मंगळवार, १० जुलै, २०१८

गोष्ट जलयुक्त विद्यापीठाची!


  शिवाजी विद्यापीठ पाण्याबाबत स्वंयपुर्ण व्हावे म्हणून १९९९पासून प्रयत्न करण्यात आले. यावर्षी विद्यापीठाने सर्व पाणी आपले वापरले. महानगरपालीकेचे पाणी घेणे, पूर्ण बंद केले. यामागे असणाऱ्या प्रयत्नांची कथा मांडली आहे... गोष्ट जलयुक्त विद्यापीठाची....या लेखात. २०१६मध्ये शिवाजी विद्यापीठाने आपल्या जलयुक्त विद्यापीठ या मोहिमला सुरूवात केली. 'नवे गाव आंदोलन' या मासिकाने ५ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशीत केलेला अंक पाणी या विषयावर काढला. तो लेख 'नवे गाव आंदोलन मासिकाच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 


            शिवाजी विद्यापीठ हे दक्षीण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत, सह्याद्रिच्या पुर्व भागातील निसर्गरम्य परिसरात कोल्हापूर गावी स्थापन झाले. ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर उंचावणे आणि घरोघरी शिक्षण पोहोचवण्याच्या हेतूने या विद्यापीठाची स्थापना झाली. उद्दिष्टांची पुर्तता करताना विद्यापीठाने हळूहळू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दर्जा सिद्ध करायला सुरूवात केली. विशेषत: भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र इत्यादी विषयातील संशोधनाची चर्चा जागतीक पातळीवर होते.  या क्षेत्रात आपण खुप चांगले संशोधन करत असल्याचे अनेक पाहण्यातून सिद्ध झाले आहे. विद्यापीठाने अत्याधुनिक नॅनोसायन्स, जैवतंत्रज्ञान असे अभ्यास सुरू करताना, यंशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रूरल टेक्नॉलॉजीची स्थापना केली आणि आपण ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज अष्टावधानी होते. त्यांचे सर्व बाबीकडे बारीक लक्ष असायचे. त्यांच्या नावाने सुरू असलेले विद्यापीठही सर्वांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करत आहे.
            या विद्यापीठाला सागरमाळ भागातील ८५३ एकराचा परिसर लाभला आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपुर्वी या परिसरात राजाराम तलाव बांधण्यात आला होता. तेथून विद्यापीठ वापरासाठी पाणी घेवू लागले. तसेच एका विहिरीचे पाणी प्रयोगशाळासाठी आणि दुसऱ्या विहिरीचे उद्यानासाठी पाणी वापरले जात असे.  विद्यापीठाच्या इमारती हळूहळू उभारल्या जावू लागल्या. मुलांची - मुलींची वसतीगृहे बांधण्यात आली. अनेक विज्ञानाचे अभ्यासक्रम सुरू झाले आणि पाण्याची गरज वाढू लागली. महानगरपालीकेकडून पाणी घ्यायला सुरूवात झाली.
            आज विद्यापीठात ४० विभागामध्ये ४५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी वसतीगृहात राहतात. परिसरातील निवासस्थानात १०० पेक्षा जास्त कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. विविध विज्ञान प्रयोगशाळामधून मोठया प्रमाणात संशोधन सुरू असते. या सर्वाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. नवे अभ्यासक्रम, संशोधन विषय आणि वाढती विद्यार्थी संख्या यामुळे पाण्याची गरज मोठया प्रमाणात वाढू लागली आणि पाण्यापोटी महानगरपालीकेला द्यावी लागणारी रक्कमही वाढू लागली. पुढे पुढे पाणी मिळणे कठिण होणार, हे ओळखून प्रथम १९९९-२००० मध्ये प्राध्यापक द.ना. धनागरे कुलगुरू असताना भाषा भवनच्या पाठीमागे तलाव बांधण्याचा निर्णय झाला. कामही सुरू झाले आणि सत्तर लाख रूपये खर्चून हा तलाव २००२ मध्ये पुर्ण झाला. मात्र या तलावात पाणी थांबत नव्हते. या प्रश्नावर  २००५ मध्ये खऱ्या अर्थाने विचार झाला. तलावात पाणी येण्यासाठी पाट तयार करावेत आणि या कामात राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्याबाबत तत्कालीन कुलगुरू माणिकराव साळुंखे यानी प्रेरीत केले.
            तत्कालीन रासेयो समन्वयक श्री भोळे यानी जातीने लक्ष घातले. अभियांत्रिकी  विभागाने पुर्ण सहकार्य केले आणि हा तलाव २००५ मध्ये पाण्याने पुर्ण भरून प्रथम वाहू लागला. या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यासाठी ग्रंथालयाजवळ जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला. विद्यापीठाने महानगरपालीकेचे पाणी घेणे बंद केले. मात्र हे तलावातील पाणी डिसेंबरमध्ये संपले. पुन्हा काही महिने महानगरपालीकेचे पाणी घ्यावे लागले. त्या वेळेपासून विद्यापीठ साधारण आठ महिने स्वत: साठवलेले पाणी वापरू लागले. मनपाचे पाणी घेणे पुर्ण बंद व्हावे, या हेतूने दुसरा तलाव संगीतशास्त्र विभागाशेजारी बांधण्यात आला. नैसर्गिक परिस्थिती अनुकुल असल्याने केवळ साडेचोविस लाख रूपये खर्चून पाच कोटी लिटर पाणी साठवणक्षमता असणारा, हा तलाव बांधता आला. पुढे राष्ट्रीय योजना समन्वयक डॉ. संजय ठिगळे यानी हे कार्य सुरू ठेवले. त्यानंतर २०१४ मध्ये प्राध्यापक एन्.जे. पवार कुलगुरू असताना या तलावाच्या पश्चिमेस १०० फुट व्यासाची, पस्तीस फुट खोलीची विहीर खोदली.  लिड बॉटॅनिकल गार्डनला पाण्याची सोय व्हावी, या हेतूने वनस्पतीशास्त्र विभागातील प्रकल्पातून भाषा भवन तलावाच्या पश्चिमेस दोन शेत तळी आणि एक विहीर खोदण्यात आली. यातून बॉटनी विभागाच्या पाण्याचा ताण कमी झाला. या सर्व प्रयत्नामुळे विद्यापीठ पाण्याबाबत सुखी होते.
             मात्र पुन्हा २०१५ मध्ये पुर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हते. महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली. एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला. विद्यापीठाला विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे कठिण झाले. सत्राचा कालावधी कमी करण्यात आला.  अशा वातावरणात दुष्काळाचा नेहमीचं सामना कराव्या लागणाऱ्या भागातून प्राध्यापक देवानंद शिंदे कुलगुरू म्हणून हजर झाले. त्यापुर्वी कांही दिवस अगोदर कुलसचिव पदाचा कार्यभार माझ्याकडे आला होता. विद्यापीठाला एक महिना परीक्षा अगोदर घ्याव्या लागल्या होत्या. ही बाब आम्हाला खुप खटकली होती. कोल्हापूरसारख्या निसर्ग संपन्न भागातील विद्यापीठावर ही वेळ आल्याची खंत मी कुलगुरू शिंदे सराना बोलून दाखवली. मराठवाड्यातील दुष्काळ अनेक वर्ष त्यानी अनुभवला होता. ते स्वत: जल संधारणाबाबत संवेदनशील होते. 'विद्यापीठाला पाण्याबाबत स्वंयपुर्ण बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करा, पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा. त्यासाठी सर्व प्रयत्न करा', असा मुक्त परवाना दिला. त्यांचे हे विधान तत्कालीन संचालक, मविवि मंडळ प्राचार्य डी. आर. मोरे सर, मी आणि अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी प्रेरणा मानून आखणी करायला सुरूवात केली.
            तोपर्यंत पाण्याचे आणि जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व अनेकांच्या लक्षात आले होते. शारीरीक शिक्षण संचालकांची संघटना मदतीसाठी पुढे आली. प्राध्यापक डी.के गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्य घ्यायचे आम्ही निश्चित केले. पहिला टप्पा म्हणून सर्व तळ्याना पाणी आणणाऱ्या चरींचे पुनरूज्जिवन करणे, पसिरातील दोन विहीरींचा गाळ काढणे आणि त्यांचे बांधकाम करणे ही कामे हाती घ्यावयाचे निश्चित केले.   महाविद्यालयीन शारीरीक शिक्षण संचालकांच्या संघटनेने दोन दिवसासाठी जेसीबी मशीन देण्याचे मान्य केले. १४ एप्रिल २०१६ रोजी पहिल्या शेत तळ्याच्या कामाचा शुभारंभ झाला. हे शेत तळे दोन दिवसात पुर्ण झाल्याने पुढील काम मोठ्या उत्साहाने सुरू झाले. पुढे साखळी पद्धतीने आणखी दोन शेत तळी पुर्ण करण्यात आली. या तळ्यांचे वैशिष्ट्य असे की एक भरल्यानंतर त्याचे जास्त झालेले पाणी आपोआप दुसऱ्या आणि ते भरले की तिसऱ्या तळात जाणार होते. या सर्व तळ्यांची उभारणी सुतार विहीरीजवळ करण्यात आली.
            त्याचवेळी सिंथेटीक ट्रॅक परिसरातील विहीरीचा गाळ काढण्याचे काम सुरू केले. विद्यापीठाचा सर्वात उंच भाग. कडक उन्हाळा आणि दुष्काळ असूनही गाळ काढल्यानंतर पस्तीस फुट खाली तळाशी थोडे पाणी येवू लागले. या परिस्थितीत हे निश्चितच आश्वासक आणि उत्साह वाढवणारे होते. या विहीरीचे तातडीने बांधकामही करून घेण्यात आले. ते संपताच सुतार विहीरीजवळील शिंदे विहीरीचे गाळ काढण्याचे काम सुरू केले.  ही  विहिरसुद्धा तीस फुट खोलीची. मात्र गाळाने पंचेविस फुट भरलेली होती. या विहीरीला गाळ निघताचं पाणी येवू लागले. पुर्ण गाळ निघाल्यानंतर तळाशी आठ फुट पाणी साठले. हे चित्र आमच्या प्रयत्नाची दिशा योग्य असल्याचे प्रमाण होते. या विहिरीचेही बांधकाम करण्यात आले.  गाळ काढून दोन्ही विहिरींच्या बांधकामास साडेसहा लाख रूपये खर्च आला.
            त्याचवेळी रासेयोचे स्वंयसेवक, अभियांत्रीकीचे कर्मचारी आणि उद्यान विभाग सर्वानी एकदिलाने या मोहिमेत सहभाग घेतला. प्रत्येकजण  आपले घरातील कार्य असल्यासारखे काम करत होता. त्यांच्यातर्फे सर्व तळ्याना येणारे पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे, अडथळे काढण्याचे काम सुरू होते. पुणे बेंगलोर रस्ता रुंदी करणात शाहू नाक्यापासून पश्चिम बाजूला जाणारे पाण्याचे प्रवाह पुर्णपणे विस्कळीत झाले होते. या रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी पश्चिम भागात जावे म्हणून रस्ता बांधताना जागोजागी फुटपाथ खालील गटाराचे मार्ग सोडले होते. मात्र आमचे त्याकडे दुर्लक्ष होते. आता या कामात सर्वानीचं लक्ष घातले. या नव्या रस्त्याची पायी चालत सर्व बाजूनी पाहणी केली आणि दोन ठिकाणावरून रस्त्याचे पाणी भाषा भवन जवळच्या तळ्यात घेता येते हे लक्षात आले. अभियांत्रीकी विभागाला या कामाची पुर्तता करध्याची सूचना दिल्या. जेसीबी भाड्याने घेवून प्रत्यक्ष देखरेख करत सर्व कामाची अंमलबजावणी सुरू होती. कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे, म.वि.वि.मंडळाचे संचालक प्राचार्य मोरे सर आणि मी मॉर्निंग वॉकच्या वेळीही कामाची प्रगती पाहत होतो. माझी पावले तर कार्यालयीन वेळ सोडून कामाच्या साईटवरून निघत नव्हती. सकाळ, संध्याकाळच नव्हे तर कार्यालयीन वेळेतदेखील शक्य त्या वेळेस काम जेथे सुरू असेल तेथे भेटी सुरू झाल्या. कुलगुरूही आवर्जून सर्व ठिकाणी जात होते. वरिष्ठांचे आपल्या कामाकडे लक्ष आहे ही गोष्ट कर्मचाऱ्याना प्रेरणा देणारी असते. कुलगुरूंच्या भेटीने नेमके हेचं साध्य होत होते. 
            यामध्ये एकूण अडीच किलामिटर अंतराच्या चरींचे काम करण्यात आले. चरींची खोली अर्ध्या फुटापासून आठ फुट होती. यामध्ये रसायनशास्त्र विभागाजवळील रोडवरील पाणी आत घेवून भाषा भवन तलावापर्यंत नेण्यासाठी तयार करण्यात आलेली चर काढताना खुप विचारपुर्वक काम करावे लागले. कांही ठिकाणी आठ फुट खोदावे लागले. माझ्या दृष्टीने या चरीचे महत्त्व फार मोठे होते कारण या चरीला रोडचे पाणी येणार होते. रोडवर थोडा जरी पाउस पडला तरी पाणी चरीत येणार. त्यातून आमच्या या प्रयत्नाची यशस्विता कळणार होती. इतर चरी ५० मिटरपासून साडेपाचशे मिटरपर्यंत होत्या. या चरी खोदणे आणि साफ करण्याच्या कामाला केवळ ५०००० रूपये खर्च आला आणि या सर्व जलसंधारणाच्या कामावर विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत शिबीराचा खर्च वगळता साडेसात लाख रूपयापेक्षा कमी खर्च केला होता. सर्व पाणी वाहून नेणाऱ्या चरींची स्वच्छता ६ जुलै २०१६  रोजी संपली.
            जूनपासून फक्त ढग येत होते. पाउस येत नव्हता. मागील वर्षाची पुनरावृत्ती होते की काय? अशी मनात भिती होती. मात्र आपण मनोभावे काम केले आहे आणि निसर्ग आपणास धोका देणार नाही हा अंतर्मनातला आवाज होता.   ढग येत आणि जात होते, ढगाबरोबर मनात आशनिराशेचा हिंदोळा सुरू होता. आणि आठ जुलै २०१६ला पाउस आला. ९ जुलैला दुसरा शनीवार होता. कार्यालयाला सुट्टी होती. मी माझ्या एका लेखाचे काम करत बसलो होतो. पावसाने जोरदार सुरूवात केली. मी आणि अभियांत्रीकी विभागाच्या कर्मचाऱ्यानी भर पावसात पाहणी केली. पाणी चरीतून व्यवस्थित तळयापर्यंत पोहोचत होते. परत कार्यालयात येवून काम करत बसलो.
             पावसाचा आणखी जोर वाढला. अभियांत्रिकी विभागाचे अभियंता अर्डेकर जेवायला निघाले. जाता जाता ते सहज भेटायला आले. त्याना जाताना शेत तळ्याची परिस्थिती पाहून जायला सांगितले. ते निघाले आणि दहाचं मिनिटात त्यांचा फोन आला 'सर, शेत तळ्याची फुटण्याची शक्यता आहे.' कार्यालय बंद करून लगेच गेलो. पहिले शेत तळे पुर्ण भरले होत मात्र त्याचे अतिरिक्त पाणी बाहेर पडत नव्हते. त्याचा सांडवा खोदणे आवश्यक होते. शेजारच्या शिंदे विहीरीमध्ये पावसाचे पाणी थेट चालले होते. दोन्ही गोष्टी तत्काळ दुरूस्त करणे आवश्यक होते. विद्यापीठ परिसरात असणारा एका कंत्राटदाराचा जेसीबी विनंती करून तत्काळ मागवून कामाला सुरूवात केली.
            परिसरात असणारे अन्य कामावरील कुली, जेसीबी, अर्डेकर आणि मी साडेतीनपासून काम करत होतो. रात्री साडेआठ वाजता सर्व काम संपले. तेवढया वेळात एवढा जोरदार पाउस झाला की दुसरे शेत तळे पुर्ण भरून तिसऱ्या शेत तळयात पाणी जावू लागले. तोपर्यंत विहिरीत जाणारे पाणी थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. सर्व कामे संपल्यानंतर आम्ही निर्धास्त झालो आणि रात्री साडेआठ वाजता पडत्या पावसात घरी गेलो. रात्रभर पाउस पडत राहिला. दुसऱ्या दिवशीही पाउस पडत होता. सकाळी सर्व पाणी साठवण्याच्या ठिकाणी भेटी ‍दिल्या. सर्व पाणवठ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुसऱ्या दिवशीच्या पावसाने भाषा भवन तलाव मोठ्या प्रमाणात भरले. पुढील काही दिवसात दोन्ही तलाव काठोकाठ भरून अतिरिक्त पाणी सांडव्यातून बाहेर पडले. या कालावधीत कुलगुरू प्राध्यापक देवानंद शिंदे महाराष्ट्र शासनाच्या ग्लोबलायझोशन ऑफ हायर एज्युकेशनसाठीच्या समितीचे सदस्य म्हणून इंग्लंड, फ्रांस आणि आयर्लंड दौऱ्यावर होते. त्याना वाट्सअपद्वारा आम्ही ही सर्व प्रगती कळवत होतो. याप्रसंगी आपण कोल्हापूरात असायला हवे होतो, असे ते सातत्याने बोलत.  ते १६ जुलैला परदेश दौऱ्यावरून परत आले. पाणीसाठे पहाण्यासाठी ते उत्सुक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून सर्व पाणवठ्याना भेटी द्यायला सुरूवात केली. भाषा भवन शेजारील तलाव पुर्ण भरून वाहात होता. तो पाण्याचा साठा पाहत तळ्यातील पाणी त्यानी हातात घेतले. हे करताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच समाधान दिसत होते.
            या सर्व प्रयत्नात विद्यापीठातील भाषा भवन तलावामध्ये २२ कोटी १५ लाख लिटर, संगीतशास्त्र तलावामध्ये ५ कोटी २० लाख लिटर, सुतार विहीर ४ लाख लिटर, क्रिडा विभागाजवळील  विहिर पाच लाख लिटर, रसायनशास्त्र विभागाजवळील विहिर ३ लाख लिटर, सिंथेटीक ट्रॅकजवळील विहिर ५ लाख लिटर, शिंदे विहिर ३ लाख लिटर आणि तीन शेत तळ्यामध्ये ४० लाख लिटर असे एकूण तीस कोटी लिटर पाणी भूपृष्ठावरील साठयामध्ये साठवण्यात आम्ही यशस्वी झालो. याखेरीज जमिनीखालील पाण्यामध्ये मोठी वाढ झाली. सुतार विहिरीजवळील साधारण दिडशे एकर क्षेत्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. आजही या क्षेत्रात कोठेही सात आठ फुटाचा खड्डा घेतला तर पाण्याचे झरे सुरू होतात. हे लक्षात घेवून आम्ही पुढील वर्षाचे नियोजन सुरू केले.
            विद्यापीठात प्राध्यापक डी.टी. शिर्के प्रकुलगुरू म्हणून रूजू झाले. कुलसचिवपदी डॉ. नांदवडेकर रूजू झाले. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा बदलला आणि संचालक मविवि मंडळ हे पद संपुष्टात आले. प्राचार्य मोरे हाती महाविद्यालयात रूजू झाले. मात्र विद्यापीठाने आपले जल संधारणाच्या कार्यात खंड पडू दिला नाही. विद्यापीठ परिसरामध्ये दोन ऐतहासीक विहिरी आहेत. त्यांचे बांधकाम १८८३ साली केल्याचे शीला लेख या दोन्ही विहिरीवर इंग्रजी आणि मराठी भाषेत आहेत. त्यातील रसायनशास्त्र विभागाजवळील विहिरीचे पाणी वापरले जात होते. तंत्रज्ञान विभागाशेजारील विहिर मात्र दुर्लक्षित होती. २०१७ मध्ये या विहिराचा गाळ काढून दुरूस्ती करण्यात आली. तसेचं सुतार विहिर परिसरातील पाणी आणखी वापरात यावे म्हणून ६६ फुट व्यासाची आणखी एक विहिर खोदण्यात आली.
            या नव्या विहिरीची साठवण क्षमता सात लाख लिटर इतकी असून विद्यापीठ परिसरातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या या विहिरीचे बांधकाम करण्यात आले. या विहिरीला 'शिवटाकं' हे नाव कुलगुरू प्रा. शिंदे सरांच्या सुचनेप्रमाणे देण्यात आले. या विहिरीला खोदकाम आणि बांधकामासह चौदा लाख रूपये खर्च झाला. मात्र पाण्याचा हा आणखी एक मोठा साठा आम्हाला उपलब्ध झाला. महानगरपालिकेचे दरमहा येणारे बिल सात लाख रूपये होते. या सर्व प्रयत्नातून विद्यापीठ वर्षाला सर्व खर्च वजा जाता वर्षाला साठ ते सत्तर लाख रूपयांची बचत करत आहे. ते पैसे अन्य विकासात्मक कामासाठी वापरण्यास उपलब्ध होत आहेत. या जल साठयाबरोबर विद्यापीठातील जैव विविधताही चांगली वाढत आहे. परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे. मोर, साप, मुंगुस, ससा, खवल्या मांजर, विविध पक्ष्याबरोबर यावर्षी पुन्हा कोल्होबाने दर्शन दिले. झाडे आणि वेली परिसरात चांगल्या वाढू लागल्या आहेत.
            सन २०१७ मध्ये पाउस तुलनेने खुपच कमी झाला तरी विद्यापीठाच्या सातत्यपुर्ण प्रयत्नामूळे पाण्याची कोणतीही अडचण आलेली नाही. दरम्यान विद्यापीठाने प्रतिदिन एक लाख लिटर शुदध पाणी देण्याची क्षमता असलेला रिव्हर्स ऑस्मॉसीस तंत्रावरील जल शुद्धीकरण प्रकल्प विद्यापीठात कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी सर्वाना पुरवण्यात येते. तलाव आणि अन्य विहिरींचे पाणी वापरासाठी वापरण्यात येते. सध्या राजाराम तलाव आणि विद्यापीठाने बांधलेल्या दोन तलावासह आठ विहिरीतील पाणी विद्यापीठ वापरते. विद्यापीठातील घाण पाणी बाहेर जावू नये म्हणून विद्यापीठाने स्वत:चे सांडपाणी जल प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. त्यातून मिळणारे पाणी बागासाठी वापरण्यात येते. यावर्षी परत एक प्रकल्प उभारण्यात येत आहे. सांडपाणी जसे बाहेर जावू नये म्हणून  प्रयत्न करते, तसेचं पावसाचा थेंबही भूपृष्ठावरून वाहून जावू नये, यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यावर्षी परत पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सुरू राहणार आहेत, जोपर्यंत सर्व पाणी अडवले जात नाही तोपर्यंत.

                                                       (छायाचित्र सौजन्य - सुवीज मुव्हीज )
२५ टिप्पण्या:

 1. Great work sir. The contribution of all departments and individuals including you to make our Shivaji University self reliant for water is extremely appreciable. I hope the day will soon come when our university will provide the excess water to the nearby local areas. Hats of to you all!! Best Wishes for further work...

  उत्तर द्याहटवा
 2. खर तर विद्यापीठात आपल्या सोबत नोकरी करत असताना बरयाच वेळेला आपल्या विविध उपक्रमांबाबत नेहमी ऐकतो चर्चा ही बर्याचदा आपणा करत असतो. बाग बगीचा बाबत भरपूर आपली चर्चा झाली . विद्यापीठाच्या बागबगीचा फुलवण्यासाठी आपले योगदान म्हणजे... त्याचे शब्दांकन करता येत नाही. पण हा पाणी साठवण हा उपक्रम म्हणजे ... अरे काय हे ... या आधी NAAC च्या माध्यमातून काम करताना Water Harvesting बाबत काम करणे एवढच ठाऊक होत. पावसाळ्यात इमारतीच्या टेरेस वरचे पाणी हौदात सोडून त्याचा वापर करणे एवढाच वैचारिक दृष्टीकोन होता पण या लेखात लिहलेल्या गोष्टींचे कधी विचारच केला न्हवता .. काही बाबतीत आपल्या या उपक्रमाबाबत असेही वाटत असे... अरे हे शिंदे साहेब काय नाही ते करतात ... पण आता मात्र पावसाचा थेंब आणि थेंब वाचवून आपण विद्यापीठास स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला ... होय सर... आपणच ...... वारंवार आपला या पाणी बाग बगीचा या साठीच राबण आम्ही पाहिलंय पाहत आहे ... आज विद्यापीठ पाण्या कडून स्वयं आहे ही बाब अत्यंत उलेखनीय आणि वाखाणण्याजोगी आहे ... येणाऱ्या NAAC साठी याचा उपयोग होईलच पण भारत सरकार सुधा याची दखल घेईल ....
  यावरून सर आणखी एक गोष्ट वाटते .. आज राधानगरी धरण आहे म्हणून आपण करविरवासीय पाण्याकडून सुखी आहे .. जशी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण उभारले तसेच काहीस येणारा काळ हा विद्यापीठासाठी पाण्याकडून सुखावह होईल यात तिळमात्र शंका नाही ... आधुनिक युगातील शाहू महाराज असे जरी आपणास म्हंटले तरी त्यात वावग असे काहीच नाही .... आपल्या सोबत काम करतो याचा सार्थ अभिमान आहे ...

  उत्तर द्याहटवा
 3. विद्यापीठातील पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवलेल्या व्यथेच्या विजयाची गाथा

  उत्तर द्याहटवा
 4. विद्यापीठ पाण्याबाबत स्वयंपूर्ण
  झाले हे माहीत होते. पण हे कार्य पूर्ण करण्यासाठी एवढ्या लोकांचे कष्ट , योगदान आहे हे हा लेख वाचल्यानंतर कळाले,
  ज्या विचारवंतांच्या कल्पनेतून हा प्रकल्प उदयास आला आणि ज्या लोकांच्या कष्टातुन, योगदानातून पूर्ण झाला त्यांना "आदरपूर्वक अभिवादन"
  आपला हा महत्वपूर्ण प्रकल्प भविष्यकालीन समस्यांचे निराकरण व दिशादर्शक ठरेल सर

  उत्तर द्याहटवा
 5. आपन दुरदृष्टी आहात. आपल्या कार्याला सलाम.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. पावसाचा थेंबही भूपृष्ठावरून वाहून जावू नये हे जलयुक्त धोरण निश्चितपणे अभिनंदनीय आहे. पण आपल्या जलयुक्त कृती सलाम.

   हटवा
 6. Dear Dr V N Shinde, I missed your recent articles due to my being off from the popular social media platform WhatsApp however I am extremely fortunate to read the water conservation and water independence true life story of Shivaji University, my university. It reads like a fairy tale. One cannot imagine a government funded public university to be taking such genuine efforts for such a grave and pertinent issue of saving water. Our Hon V C Sir 's glitter in his eyes when he took a handful of water from Languages Departments percolation tank reminded me of Pt Jawaharlal Nehru who activated Bhakra project. He had instilled the spirit of making new India a nation of progress in Science and Technology while he adored its ancient civilization. Our present Hon P M too is working hard to continue with a renewed spirit in tune with modern times. This grand project of a public university's water independence must be shared largely in Twitter so that Hon Pm will mention it in his Man Ki Baat. Prin Dr More stands beside you and looks at the wonderful site (and sight) of water with great admiration. He must be surely thinking of most memorable lines of great Romantic Poet S T Coleridge 'Water, water everywhere' and in his mind he must have given a twist to the next line 'and all drops conserved mainly by V N'... I'm going to share this comment on my Twitter ac with Hon PM right away. Great job done Sir by you and all honourable authorities like Hon V C, Engineers, Prin More Sir and all of you.: Dr R Y Shinde (Professor - Selected), Wai, 11.7.18

  उत्तर द्याहटवा
 7. On Twitter... I have already shared my comment with link to this blog.. Kindly check Twitter handle @Veerite and re tweet with Hon P M Modi ji on his Twitter accounts :

  उत्तर द्याहटवा
 8. उत्कृष्ट...
  हिरव्या बोटांचे आणि बेटांचेही किमयागार ठरलात आपण आणि शिवाजी विद्यापीठ..

  उत्तर द्याहटवा
 9. सर खुपच छान *** सर आपण केलेल्या या कार्यास मनापासून सलाम **🎄🎄

  उत्तर द्याहटवा
 10. सर खूप छान आपण नवा आदर्श आम्हा समोर ठेवला सलाम आपल्या कार्याला

  उत्तर द्याहटवा
 11. मी विद्यार्थी असताना या तळ‌्यांची बांधणी सुरू झाली होती.आपल्या लेखां मधून असाच विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मिळत रहावा. धन्यवाद सर!

  उत्तर द्याहटवा
 12. You have taken good effort for the water conservation system. This will help to increase the water level. I congratulate to you and your team.

  उत्तर द्याहटवा
 13. मित्रहो, आपण या ब्लॉगला सर्वाधिक भेट दिली त्याबद्दल मी आपला मन:पुर्वक आभारी आहे. या आमच्या कार्याची दखल स्थानिक सर्व वृत्तपत्रानी घेतली आहेचं. त्याखेरीज लोकराज्यच्या ऑक्टोबर २०१८च्या अंकात यावरील लेख आहे. जय महाराष्ट्र आणि एबीपी माझा या दोन वृत्तवाहिन्यानीही सविस्तर वृत्त दिले. त्यातील एबीपी माझाची बातमी https://www.youtube.com/watch?v=15ZS9Y-jH94&feature=youtu.be
  या लिंकवर उपलब्ध आहे.

  उत्तर द्याहटवा