('नवे
- गाव आंदोलन - जन-गण-मन' या सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाने एप्रिल आणि मे महिन्याचे
अंक पाणी या विषयावर प्रसिद्ध केले. यातील मे २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या
अंकातील शाश्वत भूजलासाठी या विषयावर माझा लेख समाविष्ट होता. तो लेख 'नवे - गाव आंदोलन -
जन-गण-मन' मासिकाच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद... व्ही. एन.
शिंदे)
--------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील
पाण्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. पाण्याचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक
रूप धारण करू लागला. १९७२ साली झालेल्या पावसापेक्षा जास्त पाऊस पडूनही
महाराष्ट्रात अशी स्थिती वारंवार उदभवू लागली. ही परिस्थिती इतकी भयंकर झाली की
२०१६ साली लातूर या जिल्ह्याचा गावाला रेल्वेने पाणी पुरवावे लागले. ही परिस्थिती
बदलण्यासाठी सार्वत्रिक विचार होवू लागला. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून नाना
पाटेकर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचे कायम चटके सहन केलेल्या मकरंद अनासपुरे
यानी आपल्या परीने प्रयत्न सुरू केले. अमिर खान आणित्यांचया सहकाऱ्यानी 'वॉटर कप'च्या
माध्यमातून जलयुक्त गाव स्पर्धा सुरू केली. महाराष्ट्र शासनाने आपली 'जलयुक्त
शिवार' योजना ही प्रमुख योजना बनवली. या सर्व प्रयत्नामुळे दोन वर्षानंतर
परिस्थितीमध्ये कांही अंशी सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. हे प्रयत्न
लोकसहभागातून होत असल्याने त्यांची यशस्विता कौतुकास्पद आहे.
खरेतर अमिर असो, नाना असोत किंवा मकरंद
अनासपुरे. ही माणसं आपाआपल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालेली. त्याना या प्रयत्नात
पडण्याची तशी काहीच गरज नाही. ते सध्या ज्या शहरात वास्तव्य करतात, तिथे पाण्याचा
प्रश्न निर्माण झालेला नव्हता. मात्र त्यांच्या सामाजिक जाणिवा जिवंत असल्याने,
त्यानी समाजाच्या या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी पुढे यायचा निर्णय घेतला. यात त्यानी
लोकसहभाग वाढवण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आणि म्हणून या प्रयत्नाना लोक
चळवळीचे स्वरूप येवू लागले. यातून ग्रामीण भागातील परिस्थितीमध्ये खुप चांगला आणि
सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. शासनाच्या मोहिमेतही अनेक गावात जलक्रांती घडू
लागली आहे. या सर्व कामामुळे पाऊस चांगला पडला तर अनेक गावात टँकरना प्रवेश करावा
लागणार नाही आणि ही गावे त्या वर्षी टँकरमुक्त राहतील यात शंका नाही. मात्र प्रश्न
पाऊस चांगला पडला, त्या वर्षासाठी नाही तर १९७२ प्रमाणे पुन्हा दुष्काळ पडला, तरी,
गावात जलसंकट उभा राहणार नाही यादृष्टीने आपण कृतीशील होण्याचा आहे.
भूतलावरील संपुर्ण जीवसृष्टी ही तशी
पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्रात पावसाचे पाणी जे पडते ते तसे कांही
कमी नाही. त्यातील केवळ तीन टक्के पाणी आपणास वापरासाठी उपलब्ध होते. याचे
महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती. महाराष्ट्रात ९२ टक्के भूभागात
कठीण खडकाचे आवरण आहे. या खडकातून पाणी जमीनीत मुरणे हे खुप अवघड आहे. त्यामुळे
भूपृष्ठावर जलसाठा करणे हे अत्यंत आवश्यक बनते. महाराष्ट्राने आपल्या वाट्याचे नद्यांचे
वाहणारे पाणी अडवण्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही, हा भूतकाळ आहे. या आणि अशा
अनेक कारणाबरोबर पावसाची अनियमितता पाणी संकट वारंवार घेवून येते आणि आपण जलसंकट
आले की त्याचा गांभीर्याने विचार करायचो. पुढच्या वर्षी पाऊस चांगला झाला की
विसरून जायचो. मात्र २०१६ पासून यात फरक पडला आहे.
पावसाद्वारे आपणास सरासरी ३३० अब्ज घनमीटर
एवढे पाणी उपलब्ध होते. या पाण्यापैकी साधारण १६३ अब्ज घनमीटर एवढे पाणी नद्यातून
वाहून जाते. तर केवळ ३१ अब्ज घनमीटर इतके पाणी जमीनीत मुरते. हे मुरणारे पाणी
आपणास पावसाळ्याव्यतिरिक्त अन्य काळात वापरावयाचे असते. या पाण्यावर आपले मोठे
बागाईत क्षेत्र अवलंबून असते. या पाण्यावर हिवाळा आणि उन्हाळ्यात पिके घ्यावयाची
असतात. पुर्वीच्या काळी यासाठी विहिरींचा वापर करण्यात येत असे. मात्र १९७१ मध्ये
भारतात पहिली बोअरवेल घेतली आणि पुढे जमिनीतील पाणी विविध कारणासाठी उपलब्ध करून
घेता यावे म्हणून हे तंत्र लोकप्रिय झाले कारण जमिनीतील खोलवरचे पाणी ते काढत असे.
विहिर काढण्यासाठी लागणारा कालावधी आणि खर्च बोअरवेलच्या तुलनेत खुपचं जास्त होता.
विहीर खोदणे, नंतर ती बांधणे आणि त्याठिकाणच्या पाण्याचा उपसा करणे हे कांही
महिन्याचे, कधीकधी काही वर्षाचे काम असे. काही लाख रुपये विहिरीसाठी खर्च होत.
बोअरवेल मात्र एका दिवसात खोदली जाते. तीचे काम काही हजारात होते आणि लगेच
संध्याकाळी पाणी उपसा सुरू होतो. या कारणामुळे बोअरवेल घेणे शेतकऱ्याना फायदेशीर
वाटणे स्वाभाविक होते. मात्र याच्या दूरगामी परिणामाचा विचार त्या कालखंडात कोणीचं
केला नाही. जे हा विचार मांडत त्यांचा आवाज दबलेला राहीला. परिणामी महाराष्ट्रात
मागील कांही दशकापासून पाणी टंचाईवर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर बोअरवेल किंवा
कुपनलिका खोदण्याचा धडक कार्यक्रम जनतेने हाती घेतला. या कुपनलिकांची खोली वाढतच
राहिली आणि १०० फुटापासून सुरू झालेला हा कुपनलिकांचा प्रवास आता १००० फुटापुढे
जाऊन पोहोचला. विशेष म्हणजे नियमानुसार बोअरवेलची खोली २०० फुटापेक्षा जास्त नेता
येत नाही. मात्र शेतीसाठी घेतलेल्या या बोअरवेल कोणतीही शासनाची परवानगी न घेता
मारल्या जात होत्या आणि आहेत. बहुतांश बोअरवेलची शासनदरबारी नोंद असण्याची शक्यता
नाही आणि नोंद असलीचं तर ती नेमक्या खोलीची असणे शक्य नाही.
एवढया
खोलवर पाणी जाण्यासाठी शेकडो-हजारो वर्षाचा कालखंड जावा लागतो. या अनेक
वर्षापुर्वी एवढ्या खोलवर जावून बसलेल्या पाण्याचा उपसा करून आपण भूपृष्ठाखाली
पाण्याची मोठी पोकळी निर्माण करत आहोत, याची जाणीव अशा कूपनलिका खोदणाऱ्या
मंडळीच्या गावी नसते. पाणी मिळवण्यासाठी अशा कुपनलीका खोदून जमिनीची आपण चाळणी
केली. या कूपनलीका कांही दिवस, महिने किंवा वर्ष पाणी देतात आणि नंतर कोरड्या
पडतात. या कोरड्या कुपनलिकांचा वापर पुढे पुनर्भरणासाठी केला असता तर एवढ्या
खोलवरचा उपसलेला पाणीसाठा पुन्हा भरला गेला असता. मात्र पुन्हा त्या कुपनलिकेत
पाणी उपसता येईल या वेड्या आशेवर तेही केली जात नाही. त्यामूळे कोरड्या बोअरवेलचे
प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आणि या पाणी उपशामुळे मोठे नुकसान झाले आहे.
जमीनीतील पाणी मोठया प्रमाणात उपसल्यामूळे
जमीनीखाली असणारी पाण्याची पातळी ही खालावत गेली. जमिनीतील पाण्याचा अंश नाहिसा
झाला. अनेक उंच आणि मोठ्या वृक्षांची मूळे खोलवर असणारे पाणी शोषून जगत असत. खोलवर
असणारे पाणी उपसल्यामूळे जमीनीतील पाण्याची पातळी खालावत गेली आणि अशा अनेक मोठ्या
वृक्षाना पाणी उपलब्ध होणे बंद झाले. भूपृष्ठाखालील शुष्कता जशी वाढत गेली, तसे या
वृक्षाना पाण्याअभावी शुष्क व्हावे लागले. ते वृक्ष मृत झाले. खोलवर जेंव्हा पाणी
असायचे तेंव्हा झाडांची मूळे जशी पाणी शोषून घ्यायची. तसेचं पावसाळ्यात ही मूळे
पावसाचे पाणी खाली नेउन पुनर्भरणाचे कामही करायची. मात्र अशी मोठी जूनी झाडे विविध
कारणानी नष्ट झाल्याने गावोगावी पिण्यासाठीही पाणी नाही, अशी परिस्थिती उदभवू
लागली.
त्यामूळे जेथे पाणी आहे तेथून टँकरद्वारा
पिण्याचे पाणी पुरवण्याचा नवा धंदा उदयास आला. या धंद्यामुळे अनेकाना व्यवसाय
मिळाला. त्यानी पाण्याचा पैसा केला. टँकर कधी येणार याची वाट पहात एकाला तरी
बसवण्याची पाळी आली. हातावरचे पोट असणाऱ्या घरातील एकाचा रोजगार बुडू लागला. ही
परिस्थिती गरीबांची. तर श्रीमंत किंवा धनिक मंडळी बोअरवेलचे मशीन घेवून आणखी शेताची
चाळण करू लागले. या परिस्थितीचे सर्वात भयानक चटके मराठवाड्याला बसले. त्यातही
उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जावू लागली. पाण्यासाठी
भांडणे ही नित्याची बाब झाली. उन्हाळ्यातील तेथील लोकांचे जीवन नकोसे झाले. यातचं
२०१५च्या दुष्काळाने कोल्हापूरसारख्या शहरालाही एक दिवसाआड पाणी वापरायला लावले. मराठवाडयात
तर रेल्वेत वॉशरूमसाठी भरलेले पाणी स्टेशनवरून भरून नेत असताना ध्वनीचित्रफिती
कांही चॅनेलवरून दाखवण्यात आल्या. यातून एक मात्र झाले की लोकांची पाण्याबाबतची
जाणीव कांही अंशी का होईना जागृत झाली. ज्या ठिकाणी खुप मोठे चटके सहन करावे लागत
होते, अशा भागात अनेक सेलिब्रटिजनी पुढाकार घेवून जलसंधारणाच्या कामासाठी लोकाना
उद्युक्त केले आणि यावर्षी अजून तरी टँकरची चर्चा सुरू झालेली नाही. मात्र हे
मागील वर्षी चांगला पाऊस झाला म्हणून आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
पाऊस हा निसर्गचक्राचा एक भाग आहे. तो
अनियमित आहे आणि एखाद्या वर्षी तो पुन्हा दांडी मारू शकतो. पावसाने एखाद्या वर्षी
अशी दडी जरी मारली तरी गावाला किमान पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही याची
काळजी आपण घेतली पाहिजे. एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तरी गावात टँकर येणार नाही,
यासाठी गावकऱ्यानीचं पुढाकार घेवून प्रयत्न केले, तर हे शक्य होणार आहे. शासनाकडून
या कामावर नियंत्रण ठेवावे, अशी परिस्थिती नाही आणि आपण म्हणजेचं नागरिक शासनाचेच
एक घटक आहोत आणि आपले हित आपणचं जपले पाहिजे, याची आज आपणास जाणीव होणे आवश्यक आहे.
हे आपण जर केले नाही तर भावी पिढ्या आपणास केंव्हाचं माफ करणार नाहीत. यासाठी फार
मोठे वेगळे कांही करायचे आहे, असेही नाही.
आपणास दुष्काळातही पाणी उपलब्ध व्हावे असे
वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक गावाने आपल्या गावात देवराई
निर्माण करणे आणि जपणे आवश्यक आहे. देवराई निर्माण करताना आपल्या भागात असणारी
परंपरागत स्थानिक वृक्षाची लागवड आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. गावातील सांडपाणी
ज्या भागातून वाहते त्या भागात वड, पिंपळ आणि पिंपरण ही झाडे अत्यावश्यक आहेत.
जमिनीतील घाण पाण्याचे शुद्धीकरण करण्यात ही झाडे महत्त्वाची भूमिका पार पाडत
असतात. या तिनही झाडाची मूळे कितीही घाण पाण्यात आणि कितीही काळ राहीली तरी सडत
नाहीत आणि झाडे मरत नाहीत ही बाब याठिकाणी लक्षात घ्यायला हवी. वनराई असेल तर तीची
जपणूक होणे आवश्यक आहे आणि नसेल तर शक्यतो पुर्वी ज्याठिकाणी ती होती तिथेचं ती
नव्याने निर्माण व्हावी कारण पुर्वी अशा देवराईचे जतन केलेल्या ठिकाणी पाण्याचा
झरा असायचा किंवा त्या भागात पाण्याची सहज उपलब्धता असायची.
महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे नदीतील वाळू
उपसा हे जमिनीत पाणी मुरण्याच्या मार्गात मोठा अडसर ठरते. नदीतील वाळू ही पाणी
जमिनीत झिरपण्याच्या प्रक्रियेत मोठे योगदान देत असते. आपण सिमेंटची जंगले उभारत
असताना मोठ्या प्रमाणात वाळू उपसायला सुरूवात केल्याने नदीपात्रात पाणी झिरपणे कमी
होत चालले आहे. तसेचं नदी आणि ओढ्याच्या कडेला फळझाडे आणि कांही स्थानीक वाणांची झाडे
लावणे आणि जगवणे आवश्यक आहे. तीसुद्धा पाण्याचा जमिनीतील साठा वाढवण्यात मोलाचे
योगदान देत असतात. गावात पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त कसे अडवले जाईल याकडे
लक्ष देणे ही काळाची गरज आहे. जमिनीवर पडणारे पाणी आपल्या शेतात थांबवणे दोन
कारणासाठी आवश्यक आहे. एक म्हणजे यामूळे शेताची होणार धूप थांबते, आणि दुसरे
म्हणजे पाण्याचा मोठा भाग जमिनीत खोलवर जातो. त्यामूळे भूजलसाठा वाढण्यापेक्षा
आजूबाजूच्या झाडाना ते पाणी उन्हाळ्यामध्ये उपयुक्त ठरत असते.
शेवटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावात
बोअरवेलला पुर्णत: बंदी घालणे हे आहे. राळेगणसिद्धी, हिवरे बाजार या गावांचे कौतुक
करत असताना त्यांचे अनुकरण करणे महत्त्वाचे आहे. या गावात किती बोअरवेल चालू आहेत
हे प्रत्यक्ष जावून अभ्यासावे. बोअरवेलद्वारा आपण जमिनीतील खुप खोलवरचो पाणी उपसत
असतो. पावसाळयात भूपृष्ठावर असणारे पाणी आपण न वापरता बोअरवेल आहे म्हणून पाणी
उपसून शेतीसाठी वापरत असतो. याठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे की असा जर खोलवरचा
पाणी उपसा आपण करत राहिलो, तर जमिनीतील पाण्याची पातळी कधीचं वाढणार नाही. समजा एक
दहा मजली इमारत आहे. टेरेसवर पाण्याची टाकी आहे. ती भरलेली आहे. तीचे एका पाईपमधून
पाणी काढून सर्व मजल्यावर स्वतंत्र पाण्याची टाकीस पाणी पुरवले आहे. मुळातचं तळमजल्यावरील
टाकीत सर्वात जास्त वेगाने पाणी पडायला सुरूवात होईल. त्यापेक्षा कमी वेगाने पहिला
मजला, आणखी कमी वेगाने दुसरा मजला, त्यापेक्षा कमी वेगाने तिसरा मजला असे करत सर्वात
वरच्या मजल्यावर सर्वात कमी वेगाने पाणी पडत राहणार. याचंवेळी तळमजल्यावरील
टाकीतील पाणी आपण उपसून वापरायला सुरूवात केली तर ती टाकी कधीचं भरणार नाही आणि
तीचा ऑटोव्हॉल्व बंद होवून वरच्या मजल्यावरील टाकीत पुरेसे पाणी कधीचं साठणार
नाही. यात सर्वात कमी पाणी असेल ते सर्वात वरच्या मजल्यावरील टाकीत.
जमिनीखालील पाण्याचे असेच आहे. आपण विहिरीचे
पाणी वापरतो ते सर्वात वरच्या मजल्यावरील पाणी आहे. हे पाणी आपण जितके वापरू तितके
पावसात भरले जाणे शक्य आहे. मात्र यासाठी त्यापेक्षा खोल जागी असणाऱ्या
पाण्यासाठीच्या पोकळ्या भरलेल्या असल्या पाहिजेत. अन्यथा जमिनीत मुरणारे पाणी
खोलवर असणाऱ्या पोकळ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि पावसाळयातसुद्धा
विहिरीमध्ये हवा तसा पाणीसाठा दिसून येत नाही. त्यामूळे अपवादात्मक परिस्थितीत
गावाला पिण्याच्या पाण्याची गरज असेल तरचं बोअरवेलचा वापर व्हावा अन्यथा बोअरवेल
शंभर टक्के बंद करायला पाहिजेत. बोअरवेलच्या मशीनने एका गावातून दुसऱ्या गावात
जाताना तहसिल कार्यालयाची परवानगी घेवूनचं गेले पाहिजे असे बंधन घालण्याची गरज
निर्माण झाली आहे.
जल, जंगल आणि जमीन यातील समतोल हा सुखी
समाजासाठीचा मुलमंत्र आहे. शासनापासून
जनतेतील आबालवृद्धपर्यंत सर्वानी जो 'जलयुक्त शिवार' करण्यासाठी जो वसा घेतला आहे,
तो जर पुर्णार्थाने यशस्वी व्हायचा असेल तर जंगल, जल आणि जमिन या तिन्ही घटकाकडे
समान लक्ष देण्याची गरज आहे. त्यातून आपणास शाश्वत भूजल उपलब्ध होवू शकते. नाहीतर,
आज लपलेले टँकर अवर्षणाचा काळ येताचं पुन्हा येतील. जल, जमीन आणि जंगल यांची योग्य
काळजी घेतली तर सारे कांही मंगल होईल, यात शंका नाही.