सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

वैज्ञानिक दृष्टीकोन

 

विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी समाजाची निर्मिती या गोष्टी आज वारंवार ऐकावयास मिळतात. प्रत्येक नवजात बालक हे सर्व दृष्टिकोन घेउनच जन्माला आलेले असते. मात्र पुढे त्याला आपण ज्या पद्धतीने वाढवतो, त्यामध्ये बालकाकडील ही वृत्ती कमी होत जाते. मात्र सुदृढ समाजासाठी, निरोगी समाजासाठी हा दष्ट‍िकोन असणे अत्यंत गरजेचे असते. हा दृष्ट‍िकोन बाळगणे म्हणजे काय? विज्ञान आणि शास्त्र यामध्ये नेमका फरक काय आहे? या विषयावर व्यक्त होण्याची संधी ‘कुळवाडी’ या माधव जाधव संपादित पहिल्याच वर्षीच्या दिवाळी अंकात मिळाली. हा लेख कुळवाडी अंकाच्या सौजन्याने खास आपल्यासाठी… 

_____________________________________________________

विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रूजला पाहिजे’, असा सूर सर्वत्र नेहमी आळवला जातो. तथापि वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवायचा, म्हणजे नेमके काय करायचे? याबद्दल फारसे कोणी बोलत नाही. त्यामुळे  नेमके प्रयत्न होत नाहीत आणि प्रश्न तसाच राहतो. विज्ञान विषय पाचवीपासून अभ्यासाला येतो. शिकवला जातो. पुढे विज्ञान शाखेत पदवी, पदव्युत्तर शिक्षणही घेतले जाते. विद्यार्थी उच्च-पदवीधर होतो आणि त्यानंतरही अशा उच्च विद्याविभुषितांच्या घरचा गणपती दूध पितो. असे झाले की वैज्ञानिक दृष्टिकोन रूजलेला संशोधक शास्त्रीय कारण सांगतो. प्रक्रियेची उकल करतो. ते वादळ शमते. मात्र काही दिवसानंतर दुसरी घटना घडते. समाज उठलेल्या अफवेला सत्य मानत धावतो. म्हणजेच द्यापही जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजलेला नाही, हेयातून स्पष्ट होते. वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घेण्यापूर्वी विज्ञान म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे.

विज्ञान म्हणजे परस्परसुसंगत, प्रतिक्षणी वाढणारा ज्ञानाचा संचय. विज्ञान हे सृष्टीतील रहस्यांचा शोध घेणे, विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावणे आहे. सृष्टीतील घटनांचा अर्थ लावताना कालचे सत्य आज खोटे ठरू शकते. विज्ञान ते स्वीकारते. अर्थात कालचे सत्य त्यामुळे खोटे ठरत नाही कारण ते त्या वेळच्या ज्ञानाच्या संकल्पनांवर आधारित असते. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा खेळ मोठा गंमतीशीर असतो. हे गुपित कळल्यानंतर होणारा आनंद अवर्णनीय असतो. घन पदार्थाच्या वस्तुमानाइतके द्रव विस्थापित होते, हे रहस्य आंघोळ करताना आर्किमिडीजला उलगडले. हे रहस्य समजताच तो त्या आनंदाच्या भरात युरेका, युरेकाअसे ओरडत कपडे न परिधान करता रस्त्यावरून पळत सुटला. हा शोधाचा आनंद मिळवण्यासाठी आजही अनेक संशोधक संशोधन करतात. निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेल्या पद्धतशीर, तर्कसुसंगत माहितीचे विश्लेषण करून एखाद्या घटनेमागील कार्यकारणभावाची मांडणी विज्ञानामध्ये करतात.

पारंपरिक समजानुसार विज्ञान म्हटले की डोळ्यांसमोर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय येतात. या सर्व विषयांना इंग्रजीमध्ये सायन्सअसा एकच शब्द वापरला जातो. मराठीमध्ये मात्र विज्ञान आणि शास्त्र असे दोन शब्द आहेत. गंमत म्हणजे हे शब्द समानार्थी नाहीत. या दोन शब्दांमध्ये सूक्ष्म असला तरी, महत्त्वपूर्ण भेद आहे. शास्त्र म्हणजे कोणत्याही नियमांच्या आधारे केलेली एखाद्या विषयाची तर्कशुद्ध मांडणी होय. त्यामुळेच जीव, रसायन आणि भौतिकशास्त्राप्रमाणेच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र अशी अनेक शास्त्रे आपणास पहावयास मिळतात. शास्त्रांमध्ये वापरण्यात येणारे नियम हे स्थल-काल-व्यक्ती-धर्मनिरपेक्ष असतातच असे नाही. ते या घटकांनुसार बदलतात. विज्ञानातील नियम मात्र स्थल-काल-व्यक्ती-धर्मनिरपेक्ष असतात. विज्ञानातील नियमांची पुनर्पडताळणी कोठेही, कोणासही करता येते. शास्त्राचे नियम देशा-देशांत बदलू शकतात. त्यामुळेच विज्ञान शास्त्र असते. मात्र प्रत्येक शास्त्र विज्ञान असतेच, असे नाही. यातही भौतिकशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र म्हणून समोर येते. पदार्थविज्ञानशास्त्रातील नियमांची पडताळणी कोणासही, कोठेही, केव्हाही करता येते. ही पडताळणी प्रत्यक्षात पुनर्पडताळणी असते. निष्कर्ष तेच असतात. इतर विषयांना मात्र शास्त्रच म्हटले जाते. जीव आणि रसायनशास्त्राचे नियम पडताळणी करताना अनेक घटकांचा परिणाम होतो. यातील काही घटना विज्ञानाप्रमाणे निरपेक्षतेचे नियम पाळतात. मात्र जीव आणि रसायनशास्त्रातील अनेक घटनांचे नेमके अनुमान काढणे शक्य नसते. उदाहरणार्थ सागाच्या पानांचा आकार प्रत्येकवेळी सारखाच असत नाही. सागाचे पान साधेच असते, त्याची रचना तीच राहते. मात्र प्रत्येक पानाचा आकार सारखाच असत नाही. तसेच मूळ भारतातील साग कॅरेबियन बेटावर गेल्यावर त्यामध्ये जनुकीय बदल होत गेले. त्यामुळेच इतर सर्व विषयांना शास्त्रच म्हटले जाते.

सुरुवातीला विज्ञानाचा प्रारंभ निसर्गविज्ञान म्हणून झाला. पुढे जसजशा ज्ञानाच्या कक्षा रूंदावत गेल्या, तसतसा विज्ञान आणि शास्त्रातील फरक स्पष्ट होत आजचे विज्ञानाचे विश्व उभे राहिले. आज निसर्गात घडणाऱ्या बहुतांश घटनामागचा कार्यकारणभाव मानवाने शोधला आहे. तरीही संशोधकांना नवनवे प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे मिळवण्यासाठी संशोधक कार्य करत आहेत. हजारो वर्षांपासून संशोधकांनी उलगडलेली रहस्ये समजून घेणे, ऐकीव माहितीला बळी न पडणे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे होय. असा दृष्टीकोन बाळगल्यास, आपण सहजपणे आपले आयुष्य सुखकर बनवू शकतो. ज्ञानाची निर्मिती करू शकतो. हा दृष्टीकोन बाळगणाऱ्यांच्या घरचा गणपती दूध पित नाही, तर ती द्रवाच्या पृष्ठीय तन्यतेमुळे घडणारी घटना असते.

हा वैज्ञानिक दृष्टीकोन नवजात बालकांमध्ये उपजत आलेला असतो. सर्वांना आठवेल असे एक उदाहरण. घरात नुकतेच रांगू लागलेले बाळ आहे. संध्याकाळची वेळ आहे. घरात इन्व्हर्टर नाही आणि अचानक विद्युत पुरवठा खंडीत होतो. अशावेळी अशा घरात मेणबत्ती लावण्यात येते. ते नुकतेच रांगणारे बाळ मेणबत्तीच्या ज्योतीकडे भारी वाटते. ते बाळ मेणबत्ती ठेवलेल्या ज्योतीकडे रांगत जाऊ लागते. त्या खोलीतील मोठी माणसे बाळाला सांगतात, ‘ते हा आहे, तिकडे जाऊ नको’. बाळ मोठ्यांचे ऐकते. ते थांबते. मात्र मोठ्यांचे लक्ष नाही हे पाहून ते त्या ज्योतीजवळ जाते. ज्योतीला हातात पकडण्याचा प्रयत्न करते. त्याच्या हाताला जेव्हा त्या पेटलेल्या ज्योतीचा चटका बसतो, तेव्हा त्याच्या मनाचे समाधान होते. त्याचवेळी कोणी जर त्याला पाहिले तर ते लगेच रडायला लागते. त्यावेळी आपण वडिलधाऱ्यांचे न ऐकल्याचा अपराध भाव त्या बालकाच्या मनात असतो. जर त्याला कोणी पाहिले नसे तर ते शांत बसते. वेदना सहन करते. मात्र, जेव्हा विद्युत पुरवठा सुरू होतो आणि कोणी मोठा माणूस ती मेणबत्ती विझवण्यासाठी पुढे येतो, तेव्हा ते छोटेसे बाळ, ‘ते हा आहे’, असे सांगते. ती ज्योत हाताला चटका देते. त्याची वेदना होते, याची अनुभुती त्या बाळाने घेतलेली असते. त्यानुसार ते व्यक्त होत असते. प्रत्यक्षात ‘हा’ म्हणजे काय आहे? हे प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेण्याचे कुतूहल त्या लहान जीवाच्या मनातही असते. हे बालसुलभ वर्तन जवळपास सर्वच लहान मुलांमध्ये अनुभवण्यास मिळते. म्हणजे सत्य जाणून घेण्याची आस सर्वच बालकांमध्ये असते.

पुढे ते बाळ जसे मोठे होते, तसे ते प्रश्न विचारून आपले कुतूहल पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करते. ते वडिलधाऱ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडते. त्याच्या प्रश्नांना मिळणारी उत्तरे खरी मानून माहिती घेण्याचा प्रयत्न करते. लहान मुलांचे प्रश्न अफलातून असतात. अनेकदा त्यांच्या प्रश्नांना वडिलधारी मंडळी, ज्यामध्ये आई, वडील, आजोबा, आजी किंवा घरातील इतर नातेवाईकांचा समावेश होतो. यापैकी जे कोणी त्याच्या प्रश्नांना न हासता, उत्तरे देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात, त्यांच्याशी बाळाची गट्टी जमते. ते आपले प्रश्न तेथे विचारून जिज्ञासा पूर्ण करून घेत राहते. पुढे त्याच्या जीवनात शिक्षक येतात. त्याच्या प्रश्नांची जे शिक्षक उत्तरे देतात, ते शिक्षक मुलांना आवडतात. या वयात जर मुलांना प्रयन विचारण्यापासून कोणी थांबवलेख्‍ प्रतिबंध केला, तर असे शिक्षक मुलांना आवडत नाहीत.

मुलांचे प्रश्न आणि कल्पना दोन्ही कल्पनेपलिकडच्या असतात. एकदा एक पालक बागेतील झाडांना पाणी घालत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर नुकताच बालवाडीची पायरी चढलेला मुलगा होता. तो मुलांना प्रश्न विचारत होता आणि वडील आपल्या परीने त्याला उत्तरे देत होते. मुलगा विचारतो, ‘तुम्ही काय करताय?’ वडील उत्तर देतात, ‘मी झाडांना पाणी घालतो.’ त्यावर मुलाचा पुढचा प्रश्न, ‘झाडांना पाणी का घालताय?’ वडिलांनी उत्तर दिले, ‘तुला तहान लागल्यावर तू पाणी पितो की नाही, तसेच झाडांना पाणी प्यावं लागतं. नाहीतर ती मरून जातील’. मुलांचा लगेच पुढचा प्रश्न, ‘मला पाणी प्यायचं झाल तर मी पाणी मागतो, झाड कुठे पाणी मागते?’ वडील त्यावर म्हणतात, ‘झाडाला बोलता येत नाही. पण त्याची पाने सुकतात. मग आपल्याला कळत त्याला पाण्याची गरज आहे. खालची जमीन वाळली की आपणच त्याला पाणी द्यायच असतं’. या उत्तरानंतर मुलाचा पुढचा प्रश्न आला, ‘मग झाड पाणी कसं पिते?’ वडील उत्तर देतात, ‘झाडाची मूळं त्याचे तोंड असते. ती जमिनीखाली असतात. झाड मूळांच्या सहाय्याने पाणी पिते.’ मुलाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. तो मुलगा बराच वेळ विचार करत राहिला. थोड्या वेळांने त्याने वडिलाना विचारले, ‘पप्पा, मी पण मातीत तोंड घालू का? मला पण झाडासारखं पाणी प्यायचयं’. तो मुलगा प्रश्न विचारल्यानंतर काही वेळ शांत होता, त्यावेळेत तो मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करत होता. त्याप्रमाणेच म्हणजे झाडांप्रमाणे माणूसही पाणी पिऊ शकतो का? हा त्याच्या मनात पडलेला आणखी प्रश्न होता. एवढंच नाही तर तसं प्रत्यक्ष करून पाहण्याची त्याच्या मनात उर्मी होती. म्हणजे सत्य जाणून घेण्याची आस त्याच्या मनात होती. ही जिज्ञासा हे कुतूहल जपण्याची जबाबदारी पालकांची आणि शिक्षकांची असते.

पुढे मुले जशी वरच्या वर्गात जातात, तसा अभ्यासाचा ताण वाढत जातो. पालकांच्या अपेक्षा त्यांच्यावर लादल्या जाऊ लागतात. शाळेचा निकाल चांगला लागला पाहिजे, म्हणून शिक्षकही ‘असे प्रश्न विचारण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष दे. हे काही परिक्षेत विचारणार नाहीत. याची उत्तरे तुला मार्क देणार नाहीत’, अशी वाक्य ऐकवून मुलांना प्रश्न विचारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. मुलांनाही पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षेनुसार वागणे भाग पडते आणि मुले प्रश्न विचारायची सवय सोडतात. एखादाच मुलगा यातूनही प्रश्न विचारत राहतो. काही शिक्षक, पालक मुलांच्या या सवयी जपतात. मुलांना खऱ्या शिक्षणाचा आनंद घेऊ देतात. त्यातून घडणारी मुले आपली सत्य जाणून घेण्याची सवय जपत वाढत राहतात आणि ती विवेकांने आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यभर ती सत्य जाणून घेण्यासाठी प्रयोग करतात, वाचन करतात. कोणी सांगितले म्हणून पटकन विश्वास ठेवत नाहीत. मात्र अशा मुलांचे प्रमाण फार कमी असते. जर विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा समाज घडवायचा असेल तर, मुलांमध्ये असणारे कुतूहल जागृत ठेवण्याचे कार्य शिक्षक आणि पालकांनी करायला हवे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये यावर भर देण्यात आला आहे. हे प्रत्यक्षात आणायचे असेल तर शिक्षक आणि पालकांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे.

शिक्षण व्यवस्था समाजाला दिशा देत असते. शिक्षण व्यवस्था सुदृढ झाली तर समाज सुदृढ होईल. विद्यार्थ्यांना वाचनाची आणि चिंतनाची सवय लहानपणापासून लावली पाहिजे. आपण वाचले त्यामध्ये सत्य काय असत्य काय याची पडताळणी करायला मुलांना शिकवायला हवे. मुलांना लहानपणापासून विषयाचे स्वतंत्रपणे आकलन करून घेण्याची सवय लावली पाहिजे. मुले वाचलेल्या, दिसलेल्या गोष्टींवर जेव्हा स्वतंत्रपणे विचार करू लागतील, सत्य असत्याची पारख करू लागतील तेव्हाच सुदृढ समाज, विवेकवादी समाज निर्माण होईल. आज समाज माध्यमांचा, विविध वाहिन्यांचा सुळसुळाट झाला आहे. आपले महत्त्व वाढवण्यासाठी त्यातून खऱ्या-खोट्या माहितीचा महापूर लोटला आहे. अशा माध्यमातून माहितीचा महापूर वाहत असतो. यामध्ये खरी आणि खोटी दोन्ही प्रकारची माहिती असते. ही पडताळून पाहणे नीर-क्षीर विवेकाने पारखून घेणे आवश्यक आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. गणपती दुध पितो अशी सुरुवातीची आरोळी ठोकणाऱ्यापेक्षा ती पुढे तशीच पाठवत राहणारा जास्त दोषी असतो. अशा काळात तर वैज्ञानिक दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

विज्ञानातील प्रयोग करणे, सत्याची पडताळणी करणे, जगण्याच्या रहाटगाडग्यात प्रत्येक नागरिकाला शक्य होत नाही. जे प्रयोग करतात, त्यांनी आपले निष्कर्ष प्रसृत करायला हवेत. तसेच या शोधाचा भविष्यात काय परिणाम होईल, हे ही सांगायला हवे. विज्ञानाचा अविष्कार सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत ते मांडायला हवा. एखाद्या शोधांचे दुष्परिणाम लक्षात येताच सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचणे आवश्यक असते. मात्र तसे घडताना दिसून येत नाही. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे आपल्या शोधाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी पत्रक छापून घेत आणि बाजारात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत. भारतात ही संस्कृती अजूनही आलेली नाही. याउलट आम्ही संशोधनाला गोपनियतेचे आवरण घालून ठेवतो. अनेक शोधांचे श्रेय त्यामुळे परदेशी संशोधकांना मिळाले आहे. आपल्याकडे विज्ञान पत्रकारिता हे क्षेत्रही अजून विकसीत झालेले नाही. त्यामुळे विज्ञान संशोधनाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचणे कठीण असते. त्याचबरोबर अशी प्रसृत होणारी माहिती वाचणे आणि समजून घेणे आवश्यक असते. या माहितीचे विश्लेषण करून समजून घेणे गरजेचे आहे. हीच खरी ज्ञाननिर्मितीची आणि वैज्ञानिक द्ष्टीकोन बाळगणाऱ्या समाजाची उभारणी करण्यासाठीची मूलभूत गरज आहे.

 

-०-