बुधवार, १२ मे, २०२१

पांढरफळी…

 



पांढरफळी… एक झुडुपवर्गीय वनस्पती... माळरानावर जंगलात सर्वत्र आढळणारी. आपल्या मस्तीत वाढणारी… जगणारी… खूप छान फुलणारी… फुललेले असो वा फळांनी भरलेले झाडाचे सौंदर्य एप्रिल ते जून या तीन महिन्यांत पहावे आणि डोळ्यांत साठवून ठेवावे असे. या झाडाविषयी आणि त्याच्या उपयोगाविषयी…


____________________________________________________________

 चैत्र महिना चैतन्याचा, सजीवसृष्टीचा नव्याने फुलण्याचा! या महिन्यात अनेक झाडे फुलतात. बहावा, सीतारंजन, कामिनी, अनेक प्रकारचे पाम, मोगरा, पारिजातक, जाई, जुई अशी अनेक. जंगलातील वातावरण तर गंधमिश्रीत झालेले असते. जंगल असणाऱ्या आणि नसणाऱ्या भागातही एक अशीच झुडुपवर्गीय वनस्पती उगवते, वाढते. सध्या या वनस्पतीचा बहराचा काळ. काही झाडे फुललेली आहेत. काहींनी फळे तयार करायला सुरुवात केली आहे तर काहींची फळे आता खाण्यायोग्य झाली आहेत. असे हे झुडुप म्हणजे पांढरफळी. समर्थ रामदास यांच्या ‘बाग’ प्रकरणातही त्याचा उल्लेख पांढरफळी असाच आहे. काही जण त्याला पांढरकळी म्हणतात. तर, काही भागात याला पीठवणी म्हणून ओळखले जाते. बुंदीच्या कळ्यांच्या आकाराची पांढरी फळे असल्याने पांढरकळी. सध्या माळरानावर आणि जंगलात सर्वत्र या झाडांचा मंद गंध भरलेला आहे.

पांढरफळीला हिंदीमध्ये शिनार म्हणतात. संस्कृतमध्ये याला भूरिफली, पान्डुफली, श्वेतकम्बुज, श्वेतमभूजा असे म्हणतात. दक्षिण भारतात याचे नाव कटुपीला आहे. इंग्रजीमध्ये याला इंडियन स्नोबेरी, बुशवीड, व्हाईट हनी श्रब म्हणून ओळखले जाते. याला शास्त्रीय भाषेत फ्ल्युजिया ल्युकोपायरस म्हणतात. ही झुडपे आसेतू-हिमालय, सर्वत्र मुक्त संचार करत वाढत असतात. पांढरफळी भारताबाहेर चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, आफ्रिका, इत्यादी देशातही आढळते. हिमालयात अगदी २००० मीटर उंचीवरही पांढरफळी आढळते. या झाडाला मुक्तपणे वाढू दिले तर त्याची उंची चोविस ते तीस फूट होते. हे झाड तसे बिनकाट्याचे. मात्र याचे लाकूड खूपच टणक असते. ज्यावेळेस याची फांदी तोडली जाते त्यावेळी वाळलेल्या कोवळ्या फांद्या काट्यासारख्या टोचतात. लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे, झोपडीवरील छपराच्या वाशासाठी केला जातो. यापासून बनवलेल्या हातातील काठ्या पिढ्यानपिढ्या टिकतात. याची मोठी लाकडे मिळत नाहीत. मात्र, असे लाकूड मिळाले, तर त्याचा वापर तंबूच्या खुंट्या, खुर्च्यांचे पाय बनवण्यासाठी करतात. या लाकडाचा उपयोग जळणासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. खोडावर पातळ लालसर साल असते. कोवळ्या फांदीवरील साल गडद चॉकलेटी लाल रंगाची असते. त्यावर बारीक ठिपके असतात.

याचे रोप बियापासून उगवते. लाल रंगाचा कोंब घऊन हे झाड उगवते. जमिनीपासून याला फांद्या यायला सुरुवात होते. कोवळी पाने सुरुवातीला लालसर असतात, नंतर ती सोनेरी पोपटी बनतात. कोवळी पाने सकाळच्या उन्हामध्ये अशी काही चमकतात की जणू झाडावर दिव्यांची रोषणाई केली आहे. नंतर ती रंग बदलत, गडद हिरवी होतात. पाने साधी, अंडाकृती आणि एकाआड एक बसलेली असतात. पानावर ठळक पोपटी शीरा असतात.  पानांचा आकार २.५ ते ७.५ सेंटीमीटर लांब आणि दीड ते साडेचार सेंटिमीटर रूंद भरतो. मुबलक पाणी मिळत असेल तर पाने मोठी होतात. शेळ्या-मेंढ्या याची पाने आवडीने खातात. या झाडाच्या फांद्या जळणासाठी मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. फांद्या तोडायला खूप कठीण असतात. लाकूड टणक असल्याने काळजीपूर्वक तोडाव्या लागतात. बुंध्यापासून झाड तोडले तरी पुन्हा नव्याने तितक्याच जोमाने फुटते. जमिनीतून मुळासकट झाड काढणेदेखील खूप जिकिरीचे असते. फांद्यांचे लाकूड जून झाले की त्याला कोपरे तयार होतात. बांधावरील या झाडामुळे चांगले कुंपण तयार होते. जमिनीपासून फांद्या येत असल्याने आणि त्या काटक असल्याने या झाडांच्या बुंध्याशी छोटे प्राणी घर करतात. अनेक झाडांच्या बुंध्याजवळ सशांची घरे आढळतात. विशेषत: वीणीच्या काळात सशांचा घरोबा या झाडाशी थोडा जास्त असतो. जवळजवळ असलेल्या फांद्यामुळे कुत्र्यांना या झाडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे हे झाड अशा प्राण्यांना सुरक्षित घर देतात.   

पावसाळ्यापूर्वी ही झाडे फुलायला सुरुवात होते. मार्चपर्यंत या झाडाकडे आकर्षक काहीच नसते. वाळलेल्या काड्या रोवल्यासारखी अवस्था असते. मात्र एप्रिलच्या मध्यापासून पानगळ झालेल्या या झाडावर पानांच्याबरोबर कळ्यांचे घोस बाहेर यायला सुरुवात होते. अगदी सात-आठ महिन्यापूर्वी उगवलेल्या झुडुपालाही कळ्या येतात. फांद्यांच्या शेंड्याला येणारी नवीन पानेही सोनेरी पोपटी असतात. त्यांच्या देठाजवळून कळ्यांचे घोस बाहेर पडतात. काही दिवसातच त्यांची फुले होतात. फुलांचा आकारही वेगवेगळा असतो. फुलांची लांबी एक सेंटिमीटरपर्यंत भरते. फुले एकाचवेळी फुलतात आणि फुलाआड पाने लपून जातात. या झुडपाला पाने साधारण हिरवट पिवळ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगांची फुले फुलली की, मधमाशांची या झाडावर गर्दी सुरू होते. या झाडाजवळ आल्यावर नेमका कोणत्या फुलातील मध घ्यावा, हा प्रश्न त्यांना पडत असावा. एकाच ठिकाणी त्यांना इतका मध मिळणार असल्याने, त्या आनंदी होऊन गुणगुणत असाव्यात. वारा विरूद्ध दिशेने असल्यामुळे गंध जरी पोहोचला नाही, तरी मधमाशांचे गुणगुणणे या झाडाकडे लक्ष खेचून घेते. एका झाडाभोवती एकाचवेळी शेकडो मधमाशा पिंगा घालत असतात. प्रत्येक फुलावर बसून मकरंद जमा करतात. या झुडपांना दोन प्रकारची फुले येतात. यामध्ये नर आणि मादी अशी दोन वेगळी फुले येतात. इवल्याशा फुलांतून मधमाशा त्यांना हवा असणारा मध बरोबर काढून घेतात. या फुलांमध्ये अनेक पुंकेसर असतात. स्त्रीकेसर तीन ते पाच असतात. मधमाशा आणि इतर कीटकांमुळे परागीभवनाची प्रकिया घडून येते आणि काही दिवसांत कळ्यांसारखी दिसणारी फळे दिसू लागतात. स्त्रीपुष्पांचे फळात रूपांतर व्हायला सुरूवात होते. इतर सर्व भाग लगेच गळून जातात.

पांढरफळीला दोन प्रकारची फळे येतात. काही झाडांची फळे मांसल आणि मोठ्या आकाराची असतात. या गोलाकार फळांचा व्यास आठ मिलिमीटरपर्यंत भरतो. तर काहींची फळे शुष्क आणि लहान असतात. प्रत्येक फळात तीन ते सहा बिया असतात. फळाने पूर्ण भरलेली फांदी पाहिली की तेथे मोत्याच्या सरी लटकवल्यासारखे चित्र दिसते. संधीप्रकाशात तर त्याचे सौंदर्य आणखी सुंदर दिसते. त्यामुळे पिकलेली फळे तोडायला नको वाटते. मात्र पांढरीशुभ्र पक्व झालेली फळे पाहिली की खाण्याचा मोह आवरत नाही. हात नकळत ही फळे कधी तोडतो आणि ती तोंडात कधी जातात कळतही नाही. गोड-तुरट चवीची ही फळे खाण्याचा आनंद बालपणापासून घेत आलो आहे. पांढरफळीची फळे अँटिऑक्सिडंट असतात. त्यापासून कर्करोगावरील औषध बनवण्यासंदर्भात संशोधन सुरू आहे. पोटातील जंतावरही ही फळे गुणकारी आहेत, असे मानले जाते. ग्रामीण भागात आजही जुनी जाणती मंडळी ही फळे आवर्जून खातात.

या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. पांढरफळीच्या मुळ्या वेदनाशामक आहेत. मूळ रेचक आणि कामोत्तेजकही आहे. परम्या’ या आजारामध्ये मुळांचा उपयोग करतात. पांढरफळीच्या पानांमध्ये क्वासीट्रीन, अल्ब्युमिन, रेझीन अशी औषधी संयुगे असतात. मधुमेह असणाऱ्या लोकांच्या जखमा लवकर भरून येत नाहीत. त्यांच्यासाठी खास या झाडाच्या पानांची भुकटी आणि तीळाच्या तेलापासून मलम बनवले जाते. जखमेमध्ये कीडे झाल्यास पांढरफळीच्या पानांचा रस किंवा चुरा तंबाखूमध्ये मिसळून लावले जातात. यामुळे किडे मरतात. पाने पाण्यामध्ये उकळून काढा बनवला जातो. हा काढा बद्धकोष्ठतेवर सारक म्हणून उपयोगी पडतो. हा काढा जखमा धुण्यासाठीही वापरतात. पांढरफळीची साल माशासाठी विष आहे. ही झाडे नदीकाठी किंवा पाणथळ जागी उगवत नाहीत. त्यामध्ये १० टक्के टॅनीन असते. यामुळे या झाडाच्या सालीचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी केला जातो. सालीचा उपयोग अतिसार आणि न्यूमोनियासारख्या आजारातही करतात.

अशा या पांढरफळीची फळे, पाने, मुळे, लाकूड सारे काही मानवासाठी उपयुक्त आहेत. हे झाड स्थानिक आहे. त्यामुळे ते इतर वनस्पती, वेली, गवतास बरोबर घेऊन वाढते. सुंदर फुललेले झुडुप अवश्य पहावे, त्याचे सौंदर्य डोळ्यांत साठवावे. रानमेवा म्हणून ही फळे दिसल्यानंतर आवर्जून खातो… आपणही या झाडाची माहिती असणाऱ्या मित्रासोबत असाल, तर या झाडाची जरूर ओळख करून घ्यावी आणि त्याच्या फळांचा आनंद घ्यावा.