रविवार, १९ जून, २०२२

पावसाचे निसर्ग संकेत

 

पन्नासेक वर्षापूर्वी सात जूनला पाऊस येणार हे ठरलेले असायचे. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. मात्र तो केव्हा, किती आणि कोठे पडणार, हे नेमके सांगता येणे कठीण झाले आहे. मानवाचे निसर्गाशी असणारे नाते दुरावलेले आहे. पशू, पक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपले आहे. त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात. आणि त्याप्रमाणे ते व्यक्तही होतात. मानवाला मात्र ते समजून येत नाही. मानवाने पुन्हा निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गाचा आपला संबंध पुनर्प्रस्थापित करायला हवा, तर पावसाबाबतचे निसर्ग संकेत समजू लागतील. 

______________________________________________________

    यावर्षी पाऊस वेळेवर येणार आणि सरासरीपेक्षा जास्त येणार, अशी बातमी आली. शेतकऱ्याला निदान पाण्यासाठी त्रासावे लागणार नाही. लातूरला रेल्वेने पाणी पाठवावे लागणार नाही, या विचारात असतानाच निसर्गातील पर्जन्याबद्दल संकेत देणाऱ्या घटकांचे चित्र नजरेसमोर आले आणि अंदाजाबद्दल साशंकता निर्माण झाली. अर्थात या अभ्यासाला शास्त्रीय अभ्यासाची जोड नाही. प्रयोगातून काढलेले नेमके निष्कर्ष नाहीत. तरीही, आज निसर्ग संकेतानुसारच घडताना दिसत आहे. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती सर्वांकडून पावसाचे संकेत मिळतात. हे संकेत निसर्गातील अनेक घटकांना ओळखता येतात. बरेच संकेत आजही ज्येष्ठांच्या मुखातून नव्या पिढीला कळतात. सहदेव भाडळी या ग्रंथात याबद्दल काही संकेत आढळतात. संस्कृत ग्रंथांतही काही उल्लेख आढळतात. एकविसाव्या शतकातही, मेंढ्यांच्या पोषणासाठी फिरणारे मेंढपाळ, भटकणारा बंजारा समाज यांच्याकडून पावसाचे प्रमाण आणि निसर्ग संकेताबद्दल ऐकायला मिळते.

      पावसाचा संकेत सर्वात चांगला देतो, तो म्हणजे कावळा. कावळ्याचे घरटे तो तीन फांद्याच्या बेचक्यात आणि काटक्यांच्या सहाय्याने बांधतो. त्याचे घरटे जर झाडाच्या उंच टोकाला असेल, तर पावसाचे प्रमाण कमी असते. कावळ्याचे घरटे मध्यभागी असेल, तर पाऊस नेहमीसारखा आणि पिकांना उपयुक्त पडतो. कावळ्याचे घरटे खालच्या बाजूला असेल, तर अतिवृष्टी किंवा पाऊस जास्त पडतो. कावळ्याचे घरटे झाडाच्या कोणत्या दिशेला आहे, यावरूनही पावसाचे अनुमान समजते. घरटे पश्चिमेला असेल तर सरासरीएवढा, पूर्वेला असेल तर जास्त आणि दक्षिण किंवा उत्तरेस असेल तर कमी पाऊस असा अंदाज असतो.

      टिटवीचे घरटे माळरानावर असते. तिचे घरटे छोट्या दगडांच्या सहाय्याने बनवलेले असते. पावसाळ्यापूर्वी ती अंडी घालते. अंड्यांच्या संख्येवरून किती महिने पाऊस पडणार, याचे सूचन होते असे मानले जाते. चार अंडी असतील, तर भरपूर पाऊस, तीन अंडी असतील तर सरासरीइतका आणि त्यापेक्षा कमी अंडी असल्यास अवर्षणाचे वर्ष, असा अंदाज असतो. तित्तर पक्षी मोठमोठ्याने आवाज करू लागला, की लवकरच पाऊस पडणार, असे ओळखून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. तसेच पावशाचेही आहे. ‘पेर्ते व्हा’ असा संदेश देत पावशा ओरडू लागला की लवकरच पाऊस येणार, असा अंदाज बांधला जातो. पावसाळा जवळ आला आहे, याचे संकेत आफ्रिकेतून भारतात येणारे चातक पक्षीही देतात. चातकांची गर्दी लवकर दिसू लागली, तर पाऊस लवकर येणार, हे ठरलेले. त्याचे येणे लांबले तर पावसाळा उशिरा सुरू होतो. पाऊस कमी येणार असेल, तर त्या वर्षी हरणे पिल्लांना जन्म देत नाहीत. वाघीणसुद्धा दुष्काळ पडणार असेल, तर पिल्लांना जन्म देत नाही. समुद्रात आढळणारा वादळी पक्षी किनाऱ्यावर येतो आणि कोळी बांधवांना वादळाची पूर्वकल्पना देतो. समुद्रकिनारी राहणारे लोक खेकडे आणि मासे यांच्या प्रवासाच्या दिशेवरून आणि काळावरून पावसाचा अंदाज बांधतात. काळ्या मुंग्याचा समूह तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करत असल्यास लवकरच मोठा पाऊस येणार असल्याचा संकेत मिळतो. वाळवीला पंख फुटून ती हवेत उडू लागल्यास लवकरच पाऊस पडतो. तसेच पाऊस जोरात येणार असेल, तर सरपटणारे प्राणी सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करतात. चिमण्या धुळीमध्ये अंग घुसळू लागल्या की दोन-तीन दिवसांत पाऊस पडतो.

निसर्गातील झाडे पावसाच्या प्रमाणाबद्दल आणि पावसाच्या काळाबद्दल अचूक संकेत देतात, असे अनेक अभ्यासकांनी नोंदवलेले आहे. त्यातील बहावा हा महत्त्वाचा वृक्ष मानला जातो. बहावाच्या झाडांनी फुलायला सुरुवात केली की चार महिन्यांच्या आत पाऊस पडायला सुरुवात होते. चिंचेच्या झाडांना फुलोरा जास्त आला तर पाऊस अधिक पडतो आणि कमी आला तर पाऊस कमी पडतो. जास्त पावसामुळे फुले आणि कोवळी फळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे चिंचेच्या झाडाने ही केलेली सोय असावी. बिबा, खैर आणि शमीची झाडे जास्तच फुलल्यास कमी पाऊस पडतो. या झाडांना पाणी कमी मिळाल्याने त्यांच्या फुलांची गळ जास्त होते. ज्या वर्षी आंबे मोठ्या प्रमाणात आलेले असतात, त्यानंतर येणारा पावसाळा हा कमी पावसाचा असतो.

निसर्गातील पावसाचे संकेत देणारे सर्व घटक तसेच कार्यरत आहेत; मात्र त्यांचे वागणे बदलले आहे. कालिदासाच्या ‘मेघदूत’ या सुप्रसिद्ध काव्याची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. मेघदूतामध्ये ढगांचे आणि पावसाचे सुंदर वर्णन आहे. यावरून साधारण सोळाशे वर्षांपूर्वी पाऊस आजच्यासारखा येत होता. पन्नासेक वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असे ठरलेले असायचे. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. मात्र तो कोठे, किती आणि केव्हा पडणार, हे नेमके सांगता येणे कठीण झाले आहे. पूर्वीपेक्षा ढगफुटीचे (कमी वेळात जास्त पाऊस) प्रमाण आणि ठिकाणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. पूर्वी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीयोग्य पाऊस पडत असे. पिके रूजण्यासाठी तो विश्रांती देत असे. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये मोठे पाऊस येत. पिके भरात आली, पक्व होऊ लागली की सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होत असे. रब्बीची पीके पेरून झाली की पुन्हा दोन-तीनवेळा पाऊस येत. मात्र रानातून क्वचितच पाणी बाहेर येत असे.

जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गातील जलचक्रावर मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याच्या अभ्यासातून मागील काही वर्षात अचूक अंदाज येऊ लागले होते. मात्र सूक्ष्मरूपात हे अंदाज चुकतात. अर्थात जागतिक पातळीवर पर्यावरणाचे अभ्यासक याबद्दल मागील काही वर्षांपासून भीती व्यक्त करत आहेत. ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ या संशोधकांच्या गटाने आपल्या सहाव्या अहवालामध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या अहवालात त्यांनी पर्जन्यचक्रामध्ये अनपे‍क्षित आणि मोठे बदल होणार असल्याचे २०२१ मध्येच जाहीर केले आहे. त्यानुसार कमी काळामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडेल. काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका संभवतो. यामुळे अतिवृष्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात पूर येणार आहेत. पूर आणि अवर्षण दोन्ही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान संभवते.


यावर्षी मेपासून हवामान विभागाने पूर्व अभ्यास आणि सध्याचे वातावरणात होणारे बदल यावरून अंदाज व्यक्त केले. सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचे अंदाज व्यक्त केले. हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाज पावसाच्या प्रमाणाबाबत अचूक निघणार याबद्दल शंका नाही; मात्र निसर्गातील संकेतानुसार पावसाच्या वेळा बदलतील, असे दिसते. निष्पर्ण गुलमोहोर ऐन उन्हाळ्यात लालजर्द फुलांनी फुललेला आढळत असे. उन्हामुळे बेजार मनाला तोच फुलवत ठेवायचा. मात्र यावर्षी गुलमोहोर जूनच्या मध्यावरही अगदी छान फुललेला आहे. हिरवीगार पाने आणि त्यांच्या टोकाला लाल फुलांचे गुच्छ पाऊस उशिरा येणार असल्याचेच संकेत देत आहेत. बहावाची झाडे अजूनही भरभरून फुललेली आहेत. बहावाला जूनच्या मध्यावर पाने आणि फुले लगडलेली दिसतात. बहावाच्या झाडाकडूनही, दीर्घ काळ पाऊस पडत राहणार असल्याचे संकेत येतात. धामण आणि पांढरफळी या झाडांची अवस्थाही तशीच आहे. दरवर्षी पंधरा दिवसांत सर्व पांढरफळीची झाडे फुलत. मात्र यावर्षी पांढरफळीची काही झाडे फुलून त्यांना फळे आलेली आहेत, तर काही झाडांना जून संपत आल्यावर फुलोरा आलेला आहे. धामणीची झाडे पाऊस येण्याअगोदर एक महिना फुलतात. मात्र यावर्षी अजूनही झाडे फुलत आहेत. दुसरीकडे कावळ्यांची घरटी टोकाला नाहीत. याचा अर्थ पाऊस येणार, भरपूर येणार, मात्र तो उशिरांने येणार, याचेच संकेत निसर्ग देत आहे.

मानवाचे निसर्गाशी असलेले नाते आज दुरावलेले आहे. झाडे, पशू, पक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपले आहे. त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि त्याप्रमाणे ते व्यक्तही होतात. मानवाला मात्र ते समजून येत नाही. मानवाने पुन्हा निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गाचा आपला संबंध पुनर्प्रस्थापित करायला हवा. त्यासाठी झाडे लावायला आणि जगवायला हवीत. यातून जल-जंगल-जमीन यातील समतोल राखला जाईल. झाडांबरोबर पाणी टिकून राहिल, पशू, पक्षी येतील आणि त्यांनी दिलेले निसर्ग संकेत आपल्याला समजू लागतील. 


दिनांक १९ मे २०२२ रोजी दै. पुढारीच्या बहार पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख


रविवार, ५ जून, २०२२

कल्पवृक्ष काजू!

 विदेशी वृक्षामूळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे, हे खरेच आहे. विदेशी झाडे स्थानिक पर्यावरणाशी एकजीव व्हायला शेकडो–हजारो वर्षांचा काळ जातो. त्यावर पक्षी घरटी बांधत नाहीत. जनावरे त्याला अन्न म्हणून स्वीकारत नाहीत. विदेशी वृक्षांची लागवड करू नये, हे खरेच! मात्र याला अपवाद आहे काजू. सोळाव्या शतकाच्या मध्यावर काजू भारतात आला आणि इथलाच झाला. डोंगररांगाची धूप थांबवण्यासाठी काजूच्या झाडांची पोर्तुगीजांनी कोकणात लागवड केली आणि आज काजू उत्पादन आणि निर्यातीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. विदेशी असूनही कल्पवृक्ष बनलेल्या काजूविषयी…

____________________________________________________

मुलीचं लग्न होते. ती सासरी जाते. सासरच आपलं घर मानते. माहेरचं सारे काही विसरून, सासरी मिसळून जाते. सासरचीच होऊन जाते. अगदी दुधात साखर मिसळावी तशी. असंच काहीसे एका झाडाबद्दल झाले. विदेशी वृक्षांचा मलाही राग येतो. वेगळी वनस्पती म्हणून एखादा वृक्ष लावणे वेगळे. मात्र ते अनिर्बंध लावू नयेत. वेगाने वाढतात, खडकाळ जमिनीवर वाढतात म्हणून लावू नका, असेच मी सांगतो. विदेशी वृक्षांना नव्या वातावरणात मिसळून जायला हजारो वर्षे जातात. स्थानिक प्राणी, पक्षी त्या झाडाला आपलेसे करत नाहीत. गुलमोहोराचेचं घ्या ना! सुंदर फुले येणारे झाड म्हणून ते शेकडो वर्षांपासून भारतात लावले, वाढवले जाते. मात्र अजूनही त्या झाडावर पक्षी आपले घरटे बनवत नाहीत. आताशा कोठे कधीतरी पोपट गुलमोहोर फुलल्यावर दिसतात. फुलातील कोवळी शेंग खातात. मात्र अजूनही इतर पक्षी त्यावर दिसत नाहीत. शेळ्या मेंढ्या याची पाने खाताना दिसतात. मात्र एक झाड भारतात सोळाव्या शतकाच्या मध्यावर आले आणि इथलेच झाले. हे झाड विदेशी आहे, यावर अनेकांचा विश्वासही बसत नाही, एवढे ते इथले झाले. एवढेच नाही, तर त्याच्या बियांच्या निर्यातीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. असे हे झाड म्हणजे काजू.

सोळाव्या शतकात काजू भारतात आला. पोर्तुगीज लोकांनी १५५७ मध्ये ब्राझीलमधून काजू आणून गोवा आणि इतर भागात लावण्यास सुरुवात केली. त्याचे कारणही वेगळेच. पश्चिम किनारपट्टीवरील डोंगररांगाची धूप टाळण्यासाठी त्यांनी काजूची झाडे लावली. काजूची पाने पसरट असतात. ती वर्षभर गळत असतात. त्यामुळे पावसाच्या थेंबांचा थेट मातीशी संबंध येत नाही. त्यामुळे झाडाखालील माती वाहून जात नाही. भारतात आल्यानंतर अवघ्या सहा शतकात हे झाड येथील वातावरणात मिसळून गेले. आज काजू उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. भारतात काजूचे प्रतिवर्ष ७,४३,००० टन काजू उत्पादन होते. तर जगातील एकूण काजू निर्यातीत भारताचा वाटा साठ टक्के आहे.

याचे काजू नावही भारतीय नाही. कठीण कवचाच्या फळास काजू असे पोर्तुगीज भाषेत म्हणतात. तेच नाव मराठीतही रूढ झाले. त्याला विलायती मँगो असेही म्हणतात. हिंदीमध्ये ‘हिज्जली बदाम’, कन्नडमध्ये ‘गेरू’, मल्याळममध्ये ‘कचुमाक’, आणि तेलगूमध्ये ‘जिडिमा मिडी’ असे म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव ॲनाकॉर्डियम ऑसिडेंटल आहे. त्याच्या फळाचा आकार हृदयासारखा असल्याने ॲनाकॉर्डियम, तर पश्चिमेत आढळणारे म्हणून ऑसिडेंटल असे ‘ॲनाकॉर्डियम ऑसिडेंटल’ असे नाव मिळाले. युरोपियन लोकांनी काजू प्रथम १५५८ मध्ये ब्राझीलमध्ये शोधले. त्यांना हे फळ खाल्ल्यानंतर प्रथम त्रास झाला. त्यामुळे त्यांना हे फळ खाण्यायोग्य नाही, असे वाटत असे. काही दिवसानंतर तेथील स्थानिक लोक (टुपी-इंडियन्स) फळांचे वरचे आवरण काढून ते खाताना युरोपियन लोकांनी पाहिले. पोर्तुगीज लोकांनी ही फळे भाजून त्यांचे आवरण काढून टाकण्यास सुरुवात केली आणि काजूचा समावेश अन्नपदार्थांत झाला. त्यापूर्वीच त्यांनी भारतात काजूची लागवड करण्यास सुरुवात केली होती. भारतात मात्र काजूचा खाण्यासाठी वापर प्रामुख्याने विसाव्या शतकात सुरू झाला.  

अशा या काजूच्या झाडाची लागवड प्रामुख्याने बियांपासून केली जाते. बी रूजून कोंब वर येताना टरफलाला डोक्यावर मुकूट असावा, तसे घेऊन येते. टरफलाखाली झाकलेल्या दोन पाकळ्या असतात. टरफलाला खाली टाकत पाकळ्यांमधून पोपटी कोंब वर येतो. पाकळ्या वगळता येणारी पाने ही इतर पानांसारखी असतात. रोप तीन-चार पानावर येताच पाकळ्याही गळून जातात. काजू हे उष्णकटिबंधीय सदाहरित वृक्ष आहे. पाण्याचा निचरा होणाऱ्या, खडकाळ जमिनीत काजूंची वाढ चांगली होते. दमट हवामान काजूच्या झाडासाठी पोषक ठरते. या पिकाला आम्लधर्मीय जमीन चांगली मानली जाते. तसेच झाडाला मोहोर येण्याच्या काळात ज्या भागात हवामान ऊष्ण आणि कोरडे असते, त्या भागात ही झाडे चांगले उत्पादन देतात. थंड हवामानाच्या आणि धुके पडणाऱ्या भागात काजूचे चांगले उत्पादन मिळत नाही. समुद्रसपाटीपासून सातशे मीटर उंचीपर्यंत हे झाड वाढते. तसेच ४००० मिलीमिटर पाऊस सहन करण्याची ताकत या झाडात आहे. चांगला सूर्यप्रकाश या झाडाच्या वाढीसाठी चांगला, सावलीत त्यांची चांगली वाढ होत नाही.

काजूची झाडे पन्नास फुटापर्यंत वाढतात. काजूचे काही बुटके वाणही आहेत. खोडावर पाने गोलाकार येतात, मात्र समोरासमोर नसतात. खोड वेडेवाकडे वाढते. पाने कातडीसारखी, अंडाकृती असतात. ती देठाकडे निमुळती असतात. पानावर देठापासून टोकापर्यंत निमुळती होत जाणारी मुख्य शीर असते. सुरुवातीला शिरेला समोरासमोर उपशीरा फुटतात. त्या कडेपर्यंत वाढत जातात. पुढे मात्र उपशीरा समोरासमोर नसतात. उपशीरांपासून फुटलेल्या छोट्या पोपटी-पिवळ्या रंगांच्या शीरांची छान नक्षी बनते. खोडावर पाने गोलाकार असतात. पान खोडाला जेथे फुटते तेथे जाड देठ असते. पानांची लांबी चार ते बावीस सेंटिमीटर तर रूंदी दोन ते पंधरा सेंटिमीटर असते. पानांच्या वरच्या बाजूचा रंग पोपटी हिरवा असतो. खालचा रंग थोडासा फिका असतो. पाने जून होतात, पिवळी पडतात तरीही खोडाला चिकटून असतात. पूर्ण वाळल्यानंतर, काही दिवसांनी ती गळतात. काजूचे रोप लावल्यानंतर एक-दोन फुटांचे होताच, त्याला फांद्या फुटू लागतात. काजू तसे वेगाने वाढणारे झाड आहे. मात्र उंची वाढवण्यापेक्षा विस्तारवृद्धीकडे या झाडांचा कल जास्त असतो. त्यामुळे ते झुडपासारखे वाढत जाते. झाड डेरेदार बनते. झाड सदाहरीत असल्याने त्याची सावली गडद असते. काजूचे झाड तीन वर्षाचे होताच, त्याला फांद्यांच्या टोकाला कळ्यांचे गुच्छ येतात. गुच्छामध्ये कळ्यातून बाहेर येणाऱ्या पाकळ्या पांढऱ्या रंगांच्या असतात. गुच्छाची लांबी दहा ते बारा सेंटिमीटर असते.

काही दिवसांत कळ्या उमलू लागतात. कळ्या उमलताच हिरव्या-पोपटी रंगाचे फुल तयार होते. काही वेळात पाकळ्यांचा रंग पिवळा होतो. त्या पिवळ्या पाकळ्यावर नंतर गुलाबी लाल रंगाची छटा येते. या संक्रमणातील फुल सुंदर दिसते. या फुलातील काही फुलांचे परागीभवन मुंग्या आणि कीटकांमार्फत होते. विशेषत: मुंग्या या फुललेल्या झाडांवर वावरत असतात. परागीभवन झालेल्या फुलांखेरीज इतर फुले गळतात. मात्र कळ्यांची देठे तशीच झाडाला चिकटून बसतात. परागीभवन झालेल्या फुलापासून फळ वाढू लागते. फळाची रचना दोन वेगळ्या भागात असते. देठाकडे मऊ तंतुमय भाग असतो. त्याला आभासी फळ मानले जाते. त्याला बोंडू असेही म्हणतात. ते कच्चे खाल्ले जाते. त्यापासून सरबत आणि मद्य बनवले जाते. बोंडूपासून बनवलेल्या मद्यास फेणी म्हणतात. ते लहान सफरचंदाच्या आकाराचे असते. त्याची लांबी पाच ते सहा सेंटिमीटरपर्यंत असते. काजू ज्या भागापासून मिळतात, तो फळांचा दोन ते तीन सेंटिमीटर लांब आणि आठ ते १५ मिलीमिटर रूंद भाग कठीण असतो. किडनीच्या आकाराचे हे खरे फळ असते. यामध्येच बी असते. बीवर एक आवरण असते. हे आवरणही सुरुवातीला हिरवे असते. पुढे त्याचा रंग करडा होत जातो. हा भाग सुरुवातीला बोंडूपेक्षा वेगाने वाढतो. त्यानंतर मागील मऊ भाग, म्हणजेच आभासी फळ वाढू लागते. काजू म्हणजेच बी असणारा भाग मात्र नंतर वाढत नाही. चार ते पाच महिन्यांत मागील भागही वाढत जातो. सुरुवातीला हिरवा असणारा बोंडूचा भाग पुढे पिवळसर होतो. फळ पक्व होत असताना बोंडूचा रंग पिवळा किंवा लालसर होत जातो. बोंडूवर चढउतार असतात. काजू मात्र मऊ आणि सपाट असतो. देठाकडे आणि काजू जेथून सुरू होतो, तेथे बोंडू आत ओढल्यासारखा असतो.

बोंडू पिकल्यानंतर काजूसह फळ खाली गळते. शेतकरी पक्व काजू झाडांवरून तोडतात. काजू फळ बोंडूपासून वेगळे करून वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. बोंडूचा गर काढून त्यापासून उत्तम सरबत मिळते. तर बोंडू कुजवून त्यापासून मद्यनिर्मिती केली जाते. काजू फळांचा मात्र रूबाब कायम असतो. कच्च्या फळावरील साल काढून त्यापासून कोकणात भाजी बनवतात. याला काजूगराची भाजी म्हणतात. कच्च्या फळांच्या आवरण काढणे मोठे जिकीरीचे आणि त्रासाचे असते. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कॉस्टिक तेल असते. त्या रसाचा त्वचेला स्पर्श झाल्यास फोड येतात. ओल्या काजूगरांना सालीपासून वेगळे करताना हाताला गोडे तेल लावतात. हातात ग्लोव्हज घातले तरी सालीतील चिक त्वचेपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बोटावर फोड येतात किंवा त्वचा काळी पडते. दुसरा प्रकार म्हणजे काजू वाळवले जातात. नंतर भाजले की वरील आवरण सहज दूर होते आणि आतील पांढरेशुभ्र नेहमीचे, ज्या भागात काजू पिकतही नाहीत, तेथील लोकांना माहीत असणारे काजू मिळतात.

‘ढ’ मुलांना अनेकदा ‘काजू बदाम खाण्याचा आणि अक्कल मिळवण्याचा’ सल्ला दिला जातो. काजू गर हे खरोखरच उत्तम अन्न आहे. काजू पोटाचे आजार, ताप, जंत, जखमा, पांढरा कुष्ठरोग, आतड्याचे संकलन, मूळव्याध, भूक न लागणे इत्यादीवर उपयुक्त ठरतात. काजू हे ऊर्जा, प्रथीने आणि चरबीने समृद्ध असतात. लहान मुले आणि खेळाडूंनी त्याचे अवश्य सेवन केले पाहिजे. कर्करोगाची वाढ नियंत्रित करण्यातही काजू उपयुक्त ठरतात. डोळ्यांच्या विकारांनाही काजू सेवन दूर ठेवते. हाडांची वाढ उत्तम ठेवण्यात काजू सेवन महत्त्वाची भूमिका पार पाडतात. काजूतील खनिजे मन प्रसन्न ठेवण्यात सहाय्यकारी असतात. टरफलापासूनही तेल निघते. याचा उपयोग होड्यांची लाकडे कुजू नयेत म्हणून केला जातो. मचवे आणि मासे पकडण्याची जाळीही या तेलाने रंगवली जातात. जलाभेद्य रंग, रंगद्रव्ये, मोटारींचे गतिरोधक अस्तर इत्यादींच्या निर्मितीतही हे तेल वापरले जाते. ही साल बाजूला काढली की आतमध्ये काजूगर असतो. काजूमध्ये ५.९ टक्के पाणी, २१.२ टक्के प्रथिने, ४६.९ टक्के स्निग्ध पदार्थ. २२.३ टक्के कर्बोदके, २.४ टक्के खनिजे, ०.०५ टक्के कॅल्शियम, आणि ०.४५ टक्के फॉस्फरस असते. १०० ग्रॅम काजू ५९० कॅलरी ऊर्जा देतात. काजूचे बी भाजल्यास त्यांच्या गंध आणि चवीमध्ये मोठा फरक पडतो. काजूला तिखट, मीठ, हळदीसह भाजून खारे काजूही बनवले जातात. वेगवेगळ्या मिठाई आणि अन्नपदार्थांच्या सजावटीसाठी काजूंचा उपयोग होतो. काजू करी हा आता देशभर मिळणारा लोकप्रिय भाजीचा प्रकार आहे. काजू कथली हा आवडता मिठाईचा प्रकार आहे. लाडू, शीरा, खीर, हलव्यामध्येही हल्ली काजूचा वापर केला जातो. काजू बियांपासून मिळणारे तेल हे बदाम तेलासारखे असते. केसाचे गळणे थांबवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच सौंदर्यप्रसाधनाच्या निर्मितीतही हे तेले वापरले जाते. यावेळी मिळणारी पेंड पौष्टिक खाद्य म्हणून वापरली जाते.

मात्र दिवसात पाच ते सहा काजूंचेच सेवन चांगले. आवडतात आणि चवीला उत्तम म्हणून कितीही खाऊ नयेत. तळलेले आणि खारे काजू खाण्यापेक्षा साधे काजू खाणे चांगले असते. काजूमध्ये काही प्रमाणात सोडियम असल्याने त्याचे मर्यादित सेवन चांगले. अमर्याद काजू सेवनाने उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. जास्त काजू सेवन वजन वाढवते. तसेच त्यामध्ये असणारे तंतूमय पदार्थ मोठ्या प्रमाणात पोटात गेल्यास पोटात सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे मर्यादित काजू सेवन हा निरामय आयुष्यासाठी जसे आवश्यक आहे, तसेच अतिसेवन आजाराकडे नेणारे ठरते. 

काजूची साल स्तंभक आहे. साल करड्या रंगाची असते. सालीचा आतला भाग लाल असतो. मात्र वाळल्यानंतर सालीतील रंगद्रव्यामुळे तो काळा होतो. सालीपासून नऊ टक्के टॅनिन मिळते. सालीपासून कपड्यावर खुणा करण्यासाठी शाई बनवली जाते. लाँड्रीमध्ये कपड्यावर खूणा करण्यासाठी, नावे लिहिण्यासाठी हीच शाई वापरतात. काजू झाडापासून एक प्रकारचा डिंकही मिळतो. हा डिंक जंतुनाशक आहे. कुष्ठरोग, नायटा आणि जखमावर तो लावला जातो. काजूचे लाकूड हे वेडेवाकडे वाढत असल्याने त्याचा प्रामुख्याने जळणासाठी उपयोग केला जातो. ते तपकिरी रंगाचे आणि कठीण असते. त्यातही मोठे लाकूड मिळाल्यास होड्या माल वाहतूकीसाठीची खोकी बनवण्यासाठी ते वापरले जाते. तसेच काजूच्या लाकडाचा उपयोग कोळसा बनवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो.

काजूच्या झाडावर रोग पडत असल्याने त्याच्या बुंध्याचा भाग नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. काजूची लागवड आता पीक म्हणून करण्यात येऊ लागली आहे. कोकण कृषी विद्यापीठाने काजू पिकांवर मोठे संशोधन करून कलमी रोपांची निर्मिती केली आहे. काजूच्या बियांपासून त्याच प्रकारची झाडे बनवणे शक्य होत नसे. यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. साधारण ३० फूट अंतरावर काजूंची झाडे लावली जात असत. त्यामध्ये आंतरपीक घेतल्याने झाडाभोवती गवत वाढत नाही. मात्र आंतरपीक दहा ते बारा वर्षांपर्यंतच घेता येते. त्यानंतर अर्थातच एका झाडापासून नऊ ते दहा किलो काजू उत्पादन होते. शेतकरी आता संकरित वाणांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. वेंगुर्ला ४, ५, ६, ७, ९ हे वाण सर्वाधिक पसंतीचे आहे. लागवडीसाठी काजू बियांपासून रोपे बनवली जातात. कलमी रोपांचा वापर आजही तितकासा लोकप्रिय झालेला नाही. चंदगडसारख्या भागात आजही लोक बियांपासून बनवलेली रोपे लावण्यावर भर देतात.

काजू झाड विदेशी असले, तरी आता ते इथलेच झाले आहे. आपणही त्याला आपलेसे केले आहे. असे हे झाड शेतकऱ्यांनी वातावरण आणि जमीन योग्य असल्यास आवर्जून लावावे. नियमित काजू खावेत आणि आपले आरोग्य चांगले ठेवावे. काजूची आणि माझी ओळख मी सहावीत असताना झाली. मोठा भाऊ नोकरीला लागला. मुंबईवरून येताना तो सुक्या मेव्याचे बॉक्स आणत असे. त्यातून काजूची ओळख झाली. पुढे मी पदव्युत्तर शिक्षणासाठी कोल्हापूरला आलो. कोल्हापूरात काजू मसाला, काजू करीची ओळख झाली. ही माझी आवडती भाजी. १९९१ मध्ये सहलीला गणपती पुळ्याला गेलो असताना काजूची झाडे पाहिली. बोंडू खाण्याचा आनंदही घेतला. पुढे २००५-०६ मध्ये विद्यापीठात काजूची झाडे लावली. त्या झाडांकडे पाहिल्यानंतर ती मला बिब्याच्या झाडांसारखी वाटली. दोन्ही झाडांच्या पानांचा आकार सारखाच असतो. तुलनेने बिब्याची पाने थोडी मोठी असतात. दोन्ही झाडांची फुलेही टोकाला येतात. फळांचा मागील भाग मऊ आणि पुढचा भाग कठीण असतो. रंगही सारखेच, मात्र काजूंच्या बोंडूच्या तुलनेत बिब्याचा मागचा माग लहान असतो. बिब्याचे खरे फळ काळे आणि चपटे असते, तर काजूचे बी किडनीच्या आकाराचे. बिब्याचे खरे फळ खाण्यासाठी वापरले जात नाही, मात्र ते औषधी असते. दोघांच्या फळांच्या गुणधर्मात पूर्ण विरोधाभास. काजूचा पुढचा, कठीण भाग अनेक दिवस टिकणारा, खाण्यासाठी वापरला जाणारा असतो, तर बिब्याचा मागचा भाग भाजून वाळवला जातो आणि वर्षभर खाण्यासाठी वापरला जातो. गावाकडे बिब्याची झाडे असल्याने काजू मला नेहमीच जवळचे झाड वाटत आले. काजूच्या झाडात मी बिब्याचे झाड शोधत आलो.

काजूची एक आठवण मात्र कायम लक्षात राहावी, अशी आहे. २७ मार्च २०२१ रोजी शिक्षण समिती कसबा नेसरीचे अध्यक्ष ॲड. हेमंत कोलेकर यांच्या आग्रहामुळे सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यासाठी गेलो होतो. कार्यक्रमानंतर त्यांनी मोठ्या आग्रहाने काजूची बाग दाखवली. प्राचार्य भांबर सर आणि झाडांची निगा राखणारे कर्मचारी सोबत होते. त्यांनी काजू झाडांची माहिती दिली. सोबत माळ्याचे काजू काढणे सुरू होते. त्यांनी बरेचसे पक्व झालेले काजू काढून एका पिशवीत घातले होते. निघताना त्यांनी ती पिशवी माझ्याकडे दिली आणि सांगितले, ‘साहेब, काजू करी नेहमीच खाल्ली असेल. मात्र कच्च्या काजूच्या भाजीची सर त्याला येत नाही. हे भाजीसाठी काजूगर’. अर्थातच काजूवरील साल काढताना काय काळजी घ्यावी, याचीही माहिती दिली. ती प्रेमाने दिलेली काजूगरांची पिशवी घेतली. कोल्हापूरला आल्यानंतर ती पिशवी सौभाग्यवतींच्या हाती सोपवली.

त्यांनी ती पिशवी तशीच बाजूला ठेवत, ‘काजूगरावरील साल काढणे किती कठीण आहे आणि ते कशाला आणले’ यावर मस्त व्याख्यान दिले. अखेर मीही (सर्व पतीराजांप्रमाणे) परिस्थितीला शरण जात, काजू गरावरील साल काढून देण्याचे मान्य केले. सौभाग्यवतींच्या सूचना सुरू होत्या. हाताला गोडे तेल लावायला दिले. हातावर ग्लोव्हज घालावयास लावले. मी सुरी घेऊन काजूंचा सामना करू लागलो. अवीट चवींच्या काजूंची साल काढणे इतके कठीण असेल, याची मला खरंच कल्पना नव्हती. मात्र एकदा घेतलेले काम सोडायचे नाही, यापेक्षा सौभाग्यवतीला मोठ्या आवेशात गर सालीपासून वेगळे काढून देण्याचे मान्य केले असल्याने हातातील सुरीच्या सहाय्याने मी त्यांच्यावर तुटून पडलो. काजूची फोड म्हणजेच काप करणेसुद्धा कठीण गेले. मात्र हरलो नाही. अखेर सर्व काजूगरांवरील साल काढण्यात मी यशस्वी झालो. विजयी योद्ध्याच्या थाटात ते पांढऱ्याशुभ्र काजू गरांचे ताट सौभाग्यवतीच्या हाती सोपवले. तिनेही त्याची छान भाजी केली. एवढे कष्ट केल्यानंतर ती भाजी छान लागली नसती, तरचं नवल. काजूगरांची साल काढण्याच्या आवेशात लक्षात काहीच आले नव्हते. काम संपल्यानंतर दोन-तीनवेळा हात स्वच्छ धुतले. मात्र हाताचा गुळगुळीतपणा काही गेला नाही. जेवण करून शतपावली संपवताना लक्षात आले हाताच्या वरच्या भागात काही काळे डाग पडले आहेत. दुसऱ्या दिवशी हाताची बोटेही काळसर झाली होती. काजू गरांच्या सालीतील आम्ल किती तीव्र आणि भेदक आहे, याची चांगलीच जाणीव झाली. त्या भाजीची चव जशी अनेक दिवस जिभेवर होती, तसेच हे काळे डाग बोटांवर आणि हातावर होते. कोकणातील महिलांच्या कष्टाचे आश्चर्य वाटते. शामसुंदर मिरजकर या कवीवर्यांशी एकदा या विषयावर चर्चा झाली. त्यांनी आपल्या लहानपणी असाच काजूगरांचा चिक हाताला लागला होता. त्यावेळी वडिलधाऱ्या शेजाऱ्यांने हात तांदळामध्ये घुसवून ठेवायला लावले. त्यामुळे हाताची होणारी आग थांबली होती असे सांगितले. आता पुन्हा असा अनुभव आला, तर हा प्रयोग करून जरूर पाहणार आहे. 

काजूच्या झाडांची पाने जनावरे खात नाहीत, पण ती जमिनीची धूप थांबवतात. जल, जंगल आणि जमीन यांचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. काजूची फुले सुगंध आणि मध देतात. बोंडूपासून मद्यही मिळते आणि छान सरबतही! काजू निरामय आयुष्य देतात. सालीपासून शाई आणि लाकूड इंधन म्हणून वापरले जाते. चांगल्या फळ्या देते. झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो. ज्याला जे हवे, ते देणारे काजूचे झाड, मला कल्पवृक्ष वाटते!         

                                 -०-