सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

द.. द.. दगडाचा


 दगड... हा शब्द रोज भेटणारा पण कुठेचं नसणारा. या दगडांची स्पर्धा भरवणे आणि दगड या विषयावर मासिकाचे दोन अंक प्रकाशित करणे... खरंच एक आश्चर्याचा धक्का... दगडावर मलाही लिहायला सांगीतले. मीही दगडावर लिहिले.. वैज्ञानीक नाही... मला जे वाटले ते...  'नवे गाव आंदोलनया मासिकाने ऑगष्ट २०१८च्या अंकात माझा लेख प्रकाशीत केला. तो तो मूळ लेख 'नवे गाव आंदोलन' मासिकाच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
---------------------------------------------------------------------------------------------------- 


दगड. ना काना, ना मात्रा. ना वेलांटी ना उकार. सरळ साधा, सोपा, जोडाक्षर नसलेला शब्द. असे असतानाही गुरूजी 'द' अक्षर शिकवताना 'द-दगडाचा' न म्हणता, 'द, द-दौतीचा' किंवा 'द-दफ्तराचा' का म्हणायचे? हे आजही न सुटलेले कोडे आहे. बरं, आजही शिक्षक 'द-दगडाचा' असे शिकवत नाहीत. बाकीची अक्षरे शिकवताना चालतात सोपे शब्द. अ-अननस, ग-गवत, म-मगर, फ-फणस, क-कमळ हे सारे सोपे शब्द चालतात. मग, दगडानेच काय आणि कोणाला धोंडा मारला, कळत नाही. हा दगडावर मोठा अन्याय आहे. गुरूजीनी दगड शिकवायला वर्ज्य केला असला, तरी  वर्गातल्या 'ढ' मुलाचे उत्तर चुकले की तेच गुरूजी, 'नुसता दगड आहे हा. गुरे वळायच्या लायकीचा' म्हणायचे. म्हणजे इथे दगडाच्या नशीबी दुजाभावच! असा हा दगड प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच.
दगड.... अगदी लहानपणी रांगताना बाळ धडपडते आणि दगडांच्या संपर्कात येते. दगडाला खरचटून अनेकदा जखमाही होतात. आणखी थोडे मोठे झाल्यावर दगड आपला दोस्त बनतो. रस्त्याने जाताना बेसावध क्षणी कुत्रा भुंकला की आजूबाजूला दगड आहे का? हे नजर शोधते. संरक्षक हत्यार म्हणून दगड हातात उचलून आपण धोका संपेपर्यंत जवळ बाळगतो. पुढे कुठे बांधकामाची वाळू पडलेली असेल, तर, तिच्यावर नाचायला आवडते. वाळू हे दगडाचे छोटे रूप. वाळूवर अशी मुले चढलेली कोण्या वडिलधाऱ्याने पाहिली, तर मात्र तो लगेच हातात दगड उचलून मुलांच्या अंगावर धावतो. झाडावरचे आंबे, चिंचा पाडायला दगडच मदतीला येतो. लगोरी आणि ठिकऱ्या खेळताना दगडच असतात. आता हे खेळच संपत चाललेत म्हणा. असा हा दगड जीवनात प्रवेश करतो आणि अविभाज्य घटक बनून जातो, तरीही गुरूजीपासून सर्वजण त्याचा उपयोग अपवादानेच कौतुकासाठी करतात.
बरे, दगड हा कांही आजच मानवाच्या उपयोगाला पडतो, असे नाही. अगदी सुरूवातीला मानवाने चार पायाने चालणे सोडले आणि तो दोन पायावर चालू लागला. तो इतरांपेक्षा वेगळा वागायला लागला. मग पुढे शिकार करायला लागला. शिकारीसाठी सुरूवातीला जी हत्यारे बनवली ती दगडाचीच. विस्तवाचा आगीचा वापर माणसाने थंडीपासून संरक्षण आणि अन्न भाजायला, शिजवायला सुरू केला. विस्तव मिळवण्यासाठी त्याने दगडाचाच वापर केला. गारगोटीचे दगड एकमेकांवर घासून ठिणगी पाडली जायची. पुढे दगड जमिनीवर घरंगळत जाताना पाहून माणसाच्या सुपिक डोक्यात चाकाची कल्पना आली. चाकाची निर्मिती झाली आणि आपण प्रगती करत करत इथवर पोहोचलो. सुरूवातीला ही चाकेही दगडाची असत. आजही गावोगावी असणारी जाती म्हणजे घरगुती पिठाच्या गिरण्याच होत्या. आज वीजेवर चालणारी गिरणी असली, तरी पिठ तयार करण्यासाठी दाणे दोन दगडांच्यामध्येच रगडावे लागतात. घर, विहीर किंवा मंदिर बांधायला दगडाचाच वापर केला जायचा आणि जातो. या दगडाना बांधून ठेवण्यासाठी पुरातन काळात शाडू, बेलफळ, उडिद दाळ  आणि बरेच काही... एकत्र करून मळीमध्ये मळला जायचा. ते रगडण्यासाठी वापरले जाणारे चाक हेही दगडाचेचं. दगडाने असे मळलेली मळी दोन दगडाना जणू प्रेमाने घट्ट पकडून ठेवायची. अगदी शेकडो वर्षापूर्वी अशा बांधलेल्या वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत.
समजा चाकाचा शोध लागला नसता किंवा आजच्या सर्व यंत्रातील सर्व चक्रे काढून टाकली तर आपण कोणत्या अवस्थेत असू, याची कल्पना करवत नाही. चाक नसलेल्या वातावरणात काय अवस्था असेल मानवाची. विमाने, रेल्वे, गाड्या सर्व कांही नसेल. घरातील मिक्सर असो किंवा जाते सर्व बंद पडलेले असेल. आपल्याला जगणे असह्य होइल. अशा सर्व प्रगतीच्या औद्योगिक क्रांतीच्या मुळाशी असणाऱ्या चक्राची कल्पना सुचवणाऱ्या दगडाला मात्र कायम हिणवले जाते. या दगडाने अनंत प्रकाराने मानवाला मदतच केली. एक काळ तर असा होता की सारे काही दगडाचे त्याला आपाण पाषाण युग किंवा अश्मयुग असे म्हणतो. एका युगाचा सम्राट असूनही ही अवहेलना!
पुर्वी अनेक उपकरणे ही दगडाचीच बनवली गेली. मसाला वाटण्यासाठी खलबत्ता बनला. चटणीसाठी उखळ बनवले गेले. त्याच्यासाठी लाकडाचे मुसळ बनवले. त्या उखळात काहीही घातले तर त्याचा भूगा होतो. मात्र काही बनेल माणसाना काहीही सांगीतले तरी ती प्रतिवाद करत राहतात, हार काही मानत नाहीत. अशा लोकावरून "उखळात घातले तर मुसळातून निघते" अशी म्हण तयार झाली. चिखलात दगड टाकला की अंगावर शिंतोडे उडणारच, घरी नकोशा झालेल्याला माकड पण दगड मारतात, आपल्या हाताने आपल्याच पायावर धोंडा कधी मारू नये, दगडापेक्षा वीट मऊ, ही काळ्या दगडावरची रेघ, लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण, दगडावर डोके आपटून फायदा काहीचं नाही...उलट डोक्याला खोक, प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, नाही चिरा नाही पणती अशा अनेक म्हणी दगडावरून मराठी भाषेत आल्या आहेत. दगडी पाला आणि दगड फुल यात खऱ्या दगडाचा काहीचं संबंध नसताना दगडाशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. मात्र या दोन्ही गोष्टी माणसासाठी अत्यंत उपयुक्त.
गावोगावी आणखी एक ऐकवली जाणारी मजेशीर दंतकथा आहे. त्या गावच्या कोणत्या तरी भागात एक दगड किंवा दगडाची मूर्ती असते. तो दगड किंवा मूर्ती म्हणे दरवर्षी गहूभर किंवा एक दाणा पुढे सरकते. मग तो दाणा गव्हाचा असेल, तांदळाचा असेल किंवा अन्य कोणत्याही धान्याचा! जेंव्हा ती मूर्ती एका विशिष्ट ठिकाणी पोहोचणार त्यावेळी जगबुडी होणार. मुर्तीपासून ती जागा हजारो मीटर दूर असते. आमच्या गावात असे निळकंठेश्वराचे मंदिर आहे. त्या मंदिराशेजारच्या टेकडीवर एक दगडाची नंदीची मुर्ती आहे. ती मुर्ती दरवर्षी गहूभर पुढे सरकत मंदिरातील पिंडीजवळ आली, की जगबुडी होणार असे मानतात. एवढे अंतर कापायला किती वर्ष लागणार? मग आपण बुडणार वगैरे अनेक कल्पना रंगवत आमचे बालपण गेले. असे अनेक गावातील लहान मुलांचे बालपण या दंतकथा ऐकून जगबुडीचे चित्र रंगवत जाते.   
पुढे मानवाने सर्वांगीण प्रगती केली. तो स्वत:साठी निवारा तयार करू लागला. सुरूवातीला गुहांचा वापर होत असे. त्या दगडातच असत. पुढे गवताचे खोपट आले. ते उभा करताना लाकडी मेढींना आधार द्यायला, घट्ट पकडून ठेवायला, मेढीभोवती दगडे बसवली जात. त्यानंतर दगड-मातीची घरे बांधली जावू लागली. त्याच्या पुढचा भाग म्हणजे सिमेंट काँक्रीटची जंगले उभी राहू लागली. या जंगलाना उभारण्यासाठी वीटा, वाळू आणि सिमेंटचा वापर होवू लागला. यातील वाळू दगडच. दगडाशिवाय निवारा उभारणे आजही अशक्य आहे. खरेतर दगडात बांधलेले घर हे नैसर्गिक वातानुकूलित राहते. दगडाची घरे हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड असतात. त्याच्या भिंती फोडणे चोरांना सहजशक्य नसते. दगड आपली सर्व परीने काळजी घेतो, आपल्या माणसासारखी. अनेक राजांनी किल्ले बांधले ते दगडातच. आपले कर्तृत्त्व सांगणारे ऐवज निर्माण केले ते शिलालेखाच्या रूपात. म्हणजे दगडातच. छत्रपती शिवाजी महाराजाना स्वराज्य निर्माण करता आले आणि त्यानी बलाढ्य शत्रूंशी सामना केला, तो या किल्ल्यांच्या मदतीने. ज्या राज्यात आर्थिक सुबत्ता आणि शांतता होती, त्यांनी कलाकारांना आश्रय दिला. अशा राजवटीतील आजही टिकून असलेली कला म्हणजे शिल्पकला. यातून अजंठा, वेरूळ, खजुराहोची लेणी निर्माण झाली, तीही दगडातच. दगडांचा वापर करून अनेक मंदिरे उभारली गेली. केवळ दगडावर दगड ठेवून बांधलेली हेमाडपंथी मंदिरे आजही आपला ऐतिहासिक वारसा आणि भक्कमपणा सांगत उभी आहेत. तरीही, आता लोकांना दगडांची घरे बांधायला नको वाटतात. उलट एखाद्याच्या क्रूरपणाला दगडाच्या हृदयाची उपमा दिली जाते. कदाचित म्हणूनच कवी इंद्रजीत भालेराव लिहीतात
      "त्याला फुटतो उमाळा, माया करितो रग्गड
      तरी क्रूर काळजाला, लोक म्हणती दगड"
नाही म्हणायला, पूर्वी कांही मुलांची नावे असायची दगडोजी, धोंडोजी अशी असायची. मात्र आजच्या युगात ही नावे चालतील का? हा मोठा प्रश्न आहे. द.मा. मिरासदार यांनी आपल्या "आणीबाणीतील गणेशोत्सव" या कथेतील आमदारांचे नाव दगडोजी धोंडोजी मांजरमारे असे घेतले आहे. वास्तवात दगडोजी देशमुखांचे चिरंजीव विलासराव मुख्यमंत्री झाले, केंद्रिय मंत्री झाले. तर धोंडो केशव कर्वे हे आपल्या कर्तृत्त्वाने अजरामर झाले. तर महिलांमध्ये धोंडूबाई कुलकर्णी या सुप्रसिद्ध गायिका झाल्याही नावे अपवादाने आणि नवसाने अशिक्षीत समाजात ठेवतात. एरवी कोणत्याही गोष्टींचे आंधळेपणाने अनुकरण करायला अर्ध्या पायावर तयार असणारा समाज, आज धोंडोबा किंवा दगडू अशी नावे ठेवायला तयार नसतो, हे मात्र खरे. मात्र 'खडा' या शब्दाने एक वेगळा अर्थही धारण केला आहे आणि युवावर्गात हा शब्द विशेष वापरला जातो. 
गोविंदाग्रज महाराष्ट्राचे वर्णन 'कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा' असे करतात. महाराष्ट्र खरोखरच कठिण खडकाचा भूस्तर असलेला प्रदेश आहे. यातून पाणी खाली पाझरणे कठिण असले तरी इथल्या कातळातील पाणी पिणारी माणसे मात्र दगडाच्या काळजाची नसतात. सहृदयता इथल्या माणसांच्या नसानसातून पाझरते. मात्र कठीण खडकातील पाणी पिणाऱ्या येथील माणसात कठिण संकटाना सामोरे जाण्याची ताकत येत असावी. मात्र या कठिण दगडातून पाणी जमिनीत पाझरणेही कठिण. भाराभर कुपनलिका खोदून मानवाने जमिनीतील पाणी काढून घेतले आणि आता त्या पातळीवर पाणी जाईनासे झाल्यावर जलयुक्त शिवार राबवायची वेळ आली आहे.
दगडाचा वापर माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होतो. दगडही आपले सारे काही मनापासून देतो. तुमची अवस्था कोणतीही असो, ग्लॅड, सॅड, मॅड, अफ्रेड किंवा डेड, दगड सोबतीला असतोच. आनंदी अवस्थेत माणसाला दगडे ही गाणी म्हणतात, असा भास होतो आणि मग "गीत गाया पत्थरोने..." असे स्वत:च गात सुटतो. भल्यामोठ्या दगडांच्या मध्ये एकटाच बसलेल्या माणसाचे चित्र पाहिले की तो दु:खी असावा, हे लगेच लक्षात येते. काहीही कारण मिळो, रस्त्यावरचे दगड उचलून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे मॅडचं असतात. हिर आणि रांझाचे, लैला आणि मजनूचे आणि तत्सम प्रेमवीर आणि प्रेमवीरांगनांचे प्रेम समजून न घेता त्याला दगड मारणारे, मॅडच असतात. नाहीतरी रागात असताना माणूस ठार वेडाचं झालेला असतो. ते इतके मॅड असतात की, 'हुस्न हाजीर है मोहब्बतकी सजा पाने को, कोई पत्थरसे ना मारे मेरे दिवानेको' ही प्रेयसीची आर्त आळवणी त्यांना ऐकायला जात नाही. घाबरलेला माणूस भक्कम दगडाआड लपलेला अनेक चित्रपटात दाखवतात. माणूस मेल्यानंतर त्याची आठवण म्हणून समाधी बांधली जाते आणि ती सुद्धा दगडाची. म्हणजेच माणसाची अवस्था कोणतीही असली तरी दगडाची साथ काही सुटत नाही. अशा या दगडाला जीवनातून वगळता येणे शक्य आहे का?
असे असूनही सर्व विसंगती दगडाच्याच बाबतीत आढळतात. तांदळातील खडा निवडून बाजूला टाकला जातो आणि तोचं माणूस दागिन्यांत मात्र खडे घालून अंगावर मिरवतो. एका दगडात दोन पक्षी मारणारा हुशार ठरतो, तर, व्यवहार शून्य माणसाला दगड म्हणले जाते. पुण्यातला प्रसिद्ध महागणपती हा दगडूशेठचा आणि मुंबईतील कुप्रसिद्ध चाळ दगडी चाळ. रामाला आणि वानरसेनेला लंकेला नेण्यासाठी बांधलेला सेतू हा दगडाचा आणि त्या युद्धात परस्पराचे सैन्य मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले ते दगडच. साप आणि उंदिर दिसला रे दिसला की त्याना मारायला हातात दगड घेतला जातो. मात्र सापाची आणि उंदिराची दगडाची मुर्ती दिसली की तेच हात जोडले जातात. दगडाला ठेचकाळले की बोट फुटते, जखम होते आणि तीचं जखम बरी व्हावी म्हणून दगडीपाला त्यावर बांधला जातो. खडा न् खडा माहिती असणाऱ्याला साहेब जवळ करतो आणि नसणाऱ्याला खड्यासारखा बाजूला ठेवतो. अशा एक ना अनेक विसंगती दगडाबाबत आढळतात.
दगडी चाळ नावाचा एक सिनेमा मराठीत आला. 'दगड, दगड, दगड, दगङ...' हे 'एलिझाबेथ एकादशी' या मराठी सिनमातील गाणे लोकप्रिय झाले. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीला दगड भलताच प्रिय! पत्थर ‍के सनम, काला पत्थर, लाल पत्थर, पत्थर के फुल, फुल और पत्थर, पत्थर और पायल, रास्ते का पत्थर, हिरा और पत्थर, पत्थर के इन्सान, पत्थर, पत्थर का ख्वाब अशा अनेक सिनेमांची नावे दगडावरून आली. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट लोकप्रिय झाले. 
दगडाची आणि माझी पहिली भेट कधी झाली, आठवत नाही. पण आम्ही सर्व भावंडे मी तिसरीत असल्यापासून शनिवारी दुपारी अर्धा दिवस, रविवार सकाळचा अर्धा दिवस, त्याचंप्रमाणे उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी माळावरच्या शेतात जायचो. ते शेत वाहीत करायचे होते. शेतात दगडे खूप होती. ती आम्ही गोळा करायचो आणि भूपृष्ठावरच दगड असलेल्या भागात टाकायचो. ढिग खूपच मोठा होऊ लागल्यावर वडिलानी ती व्यवस्थित रचायचे ठरवले. साधारण १५०० चौरस फुट जागेवर त्यांनी दगडे रचायला सुरूवात केली. बाहेर मोठी दगडे आणि आतील भागात लहान अशी रचना करू लागले. आम्ही शेतातील दगडे गोळा करून तिथे नेवून द्यायचो. दुपारी उन तापले की मध्यांतर व्हायचे. मग आम्ही कडेच्या लिंबाच्या झाडाखाली बसून जेवायचो. केलेल्या कष्टामुळे सपाटून भूक लागलेली असायची. स्वंयपाक काहीही असला तरी भरपूर जेवायचो. वडीलानी एक चपटा दगड शोधून ठेवला होता. तो उशाला घेवून मस्त झोपायचे. 'भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा' या म्हणीचा खरा अर्थ तिथेच कळला. वडिलाना डुलकी लागली की आम्ही मात्र कुठे रानमेवा मिळतो का, हे शोधत भटकायचो. कुठेतरी बांधाच्या दगडात मधाचे पोळे सापडायचे. हे आमचे दगड चाळ्याचे काम अनेक वर्ष चालले होते. त्यातून तीस बत्तीस फूट उंचीचा महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा दगडाचा ढिग एखाद्या किल्ल्यासारखा उभा राहिला. आज तीस चाळीस वर्षानंतरही तो ढिग तसाच उभा आहे. आज वडील नाहीत, पण तो दगडाचा ढिग पाहिला की मला माझे बालपण आठवते.
लहानपणी एकदा दगडाने माझा राग शांत केला होता. गावाजवळच्या आमच्या लाडक्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या रस्ता दुरूस्त करणाराने डांबर वितळवण्यासाठी जाळायला तोडल्या होत्या. मी ते पाहून भांडण काढले. तो मोठा होता. मी तेंव्हा बारा तेरा वर्षाचा होतो. मोठ्या लोकानी मला शांत करत बाजूला नेले. नाहीतरी कंत्राटदार आणि त्याचे मजूर दहा बाराजण होते. माझ्या बाजूने कोणीचं नव्हते. आमची लोकही मलाचं समजावत होत होते. भांडणात माझा टिकाव लागणे शक्यचं नव्हते. शेवटी मी रात्र होऊ दिली. त्यावेळी तिथे कोणीचं नव्हते. मग मी माझा सर्व राग त्या डांबर वितळवायच्या भट्टीवर काढला. खडीतली दगडे उचलून भट्टीवर मारली. शेवटी हात दुखायला लागला. भट्टी लोखंडी होती. तिच्यावर माझ्या दगड मारण्याचा काहीचं परिणाम झाला नाही, पण माझा राग मात्र शांत झाला होता. पुढे विद्यापीठात शिकत असताना सुरक्षा रक्षक लोखंडी घंटेवर दगडाचे घाव घालत किती वाजले ते सांगत असायचे.
अशा दगडातील एक दगड निवडून मूर्तीकार छन्नी आणि हातोड्याचा वापर करून दगडाला कोरत राहतो. त्यातून सुंदर मूर्ती घडवतो. लोक या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. तिला देव मानतात. त्या मूर्तीपुढे हात जोडतात. मंदिरातील त्या दगडाच्या मूर्तीला हात जोडायला जाताना पायरीच्या दगडांना  माणसे तुडवत जातात. मात्र दगडाचा वापर करून कोणी कुणाचा जीव घेतो, आपल्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोलीसावर दगड फेकतो. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतो.... तेंव्हा तो मंदिरातील दगडातील देव ढसाढसा रडत असतो. तो म्हणत असतो, 'माझ्यापुढे कशाला हात जोडता, तुमच्या काळजावर ठेवलेला दगड तेवढा दूर करा..... प्रथम तुम्ही तुमच्यातला माणूस ओळखा.... आजूबाजूच्या लोकातील माणूस ओळखा..... माझ्यात कुठे देव शोधता... माणसात लपलेला देव शोधा.... मुलाना देवाघरची फुले म्हणता आणि अनेक कळयाना जन्मापुर्वीचं मारता... ते थांबवा... तुम्ही देव बना.... माझ्यापुढे कुठे नैवेद्य ठेवता..... उपाशी जीवाना अन्न द्या..... पिकावरील इतर जीव मरावेत म्हणून किटकनाशके फवारू नका... तुम्ही तुमच्याच पायावर दगड मारून घेत आहात.... माझ्यावर कुठे पाणी ओतून अभिषेक घालता.... माझ्या पोटात असलेले पाणी बोअरवेलचा वापर करून उपसायचे थांबवा.... तो पाझर तसाच राहू द्या....... मग पाहा, विहीरीतील दगडालाही पाझर फुटेल.... 
नाही तर  दगडावर डोके आपटून घ्यायची वेळ तुमच्यावर येणार आहे.... निसर्ग वाचवा..... त्यात जास्त हस्तक्षेप करू नका.... नाहीतर तुम्हाला माझ्यावर डोके आपटत बसायची पाळी येईल.... त्यातून तुमचा कपाळमोक्ष ठरलेला आहे'.