गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

मृत्युपत्र



मुलांनी फ्लॅटकडे चक्कर मारली. बाल्कनीचे दार उघडे. आत वडील मात्र नव्हते. त्यांच्या फ्लॅटचा मजला पूर्ण पूरात बुडाला होता. वडील वाहून गेले असणार अशी त्यांची खात्री पटली. आपल्या मार्गातील अडसर दूर झाल्यासारखे त्यांना वाटले. पूरात फ्लॅट बुडाल्याची आणि वडील बेपत्ता झाल्याची नोंद त्यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सक्रिय सुधाकरला हे समजले. त्यांने दिनकररावांच्या कानावर ही गोष्ट घातली. आता वृद्धाश्रमातील लोकांपेक्षा कमनशिबी आपण आहोत असे दिनकररावांना वाटू लागले..... २०१९च्या पूरपरिस्थितीवर आधारीत कथा इंद्रधनुष्य या दिपावली अंकात प्रसिद्ध झाली. इंद्रधनुष्यच्या सौजन्याने ती येथे प्रसिद्ध करत आहे....... 
--------------------------------------------------------------------------------------------

    दिनकरराव एक अजब रसायन होते. आपल्या मार्गाने जाणारे, सरळमार्गी. कोणी आडवे आले तर आपलाच रस्ता बदलून जाणारे. त्यांचे वागणे एखाद्या साधूचे होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झालेले. आईने मामाच्या आधाराने दिनकररावांना शिकवले. बारावीच्या मार्क्सवर कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षण संपता संपता राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि दिनकररावांना पदवी मिळायच्या आधीच नोकरी मिळाली. निकाल लागताच ते नोकरीवर रूजू झाले. नोकरीला लागताच मामाने लग्नासाठी आपल्या मुलीचा सुमनसाठी प्रस्ताव ठेवला. दिनकररावांनी व आईने लगेच होकार दिला. दिसायला छान. चांगली बारावी झालेली. लवकरच लग्नही झाले. लग्नानंतर दिनकरराव नोकरीनिमित्त बाहेर राहात. मात्र कुटुंब त्यांनी गावातच ठेवले. आठवडी सुट्टीला ते येत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना नोकरीत फारसा त्रास झाला नाही. त्यांना यथावकाश दोन मुले झाली. आठवड्याला येऊन मुलांचे लाड करणे, घरात हवे नको ते पाहणे हे त्यांच्या सवयीचा भाग होऊन गेले. मुले आजी आणि आईसोबत राहून शिक्षण घेऊ लागली. दिनकररावांनी लवकरच 'सुसंगती' अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर एक फ्लॅट घेतला. आपली नोकरी त्यांनी इमानइतबारे पार पाडली. प्रामाणिकपणा हा अवगुण मानण्याचा तो काळ नव्हता. त्यांना पदोन्नती मिळत गेली. 
     मुलेही दिनकररावांप्रमाणेच अभ्यासात हुशार होती. चौथी, सातवीची शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. बारावी उत्तीर्ण झाल्यावर दोन्ही मुलांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचे ठरवले. दिनकररावांनी दोन्ही मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. मुले मेकॅनिकल इंजिनिअर झाली. दोन्ही मुलांना शेजारच्याच एमआयडीसीत चांगल्या कंपन्यांत नोकऱ्या मिळाल्या. दिनकररावांचा संसार उत्तम रितीने मार्गाला लागल्याचे पाहातच आईचे वयोमानानुसार निधन झाले. म्हातारी मोठ्या समाधानाने शंभराव्या वर्षी गेली.
      दरम्यान, पस्तीस वर्षांच्या सेवेनंतर दिनकरराव सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या वेळी चांगली घसघशीत रक्कम मिळाली. पत्नीशी चर्चा करून प्लॉट घेऊन बंगला बांधावा, असा त्यांनी निर्झय घेतला. दिनकररावांचा प्रामाणिकपणा कामाला आला. साखर कारखान्याचे चेअरमन शामराव पाटलांनी दिनकररावांना माफक किमतीत एक पाच गुंठ्याचा प्लॉट देऊ केला. मुलांची लग्न होणार होती. सुना येणार होत्या. अशा परिस्थितीत मोठ्या घराची गरज होतीच. दिनकररावांनी तो प्लॉट खरेदी केला. सुमनताई फार विचारी होत्या. सुना कोण येणार, कशा असतील, हे माहीत नसल्याने घर बांधतानाच दोघांची स्वतंत्र घरे राहतील, अशा पद्धतीने बंगल्याची रचना केली. एका बेडरूमला स्वयंपाकगृहात रूपांतरित केले की ते जुळे बंगले होतील, असे बांधकाम केले. वर्षभरात बांधकाम संपवून ते नव्या घरात राहायला गेले. विश्रामनगरातील घराभोवती वेगवेगळी झाडे लावून दिनकररावांनी नारळ, केळी, चिक्कू, अंजीर अशी फळे परसबागेत उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली. मात्र सुमनताईंच्या भावना फ्लॅटमध्ये गुंतल्या होत्या. त्यांच्या आग्रहाखातर दिनकररावांनी तो विकला नाही.
      घर बांधले तरी बरेच पैसे शिल्लक होते. बँकेत ठेवून फार व्याज येणार नव्हते. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही संपलेला. दिनकररावांची शेतीची आवड जागी झाली. पत्नीशी चर्चा करून त्यांनी घरापासून पाच किलोमीटरवरच्या गावठाणातील कॅनॉलकडेची चार एकराची शेतजमीन घेतली. त्या शेताच्या आजूबाजूचे अनेक शेतकरी शेतातच वस्तीला राहायचे. ते पाहून दिनकररावांनीही शेतात तीन खोल्यांचे टुमदार घर बांधले. ते आणि पत्नी अधूनमधून शेतात जाऊन राहू लागले. दोन्ही मुलांची वर्षाच्या फरकाने लग्न झाली. सुना चांगल्या होत्या. सासू-सासऱ्यांची चांगली काळजी घ्यायच्या. सासूची सुनांना मदतच व्हायची. हळहळू दोन्ही सुनांना मुले झाली. नातवंडांना खेळवण्यात सुमनताईंचा वेळ निघून जायचा. त्यांचे हळूहळू शेतात जाणे कमी झाले. दिनकररावांचा दिनक्रम मात्र ठरल्यासारखा होता. ते शेतात जायचे सोडत नव्हते. शेतातील वाढणारी पिके पाहायला त्यांना आवडायचे. काही काम असले की एखादा दिवस ते मुक्कामालाही राहायचे.
     दोन्ही मुलांची नोकरी सुरू होऊन आठ दहा वर्ष झाली. एवढ्या वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांना आता आपण स्वत:चा उद्योग सुरू करावा, असे वाटू लागले. दोघे पैसे कसे जमवायचे, याचा विचार करत. फाउंड्री सुरू करायची, हा एकच विचार त्यांच्या डोक्यात होता. मात्र उद्योग उभा करायचा, तर भांडवल पाहिजे. ते आणायचे कोठून, याच प्रश्नाचे उत्तर दोघे भाऊ शोधत होते. फ्लॅट विकायला सांगितला तर आई विकू देणार नाही आणि तेवढे पैसे पुरणारही नाहीत, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे शेती आणि फ्लॅट दोन्ही विकले तरच बँक कर्जासाठी आवश्यक असणारी तारण रक्कम उभी राहू शकते, हे त्यांच्या लक्षात आले.
     हा विषय वडिलांकडे काढता येणार नव्हता. हा विषय आईजवळच काढणे इष्ट राहील, हे त्यांच्या लक्षात आले. दोघांची सुट्टी गुरूवारी असायची. त्या दिवशीही दिनकरराव नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दोघांचीही मोठी मुले अंगणवाडीत गेली होती. तर धाकटी आजीजवळ खेळत होती. ही वेळ साधून मुलांनी आईकडे विषय काढला. शेती आणि सध्या रिकामा असलेला फ्लॅट विकावा आणि आम्हाला धंदा काढायला मदत करावी, असे दोन्ही मुले एकसुरात सांगत होती. सुमनताईंना हे अनपेक्षित होते. त्यांना पतीचे शेतीप्रेम माहीत होते. नोकरीत असताना अनेकांची शेती त्यांनी मनोभावे फुलवली होती. त्यावेळी आपली पण शेती असावी, असे त्यांना वाटायचे. ते त्यांचे स्वप्न सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता कोठे पूर्ण झाले होते. पोटच्या पोरांइतकेच ते शेतीवर प्रेम करत होते. हे सर्व माहीत असलेल्या सुमनताईंनी ही गोष्ट शक्य नसल्याचे सांगितले. मुलांनी हरतऱ्हेने समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. दोघेही नाराज झाले. तो विषय थांबवून सुमनताई नातवंडाशी परत खेळू लागल्या. दोन्ही भाऊ हॉलमध्ये बेचैन अवस्थेत बसून चर्चा करू लागले. उद्विग्नता बाहेर पडत होती. ही चर्चा ऐकणारी थोरली सून म्हणालीसुद्धा 'नाही ना त्यांची इच्छा, तर विषय सोडून द्या ना. नाही तरी आपले चांगलेच चालले आहे की. काय कमी आहे आपल्याला'. यावर धाकटा बोलला, वहिनी, तुला यातलं काही कळत नाही. आपला व्यवसाय सुरू झाला तर आपल्याला दुप्पट चौपट पैसे मिळतील. मुलांना चांगल्या शाळेत घालायचे, त्यांचे सारे करायचे तर आता मिळतात ते पैसे पुरतील का? शाळांची फी आता लाखात आहे. हे सारे करायचं तर उद्योग सुरू केल्याशिवाय पर्याय नाही. ही म्हातारा म्हातारी मेल्यावरच ते शक्य होईल, असं दिसतंय!'
ज्या पोरांना तळहातावरच्या फोडासारखे जपले, त्यांची आजारपणं झेलली. शिकवून इंजिनिअर केले. त्यांच्या तोंडातील हे शब्द कानावर पडताच सुमनताई हलक्याशा कण्हल्याचा आवाज आला. आईसारखे सासूवर प्रेम करणारी सून पळत गेली. मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच सुमनताईनी प्राण सोडलेला. 'हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू' हे कागदावरील कारण सर्वांना कळाले. घरात काय विषय झाला होता, हे दिनकररावांना कळू नये, याची मुलांनी खबरदारी घेतली. आता सासू गेल्यानंतर नवऱ्याने आणि दिराने पुन्हा शेत विकायचा विषय काढायचा नाही, ही अट घालून सूनही गप्प बसली. दु:खाचे दिवस संपले आणि पुन्हा प्रत्येकजण आपापल्या व्यापात बुडाला.
       आता दिनकरराव शेतातच राहायला लागले. शेत चांगले पिकवत होते. बायको अचानक कशी गेली. शेवटचे बोललीसुद्धा नाही, याचे दु:ख विसरण्यासाठी शेतातच ते रमत. वर्षांमागून वर्षे सरली. आता पावसाचे काही खरे नाही, असे वाटावे इतका निसर्गही बदलला. मात्र दिनकररावांची शेती कॅनॉलजवळ असल्याने पाणी यायचे. शेतात विहीरही होती. त्या भागातील शेती हिरवीगार होती. मात्र अनेकदा पाऊस पडला नाही की तळ्यातच पाणी नसायचे. मग कॅनॉलचा पाणी पुरवठा नियंत्रित व्हायचा. तरीही दिनकरराव काटकसरीने पाणी वापरून शेत चांगले पिकवायचे. आठवड्याला शहरात जाऊन नातवंडाबरोबर खेळून पुन्हा नवा उत्साह घेऊन शेतात यायचे.
     या वर्षी मात्र चित्र काही वेगळेच दिसत होते. हवामान खात्याने जूनमध्ये पाऊस येणार नाही, असेच सांगितलेले. जुलै संपत आला तरी पाऊस नव्हता. जमिनीत बी तर पेरलेले, पण पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांचीच काळजी वाढलेली. पेरलेले काहीच उगवणार नाही, अशीच सारी चिन्हे. हवामान खात्याचा अंदाज होता की नेहमीइतका पाऊस पडणार. प्रत्येक प्रयोगशाळेचा अंदाज वेगळा होता. कोणी शंभर टक्के तर कोणी नव्वद टक्के पाऊस पडणार म्हणत होते. मात्र, तो कधी पडणार, हे सांगायला कोणीच तयार नव्हते. हवामान खात्याचा अंदाज चेष्टेचा बनत चालला. दिनकररावांना मात्र खात्री होती- पाऊस येणार!
      जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला. हवामान खाते आता मुसळधार पाऊस पडणार, असे सांगू लागले.  मात्र सर्वांनीच हा अंदाजही चेष्टेवर नेला. कोणालाच विश्वास वाटत नव्हता. दिनकररावही शेतात फिरत होते. आकाशात काळे ढग जमू लागले. काही मिनिटांत ढगांनी आकाश झाकोळले. जोरदार पाऊस येणार असे चिन्ह दिसू लागताच ते शेतातील घरात परतले. पाऊस सुरू झाला. दिनकरराव खूश झाले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही पाऊस तसाच पडत राहिला. वरच्या बाजूला डोंगरात जोरात पाऊस पडत असल्याच्या बातम्या येत होत्या. एकएक करत सर्व धरणे भरू लागली. धरणाचे पोट तुडुंब भरल्यानंतर आणि धरण फुटायची वेळ आल्यानंतर पाणी सोडायला सुरूवात झाली. एकेक करत वरच्या डोंगररांगांतील लहानमोठ्या सात प्रकल्पांचे दरवाजे उघडले. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. येणारे पावसाचे पाणी आता धरणात न थांबता नदीच्या पात्रातून धावू लागले. एकाचवेळी सर्व पाणी आल्याने नद्यांना पूर आला. पावसाचा जोर वाढतच गेल्याने पाणी आणखी वाढू लागले. गावेच्या गावे पुराच्या पाण्याखाली गेली. शहरातही पाणी शिरल्याची बातमी आली. शहरातील आपल्या विश्रामनगर भागात पाणी पोहोचत नाही, हे दिनकररावाना माहीत होते. फोनवर सुना-नातवंडाशी ते बोलत होते. सर्व कुशल असल्याचे पाहून तेही निर्धास्त राहिले.
     पूर एक दोन दिवसात उतरेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र चार पाच दिवस झाले तरी पाऊस थांबायचे आणि पूर ओसरायचे नाव घेत नव्हता. शहराची चारी बाजूनी कोंडी झाली. पुरात अडकलेल्या लाखो लोकांना वाचवण्यासाठी सैन्याला आणि एनडीआरएफला बोलावले. मदतकार्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले. तात्पुरत्या निवारा छावण्या उभारल्या जात होत्या. लोकांना त्यामध्ये आसरा दिला जात होता. ज्यांना पुराचा फटका बसला नव्हता ते लोक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत होते. शहराला पाण्यासह सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा थांबलेला. पेट्रोल, डिझेलवर प्रशासनाने निर्बंध टाकले. शहराचा पाणी पुरवठा थांबलेला. या पाणीबाणीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. शहराच्या उत्तरेकडून येणारे दुध घरोघरी मिळत होते. मात्र भाजीपाला कोठेच मिळत नव्हता. शेतात लावलेला भाजीपाला पावसाने चांगलाच तरारला होता. एरवी दिनकरराव तो आठवड्याला घरी घेऊन जायचे. सूनबाईनी भाजीची अडचण सांगितलेली त्यांनी मनावर घेतली. शेतात फिरून घरासाठी आणि शेजाऱ्यांसाठी भरपूर भाजी काढली. आठदहा दिवस पुरेल एवढी भाजी. दोडका, दुधी, वांगी, घेवड्याच्या शेंगा, शेपू, पालक, मेथी अशा सर्व भाज्यांचे गाठोडे बांधले आणि ते विश्रामनगरातील आपल्या घरी आले. थोरली माहेरी गेलेली. ती तिकडेच अडकली होती. धाकटी एकटीच घरी होती. कारखाने बंद असल्याने दोन्ही मुलेही घरीच होती. शेतातल्या ताज्या भाज्या पाहून सून आनंदली.
     दिनकरराव पावसात भिजलेले. त्यामुळे अंगात बारीकसा ताप आलेला. सून स्वंयपाकाच्या तयारीला लागली, तसे दिनकररावच तिला म्हणाले, 'भाज्या शेजाऱ्यांनाही दे, म्हणजे त्यांनाही ताज्या भाज्या खाता येतील.' सून भाज्या वाटायला गेली. दोन्ही भावांच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू झाले. हवामान खात्याने पावसाचा जोर वाढतच जाणार, असे सांगितले होते. म्हणजे पूर वाढत जाणार होता. सून घरी येताच त्या दोघांनी 'वडिलांना दवाखान्यात नेतो' असे सांगितले. दोघांनी वडिलांना गाडीत घेतले. गाडी बाहेर काढून त्यांनी ती अपार्टमेंटच्या दिशेला वळवली. दिनकररावानी विचारलेपण 'अरे इकडे कुठे?' यावर थोरला म्हणाला, 'अपार्टमेंट खाली केलीय. आपला फ्लॅट तर रिकामाच आहे ना. रिकाम्या फ्लॅटमध्ये चोऱ्या होतात. आपण फ्लॅट बघून जाऊ.' दिनकररावांनाही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, असे वाटले. अपार्टमेंटच्या खाली पाणी गुडघाभर होते. ते पाण्यातून आत गेले. फ्लॅटमध्ये सर्वत्र फिरत दिनकरराव जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच दोघेही हळूच बाहेर पडले आणि बाहेरून कुलुप लावले. दिनकरराव हॉलमध्ये आले, तर हॉलच्या खिडकीतून मुलांची गाडी जाताना दिसली. त्यांनी हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण तेथे कोणीच नव्हते. फ्लॅटचा दरवाजाही बंद होता.
     दिनकरराव बाहेर बघत बसले. दवाखान्यात जायचे म्हणून त्यांनी मोबाईलपण घेतला नव्हता. कोणाला फोन करता येत नव्हता. ते हताशपणे कॉटवर बसले. बाहेर कोणी दिसते का, ते पाहत होते. मात्र सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. माणसाचा मागमूसही नव्हता. असाच एक दिवस गेला. तोपर्यंत पाणी आणखी वाढले. ते कॉटवर बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पाणी फ्लॅटमध्ये घुसू लागले. बारा वाजेपर्यंत पाणी कॉटला चिकटले. आता मात्र त्यांना भीती वाटू लागली. मुलांनी असे का केले असावे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. दोन दिवसापूर्वी दुपारी जेवण केलेले. अंगात बारीक तापही होता. रात्र पूर्ण अंधारात घालवलेली होती. हाका मारून अंगातली उरली सुरली ताकतही गेलेली. त्यांना अधूनमधून ग्लानी येऊ लागली. ते तशाच अवस्थेत कॉटवर पडायचे. पाणी कॉटवर चढले नव्हते. आता पातळी वाढायची थांबली होती. मात्र आपली कोणी सुटका करेल, असे त्यांना वाटेनासे झाले.
ते मनाने पूर्ण खचले असताना 'कोणी आहे का आत?' अशी हाक आली. अर्धमेल्या अवस्थेत त्यांनी खिडकीकडे हात नेला आणि खिडकी हलवली. अशक्तपणामुळे घशातून आवजही येत नव्हता. बाहेरच्या तीक्ष्ण नजरांनी ती हालचाल टिपली आणि बोट त्या फ्लॅटकडे घेतली. खिडकीतून पाहिले तर आत दिनकरराव होते. त्या बोटीत स्थानिक वृत्तपत्रात कृषीविषयक लेखन करणारा पत्रकार सुधाकरही होता. तो दिनकररावांना ओळखत होता. दिनकररावांच्या शेताजवळ त्याचा वृद्धाश्रमही होता. दहा पंधरा वृद्धांना तो सांभाळायचा. दिनकररावही तेथे अधूनमधून त्याच्याबरोबर जायचे. कधीकधी शेतातला भाजीपाला द्यायचे. त्या वृद्धांना पाहून आपण किती सुखी आहोत, असे वाटायचे. घरात सर्वत्र पाणी. खिडक्यांना ग्रील. बाल्कनी तेवढी विनाग्रीलची. त्याने दिनकररावांना बाल्कनीकडे यायला सांगितले. दिनकररावांच्या अंगात तेवढेही त्राण नव्हते.
     शेवटी सुधाकरने बोट बाल्कनीकडे घेतली. तो आत गेला. दिनकररावांचे मुटकुळे उचलून बोटीत ठेवले. बोट सुसाट छावणीकडे नेली. तेथील डॉक्टरनी तपासून दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला. दिनकरराव मुकाट राहिले. दोन दिवसांत औषधोपचाराने बरे वाटले. पुराची परिस्थिती अजूनच भयानक झालेली. दिनकररावांच्या अपार्टमेंटचा दुसरा मजलाही पाण्याखाली गेलेला. त्यांच्या मनातील घालमेल वाढली होती. ते अस्वस्थ होते. मुलांनी आपल्याला का कोंडले असावे, हा एकच विचार त्यांचे डोके बधीर करून सोडत होता. तेवढ्यात सुधाकर तिथं आला. त्यांनी त्याला आपण शेताकडे जाणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्याबद्दल कोणाला बोलू नको, असेही सांगितले. आवश्यक नोंदी करून त्यांनी छावणी सोडली.
     आता काही झाले तरी शेत सोडायचे नाही, असे त्यांनी ठरवले. इकडे घरी गेल्यांनतर सुनेने सासरे कोठे आहेत, असे विचारल्यावर दोन्ही मुलांनी औषधे घेऊन शेतात गेले, असे सांगितले. सासऱ्याचे शेतीप्रेम माहीत असणाऱ्या सुनेला ते पटले. आठ दिवसांनी पूर ओसरायला सुरूवात झाली. मुलांनी फ्लॅटकडे चक्कर मारली. बाल्कनीचे दार उघडे. मात्र आत वडील नव्हते. त्यांच्या फ्लॅटचा मजला पूर्ण बुडाला होता. वडील वाहून गेले असणार, अशी त्यांची खात्री पटली. आपल्या मार्गातील अडसर दूर झाल्यासारखे त्यांना वाटले. पूरात फ्लॅट बुडाल्याची आणि वडील बेपत्ता झाल्याची नोंद त्यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सक्रिय सुधाकरला हे समजले. त्याने दिनकररावांच्या कानावर ही गोष्ट घातली. आता त्यांना वृद्धाश्रमातल्या लोकांपेक्षा आपण कमनशिबी आहोत, असे वाटायला लागले. मुलांबाबत त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला.
     दुसऱ्या दिवशी दिनकरराव शहरात आले. मित्र शेटे वकिलांच्या घरी गेले. वकिलसाहेबांना आपले मृत्यूपत्र तयार करायला लावले. आपली जमीन आणि फ्लॅट त्यांनी सुधाकरच्या वृद्धाश्रमास दिला. शहरातील बंगला मुले आणि सुनांच्या नावावर केला. नेमके त्याच दिवशी दोन्ही मुले शेतात गेली. तिथे कोणीच नाही हे पाहून त्यांना वडील गेल्याची खात्री पटली. आता विक्रीची प्रक्रिया करायला हरकत नव्हती. वडिलांचे वकिल  मित्र ॲङ शेटे आपल्याला चांगली मदत करतीलम्हणून दुसऱ्या दिवशी दोघे भाऊ शेटे वकिलांना भेटायला गेले. वकिल साहेबांना फ्लॅट आणि शेती विक्रीसाठी जाहिरात बनवायची, असे सांगितले. वकिलसाहेबांनी कागदपत्रे पाहिली आणि शांतपणे सांगितले की, ही जमीन आणि फ्लॅट आता त्यांना विकता येणार नाही. त्यांच्या वडिलांनी कालच मृत्यूपत्र केले आहे. या दोन्ही मालमत्ता त्यांनी वृद्धाश्रमाच्या नावे केल्या आहेत. दोघांनीही हे कसे शक्य आहे, असा एका सुरात प्रश्न विचारला. यावर वकिल साहेब काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे मृत्यूपत्र त्यांच्यासमोर ठेवले आणि ते दोघेही सुन्न होऊन त्याकडे पाहातच राहिले.