बुधवार, ९ डिसेंबर, २०२०

… कसा पिसारा फुलला!

लहान असो किंवा थोर, स्त्री असो किंवा पुरुष; मोरपीस कुठे पडलेले दिसले तर ते उचलून न घेणारा माणूस विरळाच. त्याचा नेमका रंग ओळखता येत नाही, अशा रंगांनी रंगलेले मोरपीस. वेगळ्या कोनातून, दिशेतून पाहिले तर रंग बदलणारे मोरपीस. मोरपंखांचे मूळ रंग काहीही असोत, त्याचे सौंदर्य मनमोहक, नजर खिळवून ठेवणारे आहे. मोरपंखांचा मूळ रंग तांबूस असतो. मात्र ते निळा, हिरवा, शेवाळी असे अनेक रंग दाखवते. खरं तर मोरपिस हे निसर्गाच्या रंग विभ्रमाचे विलोभनिय उदाहरण. या मोरपंखाच्या सौंदर्यामागील विज्ञान, मोर आणि लांडोरीविषयी….
__________________________________________________________________

लहान असो किंवा थोर, स्त्री असो किंवा पुरुष; मोरपीस कुठे पडलेले दिसले तर ते उचलून न घेणारा माणूस विरळाच. मोरपीस किंवा मोरपंख आबालवृद्धांना आवडते. नेमका रंग ओळखता येत नाही, अशा रंगांनी रंगलेले मोरपीस. वेगळ्या कोनातून, दिशेतून पाहिले तर रंग बदलणारे मोरपीस. रंग बदलणारी माणसे कोणालाच आवडत नाहीत; मात्र, रंग बदलणारे मोरपीस सर्वांच्या मनात बसलेले असते. मोरपंखाचे रंग आणि रूप आहेच मुळी मनाला भुरळ घालणारे!

मोर. भारत आणि म्यानमार या दोन देशांचा राष्ट्रीय पक्षी. हंस, सारस, ब्राम्हणी बदक या पक्ष्यांना तगडी लढत देऊन २६ जानेवारी १९६३ रोजी मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला. भारतीय दंतकथेनुसार किंवा पुराणातील वर्णनांमध्ये मोर गरूडाच्या पिसांपासून बनला, असे मानले जाते. सुरुवातीला मोराचे पंख इतके आकर्षक नव्हते, असे म्हणतात. एकदा इंद्र आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध सुरू होते. रावणाच्या रागापुढे इंद्र देवाला जिंकणे कठीण दिसत होते. अशा वेळी मोराने आपला पिसारा फुलवला आणि इंद्राला रावणाच्या नजरेपासून लपवले. इंद्राची रावणाच्या रागापासून सुटका केली. याचे बक्षीस म्हणून इंद्राने मोराचे पंख सुंदर बनवले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर इंद्राने आपल्या आसनावरही मयूर पंख बसवले. त्याचे सरस्वतीशीही नाते आहे. सरस्वतीला विद्येची देवता मानली जाते. कदाचित पूर्वी मोरपिसांचा वापर लेखनासाठी केला जात असल्याने हे नाते जोडले गेले असावे. मोराला सरस्वतीचे वाहन मानले जाते. सरस्वतीप्रमाणेच भारतीय पुराणामध्ये मोर गणपतीचे ज्येष्ठ बंधू कार्तिकेय यांचेही वाहन आहे. 

       मोरपंखाला सर्व धर्मांमध्ये पवित्र मानले जाते. मोरपंखांचा संबंध लक्ष्मीशीही आहे. श्रीकृष्णाच्या डोक्यावर कायम मयूरपंख विराजमान असते. श्रीकृष्णाच्या बासरीलाही मोरपंख बसवलेले असते. एकदा श्रीकृष्ण तल्लीन होऊन बासरी वाजवत होते. त्या बासरीच्या वादनाने सर्व सजीव मंत्रमुग्ध झाले, डोलू लागले. हे सुरेल बासरी वादन ऐकल्यानंतर मोराच्या राजाने श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपंख बसवले. मोरपंखाला काळाचे प्रतीक मानले जाते. खेड्यांमधून सुप्रभाती देवाची सुमधूर आवाजात गाणी गात फिरणारे वासुदेव मोरपंखांचे टोप बनवतात, ते डोक्यावर धारण करतात. टोपाच्या खालच्या बाजूला डोळा बाहेरून दिसेलशी मोरपिसे लावलेली असतात. त्याच्या वरती मोरपंखाचा दांड्याच्या गोलाकार रचना केलेली असते. मोरपिसे टोपाला आकर्षक बनवतात. खानदेशातही देवी नाचवणे हा धार्मिक कार्यक्रम असतो.  देवीचे भक्त मोरपंखाचा मुखवटा डोक्यावर धारण करतात. जिभ लाल केली जाते. हातात त्रिशुल घेतलेले असते. देवीच्या मोहक रूपाला मोरपिसांचा मुखवट अधिकच सुंदर बनवतो.  

बौद्ध धर्मामध्ये मोरपंखाला विचारांच्या खुलेपणाचे प्रतीक मानले जाते. जैन धर्मामध्येही मोरपंखाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मोरपंखापासून पिच्छी किंवा पिंची बनवतात. जैन धर्मियांतील दिगंबर साधूची ओळख ही पिच्छी असते. दीक्षा देताना आचार्य आपल्या शिष्याला पिच्छी देतात. जाताना किंवा एखाद्या ठिकाणी आसन ग्रहण करताना, या पिच्छीने जागा साफ केली जाते, ज्यामुळे तेथे असणारे जीव हळुवारपणे बाजूला जातील आणि त्यांना इजा पोहोचणार नाही. पिच्छी बनवण्यासाठी मोरपंख निवडण्यामागे त्याचा मुलायमपणा आणि सौंदर्यासोबत, त्याचे टिकाऊपण हे महत्त्वाचे कारण आहे. त्याचप्रमाणे मोरपंख कधीही धुळीने मलूल होत नाही, ते घर्मबिंदूंनीही खराब होत नाही, ते नेहमी स्वच्छ दिसतात आणि असतात.  

ग्रीक पुराणकथेनुसार हेरा या देवतेने मोराच्या पंखांमध्ये डोळा निर्माण केला. मोराची शेपटी स्वर्गातील तिजोरीचे प्रतीक, तर, पंखावरील डोळे ताऱ्यांचे प्रतीक मानतात. मोरांची एक जोडी हेरा या देवतेचा रथ ओढत असे. मोरपंख लवकर कुजत नाहीत. त्यामुळे त्याला अमरत्वाचे प्रतीक मानत. ख्रिस्त धर्मीय त्याला अमरत्व आणि अध्यात्मिक शिक्षणाचे प्रतीक मानतात. इस्लाम धर्मीय फकिर आपल्या हातातील पात्रात जळणारा धुप मोरपिसांच्या पंख्याने फुलवून धूर सर्वत्र पसरवतात. लहानपणी आम्ही या फकिराजवळ जाणीवपूर्वक जायचो. त्याच्या थाळीमध्ये पाच पैशाचे नाणे टाकायचो. ते फकिरही प्रेमाने आमच्या तोंडावरून मयूर पंखाचा पंखा फिरवायचे. तो मऊ, मुलायम स्पर्श हवाहवासा वाटायचा. मशिदीमध्ये आशिर्वाद देण्यासाठी मोरपंखांचा बांधलेला गठ्ठा वापरला जातो. यहुदी धर्मीय लोक परमेश्वराचे सात अवतार मानतात. त्यातील मयुरावतार सर्वात शक्तीमान अवतार असल्याची त्यांची धारणा आहे. त्यामुळे मोरांची आणि मोरपंखाची ते पूजा करतात. इजिप्तची न्यायदेवता मॅट ही मोराच्या पंखांचे वजन हृदयासोबत करते, असे मानतात. ‘आपण केलेला न्याय इतका अचूक आणि हळूवार असावा. यासाठी आपले मन तसे असायला हवे’, यासाठी ती आपल्या हृदयाची मयूर पंखाशी तुला करते. सर्वच धर्मामध्ये मोरपंखांचा संबध हा शांती, प्रगती, सधनता आणि अध्यात्माशी जोडण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लोक मोराच्या अन्न आणि पाण्याची सोय करतात. काही गावात मोराला ईजा पोहोचवणे पाप मानतात. त्यातून त्या गावात मोरांची संख्या खूप वाढली आहे. ‘मोराची चिंचोली’ अशी काही गावांची मोर ही ओळख बनला आहे. भारतात मोराला मारणे, त्याचे मांस खाणे, बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे.

अनेक राजे-रजवाड्यांनी मोरपंखांच्या आणि मोरांच्या मूर्ती उभ्या केल्या. बादशहा शहाजहान याचे आसन मयुरासन म्हणून ओळखले जात असे. अनेक जुन्या मंदिरांवर आणि राजवाड्यांवर मोरांच्या मूर्ती बसवलेल्या आढळून येतात. पाश्चात्य राष्ट्रातील नागरिक मात्र अनेक वर्षे मोरपंखाला दुर्भाग्याचे प्रतीक मानत. आज हा गैरसमज दूर झाला आहे. उलट सौंदर्य आणि उच्चभ्रूपणाचे प्रतीक म्हणून मोर पंखांचे टॅट्यू बनवण्याची ‘फॅशन’ आली आहे.

         मराठी, हिंदी भाषेतील मोर किंवा मयूर, संस्कृतमधील मयूर किंवा मयूर:, इंग्रजीतील पिकॉक, हा एक कुक्कुटवर्गीय पक्षी आहे. मोर हा नर असतो, अन् त्याची जोडीदार लांडोर. तिला इंग्रजीत पीहेन म्हणतात. एक लांडोर वर्षातून एकदा चार ते पाच अंडी घालते. अंडी घालण्यासाठी लांडोर जमिनीवरच घर बनवते. गवत, काड्यांचे ते उथळ घरटे असते. लांडोर ती अंडी अठ्ठावीस दिवस उबवते. त्यानंतर पिल्लं बाहेर येतात. काही लोक रानातील मोरांची अंडी आणतात. ती कोंबडीच्या अंड्यात मिसळून उबवतात आणि मोराची पिल्ले मिळवतात. मात्र असे करणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. सुरुवातीला नर आणि मादी पिल्ले सारखीच असतात. आठ महिन्यांची होताच पिल्ले आईला सोडून स्वतंत्र राहू लागतात. त्यामुळे दरवर्षी एका लांडोरीपासून चार ते पाच नवे मोर, लांडोर तयार होतात. साधारण अडीच वर्षांनंतर मोर आणि लांडोरीमध्ये फरक दिसायला लागतो. विशेषत: मानेवरील रंग आणि डोक्यावरील तुरा हा फरक स्पष्ट करायला लागतो. मोर पिल्ले यानंतर मोठ्या मोरांप्रमाणे वागायला, नाचायला सुरुवात करतात. मोराची पूर्ण वाढ होऊन त्याला मोरपिसे येण्यास चार वर्षांचा काळ लागतो. त्यानंतर तो स्वतंत्र गट करून राहतो. मोर आणि लांडोर हे कीटक, धान्य आणि गवत, वनस्पतीच्या बिया खातात. मोर हा सापांचा शत्रू मानला जातो.

लांडोर आकाराने लहान असते. तिला शेपटीभोवती पिसारा नसतो. तिची मानही हिरवट रंगाची असते. गळ्यावरील हिरव्या रंगाच्या भागानंतर पोटाचा भाग पांढरा असतो. तिला आकर्षक बनण्याचे कारणही नसते, कारण जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मोराला नसून, लांडोरीला असते. निसर्गात माणूस वगळता सर्वसाधारणपणे सर्व पशूपक्ष्यांमध्ये नर सुंदर आढळतात. लांडोरीच्या डोक्यावरील तुराही आकर्षक नसतो. त्यामुळे ती मोराइतकी सुंदर नसते. तिच्या शेपटीभोवती मोरासारखे आकर्षक पंखांचे आवरणही नसते. 

       मोराचे वजन चार ते सहा किलो असते. मोराची चोच त्याच्या आकाराच्या मानाने छोटी, पण धारदार असते. त्याच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. भारतातील मोरपंखांचा डोळा निळा असतो. ब्रम्हदेश आणि इतर काही देशांमध्ये हिरव्या डोळ्यांचे मोर आढळतात. शेपटीभोवतीचे पंख पांढरे असणारे मोरही आढळतात. मात्र ते जनुकीय बदलातून निर्माण झाल्याचे मानले जाते. मानेवर दाट निळ्या रंगाचे केशावरण असते. मोराचे पोटही निळ्या रंगानेच झाकलेले असते. त्याच्या शरीरावरील उडण्याच्या पंखांचे रंग वगळता इतर सर्व रंगांमध्ये एक चमक असते. मोर हा सर्वांग सुंदर असतो. या सौंदर्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून की काय मोराचे पाय मात्र साधेच असतात. काळसर करड्या किंवा पिवळ्या, खडबडीत पायाला चारच बोटे असतात. मात्र पायातील काटकपणा लाजवाब असतो. दुसरे या पायाला असणारी चार बोटे आणि त्यावरील नखे अगदी पूर्ण वाढ झालेल्या सापालाही जेरबंद करू शकतील, अशा ताकतीची असतात. 

मोराच्या पाठीवरील पंखांचा रंग तपकिरी किंवा काळा आणि पांढरा असा असतो. या पंखांची लांबी फुट-दीडफुटांपेक्षा जास्त नसते. हे पंख केवळ उडण्यासाठी उपयुक्त असतात. मोर यांचा वापर करून ताशी बारा किलोमीटर वेगाने उडू शकतो. उडताना मोर आपले पाय पोटाजवळ घेतो. उडताना सुरुवातीला तो थोडा धडपडतो, मात्र त्या नंतरचे मार्गक्रमण सफाईने करतो. त्या पंखाच्या खाली निळसर-हिरव्या रंगाची केसाळ पिसे असतात. मात्र ती क्वचित दिसतात. या पंखांचा महत्त्वाचा भाग संपला की काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पिसांची दीड फुट लांबीची शेपटी असते. या शेपटीवर मोर पिसाऱ्यातील नयनरम्य पंखांचे आवरण असते.

मोराच्या डोक्यावरील तुऱ्यापेक्षाही त्याच्या शेपटीभोवती असणारी डोळेदार पिसे ही खऱ्या अर्थाने आपल्याला प्रिय असतात. या पिसांमुळेच मोर सर्वांना आवडतो. शेपटीवरील आवरणामध्ये तीन प्रकारची पिसे असतात. यातील डोळा असणारी पिसे सर्वाधिक लोकप्रिय असतात. या पिसांची लांबी पाउण फुटांपासून ते पाच फुटापर्यंत असते. ही पिसारा फुलवल्यानंतर विशिष्ट ठिकाणी दिसावीत अशा पद्धतीने ही लांबी बदलते. त्यानंतर ‘तलवार’ पिसे. या पिसांचा आकार तलवारीसारखा असतो. मोराच्या पिसाऱ्याच्या कडेला खालच्या बाजूला ही पिसे असतात. या पिसांच्या दांड्यावर एकाचं बाजूला केसाळ रचना आढळते. या पिसांची लांबीही बदलत असते. लोकप्रियतेत ही दुसऱ्या क्रमांकावर असतात. या तलवार पंखावर कधी कधी अर्धवट विकसित झालेला डोळाही आढळतो. पिसारा फुलवल्यानंतर ही पिसे दोन्ही बाजूला विभागतात आणि सुंदर कडा दिसते. तलवार पंखांचा रंग दोन्ही बाजूला सारखाच असतो. तिसरा प्रकार असतो तो कत्री पिसांचा. यांना ‘चंद्रकोर’ही म्हणतात. इंग्रजीत या पिसांना ‘टी फिदर’ म्हणतात. ही आकाराने डोळा पिसासारखी असतात. यांची लांबी सर्वाधिक असते. पिसाऱ्यात सर्वात वर ही पिसे दिसतात. डोळा पंख आणि कत्री पंख मात्र पुढच्या बाजूला वेगळा आणि मागील बाजूला वेगळा रंग दाखवतात. कत्री पंखांमध्ये डोळ्याचा आकर्षक भाग नसतो. उड्डाण पुलांसाठी बांधल्या जाणाऱ्या खांबांची रचना या पिसाप्रमाणे असते. टी आकाराची पिसे क्वचितच जमवली जातात. याशिवाय अगदी छोटी असंख्य पिसे असतात. त्यांच्या टोकाला मोरपंखी रंग आलेला असतो. अशा प्रकारची पिसे अन्य पक्ष्यानांही असतात. त्यामुळे त्याकडे आपले लक्ष जात नाही. काही उडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंखानांही मोरपंखी रंगाची लागण होते. मात्र असे पंखही जास्त नसतात. शेपटीभोवती असे साधारण २०० रंगीत पंखांचे आवरण असते. यात डोळा असणाऱ्या पिसांची व तलवार पिसांची संख्या साधारण १७० असते. कत्री पिसे तीसच्या आसपास असतात. कत्री पिसेही डोळा असणारीच असावीत, मात्र त्यांची लांबी सर्वाधिक असल्याने त्यांच्या पुढचा भाग झिजून कत्री बनत असावा. शरीराच्या एकूण लांबीच्या किमान साठ टक्के भाग हा शेपटीभोवतीचा पिसाराच्या असतो.

मोरांचे वास्तव्य हे झाडे-झुडुपे असणाऱ्या भागात असते. विरळ मनुष्य वस्तीतही मोर राहतात. जंगलांची संख्या कमी झाल्याने मोठी जागा आणि विरळ लोकवस्ती, भरपूर झाडे असणाऱ्या भागात ते राहू लागले आहेत. महाराष्ट्राचे राजभवन हे मुंबईसारख्या दाट लोकसंख्येचे शहरात आहे. मात्र राजभवन परिसरात लोकवस्ती कमी आणि भरपूर झाडे असल्याने मोर राहतात. मोर ज्या भागात असतात त्या भागात त्यांचा ‘मियाँव’ असा आवाज सकाळ, संध्याकाळी ऐकावयास मिळतो. मोराच्या या ओरडण्यास ‘केका’ किंवा केकारव असे म्हणतात. कवी मोरोपंतानी ‘केकावली’ लिहिली. मोरोपंत म्हणजे मयूर पंडीत. केका म्हणजे मोराचा आवाज. आवली म्हणजे शृंखला किंवा माळ. मोरापंतांचा आवाज (काव्य शृंखला) म्हणजे केकावली असे मानले जाते. मोर हा अतिशय सावध पक्षी आहे. एखादा सवयीचा नसणारा आवाज झाला किंवा त्यांच्या शत्रूपैकी कोणी दिसले, तरीही मोरांचे ओरडणे ऐकावयास मिळते. हे आपल्या इतर साथीदारांना सावध करण्यासाठी असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीचे मोरांचे मोठ्याने ओरडणे, हे मात्र प्रियेला साद घालण्यासाठी असतात.

आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली की त्यांचा विणीचा हंगाम सुरू होतो. मोर ओरडू लागतात. मोराला केवळ ओरडून चालत नाही, म्हणून तो पिसारा फुलवायला सुरुवात करतो. मोर हळूहळू पिसारा फुलवतो. पिसांना आपल्या मुख्य शरीराशी काटकोन करेपर्यंत वर नेतो. पिसाऱ्यासोबत त्याची शेपटी पाठीमागे वर जाते. पिसे फुलवताना विशिष्ट असा सळसळ आवाज ऐकायला येतो. पिसे वर गेली की तो एक पाय हलवत नाचू लागतो. नाचताना ‘मियाँव’ असा अधूनमधून आवाज काढतो. मोरामध्ये पिसारा एका सेकंदात सव्वीस वेळा कंप करण्याची क्षमता असते. या कंपनातून तो मानवाला ऐकता न येणारे आवाजही काढतो. जणू ‘मी सुंदर अविष्कार सादर करतोय, खास तुमच्यासाठी. तो पाहायला या, माझ्या कलेला दाद द्या, या, या’, अशी साद समस्त लांडोरींना घालत असतो. यातील मिलनोत्सुक लांडोरी सावकाश तेथे पोहोचतात. मोराचा नाच पाहतात. त्याच्या पिसाऱ्याच्या आकार, पंखातील डोळ्यांचा आकार, हे सारे प्रभावित करणारे असेल, लांडोरीला ते आवडले; तर, ती त्याला पसंत करते. त्याच्याभोवती घुटमळत राहते. तिचे ‘थांबणे’ पाहून मोर ओळखतो की तिने आपल्याला वरले आहे आणि मग त्यांचे मिलन होते. मोराचे मिलनही इतर कुक्कुटवर्गीय पक्ष्याप्रमाणे होते. मोर नाचताना अश्रू ढाळतो, ते अश्रू लांडोर पिते आणि नंतर अंडी घालते. ही निव्वळ कवी कल्पना आहे. ज्यांना यात रमायचे ते रमोत. मात्र यामध्ये कोणतेही वैज्ञानिक सत्य नाही. एका मोराला चार ते पाच लांडोरी पसंत करतात. मात्र एखाद्या मोराला एकही जोडीदार मिळत नाही. त्यामुळे मोराला खूप वेळ नृत्यकला सादर करत बसावे लागते. लांडोरीना साद घालण्यापलिकडे मोराला काहीही आवाज नसतो. सखीला आकर्षित करण्यासाठी नाचताना हा पिसारा मोराच्या कामी येतो. या एका कारणासाठी या सुंदर पिसाऱ्याची निर्मिती झाली आहे. मोरही वर्षभर हा भला मोठा पिसारा केवळ याच कारणासाठी सांभाळत असतो. मोरांचे नाचणे पावसाळाभर सुरू असते.  

       मोराच्या प्रणयाराधनेत महत्त्वाची भूमिका मोरपंख बजावतात. आपले काम झाल्यांनतर शेपटीभोवतीची सर्व पिसे गळायला सुरूवात होते. मोराला वीस ते पंचवीस वर्षांचे आयुष्य लाभते. पहिली चार वर्ष वगळता, दरवर्षी हे घडत असते. महाराष्ट्रातील पावसाळा सप्टेंबरअखेर संपतो. त्यानंतर हे मोरपंख आपोआप गळू लागतात. साधारण नोव्हेंबरपर्यंत शेपटीभोवतीचे सर्व पंख झडतात आणि पुन्हा नवीन पंखांच्या आवरणाने शेपटी संरक्षित केली जाते.

मोरांच्या पंखात मँगेनिज, लोह, तांबे आणि जस्ताचे प्रमाण भरपूर असते. मयूर पंखाच्या राखेमध्ये पाऱ्याचे अंशही आढळतात. मोरपिसांची राख काही आयुर्वेदीक औषधामध्ये वापरली जाते. तसेच मोरपिसांचे टोक ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीमध्ये वापरता. मोराच्या शेपटीच्या आवरणावर असणारी पिसे मुलत: तांब्याच्या रंगांची असतात. मात्र त्याची रचना ही खूपच सुंदर आणि वेगळी असते. त्या रचनेमुळे मोरपंखाच्या डोळ्याच्या टोकापासून निळा, हिरवा, तपकिरी रंग परावर्तित होतात आणि आपणास सुंदर रंगाविष्कार पाहावयास मिळतो. प्रत्यक्षात केरॅटीन आणि मेलॅनिन या दोन प्रथिनांपासून हे पंख बनलेले असतात. मानवी केसांतही केरॅटीन असते. मात्र माणसाच्या केसांची रचना मोरांसारखी नसते. नाहीतर माणसाचे डोकेही मोरांसारखे रंगीत सुंदर दिसले असते. 

मोरपंख एवढे आकर्षक का, हा सर्वप्रथम चार्ल्स डार्विन यांना पडलेला प्रश्न होता. डार्विन यांचे सारे आयुष्य उत्क्रांतीवादाचा अभ्यास करण्यात गेले. मात्र त्यांना या प्रश्नाचे समर्पक उत्तर मिळाले नाही. त्या नंतर मोरपंखाचे सौंदर्य समजून घेण्याचा मोह रॉबर्ट हूक आणि आयझॅक न्यूटन या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांना झाला. त्यांनी त्याचा सूक्ष्मदर्शीखाली अभ्यासही केला. त्यातून मोरपंखाची सूक्ष्म रचना ही मानवी किंवा इतर केसापेक्षा वेगळी आहे, एवढेच त्यांना समजले. खरे कारण त्यांनाही सापडले नाही. पुढे त्यांच्या संशोधनानंतर शंभर वर्षांनी थॉम्सन यंग या भौतिकशास्त्रज्ञाने तरंग व्यतिकरणाचा (Wave interferrence) शोध लावला. तोपर्यंत आणखी सूक्ष्म पद्धतीने रचना समजून घेता येतील, असे सूक्ष्मदर्शी निर्माण झाले. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि तरंग व्यतिकरणाच्या सिद्धांतातून खऱ्या अर्थाने मोरपंखाच्या रंगाचे गूढ संशोधकांना समजून घेता आले.

     खरं तर, मोराचे हे आकर्षक पंख वास्तवात आकर्षक नसतात. त्याची रचनाही अनेक विसंगतींनी भरलेली असते. त्याचे सूक्ष्म अवलोकन केले, तर या गोष्टी सहज लक्षात येतात. मात्र त्याला पाहताच माणूस त्याच्या प्रेमात पडतो आणि त्याचे ‘प्रथम दर्शन’ असा प्रभाव टाकते की आपण त्याच्या ‘वरलिया रंगा’स भुलून जातो. असे घडले की त्याच्या तपशिलात जाण्याचे कारणच उरत नाही. मोरांच्या पंखाची भौतिक रचनाच अशी असते की त्यातून प्रकाशिकीचा सुंदर आविष्कार निर्माण व्हावा. पातळ फितीतून होणाऱ्या व्यतीकरण (Thin film interference) प्रक्रियेतून मोरपंखांचे रंग खुलतात. मोरपंखाचा शरीराला जोडलेला भाग म्हणजे दांडा किंवा देठ हा पूर्णत: पांढरा असतो. तो पुढे वाढत निमुळता होत जातो. हा मूळ दांडा काही सेंटीमीटरपासून अगदी पाच फुटांपर्यंत लांबीचा असतो. दांड्याच्या सुरूवातीच्या पाच सेंटीमीटर भागावर पांढरी काळसर केसाळ रचना असते. पिसे जितकी लांब बनतात, तितकी ही केसाळ रचना कमी होत जाते. सहा सात सेंटिमीटरनंतर त्याला मोरपंखात असणाऱ्या केसाळ रचनाप्रमाणे तंतूमय घटक जोडलेले आढळतात. मोराच्या पंखांतील केस अगदी सुरूवातीला दांड्याच्या दोन बाजूला अंतरा-अंतराने आढळतात. ते सुरूवातीला शेपटीशी लंब आणि नंतर विशाल कोनात असतात. पुढे अशा दोन केसांतील अंतर कमी होत जाते. मुख्य दांड्यावर असणारी केसासारख्या रचना गोलाकार नसतात. तसेच त्यांचा आकार सर्वत्र सारखा असतो. त्या केसावर सर्वत्र सूक्ष्म रचना (barbule) बसलेल्या असतात. नंतर ते केस अगदी चिकटून बसतात. त्यातून मोरपंखाच्या डोळ्याचा आकर्षक भाग तयार होतो. ते इतके चिकटून बसलेले असतात की दोन केसाळ तंतूतील अंतर हे पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी असते. 

हा डोळा जेथे सुरू होतो, तिथपर्यंत दांडा दिसतो. या टोकाजवळ असणाऱ्या केसावरील रचना स्फटिक रूपातील पातळ फिती एकावर एक बसून बनलेल्या असतात. अशा प्रत्येक रचनेत वीसपर्यंत खंड असतात. या केसाळ रचनांवर भिन्न अपवर्तनांक असणाऱ्या विविध कोनांत बसलेल्या अनेक स्फटिक फिती असतात. प्रत्यक्षात ही रचना केसाळ काटेरी दिसते. मात्र ती मऊ असल्याने हे काटे टोचत नाहीत. मोरपंखांचा स्पर्श हा सर्वात हळूवार स्पर्श मानतात. या प्रत्येक काटेरी रचनेतील स्फटिक रचना विविध कोनात असतात. त्यामुळे विविध रंगांचे परावर्तन विविध कोनातून होते आणि आपणास ते रंग दिसतात. दोन केसाळ रचनातील अंतर विविध ठिकाणी वेगवेगळे असते. तसेच त्यावर असणारी काटेरी रचनाही वेगवेगळी असते. या सूक्ष्म रचना ज्या पदार्थांच्या बनलेल्या असतात, त्या पदार्थांचा अपवर्तनांक (Refractive Index) हवेपेक्षा वेगळा असतो. तसेच या काही मायक्रॉन जाडी असणाऱ्या फितींचे अपवर्तनांकही वेगवेगळे असतात.

     मूळात आपणास रंगाची अनुभूती मिळते ती प्रकाशामुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे. आपण ज्या प्रकाशाच्या सहाय्याने दृष्टीसुख घेत असतो, ते सूर्यापासून येणाऱ्या पांढऱ्या प्रकाशामुळे. हा पांढरा प्रकाश सात रंगांच्या प्रकाश तरंगांचा बनलेला असतो. या सात रंगांच्या तरंगांची तरंगलांबी वेगवेगळी असते. हा प्रकाश आपले मार्गक्रमण करताना रस्त्यामध्ये भिन्न अपवर्तनांक असणारा पदार्थ आला तर आपली दिशा आणि वेग बदलतो. शालेय जीवनात आपण प्रिझमच्या सहाय्याने प्रयोगशाळेत इंद्रधनुष्यातील सात रंग मिळवत असतो. निसर्गात प्रकाशाचा असा दिसणारा सुंदर अविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य होय. इंद्रधनुष्यातही भिन्न अपवर्तनांक असणाऱ्या माध्यमातून (हवा आणि जलबिंदू) परावर्तित होणारा प्रकाश आपले रंग वेगळे करतो आणि आपणास इंद्रधनुष्य पाहावयास मिळते. अगदी तसेच, वातावरणातून सूर्य प्रकाश मोरपंखावर पडला की सूक्ष्म रचनांतील पातळ फितीतून एका विशिष्ट रंगाचे परावर्तन होते आणि तो त्या भागाचा तो रंग आहे, असे आपले डोळे आपल्याला सांगतात. प्रत्येक तंतूवर असणाऱ्या केसाळ रचनेमध्ये नऊ ते बारा स्फटिक रचना असतात. मोरपंखाच्या ज्या भागातून डोळ्याचा गडद निळा रंग दिसतो, त्या भागात प्रत्येक तंतू परस्परांपासून १४० नॅनोमीटर दूर असतात. त्यानंतर त्यातील अंतर वाढत जाते. अंतर वाढल्यानंतर केसाळ रचनांचा रंग आपल्याला हिरवट तांबूस दिसतो.

आपण अनेकदा अगदी अशीच प्रक्रिया घडताना पावसाळ्यातही अनुभवत असतो. पारदर्शक असणारे पेट्रोल किंवा तेल ओल्या रस्त्यावर सांडले तर असाच विविधरंगी आविष्कार पाहावयास मिळतो. तेल किंवा पेट्रोलचा थर आणि मातीवर असणारा पाण्याचा पातळ थर आणि हवेचा अपवर्तनांक हे वेगळे असतात. या रचनेमुळे पांढऱ्या प्रकाशातील रंग वेगळे होऊन त्यातील विशिष्ट कोनातून विशिष्ट रंगांच्या प्रकाश किरणांचे परावर्तन होते आणि आपणास तो रंगाविष्कार पाहावयास मिळतो. त्या ठिकाणी असणारी पेट्रोल किंवा तेल आणि पाण्याच्या पातळ फितींची रचना ही सुसंगत आणि प्रमाणबद्ध नसते. त्यामुळे आपणास तेल जसे पसरते तसे रंगीत आकार दिसतात. मात्र ही प्रमाणबद्धता मोरपंखामध्ये निसर्गाने साधलेली असते आणि म्हणून मोरपंखाकडून असे केले जाणारे प्रकाशाचे परावर्तन चित्ताकर्षक असते. सर्वाना प्रेमात पाडणारे असते.

        या मोरपंखाच्या मध्यभागी असणारा पांढऱ्या रंगाचा दांडा डोळ्याच्या मध्यापर्यंत निमुळता होत जातो. मुख्य पंखाचा खरा आकर्षक भाग सुरू होताच, हा दांडाही तांबूस तपकिरी होत जातो. जेथे दांड्याचा भाग संपतो तेथे डोळ्याला खाच असते. मोरपंखाच्या केंद्रस्थानी हा गडद निळा किंवा जांभळा भाग असतो. त्या बाहेर असणारा विवृत्त (Elliptical) आकाराचा भाग हिरवट निळ्या रंगाचा असतो. या रंगाचे वेगळेपण असल्याने मराठीत या रंगाला मोरपंखी रंग म्हणून ओळखले जातात. हिरव्या आणि निळ्या रंगाचा हा सुंदर एकत्रित आविष्कार मनाला मोहवतो. त्या बाहेरचा भाग तांबूस रंगाचा असतो. त्यानंतर विविध रंगांचे मिश्रण आढळते. त्यापुढे या केसाळ रचनातील अंतर वाढत जाते आणि त्यांचा रंग हिरवा बनतो. पुढील बाजूला अशी रंगांची उधळण होत असताना, पाठीमागचा भाग मात्र तांबूस रंगाचाच असतो. त्यापुढे तांबूस रंगानंतर केसाळ रचनातील अंतर वाढत जाते आणि स्फटिक रचना सर्व बाजूला पसरलेल्या असतात. त्यामुळे आपणास वेगळाच रंग दिसतो. परिणामी, मागील डोळा आणि त्याच्या बाजूचा भाग संपल्यानंतरच्या केसाळ रंचनांचा रंगही पुढच्या बाजूप्रमाणे दिसतो. बारकाईने पाहिल्यानंतर या केसाळ रचनांवर असणाऱ्या काटेरी स्फटिक रचनांची घनता मोर पंखाचे जेथे रंग बदलतात, तेथे बदललेली दिसून येते. २००२ साली एस.सी. बर्जेस या यांत्रिकी अभियंत्याने याचा सखोल अभ्यास केला आणि मोरपंखाच्या सौंदर्यामागील वैज्ञानिक सत्य सांगितले.

       मोराच्या पंखातील हजारो पंखामध्ये एखादेच पंख असे आढळते की ज्यातील गडद निळा डोळा हा मध्यरेषेच्या दोन्ही बाजूला समान असतो. तो साधारणपणे एका बाजूला लहान असतो. त्यानंतरचा मोरपंखी रंगाचा भागही असमान असतो. नंतर त्याला समान आकार मिळतो. मोर पंखाची रचना नियमित किंवा समान नसते, तरीही ते सुंदर असते. मोरपंखाला आकर्षक बनवण्यामध्ये त्याचे दिसणारे चमकदार रंग महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ते सूक्ष्म स्फटिक रचनामुळे साध्य होते. दुसरी मोरपंखांचा आकर्षकपणा वाढवणारी गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची गुंतागुंतीची रचना. त्याच्या केसाळ रचनेतील बदलत जाणारे अंतर, त्यातील काटेरी स्फटिक फितींची बदलत जाणाऱ्या रचना, यामुळे होणारे विशिष्ट रंगांचे परावर्तन आणि त्यातून मिळणारी अद्भूत चित्ताकर्षक रंगांची अनुभूती मोरपंखाच्या प्रेमात पाडते. मोरपंखातील डोळ्यांखाली असणाऱ्या केसाळ रचना या अंतर वाढवत जातात, त्यामुळेही त्याचे सौंदर्य वृद्धींगत होते. या केसाळ रचनांवरही स्फटिकांच्या पातळ फिती असतात. मात्र त्या एकाच रंगाच्या दिसतात कारण त्यावरील स्फटिक रचना या एकाच प्रकारच्या, आणि दोन्ही बाजूला बसलेल्या असतात. खालच्या भागावर अशा स्फटिक रचना नसतात. अतिशय चिकटून बसलेल्या मूळ पंखाच्या रचनेशी ही रचना पूर्णत: विसंगत आहे. मात्र त्यामुळे डोळ्याचा भाग आणखी आकर्षक बनतो. डोळ्याच्या रचनेनंतर दांडा लुप्त पावतो. तो दांडा शेवटपर्यंत राहिला असता, तर मोरपंखाचे सौंदर्य निश्चितच कमी झाले असते. त्यामुळे मोरपंख दोन भागात विभागल्यासारखे दिसले असते. डोळ्याचा आकार दोन बाजूला सारखा नसल्याने मोरपंखाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली असती. दांड्याचा निमुळता होत जाणारा आकार आणि त्याला डोळ्याजवळ आलेला त्या, त्या भागाला अनुरूप रंगही मोरपंखाला सुंदर बनवतात. विशेष म्हणजे डोळ्याजवळील भाग वगळता, इतरत्र हा दांडा पांढरा असतो. जसजशी केसाळ रचनातील अंतर कमी होत जाते, तसा हा दांडाही पुढच्या बाजूने केसांचा रंग धारण करतो. केसाळ रचनेवर असणाऱ्या केरॅटिनच्या स्फटिक रचनांची जाडी आणि रचना यामध्ये होत जाणारे बदल प्रकाशातील विशिष्ट रंगाचे परावर्तन घडवतात आणि त्यातून केंद्रभागी निळा, नंतर मोरपंखी, त्यानंतर तपकिरी, पुढे हिरवा शेवाळी रंग असे दिसत राहतात. ही केसाळ रचनांतील जाडी कमी जास्त होत राहते. त्यामुळे अशी गुंतागुंतीची असणारी रचना, सुंदर दिसते.  

मोठ्या मोरपंखाच्या टोकाला अशा शंभर केसाळ रचना असतात. प्रत्येक केसावर असणाऱ्या स्फटिक रचनांची संख्या एक लाख इतकी असते. मुख्य पंखातील केसाळ रचनेमध्ये वीसवेळा स्फटिक रचना बदलते आणि ही बदलणारी रचना मोर पंखांचे सौंदर्य खुलवत ठेवते. भूमितीतील आकृत्या काढताना आपल्या हातून चूक होते, मात्र मोर पंखातील स्फटिक रचना बदलताना अशी कोणतीही अनियमितता झालेली आढळत नाही. किती अंतरावर कोणत्या केसाने रंग बदलण्यासाठी स्फटिक रचना बदलायची आहे, हे अगदी संगणकीय प्रणालीतून उतरावे, तसे उतरलेले असते. मागील बाजूला तांबूस तपकिरी रंग आढळतो. हा रंग मोरपंखांचा मूळ रंग असतो. पुढच्या बाजूच्या रचना विस्कळीत करून त्या पदार्थांचा रंग अभ्यासला तर तो तांबूस तपकिरीच दिसतो.

मोरपंखाबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. घरात मोरपंख ठेवल्याने पाली, साप, डास आणि विषारी जंतू घरात येत नाहीत, असे मानले जाते. घरात मोरपीस ठेवल्यास धन दौलत वाढते, असेही मानतात. दंगेखोर मुले शांत होतात. वास्तूदोष दूर होतात. असे अनेक समज आहेत. कष्ट न करता केवळ मोरपंख घरात ठेवल्याने कधीच संपत्ती वाढू शकत नाही. निसर्गाने मोरपंखाला आकर्षक बनवण्यासाठी एवढे कष्ट घेतले आहेत. केवळ ते घरात ठेवून धन कसे वाढू शकते? ज्यांने हे काही सांगितले असेल, त्यांना कदाचित हेच सांगायचे असावे की ‘कोणतेही काम करताना ते मोरपंखासारखे सुंदर करा. यश आपोआप मिळत जाईल’. मोरपंखाच्या दर्शनाने प्रसन्न वाटते, हे मात्र निश्चित.

 मला मोरपीस भेटले, १९७२ च्या दुष्काळात. त्या भीषण दुष्काळात माणसांप्रमाणे जनावरांचेही हाल सुरू होते. जनावरांना धामणीचा पाला चारा म्हणून दिला जात असे. तर कमी पावसात उगवलेल्या बरबड्याचे दाणे गोळा केले जात. या बरबड्याच्या बियांचे पीठ अन्य धान्याच्या पीठात मिसळून भाकरी केली जात असे. लहान-मोठे सर्वजण जगण्यासाठी अन्न आणि पाणी मिळवण्याच्या मागे असत. एका शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा सुटली. आई-वडिलांबरोबर धामणीचा पाला आणायला बालाघाटच्या डोंगरात गेलो होतो. एका झाडाचा पाला काढताना त्याखाली मोरपीस पडलेले दिसले. तोपर्यंत मोर चित्रातच पाहिला होता. मोरपंखही प्रत्यक्षात पाहिले नव्हते. ते पंख पाहताक्षणी मी त्याच्या प्रेमात पडलो. मी ते हळूवारपणे उचलून घेतले. त्याचा स्पर्श अनुभवला. अत्यंत मुलायम स्पर्श खूप जवळचा वाटला. 

ते सापडलेले मोरपीस अगदी जपून घरी घेऊन आलो. आजही आठवते, ते मोरपीस त्याचा दांडा कापून बालभारतीच्या पुस्तकात ठेवले होते. ते पंख मस्त पिसायचो. पिसल्यानंतर मोरपीस फुलायचे. पिसल्यानंतर त्यामध्ये स्थितीज विद्युत निर्माण होते, हे बी.एस्सी.चा अभ्यास करताना समजले. त्या स्थितीज विद्युतमुळे फुललेले मोर पिस कागदाचे हलके तुकडे अलगद उचलायचे. हा लहानपणीचा, शालेय जीवनातील आवडता खेळ. पुस्तकात ठेवलेल्या मोर पिसाला कुंकू वाहिले, की त्या पुस्तकातील सारे ज्ञान आपल्याला लाभते, असा भ्रम त्या काळी अनेकांच्या मनात असायचा. हे खरे असूच शकत नाही. मात्र त्या पिसाच्या आकर्षणामुळे का होईना, त्या पुस्तकाला अनेक मुलांचा हात लागायचा. 

    ‘पहिले प्रेम कधीच विसरता येत नाही’, असे म्हणतात. माझे मोरपिसाशी असलेले नाते पाहून मला तरी हे पुरते पटते. मोरपंख आणि पर्यायाने मोर, पहिल्या भेटीपासून मला खुणावत राहिले. त्यावेळी मोर पंखाशी जोडलेले नाते आजही अतूट आहे. लहानपणी पुढे अनेक मोर पंखांना पुस्तकात ठेवले. पुढे खूप मोरांचे दर्शन झाले. शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या दोन ठिकाणी  नोकरीनिमित्त राहीलो. या दोन्ही विद्यापीठात भरपूर मोर भेटले. शिवाजी विद्यापीठामध्ये तर हजारो मोर वास्तव्याला आहेत. त्यांना अनेक वर्ष बारकाईने पाहिले. मोराचे राजबिंडे रूप, चालतानाचा त्यांचा डौल आणि रूबाब, उडतानाची सफाई, नाचतानाचे फुललेले सौंदर्य, वर्चस्वावरून होणारी भांडणे, धोक्याची चाहूल होताच ओरडून इतरांना सावध करणे आणि सर्वात महत्त्वाचे त्याचे देहभान विसरून नाचणे. हे सारे पाहताना मी स्वत:ला विसरण्याचा अनेकदा अनुभव घेतला. फ्लॉवर पॉटमध्ये दररोज फुले तोडून ठेवणे माझ्या मनाला पटत नव्हते. मात्र फ्लॉवर पॉट हा एक सजावटीचा भाग. तो हवाच. यावर सुंदर मार्ग दाखवला, तो मोरपिसाने. मध्यम पण विविध उंचीची मोरपिस असलेली फुलदाणी बनवून घरात आणि कार्यालयात ठेवून फुलांना तोडणे निदान माझ्यापुरते थांबवले. हा फ्लॉवर पॉट खूप सुंदर दिसतो. मनाला भुरळ घालतो.

दरवर्षी मोराने टाकून दिलेले पंख गोळा करण्याचे वेड अनेकांना आहे. या पंखांना घर सजवण्यासाठी लोक नेतात. त्याचे रंग पाहतात. आवडीने त्याचे पंखे बनवून हवा घेतात. त्याला गालावरून फिरवून असीम सुखाची अनुभुती घेतात. मात्र निसर्गाने या मोरपंखाला सजवण्यासाठी बनवलेले कौशल्य आपल्या अंगी बाणवत प्रत्येक काम असेच सुंदर करायचा प्रयत्न केला तर… आपले शब्द वापरताना मयूर पंखाचा मुलायमपणा घेतला तर… समोरच्या व्यक्तीचे ‘चुकीचे वागणे’ही मोर पंखाप्रमाणे हलकेपणाने घेऊन सोडले तर… जगणे निश्चितच सुंदर होईल.

      मोरपंखाच्या सौंदर्याने कोणीही वेडे होते. कवी त्याला अपवाद कसे राहतील? मोर आणि मोरपंखाभोवती अनेक कविता तयार झाल्या आहेत. ना.धों. महानोर यांच्या कवितातून मोर प्रसन्न दर्शन देतो. कवी ग्रेस यांचा मोर हा घनकंप, घनसंथ, घननीळ आणि घनदंग आहे. ‘मोरपंख ते माझ्या कान्हाच्या आठवणीत पुस्तकात सजलेलं, जणू ते माझ्याच रंगात रंगलेलं’. असं ऋतुजा जगदाळे म्हणतात. तर मनिषा भगत म्हणतात, ‘तुझ्या माझ्या प्रेमाची मूक साक्ष देतात, जीवनात आलेले क्षण जेव्हा मनाच्या आकाशात आठवणी बनत राहतात, मोरपंख लेवून मुक्तपणे विहरतात’. मोरपंख वजनाने खूप हलके असते. मोरपंखांचा मुलायम स्पर्श हे मानवी भावनांशी जोडून अनेक कवींनी कविता आणि शायरी बनवली आहे. आपले जीवनही मोरपंखाप्रमाणे रंगीत असावे, जेणेकरून जीवनात तणाव राहणार नाहीत. मोराला नाचायला सांगणारे ग.दि. माडगूळकर यांचे ‘देवबाप्पा’ या चित्रपटातील आशाताईंनी गाईलेले बालगीत ‘नाच रे मोरा’ हे तर लहानपणापासून प्रत्येकाचे आवडते. त्याखेरीज अनेक बाल आणि बडबडगीते तयार झाली आहेत. अनेक कवींनी मनातला मोर प्रत्यक्षातील मोराशी जोडला आहे. त्यातूनच आलेले १९६३ मधील ‘मोहित्यांची मंजुळा’ या चित्रपटातील जगदिश खेबूडकरांनी लिहिलेले ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’ हे गाणे आजही तितकेच ताजे टवटवीत वाटते. असा कोणाच्या मनमोराचा पिसारा फुलत असताना कोणा सखीला साडीच्या ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ असतो. तर कवी चंद्रशेखर सानेकर यांच्या ‘अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटूनी आभाळ आले मेघ बरसू लागले, अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी’ या गीताला अवधूत गुप्ते यांनी आजच्या युवा पिढीला आवडेल असा संगीत साज चढवला आहे. सर्वभाषिक साहित्यात, चित्रपटात आणि इतर कला क्षेत्रात मोराचा मुक्त संचार आहे. अनेक चित्रकारांचेही मोर हा आकर्षणाचा भाग राहिला आहे. 

मोरपंखांचे मूळ रंग काहीही असोत, त्याचे सौंदर्य मनमोहक, नजर खिळवून ठेवणारे आहे. खरं तर हे निसर्गाच्या रंग विभ्रमाचे विलोभनिय उदाहरण आहे. या मोरपंखाची मला दोन रूपे दिसतात. एक रूप दिसते ते त्याच्या रंगातून, रूपातून, पोतातून आणि तेजातून. या सर्वांमुळे ते आकर्षक दिसते; मनाला भावते. मात्र दुसरे रूप असते त्याच्या त्यागाचे. आपल्या हाती येणाऱ्या मोरपिसातला ‘मोर’ विसर्जित झालेला असतो. उरलेले असते ते केवळ पंख! कालपर्यंत एका सजिवाचा घटक असलेले ते पंख आज अलग होऊन पडलेले असते. आता ते धारण करणाऱ्या मोराच्या तालावर नाचणार नसते. वर्षभर अंगावर  सांभाळलेले पिस शरीरापासून अलग होताना मोरालाही वेदना झाल्या असणार! पंखाचे त्या मोराशी रक्ताचे नाते असते. तरीही ते मोरापासून वेगळे होते… ते नव्या पिसांना जागा करून देण्यासाठी. मोराच्या प्रणयाराधनेत या पंखाने मोठी भूमिका बजावलेली असते. ते नवनिर्मितीला सहाय्यकारी ठरलेले असतात. विणीसाठी लांडोरीला राजी करणारे ते पंख मोरापासून अलग होताच निर्जीव होतात. ते रचनेने, मूळ रंगाने आकर्षक नसतात, तरीही ते सुंदर दिसतात. कदाचित पंखाच्या त्यागामुळे आणि सर्जनाचे, नवनिर्मितीचे साक्षीदार असल्याने ते सौंदर्याचे प्रतिक बनत असावे! आपणही मोरपिसावर प्रेम करता, करता मोरपंखासारखे मृदू बोलायला, वागायला लागलो तर..? मोरपंखांचे रंगाविष्कार पाहताना, आपल्या आजूबाजूंच्या लोकांच्या जिवनात रंग भरण्याचा प्रयत्न केला तर..? मोरपंखाचा त्याग समजून घेताना आपल्याजवळचे थोडे गरजूना दिले तर..? तर… निश्चितच आपले जगणे आणि जीवन सुंदर होईल! 


 


छायाचित्र सौजन्य – सुविज मुव्हीज, कोल्हापूर

---०००---रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

रातराणीचा गंध, करी बेधुंद

 

रातराणी. ‘Beauty with Aroma’ बनलेली. कधी कधी वाटतं निसर्गात फुले नसती, तर माणसाला सुगंध तरी कळला असता का? फुलांच्या दर्शनाने, त्याच्या सुगंधाने मनावरचा ताण, मनातील संताप दूर होतो. मन प्रसन्न होते. मात्र रातराणी, राणी असूनही तिचे वर्तन एखाद्या निर्मोही साधूसारखे. जे, जे आहे ते इतरांना देणारे आणि स्वत:साठी काहीही न राखून ठेवणारे. रातराणीचा सुगंध आवडत नाही असा माणूस विरळाच. ही रातराणी आपल्या सुगंधाने केवळ प्रफुल्लित करते असे नाही तर सकारात्मक ऊर्जाही देते, असे मानतात. या रातराणीपासून आपणही काही घ्यायला हवे… पण काय?

रातराणी या वनस्पतीबद्दल आणि या झाडाबद्दलच्या माझ्या आठवणीबद्दलचा लेख.......

_________________________________________________________

ढगाळ वातावरणामुळे दिवस कसा आळसावल्यासारखा गेला होता. संध्याकाळचे साडेसात वाजले तरी वातावरण तसेच होते. आकाशात असणाऱ्या बिनपावसाच्या ढगांनी जसे वातावरण कुंद झाले होते. तसंच मनावरही मळभ आले होते. कंटाळा आल्याचे जाणवत होते. पण हा कंटाळा कामामुळे नव्हता. हा केवळ वातावरणाचाच परिणाम होता. अशा वातावरणात कार्यालयातून बाहेर पडलो. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात येताच वाऱ्याची एक झुळूक आली आणि मन प्रसन्न करून गेली. सारा कंटाळा, थकवा, मनावरचे मळभ कुठल्या कुठे दूर पळून गेले. मन प्रसन्न झाले कारण तो वारा एकटा आला नव्हता, तर, सोबत रातराणीचा गंध घेऊन आला होता.

रातराणी. सुगंधी फुल येणारी ही एक झुडुपवर्गीय वनस्पती. सोलॅनेसी कुलातील.‍ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सेस्ट्रम नॉक्टर्नम आहे. रातराणी ही तशी दक्षिण अमेरिका, वेस्ट इंडिज या भागातून जगातील सर्व उष्ण कटिबंधीय देशात पसरली. या वनस्पतीच्या दोनशेपेक्षा जास्त प्रजाती असल्या तरी भारतात केवळ आठ जाती आढळतात. हे सदाहरित झुडूप दहा बारा फुट उंच वाढते. मात्र चांगला आधार मिळाला, तर, या झाडाच्या फांद्या चांगल्या तीस फुटापर्यंत वाढतात. स्वतंत्रपणे मात्र अशी रातराणीची वाढ होत नाही. जरा जोराचा वारा आला तरी उंचावरील फांद्या मोडतात. राजारामपूरीतील भाजीमंडईच्या कोपऱ्यावरील म्हसोबा मंदिरासमोर या झुडुपाला स्वस्तिकच्या झाडाचा चांगला आधार मिळाला आहे. तेथे रातराणी चांगली झाडासारखी वाढली आहे. फुलते पण छान. नेहमी रातराणीची जमिनीलगत फुले पाहायची सवय असणाऱ्या लोकांना त्या परिसरात दरवळणारा सुगंध कोठून येतो, हे लवकर समजत नाही.

रातराणी ही खूप नाजूक वनस्पती आहे. वनस्पतीना तो, ती, ते मध्ये वर्गीकरण करणाऱ्यानी काय आधार घेतला माहीत नाही. मात्र मोगरा ‘तो’ असतो, तर रातराणी, जाई, जुई, चमेली या ‘ती’ असतात. कदाचित या वनस्पती खूपच नाजूक असल्याने आणि त्यांना खूप सांभाळावे लागत असल्याने त्यांचा समावेश ‘ती’ गटात केला असावा. मोगरा एकदा रूजल्यानंतर पुढे हेळसांड झाली तरी मरत नाही, म्हणून ‘तो’ मोगरा झाला असावा. रातराणीची मात्र चांगली काळजी घ्यावी लागते. रात्री फुलल्यानंतर सुगंध पसरवणाऱ्या निशिगंध, जाई, जुई, चमेली, मोगरा, कवठी चाफा, पारिजातक, मधुमालती अशा अनेक वनस्पती असल्या तरी रातराणीची सर यापैकी कोणालाच नाही. म्हणूनच तर ती रातराणी आहे. 

रातराणी सदाहरित वनस्पती आहे. तिला एकाआड एक पोपटी पाने येतात. तिच्या फांद्या या नाजूक आणि पातळ असतात. या झाडाच्या फांदीपासून सहज रोपे तयार होतात. अंगठ्याच्या आकाराचे आठ नऊ इंचाचे खोड घेतले आणि मऊ मातीत रोवले, त्याला पाणी दिले की ते फुटतेच. सुरुवातीला फांद्याचा रंगही हिरवा असतो. उलट तो पानांपेक्षाही गडद असतो. पुढे खोड वाढल्यानंतर ते पांढरा रंग धारण करते. पाने साधी आणि पातळ असतात. पानाच्या मध्ये असणारी शीर ही खूपच उठावदार असते. पाने दहा ते बारा सेंटिमीटर लांबीची असतात. ती पुढच्या टोकाला निमुळती होत जातात. ती जून झाली की गळतात. मात्र सर्व पाने एकावेळी झडत नाहीत. झाडाला पाणी, खत आणि हवा मिळाली की झाड सुसाट वेगाने वाढायला सुरुवात होते. याच्या फांद्यांना आणखी फांद्या फुटतात आणि झुडुप डेरेदार व्हायला लागते. ही झाडे चांगले वातावरण मिळताच इतकी वेगाने वाढतात की शेजारच्या झाडावर अतिक्रमण करतात. हे झाड बहुवर्षीय आहे. या झाडाच्या फांद्या कापल्या तर लगेच त्याला फांद्या फुटून वाढायला सुरुवात करतात. या कापलेल्या फांद्यांचा उपयोग नवी रोपे तयार करण्यासाठी करता येतो. 

पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत, कुंडीत हे झाड वाढते. रातराणी प्रामुख्याने बागांमध्ये लावले जाते. गैरसमजामुळे काही लोक घराशेजारी हे झाड लावणे टाळत. रातराणीच्या सुगंधाने साप या झाडाजवळ येतात, असा अनेकांच्या मनात गैरसमज होता. मात्र विज्ञानाच्या दृष्ट‍िकोनातून हे पूर्णत: चूक आहे. मात्र आता लोकांमध्ये जागरूकता आली आहे. आता ते अनेकांच्या बागांमध्येही दिसू लागले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी झाड बिनधास्त लावावे, या झाडामुळे साप येत नाहीत. 

झाड थोडे मोठे झाले की पानाच्या बेचक्यातून कळ्यांचे घोस बाहेर पडायला सुरुवात होते. नीट निगा राखलेल्या झाडाला अगदी वर्षाच्या आतच कळ्या येतात. या कळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की झाडाला पाने कमी आणि कळ्या जास्त असे चित्र निर्माण होते. या कळ्या लांब फिकट पिवळ्या रंगाच्या असतात. कळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की फांद्या ओझ्याने खाली वाकतात. रातराणीच्या कळ्या रात्री उमलतात आणि संपूर्ण परिसरात सुगंधाची पखरण करतात. सूर्य मावळल्यानंतर तासाभरांने सुगंध पसरायला सुरूवात होते. रात्र जशी वाढत जाते तसा हा सुगंध तीव्र होत जातो. या गंधीत वातावरणात कसालाही कंटाळा असो, थकवा असो कुठल्या कुठे पळून जातो. त्याचा मंद सुगंध मनाला मोहित करतो. ही सुगंधाची उधळण केवळ रात्रीच होते. त्यामुळेच याला अत्यंत समर्पक रातराणी, नाईट क्वीन, नाईट जस्मिन या नावाने ओळखले जाते. रातराणीच्या फुलांच्या पाकळ्या चांदणीप्रमाणे दिसतात, त्यामुळे त्याला चांदणीचे झाडही म्हणतात. रात्री निर्धास्तपणे फुलणारी रातराणी सूर्याला परके मानत असावी. झुंजूमुंजू होताच, सूर्याच्या उगवण्याची चाहूल लागताच या कळ्या मिटू लागतात. या कळ्या चार पाच रात्र फुलतात आणि नंतर बहुतांश कळ्या गळून जातात. कळ्या खालून वर उमलत जात असल्याने हा ‘गंध सोहळा’ दहा ते पंधरा दिवस सुरू असतो. अपवादात्मक कळ्यांचे फळात रूपांतर होते. झाडांना खरा बहर उन्हाळा आणि पावसाळ्यात येतो. मात्र झाडाची निगा नीट राखलेली असेल आणि त्याची छाटणी व्यवस्थित केली तर वर्षातून चार-पाच वेळा फुलते. रातराणीच्या फुलांचे दलपुंज खाली नळीसारखे येते. रातराणीच्या फुलांना पाच लहान पाकळ्या असतात. चांदणीचा आकार तयार करतात. त्या अंडाकृती, उभट आणि टोकाला बोथट असतात. रातराणीच्या काही फुलांच्या परागीभवनातून हिरवी फळे तयार होतात. त्यामध्ये अनेक लहान बिया असतात. मात्र रातराणीचे पुनरूत्पादन बियांपासून क्वचितच होते.

राततराणीच्या फुलांपासून अत्तर बनवले जाते. काही महिला रातराणीच्या फुलांचे गजरेही बनवतात. क्वचित असे गजरे विकलेही जातात. याच कुळातील दिवसा फुलणारे सेस्ट्रम डाययुर्नम या झाडाला डे जस्मिन किंवा ‘दिन का राजा’ असे म्हणतात. मात्र हा दिन का राजा ‘दिल का राजा’ बनू शकत नाही. रातराणीची जागा त्याला घेता येणे शक्य नाही. त्याचा सुगंध आणि सौंदर्य रातराणीच्या जवळही पोहोचत नाही.

कधी कधी वाटतं निसर्गात फुले नसती, तर माणसाला सुगंध तरी कळला असता का? फुलांच्या दर्शनाने,


त्याच्या सुगंधाने मनावरचा ताण, मनातील संताप दूर होतो. मन प्रसन्न होते. रातराणीचा सुगंध मनाला सकारात्मक विचार करायला भाग पाडतो. याच विचाराने विद्यापीठातील एफ-४ निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन रातराणीची रोपे लावली होती. आंब्याजवळही एक रोप लावले होते. आंब्याजवळचे रोप आंब्याच्या आधाराने चांगले पंचवीस फूट उंच झाले होते. या रातराणीचा वास अतिथीगृहापर्यंत पसरत असे. ही झाडे फुलली की दहा पंधरा रात्री संपूर्ण घर सुगंधीत झालेले असे. नऊ वर्षाच्या वास्तव्यानंतर मी निवासस्थान सोडून अपार्टमेंटमध्ये गेलो. निवासस्थान सोडले तरी रातराणीची आठवण जात नव्हती. शेवटी आम्ही कुंडीत रातराणी लावली आणि ती छान फुलायची. माझ्यानंतर त्या निवासस्थानात राहणाऱ्या अधिकाऱ्याने साप येतात या गैरसमजातून त्या झाडाची बेसुमार कत्तल केली. मात्र त्याला पूर्ण नामशेष होऊ दिले नव्हते.

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. फुलांची झाडेही आहेत. मात्र एक उणीव कायम जाणवत असे. ती म्हणजे या परिसरात सुगंधी फुलांच्या वनस्पती नाहीत. प्रशासकीय काम पाहताना अनेकदा कर्मचारी, अधिकारी संध्याकाळी उशिरांने घरी जातात. दिवसभरात कधीकधी तणावाचे प्रसंगही आलेले असतात. तो तणाव घरी घेऊन जाणे कुटुंब स्वास्थ्यावर परिणाम करते. अशावेळी मन प्रसन्न करणाऱ्या रातराणीचा सुगंध पसरलेला असेल तर… हाच विचार घेऊन उद्यान विभागामार्फत मुख्य इमारतीच्या पुढे असणाऱ्या दोन्ही त्रिकोणाच्या तीन कोपऱ्यावर रातराणीची झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी रोपे विकत आणण्याऐवजी एफ-४ निवासस्थानाबाहेर असणाऱ्या झाडाच्या फांद्या आणून रोपे बनवली आणि ती रोपे लावली. काही दिवसातच विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी आणि फिरायला येणाऱ्या लोकांचे हे दोन्ही त्रिकोण आकर्षणाचे केंद्र बनले.

त्याचा पुढचा टप्पा म्हणून अनेक ठिकाणी ही रातराणीची रोपे बनवून लावली आहेत. विद्यापीठातील अनेक रस्त्याच्या कडेला रातराणी लावली आहे. रातराणी अनेक कवी, लेखकांच्या आवडीची आहे. कविता आणि गद्यातही रातराणीला मोठे स्थान मिळालेले आहे. विवेक पुराणिक या कवीने ‘रातराणी’ या कवितेत म्हटले आहे,

‘बहरली रातराणी अन् बहरून येई चंद्र,

गारव्यात प्रीतिच्या उभय जाहली मुग्ध बेधुंद

त्या धुंदितच रातराणी लाल गुलाबी स्वप्नी रंगते’

रातराणीला पाच मदन बाणातील एक असेही म्हटले जाते. रातराणीचा संदर्भ कथा, कादंबऱ्यात आणि कवितामध्ये या अनुषंगानेच आला आहे. प्रेमकथा आणि कवितामध्ये रातराणी राणीसारखी विराजमान झालेली दिसते. रातराणीचा खूप सुंदर वापर १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अमर प्रेम’ या चित्रपटात केला आहे. शर्मिला टागौर (पुष्पा), राजेश खन्ना (आनंद) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात रातराणीचे वर्णन करणारे सुंदर संवाद राजेश खन्नाच्या मुखातून ऐकायला मिळतात.

मात्र, रातराणीचा फुललेला फुलोरा, फुलल्यानंतर आसमंत सुगंधीत करणे आणि सुगंध पसरवून झाल्यानंतर गळणे पाहिल्यानंतर मनात विचार येतात यातून झाडाला काय मिळते? काहीच नाही. रातराणीची फुले फुलून त्यातून परागीभवनही अपवादानेच घडते. त्यामुळे प्रजननाचाही भाग नाही. रातराणीचे झाड वाढते ते इतराना ऑक्सिजन देण्यासाठी, झाड फुलते इतरांना सौंदर्यसुख देण्यासाठी, झाड फुलते ते इतरांना सुगंध देण्यासाठी, फुलल्यानंतर त्याच्या कळ्या गळून जातात. या झाडापासून काय शिकावे तर दातृत्व. कोणत्याही अपेक्षेशिवाय. स्वत:साठी काहीही न मिळवणाऱ्या, या झाडांच्या कळ्यांही निर्माल्य होऊन मातीत मिसळतात. सर्व काही देणाऱ्या या दानशूर वनस्पतीला त्यामुळेही ‘रातराणी’ हे नाव खऱ्या अर्थाने शोभून दिसते. रातराणीच्या नावात राणीपण असले तरी तिचे वागणे एखाद्या निर्मोही साधकाप्रमाणे! म्हणूनच हे झाड सर्वांना प्रिय असावे. फुललेल्या झाडाचे सौंदर्य आणि सुगंध या झाडाला ‘Beauty with Aroma’ बनवते हे मात्र निश्चित!

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

रस्ता : संगम सप्तपर्णी आणि पिचकारीचा

 जुना पुणे-बेंगलोर रस्ता. गत तीस वर्ष या रस्त्याला पाहात आहे. वीस वर्षापूर्वी वडाच्या सावलीने झाकलेला होता. रूंदीकरणात ही झाडे कापली गेली. रस्ता रूंद झाला आणि आता त्या रस्त्याकडेला सप्तपर्णी आणि पिचकारीची झाडे लावली आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही दोन्ही झाडे एकाचवेळी फुलतात. या रस्त्याला सुंदर बनवतात. या दोन झाडाविषयी आणि एकूणच रस्त्याविषयच्या भावना या लेखात मांडल्या आहेत. 

_________________________________________________________

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा. संध्याकाळची वेळ. सूर्य पश्चिमेच्या क्षितीजाला टेकलेला. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागापासून सिंथेटीक ट्रॅककडे जाणारा रस्ता. सूर्याला थांब’ म्हणून विनवायला वारा धावत होता. त्या मंद वाऱ्याने सूर्याला भेट देण्यासाठी सोबत अत्तराची कुपी घेतली होती. त्यातील थोडे अत्तर बाहेर सांडावे आणि त्याचा गंध हवेत पसरावा, असा सुगंध त्या हवेत पसरला होता. त्या वाऱ्याबरोबर आलेल्या सुगंधाने मन धुंद झाले. त्या रस्त्यावर फिरताना यापूर्वी असा गंध कधीच जाणवला नव्हता. हा सुगंध कशाचा हे लक्षात येत नव्हते. हायड्रोजन सल्फाईडचा नकोसा गंध ही रसायनशास्त्र प्रयोगशाळेची ओळख. सुगंधाचे या प्रयोगशाळेला वावडे. बरं, संध्याकाळची वेळ असल्याने प्रयोगशाळेतील गंधाची शक्यता शून्य. त्या निर्जन भागात तो गंध एखाद्या वृक्ष-वेलीच्या फुलांखेरीज अन्य कशाचा असण्याची सुतराम शक्यता नव्हती. येणारा हा दरवळ कुतुहल वाढवत होता. मात्र संधीप्रकाशात तो कशाचा हे शोधणे शक्य नव्हते. 

रात्र उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या सुगंधाचे कारण शोधण्याची मोहीम सुरू केली. अर्थात हा शोध जुन्या पुणे-बेंगलोर रस्त्यावर. हा रस्ता शिवाजी विद्यापीठाला पूर्व आणि पश्चिम भागात दुभागतो. हा रस्ता गत तीस सालात कसा बदलत गेला, याचा मी एक साक्षीदार. रस्ता रूंदीकरणात जुन्या रस्त्याकडेची पारंब्याची कमान करणारी वडाची झाडे इतिहासजमा झाली आहेत. या झाडांच्या पारंब्यांची कमान येणाऱ्यांचे जणू स्वागत करायची. त्याचप्रमाणे जाणाऱ्याला वाकून नम्रपणे ‘पुन्हा या’ असे अगत्याने सांगायची. दोन्ही बाजूला विद्यापीठ असल्याने घरे नव्हती. नाक्याच्या परिसरात आज असणारी वस्तीही नव्हती. विद्यापीठातील मुलांमुलींचा त्या रस्त्यावर कायम वावर असायचा. ही वडाची झाडे तोडल्यापासून मन घट्ट करूनच त्या रस्त्यावरून जातो. त्या रस्त्यावर गेले की मन उदास व्हायचे. विद्यापीठातील पाण्याच्या कामासाठी एकदोन वेळा सोडले, तर, त्या रस्त्यावर अशात चाललो नाही. ते चालणेही ‘पाणी केंद्रीत’ होते. त्यामुळे रस्त्यावरील नव्या घडामोडीकडे पूर्ण दुर्लक्षच होते. मात्र या सुगंधाचा शोध घेत रस्त्यावर गेलो. फार वेळ शोध घ्यावा लागला नाही. काही क्षणांत अत्यंत मनोहर चित्र समोर आले. सुगंधाच्या शोधाच्या नादात दोन शोध लागले. पहिला म्हणजे तो सुगंध सप्तपर्णीच्या फुलांचा. दुसरा असा की वडाची सर घेणारा नसेल पण आज हा रस्ता खूपच सुंदर झाला आहे. रस्त्याला सौंदर्य लाभले आहे ते सप्तपर्णी आणि पिचकारीच्या झाडांचे. एकाआड एक लावलेली आणि एकमेकांशी स्पर्धा करत फुललेली ही दोन प्रकारची झाडे रस्त्याला एक सौंदर्य प्रदान करत आहेत.

सप्तपर्णी हे मूळ भारतीय झाड असले तरी पूर्वी क्वचितच दिसायचे. आज मात्र त्याच्या सुंदर रूपामुळे उद्यानात, रस्त्याकडेला, काहींच्या वैयक्तिक बागांमध्ये हे झाड लावलेले दिसते. पक्ष्यातील सातभाई जसे सातजण एकत्र दिसतात, तशी या झाडाला एकाच ठिकाणी सात पाने येतात. त्यावरूनच त्याचे नाव सप्तपर्णी पडले. त्याला सातवीणही म्हणतात. संस्कृतमध्ये सप्तपर्ण:, विशालमच्छदा, विशालत्वक, सारदा या नावाने ते ओळखले जाते. हिंदीमध्ये सटवन, चाटीवन, चितवन या नावाने ओळखले जाते. बंगालीमध्ये चट्टीम, असामीमध्ये सोटीयाना, गुजरातीत सतुपर्णी, उर्दूमध्ये कशीम, तमिळमध्ये इलाई पिल्लाई, मुकुमपिलाई, कन्नडमध्ये अलेले हाले, बंताले, दोड्डापला, मंगलापल्ला, अशा विविध नावाने ओळखले जाते. त्याला सटवीन, शैतान का पेड, सैतान, डेव्हिल्स ट्री अशी नावे मिळालेली आहेत. अर्थात ही नावे त्याच्या विषारी गुणधर्मामुळे मिळाली आहेत. त्याच्या शेंगा लागल्यानंतरच्या रूपामुळे त्याला चेटकिणीचे झाड म्हणत असावेत. एकिकडे त्याला अशी असुरी नावे दिली असताना त्याला ‘स्कॉलर ट्री’ असेही म्हणतात. शाळेची सुरुवात पाटीपासून होते. या पाट्या बनवण्यासाठी या झाडाचे लाकूड वापरले जाते. शाळेतील बोर्डही यापासून बनवत. त्यामुळे त्याला हे नाव मिळाले. त्याला स्कॉलर ट्री म्हणत असल्याने काहीजण असेही सांगतात की, त्याखाली बसून अभ्यास केला तर स्मरणशक्ती वाढते. मात्र याला शास्त्रीय आधार नाही. वनस्पतीशास्त्रात त्याला ‘अल्स्टोनिया स्कॉलरिस’ या नावाने ओळखले जाते. अपोसायनेशी कुळातील हे झाड आहे. त्याच्या नावात अल्स्टोनिया हे नामवंत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. सी. अल्स्टोन यांच्या सन्मानार्थ घेण्यात आले आहे. तर स्कॉलरॅसिस हे या झाडापासून पाटया बनवत असल्याने आले.

त्याला ब्लॅक बोर्ड ट्री, इंडियन डेव्हील ट्री, डीटा बार्क ट्री, मिल्कवूड पाईन ट्री, व्हाईट चेस वूड ट्री, पुलाई इत्यादी नावानेही इंग्रजीत ओळखले जाते. सुरुवातीला शांतीनिकेतन विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी या झाडाची फांदी देत. पदवीधरानांही पदवीसोबत या झाडाची फांदी देण्याची पद्धत शांतिनिकेतन विद्यापीठाचे संस्थापक कविवर्य रविंद्रनाथ टागोर यांनी सुरू केली. आज पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून या झाडाचे एक पान दिले जाते. या झाडाला पश्चिम बंगालच्या राज्यवृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

हा वृक्ष उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात आढळतो. याचे मूळ भारतीय उपखंडातील. भारत, जपान, श्रीलंका, बांग्लादेश, ब्रम्हदेश, मलेशिया, तसेच ऑस्ट्रेलियातील जंगलात आढळतो. हा निमसदाहरित वृक्ष आहे. या झाडांची उंची साठ मीटरपर्यंत वाढते. झाडाच्या बुंध्याचा व्यासही सहा फुटांपर्यंत वाढतो. जास्त पाऊस असणाऱ्या आणि आर्द्रता जास्त असणाऱ्या भागात हा वृक्ष जोमाने वाढतो. मात्र त्याला जमीनही चांगली असावी लागते. खडकाळ माळरानावर हा वृक्ष म्हणावा तसा वाढत नाही. त्याच्या सुंदर आकारामुळे हल्ली त्याला बागांमध्ये आणि रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात लावले जाते. अर्थात पोषक जमीन आणि भरपूर आर्द्रता असेल तर तो १२०० फूट उंचीवरही वाढतो.

या झाडाची रोपे बियांपासून बनवली जातात. उन्हाळ्यात या झाडांच्या बिया फळ फुटण्यापूर्वी गोळा केल्या जातात. या झाडांच्या शेंगामध्ये बारीक केसाळ बिया असतात. पंख असल्यासारख्या बिया असल्या तरी त्या अशा प्रकारच्या इतर बियांप्रमाणे वाऱ्याबरोबर दूरवर जाऊ शकत नाहीत. या झाडांची रोपे वर आल्यानंतर सात पाने एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे त्याला सप्तपर्णी म्हणत असले तरी कधी कधी ही पानांची संख्या कमी जास्त होते. काही वेळा तर अगदी दहा पानेसुद्धा असतात. कालिदासाच्या ‘रघुवंशा’मध्ये या झाडाचे वर्णन करणारा छान श्लोक आहे.

‘सप्तच्छद क्षीरकटुप्रवाहमासह्यमाघ्राय मदं तदीयमl

म्हणजेच सात पाने असणाऱ्या सप्तपर्णी या झाडाचा पांढरा कडू चीक असतो, त्याचा दर्प रानटी मदमस्त हत्तीच्या मदासारखा असतो. महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, बृहतसंहिता, किरातार्जुनिय इत्यादी ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांच्या ग्रंथातही सप्तपर्णीच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन केले आहे.

    या झाडाची रोपे थोडी मोठी होताच त्याला फांद्या यायला सुरुवात होते. सर्व बाजूंनी या फांद्या गोलाकार वाढत जातात. त्यातील मुख्य भाग आकाशाकडे तोंड करून वाढत जातो. मात्र त्यापेक्षा या झाडाचा भर आपला आडवा आकार वाढवण्यावर असतो. तो जसा वर जाईल, तशी फांद्यांची संख्याही वाढत जाते. फांद्या ठराविक अंतरावर येतात. या स्वत:ला नियमात बांधून वाढण्याच्या गुणामुळे याचे सौंदर्य वाढते. फुले नसलेले झाडही त्यामुळेच सुंदर दिसते. या फांद्यांना चमकदार पोपटी रंगांची पाने असतात. पानांचा आकार आंब्याच्या किंवा जांभळीच्या पानासारखी असतात. मात्र पुढच्या टोकाला ती टोकदार न बनता गोलाकार असतात. पानांची लांबी दहा ते वीस सेंटीमीटर तर रूंदी तीन ते पाच सेंटीमीटर असते. पाने खालच्या बाजूला पांढरट असतात. पानांवरील शीरा स्पष्ट दिसतात. त्या पानांचे सौंदर्य वाढवतात. कवी मनाचे रविंद्रनाथ टागोर कदाचित या सौंदर्यामुळेच सप्तपर्णीच्या प्रेमात पडले असावेत. झाडाला आकार देण्यासाठी खालील फांद्या काढून टाकल्या जातात. खोड हे खडबडीत करड्या पांढरट रंगाचे असते. या झाडाच्या कोणत्याही भागाला जखम केली, पान तोडले तर त्यातून दुधासारखा चिक बाहेर पडतो. हा चिक त्यात असणाऱ्या अल्कोलॉईड्समुळे विषारी असतो.  
     
चार ते पाच वर्षांची झाडे दहा-पंधरा फूट उंच झाल्यानंतर त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कळ्या येतात. कळ्या झुपकेदार आणि जमिनीकडे झुकलेल्या असतात. झाडाच्या फांद्यांवर कळ्यांची इतकी गर्दी झालेली असते की त्या ओझ्याने फांद्या जमिनीकडे झुकतात. जणू काही साजशृंगार केलेली नववधूच. तिने आपले मुखकमल पदराने झाकावे, तशी सर्व पर्णसंपदा या कळ्या आणि फुलांआड लपलेली असते. पांढऱ्या-ऑफ व्हाईटच्या जवळ जाणाऱ्या रंगांची बारीक नाजूक फुले असतात. फुलाला पाच पाकळ्या असतात. ही फुले पारिजातकाच्या फुलांसारखी असतात. पारिजातकासारखा लाल देठ मात्र नसतो. सप्तपर्णीच्या काही वाणांना पिवळी, गुलाबी किंवा हिरव्या रंगाची फुले येतात. आपल्याकडे मात्र बहुतांश झाडे पांढऱ्या रंगात न्हाऊन निघतात. त्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांनी केलेल्या गर्दीमुळे जवळ जाऊन बारकाईने पाहिल्याखेरीज हे लक्षात येत नाही. ही झाडे फुलली की त्यापासून मादक सुगंध येतो. सप्तपर्णीचे एक झाड फुलले तरी त्याचा सुगंध एक किलोमीटर दूर पसरतो. झाड जितके सुंदर तितकीच ही फुलेही सुंदर आहेत. ही फुललेली झाडे पानांनाही झाकून टाकतात त्यामुळे श्रीलंकन लोकांना या झाडात विग घातलेला माणूस दिसतो. म्हणून श्रीलंकेत त्याला ‘विग बनियन ट्री’ असेही ओळखले जाते.

    फुलांपासून काही दिवसात शेंगा तयार व्हायला सुरूवात होते. काही काही झाडांना चांगल्या फुटभर लांबीच्या शेंगा येतात. पोपटी रंगाच्या शेगा या झाडाचे रूपडेच बदलून टाकतात. या शेंगा झाडांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. वडाच्या पारंब्यासारख्या मात्र सर्व एकाच आकाराच्या शेंगा जमिनीकडे झुकलेल्या असतात. साधारण मार्च-एप्रिलमध्ये या शेंगा पक्व होतात. पक्व शेंगांचा रंग तपकिरी होतो. त्यानंतर उन्हाचा तडाखा सुरू झाला की त्या फुटतात आणि चपट्या तपकिरी बिया खाली गळतात. बिया चार ते पाच मिलीमीटर लांबीच्या असतात. या बियांना सात ते तेरा सेंटीमीटर लांबीचे केस किंवा पंख असतात. मात्र या बिया आळश्यासारख्या वागतात. सुंदर पंख असूनही त्या दूरवर जात नाहीत. त्यामुळे भरपूर फुले, फळे आणि बिया येत असल्या तरी या झाडाचे पुनरूत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. जाणीवपूर्वक बिया गोळा करून रूजवल्या, तर मात्र त्या सहज रूजतात. आज बियांपासून रोपे तयार करून मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत. हे झाड त्याच्या सौंदर्यामुळे अनेक ठिकाणी लावले जाते. मात्र या झाडाचे सर्वच भाग सौम्य ते तीव्र विषारी आहेत.

या झाडांचे लाकूड खूपच मऊ असले तरी टिकाऊ असते. आतून लाकडाचा रंग पिवळसर पांढरा असतो. त्यामुळे या झाडाच्या लाकडाचा उपयोग टिकाऊ गोष्टी बनवण्यासाठी केला जातो. शाळेतील फळे, पाट्या, पॅकिंगसाठीची खोकी, सप्तपर्णीच्या लाकडापासून बनवली जातात. त्याच्या सालीचा औषधी उपयोग केला जातो. ताप आणि अतिसारावर साल उपयोगाला येते. दातदुखी, मलेरिया, स्नायुदूखी, घसाविकार, खोकला, सर्पदंशावरही सप्तपर्णीच्या सालीपासून औषध बनवले जाते. मात्र याचे प्रमाण जास्त झाल्यास घातक ठरते. त्यामुळे या झाडाला सैतानाचे झाड असे म्हणतात. भारतातील पश्चिम घाटातील आदिवासी लोक यामुळे या झाडाखाली झोपत नाहीत. या झाडाखाली ती बसतसुद्धा नाहीत किंवा या झाडांची सावली अंगावर पडू देत नाहीत. सुंदर गोष्टींचे सौंदर्य ओरबडण्याची आपली सवय. या झाडाला त्याचा त्रास होऊ नये आणि माणसापासून सर्वांना दूर ठेवण्यासाठी निसर्गाने केलेली रचना असावी. सप्तपर्णीचे झाड म्हणजे ‘शापीत सौंदर्या’चे उत्तम उदाहरण. काही असो, या ‘सैतानाच्या झाडा’ला आपण ‘स्कॉलरली’ समजून घेत जगवायला पाहिजे, हे मात्र निश्चित.

जुन्या पुणे - बेंगलोर रस्त्यावरील सौंदर्यात सप्तपर्णीच्या बरोबरीने भर घालत होते ते आफ्रिकन टयुलिप ट्री. एकाआड एक अशी सप्तपर्णी आणि आफ्रिकन ट्युलीपची झाडे लावली आहेत. सप्तपर्णीच्या बरोबर उलटे वागणारे हे झाड, मात्र, दोघांचाही फुलण्याचा काळ एकच. त्यात ही दोन्ही झाडे या रस्त्यावर कल्पकतेने लावली आहेत. ही फुललेली झाडे पाहताना शिवाजी विद्यापीठ परिसराला लाल पांढऱ्या फुलांचा हार घातल्यासारखे सुंदर चित्र दिसत होते.

आफ्रिकन ट्युलिप ट्री़. मराठीत याला पातरी किंवा पिचकारी म्हणून ओळखतात. याला येणाऱ्या कळ्यांमध्ये पाणी असते. त्या पाण्याची पिचकारी उडते, म्हणून त्याचे नाव पिचकारी किंवा फाउंटन ट्री पडले. लहान मुले याला बोटीचे झाडही म्हणतात. याचे फळ फुटल्यानंतर रिकामे फळाचे कवच पाण्यात छान तरंगते. त्याचा आकारही वल्हवायच्या बोटीसारखा. म्हणून हे बारसे. हा वृक्ष दक्षिण आफ्रिकेतील अंगोला प्रांतातून जगभर पसरला आहे. भारतातही अनेक राज्यात रस्त्याकडेला याला शोभिवंत वृक्ष म्हणून लावलेले आढळते. या झाडाचे कुळ बायग्नोनियासी आहे. याचे वनस्पतीशास्त्रीय नाव स्पॅथेडिया कम्पॅनुलाटा असे आहे. याच्या कळ्यांचा गुच्छ येताना ढालीसारखा येतो. ढालीला ग्रीक भाषेत स्पॅथ म्हणतात. त्यावरून स्पॅथेडिया. तर त्याची फुले ही घंटापात्राच्या आकाराची असल्याने कम्पॅनुलाटा याच्या नावात घेण्यात आले.

    हे झाड अगदी ऐंशी-पंच्याऐंशी फुटांची उंची गाठते. याची मुळे मात्र वरवरच असतात. त्यामुळे वादळात मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचा प्रसार वेगाने होत असल्याने त्याला आक्रमक वृक्षांच्या यादीत घातले आहे. या झाडांच्या बिया मातीत कोठेही ओलावा मिळताच रूजतात. तसेच फांदी आणि मुळापासूनच्या फुटव्यापासूनही रोपे बनवली जातात. त्याची वेगाने वाढ सुरू होते आणि काही महिन्यांत चार पाच फुटांची उंची गाठते. हा सदाहरित वृक्ष आहे. याला संयुक्त पाने येतात. एका पानावर पाच ते वीस मोठ्या आकाराच्या पर्णिका असतात. अंडाकृती पर्णिकांची लांबी अगदी १५ सेंटीमीटरपर्यंत असते. पानांचा रंग गर्द हिरवा असतो. पाने दाट असल्याने त्याची सावली गर्द असते. खोड कोवळे असताना पिवळसर पांढरे असते. नंतर ते किरमिजी रंग धारण करते. मूळ रोपांची उंची दहा ते पंधरा फूट झाल्यावर त्याला फांद्या यायला सुरुवात होते. या फांद्या जशा वाढत जातात, तसा त्याचा आकारही वाढतो. मात्र त्याची उंची जास्त वेगाने वाढते.

पिचकारीच्या फांद्या जाड असतात. जरासे वादळ आले तरी मोडतात. मात्र सुस्थितीत असलेल्या झाडांचा विस्तार चाळीस फुटापर्यंत वाढतो. त्यांच्यावर गोलाकार पांढरे ठिपके येतात. कोवळ्या फांद्यावर लव असावी, तसे चमकदार तपकिरी केस असतात. मात्र खोड जाड होताना हे केस गळून जातात. पर्णिंकांच्या देठाजवळही असे केस असतात. या झाडाचे लाकूड हलके असल्याने त्याच्या तुटलेल्या फांद्याच्या ठिकाणी छिद्रे तयार होते. अशा ठिकाणी पक्षी आपली घरे तयार करतात. या झाडांची पुरेशी वाढ झाल्यानंतर पावसाळ्याच्या अखेरीस सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये कळ्या यायला सुरुवात होते. टोकाला अनेक कळ्यांचा गुच्छ ढालीसारखा येतो. तांब्यासारखा लालसर, तपकिरी रंगांचा हा गुच्छ जसा वाढत जातो, तशा कळ्या म्हशीच्या शिंगाचा आकार धारण करतात. या कळ्यांमध्ये पाणी असते. या पाण्याची लहान मुले पिचकारी उडवत खेळतात. हे पाणी कपड्यावर पडले तर पिवळसर डाग पडतात. या कळ्यांवरही केस असतात. हे कळ्यांचे गुच्छ टोकाला सुरुवातीला येतात आणि नंतर ते खालच्या फांद्याकडे यायला सुरूवात होते. गुच्छातील कळ्या बाहेरून आत फुलत जातात.

कडेच्या कळ्या वाढतात आणि त्याचे फूल बनते. फुलांचा रंग नारंगी शेंद्री असतो. टोकाला आलेली फुले खूप आकर्षक असतात. गडद हिरव्या रंगावर लाल ठिपके खुलून दिसतात. फुलांचा घंटेसारखा आकार असतो. आतमध्ये असणारे पुंकेसर-स्त्रीकेसर कायम ओलसर असतात. फुले कायम वरच्या दिशेला तोंड करून फुलतात. यामुळे पाऊस, दवामुळे या फुलात पाण्याचे थेंब जमा होतात. हे चाखण्यासाठी पक्षी त्या फुलाजवळ जातात आणि नकळत परागीभवनही घडत जाते. विशेषत: हमिंगबर्डचे हे आवडते काम. मधमाशा मात्र या फुलाकडे फिरकत नाहीत. यातील मध हा त्यांच्यासाठी विषारी असतो. या फुलांचा आकार ट्युलिपच्या फुलांची आठवण करून देतो, म्हणून त्याचे सुरुवातीपासून आफ्रिकन ट्युलिप ट्री असे बारसे झाले आहे. फुलाबाहेर असणारा लाल रंगाचा भाग हा सात-आठ सेंटीमीटर लांबीचा असतो. आत पिवळ्या सुदंर रेषा असतात. फुले तीन दिवस फुललेली असतात. तशी ही झाडे वर्षभर फुलत असतात. मात्र खरा बहर असतो तो पावसाळ्याच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये.

फुलांचे परागीभवन झाल्यानंतर हिरवी शेंगेसारखी फळे तयार होतात. ही फळेही वर तोंड करूनच वाढतात. टोकाला आलेली ही फळे खिलाऱ्या बैलांच्या शिंगासारखी सरळ आणि पुढे टोक असणारी असतात. इतर कोणताही नवा भाग तयार होताना असणारी केसाळ रचना या फळांपासून मात्र दूर असते. पानांच्या तुलनेत फळाचा रंग फिकट असतो. फळे हिरवी असताना आतील भाग पांढरट असतो. फळे पक्व झाल्यानंतर वरचे आवरण तपकिरी रंग धारण करते. मात्र त्याला चमक नसते. हे फळ उन्हाळ्यात फुलते आणि आतून बिया बाहेर पडतात. हे आवरण एका बाजूला जोडलेलेच राहते. त्याला आपोआप बोटीचा आकार आलेली असतो. ही फळे विषारी असतात. आफ्रिकन शिकारी बाणांना विषारी बनवण्यासाठी फळे उकळून त्यामध्ये बाणांचे टोक बुडवतात. पाण्यात फळांचे आवरण छान तरंगत राहते. आतील बिया सोनेरी रंगाच्या चपट्या असतात. एका फळामध्ये पाचशेपर्यंत बिया असतात. आफ्रिकेत या बिया खाण्यासाठी वापरल्या जात असल्याचे संदर्भ मिळतात. त्यांना पांढरे पंख असतात. या पंखामुळे वाऱ्याबरोबर उडत त्या दूरवर जातात आणि योग्य वातावरण मिळताच रूजतात.

हे झाडही तसे औषधी आहे. याच्या पानाचा आणि सालीचा काढा कातडीवरील चट्टे घालवण्यासाठी वापरतात. आपल्याकडे दगडी पाला लावतात, तशी फुले कुस्करून जखमावर लावली जातात. तोंडामध्ये जर आल्यास सालीचा वापर केला जातो. मधुमेह, एड्स, पचनसंस्थेतील दोष, मूत्रविकारासाठी या झाडाच्या सालीचा, पानांचा आणि फुलांचा वापर केला जातो. कळ्यांतील पाणी हे भूखवर्धक मानले जाते. हे झाड पन्नास ते दीडशे वर्षांपर्यंत जगू शकते.

शोभेचे झाड म्हणून आज पिचकारीचे झाड मोठ्या प्रमाणात लावले जाते. मात्र याचे लाकूड मातीशी संपर्क येताच लगेच कुजते. त्यामुळे जळणाखेरीज त्याचा फारसा उपयोग होत नाही. जंगलाचे प्रमाण वाढावे यासाठी या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चांगल्या जमिनीत हे झाड चांगले वाढते. मात्र खडकाळ जमिनीवर ही झाडे जगत नाहीत. या झाडाची पाने आणि फुले माती सुपीक बनवण्याचे काम करतात. अतिपर्जन्यमान असणाऱ्या भागांतही ही झाडे चांगली वाढतात. मात्र या झाडाला सूर्यप्रकाश भरपूर मिळावा लागतो. झाडाचे वय जसे वाढेल, तसे फांद्या कमकुवत होत जातात आणि अखेर मोडतात. मात्र त्यावर आलेली फुले माणसाची नजर खिळवून ठेवतात.

अशी ही दोन झाडे. सप्तपर्णी भारतीय, तर पिचकारी विदेशी. सप्तपर्णीची पाने पोपटी, तर पिचकारीची गर्द हिरवी. सप्तपर्णी खालून वर फुलत जाते, तर पिचकारी वरून खाली. सप्तपर्णीची फुले आणि फळे जमिनीकडे झुकलेली, तर पिचकारीची आकाशाकडे तोंड करून बसलेली. सप्तपर्णीची फुले शांत पांढरी, तर पिचकारीची फुले नारंगी लालसर अगदी आग लागल्यासारखी. सप्तपर्णीच्या बिया केस असूनही वाऱ्याबरोबर न उडणाऱ्या, तर पिचकारीच्या बिया वाऱ्याशी स्पर्धा करत पसरणाऱ्या. सप्तपर्णीचा गंध मनाला मोहवून टाकणारा, तर पिचकारीचा गंध शोधूनही न मिळणारा. सप्तपर्णीची नाजूक लहान फुले, तर त्यापेक्षा शेकडो पटीने मोठी भडकरंगी पिचकारीची फुले. सप्तपर्णी विषारी गुणधर्माने डेव्हिल्स ट्री बनलेले, तर पिचकारी ट्युलिपची आठवण करून देणारे. सप्तपर्णीखाली माणूस बसायलाही जात नाही, तर पिचकारीखाली आनंदाला उधाण येते. सप्तपर्णीचा देशी बाणा, तर पिचकारीला विदेशी ताठरपणा. सप्तपर्णीच्या शेंगाही नाजूक चवळीच्या शेंगेसारख्या, तर पिचकारीची फळे शेंड्याबुडख्याला निमुळत्या आणि मध्ये फुगलेल्या.

दोन झाडात कोणताच मेळ नाही. कसलेच साम्य नाही. सर्वच विसंगत. मात्र या विसंगतीचा सुंदर मिलाफ त्याच्या फुलण्याच्या एकाच कालावधीमुळे जुळून येणारा. दोन्ही झाडांचा आरोग्यासाठी औषधे बनवण्यासाठी मात्र वापर केला जातो. या रस्त्यावर पंधरा २००५-०६ पर्यंत असणाऱ्या वडाच्या जागेवर ही दोन्ही झाडे लावलेली आहेत. ही झाडे पर्यावरणाच्या दृष्टीने वडांच्या झाडांची जागा घेऊ शकत नाहीत. मात्र अनेकदा विकासासाठी अशी किंमत मोजावी लागते. ही फुललेली झाडे पाहताना मन फुलून गेले.

खरंच रस्ता सुंदर दिसत होता. बालसुलभ संस्कारातून याला कोणाची नजर लागू नये, असा विचारही मनात तरळून गेला. नजर लागते की नाही माहीत नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या रस्त्याच्या पश्चिम बाजूस नको ते घडले. त्या बाजूने, रस्त्याच्या कडेने विद्युत वाहक तारा नेण्यात आल्या आहेत. या ताराखालीच ही दोन प्रकारची झाडे सौंदर्याची उधळण करत उभी होती. विद्युत कर्मचाऱ्यांची नजर या तारेपर्यंत वाढलेल्या झाडावर पडली. या कर्तव्यकठोर कर्मचाऱ्यांनी निष्ठूरपणे या झाडावर कुऱ्हाड चालवली आणि ही सुंदर रचना विस्कटली. ही झाडे अशी तोडली हाेती की पाहवत नाही. या कर्मचाऱ्यांनी विचारपूर्वक आवश्यक तेवढयाच फांद्या कापायला हव्या होत्या, असे वाटत होते. मात्र पोष्टमन जर पाकिटाचा रंग पाहून गुलाबी पाकिटावर हळूवारपणे शिक्का मारायचा, विचार करू लागला तर त्याचे काम उरकणार नाही. तसेच हे कर्मचारी सौंदर्यदृष्टी सांभाळत फांद्या कापू लागले तर काम संपणार नाही… त्यापेक्षा ही विद्युत वाहिनी जमिनीखालून नेली तर… मात्र हे अधिकाऱ्याने, व्यवस्थेने ठरवायला हवे… अन्यथा, दरवर्षी हे असेच घडत राहणार… झाड फुलणार आणि त्यावर कुऱ्हाडही चालणार!