शुक्रवार, २९ जून, २०१८

प्रशांतचंद्र महालनोबिस


                                         
 (प्रशांतचंद्र महालनोबीस संख्याशास्त्राचा देशहितीसाठी विचार करणारे महान संख्याशास्त्रज्ञ. इंडियन स्टॅटॅस्टिकल इंस्टिट्युटची स्थापना करून संख्याशास्त्राच्या अभ्यासाची सुविधा निर्माण करणारे द्रष्टे नेतृत्त्व. त्यांनी राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावेल असे संशोधन केले. आज त्यांची १२५वी जयंती.  त्यांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी आज गुगलनेही डुडलच्या माध्यमातून त्याना मानवंदना दिली आहे. त्यांच्या जीवनपटावर आधारीत संक्षिप्त लेख माझ्या 'असे घडले... भारतीय शास्त्रज्ञ' या 'अक्षर दालन' प्रकाशनाने प्रकाशीत केलल्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो आज येथे प्रकाशीत करत आहे.  धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला अंक म्हटले की लहानपणी नको वाटायचे. अगदी गाण्यातसुद्ध्दा गणित विषय माझ्या नावडीचा” असा उल्लेख केला जातो. याच आकडयाच्या खेळावर असलेल्या संख्याशास्त्राचा देशहितासाठी प्राधान्याने उपयोग करणारे संशोधक म्हणजे प्रशांतचंद्र महालनोबिस.
प्रशांतचंद्र यांचा जन्म २९ जून १८९३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या घराण्यावर ब्राम्हो समाजाचा प्रभाव होता. घरातील सर्व मंडळी उच्चशिक्षीत होती. प्रशांतचंद्र यांचे शालेय शिक्षण ब्राम्हो मुलांच्या शाळेत झाले. त्यांनी १९०८ मध्ये प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. जगदिशचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र राय यांच्यासारख्या गुरूजनांचे मार्गदर्शन लाभले. मेघनाद सहा हे त्यांच्या मागील वर्षात शिकत होते. त्यांनी १९१२ मध्ये भौतिकशास्त्र विषयातून बी.एस्सी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. ते विद्यापीठात प्रथम आले.  परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.
त्यांनी १९१३ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले. लंडन विद्यापीठात प्रवेश घ्यायचा त्यांचा मानस होता. मात्र जाताना किंग्ज कॉलेज केंब्रिज येथे मित्राकडे काही दिवस राहिले. तेथील वातावरण पाहून त्यांनी विचार बदलला. किंग्ज कॉलेज येथे प्रवेश घेतला आणि केंब्रिज विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयात ट्रॉयपास मिळवली. या काळात त्यांचा संपर्क श्रीनिवास रामानुजन यांच्याशी आला. तसेच सी.टी. विल्सन यांच्यासह कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन केले. ते भारतात परतले. त्यांच्यावर प्रेसिडेंसी कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र थोडयाच दिवसात  पुन्हा इंग्लंडला परतले.
इंग्लंडच्या दुसऱ्या भेटीत बायोमेट्रिका या संशोधन पत्रिकेमुळे ते संख्याशास्त्राकडे प्रथम आकर्षित झाले. त्यांनी संख्याशास्त्राचा हवामानशास्त्र आणि मानव वंशशास्त्राच्या अभ्यासातील महत्व शोधूले. त्यांनी भारतात परतल्यावर याच विषयात कार्य करायचे निश्चित केले. ते भारतात परतले, तेव्हा कलकत्ता विद्यापीठाने परीक्षा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीला संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्यासाठी महालनोबिस यांनी मदत केली. त्यांच्या या कौशल्याने भारावलेले समिती अध्यक्ष सील यांनी प्रशांतचंद्र यांना याच विषयात पुढे कार्य करण्याची विनंती केली.
स्टॅटॅस्टिकल अॅनालिसीस ऑफ अॅंग्लो इंडियन स्टेचर” हा त्यांचा पहिला शोधनिबंध रेकॉर्डस् ऑफ इंडियन म्युझियम या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला. तो भारतीय वेधशाळांचे प्रमुख डॉ. वॉकर यांच्या वाचनात आला. त्यांनी हवामानशास्त्रामधील उकल करण्यासाठी मदत करावी, असे प्रशांतचंद्र यांना सुचविले. प्रशांतचंद्र यांनी १९२३ ते १९२६ या काळात हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. त्याच काळात उत्तर बंगालमधील पुरामुळे मोठी हानी झाली होती. ही हानी टाळण्यासाठी उतरते धक्के बांधण्याची कल्पना सुचवली. यावर प्रशांतचंद्र यांचा अभिप्राय मागविण्यात आला. प्रशांतचंद्र यांनी ही खर्चिक योजना निरूपयोगी आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि शासनाचा पाण्यात जाणारा पैसा वाचवला.१९२६ मध्ये ओरिसा राज्यात ब्राम्हिणी नदीच्या पुराने थैमान घातले. प्रशांतचंद्र यांनी पुराचा धोका टाळण्यासाठी धरणे बांधण्याचे सुचवले आणि या उपायाची अंमलबाजवणी झाल्यानंतर राज्याचे होणारे नुकसान थांबले. या अभ्यासादरम्यान त्यानी जमवलेल्या आकडेवारीचा आणि संख्याशास्त्रीय माहितीचा उपयोग दामोदर खोरे प्रकल्प आणि हिराकूड धरण योजनेत झाला.
अशी संख्याशास्त्रीय माहिती गोळा करण्यासाठी प्रशांतचंद्र यांनी स्वखर्चाने मदतनिस नेमले. सरकारला या माहितीचे महत्व लक्षात आले. सरकारने त्यांना १९३१ मध्ये २५००० रूपयांचे अनुदान दिले. हे अनुदान दरवर्षी प्राप्त होणार होते. प्रशांतचंद्र यांनी या अनुदानाच्या सहाय्याने इंडियन स्टॅटॅस्टिकल इन्स्टिटयूटची स्थापना केली. या संस्थेने पुणे, मुंबई आणि म्हैसूर येथे केंद्र स्थापन केले. चिंतामणराव देशमुख यानी या संस्थेला पुढे मोठे करण्यासाठी कष्ट घेतले.
मानववंशशास्त्रीय अभ्यासात मानवाची वैशिष्टे आणि गुणधर्म यातील बदलासाठीचे आवश्यक अंतर संख्याशास्त्राच्या सहाय्याने शोधून काढले. या अंतरास महालनोबिस डीस्टंस असे म्हणतात. हा प्रशांतचंद्र यांचा अत्यंत महत्वाचा शोध मानला जातो. तसेच त्यांनी नॅशनल सॅंपल सर्व्हे ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन केली. १९४५ ते १९४८ या कालखंडात पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार बनले. १९४९ मध्ये ते केंद्र सरकारचे सल्लागार बनले. पुढे युनोच्या स्टॅटॅस्टिकल कमिशनचे सदस्य बनले. स्टॅटॅस्टिकल सॅंपलिंगच्या अभ्यासासाठी युनोने अभ्यास गट नेमला. या गटाचे अध्यक्ष म्हणून प्रशांतचंद्र यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, पोलंड, रशिया इत्यादी देशाना भेटी दिल्या. तेथील लोकसंख्येचा संख्याशास्त्रीय अभ्यास केला. नॅशनल सॅंपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने काढलेल्या निष्कर्षांचा उपयोग उद्योग विस्तारासाठी मोठया प्रमाणात झाला आणि आजही होत आहे.
त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९४४ मध्ये वेलडन मेमोरिअल प्राईज देवून गौरविले. वर्षभरातच रॉयल सोसायटीने त्यांना सदस्यत्व बहाल केले. १९५० च्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष होते. अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड, रशिया इत्यादी देशातील संस्थांनी सदस्यत्व दिले. १९६८ मध्ये त्यांना श्रीनिवास रामानुजन सुवर्ण पदकाने सन्मानित केले. भारत सरकारनेही याच वर्षी त्यांचा पद्मविभुषण पुरस्काराने गौरव केला. ते पहिल्या नियोजन मंडळाचे सदस्य होते आणि त्यांचा विचारांचा प्रभाव पुढे अनेक वर्षे नियोजन मंडळाच्या आराखडयावर राहिला. मानवाचे जीवन सुखकर करण्यासाठी संख्याशास्त्राचा मार्ग स्विकारणारा हा संशोधक २८ जून १९७२ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. २००६ सालापासून प्रशांतचंद्र यांचा जन्मदिवस हा “राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
----००----



११ टिप्पण्या:

  1. खूप छान माहिती.यापूर्वी कधीही न वाचलेली.धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. एका महान संशोधकाचा परिचय झाला . छान लेख .

    उत्तर द्याहटवा
  3. संख्याशास्त्राचा उपयोग कोणत्याही क्षेत्रात करुण घेणे किती महत्वाचे असते हे आपल्या लेखातून दिसून येते. अश्या या महान शास्त्रज्ञाबाबत आपल्या लेखातून चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. Very nice and informative article.My daughter also enjoyed the article because she is doing B.Sc.III in Statistics. Thank you,ccongratulations.

    उत्तर द्याहटवा
  5. Very nice article. Definitely usefull to the Student, parent and corporate community's

    उत्तर द्याहटवा