________________________________________________________
ll १ ll
एप्रिल महिन्याचा दुसरा शुक्रवार. साडेसहाची वेळ. पुढचे
दोन दिवस सुट्टी. कार्यालयातून बाहेर पडताना, ‘गाडीमध्ये बॅग ठेवून थोडा चालण्याचा व्यायाम करू या. आज थोडे लवकर घरी जाऊ या, असे विचार सुरू होते. गाडीजवळ पोहोचलो. त्याचवेळी गाडीवर ‘टप्प’ असा आवाज झाला. काय पडले
म्हणून पाहिले, तर एक जांभूळ गाडीच्या टपावर विसावलेले. लहानपण
आठवले. काहीही विचार न करता मी पटकन जांभूळ उचलले. स्वच्छतेचे
नियम, कोरोना काळ काही मनात येण्याअगोदर फुटलेला भाग सोडून ते
अधाशासारखे खाऊनही टाकले. नंतर जिव्हेचा रंग निळा झाला की नाही,
ते एकदा जीभ बाहेर काढून पाहिलेही. लहानपणची सवय,
दुसरे काय? आणि मग फिरताना डोक्यात जांभूळ घुमू
लागले. काही केल्या जाईना. दुसऱ्या दिवशी
सकाळच्या उन्हात त्या झाडाकडे बारकाईने पाहिले आणि जांभळाचा मौसम सुरू झाल्याची खात्री
पटली.
जांभूळ... रंगावरून नाव मिळालेले फळाचे झाड. याला ‘वृक्षराज’ म्हणायला हवे. फळांचा राजा असेल आंबा; पण, झाडांचा राजा जांभूळच. मराठीत जांभूळ आणि अनेक वचनात जांभळं असे नाव मिळालेला प्राचीन काळापासून माहीत असणारा वृक्षराज! याला बंगालीमध्ये कालाजाम, बजाम, गुजरातीमध्ये जम्बू, रायजंबो, जामून, उर्दूमध्ये जामून, हिंदीत जामून, राजजामून, बडी जामून, कन्नडमध्ये नेराले बीजा, जम्बू नेराले, मल्याळममध्ये जावल, ओडिसीमध्ये जाम कोल, जामू कोल, पंजाबीमध्ये जामून, तमिलमध्ये नवल, तेलगूमध्ये अलला नेरेडुचेट्टु, नेरेडू चेट्टू म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये याला जंबू, राजजंबू, महास्कंध, नीलफलं, सुरभापत्र, आणि फलेंद्र म्हणतात. देवांचा राजा इंद्र तसा फळांचा राजा जांभूळ. इंग्रजीमध्ये त्याला जावा प्लम, ब्लॅक प्लम, इंडियन ब्लॅक प्लम, जांबोलान प्लम, जांभूळ, जंबू ही नावे देण्यात आली आहेत. चीनीमध्ये ‘वू मो’ म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘सिजिजियम क्युमिनी’ आहे. जांभूळ ही मिरटॅशिए कुलातील झाड आहे.
जांभूळ, मूलत: दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळणारे
झाड. या झाडाच्या आजच्या आशिया खंडात असणाऱ्या वास्तव्यामुळे प्राचीन ग्रंथामध्ये
भारतीय उपखंडास जंबूद्विप म्हणत. भारताखेरीज जांभूळ वृक्ष, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया,
नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया खंडाच्या काही भागात आढळते. अमेरिकेत हे झाड १९११ मध्ये गेले. सध्या आफ्रिकेतही जांभूळ
वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हा वृक्ष समुद्र किनारी
जोमाने वाढतो. अगदी ६००० फूट उंच पर्वतरांगातही जांभूळ आढळते.
मात्र, त्याची उंची फार वाढत नाही. पाण्याचा चांगला निचरा होणारी कोणतीही जमीन या झाडाला चालते. काळ्या निचरा होणाऱ्या जमिनीत याची
चांगली वाढ होते. अडिचशे ते २००० मिलिमीटर पाऊस झेलण्याचे आणि
वेगवान वाऱ्यातही टिकून राहण्याचे कसब याच्यात असते. जांभूळ
वृक्षाला उष्ण आणि समशितोष्ण वातावरण चांगलेच मानवते. समुद्र
सपाटीपासून १५० मीटर उंचीपर्यंत हे झाड चांगले वाढताना आढळते. जांभूळ सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते. हा एक काटक वृक्ष
आहे. पाणी कमी मिळाले तरी, झाड टिकून राहते.
पाण्याचा निचरा होणारी, सुपीक, काळी किंवा गायरानाची हलकी पडीक जमीन जांभूळ झाडासाठी खूप चांगली असते.
जांभूळ हा सदाहरित, सपुष्प आणि दीर्घायुषी वृक्ष
आहे.
जांभूळ वृक्षाची निर्मिती बियांपासून होते. बिया दंडगोलाकार, मध्ये थोड्याशा दबलेल्या असतात. बियांवर पांढरे हलके
आवरण असते. या आवरणाला फळाच्या रसाचा रंग लागल्याने ते आवरण जांभळे
बनते. आतमध्ये द्विदल बी असते. कडक वाळण्यापूर्वी
आतला भाग हिरवा असतो. वाळल्यानंतर आतल्या भागाचा रंगही पांढरट
होत जातो. या बिया चांगली माती आणि पाणी मिळताच आठवडाभरात रूजतात.
उगवताना रोप चॉकलेटी रंगासह खोडाला चिकटलेली पाने घेऊन येतात.
पाने समोरासमोर येतात. ही पाने खोडापासून वेगळी
होतात. रोप वाढत जाते. उंच होत जाते.
सुरूवातीला रोपाची वाढ वेगाने होते. तीन
– चार महिन्यांत रोप चांगले वाढून लावण्यायोग्य होते. रोपांची
वाढ होताना त्याचा रंग सुरुवातीला पोपटी आणि नंतर गडद हिरवा होत जातो. पुढे हळूहळू खोडावर पांढरा रंग यायला सुरूवात होते. रोप
साधारण सहा सात फूट उंच असताना त्याला फांद्या फुटतात. फांद्या
येतानाही चॉकलेटी-तपकिरी रंगांच्या येतात. त्यांचाही रंग बदलत प्रथम हिरवा आणि नंतर पांढरा होत जातो. फांद्या सुरुवातीला सरळ असतात मात्र पुढे जशा वाढत जातात, तशी त्यांची टोके
खाली झुकत जातात. फांद्या अशा झुकत असल्या तरी झाड उंच वाढत जाते. पानांनी भारलेल्या खाली झुकलेल्या फांद्यांसह जांभूळ वृक्षास पाहिले की पायापर्यंत
रूळणारे केस सोडून कोणी सुकेशिनी उभी आहे, असे वाटते. झाडांची
उंची अगदी शे-दीडशे फुटापर्यंत वाढत जाते. हल्ली असे जुने वृक्ष क्वचितच आढळतात. निसर्गात साधारणपणे
पन्नास-साठ फुट उंचीची झाडे आढळतात. मोठ्या
झाडांचा बुंधा एक मीटरपर्यंत व्यासाचा असतो. झाडाच्या फांद्यांचा
विस्तार पन्नास फुटापर्यंत वाढत जातो.
जांभूळ झाडाची साल बाहेरून पांढरी, राखाडी रंगाची असते. जी झाडे मुरमाड जमिनीवर असतात, त्यांची साल मात्र काळसर करडी बनते. सालीचे आवरण तुटत जाते आणि कात पडावी तशी गळते. सालीवर बोर, बाभूळ किंवा चिंचेच्या खोडांप्रमाणे खडबडीतपणा नसतो, ती मऊ आणि गुळगुळीत असते. झाडाच्या टोकाच्या फांदीपर्यंत ती तशीच असते. सालीचा आतील भाग गडद लाल असतो. खोडाचा पांढरा रंग जेथे संपतो, तेथे असणाऱ्या हिरव्या फांद्यावर पाने असतात. पाने असणारा भाग अनेकदा लाल-तपकिरी रंगाचा असतो.
झाडाची पाने चकाकतात. पाने वरच्या बाजूला गडद हिरवी आणि खालच्या बाजूला
पांढरट पोपटी असतात. त्यांची जाडीही इतर पानांच्या तुलनेत थोडी
जास्त असते. पाने सहा ते अगदी पंचवीस सेंटिमीटर लांब असतात.
त्यांची रुंदी अडिच ते दहा सेंटिमीटरपर्यंत असते. टोकाला ती निमुळती होत जातात. शेंड्यांच्या पानांना टर्पेंटाईनसारखा
वास असतो. पानाला पिवळसर पोपटी देठ असते. देठांच्या रंगाची शीर थेट पानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या मुख्य शीरेपासून अनेक उपशीरा फुटतात आणि त्या पानाच्या कडेला काही मिलिमीटर
आत एकमेकांना जोडल्या जातात. कडेजवळून असणाऱ्या या शीरेस अंतर्धारी
असे म्हणतात. पानाच्या उपशीरांना मध्येच आणखी छोट्या शीरा फुटतात
आणि त्या दुसऱ्या उपशीरेपर्यंत जातात. पानावर शीरा आणि उपशीरांचे
जाळे अगदी स्पष्ट दिसते. ही रचना पाहताना शालेय जीवनात पाहिलेल्या
कांद्यांच्या पेशींची आठवण होते. पानांची कडा ही पिवळी असते.
त्यामुळे पानांचे सौंदर्य खुलून दिसते. जांभूळ
सदाहरित वृक्ष असल्याने जुन होतील, तशी पाने प्रथम पिवळी पडतात
आणि नंतर गळतात. सर्व पाने एकाचवेळी गळत नाहीत. त्यामुळे या झाडाची कायम सावली मिळते. जांभळाची पाने
खाण्यासाठी अनेक प्रकारच्या अळ्या टपून बसलेल्या असतात. रेशमाचे
कीडेही या झाडावर चांगले वाढतात.
झाड सात आठ वर्षांंत पंधरा-सोळा फुट उंचीचे होते. तोपर्यंत
झाडाचा विस्तार चांगलाच झालेला असतो. अशा झाडाला जानेवारीच्या अखेरीस कळ्या येतात. फांद्यांच्या
टोकाला पानांच्या बेचक्यातून कळ्या येतात. कळ्या गुच्छाने येतात. कळ्या
बारीक मुगाच्या आकाराच्या आणि पोपटी रंगाच्या असतात. त्या वाढत जातात आणि आठ–दहा दिवसात त्यांचे फुलात रूपांतर होते. मात्र बाहेरून पाहिल्यावर या झाडांचे
फुलणे लक्षात येत नाही. फुलांचे सौंदर्य पानाआड जणू लाजून लपलेले असते. ही
फुले मोठ्या प्रमाणात असूनही पानाआड असल्याने दिसत नाहीत. त्यांचा मंद गंध या झाडाच्या
फुलण्याची वार्ता देतो. ज्यांची घ्राणेंदिये तीक्ष्ण नसतील, त्यांना मधमाशांच्या गुणगुणण्यातून हे लक्षात येते. झाडाच्या बुंध्यात उभा राहून वर कोवळ्या
फांद्याकडे नजर टाकली की ही फुले दर्शन देतात. फुले अतिशय सुंदर आणि देखणी असतात. ती
झाडावर फुलली की खालून केवळ पांढरा रंग दिसतो. फुले लहान आणि गुच्छामध्ये असतात. एका
गुच्छाची लांबी अगदी वीस ते पंचवीस सेंटिमीटर असते. मात्र या राजवृक्षाच्या फुलांचे
सौंदर्य जवळून पाहिल्याखेरीज लक्षात येत नाही.
फुलांचा रंग हा पांढरा किंवा हिरवट पिवळा असतो. फुलांना मंद गंध असतो. खरे
तर, हा गंधच पानाआड लपलेल्या फुलांच्या फुलण्याची बातमी कीटकांपर्यंत पोहचवतो. इवल्याशा कळ्यातून फुलणाऱ्या फुलांच्या कडेला असंख्य केसरदले–पुंकेसर
असतात. त्यांच्या टोकाला पिवळे गोंडे असतात. त्याच्या आतमध्ये रंगवल्यासारखा पिवळा भाग असतो. त्या
गोलाकार पिवळ्या रंगाच्या केंद्रस्थानी आवरणाखाली अंडाशय असते. त्यापासून एक पुंकेसराच्याच रंगाची
कुक्षी बाहेर पडते. तिला एक लहान
छिद्र असते. पुंकेसराआड अस्पष्ट चार पाकळ्या असतात. फुलांचे
फुलणे सुरू झाले की मधमाशांची शाळाच या झाडावर भरते. काही झाडांवर मधमाशांची पोळीही बसतात. महाबळेश्वरमध्ये ‘जांभूळ मध’ विक्रीसाठी असतो. प्रामुख्याने
मध गोळा करण्यासाठी येणाऱ्या मधमाशा आणि काही प्रमाणात इतर किटकांच्या माध्यमातून परागीभवन होते. हा वृक्ष
उंच असूनही, फुलांवर फुलपाखरे आढळतात. त्यांच्या
पायाला आणि पंखांना लागून आलेले परागकण कुक्षीच्या छिद्रामध्ये पडतात. यातील परागकणामुळे अंडाशयात फलन होते.
परागीभवन झाले की प्रथम कडेचे पुंकेसर गळू लागतात. कुक्षीही गळून जाते. अंडाशयात
बीज वाढत असताना फुलाचे इतर सर्व भाग गळत जातात. बाहेरून फुलांचाच भाग बनलेली हिरवी दले बीजाभोवती आवरण तयार करतात. हिरवे फळ तयार
होते. जांभळाचे फळ तयार होताना, बाहेरचा हिरवा भाग वाढत बीजाला पोटात सामावून घेतो. असे
फार कमी फळाच्या बाबतीत आढळते. त्यामुळे जांभळाला दोन्ही बाजूने देठ असते की काय? असा प्रश्न पडतो. याच निरीक्षणावर महाभारतात जोडल्या गेलेल्या कथेवर उत्पातांचे जांभुळाख्यान बेतले आहे.
फळ सुरुवातीला कोनासारखे असते. मात्र आतील बीज जसे आकार धारण करत जाते, तसा
फळांचा आकारही बदलत जातो. फळ लंबगोलाकार
किंवा गोल असते. जांभूळ वृक्षाच्या बहुतांश फुलांचे फळात रूपांतर होते. फळांचा
देठ घट्ट असतो. मध्यमगतीच्या किंवा तीव्र वाऱ्याने फळे पडत नाहीत. पानाआड
लपलेल्या फळांना थेट वाऱ्याचा सामना करावा लागत नाही. एखाद्या मातेने उन-वारा-पावसापासून वाचवण्यासाठी आपल्या बाळाला पदराआड घ्यावे, तशी
ही फळे पानांच्या कुशीत सुरक्षित असतात. त्यांची सहज गळ होत
नाही. मात्र माकडांना फळांचा वास लागताच ती झाडांवर हल्ला करतात. जांभूळ फळे खूपच टोकाला असल्याने त्यांच्याही हाती सर्व फळे लागत नाहीत. मुळात
या मर्कटराजांच्या हातून खाण्यापेक्षा नासाडीच जास्त होते. तरीही, फळे
टोकाला असल्याने, त्यांच्या हाताला फार थोडी फळे लागतात.
सुरुवातीला फळांचा रंग पोपटी असतो. ते पूर्ण
वाढले की मग त्याचा रंग लालसर व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत आतले बी पुरेसे
वाढलेले असते. हिरव्या सालीतला गर पांढरट
हिरवा असतो. फळे तुकतुकीत कांतीची असतात. फळ
पूर्ण वाढले की त्यांचे वजन वाढते आणि शेंड्याला, अगदी वरच्या टोकाला असणाऱ्या फांद्या फळांच्या ओझ्याने आणखी वाकतात. सूक्ष्मपणे
पाहिल्यास त्यावर काही ठिकाणी शीरा दिसतात. फळे दुसऱ्या टोकापासून पिकायला सुरुवात करतात. सुरुवातीला
शेंड्याचा भाग लालसर होतो. तो रंग
पसरत देठाकडे जातो. काही दिवस अशा रंगात ही फळे
दिसतात. नंतर तो रंग गडद होत, शेवटी गडद जांभळा होतो. पक्व
फळांच्या रंगावरूनच याचे नाव जांभूळ असे पडले आहे. झाडाचीच नव्हे तर एका
घोसातील सर्व फळेही एकाचवेळी पिकत नाहीत. जांभूळ पूर्ण पिकले की देठापासून
गळते आणि खाली पडते. त्याची साल पातळ असते. साल
इतर फळांसारखी टणक आणि भक्कम नसल्याने फळ फुटते. साल बाहेरून पूर्ण गडद काळसर जांभळी असते. दुरून
झाडावर भुंगे एकत्र जाऊन बसले की काय असे वाटते. मात्र सालीच्या आवरणापासून बीपर्यंत वसलेला गर हा
गुलाबी लाल किंवा राणी रंगाचा असतो. फळे पिकायला लागली की झाडाखाली
त्यांचा सडा पडतो. एका मोठ्या झाडाला सत्तर ते ऐंशी
किलो फळे लागतात. त्यांची चव आंबट – गोड आणि किंचित तुरट असते. चांगल्या पिकलेल्या फळांची चव मात्र
पूर्ण गोड लागते.
उन्हाळ्याच्या शेवटी फळे पिकू लागली की या झाडावर पक्ष्यांची मोठी झुंबड उडते. धनेश, तांबट, बुलबुल, पोपट इत्यादी पक्षी फळांचा अस्वाद घेतात. माकडासोबत
वटवाघळेही या फळावर तुटून पडतात. जंगलातील कोल्हे, उद, मसण्या, अस्वल इत्यादी प्राणी जांभळे आवडीने खातात. पाळीव
प्राण्यातील घोडा या झाडांच्या फळाची चाहूल लागताच झाडाखाली अवश्य चक्कर टाकतो. देशी वाणांचे फळांच्या आकारावरून तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे.
भरपूर गर असणारी फळे राजजम्बू किंवा राही जांभूळ किंवा राई जांभूळ म्हणून ओळखली जातात. कमी गर असणारी
आणि राजजम्बू फळांच्या आकारापेक्षा लहान जांभूळ फळांना ‘काष्ठ
जांभूळ’ म्हणून ओळखतात. तर आकाराने
खूप लहान आणि चवीला एकदम गोड असणाऱ्या जांभूळ फळांना ‘लेंडी
जांभूळ’ म्हणतात. राजजम्बू प्रकारची झाडे पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळतात. काष्ठ
जांभूळ हा प्रामुख्याने मराठवाड्यात आढळणारा प्रकार आहे. तर लेंढी
जांभूळ जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते. पानावरूनही हे झाडांचे
प्रकार ओळखण्याचे कौशल्य अनेक शेतकरी आणि निसर्गप्रेमींनी अवगत केले आहे. लेंढी जांभूळ वृक्षांची पाने कमी हिरव्या रंगाची आणि कमी रूंदीची, लांबीला जास्त असतात. त्यापेक्षा
काष्ठ जांभूळची पाने थोडी जास्त रूंद असतात. तर राजजम्बू
झाडांच्या पानांची लांबी आणि रूंदी दोन्ही जास्त असते. लेंढी जांभूळचे बी आकाराने
खूप लहान असते. फळांचाच आकार लहान असल्याने गरही कमी असतो. मात्र
काष्ठ जांभूळ हा प्रकार नकोसा वाटणारा. गर कमी
आणि बी मोठे, असा हा मामला. या फळांना जांभळाची चव लागते. आणखी खावीशी वाटतात. मात्र
गर कमी असल्याने तल्लफ पूर्ण होत नाही.
कृषी शास्त्रात लागवडीसाठी राई आणि संकरित थाई, बारडोली आणि बियाण्या हे चार
वाण वापरले जातात. या झाडांची
कलमे तयार करून लावतात. भारतात जांभळाची शेती फार कमी प्रमाणात होते. इंडोनेशियासारख्या देशात
जांभळाची शेती करण्यात येते. भारतात जांभळाची शेती करणाऱ्या, शेतकऱ्यांना एकरी तीन ते दहा लाख रूपयापर्यंत फळांच्या उत्पादनातून मिळतात. सर्व खर्च वजा जाता तीन ते चार
लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळतो. फळांवर रोग पडत नाहीत. मात्र
फळांना बाजारात सुरक्षित पाठवण्याचे काम खूपच काळजीपूर्वक करावे लागते. तसेच फळे जास्त काळ टिकत नाहीत. ती
वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. जांभूळ फळांचे औषधी महत्त्व लक्षात घेता भविष्यात जांभूळ वृक्षांची शेती खूप फायदेशीर ठरणार आहे.
जांभूळ मधुमेहावरील औषध म्हणून सर्वपरिचित झाले आहे. जांभूळ फळांचा रस आणि
बीच्या भुकटीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. जांभळांच्या सुक्या बियात रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व आहे,
असे मानतात. जांभूळ बी गळवांच्या
त्रासावर उगाळून लावतात. जांभूळ रक्त शुद्ध करते. मुखशुद्धीसाठीही जांभूळ
बियांचे चुर्ण वापरले जात असे. जांभूळ बियांमध्ये ‘ग्लुकोसाईड
जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार, शरीरातील साखर वाढल्यानंतर पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर करण्यास प्रतिबंध करतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. चेहऱ्यावरील
मुरूम आणि पुटकुळ्या घालवण्यासाठी जांभूळ बिया उगाळून लेप लावला जातो. जांभूळ फळ पाचक
आहे. जांभूळ फळांपासून जेली, रस असे
उपयुक्त पदार्थही बनवले जातात. जांभूळ सेवनांमुळे केस लांबसडक आणि मजबूत बनतात. जांभूळ
फळामध्ये पॉटेशियम जास्त असते. पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर अशा त्रासासाठी जांभूळ रसाचे प्राशन करतात. शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी पाने आणि फळांचा उपयोग करण्यात येत असे.
पंडुरोग किंवा ॲनिमिया, कावीळ, रक्तदोषविकारावर जांभूळ
फळांमध्ये असणाऱ्या लोहामुळे गुण येतो.
चांगल्या पक्व जांभूळ फळांची चव चाखणाऱ्या माणसाला पुन्हा, पुन्हा ही फळे
खावीशी वाटतात. या फळांच्या
एक कप रसामध्ये १८१ किलोकॅलरी ऊर्जा असते. १०० ग्रॅम जांभूळ गरांमध्ये कर्बोदके १५.५६ ग्रॅम, मेद ०.२३ ग्रॅम, प्रथिने ०.७२ ग्रॅम, पाणी ८३.१३ ग्रॅम, जीवनसत्त्व बी-१ ०.००६ मिलीग्रॅम, बी-२ ०.०१२ मिलीग्रॅम, बी-३ ०.२६ मिलीग्रॅम,
बी-५ ०.१६ मिलीग्रॅम,
बी-६ ०.०३८ मिलीग्रॅम, जीवनसत्त्व
क १४.३ मिलीग्रॅम,
कॅल्शियम १९ मिलीग्रॅम, लोह ०.१९ मिलीग्रॅम, मॅग्नेशियम १५ मिलीग्रॅम,
फॉस्फरस १७ मिलीग्रॅम, पॉटेशियम ७९ मिलीग्रॅम
आणि सोडियम १४ मिलीग्रॅम असते. काही प्रमाणात जीवनसत्त्व अ देखील
असते. कोलिन आणि फोलिक आम्लही असते. मूतखडा, मूळव्याधीवरही जांभूळ
फळे गुणकारी ठरतात. जांभूळ फळे अँटिऑक्सिडंटही असतात, त्यामुळे ते कर्करोग
प्रतिबंधकही मानले जाते. चरकसंहितेत यकृतवृद्धीवर जांभूळ फळे खावीत, असे
सांगण्यात आले आहे. वजनवृद्धी टाळण्यासाठी जांभूळ फळ उपयुक्त
ठरते. मात्र जांभूळ फळे उपाशीपोटी खाऊ नयेत. कच्ची कीड लागलेली आणि अतिपिकलेली फळे खाऊ नयेत. पिकलेली
जांभळी फळे स्वच्छ धुवून जेवणानंतर खावीत. जांभूळ फळांपासून वाईनही बनवण्यात येते.
जांभळाची पाने लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र मिसळून ठेवल्यास सहा महिन्यात उत्तम लोहक्षार तयार होतो. फार पूर्वीपासून जांभूळ वृक्षांची पाने सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरण्यात येत असत.
पोटाच्या विकारावर जांभळाच्या सालीपासून औषध देतात. जांभळाच्या कोवळ्या पानामध्ये ‘ई’ जीवनसत्त्वही असते. दात आणि हिरड्या कमकुवत असल्यास सालीपासून औषध बनवतात. वारंवार
होणाऱ्या गर्भपातावरही कोवळी पाने उपयुक्त ठरतात. जांभूळ मधही सध्या आयुर्वेदीक औषधाच्या दुकानात उपलब्ध असतो. जांभूळ
वृक्षाच्या विविध घटकापासून करेला जामुन ज्युस, करेला जामुन पावडर, जम्बवासव,
जम्ब्वासव, DIABIT
capsules, DIABNEX Tablets, DIABOHILLS Tablet, DIACONT Tablets, मधुनाशिनी चुर्ण, Syziginium Jambolicum इत्यादी औषधी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मात्र यांचा वापर डॉक्टरी सल्ल्यानेच करावा.
जांभूळ वृक्षाच्या सालीमध्ये असणाऱ्या टॅनिनमुळे तीचा उपयोग कातडी
रंगवण्यासाठी आणि कमावण्यासाठी केला जातो. सालीच्या आतील लाकूड पिवळसर फिकट तपकिरी किंवा
लालसर रंगाचे असते. सालीला उग्र वास असतो. झाडाचे खोड सरळ वाढते. त्यापासून सरळ आणि लांब फळ्या
मिळतात. जांभळाचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. लाकडाचा वापर घरबांधणी आणि गाड्यांच्या निर्मितीसाठी केला जातो. हे लाकूड पाण्यामध्ये कुजत नाही, त्यामुळे त्याचा वापर
बोटींच्या निर्मितीतही केला जातो. लाकूड सरळ असल्याने बांधकामात
खांब, तुळ्या आणि शेतीच्या अवजारासाठीही केला जातो. चांगल्या दर्जाच्या लाकडापासून भाकरी करण्यासाठी काटवट तयार करण्यात येते.
जांभूळ वृक्षाचे लाकूड काटवटीसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. या झाडांच्या लाकडापासून मोठ्या प्रमाणात खेळणीही बनवली जातात. एक घनफुट लाकडाचे वजन वीस ते बावीस किलोग्रॅम इतके भरते. जळणासाठीही जांभळीचे लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले जाते. शेवाळलेल्या, घाण पाण्यात जांभूळ वृक्षाची लाकडे टाकल्यास
पाणी चांगलेच निवळते. फळमाशी आणि खोडअळी मात्र या झाडाला बांधली, तर लाकडाला आतमध्ये
पोखरण्याचा प्रयत्न करते. मात्र या झाडाचे खोड चांगलेच ताकतवान असते.
या झाडाच्या खोडात खिळा मारला, तर एका वर्षात त्याला
जिरवून टाकण्याचे सामर्थ्य या झाडात असते. लाकडाच्या या गुणांमुळेच
या झाडांचा घात होतो. लाकूड मिळवण्यासाठी आज या झाडांची मोठ्या
प्रमाणात कत्तल करण्यात येते.
ll २ ll
जांभूळ या भागातील आद्य वृक्ष आहे. त्यामुळे येथील संस्कृतीमध्ये त्याचे प्रतिबिंब सापडते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जांभूळगाव आहे. जांभळे आडनावाची अनेक मराठी कुटुंबं आहेत. जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. जांभूळ वृक्ष हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये पवित्र वृक्ष मानला जातो. त्यामुळे या वृक्षाची लागवड अनेक मंदिराभोवती आणि बौद्ध स्तुपांच्या परिसरात लावण्यात येतो. बौद्ध धर्मग्रंथामध्ये भारतीय उपखंडाचा उल्लेख जम्बूद्विप असा आढळतो. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्व इराण, रशियाचा आशिया खंडातील भाग, मंगोलियाचा वाळवंटाखेरीजचा चीनचा भाग, बांग्लादेश हा सर्व भाग यामध्ये समाविष्ट होता. बालपणी राजकुमार सिद्धार्थ जांभूळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसण्याचा अभ्यास करत, असे मानले जाते. तसेच तथागतांनी रोजच्या आहारात ज्या आठ फळांच्या रसग्रहणास अनुमती दिेली होती, त्यामध्ये जांभूळ फळांचा समावेश आहे.
तिरूचिरापल्ली शहराजवळ प्रसिद्ध ‘जंबुकेश्वर महादेव’ मंदिर आहे. या मंदिराला हे नाव त्याच्या परिसरात असणाऱ्या अतिविशाल जांभूळ वृक्षामुळे मिळाले आहे. पूर्वी प्रत्येकाच्या दारात जांभूळ वृक्ष असायचा, असे म्हणतात. गणेश, महेश आणि कृष्णास जांभूळ वृक्षांची फुले प्रिय आहेत, असे मानले जाते. भारतातील काही भागात जांभूळ पानांचे तोरण बांधले जाते. ढगांचा राजा जांभूळ वृक्षाच्या रूपात पृथ्वीवर आल्यामुळे याची फळे जांभळ्या रंगाची आहेत, असा समज आहे. महाभारतातील भीष्म पर्वामध्ये भीष्मांनी ‘या भागात असणाऱ्या विशाल जम्बूवृक्षांमुळे जम्बूद्विप असे नाव मिळाले,’ असल्याचे म्हटले आहे. रामायणांमध्ये सीतेच्या विरहात फिरणाऱ्या रामाने जांभूळ वृक्षाला मिठी मारून ‘सीता कोठे गेली?’ असे विचारल्याचा उल्लेख येतो. कालिदास यांना जम्बूवृक्षांच्या फांद्या नद्यातील पाणी अडवत असल्याचे दिसले होते. बाणभट्टांच्या कादंबरीमध्ये असणारा वैशंपायन नामक पोपट हा जम्बूवृक्षाच्या फळांचा रस पीत असे. गणेश वंदनेतही जांभूळ फळांचा उल्लेख येतो.
ll गजाननं भूतगणादि सेवितं l कपित्थं जम्बूफलसार भक्षितमं ll
ll उमासुतं शोक विनाशकारणम् l नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ll
हत्तीसारखे
मुख असणाऱ्या, ज्याची भुतादि गण सेवा
करतात, पार्वतीचा पुत्र असणारा, जो कवठ
आणि जांभूळ फळांचा रस खातो, जो सर्व
दु:खाचा विनाश करतो, अशा गणेशाला वंदन करतो. बृहत्संहिता,
कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारताचे आरण्यक पर्व इत्यादी पौराणिक साहित्यात जांभूळ वृक्षाचा उल्लेख येतो. जांभूळ
वृक्षाच्या उत्तरेस तीन हातापुढे दोन पुरुष खोलीवर पाणी मिळेल. तसेच जांभूळ वृक्षाच्या पूर्वेस जवळपास वारूळ असेल तर त्या
वारूळाच्या दक्षिणेस दोन पुरूष खोलीवर चांगले पाणी मिळेल, असे अनुमान वराहमिहिरांच्या ‘बृहत्संहिता’ ग्रंथात ५४ व्या
अध्यायात लिहिले आहे.
जांभूळ फळाचा आणि झाडाचा उल्लेख मराठी भाषेतील शृंगारिक साहित्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. कदाचित हे जांभूळ फळाच्या कृष्णवर्णामुळे असावे. १९७७ साली प्रदर्शित झालेल्या जब्बार पटेल दिग्दर्शित ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील ना.धों. महानोर यांचे आशा भोसले यांच्या आवाजातील
‘जांभूळ पिकल्या झाडाखाली,
ढोल कुणाचा वाजं जी...’
हे गीत आजही लोकप्रिय आहे. जांभूळ हा आदिवासींचा कल्पवृक्ष. हा वृक्ष बहरला की आदिवासी सर्वांना ढोल वाजवून बोलावतात आणि एकत्रित फळांचा आस्वाद घेतात. या प्रथेला अनुलक्षून महानोरांचे हे प्रसंगास साजेसे गाणे. मुळातून चित्रपट पाहताना समजून घ्यावे असे. ही प्रथा माहित नसणारांना गाण्याचा संदर्भ तसा लागत नाही. मात्र गाण्याचे बोल, आवाज आणि संगीत असा त्रिवेणी संगम इतका सुंदर आहे की, हे गीत अजरामर बनले. दादा कोंडके यांच्या १९७८ सालच्या गाजलेल्या ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ या चित्रपटामध्ये उषा मंगेशकर यांच्या आवाजातील
‘गळला मोहर झडली पालवी, फळे लागली निळी जांभळी,
पिकलं जांभूळ तोडू नका, माझ्या झाडावरती चढू नका’,
हे राजेश मुजुमदारांचे गाणेही खूप गाजले. झाडाचे दिसणे आणि त्याचे मानवाला प्रिय असणे याबद्दल शेवटच्या कडव्यात खूप छान वर्णन आले आहे.
‘भारी पिरतीनं पानाआड जपलं, रस चाखाया लई जन टपलं,
इश्काच्या माऱ्यानं पाडू नका, कुणी झाडावरती चढू नका.’
याखेरीज ज्योती अहिरे यांनीही ‘पिकलंय
जांभूळ झाडाचं तुम्ही, चाखून नका हो पाहू, खुशाल पाहा दुरून पाव्हणं, झाडाला हात नका लावू’, ही
लावणी जांभूळ वृक्षाला मध्यवर्ती धरूनच लिहिली आहे. तर राज
इर्मली यांचे ‘जांभूळ नाय पिकली, बागेचा
पिकला नाय तोह आंबा, बाबा आई तिची
बोलताय लग्नाला दोन वर्ष थांबा’ गीतही चांगलेच लोकप्रिय आहे.
जांभळाचं झाड इथल्या लोकसंस्कृतीतही मिसळून गेले आहे. पूर्वी जात्यावर दळण दळणे सुखकर व्हावे, म्हणून बायका ओव्या म्हणत. अशाच एका ओवीत
‘रावणाच्या लंकेला लावियली जांभळं,
पतिव्रता सीताबाई नाव रामाचं संभाळ’,
असा पोक्त सल्ला दळणारी माता सीतेला देत असे. इतरही अनेक कवीनी जांभूळ वृक्षाला आपल्या कवितेत स्थान दिले आहे. ‘कसा जांभूळ तरूला, आला उत्फुल्ल बहर, उजाडल्या गोकुळात, टाहो फोडतात मोर’ असे शंकर वैद्य लिहितात. तर कवी चंद्रशेखर गोखले जांभूळ वृक्षाशी आपले नाते बापलेकाचे असल्याचे सांगताना लिहितात
‘अंगणात माझ्या उभे, जांभळाचे झाड एक,
त्याचे माझे नाते असे, जणू बाप आणि लेक’.
हे जांभळाचे झाड अनेक संकटात ताठपणे उभा राहायची शिकवण देत असल्याचेही ते लिहितात. बालकवींच्या पहिल्या कवितेतही जांभूळ दर्शन होते. तर कवी अनिल गव्हाणे ‘झिम्मा जांभूळ वाऱ्याचा’ या कवितेत ‘रानमेवा लुटण्यास, थवा आलाहो पोरांचा, झिम्मा रंगला रानात, असे जांभूळ वाऱ्यांचा’ असे वर्णण करतात. कुसुमाग्रजांच्या ‘केव्हातरी मिटण्यासाठीच’ कवितेत जांभूळ खाल्ल्यानंतर त्यांचा निळा रंग जिव्हेवर तसाच राहतो, याचे वर्णन करताना लिहितात, ‘वाट केव्हा वैरीण झाली तरी झाडे प्रेमळ होती, लाल जांभळे भेटून गेली, साथीत उरली निळी नाती’. ना. धोंं. महानोर यांचे ग्रामीण जीवनाशी असलेले नाते खूप घट्ट आहे. त्यांच्या अनेक कवितांमध्ये विविध झाडे भेटतात. जांभळीचे झाड निश्चितच आणखी प्रिय असावे. ते चांगली बातमी जांभूळ झाडाला सांगायची इच्छा व्यक्त करताना
‘बिलोरी हाताना, मोराचं गोंदण,
चांदण्याचं बन बाई पेटलं पाण्यानं,
जांभळीच्या झाडाला गंs सांगावा शकून’
असे लिहितात. तर
गणेश शिवलद यांच्या कवितेतील अप्सरा मान मुरडत जांभूळ पिकल्या झाडाखाली येते.
जांभूळ झाड आणि फळे यांचा या भागातील मानवी जीवनावर मोठा प्रभाव असल्याने त्याचे मराठी साहित्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबिंब पडलेले दिसून येते. माकडाचे आणि जांभूळ फळांचे नातेही असेच घट्ट आहे.
त्यावरून जातकामध्ये एक छान बोधकथा आहे. एका गावाजवळ तलावाच्या कडेला मोठा जांभूळ वृक्ष होता. त्या झाडावर रक्तमुख वानर रहात असे.
एक दिवस त्याला झाडाखाली एक मगर विश्रांती घेत पडलेला दिसला. रक्तमुखाने झाडाची जांभळे तोडून त्याकडे टाकली आणि म्हणाला, ‘तू
झाडाखाली प्रथमच आलास, तू माझा
पाहुणा आहेस. म्हणून हे आददरातिथ्य!’
मगरला जांभळे आवडली. तो मगर
रोज येऊ लागला. रक्तमुखही त्याला जांभळे देई.
दोघात छान मैत्री झाली. पुढे मगर उरलेली जांभळे आपल्या बायकोला नेऊ लागला. एक दिवस मगराची बायको म्हणाली, ‘जर ही
फळे इतकी गोड असतील, तर ती
रोज खाणाऱ्या तुमच्या मित्राचे काळीज किती गोड असेल. मला त्याचे हृदय खायचे आहे.’ मगर बायकोला ते अशक्य
आहे, म्हणून सांगतो. मगराची बायको हट्टाला पेटते आणि रक्तमुखचे हृदय खायला न दिल्यास अन्नपाणी त्यागून जीव द्यायची धमकी देते. मगराचा बायकोच्या हट्टापुढे नाईलाज होतो.
मगर दु:खी मनाने
रक्तमुखजवळ येते. मगरला दु:खी पाहून रक्तमुख कारण विचारतो. तेव्हा बायकोने मित्राकडून रोज एवढी मधूर फळे आणता, पण
त्या मित्राला अजूनही घरी बोलवले नाही, यावरून चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सांगतो. यावर रक्तमुख तुमच्या पाण्यातील घरात मी कसा
येऊ शकेन अशी शंका व्यक्त करतो. त्यावेळी मगर तलावाच्या मध्यावर असलेल्या बेटावर घर असल्याचे
सांगतो. तेथे माझ्या पाठीवर बसवून तुला नेईन, असे सांगतो. नवरा-बायकोत
वाद वाढायला नको, म्हणून त्याच्या घरी जायला रक्तमुख तयार होतो. मगर वानराला पाठीवर घेऊन तलावाच्या बराच आत जातो. मात्र आपण त्याला फसवून नेत आहोत, याबद्दल त्याचे मन खात होते. आता रक्तमुख पळून जाऊ शकत नाही, याची
त्याला खात्री झाली. आता तरी मित्राला आपण खरे सांगावे म्हणून मगर त्याला का घेऊन
जातो आहोत, ते सांगतो. यावर माकड न घाबरता
म्हणतो, ‘अरे पण मी तर माझे काळीज झाडावरच ठेऊन आलो आहे. तिथ बोलला असतास, तर तुला तिथेच दिले असते ना’. मगर माकडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. झाडावरील
काळीज घेण्यासाठी वानराला घेऊन परत झाडाजवळ येतो. तेथे येताच वानर टुणकण झाडावर उडी मारते आणि मगराला म्हणते, ‘अरे विश्वासघातकी. जा,
तुझे तोंड काळे कर. तुझ्या तावडीतून सुटण्यासाठी मी थाप
मारली. काळीज असे थोडेच बाहेर काढून ठेवता येते. माझा तुझ्यावर विश्वास नाही. जा, संपली आपली मैत्री.’ संकटाला धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि विश्वासघातकी लोकांंपासून दूर राहिले पाहिजे, असे सांगणारी ही कथा.
हिंदी साहित्यिक कृष्ण चंदर यांची ‘जामुन का पेड’ ही कथा तशी जुनी. मागील वर्षी ती पुन्हा
नव्याने चर्चेत आली. चंद्रकांत ओंजाळ यांनी केलेला या कथेचा
अनुवाद साधनामध्ये प्रकाशित झाला. वादळात जांभळाचे झाड पडते. त्याखाली
एक शायर सापडतो. त्याची सुटका करण्याऐवजी ते झाड
हटवणे हे कोणाचे काम यावर शासनाच्या विविध खात्यात कसा पत्रव्यवहार चालतो. अधिकारी साधे कामही दुसऱ्याकडे कसे ढकलतात आणि यात सामान्य माणसाचा जीव कसा जातो. याचे
सुंदर चित्रण या कथेत आहे. श्री.द. पानवलकर यांचा ‘जांभूळ’ नावाचा
कथासंग्रह प्रसिद्ध आहे. भास्कर चंदनशिव यांची ‘जांभळढव्ह’
कथाही चांगलीच प्रसिद्ध आहे. व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘जांभळाचे
दिवस’ हा कथासंग्रह आहे. यातील शीर्षक कथेतील नायक गावाकडे गेल्यानंतर जांभळे खात असताना समोर आलेली मुलगी चमन आणि तिच्याबद्दलचे विचार यामध्ये ही कथा
फुलते. या कथेत जांभळे काढणे आणि खाण्याचे जांभळाइतकेच बहारदार आणि रसदार वर्णन आले आहे. तर इरावती
कर्वे यांच्या ‘परिपूर्ती’
या पुस्तकातील ‘मराठ्याचा मठ्ठपणा’ या
कथेत जांभूळ विकणाऱ्याचे सुंदर वर्णन आहे. ‘गाजर दाखवणे’ या
अर्थाने ‘जांभूळ भरवणे’ असा वाक्प्रचार वापरला जातो. तर
अत्यंत आळशी माणसाला ‘ओठावरचे जांभूळ तोंडात पडायची इच्छा धरणारा’ म्हणून
ओळखले जाते. देवदार वृक्षांत ‘जांभूळ
देवदार’ म्हणून ओळखला जाणारा वाण उंच वाढत जातो.
जांभूळ खाल्ल्यानंतर, रसाचा रंग जिभेला लागतो. गुपचुप
जांभळे खाल्ली, तरी रंगीत जीभ सर्वांना
बातमी सांगत असते. तसेच जांभूळ फळ दोन
देठाचे म्हणून ओळखले जाते. याच बाबीचा आधार घेत महाभारताच्या कथानकास एक कथा
जोडली गेली आहे. त्यावर विठ्ठल उमप यांनी ‘जांभूळ
आख्यान’ नावाचे सुंदर नाट्य रचले. पांडव घरी नसताना एकदा कर्ण येतो. पाच
पांडवाची पत्नी असणाऱ्या द्रौपदीच्या मनात ‘कर्ण आपला सहावा पती असता तर..’
असा विचार येतो. देहाने नाही तर मनाने
द्रौपदीचे पातिव्रत्य भंगले. तिने यात अडकू नये.
बाहेर पडावे, यातून द्रौपदीची सुटका व्हावी, यासाठी
कृष्ण पांडवांकडे येतो. सर्वांना वनभोजनाला घेऊन जातो. वनभोजनानंतर श्रीकृष्ण फलाहार करण्याची इच्छा व्यक्त करतो. पांडव फळे
घेऊन आलेले नसतात. मग भीम
वनातच फळे शोधू लागतो. त्या जांभूळ वनात कोठेच फळ नसते. अखेर एका झाडाच्या शेंड्याला एकमेव पिकलेले जांभूळ दिसते. तो ते
तोडतो आणि श्रीकृष्णाला आणून देतो. ते फळ
कोठून आणले, ते भीमाने
सांगताच श्रीकृष्ण म्हणतो, ‘भीमाने मोठा अनर्थ ओढवून घेतला आहे.
या झाडाखाली एक ऋषी कठोर तप करतात. ते दररोज
त्या झाडाला येणारे एकमेव जांभूळ फळ खाऊन रहातात. पाणीही पीत नाहीत. आज
त्यांना ते जांभूळ दिसले नाही, तर ते
चिडतील आणि शाप देतील आणि त्यात पांडवाचा विनाश होईल’. यावर मार्ग म्हणून ते फळ
पुन्हा देठाला जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम धर्माने आपले सत्त्व पणाला लावून फळ देठाला
जोडावे, असे श्रीकृष्ण सांगतो. नंतर पांडवातील प्रत्येकजण आपले सत्त्व पणाला लावतो. मात्र प्रत्येक पांडवाने सत्त्व पणाला लावल्यानंतर जांभूळ केवळ एक हात
वर जाते. अखेर द्रौपदीला तिचे पातिव्रत्य आणि सत्त्व पणाला लावायला सांगण्यात येते. द्रौपदीने
प्रयत्न करताच वर गेलेले फळ खाली पडते. असे का घडले,
या प्रश्नाचे उत्तर कोणालाच माहीत नसते. द्रौपदीलाही आश्चर्य वाटते. ती
श्रीकृष्णाला कारण विचारते. तेव्हा श्रीकृष्ण द्रौपदीला तिच्या मनात कर्णाला पाहून आलेल्या विचाराची आठवण करून देतात आणि ही बाब
पांडवासमोर कबूल करण्यास सांगतात. त्यानंतर श्रीकृष्ण आपले कौशल्य पणाला लावून फळ देठाला
जोडतात, मात्र ते उलटे जोडले जाते. तेव्हापासून जांभूळ फळ दोन
देठाचे म्हणून ओळखले जाते.
परपुरूषाबद्दल द्रौपदीच्या मनात आलेला विचार नैतिकतच्या कसोटीवर अयोग्य असल्याचे बिंबवण्यासाठी हे कथानक जोडले गेले असावे. या एका
छोट्या कथानकावर दोन तासांच्या जांभूळ आख्यानाचा प्रयोग रंगवला आहे. कथा छोटी असली तरी त्याचा साज आणि सादरीकरण इतके सुंदर आहे की कोठेही
कंटाळवाणे बनत नाही. सुरुवातीस या कथेवर
परभणीचे कलाकार कदम गोंधळी प्रयोग सादर करत. त्यांच्यानंतर ‘जांभूळ आख्यान’ विठ्ठल उमप यांनी सुरू ठेवले. या
प्रयोगासाठी सुरेश चिखले यांनी त्याचे पुनर्लेखन केले आणि उमप यांनी प्रयोग सुरू केले. लेखन आणि सादरीकरण अप्रतिम आहे.
विठ्ठलजी द्रौपदीचा अभिनय इतका सुंदर करत की, ते पुरूष
आहेत, हेही लक्षात येत नाही. संहितेत ग्रामीण बोलीभाषेतील शब्द वापरले आहेत. त्यामुळे
लोक लगेच कथेशी जोडले जातात. मध्यवर्ती कवनात ‘झाली सर्द गर्द, पाहून कामतीर, देह
चळलं, हीचं देह चळलं, अन् कर्णाला पाहून, द्रौपदीचं
मनं पाकुळलं’, हे ते
असे सादर करत की प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर त्याक्षणी सुंदर रूपवती द्रौपदीच दिसते. आता नंदेश उमप हे प्रयोग
सादर करत आहेत. खरे तर,
जांभूळ आख्यान हा देवीच्या गोंधळाचा प्रकार. मात्र उमप यांनी त्याला अमाप लोकप्रियता दिली. उमपांमुळे
जांभूळ आख्यान केवळ धार्मिक राहिलेले नाही.
ll ३ ll
संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेले जांभूळ माझ्याही बालपणापासून परिचयाचे झालेले. गावाजवळच्या सुभाषकाकांच्या ‘लिंबारी’ नावाच्या शेताच्या पश्चिम बांधावर जांभळाचे झाड होते. त्याला
टपोरी फळे येत. त्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की आम्हाला
समजायचे, जांभळे पिकली आहेत. या झाडाला
फुले कधी आली, फळे कधी आली आणि कधी पिकली, हे कळायचेच नाही. खाली एकदोन पिकलेली फळे पडलेली असायची. आम्ही
ती शोधत फिरायचो. सुरूवातीला एखाद दुसरेच फळ मिळायचे.
आम्ही तेही वाटून खायचो. झाडावरच्या झाडांना दगड मारायचा आणि फळे पाडायचा विचारही करू शकत नव्हतो. पडलेल्या
फळावरच समाधान मानावे लागत असे. त्यावेळी या झाडांची
चारपाच फळे मिळाली की जो आनंद होत असे, तो अवर्णनीय
असे. त्या झाडाची फळे काढून ती काका विकत. फळे काढण्यासाठी ते फांद्या
हलवत. झाडाखाली पडलेली पाने तशीच ठेवत. उलट खाली गवत पसरत. वरून
पडणारी जांभळे फुटू नयेत म्हणून ही काळजी घेत. पण फांद्या
हलवताच सडा घातल्यासारखी जांभळे पडत. पडलेली जांभळे पायाखाली न येऊ
देता गोळा करणे मोठे कौशल्याचे काम. पडलेली सर्व फळे गोळा करून चांगली फळे पाटीत भरत आणि मग ती
विक्रीला नेत. फुटलेली, जास्त
पिकलेली फळे गोळा करणाऱ्या मुलांची असत. पाटी भरून उरलेल्या सर्व फळांवर बालगोपाळांचा अधिकार असायचा. त्यावेळी
तेथे असणाऱ्या आणि जांभळे संपेपर्यंत तेथून जाणाऱ्या सर्व मुलांना हा मेवा चाखायला मिळायचा. मात्र एक दिवस
एका लाकूड मिलमालकाची नजर या झाडावर पडली. त्याला बालगोपाळांच्या आनंदापेक्षा झाडाचा मोठा आकार दिसत होता. काकालाही
फळे विकून येणारा थोडा, थोडा पैसा आणि बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील जांभूळ खायला मिळाल्यावर ओसंडणाऱ्या आनंदापेक्षा एकदम येणारा पैसा मोठा दिसला. लवकरच
त्या झाडाला कापण्यात आले. आमच्या डोळ्यादेखत त्याचे तुकडे पाडले. आम्ही
विदीर्ण मनाने त्या हत्येकडे पाहात होतो. सुरुवातीला वरच्या जळणायोग्य फांद्या काढून त्याचा विस्तार कमी केला. नंतर
ज्याची खेळणी, शेतीपुरक साहित्य बनवता येईल, अशा फांद्या कापल्या गेल्या. त्यानंतर बुंध्यावर कुऱ्हाड चालवण्यात आली.
झाड एवढं मोठे होते की त्याला कापण्याचे काम चार-पाच दिवस चालले. झाडाच्या
बुंध्यावर बसणारा प्रत्येक घाव आमच्या मनावरही बसत होता. त्यामुळे तो चाळीसेक
वर्षांपूर्वीचा प्रसंग जसाच्या तसा आठवतो.
एक वर्ष असेच गेले. आमच्या काही मित्रानी पांगरी स्टेशनकडच्या एका शेतात जांभूळ असल्याचे सांगितले. बंजाऱ्याच्या शेताकडील झाडाचाही शोध लागला. मात्र या दोन्ही झाडांच्या फळांना ती चव नव्हती. ही दोन्ही झाडे काष्ठ जांभूळ जातीची होती. त्यातही बंजारा शेतातील झाड विहिरीच्या कडेला होते. निम्म्यापेक्षा जास्त जांभळे विहिरीत पडत. त्यामुळे आम्ही पांगरी स्टेशनजवळच्या शेतातील जांभळे खायला जायचो. असाच एक शनिवारचा दिवस. जूनची पहिल्या महिन्यातील शाळा. गुरूजीनी लवकर जायला सांगितले. मग आम्ही दफ्तर घेऊन तसेच गेलो. काष्ठ जांभळे भरपूर खाल्ली. किती वेळ गेला कळलेच नाही. वडील तेव्हा ममदापूरच्या शाळेत शिक्षक होते. त्यांची शाळा सुटल्यावर ते त्याच रस्त्याने घरी येत. त्यांना आम्ही तेथे गेलो आहोत, ही चुगली कोणीतरी केलीच. वडिलांनी आम्हाला तिथे शोधले नाही. सरळ घरी आले. आम्हीही जांभूळ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर घरी आलो. आमची हजेरी सुरू झाली. त्यांना असे फिरणे आवडत नसे. वडिलांनी ‘कुठे गेला होता?’ असे विचारले. आम्ही खोटे बोललो, ‘शाळा सुटल्यावर थेट घरीच आलो.’ आम्ही कदाचित खोटे बोलणार, हे वडिलांनी अगोदरच ताडले असावे. त्यामुळेच कदाचित त्या झाडाजवळ येऊन आम्हाला काही बोलले नसावेत.
आम्ही तसे सांगताच ते जवळ आले आणि जीभ बाहेर काढायला सांगितली. आता आपली चोरी पकडली जाणार, या भितीने गाळण उडाली. जीभ बाहेर काढताच खण्णकन कानाखाली बसली. ‘थेट शाळेतून घरी आला तर जीभ जांभळी कशी? शाळेत काय शाई पिलास? जांभळाच्या झाडाकडे कोण गेले होते? खरं बोल… जांभळं खायला गेला होता की नाही?’ वडिलांचे करड्या आवाजातील शब्द कानात घुसत होते. आमची चोरी पकडली गेली होती. आता आणखी खोटे बोलणे म्हणजे छडीच्या प्रसादाला आणखी निमंत्रण ठरणार होते. निमूटपणे खाली मान घालून जांभळे खायला गेल्याचे मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. मान्य करूनही खोटे बोलल्याबद्दल आणखी चांगलाच मार मिळाला. जांभूळ खाल्ल्याचे कधीच लपून राहात नाही. वडिलांना आम्हाला जांभळे खायला गेलो का नाही, यापेक्षा आम्ही खोटे बोलतो की नाही, हे तपासायचे असावे. त्यामुळे तेथे येऊन त्यांनी अटकाव करणे टाळले. जांभळे खाण्याचा आनंद घेऊ दिला. घरी आल्यानंतर आम्ही खरे उत्तर देतो की खोटे, हे तपासले. म्हणूनच मारतानाही जांभळे खायला जाण्याबद्दल ते मारत नव्हते, तर खोटं का बोलला, असे म्हणत बडवत होते. त्या वेळेपासून कधी खोटे बोलण्याची वेळ आली की आमचे जांभूळ आख्यान आठवे.
ll इति जांभूळ आख्यान ll
अतिशय सुंदर लिखाण.असेच सर्व झाडांविषयी व फळांविषयी लिहीत रहा सर.
उत्तर द्याहटवावा सर,एकदम भारीच.जांभळाचा सगळा इतिहास या लेखातून कळाला.भाग तीनमधील आपली लहानपणीची सगळी आठवण आमचीही अशाचप्रकारची आहे.शाळा सोडून पेरु,चिंचा खाणे इ.तुमची निरीक्षणे मात्र थोडी हटके असतात.त्यामुळे बांधावरल्या सा-या झाडांचा इतिहास नव्याने समजून घेणे भारीच वाटते.
उत्तर द्याहटवाअति सुंदर... अप्रतिम....
उत्तर द्याहटवाआपल्या जांभूळाख्यानात अकंठ बुडून गेलो.एक फळ आपल्यातल्या संवेदनशील माणसाला किती प्रेरित करते याचे प्रतीक म्हणजे हा लेख आहे. शास्त्रीय,संशोधकीय, ऐतिहासिक, ललित अशा किती तरी अंगानी हे लिखाण समृध्द झाले आहे.
उत्तर द्याहटवाअत्यंत उपयुक्त माहिती. छान लेख आहे. अनेकांना आपल्या लहानपणाची आठवण करून देणारा आहे.
उत्तर द्याहटवाप्रा डॉ बी एल चव्हाण.
सर जांबलाविषयी अगदी चौफेर लिहला आहे खूप छान. शक्य झाल्यास गुळवेल बद्दल लिहावं हि विनंती
उत्तर द्याहटवाखुप सुंदर सर,परीपूर्ण माहिती आहे.
उत्तर द्याहटवासर जांभूळ या फळा विषयीं खूप छान इत्यंभूत माहिती मिळाली।
उत्तर द्याहटवानेहमीप्रमाणे उत्तम....
उत्तर द्याहटवाडॉ एस डी पाटील
शिवराज महाविद्यालय,
गडहिंग्लज
वाचताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. घरच्यांचा डोळा चुकवून आंम्ही झाडावर चढून जांभळे तोडायचो.
उत्तर द्याहटवाछान माहिती मिळाली. असेच लिहीत राहा.👌💐
Nice information
उत्तर द्याहटवासर, अभिनंदन! जांभूळ आख्यान वाचलं. आवडला. मराठीबरोबर इतर देशी भाषांत, परदेशात जांभळाला कोणत्या नावाने ओळखलं जातं त्याची माहिती मिळाली. हा वृक्ष जगात कोठे कोठे आहे. तिथे त्याचं महत्त्व काय आहे. या सर्व गोष्टींचा परिचय झाला. बीपासून ते अगदी त्याच्या लाकडापर्यंतचा उपयोग आणि माहिती आपण या लेखातून खूप छान पद्धतीने दिलेली आहे. त्याचे महत्त्व त्याचा उपयोग या निमित्ताने अधिक कळला.
उत्तर द्याहटवाया झाडाच्या, फळांच्यानिमित्ताने लिहिलेली गाणी, कविता, आख्यायिका, दंतकथा, पुराणकथा यांची माहिती मिळाली.
एक-दोन गोष्टी मला यासंदर्भात सूचित कराव्याशा वाटतात. या झाडाला मुंगी लागते. म्हणजे कधीकधी मुंगी जांभळाचे झाड आतून पोखरून काढते. हे असं का होतं? याची माहिती ह्यांमध्ये असावी, असं मला वाटतं. आणि या लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी होतो हे बरोबर आहे. परंतु या लाकडाच्या चौकटी केल्या जातात. दरवाजे केले जातात. छपराचे वासे केले जातात.खांब केले जातात.परंतु तू शक्यतो तुळ्या केल्या जात नाहीत. याबाबतची माहिती या लेखात असावी असं मला वाटतं.
:-प्रा डॉ गोपाळ गावडे
जांभूळ झाड खूप कणखर आहे. मात्र पाणी कमी मिळाले तर मुंग्या लागतात. जिथे चांगली माती आणि पाणी मिळते तिथे खोड माशीलाही ते दाद देत नाही. लाकडाचा वापर तुलिसाठी करत. मात्र पन्नासेक वर्षांपूर्वी झालेली जंगलतोड आणि त्या मोठया आकाराच्या लाकडाचे इतर उपयोग यामुळे तेवढे मोठे लाकूड उपलब्ध होत नाही.दुसरे तुलिसाठी वापरायचे लाकूड सालीसह वर्षभर वाळवावे लागते. थोडा जरी ओलावा राहिला तर भेग पडते,
हटवाडॉ शिंदे सर, आपण जांभूळ या झाडाबद्दल अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती लिहली आहे. बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या. आपण असेच लिहीत रहा, उपयुक्त माहिती देत रहा, पुढील लेखासाठी शुभेच्छा !!
उत्तर द्याहटवाशिंदे सर जांभूळ या विषयावर कोणताही मुद्दा तुम्ही सोडला नाही असे वाटते
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाखूपच छान अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिखाण. जांभूळ आख्यान,अत्यंत सखोल, विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेख 👌
उत्तर द्याहटवासर अतिशय सुंदर माहिती लिहिलेली आहे आपले लेखन वाचून लहानपणीच्या आठवणी आल्या शिवाय रहात नाहीत आमच्या गावात शेतकरी जांभळं खायला विरोध करत नव्हती पण झाडांवर दगड मारले किंवा झाडांवर चढले तर फटके दिले जात अपरिपक्व जांभळाला आमच्या कडे ताबंटया म्हणतात त्या अतिशय तुरट लागतात महिला त्या आवडीने खातात
उत्तर द्याहटवाSir very innovative and rare information you shared in this article.As usual your writing is studious and informative. In future also expecting the same intellectual feast. Thank you very much and heartily congratulations.
उत्तर द्याहटवाVery mich information
उत्तर द्याहटवाआजपर्यंत फ्कत विट्ठल उमप यांच जांभळआख्यान माहित होत.पण खर्या अर्थान जांभळाच महत्व हा लेख वाचून समजला सर...खूप छान, मुद्देसुद आणि सुरेख मांडणी केली आहे सर...
उत्तर द्याहटवाखूपच छान...!
उत्तर द्याहटवाअतिशय अभ्यासपूर्ण मुद्देसुद लिखाण.
अभंनंदन सर..💐💐
छान,
उत्तर द्याहटवाअभ्यासपूर्ण लेख
अभिनंदन
💐 💐 💐
जांभूळ आख्यान मस्तच उतरले आहे. अभिनंदन सर!
उत्तर द्याहटवासर, जांभळाच्या झाडाविषयी सर्वांगाने उपयुक्त अशी माहिती ती चांगल्या पद्धतीने मांडली आहे. मी तर स्वतः सर झाडावर चढून जांभळे काढत होतो .लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आदिवासीचे वृक्ष म्हणून महत्त्व कळाले .अनेकांनी या झाडावरती लेखन व कविता केलेल्या एकत्र वाचनाचा योग आपण आनूण दिला त्याबद्दल धन्यवाद! पुढील लेखनासाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवाखूप सुंदर. काय अभ्यास आणि व्यासंग आहे राव. भाषा देखील ललितरम्य
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवासर चांगले शोधून केले आहे
उत्तर द्याहटवाThis is really valuable information.
उत्तर द्याहटवासर, नेहमी प्रमाणेच सविस्तर माहिती, जांभूळ फळा विषयी व झाडा विषयी. प्रथमच बऱ्याच गोष्टी कळल्या.
उत्तर द्याहटवाखूप सूक्ष्म आणि माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाफारच सुंदर सर .एखाद्या वैश्विक ज्ञानकोशचा भाग वाटावं इतकं अभ्यासपूर्ण तसेच उच्च साहित्यमूल्य असलेलं लेखन. मी देखील जांभूळ प्रेमी आहे .शेतात मोठ्या प्रमाणावर जांभळे लावण्याचा उपक्रम सध्या सुरू आहे.
उत्तर द्याहटवाVery nice and rare information sir
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख!! जांभूळ या झाडावर लिहिलेल सुंदर ललित 👏🙏
उत्तर द्याहटवाVery much informative. Great sir
उत्तर द्याहटवा