समस्यांचे खापर निसर्गावर फोडणे सोपे आहे; मात्र, निसर्गामध्ये आपण किती हस्तक्षेप करतो, या सुंदर सृष्टिीची आपण कशी वाट लावतो, याचा विचार कधीच करत नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, असा ‘न्यूटनचा तिसरा सिद्धांत’ सांगतो. हे केवळ बलाबाबत सत्य असणारे विधान नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्टीला हा नियम लागू आहे. मानवाच्या अनियंत्रीत वागण्याची अनियंत्रीत प्रतिक्रिया येणारच. आपण नेमके हेच समजून घेणे टाळत आहोत. समजून घेतले तरी वर्तनात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. त्यामुळे निसर्गाच्या प्रतिक्रिया आल्यानंतर पुन्हा निसर्गालाच नावे ठेवणे, दोष देणे योग्य नाही. निसर्गातील साधनसंपत्ती ही केवळ मानवाची नाही. ती  निसर्गातील सर्व घटकांची आहे. पाणी, जमीन, जंगल सर्व गोष्टींचा वापर सर्वांना करता आला पाहिजे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांनी निसर्गातील साधनसंपत्तीचा हवा तसा उपभोग घ्यावा आणि दुसरीकडे किमान गरजा भागवण्यासाठी इतर जीवांनी, गरीबांनी तडफडावे, हे निसर्गाला मान्य नाही. निसर्गातील सर्व घटक परस्परपूरक भूमिका पार पाडतात. त्यामुळे मनुष्य वगळता अन्य जीवांची भरमसाठ वाढ होत नाही. काही वनस्पती, बॅक्टेरिया आणि प्राणी पाण्याचे शुद्धीकरण करतात. निसर्गात एक अन्नसाखळी कार्यरत असते. या साखळीतील एक कडी तुटली, तर हे कार्य अपूर्ण राहते. त्यामुळे निसर्गातील एकेक घटक जसे नष्ट होतील, तसे त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. म्हणून निसर्गस्नेही विकासाचा मार्ग पकडायला हवा. त्यासाठीच यावर्षी युनोने ‘विज्ञान तंत्रज्ञानातून शाश्वत विकास’ ही संकल्पना जाहीर केली आहे.   

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

शेती तंत्राचे वर्तुळ

 

शेती चांगली पिकायची. अन्नधान्याचे व्यवस्थापनही नेटके केले जात असे. त्यामुळेच ब्रिटिशांची सत्ता येण्यापूर्वी मोठे दुष्काळ पडूनही अन्नधान्याची कमतरता आणि उपासमारीने मृत्यू या उपखंडाला जाणवले नाहीत. आज ज्याला आपण सेंद्रीय शेती म्हणतो, तीच शेतीपद्धती पूर्वीपासून भारतात राबवली जात असे. शेतातील पालापाचोळा हा कुजवून त्यापासून खत मिळवून ते मातीत मिसळले जायचे. सेंद्रीय शेतीच्या पुरस्काराने भारतीय कृषी क्षेत्राचे एक वर्तुळ पूर्ण होत आहे… 
शेतीप्रगती मासिकाच्या २०२२ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख…

_________________________________________________________


पृथ्वीची निर्मिती ही एका महास्फोटातून झाली. स्फोट झाला त्यावेळी पृथ्वीसह अन्य सर्व ग्रह तप्त वायुंचे गोळे होते. या गोळ्यांना स्वत:भोवती गती होती. त्या गतीसह हे गोळे सुर्याभोवती फिरत राहिले. अनेक वर्षे असे फिरत असताना, हळूहळू ते गोळे थंड होत गेले. तापमान कमी होत असताना त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रक्रिया घडल्या, की ज्यातून विविध मूलद्रव्यांची निर्मिती झाली, हे अजून नेमकेपणाने कोणी सांगितलेले नाही. सूर्यामध्ये असणाऱ्या घटकांचेच हे तप्त गोळे होते, मात्र त्यातील ऊर्जाक्षय झाला. ते थंड झाले. मात्र त्यातून आत पृथ्वीसह अन्य ग्रहावर आढळणारी मूलद्रव्ये कशी बनली, याची उकल अजून झालेली नाही. ते काहिही असले, तरी आज हा सिद्धांत बहुतांश संशोधक मान्य करत आहेत. तर
, महास्फोटात पृथ्वी तयार झाली. ती थंड होत गेली. ती थंड झाल्याने भूपृष्ठ तयार झाले. तरीही पोटातील तप्त लाव्हा ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर येत असे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून उंच पर्वत आणि खोल समुद्र बनले. थंड होण्याच्या प्रक्रियेत तयार झालेले पाणी खड्ड्यात जाउन साठले आणि समुद्र तयार झाले. या समुद्रातील पाण्यामध्ये प्रथम एकपेशीय आणि नंतर बहुपेशीय जीव बनले. यामध्‍ये अमिबासारखे एकपेशीय जीव प्रथम तयार झाले. पुढे शैवालासारख्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती अस्तित्वात आल्या. त्यानंतर जलचर, पुढे उभयचर जीव तयार झाले, असे मानले जाते. उभयचरांपासून सरपटणारे प्राणी, पुढे भूचर, पक्षी बनले. तसेच वनस्पतींचेही उत्क्रांत पावणे सुरू होते. पाण्यात वाढणाऱ्या शैवालांपासून जमिनीवर वाढणाऱ्या वेली विकसीत झाल्या. त्यानंतर झाडे बनली. प्राण्यांमध्ये असणारा मानव हा वानरापासून उत्क्रांत झाला, असे डार्विनचे म्हणणे आज जगाने स्विकारले आहे.

मानवही इतर प्राण्याप्रमाणे प्रथम चार पायावर चालत होता. तो निसर्गात मिळणाऱ्या वनस्पतींची पाने, फळे खाऊन आपली भूक भागवत होता. कंदमुळे, फळे आणि पाने खात जगताना काही प्राणी इतर प्राण्यांना मारून आपली भूक भागवताना दिसले आणि तोही शिकार करू लागला. मांसाहार करू लागला. हळूहळू त्यांने चार पायावरील तोल दोन पायांवर सांभाळण्याची कला विकसीत केली. हा सर्वात मोठा महत्त्वाचा क्षण होता. मानवाचे डोके आणि जमीन यामधील अंतर वाढले आणि मानवांचा मेंदू आधिक कार्यक्षमतेने कार्य करू लागला. त्यातून त्याला कष्ट कमी करण्याचे वेध लागले. उन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण हवे होते. यासाठी तो एकाच ठिकाणी निवारा करून राहू लागला. निवाऱ्यासाठी त्यांने नदीकाठची जागा निवडली. सुरक्षीत ठिकाणी तो गवत, लाकडाचा वापर करून झोपड्या बनवू लागला. अनेकदा झाडावर निवारा बनवू लागला.

मानवालाच नव्हे, तर सर्वच सजीवांना जगण्यासाठी लागणाऱ्या तीनच मूलभूत गोष्टी आहेत. अन्न, पाणी आणि हवा. हवा, आणि पाणी निसर्ग सहज पुरवत होता. मानवाच्याही याच तीन मूलभूत गरजा. या पूर्ण करण्यासाठी त्याला कष्ट करावे लागत होते. शिकारीसाठी, फळे, कंदमुळे मिळवण्यासाठी त्याला जंगलात जावे लागे. वणवण फिरून अन्न मिळवावे लागे. कधीकधी शिकारीविना परतावे लागत असे. ही अनिश्चितता त्याला नको वाटे. हे कष्ट कमी करण्यासाठी, अन्नाची शाश्वती ‍निश्चित करण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये खाण्यायोग्य कोणत्या वनस्पती आहेत, याचा शोध सुरू केला. ‍जगाच्या शेतीचा शोध घेतानाही हाच निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. महिलाच अशा वनस्पतींचे बियाणे राखून ठेवत. ते बियाणे दुसऱ्या वर्षाच्या हंगामात पेरता येते आणि त्यापासून उत्पन्न घेता येते हेही महिलांनीच शोधले. नेमके किती बियाणे पेरावे, त्यापासून किती उत्पन्न मिळणार, याचा त्यांनी अंदाज येऊ लागला आणि खऱ्या अर्थाने अन्ननिर्मितेचे म्हणजेच शेतीचे तंत्र मानवाच्या हाती आले. अर्थात त्या काळात शेतातील सर्व कामे हातानेच केली जात असत.

शेतीची सुरुवात साधारण दहा हजार वर्षांपूर्वी मध्यपूर्व भागात झाली. यामध्ये आजचे इस्राईल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्तान, कुवेत, इराक, इराण या देशांचा समावेश होतो. सुरुवातीच्या काळात त्यांने गहू, आईन कॉर्न, जवस अशा धान्यप्रकारांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मसूरसारख्या कडधान्याचेही उत्पादन घेण्यात येत असे. त्यानंतर वाटाण्याची शेती होऊ लागली. पशूपालनास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ शेळ्या आणि मेंढ्या पाळल्या जात. त्याबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश झाला. या भागातून शेतीचा प्रसार उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, आणि आशिया खंडामध्ये झाला.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर सुमारे ३५०० वर्षांनी भारतात शेतीची सुरुवात झाली. निकोलाय व्हॅव्हिलाव या रशियन संशोधकाने जगभरातील शेतामध्ये सुरुवातीच्या काळात पिकवल्या जाणाऱ्या पिकांविषयी संशोधन केले. जगभरातील शेतीच्या सुरुवातीच्या क्षेत्रांमध्ये दक्षीण भारताचा समावेश होतो. या भागात पिकवल्या जाणाऱ्या पिकामध्ये तांदूळ, मूग, उडीद, तूर, हरभरा, चवळी इत्यादी तृणवर्गीय पीके लावली जात. वांगी काकडी, मुळा, इत्यादी भाज्या लावल्या जात. यामध्ये ऊस, तीळ, करडई, ताग, काळे मिरे, दालचिनी इत्यादी पिकांचाही समावेश आहे. आंबा, चिंच, संत्रा, लिंबू या फळांचाही अन्न म्हणून समावेश आहे. भारतात पिकवली जाणारी शेती ही सेंद्रीय शेती होती. शेतीसाठीची जमीन अदलून बदलून वापरण्यात येत असे. बियाणे पिकातूनच वेगळे काढले जात असे. भारतीय शेतीमध्ये मातीचा कस टिकवून ठेवण्यामध्ये मोठे महत्त्व होते. शेतामध्ये अनेक पिके एकाच क्षेत्रात लावण्यात येत असत. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तूरीमध्ये उडीद, मूग, चवळी इत्यादी कमी उंचीची पिके आडपट्ट्यामध्ये घेतली जात असत. भारतीय शेती पद्धतीमध्ये जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल राखण्यावर मोठा भर दिला जात असे. जंगलाची शेती पिकवण्यामध्ये असणारी भूमिका माहिती असल्याने ग्रामवन किंवा देवरायांना जपण्याकडे ग्रामस्थ लक्ष देत. अगदी प्राचीन काळापासून तलावांची निर्मिती आणि तलावांचे पाणी पाटाने शेतीला पुरवण्याकडे ग्रामस्थ लक्ष देत. उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाले की गाळ काढून तो शेतातील मातीमध्ये मिसळण्यात येत असे. जेथे तलावाचे पाणी जात नसे, त्या भागात शेत जमिनीच्या कडेला झाडे लावून ओलावा टिकवण्याचे तंत्र, त्यांना माहीत होते. झाडांच्या ओलाव्यावर रब्बी पिके पिकवण्यात येत असत. अशा जमिनीत कोणती पिके घ्यायची, याचे शास्त्र अवगत झाले होते. अनुभवाच्या आधारे मिश्र पिके कोणत्या जमिनीत कोणती आणि कशी लावावीत, याच्या पद्धती त्यांनी समजून घेतल्या होत्या. पिकांचा फेरपालट करून जमिनीचा कस टिकवून असत. पिके कधी काढावीत, त्यांची मळणी कशी करावी, याच्या पद्धती भारतातील शेतकऱ्यांनी विकसीत केल्या होत्या. काढलेले धान्य साठवण करण्यासाठी भारतातील शेतकरी जमिनीखाली गोदाम तयार करत. ज्वारीसारखी धान्ये त्यामध्ये दोन-तीन वर्षे सहज टिकत. मूग, उडिद, तूरीसारख्या कडधान्यापासून डाळ बनवण्याची प्रक्रिया विकसीत करण्यात आल्या. या सर्व प्रक्रिया निसर्गस्नेही होत्या. पिक काढल्यानंतर उरणारा जैविक कचरा  जनावरांना खाद्य म्हणून वापरत. उर्वरीत भाग हा खोल खड्ड्यात कुजवून त्यापासून खत बनवले जाई. जनावरांपासून मिळणारे शेणादी मलमूत्र हे ही त्याच खड्ड्यात कुजवून खत म्हणून वापरले जात असे. या शेती पद्धतीतून मिळणारे उत्पादन भरपूर होते. प्रती हेक्टर चार ते सहा टन धान्य उत्पादन निघत असल्याचे दाखले मिळतात. त्यावेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे उत्पादन खूप जास्त होते. हे धान्य पेवामध्ये पुरून ठेवत. या धान्याचा उपयोग अवर्षण काळात करण्यात येत असे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याकडील असे अतिरिक्त धान्य खरेदी करत आणि किल्ल्यावर साठवून ठेवत. पावसाळ्यापूर्वी किल्ल्यावरून बियाणे आणि घोडे आणि अन्य प्राण्यापासून बनलेले खत पुरवण्यात येत असे. अन्नधान्याचे इतके मोठे उत्पादन होते की इंग्रजांची सत्ता येईपर्यंत गत दोन हजार वर्षांत बावीस मोठे दुष्काळ पडले, मात्र अन्नधान्याची कमतरता जाणवली नाही. अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे जिवित हानी झाल्याच्या नोंदी नाहीत.   

इंग्रजाचा भारतात सर्वत्र अंमल सुरू होईपर्यंत भारतातील शेती आणि शेतीपद्धती समृद्ध होती. भीषण दुष्काळ पडले असूनही अन्नधान्याची टंचाई झाली नाही. पाण्याचीही उपलब्धता होती. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या काळातही भारतातील खेडी अन्नधान्य आणि शेतीव्यवस्थापनामध्ये स्वायत्त होती. मात्र इंग्रजांचा अंमल सुरू झाला आणि त्यांनी येथील सर्व संसाधनांची लूट सुरू केली. त्यांनी प्रथम जंगलांची मालकी शासकीय केली. जंगलातील सागासारख्या टिकाऊ लाकडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. त्यांच्या जागेवर नव्याने लागवड मात्र झाली नाही. शेतावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात येऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. जो शेतसारा पाच टक्केपर्यंत असायचा, तो पन्नास ते साठ टक्केपर्यंत वाढवण्यात आला. खेड्यांतील गावकऱ्यांना गरजेची असणारी पिके न लावता नीळ, कापूस, ऊस, भुईमूग अशी नगदी पिके लावण्याची सक्ती करण्यात येऊ लागली. उत्पादन निघो किंवा न निघो शेतसारा भरणे सक्तीचे असायचे.   

इंग्रजांच्या या धोरणाने भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दुसरीकडे शेतकऱ्यांना सहाय्य करण्याच्या नावाखाली इंग्रज सरकारच्या आश्रयाने जमिनदार आणि सावकारांचे पेव फुटले. शेतकरी कर्जबाजारी बनले. कर्ज न फेडता आल्याने शेतकरी आणखी त्रस्त झाला. जमिनींची मालकी सावकार आणि जमिनदारांकडे जाऊ लागली. यामुळे खेड्यांमध्ये दारिद्र्य वाढले. भारतातील शेतकऱ्यांची आणि शेतीची प्रचंड हानी झाली. ब्रिटीश सत्तेच्या काळात एकूण अकरा दुष्काळ पडले. तोपर्यंत भारतातील अन्नधान्य निर्मिती, साठवण आणि वितरण व्यवस्था पूर्णत: बदलली होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात  पडलेल्या बिहार आणि पश्चीम बंगालच्या दुष्काळामध्ये मोठी जिवीत हानी झाली. या दुष्काळात लोकांचे झालेले हाल आणि लाखोंची जिवितहानी वाचताना आजही अंगावर शहारे येतात.

तोपर्यंत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये रासायनिक खतांचा शोध लागला. त्यांचे कारखाने निर्माण झाले. उत्पादन वाढीसाठी या खतांचा वापर करून जास्त उत्पादन काढता येते, असा या खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा दावा होता. भविष्यात याचे काय परिणाम होणार आहेत, याचा विचार कोणीच केला नाही. भारतातील पारंपरिक शेती पद्धती आदिम आहे आणि यांना आधुनिक शेतीपद्धती शिकवण्याची गरज आहे, असे इंग्रज सरकारला या कंपन्यांनी पटवून दिले. इंग्रज शासनाने तेथील कृषी संशोधकांना भारतियांना आधुनिक शेतीपद्धती शिकवण्यासाठी पाठवण्याचे धोरण स्विकारले. अल्बर्ट हॉवर्ड असेच एक संशोधक होते. ते भारतात आले आणि येथील पारंपरिक शेती पद्धतीच्या प्रेमात पडले. ज्या कामासाठी त्यांना भारतात पाठवण्यात आले होते, ते काम ते करत नाहीत, उलट भारतीय शेती पद्धतीचा पुरस्कार आणि प्रसार करत आहेत, अशा हॉवर्ड यांच्याविरूद्ध तक्रारी करण्यात आल्या. यामध्ये कंपन्याना त्यांची उत्पादने विकायची होती. हॉवर्ड यांचे वर्तन मात्र कंपन्यांच्या ध्येयधोरणाच्या विरूद्ध होते. ते पारंपरिक भारतीय शेती पद्धतीच योग्य असल्याचे प्रतिपादन करत. त्यांच्या शेती पद्धतीची फळे इंग्लंडच्या महाराणीने चाखली आणि हॉवर्ड यांना शिक्षा करणे तर दूरच, उलट त्यांना ‘सर’ ही पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. हॉवर्ड यांच्या या प्रयत्नांना सर्वमान्यता मिळण्याऐवजी रासायनिक खत कंपन्यांनी भारतीय शेती पद्धती आणि हॉवर्ड यांच्यावर टिकेची झोड उठवली. मोठी बदनामी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात जगातील बहुतांश राष्ट्रे कंगाल झाली. इंग्लंडही याला अपवाद नव्हते. इंग्रजांनाही सूर्य कधीही न मावळणारे साम्राज्य सांभाळणे कठीण झाले आणि भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र तोपर्यंत भारतीय कृषीक्षेत्राची पूर्ण वाट लागली होती.     

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेतीकडे लक्ष देणे गरजेचे होतेच. सरकारनेही त्यादृष्टिने प्रयत्न सुरू केले. भारत सरकार, संशोधक या सर्वांनीच भारतीय शेती पद्धतीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सेंद्रीय शेतीची फळे तत्काळ मिळत नाहीत. त्यासाठी वाट पाहावी लागते. शेतीचे उत्पादन वाढेपर्यंत लोकसंख्या वाढ मात्र थांबली नाही. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. इंग्रजानी बदललेल्या शेती पद्धतीतून शेतकरी आणि शेती रातोरात बाहेर पडू शकत नव्हते. त्यातच स्वातंत्र्य पडल्यानंतर पाठोपाठ काही दुष्काळाची वर्षे आली. पुरेसे अन्न न ‍मिळाल्याने काही प्रमाणात जिवितहानी झाली. पुढे अन्नधान्याची आयात करण्यात येऊ लागली. १९७२ च्या दुष्काळापर्यंत अशी अन्नधान्याची आयात करणे क्रमप्राप्त झाले. अमेरिकेसारखी राष्ट्रे भारताला अन्न विकतानाही मुजोरी दाखवत. भारताला अक्षरश: याचकाप्रमाणे धान्य विकत घेण्यासाठीही मिनतवाऱ्या कराव्या लागत. या सर्व परिस्थितीची जाण आणि भान असणारे डॉ. स्वामीनाथन हे त्यांच्या कर्तृत्वाच्या परमसीमेवर होते. त्यांच्याखेरीज इतरही कृषी संशोधक कृषी उत्पादन वाढावे, यासाठी प्रयत्न करत होते.

जानकी अम्मल यांनी भारतीय ऊसाचा गोडवा वाढवला होता. ऊसाचे संकरीत वाण तयार केले. शर्करेचे जास्त प्रमाण असणारे ऊसाचे वाण तयार करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. कृष्णस्वामी रामय्या यांनी संकरीत वाण निर्मितीचे तंत्र अवगत असणारे अनेक संशोधक घडवले. बेंजामीन पिअरी पाल यांनी तर भाताबरोबर गुलाब आणि बोगनवेलीच्या असंख्य वाणांची निर्मिती केली. दिलबागसिंग अठवाल यांनी ‘कल्याण सोना’सारख्या आजही सुप्रसिद्ध असणाऱ्या गव्हाच्या वाणाची निर्मिती केली. एम.व्ही. राव यांनी भारत तेलबियांच्या उत्पादनात स्वंयपूर्ण व्हावा, यासाठी योगदान दिले. बद्रीनारायण बारवाले यांच्यासारख्या शेतकऱ्यांने बीजनिर्मिती आणि वितरण व्यवस्था महिकोच्या माध्यमातून भक्कम केली. संशोधकांचे असे प्रयत्न सुरू असताना दादाजी खोब्रागडे यांच्यासारखा शेतकरी आपल्या कल्पक डोक्याने संकरीत वाणांची निर्मिती करत होते. आजही प्रसिदध असलेला ‘एचएमटी तांदूळ’ दादाजींची भारताला सर्वात मोठी देणगी आहे. मद्रास भागात जी. नमलवार हे सेंद्रीय शेतीचा सर्वत्र प्रसार करत होते. संशोधक आणि शेतकरी शेतीत नवे प्रयोग करत असताना दुसरीकडे आधिकाधीक क्षेत्र शेतीखाली यावे यासाठी सरकार प्रयत्न करत होते.

तोपर्यंत भारतातील बहुतांश शेती ही निव्वळ पावसावर अवलंबून होती. त्यामुळे बहुतांश क्षेत्रामध्ये एकच पीक घेतले जात असे. वर्षभर शेती पिकवायची असेल तर त्यासाठी पाण्याची गरज होती. यासाठी जायकवाडी, उजनी, कोयना ही जशी महाराष्ट्रामध्ये धरणे बांधण्यात आली, तशीच ती देशभर बांधण्यात आली. यामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले. तरीही शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत नव्हते. संशोधकांनी संकरीत वाणही बनवले होते. मात्र हे प्रयत्न वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यास पुरेसे पडत नव्हते. स्वामीनाथन जगभरात अन्नधान्याच्या उत्पादनवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष ठेवून होते. अमेरिका आणि जपान या राष्ट्रांनी या क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली होती. स्वामीनाथन यांनी श्रीमंतीच्या तोऱ्यात वावरणाऱ्या अमेरिकेकडे मदतीचा हात मागण्यापेक्षा जपानकडे सहकार्य मागितले. मात्र जपानमध्ये झालेल्या क्रांतीमागे नॉर्मन बोरलॉग यांचेच सहकार्य होते. जपानच्या संशोधकांनी मदत तर केलीच पण त्यांनी जपानकडून मिळणाऱ्या वाणांपेक्षा नॉर्मन बोरलॉग यांच्याकडील बियाणे भारतीय वातावरणात जास्त उपयुक्त ठरतील असे कळवले.

स्वामीनाथन यांनी बोरलॉग यांच्याकडे बियाणे पाठवण्याची विनंती केली. विश्वकल्याणाचा विचार करणाऱ्या बोरलॉग यांनी ती मान्य केली. बियाणे पाठवले. स्वत: भारतात येऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना शांततेचे नोबेल देण्यात आले. संशोधकांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला. पद्धती समजावून सांगितली आणि भारतीय शेतकऱ्यांच्या सहकार्याने भारताने हरीत क्रांती झाली. हरीत क्रांती घडवून आणताना त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करण्यात आला नाही. विचार करण्यासाठी वेळही नव्हता. सुरुवातीला काही वर्षे शेती उत्पादन वाढले. मात्र संकरीत वाणांना आवश्यक असणारी पोषकद्रव्ये मिळावीत, यासाठी रासायनिक खते देणे गरजेचे बनले. तसेच संकरीत वाणांवर कीड पडते. रोग आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे आवश्यक बनले. पुढच्या मोसमांमध्ये आणखी जास्त मात्रा वापरावी लागते. याचा परिणाम जल, जंगल आणि जमीन यावर होत गेला. किटकनाशके, खते यांच्या अतिरीक्त वापरांमुळे जमीन क्षारपड होऊ लागली. जल प्रदुषणाचे प्रमाण वाढले. मातीचा पोत बिघडला. अखेर संशोधकांनी आणि शेतकऱ्यांनी आपले लक्ष सेंद्रीय शेतीवर केंद्रीत केले आहे.

रासायनिक खते, किटकनाशके यांचा वापर करण्यापेक्षा निसर्गातून मिळणाऱ्या घटकांचा वापर करून शेती पिकवण्याचे तंत्र वापरण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष गेले आहे. निसर्गातून मिळणाऱ्या घटकांचा उपयोग करून शेती पिकवण्याच्या पारंपरिक पद्धतींचे पुनरूज्ज्वीन आणि त्यामध्ये आवश्यक शास्त्रीय बदल, प्रयोग करण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली अन्नधान्ये, शेतीजन्य पदार्थ, फळे यांची भारतातील बाजारपेठेत मागणी वाढत आहे. भावही चांगला मिळत आहे. मात्र सेंद्रीय शेती पद्धती पूर्ण विकसीत होऊन वाढलेल्या लोकसंख्येचे पोट शांत करेल, इतके उत्पादन निर्माण करण्याची क्षमता येईपर्यंत मिश्र शेती पद्धती कायम ठेवावी लागेल. अन्यथा पुन्हा मोठे संकट उभे राहू शकते आणि जागतिक स्तरांवरील अस्थिर वातावरण पाहता ते परवडणारे नाही. शासनाने अशा शेतीला उर्जितावस्था प्राप्त होईपर्यंत अनुदान द्यायला हवे.

असे झाले तरी इंग्रजी राजवट आल्यापासून थेट कृषी डतपादकांना बाजारात वाढलेल्या भावाचा उपयोग किंवा फायदा होत नाही. शेतकरी आजही असंघटीत असल्याने बाजार भावाचा लाभ शेतकऱ्यास मिळू दिला जात नाही. हे टाळण्यासाठी सामुहीक शेतीचे प्रयोग व्हायला हवा आहे. खेडी अन्नधान्य आणि त्यांच्या गरजांच्यासाठी स्वायत्त होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची आंदोलने होतात, मात्र ती पूर्ण यशस्वी होताना दिसत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्च आणि मिळणारे पैसे यातून भरीव नफा मिळत नाही. त्यामुळे उपजिविकेसाठी त्याला आलेले कृषी उत्पादन तत्काह विकावे लागते. दुसरी मोठी समस्या येते ती अन्नधान्य साठवून ठेवण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही. त्यामुळे माल भाव चांगला येईपर्यंत ठेवायचे कोठे? हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. शेतकऱ्यांना गोदामांची सहज सुविधा उपलब्ध व्हायला हवी.

भारतीय शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करणे भविष्यात फार गरजेचे असणार आहे. एकीकडे पारंपरिक शेती ते सेंद्रीय शेती हे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. मात्र अन्नधान्य उत्पादन वाढवायचे असेल तर जनुकीय वाणांना मर्यादित रूपात स्विकारणे आवश्यक आहे. दुसरीकडे मूळ देशी वाणांचे जतन करत त्यांच्यापासून आधिक उत्पादन ‍मिळवण्यासाठी संशोधनाची गरज आहे. नवे संकरीत वाण शोधावे  लागतील. जागतीक तापमान वाढ आणि त्यामुळे होणारे बदल, निसर्गाचा लहरीपणा शेती क्षेत्रावर मोठे परिणाम करणार आहे. त्यातून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना संशोधकानी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यानीही या सर्व गोष्टी समजून घेऊन आवश्यक बदल तातडीने स्विकारण्याची गरज आहे. तरच शेती आणि शेतकरी ‍टिकेल!

-०-