बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

मनोगत : असे घडले...भारतीय शास्त्रज्ञ

                                        
 (दिनांक २८ फेब्रुवारी हा दिवस १९८६ पासून आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करायला सुरूवात केली. या निमित्ताने माझे 'असे घडले... भारतीय शास्त्रज्ञ' हे पुस्तक आज डॉ. पी.पी. वडगावकर, वैज्ञानिक, राष्ट्रीय रासायनीक प्रयोगशाळा पुणे यांचे हस्ते आणि प्रा. डी.टी. शिर्के यांचे अध्यक्षतेखाली होत आहे. रसायनशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमामध्ये हे प्रकाशन झाले आहे. सदर पुस्तकातील मनोगत आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
----------------------------------------------------------------------------------------------
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही सी-36) या भारतीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने 104 उपग्रह एकाचवेळी अंतराळात सोडले. पीएसएलव्ही या श्रेणीतील उपग्रहाचे अशा प्रक्षेपकाद्वारे भारतातील सदतिसावे प्रक्षेपण होते. हे प्रक्षेपण 15 फेब्रुवारी, 2017 रोजी भारतातील श्रीहरीकोटा केंद्रावरून यशस्वीरित्या पार पडले. पीएसएलव्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचा प्रक्षेपक आहे. या प्रक्षेपणाद्वारे 101 परदेशी आणि तीन भारतीय असे एकूण 104 उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या सोडण्यात आले. परदेशी 101 उपग्रहात अमेरिकाचे 96 तसेच इस्त्राईल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरात या देशांच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा आणि भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश होता. भारताने पृथ्वी निरिक्षण कार्यक्रम किंवा रिमोट सेन्सींग सॅटेलाईट मालिकेतील कार्टोसॅट-2 श्रेणीतील कार्टोसॅट-2-डी हा 730 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह पाठविला. तसेच आय.एन.एस. 1-, आय.एन.एस. 1-बी या प्रत्येकी 30 किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहांचा यात समावेश होता.
या घटनेने भारताबाबत नवा इतिहास लिहिला गेला, कारण हा एक प्रक्षेपकाच्या सहाय्याने एवढ्या मोठ्या संख्येने उपग्रह पाठवण्याचा जागतिक विक्रम होता. यापूर्वी एकाच प्रक्षेपकाच्या सहाय्याने जास्तीत जास्त उपग्रह पाठवण्याचा विक्रम रशियाच्या नावावर होता. 2014 मध्ये रशियाने एकाच वेळी 37 उपग्रह अंतराळात पाठविले होते. त्या खालोखाल अमेरिकेच्या नासाने एकाच वेळी 29 उपग्रह अवकाशात सोडले होते. तर आपल्या इस्त्रोने एकाचवेळी 20 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. या घटनेची जगभरातील सर्व वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात दखल घेतली. वॉल स्ट्रीट जर्नलने "इंडीयाज रेकॉर्ड ब्रकिंग लाँच" या शब्दात मोठे वृत्त प्रसिद्ध केले. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असणाऱ्या देशाचे उपग्रह प्रक्षेपण भारत करतो आणि मोठी रक्कम उभी करतो, ही भारताच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे.
मात्र हे यश असे एका रात्रीत मिळालेले नाही. या यशामागे अनेकांचे कष्ट आहेत. भारताला फार
मोठी परंपरा आहे. येथील विज्ञान फार प्रगत आहे. आम्ही हे करायचो आणि ते करत होतो. हा वाद ही चर्चा आजच्या युगात महत्वाची नाही. कारण अशा प्रगत आणि संपन्न राष्ट्रावर दिडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. गोव्यासारखा प्रांप्त भारताच्या स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. अर्थात इंग्रज आणि युरोपियन लोकांना भारत आणि जगातील अन्य राष्ट्रात सत्ता काबीज करताना त्यांना सर्वात सहाय्यकारी ठरली ती त्यांच्याकडील शस्त्रे. विज्ञानाच्या प्रगतीसोबत तंत्रज्ञान निर्मिती आणि अशा वस्तुंचे औद्योगिक उत्पादन घेण्यात युरोपियन राष्ट्रानी आघाडी घेतली. त्यामुळे अधिक हानिकारक शस्त्रांची निर्मिती होत गेली आणि राजकिय इच्छाशक्तीला शस्त्रांची जोड मिळताच जगभर अशा वसाहती निर्माण होत गेल्या. हा पारतंत्राचा अंध:कार दूर व्हायला दिडशे वर्ष जावी लागली.
देश स्वतंत्र झाला त्यावेळी या देशाची गणना एक मागास देशात करण्यात येत होती. काळी जादू करणाऱ्यांचा, अंधश्रद्धाळूंचा आणि साप-गारूड्यांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाई. आर्थिक दृष्ट्या भारताची मोठ्या प्रमाणात लूट झाली होती. नैसर्गिक साधन संपत्ती आणि अल्पशिक्षित समाज यातून या देशाला पुन्हा उभा करायचे होते. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यासोबत अनेक विचारवंत वैज्ञानिकांनी देश उभा करण्यासाठी विज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे, हे ओळखून संशोधनावर लक्ष केंद्रीत केले. याचे केंद्र हे जरी कलकत्ता होते, तरी देशाच्या विविध भागातील वैज्ञानिकांचा सहभाग होता.
 एखादा देश जेव्हा प्रबळ होतो किंवा जगाच्या नेतृत्वाचा दावेदार बनू पाहतो, तेव्हा त्या राष्ट्राने
त्यापूर्वीची काही वर्षे त्या त्या क्षेत्रात उदारमतवादाचे आणि सर्व समावेशकतेचे धोरण स्विकारत एकजूटीने काम केलेले असते. त्यातून त्या देशाचा त्या क्षेत्रातील पाया भक्कम होतो आणि त्यावर त्या राष्ट्रांची ताकत निर्माण होते. भारत देशाच्या त्या त्या क्षेत्रातील तत्कालीन धुरीणांनी देशाच्या कानाकोपऱ्यातील विज्ञान क्षेत्रात योगदान देऊन इच्छिणाऱ्या युवकांना सामावून घेतले आणि या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. भारत आज अवकाश संशोधन क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त झालेला देश आहे. भारताला अन्नधान्याची टंचाई ही काही नवी गोष्ट नव्हती. अवकाश संशोधन, अणुशक्ती, कृषी अशा विविध क्षेत्रात भारताची होत असलेली प्रगती ही अत्यंत अभिमानास्पद आहे. मात्र हे यश केवळ चमत्कार नाही किंवा एका रात्रीत प्राप्त करता आलेले नाही. विविध क्षेत्रात भारताला अग्रेसर बनवण्यासाठी पाया रचणारे अनेक मातब्बर संशोधक मंडळही या देशात होऊन गेले. त्यांनी त्या त्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. भारताच्या या विश्वविक्रमी प्रक्षेपणाबाबतचे वृत्त वाचत असताना मला हे प्रकर्षाने जाणवले आणि माझ्या डोळ्यासमोर गतकालातील अनेक वैज्ञानिकांची नावे येवू लागली.
स्वातंत्र्यपूर्व काळात 1930 मध्ये बंगाल प्रांतात भीषण दुष्काळ पडला. लाखो लोकांचे यात प्राण गेले. हे भूकबळी पाहून डॉक्टर न होता, कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे एम.एस.स्वामीनाथन, भारतातील युवकांना काम देण्यासाठी उद्योगधंदे उभे करणे आवश्यक असल्याचे ओळखून रसायन उद्योगांची उभारणी करणारे प्रफुल्लचंद्र रॉय, वनस्पतींना भावना असतात, त्यांनाही विषबाधा होऊ शकते, असे सांगणारे जगदिशचंद्र बोस, भारताला नोबेल पारितोषिक मिळवून देणारे आणि रमण परिमाण शोधणार सी. वी. रमण अशी अनेक नावे समोर आली.
ऑक्टोबर, 2015 मध्ये कोल्हापूर आकाशवाणीच्या प्रविण चिपळूणकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून भारतीय संशोधकांच्या जीवन कार्यावर मालिका लिहिण्यास भाग पाडले होते. त्यामुळे या सर्व वैज्ञानिकांचे जीवन आणि कार्य संक्षिप्त रूपात का होईना विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे, असे वाटू लागले. भारताचा एडिसन म्हणून अमेरिकेने ज्या शंकर आबाजी भिसे यांचा गौरव केला त्यांचे नाव तरूण पिढीपर्यंत अपवादानेच जाते. म्हणून या व्याख्यानासाठी लिहिलेल्या मसुद्यांचे रूपांतर चरित्रात्मक लेखात करावे असे वाटू लागले. या पुस्तकात निवडलेल्या संशोधकांची निवड करताना भिन्न क्षेत्रातील संशोधकांचा समावेश करणे, हा उद्देश होता. त्यांचा क्रम हा त्यांच्या जन्म तारखेनुसार घेण्यात आला अाहे आणि बऱ्याच व्यक्तींनी भारतीय संशोधन कार्याने समृद्ध केले आहे. या सर्वांचा समावेश‍ याठिकाणी करणे शक्य झाले नसले तरी मला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे.
माझ्या एककांचे मानकरी या पहिल्या पुस्तकास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असे घडले भारतीय वैज्ञानिक" हे पुस्तकही वाचकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.

        असे घडले...भारतीय शास्त्रज्ञ
प्रकाशक अक्षर दालन
लेखक डॉ.व्ही.एन.शिंदे
पृष्ठसंख्या - 105
किंमत रू. 150/-

सदर पुस्तक खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
अक्षर दालन,
2141, बी वॉर्ड,
मंगळवार पेठ, कोल्हापूर
संपर्क क्रमांक : 0231 2646424.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा