बुधवार, २४ जानेवारी, २०१८

सीताफळ शेतीला प्रतिष्ठा देणारा अवलिया


 (शेतीप्रगती अंकाचा जानेवारीमध्ये वर्धापन दिन विशेषांक प्रसिद्ध होतो. यावर्षी कृषी आयडॉल ही संकल्पना अंकासाठी घेण्यात आली. माझ्या मूळ गावापासून चारपाच किलोमीटरवर मला असाचं एक अवलिया असल्याचे माहित होते. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाला पाहिल्याशिवाय विषयाला न्याय देता येणार नाही, असे वाटत असे. यावर्षी त्यांच्या गोरमाळे ता. बार्शी येथील मधूबन नर्सरीला भेट देवून तयार केलेला लेख संक्षिप्त रूपात शेतीप्रगतीमध्ये प्रसिद्ध झाला. शेतकरी आत्महत्या हा विषय महाराष्ट्राची पाठ सोडत नसताना नवनाथ कसपटे यांचे कार्य मुळातून अनुभवावे असेचं आहे. तो मूळ लेख इथं आपल्यासाठी प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)

आमच्या लहानपणी दिवाळी आणि त्यानंतरचा काळ हा खरंच आनंदाचा काळ असायचा. दिवाळीमध्ये फटाके आणि फराळ. त्यानंतर तूरीच्या शेंगा मिठ टाकून शिजवून खाण्यात वेगळीच मजा असायची. त्याच्या जोडीला असायची बोरे आणि सीताफळे. बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये सीताफळेच सीताफळे असायची. मात्र गावातील प्रतिष्ठित, सधन घरात ती न्यायला बंदी असायची. ती खाल्ली तर बाधतात. सीताफळामुळे सर्दी पडसे होते. म्हणून आम्हालाही ती घरी न्यायला बंदी होती. मात्र आम्हाला सीताफळे खायची असायची. लहान मुलांचे तसे हे आवडते फळ. सीताफळे शेताच्या बांधावर झाडे आपोआप वाढलेली असायची. घरच्यांचा डोळा चुकवून ही फळे खाण्यासाठी आम्ही उपाय शोधला. शेतातील दगडाच्या बांधामध्ये ढी घालायची. खाली आणि बाजूला गवत घालून शेतातच सीताफळे पिकत घालायची. दोन दिवसानंतर गुपचूप शेतात जायच आणि त्या सीताफळावर ताव मारायचा. पिकलेली सीताफळे खायला जीव अधीर झालेला असायचा. पिकलेल्या सीताफळावर आम्ही तुटून पडायचो. सगळीच मुलं असे करायची. कधीकधी दुसऱ्याची अढी आम्हाला सापडायची. तर कधी आमच्या अढीवर इतर मुले डल्ला मारायची. साराच मामला गुचूप. घरी कळालं तर रागावून घ्यावे लागेल याची भिती असायची. असे हे सिताफळ. पूर्णत: दुर्लक्षीत फळ. वाडवडिलांच्या दृष्टीने घरात आणायचे. आज तीस पस्तीस वर्षांनंतर शहरात १००-१२५ रू. किलो दराने विकत घेताना हमखास बालपणात नेणारं.
खरंतर, सीताफळ हे आरोग्यासाठी वरदान म्हटले पाहिजे. सीताफळाचा १०० ग्रॅम गर जर घेतला तर त्यात पाणी ७३.३ ग्रॅम असते. पिष्टमय पदार्थ २३.६४ ग्रॅम, तंतूमय घटक ४.४ ग्रॅम, मेद ०.२९ ग्रॅम, प्रथिने २.०६ ग्रॅम असतात. सीताफळ हेजीवनसत्वयुक्त फळ आहे. उपरोक्त घटकासह जीवनसत्व (०.११ मिली ग्रॅम), (०.११३ मिली ग्रॅम), (०.८८३ मिली ग्रॅम), (०.२२६ मिली ग्रॅम), (०.२ मिली ग्रॅम), (१४ मायक्रोग्रॅम) याप्रमाणे असते. तर जीवनसत्व ३६.३ मिलीग्रॅम इतके असते. याशिवाय कॅल्शीयम (२४ मिली ग्रॅम), लोह (०.६ मिली ग्रॅम), मॅग्नेशियम (२१ मिली ग्रॅम), मँगेनिज (४२१ मिली ग्रॅम), फॉस्फरस (३२ मिली ग्रॅम), पोटॅशियम (२४७ मिली ग्रॅम), सोडियम ( मिली ग्रॅम),  आणि जस्त (०.१ मिली ग्रॅम) हे क्षाररूपात असतात. अनेक आजारांपासून मानवी शरीराला दूर ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरते. मात्र या फळाचा वापर भारतात गरीबाचे फळच असेचं राहिले. एवढे अन्नघटक असणारे हे फळ अनेक आजारावर उपयुक्त ठरते आणि मानवासाठी ते वरदान आहे.
यातील मॅग्नेशियम हे मन:शांतीसाठी उपयुक्त आहे. मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो. झोप चांगली लागते. चांगली त्वचा आणि डोळ्याला -जीवनसत्व फायद्याचे असते. -जीवनसत्वामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी -जीवनसत्व उपयोगी पडते. सीताफळातील शर्करा भरपूर उर्जा देते. तंतूमय पदार्थ पचनसंस्था चांगली ठेवतात. खेळाडूंसाठी तर सिताफळ हे दानच आहे. असे हे आरोग्यदायी फळ मागील कांही वर्षांपासून प्रतिष्ठा प्राप्त करू लागले आहे. प्रतिष्ठितांच्या आणि धनिकांच्या किचनमधील फळांच्या टोपलीत दिसू लागले आहे आणि याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत नवनाथ कसपटे.
बार्शीपासून २२ किलोमिटर अंतरावरील गोरमाळे हे गाव. चिखर्डेमार्गे गेलं तर २१ किलोमीटरवर. गाव कसले ते एक छोटेसे खेडेगाव. या गावातील नवनाथ कसपटे यांचा जन्म १९५५ चा. त्यानी सुरूवातीला गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर चिर्डे या शेजारच्या गावात आणि नंतर लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी येथून त्यांनी अकरावीपर्यंत (जुन्या काळातील पदवीपूर्वपी.डी.) शिक्षण घेतले. त्या काळात एवढ्या शिक्षणावरही नोकरी मिळू शकली असती. मात्र त्याकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरीहे विधान सुविचाराप्रमाणे सर्वांच्या मनावर कोरलेले होते. नवनाथरावांनी पण नोकरीच्या मागें लागण्याचा प्रयत्न करता शेतीच करायचे ठरवले. पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पिकांची शेती कसायला त्यानी सुरूवात केली. उत्पादन मिळायचे त्यामधून शिल्लक कांही राहायचे नाही. यामुळे परिस्थितीत कोणताच बदल होत नव्हता.
त्यांनी खऱ्या अर्थाने शेतात काम करायला सुरूवात केली ती १९७६ मध्ये. त्यावेळी त्यांचे वय होते २१ वर्ष. तरूण वय. नवी आव्हाने स्विकारण्याचं वय. त्याचकाळात फळबागा लावण्यासाठी मोठे प्रयत्न होत होते. साेलापूर जिल्ह्यातील नान्नज या गावाने द्राक्ष लागवड आणि उत्पादनासाठी राज्यात मोठे नाव कमावले होते. सांगोला भाग डाळिंब पिकासाठी प्रसिद्ध होत होता. आपणही फळबागा लावाव्यात, नवे प्रयोग करावेत, या उद्देशाने त्यांनी शेतात द्राक्षाची लागवड करायचे ठरवले. त्यासोबत शेतात बोर, पपई, डाळिंब आणि पेरूच्या बागाही लावल्या. यातील पपईच्या बागा ह्या वार्षिक उत्पन्नाच्या. मात्र बोराच्या बागांनी त्यांचे पांगरी पंचक्रोशीत चांगले नाव झाले होते. गोरमाळ्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मार्फत घरी आलेल्या टपोऱ्या बोरांची आजही आठवण येते. या फळबागामुळे हळूहळू उत्पादन वाढू लागले. पैसा शिल्लक राहू लागला. १९८५-८६ पासून त्यांना आर्थिक सुबत्ता मिळू लागली.
 त्यानी शेतात बोअरवेल घेतली होती. त्यांचे नवनवे प्रयोगही सुरू होते. यात कांही कृषी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असे. वि..राऊळ यांच्यासारखे स्नेही सहकार्य मार्गदर्शन करत असले तरी नावनाथरावांची तिक्ष्ण नजर आणि निष्कर्षाप्रत जाण्याची सवय त्यांना नव्या प्रयोगांना द्युक्त करत होती. फळबागाच्या शेतीमुळे उत्पन्न वाढत होते. त्याचकाळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात गांडूळ शेतीचा प्रयोग सर्वप्रथम राबवला. गांडूळ खत, सेंद्रिय खताचा सुयोग्य वापराच्या मात्रा त्यांनी अनुभवातून निश्चित केल्या आणि द्राक्ष उत्पादनाचे नवे उच्चांक निर्माण केले. द्राक्षांच्या उत्पादनातून त्या काळी भरपूर फायदा होत होता. द्राक्ष उत्पदनात कसपटे यांनी आपला दबदबा निर्माण केला. त्यासाठी त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार १९९४ मध्ये मिळाला. त्यांची द्राक्षे देशाच्या सीमा ओलांडून गेली आणि १९९७-९८ मध्ये सर्वाधिक द्राक्ष निर्मितीसाठीचा महाग्रेप पुरस्कार मिळाला. पुढे २००४ मध्ये वसंतराव नाईक कृषी माल निर्यात पुरस्कार देण्यात आला. एकिकडे नवनाथराव शेतीमध्ये विविध प्रयोग करत होते, उत्पादनाचे नवे शिखर गाठत होते. आता ते स्थिरस्थावर होताहेत अशा त्या काळात निसर्गाचे दुष्टचक्र सुरू झाले.
तोपर्यंत त्यांची दहा एकराची द्राक्षबाग, अर्ध्या एकरात पेरू बाग, बोर अशा फळबागा झाल्या होत्या. शेताच्या कडेला सीताफळाच्या दोन ओळी लावल्या होत्या. सीताफळाचे लहानपणची आवड जपणारी शहरात स्थिरावलेली मंडळी ती विकत घेऊन खाऊ लागली होती. पावसाचा अनियमितपणा वाढत होता. बोअरवेलचे पाणी कमी जास्त होत होते. उन्हाळ्यात बागा वाचवण्यासाठी पाणी विकत घ्यायची वेळ येत असे. त्यामुळे खेळत्या भांडवलासाठी त्यांनी भाज्यांची शेतीही सुरू केली होती. १९८५-८६ चा तो काळच असा होता की, निसर्गाच्या तडाख्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा काढून टाकल्या होत्या. बोरांच्या बागा तोडून टाकल्या. सीताफळांना मात्र उदंड पिक येत असे. एका बागवानाने नवनाथरावांच्या शेतातील सीताफळाच्या झाडांच्या फळाची खरेदी केली. सर्व फळांची रक्कम दहा हजार रूपये ठरली. बागवानाने पैसे दिले आणि फळे न्यायला सुरूवात केली. त्याची पूर्ण वसूली झाली. तरीही झाडावर फळे होतीच.
शेवटी फळे खरेदी करणाऱ्या बागवानाने आता सीताफळे नेणे परवडत नाही. मी फळावरचा हक्क सोडला सांगितले. नवनाथरावानी एवढ्या फळाचं काय करायचं म्हणून भाज्याबरोबर सीताफळेही विकायला नेली. सीताफळ विक्रीचा हिशोब मात्र स्वतंत्र ठेवला. सगळी सीताफळे विकून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की या उरलेल्या फळांना विकून ३५००० रूपये मिळाले आहेत. गंमत अशी की चांगल्या, मोठ्या आकारांच्या, आघाडीच्या फळांना केवळ १०००० रूपये मिळाले होते. बागवानाच्या फळे सोडून देण्यामुळे नवनाथरावांना या फळात पैसे आहेत हे लक्षात आले.
सीताफळ हे ५०० ते ७०० मिलीलिटर पाऊस पडला तरी चांगले येते. हलक्यामध्यम शेतात, माळरानाच्या जिराईत जमिनीतही पिक चांगले येवू शकते. बालाघाट डोंगररांगाच्या पायथ्याशी वाढलेल्या नवनाथरावांना हे लक्षात आले. निसर्गाचा लहरीपणा, पावसाचे घटते प्रमाण आणि अधिक उत्पादनासाठी फळबागांना पर्याय नाही. अशा परिस्थितीत सीताफळामुळे मिळालेले उत्पन्न त्यांना या फळाकडे ओढू लागले. सीताफळावर त्यांनी लक्ष केंद्रित करायचे ठरवले. द्राक्षाच्या बागा हळू हळू कमी करत सीताफळाचे क्षेत्र वाढवण्याचे ठरले. मात्र यासाठी रोपे आणायची कोठून? हा प्रश्न होता.
सीताफळ रोपाची नर्सरी अशी नव्हतीच. त्यानी सीताफळाची ओढ्याच्या कडेला उगवलेली रोपे वापरायचे ठरवले. निसर्गत: उगवलेली रोपे काढून फळबाग लावायला सुरूवात केली. मनापासून या फळावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी त्या झाडाच्या प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करायला सूरूवात केली. त्यातून त्यांना चाळीस भिन्न प्रकारची सीताफळे आढळून आली. त्या फळाचे, झाडांचे अशा पद्धतीने निरीक्षण करणारे नवनाथराव पहिलेच. त्यांना काही मंडळी सहकार्य करत, मात्र निसर्ग हाच गुरू मानत त्यांचे एकलव्याप्रमाणे कार्य सूरू राहिले. या चाळीस प्रकारच्या फळापैकी कांही वाण त्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्यातील एका झाडाची फळे खूप आकर्षक होती. त्या झाडांच्या सर्वच फळांचा आकार सारखा होता. याचा निसर्गत: संकर झालेला होता.या झाडाची साध्या सिताफळांच्या रोपावर त्यांनी कलमे बांधली आणि त्या वाणाची रोपे वाढवली. या कलमावरील फळेसुद्धा मातृ झाडाच्या फळासारखीच होती.
या वाणाचा शोध लागला खरा. मात्र तो शोधला होता. नवनाथरावांनी याचे नाव काय ठेवायचे? हा प्रश्न होता. कृषी अधिकारी आणि अन्य लोकांशी चर्चा करून स्वत:च्या नवनाथ मल्हारी कसपटे नावामधील एनएमके घेतले आणि एनएमके , अशी नावे निश्चित झाली. यांच्या स्वामीत्व हक्क नोंदणीसाठी अर्जही दाखल झाला. त्याचप्रमाणे अन्य वाणांच्या गुणाप्रमाणे नावे निश्चित करण्यास सुरूवात झाली. मात्र या सर्वात एनएमके हा वाण नवनाथरावांच्या मनात घर करून राहिला.
    एनएमके- वाणाची सीताफळे आकाराने सारखी असतात. फळामध्ये भरपूर गर असताे. या वाणाची फळे इतर वाणांच्या फळांच्या तुलनेत उशिराने येतात. फूट अंतरावर रोपे लावावीत आणि दोन ओळीत १६ फूट मध्ये अंतर ठेवणे येते. एका झाडावर १०० ते १२५ फळे चांगली वाढतात. जून महिन्याचा बहर पकडला तर अन्य झाडाची / वाणाची फळे संपल्यानंतर ही फळे येत असल्याने त्यांना भाव चांगला मिळतो. फळात बियांची संख्या कमी राहाते. या वाणाची फळे जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे ती दूर अंतरावर पाठवणे शक्य होते. हा वाण नवनाथरावांना शेतातच निसर्गत: संकर पावलेल्या बियातून सापडला. त्यांनी हनुमानफळाचीही अशीच ओळख करून दिली. सिताफळाला अशा प्रकारे ओळखण्यात यशस्वी झालेल्या नवनाथरावांनी हळूहळू अन्य फळबागा कमी करायला सुरूवात केली आणि सीताफळीचे क्षेत्र वाढवण्यास सुरूवात केली. सीताफळ जे मानवी निरोगी आयुष्यासाठी वरदान आहे, त्याने नवनाथरावांचे आयुष्य बदलायला सुरूवात केली. सिताफळाच्या उत्पादनातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शेजारील शेतकऱ्यांचे विक्रीस निघालेले १२ एकर शेती विकत घेतली. अन्य फळबागांना भुलता त्यांनी आपली सिताफळ निष्ठा कायम ठेवली.
क्षेत्र वाढवतवाढवत आज सीताफळ बाग ३५ एकरापर्यंत पोहोचली. त्यांच्या या अभिनव प्रयोगाची, शेतीची माहिती सर्वत्र पसरू लागली. सिताफळाच्या रोपांची मागणी वाढू लागली. त्यांनी नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. आज गोरमाळा गावाच्या उत्तरेला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतातील पाच एकर क्षेत्रावर त्यांची नर्सरी रोपवाटीका उभी आहे. या रोपवाटीकेतून प्रामुख्याने एनएमके- या वाणाची रोपे तयार करून विकली जातात. एनएमके- वाण हा गोल्डन या टोपणनावाने प्रसिद्ध झाला आहे. पस्तीस एकर क्षेत्रात एकूण ४० प्रकारचे सीताफळाचे विविध वाण आहेत. एनएमके , , ॲनोना, चांदसिली ॲनोना, ॲटोमोयाबाळानगरी, फिंगर प्रिंट्स, लाल सिताफळ , अशी कांही वाणांची नावे आहेत.
नवनाथ यांची दोन्ही मुले प्रविण आणि रविंद्र आता कमावती झाली आहेत. प्रविण यांनी बार्शी ट्रॅक्टर डिलरशिप घेतली आहे. त्यासोबत ते सीताफळ जाहिरातीचे काम बघतात. रविंद्र यांनी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. परंतु आता ते पूर्णत: सीताफळ शेतीकडे बघतात. ते बागांची देखभाल, नर्सरी आणि फळविक्रीमध्ये आपले लक्ष केंद्रित करून आहेत. सीताफळ बाग जोपासण्यासाठी एकरी २५००० रुपये इतका खर्च येतो तर त्यातून १० लाखापर्यंत उत्पादन घेण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. गतवर्षी त्याना रोप विक्रीमधून अडीच कोटी आणि फळ विक्रीतून सव्वा कोटी रूपये मिळाले. त्यानी आपली शेती मधुबन फार्म आणि नर्सरी या नावाने प्रसिद्धीस आणली आहे. मागील पंधरा वर्षात कसपटे कुटुंबियांनी सीताफळ हे ग्रामिण भागातून थेट विदेशात पोहोचले आहे.

नवनाथरावांना त्यांच्या या कार्याद्दल आजवर विविध संस्था, शासन आणि केंद्र सरकारने १७ पुरस्कार दिले आहेत. सीताफळ हे फळ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सीताफळ विकास संशोधन संस्था स्थापन केली आहे. तिचे ते अध्यक्ष आहेत. अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण संशोधन संस्थेचेही ते अध्यक्ष आहेत. कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे ते सल्लागार म्हणूनही काम पाहतात. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे या संस्थेचेही ते सल्लागार म्हणून कार्य करत आहेत.
दहावीपर्यंतचे शिक्षण असलेल्या या भूमीपुत्राने शेतात आपले लक्ष केंद्रित केले. केवळ निरिक्षण आणि स्वयंनिर्णयातून वेगळी वाट निवडली. त्या वाटेवरून जाण्याचा निर्धार कायम ठेवत मार्ग क्रमत नव्याचा शोध घेत राहिले आणि सीताफळ हे घराघरात नव्हे तर देशादेशात पोहोचवण्यात यशस्वी झाले. सीताफळानेही शेतकरी कोटीच्या कोटी उड्डाणे घेउ शकतो हे दाखवले. त्यांच्या या प्रयत्नाला सलाम आणि त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा !