गुरुवार, ४ जून, २०२०

एक पत्र कोरोनास…

पाच जून हा दिवस आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करतो. याच पर्यावरणाचे आपण किती आणि कसे नुकसान करत आहोत, हे मागील तीन महिन्यापासून, कोरोना आल्यापासून आपणास सातत्याने जाणवत आहे. तरीही कोरोनाच्या परिणामापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. एकिकडे ‘निसर्ग’ वादळ मानवी जिविताचे नुकसान न करता जाते. मानवावर दया दाखवते. तर दुसरीकडे केरळमध्ये मानवातील दानव एका हत्तीणीची क्रुरपणे हत्या करताे. या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ला लिहिलेले पत्र आपणासाठी..........                       --------------------------------------------------------------------------------------------

प्रिय (!,?) कोरोनास,

      सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

तू आल्यापासून निसर्ग आणि मानवी जीवन पूर्णत: बदलले आहे. तू आमच्या निसर्गाप्रती असणाऱ्या सर्व चुकांचा आरसा दाखवत आहेस. मात्र तू करत असलेल्या जिवित आणि आर्थिक नुकसानीमुळे आमच्या मनात तुझ्याबद्दल भयानक राग आहे. खरे तर, तुझ्या येण्यामुळे आमच्या हातून निसर्गाप्रती घडलेल्या चुका ठळकपणे दिसू लागल्या आहेत. पण माझ्यासारख्यांची फार मोठी अडचण आहे. आता हेच बघ ना. तुला पत्र लिहिताना मी नेहमीप्रमाणे ‘प्रिय’ असे लिहिले. मात्र त्यानंतर कंसात दोन चिन्हे लिहावी लागली. दुसऱ्यांच्या पत्रात काय आहे, हे जाणून घ्यायची माणसाला हौस असते. ‘आपलं ठेवायचं झाकून अन्…’ हा जणू आमचा स्थायीभाव बनलाय. त्यामुळे तुला लिहिलेले पत्र अनेक जण वाचणार. म्हणूनच जे वाचतील, त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही दोन चिन्हे. तुला ‘प्रिय’ लिहिले, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. त्यांच्यासाठी उद्गारवाचक चिन्ह. तुला मी ‘प्रिय’ कसा काय म्हणू शकतो, हा अनेकांना प्रश्न पडेल. त्यांच्या दृष्टीने हा वेडेपणा आहे. म्हणून प्रश्नचिन्ह. तसाही मी वेडाच आहे, म्हणूनच तुला पत्र लिहू शकतो. अनेक जण मला ‘वेडा’ म्हणतात. विज्ञानातला न्यूटनचा तिसरा नियम लक्षात न ठेवणारे आम्ही ‘जशास तसे’ वागतो. मी मात्र ‘न केलेल्या पापाचे माप’ माझ्या पदरात टाकणारांचाही ऋणी राहतो. त्यांच्या त्या कृतीने मला काही ना काही चांगले शिकवलेले असते, म्हणून त्यांचा तिरस्कार करत नाही. असे वागणारा माणूस आमच्या दुनियेत वेडाच ठरतो. तू तर इतके काही शिकवलेस की तुझा तिरस्कार करणे कसे शक्य आहे? म्हणूनच तुला ‘प्रिय’ म्हटले. उगाच तुझाही गैरसमज व्हायला नको, म्हणून नमनालाच हे स्पष्टीकरण.

कोरोना, तू आलास आणि बघता बघता सारे जग बदलले. जगात सर्व काही प्रथमच थांबले. सर्वजण घरात

कोंडले. यंत्रांचा खडखडाट थांबला. पक्ष्याकडे बघून आकाशात उडण्यासाठी आम्ही विमान बनवले. पक्ष्यापेक्षांही उंच उडणाऱ्या त्या विमानांची घरघर थांबली. धूर ओकणारे कारखाने बंद झाले. कामगारांचे हात थांबले. रेल्वे, गाड्या थांबल्या. नद्यांना प्रदूषित करणारी कारखान्यांची पाईपलाईन प्रथमच कोरडी झाली. सारे काही थांबले. हे आम्हीच थांबवले. औरंगजेबाच्या सैनिकांनी संताजी, धनाजीचा घेतला नसेल इतका धसका आम्ही तुझा घेतला. तू दिसत नाहीस, तरीही आम्ही तुला घाबरून सारे काही थांबवले. हे शक्य झालं ते सुद्धा आम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळेच. आम्ही पटकन सावध झालो आणि तुला भिऊन आम्ही घरात कोंडून घेतले. त्यामुळे जिवितहानीचे अपेक्षेएवढे नुकसान तुला करता आले नाही. पण आर्थ‍िक नुकसान जे केलेस तेही मोठे आहे. जे गेलेत ते जीवही कमी नाहीत. पण दर वर्षी रस्ते अपघातात साडेतेरा लाख लोकांचे प्राण जायचे. दोन ते पाच कोटी लोक कायम किंवा तात्पुरते अपंग बनायचे. प्रत्येक २४ सेकंदाला एक जीव जायचा. ‘वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तर अपघातात जीव जाउ
शकतो’ हे आ
म्हाला माहित आहे. नियम न पाळल्यानेच बहुतांश अपघात घडायचे. तरीही आम्ही निय मोडायचो, अपघात व्हायचे. मात्र तू जीव घेऊ शकतोस, हे लक्षात येताच आम्ही वाहने लॉक केली आणि अपघातात जाणारे अनेक जीव वाचले. तू घेतलेल्या जीवांनी जणू त्याची भरपाई केली. पण तरीही तुझ्यामुळे झालेले नुकसान कमी, याचा आनंद मानायचा; की तू आम्हाला घरात कोंडून टाकलेस, अनेकांचे जीव घेतलेस, त्याचे दु:ख? काहीच कळत नाही. 

        आम्ही उत्सवप्रिय. लग्न असो किंवा यश. आम्हाला ते उत्सवाच्या स्वरूपात साजरे करायचे असते. त्यासाठी
खर्चाची आम्हाला पर्वाच नव्हती. ‘ऋण काढा, पण, सण साजरा करा’ हा जणू आमचा मूलमंत्र बनला होता. आकाशात लग्न, समुद्रात लग्न ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ही संस्कृती रूजू लागली होती. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गातही हे सारे रुजू लागले होते. तर दुसरीकडे आपल्या वडिलांकडे लग्नाचा खर्च उचलण्याइतके पैसे नाहीत, म्हणून काही युवती आत्महत्या करू लागल्या होत्या. लग्नाचा खर्च अनावश्यक आहे, हे आम्हाला कळते. पण खोट्या प्रतिष्ठेपायी, आम्ही ते कर
त होतो. मात्र तुझ्या येण्याने आमच्या उत्सवप्रियतेवरच घाला घातला आहेस. आता पंधरा-वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लागू लागले आहे. लग्नातील अनावश्यक खर्च टाळला जायला लागला आहे. मात्र यानिमित्ताने वापरले जाणारे हारतुरे, गुच्छ हे सारे काही बंद झाले. जेवणावळी थांबल्या. मोठमोठे मंडप घालणे बंद झाले. मंदिरे बंद झाली. आज देवही कुलुपात बंद झाले आहेत. देवाला केले जाणारे दानही थांबले. तेथे वापरली जाणारी फुले शेतातच सडली जाऊ लागली. नाईलाजाने शेतकरी फुलांची शेती नांगरून टाकत आहे. ज्या देवासाठी त्यातील अनेक फुले वापरली जात असत, ते देवही आज तुझे संकट टाळण्यासाठी येत नाहीत. लग्न आणि उत्सवातील अनावश्यक खर्चाचा भार कमी झाला, लग्नपद्धती बदलत आहे, याचा आनंद मानायचा, की शेतकऱ्याला आपली बहरलेली फुलशेती नांगरावी लागते, याचे दु:ख? 

तुझ्या आगमनाने आमची शिक्षण पद्धतीही बदलली आहे. ‘चॉक आणि टॉक’ संस्कृती बदलण्यास तयार नसलेले, आम्ही आता ‘ऑनलाईन’ व्याख्याने देऊ लागलो आहोत. उच्च शिक्षणच नाही, तर, माध्यमिक शिक्षणातही ही संस्कृती रुजू लागली आहे. हे मोठ्यासाठी ठिक झाले. पण शाळेतील मुलांचा किलबिलाट थांबला आहे. महाविद्यालयातील तरूणाईने बहरलेले चैतन्यमय वातावरण नाहीसे झाले आहे. आता कार्यशाळा, चर्चासत्रेही ‘वेबीनार’च्या रूपात होऊ लागली आहेत. एवढेच काय, आज ‘फॅकल्टी इंप्रुव्हमेंट प्रोग्राम’ही असेच ‘ऑनलाईन’ होऊ लागले आहेत. पण सुरुवातीला मोफत असणाऱ्या या वेबीनारसाठी आता शुल्क आकारले जाऊ लागले आहे. चार-पाच दिवसात सूचना काढायची. वक्ते ठरवायचे. त्यांनी होकार देताच, एक फलक तयार करून तो ‘व्हॉटसअप’च्या माध्यमातून सर्वत्र पसरवायचा आणि त्यातून ‘ऑनलाईन पेमेंट’ घेऊन वेबीनार आयोजित करायची. अशी वेबीनार जणू नव्या धंद्याचे रूप घेत आहेत का? अशी शंका यावी, इतपत हे एक-दोन महिन्यातच बदलू लागले आहे. हे सुरू असताना काही मंडळी घरातील वस्त्रावर असतात. काहीजण व्याख्यानाने मन तृप्त करून घ्यावयाच्या वेळेत, आपल्या जिव्हेला तृप्त करत असतात. त्यांच्यामागे इतरांची हालचाल सुरू असते. यामुळे या व्याख्यानांचे गांभिर्य कमी होत आहे. मात्र या नव्या संस्कृतीमुळे प्रवास टळला आहे. त्यामुळे गाड्यांचा वापर होत नाही. प्रदुषण, कर्ब उत्सर्जन कमी होत आहे. या सर्व परिस्थितीत गाड्यांचा वापर कमी झाला, आमची शिक्षण संस्कृती आधुनिक तंत्रज्ञान वापरू लागली याचा आनंद मानायचा की शिक्षणाचे गांभिर्य संपत चालले, मुलांचा किलबिलाट थांबला, महाविद्यालयातील चैतन्याने भारलेले वातावरण लुप्त झाल्याचे दु:ख? 

या पूर्वी तुझ्या पूर्वजांनी अनेकदा मानवावर हल्ले केले. मोठ्या प्रमाणात बळी घेतले. सहाव्या शतकातील 'जस्टिनाईनचा प्लेग’ ही यातील सर्वात मोठी नोंद. जस्टिनाईनच्या सम्राटाने इजिप्तचा भूभाग जिंकला. त्याला नजराणा म्हणून पाठवलेल्या धान्यासोबत काळे उंदीर आणि प्लेग निर्माण करणाऱ्या पिसवा गेल्या. त्यातून सहा कोटी लोकांचा जीव घेणारा प्लेग पसरला. बळींची संख्या त्यावेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के होती. हे बळी प्लेगने घेतले, की मानवाच्या साम्राज्य वाढवण्याच्या हव्यासाने, की सामर्थ्यशाली राजाला खुश करण्यासाठी नजराणे देणाऱ्या लाचारांनी? कोणामुळेही असो. त्यावेळीही गेले ते गरीबच. पुन्हा चौदाव्या शतकात ‘द ब्लॅक डेथ प्लेग’ पसरला. त्याने जगातील एक तृतीयांश लोकसंख्या संपवली. वीस कोटी लोकांचा मृत्यू झाला. या साथीने अनेक वर्षांपासूनचे फ्रांस आणि इंग्लंडचे युद्ध संपवले. ब्रिटनमधील सरंजामी व्यवस्था पूर्णपणे संपून गेली. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता त्यांच्या राजधानीत, लंडनमध्ये मात्र हा प्लेग तीनशे वर्षे अधूनमधून त्रास देत होता. हे कलह, अनिष्ट प्रथा संपवल्याचा आनंद मानावा, की वीस कोटी लोकांच्या मृत्यूचे दु:ख?

मात्र, आम्ही हुशार. प्लेग माणसाच्या संपर्कात आल्याने होतो, हे आमच्या लक्षात आले. व्हेनिस राज्यातील ‘रागूसा’ शहरात नवी पद्धत सुरू केली. इतर देशाची येणारी जहाजे आम्ही बंदरातच तीस दिवस नांगरून ठेवायचो. त्यातील कोणी आजारी नाही पडले, तरच त्यांना शहरात प्रवेश दिला जायचा. ही क्वारेंटाईन करण्याची मानवी इतिहासातील पहिली वेळ. हा शब्द आम्ही इटलीतून घेतला. आम्ही तुझ्या त्या पूर्वजाला, प्लेगला नामशेष केले. त्याने फार दमवले, पण आम्ही त्याला संपवले. तो संपला या आनंदात त्यापासून काहीच न शिकता पुढे तसेच वागू लागलो.

वेळोवेळी सावध करायला तुझे अनेक भाऊबंद आले. त्यांनी आम्हाला सतावले. भरपूर त्रास दिला. अनेक लोकांचे जीव घेतले. देवी, इबोला, एन्फ्ल्यूएंझा, कांजिण्या, चिकनगुनिया, टॉयफॉईड, डांग्या खोकला, डेंग्यू, देवी, धनुर्वात, नारू, मलेरिया, कॉलरा, पोलिओ, प्लेग, कुष्ठरोग, क्षय असे किती सांगावेत? प्रत्येकावर आम्ही मात करत चाललो. ज्यांनी या आजारावर मात करण्याचे उपाय शोधले, मग ते लुई पाश्चर असोत किंवा देवीवरची लस शोधणारे एडवर्ड जेन्नर. आम्ही त्यांना महामानव ठरवले. तरिही तू, वेगवेगळ्या रूपात आम्हाला सावध करण्यासाठी येत राहिलास. आम्हाला सावध करायचा प्रयत्न केला. पाठोपाठ कोणी ना कोणी महामानव तयार झाला. आम्ही तुझ्या त्या रूपावर मात केली. आम्ही सर्वश्रेष्ठ याचा गर्व बाळगत राहिलो. तू पुन्हा पुन्हा रूप बदलत आलास… तसाच आताही तू आलास.

तू भयंकर विनाश करणार, हे आम्ही ओळखले. आम्ही क्वारेंटाईन झालो. तुझा उघड सामना आम्ही आज तरी करू शकत नाही. आमच्या नियमाप्रमाणे आम्ही आमची लाज वाटते म्हणून तोंड झाकून घेतले आहे, असे तुला वाटते. खरंय ते. पण आमच्यातील अनेकांना आजही आपल्या कृत्याची, आम्ही निसर्गाशी केलेल्या क्रूर वर्तनाची लाज वाटत नाही. त्यांनी केवळ तुझ्या भितीने तोंड झाकले आहे. आम्हाला खरंतर जगायला काय लागते? शुद्ध हवा, शुद्ध पाणी, चांगले अन्न आणि उन, वारा पाऊस यापासून वाचण्यासाठी निवारा. मात्र आम्ही प्राणीधर्म विसरलो. आम्हाला स्वार्थाने आंधळे केले. मेल्यानंतर पाच बाय चार फुटाची जागा पुरते. मात्र जिवंतपणी टोलेजंग घर बांधू लागलो. त्यासाठी मोठी वृक्षतोड करत राहिलो. आम्ही गरजेपेक्षा जास्त ओरबडत राहिलो. ‘माझेही माझेच आणि तुझेही माझेच,’ असे वागत राहिलो. ज्यांनी आम्हाला आसरा दिला. आमच्या संस्कृतीचा विकास करायला मदत केली. त्या नद्या आम्ही संपवल्या. गंगेपासून पंचगंगेपर्यत ही समस्या वाढवली. जिवनदायिन्या मृत्यूदायिन्या बनवल्या. पाण्याचे साठे खराब केले. तेलाचे, खनिजांचे अमर्याद साठे उपसले. त्यांना जाळून हवेचे प्रदूषण केले. आमची प्रगती मोजण्यासाठी ‘ऊर्जेचा आधिक वापर’ हे परिमाण वापरू लागलो. प्रत्येक देश ऊर्जेचा वापर वाढवत गेला. त्यातून वायूचे प्रदूषण वाढवले. परिणामी, आमच्यापासून पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त उंचावरील ओझोनच्या थराला धोका निर्माण केला. तो थर संपला तर सूर्याच्या अतिनील किरणांनी आम्ही भाजून जाऊ. तरीही आम्ही ऊर्जेचा वापर वाढवतच गेलो.

शेती, सिमेंटची जंगले, कारखाने उभारण्यासाठी आम्ही जंगलांची कत्तल केली. झाडांनी दिलेल्या ऑक्सिजनशिवाय आम्ही जगू शकत नाही. झाडे ही पावसाची ‘एटीएम’ यंत्र आहेत. झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही. झाडामुळे जमिनीची धूप कमी होते, हे ठावूक असूनही आम्ही झाडे तोडत राहिलो. मी तोडले म्हणून काय फरक पडतो? असा प्रत्येकांचा विचार. झाडेच राहिली नाहीत, तर ऑक्सिजन कोठून येणार? याचा विचार आम्ही एकविसाव्या शतकातही करत नाही. हेच आमच चुकतंय. आम्हाला ते कळतंय, पण वळत नाही. पर्यटनस्थळी जायची आम्हाला फार हौस. संधी मिळाली की जातो. मात्र, त्या सुंदर ठिकाणावरून परतताना सर्वत्र अस्वच्छता पसरवतो. समुद्राच्या किनारे, तलाव, जंगल… जे जे सुंदर आहे, ते आम्हाला उपभोगायचे आहे… तो आम्ही आमचा हक्क मानतो. पण ते सुंदर ठेवण्याची जबाबदारी आम्ही नाकारतो. जंगलातील, समुद्रकिनाऱ्यावरील असणाऱ्या प्राण्यांचे जीवन नष्ट करत आम्ही आमची प्रगती केली. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’ ही विंदांची शिकवण आम्ही शब्दश: घेतली. देणाऱ्या निसर्गाचे हातही आम्ही ओरबाडून घेतले. विंदाना अपेक्षित दानशूरपणाचा गुण घेतलाच नाही. उलट चीनच्याच माओ जेडोंग या हुकूमशहाने चिमण्या धान्याचे नुकसान करतात, म्हणून सारा देश चिमण्यामुक्त केला. मग पिकावर कीड आणि अळ्यांनी हल्ला केला. धान्याचे उत्पादन घटले. निसर्गावरचा हल्ला किती महाग पडू शकतो हे आम्ही अनुभवले. तरीही शिकलो मात्र शून्य. त्याचेच फळ आज आम्ही भोगतो आहोत.

शाकाहारी माणसे तोंडाने पाणी पितात. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात. यावरून आमचे शरीर खरे तर शाकाहारासाठी बनलेले आहे. आम्ही वनस्पती खायच्या. त्या वाढवायच्या. पण आम्ही मांसाहार सुरू केला. दुधदुभत्यासाठी पाळलेल्या मेंढ्यापासून सुरुवातीला लोकर मिळवली आणि नंतर मांस खायला मारू लागलो. शेळ्यांचा वापरही तसाच सुरू केला. उपयोगाचे आहेत तोपर्यंत प्राण्यांचे अन्य फायदे घेतो आणि ते बंद झाले की त्यांना मारून मांस खातो. कोंबड्यांची अंडी पुनरूत्पादनासाठी नव्हे, तर आमच्या जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी असे मानत खाऊ लागलो. ते कमी पडू नयेत म्हणून आम्ही संकरित वाण तयार करू लागलो. ते कमी पडू लागले म्हणून कुत्र्या-मांजरापासून वटवाघळापर्यंत सर्व प्राणी खायला सुरुवात केली. वाघ खायला नाही तर बसायला व्याघ्रासन हवे म्हणून मारले. कोणाची शिकार करायचे बाकी ठेवले नाही आम्ही. ज्यांचा आम्हाला त्रास होतो, तो प्रत्येक जीव आम्ही नष्ट करायचा नतद्रष्टपणा करतो. त्याच्या परिणामांचा आम्ही विचारच केला नाही. तू आणि तुझ्या पूर्वजांनी वारंवार इशारे दिले, पण आम्ही गर्वाच्या शिखरावर बसलो. ‘आम्हीच सर्वश्रेष्ठ’ असा गर्व झाला आम्हाला. भ्रमात राहिलो की आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही. पण तू आलास आणि वाघाला न घाबरणारे आम्ही, तू न दिसताही तुला घाबरलो. इतके घाबरलो की कोणाजवळ जायचे झाले तरी तुझ्या भितीने मन जाऊ देत नाही. भाजी घेताना मनात शंका; धान्य घेताना, औषध घेतानाही भिती वाटू लागली तुझी. तुझ्या धाकाने का होईना आम्ही घरात बसलो आणि…

माणसांच्या गर्दीने फुललेली ठिकाणे आता ओस पडली आहेत. गर्दीने भरलेले मोकळे रस्ते भयाण भासू लागले आहेत. गाड्यांचा आवाज नाही. हॉर्नचा आवाज नाही. सर्वत्र स्मशान शांतता भासू लागली आहे. आकाशात चंद्र आहे, चांदण्या आहेत, मंद वारा आहे, फुललेल्या रातराणीचा गंध आहे, पण सारे नि:शब्द आहे. ही शांतता मनाला अस्वस्थ करते. आम्हाला सवयच नाही, तुझा नि:शब्द शांततेत आनंद घ्यायची. पण आम्ही ज्यांना त्रास देतो, ते पक्षी मुक्तपणे निसर्गात विहार करत आहेत. त्यांना आता आमची भिती वाटत नाही. झाडांच्या जंगलातील प्राणी सिमेंटच्या जंगलात निर्धास्तपणे वावरू लागले आहेत. गाणारे पक्षी कित्येक वर्षानंतर ऐकायला मिळाले. खाडीत फ्लेमिंगोचा थवा जमला आहे. आम्ही त्याच्याही बातम्या करत आहोत. पुन्हा खूप सुंदर वातावरण अनुभवायला मिळते आहे. कित्येक वर्षानंतर या प्राण्यांना आमच्या त्रासाशिवाय फिरता यायला लागले आहे. वेगवेगळ्या बागातील लॉन हिरवेगार झाले आहे. मात्र त्यांचा जवळून आनंद घेता येत नाही. मोरांना नाचताना पाहायचे आहे, फ्लेमिंगोचा थवा पाहायचाय, कोणत्या पक्ष्याचा आवाज कसा आहे, बघायचे आहे, पण बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हे पक्षी, प्राणी आम्हाला वाकुल्या दाखवतात, असे वाटू लागले आहे. जीवाची घालमेल होतेय. पुन्हा बाहेर यावेसे वाटते. पण तू कधी कोठे हल्ला करशील ही भीती बाहेर पडू देत नाही. तू खूप नुकसान केले, असे मी म्हणणार नाही. उलट तू आम्ही करत असलेल्या पर्यावरणाच्या नुकसानीची जाणीव करून दिलीस. लोकांना माझे हे म्हणणे वेडेपणाचे वाटेल. कारण आम्हाला सवय झाली आहे, सर्व गोष्टी पैशात मोजायची. त्यापुढे निसर्गाचा विचार करणे आम्ही कधीच सोडून दिलंय. नाही तर, हेच सांगण्यासाठी धडपडणारी ती ग्रेटा नावाची मुलगी ‘ॲस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी आहे, असे म्हणत त्याचे भांडवल केले नसते. आम्ही इतके कोडगे झालो आहोत की माणसाच्या भावनांची सुद्धा किंमत करत नाही, म्हणूनच देशात वृद्धाश्रमांचे पीक आले आहे. तू अनेकांचे जीव घेतलेस, तरीही स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेस; तरीही प्रश्न आहे, आमच्या टँकरवाड्यात खरेच शुद्ध पाणी मिळत असेल?

निसर्गाने या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस दिला कारण कदाचित निसर्गाला तू येणार आणि आम्हा मानव प्राण्यांना पाण्याची जास्त गरज भासणार, हे त्याने ओळखले असावे. निसर्गावर आम्ही अनंत अन्याय, अत्याचार केले तरी तो केवळ द्यायचाच विचार करतो. निसर्ग मात्र सर्वांचे हित पाहतो. पुराने केलेले नुकसान डोळ्याआड होऊन निसर्गाने त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची, मानवाची काळजीच घेतली, असे वाटते. इटलीच्या प्रसिद्ध लेखिका फ्रांसिस्का मेलँड्री यांनी ‘फ्रॉम युअर फ्यूचर’ हे मानवाला सावध करणारे पत्र लिहिले. मात्र खरेच बदलणार आहोत का आम्ही? हा प्रश्न माझ्याही मनात आहे. केरळमध्ये भुकेने व्याकूळ गरोदर हत्तीणीच्या तोंडात अननसामध्ये पेटते फटाके देऊन जीव घेणारे मानवातील ‘दानव’ ही शंका निश्चितच रास्त ठरवतात. तरीही खूप झाले रे… आता संपव हे सगळं. मला खात्री आहे, तुला संपवणारी लसही आम्ही शोधून काढू. तुला नामशेष करण्यात शास्त्रज्ञ आणि संशोधक निश्चितच यशस्वी होतील. मात्र तोपर्यंत तुझा प्रकोप लांबवू नकोस. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी, आमच्या पुढच्या पिढीला स्वच्छ पाणी, शुद्ध हवा मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. जल, जंगल आणि जमीन

याचा समतोल साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आम्ही जन्मलो तेव्हा हे जग जितके सुंदर होते, त्यापेक्षा जास्त सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध राहू. आमच्या नातवंडाना, परतवंडांनाही आजी चिऊ-काऊचा घास भरवू शकेल, यासाठी सर्व सजीवांना जगण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध राहील, याची काळजी घेऊ. निव्वळ वृक्षारोपणाचे फोटो झळकवण्यासाठी झाडे न लावता आम्ही ती जगवू… पण तू आता जा. ‘पुढच्या पिढीला जरब बसलीय’ अशी समस्त मानव जातीतर्फे नाही, पण बहुसंख्येने असणाऱ्या सामान्य जनांच्या वतीने मी तुला खात्री देतो. नाही तरी तुझे बहुतांश बळी हे सामान्य जनांचेच असतात. ही सामान्य माणसे ही ‘ॲक्टिंग’वर नाही तर ‘ॲक्शन’वर भर देत असतात. त्यांना दिखाव्यात रस नसतो. ही मंडळी निश्चितच आता निसर्गासाठी, त्याला जपण्यासाठी आधिक कृतीशील होतील.   
  
अरे, तुझ्यामुळे बालवर्ग पुन्हा घरातील खेळाकडे वळलाय. तो आता सागरगोटे, कॅरम खेळू लागला आहे. 
गाण्यांच्या आणि गावांच्या नावाच्या भेंड्या खेळतोय. पण त्यांच्या सक्षम वाढीसाठी त्यांनी बाहेरही फिरायला हवं. निसर्ग अभ्यासायला हवा. त्यांचा किलबिलाट शाळामध्ये व्हायला हवा. निसर्ग माफ करतो. अगदी ‘निसर्ग’ नाव मिळालेले वादळसुद्धा किती शहाण्यासारखे वागले. त्यामुळे मोठा विनाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यांने काही झाडांचा बळी घेतला. काही पक्षी मृत्यूमुखी पडले. पण त्याच्या एकूण वागण्यातून तुझ्यामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या मानव प्राण्याला त्यांनी त्रास नाही दिला. ‘निसर्ग’ नावाचे वादळ असे वागत असेल, तर मग तूही निसर्गाचाच भाग आहेस ना. स्वत:ला आवर. आम्हाला घातलेले ‘लॉक’ आता तू ‘डाऊन’ कर. तुला पुन्हा येण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही… आम्ही आमच्यात सुधारणा करू… आणि नाही सुधारलो, तर निसर्गाच्या असमतोलातच आम्ही मरू, हे कळलंय आम्हाला… तेव्हा तू जा… अगदी कायमचा!                                             

                                                निसर्गप्रेमी  

३६ टिप्पण्या:

  1. खरंय,,, जीवनात आपल्या कोणीही कसाही गुरुची भूमीका बजावत असतो पण आपण त्याला गुरूच्या नजरेत कधीच बघत नाही
    तसच या करोना ने पण खूप काही जीवनाचे रहस्य, निसर्गाची जपणूक अस खूप काही शिकवून गुरुचे स्थान घेतले म्हंटल तरी वावग ठरणार नाही

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय अभ्यासपूर्ण उत्कृष्ट लेख आहे. सर्वांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारा आहे. प्रत्येकाने आपल्या कृतीत हा विचार आणायची गरज आहे. वेळीच आपण सावध झालो पाहिजे.निसर्गाचा पर्यावरणाचा हा आवाज
    सर्वांनी ऐकला पाहिजे. हा संदेश सर आपण सर्वांना दिलेला आहे. निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये याचा विचार करून व प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी करून राहिलो तरच आपल्याला भविष्य आहे.
    आपल्या आजूबाजूला जे घडत आहे त्या विषयीची वास्तव व संवेदनशील विचार सर आपण या लेखातून सर्वांना दिलेले आहेत. त्याबद्दल आपले मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आम्ही आपले आभारी आहोत.

    उत्तर द्याहटवा
  3. सर अतिशय सुंदर व छान माहिती, चांगला संदेश व विचार मांडले आहेत

    उत्तर द्याहटवा
  4. अरे व्वा, अतिशय छान माहिती आहे या पत्ररुपी लेखामध्ये.

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय विचारप्रवर्तक पत्र लिहिले गेले आहे. एका बाजूला संशोधक आणि दुसऱ्या बाजूला साहित्यिक यातून डोकावतो. खुप खुप धन्यवाद सर!

    उत्तर द्याहटवा
  6. छान लिहल आहे. अभिनंदन. पण काही काळा नतंर पुन्हा एकदा हरी ओम होणारच. अर्थचक्र चालवावयाचे असेल तर थांबून कसे चालेल. हा विषाणू मानव निर्मित आहे. त्यामुळे पुढे असे अनेक धोके तयार करण्यात येणार आणि समाजात वावरताना भिती वाटत राहणार.

    उत्तर द्याहटवा
  7. सर लेखांचे रुपातंर ग्रंथात करावे.ही न्रम विनंती

    उत्तर द्याहटवा
  8. Sir khupch utkrusht lekh ahe ,,, manvalajaval itka mothhe sankat yevunahi tyanchyamadhle matbhed ahumbhav badlle nahit ,, manusaki sampat challai manus khupch swarthi prani ahe he punha sidhh zale

    उत्तर द्याहटवा
  9. मानवाने निसर्गावर केलेल्या अन्यायाची सविस्तरपणे मांडणी करून त्याला सुधारण्यासाठी कोरोना आलाय की काय अस एकंदर वाचल्यावर लक्षात येते...सर,खूपच छान माहिती मिळाली...

    उत्तर द्याहटवा
  10. सर नमस्कार ,अत्यंत उदबोधक पत्र!मानवी हाव आणि हव्यासापोटी निसर्गाचे शोषण अतिक्रमण आणि प्रदूषण करुन पृथ्वीची वाताहत केली. मात्र आज निसर्ग मानवास संदेश व इशारा देत आहे...मानवा तू पृथ्वीचा विश्वस्त आहेस मालक नाही.

    उत्तर द्याहटवा
  11. खूप छान पत्र सर...!,
    प्रत्येक व्यक्तीला विचार करावा लागेल असे लिखाण.
    मनपूर्वक अभिनंदन💐💐

    उत्तर द्याहटवा
  12. सर लेखाद्वारे सद्याची सत्य परिस्थिती समजली. मनपूर्वक अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  13. हे पत्र लिहिल्या बद्दल तुमचे अभिनंदन सर. हे पत्र लोकांना निसर्गा बद्दल असणाऱ्या निष्टे विषयी विचार करायला लावणारे आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. सर अत्यंत वस्तुस्थितीदर्शक , अंतर्मुख करण्यास भाग पडणारे विचार मांडलेत
    आम्ही यातील काही गोष्टीचे भान ठेऊ
    आपली निसर्गप्रती संवेदना आम्ही जाणतो
    आपल्या या कार्यात सदैव सोबत राहू

    उत्तर द्याहटवा
  15. मानवी संवेदनांचे विस्तृत विश्लेषण

    उत्तर द्याहटवा
  16. "निसर्ग भरभरून देतो फक्त आपण ओरबडून घेऊ नये...." पत्राच्या माध्यमातून निसर्गाविषयी मला मिळालेला संदेश.

    उत्तर द्याहटवा
  17. अतिशय गंभीरपणे आत्मपरीक्षण करायला लावणारे हे पत्र आहे. कोरोनावरील हे विचारपूर्वक लिहलेले मराठीतील पहिलेच पत्र असावे.जागतिक महामारीच्या कयामतीच्या या घडीला आत्मशोध आणि डोळस समूहशोधाची भावना व्यक्त करणारे हे पत्र प्रत्येक माणसाला ह्रदय पिळवटून विचार करायला लावणारे पत्र आहे.सर्वांनी मुळातून वाचावे असे हे पत्र लिहल्याबद्दल मी डॉ. व्ही.एन.शिंदे सरांना मनापासून धन्यवाद देतो. समाजाला दिशा देणारी माणसे चांगल्या अर्थाने वेडी असतात,(अनेक जण मला ‘वेडा’ म्हणतात. विज्ञानातला न्यूटनचा तिसरा नियम लक्षात न ठेवणारे आम्ही ‘जशास तसे’ वागतो. मी मात्र ‘न केलेल्या पापाचे माप’ माझ्या पदरात टाकणारांचाही ऋणी राहतो. त्यांच्या त्या कृतीने मला काही ना काही चांगले शिकवलेले असते, म्हणून त्यांचा तिरस्कार करत नाही. असे वागणारा माणूस आमच्या दुनियेत वेडाच ठरतो. तू तर इतके काही शिकवलेस की तुझा तिरस्कार करणे कसे शक्य आहे? म्हणूनच तुला ‘प्रिय’ म्हटले. उगाच तुझाही गैरसमज व्हायला नको, म्हणून नमनालाच हे स्पष्टीकरण)सर्वच दिशादर्शक,पूरक, संस्कारक,उपकारक आणि प्रकाशक धन्यवाद!सर......

    उत्तर द्याहटवा
  18. डॉ.व्ही.एन.शिंदेसरांचे हे पत्रलेखन म्हणजे समकालीन कोरोनाग्रस्त पर्यावरणसंदर्भातील मराठीतील मुक्तगध्याचा उत्कृष्ट नमुना होय.

    उत्तर द्याहटवा
  19. सर तुमचे विविध विषय असलेले लेख अतिशय सुंदर व वाचनि‌‌‌‌‌य असतात. नेहमीच काहीतरी वेगळं maha मिळते.

    उत्तर द्याहटवा
  20. समर्पक,आणि यथार्थ , विशेषतः वैयक्तिक पत्र्याची शैली निवडल्यानं खुप भावतात शब्द.. पुढच्या पिढीसाठी स्वत:ला कमीपणा घेऊन व गौण मानुन केलेलं confession with gratitude खुप सुंदर साहित्यिक मुल्य घेऊन उतरलय तुमच्या प्रतिभेतुन... धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा