रविवार, १९ जून, २०२२

पावसाचे निसर्ग संकेत

 

पन्नासेक वर्षापूर्वी सात जूनला पाऊस येणार हे ठरलेले असायचे. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. मात्र तो केव्हा, किती आणि कोठे पडणार, हे नेमके सांगता येणे कठीण झाले आहे. मानवाचे निसर्गाशी असणारे नाते दुरावलेले आहे. पशू, पक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपले आहे. त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात. आणि त्याप्रमाणे ते व्यक्तही होतात. मानवाला मात्र ते समजून येत नाही. मानवाने पुन्हा निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गाचा आपला संबंध पुनर्प्रस्थापित करायला हवा, तर पावसाबाबतचे निसर्ग संकेत समजू लागतील. 

______________________________________________________

    यावर्षी पाऊस वेळेवर येणार आणि सरासरीपेक्षा जास्त येणार, अशी बातमी आली. शेतकऱ्याला निदान पाण्यासाठी त्रासावे लागणार नाही. लातूरला रेल्वेने पाणी पाठवावे लागणार नाही, या विचारात असतानाच निसर्गातील पर्जन्याबद्दल संकेत देणाऱ्या घटकांचे चित्र नजरेसमोर आले आणि अंदाजाबद्दल साशंकता निर्माण झाली. अर्थात या अभ्यासाला शास्त्रीय अभ्यासाची जोड नाही. प्रयोगातून काढलेले नेमके निष्कर्ष नाहीत. तरीही, आज निसर्ग संकेतानुसारच घडताना दिसत आहे. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती सर्वांकडून पावसाचे संकेत मिळतात. हे संकेत निसर्गातील अनेक घटकांना ओळखता येतात. बरेच संकेत आजही ज्येष्ठांच्या मुखातून नव्या पिढीला कळतात. सहदेव भाडळी या ग्रंथात याबद्दल काही संकेत आढळतात. संस्कृत ग्रंथांतही काही उल्लेख आढळतात. एकविसाव्या शतकातही, मेंढ्यांच्या पोषणासाठी फिरणारे मेंढपाळ, भटकणारा बंजारा समाज यांच्याकडून पावसाचे प्रमाण आणि निसर्ग संकेताबद्दल ऐकायला मिळते.

      पावसाचा संकेत सर्वात चांगला देतो, तो म्हणजे कावळा. कावळ्याचे घरटे तो तीन फांद्याच्या बेचक्यात आणि काटक्यांच्या सहाय्याने बांधतो. त्याचे घरटे जर झाडाच्या उंच टोकाला असेल, तर पावसाचे प्रमाण कमी असते. कावळ्याचे घरटे मध्यभागी असेल, तर पाऊस नेहमीसारखा आणि पिकांना उपयुक्त पडतो. कावळ्याचे घरटे खालच्या बाजूला असेल, तर अतिवृष्टी किंवा पाऊस जास्त पडतो. कावळ्याचे घरटे झाडाच्या कोणत्या दिशेला आहे, यावरूनही पावसाचे अनुमान समजते. घरटे पश्चिमेला असेल तर सरासरीएवढा, पूर्वेला असेल तर जास्त आणि दक्षिण किंवा उत्तरेस असेल तर कमी पाऊस असा अंदाज असतो.

      टिटवीचे घरटे माळरानावर असते. तिचे घरटे छोट्या दगडांच्या सहाय्याने बनवलेले असते. पावसाळ्यापूर्वी ती अंडी घालते. अंड्यांच्या संख्येवरून किती महिने पाऊस पडणार, याचे सूचन होते असे मानले जाते. चार अंडी असतील, तर भरपूर पाऊस, तीन अंडी असतील तर सरासरीइतका आणि त्यापेक्षा कमी अंडी असल्यास अवर्षणाचे वर्ष, असा अंदाज असतो. तित्तर पक्षी मोठमोठ्याने आवाज करू लागला, की लवकरच पाऊस पडणार, असे ओळखून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. तसेच पावशाचेही आहे. ‘पेर्ते व्हा’ असा संदेश देत पावशा ओरडू लागला की लवकरच पाऊस येणार, असा अंदाज बांधला जातो. पावसाळा जवळ आला आहे, याचे संकेत आफ्रिकेतून भारतात येणारे चातक पक्षीही देतात. चातकांची गर्दी लवकर दिसू लागली, तर पाऊस लवकर येणार, हे ठरलेले. त्याचे येणे लांबले तर पावसाळा उशिरा सुरू होतो. पाऊस कमी येणार असेल, तर त्या वर्षी हरणे पिल्लांना जन्म देत नाहीत. वाघीणसुद्धा दुष्काळ पडणार असेल, तर पिल्लांना जन्म देत नाही. समुद्रात आढळणारा वादळी पक्षी किनाऱ्यावर येतो आणि कोळी बांधवांना वादळाची पूर्वकल्पना देतो. समुद्रकिनारी राहणारे लोक खेकडे आणि मासे यांच्या प्रवासाच्या दिशेवरून आणि काळावरून पावसाचा अंदाज बांधतात. काळ्या मुंग्याचा समूह तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करत असल्यास लवकरच मोठा पाऊस येणार असल्याचा संकेत मिळतो. वाळवीला पंख फुटून ती हवेत उडू लागल्यास लवकरच पाऊस पडतो. तसेच पाऊस जोरात येणार असेल, तर सरपटणारे प्राणी सुरक्षित जागी जाण्याचा प्रयत्न करतात. चिमण्या धुळीमध्ये अंग घुसळू लागल्या की दोन-तीन दिवसांत पाऊस पडतो.

निसर्गातील झाडे पावसाच्या प्रमाणाबद्दल आणि पावसाच्या काळाबद्दल अचूक संकेत देतात, असे अनेक अभ्यासकांनी नोंदवलेले आहे. त्यातील बहावा हा महत्त्वाचा वृक्ष मानला जातो. बहावाच्या झाडांनी फुलायला सुरुवात केली की चार महिन्यांच्या आत पाऊस पडायला सुरुवात होते. चिंचेच्या झाडांना फुलोरा जास्त आला तर पाऊस अधिक पडतो आणि कमी आला तर पाऊस कमी पडतो. जास्त पावसामुळे फुले आणि कोवळी फळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे चिंचेच्या झाडाने ही केलेली सोय असावी. बिबा, खैर आणि शमीची झाडे जास्तच फुलल्यास कमी पाऊस पडतो. या झाडांना पाणी कमी मिळाल्याने त्यांच्या फुलांची गळ जास्त होते. ज्या वर्षी आंबे मोठ्या प्रमाणात आलेले असतात, त्यानंतर येणारा पावसाळा हा कमी पावसाचा असतो.

निसर्गातील पावसाचे संकेत देणारे सर्व घटक तसेच कार्यरत आहेत; मात्र त्यांचे वागणे बदलले आहे. कालिदासाच्या ‘मेघदूत’ या सुप्रसिद्ध काव्याची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. मेघदूतामध्ये ढगांचे आणि पावसाचे सुंदर वर्णन आहे. यावरून साधारण सोळाशे वर्षांपूर्वी पाऊस आजच्यासारखा येत होता. पन्नासेक वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असे ठरलेले असायचे. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. मात्र तो कोठे, किती आणि केव्हा पडणार, हे नेमके सांगता येणे कठीण झाले आहे. पूर्वीपेक्षा ढगफुटीचे (कमी वेळात जास्त पाऊस) प्रमाण आणि ठिकाणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. पूर्वी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीयोग्य पाऊस पडत असे. पिके रूजण्यासाठी तो विश्रांती देत असे. त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये मोठे पाऊस येत. पिके भरात आली, पक्व होऊ लागली की सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होत असे. रब्बीची पीके पेरून झाली की पुन्हा दोन-तीनवेळा पाऊस येत. मात्र रानातून क्वचितच पाणी बाहेर येत असे.

जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गातील जलचक्रावर मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याच्या अभ्यासातून मागील काही वर्षात अचूक अंदाज येऊ लागले होते. मात्र सूक्ष्मरूपात हे अंदाज चुकतात. अर्थात जागतिक पातळीवर पर्यावरणाचे अभ्यासक याबद्दल मागील काही वर्षांपासून भीती व्यक्त करत आहेत. ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ या संशोधकांच्या गटाने आपल्या सहाव्या अहवालामध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या अहवालात त्यांनी पर्जन्यचक्रामध्ये अनपे‍क्षित आणि मोठे बदल होणार असल्याचे २०२१ मध्येच जाहीर केले आहे. त्यानुसार कमी काळामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडेल. काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका संभवतो. यामुळे अतिवृष्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात पूर येणार आहेत. पूर आणि अवर्षण दोन्ही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान संभवते.


यावर्षी मेपासून हवामान विभागाने पूर्व अभ्यास आणि सध्याचे वातावरणात होणारे बदल यावरून अंदाज व्यक्त केले. सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचे अंदाज व्यक्त केले. हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाज पावसाच्या प्रमाणाबाबत अचूक निघणार याबद्दल शंका नाही; मात्र निसर्गातील संकेतानुसार पावसाच्या वेळा बदलतील, असे दिसते. निष्पर्ण गुलमोहोर ऐन उन्हाळ्यात लालजर्द फुलांनी फुललेला आढळत असे. उन्हामुळे बेजार मनाला तोच फुलवत ठेवायचा. मात्र यावर्षी गुलमोहोर जूनच्या मध्यावरही अगदी छान फुललेला आहे. हिरवीगार पाने आणि त्यांच्या टोकाला लाल फुलांचे गुच्छ पाऊस उशिरा येणार असल्याचेच संकेत देत आहेत. बहावाची झाडे अजूनही भरभरून फुललेली आहेत. बहावाला जूनच्या मध्यावर पाने आणि फुले लगडलेली दिसतात. बहावाच्या झाडाकडूनही, दीर्घ काळ पाऊस पडत राहणार असल्याचे संकेत येतात. धामण आणि पांढरफळी या झाडांची अवस्थाही तशीच आहे. दरवर्षी पंधरा दिवसांत सर्व पांढरफळीची झाडे फुलत. मात्र यावर्षी पांढरफळीची काही झाडे फुलून त्यांना फळे आलेली आहेत, तर काही झाडांना जून संपत आल्यावर फुलोरा आलेला आहे. धामणीची झाडे पाऊस येण्याअगोदर एक महिना फुलतात. मात्र यावर्षी अजूनही झाडे फुलत आहेत. दुसरीकडे कावळ्यांची घरटी टोकाला नाहीत. याचा अर्थ पाऊस येणार, भरपूर येणार, मात्र तो उशिरांने येणार, याचेच संकेत निसर्ग देत आहे.

मानवाचे निसर्गाशी असलेले नाते आज दुरावलेले आहे. झाडे, पशू, पक्षी यांनी मात्र ते आजही घट्ट जपले आहे. त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत हे घटक मानवापेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि त्याप्रमाणे ते व्यक्तही होतात. मानवाला मात्र ते समजून येत नाही. मानवाने पुन्हा निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गाचा आपला संबंध पुनर्प्रस्थापित करायला हवा. त्यासाठी झाडे लावायला आणि जगवायला हवीत. यातून जल-जंगल-जमीन यातील समतोल राखला जाईल. झाडांबरोबर पाणी टिकून राहिल, पशू, पक्षी येतील आणि त्यांनी दिलेले निसर्ग संकेत आपल्याला समजू लागतील. 


दिनांक १९ मे २०२२ रोजी दै. पुढारीच्या बहार पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख


८ टिप्पण्या:

  1. सर छान माहिती दिली आहे .पक्षी व निसर्गाच्या नात्याची गुंफण या लेखातून स्पष्ट होते. सर अशीच माहिती मिळावी .

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लेखन केले आहे लेखनात साहित्यिक शैली बरोबर वैज्ञानिक तेचे भान राखून लेख वाचनीय बनवला आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. पावसाचे पूर्वापार चालत आलेली भाकिते आजही खरी ठरतात , परंतु जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची हानी यामुळे हल्ली पाऊस किती कुठे कधी पडेल याची भाकिते खरी ठरतीलच असे काही सांगता येत नाही,

    उत्तर द्याहटवा
  4. खूप सुंदर व माहितीपूर्ण लेख. मानवानं निसर्गा सोबत छेडछाड केल्यामुळे मान्सूनचे असंतुलन सुरू झाले असावे .

    उत्तर द्याहटवा
  5. Physics चा माणूस झाडे, फुले, पाने, पक्षी, प्राणी ई. त्यांचा अधिवास, आपला त्यांच्याशी असलेले नैसर्गिक संबंध या विषयी इतकं सोप्या ओघवत्या शैलीत लिहितो आहे. यातुन अनेकांना लिहिण्याची प्रेरणा मिळणार यात शंका नाही

    उत्तर द्याहटवा
  6. सर,पावसाची वाट पाहत असताना ...तो येणार म्हणून पीकपाण्याची योजना करताना ...सदरच्या लेखातून तुम्ही नेमकं सांगितले आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. सर निसर्गाची छान माहिती दिली आहे. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सर अशीच माहिती मिळत जावी

    उत्तर द्याहटवा