शुक्रवार, १६ मार्च, २०१८

मृत्युंजय संशोधक( सर्व अवयव निकामी होत दोन वर्षात मृत्यू निश्चित आहे, असे सांगणाऱ्या डॉक्टरांचे शब्द त्यांनी केवळ जिद्दीने खोटे ठरवले. मृत्यूला  नमवले. त्यांची ही जिद्द पाहून मृत्यूही  थक्क झाला असावा. त्याला आपण कशासाठी आलो त्याचे भान राहिले नसावे आणि तो स्टिफन यांच्या दाराबाहेर 'तुम्हाला वाटेल तेंव्हाच मी आपणास नेईन, तोपर्यंत मी बाहेर वाट पहातो' असे म्हणत पुढची 46 वर्षे बाहेर प्रतिक्षा करत राहीला.  त्यानी सुदृढाला लाजवेल असा अभ्यास आणि संशोधन केेले. अपंगत्व आपल्या संशोधनाच्या आड येवू दिले नाही. शून्यात नजर लावत विश्वाचे कोडे उलगडण्यात मग्न असणारा, शारारीक कमतरता यशाआड येवू शकत नाही असे जगाला पटवून देणारा, अनेकांचे प्रेरणास्थान बनलेला हा संशोधन विश्वातील तळपता तारा 14 मार्च, 2018 रोजी विझला.‌.................. तरूण भारत या दैनिकातून प्रसिद्ध झालेला मूळ लेख येथे आपल्यासाठी प्रसिद्ध करत आहे, धन्यवाद. 
.........डॉ. व्ही.एन. शिंदे )


..........................................................................................................................वैज्ञानिक घडामोडीशी काहीही देणे घेणे नसलेल्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेला, अनेक शारीरीक मर्यादाना बलस्थान बनवाणारा, पीएच.डी. विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रबंधातून एक स्वतंत्र सिद्धांत मांडणारा, अनंताची मर्यादा असणाऱ्या अवकाशचा वेध घेणारा ज्ञानरूपी प्रकाशाने तळपणारा संशोधन  विश्वातील एक तारा आज निखळला. स्टिफन हॉकिंग! ज्याने मृत्यूला परतवले. सर्व संकटावर मात करत संशोधन केले आणि ते लोकापर्यंत पोहोचवले,शा असामान्य वैज्ञानिकाच्या जाण्याने केवळ वैज्ञानिक क्षेत्राचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची मोठी हानी झाली आहे.  कोण्त्याही धनाढ्याला मिळाली नसेल इतकी प्रसिद्धी या विद्वानाला मिळत आहे.
अत्यंत सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभुषीत कुटुंबात स्टिफन यांचा जन्म 8 जानेवारी, 1942 रोजी ऑक्सफर्ड मध्ये झाला. वडील डॉ.फ्रँक हे जैविक विज्ञानातील संशोधक तर आई इझोबल हॉकिंग या वैद्यकिय सचिव होत्या. त्यांच्या घरातील प्रत्येकजण अभ्यास करत असायचा. अगदी जेवतानाही  गप्पा न मारता प्रत्येकजण पुस्तक वाचत असे. स्टिफन यांना संशोधनाचे बाळकडू घरातून मिळाले. त्यांच्या हुशारीमुळे त्याना शालेय जीवनात त्यांचे मित्र आईनस्टाईन म्हणत. वडिलांच्या शिक्षणाबाबत तिव्र भावना होत्या. आपल्या मुलाला वेबमिनिस्टर स्कुल या प्रतिष्ठित या शाळेत पाठवायचे होते, मात्र आजारपणाने त्याना गाठले. या शाळेच्या प्रवेश परीक्षेवेळी स्टिफन आजारी पडले आणि त्यांची संधी गेली.   इतर मुलाप्रमाणे अभ्यास, खेळ या सर्वांचा आनंद घेत शालेय शिक्षण संपवले आणि महाविद्यालयीन जीवन सुरू झाले.  त्यानी 1959 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाची बी.ए. ही पदवी निसर्ग विज्ञानातून संपादन केली. त्याना परीक्षेतील यशामुळे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. महाविद्यालयीन जीवनात ते हुशार आणि लोकप्रिय विद्यार्थी होते. ते खुप कमी वेळ झोपत असत.
ते वीस वर्षांचे असताना अचानक आजारी पडले. आणि त्यातून ते कधीचं बरे झाले नाहीत. आई आणि वडील दोघेही वैद्यकिय क्षेत्रातील उच्चपदस्थ असल्याने सर्वोत्तम उपाय होत होते. मात्र हे उपचार कामी येत नव्हते. सर्व चाचण्या झाल्या आणि त्यांच्या 21 व्या वाढदिवशी 8 जानेवारी, 1963 ला त्यांना मोटर न्युरॉन डिसीज हा असाध्य आजार  झाल्याचे समजले. संपुर्ण कुटुंबाला हा मोठा हादरा होता कारण या रोगात हळूहळू स्नायूवरील नियंत्रण हरवत जाते. अशक्तपणा येतो. सर्व हालचाली कमी होत जातात. आणि अल्पावधीत आजारी व्यक्ती मृत्यू पावते. सर्व चाचण्याअंती  स्टिफन दोन वर्ष जगतील असे डॉक्टरनी जाहिर केले.  स्टिफन पुर्णत: उध्वस्त झाले. अश्रू गाळत कांही दिवस राहिले मात्र दोन वर्षे आहेत ती तरी मजेत जगू या असा निर्धार केला आणि पुनश्च: सर्वसाधारण जीवन जगायला सुरूवात केली. त्यानी डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतला आणि त्यानी वैश्विक किरणावर अभ्यास करायला सुरूवात केली. 1966 मध्ये त्यानी डॉक्टरेट संपादन केली. त्यांच्या प्रबंधासाठी त्याना ॲडम्स पारितोषिक देण्यात आले.
आजाराने आपले काम सुरू ठेवले. हळूळळू त्यांचे अवयव निकामी होवू लागले. अशक्तपणा वाढू लागला. त्याना पुन्हा दवाखान्यात भरती केले. आता आपले कांही खरे नाही या भावनेने त्याना गाठले. मात्र त्या दवाखान्यात त्यांच्यापेक्षा जास्त वेदनादायक अवस्थेत रूग्ण होते. त्यांना पाहून आपला त्रास काहीच नसल्याचे त्याना जाणवले आणि त्यानी परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार केला. या आजाराशी लढायचं ठरवले. मग जे पदरी पडेल ते पावन करून घेत, कुटुंबाचा परंपरागत अभ्यासाचा रस्ता क्रमायला सुरूवात केली. पाय निकामी झाले आणि व्ही चेअर आली. अभ्यासात खंड पडू नये म्हणून त्यानी व्हील चेअरला संगणक जोडून घेतला. अन्य सर्व बोटांच्या संवेदना जात राहिल्या, स्नायू शिथील होत गेले तर स्टिफन एका  बोटाने ते संगणक वापरू लागले.  पुढे 1985 मध्ये न्यूमोनिआ झाला. आजार खुप वाढला होता. तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. शस्त्रक्रिया करताना त्यांचा कंठ निकामी होणार होता. संवादासाठी असणारा अवयवही निकामी होत होता. त्यांनी तो धक्काही सहन केला. शस्त्रक्रिया झाली आणि त्यांचा आवाज गेला. तोपर्यंत या वैज्ञानिकाच्या कार्याचे महत्त्व जगाला समजले होते. संगणक तज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी हॉकिंग यांच्या संगणकासाठी अशी आज्ञावली बनवली की  त्या संगणकाच्या माध्यमातून हॉकिंग बोलू लागले. भाषणे देऊ लागले. अनेक देश परदेशात फिरत त्यांनी व्याख्याने दिली.
दरम्यान त्यांचे दोन विवाह झाले. पहिली पत्नी जेनपासून त्यांना तीन मुले झाली. पंचेविस वर्षाच्या सुसारातून त्यानी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी त्यांची देखभाल करणारी नर्स एलियन मेसन यांच्यासोबत विवाह केला. तो अकरा वर्ष टिकला आणि ते वेगळे झाले. त्यांच्या जीवनावर 1999 मध्ये आलेल्या एका ॲनिमेशन पटाने स्टिफन यांचे नाव घराघरात पोहोचले. नंतर आलेल्या स्टिफन हॉकिंग्ज युनिव्हर्समुळे ते आणखी लोकप्रिय झाले.
अशा अवस्थेत त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा अभ्यास केला आणि कृष्ण विवरावर आपले संशोधन सुरू ठेवले. त्यातून त्यानी कृष्ण विवरातून कण बाहेर पडत असल्याचे सिद्ध करता आले. वैज्ञानिक जगताने त्यांचे हे संशोधन सुरूवातीला पुर्णत: नाकरले. मात्र हळहळू प्रयोतून स्टिफन यांचे म्हणणे सिदध होवू लागले. पुढे हा सिदधंत सर्वमान्य झाला. कृष्ण विवरातून बाहेर पडणाऱ्या कणांच्या सिद्धंताला हॉकिंग रॅडिएशन थिअरी म्हणून ओळखले जावू लागले. गणित आणि भौतिकशास्त्रातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे ते शोधत राहिले. त्यांचे हॉकिंग रॅडिएशन सोबत पेन्रोज हॉकिंग थिअरम्स, बेकेनस्टेन हॉकिंग फॉर्मूला, हॉकिंग एनर्जी, गिबन्स-हॉकिंग्ज अन्सॅट्झ, गिबन्स-हॉकिंग्ज इफेक्ट, गिबन्स-हॉकिंग्ज स्पेस, गिबन्स-हॉकिंग्ज बाउंडरी टर्म, थ्रोन- हॉकिंग्ज-प्रिस्किल बेट हे महत्त्वाचे शोध आहेत. सर्व अवयव शाबूत असणाऱ्या माणसाला न सोडवता येणारी गणिते त्यांनी मनात सोडवली. सापेक्षता सिद्धांत, गुरूत्वीय बल, वैश्विक किरण आणि कृष्ण्‍ा विवर या विषयावरील अधिकारप्राप्त संशोधक बनले.
भौतिकशास्त्र आणि गणितातील अकरा मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडले. हे सर्व संशोधन अवकाशाशी निगडीत आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना इंग्टन मेडल, अईनमन प्राईज, ह्युजेस मेडल, अल्बर्ट आईनस्टाईन ॲवार्ड, आरएएस सुवर्ण पदक, डिरॅक पदक, वोल्फ प्राईज, प्रिंस ऑफ ऑस्ट्रिया ॲवार्ड, अँड्रू गिमंट पारितोषिक, नायलर प्राइज आणि लेक्चररशिप, लिलेनफिल्ड ॲवार्ड,  अल्बर्ट मेडल, कोपले प्राईज, प्रसिडेंशिअल मेडल फॉर फ्रिडम, फंडामेंटल फिजिक्स प्राईज असे नोबेल वगळता अन्य विज्ञानक्षेत्रातील सर्व पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यांना रॉयल सोसायटीने आपल्या सन्मानीय सदस्यत्व प्रदान केले होते. त्यांच्या विश्वाच्या प्रसरणाचा सिद्धांत हा खूपच प्रसिद्ध झाला. त्यांनी अकरा विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रबंध हा स्वतंत्र सिद्धांत आहे.
वयाच्या 35व्या वर्षी ते केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्राध्यापक बनले. पुर्वी न्यूटनसारख्या महत्त्वाचे संशोधक या पदावर विराजमान झाले होते. या पदावर बसलेल्या व्यक्तीला न्यूटनप्रमाणेचं मोठी प्रसिद्धी लाभलेले स्टिफन हे खऱ्या अर्थाने न्यूटनचे वारसदार बनले. न्यूटनने विश्वातील ग्रहताऱ्यांच्या गतीचा शोध घेतला तर स्टिफन यांनी या ग्रहताऱ्यांच्या निर्मितीचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भविष्यात मानवाला अवकाशात नवे घर शोधावे लागेल, असे ते म्हणत. त्यानी स्वत: शुन्य गुरूत्वीय बल अवस्थेत कांही काळ राहण्याचा प्रयत्न केला होता.‍ विश्व हे कोण्त्याही देवाने निर्माण केले नसून ते एका भौतिक प्रक्रियेतून निर्माण झाले असल्याचे ते प्रतिपादन करत.
या विज्ञानातील त्यातही अंतराळ विश्वातील संशोधनावर अनेक संशोधन निबंध प्रसिद्ध केले. मात्र विज्ञान आणि त्यातील संशोधन सर्वांपर्यंत पाहोचले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. यातूनच त्यांचे निबंधरूपात 'ब्लॅक होल् बेबी युनिव्हर्स अँड ऑदर एस्सेज' असे सुंदर आणि सोप्या भाषेतील पुस्तक निर्माण झाले. त्यानी स्वत:बाबतचे भाष्य 'माय ब्रिफ हिस्टरी' या पुस्तकात केले आहे. त्यांनी स्वतंत्रपणे सात पुस्तके लिहिली. अन्य लेखकासमवेत सहलेखक म्हणून पाच पुस्तके लिहिली आहेत. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जावून व्याख्याने दिली. ते विज्ञान अत्यंत सोप्या भाषेत मांडत. त्यामूळे त्यांची व्याख्याने गाजत. लोक त्याना आवर्जून हजेरी लावत. त्यानी विश्वातील गुढ प्रश्नांची उकल करताना आणि विश्वाच्या निर्मितीचे गुढ उकलत असताना विज्ञान सर्वसामान्यांच्या भाषेत मांडले. त्यांच्या भाषा आणि विद्वत्तेमुळे त्यांची पुस्तके प्रचंड लोकप्रिय झाली. त्यातील 'अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' या पुस्तकाचा बेस्ट सेलर बुक्सच्या यादीत समावेश आहे.
सर्व अवयव निकामी होत दोन वर्षात मृत्यू निश्चित आहे, असे सांगणाऱ्या डॉक्टरांचे शब्द त्यांनी केवळ जिद्दीने खोटे ठरवले. मृत्यूला  नमवले. त्यांची ही जिद्द पाहून मृत्यूही  थक्क झाला असावा. त्याला आपण कशासाठी आलो त्याचे भान राहिले नसावे आणि तो स्टिफन यांच्या दाराबाहेर 'तुम्हाला वाटेल तेंव्हा मी आपणास नेईन, तोपर्यंत मी बाहेर वाट पहातो' असे म्हणत पुढची 46 वर्षे तो बाहेर प्रतिक्षा करत राहीला.  त्यानी सुदृढाला लाजवेल असा अभ्यास आणि संशोधन केले. अपंगत्व आपल्या संशोधनाच्या आड येवू दिले नाही. शून्यात नजर लावत विश्वाचे कोडे उलगडण्यात मग्न असणारा, शारारीक कमतरता यशाआड येवू शकत नाही असे जगाला पटवून देणारा, अनेकांचे प्रेरणास्थान बनलेला हा संशोधन विश्वातील तळपता तारा 14 मार्च, 2018 रोजी विझला. विशेष हे की हा दिवस आईनस्टाईन यांचा जन्म दिवस. सापेक्षता सिद्धांत मांडणाऱ्या संशोधकाच्या जयंती दिनी, सापेक्षता वादाचा वापर करून विश्वाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महान संशोधकाची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांचे कार्य आपल्याला सदैव स्मरणात राहील, त्यांची आठवण देत राहील.१० टिप्पण्या:

  1. Dear Sir, really informative and encouraging article to youths and budding scientists!!, Congràtulations!!

    उत्तर द्याहटवा