गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

मृत्युपत्र



मुलांनी फ्लॅटकडे चक्कर मारली. बाल्कनीचे दार उघडे. आत वडील मात्र नव्हते. त्यांच्या फ्लॅटचा मजला पूर्ण पूरात बुडाला होता. वडील वाहून गेले असणार अशी त्यांची खात्री पटली. आपल्या मार्गातील अडसर दूर झाल्यासारखे त्यांना वाटले. पूरात फ्लॅट बुडाल्याची आणि वडील बेपत्ता झाल्याची नोंद त्यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सक्रिय सुधाकरला हे समजले. त्यांने दिनकररावांच्या कानावर ही गोष्ट घातली. आता वृद्धाश्रमातील लोकांपेक्षा कमनशिबी आपण आहोत असे दिनकररावांना वाटू लागले..... २०१९च्या पूरपरिस्थितीवर आधारीत कथा इंद्रधनुष्य या दिपावली अंकात प्रसिद्ध झाली. इंद्रधनुष्यच्या सौजन्याने ती येथे प्रसिद्ध करत आहे....... 
--------------------------------------------------------------------------------------------

    दिनकरराव एक अजब रसायन होते. आपल्या मार्गाने जाणारे, सरळमार्गी. कोणी आडवे आले तर आपलाच रस्ता बदलून जाणारे. त्यांचे वागणे एखाद्या साधूचे होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झालेले. आईने मामाच्या आधाराने दिनकररावांना शिकवले. बारावीच्या मार्क्सवर कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिक्षण संपता संपता राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि दिनकररावांना पदवी मिळायच्या आधीच नोकरी मिळाली. निकाल लागताच ते नोकरीवर रूजू झाले. नोकरीला लागताच मामाने लग्नासाठी आपल्या मुलीचा सुमनसाठी प्रस्ताव ठेवला. दिनकररावांनी व आईने लगेच होकार दिला. दिसायला छान. चांगली बारावी झालेली. लवकरच लग्नही झाले. लग्नानंतर दिनकरराव नोकरीनिमित्त बाहेर राहात. मात्र कुटुंब त्यांनी गावातच ठेवले. आठवडी सुट्टीला ते येत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना नोकरीत फारसा त्रास झाला नाही. त्यांना यथावकाश दोन मुले झाली. आठवड्याला येऊन मुलांचे लाड करणे, घरात हवे नको ते पाहणे हे त्यांच्या सवयीचा भाग होऊन गेले. मुले आजी आणि आईसोबत राहून शिक्षण घेऊ लागली. दिनकररावांनी लवकरच 'सुसंगती' अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर एक फ्लॅट घेतला. आपली नोकरी त्यांनी इमानइतबारे पार पाडली. प्रामाणिकपणा हा अवगुण मानण्याचा तो काळ नव्हता. त्यांना पदोन्नती मिळत गेली. 
     मुलेही दिनकररावांप्रमाणेच अभ्यासात हुशार होती. चौथी, सातवीची शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. बारावी उत्तीर्ण झाल्यावर दोन्ही मुलांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचे ठरवले. दिनकररावांनी दोन्ही मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. मुले मेकॅनिकल इंजिनिअर झाली. दोन्ही मुलांना शेजारच्याच एमआयडीसीत चांगल्या कंपन्यांत नोकऱ्या मिळाल्या. दिनकररावांचा संसार उत्तम रितीने मार्गाला लागल्याचे पाहातच आईचे वयोमानानुसार निधन झाले. म्हातारी मोठ्या समाधानाने शंभराव्या वर्षी गेली.
      दरम्यान, पस्तीस वर्षांच्या सेवेनंतर दिनकरराव सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या वेळी चांगली घसघशीत रक्कम मिळाली. पत्नीशी चर्चा करून प्लॉट घेऊन बंगला बांधावा, असा त्यांनी निर्झय घेतला. दिनकररावांचा प्रामाणिकपणा कामाला आला. साखर कारखान्याचे चेअरमन शामराव पाटलांनी दिनकररावांना माफक किमतीत एक पाच गुंठ्याचा प्लॉट देऊ केला. मुलांची लग्न होणार होती. सुना येणार होत्या. अशा परिस्थितीत मोठ्या घराची गरज होतीच. दिनकररावांनी तो प्लॉट खरेदी केला. सुमनताई फार विचारी होत्या. सुना कोण येणार, कशा असतील, हे माहीत नसल्याने घर बांधतानाच दोघांची स्वतंत्र घरे राहतील, अशा पद्धतीने बंगल्याची रचना केली. एका बेडरूमला स्वयंपाकगृहात रूपांतरित केले की ते जुळे बंगले होतील, असे बांधकाम केले. वर्षभरात बांधकाम संपवून ते नव्या घरात राहायला गेले. विश्रामनगरातील घराभोवती वेगवेगळी झाडे लावून दिनकररावांनी नारळ, केळी, चिक्कू, अंजीर अशी फळे परसबागेत उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली. मात्र सुमनताईंच्या भावना फ्लॅटमध्ये गुंतल्या होत्या. त्यांच्या आग्रहाखातर दिनकररावांनी तो विकला नाही.
      घर बांधले तरी बरेच पैसे शिल्लक होते. बँकेत ठेवून फार व्याज येणार नव्हते. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही संपलेला. दिनकररावांची शेतीची आवड जागी झाली. पत्नीशी चर्चा करून त्यांनी घरापासून पाच किलोमीटरवरच्या गावठाणातील कॅनॉलकडेची चार एकराची शेतजमीन घेतली. त्या शेताच्या आजूबाजूचे अनेक शेतकरी शेतातच वस्तीला राहायचे. ते पाहून दिनकररावांनीही शेतात तीन खोल्यांचे टुमदार घर बांधले. ते आणि पत्नी अधूनमधून शेतात जाऊन राहू लागले. दोन्ही मुलांची वर्षाच्या फरकाने लग्न झाली. सुना चांगल्या होत्या. सासू-सासऱ्यांची चांगली काळजी घ्यायच्या. सासूची सुनांना मदतच व्हायची. हळहळू दोन्ही सुनांना मुले झाली. नातवंडांना खेळवण्यात सुमनताईंचा वेळ निघून जायचा. त्यांचे हळूहळू शेतात जाणे कमी झाले. दिनकररावांचा दिनक्रम मात्र ठरल्यासारखा होता. ते शेतात जायचे सोडत नव्हते. शेतातील वाढणारी पिके पाहायला त्यांना आवडायचे. काही काम असले की एखादा दिवस ते मुक्कामालाही राहायचे.
     दोन्ही मुलांची नोकरी सुरू होऊन आठ दहा वर्ष झाली. एवढ्या वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांना आता आपण स्वत:चा उद्योग सुरू करावा, असे वाटू लागले. दोघे पैसे कसे जमवायचे, याचा विचार करत. फाउंड्री सुरू करायची, हा एकच विचार त्यांच्या डोक्यात होता. मात्र उद्योग उभा करायचा, तर भांडवल पाहिजे. ते आणायचे कोठून, याच प्रश्नाचे उत्तर दोघे भाऊ शोधत होते. फ्लॅट विकायला सांगितला तर आई विकू देणार नाही आणि तेवढे पैसे पुरणारही नाहीत, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे शेती आणि फ्लॅट दोन्ही विकले तरच बँक कर्जासाठी आवश्यक असणारी तारण रक्कम उभी राहू शकते, हे त्यांच्या लक्षात आले.
     हा विषय वडिलांकडे काढता येणार नव्हता. हा विषय आईजवळच काढणे इष्ट राहील, हे त्यांच्या लक्षात आले. दोघांची सुट्टी गुरूवारी असायची. त्या दिवशीही दिनकरराव नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दोघांचीही मोठी मुले अंगणवाडीत गेली होती. तर धाकटी आजीजवळ खेळत होती. ही वेळ साधून मुलांनी आईकडे विषय काढला. शेती आणि सध्या रिकामा असलेला फ्लॅट विकावा आणि आम्हाला धंदा काढायला मदत करावी, असे दोन्ही मुले एकसुरात सांगत होती. सुमनताईंना हे अनपेक्षित होते. त्यांना पतीचे शेतीप्रेम माहीत होते. नोकरीत असताना अनेकांची शेती त्यांनी मनोभावे फुलवली होती. त्यावेळी आपली पण शेती असावी, असे त्यांना वाटायचे. ते त्यांचे स्वप्न सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता कोठे पूर्ण झाले होते. पोटच्या पोरांइतकेच ते शेतीवर प्रेम करत होते. हे सर्व माहीत असलेल्या सुमनताईंनी ही गोष्ट शक्य नसल्याचे सांगितले. मुलांनी हरतऱ्हेने समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. दोघेही नाराज झाले. तो विषय थांबवून सुमनताई नातवंडाशी परत खेळू लागल्या. दोन्ही भाऊ हॉलमध्ये बेचैन अवस्थेत बसून चर्चा करू लागले. उद्विग्नता बाहेर पडत होती. ही चर्चा ऐकणारी थोरली सून म्हणालीसुद्धा 'नाही ना त्यांची इच्छा, तर विषय सोडून द्या ना. नाही तरी आपले चांगलेच चालले आहे की. काय कमी आहे आपल्याला'. यावर धाकटा बोलला, वहिनी, तुला यातलं काही कळत नाही. आपला व्यवसाय सुरू झाला तर आपल्याला दुप्पट चौपट पैसे मिळतील. मुलांना चांगल्या शाळेत घालायचे, त्यांचे सारे करायचे तर आता मिळतात ते पैसे पुरतील का? शाळांची फी आता लाखात आहे. हे सारे करायचं तर उद्योग सुरू केल्याशिवाय पर्याय नाही. ही म्हातारा म्हातारी मेल्यावरच ते शक्य होईल, असं दिसतंय!'
ज्या पोरांना तळहातावरच्या फोडासारखे जपले, त्यांची आजारपणं झेलली. शिकवून इंजिनिअर केले. त्यांच्या तोंडातील हे शब्द कानावर पडताच सुमनताई हलक्याशा कण्हल्याचा आवाज आला. आईसारखे सासूवर प्रेम करणारी सून पळत गेली. मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच सुमनताईनी प्राण सोडलेला. 'हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू' हे कागदावरील कारण सर्वांना कळाले. घरात काय विषय झाला होता, हे दिनकररावांना कळू नये, याची मुलांनी खबरदारी घेतली. आता सासू गेल्यानंतर नवऱ्याने आणि दिराने पुन्हा शेत विकायचा विषय काढायचा नाही, ही अट घालून सूनही गप्प बसली. दु:खाचे दिवस संपले आणि पुन्हा प्रत्येकजण आपापल्या व्यापात बुडाला.
       आता दिनकरराव शेतातच राहायला लागले. शेत चांगले पिकवत होते. बायको अचानक कशी गेली. शेवटचे बोललीसुद्धा नाही, याचे दु:ख विसरण्यासाठी शेतातच ते रमत. वर्षांमागून वर्षे सरली. आता पावसाचे काही खरे नाही, असे वाटावे इतका निसर्गही बदलला. मात्र दिनकररावांची शेती कॅनॉलजवळ असल्याने पाणी यायचे. शेतात विहीरही होती. त्या भागातील शेती हिरवीगार होती. मात्र अनेकदा पाऊस पडला नाही की तळ्यातच पाणी नसायचे. मग कॅनॉलचा पाणी पुरवठा नियंत्रित व्हायचा. तरीही दिनकरराव काटकसरीने पाणी वापरून शेत चांगले पिकवायचे. आठवड्याला शहरात जाऊन नातवंडाबरोबर खेळून पुन्हा नवा उत्साह घेऊन शेतात यायचे.
     या वर्षी मात्र चित्र काही वेगळेच दिसत होते. हवामान खात्याने जूनमध्ये पाऊस येणार नाही, असेच सांगितलेले. जुलै संपत आला तरी पाऊस नव्हता. जमिनीत बी तर पेरलेले, पण पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांचीच काळजी वाढलेली. पेरलेले काहीच उगवणार नाही, अशीच सारी चिन्हे. हवामान खात्याचा अंदाज होता की नेहमीइतका पाऊस पडणार. प्रत्येक प्रयोगशाळेचा अंदाज वेगळा होता. कोणी शंभर टक्के तर कोणी नव्वद टक्के पाऊस पडणार म्हणत होते. मात्र, तो कधी पडणार, हे सांगायला कोणीच तयार नव्हते. हवामान खात्याचा अंदाज चेष्टेचा बनत चालला. दिनकररावांना मात्र खात्री होती- पाऊस येणार!
      जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला. हवामान खाते आता मुसळधार पाऊस पडणार, असे सांगू लागले.  मात्र सर्वांनीच हा अंदाजही चेष्टेवर नेला. कोणालाच विश्वास वाटत नव्हता. दिनकररावही शेतात फिरत होते. आकाशात काळे ढग जमू लागले. काही मिनिटांत ढगांनी आकाश झाकोळले. जोरदार पाऊस येणार असे चिन्ह दिसू लागताच ते शेतातील घरात परतले. पाऊस सुरू झाला. दिनकरराव खूश झाले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही पाऊस तसाच पडत राहिला. वरच्या बाजूला डोंगरात जोरात पाऊस पडत असल्याच्या बातम्या येत होत्या. एकएक करत सर्व धरणे भरू लागली. धरणाचे पोट तुडुंब भरल्यानंतर आणि धरण फुटायची वेळ आल्यानंतर पाणी सोडायला सुरूवात झाली. एकेक करत वरच्या डोंगररांगांतील लहानमोठ्या सात प्रकल्पांचे दरवाजे उघडले. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. येणारे पावसाचे पाणी आता धरणात न थांबता नदीच्या पात्रातून धावू लागले. एकाचवेळी सर्व पाणी आल्याने नद्यांना पूर आला. पावसाचा जोर वाढतच गेल्याने पाणी आणखी वाढू लागले. गावेच्या गावे पुराच्या पाण्याखाली गेली. शहरातही पाणी शिरल्याची बातमी आली. शहरातील आपल्या विश्रामनगर भागात पाणी पोहोचत नाही, हे दिनकररावाना माहीत होते. फोनवर सुना-नातवंडाशी ते बोलत होते. सर्व कुशल असल्याचे पाहून तेही निर्धास्त राहिले.
     पूर एक दोन दिवसात उतरेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र चार पाच दिवस झाले तरी पाऊस थांबायचे आणि पूर ओसरायचे नाव घेत नव्हता. शहराची चारी बाजूनी कोंडी झाली. पुरात अडकलेल्या लाखो लोकांना वाचवण्यासाठी सैन्याला आणि एनडीआरएफला बोलावले. मदतकार्य मोठ्या प्रमाणात सुरू झाले. तात्पुरत्या निवारा छावण्या उभारल्या जात होत्या. लोकांना त्यामध्ये आसरा दिला जात होता. ज्यांना पुराचा फटका बसला नव्हता ते लोक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत होते. शहराला पाण्यासह सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा थांबलेला. पेट्रोल, डिझेलवर प्रशासनाने निर्बंध टाकले. शहराचा पाणी पुरवठा थांबलेला. या पाणीबाणीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. शहराच्या उत्तरेकडून येणारे दुध घरोघरी मिळत होते. मात्र भाजीपाला कोठेच मिळत नव्हता. शेतात लावलेला भाजीपाला पावसाने चांगलाच तरारला होता. एरवी दिनकरराव तो आठवड्याला घरी घेऊन जायचे. सूनबाईनी भाजीची अडचण सांगितलेली त्यांनी मनावर घेतली. शेतात फिरून घरासाठी आणि शेजाऱ्यांसाठी भरपूर भाजी काढली. आठदहा दिवस पुरेल एवढी भाजी. दोडका, दुधी, वांगी, घेवड्याच्या शेंगा, शेपू, पालक, मेथी अशा सर्व भाज्यांचे गाठोडे बांधले आणि ते विश्रामनगरातील आपल्या घरी आले. थोरली माहेरी गेलेली. ती तिकडेच अडकली होती. धाकटी एकटीच घरी होती. कारखाने बंद असल्याने दोन्ही मुलेही घरीच होती. शेतातल्या ताज्या भाज्या पाहून सून आनंदली.
     दिनकरराव पावसात भिजलेले. त्यामुळे अंगात बारीकसा ताप आलेला. सून स्वंयपाकाच्या तयारीला लागली, तसे दिनकररावच तिला म्हणाले, 'भाज्या शेजाऱ्यांनाही दे, म्हणजे त्यांनाही ताज्या भाज्या खाता येतील.' सून भाज्या वाटायला गेली. दोन्ही भावांच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू झाले. हवामान खात्याने पावसाचा जोर वाढतच जाणार, असे सांगितले होते. म्हणजे पूर वाढत जाणार होता. सून घरी येताच त्या दोघांनी 'वडिलांना दवाखान्यात नेतो' असे सांगितले. दोघांनी वडिलांना गाडीत घेतले. गाडी बाहेर काढून त्यांनी ती अपार्टमेंटच्या दिशेला वळवली. दिनकररावानी विचारलेपण 'अरे इकडे कुठे?' यावर थोरला म्हणाला, 'अपार्टमेंट खाली केलीय. आपला फ्लॅट तर रिकामाच आहे ना. रिकाम्या फ्लॅटमध्ये चोऱ्या होतात. आपण फ्लॅट बघून जाऊ.' दिनकररावांनाही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, असे वाटले. अपार्टमेंटच्या खाली पाणी गुडघाभर होते. ते पाण्यातून आत गेले. फ्लॅटमध्ये सर्वत्र फिरत दिनकरराव जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच दोघेही हळूच बाहेर पडले आणि बाहेरून कुलुप लावले. दिनकरराव हॉलमध्ये आले, तर हॉलच्या खिडकीतून मुलांची गाडी जाताना दिसली. त्यांनी हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण तेथे कोणीच नव्हते. फ्लॅटचा दरवाजाही बंद होता.
     दिनकरराव बाहेर बघत बसले. दवाखान्यात जायचे म्हणून त्यांनी मोबाईलपण घेतला नव्हता. कोणाला फोन करता येत नव्हता. ते हताशपणे कॉटवर बसले. बाहेर कोणी दिसते का, ते पाहत होते. मात्र सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. माणसाचा मागमूसही नव्हता. असाच एक दिवस गेला. तोपर्यंत पाणी आणखी वाढले. ते कॉटवर बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पाणी फ्लॅटमध्ये घुसू लागले. बारा वाजेपर्यंत पाणी कॉटला चिकटले. आता मात्र त्यांना भीती वाटू लागली. मुलांनी असे का केले असावे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. दोन दिवसापूर्वी दुपारी जेवण केलेले. अंगात बारीक तापही होता. रात्र पूर्ण अंधारात घालवलेली होती. हाका मारून अंगातली उरली सुरली ताकतही गेलेली. त्यांना अधूनमधून ग्लानी येऊ लागली. ते तशाच अवस्थेत कॉटवर पडायचे. पाणी कॉटवर चढले नव्हते. आता पातळी वाढायची थांबली होती. मात्र आपली कोणी सुटका करेल, असे त्यांना वाटेनासे झाले.
ते मनाने पूर्ण खचले असताना 'कोणी आहे का आत?' अशी हाक आली. अर्धमेल्या अवस्थेत त्यांनी खिडकीकडे हात नेला आणि खिडकी हलवली. अशक्तपणामुळे घशातून आवजही येत नव्हता. बाहेरच्या तीक्ष्ण नजरांनी ती हालचाल टिपली आणि बोट त्या फ्लॅटकडे घेतली. खिडकीतून पाहिले तर आत दिनकरराव होते. त्या बोटीत स्थानिक वृत्तपत्रात कृषीविषयक लेखन करणारा पत्रकार सुधाकरही होता. तो दिनकररावांना ओळखत होता. दिनकररावांच्या शेताजवळ त्याचा वृद्धाश्रमही होता. दहा पंधरा वृद्धांना तो सांभाळायचा. दिनकररावही तेथे अधूनमधून त्याच्याबरोबर जायचे. कधीकधी शेतातला भाजीपाला द्यायचे. त्या वृद्धांना पाहून आपण किती सुखी आहोत, असे वाटायचे. घरात सर्वत्र पाणी. खिडक्यांना ग्रील. बाल्कनी तेवढी विनाग्रीलची. त्याने दिनकररावांना बाल्कनीकडे यायला सांगितले. दिनकररावांच्या अंगात तेवढेही त्राण नव्हते.
     शेवटी सुधाकरने बोट बाल्कनीकडे घेतली. तो आत गेला. दिनकररावांचे मुटकुळे उचलून बोटीत ठेवले. बोट सुसाट छावणीकडे नेली. तेथील डॉक्टरनी तपासून दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिला. दिनकरराव मुकाट राहिले. दोन दिवसांत औषधोपचाराने बरे वाटले. पुराची परिस्थिती अजूनच भयानक झालेली. दिनकररावांच्या अपार्टमेंटचा दुसरा मजलाही पाण्याखाली गेलेला. त्यांच्या मनातील घालमेल वाढली होती. ते अस्वस्थ होते. मुलांनी आपल्याला का कोंडले असावे, हा एकच विचार त्यांचे डोके बधीर करून सोडत होता. तेवढ्यात सुधाकर तिथं आला. त्यांनी त्याला आपण शेताकडे जाणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्याबद्दल कोणाला बोलू नको, असेही सांगितले. आवश्यक नोंदी करून त्यांनी छावणी सोडली.
     आता काही झाले तरी शेत सोडायचे नाही, असे त्यांनी ठरवले. इकडे घरी गेल्यांनतर सुनेने सासरे कोठे आहेत, असे विचारल्यावर दोन्ही मुलांनी औषधे घेऊन शेतात गेले, असे सांगितले. सासऱ्याचे शेतीप्रेम माहीत असणाऱ्या सुनेला ते पटले. आठ दिवसांनी पूर ओसरायला सुरूवात झाली. मुलांनी फ्लॅटकडे चक्कर मारली. बाल्कनीचे दार उघडे. मात्र आत वडील नव्हते. त्यांच्या फ्लॅटचा मजला पूर्ण बुडाला होता. वडील वाहून गेले असणार, अशी त्यांची खात्री पटली. आपल्या मार्गातील अडसर दूर झाल्यासारखे त्यांना वाटले. पूरात फ्लॅट बुडाल्याची आणि वडील बेपत्ता झाल्याची नोंद त्यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सक्रिय सुधाकरला हे समजले. त्याने दिनकररावांच्या कानावर ही गोष्ट घातली. आता त्यांना वृद्धाश्रमातल्या लोकांपेक्षा आपण कमनशिबी आहोत, असे वाटायला लागले. मुलांबाबत त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला.
     दुसऱ्या दिवशी दिनकरराव शहरात आले. मित्र शेटे वकिलांच्या घरी गेले. वकिलसाहेबांना आपले मृत्यूपत्र तयार करायला लावले. आपली जमीन आणि फ्लॅट त्यांनी सुधाकरच्या वृद्धाश्रमास दिला. शहरातील बंगला मुले आणि सुनांच्या नावावर केला. नेमके त्याच दिवशी दोन्ही मुले शेतात गेली. तिथे कोणीच नाही हे पाहून त्यांना वडील गेल्याची खात्री पटली. आता विक्रीची प्रक्रिया करायला हरकत नव्हती. वडिलांचे वकिल  मित्र ॲङ शेटे आपल्याला चांगली मदत करतीलम्हणून दुसऱ्या दिवशी दोघे भाऊ शेटे वकिलांना भेटायला गेले. वकिल साहेबांना फ्लॅट आणि शेती विक्रीसाठी जाहिरात बनवायची, असे सांगितले. वकिलसाहेबांनी कागदपत्रे पाहिली आणि शांतपणे सांगितले की, ही जमीन आणि फ्लॅट आता त्यांना विकता येणार नाही. त्यांच्या वडिलांनी कालच मृत्यूपत्र केले आहे. या दोन्ही मालमत्ता त्यांनी वृद्धाश्रमाच्या नावे केल्या आहेत. दोघांनीही हे कसे शक्य आहे, असा एका सुरात प्रश्न विचारला. यावर वकिल साहेब काहीच बोलले नाहीत. त्यांनी शांतपणे मृत्यूपत्र त्यांच्यासमोर ठेवले आणि ते दोघेही सुन्न होऊन त्याकडे पाहातच राहिले.

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

अजुनि यौवनात मी....


पृथ्वीला आपण स्त्री-रूपात मानतो. तो गुरू, तो शनी, तो शुक्र असे म्हणतो. मात्र पृथ्वीच्याबाबत ती पृथ्वी असते. तीला आपण माता, जननी यारूपात मानतो. कुसुमाग्रजानी तिला सूर्याच्या प्रेयसीच्यारूपात पाहीले. त्यांनी तीचे प्रेमगीत लिहिले आणि मानवाने तीचे वय शोधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक आधुनिक प्रयत्नातून पृथ्वीचे वय आणखी जास्त येत राहीले. पृथ्चीच्या वय शोधण्याच्या विविध पद्धतींचा आढावा २८ फेब्रुवारी २००१ रोजीच्या 'सोलापूर तरूण भारत' तर्फे प्रकाशित झालेल्या 'विज्ञान दिन पुरवणी'मधील लेखामध्ये घेण्यात आला होता. तो लेख येथे प्रसिद्ध करत आहे....... 
--------------------------------------------------------------------------------------------
पृथ्वीला मानवाने जननी, माता अशा असंख्य विशेषणांनी गौरविले आहे. मूळात पृथ्वी ही माता आहे सर्वांची जननी आहे, असेच मानले जाते. पृथ्वीला स्त्री मानून अनेक उपमाही देण्यात आल्या आहेत. कुसुमाग्रजांनीही या पृथ्वीला सूर्याच्या प्रेयसीच्या रूपात पाहिले. त्यांच्या मते ही पृथ्वी आपल्या प्रियकराला म्हणजेच सूर्याला भेटण्यास व्याकूळ झाली आहे. ती आपल्या प्रियकराला विनवते आहे. प्रेमाची याचना करत म्हणते आहे.
                    'युगामागूनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतीची याचना.'
      बरं, ही सूर्यावर प्रेम करणारी प्रेयसी आपली व्हावी, तीने आपल्यावर प्रेम करावे म्हणून अनेकजन तिच्यावर प्रेम करत आहेत. लाख नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. तिचे रूप पाहून चंद्र तिच्या भोवती फिरतो आहे. उसना आणि फुकटचा रूबाब आणून चंद्र तिला मोहवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर लाजरा मंगळ हा लज्जेने ला होऊन पृथ्वीकडे प्रेमयाचना करतो आहे. ध्रुवांनी पृथ्वी आपल्या प्रेमयाचनेला दाद देत नाही म्हणून व्रतस्थ होणं पसंत केले आहे. तर शुक्राला अजूनही आशा आहे की पृथ्वी आपले प्रेम स्वीकारेल. त्याच्या प्रेमळ नजरेत आजही आशेचा किरण दिसतो आहे. हे सारे माहीत असूनही ही पृथ्वी वेड्यासारखी सूर्याभोवती पिंगा घालते आहे. कारण, तिला दुर्बळांचा शृंगार नको आहे. तिच्या नजरेत तिच्यायोग्य साथीदार केवळ सूर्य आहे. सूर्य आपला झाला नाही तरी चालेल, पण दूसऱ्या कोणाची मी होणार नाही हा तीचा निर्धार आहे. याच भावनेने ती मानिनी म्हणते.
'परी भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहूनी साहवे.'
      'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेत कुसुमाग्रजांनी पृथ्वीच्या मनोभावना अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेल्या आहेत. आमच्यावेळी म्हणजे १९८४-८५च्या अकरावीच्या पुस्तकामध्ये हे काव्य मराठी विषयामध्ये अभ्यासाला होते. हे काव्य शिकताना आम्ही कुसुमाग्रजांची प्रतिभा आणि पृथ्वीच्या प्रेमाची
संकल्पना पाहून त्यावेळी थक्क झालो होतो. पृथ्वी स्वत:च्या प्रियकराच्या कल्पना निश्चित ठरवून निश्चिं आहे. हे सारे आठवले कारण पृथ्वीच्या वयाचा शोध घेण्याचा प्रयत्नांची माहिती वाचनात आली. पृथ्वी ही स्त्री आहे आणि स्त्री आपले खरे वय सांगत नाही असे म्हटले जाते. तसेच काहीसे पृथ्वीच्या वयाबाबतही असल्याचे लक्षात आले. अनेक संशोधकांनी अनेक वर्षापासून पृथ्वीचे वय शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही पृथ्वीचे वय अंदाजेच सांगितले जाते. अशा या भास्कराच्या प्रेयसीला तिचं वय विचारलं तर

      अर्थातच तिचे र्त हे याबाबतही स्त्रीसुलभ आहे. ती तिचे खरे वय सांगावयास तयारच नाही. कोणत्याही चतुर आणि सुंदर स्त्रीप्रमाणेच तिने तिच्या वयाचे निश्चित अनुमान किंवा थांगपत्ता लागू दिलेला नाही. ही व्याकूळ प्रेयसी वय सांगताना मात्र सावधपणे वागताना दिसते. पृथ्वीचे खरे वय काय असावे याचा शोध मानवाने अनेकवेळा आणि अनेक प्रकारे घेतला आहे. या विविध पद्धतींचा आणि पृथ्वीचे वय शोधण्याच्या प्रयत्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
      कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतात वर्णनामध्ये चंद्र, मंगळ, शुक्र यांना पृथ्वीचे वय कमी वाटणे स्वाभाविक आहे. पण अगदी परवा परवापर्यंत म्हणजे सन १९२० पर्यंत मानवालासुद्धा ही पृथ्वी फारच तरूण वाटायची. त्यानंतर आज संशोधकांनीसुद्धा पृथ्वीचे वय ४५० कोटी वर्ष असल्याचे मान्य केले. १९२० पूर्वीतर ही सूर्यदेवतेची प्रेयसी तीन चार हजार वर्ष वयाची नवयौवना मानण्यात येत होती.
      पृथ्वी आणि विश्वाची निर्मिती एकाचवेळी झाली असे मानले जाते. अनेक धार्मिक थांमधून विश्वाचा विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कल्पना मांडण्यात आल्या आहेत. 'जिनेसीस' या पुस्तकामध्ये ख्रिश्चन आणि ज्यू धर्मामध्ये मान्य संकल्पनाप्रमाणे ही पद्धत वर्णिलेली आहे. त्याचा वापर करून जॉन लिफ्टहूट यांनी पृथ्वीची जन्मवेळ निश्चित केली. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीचा जन्म सकाळी नऊ वाजता, २६ ऑक्टोबर ४००४ (ख्रिस्तपूर्व) रोजी झाला. परंतु हे वय काही खरे नसल्याचा आणि पृथ्वी आपले वय लपवत असल्याचा संशय संशोधकांना आला आणि वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून पृथ्वीचे वय शोधले जाऊ लागले.
      अठराव्या शतकात, पृथ्वीचा जन्म हा विश्वनिर्मितीनंतर झाला असावा असा एक मतप्रवाह आला. फ्रान्समधील एक मतप्रवाह आला. फ्रान्समधील संशोधक कोम बफन यांनी पृथ्वीचे वय शोधण्यासाठी प्रयोग सुरू केले. त्यांनी असे प्रतिपादन केले की, पृथ्वी जन्मली तेव्हा तप्त लाव्हारसाचा गोळा असावी. त्यानंतर हळूहळू ती थंड होत गेली. या अनुमानानुसार त्यांनी एक गोळा तयार केला. त्याच्या थंड होण्याच्या दराचा अभ्यास करून पृथ्वीचा जन्म ७५ हजार वर्षापूर्वी झाला असल्याचा निष्कर्ष मांडला.
      सन १८६२ मध्ये लॉर्ड केल्वीन या संशोधकाने बफनच्या प्रयोगाचा अभ्यास केला. त्यात अनेक त्रुटी राहिल्याचे त्यांच्या लक्षात आलं. गुरूत्वीय बलासारख्या अनेक राहून गेलेल्या बाबी विचारात घेऊन त्यांनी पृथ्वीचे वय शोधण्यासाठी प्रयोग केला. पृथ्वीमधून उष्मा वहनाचा दर, सौर उर्जेपासून मिळणारी उष्णता, वाऱ्यामुळे आणि सागरी लाटांतून निर्माण होणारा उष्मा या सर्व बाबींचा साधकबाधक विचार करून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, पृथ्वीचे वय हे दोन कोटी ते चार कोटी वर्षे इतके असावे.
      भौतिकशास्त्राप्रमाणेच इतर विज्ञानशाखांतील संशोधक पूर्ण एकोणिसाव्या शतकामध्ये पृथ्वीचे वय शोधण्यासाठी त्या त्या वियांतील संकल्पना वापरून प्रयोग करत होते. भूगर्भशास्त्रज्ञ चार्लस लिल याने खडक कसे निर्माण झाले असावेत याचा भ्या सुरू केला होता. खडकांची निर्मिती, त्यांची झिज आणि पुननिर्माण यांच्या अभ्यासातून पृथ्वीच्या वयाचा अंदाज बांधता येईल, असा त्यांना विश्वास होता. त्यांच्या म्हणण्यानुसार खडक निर्माण होताना लाव्हा थंड होण्याची प्रक्रिया प्रदीर्घ काळ सुरू असावी. त्यामुळे केल्विनच्या कल्पनेप्रमाणे पृथ्वीचे वय शोधणे हे पूर्णत: चूक होते. त्यांनी पृथ्वी ही केल्वीनच्या निष्कर्षापेक्षा फार अगोदर तयार झाली असावी किंवा ती कायमस्वरूपी अशीच असावी असे मत मांडले.
      या वय शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये जीवशास्त्रज्ञही मागे नव्हते. जीवशास्त्रज्ञानांही केल्विनच्या या निष्कर्षाबाबत समाधान वाटत नव्हते. चार्लस डार्विनचा उत्क्रांतिवाद हा जगभर मान्यता पावत होता. त्यानुसार क्रमाक्रमाने वेगवेगळ्या जातीप्रजातींची निर्मिती झाली हे संशोधकांनी स्वीकारले होते. या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार उपलब्ध प्रगल्भ जीवसृष्टी निर्मितीसाठी किमान चार कोटी वर्षे तरी लागली असावीत. याचाच अर्थ पृथ्वीचं वय चार कोटी वर्षापेक्षा जास्त असावे.
      एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीस भूगर्भशास्त्रज्ञांची खात्री झाली की, पृथ्वीचं वय दहा कोटी वर्षांपेक्षा जास्त असावे. परंतु या त्यांच्या मतांच्या पुष्ट्यर्थ देण्यासाठी त्यांच्याकडे भक्कम पुरावे नव्हते. डब्लीनमधील भूगर्भसंशोधक जॉन जॉली यांनी एक नवा मार्ग शोधून काढला. त्यांनी सर्व घटकांचा विचार करता पृथ्वीवरील समुद्रातील पाण्याची क्षार क्षमता किती प्रमाणात वाढते याचा अभ्या सुरू केला. दरवर्षी हा प्रयोग करून अनेक वर्षानंतर पृथ्वीचे वय नव्वद कोटी वर्षे असावे असा निष्कर्ष काढला. परंतु समुद्रातील क्षार असमान पद्धतीने बाहेर पडतात. त्यामुळे या प्रयोगातही त्रुटी आढळून येतात.
      सन १८९६ मध्ये बेक्वेरेल यांनी रेडिओ ॲक्टिव्हीटी किंवा किरणोत्साराचा शोध लावला. या शोधानंतर पृथ्वीचे वय म्हणजे पृथ्वीच्या वर्तमान घनता आणि वस्तुमानासह अस्तित्वात आल्यापासूनचा कालावधी असे मानण्यात येऊ लागले. मेरी क्युरी आणि रूदरफोर्ड यांनी किरणोत्साराबाबत संशोधन पुढे नेले. किरणोत्सार होत असताना मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते हे सिद्ध झाले. केल्वीनने याबाबतचा विचार केला नव्हता. याचाच अर्थ केल्वीनचा निष्कर्ष अचूक नव्हता.
      पृथ्वीच्या विविध थरात उपलब्ध असणाऱ्या आयसोटोपच्या प्रमाणावरून किरणोत्सार किती झाला असेल याचा अंदाज बांधता येणं शक्य झाले. किरणोत्सार हा ठराविक सुत्रानुसार होतो हे लक्षात आल्यानंतर संशोधकांच्या आशा बळावल्या. या तत्वाचा वापर करून विविध मूलद्रव्यांसाठी हा अभ्यास होऊ लागला. किरणोत्सारी शिसे या धातूचा अभ्यास करून पृथ्वीचे वय ठरविण्यात आले. या अभ्यासात पृथ्वीवरील खनिजातील शिशाचा विचार करण्यात आला होता. या पद्धतीने पृथ्वीचे वय हे साडेतीनशे कोटी वर्षे एवढे निश्चित करण्यात आले.
      दुसरा महत्त्वपूर्ण किरणोत्सारी धातू किंवा मूलद्रव्य म्हणजे युरेनियम! युरेनिमचे दोन किरणोत्सारी आयसोटोप पृथ्वीवर १.६४: या प्रमाणात मिळून येतातत्यांच्या किरणोत्साराच्या प्रमाणावरून पृथ्वीचे वय ठरविण्यात आले. या मूलद्रव्यांच्या किरणोत्साराच्या अभ्यासावरून पृथ्वीचे वय हे सहाशे साठ कोटी वर्षे असावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
      खनिजातील शिशाच्या प्रमाणावरून पृथ्वीचे वय शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु विशिष्ट खनिजातील शिशाचे प्रमाण बदलत जाते. तरीही अंदाजे पृथ्वीचे वय हे तीनशे कोटी वर्षे असावे असे निश्चित करण्यात आले आहे.
      सर्वांनी स्वीकारण्यास तयारी दर्शवलेली पद्धती ही सुद्धा किरणोत्साराशी निगडित आहे. पृथ्वीवर वेळोवळी उल्कापात होत असतात. वेळोवेळी पृथ्वीवर आलेले उल्कांचे खडक हे निवडले जातात. त्यामधील शिसे हेच मूलद्रव्य आधारभूत मानले जाते. त्यानुसार त्या खडकाचे आयुष्य काढण्यात येते. त्यांचे आणि पृथ्वीचे वय सारखेच आहे असे मानण्या येते. या पद्धतीने पृथ्वीचे वय हे चारशे साठ कोटी वर्षे आहे असे मानतात.
      पृथ्वीचं वय ठरविण्यासाठी अशा भिन्न मार्गांचा वापर करण्यात आला आहे. विविध प्रयोगाचे निष्कर्ष हे वेगवेगळे आहेत. यापैकी कोणत्याही दोन पद्धतीद्वारा पृथ्वीचं एकच वय सांगता येत नाही. आजमितीला आपण पृथ्वीचं वय चारशे साठ कोटी वर्षे असल्याचे मान्य करत आहोत.
      धर्म संकल्पना किंवा साहित्य यामध्ये उपलब्ध ज्ञानाचे प्रतिबिंब दिसून येत असते. अनेक साहित्यकृतीमध्ये पृथ्वीचे वय चारशे साठ कोटी वर्षे मान्य करण्यात आले असले तरी ते निश्चित मानता येत नाही. त्यातही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र पृथ्वीला जर कधी आपले मन मोकळे करण्याची संधी मिळाली तर ती मानवावरचा राग व्यक्त करेल यात शंकाच नाही. आपण संपूर्ण मानवजात पृथ्वीकडून काहीना काही घेतच असतो. देतो मात्र प्रदूषण आणि घाण! हे कमी की काय म्हणून मानवाने पृथ्वीच्या वयाबाबत नको तेवढे कुतूहल दाखवले आहे. या पृथ्वीला तिच्या प्रियकराला भास्कराला भेटायला आणखी पाच कोटी वर्षे लागणार असेही सांगायला सुरूवात केली आहे. ते काही असेल पृथ्वीच्या वयाचे कोडे अजूनतरी निश्चितच सुटलेले नाही. ‘अजुनी यौवनात मीम्हणत सूर्याभोवती स्वत:चे प्रेमगीत गात पृथ्वी फिरत आहे हेच खरे!