शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

प्रत्येक मुलीने वाचावेसे…! Finding My Core

 

‘माझ्या अंतरंगाचा शोध’ असे सुंदर नाव देता आले असतानाही ‘Finding My Core’  अशा इंग्रजी नावाचे, इंग्रजी लिपीतच छापलेले विनया गोरे यांचे पुस्तक डॉ. काशीद सरांसोबत आलेल्या वर्षा नाडगोंडे मॅडम यांनी भेट दिले. पुस्तक पाहिल्यानंतर ते मी वाचेन का? असा माझाच मला प्रश्न पडला होता. मोठ्या आकारात, सर्वत्र रंगीत छपाई असलेले पुस्तक, मोठा खर्च करून छापलेले आहे, हे पाहताक्षणी लक्षात येत होते. अशा प्रकारे खूप खर्च करून छापलेल्या अनेक पुस्तकात आत्मप्रौढीचाच भाग जास्त असतो. मुद्रण कला सोपी आणि स्वस्त झाल्यापासून असे अनेक ग्रंथ प्रसिद्ध होतात. ते आत्मप्रौढीपर आणि खास करून लोकांना भेट देण्यासाठी असतात, अशी आता धारणा होत चालली आहे. त्याच परंपरेतील हेही पुस्तक असावे, असे समजून मी ते पुस्तक बाजूला ठेवणार होतो. ते पाहिल्या-पाहिल्या हीच भावना झाली होती, हे प्रामाणिकपणे मान्य करायलाच हवे. तरीही कोणतेही पुस्तक बाजूला ठेवताना, ते थोडेसे चाळायची, आणि त्यात काही सापडते का पहायची सवय आहे. हे पुस्तकही तसेच चाळताना पुस्तकाची प्रस्तावना तारा भवाळकर मॅडमनी लिहिल्याचे दिसले. आता त्या प्रसन्न झाल्या आणि त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला मिळाली म्हणजे निश्चित काहीतरी वेगळे असणार, म्हणून वाचायला सुरुवात केली... आणि कधी पन्नास पाने संपली, ते समजलेही नाही. पुढे पुस्तक वाचून संपवावे, असा निर्धार केला. तर पुस्तक कोठे ठेवले, तेच सापडत नव्हते. बाकीच्या कामात थोडेसे दुर्लक्षही झाले, पण पुस्तक वाचून पूर्ण करायचे आहे, हे मनात निश्चित होते. शेवटी पुस्तक सापडले आणि अधाशासारखे वाचून संपवले. एक सुंदर चरित्र ग्रंथ लिहिल्याबद्दल लेखिका विनया गोरे आणि तो माझ्यापर्यंत पोहाचवल्याबद्दल वर्षा नाडगोंडे मॅडम आणि काशिद सरांना मन:पूर्वक धन्यवाद!      

पुस्तक वाचताना या पुस्तकावर आपण लिहायला हवे, असे वाटू लागले. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे विनया यांच्या नावात विनय असला तरी सर्व प्रसंग त्या विनयाने घेत नाहीत. त्या आपल्या अंतर्मनाचा कौल घेऊन पुढे जात राहतात. जीवनात जे काही बरेवाईट घडते, घडले – त्यात गुंतून न राहता कायम नवे काय करता येईल, आपण काय चांगले करू शकतो, याचा शोध घेण्याची त्यांची सवय. कोणतेही नवे तंत्रज्ञान, नव्या ज्ञानाचे दार दिसले आणि आपण ते शिकू शकतो, हे लक्षात आले की ते शिकण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती... संसार मोडण्याची वेळ आल्यावरही तो प्रसंग इतक्या संयमाने घेऊन आकाशाला गवसणी घालण्याची ठेवलेली तयारी आणि मिळवलेले यश हे प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीने वाचायला हवे, असा विचार मनात आला आणि त्यासाठीच या पुस्तकाबद्दल लिहायलाच हवे, असे वाटले.

पुस्तकाच्या नावाखाली दिलेले लेखिकेचे नाव विनया गोरे ते विनया गोर हे पुस्तकाचा विषयप्रवेश करून देते. पहिली पन्नास पाने वाचून होईपर्यंत हे वैशिष्ट्य लक्षात आले होते. पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. तारा भवाळकर यांनी, ‘सामान्यत: स्त्रियांना सासरचा किंवा माहेरचा आधार असल्याशिवाय तरणोपाय नाही, असा समज आहे. या दोन बिन्दुपलीकडे तिसऱ्या बिंदूची निर्मिती करणाऱ्या ज्या अपवादात्मक स्त्रिया आहेत त्यापैकी विनया एक! या तिसऱ्या बिंदूचा शोध मलाही तिच्या विनया गोरे ते विनया गोर च्या वाचनातून लागला’, असे लिहिले आहे. तिसऱ्या बिंदूच्या शोधात’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ताईंचे हे म्हणने हा त्यांचा मोठेपणा असला तरी पुस्तक वाचताना, ते अगदी खरे असल्याचे जागोजागी जाणवत राहते. लेखिका बालपणी भवाळकर मॅडमच्या शेजारी राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बालपण त्यांनी पाहिले आहे आणि त्यामुळेच प्रस्तावना आणखी सुंदर झाली आहे. ती निव्वळ पुस्तक वाचनातून आलेली नाही, तर अंतर्मनातून उतरली आहे. पुस्तकाचे मराठी बारसे त्या ‘माझ्या अंत:सत्वाचा शोध’ असे करतात.

लेखिकेच्या जीवनपटाची साधारण तीन भागात विभागणी होते. पहिला भाग बालपणापासून लग्नापर्यंतचा येतो. पुढचा भाग जर्मनीत सुरू होतो तो अमेरिकेतून पतीने परतण्याचा निर्णय घेणे आणि विभक्त होण्याचा निर्णय होईपर्यंतचा भाग आहे. तिसरा भाग हा विभक्त झाल्यानंतर विनया गोरे यांच्या विनया गोरमध्ये रूपांतरित होण्याचा आहे. लेखिकेने हे पुस्तक नातेवाईकांच्या आग्रहास्तव लिहिले आहे. लिहिले आहे, हे महत्त्वाचे कारण साधारण सत्तर पंचाहत्तर वर्षांपूर्वी एका शिक्षक दांपत्याच्या घरी जन्मलेली मुलगी. मुलीवर अनंत बंधने आजही घातली जात असताना, ज्या पद्धतीने स्वत:ला पैलू पाडत जाते, ते वाचनीय आणि प्रेरणादायी आहे. त्याकाळात काळाच्या पुढे जाऊन मुलींना स्वतंत्र विचार करण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणारे मातापिता लाभले, हे त्यांचे भाग्य. याची जाणिव ठेवत लेखिकेने पुस्तक आई-वडिलांना अर्पण केले आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत मातापित्यांच्या संस्कारातून वाचनाची बालपणीच सवय लागली. वाचनातून वक्तृत्व आणि व्यक्तीमत्त्व खुलत गेले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात एक लक्षात राहावे, अशी शैक्षणिक कारकिर्द लाभलेली ही विद्यार्थीनी. अनेक स्पर्धात यश मिळवणारी. ज्या काळात मुलीने सायकल चालवलेले दिसणे, अवघड त्या काळात सांगलीमध्ये स्कूटर चालवते. विज्ञान शाखेला प्रवेश घेते. पुढे वालचंद अभियांत्र‍िकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेते. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असतानाच विवाहाचा प्रस्ताव येतो. सुरुवातीला तिलाही शिक्षण पूर्ण करायचे असते. मनात विरोध असूनही सर्वांच्या इच्छेला मान देवून ही स्वतंत्र विचाराची मुलगी लग्नाला होकार देते. मुलगा जर्मनीत नोकरी करणारा असूनही अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून संसार करण्याच्या प्रयत्न करते. १९७२ मध्ये झालेले लग्न. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या विसाव्या वर्षी ही मुलगी जर्मनीला जाते. तेथे गेल्यानंतर काही दिवसातच पतीदेव स्वत:चे निर्णय स्वत: घेत नाहीत हे तिच्या लक्षात येते. त्यानंतर नवऱ्याने अमेरिकेत जाऊन एम.एस. पूर्ण करावे, असा निर्णय दोघे घेतात. नवरा अमेरिकेला गेल्यानंतर ही वीस-एकविस वर्षांची मुलगी जर्मनीत एकटी राहते. नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत स्वत:च्या तिकीटाचे पैसे जमा झाल्यावर भारतात परत येते. स्वत:चे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करते. तरीही नवऱ्याचे एम.एस. पूर्ण होत नाही. त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती मुंबईतच नोकरी करत सासरी राहते. स्वतंत्र विचार करण्याचे संस्कार देणाऱ्या मातापित्यासोबत वाढलेल्या या मुलीला ज्येष्ठांचे निर्णय गुपचूप पाळायचे संस्कार असणाऱ्या घरात गुदमरायला लागते. मात्र एक तडजोड म्हणून ती सहन करते. पुढे नवऱ्याचे एम.एस. पूर्ण व्हायच्या वेळेस ती अमेरिकेला जाते. अमेरिकेला जाण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे उसणे आणि व्याजाने घ्यावे लागतात.

ती अमेरिकेला जाते. स्वत:ही एम.एस.चे शिक्षण घेण्याचा निर्णय घेते. तिला फेलोशिप मिळवून देण्याचे अभिवचन तेथील शिक्षक रोमर देतात. त्याचवेळी नवरा कोणतीही चर्चा न करता भारतात परतण्याचा निर्णय घेतो. डॉ. रोमर यांनी लेखिकेला फेलोशिप मिळवून देण्याचे ठरवले असताना एम.एस. पूर्ण न करणे तिच्या मनाला पटत नाही. नवराही त्याला होकार भरतो आणि ती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेऊन एकटीच अमेरिकेत राहते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांनी निर्णय घेणे अपेक्षित असताना नवऱ्याचा त्याबाबतचा अनुत्साह पाहून ही मुलगी एटी अँड टी बेलमध्ये नोकरी स्वीकारते. अखेर दोघे लग्नापासून केवळ आठ वर्षांत विभक्त होतात. जर्मनीतील दीड-दोन वर्षांचा कालखंडच ते एकत्र राहतात. तोच काय तो संसाराचा कालखंड.

तेथून पुढे विनया गोरे यांचा विनया गोर होण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. व्यावसायिक विश्वात पन्नास वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत गेलेल्या एका मुलीने आपले स्वत:चे स्थान निर्माण करणे, हे असाध्य, ही मुलगी साध्य करते. व्यावसायिक चढउताराचा फटका बसून मध्येच नोकरी जाणे, त्यानंतर नव्या कंपनीमध्ये नोकरी मिळवणे, खालच्या पदावरून पुन्हा पुर्ववैभव प्राप्त करणे या सर्व बाबी या पुस्तकात ओघवत्या शैलीत येतात. त्यामुळे वाचकाला कोठेही कंटाळा येत नाही.

पुस्तकामध्ये भरपूर छायाचित्रे आलेली आहेत. पुस्तकाची मांडणी, छपाई आणि एकूणच निर्म‍िती अतिशय सुंदर झाली आहे. पुस्तकातील भाषा मात्र पन्नास वर्षे अमेरिकेत घालवलेल्या व्यक्तीची वाटत नाही. चार-सहा वर्षे परदेशात घालवलेली मंडळी, कशी मराठी भाषेत इंग्रजी शब्दांची भेसळ करून, आपण आता परदेशी संस्कारात वाढलो आहोत, हे सर्वाजनिक जीवनात दाखवण्याचा प्रयत्न करतात, तसे विनया गोरे यांचे झाले नाही, हे मनाला खूपच भावते. गुलाब आणि मोगरा ही दोन्ही फुले भारतीयच. मात्र गुलाबाने पाश्चात्य संस्कार घेऊन तो विदेशी वाटायला लागला आहे. मोगरा मात्र जगाच्या सर्व कोपऱ्यात पोहोचूनही अजून आपले खानदानीपण जपून आहे. गुलाब दिसतो सुंदर, मात्र मोगऱ्याच्या सुगंधापुढे तो फिका पडतो. या पुस्तकाने गुलाबाचे देखणेपण घेताना, मोगऱ्याचा सुगंध जपला आहे, असे म्हणायला हवे.

या पुस्तकातील अनेक प्रसंग बरेच काही शिकवून जातात. त्यातील काही प्रसंगाचा उल्लेख करायलाच हवा. पान क्रमांक १६५/१६६ वरील एका मिटींगचा प्रसंग असाच शिकवण देणारा आहे. विशेषत: मुलगी म्हणून वेगळी वागणूक कदापि खपवून घेऊ नये. त्याचंवेळी आपण बॉस आहोत, याची कोणालाही न दुखावता कशी जाणीव करून द्यावी याचे सुंदर उदाहरण आहे. अर्थात लेखिका किंवा मी सिगार ओढझ्याचे समर्थक नाही, हे लक्षात घेऊन या प्रसंगातील शिकवण समजून घ्यायला हवी.

‘…अशीच एक मिटींग झाली आणि नंतर जेवण. नेहमीप्रमाणे मी एकटीच स्त्री, बाकी सर्व पुरूष होते. डिनरनंतर फ्रेंच पद्धतीनुसार कोनियॅक, ब्रँडी आणि मग आली सिगार बॉक्स. ती टेबलवर पास होता, होता माझ्या डावीकडच्या माणसाकडे आली. त्यानं एक सिगार उचलली आणि मला न विचारताच माझ्या उजवीकडच्या माणसाकडे पास केली, जणू मी अदृश्य होते. मी एकदम स्त‍िमित झाले! विचार आला “I have earned the right to be at this table, earned the right to be asked. I will not let you ignore me.” मी माझ्या उजवीकडच्या माणसाकडून सिगार बॉकस मागितली. सगळेच आता जरा टेंशनमध्ये. माझ्या डावीकडच्या माणसाने आश्चर्याने विचारलं, ‘तुला आवडते सिगार ओढायला?’ मी उत्तर दिलं, ‘माहीत नाही; पण तू मला विचारलं नाहीस, आपलं आपण ठरवलंस आणि मला सोडून पास केलीस.’ त्याच्या मनात विचार आला असणार, ही स्त्री, हिला काय विचारायचं. ……पहिल्यांदाच मी सिगार ओढत होते, जोरात ठसका आला; पण मीच स्वत:ला हसले आणि त्यामुळे वातावरण निवळले. मग मी त्यांना विचारले ‘तुमचा सर्वांचा पहिला अनुभव कसा होता’ आणि बघता बघता आम्ही सगळे मिळून पहिल्या झुरक्याच्या आठवणीने हसायला लागलो. They all understood that I was here to stay and was force to be reckoned with.’  

असाच सुंदर मजकूर पान क्रमांक ११४ वर आहे. लेखिकेने याठिकाणी आज भारतात परवलीचा शब्द बनलेल्या सॉफ्ट स्कील्सबद्दल लिहिले आहे. हा उतारा वाचताना पु.शि. रेगेंची सावित्री कादंबरी, त्यातील लच्छी, तिची आजी आणि मोर आठवला. या ठिकाणी त्या लिहितात, ‘मला लोकांशी वागायचं कौशल्य, सॉफ्ट स्कील्स विकसीत करायची होती. अर्थातच विस्तारीत विचारांचा आणि त्याच्या कम्फर्ट घोनमधून बाहेर पडलेला मेंटोर हवा होता. आजूबाजूचे लोक मी ‘वाचत होते. कोणाची लोकांशी वागायची कौशल्ये मला आवडतात? ‘मला मोर आवडतो’, तर ‘मी मोर कशी होणार’ याचं निरीक्षण करत होते. तेव्हा ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असा जॉर्ज, प्रोफेशनल मेंटोरच्या रूपात भेटला…..’ पुढे हा जॉर्ज त्यांना खूप छान सहकार्य करतो याचे वर्णन येते. मात्र याठिकाणी आपण ‘मोर व्हायचं आहे’ हे अगोदर ठरवायला हवं. त्यानंतर तुमचा निर्णय पक्का असेल तर पुढे मार्ग सापडतोच. मोर आवडतो आणि तो भेटत नसेल तर आपणच मोर व्हायचं, हा संदेश लेखिकेच्या रक्तात भिनलेला आहे. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय असते. हा भागही खूपच छान शब्दांकित झालेला आहे.

हे पुस्तक म्हटले तर आत्मचरित्र आहे. मात्र लेखिका जसे जगली, तसे सनावळीनुसार नाही. तिचा जीवनपट जसा चढउतारातून जात राहिला, कधी फुलांचे ताटवे; तर, कधी रखरखते उन पहात पुढे जात राहिला, तसाच मांडला आहे. तो तसा लिहिला असला तरी त्यामुळे वाचनात खंड येत नाही. त्याला साच्यात बांधण्याचा प्रयत्न केलेला नसल्याने हा फुलांचा गुच्छ सुंदर बनला आहे. हे पुस्तक वाचताना धुंद आणि स्वच्छंद जगतानाही जीवनमूल्यांना जपत यशस्वी होण्याचा एक पट उलगडत जातो. वाचक त्यात हरवून जातो. हे पुस्तक केवळ वाचून बाजूला ठेवावे, असे निश्चितच नाही. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. ते प्रत्येकांने वाचावे आणि शिकावे असे आहे. खास करून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थीनेने हे पुस्तक वाचायलाच हवे.

पुस्तकाचे नाव – Finding My Core विनया गोरे ते विनया गोर

लेखिका – विनया गोरे

प्रकाशक – विभव प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे – २६२

मूल्ये – रू.५००/-

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४

विज्ञान साहित्यातील ग्रामीण प्रवाह ! विज्ञानलेखक डॉ. संजय ढोले साहित्य विशेषांक

 


संजय ढोले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील एक प्राध्यापक. नामवंत संशोधक. मात्र उपजीविकेसोबत  जीविका शोधताना विज्ञान कथा लेखनाचा मार्ग शोधला. त्यतून पुढे कादंबरी लिहावीशी वाटली आणि दोन कादंबरी लेखन त्यांनी केले. सहा कथासंग्रह आणि दोन कादंबरी लेखन अशी मोठी ग्रंथसंपदा त्यांच्या नावे आहे. या त्यांच्या लेखनात ग्रामीण भागात त्यांनी घालवलेले बालपण ते सोबत घेत लिहितात. विदेशी पार्श्वभूमी निवडण्याऐवजी ते स्थानिक नवे, भूभाग घेऊन विज्ञान वाचकांच्या गाली उतरवतात. मात्र हे सगळे इतके सहज आहे कि वाचक आपोआप पुढे जात राहतो. कोठेही वाचकाला कंटाळवाणे वाटत नाही. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सक्षम समीक्षा नियतकालिकाने एप्रिल-मे -जून २०२४ चा अंक "विज्ञानलेखक डॉ. संजय ढोले साहित्य विशेषांक' म्हणून प्रसिद्ध केला. या अंकासाठी मला लिहिण्याची संधी मिळाली. हा लेख सक्षम सामिक्षाच्या सौजन्याने येथे प्रसिद्ध करत आहे....

__________________________________________________

मराठी साहित्यामध्ये विज्ञान साहित्याचा प्रवाह, हा अगदी अलिकडचा असल्याचे मानले जाते. असे असले तरी, मराठी साहित्यात विज्ञान नव्हतेच असे नाही. विवेकी समाज घडवण्यासाठी अनेक संतानी आपल्या साहित्यात, विशेषत: काव्यरचनांमध्ये परखडपणे सत्य सांगून समाजप्रबोधन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते. निखळ सत्य अनेकांच्या पचनी पडतेच असेही नाही. असे निखळ सत्य सांगणाऱ्यांना अनेकदा धर्मसत्ता, राजसत्ता आणि काहीवेळा समाजाच्याही रोषाला बळी पडावे लागले. तरीही विज्ञान सांगण्याचे प्रयत्न सातत्याने होत राहिले आहेत. महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला संत परंपरा मोठी आहे. अनेक संतांनी आपल्या साहित्यातून समाज प्रबोधन करताना विज्ञान समाजासमोर मांडले. याचा लौकिकार्थाने विज्ञान साहित्यात समावेश होत नाही, हे खरे. मात्र हे विज्ञान साहित्यच आहे, असे प्रामाणिकपणे म्हणावेसे वाटते कारण निखळ, निरपेक्ष सत्य संतांनी अनेक रचनामध्ये मांडले आहे.

विज्ञान म्हणजे ‘सुसंघटीत विशेष ज्ञान’ अशी व्याख्या सर्वमान्य आहे. मात्र मराठी भाषेमध्ये ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ असे दोन स्वतंत्र शब्द आहेत आणि या शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. विज्ञान हे शास्त्रच असते, मात्र प्रत्येक शास्त्र हे विज्ञान असेलच असे नाही. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची नियमावर आधारीत केलेली मांडणी होय. त्यामुळे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भाषाशास्त्र अशी अनेक शास्त्रे तयार होतात. विज्ञानातही जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशी अनेक शास्त्रे आहेत, अगदी अलिकडील या यादीमध्ये समाविष्ट झाले ते माहिती-तंत्रज्ञान शास्त्र. मात्र शास्त्रामधील नियम, ज्यावर आधारीत एखाद्या विषयाची मांडणी केलेली असते, ते स्थल, काल, व्यक्ती निरपेक्ष असतीलच, असे नाही. जेव्हा एखाद्या विषयाची मांडणी स्थल, काल, व्यक्ती निरपेक्ष नियमावर आधारीत करण्यात येते, तेव्हा ते शास्त्र विज्ञान मानले जाते. म्हणूनच विज्ञान हे शास्त्र असते, मात्र प्रत्येक शास्त्र हे विज्ञान असतेच, असे नाही. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे आज परवलीचे शब्द बनले आहेत.

आज वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये यावा, यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसतात. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी व्यक्ती ही स्वत: विचार करत असते आणि कालौघात ती विवेकी बनते. असा समाज निर्माण व्हावा, हे प्रत्येक राष्ट्राचे उद्दिष्ट असते. त्याद्ष्टिने मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसतात. शासन पातळीवरील प्रयत्न, शालेय अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट यात याचा समावेश आवर्जून असतो. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवर अनेक साहित्यिक यासाठी आपले आयुष्य वेचतात. विज्ञान जनमानसात रूजविण्यासाठी लेखन करतात.  

संत साहित्य समाज प्रबोधनासाठी आणि समाजाचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी लिहिले गेले. समाजातून अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न असतो. त्यातून समाजापुढे निखळ सत्य मांडण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडलेले निसर्गविषयक विचार, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले पसायदान, संत तुकारामांचे रोकडे बोल या सर्वांचा समावेश करावा लागेल. मात्र सतराव्या शतकानंतर विशेषत: पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर विज्ञान आणि शास्त्रे वेगळी झाली. तोपर्यंत निसर्गविज्ञानांतर्गत विज्ञान आणि शास्त्रे यांचा अभ्यास होत असे. त्यामुळेच पाश्चात्य राष्ट्रांमध्ये अनेक संशोधक हे तत्वज्ञान, कायदा किंवा आज ज्यांचा समावेश शास्त्रामध्ये होतो, त्या विषयांचा अभ्यास करणारे असल्याचे दिसून येते. तेथून पुढे मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होऊ लागली आणि त्याचे प्रतिबिंब साहित्यातही पडू लागले. शोधाचे प्रतिबिंब जसे साहित्यात पडत होते, त्यासोबत भविष्यात काय घडू शकते, याचाही वेध अनेक लेखक, साहित्यिक घेऊ लागले. उपलब्ध ज्ञानाच्या आधारे भविष्यातील शोधांचा वेध घेणारे साहित्य प्रामुख्याने विज्ञान साहित्य मानले जाऊ लागले.

मराठी विश्वकोशानुसार ‘विज्ञान हे ज्याच्या आशयाचे अविभाज्य अधिष्ठान आहे, अशा साहित्यकृती या विज्ञान साहित्यामध्ये येतात’. त्यातून विज्ञान साहित्यामध्ये निखळ विज्ञान संशोधनाचे लोकांना आकलन होईल, अशा भाषेमध्ये लेखन, ज्यामध्ये माहितीपर लेखन, वैज्ञानिक तथ्यांना कथा किंवा कादंबरीच्या रूपात सादर करणे आणि विज्ञान काव्यरूपांमध्ये मांडणे असे प्रमुख प्रकार निर्माण झाले. यातील संशोधनपर लेखनाचा वाचकवर्ग हा त्या-त्या विषयातील संशोधकांचा असतो. हा वर्ग फारच मर्यादित असतो. ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकरही या लेखनाला विज्ञान साहित्य मानत नाहीत. त्यांच्या मते, ‘जे साहित्य विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केले जाते ते विज्ञान साहित्य असते.’ माहितीपर लेखनाचा वाचक वर्ग, हा जिज्ञासू आणि ज्ञानपिपासू असतो. एखाद्या विषयातील माहिती मिळावी, ज्ञान मिळावे, यासाठी त्याचे वाचन असते. हा वर्ग प्रामुख्याने विज्ञान विषय प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च शिक्षणामध्ये अध्यापन करणारा किंवा शिकणाऱ्यांचा असतो. केवळ माहिती हवी, म्हणून वाचणारा समाजातील इतर घटकातील काही वाचकांचा गट यामध्ये समाविष्ट असतो. त्यांची संख्या अत्यल्प असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या प्रकारातील लेखन बहुतांश वेळा लालित्यपूर्ण असतेच, असे नाही.नवख्या वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यामुळे यात असेलच असे नाही. तिसऱ्या प्रकारात कथा आणि कादंबरी येते. यामध्येही विज्ञान, वैज्ञानिक तत्वे यांना मध्यवर्ती घेऊन जे लेखन होते, त्याचा समावेश विज्ञान कथा आणि कादंबरी यामध्ये होतो. हा साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये विज्ञानाबरोबर भाषिक कौशल्ये असणाऱ्या व्यक्तीकडून हे लेखन झाले तर या लेखनाचा वाचक वर्ग मोठा व्यापक बनतो. मात्र याला विज्ञान कादंबरी किंवा कथा संग्रह असे बिरूद लावले की सामान्य वाचक हातातील पुस्तक खाली ठेवतो. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे शालेय जीवनात मोठ्या प्रमाणात गणित आणि विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत असलेली नावड किंवा भीती आहे. अशी नावड होण्यामागे विज्ञान सुलभ आणि रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचणे हे आहे. विज्ञान कथा रंजक असतात आणि इतर कथा कादंबऱ्याप्रमाणे दहावीनंतर विज्ञानाचा अभ्यास न केलेल्या वाचकाचेही रंजन करू शकतात, असे अनेकांना विज्ञान साहित्याची प्रत्यक्षात चव न चाखणाऱ्या वाचकांना वाटत असते. जीएंच्या गुढकथा समजून घ्यायला तो तयार असतो, मात्र ‘राफिणू’ विज्ञान कादंबरी आहे, हे लक्षात येताच तो ती बाजूला ठेवतो. विज्ञान साहित्य लोकप्रिय करण्यामध्ये मराठी भाषेतील समिक्षकांनीही जो थोडाफार हातभार लावला आहे तो कथा आणि कादंबऱ्यांसाठीच. इतर लेखनाच्या वाटेला ते जाताना दिसत नाहीत.

इतर विज्ञान लेख्ननातही रंजकता असते. माहितीपर लेखनही ललितबंधापेक्षा कोठेही कमी असू शकत नाही, असे कदाचित मराठी साहित्यातील समिक्षकांना वाटत नसावे. त्यामुळे विज्ञान साहित्यात कथा, कादंबरी आणि काही प्रमाणात कविता येथपर्यंतच समीक्षक थांबतात. जरी विज्ञान साहित्यिकांना इतर साहित्यिकांप्रमाणे मान, सन्मान आणि धन मिळत नसले तरी अनेक विज्ञान लेखक तपस्व्याप्रमाणे या क्षेत्रात कार्य करत असतात. कदाचित त्यांना यातून आनंद मिळत असावा. म्हणूनच लेखन, त्यांची जिविका बनत असावे. यातील अशाच दोन प्रकारात, म्हणजेच विज्ञान कथा आणि कादंबरी लेखनातून आपली जिविका शोधत, इतरांना त्यांच्या जिविकेचे साधन उपलब्ध करून देणारे लेखक म्हणजे संजय ढोले.

तसे कथा किंवा कादंबरी लिहिणे माहितीपर लेखनापेक्षा निश्चितच आधिक वेळ घेणारे तसेच कौशल्याचे काम आहे. अनेकांच्या मनात कथेचे बीज येऊ शकते. येतेही. विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्यालाही असे कथाबीज सापडते. मात्र त्या बिजाला रूजण्यासाठी योग्य मशागत केलेल्या जमिनीत पेरणे, त्याच्या वाढीसाठी योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी देणे, तणापासून त्याचे संरक्षण करणे आवश्यक असते. त्यानंतरच त्या बिजाचे रूपांतर रोपात आणि नंतर झाडात होते. माहितीपर लेखनात संकल्पना समजणे आणि ती योग्य पद्धतीने लोकांना समजेल, अशा भाषेत मांडणे आवश्यक असते. या कौशल्यांची कथा लेखनासाठी गरज असतेच. मात्र त्याहीपेक्षा कल्पनाविस्तार करणे आणि संपूर्ण घटनाक्रम योग्य गुंफणे, हे आवश्यक असते. त्याखेरीज हे लेखन पूर्णत्वास जात नाही. या सर्व वैशिष्ट्यांचे दर्शन डॉ. संजय ढोले यांच्या लेखनामध्ये घडते.

संजय ढोले हे माझ्यापेक्षा जन्माने तीन वर्षांनी ज्येष्ठ आहेत. माझ्यानंतर कदाचित त्यांनी लेखनाला सुरुवात केली असावी. मात्र पुस्तक लेखनामध्ये त्यांची ज्येष्ठता १७ वर्षे भरते. मी वृत्तपत्रीय लेखन करत होतो, त्याच काळात त्यांच्या कथा नियतकालिकात प्रसिद्ध होत होत्या. या कथा वाचल्याही जात होत्या. मात्र तो काळ जयंत नारळीकरांच्यासारख्या वलयांकीत संशोधकाच्या कौतुकास्पद लेखनाने भारावलेला काळ होता. संजय ढोले सरांनी कोणाचे लक्ष आहे किंवा नाही याचा विचार न करता आपले लेखन सुरू ठेवले. हळूहळू त्यातील गुणवत्तेने एकेकाला त्यांच्याकडे, त्यांच्या लेखनातील गुणवत्तेने लक्ष देण्यास भाग पाडले. ते लिहित गेले आणि त्यातून ते लवकरच डझनभर पुस्तकांचे लेखक बनले. पंडित विद्यासागर, शंकर सारडा यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप त्यांची ऊर्जा बनली असावी आणि ते लिहित राहिले असावेत.

संजय ढोले यांचा विषय लौकिकार्थाने भौतिकशास्त्र आहे. अनेक भौतिकशास्त्राचे विद्यार्थी विज्ञानप्रसाराच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. भौतिकशास्त्राचा मनापासून अभ्यास करणाऱ्यांना कल्पनाविश्वात जाण्याची सवय लावून घ्यावीच लागते, तरच भौतिकशास्त्र खऱ्या अर्थाने समजून घेणे शक्य होते. कदाचित भौतिकशास्त्राचे जास्त अभ्यासक विज्ञान प्रसारकार्यात असण्यामागे हे एक कारण असावे. उदाहरणार्थ- पदार्थवानशास्त्राच्या विद्यार्थ्याला अणू, अणूतील इलेक्ट्रॉनच्या कक्षा, विद्युत धारा वाहत असताना इलेक्ट्रॉनचा विरूद्ध दिशेने जाणारा प्रवाह इत्यादी कल्पनेच्या विश्वात पहावे लागते. दुसरे एक कारण म्हणजे शालेय जीवनात ज्या ग्रह ताऱ्यांचे आकर्षण असते, त्यांचा अभ्यासही भौतिकशास्त्रातच होतो. विद्यार्थ्यांचे बहुतांश प्रश्न हे याच विषयांवर असतात. विद्यार्थ्यांच्या बालसुलभ प्रश्नांची उत्तरे देताना या विषयाचे अभ्यासक यामध्ये रममाण होत, पुढे या सवयीचे ते गुलाम होत असावेत. त्यामुळे विज्ञानप्रसार करण्याची त्यांना आवड निर्माण होत असावी.

असे असले तरी, संजय ढोले यांच्या लेखनामध्ये भौतिकशास्त्र विषयाची छाप आहे, असे झालेले नाही. त्यांचे लेखन विज्ञानातील सर्वच क्षेत्रात प्रभावी मुशाफिरी करताना दिसते. त्यांनी वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अंतराळविश्व, रसायनशास्त्र यामधील अनेक तत्वांना कथेमध्ये बांधलेले दिसून येते. यामध्ये अनेक पोलिस शोध कथांचा समावेश आहे. संशोधन, संशोधक, संशोधक विद्यार्थी हे सर्व येतेच. मात्र त्यासोबत समाजातील अनेक घटना प्रसंग, विविध क्षेत्रातील कार्यपद्धती या सर्वांचा समावेश होतो. डॉ. ढोले ज्या विषयाला हात घालतात, त्या क्षेत्रात ते कार्यरत असावेत, असे वाटते. अत्यंत साध्या, मृदू भाषेत त्यांचे लेखन ओघवत्या शैलीत पुढे सरकत राहते. या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या प्रेमाचा रेणू (२००७), अश्मजीव (२०१०), अंतराळातील मृत्यू (२०१५), संकरित (२०१५), डिंभक (२०२९), खुजाबा (२०२२), हे सहा कथासंग्रह आणि प्लँटोन (२०२२) आणि राफिणू (२०२३) या दोन कादंबऱ्यांचे वाचन झाले. यातील अनेक कथा पूर्वीच वाचल्या होत्या. मात्र त्या पुन्हा वाचताना पूर्वीचाच आनंद लाभला. हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकत आहे. वैज्ञानिक आशय, जो त्या कथेचा गाभा असतो, तो मांडत असताना, ते सूक्ष्मतिसुक्ष्म तपशिल बारकाईने देतात. त्यांच्या बहुतांश कथा दिर्घ आहेत. मात्र वाचकाला हा विस्तार जाणूनबुजून किंवा ओढूनताणून केला असे कोठेही वाटत नाही. यातच संजय ढोले यांच्यातील लेखकाचे सामर्थ्य सिद्ध होते.

काही कथा वाचताना खरंच असे घडू शकते का, असा प्रश्न पडतो. मात्र वाचकाचे आत्मसमाधान सकारात्मक उत्तरावर होते. विज्ञान कथा आकलनासाठी थोडी वैज्ञानिक पार्श्वभूमी असणे आवश्यक असते. मात्र अशा कथा क्वचित आहेत. बहुतांश कथा वाचताना त्यामध्ये निखळ वाचनानंद मिळत राहतो, त्याचसोबत विज्ञान विषयाचा अभ्यास न केलेल्यांना निदान असेही घडू शकते, या प्रश्नासोबत काही तास, काही दिवस विचार करायला भाग पाडते. त्यांनी एकाही कथेचा अतिशयोक्त केलेला नाही. तो मोह त्यांनी आवर्जून टाळला आहे. त्यांच्या लेखनाचे आकलन करून घेताना काही मुद्दे ठळकपणे लक्षात घ्यावे लागतात.

तपास कथा किंवा पोलिस कथा-

डॉ. संजय ढोले यांच्या लेखनामध्ये अनेक पोलिस कथा आहेत. या कथा वाचताना अरविंद इनामदार यांनी ‘दक्षता’ मासिकात लिहिलेल्या तपास कथा आठवाव्यात इतक्या त्या जिवंत झाल्या आहेत. पोलिस कथामध्ये केवळ गुन्हा आणि प्रश्नोत्तरे यांचा समावेश असून चालत नाही. गुन्ह्याचे ठिकाण, गुन्ह्यामागचे कारण, गुन्हेगाराची पार्श्वभूमी, त्याच्याशी निगडीत इतर पात्रे, त्यांचे तपशील व संवाद, या सर्वांचा समावेश होतो. याची तपशिलवार माहिती देण्यासाठी तुमचे निरीक्षण, आकलन आणि स्मरण या तिन्ही गोष्टींचा सुरेल संगम घडावा लागतो. अन्यथा वर्णनात सुसंगती आणि गेयता येत नाही. मात्र ढोले यांच्या कथांमध्ये हे सर्व काही दिसून येते. हे सर्व साध्य करत असताना वैज्ञानिक सूत्र, बीज ते खूबीने पेरतात किंवा मिसळतात. यातील अपहरण, आगंतुक, साक्षीदार (सर्व खुजाबा), अनामिक प्रयोग, चिरूट, आश्रय, आक्रोश, स्फोट (सर्व प्रेमाचा रेणू), सोनियाची खाण, पिंजक, सुगावा (सर्व डिंभक), मोहीम फत्ते, संकरित, विचारवहन (सर्व संकरित), निरपराध, कबुल जबाब, अस्त्र, न्याय (सर्व अश्मजीव) अशा पोलिस तपासकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथामध्ये असणारा गुन्ह्याचा, गुन्ह्याच्या जागेचा तपशील अगदी पोलिस तपासाप्रमाणे दिसून येतो. पोलिस कथांचा एक वाचक वर्ग आहे. त्यातही किशोरवयीन युवकांमध्ये पोलिस कथांचा वाचक असतोच. त्यामुळे युवकांमध्ये पोलिस कथांच्या माध्यमातून विज्ञानाची बीजे पेरणे, विज्ञानाची आवड निर्माण करणे अत्यंत सोपे होते. त्यामुळे पोलिस तपासाच्या माध्यमातून विज्ञानकथा लिहिणे हे डॉ. ढोले यांचे अभिनंदनीय कार्य आहे.

सर्व पोलिस कथांमध्ये ते गुन्ह्याची पूर्ण उकल झाल्याचे आवर्जून दाखवतात. यातून गुन्हा हा कधीच लपत नाही, हा संदेश वाचकाच्या मनावर कोरण्यात डॉ. ढोले यशस्वी होतात. अत्यंत हुशारीने केलेला गुन्हाही उघडकीस कसा येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘प्रेमाचा रेणू’ या कथासंग्रहातील ‘चिरूट’ ही कथा आहे. या कथेतील नायक डासांचा हल्ला घडवून खून करतो. मात्र तेथे सापडलेल्या एका चिरूटाच्या तुकड्यावरून पोलिस, शास्त्रज्ञ असणाऱ्या डॉ. किरण पाटील यांच्यापर्यंत पोहोचतात. हे वाचताना ही कथा एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या तोंडून ऐकल्याचा आनंद वाचकाला देण्यात ते यशस्वी होतात. त्याचप्रमाणे अनेकदा गुन्ह्याची चाहूल लागत असते. तो आवाज ओळखण्यात कमी पडणारा बळी जातो. आक्रोश’ या कथेत अशा प्रकारे धोक्याची चाहूल लागूनही डॉ. तुकाराम सावध होत नाहीत आणि त्यांचा बळी जातो. पोलिस कथासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींसह डॉ. ढोले विज्ञान कथा लिहितात. या सर्व वैशिष्ट्यामुळे डॉ. ढोले यांच्या कथा सर्व प्रकारच्या वाचकांना आवडाव्यात अशा आहेत.    

पात्र निवड आणि त्यांच्या नावातून जवळीक -

डॉ. संजय ढोले यांच्या बहुतांश कथांची सुरुवात महाराष्ट्रातील एखाद्या गावात, शहरात होते. कथातील बहुतांश पात्रांची नावे महाराष्ट्रीय आहेत. त्यातही बहुजन, अभिजन असा भेदभाव न करता, ते सर्वसमावेशकता राखतात. हे तत्व ते कथा आणि कादंबरी दोन्ही प्रकारच्या रचनामध्ये वापरतात. आजही अनेक विज्ञान कथा लेखक आपल्या पात्रांची नावे विदेशी ठेवताना आढळतात. अनेक कथांमध्ये परिसर, प्रयोगशाळा, संशोधन संस्था विदेशातील दाखवतात. त्यामुळे वाचकाला अशा कथा, कादंबऱ्या वाचत असताना, आपण कधीही न पाहिलेल्या परिसराशी एकरूप होणे कठीण जाते. डॉ. ढोले यांचे लेखन वाचताना मात्र खानदेशात कधीही न गेलेला वाचकही खानदेश शब्द वाचताच त्याच्याशी सहज जोडला जातो. निदान त्याने महाराष्ट्राच्या भूगोलात खानदेश कोठे आहे, हे समजून घेतलेले असते. या कथातील वातावरण हे वाचकांच्या आजूबाजूच्या परिसरासारखे असते. त्यामुळे वाचकाला कथेत प्रवेश करणे सोपे जाते. उदाहरणादाखल ‘राफिणू’ या कादंबरीमध्ये त्यांनी नायकाचे नाव राजू फिरके ठेवले आहे. त्याचा मामा किरण हाही वाचकाशी जोडला जातो. या कादंबरीतील कनसाई गाव, गावाचे केलेले वर्णन हे साधारणपणे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्याला लागू पडते. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र त्यामध्ये नियुक्त डॉक्टरची बेफिकीर वृत्ती, त्याचठिकाणी काम करणाऱ्या परिचारिकेचा सेवाभाव हे सर्व अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वातावरणाशी जुळणारे आहे.

या कादंबरीमध्ये शाळेचे केलेले वर्णन हे बहुतांश माध्यमिक शाळाना लागू पडते. शिक्षकांमध्ये दिलेला अभ्यासक्रम कसाबसा पूर्ण करणारे, थोडे प्रश्न विचारले तरी वैतागणारे काही शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये असतातच. अशा शिक्षकांनी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर राग काढणे, हे प्रत्येक वाचकाच्या परिचयाचे असते. अनेकांचा तो स्वानुभव असतो. संकटसमयी आपले कर्तव्य विसरणारे डॉक्टरही कोठे ना कोठे भेटलेले असतात. त्यामुळे वाचक कादंबरी वाचायला सुरुवात करताच कादंबरीतील वातावरणाशी जोडला जातो. स्वभावधर्म, परिसर, पात्रांची नावे, गावांची नावे सर्व काही परिचित असते. याच पद्धतीने ते ‘प्लँटोन’ या कादंबरीमध्ये किंवा सर्व कथासंग्रहामध्ये पात्र, परिसर रचना करतात.

धोक्याची जाणीव करून देणारे लेखन-

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून मानवाच्या मनात आपण निसर्गाचे एक घटक आहोत ही भावना नष्ट होऊन आपण या निसर्गाचे मालक असल्याची भावना वाढीस लागली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती आपल्याला हवी तेव्हा, हवी तशी वापरण्याकडे मानवाचा कल वाढत चालला आहे. डॉली नावाची पहिली मेंढी जन्माला घालण्यापूर्वी मानवाने निसर्गात किती हस्तक्षेप करावा, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. आजही वैज्ञानिक जगतामध्ये या विषयावर चर्चा होते, मात्र ती जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर मानवी सुखासाठी करण्याबद्दल ढोले सरांचा आक्षेप नाही, मात्र हा वापर अतिरेकी झाला तर त्याचे दूरगामी परिणाम होतात आणि ते दुरूस्त करणे अवघड किंवा अशक्य होते. त्यास अनुसरून कथेचा शेवट करणे समाजाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचे असते. त्याबाबत संजय ढोले दक्ष असतात. नेहमीच कथेमध्ये नायकाचा विजय दाखवणे वाचकाला आवडते. मात्र ढोले सरांनी निसर्गात हस्तक्षेप होऊन नैसर्गिक प्रक्रिया बदलली जाऊ शकते, अशा अनेक कथांमध्ये नायकांचे मरण दाखवले आहे. कदाचित यामुळे त्यांच्या कथांचा शेवट नकारात्मक असतो, अशी टिका काही लोक करतात. मात्र विज्ञान कथाकाराला हे भान राखणे खूप गरजेचे असते.

 मागील काही दिवसापासून इलान मस्क नावाचा एक धनाढ्य अशा प्रकारचा निसर्गात ढवळाढवळ करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. त्याचा एक प्रयोग आणि ढोले यांची एक कथा यामध्ये खूप जवळीक आढळून येते. त्याचा विस्ताराने उल्लेख करणे आवश्यक वाटते. प्रेमाचा रेणू या डॉ. ढोले यांच्या कथा संग्रहातील पहिलीच कथा ‘अनामिक प्रयोग’ ही आहे. या कथेमध्ये थोर संशोधक डॉ. परांजपे यांची हत्या यमाजी मालुसरे नावाची सामान्य व्यक्ती करते. अनेक लोकांनी हे पाहिलेले असते. मात्र तपासामध्ये मालुसरे यांने डॉ. परांजपे यांचा खून का केला असावा, हे पोलिसांना समजत नाही. गुन्ह्यामागचे कारण आढळत नाही. पुढे याचा तपास करताना मालुसरेच्या डोक्यात एक इलेक्ट्रोड बसवून त्याचा मेंदू बाहेरून नियंत्रीत करून डॉ. परांजपे यांचा खून घडवून आणल्याचे स्पष्ट होते. डॉ. परांजपे आपल्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठ ठरत असल्याने डॉ. काळदाते या त्यांच्याच सहकाऱ्याने हे हत्याकांड घडवून आणलेले असते. यामध्ये डॉ. काळदाते यांची पोलिस आधिकाऱ्याकडून हत्या होते.

या कथेमध्ये मालुसरेंच्या डोक्यात इलेक्ट्रोड बसवून मेंदूवर बाह्य नियंत्रण मिळवले आहे. ही त्यांची कथा २००७ साली प्रकाशीत झालेल्या कथा संग्रहात आहे. २०२३ मध्ये इलान मस्क यांनी काही माकडांच्या डोक्यात चीप बसवून त्यांच्या मेंदूवर नियंत्रण मिळवले. या माकडातील एक माकड संगणकावर टंकलेखन करताना, तर एक माकड संगणकावर खेळ खेळत होते. याचे व्हिडिओ बनवून ते प्रसृत करण्यात आले. यानंतर मी पुण्यनगरी दैनिकातील माझ्या सदरात ‘मस्कची माकडचेष्टा’ या शिर्षकाचा लेख २०२३ मध्ये लिहिला होता. यामध्ये मेंदूवर असे बाह्य नियंत्रण मिळवल्यास एखाद्या सुसंस्कृत सज्जन, पापभिरू मानवाच्या हातून खून घडवला जाऊ शकते, असे लिहिले होते. मस्क हे मात्र यामुळे अपघाताने एखादा अवयव निष्क्रीय झालेल्या मानवाच्या अपंगत्वावर यातून मात करता येईल, असे सांगत होते. मात्र ज्यावेळी माकडाचा मेंदू असा नियंत्रीत करता येणे शक्य होते, तेव्हा त्याचा चांगल्या आणि वाईट दोन्ही कारणासाठी उपयोग होऊ शकतोच. मस्क यांनी ज्या माकडांच्या डोक्यात चीप बसवली होती ती सर्व माकडे मरण पावली. त्यामुळे विज्ञान कथा लेखकांने एखाद्या विज्ञान तत्वाला धरून कथेची मांडणी करताना समाज भान ठेऊन कथेमध्ये नायकाचा प्रसंगी अंत दाखवणे, तो शोध नायकाबरोबर संपला, असा शेवट करणे, हे लेखकाचे सामाजिक भान जागे असल्याचे दाखवतात. डॉ. ढोले यांचे समग्र लेखन वाचत असताना, हे पदोपदी जाणवते. विज्ञान संकल्पनांची मानवी जीवनाशी सांगड घालताना ती सुसंगत, समाजव्यवस्था जपणारी, नैतिक मूल्ये जपणारी अशी ठेवण्याकडे डॉ. संजय ढोले यांचा कल दिसून येतो.

नकारात्मक नव्हे तर समाजभान जपणारे लेखन -

डॉ. ढोले यांच्या लेखनावर ते नकारात्मक असल्याचा अनेकजन आरोप करत असतात. मात्र त्यांचे विज्ञान कथा-कादंबरी लेखन हे कोठेही नकारात्मक नाही. वैज्ञानिक सत्य, सूत्र वाचकाच्या गळी उतरवाताना ते कथा किंवा कादंबरीचे गोड आवरण घेतात. यामध्ये कथा किंवा कादंबरी लेखन म्हटले की नायक येतो. नायकांने कोणतीही गोष्ट केली तर ती माफ, अशी एक समाजधारणा असते. मात्र निसर्गात अवाजवी हस्तक्षेप करणारी घटना, शोध कथेचे सूत्र असल्यास, किंवा नायक मानवहिताच्या समाजविरोधी कृत्यात सहभागी होत असल्याचे कथेमध्ये येत असल्यास ते प्रसंगी नायकाचा मृत्यू दाखवतात. ‘अघटीत’ ही अश्मजीव या कथासंग्रहातील कथा यादृष्टीने महत्त्वाची वाटते. प्रत्येकाला आपण अमर व्हावे, असे वाटते. कधी मरूच नये, असे वाटते. शास्त्रज्ञही याला अपवाद असण्याचे कारण नाही. डॉ. गजानन बारलिंगे हे मृत्यूनंतर जिवंत होण्याचे तंत्र शोधतात. ते अनेकांना असे जिवंत करतात. मात्र अशा पुन्हा जगू लागलेल्या या लोकांना जगण्याचा कंटाळा आला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या डॉ. सुशांत आणि संजिवनीला पुन्हा मरण येणारे तंत्र शोधण्याची जबाबदारी देतात. 

तसेच ‘खुजाबा’ या कथेमध्ये ते संशोधकाने तयार केलेला खुजाबाच निर्मात्याचा जीव घेताना दिसतो. ‘अंधार गुणिले अंधार’ कथेमध्ये सशक्त डिंभके दहशतवाद्याना विकणारे डॉ. खराटे आत्महत्या करतात. आक्रोश कथेमध्ये कोळ्यांचा वापर करून सशक्त धागे तयार करतात. मात्र तो प्रयोग अयशस्वी होतो. नंतर वनस्पतीवर प्रयोग करून ते धागे बनवतात. मात्र शेतातील फळे त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यात त्यांचे निधन होते. ‘प्रेमाचा रेणू या कथेमध्ये ते प्रेमभावना निर्माण करणारे रसायन शोधले जाते. त्याचा यशस्वी वापरही केला जातो. मात्र पुढे तेच सातत्य टिकवले जात नाही. त्या जोडप्याचा घटस्फोट होतो. 

त्यामुळे डॉ. ढोले यांचे लेखन नकारात्मक असल्याचे काही समिक्षकांचे असणारे मत बरोबर नाही. याउलट त्यांचे लेखन हे समाजहित पाहणारे, वाचकाला योग्य दृष्टी देणारे आहे. निसर्गात अवाजवी हस्तक्षेप करू नये. निसर्गाला त्याचे काम करू द्यावे, प्रसंगी मानवी हीत असणारी गोष्टही निसर्गासाठी घातक असेल तर ती टाळली गेली पाहिजे, असा संदेश देणे हे जागरूक लेखकाचे लक्षण आहे. कोळी, वटवाघूळ अशा कथांमध्ये ते प्राण्यांचा उपयोग मानवी हितासाठी करण्याचा प्रयत्न दाखवत असताना अखेर तो शोध समाजासमोर येणार नाही, याची दक्षता घेताना दिसतात, ते यामुळेच. त्याही पलिकडे त्यांच्या दोन्ही कादंबऱ्यांचा शेवट हा सुखान्त आहे.

कथांचे विषय-

डॉ. ढोले विज्ञानमय झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांना विज्ञानातील सर्व शाखा मान्य आहेत. अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय अभ्यासास प्राधान्य दिलेले आहे. संशोधन अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था बहुसंस्थीय संशोधन प्रकल्पानाच अर्थसहाय्य करू लागल्या आहेत. डॉ. ढोले यांचे संपूर्ण लेखन या विचारसरणीत चपखल बसते. त्यांनी विज्ञान कथांचे विषय निवडताना अंतराळ (अज्ञात, संकेत, अनाहुत, अद्भूत प्रवास, अंतराळातील मृत्यू, वलय, प्रतिघटना, पृथ्वीचा दूत, दुर्गम्य), भौतिकशास्त्र (अपहरण, खुजाबा, अनामिक प्रयोग, स्फोट, जिद्द, भविष्य, सोनियाची खाण, द डे आफ्टर, सुगावा, झेप, अविष्कार, अंधारातील तीर, मोहिम फत्ते, अस्तित्व, विचारवहन, महास्फोट, हुतात्मा), रसायनशास्त्र (प्रेमाचा रेणू, उध्वस्त) वनस्पतीशास्त्र (प्रतिशोध, उत्परिवर्तन, शापीत), प्राणीशास्त्र (चिरूट, आक्रोश, डिंभक, पिंजक, प्रक्षेपक, कोळिष्टक, मूषक, वटवाघूळ,) वैद्यकशास्त्र (आगंतुक, साक्षीदार, अपघात, अगम्य, शिखंडी, अंधार गुणिले अंधार, कलाटणी, कालचक्र, ठरते.

डॉ. ढोले यांचे कादंबरी लेखन

डॉ. ढोले यांच्या ‘राफिणू’ आणि ‘प्लँटोन’ या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या दोन्ही कादंबऱ्यांचा पैस, आकार सर्वकाही परस्परविरोधी आहे. राफिणू ही कादंबरी वाचत असताना फास्टर फेणेची आठवण आली. या कादंबरीमध्ये असणारा नायकही किशोरवयीन आहे. किशोरवयीन मुलगा राजू फिरके संकटकाळात कसे जबाबदारीने वागतो हे मांडण्यात आले आहे. या कादंबरीमध्ये कोरोना संकट घेतले आहे. यातून नुकतेच आपण गेलेलो आहोत. त्यामुळे परिस्थिती आपल्या परिचयाची आहे. यातील नायकास भेटलेली पात्रे ही समाजात वावरताना प्रत्येकाला भेटतात. त्यामुळे हे वर्णन, कादंबरी वाचकाला भिडते. काही शिक्षकांना गाव सोडून जावे वाटणे, डॉक्टरचे पळून जाणे, तेथे असलेल्या परिचारिकेने मानवतेची जाण ठेवून सेवा करणे, तिला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कल्पक राजूने वापरलेले ड्रोन युवकांना भावणारे आहे. पुढे परग्रहवासीय, त्यांनी लावलेला वनस्पतीचा कोरोना प्रतिबंधासाठीचा वापर, त्यांचे अनुकरण करणारे ग्रामस्थ आणि त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर राजूने त्याचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी मामाची आणि मामाने त्याच्या संशोधक मित्रांची घेतलेली मदत मुळात वाचनीय आहे.  

डॉ. ढोले यांची प्लँटोन ही दिर्घ कादंबरी आहे. यामध्ये वनस्पतीच्या स्मृतीपटलासंदर्भातील संशोधन आणि त्यातून होणारी अवैध वृक्षतोड या समस्येवर प्रकाश टाकलेला आहे. यातील नायक सोनवणे आहे की अमेरिका सोडून भारतात येऊन संशोधन करणारा त्यांचा मित्र असा प्रश्न पडतो. ओघवत्या भाषेत आलेल्या या कादंबरीत प्रेमकहाण्या आहेत. आदिवासींचे दु:ख आहे, त्यांच्यावरील अन्याय आहे, गैरप्रकारांना वाचा फोडणाऱ्या पत्रकाराची हत्या आहे, बेमुर्वत वागणारा राजकारणी, संस्कारानुरूप वागणारा मंत्र्यांचा मुलगा आहे, त्यांना साथ देणारे वनाधिकारी शिंदे आहेत. अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी संशोधनातून मार्ग शोधलेला दाखवला आहे. यातील नायकाला त्रास देणारे कसे अखेर पराभूत होतात, हे दाखवत कादंबरी संपते.

या दोन कादंबऱ्यामध्ये प्लँटोन ही ४६२ पानांची कादंबरी आहे. तीमध्ये समाजातील सर्व प्रकारच्या घटना आपणास भेटतात. तर राफिणू ही १२६ पानांची कादंबरी आहे. या कादंबरीतील घटना, पैस हा खूप छोटा आहे. किशोरवयीन मुलांनीही एका बैठकीत संपवावी, अशी तिची रचना आहे. प्लँटोन वाचताना मात्र आपणास वेळ काढून निवांतपणे ती समजून घ्यावी लागते. यातून डॉ. ढोले यांच्या सर्जनशिलतेच्या परिघाचा विस्तार किती मोठा आहे, हे लक्षात येते.

एकूणच डॉ. संजय ढोल यांचे लेखन हे शहरी बाजातून बाहेर पडलेले लेखन आहे. ग्रामीण जीवन जगणाऱ्या आणि जगलेल्या लोकांशीही नाळ जोडणारे असे हे लेखन आहे. मराठी विज्ञान साहित्याच्या प्रवाहात ग्रामीण भागाला जोडणारे पहिले सातत्यपूर्ण लेखन असल्याने त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात खळखळता ग्रामीण प्रवाह निर्माण केला आहे. डॉ. ढोले यांच्या लेखनाची वारंवारिता वाढत राहो. त्यांच्या हातून अशा अनेक कथा संग्रहाची निर्मिती व्हावी. ती वाचकांना वाचनानंद देत राहो. यासाठी त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!


संदर्भ –

१.     https://www.esakal.com/maharashtra/science-age-and-science-literature-tmb01

२.     मराठी विज्ञान साहित्याचा इतिहास, जयंत एरंडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, २०१८

३.     प्रेमाचा रेणू, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २००७

४.     अश्मजीव, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१०

५.     अंतराळातील मृत्यू, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१५

६.     संकरित, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१५

७.     डिंभक, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२९

८.     खुजाबा, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२२

९.     प्लँटोन, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२२

१०.  राफिणू, डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२३

-०-

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

बांधावरची झाडे : ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी .

 

मित्रहो , 

मागील दहा - बारा वर्षात झाडं वाचनाचे मला वेड लागले .  हे वेड एका कवितेने लावले.  मी झाडे वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो. प्रत्यक्ष झाडांच्या निरीक्षणात कित्येक तास घालवले. त्यातून मिळालेला आनंद अलौकिक आहे. तसेच या झाडावरील माहिती मिळवण्याचा,  वाचण्याचा आनंद घेत राहिलो. मला हे लिहावेसे वाटले. ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सरांचे नेमकं कौतुक पहिल्या लेखाला मुराळीत बहावावरील लेख छापल्याने समजलं. पुढे विविध झाडावर लिहीत राहिलो. त्याला आपण उदंड प्रतिसाद दिला. बाभळीवरील लेख चार हजारपेक्षा जास्त वाचकांनी वाचला. त्यावर प्रतिक्रिया दिल्या. सुधीर जोगळेकर सरानी सर्वप्रथम या लेखांचे पुस्तक करावे आणि तेही मनोविकासने असा आग्रह धरला. मात्र मीच थोडा उशीर करत होतो.  

अखेर त्यातील बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ, आणि साग या दहा झाडावरील लेखांचे संकलन ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी बांधावरची झाडे  या पुस्तकाच्या रूपात मनोविकास प्रकाशनाने वाचकांना उपलब्ध करून दिले आहे . 

हे पुस्तक मला झाड वाचायला शिकवणाऱ्या वसंत आबाजी डहाके यांच्या ‘चित्रलिपी’ या संग्रहातील ‘झाड’ या कवितेस अर्पण केले आहे.

या पुस्तकाची पाठराखण ज्येष्ठ समिक्षक आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. रणधीर शिंदे सरांनी केली आहे. पुस्तकासाठी ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तसेच ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रसारक श्री.द. महाजन आणि मधूकर बाचुळकर यांनी प्रतिक्र‍िया दिल्या आहेत. आपणास हे पुस्तक खालील लिंकवर भेट देऊन खरेदी करता येईल्…

https://manovikasprakashan.com/Bandhavarachi_Zade


पाठराखण

    डॉ. व्ही. एन. शिंदे यांचा झाडांविषयीचा हा वैशिष्ट्यपूर्ण असा ललित लेखसंग्रह. बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडूलिंब, बाभूळ, साग या झाडांविषयीच्या ज्ञानललितमाहितीच्या या दशकथा आहेत. बांधावरील झाडांच्या परिचित-अपरिचित कथा त्यांनी सांगितल्या आहेत.

    डॉ. शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञानललित बंध आहे. झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबर त्यांचा व्याप्ती-पसारा, भूगोल, भाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे. त्यामुळे त्यास वस्तुनिष्ठ वैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यासाठी त्यांनी विविध ज्ञानशाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतला आहे. झाडांचा अधिवास व परिसरविज्ञानांविषयीचे हे कथन आहे. त्यात शेतीज्ञानाबरोबर वनस्पतिविज्ञान आहे. त्या त्या झाडांची व्यावहारिक उपयोगिता सांगितली आहे. शिंदे यांच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण विशेष म्हणजे झाडसृष्टीचे मानवनिर्म‍ित बांधकामाचे कथन. माणूस आपल्या कल्पनानिरीक्षणाने सृष्टीवाचन करत त्यास तो मानवी रंगरूप देत आला आहे. डॉ. शिंदे यांच्या लेखनात मानवाने आदिकाळापासून झाडांविषयीचे रचलेले विहंगदर्शन आहे. लोककथा, गाणी, दंतकथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाडदर्शने आहेत. लोक व लिखित परंपरेच्या झाडवाचनाचा त्यात धांडोळा आहे. एका अर्थाने मराठी संस्कृतीचे बांधावरील झाडांचे हे बिलोरी रंगछायादर्शन आहे. बीजांकुरापासून झाडांच्या सळसळण्याच्या या बहर सुफळ कथा आहेत. तसेच डॉ. शिंदे यांच्या या झाडवाचनाला लेखकाच्या आत्मपरतेचे गहिरे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बांधावरील हे झाडमायादर्शन मनोहारी ठरेल.      

               
-    डॉ. रणधीर शिंदे


गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

शिकायला शिकवणारे : आर.एन. पाटील सर

                                                                                                शिक्षक दिन विशेष -६ 


    सरांनी किती पुस्तके वाचली त्यांनाच माहीत. कदाचित त्यांच्याही लक्षात नसेल. मात्र सर बोलताना प्रकांड पंडिताचे भाष्य ऐकत असल्याची जाणीव व्हायची. सरांचे भौतिकशास्त्रावरचे भाष्य विषयाची भिती दूर घालवायचे. एकदा कुलगुरू रजेवर गेले असताना त्यांच्याकडे कुलगुरू पदाचा कार्यभार आला होता. ते स्वत: सहज एखाद्या विद्यापीठात कुलगुरू झाले असते. मात्र कधी सरानी त्या पदाची अपेक्षा ठेवली, प्रयत्न केले असे आठवत नाही. मात्र शिक्षक म्हणून सतत विद्यार्थी घडवत राहिले. शिकवत राहिले…मुलांना स्वत:ला शिकायला… असे माझे गुरू आर.एन. पाटील सरांविषयी....
_________________________________________________________

‘न केलेल्या पापाचे माप’ अनेकांच्या पदरात पडत असते. चूक केलेली नसताना जेव्हा असे काही घडते, तेव्हा ती शिक्षा भोगणाराच्या मनावर मोठा आघात होत असतो. विद्यार्थी दशेत तर हा आघात खूपच मोठा असतो. अनेक विद्यार्थी हा आघात सहन न होऊन आत्महत्येस प्रवृत्त होतात. अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत असते. मात्र जर चांगले शिक्षक असतील तर ते खरा चूक करणारा शोधून काढतात. निरपराधावर अन्याय होऊ देत नाहीत. ते भाग्य विल्यम राँटजन यांच्या वाट्याला आले नाही. १८६२ मध्ये विल्यम राँटजेन नावाचा एक विद्यार्थी युट्रेच टेक्निकल स्कूलमध्ये शिकत होता. तो त्याच शाळेतील गिनिंग नावाच्या शिक्षकाच्या घरी राहात होता. गिनिंग रसायनशास्त्र शिकवत, संशोधन करत. त्यांच्यामुळेच विल्यम यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली होती. विल्यम यांच्या वर्गात जशी हुशार मुले होती तशीच काही आडदांड, गुंड प्रवृत्तीची मुले होती. या मुलातील एका मुलाने वर्गात दोन तासांच्या मध्ये शिक्षक यायला जो वेळ लागतो, त्या वेळेत पुढच्या तासाला येणाऱ्या शिक्षकाचे कार्टून काढले. चित्र काढणारा मुलगा आपल्या जागेवर बसला. मात्र शिक्षक वर्गात येत असताना विल्यम बाहेरून वर्गात येत होता.

शिक्षक जेव्हा दरवाज्यातून आत येत होते, नेमके तेव्हा विल्यम फळ्याच्या अगदी जवळ होते. शिक्षकांनी फळ्यावरील आपले काढलेले चित्र पाहिले आणि त्यांचा पारा चढला. त्यांना विल्यमवर संशय आला. ते साहजिकही होते. त्यांनी विल्यमला, आपण चित्र काढल्याचे कबूल करावयास सांगितले. मात्र विल्यम यांनी आपण चित्र काढले नसल्याचे सांगितले. ‘तू काढले नाहीस, तर कोणी काढले, ते सांग’, असे विचारले. विल्यम यांनी आपण चित्र काढले नसल्याचेच वारंवार सांगितले. विल्यम चित्र काढले असल्याचे कबूल करत नाहीत आणि कोणी काढले हे सांगतही नसल्याचे पाहून सरांचा पारा आणखी चढला. अखेर विल्यम यांना मुख्याध्यापकाकडे नेण्यात आले. मात्र विल्यम यांचे उत्तर तेच होते. जर त्यांनी चित्र काढणाऱ्या मुलाचे नाव सांगितले असते, तर बेदम मारहाणीची, भांडणाची भिती होती. वर्गातील अनेक मुलांनी ते चित्र कोणी काढले आहे, ते पाहिले होते. मात्र तेही विल्यम यांच्या बाजूने बोलायला तयार नव्हते. विल्यम यांनी काढले नाही, असेही कोणी सांगू शकत नव्हते. कारण त्यांनी काढले नाही असे सांगितले तर, कोणी काढले ते सांग असा प्रश्न आला असता. शेवटी चित्र काढल्याचा आरोप विल्यम राँटजन यांच्यावर निश्चित करण्यात आला आणि त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

आपण दोषी नसताना, आपल्याला शाळेतून काढून टाकल्याची खंत विल्यम यांच्या मनात होती. मात्र विल्यम यांनी तो आघात पचवला. शिक्षणाची कास सोडली नाही. त्यांनी बाहेरून अभ्यास करून युट्रेच विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली. उत्तम गुणांनी ते ती परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रत्यक्षात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन विद्यार्थ्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे हे तपासले जात असे. या मुलाखतीसाठी विल्यम मुलाखत कक्षात गेले. तर मुलाखत घेणाऱ्यामध्ये ज्या शिक्षकाचे चित्र काढण्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना शाळा सोडावी लागली होती, तेच शिक्षक मुलाखत घ्यायला होते. अर्थातच विल्यम यांना प्रवेश नाकारण्यात आला. अखेर नव्याने सुरू झालेल्या झुरीच विद्यापीठात विल्यम यांनी प्रवेश घेतला, खूप अभ्यास केला. त्यांचे संशोधन समस्त मानवजातीला वरदान मानले जाते. त्यांनी क्ष-किरण शोधले आणि आपले नाव विज्ञान जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यास भाग पाडले.

…विल्यम राँटजन यांच्या चरित्रातील हा भाग वाचताना, मला माझे विद्यार्थी जीवन आठवले आणि वाटू लागले, ‘माझे नशीब चांगले, मला राँटजनच्या शिक्षकांसारखे शिक्षक नाही मिळाले. नाहीतर माझे शिक्षण तेथेच थांबले असते. माझ्याही आयुष्यात न केलेल्या चूकीचे फळ भोगण्याची वेळ आली होती. त्यावेळी पदार्थविज्ञानशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असेच वागले असते, तर माझे काय झाले असते. मी शिक्षणाच्या प्रवाहातून कदाचित बाहेर पडलो असतो. इतर एखाद्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलीही असती. मात्र भौतिकशास्त्र विषयात शिक्षण घेतले नसते. त्याचं झाले असे होते की…

    मी भौतिकशास्त्र विषयातील एम.एस्सी. अभ्यासक्रमाला शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन तीन-चार महिने उलटले होते. दयानंद महाविद्यालयातून मला एकट्यालाच प्रवेश मिहाला होता. मी दयानंद महाविद्यालयाचे संस्कार घेऊन आलो होतो. यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ यायन्स सातारा, मुधोजी कॉलेज फलटण यांच्यापेक्षाही जास्त दरारा दयानंदमधून येणाऱ्या मुलांचा होता. अस्मादिकांच्या स्वभावामुळे सर्वांशी परिचय लगेच झाला होता. दयानंदमध्ये झालेल्या संस्कारामुळे कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास अगोदर सुरू केला होता. स्वत:च्या नोटस काढायला सुरुवातही केली होती. ग्रंथालयातील पुस्तकांची सातत्याने मी देवघेव करत होतो. सांस्कृतिक स्पर्धांपासून फारकत घेऊन मी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले होते. दिवस तसे मजेत आणि भविष्याच्यादृष्टिने चांगले चाललेले होते.

अशात एक दिवस आमच्या वर्गाच्या प्रमुखानी बोलावून घेतले आणि सांगितले, ‘स्पेक्ट्रोस्कोपीचे पुस्तक तुम्ही घेतले होते का?मी लगेच ‘हो’ म्हटलो. सरांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. मी म्हटलं, ‘काय झाले? सर’. सरांनी सारवासारव केली आणि म्हणाले, ‘तुम्ही विभागप्रमुखांना भेटा.’ मला नेमके काय झाले आहे लक्षात येत नव्हते. सरांनी फक्त पुस्तक घेतले होते का असे का विचारले असावे, या प्रश्नाने विचारांचे काहूर उठले होते. मनात भिती होती, काय झाले असावे, उत्तर मिळत नव्हते. अखेर विभागप्रमुखांना भेटायला गेलो.

पदार्थविज्ञानशास्त्र अधिविभागाचे त्यावेळी प्रमुख होते, प्रा. आर.एन. पाटील सर. उंच, धिप्पाड, गोरे, अगदी कोणीही पाहिले तरी त्याच्या मनात आदरयुक्त भिती निर्माण व्हावी. सरांच्या ज्ञानाबद्दल मनात एक संकल्पना तयार झाली होती. आम्ही त्यांच्या कक्षात कधीच गेलो नव्हतो. मात्र खिडकीतून कधीकधी डोकावयाचो. ते कायम एखाद्या पुस्तकातील मजकूर वाचत असायचे. त्यांना असे वाचत बसलेले किंवा क्वचित सहकाऱ्यांशी कायम चर्चा करत प्रवेशद्वाराजवळ उभा असलेले आम्ही पाहिले होते. आज अज्ञात कारणासाठी मला त्यांच्याकडे जावे लागणार होते. मनातील भितीने पोटात गोळा आणला होता. मात्र त्यांचयाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

मी मनातून घाबरलेल्या अवस्थेतच सरांच्या कक्षाच्या दरवाज्याजवळ गेलो. कोर्ट यार्डच्या कडेने गेले की पुढच्या बाजूला जिन्याच्या कडेला पहिल्यांदा ऑफिस आणि त्याच्या शेजारी सॉलिड स्टेट फिजिक्स, मटेरियल सायन्स प्रयोगशाळेशेजारी सर बसलेले असायचे. आजही विभागप्रमुखांची तीच खोली  आहे. ‘मे आय कम इन सर,’ विचारले. आत वाचत बसलेले सर, ‘या’ म्हणाले. आत गेलो. सरांच्यापुढे नेहमीप्रमाणे पुस्तक होतेच. मात्र शेजारीच स्पेक्ट्रोस्कोपीचे, त्याच लेखकाचे पुस्तक होते. मी उभाच होतो. सरांनी स्पेक्ट्रोस्कोपीचे ‘ॲटोमिक अँड मोलॅक्युलर स्पेट्रोस्कोपी’चे पुस्तक उचलले. काही पाने चाळली. मला जवळ बोलावले. पुस्तकातील एक पान दाखवत मला विचारले. ‘हे कोणी लिहिले’. मी अक्षर बारकाईने निरखून पाहिले. ते अक्षर सुंदर होते यात शंकाच नव्हती. मात्र ते माझे नव्हते. माझेही अक्षर सुंदर असल्यामुळेच माझ्यावर आरोप आला होता. अक्षर सुंदर आहे, हाच मोठा अपराध ठरला होता.

मला ते सर्व पाहून धक्का बसला. मूळात ज्या रंगाच्या शाईमध्ये लिहिले गेले होते, तशा प्रकारची शाई मी ‘अक्षरमंच’ची सजावट करण्यासाठीही वापरली नव्हती. आमच्याच वर्गातील दोन मुलींबद्दल तो मजकूर होता, त्यामुळे आपोआपच ती बाब गंभीर बनली होते. ज्या प्रकारे लिहिले होते, ते माझे हस्ताक्षर नाही हे मी स्पष्ट सांगू शकत होतो. मात्र ते कोणीच मान्य करणार नव्हते. सर मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तटस्थतेचे भाव होते. त्यांनी मला स्पष्टच सांगितले, ‘हे पहा शिंदे, तुम्हीच ते लिहिले आहे असं त्या मुलींपैकी एका मुलीचे मत आहे. आता जबाबदारी तुमची आहे. तुम्ही लिहिलेले नाही, हे तुम्हीच सिद्ध करायचे आहे. जास्तीत जास्त आठ दिवसात, नाही तर तुमचा प्रवेश रद्द होईल.’ मी अगदी काकुळतीला येऊन म्हटले, ‘सर हे मी लिहिलेले नाही, शप्पथ, माझं हे अक्षर नाही. पण मी कसं सिद्ध करायचं, की मी ते लिहिलेले नाही.’ सरांनी सांगितले, ‘ते तुम्ही बघा. नाहीतर आठ दिवसानी तुम्ही रस्टिकेट व्हाल.’ कानात कोणीतरी शिशाचा रस ओतावा असे होत होते. माझा चेहरा पडला. ती बाब इतकी भयंकर होती की माझा प्रवेश रद्द झाल्याची स्वप्न पडू लागली. मी दयानंदमध्ये माझे जर्नल जपून ठेवले होते, माझा प्रवेश रद्द झाला तर मला दयानंद महाविद्यालयात मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. धायगुडे सर, मॅडम यांचा मानसपुत्र सर्वजन समजत. या कारणाने माझा प्रवेश रद्द झाला तर माझ्यामुळे त्यांनाही त्रास होणार होता.

पुढचे दोन-तीन दिवस मी विमनस्क अवस्थेत वर्गात जात होतो. काहीजनाना ते समजले होते, म्हणजे सर्वांना समजल्यातच जमा होते. माझ्याकडे काहीजनानी तिरस्कारयुक्त नजरा टाकायला सुरुवात केली होती. काहीजन, ‘शिंदे असा असेल वाटत नव्हतं,’ अशा अविर्भावात पहात असायचे. मधुकर पाटील नावाचा जळगावकडचा विद्यार्थी आणि तानाजी मानेच माझ्याशी नीट वागत होते. नेमके त्यांना माहीत होते की नव्हते, माहीत नाही. कदाचित मी भितीने तसा विचार करत असेन. माहीत नाही. असाच एकेक दिवस जात होता. चार-पाच दिवसानी परत पाटील सर बाहेर जाताना दिसले. त्यांनीच मला बोलावले. मला म्हणाले, ‘तुम्ही लिहिलेले नाही हे मला पटते. मात्र ते तुम्हालाच पहावे लागेल. तुम्ही सर्वांची अक्षरे पाहिली का?असा शेवटी प्रश्न केला. मी ‘नाही’ म्हटले. मात्र त्या प्रश्नाने माझ्या मनात एक कल्पना आली. मी परत फिरलो. आमच्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले दोन शिक्षक होते. त्यापैकी एका सरांच्या केबीनमध्ये परवानगी विचारत चक्क घुसलोच. सर काहीतरी तपासत बसले होते. मी घाईघाईत म्हणालो, ‘सर मला सर्व विद्यार्थ्यांच्या असाईनमेंट पाहिजेत.’ हा खरं तर परीक्षेचा भाग होता. सर किती सहकार्य देणार माहीत नव्हते. सरांना हा सर्व प्रकार माहीत होता. त्यांनी पहिल्यांदा नकार दिला. मात्र मी जेव्हा तुम्ही सहकार्य केले नाही तर माझी काहीच चूक नसताना माझा प्रवेश रद्द होईल. माझे शिक्षण थांबेल हे सांगितले, तेव्हा त्यांनी टेबलच्या खालच्या खणातून एक गठ्ठा काढून दिला. त्यामध्ये आमच्या वर्गातील सर्व सदतीस मुलांच्या असाईनमेंट होत्या. सर असाईनमेंटबाबत खूपच कडक असल्याने प्रत्येकाने आपल्या हस्ताक्षरातच लिहिल्या होत्या.

प्रत्येकाचे हस्ताक्षर पहात पुढे चाळत होतो. सहा सात असाईनमेंट तपासताच आलेल्या शाईच्या रंगाने माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तोच शाईचा रंग, एम. आणि एन. ही अक्षरे इंग्रजीतून लिहिताना पहिल्या उभ्या रेषेला दिलेला तोच बाक. मी एकदम ‘सापडले’ असे म्हटलो. आर्किमिडीजला एखादी वस्तू द्रवात बुडवल्यावर त्याच्या आकारमानाइतका द्रव विस्थापित होतो. हा शोध लागल्यावर तो आंघोळ करता-करता तसाच पळत सुटला होता म्हणे. त्याला जितका आनंद झाला असेल, त्याच्यापेक्षाही जास्त मला आनंद झाला होता. आता मी सिद्ध करू शकत होतो की ते घाणेरडे कृत्य मी केलेले नाही. मात्र तोपर्यंत सात वाजत आलेले होते. मात्र डोक्यावरचे सगळे टेंशन गेले होते. 

    पाटील सर विभागात नव्हते. त्यांना कधी एकदा मी हे सर्व सांगेन असे झाले होते. सर विद्यापीठ परिसरातच मुलींच्या वसतीगृहाच्या शेजारच्या (आजचे लोकविकास केंद्र) प्राध्यापक निवाससानात राहायचे. मात्र माझे एकट्याने त्यांच्या घरी जायचे धाडस होत नव्हते. मधूकरला बरोबर घ्यायला हवे असे वाटले. मधुकर जळगावकडचा असल्याने, तो पाटील सरांचा गाववाला असे सर्व वर्गाचे मत होते आणि माझे आणि त्याचे चांगले जमायचेही. त्यासाठी त्याला होस्टेलवरच गाठायचे म्हणून पटपट होस्टेलवर आलो. तोपर्यंत पोटातील कावळ्यांची कावकाव चांगलीच सुरू झाली होती. टेंशनने बांधून ठेवलेले कावळेपण आज मोकळे झाले असावेत. सकाळी साडेनऊला पोटात अन्न ढकलले होते. मेसचे जेवण जास्त खाऊ वाटत नसायचे, मात्र आज मनापासून जेवावेसे वाटत होते. आमच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांनी मेसबाबत केलेल्या आंदोलनामुळे होस्टेलला मेस नव्हत्या. मी आणि लउळचा राजा तीन नंबर होस्टेलच्या रूम नंबर ४१ मध्ये राहायचो. सायबर चौकातील आवटी मावशीच्या मेसला मी जेवायला जायचो. तर तानाजी माने आणि मधूकर पाटील तिथेच दुसऱ्या मेसला जेवायचे. मी मधूकर पाटलाला होस्टेलवर गाठायचे ठरवले. मात्र तो आणि तानाजी माने लवकर गेले होते. दोघे अनेकदा राजारामपुरीत जनता बझारपर्यंत पायगाडीने जात आणि येताना जेवण करून येत. मी आठच्या दरम्यान जायचो. आज भूक लागल्याची जाणीव लवकर झाली. मीपण लगेच जेवायला निघालो. मी मेसवर गेलो, तेव्हा ते दोघे आलेले नव्हते. त्यामुळे मी निर्धास्त झालो. मी घाईघाईने जेवण आटोपले आणि त्यांची वाट पहात चौकात थांबलो. ते दोघे जेवून येताच मधूकरला हातानेच खुणावले. त्याला ‘आपल्याला पाटील सरांच्या घरी जायचे आहे’ असे सांगितले. त्यांने ‘का’ असे विचारताच ‘आल्यावर सांगतो. लवकर जेऊन ये’ असे सांगून मी तिथेच वाट पहात उभा राहिलो. मिनिट मिनिट तासासारखा वाटत होता. घड्याळ त्याच वेगाने चालत होते, मात्र आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची मला साक्ष पटत होती. प्रेयसीची वाट पहाताना पाच मिनिटेही तास वाटतात, तर ती सोबत असताना तास गेला तरी पाच मिनिटेच झाली असे वाटतात. मलाही ही प्रतिक्षा असह्य होत होती. वेळ पटकन जात नाही म्हणतात, ते अनुभवत होतो.

अखेर ते दोघे जेवण करून आले. आम्ही तिघे गप्पा मारत क्रीडासंकूल ओलांडून ॲम्पिथिएटरपर्यंत आलो. भवनच्या शेजारचा चढ चढताना मी तानाजीला सांगितले, ‘आम्ही पाटील सरांकडे चाललो आहोत. तू येणार का?’ त्याच्याकडून अपेक्षित ‘नाही’ हे उत्तर आले. मी आणि मधूकर तसेच मग हेल्थ सेंटरवरून पुढे आलो आणि लेडिज होस्टेलच्या मार्गावर आलो. कोपऱ्यावर पाटील सरांचे घर आले. जाताना रस्त्यात मधूकरने कशासाठी भेटायचे, हे विचारून घेतले होते. घराच्या गेटजवळ आल्यानंतर माझी थोडी धडधड वाढली होती. सर घरात येऊ देतील का, नीट बोलतील का, असे अनेक प्रश्न होते. मधूकरने गेट उघडले. दोघे आत गेलो. मी दरवाज्याबाहेरच उभा राहिलो होतो. मधूकरने आम्ही दोघे आल्याचे सांगितले आणि सरांनी बाहेर येऊन मलाही आत बोलावले.

आत गेल्यानंतर बसायला लावले. कसे काय आलात हे विचारले. मी अक्षर कोणाचे हे सापडल्याचे पटकन सांगून टाकले. मी ते लिहिणाऱ्यापर्यंत कसा पोहोचलो तेही सांगितले. तुम्ही उद्या कोणाकडूनही त्या उत्तरपत्रिका मागवून पहा. ते अक्षर आणि शाई माझी नाही. ती कोणाची आहे, हे सांगायचे धाडस केले नाही कारण मधूकरचे त्याच्याशीही चांगले जमायचे. सर म्हणाले, ‘बरं झाले सापडले ते. तुम्ही लिहिलेले नाही हे कळत होते. मात्र नाईलाज होता’. असे म्हणून त्यांनी विषय संपवला. पुढे अभ्यासाविषयी बोलत राहिले. गप्पा रंगात आलेल्या असताना ‘मॅडम दवाखान्यातून आल्या. त्या डॉक्टर होत्या तसेच मुलींच्या वसतीगृहाच्या प्रमुखही होत्या. त्यांचे विजय बेकरीच्या इमारतीत ओपीडी होती. मग नको म्हणत असतानाही चहा झाला आणि त्यानंतर आम्ही निर्धास्त मनाने निघालो. अनेक दिवसानंतर मी आज शांत झोपणार होतो. डोक्यावरचे संपूर्ण टेंशन नाहीसे झाले होते. आता माझा प्रवेश रद्द होणार नव्हता. सरांच्या ‘सर्वांची अक्षरे तपासली का? या एका प्रश्नाने मला माझ्यासमोरील संकटाची किल्ली मिळाली होती. सर्वांची अक्षरे कोठे मिळतील याबाबतची कल्पना मला त्यानंतर आली होती. दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी मला निर्दोष मानले होते आणि आठ दिवसाची मदत दिली होती. मी बोललो नाही तरी सर स्वत:हून माझ्याशी बोलत होते. सरांनी नंतर त्याची खातरजमा केली. त्या विद्यार्थ्याचे नाव मला आणि सरांनाच समजले. नंतर एकदा सरांशी बोलताना, ‘माझा प्रवेश रद्द करणार होता, सर मग त्या विद्यार्थ्यांवर का कारवाई केली नाही’, असे विचारले. सरांनी सांगितले, ‘मुलींचा गैरसमज दूर झाला. तुम्ही लिहिलेले नाही, हे त्यांना पटलयं. मी ज्याने लिहिले, त्याला समज दिली आहे. तो दलित समाजातील आहे. त्याच्या घरातील तो पहिलाच शिकणारा आहे. त्याच्या एका चूकीमुळे शिक्षणाची त्याच्या दारात पोहोचलेली गंगा आटेल. तेव्हा त्याला एकवेळ माफ केले आहे. या वयात चूका होतात. तो पुन्हा चूक करणार नाही. तुम्हीही हा प्रसंग विसरून वर्गात मिसळून रहा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा.’ असे सांगितले. वर्गातील वातावरण खरेच बदलले. आम्ही खूप आनंदाने पुढील दोन वर्षे घालवली. सरांनी नेमके काय केले माहीत नाही, मात्र या घटनेचा उल्लेख कोणाकडूनच झाला नाही.

असे हे प्रा.रामकृष्ण नेमा पाटी सर. मी १९८९ च्या जुलैमध्ये पदार्थविज्ञानशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख होते. उंच, धिप्पाड, गोरेपान असे पाटील सर चालतच विभागात यायचे. पाचशेक मीटर अंतरावर राहायचे. त्यांच्याकडे स्कूटर होती. मात्र गावात जातानाच तिचा वापर व्हायचा. सर खूप सावकाश पावले टाकत चालत. आपल्याच विचारात ते चालत येताना पाहिले तरी त्यांच्या विद्वत्तेची कल्पना यायची. आम्हाला त्यांनी तसे शिकवले नाही. मात्र पदवी परीक्षेत मिळालेल्या भरपूर गुणांमुळे आमच्या वर्गाची चर्चा विद्यापीठातील भौतिकशास्त्र जगतात सर्वत्र होती. त्यामुळे आमची सेमिनार त्यांनी स्वत: घ्यायची असे ठरवले होते. दर शनिवारी ते आमचे प्रॅक्टिकल संपले की प्रयोगशाळेत सर्व विद्यार्थ्सांना १२ वाजता बोलावत आणि आमच्यातील कोणीतरी दोघे सेमिनार देत. त्यावेळी त्यांनी विचारलेले प्रश्न आमच्यासाठी गुगली असायचे आणि बहुतेकांची बहुतेकवेळा विकेट पडायची. या संपूर्ण प्रक्रियेत एखाद्या विषयाचे आकलन करून घेण्यासाठी त्या विषयाचा विचार कसा करावा याचे आम्हाला जणू प्रशिक्षण मिळत होते. त्यावेळी नोटस कशा काढाव्यात, कोणत्या पुस्तकात सेमिनारचा टॉपिक चांगला दिला आहे, हे कोणतेही पुस्तक हातात नसताना ते सांगायचे. त्या काळात विषय आकलनाचे झालेले प्रशिक्षण मला वाचनातून लेखनापर्यंत नेताना महत्त्वाचे ठरले अशी माझी नम्र भावना आहे. नाहीतर भौतिकशास्त्राच्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्याला वनस्पती लेखनापर्यंत जाता आले नसते.


आमचा प्रवेश झाला तेव्हा विभागात सॉलिड स्टेट फिजिक्स, मटेरियल सायन्स, स्पेक्ट्रोस्कोपी, एनर्जी स्टडीज आणि थिअरॉटिकल फिजिक्स या पाच विषयात अध्यापनाची सुविधा होती. मात्र कमी विद्यार्थी प्रवेशीत झाल्याने त्यातील सॉलिड स्टेट फिजिक्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा असायचा. मलाही तेच स्पेशलायझेशन घ्यायचे होते. मात्र अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत खूपच जास्त गुण दिल्याने गुणवत्ता यादीत आम्ही खूप खाली होतो. मला थिअरॉटिकल फिजिक्स् किंवा स्पेक्ट्रोस्कोपी मिळाले असते. सरांना जाऊन आम्ही बी.एस्सीच्या मार्कावर दुसऱ्या वर्षाचे स्पेशलायझेशन हा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले. यावर सरांनी ‘हा नियम असल्याचे आणि तो बदलायचा असेल तर कुलगुरुना तुम्हीच भेटून विनंती करावी लागेल’, असे सांगितले. त्यांच्या सांगण्यात संपूर्ण प्रक्रिया होती. आम्ही कुलगुरूना भेटून विनंती करायची आहे, हे सांगणे होते, शिकवण होती. आम्ही तत्कालिन कुलगुरू प्रा. के.बी. पोवार सरांना भेटलो. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सर्व शांतपणे ऐकून घेतले. पी.जी. प्रवेश विभागाचे त्यावेळचे उपकुलसचिव जाधव यांना बोलावून घेतले. विद्या परिषदेसमोर विषय ठेवून त्यास मान्यताही घेतली. आमच्या बॅचपासून एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षाच्या गुणावर स्पेशलायझेशन ठरू लागले.

माझे एम.एस्सी. शिक्षण संपले. सरांनी बोलावून पुढे काय करणार विचारले. मी पीएच.डी. करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी हमखास फेलोशिप मिळवून देणारे मार्गदर्शक फक्त एस.एच. पवार होते. मी त्यांच्याकडे पीएच.डी. करायचा विचार बोलून दाखवला. सरांनी मला दुसरा विषय स्पेस सायन्स सुरू होणार असल्याची माहिती दिली. त्यामध्ये भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्याकडे फेलोशिप लगेच मिळणार नसल्याचेही सांगितले. मी अखेर एस.एच. पवार सरांच्याकडे त्यावेळी चर्चेत असलेल्या सुवाहकता या विषयावर पीएच.डी करायचा निर्णय घेतला. संशोधन कार्य करत असतानाही अनेक गोष्टीबाबत मला सरांच्याकडून अनमोल मार्गदर्शन मिळाले. मी तसा विभागातील सर्वच शिक्षकांशी चांगले संबंध ठवून होतो. मला क्ष-किरण पंक्तींचे विश्लेषण कसे करायचे, हे समजत नव्हते, तेव्हा सरांनी ते समजावून सांगितले. तसेच आणखी काही शिकायचे असेल तर डॉ. एस.ए. पाटील सरांना भेटायला सांगितले. आपल्यापेक्षा दुसरा एखादा शिक्षक एखाद्या विषयातील तज्ज्ञ असेल तर ते मोठेपणा मान्य करत.

आणखी एक गोष्ट सरांच्याकडून मला समजून घेता आली. ती म्हणजे, प्रश्न कसे तयार करायचे. झाले असे होते, बार्शीचे श्री. दिलीप रेवडकर हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक फिजिक्स एज्युकेशन या विषयावर सरांकडे संशोधन करणार होते. मी गावाकडे जाताना त्यांनी माझ्याकडे दोनशेक पानाचा गठ्ठा सुपुर्त केला. मी तो रेवडकर सरांना द्यावा अशी त्यांची इच्छा होती. मी तो नेण्यासाठी घेतला. काय आहे ते पाहिले. त्यात प्रश्न कसे तयार करावेत याबद्दलच्या साहित्याच्या छायांकित प्रती होत्या. मी सरांना हे कशासाठी असे विचारले. सरांनी मला सर्व इतिहास सांगितला. मात्र रेवडकर सरांनी ते घेतले नाहीत. तसेच संशोधन करण्याचा विचार सोडून दिला असल्याचे सांगितले. त्या प्रती घेऊन मी परत सरांना द्यायला गेलो, तर सरांनी माझ्याकडेच ठेवायला सांगितले. मी पुन्हा खोलीवर तो गठ्ठा घेऊन आलो. मी वाचला. स्टेम, ऑब्जेक्ट सर्व संकल्पना सरांशी बोलून समजून घेतल्या. एखादा प्रश्न इतिहासासाठी योग्य असला तरी विज्ञानाच्यादृष्टीने अयोग्य कसा असतो. सर्वकाही सोदाहरण सर समजून सांगत होते. यामध्ये किती वेळ गेला माहीत नाही. मात्र सरांनी बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे, असेच त्यावेळी वाटत होते. सरांसोबतची प्रत्येक भेट ही काही ना काही शिकवत असे. शिकण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी माझ्यासाठी पाटील सरांचा हा सहवास खूप महत्त्वाचा आहे.

सर किती वाचत होते. सरांनी किती पुस्तके वाचली हे केवळ त्यांनाच माहीत असेल. कदाचित त्यांच्याही लक्षात नसेल. मात्र सर बोलताना प्रकांड पंडिताचे भाष्य ऐकत असल्याची जाणीव होत असायची. सरांचे भौतिकशास्त्रावरचे भाष्य विषयाची भिती दूर घालवायचे. त्यामुळेच एकदा कुलगुरू रजेवर गेले असताना त्यांच्याकडे कुलगुरू पदाचा कार्यभार आला होता. ते स्वत: सहज एखाद्या विद्यापीठात कुलगुरू झाले असते. मात्र कधी सरानी त्या पदाची अपेक्षा ठेवली, प्रयत्न केले असे आठवत नाही. सरांचा सहवास पाच वर्षे मिळाला. नंतर मी बारामतीला रूजू झालो. त्यानंतर विभागातही रूजू झालो. मात्र लगेच माझी सोलापूरच्या पदव्युत्तर केंद्रात नियुक्ती झाली आणि माझे त्यांच्याशी असणारे संवाद कमी होत गेले. सरांचे शिक्षण पुणे विद्यापीठातील. त्यांचा अनुभव इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथील होता. मनात आणले असते तर ते विदेशात जाऊ शकले असते. मात्र १९७० ला ते नव्याने स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठात रूजू झाले आणि कोल्हापूरचे झाले. पुण्यात शिकूनही येथील पहिल्या पिढीच्या शिक्षणाची काळजी घेत राहिले. सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांना घडवत राहिले. माझ्यासारख्या बंडखोर विचाराच्या मुलाला योग्य मार्गदर्शन करत घडवत राहिले. आज त्यांच्याबाबतच्या अनेक आठवणी येतात. त्या सर्व शब्दांकित करता येतीलही. मात्र लेखन खूप मोठे होईल आणि लेखनाचा हेतू सरांचे संस्कार कार्य सांगण्याचा असल्याने, तो मोह टाळणेच योग्य आहे. मात्र त्यांनी कायम कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत राहिले.

अशा या शिक्षकास, गुरूस विनम्र प्रणाम!