(रवळनाथ को-ऑपरेटीव्ह
हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी गडहिंग्लज येथे आयोजित
कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाचा गोषवारा येथे
प्रकाशित करत आहे........धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
--------------------------------------------------------------------------------------
मित्रहो, प्रस्थापित
व्यवस्था किंवा पद्धती जेव्हा लोकांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा
नव्या संस्थेची स्थापना होत असते. अशी संस्था स्थापन होत असताना काही आदर्श, काही उद्दिष्ट्ये
डोळयासमोर ठेवून स्थापन होत असते. अशा नव्याने सुरू होणाऱ्या संस्थेने स्वत:ची अशी
एक कार्यपद्धती ठरवलेली असते. त्या उद्दिष्टानुरूप कार्यपद्धतीचा वापर करत पुढे
जाणाऱ्या संस्थेचा लौकिक वाढत जातो आणि ती संस्था नावारूपाला येत असते. आज रवळनाथ
हौसिंग सोसायटीने स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. आजरा, गडहिंग्लज भागातील
शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चांगले घर उभे करता यावे, त्यांना आर्थिक पाठबळ
सहज उपलब्ध व्हावे, या हेतूने १९९६ मध्ये रवळनाथ को-ऑपरेटीव्ह हौसिंग फायनान्स
सोसायटीची स्थापना झाली. यामध्ये शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी दोन्ही घटकांचा
समावेश करून संस्थेने सुरूवातीपासून सर्वसमावेशकता साधण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व मंडळी नोकरदार असल्याने वसुलीचा प्रश्न सोपा झाला. आजरा येथे सुरू झालेल्या
या संस्थेच्या आज आठ शाखा आहेत आणि नववी शाखा लवकरच कुडाळ येथे सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या
बाहेरही सोसायटीने शाखाविस्तार सुरू केला असून आता तिचे स्वरूप मल्टीस्टेट झाले आहे.
संस्था अशा पद्धतीने वाढवण्यात कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे असते. कर्मचारी
त्यांच्या कामाने संस्थेचा लौकिक वाढवत असतात.
कर्मचाऱ्यांची विश्वासार्हता संस्थेसाठी फार
महत्त्वाची असते, याचे एक उदाहरण सांगावेसे वाटते. अशाच एका सोसायटीमार्फत कर्ज वितरण होत असे. तशी
ही सोसायटी फार मोठी नव्हती. एका कार्यालयापुरते तिचे कार्यक्षेत्र मर्यादित होते.
काही हजारांत कर्ज दिले जात असे. ते कर्ज कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करून
सोसायटीकडे जमा होत असे. हा हप्ता वेतनातून कपात होऊन गेला तर हातात पडणारा पगार
कमी दिसत असे आणि त्या कर्मचाऱ्याला अन्य संस्थेचे बँकेचे कर्ज मिळण्यात अडचण येत
असे. यावर उपाय म्हणून काही हुशार कर्मचाऱ्यांनी नामी शक्कल शोधून काढली. ती अशी
की हा हप्ता रोखीने वेतनापुर्वीच भरायचा. त्यामुळे ती कपात वेतनपत्रकात येऊ देत
नसत. हातात पडणारे वेतन जास्त दिसत असे. त्यामुळे अन्य बँकाचे कर्ज घेता येणे शक्य
होत असे. पुढे पुढे कर्मचारी हा हप्ता सोसायटीच्या एका कर्मचाऱ्याकडे देऊ लागले.
तोच कर्मचारी वेतनातून कपात करावयाची रक्कम कळवण्याचे कामही करत असे. तो अशा कर्मचाऱ्यांची
रक्कम कळवत नसे. काही दिवस ही पद्धत सुरळीत चालली. पुढे सोसायटीचा कर्मचारी ही
रक्कम वापरू लागला आणि काही दिवस ही रक्कम वापरून पुन्हा भरत असे. अशी रक्कम तो मोठ्या प्रमाणात वापरू लागला.
अन्य ग्राहकांना ही पद्धत कळाल्यानंतर अनेक जण असे करू लागले. त्यातच अशी रक्कम
मोठ्या प्रमाणात जमा केलेली असताना आणि ती संस्थेत भरण्यापूर्वी अचानक त्या
सोसायटीच्या कर्मचाऱ्याचे निधन झाले. पैसे जमा करणाऱ्याकडे कोणतेही अधिकृत
कागदपत्र नसल्याने त्यांचे असे दिलेले पैसे बुडाले. यात ग्राहकांच्या विश्वासाला मोठा
तडा गेला. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने कोणत्याही संस्थेतील कर्मचाऱ्यांची
विश्वासार्हता ही फार महत्त्वाची असते.
दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे संस्थेतील
कर्मचाऱ्यांची विचारसरणी. सकारात्मक विचारसरणीने कार्य करणारे कर्मचारी संस्था
मोठी करण्यामध्ये मोठे योगदान देत असतात. संस्था आपली आहे, असे समजून कर्मचाऱ्याने
काम करणे आवश्यक आहे. आपले कोणतेही कृत्य संस्थेला बाधा पोहोचवणारे असणार नाही,
याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक ठरते. संस्थेत येणारा ग्राहक हा आपला पगार
देणारा आहे. तो आहे म्हणून आपण आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असला पाहिजे.
ग्राहकाला 'कमीत कमी त्रास आणि त्याचे पूर्ण समाधान' यासाठी आपणास वेतन दिले जाते,
याची जाणीव ठेवून काम व्हायला हवे. ग्राहक समाधानाने जात असेल तर तो संस्थेची नकळत
जाहिरात करून संस्थेचा लौकिक वाढवण्यास कारण ठरतो हे आपण जाणले पाहिजे आणि
त्यानुसार आपले वर्तन ठेवले पाहिजे.
पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येकाला
संस्थेचे काम हे आपले काम वाटले पाहिजे. आपल्या घरात आपण प्रत्येक गोष्टीची काळजी
घेत असतो, तसेच संस्थेतील प्रत्येक गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येक
कर्मचारी हा तीन भूमिकांमध्ये जगत असतो. घरात तो कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबाचा घटक
असतो. समाजातील तो एक घटक असतो आणि संस्थेचा कर्मचारी म्हणून तिसरी भूमिका तो पार
पाडत असतो. यातील संस्थेतील नोकरी ही सर्वात महत्त्वाची असते. या नोकरीमुळे त्याला
समाजात एक स्थान प्राप्त झालेले असते. समाजात वावरताना संस्थेचे वलय त्याच्याभोवती
असते आणि समाजात वावरताना आपल्या वर्तनाने संस्थेच्या लौकिकास बाधा पोहोचणार नाही,
हे त्याने पाहिले पाहिजे. यातील कुटुंबाचा घटक म्हणून वावरतानाही आपले घर
चालवण्यास संस्थेतील वेतन सहाय्यकारी आहे याचे भान ठेवायला हवे. आपले कोणतेही काम
संस्थेच्या लौकिकात वाढ करणारे असले पाहिजे.
मी ज्यावेळी शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर
शिक्षण घेत होतो त्यावेळचा एक प्रसंग आठवतो. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार
होत्या. मला गावी जायचे होते. कोल्हापूर ते बार्शी त्यावेळी पस्तीस रूपये तिकीट
होते. सवलत अर्जावर पदव्युत्तर प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांची स्वाक्षरी घेतली
तर साडेसतरा रूपये वाचत. ही रक्कम तीस वर्षांपूर्वी तशी फार मोठी होती. मी त्या
अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी त्या विभागात गेलो. त्यावेळी दरवाज्यातच मला
त्यांचे मोठ्याने रागावणे ऐकायला येत होते. अधिकाऱ्याची केबीन म्हणजे पाच सहा
कपाटे लावून आडोसा तयार केलेला होता. त्यामुळे आतले सर्व बाहेर सहज ऐकायला येत
होते. सवयीने मी शिपाई मामाकडे पाहिले. त्यांनी सांगितले, 'तवा लय तापलाय, आत जावू
नको. जरा थांब.' मी बाहेरच थांबलो. कान मात्र त्या अधिकाऱ्याच्या कक्षातून
येणाऱ्या आवाजाकडे होते. अधिकाऱ्याचे रागावणे सुरू होते. 'ही काय पत्ता लिहिण्याची
पद्धत आहे. असा पत्ता लिहिलेले पाकिट त्यांच्या हातात पडल्यावर त्यांच्या मनात विद्यापीठाबद्दल
काय प्रतिमा तयार होईल. असा पत्ता लिहितात का? कोणी नोकरीवर घेतलं तुम्हाला?' आतून महिला कर्मचारी बोललेले ऐकायला आले, 'सॉरी सर'.
अधिकारी पुढे म्हणाले ' सॉरी काय सॉरी, एवढे साधे काम करता येत नाही. पाकिटावर
पत्ता नीट लिहिता येत नाही. घेवून या एक पाकिट.' ती महिला लेखनिक बाहेर आली आणि
पाकिट घेवून पुन्हा आत गेली. आता माझे कानाबरोबर डोळेही आतमध्ये केंद्रित झाले.
कपाटाच्या फटीतून ते काय सांगतात, याकडे माझे लक्ष होते. कपाटाच्या फटीतून आतले
स्पष्ट दिसत होते. असे चोरून ऐकणे, पाहाणे हे वाईट आहे, याचे भान मला नव्हते. ते
माझे वर्तन आज मला चुकीचे दिसत असले तरी मला फार मोठी शिकवण देणारे होते. त्या
अधिकाऱ्याने ते पाकिट हातात घेतले. त्याचे घडी घालून चार भाग केले आणि ते सांगू
लागले, ''डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात 'प्रेषक' लिहून कुलसचिवांचा शिक्का
मारायचा. उजव्या हाताकडील वरच्या भागातील डाव्या कोपऱ्यात खाली 'प्रति' लिहावयाचे
आणि त्याखाली असणाऱ्या उजव्या कोपऱ्यातील एक चतुर्थांश भागातच ज्यांना पत्र
पाठवायचे आहे, त्यांचा पत्ता लिहायचा. असे पाकिट भरून पत्ता लिहितात का कोणी?'' आता त्यांचा आवाज बदलला
होता. ते अधिकारी एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्या कर्मचारी महिलेला समजावून
सांगत होते. या घटनेतील त्या अधिकाऱ्याला साध्या पाकिटावरील पत्त्यातून
विद्यापीठाबाबत पत्र स्वीकारणाऱ्याच्या मनात तयार होणाऱ्या प्रतिमेची चिंता होती. ही
चिंता, काळजी संस्थेच्या लौकिकास बाध पोहोचू नये, या भावनेतून होती. ही चिंता प्रत्येकाच्या
मनात आपल्या प्रत्येक कृतीबाबत असली पाहिजे. आपले काम हे पाट्या टाकण्याचे नाही,
हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण कामातून आनंद घ्यायला शिकले पाहिजे. आपले काम
कोणत्या तरी चांगल्या कार्यासाठी आहे, याची जाणीव आपणास हवी. आपण 'रूटीन काम'
म्हणून त्याकडे पाहायला लागलो; तर, ते आनंददायी ठरत नाही आणि त्यातून संस्थेची आपणास जाणवत
नसले तरी आपण हानी करत असतो. आपल्या कृतीने संस्थेच्या लौकिकात भर पडणे म्हणजे
हानी न होणे असते.
एका गावात गावकऱ्यांनी निधी जमवून एक सुंदर
मंदिर बांधले. त्या मंदिरात ठेवण्यासाठी त्यांना तशीच सुंदर मूर्ती हवी होती. अनेक
मूर्ती घडवणाऱ्यांमधून त्यांनी तीन मूर्तीकार निवडले आणि त्यांना सांगितले की,
ज्याची मूर्ती आम्हाला आवडेल, त्याला आम्ही मोठे बक्षीस देऊ. ज्याचे काम आम्हाला
आवडणार नाही, त्याचेही आम्ही नुकसान करणार नाही. त्याला जेवढा रोजगार मिळाला असता,
तेवढे पैसे आम्ही देऊ. या तीन मूर्तीकारांची गावात राहण्याची व्यवस्था करण्यात
आली. त्यांच्या पसंतीचे दगड शोधण्यासाठी त्यांना येणारा खर्च गावाने केला आणि ते
दगड मंदिर परिसरात आणून देण्यात आले. दिवसभर हे तीन मूर्तीकार मूर्ती घडवण्याचे
काम करू लागले. अनेक दिवस मनोभावे काम सुरू असल्याचे सर्वांना दिसत होते.
त्यांच्यापैकी एकाची मूर्ती निवडली जाणार होती. तिघेजण भर उन्हातही हे काम करत
होते. त्या गावात एक बाहेरगावचा पाहुणा आला होता. त्याला गावात मंदिर बांधण्यात
आल्याचे समजले होते. त्याचप्रमाणे तीन मूर्तीकारांपैकी ज्याची मूर्ती अधिक छान
बनेल, तिची तिथे प्रतिष्ठापना होणार असल्याचेही समजले. संध्याकाळच्या वेळी त्याने
मंदिराकडे जायचे ठरवले. तो त्या मंदिराजवळ ज्या ठिकाणी मूर्ती घडवत होते तिथे
गेला. तसे हे तिघेजण बऱ्यापैकी अंतर राखून काम करत होते. छिन्नीने दगड घडवताना तो
कोणाला लागू नये, याची काळजी घेत होते. मात्र एकमेकांचे काम एकामेकाला दिसत होते.
ही स्पर्धा होती. परीक्षा होती. जो सर्वोत्तम प्रदर्शन करणार तो जिंकणार, हे उघड
होते. म्हणून ते आपले कार्य-कौशल्य लपवण्याचा प्रयत्न करत नव्हते. सर्वांचे काम
खुलेपणाने सुरू होते. पाहुणा पहिल्या मूर्तीकाराकडे गेला. तो आधीच त्रस्त
चेहऱ्याने काम करत होता. पाहुण्याने पहिल्या मूर्तीकाराला विचारले, 'काका, तुम्ही
काय करताय?' मूर्तीकार वैतागून म्हणाले, 'दिसत नाही होय, दगड फोडतूय. या देवळात बसवायला
मूर्ती पायजेल हाय. रोजगार मिळतूय म्हणून काम करतूय पोटासाठी'. तो पाहुणा
पहिल्याचे ऐकून पुढे गेला. त्याने दुसऱ्या मूर्तीकाराला तोच प्रश्न विचारला.
दुसऱ्या मूर्तीकाराने उत्तर दिले. 'पोटाचा प्रश्न आहे बाबा. पापी पेट भरायचं तर
काम कराय लागतंय. ही जी मंदिर बांधलय नव्हं त्याच्यात देव बसवायचाय, त्याला मूर्ती
पायजेल. आम्हा तिघास्नी बोलवून घेतलं. त्यातली एक बसवायची म्हणतेत. पैसा मिळतूय
म्हणून करायचं काम.'
तो पाहुणा तिसऱ्याकडे गेला आणि हाच प्रश्न
विचारला. तिसऱ्या मूर्तीकाराने उत्तर दिले,
'समोर जे सुंदर मंदिर बांधले आहे. त्यामध्ये बसवायला एक सुंदर मूर्ती हवी आहे. ती
मूर्ती मी घडवतो आहे.' त्याचा आत्मविश्वास पाहून पाहुण्याला राहवले नाही. त्याने
पुढचा प्रश्न केला, 'पण तुमची मूर्तीच बसवतील कशावरून? बाकीचे लोक पण तेचं काम
करतेत ना?' तेंव्हा तो मूर्तीकार परत बोलला, 'बाकीचे काय करतात माहित नाही. पण मला इथं
त्या कामासाठी बोलावलंय आणि मी ती मूर्ती घडवतोय'. पाहुण्याने मनोमन ओळखले की
याचीच मूर्ती बसवली जाणार तरीही त्याने विचारले 'मग पोटापाण्याचे काय करता?' मूर्तीकार बोलला, 'काम
चालूच हाय की, हातातली कला उपाशी राहू देती व्हय. कामातून मिळतेत चार पैसे, पोटभर
देतूय त्यो. पोटाची काळजी कराय तो खंबीर हाय. आपण आपलं काम करायचं, बास्स'. कांही
दिवस गेले. आणि तिघांच्या मूर्तीपैकी तिसऱ्या मूर्तीकाराची मूर्ती सर्वाना आवडली
आणि तिची प्राणप्रतिष्ठा त्या मंदिरात करण्यात आली. त्याबद्दल गावाने त्याला मोठे
बक्षीसही दिले.
मित्रहो, आपली काम करत असतानाची भावना
तिसऱ्या मूर्तीकाराप्रमाणे असली पाहिजे. आपल्या कामासाठी पगार द्यावयाची काळजी
संस्था घेतच असते. त्यासाठी व्यवस्थापक मंडळ आणि संचालक मंडळ सक्षम असते. आपण त्या
गोष्टीचा विचार न करता ही संस्था, संस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी आपली नियुक्ती झाली
आहे, हे कदापि विसरता कामा नये. आपले काम सर्वोतम असले पाहिजे आणि त्यासाठी आपण
अंत:करणापासून या कार्यात लक्ष दिले पाहिजे. संस्थेमध्ये आपले काम सर्वोत्कृष्ट
ठरेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे हे तीन मूर्तीकार काय करतात, ते परस्परांना
दिसत होते. आपले काम कोणी झाकून, लपवून करत नव्हते. तसा पारदर्शकपणा आपल्या
कार्यात असला पाहिजे. पारदर्शकता ही प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामात ठेवून
सर्वोत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही सर्वोत्कृष्ट बनण्याची निकोप आणि
निरोगी स्पर्धा संस्थेतील वातावरण चांगले ठेवते. तिथे 'हेल्दी वर्क कल्चर' निर्माण
होते आणि त्यातून संस्था नावारूपाला येतात. चांगले वातावरण ठेवण्यामध्ये
संस्थेच्या अधिकाऱ्याइतकेच कर्मचाऱ्यांचे आपसात असणारे संबंधही महत्त्वाचे असतात.
आपसातील संबंध जितके खुले आणि मोकळे तितकी त्या संस्थेची भरभराट होत असते. यामध्ये
आणखी एक महत्त्वाची बाब असते, ती म्हणजे आपण स्वत:शी प्रामाणिक राहायला शिकले
पाहिजे. कोण काय म्हणते? यापेक्षा आपल्या अंत:करणाला माहित पाहिजे की आपण 'कोणतेही
चुकीचे काम करत नाही की ज्यामुळे आपण स्वत:ला दोषी धरावे'. विद्यापीठातच घडलेला एक छान किस्सा इथं
सांगावासा वाटतो.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना बढत्या
देण्यासाठी एक समिती असते. समितीत चार-पाच वरिष्ठ अधिकारी असतात. या समितीसमोर जे
कर्मचारी पदोन्न्तीस पात्र असतात, त्यांची यादी ठेवली जाते. समितीच्या बैठकीत सर्व
कागदपत्रांची, गोपनीय अहवालांची, वैयक्तिक नस्तीची पडताळणी करून शिफारशी केल्या
जातात आणि नंतर प्रशासकीय आदेश काढले जातात. अशीच एकदा पदोन्नती समितीची बैठक
झाली. बैठकीनंतर समिती सदस्यापैकी एकजण काही कामानिमित्त विद्यापीठातील पतसंस्थेत
गेले होते. ते अधिकारी त्यांच्या हुशारीमूळे सर्वत्र चर्चेत असत. विद्यापीठात
काहीही घडले तर त्याच्या पाठीमागे त्या अधिकाऱ्याचा हात आहे, असे म्हटले जायचे; प्रत्यक्षात त्या
अधिकाऱ्याला त्या घटनेबद्दल काही माहित नसले तरी. हे अधिकारी विद्यापीठातच शिकले
होते. इथेच नोकरीला लागलेले. त्यामुळे १०-२० वर्षे नोकरी झालेल्या लोकांनी त्यांना
विद्यार्थी दशेपासून पाहिलेले होते. पतसंस्थेत त्यांच्या विद्यार्थीदशेपासून
परिचित असलेला एक कनिष्ठ अधिकारी भेटला. एरवी अनेक वेळा ते दोघे एकत्र असत. मात्र
त्या दिवशी या दुसऱ्या अधिकाऱ्याला पदोन्नती देण्याचा निर्णय झाला होता. नेहमीप्रमाणे
चहा घेण्याबाबत चर्चा झाली. दोघेजण कँटीनला गेले. त्याठिकाणी आम्ही अगोदरच बसलेलो
होतो, त्यामुळे या घटनेचा साक्षीदार होता आले.
कँटीनमध्ये नेहमीच्या पद्धतीने कनिष्ठ
अधिकारी काउंटरकडे जाऊ लागला. वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला थांबवले. स्वत: कुपन
घेतले आणि चहा घेतला. यावर कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना विचारले 'सर,
असे का? चहाला तर मी जाऊ या, म्हटले होते. बिल मी द्यायला पाहिजे होते.' त्यावेळेस
त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जे सांगितले ते लाखमोलाचे आहे. ते म्हणाले, 'तुमचा आज
प्रमोशनसाठी विषय होता. ती बैठक झाली आहे. आपण दोघे इथे चहाला आलो आहोत, याची
चर्चा तर होणारच. बढतीच्या बैठकीनंतर आपण दोघे चहाला गेलो म्हणून. याठिकाणी तुम्ही
बिल दिले काय आणि मी दिले काय? रक्कम ती किती? मात्र मी आज तुमच्या विषयानंतर तुमच्याकडून चहा घेतला, ही
चर्चा करणाऱ्या लोकापेक्षा आजचा चहा मी तुमच्याकडून घेतला नाही, तर तो मी तुम्हाला
दिला आहे, याची माझ्या मनाला खात्री हवी होती. आता मी निर्धास्त आहे. कोणी काहीही
बोलू देत. माझ्या मनाला खात्री आहे, मी तुमच्याकडून संभाव्य चर्चेतला लाभ घेतला
नाही. ही खात्री आपल्या मनाची असेल तर जग काय म्हणते याची काळजी कशाला?' आज या प्रसंगाबाबत प्रशासनाचा एवढी वर्षे अनुभव घेतल्यानंतर
मला त्या अधिकाऱ्याचे वागणे अनेक कारणानी खूप महत्त्वाचे वाटते.
त्यातील पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे त्या
ज्येष्ठ अधिकाऱ्याने माणूस म्हणून पूर्वीपासून असलेले संबंध जपले. त्या दुसऱ्या अधिकाऱ्याबरोबर
चहाला जायला नकार दिला नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पदोन्नती समितीची बैठक
आणि त्यामधील विषयपत्रिका ही सर्वांना माहित असते. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्याला
त्याची पदोन्नती झाली की नाही, हे कुठेही सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी कोणतीही
गोपनीय माहिती सांगितली नाही. जग काय म्हणते यापेक्षा आपल्या अंतर्मनाचा आवाज त्या
अधिकाऱ्याला महत्त्वाचा वाटत होता आणि त्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याचे वर्तन होते.
हा आवाज ऐकायला आपण सुरूवात केली पाहिजे. आपली कृती नियमबाह्य नाही, मानवता सोडून
नाही, नैतिकता सोडून नाही आणि याची साक्ष कोण परकी व्यक्ती नाही, तर आपले अंतर्मन
देते, यापेक्षा कोणतेही मोठे प्रमाणपत्र नाही.
सर्वांची कार्यतत्परता, कौशल्य, संभाषण चातुर्य
हे सारखे असते, असे नाही. प्रत्येकाची जमा मानके आणि वजा मानके असतात.
प्रत्येकाकडे काही चांगले गुण आणि कौशल्ये असतात तसेच एखाद्या गोष्टीची कमतरता सुद्धा
असते. अशा सर्वांना बरोबर घेऊन कार्यालयीन कामकाज करावयाचे असते. या सर्वांना
एकसंघ ठेवण्याचे कसब अधिकाऱ्यांच्या अंगी असावे लागते. अधिकाऱ्यांनी निष्पक्ष
राहणे आणि सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक देणे हे त्याचे कर्तव्य असते. अधिकारी
पक्षपाती वागू लागला तर त्या कार्यालयाचे मोठे नुकसान होते. अधिकाऱ्याने टीमवर्क
व्हावे, यासाठीची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. सर्व कर्मचारी सारख्या क्षमतेचे
नसतात. प्रत्येकाच्या क्षमता ओळखून जबाबदारी सोपवली की अनेक गोष्टी सोप्या होतात.
कर्मचाऱ्यांनीदेखील हे लक्षात घेतले पाहिजे की कोणतेही काम हलके किंवा मोठे नसते.
कोणतीही जबाबदारी ही संस्थेचे काम असते आणि कामासाठी आपली नियुक्ती झालेली असते.
संघकार्य उत्तम तर शाखेचे काम उत्तम आणि प्रत्येक शाखा अशी काम करू लागली, तर
संस्था मोठी होण्यास वेळ लागत नाही.
शेवटी मला इलेनोर रूझव्हेल्ट यांचे एक वाक्य
सांगावेसे वाटते. हे वाक्य अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. याठिकाणी मी
कोणाला विचारणार नाही की, तुम्ही यातील काय करता? कसे वागता? प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे, आपले वर्तन
कसे आहे. रूझव्हेल्ट यांचे ते सुभाषित असे आहे, 'Great minds discuss ideas, average minds discuss events and small minds
discuss peoples.' म्हणजे काय? तर, लहान मनाची माणसे ही
लोकांबद्दल चर्चा करतात, खरेच आहे. अनेक लोक आपले काम सोडून कोण कसा चुकला, याचंच
मूल्यमापन करत असतात. त्याना सांगावंस वाटतं, 'पहिलं तू काम करायला शिक. म्हणजे तो
कसा चुकला, ते कळेल'. सर्वसाधारण मनाची माणसे ही घटनांबद्दल चर्चा करतात. एखादी
घटना कशी घडली, कार्यक्रम आणखी चांगला कसा करता आला असता; कार्यक्रमात काय चांगले
होते, काय चांगले नव्हते, वगैरे. मात्र त्यांचा सूर निव्वळ दुसऱ्याची मापे
काढण्याचा नसतो. तर मोठ्या मनाची माणसे भविष्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करत असतात.
ती कल्पना मांडतात, त्यावर चर्चा करतात.
आपण यापैकी कोठे बसतो. आपण लोकांबद्दल चर्चा
करत असतो का? उत्तर जर, 'हो' असेल तर, आपण कोत्या मनाचे आहात का? आपले मन विशाल नाही का? आपले मन लहान आहे का? असे प्रश्न विचारून कोणाला
कमी लेखण्यासाठी किंवा उघडे पाडण्यासाठी मी येथे आलेलो नाही. या प्रश्नाच्या
उत्तराची खात्री ज्याची त्याने करावी. आपणच आपले चांगले परीक्षण करू शकतो. आपणच
स्वत:ला चांगले ओळखत असतो. आपल्यातल्या उणिवा आणि बलस्थाने ही आपल्याला माहित
असतात. ती मी तुम्हाला विचारणार नाही. मात्र एक विनंती आहे ती अशी की, आज जर आपण
लोकांबद्दल चर्चा करत असू, तर ती थांबवू या आणि आपण घटना, कार्यक्रम कसा झाला आणि
तो आणखी कसा चांगला करता आला असता, याबाबत चर्चा करायला सुरूवात करू या. आज आपण जर
कार्यक्रमाबद्दल चर्चा करत असू तर आपण भविष्यातील कल्पना मांडायला आणि त्यावर
चर्चा करायला सुरूवात करू या. जे आज नव्या कल्पना मांडतात आणि अंमलात आणायचा
प्रयत्न करतात, त्यांच्या कार्यावरच संस्थेचा विकास आणि वाढ होत असते. आपण अशा
लोकांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा प्रयत्न करू या. निश्चितपणे आपल्या या
प्रयत्नातून संस्थेला मोठी उर्जा प्राप्त होईल आणि संस्थेची प्रगती होत राहील. यात
फूल नाही, फुलाची पाकळी आपली राहील, यादृष्टीने प्रत्येक कर्मचारी कार्यरत राहील,
अशी आशा बाळगतो.
आज संस्था दोन राज्यांत पोहोचली आहे. आपल्या
सर्वांच्या प्रयत्नातून ती लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, सर्व राज्यांत
संस्थेच्या शाखा स्थापन व्हाव्यात, यासाठी माझ्या संस्थेस मन:पूर्वक शुभेच्छा!
___0___