सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

पाणीच पर्यावरणाचं मूळ!


 पाणी हे संपूर्ण जीवसृष्टीचे मूळ आहे. पाण्यापासूनच जीवसृष्टी निर्माण झाली. नद्या मानवासाठी जिवनदायिन्या बनल्या. मात्र आज याच नद्या मृत्यूदायिन्या बनल्या आहेत. कोल्हापूरमध्ये ज्या पंचगंगेचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, त्याच पंचगंगेच्या पाण्यात इचलकरंजीमध्ये पायही धुवायला नको वाटते. अशी नद्यांची, पाण्याची अवस्था झाली आहे. पाण्यावर केसरी सांगलीने २०२४चा वर्धापन दिन विशेषांक 16 जुलै रोजी प्रसिद्ध केला. त्यामध्ये माझाही लेख प्रसिद्ध झाला. तो लेख आपल्यासाठी केसरीच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करत आहे…

______________________________________________________

        आमचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील चिंचोली. मराठवाड्याच्या उंबरठ्यावर. आमच्या बालपणीही हा भाग कमी पावसाचा होता. पण पाऊस यायचा तो अगदी वेळेवर यायचा. त्या काळात प्रदूषण हा शब्द खेड्यापाड्यात पोहोचला नव्हता. त्यामुळे शेतात जाताना बाटलीतून पाणी नेण्याची संस्कृती नव्हती. शेतात वाहणारे पावसाचे पाणी पिताना त्यावेळी संसर्गाची, आजारी पडण्याची भिती नसायची. पावसाळ्यात लहानमोठे सर्वजन बिनधास्त नदीचे, ओढ्याचे किंवा वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी प्यायचे. आमच्या मालकीची कोरडवाहू मुरमाड जमीन होती. त्या कोरडवाहू शेतीमध्ये वडिलांनी पावसाळा संपल्यावरही पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून एक खड्डा खोदायला घेतला. तेथे एक-दोन फुटाचा मातीचा थर होता. त्याखाली लगेच शिळांसारखा मुरमाड भाग लागला. वडिलांनी हळहळू तो फोडायला सुरुवात केली आणि वीस फूट लांब पंधरा फूट रुंद आणि सात-आठ फूट खोलीचा एक खड्डा तयार झाला. त्यामध्ये पुढे संक्रांतीपर्यंत पाणी टिकू लागले.

हा खड्डा खोदल्यानंतर त्यात पहिल्या पावसाचे पाणी साठले. शाळा असल्याने आठवडाभर तिकडे जाता आले नव्हते. रविवारी कुतुहलापोटी तेथे पाणी कसे साठले, हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही गेलो. त्या पाणवठ्यावर चिमण्या, साळुंखी, होला असे काही पक्षी पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्या खड्ड्याभोवती असणाऱ्या मातीत उगवलेले गवत, इतर भागातील गवताच्या तुलनेने थोडे जास्तच उंच वाढलेले होते. इतर पक्षीही आपली तहान भागवत असणार, मात्र त्यांच्या पाणी पिण्याच्या वेळी आपण तेथे नसणार, हे लक्षात आले. एक दिवस सकाळी लवकरच तिकडे चक्कर टाकली, तर हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी आलेला. या सर्व पक्षी आणि प्राण्यांना या पाणीसाठ्याचा सांगावा कोणी दिला होता, कोणास ठाऊक? मात्र आमच्या सोयीसाठी केलेला पाणवठा निसर्गातील अनेक घटकांच्या उपयोगाला येत होता.

त्यावेळी फार काही समजले नव्हते. पुढे डार्विनचा उत्क्रांतीवाद अभ्यासासाठी आला. त्यात समजले की संपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती पाण्यापासून सुरू झाली. अर्थात पहिला जीव एकपेशीय अमिबा कसा तयार झाला, याचे नेमके उत्तर अद्याप कोणीच देऊ शकले नाही. काही तरी अज्ञात रासायनिक अभिक्रिया घडली आणि त्या अभिक्रियेतून एकपेशीय अमिबा जन्माला आला, असेच आजही शिकवण्यात येते. त्यातून पुढे जलचर अस्तित्वात आले. त्याचबरोबर शैवाल जन्माला आले. त्यापासून पुढे वेली तयार झाल्या. वेलीतून पुढे झुडपे आणि वृक्ष बनले. तर दुसरीकडे उभयचरांपासून प्राणी आणि पुढे पक्षी उत्क्रांत पावले. या प्राण्यातील माकडांपासून मानव उत्क्रांत पावला, असे डार्विनचा सिद्धांत सांगतो. आजही तोच प्रमाण मानला जातो. थोडक्यात संपूर्ण जीवसृष्टीची निर्मिती ही पाण्यापासून झाली. जीवसृष्टीचे मूळ पाण्यात आहे, असे विज्ञानही मान्य करते.  

सजीवांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. सजिवांमध्ये सर्वात कमी म्हटले तरी ६० टक्केपेक्षा जास्त पाणी असते. वनस्पतींमध्ये सरासरी ६० ते ९८ टक्के पाणी असते. कमी पाण्याचे प्रमाण असणाऱ्या वनस्पती या झुडुपवर्गीय काटक, पातळ सालीच्या आणि छोटी फळे येणाऱ्या असतात. यामध्ये तुरीसारखी पिके मध्यम पाण्याचे प्रमाण धारण करतात. पांढरफळीसारख्या वनस्पतींमध्ये हे प्रमाण ६० टक्केच्या आसपास असते. पावसाळ्यात या झाडांतील पाण्याचे प्रमाण वाढते. तर संपूर्ण उन्हाळा या झाडाला पानेच नसल्याने त्यांना अत्यल्प पाण्याची गरज असते. टॉमॅटोसारख्या वनस्पतीमध्ये पाण्याचे प्रमाण ९८ टक्के इतके असते. या वनस्पतींचे खोड आणि फळे सर्वच मांसल असते. या वनस्पतींमध्ये थोडाही टणकपणा नसतो. मोठ्या वनस्पतींमध्ये पाण्याचे प्रमाण हे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार बदलत जाते. मात्र तरीही पाण्याने बहुतांश भाग व्यापलेला असतो.

प्राण्यांमध्ये पाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके असते. त्यातही वेगवेगळ्या भागात पाण्याचे प्रमाण हे बदलत जाते. पिल्लांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. मेंदू, हृदय अशा भागात पाण्याचे प्रमाण जास्त असते. तर हाडांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. असे असले तरी शरीराच्या एकूण वजनाच्या तुलनेमध्ये पाण्याचे प्रमाण इतर सर्व घटकांच्या तुलनेत जास्त असते. सर्व सजिवांच्या क्रियांमध्ये पाणी आपली भूमिका पार पाडते. वनस्पती श्वसन आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी पाण्याचा निरंतर वापर करत असते. प्राण्यांच्या तर अनेक गोष्टीसाठी पाणी लागते. झाडे आंघोळ करतात, ती केवळ पाऊस पडत असताना. मात्र जमिनीवरील प्राणी, पक्षी हे केव्हा ना केव्हा आंघोळ करतातच. म्हणजे स्वच्छतेसाठी पाण्याची गरज पडते. ही तशी दुय्यम तरीही आवश्यक गरज आहे.

मात्र पिण्यासाठी पाणी ही तशी मूलभूत गरज आहे. सर्व जिवांचा वावर हा पाण्याभोवती आहे. मानवाने वस्ती करायला सुरुवात केली, तिही नदीच्या किनाऱ्यावर, म्हणजेच पाण्याच्या जवळ. प्राण्यांच्या शरीरातील प्रत्येक स्रावामध्ये पाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. शरीराचे तापमान सुयोग्य ठेवण्याचे कामही घामाच्या रूपात शरीरातून बाहेर पडणारे पाणीच करत असते. त्यासोबत आपल्या शरीराला अपायकारक असणारे घटकही बाहेर टाकत असते. म्हणजे पाणी आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही उपयुक्त असते. मूत्रावाटे पाणी बाहेर पडणारे पाणीही असेच कार्य करत असते. शरीराला आवश्यक असणारे पाणी हे आहारातून तसेच थेट पाणी प्राशन करून घेतले जाते. मानवापुरते बोलायचे झाले तर माणूस पाणी न पिता सात दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. त्यामुळे पाणी ही सजिवांची अत्यंत मूलभूत गरज आहे.  

तरीही आपण पाणी हे मानवाची मूलभूत गरज म्हणून शिकवत नाही, मानत नाही. पाण्याचे महत्त्व बालवयात मुलांच्या मनावर बिंबवत नाही. परिणामी पाण्याचा वापर गरजेपेक्षा जास्त होतो. इतर सजिवांना त्याचा मोठा फटका बसत आहे. निसर्गाचे चक्र बदलावे इतके मानवाचे पाण्यावर अत्याचार सुरू आहेत. पाण्याच्या चक्रामध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण पर्यावरण बदलत आहे. मानवाने वस्ती करताना सुरुवातीला नदीच्या काठावर केली. त्यासोबत मानवाने आपल्या बुद्धीचा वापर आपल्या भौतिक सुखासाठी करायला सुरुवात केली. त्यातून मानवाचे आरोग्य सुधारले. त्यामुळे मनुष्य प्राण्यांची संख्या इतर सजिवांच्या तुलनेत वेगाने वाढू लागली. वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ पाण्याचीच नाही तर अन्नाचीही गरज वाढली. अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतीचे क्षेत्र वाढवणे क्रमप्राप्त ठरले. त्यासाठी जंगलांची कत्तल सुरू झाली.

जंगलाची कत्तल केवळ शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठीच नाही तर, इतर कारणांसाठी म्हणजेच इमारत बांधकाम, फर्निचर, अवजारांसाठी, पॅकिंगसाठी होऊ लागली. जंगलांचे क्षेत्र कमी झाले तसे जमिनीत पाणी नेणारे मार्ग कमी होत गेले. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून तलावांबरोबर विहिरी आणि त्यानंतर कुपनलिकांचे तंत्रज्ञान विकसीत झाले. त्यातून आपली पाण्याची तहान भागविण्यासाठी या तंत्रांचा अविचारी वापर सुरू झाला. याचा परिणाम किती मोठा झाला आहे, हे अजून सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. जमिनीत पाणी नेणारे मार्ग झाडांसोबत संपुष्टात येतात. त्यातच महाराष्ट्रातील जमिनीमध्ये खाली बेसॉल्ट खडक असल्याने पाणी पाझरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत कुपन‍लिकांच्या खोलीपर्यंत पाणी जाण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. शेकडो वर्षांपूर्वी त्याठिकाणी पोहोचलेले पाणी कुपनलिकातून उपसले जात असते. मात्र हे पाणी उपसताना याचा परिणाम काय होणार याचा कधीच विचार होताना दिसून येत नाही. अर्थात भारतात प्रामुख्याने कुपनलिकांचे तंत्रज्ञान पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने अनेक वर्षे वापरले जात होते.

लवकरच या तंत्राचा वापर शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सुरू झाला. त्यातून भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा करण्यात येऊ लागला. भूगर्भातील पाणी मर्यादित आहे. त्याचे पुनर्भरण ज्या वेगाने आपण पाणी उपसतो, त्या वेगाने होत नाही. हे लक्षात यायला अनेक वर्षांचा काळ जावा लागला. शासनाने हे लक्षात येताच नियम बनवले. त्यानुसार २०० फुटांपेक्षा जास्त खोलीची कुपनलिका खोदता येत नाही. तसेच दोन कुपनलिकांतील अंतर हे २०० मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊ लागले. हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे एका एकरात चार-पाच कुपनलिका खोदल्या गेल्या. अजूनही लोक खोदत आहेत. कुपनलिकांची खोली हा तर संशोधनाचा विषय ठरावा. आजवर पाण्यासाठी खोदल्या गेलेल्या कुपनलिकातील एका कुपनलिकेची १८०० फूटापर्यंत खोली नेल्याचे एका अहवालात पहावयास मिळते. शहरामध्ये तर ‘आपले स्वत:चे बोअर असावे’, अशा मानसिकतेतून प्रत्येक बंगल्याच्या आवारात कुपनलिका खोदली जाते. अनेक महाभाग बांधकामास सुरुवात करण्याअगोदरच कुपनलिका खोदतात आणि मगच बांधकामाला सुरुवात करतात. एकट्या बेंगलोर शहरात स्थानिक प्रशासनाने कडक धोरण अवलंबल्यानंतर कुपनलिकांची नोंदणी करण्यात येऊ लागली. या एका शहरात २०१६ मध्ये नोंदणी झालेल्या कुपनलिकांची संख्या ३,१९,२११ इतकी आढळून आली. आज हा भूभाग भूजलाच्या अतिरेकी वापराने शुष्क झाला आहे. जगातील पाण्याचे सर्वाधिक दुर्भिक्ष झालेला भाग, केपटाऊन शहराचा आहे. १४ एप्रिल २०२४ पासून शहराला पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे तेथील स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. भारतातील बेंगलोर, मद्रास, पुणे ही शहरे याच मार्गावर आहेत. जून मध्यावर आला असताना मुंबई शहर पाणी कपातीला सामोरे जात आहे.

पाण्यापासून जीवन सुरू होते, पाण्याला जीवन असेच म्हणतात. हे पाणी उपलब्ध होते ते पावसापासून. जगाच्या (४१ इंच) तुलनेत भारतात (४३ इंच) आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात (४८ इंच) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. हे पावसाचे पाणी त्याच्या जलचक्राच्या नियमाने आकाशातून जमिनीवर आले की जमिनीत शक्य असेल तेवढे मुरते. उरलेले पाणी उताराच्या दिशेने वाहत जाते. महाराष्ट्रातील पावसापासून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विचार केला तर ६७ टक्के पाणी आजही आपल्या भागातून नदी-नाल्यातून वाहत जाऊन समुद्रास मिळते. पावसापासून उपलब्ध झालेल्या पाण्यातील १७ टक्के पाण्याची वाफ होते. केवळ दहा टक्के पाणीच जमिनीत मुरते. पावसापासून उपलब्ध झालेल्या पाण्यातील सहा टक्के पाणी हे तलावातून आणि जलसाठ्यातून साठवले जाते. तर नदी वाहत असताना त्यातील दहा टक्के पाणी हे शेती आणि उद्योगासाठी वापरले जाते. अशा प्रकारे जे उपलब्ध होते त्यातील ६७ टक्के पाणी समुद्राला थेट जाऊन मिळत असताना मानवाच्या गरजा वाढल्याने लागणारे ७० टक्के पाणी आपण जमिनीतून उपसा करून घेतले जाते. केवळ तीस टक्के पाणीच नद्या आणि तलावातून उपलब्ध होते.

कूपनलिकांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होऊ लागला. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे दोनशे फूट खोलीपर्यंत कूपनलिका खोदण्याचा शासनाचा नियम असताना पाचशे, सहाशे फुट गाठत, हजाराच्यापुढे खोदल्या जाऊ लागल्या. चार-पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये अशीच एक कुपनलिका खोदली जात होती. हजारपेक्षा जास्त खोल जाऊनही पाणी लागले नाही. मालकाने आणखी खोल जाण्याचा आग्रह धरला. अखेर त्या बोअरमधून उष्ण द्रव पदार्थ बाहेर पडला आणि त्यामध्ये कूपनलिका खोदणाऱ्या मशिनचे मोठे नुकसान झाले. तरीही माणसाचा हव्यास काही सूटला नाही. आजही खोल कुपनलिका खोदण्याचे प्रमाण काही कमी होत नाही.

दुसरीकडे चीन १०,००० मीटर खोल जमिनीत छिद्र खोदण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करण्यासाठी, हे ३०,००० फूट खोलीची कूपनलिका खोदत असल्याचे चीन सांगतो. असे अनेक प्रयोगाच्या नावाखाली उपदव्याप मानवाकडून सुरू आहेत. कुपनलिकातून अधिकचा पाणी उपसा झाल्यामुळे भूजल पातळी खाली जाणे, हा तत्काळ होणारा परिणाम. मात्र भूजल पातळी खाली गेल्यामुळे खोलवर मुळ्या असणाऱ्या झाडांना जमिनीतून पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पिंपळ, कडुनिंब अशी झाडे सुकतात आणि अंतिमत: मरून जातात. हा दुसरा फटका. एक झाड मरणे म्हणजे एक गाव उध्वस्त होण्यासारखेच आहे, हे कधी आपण लक्षात घेणार, हा खरा प्रश्न आहे. झाडे वाळल्यानंतर त्यांच्या मुळ्या मृत होतात. या मुळ्या जमिनीतून झाडाला जगवण्यासाठी जसे जमिनीतून पाणी घेतात, त्यापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडताना, पाणी जमिनीत नेण्याचे कार्य करतात. तेही थांबते. भूजल पुनर्भरण होत नाही. हा तिसरा दुष्परिणाम. याचा आणखी पुढे काही परिणाम होत असेल, असे कोणाच्या मनातही येत नाही. कुपनलिकांच्या माध्यमातून शेकडो वर्षांपूर्वी जमिनीत जाऊन स्थिरावलेले पाणी मोठ्या प्रमाणात उपसल्याने आणि त्याचे पुनर्भरण झाल्याने पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठा फटका बसू शकेल, असा शोध संशोधकांना लागला आहे.

मागील काही वर्षांत पृथ्वीचा अक्ष ८० सेंटिमीटर पूर्वेकडे सरकल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आहे. यामागे भारत आणि उत्तर अमेरिकेतील भूजल पातळी खाली गेल्याचे कारण संशोधकांनी जाहीर केले. भारत आणि उत्तर अमेरिकेत मागील तीस वर्षांत २१८० गिगाटन पाणी उपसले गेले आहे. त्यामुळे दरवर्षी पृथ्वीचा अक्ष ४.३६ सेंटिमीटरने १९९३ ते २०१० या काळात सरकला आहे. यामुळे हवामानाचे अंदाज बदलू शकतात. जेवढे जमिनीतून पाणी उपसले ते जर समुद्रात पसरले तर समुद्राची पातळी ०.२४ इंचाने वाढेल. त्याचा अनेक गावांना फटका बसू शकतो. आपण निसर्गात कसलाही हस्तक्षेप करताना त्याचा पुन्हापुन्हा विचार करायला हवा.

त्यातही मानवाने अनेक प्रकारांनी पाण्याच्या चक्रात हस्तक्षेप केला आहे. सुरुवातीला नद्यांवर अडथळे निर्माण केले. तलाव बांधले. नद्यातून पाणी मोठ्या प्रमाणात उपसले जाते. यापेक्षा महत्त्वाचा भाग ठरला तो म्हणजे बांधकामाच्या आधुनिक तंत्राचा वापर करताना नद्यातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होऊ लागला. नद्यांच्या कडेला असणाऱ्या नैसर्ग‍िकरित्या वाढलेल्या झाडांची तोड हाही महत्त्वाचा भाग बनला. त्यामुळे त्या झाडावर राहणाऱ्या पक्षांचा, खारूताई, सरडे अशा प्राण्यांचा आणि मुंगळे, मुंग्या अशा किटकांचा अधिवास नष्ट करण्यात आला. त्यामुळे तेथील पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. गाळ येऊन नद्यांची पात्रे उथळ झाली. नद्यांचे जिवंतपण संपले. त्या मृत झाल्या, होत आहेत. पुराचे पाणी सर्वदूर पसरू लागले. नद्यावर बांधण्यात येणारे पूल आणि नद्यांवरून बांधले जाणारे रस्ते हा आणखी एका मोठ्या संशोधनाचा विषय ठरावा. यात भर टाकली ती नद्यांमध्ये वापरलेले घाण पाणी सोडण्याने. प्रदूषीत पाणी नद्यांमध्ये सोडल्याने जिवनदायिन्या या मृत्यूवाहिन्या बनल्या. नद्यातील पाणी प्रदूषीत झाल्याने ते वापरण्यायोग्य न राहिल्याने नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना पाणी असूनही पाण्याची टंचाई जाणवू लागली.

त्यातच पाण्यामध्ये अनेक विदेशी वाणांच्या प्रजाती आणून येथील पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे कार्य करणाऱ्या स्थानिक वाणांच्या माशांचे अस्तित्व आपण धोक्यात आणले आहे. चिलापी किंवा टिलापी ही अशीच प्रजाती. ती आपण मोठ्या प्रमाणात वाढवल्याने उजनीसारख्या महाकाय धरणात आढळणाऱ्या स्थानिक प्रजातींचे मासे आता मिळेनासे झाले आहेत. इतर जलचरांनाही या प्रजातीनी धोका निर्माण केला आहे.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे आजही एखाद्या ठिकाणी पाणवठा तयार झाला तर तेथे पशू, पक्षी आणि हिरवळ आपोआप येते. एक पर्यावरणीय संस्था निर्माण होते. मात्र त्यासाठी पाण्याचे साठे आहे तसे जतन करायला हवेत. स्वच्छ पाण्यात अशुद्ध पाणी मिसळू देता कामा नये. अनेक आजार प्रदूषीत पायामुळे होतात. पाण्यावर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे, हे आपण मान्य करायला हवे. सुयोग्य पाणी सर्वांना मिळावे यासाठी स्वच्छ पाण्यात प्रदूषीत पाणी मिसळू न देण्याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. नाहीतर पर्यावरणाचे मूळ असणारे पाणी मानवाच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा