बुधवार, १२ मे, २०२१

पांढरफळी…

 पांढरफळी… एक झुडुपवर्गीय वनस्पती... माळरानावर जंगलात सर्वत्र आढळणारी. आपल्या मस्तीत वाढणारी… जगणारी… खूप छान फुलणारी… फुललेले असो वा फळांनी भरलेले झाडाचे सौंदर्य एप्रिल ते जून या तीन महिन्यांत पहावे आणि डोळ्यांत साठवून ठेवावे असे. या झाडाविषयी आणि त्याच्या उपयोगाविषयी…


____________________________________________________________

 चैत्र महिना चैतन्याचा, सजीवसृष्टीचा नव्याने फुलण्याचा! या महिन्यात अनेक झाडे फुलतात. बहावा, सीतारंजन, कामिनी, अनेक प्रकारचे पाम, मोगरा, पारिजातक, जाई, जुई अशी अनेक. जंगलातील वातावरण तर गंधमिश्रीत झालेले असते. जंगल असणाऱ्या आणि नसणाऱ्या भागातही एक अशीच झुडुपवर्गीय वनस्पती उगवते, वाढते. सध्या या वनस्पतीचा बहराचा काळ. काही झाडे फुललेली आहेत. काहींनी फळे तयार करायला सुरुवात केली आहे तर काहींची फळे आता खाण्यायोग्य झाली आहेत. असे हे झुडुप म्हणजे पांढरफळी. समर्थ रामदास यांच्या ‘बाग’ प्रकरणातही त्याचा उल्लेख पांढरफळी असाच आहे. काही जण त्याला पांढरकळी म्हणतात. तर, काही भागात याला पीठवणी म्हणून ओळखले जाते. बुंदीच्या कळ्यांच्या आकाराची पांढरी फळे असल्याने पांढरकळी. सध्या माळरानावर आणि जंगलात सर्वत्र या झाडांचा मंद गंध भरलेला आहे.

पांढरफळीला हिंदीमध्ये शिनार म्हणतात. संस्कृतमध्ये याला भूरिफली, पान्डुफली, श्वेतकम्बुज, श्वेतमभूजा असे म्हणतात. दक्षिण भारतात याचे नाव कटुपीला आहे. इंग्रजीमध्ये याला इंडियन स्नोबेरी, बुशवीड, व्हाईट हनी श्रब म्हणून ओळखले जाते. याला शास्त्रीय भाषेत फ्ल्युजिया ल्युकोपायरस म्हणतात. ही झुडपे आसेतू-हिमालय, सर्वत्र मुक्त संचार करत वाढत असतात. पांढरफळी भारताबाहेर चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, आफ्रिका, इत्यादी देशातही आढळते. हिमालयात अगदी २००० मीटर उंचीवरही पांढरफळी आढळते. या झाडाला मुक्तपणे वाढू दिले तर त्याची उंची चोविस ते तीस फूट होते. हे झाड तसे बिनकाट्याचे. मात्र याचे लाकूड खूपच टणक असते. ज्यावेळेस याची फांदी तोडली जाते त्यावेळी वाळलेल्या कोवळ्या फांद्या काट्यासारख्या टोचतात. लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे, झोपडीवरील छपराच्या वाशासाठी केला जातो. यापासून बनवलेल्या हातातील काठ्या पिढ्यानपिढ्या टिकतात. याची मोठी लाकडे मिळत नाहीत. मात्र, असे लाकूड मिळाले, तर त्याचा वापर तंबूच्या खुंट्या, खुर्च्यांचे पाय बनवण्यासाठी करतात. या लाकडाचा उपयोग जळणासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. खोडावर पातळ लालसर साल असते. कोवळ्या फांदीवरील साल गडद चॉकलेटी लाल रंगाची असते. त्यावर बारीक ठिपके असतात.

याचे रोप बियापासून उगवते. लाल रंगाचा कोंब घऊन हे झाड उगवते. जमिनीपासून याला फांद्या यायला सुरुवात होते. कोवळी पाने सुरुवातीला लालसर असतात, नंतर ती सोनेरी पोपटी बनतात. कोवळी पाने सकाळच्या उन्हामध्ये अशी काही चमकतात की जणू झाडावर दिव्यांची रोषणाई केली आहे. नंतर ती रंग बदलत, गडद हिरवी होतात. पाने साधी, अंडाकृती आणि एकाआड एक बसलेली असतात. पानावर ठळक पोपटी शीरा असतात.  पानांचा आकार २.५ ते ७.५ सेंटीमीटर लांब आणि दीड ते साडेचार सेंटिमीटर रूंद भरतो. मुबलक पाणी मिळत असेल तर पाने मोठी होतात. शेळ्या-मेंढ्या याची पाने आवडीने खातात. या झाडाच्या फांद्या जळणासाठी मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. फांद्या तोडायला खूप कठीण असतात. लाकूड टणक असल्याने काळजीपूर्वक तोडाव्या लागतात. बुंध्यापासून झाड तोडले तरी पुन्हा नव्याने तितक्याच जोमाने फुटते. जमिनीतून मुळासकट झाड काढणेदेखील खूप जिकिरीचे असते. फांद्यांचे लाकूड जून झाले की त्याला कोपरे तयार होतात. बांधावरील या झाडामुळे चांगले कुंपण तयार होते. जमिनीपासून फांद्या येत असल्याने आणि त्या काटक असल्याने या झाडांच्या बुंध्याशी छोटे प्राणी घर करतात. अनेक झाडांच्या बुंध्याजवळ सशांची घरे आढळतात. विशेषत: वीणीच्या काळात सशांचा घरोबा या झाडाशी थोडा जास्त असतो. जवळजवळ असलेल्या फांद्यामुळे कुत्र्यांना या झाडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे हे झाड अशा प्राण्यांना सुरक्षित घर देतात.   

पावसाळ्यापूर्वी ही झाडे फुलायला सुरुवात होते. मार्चपर्यंत या झाडाकडे आकर्षक काहीच नसते. वाळलेल्या काड्या रोवल्यासारखी अवस्था असते. मात्र एप्रिलच्या मध्यापासून पानगळ झालेल्या या झाडावर पानांच्याबरोबर कळ्यांचे घोस बाहेर यायला सुरुवात होते. अगदी सात-आठ महिन्यापूर्वी उगवलेल्या झुडुपालाही कळ्या येतात. फांद्यांच्या शेंड्याला येणारी नवीन पानेही सोनेरी पोपटी असतात. त्यांच्या देठाजवळून कळ्यांचे घोस बाहेर पडतात. काही दिवसातच त्यांची फुले होतात. फुलांचा आकारही वेगवेगळा असतो. फुलांची लांबी एक सेंटिमीटरपर्यंत भरते. फुले एकाचवेळी फुलतात आणि फुलाआड पाने लपून जातात. या झुडपाला पाने साधारण हिरवट पिवळ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगांची फुले फुलली की, मधमाशांची या झाडावर गर्दी सुरू होते. या झाडाजवळ आल्यावर नेमका कोणत्या फुलातील मध घ्यावा, हा प्रश्न त्यांना पडत असावा. एकाच ठिकाणी त्यांना इतका मध मिळणार असल्याने, त्या आनंदी होऊन गुणगुणत असाव्यात. वारा विरूद्ध दिशेने असल्यामुळे गंध जरी पोहोचला नाही, तरी मधमाशांचे गुणगुणणे या झाडाकडे लक्ष खेचून घेते. एका झाडाभोवती एकाचवेळी शेकडो मधमाशा पिंगा घालत असतात. प्रत्येक फुलावर बसून मकरंद जमा करतात. या झुडपांना दोन प्रकारची फुले येतात. यामध्ये नर आणि मादी अशी दोन वेगळी फुले येतात. इवल्याशा फुलांतून मधमाशा त्यांना हवा असणारा मध बरोबर काढून घेतात. या फुलांमध्ये अनेक पुंकेसर असतात. स्त्रीकेसर तीन ते पाच असतात. मधमाशा आणि इतर कीटकांमुळे परागीभवनाची प्रकिया घडून येते आणि काही दिवसांत कळ्यांसारखी दिसणारी फळे दिसू लागतात. स्त्रीपुष्पांचे फळात रूपांतर व्हायला सुरूवात होते. इतर सर्व भाग लगेच गळून जातात.

पांढरफळीला दोन प्रकारची फळे येतात. काही झाडांची फळे मांसल आणि मोठ्या आकाराची असतात. या गोलाकार फळांचा व्यास आठ मिलिमीटरपर्यंत भरतो. तर काहींची फळे शुष्क आणि लहान असतात. प्रत्येक फळात तीन ते सहा बिया असतात. फळाने पूर्ण भरलेली फांदी पाहिली की तेथे मोत्याच्या सरी लटकवल्यासारखे चित्र दिसते. संधीप्रकाशात तर त्याचे सौंदर्य आणखी सुंदर दिसते. त्यामुळे पिकलेली फळे तोडायला नको वाटते. मात्र पांढरीशुभ्र पक्व झालेली फळे पाहिली की खाण्याचा मोह आवरत नाही. हात नकळत ही फळे कधी तोडतो आणि ती तोंडात कधी जातात कळतही नाही. गोड-तुरट चवीची ही फळे खाण्याचा आनंद बालपणापासून घेत आलो आहे. पांढरफळीची फळे अँटिऑक्सिडंट असतात. त्यापासून कर्करोगावरील औषध बनवण्यासंदर्भात संशोधन सुरू आहे. पोटातील जंतावरही ही फळे गुणकारी आहेत, असे मानले जाते. ग्रामीण भागात आजही जुनी जाणती मंडळी ही फळे आवर्जून खातात.

या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. पांढरफळीच्या मुळ्या वेदनाशामक आहेत. मूळ रेचक आणि कामोत्तेजकही आहे. परम्या’ या आजारामध्ये मुळांचा उपयोग करतात. पांढरफळीच्या पानांमध्ये क्वासीट्रीन, अल्ब्युमिन, रेझीन अशी औषधी संयुगे असतात. मधुमेह असणाऱ्या लोकांच्या जखमा लवकर भरून येत नाहीत. त्यांच्यासाठी खास या झाडाच्या पानांची भुकटी आणि तीळाच्या तेलापासून मलम बनवले जाते. जखमेमध्ये कीडे झाल्यास पांढरफळीच्या पानांचा रस किंवा चुरा तंबाखूमध्ये मिसळून लावले जातात. यामुळे किडे मरतात. पाने पाण्यामध्ये उकळून काढा बनवला जातो. हा काढा बद्धकोष्ठतेवर सारक म्हणून उपयोगी पडतो. हा काढा जखमा धुण्यासाठीही वापरतात. पांढरफळीची साल माशासाठी विष आहे. ही झाडे नदीकाठी किंवा पाणथळ जागी उगवत नाहीत. त्यामध्ये १० टक्के टॅनीन असते. यामुळे या झाडाच्या सालीचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी केला जातो. सालीचा उपयोग अतिसार आणि न्यूमोनियासारख्या आजारातही करतात.

अशा या पांढरफळीची फळे, पाने, मुळे, लाकूड सारे काही मानवासाठी उपयुक्त आहेत. हे झाड स्थानिक आहे. त्यामुळे ते इतर वनस्पती, वेली, गवतास बरोबर घेऊन वाढते. सुंदर फुललेले झुडुप अवश्य पहावे, त्याचे सौंदर्य डोळ्यांत साठवावे. रानमेवा म्हणून ही फळे दिसल्यानंतर आवर्जून खातो… आपणही या झाडाची माहिती असणाऱ्या मित्रासोबत असाल, तर या झाडाची जरूर ओळख करून घ्यावी आणि त्याच्या फळांचा आनंद घ्यावा.        


४० टिप्पण्या:

 1. अतिशय नवीन झाडाचा परिचय झाला.मी एकदा मलकापूर बस स्टँडवर रानमेवा घेऊन खाल्ला होता. त्यामध्ये ही फळे होती.पण त्याबद्दल फारसे काही माहीत नव्हते. आज कळले.छान वाटले.मनःपूर्वक धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 2. वा महत्त्वाची माहिती मिळाली. लेखही मस्त झाला आहे.

  उत्तर द्याहटवा
 3. फारच सुंदर माहिती ....आता बोटनीकडे असायला पाहीजेत होते असे वाटते ..मस्तच

  उत्तर द्याहटवा
 4. Very valuable information shared by you dear friend. Thanks a lot
  Dr. Dilip Kamble 1991 class mate
  Bhogawati College Kurukali

  उत्तर द्याहटवा
 5. खूप चांगली, महत्त्वाची आणि वेगळी माहिती मिळाली सर. आमच्या परिसरात ही वनस्पती आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पतींची माहिती मिळाली धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 7. Very nice and thanks for sharing rare information about this plant.👍👍👌

  उत्तर द्याहटवा
 8. खूप आवडले
  हा ध्यास असाच चालू दे
  अनेक शुभेच्छा

  उत्तर द्याहटवा
 9. नेहमीप्रमाणेच एक छान, आगळावेगळा आणि अभ्यासपूर्ण लेख
  डॉ शिंदे सर असेच लिहीत रहा आणि आमची बौद्धिक करमणुक करत रहा,
  खूप खूप शुभेच्छा

  उत्तर द्याहटवा
 10. अतिशय वेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची ओळख करून दिली आहे.अभ्यासू व व्यासंगी वृत्ती खूप विलक्षण आहे

  उत्तर द्याहटवा
 11. सर खूप दुर्मिळ माहिती आहे
  हा उपक्रम असाच चालू ठेवावा

  उत्तर द्याहटवा
 12. अतिशय सुंदर लेख,पांढरफळी वनस्पतीबद्दलची महत्त्वपूर्ण व चांगली माहिती। सर,आपणास खूप शुभेच्छा!!

  उत्तर द्याहटवा
 13. पांढरफळ या अत्यंत दुर्मिळ वनस्पतीचे वर्णन आणि उपयोगिता या लेखात मांडली आहे.
  लेखाच्या सुरुवातीला चैत्र महिन्यात फुलाफळांनी बहरणाऱ्या अनेक झाडा-झुडपांचे वर्णन आले आहे. त्यानंतर लेखशीर्षक असलेल्या पांढरफळची जन्मकथा, वेगवेगळ्या भाषेत, भूप्रदेशात आणि परदेशातील तिची नावे, पांढरफळीचे लाकूड, त्याचे गुणधर्म व उपयोगिता, विशेषकरून पांढरफळीचा जमिनीलगतचा बुंधा म्हणजे सशिणींचे बाळंतगृह यासारखे वर्णन लेखकाची सूक्ष्मदृष्टी आणि संशोधक वृत्ती नजरेत भरते.
  पांढरफळीची फुले म्हणजे मधमाशांचे मधशोधनाचे आगर आणि त्यातून परागीकरण होऊन पांढऱ्या फळासह स्वतःचं प्रसुत होणं; त्यातून पांढरफळ या नावानं आपण नावारूपाला येणं, त्या पांढरफळाच्या गोड-तुरट चवीचा आबालवृद्धासह सर्वांनाच होणारा आनंद, त्यातून त्याचे कॅन्सरसारख्या दुर्धर आणि इतर कित्येक आजारावरील औषधीपण यासारखे कितीतरी बारकावे टिपणारा हा मराठी साहित्यातील मुक्तगद्य प्रकारातील लेख वाचकांना जंगलाच्या दुनियेतील एका दुर्मिळ वनस्पतीची इत्थंभूत माहिती करून देणारा आहे. मानवी जीवाशी आणि जीवनाशी त्याचे नाते किती अतूट आहे याचीही ओळख तितक्याच संदर्भातून डॉ.व्ही.एन. शिंदे यांनी करून दिली आहे.

  उत्तर द्याहटवा
 14. अतिशय सुंदर लेख,पांढरफळी वनस्पतीबद्दलची परिपूर्ण चांगली माहिती मिळाली.
  अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा सर..!

  उत्तर द्याहटवा
 15. छान लेख, एका वेगळ्या झाडाची माहिती मिळाली. असेच लिहिते राहा.

  उत्तर द्याहटवा
 16. माहितीपूर्ण छान लेख. धन्यवाद सर.

  उत्तर द्याहटवा
 17. फार सुरेख व अभ्यासपूर्ण मांडणी.. उपयुक्त औषधाची माहिती..

  उत्तर द्याहटवा
 18. छान,उत्कृष्ठ आणि अप्रतिम माहितीपूर्ण लेख.

  उत्तर द्याहटवा
 19. खूपच छान माहिती. या वनस्पती बद्दल इतकी परिपूर्ण माहिती मिळाली. खूप धन्यवाद. आपली लेखमाला अशीच बहरत राहो हीच सदिच्छा.

  उत्तर द्याहटवा
 20. माहितीपुर्ण लेख, पंढरफळीचे चिकित्सक वर्णन ....

  उत्तर द्याहटवा
 21. छान लिहिलंय सर.मी ही वनस्पती पहिल्यांदा पाहिली.

  उत्तर द्याहटवा
 22. प्रत्येकवेळी खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती असते सर्व, त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते, यापुढे ही अशीच माहिती देत जा, धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 23. खूपच छान लेख!
  खूपच छान माहिती मिळाली सर, झाड पाहिले होते परंतु त्याचे नाव माहित नव्हते.

  उत्तर द्याहटवा
 24. अप्रतिम माहिती सर ! तुमची लेखन शैली त्यातील विषयज्ञान आणि लिखाणातील प्रवाहित पणा वाचकाला खिळवून ठेवतोय.ही महिती वाचल्यावर इतकं लक्षात येत आहे, लहानपणी आम्ही सागरेश्वर अभयरण्यामध्ये जो रानमेवा वेड्यासारखे अक्षरशः ओरबाडून खात होतो. ते हेच असावे. तेव्हा नाव माहिती नव्हते.

  उत्तर द्याहटवा
 25. अप्रतिम, नविन माहिती मिळाली.

  उत्तर द्याहटवा
 26. वा !! खूपच छान लिहिलं आहे. सर माझे मित्र श्री.पुंडपाळ सरांचे पुस्तक परीक्षण वाचले. अप्रतिम. अधून मधून वाचत असतो.

  उत्तर द्याहटवा
 27. माहितीपूर्ण लेख. धन्यवाद सर

  उत्तर द्याहटवा
 28. अतिशय उपयुक्त लेख.. आजच्या पिढीला अश्या महिती ची गरज आहे..इंटरनेट प्लॅटफॉर्म चा वापर करून खूप छान छान व उपयोगी माहिती सर्वांपर्यंत पोहोचते..Thank you Sir.तुमचे सर्व लेख वाचण्यास खूप उत्सुक आहोत.

  उत्तर द्याहटवा