(बागलकोट
हा उत्तर कर्नाटकातील जिल्हा तसा सुजलाम् सुफलाम् होता. कोयना धरण बांधले आणि
हळूहळू या भागात बारमाही वाहणारी कृष्णा उन्हाळ्यात कोरडी पडू लागली. बारा महिने
रिवी शेती असणाऱ्या भागात, पिण्यासही पाणी मिळेनासे झाले. जमखंडी तालूका आणि अथणी
तालुक्याला पाणीटंचाईच्या संकटातून लोकनेते सिद्दू न्यामगौडा यानी बाहेर काढले.
त्यांचे नुकतेचं निधन झाले. शेतीप्रगती मासिकामध्ये न्यामगौडा यांच्या जीवनावर 'पाणीदार
नेता' लेख प्रसिद्ध झाला आहे. तो मूळ लेख इथं आपल्यासाठी प्रकाशित करत आहे.
धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
--------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही नव्या प्रकल्पाचे कांही चांगले आणि कांही वाईट परिणाम होत असतात. महाराष्ट्रात १९६०च्या दशकात कोयना प्रकल्प उभारला गेला. कोयना धरणामध्ये मोठा पाणीसाठा होवू लागला. त्याचे पाणी प्रामुख्याने विद्युत निर्मितीला वापरले जावू लागले. महाराष्ट्र
प्रकाशाने उजळला. मात्र या धरणाच्या
पुर्णत्वानंतर बारा महिने वाहणारी कृष्णा नदी उन्हाळ्यात कोरडी पडू लागली. महाराष्ट्रातून वाहणारी कृष्णा नदी कोयना प्रकल्पाच्या खालच्या बाजूस पावसाळ्यात वाहू लागली. मात्र उन्हाळ्यात पुर्ण कोरडी रहात असे. परिणामत: या नदीच्या
खोऱ्यात वाढणाऱ्या पिकांना उन्हाळ्यात पाणी मिळेणासे झाले. उत्तर कर्नाटक प्रांताला याचा मोठा फटका बसला. उन्हाळ्यात पाणी मिळेणासे झाले आणि उन्हाळ्यातही हिरवीगार असणारी शेती उदास झाली. आलमट्टी धरणाचे त्यावेळी बांधकाम झाले नव्हते. महाराष्ट्राची प्रकाशदायीनी उत्तर कर्नाटकसाठी अंधारदायीनी बनली. पावसाळ्यात या नद्यांना पूर येण्याइतके पाणी असायचे. प्रसंगी पुरामुळे मोठे नुकसानही व्हायचे. मात्र उन्हाळ्यात कावळ्याची तहान भागेल इतकेही पाणी नसायचे. अशा परस्थितीत देशातील पहिला खाजगी बंधारा बांधणारे आणि
पुन्हा जमखंडी आणि अथणी तालुक्याला समृद्धी मिळवून देणारे नेतृत्व म्हणजे सिद्दू भिमप्पा न्यामगौडा.
कर्नाटकातील जमखंडी या गावात सिद्दू यांचा ५ ऑगस्ट, १९४९ रोजी जन्म झाला. वडील भिमप्पा आणि गुरूबसव्वा हे त्यांचे
माता-पिता. त्यांचे कुटुंब शेती करायचे. जमखंडीमध्ये त्यांची चोवीस एकर शेती होती. जोडीला अडत दुकान
होते. जमखंडी गावातच सिद्दू यांचे सर्व शिक्षण झाले. बीएलडीईए महाविद्यालय, जमखंडी येथून त्यांनी बी.एस्सी. ही पदवी रसायनशास्त्र
विषयातून प्राप्त केली. या कालखंडात ते वडील शेती करताना पहात होते. शिक्षण संपताच ते आपला व्यवसाय
सांभाळू लागले. अडत दुकानात पुर्वी येणारे धान्य आणि नंतर त्याचे घटत जाणारे
प्रमाण त्यानी टिपले होते. ते आजूबाजूच्या
भागाचे बदलते चित्र पहात होते. पुर्वी असणाऱ्या समृद्धीचे आणि नंतर आलेल्या गरीबीचे ते साक्षीदार होते. उसाने बहरलेला परिसर आता ओसाड झाला होता. ते या सर्व घटनानी बेचैन
होत असत. त्यांत व्यवसायही शेतीशी निगडीत होता. शेतकऱ्यांशी होणाऱ्या संवादातून
शेतीच्या बदलत्या स्वरूपाचे ते आकलन करून घेत होते. शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी
होत्या. शेतमालाचा भाव, शेतीचे अनूदान असे अनेक प्रश्न होते. त्यातील महत्त्वाचा
भाग होता तो लहरी पर्जन्यमानाचा आणि पाण्याच्या उपलब्धतेचा. शेतीसाठी सोडा त्या
भागात पिण्यासाठी पाणी मिळणेही अवघड झाले. या पार्श्वभूमीवर सिद्दू १९८७ पासून
शेतकरी चळवळीकडे ओढले गेले. पिढीजात व्यवसाय शेतीचा असल्याने ते त्यापासून दूर
राहू शकले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सिद्दू शेतकरी चळवळीचे
भाग बनले. शेतकऱ्यांचे प्रश्न हिरीरीने मांडू लागले. या क्षेत्राचा त्यांचा अभ्यास
चांगला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विविध मागण्यांची निवेदने ते सरकार दरबारी
पाठवू लागले. प्रश्न फक्त मांडून चालणार नाही तर प्रश्नाची सोडवणूक होणे
महत्त्वाचे आहे, हे त्यांच्यातील सुज्ञ नेत्याने ओळखले. या भागात जर पाणी उपलब्ध झाले तर शेती पुन्हा बारमाही हिरवीगार राहू शकते, हे त्यांच्या लक्षात आले.
बागलकोट जिल्ह्यातून कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा या तीन मोठ्या नद्या वाहतात. या खोऱ्यातील बहुतांश जमिन हे सपाट आणि सुपिक. मात्र या भागाचा विचार न करता विकास योजना राबवल्या गेल्या
होत्या. त्याचा कांही वर्षातच इतका भयानक परिणाम दिसू
लागला की लोकांचे गावातून शहराकडे स्थलांतर होऊ लागले. शेतीचे वर्षभर मिळेल असे काम नाही आणि पिण्यासाठी पुरेसे
पाणी नाही. आपोआपच हा प्रश्न आणखी तिव्र होऊ लागला. अशा या वातावरणात शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी सिद्दू
पुढे आले. त्यांनी फक्त "पाणी द्या" “शेतीला पाणी मिळालंच पाहिजे" अशा घोषणा न देता या प्रश्नावर उत्तर प्रथम शोधले आणि
मागण्या सरकार दरबारी मांडायला सुरूवात केली. चिक्कपडसलगी गावाजवळ कृष्णा नदीवर बंधारा बांधला तर त्यामध्ये पाणी साठून या
भागातील शेतकऱ्याना पाणी मिळेल. ही मागणी त्यानी उचलून धरली. सरकार दरबारी निवेदन
गेले. मात्र सरकारी बाबूनी ही योजना व्यवहार्य नाही म्हणून वाटाण्याच्या अक्षता
लावल्या. वारंवार मागणी केल्यानंतर तीचे १९७६ मध्ये ८५ लाखाचे अंदाजपत्रक काढण्यात
आले. पुन्हा १९८६ मध्ये एक कोटी ८० लाखाचा खर्च होइल असे सरकारकडून सांगण्यात आले.
मात्र पुढे कार्यवाही शून्य. त्यासाठी अधिकाऱ्याकडून अनेक कारणे सांगण्यात येत
होती.सतरा वर्षाच्या प्रदिर्घ लढ्यानंतरही मागणी पुर्ण होत नाही म्हटल्यावर त्यानी
कोणतेही अतिरेकी आंदोलन न करता, शेतकऱ्यानी स्वत:च हा बंधारा बांधावा, असे प्रयत्न
सुरू केले. बंधाऱ्याची मागणी १९६५ पासून सातत्याने होत होती. सिद्दू यानी खेड्यापाड्यातील
शेतकऱ्यांशी, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला सुरूवात केली. यातून सिद्दू
यानी या प्रश्नासाठी अल्गूर येथे पहिली बैठक बोलावली. 'आपणच आपली मदत केली पाहिजे',
असे आवाहन करत त्यानी शेतकऱ्यासमोर आपला प्रस्ताव मांडला.
यासाठी त्यानी
शेतकऱ्याना पैसा, मनुष्यबळ आणि साहित्य जमा करायचे सुचवले. मॅनपॉवर, मनी आणि
मटेरिअल असे तीन एमचे सूत्र लोकाना पटवून दिले. या सिद्दू यांच्या प्रस्तावाला
शेतकऱ्यानी मनापासून स्वीकारले आणि यातून 'कृष्णा तीर रयत संघा'ची निर्मिती झाली.
या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यानी शेतकऱ्यासाठी बांधावयाच्या बंधाऱ्याची परवानगी
शासनाकडून मिळवण्यात सिद्दू यशस्वी झाले. या प्रकल्पाची सर्व आखणी नकाशे आणि
अंदाजे खर्च कर्नाटक राज्य पाटबंधारे खात्याचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता श्री
अमिनाभावी यानी तयार केले. ही मान्यता देताना सरकारने घातलेल्या अटी अस्वीकारार्ह
होत्या तरीही सिद्दू यानी त्या स्वीकारल्या आणि २ ऑक्टोबर १९८७ रोजी, गांधी जयंती
दिनी या ऐतहासीक कामाचा भूमीपूजन समारंभ पार पडला. हे बंधाऱ्याचे काम दोन टप्प्यात
पार पाडण्यात आले. जानेवारी ते जून १९८८ मध्ये पहिला टप्पा पार पडला आणि जानेवारी
ते जुलै १९८९ या दुसऱ्या टप्प्यात हे काम पुर्ण झाले. उद्यमशीलता, खाजगीकरण युगाचा
उदय होण्यापूर्वी हे कार्य झाले आहे आणि म्हणूनच सिद्दू यांचे कार्य महत्त्वपूर्ण
आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट म्हणजे हा लोकानी लोकासाठी बांधलेला
प्रकल्प आहे. प्रकल्पाला एकूण एक कोटी रूपयांचा खर्च आला. हे पैसे गोळा करताना
प्रसंगी सिद्दू यानी गावोगावीचं नव्हे तर घरोघरी जावून लोकाना उद्युक्त केले, प्रोत्साहीत
केले. मानवतेच्या कारणासाठी पैसे जमा करण्याचे आवाहन केले आणि लोकानी सिद्दू
यांच्या मनापासून सांगण्याला प्रतिसाद दिला. जे पैसे देवू शकत नाही त्यानी आणि
ज्यांची इच्छा असेल त्यानी या प्रकल्पासाठी श्रमदान करावे असे आवाहन केले आणि लोक
श्रमदान करू लागले. यामूळे प्रकल्पाचा खर्च घटला. हा बंधारा अशा प्रकारचा देशातील
पहिला बंधारा आहे. या बंधाऱ्याला 'श्रम बिंदू सागर' असे नाव देण्यात आले.
या बंधाऱ्याची ४३० मीटर लांबी आहे. तर बंधारा आठ मीटर उंच
आहे. या बंधाऱ्यामूळे २.८ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. हे पाणी कृष्णा नदी पात्रात
बंधाऱ्याच्या वरील अंगास ४५ किलोमीटर अंतरापर्यंत राहाते. या बंधाऱ्यामूळे जमखंडी
तालुक्यासोबत अथणी तालुक्यातील कांही गावाचाही पाण्याचा प्रश्न सुटला. एक लाख एकर शेती
आणि तीन लाख लोकाना पिण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध होवू लागले. एक कोटी रूपये खर्च
केल्यानंतर या भागातील उत्पादन एक हजार कोटी रूपयानी वाढले. या श्रम बिंदू सागराच्या
निर्मितीला हजारो हात लागले, मात्र सजग नेतृत्व होते ते सिद्दू यांचे.
या बंधाऱ्याच्या यशस्वी निर्मितीमूळे सिद्दू यांचे देशभर
नाव झाले. ते त्या भागातील सर्वपरिचित नेतृत्त्व बनले. १९९१ मध्ये लोकसभा निवडणूकीत
बागलकोट मतदारसंघात रामकृष्ण हेगडे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याविरूद्ध त्याना
काँग्रेस पक्षाने उभा केले आणि ते निवडून आले. या विजयाने त्यांची 'जायंट किलर'
अशी नवी ओळख निर्माण झाली. ते केंद्रात कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री बनले. १९९६
ची निवडणूक ते हरले. तरी पुन्हा २००३ मध्ये विधान परिषद सदस्य बनले. आर्थिक
सुबत्ता आल्यानंतर या बंधाऱ्यातील पाण्यावरून राजकारण झाले. योजनेमध्ये गटतट आले.
त्यामूळे लोकांचे मोठे नुकसान झाले. यामूळे सिद्दू याना विधानसभा निवडणूकीत २००८
मध्ये पराभवही पहावा लागला. पण लोकाना आपली चूक लक्षात आली. त्यानी पुन्हा सिद्दू
यांना साथ द्यायला सुरूवात केली आणि पुढे २०१३ आणि २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये ते
आमदार म्हणून निवडून आले. या निवडणूकीनंतर दिल्लीहून पक्षनेतृत्त्वाला भेटून परत
आपल्या मतदारसंघात जात असताना २८ मे २०१८ रोजी त्यांचे अपघातात दुर्दैवी निधन
झाले. सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ आमदार, माजी केंद्रिय मंत्री आणि
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रयतेला पाणी देणारा पाणीदार नेता हरवला. श्रम बिंदू सागर
योजना यशस्वीपणे चालवणे आणि हा सागर जतन करणे हीचं या द्रष्ट्या नेत्याला खरी
श्रद्धांजली ठरेल.
Excellent work. Devotion, dedication and determination is the key of such great work. Thanks for bringing this work of him to us
उत्तर द्याहटवाVery nice informative and motivational article.. keep it up
उत्तर द्याहटवाखूप छान लेख!
उत्तर द्याहटवाखूपच छान लेख आहे आणि सदर माहिती सर्वांच्या साठी उपयुक्त अशीच आहे.
उत्तर द्याहटवाSir Very nice information.
उत्तर द्याहटवान्यामगौडा हे काॅग्रेस आमदार होते इतकेच माहीत पण त्यांच्या कार्यावर या लेखातून प्रकाश पडला. फारच छान लेख
उत्तर द्याहटवा