बुधवार, २१ मार्च, २०१८

प्रेमाचा ‘विडा’



(वर्षभर नवऱ्याला धाकात ठेवणारी तात्याची बायको धुवडीला त्याला दिसायची नाहीचुकून कचाट‌्यात सापडली तर गुपचुप मार खायची. तरखाजगीत वर्षभर बायकोला कैदाशीण म्हणणारा, धुळवडीला वाट्टेल तसं बोलणारा तात्या. अनेक विसंगती जगाला दिसत असतानाही संसार टिकवून ठेवणारं गुपित अक्षरभेट २०१७ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केले. ते आपल्यासाठी येथे प्रसिद्ध करत आहे. धन्यवाद.
                                .............डॉ. व्ही.एन. शिंदे)

--------------------------------------------------------------------------------------------
  खेड‌्याची कशी एक विशिष्ट रचना असते. घरं जवळ जवळ असतात. एका घरातली घटना शेजारी सहज कळत असते. चहुबाजूंनी घरं आणि मध्ये चाै असतो. कोणाच्याही घरात बारसं असो, लग्न असो, नाही तर अगदी नवरा-बायकोची भांडणं सुद्धा घडतात ती या चौकाच्या साक्षीनंच. रात्री जेवण झाल्यावर समवयस्कांना गप्पा मारायला, पानसुपारी खायला चाैकाचाआधार. अनेक पिढ‌्यांच्या नानाविध घटनांचा साक्षीदार असतो हा चाै. आमच्या गावातही या चाैकाच्या पश्चिमेला आमचं घर आणि पूर्वेला तात्याचं घर होतं. आजही ते सारं काही तसंच आहे.
तात्या तसा माझा वर्गमित्र. तात्यानं बरीच वर्षं पहिलीत आणि नंतर कंटाळा येईपर्यंत दुसरीत मुक्काम ठोकलेला. त्याचा तिसरीत तिसऱ्यांदा मुक्काम चालू असताना त्या वर्षी आम्ही न अडखळता तात्याचा वर्ग गाठला. पंधरा सोळा वर्षांचा तात्या तिसरीत आमचा वर्गमित्र झाला. अंगापिंडानं गडी थोराड, पण अभ्यासात गोळा. तिसरीतही तात्याला 'बे'चा पाढा म्हणायला यायचा नाही. मला तात्याची टर उडवायची फार हुक्की यायची, पण थोराड तात्याच्या बुक्कीला भिवून आम्ही गप्प बसायचो. तात्याच्या घरची परिस्थिती गरीबीची; तात्याही तसा गरीब स्वभावाचा. मजुरी करून जगणारं कुटुंब. तात्याचं शिक्षण परवडत नव्हतं, तरी पोराने शिकावं, ही त्याच्या वडिलांची इच्छा होती आणि म्हणूनच तात्या शाळेत होता. याच वर्षी तात्याला बहिण आली. आईनं मजुरीला जायचं तर, बहिणीकडे लक्ष द्यायला कोणाची तरी गरज होती. तात्या बहिणीकडे लक्ष द्यायला लागला आणि तिसरीतच तात्याची शाळा सुटली.


दिवसामागून दिवस जात होते. तात्याची बहिण मोठी झाली मात्र तात्या पुन्हा शाळेत जाण्याऐवजी काम शोधायला लागला. सुरवातीला काम मिळेना म्हणून शेळ्या पाळायला सुरूवात केली. भोळसर तात्याच्या दोन्ही शेळ्या लांडग्याने खाल्ल्या. तात्या मजुरीवर पण जाईना. गावातच फिरत राहायचा. काही दिवस असंच गेल्यावर तात्यानं स्वत:चा व्यवसाय स्वत:च निवडला.
आई वडील मजुरीला गेले की तात्या बाहेर पडायचा. वर तीन बटनाचा शर्ट आणि खाली पायजमा असा त्याचा नेहमीचा वेष. हातात एक पिशवी. पिशवीत ॲल्युमियिमचे एक पातेलं आणि फडक्यात गुंडाळलेल्या दोन भाकरी, भाजी आणि कांदा असायचा. काचेच्या रिकाम्या दोन तीन बाटल्या आणि धोतराच्या कापडाचा एक तुकडाही असायचा. अशा वेशात तात्या शेतातल्या बांधावरून झाडांकडं बघत फिरायचा. कसं काय माहीत, पण त्याला मधाचं पोळं बरोबर दिसायचं. मग तात्या पिशवी खाली ठेवायचा. धोतराचा तुकडा व्यवस्थित अंगाला गुंडाळायचा आणि झाडावर चढायचा. मधाच्या पोळ्यातून मध असणारा भाग अलगद तो पातेल्यात काढायचा. अशी दोन तीन पोळी मिळेपर्यंत दुपार व्हायची. मग एखाद्या विहीरीच्या कडेला बसून तात्या जेवायचा. जेवण झालं की पातेल्यातील मध स्वच्छ कापडाने गाळून बाटल्यांत भरायचा. पुन्हा झाडाच्या कडेने फिरत मधाची पोळी शोधून आणखी दोन-चार पोळी मिळवायचा. तात्या दिवसाकाठी एक-दोन किलो मध सहज मिळवायचा. तात्याने आणलेला मध त्याचे वडील विकायचे. यातून त्याची चांगली कमाई होत होती. तात्या यात तरबेज झाला होता. आम्ही पण तात्याकडून मधाचं पोळं कसं शोधायचं आणि त्यातला मध कसा काढायचा, हे शिकून घेतलं. आंबा, कडूनिंब, शेलवट, निरगुड या झाडावरील मोहोळाच्या माशा खूप चावतात, अशी पूरक माहितीही तात्यानं आम्हाला दिली. आम्ही पण मधाच्या पोळ्यातून मध काढायला शिकलो. एकदा मात्र ही कला शिकवणाऱ्या आमच्या या गुरूला काही मित्रांच्या आग्रहामुळं वेगळीच गुरूदक्षिणा मिळाली.
झालं असं की, नदीकडेला एक भलंमोठं आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या एका बाजूला साधं मधाचं पोळं होतं. ते आमच्या नजरेला पडलं. मात्र त्या झाडाच्या दुसऱ्या बाजूच्या फांदीला आग्या मोहोळ लागलेलं. आम्ही त्यामुळंच ते पोळं काढायला तयार नव्हतो. तात्याला फक्त साधं मधाचं पोळं दाखवून आमच्या काही मित्रानी ते काढायला तात्याला राजी केले. ते भलंमोठं पोळं पाहून तात्याही मोठ्या उत्साहानं तयार झाला. नेहमीच्या पद्धतीनं तयार होऊन तात्या झाडावर चढला. मधाच्या पोळ्यातून व्यवस्थित मध काढताना आम्ही त्याला बघत होतो. आग्या मोहोळाच्या भितीनं आम्ही दूरच उभे होतो. तात्या काम पूर्ण करून खाली उतरणार एवढ्यात शहरात राहणारा त्या शेताचा मालक तिथे आला. आमचा गोंधळ बघून त्याला वाटलं की, कैऱ्या काढायलाच कोणीतरी झाडावर चढलंय. त्यानं बांधावरचा एक दगड उचलला आणि झाडावर फेकला. तो नेमका आग्या मोहोळाच्या फांदीला लागला. आग्या मोहोळाच्या माशा उठल्या. आम्ही शेतमालकाच्या आवाजानंच पळून गेलेलो. तात्या मात्र झाडावरच होता. माशा तात्याजवळ आल्या, तर तात्याची खाली उतरायची घाई चाललेली. त्याच्या हालचालींमुळं त्याला माशा डंख मारू लागल्या. तात्यानं शेवटी कशीबशी बुंध्यावरून उडी मारली. पण माशा काही त्याला सोडत नव्हत्या. शेतमालक मात्र काही हालचाल न करता थांबलेला. त्याला एकही माशी चावली नाही. शेवटी त्यानंच तात्याला 'गपगुमान मुडद्यासारखा पडून राहा' म्हणून सांगितलं. तात्यानं हालचाल थांबवली आणि दहा एक मिनिटात माशा शांत झाल्या. शेतमालकानंच तात्याच्या अंगावरचे माशा चावलेल्या ठिकाणचे काटे काढले. सुजलेला तात्या पुढं दोन-तीन दिवस भीमासारखा दिसत होता. पैलवान तात्याचं हे रुप पाहून आम्हाला मात्र हसू आवरत नव्हतं.
एवढं होऊनही तात्यानं मध गोळा करणं काही सोडलं नाही. मात्र हे काम फक्त ज्वारीच्या दिवसात चालायचं. एरवी पोळ्यातून मध मिळायचा नाही. तात्यानं मग पूरक व्यवसाय शोधले. तात्या जंगलात जायचा. रानभाज्या, बिबे आणायचा. कर्टुली (रानकारली), वाघाटे, फांजीची पाने अशा वेगवेगळ्या भाज्या आणायचा. त्याच्या घरच्यांना फुकट काही कोणाला दिलेलं आवडायचं नाही. अशा भाज्या त्याच्या पद्धतीने लपवून त्याच्या मर्जीतल्या लोकांना गुपचूप नेवून द्यावयाचा. अडल्या नडल्या लोकांची कामंही करायचा. कोणाचं दळण दळून आण, कोणाच्या गाईची धार काढून दे, कोणाला विहीरीतून पाणी काढून दे, तर कोणाची लाकडे फोडून दे. तात्या दिवसभरात किमान एक तरी समाजकार्य करायचा. यांत कोणाला पैसे मागायचा नाही. कोणी दिला तर घोटभर चहा हवा असायचा. तात्यानं काम संपवून 'येऊ का' म्हटलं की, जाणती माणसे त्याला बसायला सांगत. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तात्या चहा पित असे. मात्र त्या गप्पांत चहाड्या नसत. कोणाची भांडण लावण्याचा उद्देश नसे. असा हा तात्या गावातील कोणच्याही घरी हक्काने जाई. त्याला सर्व घरांचे दरवाजे कायम उघडे असायचे.
पण हे कामही काही सातत्यपूर्ण नव्हतं. या कामाला जोडधंदा म्हणून तात्यानं पुन्हा शेळ्या पाळायचं ठरवलं. त्यानं पुन्हा दोन शेळ्या विकत घेतल्या. तोपर्यंत लांडग्यांची भितीही कमी झालेली. तात्या मध, रानभाज्या गोळा करत शेळ्या राखू लागला. हळूहळू त्याच्याकडं डझनभर शेळ्या झाल्या. शेळ्यांबरोबर तात्याचं वयही वाढत होतं.
तात्या आता थोराड दिसू लागलेला. मिसरूड फुटलेलं, दाढीचे खुंटही उगवलेले. लोकांना तात्याला चिडवायला लग्न हा एक नवा विषय मिळाला. विशीतल्या तात्याची काहीजण लग्नावरून फिरकी घ्यायचे. तात्याला बायको कशी पाहिजे विचारायचे. भोळसर तात्या म्हणायचा 'मला गोरीपान बायको पाहिजे'. तात्याच्या या उत्तरावर सगळे हसायचे. ­­'तू न शिकलेला, शेती नाही, काही कामधंदा नाही, तुला कोण बाप गोरी पोरगी देणार' म्हणायचे. तात्या हिरमुसायचा. त्याचा गरीब चेहरा आणखीच केविलवाणा दिसायचा.
गावातल्या एका टारगट माणसानं तात्याला गोरी बायको मिळवायचा उपाय सांगितला. 'दोन्ही पायांवर बिब्याचा रस लावला, की गोरी बायको मिळते,' असं सांगितलं. तात्याला ते पटलंच. तो फेब्रुवारी होता. टेकडीवरच्या बिब्याला भरपूर फळं आलेली. नेहमी रानात फिरणाऱ्या तात्याला असली माहिती अचूक असायची. संध्याकाळच्या वेळी तात्या त्या झाडाकडं गेला. दहा-वीस बिबे घेतले. कापडात गुंडाळले. दगडानं ठेचले. त्या कापडानंच बिब्याचा रस दोन्ही पायांना लावला. हसत घरी आला आणि आपल्याला गोरी बायको मिळणार, या आनंदात जेवला आणि झोपला. स्वप्नातही कदाचित त्याला आपलं लग्न होऊन गोरी बायको मिळाल्याचं दिसलं असल्यास नवल नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तात्या उठला तो रडत-ओरडतच. बिब्याचा रस शरीराच्या ज्या ज्या भागाला लागलेला, तो सगळा भाग काळ‌्या फोडांनी भरला हाेता. उतलेल्या बिब्यानं त्याची करामत दाखवली होती. ज्यानं हा उपाय सांगितलेला, तो मात्र तात्याच्या फजितीवर हसत होता. तात्या फोडांमुळे चांगलाच वैतागला होता. पायावरचे सगळे फोडांना जिरून बरं व्हायला तात्याला दहा एक दिवस लागले. तात्याने हा प्रकार का केला, हे लक्षात आल्यावर तात्याच्या बापानं त्याचं लग्न लावून दिलं.
अशिक्षित तात्याला बायको चांगलीच मिळाली, रंग गोरा नसला तरी काळ्यात मोडणारा नक्कीच नव्हता. तात्याचा नवा संसार सुरू झाला. नव्याचे नऊ दिवस संपले. बायकोचे एक एक रंग दिसायला लागले. तात्या आणि त्याची बायको तिथंच तात्याच्या आई-वडिलांपासून वेगळे राहायला लागले. वर्षातच तात्याच्या घरात पाळणा हलला. तात्या एकदम खूश. दिसेल त्याला त्यानं मूठ-मूठ साखर वाटली. मनापासून खुलून हसलेला तात्या तेव्हा एकदाच दिसला. दुसऱ्या वर्षी पुन्हा पाळणा हलला. तात्याला दुसराही मुलगा झाला. त्यानंतर कोणाला काही न बोलता, न शिकलेल्या तात्यानं सरकारी दवाखान्यात जावून पुन्हा कधीच पाळणा हलणार नाही, याची सोय केली.
कामाला वाघीण असणारी तात्याची बायको बोलायलाही फटकळ. मात्र, संसार कसा करावा हे तिला चांगलं कळायचं. मुलं मोठी होताच तात्याचा शेळीपालनाचा उद्योग तिनं आपल्या ताब्यात घेतला. तात्याला मजुरीला पाठवायला सुरूवात केली. दोघंही कामावर जायची. सकाळी लवकर उठून शेळ‌्याचं सगळं आवरायचं. स्वयंपाक करायचा. तात्याला कामावर पाठवायचं आणि आपण शेळ‌्या घेरानात जायची.
संध्याकाळी आल्यावर स्वयंपाकाला लागायची. तात्या बाहेर फिरायचा. तिच्या भाकरी व्हायच्या आत तात्याला घरी परत येन भाजी करावी लागायची. तात्या जर वेळेत आला नाही तर, वय, कुठं मुडदा बशीवलाय तुमचाअशी प्रेमळ साद यायची. तात्या गुमान घरी जायचा. सुरूवातीला तात्यानं भाजी करायला नकार दिला. तर मरा उपाशी, मी पण दिवसभर राबते. मला बी थकवा येतोय. भाकऱ्या केल्यात. भाजी केली तर गिळायला मिळं. नाही तर नाही.म्हणून तशीच बसली. तात्यानं हात उचलायचा प्रयत्न केला तर तात्यालाच उलट बदडून काढलंन. तेव्हापासून तात्या गुमान सगळं ऐकायचा. भांडणात तात्याची बायको कोणाला ऐकायची नाही. शेवटी तात्यानं गपचुप सगळं स्विकारलं. वर्षभर तात्या बायकोच्या धाकात असायचा. मात्र वर्षातला एक दिवस - तात्याचा असायचा.
त्या दिवशी तात्याची बायको त्याला घाबरून लपून बसायची. वर्षभर बायकोच्या तालावर नाचणारा तात्या धुवडीला मात्र 'वाघ' व्हायचा. एरवी कोणतंच व्यसन न करणारा तात्या त्या दिवशी सकाळी नलाच फुल्ल टाईटव्हायचा. गावात येतानाच मोठमोठ्यानं ओरडत यायचा. वर्षभर मनात साठलेला सगळा राग शब्दातून व्यक्त करायचा. बायकोला वाट्टेल ते बोलायचा. तात्याची बायको त्या दिवशी तात्याला दिसायचंच टाळायची. तात्या तिला शोधत राह्यचा. एकदा बायको कुठे लपलीय, हे तात्याला कळलं. वाघ झालेला तात्यानं तिच्याजवळ जाऊन तिला बडवायला सुरूवात केली. त्याला धड मारताही येत नव्हतं, मात्र त्याची बायको  गप्प होती. त्याला विरोध करत नव्हती. मात्र हे एकदाच घडलं. पुढं केव्हाच धुलवडीदिवशी तात्या बायकोला शोधू शकला नाही. वर्षातला हा एक दिवस गेला की, पुन्हा दुसऱ्या दिवशी सारं नेहमीप्रमाणं सुरळीत व्हायचं. तात्या बायकोच्या तालावर नाचायचा अन् ती पण त्याला नाचवायची. पुढं पुढं तात्या संध्याकाळी अगोदर भाजी करायचा, जेवायचा आणि आमच्यात येन बसायचा.
तात्या सगळ्यांच्या बरोबर पान खायचा. सुरूवातीला दोन पानं घ्यायचा. त्याचा विडा बनवून चवीनं चघळायचा. नंतर पुन्हा पानं घेन विडा बनवायचा. 'आताच पान खान पुन्हा हा विडा का बनवतो'? असा प्रश्न खूप दिवसांनी आम्हाला पडला. बरं, हा दुसरा विडा तयार झाला की लगेच उठून जायचा आणि थोड्या वेळात पुन्हा आमच्यात येन बसायचा. तात्याच्या या गुपिताचा शोध घ्यायचं, आम्ही ठरवलं. असाच एकदा नेहमीप्रमाणे दुसरा विडा तयार करून तात्या उठला. हळूच निघाला. त्याची बायको भांडी घासत होती, तिकडं तात्या गेला. तात्या बायकोजवळ गेला. तेवढ्यात आमच्यातल्या एकानं लपवून ठेवलेल्या बॅटरीचा प्रकाशझोत अचानक तिकडं टाकला. तर तात्याचा हात त्याच्या बायकोच्या तोंडावर होता. 'काय चाललं, तात्या?' असं विचारल्यावर 'कुठं काय?' असं म्हणून त्यानं सारवासारव करायचा प्रयत्न केला. त्यानं थोडं वातावरण शांत होऊ दिलं. थोड‌्या वेळानं पुन्हा चाैकात आला. सगळ‌्यानी तात्याला फैलावर घेतलं. बराच वेळ ताणूनही चर्चा संपत नाही, हे बघून दुसऱ्या विड‌्याचं गुपित त्यानं लाजत लाजत सांगितलं. दुसरा विडा तो भांडी घासणाऱ्या बायकोला भरवायचा.
वर्षभर नवऱ्याला धाकात ठेवणारी तात्याची बायको धुवडीला त्याला दिसायची नाही; चुकून कचाट‌्यात सापडली तर गुपचुप मार खायची. तर, खाजगीत वर्षभर बायकोला कैदाशीण म्हणणारा, धुळवडीला वाट्टेल तसं बोलणारा तात्या तिला पानाचा विडा तयार करून अंधारात सर्वांसमोर गुपचूप भरवायचा. तीही तो गुपचूप खायची. अनेक विसंगती जगाला दिसत असतानाही संसार टिकवून ठेवणारं, दोघांना बांधून ठेवणारं या दोघांचं अव्यक्त प्रेम सुखी संसाराचं इंगितच जणू आम्हाला सांगत राहिलं.

(पुर्वप्रसिध्दी - अक्षरभेट दिवाळी अंक २०१७)