_________________________________________________________
एक दिवस सकाळी फिरताना विद्यापीठातील एका चौकाच्या कोपऱ्यावर मधमाशा गुणगुणताना दिसल्या. त्यांच्या आनंदाचे कारण शोधण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. जवळ जाऊन पाहिले तर काष्ठयुक्त शरीरावर पिवळ्याधमक फुलांचे उमलणे सुरू होते. त्या फुलांभोवती मधमाशांचा गुंजारव सुरू होता. बारकाईने पाहताच त्याची ओळख पटली. या झाडाभोवती अनेक आठवणी गुंतलेल्या होत्या. त्या झाडाला पाहून मनस्वी आनंद झाला. ते झाड होते धामण!
धामण
माल्वेसी कुळातील झाड. शास्त्रीय नाव ग्रूविया टिलीफोलिया. याचे बारसे कार्ल
लिनियस यांनी केले. ग्रूविया हे नामकरण इंग्लंडमधील सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ नेहेमियाह
ग्रू यांच्या सन्मानार्थ आणि त्याचे पाने टिलिया गटातील वनस्पतींच्या (जसे की कापूस,
ताग, कोको) पानाप्रमाणे असल्याने टिलिफोलिया असे करण्यात आले. याला मराठीप्रमाणेच गुजराती
आणि हिंदीमध्येही धामण म्हणून ओळखले जाते. मराठीमध्ये धामन, धामीण, धामणी, करकरणी,
करवरणी या नावानेही ओळखले जाते. याच्या मोठ्या झाडाच्या फांद्या खाली लोंबकळत असतात.
या फांद्या धामhण लोंबकळते, तशा दिसतात म्हणून याचे नाव धामण असे पडले, असे मानतात.
हिंदीमध्ये याखेरीज झुझना, फैसा, फारसा या नावानेही ओळखले जाते. तेलगूमध्ये तड चेटू,
चराची, इरथ्थडा अशा २९ नावानी हा वृक्ष ओळखला जातो. तमिळमध्ये बेलक्का, थडाची उनू,
सदाची याप्रमाणे पंचवीस नावे याला मिळाली आहेत. ओडिसीमध्ये धामुरो, भंगिया म्हणतात.
मल्याळममध्ये उन्नम, धानुना वृक्षम, धामण, चडची अशी एकोणीस नावानी हे झाड ओळखले जाते.
कन्नडमध्ये बाल्मुरी, बताला, तडस्सू, तडसल अशी विविध प्रांतात तब्बल छत्तीस नावे आहेत.
संस्कृतमध्ये फांद्या धनुष्याप्रमाणे वाकलेल्या अर्धगोलाकार असल्याने धुनर्वृक्षा,
धन्वंगाह, धनुष्याची ताकत लाकडामध्ये असल्याने धन्वन, महाबला, झाडाचे लाकूड निसरडे,
मऊ सालीचे असल्याने पिन्हलिका, फुलांचा रंग लाल होत असल्याने रक्तकुसुम, फळे चवीस गोड
असल्याने स्वादुफल:, या फळांच्या सेवनाने वेदना कमी होत असल्याने रूजपह:, याच्या फळामुळे
ज्वर कमी होत असल्याने ज्वरघ्न:, विषबाधेवर उपयुक्त असल्याने विषघ्न:, भरून न येणाऱ्या
जखमावर गुणकारी असल्याने दुष्ट व्रण: अशी या वृक्षाच्या आणि त्याच्या फळाच्या गुणधर्मावरूनही
या झाडाला सतरा नावे आहेत.
हे मुळचे उत्तर भारतातील झाड. वाराणशी भागात सर्वप्रथम आढळले. या झाडाच्या चविष्ट फळांना त्याच्याच पानांमध्ये गुंडाळून ठेवल्यास फळे दोन तीन दिवस चांगली राहतात. बौद्ध भिक्खू प्रवास करत असताना ही फळे आपल्यासमवेत नेत. त्यांच्यामार्फत या झाडाचा प्रसार देशाच्या इतर भागात आणि विदेशातही झाला असावा, असे मानले जाते. आज हे झाड भारत, नेपाळ, श्रीलंका, ब्रम्हदेश, दक्षिण चीन, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम आणि आफ्रिका खंडाच्या काही देशांत मोठ्या प्रमाणात आढळते. पानझडी आणि निमसदाहरित जंगलात उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात आढळणारे हे झाड आहे. गवताळ प्रदेशात समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंत हे झाड वाढते. ३० ते ४२ डिग्री सेल्सियस तापमान असणाऱ्या प्रदेशातही चांगले वाढते. चांगले वाढलेले झाड -५ डिग्री सेल्सियस इतके अल्प तापमान सहन करते. साडेसातशे ते ४००० मिलीमीटर पर्जन्यमान या झाडाला चालते. केतकरांच्या ज्ञानकोशात धामण वृक्षांच्या साठ प्रजातींची नोंद आहे. त्यातील छत्तीस भारतात आढळतात. या प्रजातीतील केवळ फालसा प्रजातीची (ग्रेविया ॲसियाटिका) व्यावसायिक शेती केली जाते.
या झाडाची निर्मिती बियापासून होते. याच्या बिया
मातीत पडल्या आणि पाणी मिळाले की रूजतात. त्यापासून रोप तयार होते. रोपावर एकाआड एक
पाने येतात. रोप लहान असतानाच त्याला फांद्या येऊ लागतात. झाड चार पाच फुटाचे उंच होताच,
ते फळ द्यायला सुरुवात होते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात याची सर्व पाने गळून जातात.
एप्रिलच्या अखेरीस त्याला नव्याने पाने फुटू लागतात. कोवळ्या फांद्या आणि पानांवर लव
म्हणजेच बारीक केसासारख्या रचना असतात. त्यामुळे त्यांचा रंग पांढरट दिसतो. पाने साधी
असतात. पानांचा आकार हृदयाकृती असतो. त्यांची लांबी सात ते अठरा सेंटिमीटरपर्यंत आढळते.
पानांचा वरचा भाग गुळगुळीत असतो, तर खालचा भाग केसाळ. पानांच्या मधोमध एक शीर असते.
त्यापासून एकाआड एक सहा उपशीरा दोन्ही बाजूला फुटतात. त्यांच्यापासूनही पुन्हा बारीक
केसाळ शाखा फुटतात. त्या एकमेकाला मिळतात. त्यांचा रंग पिवळसर पोपटी असतो. या शीरा
आणि उपशिरांची सुंदर नक्षी पानावर तयार होते. पानाच्या कडेला पांढरी सुंदर कडा तयार
झालेली असते. ती पानांच्या सौंदर्यात मोठी भर घालतात. पानाच्या कडेला बारीक कात्र्यांची
नक्षी असते. ही नक्षी पांढऱ्या रंगामुळे आणखी उठून दिसते. पाने दुसऱ्या बाजूला टोकदार
असतात. हळूहळू केसाळ रचनांचा प्रभाव कमी होत जातो. पाने हिरव्या रंगाची दिसू लागतात.
खोड पांढरे होते. धामणीची पाने शेळ्या, मेंढ्या, गाई आणि म्हशींचे आवडते खाद्य आहे.
पानांमध्ये एक टक्का टॅनिन असते. या वृक्षांच्या पानाचा किंवा सालीचा रस कपड्याला लागल्यास
लाल डाग पडतात आणि हे ‘डाग अच्छे’ नसतात कारण ते साबणाने धुवूनही जात नाहीत. झाडांची
पाने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करतात. पाने पसरट असल्याने ती जमिनीची धूप थांबवतात.
बांधावर असणारी झाडे वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण करतात.
त्याचवेळी पानांच्या देठाच्या बेचक्यातून दोन ते चार कळ्या पांढरट रंगात यायला सुरूवात होते. या कळ्या सुरुवातीला गोल असतात. त्या वाढतात, तशा फुगीर होत जातात. कळ्या चार ते पाच मिलीमीटर लांबीच्या होताच उमलू लागतात. त्यातून पाच थरांचे फुल तयार होते. सर्वप्रथम बाहेरच्या आधाराच्या पुष्पपटलांचा थर असतो. त्याच्या बाह्य बाजूस केसाळ रचना असतात. त्यावर पिवळ्या पाच मध्यम आकाराच्या पाकळ्या असतात. त्यावर पाच छोट्या पाकळ्या येतात. या अत्यंत अस्पष्ट दिसणाऱ्या पाकळ्यांच्या केंद्रस्थानी पुंकेसरांचा पिवळा गठ्ठा असतो. त्याच्या टोकाशी परागकण असतात. पुंकेसराच्या केंद्रस्थानी फिकट हिरवट पिवळ्या रंगाचे पुंकेसरापेक्षा जाड स्त्रीकेसर असते. फुलाच्या तळाशी बिजांडकोष असतो. संपूर्ण फुल पिवळेधम्मक असते. फुलांची लांबी दोन सेंटिमीटर असते. तर फुलांचा व्यास दीड ते दोन सेंटिमीटर असतो. पानांच्या बेचक्यामध्ये फुललेल्या फुलांमुळे हळद सांडल्यासारखे दिसू लागते. मात्र या फुलातील पुंकेसरांचा पुंजका दोन-तीन दिवसांत प्रथम लाल-केशरी रंगाचा दिसू लागतो. कीटक विशेषत: मधमाशा या फुलाजवळ मध गोळा करण्यासाठी येतात की अंग मोकळे व्हावे म्हणून कुस्ती खेळायला, असा प्रश्न पडतो. मधमाशांचे इतर फुलांबरोबर असणारे नाजूक, मर्यादाशील वर्तन धामनीच्या फुलाजवळ दिसत नाही. या फुलांवर मधमाशांचे जरा जास्त प्रेम दिसून येते. (मधमाशांचा धामण वृक्षाच्या फुलाबरॊबरचा विडिओ https://youtu.be/WgGmNzDY0zI या लिंकवर उपलब्ध आहे.) मधमाशांची ही मस्ती सुरू असताना पिवळे परागकण पानांवर पडतात. मधमाशांच्या या वर्तनाचे कारण जो मकरंद या फुलांमध्ये असतो, तो परागकणाच्या खाली लपलेला असतो. तो मिळवण्यासाठी त्यांची धडपड असते. स्वत:ला मध मिळावा म्हणून त्या एकमेकींशी भांडतातही. या त्यांच्या मस्तीमध्ये पानांवर पडलेले काही परागकण हळद सांडल्यासारखे दिसतात. या फुलांवर इतर कीटकही असतात. मात्र खरे अस्तित्व दिसते आणि जाणवते ते मधमाशांचे. एखादा भुंगाही हजेरी लावतो. मुंग्यांचा वावरही या झाडावर असतो.
किटकांच्या फुलांवरील मध गोळा करण्यासाठी चाललेल्या
धडपडीमधून फुलांचे परागीभवन होते. फुलाच्या पाकळ्यांचा रंगही तीनचार दिवसांत केशरी
बनतो. प्रथम पाकळ्या गळतात. पाठोपाठ पुंकेसर गळतात आणि त्या ठिकाणी एक गोल फळ दिसू
लागते. सुरुवातीला हे गोल फळ देठापेक्षाही लहान असते. फळांबरोबर देठही वाढत जाते. क्वचित
दोन गोलाकार फळे एकमेकाला चिकटून डंबेलसारखी रचना तयार करतात. मात्र अशा जुळ्यांची
संख्या अगदी कमी असते. एकाच देठाला तीन बी असलेले फळही पहावयास मिळाले, पण अख्ख्या
झाडावर एकच! फळे मजबूत देठाला चिकटलेली असतात. ती शक्यतो गळत नाहीत. त्यांचा रंग पोपटी
हिरवा असतो. ती वाढतात आणि वाटाण्याच्या आकाराची होतात. पिकण्यापूर्वी फळे आंबट-तुरट
असतात. मात्र कच्ची फळे खाण्यासाठी पक्षी येत नाहीत. फळे मोठी होताच पिकू लागतात. सुरूवातीला
त्यांचा रंग पिवळसर होतो. त्यानंतर तो लालसर तपकिरी होतो. त्यावर गडद ठिपके दिसू लागतात.
फळाचा रंग आणखी गडद होत चॉकलेटी किंवा जांभळा
होतो. हे आंबटगोड फळ खाण्यासाठी योग्य मानले जाते. बी आणि साल यांच्यामध्ये
असणारा गर खाल्ला जातो. आतमध्ये फळ खाल्ल्यानंतर हिरवट आवरण असलेले बी सापडते. वाळल्यानंतर
बियांचा रंग तपकिरी होतो. बियांवरील आवरण कठीण असते. धामणीची फळे पक्ष्यांना फार आवडतात. पिकलेली फळे वेचून खायला
पक्षी गर्दी करतात. पोपट, बुलबुल, चिमणी, होला, साळुंखी असे अनेक पक्षी झाडाकडे चक्कर
मारायला सुरूवात करतात. खंड्याही या झाडावर विसावताना खाण्यायोग्य्ा फळांवर नजर ठेवून
असतो. खालच्या फांद्यावर असणारी फळे खायला मोरही येतो. खारूताईलाही पिकलेली फळे फार आवडतात. गाय, म्हैस, बकऱ्या हरीण, अस्वल हे प्राणीही
झाडांची फळे आवडीने खातात. ही पिकलेली फळे लहान मुलांचा आवडता रानमेवा असतो. ही फळे तोडून काही ग्रामीण
भागातील महिला, पुरूष बाजारात विकायला नेतात. या रानफळांच्या विक्रीतून मिळणारे पैसे हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असते. मात्र आज झाडांचे प्रमाण
कमी झाले असल्याने या फळांची उपलब्धता कमी झाली आहे.
फळांना मधूर सुवास असतो. या फळांची साल जाड असते. फळ अर्धा ते सव्वा सेंटिमीटर आकाराचे असते. आतमध्ये गर कमी असतो. बी मोठे असते. पांढरे, गोलाकार एकच बी असणारे हे फळ आहे. जोडफळांमध्ये मात्र दोन बी असतात. क्वचितच तीन बियांचे फळ आढळते. ॲन्थोसायनीन, फिनॉल, फ्लॅव्होनाईडस् आणि जीवनसत्व ‘क’ या फळाच्या गरामध्ये असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट घटकही असतात. या फळांचे सेवन आरोग्यासाठी लाभकारक ठरते. या झाडांच्या कळ्याही काही आयुर्वेदिक औषधामध्ये वापरण्यात येतात. चरकसंहिता, भावमिश्रा, सुश्रुतसंहिता इत्यादी ग्रंथांमध्ये या वृक्षांच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन करण्यात आले आहे. निघंटू या औषधकोषातही याच्या औषधी गुणधर्मांची माहिती देण्यात आली आहे. फळांप्रमाणे साल आणि लाकूडही काही औषधांमध्ये वापरले जाते. मूळव्याधीच्या त्रासावर सालीपासून बनवलेला काढा वापरला जातो. अतिसारावर सालीचे सेवन केले जाते किंवा सालीपासून बनवलेले चूर्ण देण्यात येते. स्नायूंच्या वेदना, कमी तीव्रतेची विषबाधा, खोकला इत्यादींवरील औषधे या झाडाच्या सालीपासून किंवा पानापासून बनवली जातात. कवचकुली, खाजखुजलीला स्पर्श झाल्यास या झाडाची साल त्या जागेवर चोळतात. अल्सर, श्वसनाचे आजार यावरही धामण फळांचे सेवन उपयुक्त ठरते.
या झाडाचा उपयोग केवळ फळापुरता नाही. या झाडाचे
खोड जसे दिवस जातील, तसे वाढत जाते. मध्ये असणारी फांदी उंच वाढत जाते. झाडाची उंची
तीस ते अगदी पन्नास फुटापर्यंत वाढते. खोडाचा व्यास दोन फुटापर्यंत वाढतो. त्याच्या
दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर फांद्या फुटतात. या बाजूने फुटणाऱ्या फांद्या काही दिवसानंतर
वाळतात आणि गळून जातात. वरच्या भागात नव्या फांद्या फुटत जातात. साल बाहेरील बाजूस
पांढरी असते. मात्र पूर्ण वाढलेल्या झाडाची साल काळसर, करडी बनते. धामण वृक्षाची साल
झाड जून झाल्यावर थोडी खडबडीत बनते. साल मध्यभागात लालसर असते. सालीची आंतरसाल मात्र
पांढरी आणि चिवट असते. या आंतरसालीपासून दोरखंड बनवले जातात. धामण वृक्षाचे लाकूड गुळगुळीत
असते. लाकडाचा रंग फिकट पिवळा असतो. या लाकडाला पॉलिश चांगले होते. लाकूड कठीण व टिकाऊ
असते. लाकडाचा उपयोग अवजारे, दारे, खिडक्यांच्या चौकटी, दांडे, बैलगाड्या, होड्या बनवण्यासाठी
करण्यात येतो. लाकूड जळणासाठी आणि कोळसा बनवण्यासाठीही वापरले जाते. याच्या लाकडांपासून
पूर्वी तेलासाठीची छोटी भांडी बनवली जात. आज अशा भांड्यांची जागा स्टीलच्या भांड्यांनी
घेतली आहे. ओकच्या लाकडाला धामणीचे लाकूड पर्याय मानले जाते. कोईमतूर येथे संशोधन करणाऱ्या
किर्ती कापडी यांनी धामण वृक्षांच्या लाकडापासून प्लायवूड बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित
केले आहे.
मूळ, साल, आंतरसाल, लाकूड आणि सर्वात महत्त्वाचे
फळ, सारे काही उपयुक्त. मानवी आयुष्यात महत्त्वाचे. जमिनीचा पोत सुधारणे, धुप थांबवणे,
पिकांचे संरक्षण आणि जनावरांचे खाद्य पुरवणारे हे झाड आज मात्र दुर्लक्षित आहे. जांभळासारख्या
मूळ जंगलातील झाडाला आज शहरात स्थान मिळाले आहे. मात्र धामण आजही केवळ जंगलात आढळते.
या झाडाची लाकडासाठी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. त्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाचे
दर्शन दुर्मिळ झाले आहे. याची खास रोपे तयार करून लावण्याची गरज आहे.
असे असले तरी या झाडावर कोणी काव्य रचल्याचे आढळून येत नाही. मात्र या झाडावरून अनेक गावांना धामणगाव असे नाव येते. काही गावांचे नाव धामणी असेही आहे. त्यावरून धामणगावकर, धामणकर, धामणीकर, धामणी अशी आडनावे धारण केलेली कुटुंबेही आहेत. एका नदीलाही धामणी असे नाव मिळाले आहे. पालघर जिल्ह्यात धामणी धरण आहे. धामण या सापाच्या प्रजातीप्रमाणे असून या झाडाच्या फांद्या लोंबकळताना दिसतात म्हणून त्याचे नाव धामण असे आले असल्याचा संदर्भ राणी बंग यांच्या ‘गोईण’ पुस्तकात आढळतो.
या झाडाबद्दल मला विशेष आकर्षण आहे, प्रेम आहे.
धामण वृक्षांची फळे लहानपणीच नव्हे, तर मोठेपणीही अनेकदा खाल्ली आहेत. आंबट गोड चवीची
ही फळे पिकू लागली की आम्ही शोधून खायचो. अगदी जूनपासून ते डिसेंबर-जानेवारीपर्यंत
ही फळे मिळतात. चांगली पिकलेली फळे खायला खूप आवडायचे. मात्र कामाच्या व्यापात गावी
जाणे कमी झाले. फळे मात्र आठवत. हे झाड आणखी एका कारणासाठी आठवते. ही आठवण, निव्वळ
फुलांची, फळांची किंवा आम्ही केलेल्या उपद्व्यापाची नाही, तर त्याने संकटकाळात केलेल्या
मदतीची आहे. १९७२ चा भीषण दुष्काळ. माणसाला पिण्यासाठी पुरेसे पाणी होते. मात्र माणसासह
जनावरांच्या पोटाला पुरेसे अन्न नव्हते. हुशार माणसाने भूक भागवण्यासाठी परदेशातून
अन्न मागवले. मात्र जनावरांच्या पोटासाठी अन्न येथेच शोधावे लागले. त्यावेळी आम्ही
खूप लहान होतो. शनिवारची अर्धी सुट्टी आणि
रविवारची सुट्टी या काळात बालाघाटच्या जंगलात जावे लागत असे. त्या काळात बालाघाटच्या
डोगरात धामणीची भरपूर झाडे होती. जंगलात असणाऱ्या धामण वृक्षांची पाने ओरबडून पोत्यात
भरली जात. या कामामध्ये लहान मुले फार महत्त्वाची असत. धामण वृक्षांच्या बारीक फांद्यावर
लहान मुलांना चढवले जात असे. त्यांनी पाने ओरबडून पिशवीत भरली जात आणि त्या खाली सोडल्या
जात. वडिलधारी मंडळी त्या रिकाम्या करून पुन्हा पिशव्या वर पाठवत. दोन चार झाडे मिळाली
तरी पोते भरत असे. असा गोळा केलेला पाला घरी आणून कोठ्यामध्ये पसरवून ठेवला जात असे.
पोत्यातून पाला काढताना त्यातील उब जाणवत असे. तो पोत्यातच ठेवला तर सडून जात असे.
आठवडाभर तो पाला जनावरांना पुरवून खाऊ घातला जाई. विशेष म्हणजे जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय
आणि गरीब शेतकरी आपल्या पशुधनासाठी हे कष्ट घेत असे. त्यामुळे १९७२ च्या दुष्काळात
माणसाला इलोमिलो आणि सुखडीने तर जनावरांना धामणीच्या पाल्याने जगवले. विशेषत: मराठवाडा
भागातील जनावरांसाठी धामण वरदान ठरले. असे हे झाड आपण आवर्जून लावायला आणि जगवायला
पाहिजे कारण हे बहुगुणी झाड जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
-०-