रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

रातराणीचा गंध, करी बेधुंद

 

रातराणी. ‘Beauty with Aroma’ बनलेली. कधी कधी वाटतं निसर्गात फुले नसती, तर माणसाला सुगंध तरी कळला असता का? फुलांच्या दर्शनाने, त्याच्या सुगंधाने मनावरचा ताण, मनातील संताप दूर होतो. मन प्रसन्न होते. मात्र रातराणी, राणी असूनही तिचे वर्तन एखाद्या निर्मोही साधूसारखे. जे, जे आहे ते इतरांना देणारे आणि स्वत:साठी काहीही न राखून ठेवणारे. रातराणीचा सुगंध आवडत नाही असा माणूस विरळाच. ही रातराणी आपल्या सुगंधाने केवळ प्रफुल्लित करते असे नाही तर सकारात्मक ऊर्जाही देते, असे मानतात. या रातराणीपासून आपणही काही घ्यायला हवे… पण काय?

रातराणी या वनस्पतीबद्दल आणि या झाडाबद्दलच्या माझ्या आठवणीबद्दलचा लेख.......

_________________________________________________________

ढगाळ वातावरणामुळे दिवस कसा आळसावल्यासारखा गेला होता. संध्याकाळचे साडेसात वाजले तरी वातावरण तसेच होते. आकाशात असणाऱ्या बिनपावसाच्या ढगांनी जसे वातावरण कुंद झाले होते. तसंच मनावरही मळभ आले होते. कंटाळा आल्याचे जाणवत होते. पण हा कंटाळा कामामुळे नव्हता. हा केवळ वातावरणाचाच परिणाम होता. अशा वातावरणात कार्यालयातून बाहेर पडलो. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात येताच वाऱ्याची एक झुळूक आली आणि मन प्रसन्न करून गेली. सारा कंटाळा, थकवा, मनावरचे मळभ कुठल्या कुठे दूर पळून गेले. मन प्रसन्न झाले कारण तो वारा एकटा आला नव्हता, तर, सोबत रातराणीचा गंध घेऊन आला होता.

रातराणी. सुगंधी फुल येणारी ही एक झुडुपवर्गीय वनस्पती. सोलॅनेसी कुलातील.‍ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सेस्ट्रम नॉक्टर्नम आहे. रातराणी ही तशी दक्षिण अमेरिका, वेस्ट इंडिज या भागातून जगातील सर्व उष्ण कटिबंधीय देशात पसरली. या वनस्पतीच्या दोनशेपेक्षा जास्त प्रजाती असल्या तरी भारतात केवळ आठ जाती आढळतात. हे सदाहरित झुडूप दहा बारा फुट उंच वाढते. मात्र चांगला आधार मिळाला, तर, या झाडाच्या फांद्या चांगल्या तीस फुटापर्यंत वाढतात. स्वतंत्रपणे मात्र अशी रातराणीची वाढ होत नाही. जरा जोराचा वारा आला तरी उंचावरील फांद्या मोडतात. राजारामपूरीतील भाजीमंडईच्या कोपऱ्यावरील म्हसोबा मंदिरासमोर या झुडुपाला स्वस्तिकच्या झाडाचा चांगला आधार मिळाला आहे. तेथे रातराणी चांगली झाडासारखी वाढली आहे. फुलते पण छान. नेहमी रातराणीची जमिनीलगत फुले पाहायची सवय असणाऱ्या लोकांना त्या परिसरात दरवळणारा सुगंध कोठून येतो, हे लवकर समजत नाही.

रातराणी ही खूप नाजूक वनस्पती आहे. वनस्पतीना तो, ती, ते मध्ये वर्गीकरण करणाऱ्यानी काय आधार घेतला माहीत नाही. मात्र मोगरा ‘तो’ असतो, तर रातराणी, जाई, जुई, चमेली या ‘ती’ असतात. कदाचित या वनस्पती खूपच नाजूक असल्याने आणि त्यांना खूप सांभाळावे लागत असल्याने त्यांचा समावेश ‘ती’ गटात केला असावा. मोगरा एकदा रूजल्यानंतर पुढे हेळसांड झाली तरी मरत नाही, म्हणून ‘तो’ मोगरा झाला असावा. रातराणीची मात्र चांगली काळजी घ्यावी लागते. रात्री फुलल्यानंतर सुगंध पसरवणाऱ्या निशिगंध, जाई, जुई, चमेली, मोगरा, कवठी चाफा, पारिजातक, मधुमालती अशा अनेक वनस्पती असल्या तरी रातराणीची सर यापैकी कोणालाच नाही. म्हणूनच तर ती रातराणी आहे. 

रातराणी सदाहरित वनस्पती आहे. तिला एकाआड एक पोपटी पाने येतात. तिच्या फांद्या या नाजूक आणि पातळ असतात. या झाडाच्या फांदीपासून सहज रोपे तयार होतात. अंगठ्याच्या आकाराचे आठ नऊ इंचाचे खोड घेतले आणि मऊ मातीत रोवले, त्याला पाणी दिले की ते फुटतेच. सुरुवातीला फांद्याचा रंगही हिरवा असतो. उलट तो पानांपेक्षाही गडद असतो. पुढे खोड वाढल्यानंतर ते पांढरा रंग धारण करते. पाने साधी आणि पातळ असतात. पानाच्या मध्ये असणारी शीर ही खूपच उठावदार असते. पाने दहा ते बारा सेंटिमीटर लांबीची असतात. ती पुढच्या टोकाला निमुळती होत जातात. ती जून झाली की गळतात. मात्र सर्व पाने एकावेळी झडत नाहीत. झाडाला पाणी, खत आणि हवा मिळाली की झाड सुसाट वेगाने वाढायला सुरुवात होते. याच्या फांद्यांना आणखी फांद्या फुटतात आणि झुडुप डेरेदार व्हायला लागते. ही झाडे चांगले वातावरण मिळताच इतकी वेगाने वाढतात की शेजारच्या झाडावर अतिक्रमण करतात. हे झाड बहुवर्षीय आहे. या झाडाच्या फांद्या कापल्या तर लगेच त्याला फांद्या फुटून वाढायला सुरुवात करतात. या कापलेल्या फांद्यांचा उपयोग नवी रोपे तयार करण्यासाठी करता येतो. 

पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत, कुंडीत हे झाड वाढते. रातराणी प्रामुख्याने बागांमध्ये लावले जाते. गैरसमजामुळे काही लोक घराशेजारी हे झाड लावणे टाळत. रातराणीच्या सुगंधाने साप या झाडाजवळ येतात, असा अनेकांच्या मनात गैरसमज होता. मात्र विज्ञानाच्या दृष्ट‍िकोनातून हे पूर्णत: चूक आहे. मात्र आता लोकांमध्ये जागरूकता आली आहे. आता ते अनेकांच्या बागांमध्येही दिसू लागले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी झाड बिनधास्त लावावे, या झाडामुळे साप येत नाहीत. 

झाड थोडे मोठे झाले की पानाच्या बेचक्यातून कळ्यांचे घोस बाहेर पडायला सुरुवात होते. नीट निगा राखलेल्या झाडाला अगदी वर्षाच्या आतच कळ्या येतात. या कळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की झाडाला पाने कमी आणि कळ्या जास्त असे चित्र निर्माण होते. या कळ्या लांब फिकट पिवळ्या रंगाच्या असतात. कळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की फांद्या ओझ्याने खाली वाकतात. रातराणीच्या कळ्या रात्री उमलतात आणि संपूर्ण परिसरात सुगंधाची पखरण करतात. सूर्य मावळल्यानंतर तासाभरांने सुगंध पसरायला सुरूवात होते. रात्र जशी वाढत जाते तसा हा सुगंध तीव्र होत जातो. या गंधीत वातावरणात कसालाही कंटाळा असो, थकवा असो कुठल्या कुठे पळून जातो. त्याचा मंद सुगंध मनाला मोहित करतो. ही सुगंधाची उधळण केवळ रात्रीच होते. त्यामुळेच याला अत्यंत समर्पक रातराणी, नाईट क्वीन, नाईट जस्मिन या नावाने ओळखले जाते. रातराणीच्या फुलांच्या पाकळ्या चांदणीप्रमाणे दिसतात, त्यामुळे त्याला चांदणीचे झाडही म्हणतात. रात्री निर्धास्तपणे फुलणारी रातराणी सूर्याला परके मानत असावी. झुंजूमुंजू होताच, सूर्याच्या उगवण्याची चाहूल लागताच या कळ्या मिटू लागतात. या कळ्या चार पाच रात्र फुलतात आणि नंतर बहुतांश कळ्या गळून जातात. कळ्या खालून वर उमलत जात असल्याने हा ‘गंध सोहळा’ दहा ते पंधरा दिवस सुरू असतो. अपवादात्मक कळ्यांचे फळात रूपांतर होते. झाडांना खरा बहर उन्हाळा आणि पावसाळ्यात येतो. मात्र झाडाची निगा नीट राखलेली असेल आणि त्याची छाटणी व्यवस्थित केली तर वर्षातून चार-पाच वेळा फुलते. रातराणीच्या फुलांचे दलपुंज खाली नळीसारखे येते. रातराणीच्या फुलांना पाच लहान पाकळ्या असतात. चांदणीचा आकार तयार करतात. त्या अंडाकृती, उभट आणि टोकाला बोथट असतात. रातराणीच्या काही फुलांच्या परागीभवनातून हिरवी फळे तयार होतात. त्यामध्ये अनेक लहान बिया असतात. मात्र रातराणीचे पुनरूत्पादन बियांपासून क्वचितच होते.

राततराणीच्या फुलांपासून अत्तर बनवले जाते. काही महिला रातराणीच्या फुलांचे गजरेही बनवतात. क्वचित असे गजरे विकलेही जातात. याच कुळातील दिवसा फुलणारे सेस्ट्रम डाययुर्नम या झाडाला डे जस्मिन किंवा ‘दिन का राजा’ असे म्हणतात. मात्र हा दिन का राजा ‘दिल का राजा’ बनू शकत नाही. रातराणीची जागा त्याला घेता येणे शक्य नाही. त्याचा सुगंध आणि सौंदर्य रातराणीच्या जवळही पोहोचत नाही.

कधी कधी वाटतं निसर्गात फुले नसती, तर माणसाला सुगंध तरी कळला असता का? फुलांच्या दर्शनाने,


त्याच्या सुगंधाने मनावरचा ताण, मनातील संताप दूर होतो. मन प्रसन्न होते. रातराणीचा सुगंध मनाला सकारात्मक विचार करायला भाग पाडतो. याच विचाराने विद्यापीठातील एफ-४ निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन रातराणीची रोपे लावली होती. आंब्याजवळही एक रोप लावले होते. आंब्याजवळचे रोप आंब्याच्या आधाराने चांगले पंचवीस फूट उंच झाले होते. या रातराणीचा वास अतिथीगृहापर्यंत पसरत असे. ही झाडे फुलली की दहा पंधरा रात्री संपूर्ण घर सुगंधीत झालेले असे. नऊ वर्षाच्या वास्तव्यानंतर मी निवासस्थान सोडून अपार्टमेंटमध्ये गेलो. निवासस्थान सोडले तरी रातराणीची आठवण जात नव्हती. शेवटी आम्ही कुंडीत रातराणी लावली आणि ती छान फुलायची. माझ्यानंतर त्या निवासस्थानात राहणाऱ्या अधिकाऱ्याने साप येतात या गैरसमजातून त्या झाडाची बेसुमार कत्तल केली. मात्र त्याला पूर्ण नामशेष होऊ दिले नव्हते.

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. फुलांची झाडेही आहेत. मात्र एक उणीव कायम जाणवत असे. ती म्हणजे या परिसरात सुगंधी फुलांच्या वनस्पती नाहीत. प्रशासकीय काम पाहताना अनेकदा कर्मचारी, अधिकारी संध्याकाळी उशिरांने घरी जातात. दिवसभरात कधीकधी तणावाचे प्रसंगही आलेले असतात. तो तणाव घरी घेऊन जाणे कुटुंब स्वास्थ्यावर परिणाम करते. अशावेळी मन प्रसन्न करणाऱ्या रातराणीचा सुगंध पसरलेला असेल तर… हाच विचार घेऊन उद्यान विभागामार्फत मुख्य इमारतीच्या पुढे असणाऱ्या दोन्ही त्रिकोणाच्या तीन कोपऱ्यावर रातराणीची झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी रोपे विकत आणण्याऐवजी एफ-४ निवासस्थानाबाहेर असणाऱ्या झाडाच्या फांद्या आणून रोपे बनवली आणि ती रोपे लावली. काही दिवसातच विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी आणि फिरायला येणाऱ्या लोकांचे हे दोन्ही त्रिकोण आकर्षणाचे केंद्र बनले.

त्याचा पुढचा टप्पा म्हणून अनेक ठिकाणी ही रातराणीची रोपे बनवून लावली आहेत. विद्यापीठातील अनेक रस्त्याच्या कडेला रातराणी लावली आहे. रातराणी अनेक कवी, लेखकांच्या आवडीची आहे. कविता आणि गद्यातही रातराणीला मोठे स्थान मिळालेले आहे. विवेक पुराणिक या कवीने ‘रातराणी’ या कवितेत म्हटले आहे,

‘बहरली रातराणी अन् बहरून येई चंद्र,

गारव्यात प्रीतिच्या उभय जाहली मुग्ध बेधुंद

त्या धुंदितच रातराणी लाल गुलाबी स्वप्नी रंगते’

रातराणीला पाच मदन बाणातील एक असेही म्हटले जाते. रातराणीचा संदर्भ कथा, कादंबऱ्यात आणि कवितामध्ये या अनुषंगानेच आला आहे. प्रेमकथा आणि कवितामध्ये रातराणी राणीसारखी विराजमान झालेली दिसते. रातराणीचा खूप सुंदर वापर १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अमर प्रेम’ या चित्रपटात केला आहे. शर्मिला टागौर (पुष्पा), राजेश खन्ना (आनंद) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात रातराणीचे वर्णन करणारे सुंदर संवाद राजेश खन्नाच्या मुखातून ऐकायला मिळतात.

मात्र, रातराणीचा फुललेला फुलोरा, फुलल्यानंतर आसमंत सुगंधीत करणे आणि सुगंध पसरवून झाल्यानंतर गळणे पाहिल्यानंतर मनात विचार येतात यातून झाडाला काय मिळते? काहीच नाही. रातराणीची फुले फुलून त्यातून परागीभवनही अपवादानेच घडते. त्यामुळे प्रजननाचाही भाग नाही. रातराणीचे झाड वाढते ते इतराना ऑक्सिजन देण्यासाठी, झाड फुलते इतरांना सौंदर्यसुख देण्यासाठी, झाड फुलते ते इतरांना सुगंध देण्यासाठी, फुलल्यानंतर त्याच्या कळ्या गळून जातात. या झाडापासून काय शिकावे तर दातृत्व. कोणत्याही अपेक्षेशिवाय. स्वत:साठी काहीही न मिळवणाऱ्या, या झाडांच्या कळ्यांही निर्माल्य होऊन मातीत मिसळतात. सर्व काही देणाऱ्या या दानशूर वनस्पतीला त्यामुळेही ‘रातराणी’ हे नाव खऱ्या अर्थाने शोभून दिसते. रातराणीच्या नावात राणीपण असले तरी तिचे वागणे एखाद्या निर्मोही साधकाप्रमाणे! म्हणूनच हे झाड सर्वांना प्रिय असावे. फुललेल्या झाडाचे सौंदर्य आणि सुगंध या झाडाला ‘Beauty with Aroma’ बनवते हे मात्र निश्चित!

३४ टिप्पण्या:

  1. रातराणीच्या सुगंधाहून अधिक अप्रतिम लेख
    धन्यवाद व अभिनंदन सर

    उत्तर द्याहटवा
  2. सर रातराणी चा वास आणि तुमचा लेख दोन्ही मन मोहून टाकतात

    उत्तर द्याहटवा
  3. सर,रातराणीचा सुगंध सगळीकडे दरवळला आहे. खूप मस्त मांडणी केलीत. अगदी सहज ,सोपे करून सांगितले आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. रातराणीचा गंध,करी बेधुंदचा लेखातून अतिशय सुंदर माहिती, छान मांडणी ।
    सर आपले मनपूर्वक अभिनंदन आणि आपणास खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  5. रातराणीच्या दातृत्वाचे दाइत्वप्रमाने आपल्या लेखनातून व्यक्त होणारे दातृत्व फार महत्त्वाचे आहे.छान....

    उत्तर द्याहटवा
  6. नुसता तुमचा लेख वाचून रातराणी चा सुगंध दरवरळा असे मला वाटले.
    सुंदर लेख, अप्रतिम मांडणी

    उत्तर द्याहटवा
  7. सुंदर लेखन धन्यवाद व अभिनंदन!!!������

    उत्तर द्याहटवा
  8. सुंदर आणि वाचनीय लेख. अभिनंदन डॉक्टर शिंदे सर. सामान्य माणसांना माहीत नसलेली खूप चांगली माहिती आहे पण विस्ताराने मांडली आहे. या माहितीला वैज्ञानिक विचारांची जोड असल्यामुळे ती अधिक वाचनीय ठरते.

    प्रा डॉ बी एल चव्हाण औरंगाबाद.

    उत्तर द्याहटवा
  9. सुन्दर व वाचनिय लेख.लेख वाचताना रातराणीचा खरोखरच वास येतो की काय असा भास निर्माण करणारे जिंवत लेखन👌👌

    उत्तर द्याहटवा
  10. अतिशय छान लेखन! सर, धन्यवाद व शुभेच्छा 👍👍 🙏
    डॉ. प्रवीण डी पाटील

    उत्तर द्याहटवा
  11. काल मी आपल्या विद्यापीठातील विविध वनस्पती समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि संध्याकाळी परत जाताना रातराणीच्या सगळ्या झाडांनी लक्ष वेधून घेतले. आज आपला लेख वाचायला मिळाला. हा एक दुग्ध शर्करा योग्य म्हणावा लागेल. रातराणी अर्थात रजनीगंधा यावर आपण अतिशय सुंदर लेख लिहला आहे. त्यामुळे त्याचे लालित्य आणि माहिती दोन्हीचा आस्वाद घेता आला. रोज रात्री सहकुटुंब फिरायला जाताना विश्वनाथ शिंदे सरांच्या घराजवळची रातराणी दरवळताना सातत्याने अनुभवली आहे.
    रातराणीचा सुगंध अनुभवणे हा एक आनंदसोहळा असतो.
    छानच लेख

    उत्तर द्याहटवा
  12. सुंदर व वाचनीय . अभिनंदन डॉक्टर विलासराव शिंदे सर. सामान्यांना माहीत नसलेली खूप चांगली माहिती आपण विस्ताराने मांडली आहे

    उत्तर द्याहटवा
  13. लेखातून पसरलेला शब्दगंध... सर..
    रातराणीला अक्षरांचा चढवलेला साज..

    उत्तर द्याहटवा
  14. Sir.Ratrani vanaspatibaddal evdhi surekh mahiti Kuni attaparyant dili nahi tumhi khupach vistarit mahiti dili ahe khup khup Shubhechha Sir.

    उत्तर द्याहटवा
  15. Very blanced article sir where you have shared the contribution of nature (Ratrani)and our mind. Hearrtily congratulation. Keep it up.

    उत्तर द्याहटवा
  16. लेख अतिशय सुंदर आहे धन्यवाद व शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  17. आपल्या या सुंदर लेख मांडणीमुळे मी हा लेख वाचताना प्रत्यक्ष रातराणीला समोर उभी राहीली व तिचा सुगंध अनुभवून गेले अभिनंदन व पुढील लिखाणासाठी शुभेच्छा सर💐

    उत्तर द्याहटवा
  18. सर, अप्रतिम लेख.आज रातराणी बद्दल खूप माहिती कळली.

    ---- Adv.DD

    उत्तर द्याहटवा
  19. विद्यापीठाच्या हिरव्यागार परिसराचा नेमका प्रभाव लेखावर पडला आहे. बहुवर्षीय या एका नवीन शब्दाची माझ्या शब्द संग्रहात भर पडली. आणि फुलांच्या वर्गीकरणाचे आधार शोधून काढण्याची उत्सुकता वाढली आहे. कारण फुलांचे तो, ती, ते याप्रकारचे वर्गीकरण भाषिक लिंगभेदा वर आधारित आहे असे माझे मत होते म्हणजे मोठा तो गुलाब आणि छोटी ती सदाफुली असे... परंतु तुमच्या लेखामुळे याबाबत आणखी माहिती मिळवावी असे वाटते. आपले लिखाण वाचकांच्या वाचनाची भूक वाढवते आहे.. हे एक उत्तम लेखकाचे यश असते .. खूप खूप अभिनंदन सर������

    उत्तर द्याहटवा
  20. उत्कृष्ट माहितीपूर्ण सुगंधी लेख.. छायाचित्रेही छान समर्पक 👌प्रत्येक लेख वाचताना परिपूर्ण माहितीचा खजिना उलगडत जातो. सर असेच लिहीत रहा.. अभिनंदन आणि शुभेच्छा 👍👍

    उत्तर द्याहटवा
  21. हव्याहव्याशा वाटणार्या रातराणीप्रमाणेच हा लेखही एकदम माहीतीवर्धक असा आहे.यानंतर कधीही परत रातराणीचा गंध आला की आपल्या लेखाची आठवण नक्कीच येत राहील.
    रातराणीच्या दरवळत रहाणार्या सुगंधाप्रमाणेच आपली लेखणी अशीच बहरत राहो ही शुभेच्छा !

    उत्तर द्याहटवा
  22. Dear shinde sir,
    Pleasant smell gives pleasure and your writings always depicts the facts of natural flora and fauna available around us.
    This blog helps me as inhaler of nocturnal flower.
    All the best.

    उत्तर द्याहटवा
  23. 1. ती रातराणी तो मोगरा
    2. रातराणीचा सुगंध आणि ताण-तणाव
    3. रातराणीचे स्वभाव वर्णन
    सूर्याला परके मानने
    4. फुले बहरणे म्हणजे गंध सोहळा
    5. इतर फुलांच्या सुगंधाची रातराणीच्या सुगंधात अशी तुलना (दिल का राजा)
    6. निसर्गातील फुलांमुळे माणसाला समजलेला सुगंध
    7. सुगंधाच्या पाठीमागील मानसशास्त्रीय तत्वे
    8. सुगंध आणि कार्यालयातील कार्यसंस्कृती सहसंबंध
    9. निसर्गातील वनस्पती आणि मानवी जीवनातील अत्यावश्यक गुण (दातृत्व, दानशूर, निर्मोही)

    या संकल्पना व त्यातील मनुष्य जीवनाची सहसंबंधात्मक रूपके वर्णन अतिशय मनाला भावले व रातराणीचे एक झाड असताना अनेक झाडे लावण्याचा मोह झाला.

    उत्तर द्याहटवा
  24. रातराणीचा गंध बेधुंद करण्याबरोबर तिच्या रुपरंगाची अनेक वैशिष्ट्ये या लेखात अगदी बारकाईने आली आहेत. मानवी जीवनातील लिंगभेदाची जाणीव करून देताना सत्यदर्शनाच्या शोधासाठी मुखवट्यापलीकडील "व्यक्तित्वाची" उकल रातराणीच्या रूपाने खूप चिकित्सक झाली आहे.

    उत्तर द्याहटवा
  25. रातराणी दरवळते तीच मुळात मोहकपण घेऊन! अवघा परिसर गंधाने माखला जातो. गेली कित्येक वर्षे एक रातराणी आमच्या अंगणात आहे. त्या गंधाने मोहित होऊन साप येतात असे म्हटले जाते. पण तसा आमचा अनुभव नाही. मन धुंद करणारा तो गंध रात्र प्रसन्न करतो हेच खरे. डॉ व्ही. एन. शिंदे सरांनी रातराणीची शास्त्रीय माहिती देखील दिली आहे.मी आजपर्यंत रातराणीचे रोप तयार केले नव्हते. या लेखामुळे तोही प्रयोग करता येईल. संत तुकारामांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असे म्हटले होते. या सोयऱ्यांचा सर्वांगसुंदर परिचय करून द्यायचे काम शिंदे सर करत आहेत. मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन!!!

    उत्तर द्याहटवा