बुधवार, १७ जानेवारी, २०१८

सुंदर ते जतन करावे......... ('बदलते जग'चा २०१४ चा दिवाळी अंक कौशल्य शिक्षण या विषयावर होता. त्या अंकात मी संक्षीप्त रूपात मी माझे मनोगत व्यक्त केले होते. तो सविस्तर लेख याठिकाणी आपल्यासाठी प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)

कांही दिवसापूर्वी एका हंगामी लेखनिकाच्या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी मला तज्ज्ञ म्हणून बोलाविण्यात आले होते. तीनच अर्ज होते. तीनही अर्ज तीन वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्यात आले होते. एका उमेदवाराने कोऱ्या कागदावर सुबक मांडणी करून स्वत:चे नाव, पत्ता इतर सर्व आवश्यक माहिती नमूद केली होती. ज्या क्रमाने माहिती लिहिली होती, त्याच क्रमाने आवश्यक कागदपत्रे जोडली होती अर्ज टंकलिखीतही नव्हता. स्वहस्ताक्षरात होता. पण मांडणीतून नीटनेटकेपणा जाणवत होता. दुसऱ्या उमेदवाराने फक्त अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रांच्या प्रती जोडल्या होत्या. अर्ज टंकलिखित होता, पण त्याची अर्हता प्रमाणपत्रातून शोधावी लागत होती. तिसरा अर्जही टंकलिखित होता. बायोडाटा जोडला होता. पण त्यामध्येही व्याकरणाच्या आणि स्पेलिंगच्या भरपूर चुका होत्या.
प्रत्यक्ष मुलाखतीमध्येही अर्जाचे प्रतिबिंब दिसून आले. पहिल्या उमेदवारानं अत्यंत स्पष्ट उत्तरे दिली. त्याचं विषयाच आकलन चांगले होत. त्यानं अर्ज टंकलिखित करण्याच कारणही सांगितले. दुसऱ्या उमेदवारानं अर्ज व्यवस्थित करण्याचं कारणवेळ नव्हताअसं सांगितले. तर तिसऱ्या उमेदवारानं आत्मप्रौढीच कथन केल. या प्रसंगातून मला जाणवले, आज आपण जे शिक्षण देतो ते शिक्षण योग्यच आहे. कौशल्याचे शिक्षण मुलांना जरूर मिळते, पण ती कौशल्ये प्रत्यक्ष जीवनात कशी वापरावीत, याचे प्रशिक्षण मात्र अपुरे पडत असावे.
इंग्रजांनी सुरू केलेली शिक्षणपद्धतीच थोड्याफार फरकाने आजही आपण वापरत आहोत, याच शिक्षण पद्धतीतून शिक्षण घेतलेले अनेक थोर लोक आपल्यासमोर आदर्शवत आहेत. पण हे संख्येने फारच कमी आहेत. त्यातील अनेकजण किंवा बहुतांश पदवीधर हे शिक्षणातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा वापर प्रात्यक्षिकात, अयशस्वी होतात. वरील उदाहरणातील तीनही उमेदवार हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. त्यांनी दहावी आणि बारावी परीक्षा दिलेली होती. त्यामध्ये अनिवार्य इंग्रजी विषय होता आणि तिघांनीही पत्रलेखन हा भाग अभ्यासलेला होता. तरीदेखील तीनही उमेदवारांचे अर्ज हे भिन्न रूपात दाखल झालेले होते. हस्तलिखित अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे साधनांची कमतरता होती, पण आपण प्राप्त केलेल्या कौशल्यांचा वापर कसा करावा, हे त्याला माहित होतं. आजच्या विद्यार्थ्याला, त्यामुळेच, प्राप्त ज्ञानाचा वापर कसा करावा, याचे आणखी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रकर्षाने जाणवते.
विविध मुलाखतीवेळी आलेले अनुभवही हीच धारणा अधोरेखित करतात. जी पदवी आपण घेतली आहे, त्या विषयाच्या मुलभूत ज्ञानाकडे दुर्लक्ष होते आणि मुलाखतीमध्ये अनेकजणांना अपयशी व्हावे लागते. एम.. मराठी ही अर्हता धारण करणारा मुलगा ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त मराठी साहित्यिकांची चार नावेही सांगू शकत नाही. विद्यार्थी मुलाखत देण्यास जातो, तेव्हा प्रत्येकवेळी समोर बसलेले समिती सदस्य त्या विषयाचे असतीलच असे नाही. पण त्यांचे वाचन चांगले असते. अशावेळी त्या विषयाच्या अनुषंगाने मासिकातून, वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या घटना यांवर प्रश्न विचारले जातात. पण उमेदवाराचे वाचन कमी असल्याने ते उत्तर देऊ शकत नाहीत आणि मुलाखतीमध्ये अनेक मजेदार उत्तरे ऐकायला मिळतात. त्यातून खरे तर मग अंतर्मुख व्हायला होते.
इतिहास विषयाचा उमेदवार शिवाजी महाराजांच्या औरंगजेबासोबत झालेल्या तहातील अटी सांगू शकत नाही. कॉमर्सचा विद्यार्थी डिमांड ड्राफ्ट चेकमधील फरक सांगू शकत नाही किंवा इंग्रजी विषय असणारा उमेदवार शेक्सपिअरची जगप्रसिद्ध कादंबरी ऑथेल्लो किंवा हॅम्लेट असे सांगतो की जेंव्हा शेक्सपिअरने एकही कादंबरी लिहिलेली नाही. वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी वनस्पतींचे सपुष्प व अपुष्प हे प्रकार सांगू शकत नाही. भूगोलाच्या विद्यार्थ्याच्या लक्षात नकाशाचे प्राकृतिक व राजकिय हे दोन प्रकार राहात नाहीत. वातावरणाच्या पर्यायाने लोखंडी खुर्चीच्या तापमानापेक्षा जास्त असते आणि लोखंडी खुर्चीवर बसल्यावर शरीरातील उष्मा अधिक वेगाने खुर्चीमध्ये जातो, हे तो कधीतरी समजून घेतो. पण मुलाखतीवेळी हिवाळ्यात लोखंडी खुर्ची प्लॅस्टीक खुर्चीपेक्षा थंड का वाटते, असा प्रश्न विचारला की तो गोंधळतो. याचं कारण प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून, विश्लेषणात्मक विचार रण्याची आणि नंतर उत्तर देण्याचं प्रशिक्षण त्याला कमी मिळालं आहे, असाच अर्थ यातून काढावा लागतो.
या सर्व घटनांमध्ये विद्यार्थी म्हणून उमेदवारांनी विषयाचा अभ्यास केलेला असतो किंवा पाठांतर केलेले असते. त्यावर आधारीत परीक्षा दिलेली असते, गुणांच्या रुपाने उज्ज्वल यश संपादन कलेले असते. तथापि, जे आपण शिकतो ते केवळ परीक्षेसाठीच, अशी त्याची धारणा असल्याने परीक्षा संपताच या ज्ञानाचा पुढे आयुष्यात कांही उपयोग होणार आहे, हे तो विसरतो. आणि प्राप्त केलेले ज्ञानही विसरतो. हे सर्व विसरण्याची प्रवृत्ती वाढत असल्यानेच केवळ असे घडतेथोडक्यात काय तो शाळा महाविद्यालयातील कालावधीत विद्यार्थी म्हणून जगण्याऐवजी परीक्षार्थी म्हणून वागतो. खरेतर विद्यार्थी हा शब्द 'विद्या' आणि अर्थी म्हणजेचं 'धन जमा करणारा' या दोन शब्दाचा बनलेला आहे. या कालखंडात त्याने विद्येचे धन जमा करावयाचे आहे. विद्येचे धन जमा करणारा तो विद्यार्थी. मात्र आज परीक्षेत उत्तम लिखाण करून गुण वसूल करणारे परीक्षार्थी तयार होत आहेत. शिकण्याची प्रक्रिया ही फक्त परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठीचं आहे असा एक मोठा समज शिक्षण व्यवस्थेत निर्माण झाला आहे. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी विद्यार्थ्यानी परीक्षार्थी न बनता विद्यार्थीपण जपले पाहिजे.
मागील शतकापासून तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत गेले, तसतसे नोकरीसाठी तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या उमेदवारांची गरज वाढू लागली. नव्वदच्या दशकापर्यंत (1988-89 पर्यंत) अनेक वृत्तपत्रांची छपाई खिळ्या-ठोकळ्याच्या सहाय्याने होत असे. त्या काळी पत्रकारांना संगणक ज्ञान आवश्यक नव्हते. ते बातमी हाताने लिहावयाचे. जुळणी करणारे त्या बातमीची अक्षरे जुळवून पाने तयार करायचे. त्यामध्ये मुद्रणदोष राहू नये, यासाठी वेगळी व्यक्ती मुद्रिते तपासून दुरूस्त करायची आणि मग ती पाने छपाईसाठी जात असत. आजच्या पत्रकारांना मात्र थेट आपली बातमी संगणकावर टंकलिखित करून सॉफ्ट कॉपीच्या रूपात द्यावी लागते. नव्या तंत्रामध्ये कमी मनुष्यबळ वापरून अधिक दर्जेदार माहिती अधिक गतीने वाचकांपर्यंत पोहचवणे मालकांनासंपादकांना शक्य होऊ लागले. खिळे (अक्षराचे) जुळवणारे मुद्रित तपासणारे आता पूर्वीसारखे आवश्यक राहिले नाहीत. नव्या तंत्रज्ञानाला ज्यांनी आपलेसे केले, ते नोकरी राहिले. उरलेले बेकार झाले. अन्वयार्थ हाच निघतो की, आपल्याला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची सवय ठेवावी लागते. वृत्तपत्रीय क्षेत्रातील बदलांमध्ये संगणक तंत्रज्ञानानं खिळे जुळवणारे मुद्रित शोधनाचे कार्य करणारे यांचे काम संगणक प्रणालीमध्ये आणून कमी मनुष्यबळात दर्जेदार उत्पादनाची खात्री दिली आणि सर्वांना ती अपरिहार्यपणे स्विकारावी लागली.
आज संगणक ज्ञान आणि संगणक वापर हे तर कळीचे मुद्दे ठरले आहेत. सर्वच अभ्यासक्रमांत संगणक शिरला आहे. विद्यार्थी त्या परीक्षा उत्तीर्णही होतात. चांगले गुणही प्राप्त करतात. पण ते संगणक शिक्षण फक्त परीक्षेपुरते आणि चांगले गुण मिळवण्यापुरते मर्यादित राहते. पुढे त्याचा वापर करण्याचा विसर पडतो आणि आपोआप ते ज्ञानही धूसर होत जाते. हे टाळायला हवं. उमेदवाराची पदवी कोणतीही असो, जे जे आपण शिकतो, त्याचा परिपूर्ण वापर करण्याचं कौशल्य आत्मसात केलं पाहिजे, हे विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. अच्युत गोडबोले यांचं उदाह याठिकाणी सांगता येईल. गोडबोले हे लौकिक शिक्षणाच्यादृष्टीने पाहिल्यास केमिकल इंजिनिअर आहेत. त्यानी आयआयटी मुंबईमधून केमीकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. कर्तृत्वाचा किंवा करिअरचा विचार केला तर त्यांनी संगणक कंपन्यामध्ये नोकरी केली. अगदी चिफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसर पर्यंतची पदे सांभाळली. त्यांची संगणक शास्त्रावरील पुस्तके अनेक देशातील संगणकशास्त्राचे विद्यार्थी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात. आज पुर्ण महाराष्ट्राला लौकिकार्थाने ते मराठीमध्ये चौफेर लेखन करणारे साहित्यिक-लेखक म्हणून सुपरिचित आहेत. हे शक्य होऊ शकतं. कारण गोडबोले विद्यार्थीदशेत जे जे शिकले, त्याचा वापर जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे करतात म्हणून. विद्यार्थी म्हणून त्यांचा मराठीचा अभ्यास हा शालेय जीवनापुरता होता. ते कोणा मराठी साहित्यिकाकडे साहित्य लेखनासाठी उमेदवारी करायला गेले नव्हते किंवा कोठे शिकवणी लावली नव्हती. वाचनाचे दालन तर सर्वानाचं खुले असते मात्र त्यातून अच्युत गोडबोले अपवादानेचं घडतात कारण ते त्यांच्या शिकण्याच्या कालखंडात, शालेय व महाविद्यालयीन जीवनात, खऱ्या अर्थाने विद्यार्थी राहिले. लौकिकार्थाने ज्या विषयातील पदवी घेतली त्याच विषयाला ते चिकटून राहिले असते, तर सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत हे नाव कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचूही शकले नसते.
हे जसे आजच्या काळातले उदाहरण आहे, तसंच एक इतिहासातील उदाहरण पाहू या. माणसाच्या कामाचे आठ तास ठरवणारा कोणीतरी व्यवस्थापन तज्ज्ञ असावा, असे मला अनेक दिवस वाटायचे. पण एका भौतिकशास्त्रज्ञाचं चरित्र वाचताना मला हे समजले की, आठ तासांची ड्युटी असावी, असे सांगणारा एक भौतिकशास्त्रज्ञ आहे. बरे हा भौतिकशास्त्रज्ञ कांही भौतिकशास्त्र शिकला नव्हता किंवा तो व्यवस्थापनशास्त्राचाही विद्यार्थी नव्हता. चार्ल्स ऑगस्टीन डी कुलोंब हे त्यांचे नाव. या शास्त्रज्ञाची गंमत अशी की त्यांचे शिक्षण होते स्थापत्य अभियांत्रिकीचे. शिक्षण संपताच ते संरक्षण दलानोकरीस लागले. त्यांच्यावर आधिकारी म्हणून वेस्ट इंडिज बेटावरील किल्ल्यांचे बांधकाम करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली. हे काम सुरू असताना गुलाम जे लाकडांचे ओंडके वाहून आणायचे त्याचे ते निरीक्षण करत. या निरिक्षणातून त्यांनी माणसाची काम करण्याची क्षमता निश्चित केली आणि माणूस जास्तीतजास्त आठ तास पुर्ण क्षमतेने कार्य करू शकतो, असे प्रतिपादन केलं. त्यांची जगाला ओळख आहे ती मात्र विद्युतशास्त्रातील संशोधक म्हणूनच. केवळ किल्ल्याचं बांधकाम स्थापत्य अभियंता म्हणून ते पाहात राहिले असते, तर ते व्यवस्थापन शास्त्रातील मूलभूत सिद्धांत मांडू शकले नसते आणि विद्युतशास्त्रातील ज्येष्ठ संशोधक म्हणूनही प्रसिद्ध झाले नसते.

आजच्या शिक्षणातून नवनवीन नर-रत्ने, थोर स्त्री-पुरूष विद्वत्तजन प्रसिद्ध पावत आहेत. त्यामुळे शिक्षण पद्धतीच पूर्ण बदलणे आवश्यक आहे किंवा ही पद्धत काही कामाची नाही, असे म्हणणं तितकंस पटत नाही. ही पद्धतीही चांगली आहे, फक्त प्रशिक्षणातील बदल आवश्यक आहे. मुळात विद्यार्थी दशेतच कोणतेही कौशल्य आत्मसात करणे कठीण नाही, हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला हवं. त्याला ज्या कौशल्यात गती, ते आत्मसात करण्यास प्रोत्साहित करायला हवे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलाना जे कठीण वाटते, ते सहज करायला शिकवले पाहिजे. जे ते सहज करतात ते सुंदर करायला शिकवले पाहिजे. जे ते सुंदर करतात, ते जतन करायला शिकवले पाहिजे आणि आणि हे जतन केलेलं योग्यवेळी वापरायला शिकवले पाहिजे. एकदा का सुंदर असणारं प्रत्येक कौशल्य जतन करायला विद्यार्थी दशेपासून सुरूवात झाली, तर वेगळं कौशल्य शिक्षण घ्यावे लागते, असे वाटणारच नाही. मात्र, यासाठी शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष देता आले पाहिजे. जर हे साध्य झाले, तर वेगळ्या कौशल्य शिक्षणाची गरज भासणार नाही. म्हणूनच वाटते, गरज वेगळ्या पद्धतीची नाही तर जाणीव निर्मितीची आणि जागृतीची आहे. विद्यार्थ्याला विद्यार्थी बनवण्याची आहे. जर हे घडले तर यश आपल्यापासून दूर राहूचं शकत नाही.  
----००----

१२ टिप्पण्या:

 1. सर
  अतिशय छान लेख
  कौशल्य शिक्षण या विषयाची सुरेख माहिती

  उत्तर द्याहटवा
 2. मी विद्यार्थ्याना नेहमी म्हणतो "तुम्ही पदवी लग्न पत्रिकेवर छापण्यासाठी घेत नाही", त्याचा प्रत्यय येथे येतो

  उत्तर द्याहटवा
 3. प्रत्युत्तरे
  1. खूप छान लेख ..! आज शिक्षणपद्धतीत याचा जाणीवपूर्वक विचार होणे आवश्यक आहे -

   हटवा
 4. "सुंदर ते जतन करावे" शिर्षक वाचूनच लेख वाचण्याची सक्ती निर्माण होते, कारण सुंदर कोणास नको आहे . आता सुंदरता शोधणारी पाहणारी नजर असणे आवश्यक आहे .व ती असलीच तर व्यक्ती सापेक्ष बदलत असते. कोणास काय सुंदर दिसेल हे त्या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. आपणास शैक्षणिक सुंदरता दिसली व ती योग्य शब्दात व्यक्त करता आली . किंबहुना ती योग्यशब्दात कशी व्यक्त करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा लेख. धन्यवाद.
  From-
  A.S. NALAWADE
  DY.REGISTRAR,
  Special cell,Shivaji University,Kolhapur.
  ☎ (0231) 2609320 9226076541

  उत्तर द्याहटवा