मंगळवार, २४ जुलै, २०१८

प्रगतीपीठ : शिवाजी विद्यापीठ



 
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हा सर्व भाग तसा ग्रामीण. विद्यार्थ्यांना सर्व कामासाठी पुण्याला जावे लागे. या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आणि ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी १९६२ मध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. सुरूवातीला कांहीनी या घटनेला "कोल्हापूर येथे आणखी एक खानावळ सुरू झाली", असे हिणवले. तर अनेक नोकरीसंदर्भातील जाहिरातीत 'शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत' अशी टिप असायची. आज हेचं विद्यापीठ अध्यापन, संशोधन आणि समाजप्रबोधन या तीनही प्रांतात स्वत:ची एक नवी ओळख निर्माण करत आहे.  'नवे गाव आंदोलनया मासिकाने जून २०१८चा अंक शिक्षण या विषयावर काढला. त्यातील शिवाजी विद्यापीठासंदर्भातील लेख 'नवे गाव आंदोलन' मासिकाच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 

 

 कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हे सर्व जिल्हे पुर्वी पुणे विद्यापीठाशी सलंग्न होते. हा सर्व भाग तसा ग्रामीण. या भागातील विद्यार्थ्यांना सर्व कामासाठी पुण्याला जावे लागत असे. या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आणि ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न राजाराम महाराजानी पाहिले होते. ही इच्छा राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्य केलेले बाळकृष्ण बोलून दाखवत असत. पुढे त्यांचे विद्यार्थी राहिलेले तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई आणि इतर मंडळींच्या प्रयत्नातून कोल्हापूर येथे १९६२ मध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. कोकणातील रत्नागीरीसह पाच जिल्ह्यासाठी विद्यापीठ सुरू झाले. सुरूवातीला कांहीनी या घटनेला कोल्हापूर येथे आणखी एक खानावळ सुरू झाली असे हिणवले. तसेचं अनेक नोकरीसंदर्भातील जाहिरातीत 'शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत' अशी टिप असायची. आज हेचं विद्यापीठ अध्यापन, संशोधन आणि समाजप्रबोधन या तीनही प्रांतात स्वत:ची एक नवी ओळख निर्माण करत आहे. त्यावेळी सागर माळ म्हणून प्रसिद्ध असलेली जागा विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आली. हा भाग तसा गावापासून, मानवी वस्तीपासून दूर होता. हळू हळू या परिसरात विद्यापीठासाठी प्रशासकिय आणि अधिविभागाच्या इमारतींचे बांधकाम सुरू झाले आणि सागर माळाचे विद्यानगरीत रूपांतर होवू लागले. सुरूवातीला विद्यापीठाला पाच जिल्हे जोडले गेले असले तरी नंतर रत्नागीरी जिल्हा हा पुन्हा मुंबई विद्यापीठाला जोडला गेला. पुढे २००४ मध्ये स्वतंत्र सोलापूर जिल्ह्यासाठी विद्यापीठ स्थापन झाले आणि आज कोल्हापूर, सातारा आणि सांगली असे तीन जिल्ह्यांचे मर्यादित कार्यक्षेत्र राहिले आहे.
      दोन जिल्हे कमी झाले तरी विद्यापीठाची विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सातत्याने वाढत आहे. पहिल्या पदवी प्रदान कार्यक्रमात १९६४ मध्ये १०९४ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केवळ दहा वर्षात पदव्यांची संख्या दहा पटीने वाढली. विद्यापीठाने १९७४मधील पदवी प्रदान कार्यक्रमात १००५१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या.  १९८४ मध्ये ही संख्या १२६२८ इतकी झाली. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उच्चतम पातळीवर पोहोचत आहे, असे वाटत असतानाचं साक्षरता जागृती आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रपातळीवर मोठे प्रयत्न सुरू होते. तसेचं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यानी खाजगी महाविद्यालयाना परवानगी देण्यास सुरूवात केली. या नव्या धोरणाचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रात खाजगी महाविद्यालयांचे जाळे उभे राहू लागले. यामध्ये व्यावसायीक अभ्ययासक्रमांची संख्या मोठी होती. सहकारक्षेत्रातील मंडळीनी आणि सजग नेतृत्त्व असणाऱ्या अनेक संस्थानी अशी महाविद्यालये सुरू केली आणि त्याचा परिणाम म्हणून अभियांत्रीकी, वाणिज्य, वैद्यक, आयुर्वेद आणि शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली. अर्थात विद्यापीठाने १९९४ मधे २४९३५ विद्यार्थ्याना पदव्या प्रदान केल्या. वैद्यक, आयर्वेद महाविद्यालयेही शिवाजी विद्यापीठापासून वेगळी झाली. तरीही विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या कायम राखण्यात विद्यापीठ यशस्वी झाले. याचाचं अर्थ विद्यापीठ शिक्षणाचा पचार आणि प्रसार करण्यामध्ये यशस्वी झाले. ही संख्या २००४ मध्ये ४०००० पेक्षा जास्त झाली. पुढे सोलापूर जिल्हा वगळला जात असताना विद्यार्थी संख्येवर परिणाम अपरिहार्य होता. तो टाळण्यासाठी विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. यामध्ये सर्वप्रथम विद्यापीठाच्या 'बहिस्थ विभागा'चे 'दूर शिक्षण विभागा'मध्ये रूपांतर करण्यात आले. आकाशवाणी आणि चलचित्र वाहिन्यावर जाहिरात देण्यात आल्या. याचा मोठा फायदा विद्यार्थी संख्या वाढवण्यामध्ये झाला. २०१७ मध्ये विद्यापीठाने ५०४४४ इतक्या विद्यार्थ्याना पदव्या प्रदान केल्या.
      या सर्व वाटचालीमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिल्या पदवी प्रदान कार्यक्रमात १९६४ साली पदवी स्वीकारणाऱ्या महिलांची संख्या ही १९९ इतकी होती. ती १९७४ मध्ये १६२३ तर १९८४ मध्ये ३२६८ झाली. वीस वर्षात पहिल्या पदवी प्रदान कार्यक्रमापासून ही संख्या सोळा पटीने वाढली. मुलींची संख्यावाढ ही सातत्यपुर्ण राहीली आणि १९९४ मध्ये एकूण स्नातकामध्ये मुलींची संख्या ही ७८१७ इतकी झाली.  ज्या मुलींचे विवाहानंतर शिक्षण थांबते, त्या मुलीना या सुविधेची माहिती मिळावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांचे सहाय्य घेण्यात आले. २०१८ च्या पदवी प्रदान कार्यक्रमात पदवी स्वीकारणाऱ्या मुलींची संख्या २६९३८ इतकी होती. सुरूवातीला या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण हे १८ टक्के इतेक होते. आज हे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून ते पन्नास टक्केपेक्षा जास्त करण्यामध्ये विद्यापीठ यशस्वी झाले आहे.
      अध्यापनाच्या क्षेत्रात विद्यापीठाने सुरूवात ही सहा अधिविभागापासून केली होती. आज विद्यापीठात एकोणचाळीस अधिविभाग आहेत. सुरूवातीला पारंपरिक अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर या भागातील शिक्षणाची गरज ओळखून विद्यापीठाने व्यावसायीक अभ्यासक्रमही सुरू केले. शिक्षणशास्त्र, विधी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या यशस्वी प्रयोगानंतर विद्यापीठाने तंत्रज्ञान अधिविभाग सुरू केला आहे. यामध्येही पारंपरिक सिव्हीलसारखी शाखा सुरू करत असताना विद्यापीठाने अन्न तंत्रज्ञान सारखी नवी शाखा सुरू केली. आज या अभ्यासक्रमाला मोठी मागणी आहे. जुन्या पारंपरिक अभ्याक्रमाला नविनतम अभ्यासक्रमाची जोड देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करत आहे. विद्यापीठात सध्या तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे अध्यापन होत असतानाचं यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विद्यापीठ ग्रामीण विकासासाठी विद्यार्थी घडवत आहे. सुरूवातीला विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दोन आकडी होती. ती आता सात हजारपेक्षा जास्त झाली असून ती पुढील दहा वर्षात १०००० इतकी करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
      विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील. अनेकांची परिस्थिती गरीबीची. त्याना कोल्हापूरमध्येही राहणे अवघङ. काम करायची तयारी असली, तरी तशी संधी नव्हती. ती शिवाजी विद्यापीठाने 'अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन'च्या माध्यमातून 'कमवा आणि शिका' योजना सुरू करून उपलब्ध करून दिली. पन्नास मुलाना आणि २५ मुलीना या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो. नाममात्र प्रवेश फी भरल्यानंतर विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, परीक्षा फी असे कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. तसेचं विद्यार्थ्यांची राहण्याची आणि भोजनाची मोफत सोय केली जाते. यासाठी विद्यार्थ्यास उद्यान, ग्रंथालय, प्रशासकिय विभाग, फोटीकॉपी युनिट इत्यादी ठिकाणी नेमून दिलेल्या विभागात दररोज तीन तास काम करावे लागते.
      संशोधन हे कोणत्याही विद्यापीठात चालणारे एक महत्त्वाचे कार्य आहे. विद्यापीठाने अगदी सुरूवातीपासून विद्यापीठात नामवंत शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुरूवात केली. परिणामत: विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठात संशोधन कार्य सुरू झाले. अगदी सुरूवातीच्या काळामध्ये पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विज्ञानशाखेतील विषयामध्ये संशोधन कार्यासाठी प्रयोगशाळा सुरू झाल्या. त्या त्या विभागातील शिक्षकानी आपले संशोधन निबंध जागतीक दर्जाच्या संशोधन पत्रीकामधून प्रकाशीत करायला सुरूवात केली आणि आपोआप जागतीक पातळीवर विद्यापीठाचे स्वत:चे असे स्थान निर्माण होवू लागले.  विद्यापीठातील शिक्षकांच्यामध्ये असणारे अनंत नारळीकर हे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, नवी दिल्ली येथे शास्त्रज्ञ म्हणून गेले. तथापी त्यानी विद्यापीठात त्या काळामध्ये मटेरिअल सायन्सवर संशोधन करणाऱ्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची फळी तयार केली. त्याचप्रमाणे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र विषयातील संशोधनाने एक आपले स्थान निर्माण केले. त्याचाच परिणाम म्हणून आज मटेरिअल सायन्समध्ये चालणारे शिवाजी विद्यापीठातील संशोधन हे देशात अव्वल क्रमांकाचे मानले जाते.
      शिवाजी विद्यापीठाने पश्चिम घाटातील जैववैविधतेवर मोठे संशोधन केले आहे. याचा परिणाम म्हणून विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागास या भागात दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्पाच्या निधीतून विद्यापीठामध्ये 'लीड बॉटेनिकल गार्डन'ची निर्मिती करण्यात आली आहे. पुढे काळाची पावले ओळखत सुरू झालेल्या जैवतंत्रज्ञान आणि ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमही आपल्या उत्तम दर्जाच्या संशोधनासाठी ओळखले जातात. यातील जैवतंत्रज्ञान विभागाने संशोधनाच्या प्रांतात भारतात नववे स्थान पटकावले आहे. तसेच या विभागात चालणारा पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान या अभ्यासक्रमास डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, स्फटीकशास्त्र, सेंद्रिय रसायनशास्त्र, संख्याशास्त्र या विषयासह विज्ञानाच्या विविध विषयात विद्यापीठात संशोधन सुरू आहे. नव्याने सुक्ष्मजीवशास्त्र विभागही आपली संशोधनामध्ये आपली ओळख निर्माण करू लागला आहे. गणितामध्येही अनेक शिक्षकांचे शोधनिबंध उत्तम दर्जाच्या संशोधन पत्रिकामधून प्रसिद्ध होत आहेत. अवकाश शास्त्र अभ्यासक्रम हा भौतिकशास्त्र विभागात सुरू झालेला एक चांगला अभ्यासक्रम आहे. विद्यापीठाने या विषयातील संशोधनासाठी पन्हाळा येथे एक प्रयोगशाळा उभारली असून त्या ठिकाणी विविध रिसीव्हर्स बसवण्यात आले आहेत.  या ठिकाणी मिळणारी माहिती विविध प्रयोगशाळामध्ये पाठवली जाते.
      विद्यापीठ स्थापन झाले त्यावेळी विद्यापीठाकडे कोणतीही प्रयोगशाळा नव्हती. त्या काळात पदार्थांची निर्मिती विद्यापीठात केली जायची. त्याचे गुणधर्म तपासण्यासाठी विद्यार्थ्याना आणि मार्गदर्शकाना अन्य संस्था किंवा प्रयोगशाळामध्ये जावे लागत असे. नंतर अगदी मागील शतकाच्या शेवटी क्ष-किरण विकीरण उपकरणासारखी उपकरणे विद्यापीठामध्ये येवू लागली. आज मात्र वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठाने विविध संस्थाशी केलेल्या सामंजस्य करारामुळे विविध मापन सुविधा विद्यापीठात उपलब्ध झाल्या. विज्ञानातील संशोधनाप्रमाणेचं मानव्यशास्त्र आणि कला शाखेमध्येही संशोधन सुरू आहे आणि विद्यापीठातील अनेक शिक्षकानी आपली गुणवत्ता आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध केली आहे. विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना विविध संशोधनवृत्ती मिळतात. तरीही विद्यापीठाने ज्याला कोणतीही संशोधनवृत्ती मिळत नाही, अशा प्रत्येक अधिविभागातील एका विद्यार्थ्यास स्वनिधीमधून अध्ययनवृत्ती सुरू केली आहे.
                विद्यापीठातील नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमही आता सुरू झाला आहे. या विद्यार्थ्याना अभ्यासक्रम पुर्ण करत असतानाचं संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यादृष्टीने त्याना प्रशिक्षण देण्यात येते. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. पोष्ट डॉक्टरल रिसर्चसाठी भरीव विद्यावेतनावर परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी २०१८च्या 'करंट सायन्स'च्या अंकामध्ये भारतातील संशोधनाची सद्यस्थिती सविस्तरपणे प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये भारतातील संशोधन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या संस्थांची विविध पैलूना अनुलक्षून माहिती देण्यात आली आहे. या अंकातील 'रिसर्च आउटपूट ऑफ इंडियन इंस्टिट्युशन्स ड्युरिंग २०११-१६:क्वालीटी अँड क्वांटीटी परस्पेक्टीव्ह' लेखात 'साय-व्हॅल' निर्देशांकाच्या आधारे माहिती देण्यात आली आहे.
      सन २०११ ते १६ या पाच वर्षात शिवाजी विद्यापीठाने १९२८ प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत आणि देशातील अकृषी विद्यापीठातील संशोधनामध्ये ते आठव्या स्थानी आहे. त्याशिवाय या संशोधन संस्थाच्या 'फिल्ड वेट सायटेशन निर्देशांका'वर आधारीत विषयनिहाय क्रमवारीमध्ये मटेरिअल सायन्स, भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रीकी या विषयामध्ये देश पातळीवर सर्वसाधारण यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वर असणाऱ्या संस्था या खुप जुन्या आणि शासनाचे निव्वळ संशोधनासाठी भरीव अनुदान प्राप्त करणाऱ्या आहेत. विद्यापीठातील शिक्षकानी संशोधनामध्ये केलल्या या भरीव आणि महत्त्वपुर्ण कार्यामूळे आज शिवाजी विद्यापीठास 'रूसा' आणि केंद्र शासनाच्या विविध योजनातून भरीव अर्थसहाय्य उपलब्ध होत आहे. निश्चितच नजीकच्या काळात संशोधनात शिवाजी विद्यापीठ आपला क्रमांक आणखी सुधारू शकेल, यात शंका नाही.
      शिवाजी विद्यापीठ स्थापनेपासून समाज प्रबोधनाच्या कार्यात अग्रभागी आहे. विद्यापीठ स्थापनेच्या पहिल्या दशकातचं विद्यापीठाने 'एक महाविद्यालय, एक खेडे' ही अभिनव योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून खेड्यातील लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी बहिश:ल शिक्षण मंडळ कार्यरत राहिले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यामार्फत जनजागृतीसाठी विविध प्रसंगानिमित्त प्रभात फेऱ्या अनेक वर्ष काढण्यात येत. आजही दुर्गसंवर्धन भावना विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी या हेतून 'रायगड परिक्रमा'सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाने आपल्या विविध व्याख्यानमाला या ग्रामीण भागातील महाविद्यालयात आयोजीत करण्यास सुरूवात केली. विद्यापीठामध्ये प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाने प्रौढ शिक्षणासाठी भरीव योगदान दिले. आपल्या पदवीधराना स्वत:च्या पायावर उभा राहता यावे, यासाठी विविध अभ्यासक्रमांची निर्मिती केली. ग्रामीण भागातील ग्रंथालय व्यवस्थापन, सूत्रसंचलन, रेडिओ जॉकी, दागीने बनवणे, सुगम संगीत, दूधाचे सुक्ष्मजीवशास्त्र, संगणकसंबधी अभ्यासक्रम, पर्यटक मार्गदर्शक अशा प्रकारचे विविध ८५ पारंपरिक आणि अद्ययावत कौशल्यांचे ज्ञान देणारे अभ्यासक्रम राबवण्यात येवू लागले आणि विद्यापीठ परिसरातील जनसामान्याना रोजगाराची संधी उपलब्ध होवू लागली.
      त्याचप्रमाणे विद्यापीठाने लोक विकास केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रामार्फतही अल्प मुदतीचे ३३ विविध अभ्यासक्रम राबवले जातात. उद्यान निर्मिती, प्रयोगशाळा व्यवस्थापन, रोपवाटीका व्यवस्थापन, अशा अभ्यासक्रमामधून लोकाना आपले कौशल्य वर्धन करण्याची आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या अभ्यासक्रमाना सातवी उत्तीर्ण पासून कोणीही त्या त्या अभ्यासक्रमाच्या अर्हतानुसार प्रवेश घेवू शकतो. यासाठी प्रवेश घेणारा हा पदवीधर असण्याची अट नाही. तसेचं तो विद्यर्थी असण्याची आवश्यकता नाही. या अभ्यासक्रमांचा कालावधी हा ही तीन महिने ते वर्ष असा आहे. हे अभ्यासक्रम अर्धवेळ असल्याने आपला उपजिवीकेचा व्यवसाय सांभाळून हे शिक्षण घेता येते.
      विद्यापीठाचे उद्यान आणि वृक्षराजीच्या माध्यमातून विद्यापीठाने कोल्हापूर परिसरात स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठ परिसरात १३००० पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यावर्षी सामाजिक वनीकरण विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाद्वारा १३००० पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याची तयारी करण्यात आली आहे. विद्यापीठ आपल्या परिसरातील बागा आणि वृक्षाना जास्तीत जास्त पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरते. यासाठी परिसरात दोन प्रकल्प उभारले असून आणखी दोन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठाने मागील काही वर्षात जलयुक्त विद्यापीठ ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली आहे. सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठाने आपल्या वापरासाठी विद्यापीठ परिसरात साठवण्यात आलेले पाणी वापरले आणि एक नवा आदर्श घालून दिला आहे. २०१५ प्रमाणे अवर्षणाची परिस्थिती उद्भवली तरी विद्यापीठ पाण्याबाबत स्वंयपुर्ण राहील यादृष्टीने विद्यापीठाने आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विद्यापीठाने जलसाक्षरता आणि पाण्यासंदर्भात केलेल्या या वस्तुनिष्ठ प्रयत्नांची दखल विविध वृत्तपत्रे आणि मासिकानी घेतली आहे. याचंबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छता, जलसंधारण, आरोग्य, प्रौढ शिक्षण अशा विविध बाबीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत आहे.
      क्रीडा विश्वातही विद्यापीठाने अनेक उत्तम खेळाडू दिले आहेत. शैलजा साळुंखे (टेबल टेनीस), वंदना शानबाग (ॲथलेटीक्स), राही सरनोबत (नेमबाजी), तेजस्वीनी सावंत (नेमबाजी), राधीका बराले (नेमबाजी), रेश्मा माने (कुस्ती), जयश्री बोरगे (ॲथलेटीक्स),  दीपक कुंभार (ॲथलेटीक्स), अमीत निंबाळकर पॉवर लिफ्टींग), वीरधवल खाडे (जलतरण), संभाजी वरूटे (कुस्ती) इत्यादी खेळाडू घडवण्यात विद्यापीठ यशस्वी झाले. या खेळाडूनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. आज विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटीक ट्रॅक तयार केला आहे. याचा लाभ विद्यार्थी आणि या भागातील खेळाडूना होत आहे.या भागात क्रीडा संस्कृती रूजवण्यात विद्यापीठ यशस्वी झाले आहे.
                विद्यापीठाने २०१२ मध्ये आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. विद्यापीठ स्थापन झाले त्यावेळी सागर माळ म्हणून प्रसिद्ध असलेला भाग आज विद्यानगर बनला आहे. ज्या अपेक्षेने या विद्यापीठाची स्थापना झाली त्या पुर्ण करत आहे. अध्यापन, संशोधन आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून या परिसराच्या प्रगतीसाठी, लोकांचे जीनमान उंचावण्यासाठी आपले योगदान देत आहे आणि  मन आणि बळकअ असणाऱ्या भागात मेंदू बळकट करणारे या भागातील एक केंद्र बनले आहे.

चौकट क्र. १ विद्यापीठाच्या प्रगतीसाठी लाभलेली नेतृत्त्व
अ.क्र.
कुलगुरूंचे नाव
कालावधी
१.
डॉ. अप्पासाहेब पवार
२०-०९-१९६२ ते २०-०१-१९७५
२.
बॅरिष्टर पी. जी. पाटील
२१-०१-१९७५ ते १६-०४-१९७८
प्राचार्य बी. एस. भणगे
१७-०४-१९७८ ते २८-०३-१९८०
प्राचार्य आर. के. कणबरकर
२२-०९-१९८० ते २१-०९-१९८३
प्राचार्य के. भोगीशयना
२२-०९-१९८३ ते २१-०९-१९८६
प्राध्यापक के.बी पोवार
२२-०९-१९८६ ते २१-०९-१९९२
७.
प्राध्यापक ए.टी. वरूटे
२२-०९-१९९२ ते १५-०६-१९९५
प्राध्यापक डी. एन. धनागरे
१-११-१९९५ ते ३१-१०-२०००
प्राध्यापक एम.जी. ताकवले
०१-११-२००० ते ११-०३-२००४
१०
प्राध्यापक एम.एम. साळुंखे
११-०६-२००४ ते ०२-०३-२००९
११
प्राध्यापक एन.जे. पवार
२७-०२-२०१० ते २६-०२-२०१५
१२
प्राध्यापक देवानंद शिंदे
१८-०६-२०१५ पासून आजतागायत

१६ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर व उपयुक्त लेख. उत्तम..

    उत्तर द्याहटवा
  2. खूप अभ्यासू लेख.. विद्यापीठाची एवढी माहिती केवळ तुमच्याकडेच मिळू शकेल

    उत्तर द्याहटवा
  3. आपण या विद्यापीठाचे पदवीधर आहोत याचा सार्थ अभिमान आहे, येथील शिक्षणानेच मला आजची माझी ओळख मिळाली

    उत्तर द्याहटवा
  4. Enter your comment...सर छान लेख ...काही अनभिज्ञ गोष्टी समजल्या!!

    उत्तर द्याहटवा
  5. सर, अप्रतिम माहितीपूर्ण लेख. जुन्या आठवणी ताज्या झाल्या...

    उत्तर द्याहटवा
  6. Very important information of our university and I suggest I.e display this in university campus

    उत्तर द्याहटवा
  7. ओघवती लेखनशैली, सखोल माहिती देणारा लेख. उत्तम..

    उत्तर द्याहटवा
  8. Truly inspiring and motivating success story of our university i.e Shivaji University.

    उत्तर द्याहटवा
  9. I am really happy to say it’s an interesting article to read on the occasion of 57th foundation day of SUK. Sir, the way of your writing is always realistic, insightful and motivate us for becoming good researchers of Shivaji University, Kolhapur.

    उत्तर द्याहटवा
  10. डाॅ व्ही एन शिंदे सरांचे आभार
    सर आज आपण दिलेल्या माहितीच्या आधारावर मला पुन्हा विद्यापीठाचा सार्थ अभिमान वाटतो

    उत्तर द्याहटवा