जानेवारी
हा माझा आवडता महिना. या महिन्यात गावाकडे हुरड्याचे दिवस सुरू होतात. हुरड्याच्या
जोडीला रानात पक्व झालेले हरभऱ्याचे डहाळे खायला असायचे. गावाकडील हे रानमेव्याचे दिवस.
हरभरा, पक्व होऊ लागलेल्या गव्हाच्या ओंब्या आणि ज्वारीचा हुरडा असा मस्त बेत असायचा.
आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हुरडा पार्ट्यांचे बेत आखले जातात. हुरड्याची तयारी
होईपर्यंत बालगोपाळ बांध धुंडाळत. यात महत्त्वाचा शोध असायचा तो बोरांचा. आपल्या आंबट-गोड,
अवीट चवीने गोडी वाढवणारा रान मेवा म्हणजे बोरं. गावाकडील असो, नाही तर शहरातील – बोरं
माहीत नाही, अशी पोरं मिळणे कठीण. कदाचित शहरातील मुलांना बोराचे झाड माहीत नसेल, पण
या फळाची ओळख नाही, असे सांगणारी व्यक्ती भारतात तरी मिळणे अशक्यच!
बोरं म्हटल्यावर
चिंचेप्रमाणे, तोंडाला पाणी सुटत नसले, तरी त्याची चव नक्कीच आठवते. मराठीमध्ये बोर,
हिंदीमध्ये बाएर, बादरी, बेर, जेलाची, उर्दूमध्ये बेर, गुजरातीत बोर्डी, बंगालीमध्ये
बेर बोरोई, कूल, बेर, बोराई, तमिळमध्ये इलांडाई, येलांडे, या नावाने ओळखले जाणारे हे
चवदार फळांचे काटेदार झाड. संस्कृतमध्येही बोराला अनेक नावे आहेत. संस्कृतमध्ये मोत्यासारखे
फळाचे म्हणून कुवल, नखासारखे तीक्ष्ण काटे असणारे म्हणून करकंधू, शेळीला खायला आवडणाऱ्या
पानांचे झाड म्हणून अजाप्रिया, तर गोड फळे आहेत म्हणून मधुरफल: अशी त्याची काही नावे
आहेत. संस्कृतमध्ये बोराला ‘बादरा’ असेही म्हणतात. काही मंडळी द्वैपायन परिसरात किंवा
बद्रीनाथ परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात बोरीचे झाडे असल्याने हे नाव आले असल्याचा
‘बादरायणी’ संबंध जोडतात.

बोराला त्याच्या
रंग, रूप आणि गुणावरूनही अनेक स्थानिक नावे प्राप्त आहेत लहान, आंबट गोड बोरांना अनेक
भागात ‘चन्या-मन्या’ किंवा ‘चनिया – मनिया’ बोर म्हणतात. फळाचा आकार लांब खारकेसारखा
असेल आणि गाभुळे बोर चवीला गोड असेल तर त्याला ‘खारकी’ म्हणतात. ज्या फळाचा गाभा मऊ
कापसासारखा असतो, त्याला ‘कापशी’ बोर असे म्हणतात. चवीला आंबट असणारेही काही वाण असतात,
त्यांना आंबट्या किंवा अपभ्रंशित ‘आमट्या’ असे तिरस्कारयुक्त नाव आढळते. विज्ञान जगतात
मात्र बोराला ‘झिझिफस मोरिशिएना’ असे नाव मिळाले आहे. हे रॅमनेसी कुटुंबातील झाड आहे.
बोरांचे अनेक संकरित वाण तयार करण्यात आले
असून, त्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार नावे देण्यात आली आहेत. यातील ॲप्पल बोर खूप
प्रसिद्ध झाले आहे.
बोर हे अस्सल
भारतीय झाड. त्याचे मूळ भारतीय उपखंडातील इंडो-मलेशियातील मानले जाते. या झाडाचे मूळ
दक्षिण-पूर्व आशियातील असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. काहींच्या मते, हे झाड मूळचे
मलेशियातील आहे. आज उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील बहुतांश सर्व देशामध्ये बोरीची झाडे
आढळतात. हा बोरीचा प्रवास नैसर्गिकरित्या झालेला आहे. फिजी आणि ऑस्ट्रेलियाच्या काही
भागामध्ये तर या झाडांने तणाचे रूप धारण केले आहे. तेथील सुपीक जमिनीवर या झाडाने कब्जा
मिळवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे बोरीच्या झाडाविरूद्ध आपल्याकडे विलायती बाभळीविरूद्ध
मोहीम उघडतात, तशी मोहीम राबवतात. मात्र बोरीची झाडेही अशी चिकट की एकदा जुन झाल्यावर
मुळाचा थोडा अंश जरी जमिनीत राहिला तरी तिथे पुन्हा उगवून येते. त्यामुळे नको त्याठिकाणी
झाड आल्यावर लगेच त्याचे उच्चाटन करावे लागते.
बोरीचे झाड
घनदाट फांद्यांचे, काटेरी आणि मध्यम उंचीचे असते. याची सावली छान पडते. काही वाणांची
उंची अगदी चाळीस फुटापर्यंत वाढत असली तरी अनेक झाडांची उंची ही दहा फुटांपेक्षा कमी
असते. तर काही वाण वेलीसारखे वाढतात. त्याला कसलीही जमीन चालते. माळरान, मुरमाड, काळ्या
मातीची, लाल मातीची कोठेही ते रूजते. वाढते. ऊष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील बहुतांश
सर्व देशात बोरीची झाडे आढळतात. बोरीची झाडे कोरड्या वातावरणात चांगली वाढतात. थंड
ते उष्ण तापमानाच्या प्रदेशातही ही झाडे वाढतात. दुष्काळी भागापासून ज्या प्रदेशात
अगदी २२५ सेंटिमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशातही बोरीची झाडे आढळतात. समुद्र सपाटीपासून
६०० मीटर उंचीच्या टेकड्यावरही ही झाडे वाढतात. रानटी बोरीची झाडे तर १६०० मीटर उंचीवरही
उगवतात. बोरीच्या फळाचे कौतुक अनेकजण करतात. बहुतेक सर्वांना ती आवडतात. झाडाचा काट्यामुळे
तिरस्कार करतात, मात्र बोराचे झाडही सुंदर असते.
बोरीचे झाड बियापासून उगवते. एका किलोमध्ये अंदाजे तीन हजार वाळलेल्या बिया असतात. याच्या बियांचा आकारही फळांप्रमाणे असतो. साधारणत: बोराच्या बिया गोलाकार किंवा लंबगोलाकार, टोकाला निमुळत्या होत जाणाऱ्या असतात. रंग पांढरा असतो. याला आठोळी म्हणतात. या आठोळीत पांढऱ्या टणक कवचाच्या आत चमकदार दोन - तीन तपकिरी, लंबवर्तुळाकार, चपटे बी असतात. या बिया साधारण पाच ते सहा मिलीमीटर लांबीच्या असतात. या आतल्या बियांपासून तेल काढले जाते. आठोळीवर सुंदर नक्षी किंवा रचना असते. देठाकडील भागाला एक खाच असते. चांगले वातावरण म्हणजेच पुरेसे पाणी आणि माती मिळताच, हे बी रूजते. बोरीचे बी विनाप्रक्रिया लावले, तर ते रूजण्यास सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र त्यावर प्रक्रिया करण्यात आली, तर आठवड्यात रोपे उगवतात. बिया लवकर रूजाव्यात, यासाठी या बिया पातळ सल्फ्युरिक आम्लात भिजवतात. बियावरील कवच फोडूनही बिया रूजण्याचा कालावधी कमी करता येतो. मात्र हे काम फारच कौशल्याचे असते. रूजलेली रोपे उपटून लावली तर जगत नाहीत. त्यामुळे बिया थेट जमिनीत लावाव्या लागतात किंवा पिशव्यांमध्ये त्यांची रोपे तयार करावी लागतात. तीन चार महिन्यांत रोपे लागवडीस योग्य होतात.
बिया रूजल्यावर त्यातून सर्वात प्रथम गोलाकार दोन पाने येतात. त्या पानांमधून वर कोंब सरकत जातो आणि त्यासोबत काटे आणि पाने एकत्र यायला सुरूवात होते. पाने एकाआड एक येत जातात. पानांची लांबी अडीच ते साडेतीन सेंटिमीटर लांब आणि पावणेदोन ते चार सेंटिमीटर रूंद आढळतात. एकिकडे जमिनीवर पाने आणि काटे वाढत असताना जमिनीमध्ये सोटमूळ भराभर वाढायला सुरुवात होते. झाडाच्या सोटमुळाला पुढे उपमुळे फुटत जातात आणि झाड वेगाने वाढू लागते. दुष्काळातही या मुळांच्या सहाय्याने झाड सदाहरित राहते.
बोरांचे
सूक्ष्म निरीक्षण केले तर त्याच्या काट्यांची रचना भिन्न असल्याचे लक्षात येते. बहुतांश
बोरांच्या झाडाला सरळ आणि वाकडे असे दोन्ही प्रकारचे काटे असतात. काही झाडांमध्ये सरळ
काटे एकाआड एक पानाबरोबर येतात, तर काही झाडांमध्ये ते प्रत्येक पानाबरोबर येतात. वाकडे
काटे मात्र प्रत्येक पानांबरोबर येतात. विशेष म्हणजे सरळ काटे फांदीच्या दर्शनी भागात
असतात. ते सहज लक्षात येतात. वाकडे काटे पानाआड लपलेले असतात. हे काटे सुरुवातीला येतात
पांढऱ्या हिरवट रंगासह. या झाडाची पूर्ण ओळख नसलेल्या माणसाने त्याच्याशी जराशी जवळीक
करायचा प्रयत्न केला की कपडे फाटलेच म्हणून समजायचे. त्याहीपेक्षा थोडे जास्त जवळ जायचा
प्रयत्न केला, तर अंगावर ओरखडे उठणार, हे ठरलेले. या काट्यामुळे फळे आवडत असली तरी
अनेकजण या झाडांपासून फटकून राहतात. बोरे खाताना अंगावर ओरखडे उठले की बोरांची चव अविस्मरणीय
बनते.
खोड, काटे आणि पानांवर कोवळे असताना कुशीमुळे पांढरा रंग येतो. पांढरे बारीक तंतू त्या भागाची वाढ जशी होऊ लागते, तसे कमी होत जातात. पुढे पानांचा रंग जसा बदलत जातो, तसा काट्यांचा रंगही बदलत जातो. पुढे खोड गडद पोपटी बनत जाते, तसे काट्याचा रंगही बदलतो. नंतर खोड तांबूस लाल होतो, तसा काट्यांचा रंग लालसर तांबडा होतो आणि त्या खोडाच्या सालीवर भेगा निर्माण होईपर्यंत हा काटा सालीला सोडत नाही. साधारण पाच-सहा सेंटिमीटर आकाराचे होईपर्यंत खोडाची साल लालच असते. नंतर मात्र ती बाहेरील बाजूस पांढरी, किरमिजी होत जाते आणि खडबडीतही होते. मात्र आतील भागातील साल लाल असते. खोड लाल असेपर्यंत त्यावरील काटे काही हटत नाहीत. लाल सालीला चकाकी असते. तसेच ती खडबडीत नसते. नंतर खोडांचा रंग बदलत पांढरट करडा होतो. तसे सालीला खडबडीतपणा येतो आणि काटेही गळून जातात. खोड सरळ वाढते आणि नंतर फांद्यांचा विस्तार होतो. फांद्याची टोके जमिनीकडे झुकलेली असतात.
पानांचा वरच्या बाजूचा रंग हा गडद हिरवा होत जातो. पानाला चांगलीच चकाकी असते. पानांचा खालचा रंग मात्र पांढरटच राहतो. खोडापासून बारीक देठ असतो. काही मिलीमीटर देठानंतर हिरवे पान सुरू होते. पानांचा आकार गोलाकार, किंवा लंबगोलाकार असतो. बोरीच्या पानावर वरच्या बाजूला तीन ठळक शीरा असतात. पानांच्या सुरुवातीपासून कडेपर्यंत या शीरा पसरलेल्या असतात. यामुळे पान चार भागात विभागले जाते. त्यांच्यापासून निघालेल्या बारीक पोपटी शीरांची नक्षीदार जाळी असते. पाने कडेला करवतीसारखी असतात. मात्र ही नक्षी लहान आकाराची असते. या जाळीमुळे आणि करवती नक्षीमुळे पानाच्या सौंदर्यात भर पडते. पानांचा रंग मात्र गडद हिरवा असतो. भारतात या झाडांची पाने एप्रिल मे मध्ये गळतात. पानामध्ये १५.४ टक्के प्रथिने, १५.८ टक्के तंतूमय पदार्थ, ६.७ टक्के क्षार, १६.८ टक्के पिष्टमय पदार्थ असतात. बोरीच्या झाडांची पाने ही शेळी आणि मेंढ्यांची आवडते खाद्य. बोरीचे झाड दिसताच एवढे काटे असूनही हे प्राणी त्यावर तुटून पडतात. कोवळे शेंडे तर काट्यासह फस्त करतात. मात्र निबर काटे असणाऱ्या फांद्यातील पाने वेचून खाण्याचे कसब त्यांना चांगलेच अवगत असते. विशेष हे की शेळ्या आणि मेंढ्यांची चोरी करणारे चोर त्यांनी ओरडू नये म्हणून त्यांना चोरण्यापूर्वी त्यांच्या जिभेवर बोरीचा वाकडा काटा टोचतात. हा काटा बकरीला काढता येत नाही आणि त्यामुळे ती ओरडत नाही. बोरांची पाने उंटाचेही आवडते खाद्य आहे.
झाड दोन-तीन
वर्षांचे झाले की जून ते ऑक्टोबर या कालावधीत पानाच्या बेचकीतून कळ्या बाहेर पडतात.
झाड तीन चार फुटाचे असताना फुले येऊ लागतात. एकाच जागेवर चार-पाच कळ्या येतात. खोडाला
प्रत्येक कळी स्वतंत्रपणे येते. हळूहळू कळ्या उमलू लागतात. कळ्यांचा आकार अंजिरासारखा
असतो. कळ्यांचा रंगही पांढरट, हिरवा असतो. त्या कळ्यावरही बारीक लव असते. कळ्या उमलतात
आणि झाडावर जणू चांदण्या फुलतात. ही फुले खूप लहान तीन-चार मिलीमीटर आकाराची असतात.
त्यांच्याजवळ जाऊन निरखून पाहिले, तर त्यांची
निश्चितच मनाला भुरळ पडते. मात्र तोडण्याचा प्रयत्न न करणेच बरे! बोराच्या फुलाला पाच
पाकळ्या असतात. फुलांचा रंग फिकट पिवळा, हिरवा पांढरट असा असतो. हिरवट पाच पाकळ्यामध्ये
सुंदर सूक्ष्म रचना घेऊन फुल बसलेले असते. या फुलामध्ये पाच निदलपुंज, त्यातून पांढरे
धाग्यासारखी पुंकेसरांची रचना बाहेरपर्यंत आलेली असते. फुलांना मंद गंध असतो. फुले
द्विलिंगी किंवा केवळ पुल्लिंगी असतात. बिजांडकोष फुलांच्या मध्यभागी खाली बसलेले असते.
या फुलांकडे त्यांचा गंध आणि त्यातील मधामुळे कीटक आकर्षित होतात. बोरांचा मध हा हलका
आणि मंद सुगंधी असतो. बोरांचे परागकण जाड आणि जड असतात. बोरांच्या फुलांमध्ये परागीभवन
प्रामुख्याने मधमाशांमुळे होते. मुंग्या आणि इतर किटकांचेही परागीभवन प्रक्रियेत योगदान
असते. त्यामुळे बहुतांश फुलांचे फळात रूपांतर होते. फुले फुलल्यानंतर त्यांचे किटकामार्फत
परागीभवन होते. त्यानंतर फुलाच्या देठाला हिरवे बोर लागलेले आढळते. हळूहळू बोरांची
वाढ होऊ लागते. फुलांचे अस्तित्व संपून तेथे फुले लगडलेली फळे दिसू लागतात. बोरे वाढून
मोठे व्हायला साधारण चार महिने लागतात. ऑक्टोबरपासून काही झाडांची बोरे पिकतात. साधारण
फेब्रुवारी मार्चपर्यंत ती मोठ्या प्रमाणात असतात. देशी वाणातील झुडुपवर्गीय बोरांच्या
रोपांना वर्षभर फळे असतात. भारतात पूर्ण वाढलेल्या झाडाला पाच ते दहा हजार बोरे लागतात.
संकरित झाडांना अगदी तीस हजारापर्यंत फळे लागतात. भारतात लागवड केलेल्या झाडांपासून
एकूण नऊ लाख टन बोरांचे उत्पादन होते. ॲपल बोर या संकरित वाणांची झाडे प्रती झाड प्रती
वर्ष २०० किलोपर्यंत उत्पादन देते. अंदाजे ८८ हजार हेक्टर जमीन बोराच्या लागवडीखाली
आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि आफ्रिकेतही बोरांची लागवड केली जाते.
बोराची फळे
मऊ गाभा असणारी असतात. फळे पाऊण सेंटिमीटर व्यासापासून अगदी अडीच तीन सेंटिमीटर लांबीची
असतात. बोराचे संकरित वाणही मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले आहेत. यातील काही वाणांची
फळे सात सेंटिमीटर व्यासाचीही आढळतात. फळांचे आकार गोलाकार किंवा अंडाकृती असतात. कच्च्या
फळांची त्वचा कडक असते. मात्र आतील गर मऊ असतो. त्यातील आठोळी किंवा बी सर्वात कडक
असते. सुरुवातीला फळे हिरवी किंवा पोपटी रंगाची असतात. हिरवी कच्ची फळे तुरट किंवा
आंबट असतात. पिकताना प्रथम ती पिवळी होतात. अशी पिकू लागलेली फळे गोड चव धारण करू लागतात.
त्यातील चांगली आंबट गोड चव असणारी फळे ओळखण्याचे कसब काही मुलांना अवगत होते. ती मुले
पिकलेल्या फळांच्या वासावरून त्यांची चव ओळखतात. अशा अर्धवट पिकलेल्या फळांचा गर पांढरा
आणि करकुरीत असतो. मात्र काही झाडे फसगत करत आपला आंबटपणा दाखवतात. पिकल्यावर त्यांचा
रंग गडद तपकिरी किंवा लाल होतो. पूर्ण पिकलेले फळ बिलबिलीत होते. त्या फळावर सर्वत्र
सुरकुत्या पडलेल्या असतात. अर्धवट पिकलेली फळेच खायला लोकांची पसंती असते. एका झाडाची
सर्व फळे एकाचवेळी पिकत नाहीत. मात्र पिकलेल्या फळांचा एक मंद प्रसन्न गंध सर्वत्र
पसरतो. ती चवीला गोड असतात. अतिपिकलेल्या फळांचा वास मात्र थोडा न आवडणारा असतो. अनेकजण
पूर्ण पिकलेली फळे चांगली वाळवून वर्षभर जिव्हेचे चोचले पुरवत राहतात. या फळांमध्ये
एकच आठोळी असते.
बोराच्या
बियांचा प्रसार हा प्रामुख्याने प्राणी आणि पक्ष्यांमुळे होतो. मानवही बोरे खाल्ल्यानंतर
आठोळ्या फेकतो आणि त्यातून रोपे उगवतात. बोरीचे बी साधारणपणे अडीच ते तीन वर्षे सुरक्षित
राहते. मिश्र फलनामुळे ज्या झाडाच्या फळांचे बी असते, त्याच झाडाचे गुण पुढच्या पिढीत
येतातच असे नाही. चांगल्या रोपांची कलमे रानटी रोपावर त्या झाडांची कलमे बांधून बनवली
जातात. काही विनाकाट्याचे वाणही बनवण्यात आले आहेत, पण त्या बोरांना देशी वाणांची सर
नाही. जमिनीचा पोत, वातावरणीय बदल याचाही फळांच्या व पानाच्या गुणधर्मावर परिणाम होतो.
बोरांची
फळे, आहे त्या रूपात खाल्ली जातात. बोरांपासून मद्यनिर्मितीही करण्यात येते. त्यापासून
कोशिंबीर, चटणी आणि लोणचेही बनवतात. बोर अतिशय पौष्टिक असते. बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात
जीवनसत्त्व ‘क’ असते. ‘क’ जीवनसत्त्वाबाबत आवळा आणि पेरूनंतर बोरांचा क्रमांक लागतो.
सफरचंद आणि लिंबापेक्षाही ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. बोरांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वही
असते. त्यापासून जामही बनवण्यात येतो. बोरांच्या फळांच्या शंभर ग्रॅम गरामध्ये १७ ग्रॅम
कर्बोदके असतात. यामध्ये पाच ते १० ग्रॅम शर्करा असते. तंतूमय पदार्थ ०.६ ग्रॅम असतात.
तर संकरित वाणांच्या फळांच्या गरांमध्ये २०
ते ३० टक्के शर्करा असते. अडीच टक्के प्रथिने असतात. १२.८ टक्के कर्बोदके असतात. त्यामध्ये
कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहही असते. काही देशात मासेमारीत बोराचा वापर केला जातो. बोरांचा
रसही काढला जातो. तोंडातील जखमा, अल्सर भरून येण्यासाठी फळांचा चांगला उपयोग होतो.
वाळलेली बोरांची फळे रेचक म्हणून उपयोगी पडतात. बाळंतपणावेळी वेदनांची तीव्रता कमी
व्हावी, म्हणून गर्भवती महिलांना बोरे आवर्जून खायला लावतात. मळमळ कमी करण्यासाठीही
बोरांची फळे उपयोगी पडतात. बोराच्या आठोळीतील बियापासून तेल काढले जाते. जैविक इंधन
म्हणून याकडे आज पाहिले जात आहे आणि प्रगत देशांत यावर संशोधन सुरू आहे. पाने शेतातील
मातीचा पोत सुधारण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे बांधावरील झाडे शेतीतील पिकांचे
रक्षण जसे करतात, तशीच ती माती सुपीकही ठेवतात.
बोराच्या
झाडाचे लाकूड खूपच गुणी आहे. ते टणक आणि टिकाऊ असते. पूर्वी ताक करण्यासाठीची ‘रवी’
बोराच्या योग्य आकाराचे लाकूड शोधून ती कुशल सुताराकडून बनवून घेतली जायची. बोरांच्या
लाकडापासून शेतीची अवजारे, बैलगाड्यांची चाके बनवतात. बोराच्या लाकडाच्या टिकाऊपणामुळे
बंदुकीचे दस्त बनवण्यासाठी या लाकडाला खास पसंती दिली जाते. काटेरी गुणधर्मामुळे शेतीला
कुंपण घालण्यासाठी फांद्या कापून त्यांचा फास (काटेरी फांद्या सपाट याव्यात म्हणून
घातलेला ढीग) घालतात. अशा फासामध्ये वाळवलेल्या फांद्याचे कुंपण एका रेषेत घालता येते.
बाभळीपेक्षा बोराच्या काटेरी फांद्याचे कुंपण चांगले बनवता येते. बोराची टणक लाकडे
जळणासाठी, इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जातात. एक किलो जळणापासून ४९०० किलोकॅलरी
उष्मा मिळते. लाकडाची घनता चांगली असते. एक घनमीटर लाकडाचे वजन एक टन भरते. लाकडाचा
रंग हा पिवळसर किंवा लालसर असतो. लाकडाला एक प्रकारची चकाकी असते. त्यापासून कोळसाही
बनवला जातो. बोरीच्या झाडाच्या सालीपासून रंगही बनवतात. साल आणि मुळे पाण्यात टाकली
तर लाल किंवा तपकिरी रंग मिळतो. रेशिम आणि लाख उत्पादनासाठी ही झाडे सहाय्यकारी असतात.
काही भागात बोराच्या लाकडापासून फर्निचरही बनवतात. कृषी अवजारासाठीही लाकूड वापरले
जाते. पार्टिकल बोर्ड, खेळाचे साहित्य बनवण्यासाठी बोरीच्या झाडाचे लाकूड चांगले मानले
जाते.
फळमाशी बोराची
सर्वात मोठी शत्रू आहे. आकाराने मोठ्या, गोड चवीच्या फळावर ही माशी हल्ला चढवते. अशा
झाडांची सर्वच फळे किडलेली असू शकतात. कमी गोडींची, आंबट फळे मात्र केवळ एक दोन टक्केच
किडलेली आढळतात. संकरित वाणांच्या झाडावर त्यामुळे किटकनाशकांची वारंवार फवारणी करण्यात
येते. पाने खाणारे सुरवंटही बोरावर मोठ्या प्रमाणात येतात. त्यांचा हल्ला झाली की झाडाच्या
वाढीचा वेग कमी होतो. तसेच फळाच्या उत्पादनावरही याचा मोठा परिणाम होतो. काही परजीवी
वेलही बोरांच्या झाडावर हल्ला करतात. असे झाले तर मोठ्या प्रमाणात फळांची गळ होते.
पानावर येणारा तांबिरा रोगही घातक असतो. मात्र यांचा प्रादुर्भाव संकरित वाणावर जास्त
आढळतो. देशी वाण त्यांना दाद देत नाहीत.
ll २ ll
फळमाशी वगळता
इतर सजीवांचे या झाडावर मोठे प्रेम. फुले येताच बोराच्या झाडावर मधमाशा आणि कीटक येतात.
दाट फांद्यापैकी एखाद्या फांदीवर मधाचे पोळे दिसते. घर म्हणूनही मधमाशा या झाडाची निवड
करतात. मुंगळे, मुंग्या यादेखील या झाडाबरोबर राहतात. झाडाच्या सालीवर असणाऱ्या भेगांमध्ये
वेगवेगळे कीटक आढळतात. खाद्य मिळत असल्याने अनेक पक्षी या झाडाभोवती घिरट्या घालत असतात.
बोरीचे झाड सुगरणीचे आवडते. नदीकिनारी किंवा पाणवठ्याशेजारी असणाऱ्या बोरीच्या झाडाला
सुगरण आपल्या घराचे तोरण बांधतेच. बोरीवर कोतवाल, खाटिक, पावशा, सातभाई, चिमण्या, मुनियासारखे
इतरही अनेक पक्षी घरटी बांधतात. त्यावर असणारे काटे आणि टोकांच्या झुकत्या फांद्यामुळे
बोरीच्या झाडाला ही पसंती मिळते. एरवी बोराच्या झाडावर न बसणारा पोपट फळे लागताच झाडाशी
जवळीक साधत असतो. हे पक्षी पिकांवरील कीड, अळी खातात. दाट फांद्यामुळे मधमाशा आपली
पोळी बोरीच्या झाडावर बसवतात. मधमाशांमुळे शेतातील पिकांचे परागीभवन होते. शेळ्या आणि
मेंढ्यांप्रमाणे जंगलातील हरीण आणि चिंकारा यांना बोरांची पाने खूप आवडतात. खाली पडलेली
पिकली बोरे गपागपा खाऊन नंतर रवंथ करत बसलेले चिंकारा जंगलात आढळतात. रवंथ केल्यानंतर
ते आठोळ्यांचा ढिग घालून ठेवतात. अन्नाची कमतरता पडू लागली की हे आठोळ्याचे ढिग फस्त
करतात. कोल्हा, अस्वल हे देखील आवडीने बोरे खातात. जमिनीवर पसरणाऱ्या बोराच्या झाडाच्या
बुंध्यात ससे आपल्या पिलांना जन्म देतात. त्यामुळे बोरीच्या झाडाला निसर्ग चक्रात महत्त्वाचे
स्थान आहे.
बोरांची
पाने गणपतीला अर्पण केली जातात. माणसासाठी तर बोरे खूप उपयुक्त आहेत. यासंदर्भातील
एक श्लोक ‘कर्कन्धु कोलबदरमामं पित्त कफापहम् l पक्वं पित्तनिलहरं स्निग्धंसमधुरंसरम्
l पुरातनं तृटशमनं श्रमघ्नं दीपनं लघु ll’ याबाबत पुरेसा बोलका आहे. बोरे खाल्ल्याने
अनेक आजारांपासून मानवी शरीराचे रक्षण होते. यातील जीवनसत्व ‘क’ अँटिऑक्सिडंट म्हणून
काम करते. कर्करोगाला प्रतिकार करणाऱ्याचे काम बोरे करतात. बोरांचे सेवन मानसिक तणाव
दूर करते. बोरांचा रस आणि मिरी पावडरपासून सर्दीवरील औषध बनवतात. अतिसार, थकवा, भूक
न लागणे, सर्दी, शीतज्वर, त्वचा कोरडी होणे, त्वचा काळवंडणे, त्वचेवरील सुरकुत्या न
येऊ देणे, अस्थमा, मधुमेह इत्यादींवर बोरे उपयुक्त ठरतात. पचनशक्ती सुधारण्यासही बोरांचे
सेवन उपयुक्त ठरते. बोरांतील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे आणि दातांच्या मजबूतीकरणास
मदत करते. याखेरीज वजन कमी करणे, हृदयरोगापासून बचाव, रक्तदाबावर नियंत्रण, निद्रानाशापासून
मुक्ती, केसवृद्धी, मेंदूविकारापासून मुक्ततेसाठी बोरांचे सेवन उपयुक्त मानले जाते.
यकृताचा त्रास, अस्थमा, ताप या आजारावर बोरीची पाने वापरून उपाय केले जात. बोरांचे
फळ पचनसंस्थेच्या शुद्धीकरणाचे कार्यही करतात. बोरीच्या सालीपासून तयार केलेले मलम
जखमांवर लावले जात असे. बोरीची मुळे ही शुद्धीकरण करतात. मात्र त्यांचा अतिवापर शरीराला
हानी पोहोचवतो, त्यामुळे मुळांचा वापर खाण्यासाठी केला जात नाही. जखमांवर मूळांची पावडर
लावली जात असे.
आदिवासी
भागात मनोभावे कार्य करणाऱ्या राणी बंग यांच्या ‘गोईन’ पुस्तकात बोरीच्या औषधी गुणधर्मांची
विशेष माहिती दिली आहे. बोरीची पाने हगवणीवर कुटून दिली जातात. हात-पाय दुखत असल्यास
उतरणीच्या पाल्याबरोबर वाटून गरम करून त्याचा शेक देतात. अर्धेशिशीवर बोरांची पाने
गुळासोबत खाण्यास देतात. उन्हाळीवर बोरीच्या पाल्याच्या रसात खडीसाखर आणि जिरे घालून
प्यायला देतात. विंचू चावला, बेंड किंवा फोडावर बोरीचा पाला वाटून लेप देतात. वाळलेली
बोरे मोहात शिजवून तिखट मीठ टाकून खातात. देशाच्या इतर भागांतही बोरे वाळवून त्यावर
तिखट मीठ टाकून खातात.
अशा बहुगुणी
बोरांचा आहारात वापर व्हावा, म्हणून संक्रात सणामध्ये, बोरन्हाण विधीमध्ये बोराला स्थान
मिळाले. संक्रातीच्या एक दिवस अगोदर भोगी दिवशी बोरांचा भाजीत वापर करतात. याखेरीज
बोरांचा वापर इतर पाककृतीतही केला जातो. बोरांचा साखरभात अनेक भागात केला जातो. यासाठी
एक वाटी बासमती तांदूळ प्रथम स्वच्छ धुवून घेतात. त्यात चिमुटभर मीठ घालून शिजवलेला
मोकळा भात परातीत थंड होण्यासाठी ठेवतात. आठ ते बारा मोठ्या टपोरी बोरांचे तुकडे करून
घेतात. एक मोठा चमचा तूप कढईत गरम करून घेतले जाते. गरम तुपात चार ते पाच लवंगा टाकतात.
एक वाटी साखरेमध्ये थोडेसे पाणी टाकून पाक तयार करतात. त्यात सुटा केलेला भात, बोरांचे
तुकडे, अर्धा चमचा वेलची पूड, केशर काड्या, आणि अर्धी वाटी खिसलेला ओला नारळ घालून
मिसळून ठेवतात. भांड्याला वाफ येऊ लागली की थोडा वेळ झाकून ठेवून आणि नंतर तो खाण्यास
घेतात. बोराच्या भातावर साजूक तूप घालतात.
बोरांची
चटणीही चविष्ट असते. अर्धवट पिकलेल्या पिवळसर बोरांच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून
गरम करून घेतात. मसाल्याचे पदार्थ मऊ कापडात गुंडाळून त्या मिश्रणात सोडतात आणि अधूनमधून
पिळून अर्क बाहेर काढतात. मिश्रण शिजवून त्यात मिरची किंवा तिखट टाकतात. गरम चटणी तशीच
अरंद तोंडाच्या बाटलीस स्वच्छ धुवून त्यात भरून ठेवतात. पुढे ही चटणी वर्षभर पुरवून
खातात. मात्र ही कला आता विस्मृतीत चालली आहे. त्याऐवजी बोरांचा मिळणारा जाम लोक विकत
घेतात आणि खातात. वाळलेल्या बोरांचा काढाही अनेकजण करतात. वाळलेली मूठभर बोरे उकळत्या
पाण्यात टाकून त्याचा अर्क बाहेर येऊ देतात. त्याला थोडे थंड करून थोडा गूळ, साखर किंवा
मध टाकून पिल्यास थकवा पळून जातो. काही भागात बोरांचे लोणचे तयार केले जाते. सरबत बनवण्यासाठीही
बोरांचा वापर होतो. उत्तर भारतात ‘उन्नाव सरबत’ खूप ठिकाणी उपलब्ध असते. तर उत्तर भारतात
विशेषत: गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ‘बोरदाल’ दाळीमध्ये वाळवलेली
बोरे घालून बनवतात, ती एकदा तरी अवश्य चाखावी, अशी असते.
ll ३ ll
बोराचे झाड
भारतात पुराण काळापासून ज्ञात आहे. ते येथील संस्कृतीमध्ये मिसळून गेले आहे. अर्थात
या झाडासोबत अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत. बोर म्हटले की शबरी आठवतेच. राम वनवासात
असताना रानावनात सीतामाईच्या शोध घेत फिरत होते. त्यावेळी त्यांना शबरी भेटली. तिने
रामासाठी जंगलातून गोड बोरे शोधून आणली. मात्र रामाला दिली जाणारी बोरे ही चांगली आणि
गोड असावीत, किडकी नसावीत, म्हणून तिने सर्व बोरे चिमणीच्या दाताने कुरतडून पाहिली
म्हणजेच उष्टी केली. रामाने शबरीचा बोरे देण्यामागचा भाव पाहिला आणि ती उष्टी बोरे
गोड मानून ग्रहण केली. लक्ष्मणाला मात्र ती उष्टी बोरे खावीशी वाटली नाहीत. हा बोरांचाही
अपमान झाला. पुढे रावणाबरोबरच्या युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागली. तो बेशुद्ध झाला.
त्यामुळे लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी वापरली गेलेली वनस्पती म्हणजे ‘बोर’च होती, असे
अनेक निरूपणकार सांगतात. खरे खोटे त्या रामायणातील वैद्यालाच माहित!
बोरीचे झाड
मुळापासून काढण्याचा प्रयत्न केला तर राहिलेल्या मुळापासून पुन्हा झाड तयार होते. यामुळे
बोर अमर मानली जाते. यासंदर्भातही रामायणाशी जोडली गेलेली कथा आहे. रावणाने सीताहरण
केल्यानंतर राम सीतेला शोधत जंगलातून फिरत होते. त्यावेळी एका बोराच्या झाडाने रामाला
हाक मारली आणि सांगितले, ‘सीतेला एक राक्षस पळवून घेऊन गेला. मी तिचा पदर पकडून थांबवायचा
आटोकाट प्रयत्न केला. मात्र माझ्या कमकुवत फांद्याची ताकत अपुरी पडली. तिच्या पदराचा
एक तुकडा फाटून माझ्या फांद्यावरील काट्यात अडकला आहे’, हे सांगताना बोराची मान शरमेने
खाली गेली, ती आजही खालीच आहे; मात्र या झाडाने दाखवलेले धैर्य पाहून श्रीरामाने त्याला
आशीर्वाद दिला. ‘हे बोराच्या झाडा, तू जे प्रयत्न केलेस, त्यामुळे तू अमर होशील. कोणत्याही
मनुष्याने तुला मुळासकट उपटून टाकायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही. तुझे
एक जरी मूळ राहिले तरी तू पुन्हा उगवून वर येशील.’
बोरीच्या
झाडाबाबत अशा अनेक कथा येतात. ‘भागवत’ लिहीत असताना कर्दम ऋषी बोरांच्या फळांची न्याहरी
करत. एकदा परिक्षित राजा शिकारीला गेला असताना सिमिका ऋषी तप करत असलेले दिसले. राजाला
त्यांची गंमत करावीशी वाटली. परिक्षित राजाने एक साप ऋषींच्या गळ्याभोवती गुंडाळून
ठेवला आणि गेला. त्यानंतर सिमिक ऋषींचा पुत्र श्रृंगी आला. आपल्या वडिलांची अशी विटंबना
पाहून तो चिडला आणि त्याने शाप दिला, ‘हे कृत्य करणारा जो कोणी असेल त्याचा मृत्यू
सात दिवसांत सापांचा राजा तक्षक चावल्याने होईल’. परिक्षित राजाला हे कळले. तो साप
जवळ येऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली. सहा दिवस तो होमहवन करत राहिला. आता
शेवटचा दिवस. तेवढ्यात राजाला बोरे खाण्याची इच्छा झाली. बोरे खाताना एका बोरात अळी
निघाली. पाहता, पाहता ती अळी वाढली आणि तक्षक राजा समोर उभा राहिला. तक्षकाने परिक्षित
राजाला दंश केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
बद्रिनाथ
येथे दहा पंधरा फुट बर्फ पडतो. तरीही तेथे बोराची झाडे वाढतात. विष्णूनारायण तेथे तप
करायला गेले. लक्ष्मीही मागोमाग गेली. विष्णूने ओळखू नये आणि त्यांना ऊन लागू नये,
म्हणून लक्ष्मीने बोरीच्या (बदरी) झाडाच्या रूपात विष्णूवर सावली धरली. म्हणून या ठिकाणास
बद्रिनारायण म्हणतात. ही एक कथा. विष्णूंच्या वास्तव्यामुळे अनेक देव आणि ऋषी तेथे
आले म्हणून या भागाला बदरीविशाल असे नाव पडल्याचा संदर्भ स्कंदपुराणात आहे. तर वराहपुराणात
विशाल नावाच्या राजाने येथे तप करून नारायणाला प्रसन्न करून घेतले, म्हणून या भागास
बदरीविशाल नाव पडल्याचा उल्लेख आहे. याच बद्री वनात महर्षि व्यासांचा जन्म झाला, म्हणून
त्यांना बादरायण म्हणत.
मात्र बोर
असे झाड आहे की, माणसाच्या बालपणापासून जीवनात येते. ओळख देते. जिव्हेचे चोचले पुरवते.
तरीही त्याचे झाड दारात असणे अशुभ मानले जाते. अशा सदगुणी झाडाला अशुभ मानण्यामागे
एक लोककथा आहे. एकदा त्या भागातील सरदार एका गावात आले होते. त्यांना भेटायला गावातील
पाटील जाणार होते. त्या पाटलांच्या दारात बोरीचे झाड होते. त्या बोरीला फळे लागली होती.
सवयीने खाली झुकलेल्या फांद्या आणखी खाली आलेल्या होत्या. पाटील बोरीच्या झाडाखाली
आले असताना वाऱ्याची झुळुक आली आणि पाटलांचा फेटा बोरीच्या काट्यात अडकून खाली पडला.
त्या अणकुचीदार काट्यातून काढताना फेटा फाटलाही. फाटका फेटा घालून पाटील सरदाराला भेटायला
जाऊ शकत नव्हते. फेटा बदलण्यास वेळ लागला. सरदाराकडे जाण्यास उशीर झाला. परिणामी, सरदार
खफा झाले. मुळात फेटा खाली पडणे अशुभ. त्यात तो फाटला. त्यामुळे उशीर आणि उशीरामुळे
सरदाराची खफामर्जी. हे सारे दारातील बोरामुळे घडले. त्या वेळेपासून दारातील बोराचे
झाड अशुभ मानले जाऊ लागले. आजही दारात किंवा परसबागेत कोणी बोराच्या झाडाला जगू देत
नाही.
कोणतीही
वस्तू मिळाली तर ती गरजेपेक्षा जास्त घेऊ नये, हे सांगणाऱ्या बोधकथेतही बोरेच घेतली
आहेत. एक आजोबा शेतात गेले होते. येताना त्यांनी नातवंडासाठी बोरे न्यायची ठरवले. भरपूर
बोरे गोळा केली आणि पाणी भरून नेलेल्या मातीच्या हंड्यात बोरे भरली. हंड्याचे तोंड
लहान होते. घरात शिरताच एका नातवाने बोर पाहून आत हात घातला. त्याला जास्तीत जास्त
बोरे हवी होती. ती बोरे मुठीत पकडल्याने त्याला बोरासह मूठ बाहेर काढता येईना. तो रडू
लागला. शेवटी आजोबांनी त्याला मुठीतील काही बोरे सोडायला सांगितली. मग त्याची मूठ बाहेर
आली.
‘बादरायण
संबंध जोडणे’ हा वाक्प्रचार येण्यामागेही एक कथा सांगितली जाते. ‘संस्कृत सुभाषित सरिता’
या पुस्तकामध्ये ‘अस्माकं बदरीचक्रं, युष्माकं बदरीतरू: l बादरायणसंबन्धात् – यूयं
यूयं, वयं वयम् ll’ असा श्लोक आहे. एका पांथस्थाला उतरायला कोठेच जागा नव्हती. अखेर
एका सद्गृहस्थाच्या वाड्यात ते शिरले आणि ‘आपणास इथे राहण्याची अनुमती द्यावी’, अशी
विनंती केली. त्या मालकांने त्यावर म्हटले, ‘अहो, तुमची आमची ओळख ना पाळख. ना तुम्ही
आमचे नातेवाईक. मग तुम्ही असा आग्रह कसा काय करू शकता?’ यावर तो पांथस्थ म्हणाला,
‘असे कसे म्हणता. तुमच्या दारात बोराचे झाड आहे आणि माझ्या गाडीचे चाक बोरीच्या लाकडाचे
आहे. तेव्हा आपण नातेवाईकच की’. ‘काहीही संबंध नसताना संबंध जोडणे’, असा हा ‘बादरायण
संबंध!’
लहानपणी
ऐकायला मिळालेली गोष्ट आजही तशीच आठवते. एका गावाबाहेर झोपडीत आजीबाई राहात होती. तिच्या
घराजवळ सुमधूर फळे येणारे बोरीचे झाड होते. त्या झाडांची फळे पिकली की आजीबाई ती फळे
गोळा करायची आणि विकायची. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून ती आपला उदरनिर्वाह करायची. जंगलातील
एका कोल्ह्याला या बोरांचा वास लागला. तो रात्री आला. बोरे खाल्ली. शेवटी आजीच्या दारात
घाण करून गेला. हा प्रकार दररोज घडू लागला. हे काम कोण करते, हे आजीला कळेना. एक रात्र
जागून आजीने गुन्हेगार शोधला. तिने या कोल्ह्याची खोड जिरवायचे ठरवले. रात्रभर जागत
बसली. नेहमीप्रमाणे कोल्होबा आले. त्याने बोरे खायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात आजीने
तवा लाल होईपर्यंत तापवला. कोल्होबा मागे फिरणार असे दिसताच, तो तवा दारातील पायरीवर
ठेवला. तो लाल तवा पाहून, कोल्होबाला आपल्यासाठी कोणीतरी सिंहासन ठेवले असे वाटले आणि
तो गरम तव्यावर बसला. तव्याचा चटका बसताच तो ओरडू लागला. कोल्होबाची फजिती पाहून आजीला
हसू फुटले. हसतच ती म्हणाली, ‘ये रे, ये रे, कोल्होबा, बोरे पिकली’. यावर कोल्होबा
विव्हळतच म्हणाले, ‘नको, नको, आजीबाई, खोड जिरली’.
अनेक ग्रामीण
कथा कादंबऱ्यातील प्रामुख्याने नायिकांचे कपडे (आणि काही नायकांचेसुद्धा) बोरीच्या
काट्याने फाडल्याची दृष्ये आहेत. कवितातून मात्र असे उल्लेख अपवादानेच आहेत. ‘ज्या
गावच्या बोरी, त्याचं गावच्या बाभळी’ असे म्हणतो. बोरी आणि बाभळी एकाच मातीत रूजतात,
वाढतात, त्यावरून ही म्हण आली. बोरी-बाभळी एकत्र वाढत असल्या तरी, बाभळीवर वसंत बापट,
इंदिरा संत, कृष्णशास्त्री चिपळूणकर अशा अनेक कवींनी काव्ये रचली, बोरीच्या झाडाला
मात्र हे भाग्य लाभले नाही. बा.सी. मर्ढेकरांनी मात्र एका काव्यात ‘येईल का कधी सीतापती
गं, चुकून तरीपण ह्या वाटेला? घेईल का अन रूजू करून या बोराच्या नैवेद्याला?’ असा प्रश्न
विचारतात. कवी प्रशांत मोरे हे एका कवितेत ‘काटे पायात फोडून, उन वाऱ्यात झडून, बोरी
बाभळीच्या होती बागा गं, बाई दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा’, असे सांगतात. तर ‘रानातल्या
बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सातखंडी’, हे सुंदर बालगीत सुप्रसिद्ध
आहे. तुळजापूरच्या कवी नारायण पूरी यांच्या कवितेतील पत्नीला टोचलेला काटाही बोरीचा
आहे. ते म्हणतात, ‘पायामध्ये सलतो गं, सखे बोराटीचा काटा, तुह्या पायातील सल, त्यात
माहा निम्मा वाटा.’ ना. धों. महानोर यांच्या कवितांमध्ये झाडे, शेती, ग्रामीण जीवन
असते. एका कवितेत बोरीच्या झाडाचे सुंदर वर्णन आले आहे. ते लिहितात, ‘अशी लकाकली बोर,
अंगभर चंद्रकोर, ऊस मळ्याच्या गर्दीत, थोडे सांडले केशर’. तर ग्रामीण जीवनाचे आपल्या
कवितांतून दर्शन घडवणाऱ्या कवी इंद्रजित भालेरावांच्या ‘बाप’ कवितेतील बापाच्या खोपीला
बोराटीचा दरवाज आहे. अनेक नवकवींनी बोरीच्या झाडांना कवितेत स्थान दिले आहे.
तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगात बोरीचा दाखला येतो. भाव महत्त्वाचा, हे सांगताना ते लिहितात, ‘यज्ञ मुखे खोड्या काढी l कोण गोडी बोरांची ll तुका म्हणे भावाविण l अवघा शीण केला तो ll’. खरे तर शबरीच्या बोराची कथा मूळ वाल्मिकी रामायण किंवा तुलसी रामायणात नाही. मात्र नंतर आलेली ही कथा इतकी प्रसिद्ध झाली आहे की तुकोबांनीही शबरीच्या बोराला आपल्या अभंगात गुंफले आहे. ते म्हणतात, ‘ऐका महिमा आवडीची l बोरे खाय भिल्लटीची ll थोर प्रेमाचा भुकेला l हाचि दुष्काळ तयाला ll’. संत निळोबारायांनीही या घटनेला ओवीत गुंफले आहे. त्यांच्या मते यज्ञातील आहुतीपेक्षा भक्तीने दिलेली उष्टी बोरे देवाला जास्त प्रिय आहेत. ते लिहितात, ‘याज्ञिक मंत्रे अवदान देती l त्याहुनी अधिक या उच्छिष्टा बोराची प्रीती ll’ पुराणात अनेक ठिकाणी बोरांचा उल्लेख येतो. निपटबाबा, औरंगाबाद भागातील संत. ते इतके निर्भय होते की, बादशहा औरंगजेबालाही ते सुनावत असत. त्यांना बादशहा औरंगजेब भेटायला आला आणि आश्रमात एकवीस दिवस राहिला, असे सांगण्यात येते. बादशहाला त्यांनी पोपटाच्या रूपात जाऊन मक्केतील बोरे आणून दिली होती, अशी एक आख्यायिका सांगण्यात येते. शकुंतला परांजपे यांनी ‘भिल्लीणीची बोरे’ हा ललित लेखसंग्रह प्रकाशित केला आहे. तर चंद्रकांत खोत यांनीही ‘चनिया मनिया बोर’ पुस्तक लिहिले आहे.
बोरकर, बोरगावे,
बोरगावकर अशी आडनावे महाराष्ट्रात आपणास आढळतात. अर्थात ही गावांच्या नावावरून आली
आहेत. अनेक गावांची नावे बोरावरून आली आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बोरगाव
भेटतेच. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात ‘जरी-बोरी’ नावाचे गाव आहे. खंडाळा तालुक्यातही
बोरी नावाचे गाव आहे. मुंबईतील बोरिवली भागात पूर्वी बोरांची भरपूर झाडे होती. त्यामुळे
या भागाला बोरी व्हिले म्हणत. इंग्रज याचे स्पेलिंग Berewlee असे लिहित. याचेच पुढे
बोरिवली झाले. रायगड जिल्ह्यातील खोपोली आणि पुणे जिल्हयातील लोणावळा शहराला सह्याद्री
डोंगर रांगातील ‘बोरघाट’ जोडतो. वर्धा जिल्ह्यामध्ये वर्ध्यापासून ४० किलोमीटरवर ‘बोर
व्याघ्र अभयारण्य’ आहे. ‘बोरमाळ’ हा बोराच्या आकाराच्या सोन्याच्या मण्यांचा दागिना
महिलांच्या आवडीचा आहे. खंडाळा तालुक्यात बोरी गाव आहे. त्याच्या शेजारी सुखेड गाव
आहे. या दोन गावातील महिला नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ओढ्याच्या कडेला समोरासमोर शंख,
शिंग, डफ वाजवत येतात. भर दुपारी एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहतात. अर्धा-एक तास
हा विधी चालतो. या उत्सवाला ‘बोरीचा बार’ म्हणून ओळखले जाते. ही खरे तर शिव्यांची किंवा
वादावादीची यात्रा. हे सारे इतके त्वेषाने सुरू असते की, ओढ्याच्या मध्यभागी पोलिस,
गावकरी असतात. वाद्यांचा आवाज आणि ओरडण्यामध्ये नेमक्या शिव्या अनेकदा ऐकायला येत नाहीत.
अखेर अर्ध्या-एक तासाने ज्येष्ठ नागरिक आवाहन करतात आणि शिव्यांचा जोर कमी होत जातो.
तासाभरापूर्वी शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या महिला एकमेकीची गळाभेट घेतात. अतिशय वेगळा
असणारा हा उत्सवही ‘बोरी’शी जोडला गेला आहे.
बोराला धार्मिक
सण, उत्सवामध्ये मोठे स्थान आहे. संक्रातीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते. यादिवशी
केल्या जाणाऱ्या भाजीमध्ये बोरे घातली जातात. या भाजीमध्ये त्या काळात शेतात, रानात
असणाऱ्या अनेक पालेभाज्या, फळभाज्या घालून मिश्र भाजी बनवली जाते. संक्राती दिवशी बायका
पूजा घालतात. या पूजेसाठी पाच मडक्यांची (सुगड किंवा बोळकी) पूजा करतात. या पाच मडक्यांना
दोरा बांधतात. हळद, कुंकू लावतात. त्यामध्ये ऊसाचे काप, तीळ-गुळ, गाजर, ज्वारीच्या
किंवा गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभऱ्याचे दाणे आणि बोरे घालतात. त्यावर झाकण ठेवून पणती
ठेवतात. हे सारे स्टीलच्या ताटात ठेवतात. वर एक नवीन कापड झाकतात. आणि त्याची यथासांग
पूजा करतात.
याच काळात
लहान मुलांना ‘बोरन्हाण’ घालण्याची प्रथा आहे. संक्रातीच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या
काही दिवसात हा उत्सव साजरा केला जातो. करी नावाचा राक्षस होता. त्याची लहान मुलांवर
वाईट नजर पडत असे. आपल्या मुलावर त्याची नजर पडू नये, यासाठी सर्वप्रथम श्रीकृष्णाला
‘बोरन्हाण’ घालण्यात आले. त्यानंतर लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा रूढ झाली.
मात्र या काळात शेतात नैसर्गिकरित्या पिकणारी ही मुले मुलांनी या खेळात खावीत, या हेतूने
हा विधी सुरू झाला असावा. ज्या मुलाला बोरन्हाण घालायचे आहे, त्याला हलव्याचे दागिने
आणि मलमलचे कपडे घातले जातात. आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावले जाते. एका भांड्यामध्ये
चुरमूरे, तीळगुळ, साखर फुटाणे, बोरे, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, अशा गोष्टी मिसळतात.
आज ऊसाच्या तुकड्यांऐवजी चॉकलेट, लिमलेटच्या गोळ्या मिसळल्या जातात. मुलाला पाटावर
किंवा चौरंगावर बसवून त्याच्या डोक्यावर हे मिश्रण पाचजणी एक एक ओंजळ सोडतात. पाच वर्षाखालील
मुलांना असे बोरन्हाण घातले जाते. बाळावर असाच सर्वांकडून प्रेमाचा वर्षाव व्हावा,
तो सर्वांचा लाडका व्हावा, अशी कामना व्यक्त केली जाते.
ll ४ ll
मला बोरन्हाण
घातले होते की नाही माहित नाही. मात्र माझे बोराच्या फळांशी कळू लागल्यापासून स्नेहाचे
नाते जोडले गेले. कळायला लागल्यावर आईसोबत, वडिलांसोबत शेतात जावे लागत असे. त्यावेळी
नेमके कधी आठवत नाही पण बोरे खाऊ लागलो. आमच्या शेतात बोराचे झाड नव्हते. पुढे झाडे
लावायला सुरुवात केली, तेव्हा वाढवलेली दोन-तीन बोरांच्या झाडांची फळे आंबट निघाली.
मात्र गावाच्या हद्दीत आम्हाला सर्वात प्रिय असणारी फळे देणारी बोराची दोन झाडे होती.
गावाजवळच्या आमच्या शेताशेजारी झांबऱ्याचे शेत (झांबरे यांच्या मालकीचे) होते. या शेताच्या
पश्चिमेच्या बांधावर पंचवीस-तीस फुट उंचीचे बोराचे झाड होते. या झाडाला आम्ही ‘कापशी
बोर’ म्हणत असू. या झाडाच्या मऊ कापसासारखा गाभा असणाऱ्या फळांमुळे त्याला पूर्वी कोणीतरी
हे नाव दिले. या झाडांची फळे काही वर्षे मुक्तपणे खाता आली. नंतर रानातून बोरे आणून
विकणाऱ्या अण्णांनी या झाडाच्या फळांसाठी मालकाला पैसे द्यायला सुरुवात केली आणि आमचा
आनंद हरवला. ते सकाळी लवकर त्या झाडाखाली येऊन बसत. त्यांचा शेलीपालनाचा व्यवसाय असल्याने,
त्यांच्याकडे उंच काठी होती. त्या काठीला आकडा लावून ते खालूनच सर्व फांद्या हलवत.
पिकलेली बोरे खाली पडत. ती गोळा करून पाटीमध्ये भरत. गावात कोणाला पाहिजे असतील तर
विकत, नाही तर, शेजारच्या गावी जाऊन विकत. ते अशी बोरे काढताना पाहून आमच्या तोंडाला
पाणी सुटे. आमच्यासारख्या पोरांना अण्णा चार-चार बोरे द्यायचे. त्यामुळे बोरांची भूक
आणखी वाढायची. पण विकत घ्यायला खिशात पैसे नसत आणि अण्णा पुन्हा बोरे देत नसत. त्यामुळे
मिळालेली चार बोरे घेऊन जावे लागे. मात्र बोरे जास्त असली की, बोरे गोळा करण्यासाठी
एकदोघांना मदतीला बोलावत. त्या मुलांना मात्र पसाभर बोरे मिळत. गावात जाता-येता या
झाडाकडे लक्ष जायचे आणि बोरांची भूक वाढायची.
दुसरे झाड
गावापासून दोन किलोमीटर अंतरावर बार्शी-लातूर रेल्वेमार्गावरील थोरल्या पुलाजवळ होते.
या झाडाला आम्ही ‘खारकी बोर’ म्हणायचो. नावाप्रमाणेच या झाडांची पिवळसर झालेली बोरे
खारकेसारखी गोड होती. या झाडाखालची बोरे खायला कोणी अडवत नसे. मात्र झाडाला कोणी दगड
मारला की तिकडून धनुबप्पा ओरडत असे. दगडे मारली की कच्ची फळे मोठ्या प्रमाणात पडतात,
असे त्याचे म्हणणे होते. यावर उपाय म्हणून आमच्यातील एकजण झाडावर चढून हळूच फांदी हलवायचा.
पिकलेली बोरे टपटप अंगावर पडायची. अंगावर पडणारी बोरे लागायची; पण त्यात वेदना नसायच्या,
उलट मज्जा वाटायची. खाली पडलेली बोरे गोळा करायला तिघे-चौघेजण असायचो. त्या काळात खिशात
रूमालही नसायचा. मग ही बोरे खिशात कोंबायचो. खिसा सांडू लागला; तरी बोरे गोळा करण्याचा
मोह सुटत नसायचा. बोरे जास्तच निघाली, तर तीन गुंड्यांचा शर्ट घालणारा मित्र त्याच्या
शर्टच्या पुढील बाजूचे खालचे टोक पकडून झोळी करत असे. मग खिसे भरलेले सर्वजण त्यात
बोरे टाकायचो. आणखी कोणी वाटणीदार येऊ नये म्हणून झाडापासून दूर जायचो आणि मग त्या
बोरांच्या वाटण्या व्हायच्या. चौघेजण एकत्र असलो तर पाच वाटे घातले जात. नंतर एका वाट्यातील
निम्मी बोरे झाडावर चढलेल्याच्या वाट्यात मिसळत. उरलेला अर्धा वाटा पुन्हा चौघांच्या
वाट्यात घातली जात. सामोपचार, सहकाराचे शिक्षण नकळतपणे या बोरातून मिळत असे. इतर बोराच्या
झाडांची फळे आम्ही खात असू. पण ते दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे असे. मनापासून
आवडणारी ही दोनच झाडे होती.
बोरांची
आणखी एक आठवण. बोरांसारखीच आंबटगोड! वर्गात बोरे चघळत बसायला मजा यायची. आम्हीही वर्गात
बोरे खायचो. एकदा वर्गशिक्षिका जंगम मॅडमच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी हातावर
दोन पट्ट्या जोरात मारल्या. आम्हाला ‘शाळेत बोरे खायची नाहीत’, अशी सक्त ताकीद दिली.
आमच्याजवळची सर्व बोरेही जप्त केली. त्या वेळी मारापेक्षा बोरे जप्त झाली, याचेच जास्त
वाईट वाटले होते. त्यानंतर आम्ही वर्गात बोरे खाणे सोडून दिले. मात्र वर्गातील मागच्या
बाकड्यावर बसणारी इतर मुले बोरे खात. आम्ही
मार खाल्ल्यापासून ती मुले बोरे खाऊन आठोळ्या आमच्या बाकड्याखाली टाकत. शिपायाने याची
तक्रार मुख्याध्यापक सरांकडे केली. मुख्याध्यापकांनी आम्हाला बोलावून खूप सुनावले.
आम्ही धीर करून सरांना वस्तुस्थिती सांगितली. सरांनी त्या मुलांना बोलावण्याचे फर्मान
सोडले. आमच्यासमोर खरे खोटे झाले असते तर, आम्हाला बाहेर त्या मुलांनी बदडले असते,
हे मॅडमनी ओळखले. मॅडमनी मुख्याध्यापकांना ‘मी पाहते’, असे सांगितले. मॅडमनी प्रकरणाची
जबाबदारी स्वत:वर घेतली. दुसऱ्या दिवशी शिकवताना त्यांनी त्या मुलांना उभा केले आणि
प्रश्न विचारला. ती मुले उत्तर देणार नाहीत, याची मॅडमना खात्री होती. मुले केवळ उठून
उभा राहिली. उत्तर त्यांना येत नव्हते. मग मॅडमनी पुढचा प्रश्न विचारला, ‘अरे उत्तर
येते का नाही, एवढे तरी सांग’. आता त्यांचा नाईलाज झाला. एकाने बोलायला तोंड उघडताच
बोराची आठोळी बाहेर पडली आणि मॅडमची पट्टी त्याच्या पाठीवर बसली. त्यानंतर मात्र त्यांचेही
बोरे खाणे बंद झाले. वर्गात जणू ‘बोर बंदी’ झाली.
शेतात खाल्लेल्या
बोरांच्या आठोळ्या आम्ही साठवून ठेवायचो. आठोळ्यांचे टणक आवरण काढले की आत तीन चार
बिया मिळत. या बिया स्निग्ध असत आणि चवीला खोबऱ्यासारख्या लागत. हा खेळ वडिलांना न
दिसेल, अशा पद्धतीने चालत असे. अशा बिया खाणे वडिलांना आवडत नसे. ‘बोरांच्या फळावरील
गर ते देते. त्याच्या वंशवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या बिया पक्षीसुद्धा खात नाहीत. माणसाने
खाणे म्हणजे त्या झाडाची वंशवृद्धी रोखण्याचे पाप करणे’, असे ते म्हणत. तरीही चोरून
आम्ही कधी-कधी हे करत असू. मात्र आठोळीचा टणक भाग त्यांना दिसणार नाही, असा लपवला जात
असे.
पुढे वि.ग.राऊळ या कृषीतज्ज्ञाने रानातील, बांधावरील बोराची झाडे शेतात आणली. सोलापूर जिल्ह्यात बोरांची शेती १९८०-८१ मध्ये सुरू झाली. काही वर्षातच क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. संकरित बोरांची कलमे विकत आणून लोक लावू लागले. झाडांचा दरवर्षी हंगाम घ्यायचा, फळे काढायची, फळे संपली की फांद्या छाटायच्या, हे सारे सुरू झाले. आजीच्या पाटीत विकायला असणारी पिवळी, लाल बोरे नायलॉनच्या जाळीदार पिशव्यातून फळांच्या गाड्यावर आणि मॉल्समध्ये दिसू लागली. ॲप्पलसारखी बोरे, ही बोरे की हिरवे सफरचंद, असा प्रश्न पडावा इतकी मोठी. संकरित वाणामध्ये मूळ बोरांची ओळख असलेला आंबटपणा नष्ट होत गेला. जुन्या बोरांची चव माहीत असणांऱ्याना ही नवी बोरे काही मजा देत नाहीत. देशी वाणांच्या बोरांची गोष्टच न्यारी!
ll
इति बोर पुराणं ll
-0-
(या लेखातील बोरन्हाण छायाचित्रासाठी डॉ. विनोद कांबळे यांचे मनपूर्वक आभार तसेच कथांची चित्रे आंतरजालावरून साभार घेतली आहेत)
-o-
बाप रे! किती विस्ताराने लिहिलेय. ब्लॅाग लेखनाचा उत्कृष्ट नमुना झालाय हा लेख. विस्तृत चार भागात. किती माहिती? मला सगळीच नवी. आमच्याकडे बोरीबाभळी नाहीत. त्यामुळे आमच्या जीवनात बोरीला स्थानच मिळाले नाही. विद्यापीठांत शिकायला आल्यावरच बोरीची झुडपं पाहिली. कधी एखाददुसरे तोंडात टाकले असेल. पण या फळावर जीव जडला नाही. पण लेखावर जडला. आता बोरीकडे बघण्याची नवी नजर तयार झाली. धन्यवाद सर!!!
उत्तर द्याहटवासर बोराच्या झाडाची माहिती इतकी विस्तृत आपण लिहिली आहे बोराच्या झाडावर इतके आघात ज्ञान कोणाला असेल असं मला वाटत नाही संपूर्ण जवळपास निम्म्या जगात बोराची झाडे असतात हे मला आज प्रथमच कळले
उत्तर द्याहटवामला आमच्या मामाच्या गावातील बोरांची झाडे आठवले लहानपणी गडिंग्लज तालुक्यातील सामानगड हे आमच्या मामाचे गाव गडाच्या सभोवतालची सर्वजणी आमच्या मामाची त्यामुळे प्रचंड बोराची चिंचेची करवंदी खूप हसायचे कुठले झाड लावलेलं असायचं परंतु भरपूर करवंद बोर आणि चिंच आणि गोळा करायचं खूप खायचं आणि येताना पिशवी भरून कोल्हापूरला घेऊन यायचं आणि इतर मित्रांनाही वाटतं असे तर ती आठवण पुन्हा एकदा जागी झाली आणि पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या एक क्षण डोळ्यातून पाणी देखील आहे तर ते दिवस पुन्हा येणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे
सर नव्या पिढीने करायचं काय सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडता येत नाही ऊठसूट अभ्यास करिअर नोकरी नोकरी नंतर छोकरी त्याच्या पलीकडे मुलांचे जीवनच उरलेलं नाही हा क्लास तो क्लास सुट्टीच्या दिवसात देखील उन्हाळी क्लासेस यामुळे मुलं जीवनच हरवून गेलेत त्याने पाहायला मिळणार नाही असं मला वाटतं आम्ही लहानपणी अनुभवलंय उपभोगलं त्याची पैशातून होऊ शकत नाही हे बाकी नक्की सर
सर तुमच्या या लेखामुळे पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोर माझ्या मामाचे गाव तर होऊन गेले तसं पाहिलं तर मी दोन-तीन महिन्यातून एकदा आजी मामाच्या गावाला जातो परंतु पूर्वी दोन दोन तीन तीन महिने राहत होतो आता एखादा दुसरा सुद्धा दिवस राहायला मिळत नाही आणि कोरोनामुळे तर गेले वर्षभर सर बाहेर पळाला मिळाली नाही
परंतु सर तुम्ही एकदा या लेखामुळे मला एका ग्रामीण भागाचे शहर कळवली प्रत्येक शब्दांमध्ये तुमच्या ताकत आहे अगदी बोराचे झाड बोराचे झुडूप तुम्ही प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर उभा केले धन्यवाद सर आपला प्रत्येक लेख समाजाला प्रेरणा देत राहील हे बाकी नक्की
You are great sir thanks a lot good day and good night
आजच्या काळात बोराला अल्कली असल्याने महत्व आहेच.
उत्तर द्याहटवाImmunation साठी हे खूप महत्त्वाचे आहे, पेरू, बोरे त्याची पाने यांची खरी गरज आहे.
तुम्ही लेख चां माहिती व वर्णन यांनी परिपुर्ण लिहिला आहे
अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे साहेब...मला वाटत नाही जिथे जिथे बोरंचा संबंध आला आहे, त्याचा उल्लेख लेखात राहिला आहे.
उत्तर द्याहटवाअगदी बोरिचा उगम,विविध नावे,उत्पत्ती,प्रकार,तसेच बोर न्हान, सनवार, त्याच्या अख्यायिका,म्हणी,गावांची नावे,कथा,पुराण,वेद,श्लोक,ईतर भाषा, म्हणींचे अर्थ, तर त्या कशा अस्तित्वात आल्या,रामायणातील उल्लेख सर्वच अप्रतिमपणे शब्दात गुंफले आहे... लहानपनिच्या आठवणी जागृत केल्या.....
अतिशय माहिती युक्त लेख आहे साहेब...
मनापासून आवडला
एखाद्या सामान्य माणसातला सर्वसाधारण वृक्षाची माहीती देखील किती अपुरी असते हे हा लेख वाचून जाणवते. बोराचे झाड प्रत्येकालाच माहीत असलेली परंतु ही संपूर्ण माहिती वाचल्यावर बोरा विषयाचे खरे ज्ञान मिळवतील. खूप चांगले लेखन कौशल्य आहे.
उत्तर द्याहटवाप्रा डॉ बी एल चव्हाण, औरंगाबाद.
सर,मी तुमचा हक्काचा वाचक आहे. सर्व लेख वाचतो.सर हा लेख ५८०० शब्दांचा आहे. असे आपण सांगितले.लेख वाचताना खूप माहिती आम्हाला यातून मिळाली.अत्यंत संवेदनशील निसर्ग मनाने हा बोरीचा सांगितलेला महत्त्वाचा दस्तऐवज जाम आवडला.
उत्तर द्याहटवाबोरा विषयीं संपूर्ण माहिती मिळाली सर । खूप छान लेख
उत्तर द्याहटवासंशोधक व साहित्यिक असा मिलाफ आपल्या व्यकतीमत्त्वात झाल्याने इतकी शास्त्रीय, रोचक व अचूक माहिती मिळाली. सहज सुंदर लेख. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाWhat's app vrtee पूर्ण लेख शेअर केला तर बरे. आणखी प्रसार करता येईल.
खूप छान माहिती आहे सर
उत्तर द्याहटवाखूप मुद्देसूद माहिती देणारा लेख
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिखाण. संशोधक व साहित्यिक दोन्ही भूमिका अत्यंत सफाईदारपणे उठवितात . असेच लिहिते व्हा
खूपच सुंदर महिती आहे.
उत्तर द्याहटवासुंदर माहीती आहे.
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लेख आहे सर .
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती. चित्रमय लेखन, नेहमीप्रमाणे.
उत्तर द्याहटवासोलापूर आणि बोर.....खास नात....
उत्तर द्याहटवामाहितीपूर्ण लेख....👍
नेहमीप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिला आहे सर ,बोराबद्दल इतकी माहिती माझ्या तरी वाचनात आली नव्हती
उत्तर द्याहटवासर, किती सखोल आणि विस्तृत माहिती दिली आहे तुम्ही. तसं पाहिलं तर बोर हे दुर्लक्षित फळ, आपण क्वचितच विकत आणतो, लहानपणी मात्र भरपूर बोरं खाल्ल्याच लक्षात आहे, तुमच्या या लेखामुळे लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.
उत्तर द्याहटवाखूप छान वाटले
धन्यवाद,
लिहीत रहा
नमस्कार सर, नेहमी प्रमाणे सुंदर माहिती.
हटवासर, हा केवळ लेख नाही, हा परिपूर्ण बोरपिडिया आहे.. अभिनंदन..
उत्तर द्याहटवाखूपच छान, बोरा विषयी विस्तृत माहिती देणारा परिपूर्ण लेख. मराठीत या पेक्षा चांगला बोरपिडिया नसावा. शब्द रचना, मांडणी व फोटो अतिशय समर्पक. अभिनंदन साहेब.
उत्तर द्याहटवासाहेब बोराविषयी एवढी माहिती आम्ही कधीच ऐकली नव्हती..
उत्तर द्याहटवाKhup chan sir
उत्तर द्याहटवाखूप छान सविस्तर माहिती आहे सर..👍👌
उत्तर द्याहटवापरिपूर्ण माहिती!या झाडाच्या सर्व पैलूवर प्रकाश टाकला आहे. एका ठिकाणी अशी सर्व माहिती मिळणे दुर्मिळच!
उत्तर द्याहटवापरिपूर्ण बोरायन आणि खूप छान लेख.
उत्तर द्याहटवाअत्यंत सुंदर लेख. गावाकडील आठवणी ताज्या झाल्या...
उत्तर द्याहटवाKhup sunder sir
उत्तर द्याहटवासर ,बोराच्या झाडाविषयी उपयुक्त अशी माहिती मिळाली त्याचे मानवी जीवनातील उपयुक्तता याची छान मांडणी केलेली आहे धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाबोरपुराण अथपासून इतिपर्यंत सफल संपूर्ण झाले आहे. प्रत्येकाच्या भावजीवनात असलेले तरीही दुर्लक्षित असे बोराचे झाड या लेखातून सर्वांग परिपूर्ण प्रगट झाले आहे. विविध प्रकारची पाखरं, त्यांची घरटी आणि मुलांचे भावविश्व यासाठी तरी बोरी जगवल्या पाहिजेत. मायणीत आमच्या शाळेच्या दारात एक म्हातारी बोर विकायची. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंजा उत्पन्नातून स्वतःचा गुजारा करायची. अजूनही खटाव-माण मध्ये फिरताना बोरीने लगडलेले झाड दिसले की मी गाडी थांबवतो आणि काही पिकू लागलेली बोरे खाऊन हरखून जातो. बोरांचा गोडवा तुमच्या लेखातही तितकाच रसदारपणे उतरला आहे सर! मनःपूर्वक अभिनंदन!
उत्तर द्याहटवाबोर या झाडाबद्दल इतकी माहिती विस्तृत माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
उत्तर द्याहटवाजत विजापूर मार्गावर माडग्याळ ची बोरे मे एकदा खाल्ली होती.एकदम गोड रुचकर अशी चव होती. एकूण जत भागात आजही व्यापारी तत्वावर बोराची शेती केली जाते.
सर बोर याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकलात.
उत्तर द्याहटवास्मरणात राहील असे बोरलेखन केलं आहे. आम्ही भाग्यवान आहोत अशी सुंदर वृक्ष संपदा आपल्या वेस्टर्न घाट मधे पहायला, खायला मिळते. खुप सुंदर रित्या वर्णन केलं आहे हे अभ्यास पूर्ण लिखाण जरूर करत रहा. पुन्हा एका अनोख्या निसर्ग फळाची सफर घडवून आणण्यासाठी.
खुप शुभेच्छा!
स्मिता गिरी
उत्तम बोरं बिया कूठे मिळतील?
उत्तर द्याहटवा