शिवाजी विद्यापीठातील जलसंधारण
कार्याला प्रत्यक्षात भेट देऊन प्रामाणिक भावनेने मत मांडणारे राजेंद्रसिंह राणा
मनाला खूप भावले. या महान जलनेत्याने ज्या सहजपणे आपल्या भावना मांडल्या, ते पाहून
ते नेते आहेत मात्र आजही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवला, आहे याची खात्री
पटली. हेच त्यांचे मोठेपण आहे, असे मला जाणवले. मी २०१५च्या जुलैमध्ये 'कृषीक्रांतीचे शिलेदार' या लेखमालेत 'लोकमत' कोल्हापूरमध्ये
राजेंद्रसिंह यांच्यावर लिहिलेला एक छोटेखानी लेख आणि शिवाजी विद्यापीठ-जलयुक्त विद्यापीठास
त्यांनी दिलेल्या भेटीतील काही छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहे.. धन्यवाद
------------------------------------------------------------------------------------
जागतिक ख्यातीचे
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शिवाजी विद्यापीठास काल दिनांक २७ मार्च २०१९
रोजी भेट दिली. मी राजेंद्रसिंह यांना प्रथमच भेटलो. पर्यावरणशास्त्र विभाग,
तंत्रज्ञान अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स यांच्या वतीने
जलदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम हे निमित्त होते. या भेटी दरम्यान त्यांनी
अनेक ठिकाणी भेटी दिल्या. शिवाजी विद्यापीठात ते सकाळी सव्वादहाच्या सुमारास आले. त्यांना
एरव्ही अनेकदा दूरचित्रवाणीवर पाहिले होते. ऐकले होते. मात्र त्यांना आज प्रथमच
पाहात होतो. एका जिंदादिल, पाणीदार व्यक्तीमत्त्वाचे दर्शन झाले. आपण एका मनस्वी
माणसाला भेटल्याचे जाणवले. ते विद्यापीठात आल्यानंतर पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख
प्राध्यापक पी.डी. राऊत यांनी विद्यापीठातील पाणी योजना पाहू या का? अशी विचारणा केली आणि त्यांनी आनंदाने होकार
दिला.
त्यानंतर
त्यांच्यासमवेत उदय गायकवाड आणि राऊत सर, कुलसचिव नांदवडेकर सर यांच्यासमवेत
सर्वत्र पाहणी झाली. संगीतशास्त्र विभागाशेजारचा तलाव, जलशुद्धीकरण (आरओ) प्रकल्प,
त्याशेजारील विहीर, शिंदे विहीर, सुतार विहीर, शेजारील शेततळी हे सर्व पाहिले. हे
पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे कौतुक स्पष्ट दिसत होते. शिंदे विहिरीतील पाणी पूर्ण
काढले असल्याने त्यातील झरे स्पष्ट दिसत होते. ते पाहून त्यांचा आनंद द्विगुणीत
झाल्याचे दिसत होते. 'आडवे पाण्याचे झरे हे पाण्याची पातळी चांगली वाढली लक्षण
आहे. सुंदर!' हे त्यांचे उद्गार होते. आरओ प्लँटजवळील
नारळाची बाग पाहूनही त्यांनी कौतुक केले. आरओचे वाया जाणारे पाणी वापरून दोनशे
नारळांची बाग फुलते आहे. त्यांनी भावी काळात सुतार विहिरीच्या खालच्या बाजूस आणखी एक विहिर
खोदावी, अशीही सूचना केली. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाने त्या भागात विहिर
खोदण्याचे पूर्ण नियोजन केले असून याच उन्हाळ्यात ती पूर्ण करायचा विद्यापीठाचा
मानस आहे. आणि तो विद्यमान कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे सरांच्या नेतृत्त्वाखाली
पूर्णही करण्याचे नियोजन आहे.
पाहून त्यांनी
केलेली सूचना ही त्यांच्या अभ्यासाची साक्ष देत होती. त्यांचे शब्द म्हणजे शिवाजी
विद्यापीठाचे जलसंधारणाचे कार्य योग्य दिशेने चालले आहे, याची पावती देणारे होते.
आम्हाला आमची वाटचाल योग्य दिशेने चालली आहे, आणि पुढे जा, असे सांगणारे होते. हे
निश्चितच प्रेरणादायी आहे.
एक तासाचा अवधी
त्यांच्यासमवेत घालवता आला, हे माझे भाग्य. त्यांच्या त्या सहवासात त्यांच्यातील
मोठेपण हे प्रत्यक्ष अनुभवता आले. ते नेते आहेत, जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले
आहे. ते जगाला या विषयावर सल्ला देतात. मात्र सहज बोलल्यानंतर, जलसंधारणाच्या
शिवाजी विद्यापीठातील प्रत्येक जागेला प्रत्यक्षात भेट देऊन प्रामाणिक भावनेने मत
मांडणारे राजेंद्रसिंह राणा मनाला खूप भावले. या महान जलनेत्याने ज्या सहजपणे
आपल्या भावना मांडल्या, ते पाहून ते नेते आहेत मात्र आजही त्यांच्यातील कार्यकर्ता
जिवंत ठेवला, आहे याची खात्री पटली. हेच त्यांचे मोठेपण आहे, असे मला जाणवले.
मी २०१५च्या
जुलैमध्ये 'कृषीक्रांतीचे शिलेदार' या लेखमालेत 'लोकमत' कोल्हापूरमध्ये
राजेंद्रसिंह यांच्यावर लिहिलेला एक छोटेखानी लेख आणि शिवाजी विद्यापीठ-जलयुक्त
विद्यापीठास त्यांनी दिलेल्या भेटीतील काही छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहे.
राजेंद्र सिंह राणा
पाण्याला जीवन म्हणतात. प्रत्येक जीवाचे जगणं किंवा मरणे पाण्यावर अवलंबून
आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर इतर सर्व सजीव वनस्पती किंवा
वनस्पतीवर आधारीत अन्य जीवांचे भक्षण करून भूक भागवतात. अन्न स्वतः तयार करणा-या
वनस्पती असोत, त्यांच्यावर
अवलंबून असणारे शाकाहारी जीव असोत किंवा मांसाहारी प्राणी
सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. या पाण्याचे महत्व ओळखून
जलसंधारणासाठी आयुष्य खर्ची घालवण्यास एक युवक तयार झाला आणि
राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात नंदनवन फुलवले असे हे आनंददायी व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ. राजेंद्र सिंह! भारताचा पाणीवाला बाबा!
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्हयातील दौला या गावात ६ ऑगस्ट, १९५९ रोजी राजेंद्र सिंह यांचा जन्म झाला. जमिनदार
घराणे होते. ६० एकर क्षेत्रात त्यांचे वडील स्वतः शेती करत असत.
त्याच दौला गावात राजेंद्रसिंह यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. रमेश शर्मा नावाचे गांधीजींचे
अनुयायी यांनी ग्रामसुधाराबाबत राजेंंद्रसिंहांच्या मनावर खोल परिणाम केला.
त्याचप्रमाणे प्रतापसिंह या त्यांच्या इंग्रजीच्या शिक्षकानेही
प्रभावित केले. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी
आयुर्वेद शिक्षण घेण्यास सुरवात केली. बी.ए.एम.एस. ही पदवी १९७१ मध्ये घेतली. त्यानंतर एम.ए.साठी हिंदी विषयाकरीता प्रवेश घेतला. या काळात जयप्रकाश नारायण यांचा आणि विद्यार्थी चळवळीचा संपर्क
आला. छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते नेते बनले. मात्र जयप्रकाशजी आजारी असताना अंतर्गत राजकारणाचा राजेंद्रसिंह
यांना उबग आला.
सन १९८० मध्ये ते शासकीय सेवेत रूजू झाले. त्यानंतर जयपूर जवळ
प्रौढ शिक्षा वर्गाचे शिक्षक म्हणून त्यांना
जबाबदारी देण्यात आली. याच काळात तरूण भारत संघटनेची त्यांना ओळख झाली. ही
प्रामुख्याने आधिकारी आणि विद्यार्थ्यांची संघटना होती. १९८४ मध्ये ते या
संघटनेचे सचिव झाले. त्यांनी अनेक प्रश्नाकडे सदस्यांचे लक्ष
वेधले. संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा देवून संपूर्ण संघटना राजेंद्र सिंहांकडे
दिली. ते खेडयातून फिरले. त्यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला
आणि ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी कार्य करण्याची त्यांची मनिषा आधिक दृढ झाली. मनात एक आराखडा तयार होवू लागला. मात्र नोकरीत वरिष्ठांचे या
सुधारणावादी विचाराप्रती असणारे औदासिन्य पाहून त्यांनी नोकरी सोडली.
घरातील सर्व साहित्य विकून रू. २३०००/- ची पुंजी घेवून १९८५ साली हा युवक
चार मित्रासह एका बसमध्ये चढला आणि शेवटच्या गावाचे तिकीट काढून किशोरी या थानागाझी तालुक्यातील गावात उतरला. योगायोगाने तो दिवस
ग्रामविकासाचे स्वप्न पाहणा-या महात्माजींची जयंती २ ऑक्टोबर, १९८५ हा होता. भिकमपुरा गावातील रहिवाशानी त्यांना
स्विकारले. राजेंद्रसिंहानी तेथे छोटेखानी दवाखाना सुरू केला. इतर चाैघे शाळेत शिकवू लागले. धान्याचे कोठार म्हणून एकेकाळी
प्रसिध्द असलेल्या अलवार जिल्हयाचा तो भाग होता. आता रूक्ष वाळवंट निर्माण झाले
होते. वयस्कर लोकांशी चर्चा केल्यानंतर जोहड नामशेष झाल्याने हे घडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जोहडव्दारा होणारा जलसंचय न
होणे आणि बोअरवेल लावून पाणी उपसा जास्त झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खूपच
खालावली होती. अरवली पर्वतावरील वृक्षांची हानी झाली होती. गावातील जेष्ठ मंगू लाल पटेल यांच्या सहमतीने त्यांनी जोहडची पुनर्निमिती केली. गावातील
काही युवकांच्या मदतीने गोपालपुरा जोहड पूर्ण झाला. पावसाळयात जोहडही आले आणि
गावातील विहीरीत पाणी आले. हे पाहून वनखात्याने त्यांना
अभयारण्यात काम करण्यासाठी बोलावले. तरूण आश्रम, किशोरी, भाकमपुरा हा तरूण भारत
संघाचे कार्यालय बनला. या यशानंतर गावोगावी फिरून आणि जनजागृती करून त्यांनी
जलसाक्षरता घडवले आणि पडणारे पाणी थेंब न थेंब वापरण्यास जनतेला प्रवृत्त केले.
लोकांना श्रमदानातून जोहड बांधण्याचा मुलमंत्र दिल्याने राजस्थानची पाणीपातळी
वाढली. जोहड निर्मितीमुळी अरवली नदी वाहू लागली. आजवर अनेक बंधारे बांधणारे
राजेंद्रसिंह हे स्टाॅकहोम वाॅटर पुरस्काराचे मानकरी
आहेत. आता पुढील काळात जल जन जोडो आभियान ते राबवत आहेत. त्यांच्या या राजस्थान
मधील यशस्वी प्रयोगामुळे देशभर नव्हे, तर विश्वभर त्यांची पाणीवाला बाबा म्हणून ओळख निर्माण झाली. ज्याने
राजस्थानची भूमी पुन्हा हिरवीगार केली.