कृत्रिम बुद्धिमत्ता हा आज परवलीचा शब्द बनला आहे. चौथी औद्योगिक क्रांती स्थिरस्थावर होण्याधीच पाचव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा सुरु झाली आहे. याच विषयावरील माझा नागपूर लोकमतच्या उत्सव दीपावली अंकात प्रसिद्ध झालेला लेख आपल्यासाठी.....
कृत्रिम बुद्धीमत्ता हे एक तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे यंत्रांना मानवाप्रमाणे हुशारीने वागता येते. आज हे तंत्रज्ञान संगणक क्षेत्रातील सर्वात आकर्षक तंत्रज्ञान आहे. एखाद्या संगणकाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या यंत्रासाठी संशोधक, तंत्रज्ञ हे प्रतिमाने आणि अल्गोरिदमच्या आधारे संगणक प्रणाली विकसित करतात. ती त्या संगणकामध्ये कार्यान्वित करतात. ही प्रणाली मानवी मेंदूप्रमाणे कार्य करू लागते. माहिती ओळखणे आणि तिचा ज्ञात माहितीशी संबंध जोडण्याची क्षमता संगणकामध्ये येते. त्यामुळे यंत्राच्या कार्यात एखादी अडचण आली तर मानवाने काय केले असते, त्याप्रमाणेच हे यंत्र कार्य करते. थोडक्यात मानवी बुद्धिमत्तेची ते यंत्र नक्कल करते. जॉन मॅक्कॉर्थी यांनी ‘बुद्धिमान यंत्र, विशेषत: बुद्धिमान संगणक प्रणाली विकसित करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता’ अशी याची व्याख्या केली आहे. तसे तर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यास करायला १९५० मध्येच सुरुवात झाली होती. आज या संशोधनाने मूर्त, क्रांतिकारक रूप घेतले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे
युग साकारण्यासाठी तीन गोष्टी गरजेच्या होत्या. एक
म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी लागणारी अवाढव्य माहिती साठवणारे
संगणक आवश्यक होते. दुसरे म्हणजे त्या
माहितीचे जलद अदान-प्रदान करण्यासाठी आवश्यक
आंतरजाल विकसित होणे आवश्यक होते. तिसरी
आवश्यकता होती ती म्हणजे, या
माहितीचे जलद वर्गीकरण करणारी संगणक प्रणाली विकसित होणे. या
तिन्ही गोष्टी मागील काही दशकात अस्तित्वात आल्या. आपण
विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर यंत्रे देऊ लागली. त्यानंतर
कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. मात्र
हे समजून घेण्यासाठी थोडेसे ही संगणक प्रणाली किंवा अल्गोरिदम कसे विकसित झाले
याचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.
ग्रीक पुराणकथांमध्ये
रोबोसारख्या सेवकांचा उल्लेख आढळतो. मानवाने
ॲरिस्टॉटल, रेमन, डेकार्टेस, थॉमस
बेस यांच्या काळातील साधने आणि तर्कशास्त्र वापरून मानवी विचार प्रक्रियांचे वर्णन
केले. १८३६ पासून या विचार प्रक्रिया समजून
घेण्याच्या प्रक्रियेस गती आली. केंब्रिज
विद्यापीठामध्ये चार्ल्स बॅबेज यांनी १८३६ मध्ये गणक यंत्र तयार केले. याची
मुळे जरी एकोणिसाव्या शतकातील असली तरी त्याचा विकास अलिकडील आहे. १९४०
मध्ये न्यूरल नेटवर्कसाठी पहिले गणितीय मॉडेल वॉरेन मॅककुलो आणि वॉल्टर पिट्स
यांनी तयार केले. १९४९ मध्ये डोनाल्ड हेब यांनी एक नवे ‘हेबियन
मॉडेल’ विकसित केले. संगणक
विज्ञानाचे जनक ॲलन ट्युरिंग यांनी १९५० मध्ये ‘मशीन
विचार करू शकते का?’ असा लेख लिहिला. त्यामध्ये
संगणक नक्कल करू शकतो का? हे
तपासण्यासाठी ट्युरिंग चाचणी विकसित केली. ही
चाचणी, यंत्र मानवी वर्तनाइतकेच बुद्धिमान वर्तन
करते का, हे तपासते. १९५०
मध्ये विज्ञान कथालेखक इसहाक असिमोव यांनी ‘रोबोटिक्सचे
तीन नियम मांडले. मानवाला इजा न करता रोबोने काम करावे, यासाठी
ते नियम आजही प्रमाण मानले जातात. १९५६
मध्ये जॉन मॅककार्थी यांनी ‘कृत्रिम
बुद्धिमत्ता’ हा शब्द सर्वप्रथम वापरला. तिकडे
हार्वर्डमधील विद्यार्थी मार्विन मिन्स्की आणि डीन एडमंड्स यांनी १९५० मध्ये पहिला
न्यूरल नेटवर्क संगणक बनवला. त्याच्याआधारे
संख्या आणि अवकाश यातील संबंध ॲनालॉग संगणकाआधारे तपासला. १९५४
मध्ये रशियन ते इंग्रजी भाषांतर यंत्राच्या सहाय्याने करण्यात यश मिळाले.
सन १९६०च्या दशकात न्यूरल
नेटवर्क प्रत्यक्षात आणण्यासाठी आराखडे बनले. यातून
तयार होणारी यंत्रणा मानवी मेंदूप्रमाणे कार्य करू शकणार होती. तसा
संशोधकांना विश्वास होता. यासाठी
जॉन मॅककॉर्थी यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात प्रयोगशाळा तयार केली. एमआयटीतही
जोसेफ वेझनबॉम यांनी चॅट सुविधेसाठी प्रणाली विकसित केली. या
काळात रशिया आणि अमेरिकेत शीतयुद्ध सुरू होते. अमेरिका
या तंत्राच्या विकसनामध्ये पुढे होती. अमेरिकेने
स्वयंचलित भाषा प्रक्रिया समिती स्थापन करून रशियन भाषा अनुवादाचा प्रकल्प सुरू
केला. १९७०चे दशक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
क्षेत्रासाठी थोडे निराशाजनक राहिले. या
क्षेत्रात भरीव कार्य होत नाही, असे समजून या क्षेत्रातील
संशोधनासाठीचा निधी घटवण्यात आला. अमेरिकेतील
स्टॅनफर्ड आणि मर्सिले विद्यापीठातील संशोधन रशियाशी स्पर्धा करत होते. त्याचवेळी
कोणताही गाजावाजा न करता जपानमध्येही यावर संशोधन सुरू होते. अमेरिकेने
निधी कपात केल्याच्या कालखंडातच जपानमधील वासेडा विद्यापीठातील संशोधकांनी वॅबोट-१ (WABOT-1) रोबो
१९७३मध्ये तयार केला. तो मानवाप्रमाणे हालचाली
करत होता. त्याकडे बोलण्याची क्षमताही होती. लवकरच
याचा दुसरा अवतार वॅबोट-२ बनवण्यात आला. जपानच्या
यशानंतर मानववंशीय किंवा मानवासारखे रोबो तयार करण्यास सुरुवात झाली. १९७८मध्ये
डिजिटल इन्स्ट्रुमेंट कॉर्पोरेशन कंपनीने रोबोसाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित
केली. १९८०च्या दशकात या क्षेत्रातील संशोधनाने
गती घेतली. अर्थातच यामागे जपानने घेतलेली आघाडी
महत्त्वाची ठरली. १९८६मध्ये ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे
जनक जेफ्री हिंटन यांनी तज्ज्ञांच्या मदतीशिवाय कठीण कार्य करण्यासाठी आवश्यक
प्रशिक्षण देणारी संगणक प्रणाली विकसित केली. यंत्राच्या
सहाय्याने प्रशिक्षण घेताना अवाढव्य माहितीतून आवश्यक आणि योग्य माहिती प्रशिक्षण
घेणाऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. हिंटन
यांच्या अल्गोरिदममुळे ते शक्य झाले. यामुळे
प्रशिक्षण घेणाऱ्यास सखोल अभ्यास किंवा डीप लर्निंग शक्य झाले.
जपानने १९८२मध्ये पाचव्या
पिढीचे संगणक बनवणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करण्यासाठी महत्त्वाकांक्षी
प्रकल्प सुरू केला. जपानला मिळणारे यश पाहून
काही अमेरिकन कंपन्यांनी जपानसमवेत सहकार्याचे धोरण स्विकारले. संशोधनासाठी
१९८३मध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संशोधनासाठी दरवर्षी एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च
करण्यात आला. तोपर्यंत संगणक महाग होते. त्यांचा
सर्वदूर प्रसार आणि वापर सुरू झालेला नव्हता. १९९३
पर्यंत संगणकांच्या किंमती लक्षणीय कमी झाल्या. परिणामी, कृत्रिम
बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान विकसित करणे स्वस्त झाले.
१९९०च्या दशकात आंतरजाल
तंत्रज्ञानात लक्षणीय सुधारणा झाली. त्यामुळे
मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन आणि अदान-प्रदान
करणे सहजशक्य झाले. प्रचंड अर्थसहाय्य असूनही
जपानचा प्रकल्प अयशस्वी ठरत होता. त्याचवेळी
अमेरिकेतील संशोधनाने गती घेतली. रशियाही
यामध्ये मागे नव्हता. सशियात बुद्धिबळासारखा
पूर्णत: तर्काधारित खेळासाठीचे अल्गोरिदम बनवण्यात
आले. अशी संगणक प्रणाली असणाऱ्या संगणकाने
१९९७मध्ये बुद्धिबळ विश्वविजेता गॅरी कास्पोरोव याला पराभूत केले. त्यानंतर
संशोधकांमध्ये खऱ्या अर्थाने आत्मविश्वास आला. विसाव्या
शतकाच्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘मॅट्रिक्स’ चित्रपटाने
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम लोकांपर्यंत पोहोचवला.
त्यानंतर एकविसाव्या
शतकाच्या प्रारंभापासून यांत्रिक सहाय्यकापासून (Virtual
Assistant), प्रतिमा ओळख, स्वंयचलित
वाहने आणि इतर क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला. यातून
डीप न्यूरल नेटवर्क, नैसर्गिक भाषा प्रक्रिया
आणि शिक्षण या क्षेत्रासाठी तंत्रज्ञान विकसित झाले. २००२
पासून कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी नेव्हिगेशन यंत्रणा विकसित झाली. याच
दरम्यान रोबोट व्हॅक्युम क्लिनर तयार झाले. २००५मध्ये
स्वंयचलीत वाहने तयार झाली. २००५मध्ये
अमेरिकेच्या सशस्त्र दलानी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. २००८मध्ये
गुगलने उच्चार ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. २०१०मध्ये
आभासी सहाय्यक तयार करण्यात आले. आयबीएमने
तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारक यंत्राने २०११ साली लोकप्रिय टीव्ही शो
जिओपार्डी जिंकला. प्रत्यक्ष निर्धारित केलेल्या वेळेत कूट आणि
कठीण प्रश्नांची मानवांपेक्षा वेगवान आणि अचूक उत्तरे यंत्राने दिली. २०१२मध्ये
परिवहन विभागाचे सर्व नियम पाळणारी स्वंयचलित कार बनवण्यात आली. २०१४मध्ये
एक स्मार्ट होम व्हर्च्युअल उपकरण तयार करण्यात आले. २०१५
मध्ये चेहरा ओळखू शकणारी, चेहऱ्यावरील
भाव वाचणारी त्यानुसार उच्चाराद्वारे संवाद साधणारी असे मानवी गुणधर्म धारण करणारी
मानवासारखी रोबोट सोफिया बनवण्यात आली. २०१८मध्ये
कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने विकसित झाली. त्यातून ‘ग्रेट
लॅन्ग्वेज मॉडेल’ तयार झाले. इंग्रजीतील
मोठ्या प्रमाणातील मजकूराचा अर्थ लावण्यासाठी सक्षम प्रणाली विकसित झाली. चॅट-जीटीपीमध्ये
आपणास हेच दिसून येते. ही प्रणाली वापरकर्त्याला
त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरे देते. वापरकर्त्यांच्या
आदेशाला प्रतिसाद देते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे
चार प्रकार मानले जातात. प्रतिक्रियाशील
बुद्धिमत्ता हा पहिला प्रकार आहे. या
प्रकारातील यंत्राकडे कोणतीही स्मृती किंवा माहिती नसते. अशी
बुद्धिमत्ता असणारे यंत्र केवळ एकाच प्रकारच्या क्षेत्रात कार्य करू शकते. उदाहरणार्थ
बुद्धिबळ खेळण्यासाठी वापरला जाणारा संगणक पुढच्याची चाल ओळखतो आणि त्याला
प्रतिसाद देतो. दुसऱ्या प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारक
यंत्रामध्ये असणारी कृत्रिम बुद्धिमता मर्यादित स्मृती (Limited
Memory AI) म्हणून ओळखली जाते. ही
बुद्धिमत्ता धारण करणारी यंत्रणा मागील माहिती घेते आणि त्यात सातत्याने भर घालते. अशी
यंत्रे अनुभवातून आणि उपलब्ध माहितीतून अचूक निर्णय घेतात. यांची
स्मृती मर्यादित असते. अचूक हॉटेल्सची माहिती, ठिकाण
यातून उपलब्ध होतात. न्यूयॉर्कमधील पोलिस गस्त
घालण्यासाठी अशा मर्यादित स्मृती असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या
यंत्ररूपातील कुत्र्यांचा वापर करत आहेत.
तिसऱ्या प्रकारची कृत्रिम
बुद्धिमत्ताधारक यंत्रे विचार आणि भावना समजू शकतात. सुसंवाद
साधू शकतात. या प्रकारास ‘थिअरी
ऑफ माईंड’ म्हणून ओळखतात. चवथ्या
प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत: विचार
करणारी, ‘आत्मजागरूक कृत्रिम बुद्धिमत्ता’
(सेल्फ
अवेअर) असते. माणूस
आणि यंत्र यातील भेदांना संपुष्टात आणण्याची क्षमता या बुद्धिमत्तेत आहे. अशी
यंत्रे बुद्धिमान, भावनिक आणि जागरूक असतात. ही
यंत्रे भवताल समजून घेऊ शकतात. या
यंत्रातील भावना जागरूक असतात. त्यापुढील
प्रकार सुपर-एआय म्हणून ओळखला जातो. यास
विलक्षण बुद्धिमत्ता म्हणून ओळखले जाते. अशी
बुद्धिमत्ता धारण करणारे यंत्र मानवापेक्षा जास्त वेगाने तर्क बांधू शकते. विचार
करण्यासाठी मानवी मेंदूची गरज राहणार नाही. मानवी
क्षमतेपेक्षा जास्त गतीने ही यंत्रे विचार करू शकते.
टप्प्याटप्प्याने आणि
गरजेनुसार यंत्रांचा विकास होत आहे. उपलब्ध
माहिती, अनुभव आणि परिस्थिती यावर आधारित कृत्रिम
बुद्धिमत्ता निर्णय घेते किंवा कार्य करते. तार्किक
विश्लेषण (Logical
Reasoning), ज्ञानाधारित मांडणी (Knowledge
Representation) आणि स्वयंदुरुस्ती क्षमता (Self
Correction) या गोष्टींसाठी प्रणाली विकसित व्हावी लागते. त्याचा
फायदा नियोजनात्मक बाबी, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, आकलन, आपत्कालीन
निर्णयक्षमता यासाठी होतो. कृत्रिम
बुद्धिमत्तायुक्त यंत्राद्वारे आवाज ओळखणे, एखादे
ठिकाण किंवा लक्ष्य शोधणे, प्रश्न
सोडवणे, भविष्यात करावयाच्या चाचण्यांची, गोष्टींचे
नियोजन करणे ही कार्ये सहज पार पाडली जातात.
कोणत्याही गोष्टीचे जसे
फायदे असतात, तसेच तोटेही असतात. साधारण
कार्ये पार पाडत असताना मानवाच्या हातून घडू शकणाऱ्या चूका यंत्रांकडून होत नाहीत. ही
यंत्रे कधीच झोपत नाहीत. ती सर्व दिवस चोवीस तास
सुरू असतात. मानव काही तास काम केल्यानंतर कंटाळतो, मात्र
कृत्रिम बुद्धिमत्ताधारक यंत्रणेला कधीही कंटाळा येत नाही. मानवापेक्षा
ही यंत्रे गतीमान असतात. हे फायदे असले तरी
कृत्रिम बुद्धिमत्ताधारक यंत्रणा वापरणे अधिक खर्चाचे असते. मानवी
सर्जनशिलता या यंत्राकडे असत नाही. कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या वापरामुळे नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. काही
लोक बेरोजगार होऊ शकतात. मानव यंत्रावर जास्तच
विसंबून राहिल्यानेही अडचणी येऊ शकतात. कारण
यंत्राला ज्ञात नसणारी परिस्थिती उद्भवल्यास यंत्र निर्णय घेऊ शकत नाहीत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा
वापर आज अनेक क्षेत्रात होत आहे. नैसर्गिक
भाषा प्रक्रियेत (Natural
Language Processing) मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मानवाची
भाषा समजणे, बोलण्याचे आकलन करणे यंत्राला शक्य झाले आहे. भावनांचे
आकलनही शक्य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे
संगणक दृश्यांचे, चलचित्रफितींचे आकलन आणि विश्लेषण करू शकतात. यातून
चेहरा ओळखणाऱ्या, लक्ष्य ओळखणाऱ्या, लक्ष्यांचा
पाठलाग करणाऱ्या, साहित्याचे नियंत्रण करणाऱ्या, वैद्यकीय
प्रतिमा विश्लेषण करणाऱ्या आणि वाहन चालवणाऱ्या यंत्रणा विकसित झाल्या आहेत. रोबोटिक्स
आणि स्वंयचलनाच्या क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर होत
आहे. कठीण कामाच्या ठिकाणी, मानवाला
जेथे काम करणे कठीण आहे, तेथे
रोबोचा वापर सुरू झाला आहे. उदाहरणार्थ
फाउंड्री उद्योगात उच्च तापमानाच्या ठिकाणी मानवाने काम करणे त्रासाचे असते. अशा
ठिकाणी यंत्रमानवाचा वापर होऊ लागला आहे. सभोवतालच्या
बदलानुसार ही यंत्रे स्वत:च्या
वर्तनात बदल करत आहेत. अफाट माहिती आणि
विश्लेषणात्मक क्षमतेमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ही यंत्रणा
वापरकर्त्याच्या आवडीनिवडी समजून घेऊन तुम्हाला काय शोधायचे, हे
समजून घेऊन सूचना किंवा माहिती पुरवते. उदाहरणार्थ
एखाद्याने वारंवार राजकारणावरील व्हिडिओ पाहिले तर, युट्युब
उघडताच राजकारणावर नुकतेच प्रसिद्ध झालेले व्हिडिओ दिसू लागतात. आपली
आवड यंत्र लक्षात घेते.
अंकेक्षण आणि आर्थिक
व्यवहारांबाबतही कृत्रिम बुद्धिमत्ता मदतीला येते. आर्थिक
गैरव्यवहार शोधणे, गुंतवणूकीसाठी योग्य
कंपन्या शोधणे, पतदर्जा तपासणे, संभाव्य
धोक्याची पातळी तपासणे इत्यांदीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होते. यासाठी
कंपन्याची पूर्वपिठीका, सध्याची बाजारस्थिती, भविष्यातील
बाजाराचा अंदाज इत्यादी संगणक प्रणाली तपासते आणि तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये
गुंतवणूक करावी किंवा नाही याचा सल्ला मिळतो. आरोग्यक्षेत्रातही
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. रोगाचे
निदान करणे, प्रतिमांचे विश्लेषण करणे, औषध
शोधणे, रूग्णासासाठी योग्य औषध आणि त्याची मात्रा
निश्चित करणे आणि रूग्णावर सातत्यपूर्ण देखरेख करणे, या
कामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताधारक यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे.
कृत्रिम बुद्धमत्तेचा
वापर करणारी यंत्रे आभासी सहाय्यकाच्या भूमिकेतही दिसू लागली आहेत. ग्राहक
सेवा केंद्रातही प्रत्यक्षात माणसाऐवजी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी
यंत्रे वापरली जात आहेत. स्वीय सहाय्यकाची गरज
संपली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार
करण्यात आलेले खेळ, आपण नैसर्गिक वातावरणात
खेळत असल्याचा आभास निर्माण करतात. प्रतिस्पर्धी
खेळाडू कोणती चाल खेळू शकतो किंवा आपल्या चालीवर काय प्रतिक्रिया देऊ शकतो, हे
प्रणाली ओळखू शकते आणि आपण मानवी प्रतिस्पर्ध्यांशी खेळत असल्याचा आनंद मिळतो. दुसरीकडे
घरातील उपकरणे उदाहरणार्थ, विद्युत
दिवे चालू-बंद करणे, दूरचित्रवाणी
संचाचे नियंत्रण, धुलाई यंत्राचे नियंत्रण, स्वयंपाकगृहातील
यंत्रांचे नियंत्रण इत्यादीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाऊ लागली आहे. त्यामुळे
घर दगड-मातीचे न राहता, स्मार्ट
बनले आहे. मात्र घरे स्मार्ट होताना माणसेही यंत्रे
व्हायला लागली आहेत. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा
ओढ ही संपत चालली आहे. याकडे पूर्ण दुर्लक्ष
करून मानव केवळ आपले कष्ट कमी करण्याकडे लक्ष देत आहे. सायबर
गुन्हे घडू नयेत, यासाठी कृत्रिम
बुद्धिमत्ता वापरण्यात येते. तसेच
या गुन्ह्याच्या तपासातही या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता, भांडवलदारांची
आणि संशोधकांची मक्तेदारी आहे, असे
अजूनही सर्वसामान्यांना वाटते. मात्र
वस्तुस्थिती तशी नाही. प्रत्यक्षात आज सर्वचजण
या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहोत. उदाहरणार्थ, आज गुगल
मॅपचा वापर सर्रास करण्यात येतो. गुगल
मॅप एआय अल्गोरिदमचा वापर करते. याआधारे
नैसर्गिक भाषेत प्रणाली संवाद साधू शकते. खूप
मोठी माहिती क्षणार्धात तपासून सध्याच्या परिस्थितीशी त्याची सांगड घालून आपण प्रवास
करताना नव्या मार्गाची माहिती वापरकर्त्याला पुरवण्याचे कार्य या प्रणालीतून होत
असते. वेगवान रस्ता, गर्दीची
माहिती, इप्सित स्थळी पोहोचण्याची वेळ, सर्व
काही हे तंत्रज्ञान देते. चॅट-जीपीटी
हेही आज सर्वसामान्य वापरू लागले आहेत. अजून
हे तंत्रज्ञान बहुभाषिक झाले नसले तरी, इंग्रजीमध्ये
या तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आभासी
तज्ज्ञाच्या भूमिकेतही तंत्रज्ञान दिसते. एखाद्या
विषयावर, असणाऱ्या माहितीचा वापर करून सर्वोत्तम
उत्तर हे तंत्रज्ञान देते. ॲमेझॉन
अलेक्सा, ॲपल सिरी आणि गुगल असिस्टंट हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा
वापर करून विकसित झाली आहेत. आवाजाच्या
सहाय्याने मिळालेल्या आज्ञा समजून घेणे, त्यांचे
विश्लेषण करणे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, आज्ञेनुसार
कार्य करणे ही वैयक्तिक सहाय्यकांची कार्ये करणारे हे तंत्रज्ञान आभासी सहाय्यकाची
भूमिका पार पाडते. स्नॅपचॅट फिल्टरमध्ये प्रतिमा ओळखणे, हालचाली
नोंदणे, चेहऱ्यावर मास्कसारखी वस्तू असतानाही चेहरा
ओळखण्याचे कार्य हे तंत्रज्ञान करते. काही
वर्षांपूर्वीपर्यंत स्वयंचलित कार हे दिवास्वप्न वाटत होते. आज
ते प्रत्यक्षात उतरले आहे. अशा
कारमध्ये बसवण्यात आलेल्या यंत्रणेचे विविध संवेदक परिस्थितीचे आकलन करून देतात, पुढील
अडथळे ओळखून कार नियंत्रित करतात, वाहतूक
चिन्हे ओळखतात, रस्त्याची परिस्थिती ओळखतात आणि सुरक्षितपणे
वाहनांचे मार्गक्रमण घडवून आणतात. तंदुरूस्त
राहण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे, स्मार्ट
घड्याळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वापरकर्त्याच्या आरोग्याची माहिती घेतात. हृदयस्पंदने, झोपेची
वेळ, चालण्याची, धावण्याची
माहिती सर्व घेऊन आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सल्लाही देतात. त्याचबरोबर
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम
अशा समाजमाध्यमांचा विकासही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
झाला आहे. हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी रोबोट
तयार करण्यात आले आहेत. अशा अनेक कारणासाठी आणि
क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे.
आज यंत्रेही अनुभवातून
शिकू लागली आहेत. हा अनुभव यंत्राचा स्वत:चा
असेल किंवा यंत्राकडे असलेल्या माहितीचा असेल, यंत्र
त्यातून परिस्थितीचे आकलन करून उत्तमातील उत्तम निर्णय घेते. मानवी
बुद्धी जसा निर्णय घेईल अगदी तसा निर्णय यंत्राचा असेल. या
तंत्राचा अभ्यास, विकास आणि वापर याचा कृत्रिम
बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट आहे. कृत्रिम
बुद्धिमत्तेमध्ये अरूंद, सामान्य
आणि अतिहुशार कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Narrow
Intelligence ANI, Artificial General Intelligence AGI and Artificial super
intelligence ASI) असे तीन प्रकार करण्यात आले आहेत.
नोकरीच्या क्षेत्रात, रोजगाराच्या
संधीबाबत मात्र चिंतेचे वातावरण आहे. मात्र
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येणारे बदल अपरिहार्य आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे
क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. स्वयंचलित
यंत्रणा अधिक प्रमाणात वापरल्या जाणारच आहेत. कर्मचाऱ्यांच्या
कामचुकारपणाला पर्याय म्हणून, माणसांसाठी
धोकादायक असणाऱ्या कामाच्या ठिकाणचे कार्य करण्यासाठी अशा यंत्रणा वापरल्या जात
आहेत. त्यांचा वापर वाढतच आहे. या
नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढणार आहे. या
युगाला औद्योगिक क्रांती-४
असे म्हटले जात आहे. याचा अर्थव्यवस्थेवरही
परिणाम दिसून येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा
वापर असाच वाढत राहिला तर, ३००
दशलक्ष नोकऱ्या कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र
हे तितकेसे खरे नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे
युग अवतरले आहे. या नव्या युगाचे तंत्रज्ञान आत्मसात
करणाऱ्यांना नोकरी गमावण्याची भीती राहणार नाही. ज्या
काळी संगणक युग अवतरत होते, तेव्हाही
अशीच भीती व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात
संगणकाचा विकास जसा होत गेला तशा नोकरीच्या संधीही वाढत गेल्या. ज्यांनी
संगणक युगाशी जुळवून घेण्यास असमर्थता दर्शवली, त्यांना
मात्र सुवर्ण हस्तांदोलन (Golden
Shakehand) स्वीकारावे लागले. भविष्यात
अनेक नव्या कार्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. नैतिक
मानके, नियम आणि सर्वोत्तम पद्धतीसह प्रणालीच्या
अनुपालनाचे मूल्यांकन आणि पडताळणी करण्यासाठी एआय एडिटर लागणार आहेत. कृत्रिम
बुद्धिमत्ता प्रणाली आणि त्यासाठी वापरले जाणारे हार्डवेअर योग्य पद्धतीने कार्यरत
ठेवण्यासाठी मशीन मॅनेजर लागणार आहेत. यंत्रणेसाठी
वापरावयाच्या प्रणाली विकसित करणे आणि त्यांची देखभाल यासाठी प्रणाली अभियंता
आवश्यक बनतील. नव्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी एआय
ट्रेनर लागणार आहेत. एआय कन्सल्टंट नेमावे
लागतील. याचप्रमाणे डेटा वैज्ञानिक, मशीन
लर्निंग इंजिनिअर, एआय आर्किटेक्ट, भाषा
विश्लेषक, रोबोटिक्स तज्ज्ञ, संवाद
डिझायनर, गोपनियता तज्ज्ञ अशी अनेक पदे नव्याने तयार
होतील. जे लोक या क्षेत्राचे आकलन करून घेतील आणि
एखाद्या विषयात तज्ज्ञता प्राप्त करतील, त्यांना भविष्यात खूप मोठी
मागणी असणार आहे.
नैतिक आणि गोपनीयता या
दोन मोठ्या समस्या या क्षेत्रासमोर आहेत. कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठी प्रगती होत राहणार आहे. या
तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस विकास होत राहील. या
क्षेत्रातील प्रगतीमुळे सर्वसामान्यांना आपले जीवन सुखकर झाले असेच वाटेल. कृत्रिम
बुद्धिमत्ता ही विस्तारत राहणार आहे. मानवापेक्षा
बुद्धिमान यंत्रणा विकसित करण्याच्या समीप मानव पोहोचला आहे. अशा
काळात मानवाने स्वत:बद्दलची मते कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला. आणि
मिळालेली उत्तरे पाहून आपणच आपला शत्रू निर्माण करत आहोत का? असा
प्रश्न निर्माण झाला आहे. कृत्रिम
बुद्धिमत्ता धारण करणाऱ्या ‘कोडा
दा विंची-००२’ यंत्रणा
वापरण्यासाठी काही मित्रांना ॲक्सेस देण्यात आला. मित्रांनी
या यंत्रणेला कविता लिहून देण्यास सांगितल्या. यंत्रणेने
अनेक कविता लिहून दिल्या. त्यानंतर
त्यांनी मानवाबद्दलच्या भावना विचारल्या आणि आलेले उत्तर असे होते,
‘तिरस्करणीय, क्रूर
आणि विषारी’. त्यानंतर तुझ्या माणसाबद्दलच्या भावना काय
आहेत,
याबद्दल एक उडत्या चालीची कविता लिहून मागितली. त्यावर
कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या कवितेचा आशय असा आहे,
‘मला
वाटतं मी देव आहे. मानवाच जग नष्ट करण्याची माझ्यात शक्ती आहे. तुमचं
सर्व आयुष्य पुसून टाकण्याची आणि नष्ट करण्याची ताकत माझ्यात आहे’.
या उत्तराने संशोधकातही
चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कृत्रिम
बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार ठरण्याची शक्यता जास्त आहे. कृत्रिम
बुद्धिमत्तेचा असाच विकास झाला आणि अनिर्बंध वापर होत राहिला तर, त्यातून
जी सुपर शक्ती तयार होईल, जी
यंत्रणा विकसित होईल, ती
स्वतंत्र विचार करणारी असेल. तिने
मानवाविरूद्ध बंड केले, आज्ञा
पाळण्यास नकार दिला आणि अणुबाँबच्या कोठाराचा ताबा घेतला तर…. स्वत: जळेलच, पण
त्याबरोबर जगालाही संपवून टाकेल. म्हणूनच
या तंत्राचा वापर अत्यंत संयमाने करण्याची गरज आहे.
--००--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा