जयसिंगपूर
येथील जयसिंगपूर महाविद्यालयात येथे १८ जानेवारी २०२० रोजी सायन्स फेस्टिवलच्या उद्घाटन
कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली. महाविद्यालयाने हा ‘विज्ञान मेळावा’ (Science
Festival) विद्यार्थ्यांमध्ये निव्वळ वैज्ञानिक जाणिवा जागृत व्हाव्यात, या हेतूने
आयोजित केलेला नव्हता; तर, यामध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त ज्ञानाचा उपयोग कसा करावा,
यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पनातून प्रयोग करायचा होता. त्यांचे लेखन कौशल्य
प्रदर्शित करण्याचीही संधीही देण्यात आली होती. या मेळ्यात पोस्टर प्रदर्शन होते, चित्रकला
होती, छायाचित्रे होती. विविध प्रयोगही होते. खाद्यसंस्कृतीचे आणि त्यामध्ये आधुनिक
कलेचेही विद्यार्थ्यांनी प्रदर्शन मांडले होते. विद्यार्थ्यांनी सर्व घटनांचे प्रयोगांचे,
निरीक्षण करणे, घटनांचे आकलन करून घेणे आणि आपल्याला समजलेल्या ज्ञानाचा प्रात्यक्षिक
जीवनात वापर करणे हीच यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणारी त्रिसूत्री आहे आणि याचे प्रशिक्षण
महाविद्यालयीन काळात, विद्यार्थी दशेत मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य महाविद्यालयात
घडते आणि हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे, माझ्यासाठी आनंददायी होते. निरीक्षण, आकलन
आणि उपयोजन या त्रिसूत्रीचा वापर मानवाच्या यशस्वीतेची गुरूकिल्ली असते. संशोधक बनण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांना नेणारे
ते एक महत्त्वाचे पाऊल ठरते. प्राचार्य राजेंद्र कुंभार आणि सर्व सहकारी शिक्षकांनी
आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.
निरीक्षण,
आकलन आणि उपयोजन याचे महत्त्व समजून घेण्यासाठी पन्नासेक वर्षापूर्वीची एक घटना पाहायला
हवी. टाटांच्या मुंबईतील एका कारखान्यात बसवण्यासाठी एक अवजड यंत्र जर्मनीमधून भारतात
मागवले होते. बंदरामध्ये ते यंत्र उतरवून घेतले. क्रेनच्या सहाय्याने ते ट्रकवर चढवण्यात
आले. ज्या युनिटमध्ये ते यंत्र बसवायचे होते, तेथे ते आणले. ट्रकवरून ते खाली उतरवले.
ते यंत्र तळघरात बसवायचे होते. जेथून ते यंत्र
खाली न्यायचे होते, तेथवर ते मजुरांच्या सहाय्याने ढकलत नेण्यात आले. यंत्र खूपच अवजड
असल्याने ते तळघरात कसे न्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. इमारतीमध्ये आणून ते यंत्र
खाली नेईल, अशी क्रेन मुंबईत नव्हती. टाटांच्या जमशेदपूर येथील कारखान्यात अशी क्रेन
होती; मात्र ती मुंबईत यायला आठेक दिवसाचा कालावधी लागणार होता. यंत्र सुरू करण्यासाठी
जर्मनीतील कंपनीचे अभियंतेही आले होते. हे सर्व अभियंते विचार करू लागले. शेवटी जमशेदपूरवरून
क्रेन मागवायचे ठरले.
दोन
दिवस झाले. मजूर बसून होते. कंपनी बसून असलेल्या दिवसाची मजूरी देणार होती. मात्र मजुरांना
बसून पगार द्यावा लागला, तर, ते आळशी होतील, अशी मुकादमाला काळजी होती. तो हे यंत्र
खाली कसे न्यायचे, असा विचार करत होता. अचानक तो हसू लागला. त्याला हसताना पाहून भारतीय
अभियंता त्याच्यावर ओरडला, ‘हसायला काय झाले? मशीन खाली कसे न्यायचे, याचा विचार आम्ही
करतोय आणि तू हसतोस? तुला माहित आहे का हे मशीन खाली कसे न्यायचे?’ यावर मुकादम बोलला,
‘अहो, एवढ्या सोप्या कामाला तुम्ही दोन दिवस लावले.’ अभियंत्याने मुकादमाला विचारले,
‘सांग ना मग’. यावर मुकादम भाव खाऊ लागला. ‘तुम्ही माझं ऐकणार असला तर सांगतो. नाही
तर मला अडाण्याला काय कळतंय’. शेवटी इंजिनियरने या अडाण्याला काय कळणार, म्हणून विषय
सोडला. हे सर्व जर्मन अभियंता पाहात होता.
त्यांने भारतीय इंजिनिअरला विचारले की, तो मुकादम काय म्हणत होता. ते जाणून घेतल्यावर
तो भारतीय अभियंत्याला ‘तू म्हणतोस तसं करू’, असे मुकादमाला सांगायला सांगितले. आता
भारतीय अभियंत्याचा नाइलाज झाला. त्याने मुकादमाला ‘तो सांगेल तसे ऐकू असे’ आश्वासन
दिले.
मुकादमाने
दोन ट्रक बर्फ आणि पाणी उपसायचा पंप आणायला सांगितले. साहित्य येताच सर्व बर्फाच्या
लाद्या मजूरांच्या सहाय्याने तळघरात एकावर एक रचल्या. त्यावर मजूरांच्या सहाय्याने
यंत्र सरकवले. बर्फाचे हळूहळू पाणी होऊ लागले. ते पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर टाकले
जाऊ लागले. बर्फाची पातळी कमी होत गेली आणि यंत्र तळघरात सावकाश जाऊन बसले. मुकादमाने
‘बर्फ वितळणे’ या गोष्टीचे निरीक्षण केले होते. बर्फ वितळताना त्याचा आकार कमी होतो,
याचे त्याला आकलन झाले होते. या आकलनातून प्राप्त ज्ञानाचा त्याने गरज पडताच उपयोग
केला होता. त्यामुळे अभियंत्यांना जी गोष्ट शक्य झाली नव्हती, ती अडाणी मुकादमाला साध्य
झाली होती. म्हणूनच निरीक्षण, आकलन आणि उपयोजन या तीन गोष्टी कधीही विसरता कामा नयेत.
याच गोष्टीचा धडा या विज्ञान मेळ्यातून विद्यार्थ्यांना दिला जातोय. खरे कौशल्य अशा
कार्यक्रमातून मेळ्यातून मिळते. हे विद्यार्थी कधीही विसरत नाहीत.
याच
कार्यक्रमात ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ या पुस्तकाचे पुन:प्रकाशन संस्थेच्या
स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात
आले. ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ या पुस्तकाचे प्रकाशन आम्ही जे दोन विद्यार्थी
हे पुस्तक मला लिहायला भाग पाडणारे होते, त्यांना भेट देऊन करण्यात आले होते. आवर्त
सारणी वर्षानिमित्त लिहिलेल्या या पुस्तकाचे या मेळाव्यात प्रकाशन होण्याचा आनंद होता.
ज्यांच्या हस्ते प्रकाशन झाले ते डॉ. महावीर अक्कोळे म्हणजे अजब रसायन आहे. ते स्वत:
डॉक्टर आहेत. संस्थेचे सचिव आहेत. चांगले लेखक आहेत. त्यांचे भाषणही सुंदर असते. जीवनातील
अनुभवाला मांडतानाही सकारात्मकतेची जोड असते. या निमित्ताने त्यांचे भाषण ऐकायला मिळणे,
हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. हे पुस्तक म्हणजे शिक्षकांना विद्यार्थी कसे कार्यरत
ठेवू शकतात, त्याचे प्रतीक बनले आहे. या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो
आहे.
आणखी
एक सर्वात आनंदाच्या गोष्टीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला याच कार्यक्रमात लाभले.
हा होता एका विद्यार्थिनीचा माझ्या हस्ते झालेला सत्कार.
या
मुलीचे आई-वडील दोघेही सालमजुरी करणारे शेतमजूर. वर्षभराचा मोबदला ठरवून घ्यायचा आणि
त्या मालकाकडे वर्षभर पडेल ते काम करायचे. अशा प्रकारचे कष्टाचे जीवन जगणाऱ्या ओझी
दांपत्याने आपल्या मुलीचे नाव उषा ठेवले. ही मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा
उत्तीर्ण झाली. वर्ग-२ लेखा व कोषागार अधिकारी म्हणून निवडली गेली. यासाठी तिचा या
कार्यक्रमात सत्कार झाला. तिचे प्राथमिक शिक्षण
झाले. त्यानंतर तिनेही मजुरी करावी, अशी स्वाभाविक अपेक्षा तिच्या पालकांची होती. मात्र
तिची हुशारी ओळखणाऱ्या गावातील काही लोकांनी, तिच्या पालकांची समजूत काढली. तिचे शिक्षण
सुरू राहिले. तिनेही मन लावून अभ्यास सुरू ठेवला. बारावीनंतर तिने शिकवण्या घ्यायला
सुरूवात केली. काही शिक्षक आणि सूज्ञ नागरिकांनी तिला मदत केली. मात्र आपणास इतरांकडून
कमीत कमी मदत घ्यावी लागावी, यासाठी तिने स्वत:ही कष्ट करायला सुरुवात केली. बी.एस्सी.
(गणित) हा पदवी अभ्यासक्रम २०१७ मध्ये पूर्ण केला. त्याच काळात आपण प्रशासकीय सेवेत
जायचा तिने निर्धार केला. तिने शिकवण्यांसोबत अभ्यासही सुरू ठेवला. पहिल्या प्रयत्नात
अपयश पाहिले. मात्र अपयशाने मागे न हटता दुप्पट जोमाने अभ्यास सुरू केला आणि ती वर्ग-२
पदावर निवडली गेली.
तिचा
माझ्या हस्ते सत्कार होणे म्हणजे अनेक अडचणीवर मात करून मिळवलेल्या यशाला माझे दोन्ही
हात जोडण्याची संधी मिळणे, असेच मला वाटले. फक्त हात टाळ्यांसाठी एकमेकाजवळ येण्याऐवजी
तिला पुष्पगुच्छ देण्यासाठी आले होते; मात्र तिच्या यशाचे कौतुक करण्यासाठीच. ती संधी
या कार्यक्रमामुळे मिळाली. सत्काराला उत्तर देताना उषाने ‘आपण वर्ग-१ अधिकारी होणारच’,
हा आत्मविश्वास बोलून दाखवला. ती हे उद्दिष्टही साध्य करणार याबद्दल मला तीळमात्रही
शंका नाही.
कार्यक्रमाहून
परत येताना माझ्या मनात या मुलीचेच विचार येत होते. अत्यंत गरीब घरात मुलगी म्हणून
जन्मलेल्या या मुलीला शिकण्याची आणि अधिकारी पदावर विराजमान होण्याची संधी आज मिळाली
आहे. अनिष्ट प्रथा, परंपरा आणि भेदभावाच्या भिंती असणाऱ्या या देशात मुलींना शिक्षणाचे
दार उघडून दिले ते महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. म्हणूनच ही मुलगी
शिकू शकली. मुली आज मुलांच्याही पुढे जाऊन
यश संपादन करत आहेत. हे पाहिल्यानंतर या दांपत्याने केलेल्या कार्याचे महत्त्व समजून
येते. आज ती अधिकारी पदावर निवडली गेली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची
निर्मिती करताना सर्व उपेक्षित घटकांना संधी मिळेल, याची दक्षता घेतली. त्यात महिलांनाही
उपेक्षित घटक समजून तरतुदी केल्या. महिलांना समानतेची संधी मिळेल, अशी सोय केली. म्हणूनच
उषा ओझी कुटुंबाचे ओझे न बनता उष:काल बनली. हे सर्व पाहून फुले दांपत्याचे कार्य आणि
आदर्श संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे द्रष्टेपण नकळत स्मरत राहिले.