शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

पंचगंगा प्रदूषण : खरंचं, आम्ही देवाचं लाडकं लेकरू आहोत?

 

पाणी हे केवळ मानवाच्या नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. पाण्याची गरज ओळखून मानवी संस्कृती नद्यांच्या काठावर विकसीत होत गेली. सुरुवातीपासून निसर्गाच वरदान लाभलेला कोल्हापूर भाग. या भागातून वाहणारी पंचगंगा आणि तिच्या नद्या या भागाला पाणी पुरवत. त्यांच्यामुळेच येथे आजही आर्थिक सुबत्ता आहे. त्यामुळे भारताचे जलमानव कोल्हापूर भागाला देवाचं लाडकं लेकरू म्हणतात. मात्र आज हीच पंचगंगा भारतातील सर्वाधिक प्रदूषीत नदी बनली आहे. हे पंचगंगेचे प्रदूषण पाहिले की मनात प्रश्न पडतो, ‘खरचं, आपण देवाचं लाडकं लेकरू आहोत?’ याच शिर्षकाचा इंद्रधनुष्य मासिकाच्या डिसेंबर २०२२ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला लेख...
___________________________________________________

पाणी हा जीवनाचा आधार. म्हणून तर पाण्याला ‘जीवन’ हे नाव मिळाले. पहिला एकपेशीय जीव तयार झाला पाण्यात. जीवसृष्टी उत्क्रांत पावली पाण्यासह. जगते पाण्यासह. मानवी शरीर असो वा वनस्पती. पक्षी असोत वा प्राणी. प्रत्येक जीवामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधीक असते. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा नाहीत, हे मानवाला अजूनही उमगलेले नाही. मानव अन्न आणि वस्त्राविना राहात होता. राहू शकतो. मात्र पाणी आणि हवेशिवाय राहू शकत नाही. म्हणूनच मानवाच्याच नव्हे, तर प्रत्येक जीवाच्या मूलभूत गरजा या अन्न, पाणी आणि हवा आहेत. यातील हवा मिळवण्यासाठी कोणतीही यातायात करावी लागत नाही. ती आपोआप वाहते. आपणास मिळते. पाणी अजूनही सहज मिळते. अन्न मिळवण्यासाठी मात्र कष्ट करावे लागतात. अजून तरी खरोखरच ‘दे रे हरी, खाटल्यावरी’ म्हणत बसलेल्या कोणाला, विनाकष्ट अन्न मिळत नाही. ते मिळवावे लागते. म्हणून अन्नाबाबत थोडीफार काळजी घेतो. मात्र पाणी आणि हवेबाबत तशी काळजी घेत नाही. हीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात सर्व देशात, प्रांतात पहावयास मिळते.

कोल्हापूरही याला अपवाद नाही. कोल्हापूर जिल्हा हा निसर्ग संपन्न जिल्हा. पश्चिमेस सह्याद्रीच्या पर्वतरांगा. या पर्वतरांगावर विपूल वनसंपदा. संख्या आणि प्रकारानेही. या वनस्पतीवर गुजराण करणारे असंख्य पशू आणि पक्षी. अगदी जागतिक पातळीवर दखल घ्यावी अशी जैवविविधता. जिल्ह्याच्या पूर्वेस सखल प्रदेश. काळ्या मातीची सूपीकता घेऊन दिमाखात वावरणारा. पश्चिमेस शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर अरबी समूद्र. त्यामुळे कोल्हापूरचे हवामान मिश्र प्रकारचे. ना दमट ना कोरडे. मानवी शरीरासाठी सर्वोत्तम. त्यामुळे कोल्हापूर पहिलवानांच्या पसंतीचे गाव. कोकणातील अतीवृष्टीची कोल्हापूरला भिती नाही. काळ्या कातळाने बनलेला सह्याद्री, कोपलेल्या ढगानाही शांत करून कोल्हापूरला पाठवायचा. तरीही जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान हजार मिलीमिटर. सह्याद्रीच्या डोंगररांगात दुपटीपेक्षा जास्त, तर पूर्वेला कमीकमी होत जाणारे. या जिल्ह्यात जीवनदायिनी पंचगंगा वाहते. पंचगंगेला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी या पाच उपनद्या. या भागातील शेतीला पंचगंगा, तिच्या उपनद्या पाणी देतात. पिकवतात. मानवाला भरभरून द्यायला काळ्या आईला सहाय्य करतात. सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणाऱ्या या नद्या पूर्वेस वाहतात. या भागाला समृद्ध करतात. खऱ्या अर्थाने ‘जीवनदायिनी’ नाव सार्थ ठरवतात.

लोकांना सुख आणि समृद्धी या नद्यांमुळे प्राप्त झाली. पंचगंगा खोऱ्यातील लागवडयुक्त क्षेत्र ६३६५१ हेक्टर इतके आहे. त्यातील ५८८७१ हेक्टर क्षेत्रातील जलसिंचन पंचगंगेच्या पाण्यावर होते. भारतातील ऊसाचे सर्वोत्तम क्षेत्र याच भागात. पूर्वीपासून उद्योगजगतात नाव कमावलेले कोल्हापूर, साखर उद्योगामुळेही प्रसिद्ध. गूळ आणि चप्पल उद्योग या भागाची ओळख. लोकांकडे भरपूर पैसा येतो. त्यामुळे भारतात येणारे कोणतेही वाहनाचे नवे मॉडेल कोल्हापूरात लगेच येते. असे हे कोल्हापूर आणि कोल्हापूरी, पंचगंगेमूळे जगात भारी बनलेले. पंचगंगाही समृद्ध होती. अनेक जीव नदीत राहायचे. बारा महिने वाहती असणारी, अनेक जलचरांना पोसत राहणारी पंचगंगा नदी, खरंच समृद्ध होती. डोंगररांगातून, गवताच्या बुंध्यातून नितळ पाणी यायचे. पाणी हातात घ्यावे आणि खुशाल प्यावे, असे पंचगंगेचे पाणी होते. म्हणूनच कोल्हापूर दक्षीण काशी आणि पाच नद्यांची पंचगंगा, बनली. मात्र आज कोल्हापूर आणि परिसराला समृद्धी देणारी नदीच आता दारिद्र्यात जगत आहे.  

नद्यांमधील पाण्याच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार तीन टप्पे पडतात. उगमाजवळचा पहिला टप्पा उत्कृष्ट पाण्याचा असतो. या टप्प्यातील पाणी पिण्यायोग्य असते. त्यामध्ये प्रदूषकांचे प्रमाण नसते. आरोग्यास घातक नसते. मध्यम पाण्याचा टप्पा हा दुसरा भाग. यातील पाणी प्रक्रिया करून वापरण्यास योग्य बनवता येते. घातक पाण्याचा किंवा निकृष्ट पाण्याचा तिसरा टप्पा. या टप्प्यातील पाण्यांमध्ये असणारे ऑक्सीजनचे प्रमाण खूपच घटते आणि हे पाणी आपण प्रक्रिया करूनही वापरण्यायोग्य बनवू शकत नाही. पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांबाबत मध्यम पाण्याचा टप्पा अत्यंत छोटा आहे. तसेच उत्कृष्ट पाण्याचा टप्पाही आखूड आहे. आज पंचगंगा जगातील अनेक नद्याप्रमाणे नव्हे, तर त्यापेक्षा भयानक अवस्थेत आहे. जीवनदायिनी असणाऱ्या नदीची ही अवस्था झाली आहे, ती आपल्यामूळेच. पंचगंगेच्या प्रदूषणाची भिषणता इतर नद्यांपेक्षा जास्त आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतर नद्या प्रवाहीत झाल्यानंतर, अर्धे मार्गक्रमण झाल्यावर प्रदूषीत होतात, पण पंचगंगा ही सुरुवातीपासून, उगमापासून प्रदूषीत बनली आहे. मूळात तिच्या उपनद्याच प्रदूषणाच्या बळी आहेत. याला कारण ठरला आहे मानवाचा हव्यास, अविचारी विकास, निसर्गातील संसाधनांचा अविचारी वापर आणि निव्वळ स्वार्थ.

पंचगंगा खोऱ्यामध्ये साधारण १७४ गावे येतात. या खोऱ्याची लांबी १२५ किलोमीटर भरते. या खोऱ्यांमध्ये सुमारे वीस लाख लोक (२००१ च्या जनगनणेनुसार १५.२४ लाख) राहतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००८ मध्येच पंचगंगा नदीचा समावेश भारतातील सर्वाधीक प्रदूषीत नद्यांमध्ये केला आहे. लोकांना पंचगंगेच्या अवस्थेची जाणीव विसाव्या शतकाच्या अखेरीस झाली. कोल्हापूरातील ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयातही प्रकरण नेले. डिसेंबर १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पंचगंगा शुद्धीकरणासाठी पाच-सहा वर्षांत उपाययोजना पूर्ण करणे आवश्यक होते. यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा कार्यान्वीत करणे, मैला आणि सांडपाणी वाहून नेणारी भूमीगत गटारी बांधणे, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वीत करणे बंधनकारक होते. हा दावा कोल्हापूर महापालिका, इंचलकरंजी नगरपरिषद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विरोधात होता. त्यानुसार अंमलबजावणीची जबाबदारी सर्वांची होती. मात्र पंचगंगा आणि तिच्या नद्यांचे प्रदूषण थांबले नाही, त्यांना गतवैभव मिळाले नाही.

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००२ मध्ये जल प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९७४ मधील कलम ३३(अ)नुसार महानगरपालिकेचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली. डिसेंबर २००३ मध्ये पुन्हा आंदालेनाची सुरुवात झाली. त्यानंतरही मंडळाने पंचगंगा प्रदूषण रोखण्यामध्ये कसूर करणाऱ्यांवर शेकडो वेळा कारवाई केली आहे. कोल्हापूर मनपा, इचलकरंजी नगरपालिका, साखर कारखाने यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हेही दाखल केले आहेत. कोल्हापूर मनपाची प्रथम एक लाख आणि नंतर दोन लाखाची बँक हमी जप्त केली. फेब्रुवारी २००६ मध्ये कालबद्ध कृती कार्यक्रम आखून देण्यात आला. ही सर्व माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. ती आजही उपलब्ध आहे.

आजही कृती कार्यक्रमाची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न गंभीर बनले आहेत. दरवर्षी पाण्याचा प्रवाह खंडीत झाला की काही दिवसांत जलसाठ्यांमध्ये मासे मृत होऊन तरंगत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात कावीळ रोगाची साथ येते.

सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये जेथे पंचगंगेच्या उपनद्या उगम पावतात, त्या भागात मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे. खडीसाठी दगड काढण्यापासून, खनीजे मिळवण्यापर्यंत अनेक कारणांसाठी खोदकाम सुरू असते. खाणकाम करताना जे नियम पाळणे आवश्यक असते, त्यांचे काटेकोर पालन केले जात नाही. खोदकाम करताना बाहेर पडणारी माती, हिरव्या आच्छादनाने झाकणे आवश्यक असते. मात्र तसे होत नाही. पावसाळ्यात ती माती नदीमध्ये येते. या मातीमुळे नद्यांमध्ये प्रदूषकांवर नियंत्रण करणारी जी जैविक यंत्रणा कार्यरत असते, ती कार्यक्षमपणे कार्य करू शकत नाही. पंचगंगेच्या पात्रात त्यामुळे वाळू न आढळता माती दिसते. मुळात पाण्यात प्रदूषकेच मिसळू द्यायला नकोत. ती एकिकडे मोठ्या प्रमाणात मिसळत असताना, त्यावर नियंत्रण करणारी जैविक यंत्रणाही निकामी होते. त्यामुळे खाणकामावर नियंत्रण आणणे, अत्यंत आवश्यक आहे. मात्र आजवर खाणकामावर खऱ्या अर्थाने नियंत्रण आणण्यात यश आलेले नाही. माती नदीपात्रात मिसळल्याने नदी पात्राची खोली कमी होते. जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण घटते. याचा परिणाम भूजल पातळीवरही झालेला आहे. पाण्याची गुणवत्ता, त्याच्या शुद्धीकरणासाठीच्या खर्चात वाढ होणे, हे आणखी काही दुष्परिणाम.

पंचगंगा खोऱ्यातील नागरी वसाहतीमध्ये प्रतीदिन २२० दशलक्ष लिटर पाण्याचा वापर होतो. यातून १७५ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. साधारण तीन हजार उद्योगधंद्यातून २० दशलक्ष लिटर वापरलेले पाणी बाहेर पडते. पंचगंगा खोऱ्यामध्ये ११०० दवाखाने आहेत. डझनभर प्रयोगशाळा आहेत. सहा हजार अंतर्रूग्णांची सुविधा आहे. यातून सुमारे नऊ लाख लिटर सांडपाणी तयार होते. पन्नासपेक्षा जास्त सर्व्हीसिंग केंद्रातून पाच लाख लिटर सांडपाणी बाहेर पडते. तीन मोठ्या कत्तलखान्यामध्ये दोनशेपक्षा जास्त लहान जनावरे कापली जातात. चार ते पाच मोठ्या जनावरांची कत्तल होते. त्यातून अडीच हजार लिटर द्रवकचरा तयार होतो. शेकडो कोंबड्या कापण्याची ठिकाणे, मत्स्यविक्री केंद्रे आहेत. त्यातून बाहेर पडणारा द्रवकचरा सुमारे अडीच हजार लिटर आहे. हजारपेक्षा जास्त हॉटेल्स, खानावळी फेरीवाले यांच्याकडून जवळपास वीस लाख लिटर सांडपाणी तयार होते. आरोग्याच्या दृष्टिने गटार योजना सर्वत्र राबवण्यात आली. परिणामी पूर्वीप्रमाणे वापरलेल्या पाण्याचा थोडाही अंश जमिनीत मुरत नाही. गावातून आणि शहरातून असे तयार झालेले सांडपाणी गटारातून पुढे वाहत जाते आणि अखेर नदीपात्रात मिसळते. या पाण्यातील बहुतांश पाण्यावर प्रभावी प्रक्रिया करण्यात आलेली नसते. वापरलेलया पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलेले असते. त्याखेरीज साबूण, अल्कली, आम्लांश, शौचालयासाठी वापरलेल्या पाण्याचा अंश मिसळलेला असतो. असे पाणी शुद्ध पाण्यात जगणाऱ्या जलचरांना घातक ठरते. तसेच नैसर्गिक पाणी शुद्ध करणाऱ्या घटकांनाही जगू देत नाही.

पंचगंगा खोऱ्यामधील शेतीमध्ये पूर्वी सेंद्रीय घटकांचाच वापर होत असे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होण्याचा धोका नसे. मात्र हरित क्रांतीनंतर रासायनीक खते आणि किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला. आजमितीला दरवर्षी ८०,००० टनांपेक्षा जास्त रासायनीक घन पदार्थांचा शेतीमध्ये वापर होतो. तसेच द्रवस्वरूपातील किटकनाशके, खते यांचा वापर सुमारे ५०,००० लिटरपेक्षा जास्त होतो. यातील दहा टक्केपेक्षा कमी भाग पिकांसाठी वापरला जातो. उर्वरित भाग जमिनीवरील मातीमध्ये मिसळतो. पावसाच्या पाण्यामध्ये मिसूळून तो नदी पात्रामध्ये येतो. नायट्रोजनयुक्त खते, विषारी किटकनाशके यांचा परिणाम जनावरांपासून अन्य जैवीक घटकांवर मोठ्या प्रमाणात होतो. पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मधमाशांच्या पोळ्यांची संख्या घटण्याचे हेच प्रमुख कारण आहे. हे दृष्यरूपात जाणवणारे उदाहरण. इतर अन्य घटकांवरही मोठा परिणाम झाल्यांने जैवविविधता संपुष्टात येत आहे. त्याचबरोबर खते आणि किटकनाशके मिसळलेले पाणी नदीपात्रात आल्यानंतर ते जलचरांनाही घातक ठरते.

याचप्रमाणे नोंदणी असलेल्या २३७ ठिकाणी सुमारे ५३० टन निर्माल्य नदीपात्रात टाकण्यात येते. ते थेट पाण्यात पडते. पाण्यात कुजते. कुजताना पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये २३७ ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विशेषत: गणपतींच्या एक लाखापेक्षा जास्त लहानमोठ्या मूर्त्यांचे विसर्जन होते. तसेच हजाराहून जास्त सार्वजनीक मंडळे आपल्या गणपतींचे विसर्जन करतात. या मूर्त्यांसाठी वापरण्यात आलेले रंग गोणपाट आणि कापडांचे तुकडे पाण्यात मिसळतात. रंग जलचरांना अपायकारक असतात. पूर्वी मातीच्या किंवा शाडूच्या असत. त्यांची संख्या कमी आणि आकार लहान असायचा. त्या मूर्त्या पाण्यात विरघळून जात. आज मूर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. त्या पाण्यात विरघळत नाहीत. तळाशी तशाच साठून राहतात. याचा परिणाम एकूण जलसृष्टीवर होतो.

पंचगंगा खोऱ्यातील कोल्हापूर, इचलकरंजी या शहरातील आणि गावागावातील स्मशानभूमीमध्ये जवळपास पाचशे टन राख तयार होते. धार्मिक प्रथानुसार ही राख पाण्यात विसर्जीत करतात. नदीपात्रात दररोज तीन हजार जनावरांना स्नान घातले जाते. नोंदणी असलेल्या कपडे धुण्याच्या ठिकाणांची संख्या २२३ आहे. या ठिकाणी आठ हजार लोक कपडे धुण्याच्या कार्यात गुंतलेले असतात. कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साबणाचे पाणी, कापडांचा मळ थेट पाण्यात मिसळतो. साबणाचे पाणी जीवसृष्टीला अपायकारक असते.

पंचगंगा खोऱ्यांमध्ये प्रतीदिन ४२० टन घनकचरा प्रतीदिन तयार होतो. औद्योगिक वसाहतीत प्रतीदिन ९० टन घनकचरा तयार होतो. विविध हॉस्पीटलमधून प्रतीदिन साडेसहाशे टन जैववैद्यकीय घन कचरा तयार होतो. सर्व्हीसिंग सेटर, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणारे फेरीवाले यांच्याकडून प्रतीदिन आठशे टन घनकचरा तयार होतो. हा सर्व कचरा गावातून गोळा करून एका ठिकाणी टाकला जातो. या कचऱ्याचे ओला, सुका कचरा आणि प्लॅस्टीक असे वर्गीकरण करणे आवश्यक असते. तसे १०० टक्के वर्गीकरण होत नाही. यातील प्लॅस्टिक कचरा वर्षांनुवर्षे कुजत नाही. मात्र त्यातील घटक हळूहळू पाण्यात मिसळण्यास सुरुवात होते. मानव आणि इतर प्राण्यांच्या रक्तामध्ये प्लॅस्टिकचे अंश सापडल्याचे २०२२ च्या सुरुवातीस संशोधकांनी शोधले. यामुळे मानवाच्या आयुष्य कमी होणे आणि विविध आजारांना निमंत्रण, दोन्ही गोष्टी घडत आहेत.  

पंचगंगेच्या प्रदूषणाची ही कारणे आहेत. यातून केवळ मानवी जीवनच नाही, तर शेती आणि निसर्गातील इतर घटकांनाही मोठा धोका निर्माण झालेला आहे. याचे गांभिर्य, आपल्या जीवावर बेतत नाही, तोपर्यंत समजून घ्यायचे नाही, असेच आपण ठरवले आहे की काय, असे वाटते. शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम पाण्याचा वापर आणि त्यातून तयार होणाऱ्या नेमक्या सांडपाण्याची नेमकी आकडेवारी काढायला हवी. सर्व प्रकारचे वापरलेले पाणी वाहून नेण्यासाठी गटार योजना राबवायला हवी. या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पांची उभारणी करायला हवी. प्रक्रिया झालेल्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणाही उभारणे आवश्यक आहे. सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे वेगवेगळ्या भागात उभा करायला हवीत. तसेच या केंद्रांचा विद्युत पुरवठा अखंडीत राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शहराचा, गावाचा विस्तार कोणत्या भागात होणार, याचा अंदाज बांधून उद्याने, मैदाने, शिक्षणासाठी आरक्षीत जागा ठेवण्यात येतात. त्याप्रमाणे सांडपाणी प्रकल्पासाठी जागा आरक्षीत ठेवायला हव्यात. सांडपाणी प्रकल्प छोटे असल्यास त्यामधून बाहेर पडणारे प्रक्रिया केलेले पाणी त्याच भागातील उद्याने, शिक्षण संस्थांच्या बागा, शौचालयातील फ्लश इत्यादींसाठी पुरवणे सोईचे होईल. ग्रामीण भागात अशा केंद्रातून तयार होणारे पाणी जनावरांसाठी हिरवा चारा निर्मिती आणि गुणवत्तेनुसार शेतीसाठी वापरता येणे शक्य आहे.

उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यांमध्ये जड धातू, तेल, रसायने, आम्ल आणि अल्कलींचा समावेश असतो. या घटकांमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने घटते. त्यामुळे प्रत्येक कारखान्याचा सीईटीपी (Common Effluent Treatment Plant) असेणे सक्तीचे असले पाहिजे. ज्या उद्योगात असा प्रकल्प नसेल, त्यांचे उत्पादन बंद करायला हवे. ज्या उद्योगांनी बोअरवेलमध्ये असे पाणी सोडले आहे. तेही तातडीने बंद करायला हवे. बांधकामाचा परवाना देताना कठोर नियम लावायला हवेत. त्यामुळे याबाबत उपाययोजना करणे आणि त्याची सुरुवात स्वत:पासून करणे आवश्यक बनते. साखर कारखान्यांनी त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि ते पाणी इतर कारणांसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. साखर कारखान्यांची मळी ओढ्यात येणे आणि नंतर ती नदी पात्रात पोहोचणे यामुळे पाण्याबरोबरच हवेचेही प्रदूषण होत असते. ज्या साखर कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया केली जात नाही, त्या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस घालणे बंद करायला हवे. जनता जोपर्यंत सक्रीय होत नाही, बहिष्कारासारखे शस्त्र उगारत नाही, तोपर्यंत साखर कारखाने आणि उद्योगांचे सांडपाणी नदीत येणे थांबणार नाही. तसेच, उद्योगांतील सांडपाण्यांमध्ये जड मूलद्रव्ये असतात. त्यांचा शरीरावर थेट परिणाम होतो. पाण्यात विरघळलेली ही मूलद्रव्ये जाणवत नाहीत, दिसत नाहीत. मात्र त्यांचे अत्यंत गंभीर परिणाम होतात. त्यामुळे उद्योगातील पाण्यावर प्रक्रिया होणे अत्यंत आवश्यक असते. मात्र अनेक उद्योग जमिनीत खड्डे घेतात, बोअरवेलमध्ये पाणी सोडतात. अशा उद्योगांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही व्हायला हवी.

कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय आणि काही अपवादात्मक दवाखाने वगळता इतर दवाखान्यांनी त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कार्यान्वीत केली नाही. हे पाणी गटारात आणि नदीपात्रात जाते. मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. निदान अशा दवाखान्यांना मोठा अधिभार लावणे आणि त्यातून प्रक्रिया केंद्र विकसीत करण्याची गरज आहे. ज्या दवाखान्यांमध्ये प्रक्रिया करण्याइतके सांडपाणी तयार होत नाही, अशा दवाखान्यांना ते साठवण्यासाठी काँक्रीटमध्ये खड्डा बांधणे आणि त्यामध्ये साठवलेले पाणी टँकरच्या माध्यमातून प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था उभारण्याची गरज आहे. हौदातील पाणी उचलेपर्यंत त्याचे क्लोरीनेशन करायला हवे. कत्तलखाने, मटण दुकानांमध्ये तयार होणारे सांडपाणी एकत्र करायला हवे. या पाण्याची दुर्गंधी पसरू नये, म्हणून प्राथमिक दक्षता घ्यायला हवी. फेरीवाल्यांसाठीही अशी योजना राबवायला हवी.

शेतीसाठी वापरले जाणारी किटकनाशके, तणनाशके आणि रासायनीक खते कशी आणि किती प्रमाणात वापरावीत, याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. सूक्ष्म सिंचन, खतांचा मूळांशी आणि आवश्यक तेवढाच वापर, सेंद्रीय खतांचा जास्त वापर या बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून उत्पादन वाढ करून देणे आवश्यक आहे. शेती उत्पादनांतील फळे, भाजीपाला आणि अगदी दुधातसुद्धा रासायनीक खते आणि किटकनाशकांचे अंश आढळतात. अन्य भागाच्या तुलनेमध्ये कोल्हापूर आणि त्यातही शिरोळ भागात कर्करोगाचे प्रमाण जास्त असण्यामागे किटकनाशकांचा अतिरेकी वापरच कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शेतीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचेही अचूक मापन होणे गरजेचे आहे. विक्रमी ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सत्कार करण्यात येतो. त्याऐवजी किमान पाण्यांमध्ये कमाल उत्पादन घेतील, अशा शेतकऱ्यांचा सन्मान करायला हवा.

धार्मिक प्रथा, परंपरानुसार नद्यांमध्ये केले जाणारे रक्षा, मूर्ती, निर्माल्य विसर्जन काळानुरूप थांबवायला हवे. रक्षा विसर्जन करण्याऐवजी ती राख विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांची उद्याने, ज्या शेतकऱ्यांची इच्छा असेल त्यांच्या फळबागासाठी वापरायला हवी. निर्माल्यापासून सेंद्रीय खताच्या निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याची गरज आहे. मूर्तींचा आकार मर्यादित ठेवण्यासाठी निर्बंध आणायला हवेत. नैवेद्य, तेल, मैदायुक्त पदार्थ पाण्यात मिसळले जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. नदी पात्रात पोहणे, कपडे आणि जनावरे धुणे यावरही निर्बंध आणण्याची गरज आहे. ‘आम्ही शेकडो वर्ष इथंच जनावरे धुतो’, हा दुराग्रह शेतकऱ्यांनी सोडून द्यायला हवा. त्यावेळी गावात दहा जनावरे असायची ती हजार झाली आहेत, हे लक्षात घेऊन आपण आपले वागणे, पद्धती बदलायला हव्यात. कपडे आणि जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र कठ्ठे आणि व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. 

घनकचरा वर्गीकरण आणि त्यावरील प्रक्रिया केंद्रे कार्यक्षम करणे, आवश्यक आहे. खडीसाठी डोंगर सपाट करणे आणि कचऱ्याचे डोंगर उभा करणे पंचगंगेच्या खोऱ्यात सुरू आहे. या दोन्ही गोष्टींमधून पंचगंगेचे प्रदूषण वाढते. घनकचऱ्यातील जैविक कचऱ्यातून खताची निर्मिती आणि थर्माकोल, प्लॅस्टिकपासून विटा, प्लायवूड निर्मिती करण्याचे प्रकल्प उभा करायला हवेत. सर्व पॅकींग करून उत्पादने विकणाऱ्या कंपन्यावर कचरा निर्मूलन अधिभार लावून तो पैसा या कार्यासाठी वापरण्यात यायला हवा.

महात्मा गांधी म्हणतात, ‘जमीन, नैसर्गिक संसाधने ही आपल्या बापजाद्यांची जहागिरी नाही, तर ती पुढील पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी आहे’. त्यामुळे या जलस्रोतांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये. त्याचप्रमाणे जे.आर.डी. टाटा म्हणतात, ‘पैसे तुमचे आहेत, पण नैसर्गिक संसाधने सर्वांची आहेत. त्यांचा वापर सर्वांनाच करता यायला हवा’. या दोन महनीय व्यक्तींचे विचार पाहून एक उपाय आणखी करणे आवश्यक वाटते. प्रत्येक घराची पाणीपट्टी ही घरातील व्यक्ती निश्चित करून व्हायला हवी. प्रतीमाणसी १३० लिटर एवढे पाणी, कमी दराने पुरवावे. त्या मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरणारास किमान पाचपट पाणीपट्टी आकारण्यात यावी. यातून ज्यांच्याकडे पैसे जास्त असेल, ते जास्त पैसे मोजतील. त्याचा उपयोग पाण्याच्या शुद्धीकरणासाठी करता येईल.

भारताचे जलपुरूष राजेंद्रसिंह राणा कोल्हापूर भेटीत २०२२मध्ये म्हणाले होते, ‘कोल्हापूर हे देवाचे लाडके लेकरू आहे. त्यांने निसर्गातील जे काही देता येणे शक्य होते, ते सारे काही कोल्हापूरला दिले आहे. ते जतन करायला हवे. तरच कोल्हापूर देवाचे लाडके लेकरू राहील.’ मात्र पंचगंगेची अवस्था पाहिल्यानंतर, आपण खरंच देवाचं लाडकं लेकरू म्हणवून घेऊ शकतो का? हा प्रश्न मनात येतो. इंग्लंडमधील नागरिक, एकेकाळी जगातील सर्वात प्रदूषीत थेम्स नदीला, दहा वर्षात जगातील सर्वात स्वच्छ नदी बनवू शकत असतील, तर आम्ही कोल्हापूरी, जगात भारी आहोत. आम्ही पंचगंगा शुद्ध करून, ते सिद्ध करण्याची गरज आहे. यासाठी इतर काय करतात, याचा विचार करायला नको. मी करून काय होणार असा विचार करण्यापेक्षा, मी केले तर निश्चित होणार, हा विचार करायला हवा. तरच पंचगंगा पुन्हा जिवनदायिनी बनेल. इचलकरंजी, शिरोळमध्येही पंचगंगेचे पाणी थेट पिता येईल.


शनिवार, १४ जानेवारी, २०२३

मोर, सावित्री आणि पु.शि. रेगे

 डिसेंबर २०२० मध्ये मी मोरासंदर्भात ‘… कसा पिसारा फुललाहा लेख ब्लॉगवर प्रसिद्ध केला. तो वाचून मराठीतील कवी, लेखक, संत साहित्याची विशेष जाण असणारे डॉ. शामसुंदर मिरजकर यांनी मोराचे साहित्यातील प्रतिबिंब शब्दांकित करताना, पु.शि. रेगे यांच्यासावित्रीकादंबरीतीलमोरयायला हवा होता, असे सांगीतले. हे पुस्तक मिळवले. आकार पाहून एका बैठकीत वाचून संपेल, असे वाटले. मात्र तसे झाले नाही. हे पुस्तक म्हणजे निव्वळ कथा नाही. यात लेखकाने अनेक विषयांनाप्रश्नांना हात घातला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला जे वाटले ते "शब्द शिवार – २०२२" च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहे... तो लेख आपल्यासाठी...

________________________________________________________

समाज माध्यमे माझ्यासारख्यासाठी वरदान आहेत. धकाधकीच्या जीवनात प्रत्यक्ष भेटता, एकमेकांच्या चांगल्या गोष्टी समजून घेणे, त्यावर भाष्य करणे, सूचना करणे त्यामुळे सहजशक्य झाले. यातून चांगल्या सूचना येतात आणि त्या माझ्यासारख्याला विचारप्रवण ठेवतात. मध्ये एका ब्लॉग वाचकाने दसऱ्यापूर्वी आपट्यावर लिहावे, असे सुचवले आणि आपट्याबाबत भरपूर शोध घेऊन मी लिहिले. समाज माध्यमांचा मोजका आणि शैक्षणिक प्रबोधनात्मक कार्यासाठी वापर करणारी मंडळी भेटतात आणि त्यांचा चांगला फायदा होतो.

डिसेंबर २०२० मध्ये मी मोरासंदर्भात ‘… कसा पिसारा फुललाहा लेख ब्लॉगवर (http://drvnshinde.blogspot.com/2020/12/blog-post.html) प्रसिद्ध केला. तो वाचून मराठीतील कवी, लेखक, संत साहित्याची विशेष जाण असणारे मित्रवर्य डॉ. शामसुंदर मिरजकर यांनी एक नोंद निदर्शनास आणली. मोराचे साहित्यातील प्रतिबिंब शब्दांकित करताना, त्यांना- पु.शि. रेगे यांच्यासावित्रीकादंबरीतीलमोरयायला हवा होता. त्यांनी स्पष्टपणे तसे लिहिले नव्हते. पण मुद्दा मांडतानाची तळमळ तसे सुचवत होती. सावित्री मी वाचलेली नव्हती. अर्थातच तिचा उल्लेख येणे स्वाभाविक होते. मात्र आता वाचणे क्रमप्राप्त होते. मागे लोकसत्ताचे माजी निवासी संपादक श्री. सुधीर जोगळेकर सरांनी डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्यावृक्षगानचा उल्लेख केला आणि मला ते पुस्तक मिळवून वाचल्यानंतरच समाधान लाभले. मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने मराठी साहित्यातील मुशाफिरी तशी बेताची. त्यामुळे असे कोणी काही सांगितले की ते मिळवून वाचेपर्यंत मन शांत होत नाही.

तर मिरजकर सरांनी सावित्रीबद्दल लिहिलं. त्यांनी या पुस्तकावर लिहिलेला लेखही पाठवला. त्यानंतर या पुस्तकाची ओढ जास्तच वाटू लागली. अखेर हे पुस्तक मिळवले. आकार पाहून एका बैठकीत वाचून संपेल, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. पुस्तक वाचत पुढे गेल्यानंतर तो भाग वेगळेच काही सांगत आहे, असे वाटायचे. त्यामुळे अनेक पत्रे पुन्हा सुरुवातीपासून वाचली. वाचावी लागली. हे पुस्तक म्हणजे निव्वळ कथा राहिलेले नाही. यात लेखकाने अनेक विषयांनाप्रश्नांना हात घातला आहे. हे पुस्तक विविध पैलूंवर वाचकाला विचार करायला लावते. पुस्तक वाचून पूर्ण होताना याची खात्री पटते.

वर वर पाहिले तर या कादंबरीत मुग्ध प्रेमाची यशस्वी सांगतासांगणारी कथा मांडली आहे. मात्र हे प्रेम शारीर नाही. दोन मनांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे हे शेवटपर्यंत बिंबवत जाणारी मांडणी आहे. या कादंबरीला पत्राच्या माध्यमातून पुढे नेलेले आहे. पत्रातील संवादही दुतर्फा नाहीत. केवळ नायिकेने पाठवलेल्या ३९ पत्रांच्या आशयातून ही कथा उलगडत जाते. तरीही संदर्भ तुटत नाहीत. पहिल्या पत्रातच मोराची कथा येते. एक म्हातारी आणि तिची नात लच्छी यांची ही कथा. या कथेत लच्छी घराजवळ आलेला मोर पाहते. मोर पाहताच ती नाचू लागते. तिला तो इतका आवडतो की तो बांधून ठेवला पाहिजे, असे तिला वाटते. तिला मोर पाळायचा आहे. परिस्थितीन्य कारणाने आज्जी नकार देते. मोर पाळू शकत नाही. लच्छी नाराज होते. मग मोरच एका अटीवर तेथे यायला तयार होतो. ती अट म्हणजे मोर आल्यानंतर लच्छीने अगोदर नाचले पाहिजे. नाचायचे तर मन आनंदी असले पाहिजे. मोर कधीही येऊ शकतो. तो आला की वेळी अवेळी नाचायला हवे. असे करायचे तर स्वानंद प्रत्येक ठिकाणी शोधता आला पाहिजे. नायिकेच्या या पत्रातील एक वाक्यमोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जें जें हवं ते आपणच व्हायचं.’ हे वाक्य खूप काही सांगून जाते (पान क्र.). ळात मोराचं दर्शनच आनंददायी. पण मनाला मोर भावतो तो नृत्यमुद्रेतला. त्यात मोराने घातलेली, लच्छीने अगोदर नाचण्याची अट आणि त्यानंतर आलेले हे वाक्य. म्हणजे आहे त्या परिस्थितीला सामोरे जातानाही मन प्रसन्न असायला हवे, असे लेखकाला सुचवायचे आहे. विशेष म्हणजे गोष्टीचे तात्पर्य नायिकेला राजम्मा सांगत नाही. नायिका ते शोधते. नायिकेचे हे वाक्य कथेचे तात्पर्य आहे. पुन्हा कथानकाच्या शेवटच्या टप्प्यावर मोराचा उल्लेख येतो. नायिकेने लहान मुलांच्या नाचाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कादंबरीच्या शेवटी पुन्हा मोर आणून लेखकाने वर्तूळ पूर्ण केले आहे.

लेखनासाठी निवडलेला कालखंडही मोठा सूचक आहे. १९३९ ला ही पत्रकथा सुरू होते. त्यावेळी जगामध्ये अशांततेचे ढग जमा होत होते. जर्मनी पहिल्या महायुद्धाच्या तहावेळी लादलेल्या जाचक अटीमुळे अशांत होता. तो पुन्हा लढाईच्या तयारीला लागला होता. मात्र ही अशांतता उघड नव्हती. जगामध्ये अंतर्गत खळबळ जोरात होती. भारतातही स्वातंत्र्याच्या मागणीने जोर धरला होता. नायिकेच्या मनातील वादळही त्याचवेळी सुरू झालेले दाखवले आहे. लेखकाने नायिकेची मानसिकता दाखवण्यासाठी या जागतिक परिस्थितीचा संदर्भ सूचकतेने घेतला आहे. कथानक संपते, त्या दिवशी एजवर्थ यांच्या घराचे खेळघरामध्ये रूपांतर करून त्या खेळघराच्या उद्घाटनासाठी बालगोपाळांच्या नाचाचा कार्यक्रम ठेवला आहे. हा दिवस आठ वर्षांनंतरचा आहे. या दिवशी भारत स्वतंत्र झाला. त्यापूर्वी नायक आणि नायिका परस्परांना स्वीकारतात, असे दर्शवले आहे. हे दोघे जे नाते पत्रातून जपत होते, त्याला आता एक रूप प्राप्त होत असल्याचे सुचवत कथा संपते. स्वातंत्र्य दिन निवडण्याचे कारण परस्परातील बंधने गळून त्यांनी परस्परांना स्वीकारले. बंधमुक्त झाल्याचे सूचक स्वातंत्र्य दिन. आपल्याला स्वातंत्र्य मिळताना दुसऱ्या महायुद्धाने ब्रिटन खिळखिळा झाला आणि पारतंत्र्याचे बंधन गळाले, असे लेखकाने चवल्याचे दिसून येते.

नायिका ही आईविना वाढणारी मुलगी. तिचे नाव सावित्री. तिला साउ म्हणतात. वडिलांनी तिच्या स्वभावाला पाहून तिला आनंदभाविनी असे म्हटले आहे. ती सर्वात अगोदर स्वत:ला विसरायला शिकली. मोर नाचताना बेभान होतो, स्वत:ला विसरतो. साउही सर्वात अगोदर स्वत:ला विसरायला शिकली आहे. ती सर्वांची काळजी करते. बालपणापासून ती हट्ट करायला विसरली आहे. ती समंजस आहे. हुशार आहे. वर्गात प्रा. गुरूपादस्वामींच्या विषयात पैकीच्या पैकी गुण तिने प्राप्त केले आहेत. राजम्माने सांगितलेल्या कथेचे तात्पर्य ती आपल्या परीने शोधते. म्हणजे तिच्याकडे विश्लेषण क्षमता आहे.

ती स्त्री-पुरुष समानता मानते. प्रवासात भेटलेल्या युवकाने सामान उतरवताना मदत केली. त्यानंतर तिने चहाचे बिल दिले. तिने मोबदला म्हणून हे केले नाही. मात्र उपकाराची जाण तिच्यामध्ये आहे, त्या कृतज्ञतेपोटी तिच्याकडून नकळत घडलेली ती कृती आहे. त्याचा सभ्यपणा ओळख नी नसतानाही मदत करण्याची वृत्ती लक्षात घेऊन साऊ त्याच्या संपर्कात राहते. हा साउचा सुसंस्कृतपणा संपूर्ण कथानकभर आहे. ती बहुभाषिकही आहे. तिचे वडील आप्पा हे एक अभ्यासू आणि सर्जनशील व्यक्तीमत्व. ते शिस्तप्रिय आहेत. ते नायिकेवर रागावत नाहीत. यामुळेच आप्पा दुखावणार नाहीत, याची ती परोपरीने काळजी घेत असते. आप्पांच्या विद्वत्तेमुळे लोक त्यांच्याशी चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला येत असतात. आप्पा आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांना त्यांचे काम सुरू असताना कोणाची लुडबूड नको असतो. आप्पा एक्सपिरियन् अँड ग्रोथनावाचा ग्रंथ लिहित आहेत. हे नावही खूप सूचक आहे. अनुभवातून ज्ञानामध्ये वाढ अपेक्षित असते. ‘अनुभवातून माणूस शिकतोअसे म्हणतात. अनुभव आणि ज्ञान परस्परपूरक गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी अदृष्य आहेत. त्या जाणवतात, अनुभूती घेता येते. मात्र त्या डोळ्याना दिसत नाहीत. आप्पांचे हे पुस्तक क्रांतीकारक ठरणार, असे आप्पांचे मित्र एजवर्थ यांचे म्हणणे असते. त्या पुस्तकाच्या लिखाणावर त्यांनी व्याख्याने द्यावीत, असे त्यांना सुचवले जाते आणि आनंद मिशनच्या माध्यमातून ते व्याख्याने देण्यासाठी जपानला जातात.

आप्पांच्या स्वत:च्या विश्वात रमण्यामुळे साउकडे मोकळा वेळ असतो. या वेळेत ती आपला अवकाश शोधत असते. याचाच एक भाग म्हणजे पत्र लेखन. साउ अनेक गोष्टी करत असते. आप्पांसमवेत ती जपानला जाते. तेथेही ती आपला अवकाश शोधते. या अवकाशात ती रमते. नवे मित्र मैत्रिणी जोडते. तेथे एक नाटक लिहिते आणि बसवते. आप्पांच्या आजारपणामुळे तिचा दवाखान्याशी संबंध येतो. त्या दवाखान्यात, युद्ध कालावधीत, ती परिचारिकेचे काम स्वीकारते. जपानमध्ये तिला आझाद हिंद सेनेतील सैन्य धिकारी सेन भेटतात. त्यांचे जपानी नर्सबरोबर लग्न झालेले असते. ते दुसऱ्या महायुद्धात झालेल्या एका हल्ल्यात गायब होतात. त्या धक्क्याने त्यांची जपानी पत्नी अकाली प्रसूत होते. त्यात तिचेही निधन होते. त्यांची कन्या बीनाला साउ आपली मुलगी मानते. आप्पाचे निधन जपानमध्येच झाले. मात्र ती भारतात येताना जपानी माता आणि बंगाली पित्याची मुलगी कुर्गमध्ये वाढवण्यासाठी घेऊन आली. ती मनस्विनी आहे. स्वभावाने मनमोकळी आहे. नायकाने तिला मनमोकळीअसे नावही दिले आहे. जपानमध्ये स्वीडनची भेटलेली मैत्री ल्योरे हिच्यासमवेतचा फोटो ती नायकाला पाठवते. तिला आवर्जून भेटायला सांगते. यामध्ये तिला स्त्री स्वभावाला अनुसरून असुरक्षित वाटत नाही. उलट आपण लिहिलेल्या पत्राचा मजकूर लिहिताना ल्योरेचाही सहभाग होता, असे खुलेपणाने लिहिते (पृष्ठ ८६). यात नायकाने तिचेमनमोकळीअसे केलेले नामकरण किती सार्थ आहे, हे लक्षात येते.

ती मनाने किती चांगली आहे, तर तिला जगात सर्व चांगलेच लोक आहेत, असे वाटते. तिला तसा कटू अनुभवही आलेला नाही. ती चांगली व्यवस्थापिका आहे. नायक येणार म्हटल्यावर  कसे यायचे’, याची माहिती देणारे पत्र आणि स्वत:ला घालून घेतलेली बंधने याची साक्ष देतात. तसेच येताना आपल्यासाठी काही आणू नका, हे लिहायला ती विसरत नाही. ‘ही भेट निरपेक्ष असावीही साउची अपेक्षा आहे. शेवटच्या भागात नायकाच्या येण्यापूर्वी त्याच्या राहण्याच्या केलेल्या व्यवस्थेच्या वर्णनातही हे जाणवते.

साउला नायकाला भेटायची ओढ लागली आहे. तो येणार याची तिला असणारी उत्कंठा, ओढ चौदाव्या पत्राच्या शेवटी केलेल्या वारांच्या उल्लेखात दिसते. नायक येतो त्यांची भेट होते. मात्र त्यानंतरचा त्यांचा पत्रव्यवहारही प्रेमाच्या पारंपरिक संकल्पनेकडे जात नाही. ती त्याच्या इतरांच्या दृष्टीने असणाऱ्या दोषांनाही गुण मानत राहते. म्हणजे तिने त्याला मनोमन स्वीकारले आहे. ‘माणसानं इतकं शांत असू नये म्हणतातपण तुम्हाला हा शांत-वेष अधिकच शोभून दिसतो,असे सूचक वाक्य लिहिलेले आहे (पान क्र.३१). या काळात नायिकेच्या मनात गोंधळ उडालेला आहे. ती, नायकाबद्दल आकर्षण का वाटते? याचाही उल्लेख करते. मात्र ती स्पष्टपणे कोठेही व्यक्त होत नाही.

आप्पांचे मित्र एजवर्थ हे ब्रिटिश आहेत. ते लागवड करणारे (प्लँटर) आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पूर्वजन्मीचे कुर्गवासी होते. ते तीस बत्तीस वर्ष तेथे राहात होते. त्यांना पुढच्या जन्मीही कुर्गमध्येच जन्माला यायचे होते. पण त्यांना कूर्ग स्त्रीचा जन्म हवा होता. ते अविवाहि आहेत. त्यांचे १९४३ मध्ये निधन होते. त्यांनी आपली सर्व संपत्ती नायिकेच्या नावे केली आहे. एजवर्थ यांच्या घराचं साउ खेळघरात रूपांतर करते. या खेळघराचे उद्घाटन १५ ऑगस्ट १९४७ रोजी करायचे आहे. त्यासाठी नायकाने यायचे आहे, हे सांगणाऱ्या पत्राने कथा संपते. मात्र त्यापूर्वी ३५ वे पत्र वाचताना नायकाने प्रेम व्यक्त केले आहे, असे लक्षात येते. यावर नायिका तितक्याच मोकळेपणाने आपणासही ते हवे आहे’, असे लिहिते. तिलाही हा प्रतिसाद हवा होता. खरे तर सहा वर्षांचा पत्रव्यवहारही प्रेमच होतं. पण ती स्वत: कधीच व्यक्त झालेली नाही. त्याच्या पुढाकाराची स्त्रीसुलभ भावनेने ती वाट पाहात होती. या पत्रातीलतुम्ही मला उचलून, ओढून न्यायला हवं होतंहोय, हे मी अगदी खरं खरं लिहित आहे’, (पान क्र.१०४) या वाक्यातून ही अपेक्षा स्पष्ट होते.

या कादंबरीला केवळ प्रेमकथेमध्ये बांधणे अन्यायकारक ठरेल. या कथानकात अनेक उपकथानके, पात्रे, व्यक्ती आणि देशसुद्धा भेटत राहतात. केवळ ११७ पानांची ही कादंबरी. तिचा आकार छोटा पण अवकाश मोठा आहे. एका तरूण मुलीच्या भावभावनांचा गुंता अलगद सोडवत जाणारी ही कथा. मुग्ध प्रेम ते परिपक्व प्रेमाची ही कथा, एवढेच या कथेत सापडत नाही. नायिका गुणसंपन्न आहे. ती मनाने भेदाभेदाच्या पलिकडे आहे. तरीही ती स्त्री आहे, हेजन्माला येताना प्रत्येक मुलगी आपल्या आईला आणि बापालाही सोडण्याची तयारी करून आलेली असते,या विधानातून हे स्पष्ट होते (पान क्र.१०६). साउचे चित्रण एका आदर्श, परिपक्व, कलासक्त मुलीचे आहे. त्यामुळेच या कथेत अनेक प्रश्नांना आणि संकल्पनाना सामावून घेणे लेखकाला शक्य झाले आहे.

कादंबरीचा लेखन काल हा १९६०-६२ या कालावधीतील असावा. कादंबरी १९६२ मध्ये प्रकाशित झाली. त्या काळात पर्यावरणाचा प्रश्न एवढा ऐरणीवर आलेला नव्हता. मात्र या कादंबरीत तो अतिशय तळमळीने मांडला आहे. साउने जपानमध्ये लिहिलेले आणि बसवलेले नाटकगाणारे झाडयाचा कादंबरीतील उल्लेख सविस्तर आहे. या नाटकाची कथा वाचताना मानवी वस्त्यासाठी केली जाणारी वृक्षतोड कसे, गंभी रूप धारण करणार आहे आणि पुन्हा मानवाला वृक्ष लागवड करावी लागणार आहे, हे सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे लक्षात येते. मुळात मानव निसर्गातील एखाद्या घटकाचा त्रास झाला की तिच्या मुळावरच उठतो. नचा प्रमुख माओ झेडोंग याने चिमण्या पिकाचे नुकसान करतात, म्हणून देशातील सर्व चिमण्या मारायला सांगितले होते. तो कालखंड १९५८ ते ६१ चा. त्यामुळे शिकारीवेळी पक्ष्यांच्या आवाजाने राजाची शिकार सुटते. पक्ष्यांमुळे हे घडले. पक्ष्यांचा हा त्रास होतो, म्हणून राजा पक्ष्यांना नाहिसे करण्यास सांगतो. त्यांना नाहिसे करण्यासाठी झाडच तोडले जाते. झाड तोडताना ते तोडू नका, म्हणून सांगणाऱ्या वृद्धाचे कोणीच ऐकत नाही. झाड तोडले जाते. पक्ष्यांना दूर हुसकावले जाते. या प्रवेशातील राजा हा प्राचीन काळातील दाखवला आहे. झाडाच्या फळ्यांचे घर बांधले जाते. या घरात माणसांबरोबर पक्षीही राहू शकत असतात, कारण हे झाड लाकडाचे आणि फटीमध्ये पक्षी राहू शकतील, असे असते. त्यामुळे माणूस आणि निसर्ग एकत्र नांदतात, हे सुचवायचे आहे.

या नाटकाच्या कथानकातील दुसरा प्रवेश मध्ययुगातील आहे. झाडाच्या जागेवर घर आहे. काही पक्ष्यांच्या जागेवर आता मुले दाखवली आहेत. ती उरलेल्या पक्ष्यांबरोबर खेळत आहेत. हा राजा पक्षी आणि मुलांना वेगळा करू पाहतो. ते वेगळे होत नाहीत म्हटल्यावर त्रास देणाऱ्या पक्ष्यांना हाकलण्यासाठी हे घर पाडायचा हुकूम राजा देतो. घरातून एक स्त्री येते. मुलं आणि पक्षी तिच्याजवळ जातात. ती घर पाडू नका, असे विनवते. मात्र तिचे कोणी ऐकत नाही. तिथे माणसाबरोबर पक्षी राहू शकणार नाहीत, असे घर बांधायचे ठरवतात. मग तिथे सिमेंट काँक्रीटचे घर बांधले जाते. या घरात पक्ष्यांना राहायला फटी, घरे नसतात. येथे मानव निसर्गापासून दुरावला गेल्याचे दिसते.  

तिसऱ्या प्रवेशामध्ये जुन्या लाकडी घराच्या जागेवर सिमेंट काँक्रिटची उंचच उंच इमारत असते. पक्ष्यांना या घरात थारा नसतो. या प्रवेशात सर्वांचा पेहराव आधुनिक आहे. सरकारी नोकर, हॉटेल मालक, कारखानदार अशी आधुनिक काळातील पात्रे, नेपथ्य रचना आणि दृष्य घेतले आहे. मात्र या प्रवेशात मोठे हादरे बसतात आणि ही इमारत पडते. त्यानंतर पहिल्या प्रवेशातील झाड तोडू नका’, म्हणून सांगणारा म्हातारा, दुसऱ्या प्रवेशातील स्त्री, मुले आणि पक्षी सगळे बाहेर येतात. तिथे ही मुले झाडे लावतात, छोटी छोटी घरे बांधतात. आता पुन्हा तिथे मुले आणि पक्षी सर्वजण एकत्र राहू शकत असतात. या कथानकात मानवाने स्वत:ला निसर्गापासून वेगळे करू नये, तसे केले तर विनाश अटळ आहे, असा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे याची प्रचिती आज प्रकर्षाने येत आहे.

या कथेत लेखकाने ज्या काळात पर्यावरणाचा प्रश्न एवढा चर्चेत नव्हता त्या काळात भविष्यातील या भीषण समस्येची जाणीव करून दिली आहे. पन्नास वर्षानंतर वृक्ष लागवडीसाठी राबवल्या जाणाऱ्या मोहिमेचे चित्रण केले आहे. आज आपण वृक्ष लागवड करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहोत. शाळा महाविद्यालयांचा यात समावेश करत आहोत. हेच चित्र या तिसऱ्या प्रवेशात रंगवले आहे. एका काव्यात्म कादंबरीत विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून उदभवणाऱ्या या पर्यावरणाच्या प्रश्नाला हात घातला आहे. नाटकाचे नावही सुंदर आणि सूचक ठेवले आहेगाणारे झाड’. भविष्याचा वेध घेऊन त्यातील धोक्याची आणि उपायाची मांडणी उत्तमपणे केली आहे. कादंबरी ज्या काळात आली त्या काळात पर्यावरणाचा प्रश्न एवढा गंभी नसल्याने वाचकांचे कादंबरीतील या भागाकडे गांभीर्याने लक्ष गेले नसावे.

कादंबरीमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग दिसतो. या कादंबरीत अनेक देशांचा उल्लेख येतो. यातील ब्रिटनचे नागरीक एजवर्थ, भारतातील डॉ. जोशी, स्वीडनची ल्योरे आणि त्यांचे वडील, जपानमधील नामुरा आणि त्यांचे सहकारी, पश्चिम बंगालमधील मेजर सेन, त्यांची जपानी पत्नी ही सर्व या कादंबरीत भेटतात. हे सर्वजण सुजन आहेत. त्यांचे देश भिन्न आहेत. यांचा साऊला त्रास होत नाही. विना आईबापांची मोठी झालेली साउ अनाथ झालेल्या बिनाला आपलीशी करते. ब्रिटनचे एजवर्थ आपली सर्व संपत्ती साऊच्या नावे करतात. आप्पांचे निधन जपानमध्ये होते. तेथेही सरकारी अडथळे आणि लालफितीचा कारभार तिच्या अनुभवास येत नाही. अशा सर्व घटनांच्या माध्यमातून वसुधैवकुटुम्बकमया भावनेला आणि प्रेमाच्या संकल्पनेला व्यापक रूपात दर्शवले आहे. कोठेतरी ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला या कथेत वेगळ्या बंधात बांधायचा लेखकाचा प्रयत्न असावा, असे वाटत राहते.

पत्र हे दूरस्थ संवादाचे साधन. वेळ खाणारे. पूर्वी पत्र मिळायला काही आठवड्याचा काळ लागायचा. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीने हा वेळ काही सेकंदावर आला आहे. त्यामुळे आजच्या पिढीला अशा पत्रसंवादाची संकल्पनाच पटू शकणार नाही. या पत्रातील प्रत्येक शब्द अत्यंत काळजीपूर्वक वापरला आहे. काव्यात जसे प्रत्येक शब्दाला महत्त्व असते, अगदी तसेच या कादंबरीतील प्रत्येक शब्दाला महत्त्व आले आहे. लेखक प्रसिद्ध कवीही आहेत. त्यामुळे भाषा तरल, सहज आणि मोजक्या शब्दात मोठा आशय सांगणारी आहे. मांडणीत सर्व पत्रे साउचीच वापरावयाची असल्याने लेखकाने तिला सर्वगुणसंपन्न रेखाटले आहे. साउला सदोदित आनंदी दाखवण्यासाठीच मोर या कथानकामध्ये आणला आहे. अशा पत्रव्यवहारात उत्तरास होणाऱ्या विलंबाने लागणारी हुरहुर, तगमग या कादंबरीत अनेक ठिकाणी जाणवत राहते. कादंबरीतील कथानक मुग्ध प्रेम ते समर्पण एवढे नाही, तर आत्मशोधापर्यंत जाते. शेवटी केवळ मोराच्या नाचाच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही. तर मोर नाचतो म्हणजे काय तर एका पायावर उभा राहायचा प्रयत्न करतो, तोल जातो म्हणून दुसरा पाय टेकवतो, आणि पहिला वर घेतो. त्यालाच आपण नाच समजतो, असे कोठेतरी वाचल्याचे  (पान क्र. ११६) साउने नमूद केले आहे.  

कादंबरी अत्युच्च आध्यात्मिक संदेशही देते. परमेश्वराची आठवण काढायची तर सुखात काढायला हवी. (पान क्र.७८) दु:खाच्या क्षणी तर कोणीही आठवण काढेल. साउला सुख-समाधानात परमेश्वर जपणे महत्त्वाचे वाटते. आपले संतही तेच सांगत आले आहेत. प्रत्येक क्षणी परमेश्वराचे स्मरण व्हावे, हेच त्यांनीही अपेक्षिले आहे. तसेच वरील महत्त्वाची मांडणी आहे. घरातील फर्निचर वाढले की माणसं बाहेर जातात (पान क्र. ११३). पूर्वी घरात मोजक्या वस्तू असायच्या. बाहेरून आलेले पाहुणे घरातच मुक्काम करायचे. आता प्रत्येकाला घरात मोठे फर्निचर लागते. पाहुणेही आता गेस्ट होतात. त्यांना खाली कसं झोपवायचं किंवा आपण आपली गैरसोय कशी करून घ्यायची, म्हणून मग त्यांची रवानगी गेस्ट हाउसमध्ये होते. तसेच झालेल्या चुकांना कुरवाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. ‘विश्लेषणाने काहीच साधत नाही. आपण आपणालाच पारखे होतो’ (पान क्र. १०४), हे विधानही असेच आहे. झाले गेले विसरून, आहे तेथून चांगल्या गोष्टीची सुरूवात करण्याची भावना व्यक्त झाली आहे.

कोणत्याही पुस्तकाला वाचकापर्यंत पोहोचवण्यामध्ये सादरीकरणाचाही मोठा वाटा असतो. मुखपृष्ठावर निव्वळ खरेखुरे मोराचे चित्रही छापणे शक्य होते. मात्र सूचक पद्धतीने मोराला सादर केले आहे. मौज प्रकाशनाने कादंबरीचा मजकूर मर्यादा ओळखून, त्यातील शब्दरचना आणि त्याने व्यापलेला अवकाश याचा मेळ घालण्यासाठी प्रत्येक पानावर मर्यादित मजकूर घेतला आहे. इतर पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक छापले असते, तर पाने आणखी कमी झाली असती. त्यामुळे वाचकाला वाचताना अर्थ समजून घ्यायला कमी वेळ मिळाला असता. प्रकाशकाने आपले पूर्ण कौल्य कादंबरीच्या छपाई प्रक्रियेत वापरले आहे. सावित्री ही कादंबरी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये, माठा आशय घेऊन, धोक्याची जाणीव देणारी, वैज्ञानिक संदेश देणारी कादंबरी आहे. मनापासून ही कादंबरी वाचावी अशी आहे. अशी ही साठ वर्षापूर्वीची सर्वांगसुंदर कादंबरी वाचून मनही मोराप्रमाणे नाचत राहिले.

-०-