डॉ. आर.व्ही. तथा राजाराम विष्णू भोसले सर. एक थोर खगोलशास्त्रज्ञ. भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनवणारा संशोधक. सौरवाताचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासणारा संशोधक. आपले कार्य उच्च दर्जाचे असूनही प्रसिद्धीपासून दूर राहणारा, पण मातृभूमी, जन्मभूमीवर मनस्वी प्रेम करणारा सूज्ञ नागरीक. त्यांचे १४ जून २०२० रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.….......
--------------------------------------------------------------------------------------------
त्यावेळी एम.एस्सी.त होतो. १९९० च्या फेब्रुवारीत, पुढील वर्षापासून विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात स्पेस सायन्स म्हणजेच अवकाश विज्ञान हा नवीन उपशाखा अभ्यासक्रम सुरू होत असल्याची चर्चा सुरू झाली. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असणारे प्रा. डॉ. आर.व्ही. भोसले सरांचे विभागात येणे सुरू झाले. उंचीने कमी, प्रसन्न चेहरा. चेहऱ्यावर कायम विलसणारे स्मित आणि सेवानिवृत्त झाले हे जाणवूही नये, असे व्यक्तीमत्व लाभलेले भोसले सर! ही व्यक्ती किती थोर आहे, हे हळूहळू लक्षात यायला लागले. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मनोमन प्रसन्न वाटे. रेडिओ टेलिस्कोप निर्माण करणारा आणि सौरवाताचे निरीक्षण करणारा संशोधक आमच्यापुढे सहज वावरत होता. आपल्या भव्य कार्याचा ‘ग’ त्यांच्या वागण्यात कोठेही दिसत नसे.
पुढे माझे पीएच.डी. सुरू झाले आणि अवकाश विज्ञान ही एक महत्त्वाची शाखा बनू लागली. उत्तम गुण मिळणारे विद्यार्थी या क्षेत्राचे
अध्ययन करू लागली. ही संधी
केवळ भोसले सरांमुळे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लाभली. भोसले सर वर्गात
प्रत्यक्ष अध्यापन करत. ते लवकरच
विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. त्यांनी या अभ्यासक्रमासाठी आवश्यक
अनेक उपकरणे मिळवायला सुरुवात केली. ही उपकरणे
सामावून घेण्यासाठी भौतिकशास्त्र विभागात पुरेशी जागा नव्हती. प्रयोगशाळा
कोठे उभी करायची, हा प्रश्न
होता. वरचे लागेबांधे वापरून चांगल्या खोल्या मिळवणे त्यांना शक्य झाले असते; मात्र विद्यमान व्यवस्थेला हात न लावता
भौतिकशास्त्र विभागाच्या टेरेसवर प्रयोगशाळा उभी केली. त्यासाठी
कच्चे बांधकाम केलेली एक खोली बनवून त्यात प्रयोगशाळा उभी केली. उत्तम उपकरणे आणि उत्तम अध्यापन यांचा मेळ
घालत, या भागातील विद्यार्थ्यांसाठी एका आधुनिक विषयाच्या
शिक्षणाची दारे खुली करून दिली.
प्रा.
राजाराम विष्णू भोंसले. कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवडे (ता. कागल) योथील वारकरी परंपरेतील
भोंसले-पाटील घराण्यात त्यांचा जन्म झाला. आईंचे शिक्षण झालेले नसले तरी अनेक अभंग,
ओव्या त्यांना पाठ असत. आईबरोबर ते तीन-चार वेळा पंढरपूरला वारीलाही गेले. वडिलांचे
त्या काळातील सातवी म्हणजे व्हर्नाक्युलरपर्यंत शिक्षण झालेले. त्या काळात एवढ्या शिक्षणावर
अनेकजण शिक्षक होत असत. साहजिकच त्यांच्यावर सुसंस्कार आपोआप घडत गेले. त्यांचे शिक्षण
नागोजीराव पाटणकर विद्यालयातून झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. माध्यमिक जीवनामध्ये
ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहात असताना त्यांना संस्थाचालकांनी सेक्रेटरी
बनवले. त्यांच्याकडे कपाटाच्या किल्ल्या दिल्या. त्या कपाटात एक रेडिओ होता. त्यावरील
गाणी ऐकण्याचा त्यांना छंद लागला.
गाणी
ऐकत कोठे तरी दूरवर लावलेली गाणी कोल्हापुरातील, वसतीगृहातील त्या रेडिओसंचावर कशी
ऐकायला येतात? त्या लहरी कशा पोहोचत असतील? असे आकलनापलिकडील प्रश्न त्यांना पडत. याच
रेडिओने त्यांच्या मनात रेडिओ लहरींचा विचार पेरला आणि त्या लहरी त्यांच्या आयुष्याचा
भाग बनल्या. त्यांच्या जीवनातील काही अनमोल स्मृतींचा ठेवा असणाऱ्या ‘स्मृतीतरंग’ या
पुस्तकातही त्यांनी या प्रसंगाचा आणि रेडिओचा आभारदर्शक उल्लेख केला आहे. त्यानंतर
राजाराम महाविद्यालयात बी.एस्सी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनात
त्यांनी कला-क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध केले. ते ड्रामा व बोटिंग क्लबचे
सेक्रेटरी होते.
सन
१९५० साली बी.एस्सी. उत्तीर्ण झाले. राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य गोकाक
यांचे पत्र घेऊन एम.एस्सी.ला प्रवेश घेण्यासाठी ते पुण्याला गेले. त्यावेळी सर परशुरामभाऊ
महाविद्यालयात दोन अभ्यासक्रम उपलब्ध होते. त्यांनी प्रथम रेडिओ कम्युनिकेशनचा पदविका
अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केला. त्यानंतर एम.एस्सी. (वायरलेस) या अभ्यासक्रमाला प्रा. एम.के. परांजपे यांनी बोलावून
प्रवेश दिला. १९५४ साली ते प्रथम श्रेणीत एम.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण झाले. परांजपे
सरांकडे काही संशोधक विद्यार्थी पीएच.डीसाठी काम करत होते. दरम्यान त्यांना पुण्यातील
अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाची संधी मिळाली. मात्र येथे अध्यापन करत असताना
संशोधन करता येणार नाही, हे समजताच त्यांनी नोकरीचा विचार सोडला. त्यावेळच्या शिक्षणमंत्री
इंदुमती सेठ यांची अहमदाबादला शिक्षणसंस्था होती. या संस्थेत रेडिओ इंजिनिअरिंगचा एक
पदविका अभ्यासक्रम होता. तेथील अध्यापक सरकारी सेवेत गेल्याने त्यांना एका अध्यापकाची
गरज होती. योगायोगाने तेथील नोकरी सोडून जाणारे शिक्षक भोसले सरांचे गुरू होते. त्यांनीच
भोसले सरांचे नाव सुचविले आणि सर अहमदाबादला गेले.
अहमदाबाद
येथे दरमहा रूपये पाचशे इतक्या पगारावर ही नोकरी सुरू झाली. शाळेतच राहण्याची व भोजनाची
सोय झाली. सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत अध्यापनकार्य असे. नंतरचा वेळ मोकळा होता. अहमदाबाद
येथेच फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी होती. या संस्थेची स्थापना डॉ. विक्रम साराभाई यांनी
केली होती. या संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. के.आर. रामनाथन यांना सर भेटले. आपली संशोधन
करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी भोसले सरांना ज्युनिअर रिसर्च असिस्टंट या पदावर
रूजू होण्यास सांगितले आणि सरांचा १९५५ मध्ये या संस्थेत प्रवेश झाला.
या
कालावधीत सरांनी रेडिओ टेलिस्कोपची उभारणी केली. पाच वर्षे या यंत्रणेवर काम करून त्यांनी
पीएच.डी. पदवी प्राप्त केली. ती भारतातील पहिली रेडिओ टेलिस्कोपिक दुर्बीण होती. पृथ्वीच्या
उच्च वातावरणावर या काळात सरांनी संशोधन केले. खरे तर ही टेलिस्कोपची उभारणी मोठी गुंतागुंतीची
आणि प्रचंड वेळखाऊ होती. ही उभारणी करताना सरांना खूप कष्ट घ्यावे लागले. मात्र या
आपल्या सर्वोत्तम कार्याची मांडणी आपल्या चरित्रपर पुस्तकामध्ये केवळ एका परिच्छेदात
केली आहे. हीच सरांची विनयशीलता आमच्यासारख्या प्रत्यक्षात त्यांचे विद्यार्थी नसलेल्या
अनेक विद्यार्थ्यांनी भावत असे. पीएच.डी. पदवी प्राप्त होताच उच्च संशोधनासाठी त्यांना
कॅनडा येथे जाण्याची संधी मिळाली. तेथेही सोलर रेडिओ पोलारीमीटर हे उपकरण बनवले. त्यावर
आधारित संशोधन निबंध जागतिक दर्जाच्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध केले. तेथून ते अमेरिकेला
गेले. स्टॅनफर्ड विद्यापीठामधील प्राध्यापक प्रा. गॅरियट आणि एशेलमन यांच्याशी संपर्क
साधला. त्यांनी सरांचे उच्च दर्जाचे संशोधन पाहून त्यांना ‘नासा’मध्ये व्हिजिटिंग रिसर्च
असोसिएट म्हणून बोलावून घेतले. तेथे त्यांनी तीन वर्षे काम केले. दरम्यान डॉ. साराभाई
आणि डॉ. रामनाथन यांनी त्यांना भारतात येण्याविषयी सुचविले आणि भोसले सर भारतात परतले.
तोपर्यंत
पीआरएल या संस्थेला स्वत:ची तीस एकर जागा मिळाली होती. त्या जागेत नव्या टेलिस्कोपची
उभारणी करण्यात आली. सूरत आणि राजकोट येथेही टेलिस्कोप बसविले. सूर्याच्या वाऱ्याचा
वेग आणि दिशा मोजण्याची यंत्रणा निर्माण केली. यावेळी डॉ. विक्रम साराभाई यांच्यासह
अनेक दिग्गज संशोधकांसह त्यांनी काम केले. याविषयी त्यांना भरभरून लिहिता आले असते.
मात्र चरित्र ग्रंथात याचाही उल्लेख ओझरता येतो. तेथे सरांनी पंधरा वर्षे काम केले
आणि नोव्हेंबर १९८८ मध्ये सर निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही सरांना मानद शास्त्रज्ञाचे
पद देण्यात आले. या पदावर एक वर्ष संशोधन कार्य केले. त्यानंतर सरांनी १९८९ मध्ये कोल्हापूरला
येण्याचे निश्चित केले.
त्या
वेळी प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. के.बी. पोवार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू होते. सर त्यांना भेटले. आपल्याला संशोधनामुळे अध्यापन करता आले नाही. विद्यापीठामध्ये
अध्यापन करण्याची संधी मिळावी, अशी विनंती केली. हाताशी असणारे मानद शास्त्रज्ञाचे
पद नाकारून सर मातृभूमीतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी आले. पोवार सरांनी
त्यांना स्पेस सायन्स ही विशेष अभ्यासशाखा सुरू करावी, असे सुचविले. तसेच ‘ऑनररी प्रोफेसर
ऑफ स्पेस सायन्स’ हे पदही दिले. त्यांनी हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केला. तेथे
ते स्वत: अध्यापन करत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सोळा विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट
पदवी संपादन केली आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सर शिवाजी विद्यापीठामध्ये आल्यानंतर
हे संशोधन कार्य केले.
या
अध्यापनाबरोबर पन्हाळा येथे चांगल्या दर्जाचे केंद्र उभा करावे, असा त्यांचा मानस होता.
त्यांच्या प्रयत्नातून पन्हाळा येथे विद्यापीठाला पाच एकर जागा उपलब्ध झाली आहे. अमेरिका
किंवा रशियाच्या स्वतंत्र ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहेत. भारताचीही अशी यंत्रणा असावी,
असे इस्रोच्या संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी १०५ संदेशग्राहक (Receiver)
देशभर उभा केले जात आहेत. या यंत्रणेसाठीचा तेविसावा ग्राहक विद्यापीठाच्या पन्हाळा
येथील जागेत बसवण्यात आला आहे. या संदेशग्राहकाकडून अत्यंत चांगल्या दर्जाचे कार्य
होत आहे. सरांचे विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न आणि त्याला प्रशासनाने दिलेली सकारात्मक
साथ यामुळेच हे केंद्र उभारणी शक्य झाली. महाविद्यालयीन पातळीवर खगोल व अवकाशशास्त्र
हा विषय सुरू करण्यातही सर यशस्वी झाले. पन्हाळ्यावरील जागेवर स्वतंत्र चांगली इमारत
व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. विद्यापीठाने त्याची तयारीही सुरू केली होती. मात्र
पन्हाळगड ऐतिहासिक वारसा यादीत असल्याने तेथे नवे पक्के बांधकाम करण्यास परवानगी मिळू
शकली नाही.
लोकांच्यामध्ये
विज्ञानप्रेम वाढावे, यासाठी सर मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात शिवाजीराव पवार सरांच्याबरोबर
कार्य करत असत. त्यांना कोणत्याही विषयाचे बंधन नव्हते. वृक्ष आणि उद्यानाप्रती जागरूकता
निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या गार्डन क्लबचेही ते सदस्य बनले. सन २००८-०९
पर्यंत सर विभागात येत असत. त्यांना कोल्हापूर भूषण
हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने डी.लिट.
पदवी प्रदान केली. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स यांनी त्यांना
सदस्यत्व दिले. मात्र राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर म्हणावे तसे कौतुक झाले नाही. त्यांचा
‘ॲक्टिंग’वर नव्हे तर ‘ॲक्शन’वर भर होता. कायम कार्यात मग्न असणारे सर प्रसिद्धीपासून
दूर राहिले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओझरती ओळख करून देणारे ‘स्मृतीतरंग’ हे पुस्तकही
त्यांचे मित्र आणि कुंभी कासारी शिक्षण मंडळाचे सचिव पी.टी. पाटील सर यांच्यामुळे प्रकाशित
झाले.
पुढे दोन वर्षे २०१० ते २०१२ या कालावधीत मी नांदेडला असल्याने सरांशी थेट संपर्क
नव्हता. मात्र २०१२ मध्ये वेगळ्या कारणाने त्यांची भेट झाली. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने कोल्हापुरात विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगणाच्या धर्तीवर तारांगण सुरू झाले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यासाठी
त्यांचा वारंवार पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. पुढची दहा वर्षे ते या प्रकल्पाचा पाठपुरावा करत होते. विद्यापीठाने हे
विज्ञान केंद्र आणि तारांगण विद्यापीठात उभारण्यासाठी तयारी केली होती. सुवर्णमहोत्सवी वर्षात हा प्रकल्प मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्नही केले. मात्र
त्यांचे हे स्वप्न अद्याप प्रत्यक्षात
उतरू शकलेले नाही.
माणसावर
प्रेम करणारा माणूस, प्रेमळ पण कर्तव्यदक्ष पिता, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन
वाढीला लागावा म्हणून कार्य करणारा विज्ञानप्रसारक, परदेशात उत्तम संधी हाती असतानाही
देशावरील प्रेमापोटी भारतात परतणारा देशप्रेमी, देशासाठी संशोधन केल्यानंतरही तेथेच
कार्य करण्याची संधी असतानाही जन्मभूमी कोल्हापूरला परतणारा सूज्ञ नागरिक, आपले ज्ञान
अखेरपर्यंत देण्याचा प्रयत्न करणारा गुरू अशा अनेक अंगानी सरांना पाहता येते. ‘विद्या
विनयेन शोभते’ हे सुभाषित सरांसाठीच तयार झाले असावे. असा हा अनोखा संशोधक, कोल्हापूरचा
थोर सुपुत्र. विज्ञान
केंद्र आणि तारांगणाचे स्वप्न पाहात १४ जून २०२० रोजी कालवश झाले. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरावी!